प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.com



रविवार, 30 जून 2013

आत्मकरुणा .. निराशा ...एकटेपणा ! - प्रथम पर्व समाप्त

पुनर्वसनाची योजना !  ( भाग १७१ वा )

मुक्तांगण व्यसनमुक्तीसाठी तीन पातळयांवर काम करते .. ज्यात जनजागृती ..म्हणजे विविध शाळा कॉलेजेस .. कार्यालये .. या ठिकाणी जावून व्यसनाधीनता हा एक गंभीर मनोशारीरिक आजार आहे ..त्याचे दुष्परिणाम ..तसेच योग्य शास्त्रीय उपचारांनी व्यसनी व्यक्ती बरा होऊ शकतो हे दर्शविणारे पथनाट्य सादर करणे व व्याख्याने देणे ज्या मुळे नवीन व्यसनी निर्माण होण्यास आळा बसू शकतो आणि जे व्यसनात अडकले आहेत त्यांना उपचार घेण्याची प्रेरणा मिळते .. दुसरा भाग उपचारांचा असतो ज्यात व्यसनी व्यक्तीला निवासी उपचार देण्यात येवून त्याला आधी व्यसनाच्या शारीरिक गुलामीतून बाहेर काढणे ..आवश्यक ती वैद्यकीय मदत देणे .. नंतर समूह उपचार ..व्यक्तिगत समुपदेशन ..मानसोपचार तज्ञांची मदत ..आणि इतर उपचार देवून व्यसनापासून कायम दूर राहण्यासाठी त्याची मानसिक ताकद वाढविण्याचे कार्य केले जाते ..तिसरा महत्वाचा भाग हा त्या व्यसनी व्यक्तीच्या पुनर्वसनाचा असतो ..ज्यात त्या व्यक्तीने पुन्हा व्यसनाकडे वळू नये म्हणून .. त्याचे कुटुंबीय ..समाज ..यात पुनर्प्रस्थापित होण्यासाठी त्याला स्वतच्या विचार ..वर्तन आणि कृती यात बदल करण्याचे प्रशिक्षण देणे व आर्थिक बाबतीत स्वावलंबी होण्यासाठी त्याला नोकरी व्यवसाय ई. बाबतीत स्थिर करण्यासाठी त्याचे कुटुंबीय व समाजातील घटकांची मदत घेणे .. त्याचा आत्मविश्वास वाढविणे हे असते . ज्या लोकांना काहीच येत नसेल त्यांना काही तांत्रिक प्रशिक्षण देणे .. किवा एखादा छोटासा व्यवसाय करण्यासाठी या व्यवसायाचे शिक्षण देणे वगैरे देखील झाले पाहिजे असा मँडमचा कटाक्ष असे . त्या साठी ' अनिकेत प्रशिक्षण ' म्हणून विभाग होता मुक्तांगण मध्ये जेथे आम्हाला मेणबत्त्या बनविणे ..आकाश कंदील बनविणे .. प्लास्टिक मोल्डिंग च्या मशीन मध्ये प्लास्टिकच्या वस्तू बनिविणे वगैरे प्रशिक्षण दिले जाई ..अर्थात जे इच्छुक आहेत तेच लोक यात सहभागी होत असत ..बहुधा जास्त काळ मुक्तांगण मध्ये उपचार घेणाऱ्या मित्रांच्या बाबतीत हा पुनर्वसनाचा भाग असे .. मुक्तांगण मध्ये जास्त काळ राहणारे असे आम्ही सुमारे १० जण होतो त्यावेळी .. त्यापैकी काही निवासी कार्यकर्ता म्हणून संस्थेच्या कामात मदत करीत करीत असत ..असे निवासी कार्यकर्ता म्हणून काम करणे हा देखील पुनर्वसनाच्या प्रक्रियेचा भाग होता ..ज्यात आम्हाला विविध प्रकराच्या जवाबदा-या देवून ..बाहेरच्या जगात समर्थ पणे जगण्याचा आत्मविश्वास मिळणार होता ..निवासी कार्यकर्ता म्हणून जास्त काळ मुक्तांगण मध्ये व्यतीत करण्याने आमची व्यसनमुक्ती बळकट होण्यास अधिक मदत मिळत असे ..माझी इच्छा तर कायमचे या क्षेत्रातच काम करावे अशी होती .. कारण पूर्वी बाहेर इतर नोकऱ्या करण्याचा माझा प्रयत्न काही महिन्यातच शून्य होत असे ..

मी बाहेरच्या जगात जास्त काळ व्यसनमुक्त राहू शकत नाही असा माझा अनुभव होता .. मुक्तांगणला त्यावेळी मोजके सरकारी अनुदान होते .. निवासी कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या काही जणांना स्टाफ मध्ये म्हणजे पगारी कार्यकर्ता म्हणून नेमण्याचा प्रस्ताव आला होता ..माझी इच्छा होती की मला ही संधी मिळावी .. परंतु मी हे कोणाजवळ उघड पणे बोलू शकलो नाही .. मँडमनी जेव्हा एकदा मला माझ्या भविष्यकालीन योजनेबद्दल विचारले होते तेव्हा मी त्यांना सांगितले होते की ..मी नाशिकला तर जाणार नाहीय इतक्यात .. पुण्यातच कुठेतरी नोकरी करून आधी व्यसनमुक्ती बळकट करणार आहे . .त्या नंतर मग दोन महिने तो विषय बाजूला पडला होता .एकदा मँडमनी मला व आणखी दोघांना बोलावून सांगितले की आपल्या कडे पुनर्वसनाच्या योजनेचा भाग म्हणून एका कुबेर चेम्बर्स येथे असलेल्या एका इलेक्ट्रोनिक्स कंपनी कडून प्रस्ताव आलाय की इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंचे ..असेम्ब्लिंग ..साँल्ड्रींग ..वगैरे शिकायची कोणाला इच्छा असेल तर अशा दोन तीन जणांना मोफत प्रशिक्षण देण्यास ते तयार आहेत .. त्यासाठी मी तुमच्या तिघांचे नाव सुचविते आहे .. रोज दुपारी तीन ते पाच या वेळात तेथे जायचे आहे .. मँडमनी मी.. विजय..शेखर या तिघांची निवड केली होती . आम्हीही त्यास होकार दिला .. मग रोज दुपारी मँडम घरी जायला निघाल्या की त्यांच्या सोबत जिप्सी गाडीत आम्ही तिघे ..इंजिनियरिंग कॉलेजच्या अलीकडे असलेल्या कुबेर चेम्बर्स येथे जात असू ..तिसऱ्या मजल्यावर कंपनी होती . जाताना मँडम त्यांच्या गाडीने आम्हाला सोडत असत व येताना आम्ही बसने परत येत असू .. कँपँसिटर..रेजिस्टंर ..सोल्ड्रिंग गन..वगैरेचा वापर करून पीसीबी वर सगळे कसे असेम्बल करायचे व त्यापासून एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू कशी तयार होते हे शिकत होतो आम्ही ..पुन्हा एक महिन्य नंतर निवासी कार्यकर्त्यांपैकी काही लोकांना आता हळू हळू बाहेर राहण्यास सुरवात करावी ..जेणे करून बाहेरच्या जगात देखील व्यसनमुक्त राहण्याची सवय लागेल या हेतूने मुक्तांगण पासून २ किमी अंतरावर असलेल्या एका वस्तीत .. एका सामाजिक संस्थेमार्फत चालीवण्यात येणाऱ्या ' बेगर्स होम ' मध्ये काही लोकांनी रात्रीचे झोपायला जावे असा प्रस्ताव आला .. त्यासाठी मी ... शेखर ..अँग्नेलो ..प्रकाश यांची निवड झाली .आधी आम्ही चौघांनी तेथे जावून त्या पडक्या हॉलची जरा डागडुजी केली .. तेथे खाली फरश्या बसविण्याच्या कामात मदत केली .. मग तेथे राहणे सुरु करण्याचा दिवस उजाडला .. सकाळी ८ वा , मुक्तांगणला यायचे ..दिवसभर येथे कामात ..उपचारात सहभाग घ्यायचा ..रात्रीचे जेवण झाले की मग त्या बाहेरच्या जागेत झोपायला जायचे असे आम्हाला सांगितले गेले .मला हे मनापासून आवडले नव्हते ..मात्र तसे मँडमना सांगण्याची माझी हिम्मत नव्हती ..खरेतर आपल्या मनात काय आहे हे मोकळेपणाने मी बोलायला हवे होते ..मात्र तसे झाले नाही त्यामुळे मी मनातल्या मनात कुरकुर करत सगळे मान्य करत गेलो .

बाहेर झोपायला जाण्याच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी सिनेमा पाहायला म्हणून आम्ही चौघे परवानगी घेवून सायंकाळी ४ ला बाहेर पडलो ..सिनेमा पाहून ..नंतर बाहेरच जेवण करून आम्ही त्या बेगर्स होमच्या हॉल मध्ये झोपायला जाणार होतो ..दुसऱ्या दिवशी सकाळी परत ८ वाजता मुक्तांगण मध्ये यायचे होते ..खूप दिवसांनी कोणतेही निर्बंध नसताना आम्ही बाहेर पडलो होतो .. बसमध्ये माझ्या बाजूला अँग्नेलो बसला होता ..तर मागच्या सीट वर शेखर आणि प्रकाश .. अँग्नेलो ने त्याच्या खिश्यात हात घालून शंभराच्या काही नोटा बाहेर काढल्या व मोजून खिश्यात ठेवल्या .. त्याच्याकडे इतके पैसे पाहून मला नवल वाटले .. आम्हाला मँडम नी सिनेमा आणि जेवण असे मिळून प्रत्येकी ५० रु. दिले होते .. हे इतके जास्त पैसे याने कुठून आणले ? ..त्याला विचारले तेव्हा समजले की त्या दिवशी गुरुवार असल्याने त्याला भेटण्यासाठी त्याचे काका आले होते त्यांच्याकडून याने सुमारे १ हजार रुपये घेतले होते ..ते पैसे पाहून शेखरने माझ्याकडे पाहून डोळे मिचकावले व म्हणाला ' आज बहोत माल है अपने पास ..जो चाहे वो कर सकते है ..किसीको पता नाही चलेगा ' मी नुसताच हसलो .. येरवड्यात ' गुंजन ' थेटरला त्यावेळी सनी देओलचा ' नरसिंहा ' हा सिनेमा लागला होता . तिकिटे काढून जरावेळ बाहेर चहा.. सिगरेट झाल्यावर आम्ही सिनेमा थेटर मध्ये बसलो .मध्यंतराच्या आधी प्रकाश उठून लघवीला म्हणून जो बाहेर पडला तो ..नंतर सुमारे अर्धा तास उलटून गेला तरी परत आला नाही ..आम्ही तिघेही त्याला शोधायला बाहेर पडलो ..थेटरच्या आवारात सगळीकडे शोधले पण प्रकाश काही सापडला नाही ..म्हणजे तो पळून गेला होता हे नक्की झाले .. आम्हाला उगाच अपराध्यासारखे वाटू लागले ..प्रकाश जरी जास्त दिवस मुक्तांगण मध्ये रहात होता तरी तो मनापासून नाही तर त्याच्या आईवडिलांच्या आग्रहावरून रहात होता .. त्यामुळे त्याला संधी मिळताच त्याने पोबारा केला होता . आम्ही एसटीडी वरून कॉल करून मुक्तांगण मध्ये प्रकाश पळून गेला ही बातमी कळविली . मग सिनेमा संपल्यावर .. जेवण करायला म्हणून बाहेर पुणे शहरात गेलो ..शेखर आणि अँग्नेलोच्या नशेच्या गप्पा सुरु झाल्या ..पुण्यात कोठे ब्राऊन शुगर मिळते वगैरे .. त्यांच्या बोलण्यावरून त्यांना नशा करण्याचे ' ऑब्सेशन ' आलेय हे मला समजले .. पण सोबत मी असल्याने कदाचित ते उघड तसे म्हणत नव्हते .. मी त्यांच्यात सामील होईन की नाही याची त्यांना भीती वाटत असावी ...शेखर शेवटी मला न राहवून म्हणाला ' तुषार..देख यार बहोत दिन हो गये अपनेको यहाँ.. आज जरा मौका मिला है ..पैसे भी है .. जरा मूड बन रहा है गर्द पीने का .. हम दोनो पियेंगे आज .. चाहे तो तू भी पी ले !' शेखरच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मी म्हणालो ' यार मेरेको जमके भूख लगी है ..मै तो मस्त खाना खावूंगा '

( बाकी पुढील भागात )

================================================================

आँब्सेशन ! (भाग १७२ वा )

अँगी आणि शेखर यांना खूप दिवसांनी हातात भरपूर पैसे आणि स्वातंत्र्य मिळाल्यामुळे नशा करण्याची तीव्र इच्छा होतेय हे मला समजले .. सुरवातीला व्यसनाने दिलेला आनंद व्यसनी व्यक्तीच्या अंतर्मनात खूप खोलवर रुजलेला असते ...संधी मिळताच पुन्हा एकदा तो आनंद घेण्याची इच्छा उफाळून येते हाच या आजाराचा दुर्दैवी भाग आहे ..अशा वेळी काही पथ्ये पाळण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात शिकविले जाते ..त्यात मोकळेपणी आपल्या मनातील विचार ... भावना आपल्या जवळच्या व्यक्तीकडे बोलून दाखवणे .. व्यसन करण्याची इच्छा होतेय हे जरी खरे असले तरी ..या पूर्वी या इच्छेने आपला कितीतरी वेळा घात केला आहे याची स्वतःला आठवण करून देणे .. व्यसनामुळे आपले झालेले नुकसान आठवणे ...आपण फक्त एकदा ..किवा थोडेसे करून नंतर थांबू शकलो नाहीय ..तर प्रत्येक वेळी एकदा ..थोडेसे सुरु झाले की पुन्हा काही दिवसातच आपण त्याच दुष्टचक्रात अडकलो आहोत..ही इच्छा ..ही तीव्र ओढ तात्पुरती आहे ..अशा वेळी मन दुसरीकडे तरी कुठेतरी गुंतवावे लागते ...एकदा मनाला असे डायव्हर्ट केले की ती इच्छा निघून जाते वगैरे .. तसेच अशा वेळी सर्वात प्रथम गोष्ट अशी की आपण मानत असलेल्या ईश्वराची मनात प्रार्थना करणे ..त्या सर्वोच्च शक्तीकडे .. व्यसन न करण्यासाठी शक्ती मागणे ..मग पोटभार जेवण करणे किवा काहीतरी खाणे ज्यामुळे मनाची बैचेनी ..अवस्थता कमी होण्यास मदत मिळते .मी मुक्तांगण मध्ये खूप निर्धाराने आलो होतो ..तसेच .. खूप प्रयत्न केल्यानंतर अँडमीशन मिळवली होती .. बाहेर आता आपल्याला कोणताही आधार नाही अशी मनाशी खुणगाठ बांधली होती ..अशा वेळी पुन्हा तीच चूक करून उरला सुरला ..मुक्तांगणच्या लोकांचा विश्वासघात करणे मला नक्कीच परवडणारे नव्हते हे मी जाणून होतो ..त्या मुळे शेखर आणि अँगीच्या बोलण्याकडे मी दुर्लक्ष करत होतो .

' यार मेरेको बहोत भूख लगी है ..पहेले खाना खाते है ' असे म्हणून मी त्यांचे मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करीत होतो .. मात्र त्यांचा तुणतुणे सुरूच राहिले ..मग वैतागून मी म्हणालो ' आप लोगो को जो करना है करो ..मै नही करूंगा ' मी तुमच्यात सामील होणार नाही असे स्पष्ट सांगितल्यावर त्यांचा जरा विरस झाला ..मग आपण दोघेच ब्राऊन शुगर पिवू अशा त्यांच्या गप्पा सुरु झाल्या .. पण त्यांच्या मनात मुख्य भीतीही होती की मी त्यांनी काय काय केले ते उद्या मुक्तांगण मध्ये गेल्यावर मँडम ना सांगेन याची .. शेखर मग म्हणाला ' तुषार देख तू नही करेगा ..ये बहोत अच्छी बात है .. लेकिन साले तू कल सब मँडम को बता देगा ऐसा लग रहा है ' यावर मी त्यांना आश्वासन दिले की तुम्हाला जे करायचे ते करा मी कोणालाही काहीही सांगणार नाही .. ते थोडे निर्धास्त झाले .. तरी त्यांना इतके दिवस माझ्यासोबत राहून हे ठावूक झाले होते की याच्या पोटात कोणतही फार काळ रहात नाही ..मँडमला नाही पण इतर कोणाला तरी हा नक्की हे बकणार .. हो.. नाही करत करत त्यांनी ब्राऊन शुगर चा विचार सोडून दिला ..मग ते दारू कडे वळले .. ' चलो हम गर्द नही ..लेकिन दारू तो पियेंगे ' असा प्रस्ताव त्यांनी मांडला . मी त्यालाही स्पष्ट नकार दिला .. मला भूख लागली आहे हे पालुपद सुरूच होते माझे ..मग दारूचा विचारही बारगळला .. मग संवादाची गाडी जरा वेळ ' बुधवार पेठ ' या विषयावर रेंगाळली ...शेवटी आम्ही मस्त नॉनव्हेज जेवण करून ..आमच्या नव्या निवासस्थानी ' बेगर्स होम ' मध्ये सुखरूप परतलो.

दुसऱ्या दिवसापासून आमचे वेगळे रुटीन सुरु झाले होते .. सकाळी ' बेगर्स होम ' मध्येच अंघोळ वगैरे उरकून आम्ही आठ वाजता मुक्तांगण मध्ये जात असू ..मग दिवसभर तेथेच राहून पुन्हा रात्री मुक्तांगण मध्ये जेवण झाले की परत ' बेगर्स होम ' ..दुपारी नियमित पणे मँडम च्या जीप्सीतून ' इलेक्ट्रॉनिक असेम्ब्लिंग ' च्या प्रशिक्षणाला जाणे सुरूच होते... हा नवीन बदल मला मनापासून आवडला नव्हता .. कारण मला पूर्णवेळ मुक्तांगण मध्येच राहायची इच्छा होती .. काही दिवसांनी हे आपण मँडमना सांगू आणि परत मुक्तांगण मध्येच राहायला येवू असे मी ठरविले होते मनाशी .. त्याच काळात मँडम आजारी होत्या म्हणून चार दिवस मुक्तांगण मध्ये आल्या नाहीत .. मुंबईला कसल्यातरी तपासण्या करायला गेल्या आहेत हे समजले .. माझ्या सुमारे आठ महिन्याच्या मुक्तांगणच्या वास्तव्यात मँडम सलग इतके दिवस सुटीवर पहिल्यांदाच गेल्या होत्या .. त्यांचे आपल्या कामावर इतके प्रेम होते की त्या बहुधा सुटी घेत नसत ...अनेकदा तर त्या जेव्हा नाशिक ..मुंबई ..सातारा येथे तेथील जुन्या रुग्णांचा फाँलोअपचा दौरा करत असत तेव्हा पुण्याला रात्री २ वाजता परतल्या तरी मुक्तांगण मध्ये इतक्या रात्री एक चक्कर मारत असत .. मँडमचे असे अचानक मध्यरात्री मुक्तांगण मध्ये येणे आमच्यासाठी खतरनाक असायचे .. कारण सर्वानी रात्री ११ वाजता झोपले पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता ..मात्र बहुधा आम्ही निवासी कर्मचारी आणि काही वार्डातील अवस्थ गर्दुल्ले काही रात्री लवकर झोपत नसत ..आमची लायब्ररीत काहीतरी थट्टा..मस्करी सुरु असे ..तर वार्डातील लोक आपल्या जागण्याने इतरांना त्रास नको म्हणून वार्ड जवळ असलेल्या संडास बाथरूमच्या मोकळ्या जागेत गप्पा मारत बिड्या फुंकत टाईम पास करत असत .. व्यसन जरी बंद झाले असले ... जेवण वगैरे सुरळीत झाले असले तरी वेळच्यावेळी झोप येणे सुरु व्हायला गर्दुल्ल्यांना ..दारूड्यांच्या तुलनेत थोडा जास्त वेळ लागतो ...मँडम अशा रात्री राउंड वर आल्या की आधी सरळ लायब्ररीत शिरत ..आम्हाला झोपायला हाकलून मग वार्ड मध्ये ..सरळ बाथरूम मध्ये जावून तेथील लोकांना बाहेर काढून झोपायला लावत .. बंधूला एकंदरीतच विश्रांतीचे वावडे होते .. तो रात्री बेरात्री देखील कपडे धुणे .. बागेत खड्डे करून नवीन झाडे लावणे वगैरे कामे करत असे .. त्याला मँडम हमखास असेल तेथून शोधून काढून झोपायला पाठवत ..कारण बंधू असा तीनचार दिवस पुरेशी विश्रांती न घेता जागला की त्याचा एकदम कोणत्यातरी शुल्लक करणावरून स्फोट होई ..कोणावर तरी प्रचंड आरडा पओरडा करत असे तो ... मग त्याला व्यक्तिगत समुपदेशन करून मँडम शांत करत असत. व्यसन बंद केल्यावर ..लवकरात लवकर सर्व सामान्य जिवन जगायला सुरवात झाली पाहिजे असा मँडमचा आग्रह असायचा .

( बाकी पुढील भागात )

================================================================

आत्मकरुणा .. निराशा ...एकटेपणा ! (  भाग १७३ वा )

' बेगर्स होम ' मध्ये राहण्याचे आमचे रुटीन व्यवस्थित सुरु झाले होते .. त्या दिवशी आँब्सेशनचा यशस्वी सामना केल्यानंतर पुन्हा आम्ही नीट स्थिरावलो होतो .. एकदा अचानक दुपारी १२ च्या सुमारास माझा मोठा भाऊ व वाहिनी मला भेटायला आले ... ते पुण्यात कोणत्यातरी कार्याच्या निमित्ताने आले होते ..लगेच परत जायचे होते त्यांना.. म्हणून जास्त बोलता आले नाही ...माझ्याशी पाच मिनिटे बोलून ते मँडमना भेटण्यासाठी म्हणून वरच्या मजल्यावर गेले ..त्या पाच मिनिटात मी न राहवून वाहिनीला अनघाबद्दल हळूच विचारले ' अनघाचे काही पत्र वगैरे आले का ? काही माहिती मिळाली का ? ' यावर त्या पटकन म्हणाल्या ' अजून विसरला नाहीत तुम्ही तीला ? आता कायमचे विसरायला हवे तुम्ही हे ' मला हे ऐकून जरा धक्काच बसला .. म्हणजे बहुधा अनघाबद्दल त्यांना काहीतरी निश्चित माहिती असावी मात्र मला सांगण्यासारखी ती माहिती नसेल म्हणून त्यांनी मला असे कोड्यात टाकणारे उत्तर दिले असावे .. मला भेटून ते दोघे मँडमना भेटले आणि निघूनही गेले ... ते गेल्यानंतर मँडमनी मला भेटायला बोलाविले .. ' काय म्हणत होता भाऊ ? ' ' काही विशेष नाही मँडम ..तो इथे पुण्यात एका नातलगांच्या लग्नाला आला होता ..सहज म्हणून मला भेटून गेला ' माझे उत्तर गुळमुळीत होते .. वर मी मँडमला ' तुमच्याशी काय बोलला असे विचारले ? ' त्यावर मँडम नुसत्याच हसल्या ..' तुला काय वाटते ..काय बोलले असतील ? ' पुन्हा त्यांचा प्रतिप्रश्न ..' त्यांनी मी काय काय त्रास दिला ते सांगितले असेल तुम्हाला ..किती पैसे उडविले .. काय काय भानगडी केल्या वगैरे ' माझ्या मनात होते ते मी बोलून दाखवले ' ..मला मध्येच थांबवत त्या म्हणाल्या ' असे तुला वाटतेय .. प्रत्यक्षात त्यांनी अजिबात तुझ्या तक्रारी केल्या नाहीत ..फक्त आमचे आता पुढे काय ? तुझे सध्या कसे चालले आहे या वर बोलणे झाले ..प्रत्येक वेळी असा उलटा विचार करणे योग्य नाही .. याच सवई मुळे कदाचित तुझा घरच्या लोकांशी सुसंवाद होत नाही ..ते काय विचार करतील ..काय बोलतील ..काय करतील हे सगळे तू आधीच गृहीत धरतोस आणि ते देखील नकारात्मक पद्धतीने .. त्याचा तुलाच त्रासही होतो ..त्यांच्या साठी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की तू व्यसनमुक्त आहेस .. नव्याने आयुष्य पुन्हा घडविण्याचा प्रयत्न करतो आहेस हे सगळे ऐकून त्यांना आनंद झालाय ' मँडमचे बोलणे एकूण मला बरे वाटले ... मग इलेक्ट्रॉनिक क्लासची प्रगती .. नवीन बेगर्स होम या जागेत झोपायला कसे वाटते वगैरे विचारून त्यांनी मला निरोप दिला .

त्या दिवशी रात्री पुन्हा टक्क जागा होतो .. अनघाचे लग्न तर झाले नसेल ? हा विचार राहून राहून मनात येत होता ..तसे झाले असेल तर माझ्या व्यसनमुक्त राहण्याला काहीच अर्थ राहिला नसता ..जिच्या प्रेरणेने ..जिच्या मुळे मी व्यसनमुक्तीचा निर्धार जपत होतो तीच जर जीवनात नसेल तर सगळे शून्य असे वाटत होते .. दुसऱ्या दिवशी पासून माझ्या वागण्यात बदल झाला .. मी शांत शांत राहू लागलो ..कोणत्याच कामात मन लागेनासे झाले .. हा बदल कोणाच्या फारसा लक्षात आला नाही ..काही दिवसातच माझा इलेक्ट्रॉनिकचा कोर्स संपला व तेथेच मला नोकरी लागली ..म्हणजे सकाळी ९ ते दुपारी चार या वेळात मी तेथेच थांबून शिकायला येणाऱ्या इतर प्रशीक्षणार्थीना मदत करावी असे मला सांगितले गेले व त्याचा पगार म्हणून मला सुराविताला महिना पाचशे रुपये मिळणार होते .. मी ते मान्य केले .यात एक अडचण अशी होती की सकाळी मला लवकर निघावे लागे कारण ९ वाजता मला येरवड्याहून इंजिनियरींग कॉलेज जवळ ' कुबेर चेम्बर्स ' ला जावे लागे .. सकाळी ६ ला उठून मी फ्रेश होऊन मुक्तांगणला जाई ..मग तेथे चहा घेवून लगेच रात्रीच्या उरलेल्या पोळ्या आणि जर तयार असेल तर नाश्त्याची उसळ डब्यात घेवून लगेच निघावे लागे .. दोन मुले आणि दोन मुली असे आम्ही एकूण चार जण तेथे नोकरी करत होतो .. दुपारी जेव्हा सगळे डबा खायला बसत तेव्हा मला माझ्या डब्याची लाज वाटे ..कारण माझ्या डब्यात कालच्या शिळ्या पोळ्या आणि असली तर उसळ नाहीतर ...नुसत्या पोळ्या व कांदा लसून मसाला असे .. एक दोन वेळा तर रात्री पोळ्या उरल्या नाहीत म्हणून मला डबाच नेता आला नाही .. मला रोज खर्चायला म्हणून मुक्तांगण मधून फक्त बस भाड्यपुरते पैसे मिळत होते .. एखादा रुपया वर उरत असे कधी कधी ..ज्या दिवशी डबा नेत नव्हतो त्या दिवशी मी एक वडापाव खात असे .. एकेकाळी हजारो रुपये उडविणाऱ्या वर अशी अर्धपोटी राहायची वेळ येते या बद्दल मला फार वाईट वाटे .. त्याच काळात मँडम पुन्हा आजारी पडल्या ..पुन्हा त्यांना मुंबईला उपचारांसाठी जावे लागले ..बातमी अशी पसरली होती की मँडमना कँन्सर झालाय ..ही बातमी आमच्या सर्वांसाठीच धक्कादायक होती .. इतक्या चांगल्या व्यक्तीलाच नेमका असा दुर्धर आजार का व्हावा ? जगात देव असेल तर तो नक्कीच निष्ठुर आणि अन्यायी आहे असे वाटू लागले .. मुक्तांगण आता स्वतंत्र होऊन ... उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी पांढरा पायजमा आणि पांढरा कुर्ता किवा पांढरा शर्ट असा युनिफार्म ठरला होता .. निवासी कार्यकर्त्यांकडे उपचार घेणाऱ्या सगळ्या मित्रांचे हे युनिफार्म धुण्याचे आणि नीट वळवून इस्त्री करून त्यांना देण्याचे काम सोपविण्यात आले ..याचे कारण इतक्या लोकांना एकदम कपडे धुण्यासाठी बाथरूम मध्ये जागा होत नसे तसेच सुमारे ७० लोकांचे कपडे वाळत घालण्यासाठी वार्ड मध्ये सोय नव्हती ..हे कपडे धुण्यासाठी एक वॉशिंग मशीन आणले होते .. एकाने वार्डमधील लोकांचे कपडे विशिष्ट वारी म्हणजे मंगळवारी व शनिवारी गोळा करायचे ..दुसऱ्याने ते कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवायचे ..सुकवायचे आणि एकाने इस्त्री करून ते परत वार्डात ज्याचे त्याचे कपडे त्याला द्यायचे अशी कामे वाटून दिली गेली ..दिवसा चार वाजेपर्यंत मी कुबेर चेम्बर्स मध्ये नोकरी करून मग संध्याकाळी परत मुक्तांगण मध्ये येत होतो .. तेथे रात्रीचे जेवण करून पुन्हा परत बेगर्स होम मध्ये जात होतो म्हणून माझ्या कडे आठवड्यातून दोन वेळा वार्डमधील मित्रांच्या कपड्यांना इस्त्री करण्याचे काम सोपविले गेले ...त्यासाठी एक मोठी वजनदार इस्त्री देखील आणली गेली .

अनघाचे लग्न झाले की काय ही शंका ..कुबेर चेम्बर्स मध्ये डब्यावरून वाटणारी लाज .. मला दिले गेलेले इस्त्रीचे काम ..आणि मँडमचा आजार या सगळ्या गोष्टी माझ्या पचनी पडत नव्हत्या ...खूप अवस्थ वाटू लागले मला .. मी किती गरीब ..बिचारा .. आणि हे सगळे जग किती स्वार्थी निष्ठुर अशी आत्मकरुणेची भावना मनात निर्माण होऊ लागली .. तसेच आता अनघा कधीच आपली होणार नाही हा विचार निराशाजनक होता .. अश्या सगळ्या गोष्टी मला समुपदेशकाकडे बोलायच्या होत्या मनमोकळे करायचे होते ..परंतु दिवसा कामासाठी बाहेर जावे लागे ..मी परत येईपर्यंत सगळे समुपदेशक घरी निघून जात ..खास सुटी घेवून हे सगळे मी कोणाकडे तरी बोलायला हवे होते ..त्या साठी एक दिवस कुबेर चेम्बर्सला गेलो नसतो तरी चालले असते पण मला हे बोललेच पाहिजे असे महत्व वाटले नाही ..मी मनातल्या मनात कुढत दिवस काढत होतो ...इतर सगळे माझ्यापेक्षा खूप सुखी आहेत ..जगात सर्वात जास्त दुखी: असा मीच आहे हा विचार मनात पक्का बसला .. त्यामुळे माझे इतरांशी बोलणे एकदम कमी झाले ... सारखे झोपून रहावेसे वाटू लागले ..कारण रात्री उलट सुलट विचार करून पुरेशी झोप मिळत नव्हती ..एकदोन वेळा मी कुबेर चेम्बर्स मधून तब्येत बरी नाही या कारणाने लवकर सुटी घेवून बेगर्स होममध्ये जावून दुपारचा झोपून राहिलो ..एकदा असाच खालच्या मोठ्या होलमध्ये रात्रीचा कपड्यांना इस्त्री करीत होतो ..सत्तर लोकांचे पायजमे आणि शर्ट असे मिळून एकूण १४० कपडे इस्त्री करायचे होते .. ती जड इस्त्री घेऊन नशिबाला दोष देत काम सुरु होते .. या अशा जगण्याला काही अर्थ नाही हा विचार मनात पक्का होत होता ...नेमके किती दिवस हे कष्ट करावे लागणार हे अनिश्चित होते .. व्यसनमुक्तीचे सुमारे ९ महिने होत आले होते तरीही ..मनासारखे काहीच घडत नव्हते .. पुन्हा व्यसन करायचा पर्याय तर नव्हताच ..मग ..मग हे जिवनच संपविले तर ? ..सगळ्या गोष्टी संपतील .. कुठलेच दुखः राहणार नाही .. असा आत्मघाताचा विचार मनात येवू लागला .

( बाकी पुढील भागात )


================================================================

ससून सर्वोपचार रुग्णालय !   ( भाग १७४ वा )

सुमारे अर्धे कपडे इस्त्री करून झाले होते ..अजून ७० कपडे तरी बाकी होते इस्त्री करायचे .. जीवावर आल्यासारखा मी संथ पणे काम करत होतो ...रात्रीचे ९ वाजत आलेले .. खालच्या ' अनिकेत प्रशिक्षण ' च्या हॉल मध्ये मी एकटाच होतो .. मनातला अंधार वाढत गेला तसा हे जिवन संपवावे असे विचार मनात दाटून येवू लागले .. गेल्या ९ महिन्यापासून धुम्रपान सोडून कोणतेही व्यसन न करता देखील मला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत होता .. खरे तर जगात प्रत्येकालाच अशा प्रकारच्या आर्थिक ..मानसिक वगैरे अडचणींचा सामना करावा लागतो .. पण असा सामना करणे मला कठीण जात होते ..कारण अनेक वर्षे व्यसन करून मी आत्मविश्वास गमावला होता ..तसेच जीवनात सगळे काही झटपट मिळावे ही वृत्ती असल्याने ..चांगले जिवन सुरु होण्यास लागणारा वेळ माझ्यासाठी जीवघेणा वाटत होता ...खरे तर माझे जिवन संकटमय करण्यास मीच कारणीभूत होतो .. बेजवाबदार वर्तन करून .. स्वतच्या मर्जीने जगून .. इतरांच्या भावनांची पर्वा न करता मी जगलो होतो .. त्याचीच फळे म्हणून मला जीवनात स्थिरावण्यास वेळ लागत होता ..परंतु या संकटांची जवाबदारी स्वतःकडे न घेता ...मी अन्याय होतोय या भावनेने ग्रस्त झालो होतो ..जसा जसा वेळ पुढे सरकत होता तसे तसे माझी निराशा वाढत गेली .. मी आजूबाजूला नजर टाकली .. समोरच्या एका रँक मध्ये ...संडास -बाथरूम स्वच्छ करण्याची साधने ठेवलेली होती ..फिनेल ..हायड्रोक्लोरिक अँसिड..ब्रश वगैरे त्याच्याच बाजूला इमारतीत खूप मच्छर ..ढेकुण झाले की लॉकर्स ..कपाटे साफ करण्यासाठी एक कीटकनाशक ठेवलेले दिसले .. आम्ही निवासी कर्मचारीच याचा वापर करत असू .. ' न्युआँन ' नावाचे फिकट निळ्या रंगाचे ते कीटक नाशक खूप जहाल होते ..बहुधा शेतकरी शेतातील कीड नष्ट करण्यासाठी याचा वापर करतात .. मी सरळ ती बाटली उचलली आणि बुच उघडून तोंडाला लावली .. कडवट द्राव घसा जाळीत पोटात शिरला ..क्षणभर श्वास कोंडल्यासारखे झाले .. बाटलीत सुमारे ७५ टक्के कीटकनाशक शिल्लक होते ..त्यापैकी अर्धे पोटात गेले असावे ..तशी ..उलटीची उबळ आली ..मात्र सकाळी फक्त चहा घेवून बाहेर पडलो होतो ..आदल्यादिवशी रात्री पोळ्या उरल्या नव्हत्या म्हणून डबाही नेला नव्हता ' कुबेर चेम्बर्स ' ला जाताना .. दिवसभरात उदास मनस्थिती मुळे काहीच खाल्ले नव्हते ..फक्त दोन वेळा चहा घेतला होता ..पोटात उलटून पडण्यासारखे काहीच नव्हते ..

बेसिन जवळ गेलो .. उलटीची उबळ येत होती पण कोरड्या उलट्या होत होत्या .. एकदम गरगरल्यासारखे होऊ लागले ..डोक्यात कोणीतरी घणाचे घाव घालतेय असे वाटू लागले ..पोटात तर जणू जाळच पेटला होता .. तितक्यात मला जेवायला बोलवायला आमचा सुभाष नावाचा मित्र खाली आला ..मी हॉल मध्ये नाही पाहून उलट्यांचा आवाज ऐकून सुभाष बाथरूम मध्ये आला .. त्याने पहिले की बाजूला ' न्यूआँन ' ची बाटली पडलीय उघडी .. त्याने लगेच आरडा ओरडा सुरु केला .. सगळे निवासी कर्मचारी धावत आले .. माझ्या डोळ्यापुढे आता अंधारी येवू लागली ..काजवे चमकल्यासारखे वाटले .. पटकन कोणीतरी मला उचलून खांद्यावर घेतले बहुधा शेखर होता .कारण त्याच्या बोलण्याचा आवाज मी ओळखला .. नंतर मला अंधुक आठवते .. बंधू ..अँगी ..विजय सर्वांचे आवाज ऐकू येत होते .. मग कोणीतरी डोळे उघड म्हणत हाताने माझ्या पापण्या उघडल्या ..माझ्या डोळ्यात विजेरीचा प्रकाश टाकला ..मग म्हणाले .. याला ससून मध्ये न्या ..झोपू देवू नका .. बहुधा ते मेंटल हॉस्पिटलचे डॉक्टर असावेत ..पुढचे काहीच आठवत नाही ..

एकदम दोन दिवसांनी मला शुध्द आली तेव्हा मला ससून हॉस्पिटलच्या एका पलंगाला बांधून ठेवलेले होते ...बाजूला अँगी ..शेखर उभे होते .. मी डोळे उघडल्यावर शेखरने माझ्या डोक्यावरून हात फिरवला ..म्हणाला ' साले बच गया तू ' ..मग त्याने मला सगळी कथा सांगितली .. मला खांद्यावरून उचलून घेवून माझे मित्र आधी मेंटल हॉस्पिटलच्या डॉक्टरकडे घेवून गेले होते ..तेथे रक्तदाब ..नाडी वगैरे तपासून ..डोळ्यांच्या बाहुल्या पाहून मला ससून मध्ये नेण्याचा सल्ला दिला गेला ...ताबडतोब एकाने ऑटो आणला त्यात मला बसवून विजय ..शेखर ..अँगी यांनी ..ससून रुग्णालयात आणले .. तेथे आधी माझ्या घश्यात रबरी नळी घालून पोटातील विषारी द्राव बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला ..मग काही इंजेक्शन्स दिली गेली .. सलाईन लावले ..नाकातून नळी घालून... पोटेशियम परमँग्नेटचे पाणी सोडून स्टमक वाँश दिला गेला .. एव्हाना मी बहुधा त्या द्रवाच्या प्रभावाने भ्रमाच्या अवस्थेत गेलो होतो म्हणे ..मी मोठमोठ्याने रडत होतो ..गाणी म्हणत होतो .. सारखा बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करत होतो ..म्हणून मला बांधून ठेवले गेले .. शेखर सगळी माहिती सांगत होता .तसा तसा माझ्या अंगावर काटा येत होता .. मला म्हणे त्या भ्रमाच्या अवस्थेत ..अनघा भेटायला आलीय .. मी तिच्याशी बोलतोय ..नंतर माझा जिवलग मित्र विलास पाटील पण दिसला .. मध्येच अकोल्यातील रामाचे मंदिर दिसले .. मग मी कोणाला तरी खुप शिव्या दिल्या त्या अवस्थेत ..असे सुमारे दीड दिवस सुरु होते .. मग मला गाढ झोप लागली ..आणि आता सकाळी मी शुद्धीवर आलो होतो ..मी शेखरला माझे हात सोडण्यास सांगितले .. तर त्याने आधी डॉक्टरला विचारले मग माझे हात सोडले .. आता मी धोक्याच्या बाहेर होतो असे डॉक्टरनी मला तपासून सांगितले ... बांधलेले हात पाय सोडताच मी उठण्याचा प्रयत्न केला ..मात्र प्रचंड अशक्तपणा जाणवत होता ..उठू शकलो नाही .. मला लघवीला जायचे होते ..शेखरने सांगितले की काळजी करू नकोस तुला कँथेटर लावला आहे .. नंतर सुमारे दोन दिवसांनी मी हळू हळू उठून बसू लागलो ..थोडासा चालू फिरू लागलो ..
माझा आत्महत्येचा प्रयत्न फसला होता .. म्हणतात ना ' वेळ आली नव्हती ' अजून बरेच भोग बाकी असावेत .. आपण जिवंत आहोत याचा आनंद वाटला नाही ..मात्र नियतीच्या मनात मी अजूनही जिवंत राहावे असे आहे हे समजले ..कोणत्या हेतूने निसर्गाने मला जिवंत ठेवले ते शोधावे लागणार होते आता ..या मिळालेल्या जीवदानाचा लाभ घेतला पाहिजे असे वाटले !

(बाकी पुढील भागात )

================================================================

परत नाशिक ! ( भाग १७५ वा )

ससून मध्ये चार दिवस राहून चालणे फिरणे ..जेवण सुरळीत झाल्यावर मला डॉक्टरांनी सुटी दिली .मुक्तांगण मध्ये परत आलो तसे मला उमराणी सरांनी मला भेटायला बोलाविले ..मँडम अजूनही मुंबईलाच होत्या असे समजले .. त्यांच्या अनुपस्थितीत उमराणी सर् प्रमुख म्हणून काम पाहात असत ..सरांनी आधी तब्येतीची वगैरे चौकशी केली ..' तू असा कसा एकदम टोकाचा निर्णय घेतलास ? अरे तुला काय समस्या होत्या त्या बोललास का कोणाजवळ ? " सरांचा हा प्रश्न मला अपेक्षित होता ..मात्र त्याचे उत्तर मलाही सांगता येत नव्हते ..कदाचित आसपासच्या सर्व लोकांवरील अविश्वास हे देखील कारण असावे माझ्या कोणाजवळ काहीही न बोलण्याचे ..मी नुसता मान खाली घालून बसलो ..पुढे सर् म्हणाले ..' असो झाले ते झाले .प्रत्येकाच्या जीवनात कधी कधी अशा समस्या येतात की जेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात .. आपल्या सगळ्या क्षमता संपल्यासारखे वाटते ..आता सगळेच संपले .. अशी निराशा दाटून येते ..मात्र एक नेहमी लक्षात ठेव ..कोणतीही समस्या ही आपल्या जीवापेक्षा मोठी असत नाही .. फक्त ती समस्या सोडविण्यासाठी आपली बुद्धी तोकडी पडते कधी कधी ..अशा वेळी आसपासच्या व्यक्तींची मदत घ्यायची असते .. तू तुझी घुसमट तुझ्या एखाद्या जवळच्या मित्राजवळ ..माझ्याजवळ .. मोरे सरांजवळ व्यक्त करू शकला असतास ..आपण नक्की मार्ग काढला असता काहीतरी ... मी सर्व सामुपदेशकांसोबत तुझ्या बाबतीत चर्चा केली ..आणि आम्ही असे ठरवले आहे की ..तू खूप ' होमसिक ' झाला असावास ..अथवा येथे पुन्हा त्याच वातावरणात राहून कदाचित तुला पुढचा सकारात्मक विचार करणे या पुढे कठीण जाईल .म्हणून तुला आम्ही मुक्तांगण मधून सुटी द्यायचे ठरवले आहे .. तू उद्या खैरे सरांबरोबर नाशिकला आपल्या घरी जावे हे अधिक योग्य राहील ..येथे सुमारे नऊ महिने तू राहिलास ..या काळात व्यसनमुक्ती हा आजार .. त्यातून बाहेर पडण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न .. धोके ..या बाबत बहुतेक सगळी माहिती मिळाली आहे तुला .. रस्ता माहित झालाय व्यसनमुक्तीचा ..अडचणी ..खाच खळगे देखील माहित आहेत ..आता निर्धाराने चालणे तुझे काम आहे .. पुन्हा कधी असा टोकाचा विचार करू नकोस ..आणि कधी काही अडचण आली तर . ..आमच्याशी संपर्क कर .. मदत माग ..वगैरे सांगत सरांनी मला जाण्यास सांगितले ...!

दुसऱ्या दिवशी सकाळी माझे मोजके समान घेवून खैरे सरांबरोबर नाशिकला जायला निघालो निघालो ..वाटेत ..आधी संगमनेरल उतरलो ....तेथील सामाजिक कार्यकर्त्या अँड .... निशाताई शिवूरकर यांनी व्यसनमुक्तीच्या प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला होता .. त्या कार्यक्रमात सामील झालो ..तेथे खैरे सरांनी मला माझे व्यसनाचे दाहक अनुभव सांगायला सांगितले .. मी कोणताही संकोच न बाळगता .. थोडक्यात व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम माझ्या अनुभवातून मांडले .. मग तेथेच जेवण वगैरे करून ..नाशिककडे निघालो... संध्याकाळी आम्ही घरी पोचलो ..सरांनी थोडक्यात आईला ..भावाला माझ्याकडून घडलेल्या प्रकारची कल्पना दिली ..या पुढे मी नाशिकलाच राहणार आहे हे सांगितले त्यांना ..तसेच ही देखील खात्री दिली की तुषार या पुढे चांगला राहील .. त्याने मुक्तांगण मध्ये सगळ्या उपचारात चांगला सहभाग घेतलाय ..मात्र काही भावनिक त्रासांमुळे त्याने चुकीचा निर्णय घेतला होता ..या पुढे आपण त्याच्यावर नियंत्रित पद्धतीने विश्वास ठेवून .. आमच्या संपर्कात रहावे ..पुढे काही गडबड झाल्यास ..आपण त्याला पुन्हा मदत करू . मग दुसऱ्या दिवशी ..मी ' भालेकर हायस्कूल ' येथे पाठपुरावा सभेला गेलो ..पूर्वी मुक्तांगण मध्ये उपचार घेवून आता चांगले राहणारे पाच सहा जण आले होते ..सरांना भेटायला .. मुक्तांगण तर्फे नियमित पाठपुरावा ठेवण्यासाठी संजय नावाचा एक पूर्वी मुक्तांगण मध्ये उपचार घेवून चांगला राहणारा तरुण नेमला होता ..त्याच्यासोबत माझी ओळख झाली ....आता मी नाशिकलाच राहणार होतो हे मी संजयला सांगितले ..तेव्हा संजयने मला आठवडयातून एकदा तरी आपण भेटले पाहिजे वगैरे सांगितले ....नंतर सर् पुण्याला निघून गेले .
सुरवातीचे काही दिवस घरात मला अपराध्यासारखे वाटत होते .. पण भाऊ ..वाहिनी ..आई यांनी मला मी पूर्वी केलेल्या चुकांची आठवण करून दिली नाही ..दिवाळी जवळ आली होती ..आईचे दिवाळीत बहिणीकडे अकोल्याला जायचे ठरले होते ..जरा बदल म्हणून मी पण आईसोबत जावे असे ठरले .. मी मनातून खूप आनंदित झालो होतो .. नक्की अनघा भेटेल ..किवा तिच्या बद्दल पक्की माहिती मिळेल अशी आशा बळावली पुन्हा ...अकोल्याला पोचलो तर पहिला धक्का बसला तो हा की बहिण आता जुने घर सोडून ..स्वतच्या बांधलेल्या घरात तुकाराम हॉस्पिटल जवळ राहायला गेली होती ..म्हणजे अनघाच्या घरापासून सुमारे ६ कि.मी . दूर ... म आता उठसुठ राम मंदिरात जावून बसणे शक्य नव्हते ..तसेच सलील देखील सारखा भेटू शकला नसता .. अकोल्याला पोचल्यावर दुसऱ्या दिवशी मी भाचीला अनघाबद्दल विचारले तेव्हा तीने आधी गुळमुळीत उत्तर दिले ..तुझी अनघाची भेट झाली होती का ? ती तुला माझ्या बद्दल काही बोलली का ? असे खोदून खोदून विचारले तर म्हणाली ...आता आम्ही दूर राहायला आल्यापासून भेट होत नाही ..एकदाच भेटली होती .. तिचे लग्न झाले आहे .कोठे असते नक्की माहित नाही ती .. मला हे अपेक्षितच होते ..जरी लग्न झाले असले तरी तीला किमान एकदा तरी मला भेटायचे होते ..तिची माफी मागायची होती प्रत्यक्ष ..मी तीला भेटण्याचा प्रयत्न करीन हा सर्वाना अंदाज होताच ..त्या मुले सगळ्यांनी योग्य ती सावधगिरी बाळगूनच मला माहिती दिली ...संध्याकाळी सलीलला भेटायला माझ्या भाच्यासोबत गेलो .. मला अनघाच्या घरात जायला आता संकोच वाटत होता ..पूर्वीच्या संबधात खूप वादळे आल्यामुळे दुरावा निर्माण झाला होता .. मी बाहेरच थांबून भाच्याला सलीलला बोलवायला पाठविले .. सलील माझ्याशी जणू पूर्वी काही घडलेच नाही असा बोलला .. त्याला सरळ सरळ अनघाबद्दल काही विचारण्याची मलाही हिम्मत झाली नाही .. इकडच्या तिकडच्या गप्पाच झाल्या ... मी प्रयत्नपूर्वक नॉर्मल रहात होतो .. सलील ने मला जेव्हा ' एक आकाश संपले ' या मालिकेत आम्ही तुला पहिले गाणे म्हणताना असे सांगितले तेव्हा मला बरे वाटले .. चला म्हणजे मी कोठे होतो वगैरे यांना ठावूक आहे तर ..म्हणजे अनघाला देखील माहित असणार ..तरीही तीने आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही म्हणजे ..ती नक्की आपल्याला विसरण्याचा प्रयत्न करत असणार ..जगराहाटी पुढे तीने हार मानली असावी ..किवा मनावर दगड ठेवून .. नवीन संसार सुरु केला असावा .. कसे जमले असेल तीला हे .. ती कधी माझ्या आठवणीने व्याकुळ होत असावी का ? ...नव्या संसारात रमल्यावर ..बरे झाले जे झाले ते असे वाटत असेल तीला ? अनेक प्रश्न मनात होते ..त्यांची उत्तरे केवळ अनघाच देवू शकली असती . .बहिणीकडे मी एरवीपेक्षा शांत शांतच राहिलो ..नवा डाव सुरु करायचा होता एकट्याने .. मनात गाणे आठवत होतो ..' दुनिया मे हम आये है तो जीना ही पडेगा ..जिवन ही अगर जहर तो पिना ही पडेगा !

( बाकी पुढील भागात )

रविवार, 21 अप्रैल 2013

मुक्तांगण

स्वतंत्र मुक्तांगण !  ( भाग १६६ वा )

मेंटल हॉस्पिटलच्या अखत्यारीत असलेले मुक्तांगण याच काळात स्वतंत्र होण्याची प्रक्रिया सुरु होती.. अँडमिशनची प्रक्रिया ..जेवण ..इतर व्यवस्थापन हळू हळू स्वतंत्र होणार होते .नंतर मेंटल हॉस्पिटलची संबंध फक्त इमारती पुरताच राहिला असता असे म्हंटले जाई ..आम्हाला निवासी कार्यकर्त्यांना यातील फारसे कळत नसे ..मात्र आता मुक्तांगणचे वेगळे किचन होणार याचा खूप आनंद होता .. मेंटल हॉस्पिटल मधून येणारे जेवण बंद होऊन ' मुक्तांगण ' मध्येच जेवण तयार केले गेले असते ही आमच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट ...त्याच कळत राजू नावाचा एक केटरिंगचा कोर्स केलेला दारुडा मुक्तांगणला दाखल होता ..त्याच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने त्याने किचनचे काम सांभाळावे असे मँडमने त्याला सूचित केले होते ..त्या नुसार आधी आठवडयातून दोन वेळा त्याने मुक्तांगण मध्येच भाजी बनविण्यास सुरवात केली होती .. हा राजू पुण्यातच राहणारा होता ..छान भाजी बनवीत असे .. त्याच्यावर किचनचे काम करण्याची जवाबदारी दिल्यावर ..त्याने पहिल्यांदा जी भाजी केली ती फरसबीची ( श्रावणघेवडा )..तिची चव अजूनही आठवतेय मला .. ...अगदी हॉटेल मध्ये मिळेल तशी भाजी केली होती ..त्यात खोबऱ्याचा किस वगैरे घातला होता मग हळू हळू सगळेच जेवण मुक्तांगण मध्ये तयार व्हायला लागले ....पहिल्या भाजीनंतर राजूला खास सूचना दिल्या गेल्या की पंचतारांकित हॉटेल सारखे जेवण बनवू नकोस ..संस्थेचे दिवाळे काढायचे नाहीय आपल्याला .. योग्य प्रमाणात मसाले वापरून ..काटकसर करून उत्तम जेवण बनवायचे होते ...पोळ्या मुक्तांगण मध्ये करण्याची सोय नव्हतीच ..कारण रोज सुमारे ५०० चपात्या करणे कार्यकर्त्यांना शक्य झाले नसतेच .. त्यावर उपाय म्हणून डॉ . बाबा आढव यांनी सुरु केलेल्या हमाल पंचायतीच्या ' झुणका भाकर ' केंद्रावरून चपात्या आणाव्यात असे ठरले ..पुणे रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या या केंद्रातून चपात्या आपणयासाठी मी आणि अजून एकाची नेमणूक करण्यात आली होती .. मोठे अल्युमिनियमचे दोन डबे घेवून आम्ही सुमारे ११ च्या सुमारास बसने तेथे चपात्या आणायला जात असू .बसच्या गर्दीत ते मोठे वजनदार डबे घेवून येणे कठीणच काम होते .. मात्र त्या निमित्ताने आम्हाला मुक्तांगणच्या बाहेर जाता येत असे ही आमच्यासाठी आनंदाची बाब होती ..एकदा माझ्या सोबत चपात्या आणायला कार्यकर्ता म्हणून नवीनच सामील झालेला प्रकाश होता ..मी झुणका भाकर केंद्रात चपात्या मोजून घेत असताना .. कसा कोण जाणे प्रकाश सटकला .. मी खूप वेळ त्याची वाट पाहत उभा राहिलो ... साडेबारा वाजत आलेले ..तिकडे मुक्तांगण मध्ये जेवणाची वेळ होत आलेली .. काय करावे समजेना ..शेवटी मुक्तांगणला फोन करून झाला प्रकार सांगितला तेव्हा .. प्रकाशची वाट न पाहता तू चपात्या घेवून निघून ये अश्या सूचना मिळाल्या ..मग ते दोन मोठे डबे उचलून बसमध्ये मला एकट्याला आणावे लागले ..मनातल्या मनात प्रकाशला खूप शिव्या घालत घातल्या .. मुळचे व्यसनी असल्याने सगळेच कार्यकर्ते तसे बिनभरवश्याचे होते .. केव्हा मनात काय विचार येईल याची खात्री नाही .. आणि मनात विचार आला की तो अमलात आणायला ही वेळ लागत नसे .. अश्या लोकांना सोबत घेवून कम करणे म्हणजे मँडम व इतर वरिष्ठ समुपदेशकांची तारेवरची कसरतच असे होती .

मुक्तांगण मध्ये स्वैपाक सुरु आल्यापासून नवा कुक राजूचा भाव खूप वाढला होता .. तो सतत किचन मध्ये थांबू लागला .. मुक्तांगणच्या इमारतीच्या मागे मेंटल हॉस्पिटलची खूप मोठी जागा होती ..तेथे खूप गवत आणि इतर झाडे वाढलेली .. इमारतीच्या जवळच मागच्या बाजूला तसेच मेंटल हॉस्पिटलच्या इतर जमिनीवर शिंदीची झाडे वाढलेली होती .. दरवर्षी त्या शिंदीच्या झाडांचा ठेका दिला जाई मेंटल हॉस्पिटलतर्फे ..निरा काढण्यासाठी .. म्हणजे त्या ठेकेदाराची माणसे येवून त्या झाडावर चढून तेथे झाडाच्या वरच्या भागात चिरे मारून .. मडकी लावून ठेवत असत ..दोन दिवसानी ती मडकी काढून घेतली जात.. पुन्हा नवी मडकी लावली जात .. त्या मडक्यात जमा होणारा त्या झाडाचा रस निरा म्हणून विक्रीस पाठविला जाई .. एकदा राजू सर्वाना दारूच्या नशेत असल्यासारखा वाटला .. पण तोंडाला दारूचा वास मात्र येत नव्हता .. काय भानगड आहे कळेना कोणाला ..त्याला काय गडबड आहे विचारले तर त्याने तब्येत बरी नाही ..रात्री झोप झाली नाही म्हणून डोळे लाल दिसतात अशी करणे सांगून आम्हाला उडवून लावले .. `मग आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवायचे ठरवले ..तेव्हा एकाला तो ..त्या शिंदीच्या झाडावर चढ उतर करणाऱ्या एका माणसाशी बोलताना दिसला .. दुसऱ्या दिवशी राजूने किचन मध्ये केलेला चहा त्या माणसाला दिलेला आम्ही पहिले ..मग संशय आला म्हणून संपूर्ण किचनची झडती घेण्यात आली तेव्हा राजूने किचन मध्ये लपवून ठेवलेले मडके सापडले .. त्या मडक्यात ताडी होती ..सगळा उलगडा झाला .. राजूने त्या माणसाशी ओळख वाढवून त्याला चहा पाणी वगैरे देवून त्याच्याकडून झाडावरून काढलेले निरेचे मडके मागून घेतले होते .. तापमान वाढल्यावर त्या निरा आंबून त्याची ताडी झाली होती .. निरा जरी आरोग्यवर्धक ..शीतल .. पित्तशामक पेय म्हणून वापरली जात असली तरी ..निरा आम्बल्यावर त्यापासून तयार होणारी ताडी मात्र नशा देणारे पेय असते .. त्याचे देखील अनेक व्यसनी आहेत ..त्याचेही भयानक दुष्परिणाम होतात .. राजूने ते मडके मिळवून अशी बसल्या जागी नशेची सोय करून ठेवलेली आढळली ... हा सगळा प्रकार समजल्यावर ताबडतोब राजूला पुन्हा वार्डात पाठविण्यात आले .. त्याच्या हाताखाली काम करून तयार झालेल्या दुसऱ्या कार्यकर्त्याला किचनची जवाबदारी दिली गेली ..आणि सर्वात मोठे काम आम्हा निवासी कार्यकर्त्यांवर आले ते म्हणजे मँडमनी आम्हाला इमारतीच्या मागे असलेली शिंदीची झाडे तोडण्यास सांगितले ..सुमारे २० झाडे असावीत .. या झाडाच्या पानांची टोके खूप अणकुचीदार असतात .. तसेच जितके वर हे झाड असते तितकेच आत खोल जमिनीत त्याचे मूळ असते ...ही सगळी झाडे मुळासकट काढून टाकणे खूप जिकीरीचे कम होते ...कोयत्याने आधी पाने छाटायची .. मग जमीन खोदून सुमारे १० ते बारा फुट आत खोल झाडांच्या मुळापर्यंत जावून ते झाड उपटून टाकायचे असा आमचा उद्योग सुमारे महिनाभर सुरु होता .. पानांची धारधार पाती लागून अंगावर ओरखडे उमटत .. पानांची टोके हाताला टोचून तेथे सूज येई .. आणि खड्डे खोदून दमछाक .. आम्ही सगळे उत्साहाने कामाला भिडलो ..तीनचार दिवसातच आमचा उत्साह मावळू लागला .. सगळे रोज राजूला शिव्या घालत होतो .. तर तो निर्लज्जासारखा आम्हाला झाडे तोडताना पाहून हसत असे ..एका व्यक्तीने इतक्या लोकांना सुमारे महिनाभर कामाला लावले होते !

================================================================
पालक सभा ! ( भाग १६७ वा )

मुक्तांगण मध्ये उपचार घेत असलेल्या व्यसनी मित्रांना पालकांनी भेटण्यासाठी गुरुवार ठरला होता .. त्या नुसार प्रत्येक गुरुवारी सकाळी ९ ते ४ या वेळेत पालक भेटायला येत असत .. तसेच महिन्यातून येणाऱ्या चार पैकी दोन गुरुवारी पालक सभा देखील होई .. प्रत्येक गुरुवारी ज्या मित्रांचे पालक येतील असा अंदाज असे ते सगळे मस्त दाढी ..अंघोळ वगैरे करून तयार असत इतकेच नव्हे तर ज्यांचे पालक येवू शकणार नाहीत ते देखील गुरुवारी खुश असत कारण त्यांच्या मित्रांच्या पालकांनी घरून आणलेले खाण्याचे पदार्थ त्यांना देखील मिळत असत .. माझ्या घरून कोणीही येणार नाही याची मला खात्री होती .. मी घरी इतका त्रास दिलेला होता की मला असे आवर्जून कोणी भेटायला यावे असे प्रेम ..नात्यांमधील आपुलकी.. मी माझ्या वागण्याने गमावली होती .. पहिल्यांदा जे मुक्तांगण मध्ये उपचार घेत होते त्यांचे पालक मात्र नक्की येत असत .. ज्यांचे दोन दिन वेळा उपचार घेवून झालेले आहेत अश्या मंडळींचे पालक येण्यास टाळाटाळ करत ...गुरुवारी सकाळपासून माझ्या मनात विषण्णता दाटून येई ...मी घरी दिलेला त्रास आठवे .. केलेले नुकसान .. घडलेल्या सगळ्या घटना सारख्या सारख्या आठवून खूप अपराधीपणा वाटे ..गुरुवारच्या पालक सभेची तयारी करण्याचे काम निवासी कर्मचाऱ्यांकडे होते ..म्हणजे आदल्या दिवशी रात्री पालक सभेचा मोठा हॉल धुवून काढणे .. मोठ्या सतरंज्या झटकून त्या घालून ठेवणे .. पालकांना बसण्यासाठी खुर्च्या लावणे वगैरे ..ही सगळी कामे मी उत्साहाने करत होतो .. प्रत्यक्ष गुरुवारी सकाळ पासून मात्र शक्तिपात झाल्यासारख्या माझ्या हालचाली मंदावत जात . बंधूच्या ते लक्षात आले होते .. तो मला त्याबद्दल नेहमी समजावे .. मला धीर देई .. ' हे ही दिवास जातील मित्रा ' हे बहुधा साँक्रेटीस या तत्ववेत्त्याचे वाक्य सांगे ..काळ हा नेहमी बदलत असतो .. जेव्हा यश ..प्रतिष्ठा .. सन्मान ..धन या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतात तेव्हा तुम्हाला त्याचा माज येवून अहंकार..उन्माद वाढू नये व जेव्हा सगळे काही हिरावून घेतले जाईल ..नैसर्गिक आपत्ती .. आजारपण .. प्रिय व्यक्तीचा विरह .. दारिद्र्य या गोष्टी पदरात पडतील तेव्हा निराशेने ..वैफल्याने खचून न जाता ..कायम आशा जागृत ठेवण्यासाठी हे वाक्य अतिशय उपयुक्त ठरते .

महियातून दोन वेळा होणाऱ्या पालक सभेत पालकांना ' व्यसनाधीनता ' या गंभीर आजाराबद्दल विविध मार्गाने माहिती देण्याचा प्रयत्न समुपदेशक करीत असत ..तसेच व्यसनी माणसाला उपचार पूर्ण करून घरी गेल्यावर कसे सांभाळावे .. त्याच्या भावनिक बदलांवर कसे लक्ष ठेवावे .. समुपदेशकानी दिलेल्या सूचना पालन करण्यासाठी त्याला कसे प्रेरित करावे वगैरे .. त्यासाठी महिन्यातून एका गुरुवारी ' मनोनाटय ' ..हा प्रकार सदर केला जाई . वार्डातील उपचार घेणाऱ्या मंडळींपैकी उत्साही लोकांचे चार ग्रुप पाडले जात ..आमच्या पैकी एक निवासी कर्मचारी एका ग्रुपचा प्रमुख म्हणून नेमला जाई ..मग आम्हाला पालक सभेच्या १ तास आधी एखादा विषय दिला जाई .. त्या विषयावर आधारित असे मनोनाटय त्या समूहाला सादर करावे लागे .. बहुधा सर्व विषय ..सर्वसामान्य जीवनाशी ..व्यसनाशी..स्वभावदोषांशी .. व्यसनमुक्तीशी ..कौटुंबिक जीवनाशी निगडीत असत .. आम्ही समूहातील मित्रांना भूमिका वाटून देत असू . वडिलांची ... आईची .. पत्नीची .मुलांची ..व्यसनी व्यक्तीची अश्या साधारण चार पाच भूमिका एका मनोनाटयात असत .. हे मनोनाटय सादर करताना कधी कधी खूप धम्माल येई ..एखादा विनोदी वाक्य बोले ..किवा काहीतरी प्रसंगनिष्ठ विनोद घडत .. तर कधी एकदम गंभीर प्रसंगात सर्व स्तब्ध होत .. अंतर्मुख व्हावे लागे ..पूर्वी अनुभवलेल्या घटना आठवून पालकांच्या डोळ्यात पाणी येई . मनोनाटय ही एक मानसिक उपचार पद्धती होती ..ज्यात व्यसनी व्यक्तीला त्याच्या व्यसनामुळे पत्नीला ..आईवडिलांना .मुलांना ..भावंडाना कसा त्रास होते ते अनुभवायला मिळत असे ..चारही समूहांचे मानोनाटय सादर करून झाल्यावर ..त्यात काम करणारे लोक आपापले मनोगत व्यक्त करीत .. शेवटी मँडम प्रत्येक समूहाला दिल्या गेलेल्या विषयाचे सखोल ..अर्थपूर्ण असे विश्लेषण करून ..व्यसनाधीनता हा किती गंभीर असा मनोशारीरिक आजार आहे हे सर्वाना समजावून देत असत ...अनेक पालकांना असे वाटत असते ..की याला उपचार देण्यासाठी मुक्तांगण किवा एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले की आपले काम झाले ..आता त्याने पूर्ण बरा होऊनच बाहेर पडावे .. उपचारात पालकांचा देखील सहभाग असावा लागतो .. कितीही काळजी घेतली तरी हा आजार पुन्हा डोके काढू शकतो ..अश्या वेळी त्या बाबत एकदा उपचार दिले काही फायदा झाला नाही असा विचार न करता ..परत उपचार देणे गरजेचे आहे ..कोणतीही केस ही गाँन केस नसते ..तर काही वेळा उपचारांचा फायदा व्हायला वेळ लागू शकतो ..काही जास्त हट्टी ..जिद्दी ..जास्त संवेदनशील ..अहंकारी असलेले मित्र पुन्हा पुन्हा चुका करू शकतात वगैरे गोष्टी मँडम सांगत असत ..स्वतः मानसोपचार तज्ञ ..शिवाय अनेक वर्षांचा रुग्णसेवेचा अनुभव .. उपचार देताना असलेले तादात्म्य .. मुळचा समाजसेवेचा पिंड ..या सगळ्या गोष्टींमुळे मँडम खूप प्रभावी बोलत असत .आम्ही बर व्हावे ही त्यांची कळकळ आम्हाला जाणवत असे .

एखाद्या गुरुवारी ..मनोनाटया प्रमाणेच चित्र उपचार ( पिक्चर थेरेपी ) देखील घेतली जाई म्हणजे फळ्यावर चार पाच सूचक चित्र काढली जात ..प्रत्येकाने ती चित्रे पाहून आपल्या मनात काय विचार आले मांडावेत असे आवाहन केले जाई ..घड्याळ .. घोडा ..शिडी .. सूर्य .. नोटा .. मुलगी ..पुरुष .लहान मुलगा ..दोरीवर तोल साधत चालणारा डोंबारी ..पाण्यात पोहोणारा मुलगा वगैरे चित्र काढली जात .. एकदा गम्मत झाली .. फळ्यावर दोरीवर तो साधत चालणारा डोंबारी काढला होता .. आजूबाजूला गोलाकार जमलेली माणसे .. गळ्यात ढोलकी अडकवून ढोलकी वाजविणारी त्याची बायको .. वगरे सगळे तपशील चित्रात होते .. मुंबईत व्यसनापायी पाकीटमारी करणाऱ्या एका गर्दुल्ल्याला जेव्हा त्या चित्राबद्दल बोलायला सांगितले तेव्हा तो म्हणाला ..माझे लक्ष डोंबार्‍याच्या चित्राकडे गेलेच नाही तर त्या गोलाकार जमलेल्या गर्दीकडे होते .. खूप गर्दी होती ..त्यामुळे मला पाकीट मारायला चांगली संधी आहे असे वाटले ..हे ऐकून सर्व हसू लागले तसा तो खजील झाला .. एकाने जिवन म्हणजे अशी दोरीवरची कसरत असते ..नेहमी तोल सांभाळावा लागतो .. आजूबाजूला असलेले लोक फक्त बघे आहेत ..ते तुम्हाला टाळ्या वाजवून नेहमीच प्रोत्साहन देतील याची खात्री नसते ..मात्र तुम्ही तोल जावून पडलात तर सर्व दोष नक्की देतात ..वगैरे भाष्य केले .. तो खूप शहाणपणाचे बोलला होता .. नंतर एकाने त्याला तुझ्या किती अँडमीशन येथे झाल्यात असे विचारले तेव्हा त्याने मान खाली घालत आठ असे उत्तर दिले .. ' अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ' हे वाक्य इथे चांगले लागू पाडत होते .. तो मित्र फक्त इतरांना सांगण्यासाठी हे सगळे बोलत होते मात्र त्याने स्वतःच्या मनावर हे विचार बिंबवले नव्हते हे स्पष्ट होते .माझेही ही तसेच होत असे ..ऐरवी इतरांना सांगताना मी खूप उदात्त .. सकारात्मक .. असे बोलत असे ..परंतु स्वतः मात्र वेगळाच वागत होतो
================================================================

पालक सभा !  वाढदिवस !  ( भाग १६८ वा )

पालक सभेच्या शेवटी मँडम सर्व पालकांना आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांना मार्गदर्शन करीत असत .. व्यसनाधीनता हा आजार कसा गंभीर आहे ... तसेच योग्य उपचार दिल्यास व्यसनी व्यक्ती नक्की बरा होऊ शकतो ..त्यासाठी पालकांनी देखील याला बरे करायचे हा निर्धार मनात जपायला हवा ..या आजाराबद्दल कोणालाही दोष न देता सर्व पालकांनी एकत्र येवून व्यसनी व्यक्तीला उपचार देण्यासाठी मदत केली पाहिजे .. त्याच्या व्यसनाला कोण जवाबदार आहे या वादात न पडता ..यशस्वी पणे उपचार कसे देता येईल याकडे लक्ष द्यायला हवे ..बहुतेक वेळा ..पालक गोंधळून जातात.. तेव्हा याच्यावर कोणी तरी करणी केली .. काहीतरी खावू घातले .. मित्रांमुळे बिघडला .. परिस्थिती ..घटना ..इतर माणसे यांना दोष न देता सर्व शक्ती हा बरा कसा होईल या वर केंद्रित करायला हवी ..तसेच याच्या व्यसनीपणा बद्दल स्वतःला दोष न देता ...आपण वेळेवर लक्ष देवू शकलो नाही .. अशी अपराधीपणाची किवा आता हा कधीच सुधारू शकणार नाही अशी निराशेची .. आमचे नशीब फुटके .. आमचे मागील जन्माचे भोग आहेत ते भोगलेच पाहिजेत ही वैफल्याची भावना ठेवता ..कँन्सर , मधुमेह .. रक्तदाब ..हृदयरोग ..किवा इतर दीर्घकालीन उपचार घ्याव्या लागणाऱ्या आजारासारखाच हा देखील एक आजार आहे हे समजून घ्यायला हवे व आपला माणूस नक्की बरा होईल असा सकारात्मक विचार करायला हवा .. बहुधा तसे न होता व्यसनीच्या पत्नीच्या माहेरचे लोक व्यसनी व्यक्तीच्या आईवडिलांना किवा भावंडाना ..तुम्ही आम्हाला फसविले .. आमच्या मुलीच्या आयुष्याचे वाटोळे केलेत .. असा दोष देतात नाहीतर व्यसनीचे पालक त्याची पत्नी नीट वागत नाही म्हणून जास्त पितो .. तीला चांगले संस्कार नाहीत ..सारखी कटकट करते ..माहेरी जाते ..तिच्या माहेरचे लोक याचा अपमान करतात ..यांच्या संसारात लुडबुड करतात म्हणून हा पितो.. असे एकमेकांवर दोषारोप करत बसतात .. याचा फायदा घेवून व्यसनी व्यक्तीला मिळतो व तो अधिक अधिक बेताल होतो .. व्यसन कसे ..कोणामुळे लागले ..का वाढले याची चर्चा करत बसण्यापेक्षा पालकांनी आपापसातील सर्व गैरसमज दूर करून एकदिलाने व्यसनी व्यक्तीला उपचार देण्यासाठी मानसिक व आर्थिक तयारी ठेवायला हवी .. काहीवेळा एकदा उपचार देवून झाले ..मात्र काही फायदा झाला नाही ....आता तो आणि त्याचे नशीब .. याला कायमचे हाकलून देणार .. हा मेला तर बरे .. हा कधीच सुधारू शकणार नाही असे टोकाचे विचार मनात येवू शकतात ..हे विचार झटकले पाहिजेत ..कारण त्याला उपचार दिले नाहीत तर तो उपचारांना जितका खर्च येवू शकतो याच्या कितीतरी पट अधिक आर्थिक ..शारीरिक हानी करू शकतो ..शिवाय घरातील सदस्यांची आपापसात भांडणे .. कटकटी .. त्याचे घरातील लहान मुलांवर होणारेदुष्परिणाम .. या सगळ्या गोष्टी ध्यानात घेवून वारंवार उपचार देणे व तो बरा होईपर्यंत देणे ..हेच ध्येय ठेवले पाहिजे ..थोडी थोडी घ्यायला हरकत नाही अशी तडजोड देखील नको कारण तो थोडी घेवू शकत नाही हे शास्त्रीय सत्य आहे .. तो नक्की बरा होईल हा विश्वास मनात जागवला पाहिजे ...मँडमच्या मार्गदर्शनानंतर बहुधा पालकांना काहीच शंका उरत नसे त्या अतिशय संतुलित पद्धतीने योग्य ..समर्पक शब्द वापरून सर्वाना दिलासा देत असत .. मुद्देसूद ..मानसशास्त्रीय संकल्पने वर आधारित असे त्यांचे बोलणे ऐकून नव्या उमेदीने ..नव्या आशेने पालक निश्चिंत होत असत तर आम्ही उपचार घेणारे लोक.. आपण यातून नक्की बाहेर पडू शकतो ..फक्त त्यासाठी प्रामाणिक पणे मेहनत केली पाहिजे .. आपल्यामुळे इतरांना झालेल्या त्रासाची नुकसानभरपाई केली पाहिजे असा निर्धार करत असू . पालक सभे नंतर व्यक्तिगत समुपदेशन व पालकांचे समुपदेशन समुपदेशकांच्या खोल्यात केले जाई ..त्यात कौटुंबिक समस्या .. वैवाहिक समस्या .. व इतर समस्यांवर चर्चा करून योग्य मदत काय करता येईल ते ठरवले जाई .

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी सकाळी ' पुनर्जन्माचा वाढदिवस ' हा कार्यक्रम होई ..म्हणजे ' मुक्तांगण ' सुरु झाल्यापासून तेथे उपचार घेवून १ वर्ष किवा त्याहून अधिक व्यसनमुक्तीची वर्षे पूर्ण केलेल्या व्यसनमुक्त राहणाऱ्या मित्रांचा मँडम , बाबा किवा बाहेरून बोलाविलेल्या एखाद्या प्रतिष्ठीत व्यक्तीकडून व्यसनमुक्तीचे पदक देवून त सन्मान केला जाई ..हा कार्यक्रम अतिशय भावविभोर करणारा असे .. एरवी आपण एखाद्या व्यक्तीचा जन्म तारखेने होणारा वाढदिवस आणि हा व्यसनमुक्तीचा वाढ दिवस यात खूप फरक होता .. आपण काहीही केले नाही ..किवा काहीही केले तरी जन्माचा वाढदिवस साजरा होऊ शकतो ..वय वाढण्यासाठी काहीच प्रयत्न करावे लागत नाहीत .काळाबरोबर वय वाढते .. मात्र हा व्यसनमुक्तीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले असतात व्यसनी व्यक्तीने .. त्याच्या सगळ्यात जास्त आवडत्या गोष्टीपासून दूर राहणे .. कितीही मनाविरुध्द घडले तरी व्यसनाचा आधार न घेणे .. अनेक मोह ..चांगल्या वाईट घटना घडून गेल्यावरही .. स्वतःला फक्त एकदा ..थोडेसे या आकर्षणापासून दूर ठेवणे सोपे काम नव्हते .. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला समुपदेशक प्रस्तावना करून या वाढदिवसाचे महत्व सांगे .. हा कार्यक्रम जे व्यसनमुक्तीचा वाढदिवस साजरा करत आहेत त्यांचा सातत्याने पुढेही व्यसनमुक्त राहण्याचा निर्धार वाढविणारा असतो ...व उपचार घेणाऱ्या मित्रांच्या मनात आपणही असाच वाढदिवस साजरा केला पाहिजे अशी प्रेरणा जागवणारा ठरतो ..असे सांगितले जाई ..त्यानंतर आम्ही निवासी कार्यकर्ते एक समूह गीत म्हणत असू .. हे गीत सुप्रसिद्ध मनोविकास तज्ञ डॉ . आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेले होते ते खालील प्रमाणे !

हर नया दिन ..इक नई सुबह ..हर सांस में जागी आशा
दूर हटे ..गम कें बदल ..अब नही चाहिये कोई नशा ||

घेर लिया था अंधेरोने ..खयाल बनके घायल
इक पल भी ऐसा ना बचा था ..जो ना बनाता कायर
जिने कें इस संगर में ..सामने आई नई दिशा ....
हर नया दिन ..............................................|| १||

छोड दिये अहेसास पुराने ..गाड दिया अभिमान को..
अपने भीतर झांक कें देखा ..डबे हुवे ..इन्सान को
विकार मनके विकल हुवे ..अब हुई सत्य की अभिलाषा
हर नया दिन ..............................................||२||

अब जिवन की राहों पर ..विश्वास हमारा साथी है ..
समय समय कें गहेरे रंग ..इंद्रधनुष की भांती है ..
ये देन ना फिर बिखरा देंगे ..रहे हमारी ये मनीषा ..
हर नया दिन ...............................................|| ३||

या गीतातील अर्थपूर्ण शब्द ..त्याला लावलेली चाल . स्वरातील चढ उतर इतके सुंदर आहे की ते गीत म्हणताना आम्हाला मनात व्यसनमुक्तीची शक्ती संचारते आहे असे वाटे तर गाणे ऐकणाऱ्या लोकांना एखादे समर गीत ऐकल्यानंतर जसे लढाईचे स्फुरण चढते ..तसे व्यसनमुक्तीच्या लढाई चे स्फुरण चढत असे .


================================================================

दूरदर्शन मालिका ! (  भाग १६९वा )

आमच्या समूहगीत गायनानंतर मग पुनर्जन्माचा वाढदिवस साजरा करणाऱ्या मित्रांना पदक देवून सन्मानित केले जाई .. त्यांचे समुपदेशक थोडक्यात त्यांच्या व्यसनमुक्तीच्या प्रवासाबद्दल माहिती देत असत ..असा वाढदिवस साजरा करणाऱ्या मित्रांचे मनोगत खूप प्रेरणादायी असे .. व्यसनामुळे कसे नुकसान झाले .. त्यातून सावरताना किती संघर्ष केला .. कुटुंबियांची मदत वगैरे .. कधी कधी त्याच्या सोबत आलेली त्याची पत्नी ..आई अथवा इतर नातलग मंडळींपैकी कोणीतरी बोले .. नातलगांचे बोलणे तर हृदयात घर करून जाई ..एका व्यक्तीच्या व्यसनामुळे घरात कसा कलह निर्माण होतो ..आर्थिक ओढाताण ...भांडणे .. अशी सारी कुटुंबियांची होणारी कुचंबणा ऐकताना आम्हाला पण आमच्या घरातील लोकांवर आम्ही कळत ..नकळत केलेले अन्याय आठवत असत .. डोळ्यात पाणी येई ते ऐकताना ..शेवटी प्रमुख अतिथींचे मनोगत असे ...पहिल्यांदा हा कार्यक्रम पहिला तेव्हाच मी मनाशी निर्धार केला होता ..आपण पुढच्या वर्षी नक्की व्यसनमुक्तीचे पदक घ्यायचे .. खरोखर हा वाढदिवसाचा कार्यक्रम म्हणजे एक रोमांचकारी अनुभव असे .

आता मुक्तांगण मध्ये स्थिरावलो होतो .. मला येवून सुमारे चार महिने होत आले होते ..या काळात मी साफसफाई .. इतर कामात मदत करताना ..समूह उपचार कसे घेतात .. योगाभ्यास घेणे .. मुक्तांगणच्या बाहेरची किरकोळ कामे करणे यात पटाईत झालो होतो .. अर्थात स्वभावानुसार आम्ही कार्यकर्ते एकमेकांची मस्करी देखील करत असू ..अजून वृत्तीत पाहिजे तेवढा गंभीरपणा आलेला नव्हता .. व्यसनमुक्त रहात असताना जी उर्जा निर्माण होते किवा व्यसनात खर्च होणाऱ्या ज्या उर्जेची बचत होते ती उर्जा पूर्णपणे सकारात्मक कामात लावली पाहिजे असे मँडम सांगत ..ते मात्र पूर्णपणे जमत नव्हते तसेच अजूनही माझी रात्रीची झोप सुरळीत झाली नव्हती ..दिवसभर जरी मी कामे ..मस्ती ..मस्करी ..थोडेसे वाचन यात वेळ व्यतीत करीत होतो तरीही रात्री मात्र सुमारे २ ते ३ वाजेपर्यंत झोप येत नसे .. एकदा बिछान्यावर गेले की अनिश्चित भविष्यकाळ.. भयावह भूतकाळ .. या बद्दल विचार मनात येत असत .. उलट सुलट विचारांनी मन व्यथित होई .. अनघा पासून दूर होऊन सुमारे दीड वर्ष होत आले होते ..तिचा काहीच ठाव ठिकाणा नव्हता .. माझ्या भविष्यकाळाच्या स्वप्नांचा जणू आत्माच हरवल्यासारखे झाले होते .. अनघाची आठवण झाली की मन खूप व्याकुळ होई ..स्वताच्या असहायतेची खूप चीड येई .. तर कधी कधी सगळ्या जगाचा राग येई ..' एक तू ना मिला ..सारी दुनिया मिले भी तो क्या है ' अशी अवस्था होई ..मग काही दिवस मी उदास राहत असे .. निराशेत..वैफल्यात आला दिवस कसातरी ढकलत असे .. मँडमना देखील मी अनघाबद्दल सगळे सांगितले होते .. त्यांनी मला धीर देवून ..सगळे काही नीट होईल यावर विश्वास ठेवायला हवा सतत असा दिलासा दिला होता .. मी असा उदास मूडमध्ये असलो की रात्रीचा एकटाच योगाभ्यासाच्या हॉल मध्ये जावून जुनी दर्दभरी गाणी म्हणत बसे ..बाकीचे निवासी कार्यकर्ते कधी कधी माझी थट्टा करत.. तर कधी सहानुभूती दर्शवत असत . अनघाने व्यापलेला मनाचा कप्पा मला अस्वस्थ ठेवण्याचे काम चोख बजावत होता .

त्याच काळात मुक्तांगणच्या कार्यात मोलाचा सहभाग असलेले डॉ . आनंद नाडकर्णी यांनी ब्राऊन शुगरच्या व्यसनाधीनते वर आधारित .. दूरदर्शन मालिका निर्मितीचे काम सुरु केले होते .' एक आकाश संपले ' असे त्या मालिकेचे नाव होते ..ही मराठी मालिका नंतर दूरदर्शनवर प्रसारित झाली होती .. मालिकेच्या दोन भागांचे चित्रीकरण मुक्तांगण मध्ये होणार होते ..सुमारे चार दिवस त्या मालिकेत काम करणारे कलाकार .. तंत्रज्ञ यापैकी काही लोक आमच्या सोबत मुक्तांगण मध्ये रहायला होते .. या मालिकेतील व्यसनी व्यक्तीची प्रमुख भूमिका चावला या आडनावाच्या कलाकाराने केली होती ( त्याचे पहिले नाव आता आठवत नाहीय नीट) .. हा मराठी उत्तम बोलत असे..त्याने त्याची भूमिका उत्तम व्हावी म्हणून आमच्या सगळ्यांकडून ब्राऊनशुगर मुळे येणाऱ्या नशेबद्दल..टर्की बद्दल माहिती घेतली होती . मालिकेतील नायक ब्राऊन शुगरच्या व्यसनात अडकून खूप नुकसान करून घेतो आणि मग उपचारांसाठी मुक्तांगण मध्ये दाखल होतो असे कथासूत्र होते ..त्यानुसार नायकाच्या मुक्तांगण मधील उपचारांच्या भागाचे चित्रीकरण मुक्तांगण मध्ये होणार होते ....त्यात समूह उपचार .. योगाभ्यास .. व्यक्तिगत समुपदेशन .. संगीत उपचार यांचे देखील थोडे थोडे चित्रीकरण झाले ..संगीत उपचारांच्या चित्रीकरणाच्या वेळी ...मी चांगला गातो म्हणून माझे ' या जन्मावर ..या जगण्यावर शतदा प्रेम करावे ' हे गाणे चित्रित झाले .. समूह उपचार सुरु आहेत ..नायक वार्डसोबतच्या इतर मित्रांसोबत संगीत उपचारात बसला आहे आणि समोर मी हे गाणे म्हणतोय असा प्रसंग चित्रित केला गेला . हा माझा मोठा सन्मान होता .. त्या निमित्ताने मला कँमे-या समोर येण्याची संधी मिळाली होती ..सुमारे दोन मिनिटे  का होईना ..मी त्या मालिकेत झळकलो होतो .. चित्रीकरण झाल्यावर मनात विचार आला अनघा जिथे कुठे असेल ती नक्की ही मालिका पाहिल .. तीला मी पण दिसेन ..मी आता चांगला आहे हे कळेल ..मुक्तांगण मध्ये आहे हे देखील समजेल..कदाचित ती माझ्याशी संपर्क करेल .

================================================================

डॉ .आनंद नाडकर्णी यांची जादू ! ( भाग १७० वा )

डॉ .आनंद नाडकर्णी या सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञांबद्दल मुक्तांगण मध्ये ऐकूण होतो की ते खूप छान बोलतात .. सुंदर समूह उपचार असतो त्यांचा वगैरे .. ते मुक्तांगणच्या कार्यकारी मंडळात होते असेही ऐकले होते .. ते त्याकाळी दोन तीन महिन्यातून एकदा मुक्तांगणला येत असत .. ठाण्याला त्यांचे क्लिनिक होते .. त्याकामातून वेळ काढून ते खास मुक्तांगण मध्ये आले की एखादा समूह उपचार घेत असत सर्वांचा .. अगदी प्रथम मी त्यांना महिले तेव्हा मी बुचकळ्यात पडलो की इतक्या अवाढव्य देहाचा माणूस इतका चपळ कसा ? त्यांचा चेहरा नेहमी हसतमुख आणि प्रसन्न असे ..डोळे अतिशय बोलके .. ते जेव्हा समूह उपचार घ्यायला आले तेव्हा आम्ही सगळे ते काय सांगतात याकडे लक्ष देवून होतो ..जुनी मंडळी देखील या वेळी नवीन काय सांगणार उत्साहाने बसली होती .. ते दारू ..चरस ..गांजा अगैरे व्यसनांचा अजिबात उल्लेख न करता त्या दिवशी बाबांसारखेच सृजनशीलता या विषयावर बोलले .. त्यांचे वजन सर्वसामान्य माणसाच्या तुलनेत जरा जास्तच होते .. तरीही ते अतिशय चपळपणे हालचाली करत होते .. आधी त्यांनी सर्वाना स्वतची ओळख करून दिली .. मग विचारले तुमच्या पैकी किती जाण कविता करतात ? हा अगदी अनपेक्षित प्रश्न होता .. आमच्या पैकी काही जणांनी हात वर केले.. तेव्हा पुढे म्हणाले आज आपण सर्व जण मिळून कविता करायची आहे ..अशी समूहाने मिळून कविता कशी करायची ते मला समजेना ..त्यांनी मग पुढे कवितेचा सर्वात महत्वाचा भाग भावना आहे असे सांगत .. आपल्या मनातील भावना मोजक्या अर्थपूर्ण शब्दात मांडणे म्हणजे कविता .. कविता करायला देखील विशेष प्रतिभा असलीच पाहिजे असे नाही तर .. आपल्या मनातील नेमक्या भावना ओळखण्याचे कसब ..त्या भावना सुसंगतपणे इतरांपर्यंत पोचण्यासाठी ..कागदावर उतरवण्याची कळकळ ..आणि आपल्या मनातील भावनेसाठी योग्य शब्द निवडण्याचे भान हवे हे स्पष्ट केले . पूर्वी कॉलेजला असताना मी काही प्रेम कविता केल्या होत्या .. त्यात तुझ्याशिवाय जिवन ...जिवंत मरण ..मनाला चटका .. कडक उन्हाळा .. हृदयातील खळबळ .. हुरहूर .. विरह .. समर्पण .. निष्ठुर जग .. असे शब्द असत बहुधा . अश्या चार पाच कविता करून काही दिवस मी कवी म्हणून मिरवलो होतो कॉलेजला.. त्यामुळे मी देखील कविता कोण कोण करतो हे नाडकर्णी सरांनी विचारल्यावर हात वर केला .. मग नाडकर्णी सर् पुढे सांगू लागले .. कविता करताना दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की कवितेतील शब्द एकमेकांची घट्ट बांधणे..म्हणजेच चपखल पणे मांडणे .. त्यासाठी अगदी खूप वाचन .. शब्द संग्रह असलाच पाहिजे असे अजिबात नाही असे सांगताना त्यांनी बहीणाबाई चौधरी सुप्रसिध्द कावियात्रींचे उदाहरण दिले ..अशिक्षित असलेल्या या स्त्री ने व्यवहारात नेहमी वापरले जाणारे शब्द वापरून अतिशय सुंदर कविता केल्यात ..ज्या अजरामर आहेत ..

कवितेत यमक नावाचा प्रकार देखील महत्वाचा आहे ज्यात कवितेच्या ओळीतील शब्दांच्या उच्चारांचा ..ताल जपावा लागतो .. असे सांगून यमक म्हणजे नेमके काय हे स्पष्ट करताना फळ्यावर नळ हा शब्द लिहिला व आम्हाला या शब्दासारखे शेवटी ' ळ ' आलेले दोन अक्षरी व तीन अक्षरी शब्द सांगा असे विचारले .मुलांनी त्यावर .. चळ ..मळ ..कमळ..वळ ...कांबळ..वगैरे उत्तरे दिली ..यावर सगळ्यांना शाबासकी त्यांनी असेच करायचे आहे आपल्याला असे म्हणत फळ्यावर ' हसत हसत जगायचे ' अशी ओळ लिहिली व या ओळीतील शब्दांचा ताल ..अर्थ ..यमक सांभाळून पुढच्या ओळी आम्हाला सुचवायला सांगितल्या .. एकंदरीत गम्मत होती सगळी ..एकाने पुढे ' व्यसन नाही करायचे ही ओळ सुचविली .. दुसऱ्याने ...इतरांनाही हसवायचे असे लिहिले ..मी देखील मग त्याखाली .. नाही रडायचे , नाही कण्हायचे असे लिहिले .. पाहता पाहता ऐक अर्थपूर्ण कविता तयार झाली ती अशी

हसत हसत जगायचे
व्यसन नाही करायचे
नाही रडायचे, नाही कण्हायचे
नाही हरायचे ,नाही पळायचे
हसत हसत जगायचे .

समर्थ पणे उभे राहायचे
इतरांनाही हसवायचे
नाही उतायचे ,नाही मातायचे
नाही कोणालाही रडवायचे
हसत हसत जगायचे !

ही कविता फक्त पाच मिनिटात तयार झाली ..मग पुन्हा त्यांनी दुसरी ओळ लिहिली ..पुन्हा कविता झाली .. तासाभरात आम्ही चार पाच कविता तयार केल्या सर्वानी मिळून . मग नाडकर्णी सरांनी या कवितेला आता आपण चाल लावू असे मनात टाळ्यांच्या तालावर कवितेला चाल लावली . खूप मजा येत होती सर्वाना ..अश्या हसत खेळत झालेल्या समूह उपचारांचा लाभ असा की काहीतरी नवीन शिकायला मिळाले सर्वाना .. सुमारे दीड तास सर्वांच्या मनातील निराशा ..वैफल्य ..अश्या नकारात्मक भावना पळून जावून त्या जागी.. उत्साह .. उत्स्फूर्तता ..आनंद या भावना निर्माण झाल्या ..शिवाय नंतर वार्डात अनेक कवी निर्माण झाले ..ज्यांनी तीनचार दिवस कविता करून धुमाकूळ घातला होता . एखादी कठीण वाटणारी गोष्ट अतिशय सोपी सर्वाना समजेल अश्या प्रकारे सांगायची सरांची हातोटी अवर्णनीय होती .. व्यसनांपासून दूर रहात जर अश्या गोष्टी करून आपण आपल्या भावनाव्यक्त करत गेलो तर ..व्यसनमुक्ती सहज साध्य होऊ शकते हे पुढे त्यांनी सांगितले .मुक्तांगण च्या या धावत्या भेटीत डॉ. आनंद नाडकर्णी म्हणजे निखळ आनंद अशी त्यांची छाप त्यांनी सर्वांवर सोडली होती ... त्या नंतर लायब्ररीत असलेली त्यांनी लिहिलेली बहुतेक पुस्तके मी आवर्जून वाचली !' गद्धे पंचविशी ' .. ' एका सायकियाट्रिस्टची डायरी' ..ही नावे ठळकपणे आठवतात ..नंतर त्यांचे व्यसनमुक्ती वर आधारित ' मुक्तीपत्रे ' विवेकनिष्ठ भावोपचार या उपचार पद्धतीवर आधारित ' विषादयोग ' वगैरे !

कार्यकर्ता प्रशिक्षण

धावती भेट ..ऑब्सेशन ! ( भाग १६१ वा )

दुपारी जेवणे झाल्यावर सर्वांचा निरोप घेवून मी एक दिवसासाठी घरी जायला निघालो .. मुक्तांगणच्या बाहेर पडताच ..एकदम सगळी बंधने निघून गेल्यासारखी वाटली .. मुक्तांगण मध्ये असताना सतत कोणी न कोणी तरी आपल्याला पहात आहे ..आपले परीक्षण करीत आहे .. आपल्या चुकांवर लक्ष ठेवून आहे याची जाणीव होती .. बाहेर तसे नव्हते .. रस्त्यावरचे लोक ओळखीचे नव्हते .. कोणाला माझ्यावर लक्ष ठेवायला वेळही नव्हता ..जो वर मी काही वेगळे वर्तन करणार नाही तोवर कोणीही माझी दखल घेतली नसती ..ही अशी अती स्वातंत्र्याची भावना माझ्या सारख्या व्यसनी करिता घातक असते .. अशा वेळी मनात व्यसनाचे विचार येवू शकतात .. आणि या विचारांना जर थारा दिला गेला तर ते विचार .. थोडीशी घ्यायला काय हरकत आहे ..कोणाला समजणार सुद्धा नाही ..अशा भावनेत रुपांतरीत व्हायला वेळ लागत नाही ..या प्रकाराला ' ऑब्सेशन ' असे म्हणतात हे मला मुक्तांगण मध्येच समजले ..म्हणजे व्यसनमुक्तीच्या काळात ... व्यसन केल्यावरच्या त्या मस्त धुंदीची आठवण येणे .. थोडी घेण्यास काय हरकत आहे असे विचार वारंवार मनात येणे .. आता आपल्याला व्यसनमुक्ती साठी आवश्यक अशा सगळ्या गोष्टी माहीतच आहेत ..तेव्हा एकदा घेतल्याने काही फरक पडणार नाहीय ..वगैरे विचार मनात येवून व्यसनमुक्तीचा निश्चय डळमळीत होऊ शकतो .. हे विचार जर लगेच झटकून टाकले नाहीत ..तर हमखास गडबड होणार असते ...माझ्या मनात तो विचार आला होता पण मी लगेच झटकून टाकला ...मनाला दुसरीकडे वळवले ..अनघा ..नाशिक ..अकोला व्यसनामुळे झालेले नुकसान यावरच सारे विचार केंद्रित केले आणि सुरक्षित झालो .. शिवाजीनगर बस स्टँड वर आलो आणि बस मध्ये बसलो ..मला वार्ड च्या खात्यातून ७० रुपये दिले गेले होते ..बसमध्ये प्रधान्याने अनघाचा विचार मनात होता ..तिला शेवटचे पाहून सव्वा वर्ष उलटून गेले होते ..या कालावधीत तिच्या बद्दल काहीच माहिती समजली नव्हती ..तिनेही मला संपर्क करण्याचा प्रयत्न केला नव्ह्ता ..हे जरा विचित्र वाटत होते ..काहीतरी अघटीत तर        झाले नसावे ही शंका मनात येत होती .. बहुधा तीने पळून जावून लग्न करू असा प्रस्ताव ठेवल्यावर मी माघार घेतली म्हणून तीला राग तर आला नसावा माझा ? हा विचार व्यथित करीत होता .. त्यावेळी परिस्थितीच अशी होती की तसे पळून जावून लग्न करण्यासारखी परिस्थिती नव्हती माझी .. तेव्हढी आर्थिक कुवत नव्हती .. ताकदही नव्हती ..धैर्य नव्हते ..व्यसन सुरु असल्याने तेव्हा शरीर मनाने देखील कमकुवत झालो होतो मी ... तिच्या म्हणण्या नुसार वागणे वेडेपणा ठरला असता ... असे माझे विचार ..तर अनघा कदाचित आयत्या वेळी मी माघार घेतली .. ज्याच्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी केली होती त्यानेच कच खाल्ली म्हणून निराश झाली असावी .. निमुटपणे कुटुंबियांच्या म्हणण्याला होकार देवून तीने माझे नाव तिच्या हृदयातून कायमचे पुसून टाकले असेल तर ? ..या विचाराने माझा थरकाप झाला .. पुन्हा मनावर निराशेचे मळभ दाटून आले .. एकदा फक्त एकदा तरी तीला भेटले पाहिजे असे तीव्रतेने वाटू लागले .. आशा निराशेच्या खेळ मनात सुरु राहिला नाशिकपर्यंत .. !

घरी पोचलो  वहिनींनी दार उघडले .. त्यांना मला असे अचानक पाहून नवल वाटले ... सुहास घरातच होता ..एकदम कसा काय आलास ? उपचार पूर्ण झाले का ? वगैरे प्रश्न विचारू लागला ..त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची चिंता वाढल्याचे जाणवत होते .. आई काही दिवस नांदेडला मामा कडे गेलीय असे समजले .. भावाला परवा परत जाणार आहे असे सांगितल्यावर त्याचे समाधान झाले .. जेवण करून भावाशी गप्पा मारत बसलो .. त्याला ' मुक्तांगण ' मधील गमती जमती सांगितल्या .. एकदोन वेळा अनघाबद्दल याला विचारावे असे वाटले पण तो काहीच सांगणार नाही याही खात्री होती ..उगाच तिचा विषय पुन्हा आमच्या विसंवादाचे कारण बनला असता ..आई घरी नव्हती हे खूप वाईट झाले होते ..अनघाच्या बाबतीत माहिती साठी माझी सगळी भिस्त आईवर होती .. तीला कदाचित सगळे सविस्तर माहित असावे .. दुसऱ्या दिवशी सकाळी नाशिकरोडला मित्रांकडे जावे अशी इच्छा होत होती ..पण घरा बाहेर पडलोच नाही .. आईचे कपाट शोधून अनघाचे एखादे जुने पत्र दिसतेय का ते पहिले .. पण हाती काहीच लागले नाही .. सायंकाळी मेरी मध्येच एक चक्कर मारली .. कंटाळा आल्यासारखे झाले होते .. कसातरी दिवस रेटला होता ..रात्र कठीण गेली ..अनेक शंका कुशंका .. जर तरची वावटळ मनात येत होती ...रफी लता चे एक जुने गाणे मनात घोळत होते .. .. ' याद में तेरी जाग जाग कें हम ..रातभर करवटे बदलते है ..हरघडी दिलमे तेरी उल्फत कें धीमे धीमे चिराग जलते है .. त्यातील एक कडवे आहे ' क्या कहे तुझसे क्यू हुई दुरी ..हम समझते है अपनी मजबुरी ..जिंदगी कें उदास राहो में ..तेरी यादो कें साथ चलते है ...' अशा अवस्थेत ही दर्दभरी गाणी मनात तुंबळ युद्ध माजवतात .. घायाळ व्हायला होते .. !

शेवटी मनावर दगड ठेवून पुन्हा मुक्तांगणला जायला निघालो ..भावाला हायसे झाल्यासारखे वाटले असावे .. बहुतेक आता कायमचे ' मुक्तांगण ' ला राहीन असे त्याला सांगितले ...बसमध्ये पुन्हा मनाचे वेगवेगळे रंग अनुभवत होतो .. एकदाचा सुरक्षित असा मुक्तांगण ला पोचलो .. सर्व मित्रांना खूप आनंद झाला ..सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी मी सुरक्षित आल्याबद्दल सर्वानी माझे अभिनंदन केले . ती रात्र पुन्हा झोपेविना तळमळत गेली ..आपण घेतलेला निर्णय चूक की बरोबर हे ठरवता येत नव्हते .. आत्मविश्वास डळमळीत झाल्यासारखा वाटला .. दुसऱ्या दिवशी मँडमना भेटलो .. त्यांना देखील मी जावून परत आल्याचे समाधान वाटले .. त्यांनी आता तुला येथे अधिक जवाबदारीने राहावे लागेल याची कल्पना दिली ..माझ्या येथे राहण्याचा खर्च म्हणून भावाने दर महिना तीनशे रुपये मुक्तांगणला भरण्याचे ठरले होते .. तो तीनशे रुपयांचा चेक सोबत आणला होता ..मँडम कडे तो दि ला .. चेक घेताना मँडम म्हणाल्या हे पैसे मुकांगणला कमाई व्हावी म्हणून घेतले जात नाहीत तर ..तुला त्याची किंमत राहावी म्हणून घेतले जातात ..आयते ..फुकट ..असे काही मिळाले तर त्याची किंमत रहात नाही असा माणसाचा स्वभाव असतो .. आजपर्यंत तुला आईवडिलांचे प्रेम .. त्यांनी दिलेल्या सुख सुविधा ..वगैरे गोष्टींची किंमत नव्हती कारण तुला हे सगळे आयते ..आपोआप मिळालेले होते ..आता या पुढे मिळालेल्या संधीचा ..प्रेमाचा .. सुविधांचा गैरवापर न करता राहिलास तर नक्कीच फायदा होईल .. पाहता पाहता सगळे बदलेल ..! मँडम च्या बोलण्याने जरा धीर आला !

================================================================

कार्यकर्ता प्रशिक्षण ! (  भाग १६२ वा .)

नाशिकहून मुक्तांगणला परत आल्यावर ..आता मी मुक्तांगण येथे फक्त उपचार घेणारा पेशंट नव्हतो तर त्यासोबतच मुक्तांगणच्या निवासी कार्यकर्ता देखील झालो होतो .. म्हणजे येथे राहत असताना थेरेपी मध्ये सहभाग घ्यायचाच होता अधिक मुक्तांगणच्या कामात देखील सहभागी व्हायचे होते ..माझ्यावर हळू हळू काही जवाबदा-या टाकण्यात येणार होत्या .. निवासी कार्यकर्त्यांची सर्वात पहिली आणि मोठी जवाबदारी असे ती संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्याची ... जरी स्वैपाकाची मोठी भांडी घासण्यासाठी वार्डच्या लोकांची दोन दोन जणांची पाळी असे ..तरी संपूर्ण इमारतीत झाडू मारणे ..झाडू मारून झाल्यावर सगळीकडे फिनेलच्या पाण्याने पोछा मारणे ...समुपदेशकांच्या खोल्या झाडून स्वच्छ ठेवणे .. इमारतीत असलेले संडास..बाथरूम स्वच्छ करणे .. बागकाम करणे .. इमारतीच्या मागील मेंटल हॉस्पिटलच्या आवारातील परिसरात खड्डे करून वेळो वेळी झाडे लावणे .. ड्रेनेज लाईन स्वच्छ ठेवणे .. मुक्तांगण मध्ये होणाऱ्या कार्यक्रमांची तयारी करणे ..अशी अनेक किरकोळ आणि अनेक महत्वाची देखील कामे निवासी कार्यकर्ते करत असत .. मँडम ने जेव्हा बंधू ला बोलावून त्याला तुषार देखील आजपासून तुमच्या सोबत कम करणार आहे असे सांगितले तेव्हा त्याला खूप आनंद झालेला दिसला .. बाहेर आल्यावर मला मिठी मारून म्हणाला ' बरे झाले तू अजून काही महिने येथे थांबतो आहेस ते ..एका महिन्यात खरे तर काहीच शिकायला मिळत नाही .. ' बंधू चे म्हणणे अगदी खरे होते .. इतक्या वर्षांचे व्यसन .. विचारांचे बिघडलेपण .. भावनिक असंतुलन केवळ ३५ दिवस किवा एका महिन्यात निघून जाणे कठीणच असते ..त्या दिवशी संध्याकाळीच प्रार्थनेच्या वेळी बंधूने वार्डात सर्वाना सांगितले की आता निवासी कार्यकर्त्याच्या आमच्या टीम मध्ये तुषार देखील सामील झाला आहे ..सर्वानी टाळ्या वाजवून पाठींबा दिला . माझी नेमणूक रोज सगळा वार्ड झाडण्यासाठी करण्यात आली ..अर्थात इतरही कामात मी सहभागी असणारच होतो .. !

एकदा रात्री जेवणे झाल्यावर बंधू माझ्याकडे आला .. म्हणाला ' अरे यार वार्डचे बाथरूम चोक झालेय ते स्वच्छ करायला हवेय आपल्याला रातोरात .. नाहीतर उद्या सकाळी वांधे होतील सगळ्यांचे ..' मी देखील उत्साहाने चल आपण साफ करूयात म्हणून निघालो .. वार्ड च्या समोर मोठा पँसेज ओलांडला की टी.व्ही .रूम व डायनिंग रूमचा मोठा वार्ड इतकाच हॉल होता ..त्याच्या कडेला चार संडास ..दोन बाथरूम ..आणि त्याच्या समोर लघवी करण्यासाठी वेगळी जागा होती .. त्या वेळी मुक्तांगण मध्ये तंबाखू विडीची बंदी नव्हती... फक्त सगळे लक्ष दारू ..आणि इतर मादक पदार्थांवर केंद्रित होते .. विडी ओढणा-याला दिवसाला सुमारे १० विड्या मिळत असत व तंबाखू खाणाऱ्याला दिवसाला तंबाखूची फक्त एक पुडी मिळे..अनेकदा विडी ओढून झाल्यावर .. थोटूक कचऱ्याच्या बादलीत टाकून द्यावे असा दंडक असला तरी ..येथे राहणारे सगळे मुळातच नियम तोडण्याच्या वृत्तीचे असल्याने बहुतेक जण विडीची थोटके लघवी करण्याच्या सिरँमिक च्या भांड्यात किवा खालच्या लघवी वाहून नेणाऱ्या नालीत टाकून देत असत ....शिवाय नीट पाणी टाकत नसत ..त्यामुळे ती नाली तुंबली होती ..लघवीचे पाणी नीट ड्रेनेज च्या पाईप पर्यंत जात नव्हते ..नालीतून ते बाहेर बाथरूम मध्ये पसरत होते .. खराटा..फिनेल .. तुंबलेली जागेत घालण्यासाठी एक काठी असे साहित्य घेवून आम्ही तेथे पोचलो ..रात्री चे ११ वाजून गेले होते ..वार्ड मधील सगळे मेंबर झोपले होते .. बाथरूम मध्ये शिरताच तुंबलेल्या पाण्याचा दर्प नाकात शिरला .. बंधू .मी ..आणि शेखर असे तिघे होतो .. बंधूने नालीच्या तोंडाशी असलेल्या गोलाकार छिद्रात काठी घालण्याचा प्रयत्न केला पण काठी पुढे जाईना .. म्हणजे तोंडाशीच चोकअप असावे .. मग बंधू ने त्या लघवीच्या पाण्यात सरळ हात घातला ..ते पाहुन मला कसेतरीच झाले ... बंधू त्या घाणेरड्या पाण्यात बिंधास्त् हात घालून हाताने चाचपडत अंदाजे काय अडकले आहे ते पाहण्याचा प्रयत्न करत होता ..मग त्याने हात बाहेर काढला तेव्हा त्याच्या हातात विडीची थोटके आली ..ती त्याने बाहेर फेकली ..तितक्यात शेखर म्हणाला ' बंधू नये पंटर को सिखावो ये ' ..बंधू हसला ..' अरे यार पहेलाही दिन है उसका ...जमणार नाही त्याला ' ..पण शेखर मागेच लागला माझ्या .. मी आढेवेढे घेत नालीजवळ बसून त्या पाण्यात हात घातला ..तसा आणखीन जास्त उग्र दर्प माझ्या नाकात शिरला .. एकदम उलटी होईलसे झाले ..मी पटकन उठून उभा राहिलो .. बंधू आणि शेखर हसु..लागले ते पाहुन मला शरमल्या सारखे झाले ..मनात आले आपली ही जणू परीक्षाच आहे ..निर्धाराने पुन्हा खाली बसलो आणि पाण्यात हात घालून आत चाचपडू लागलो ..हात जरा खोल घातला .अगदी कोपरापर्यंत .. माझ्या हाताला देखील बुळबुळीत झालेली बिडीची थोटके ..प्लास्टिकची पिशवी वगैरे लागले ..मी ते बाहेर काढले .. श्वास कोंडून धरला होता इतका वेळ .. तो कचरा बाहेर काढून पुन्हा ..हात घातला .. पुन्हा कचरा काढत गेलो आणि काय आश्चर्य हळू हळू तुंबलेले पाणी ओसरू लागले ..नालीतील सर्व पाणी ड्रेनेज मध्ये वाहून गेले .. बंधू ने माझ्या पाठीवर थाप मारून शाबासकी दिली .. मग आम्ही पाणी आणि फिनेल टाकून सर्व नाली स्वच्छ केली .. तासाभराने समाधानाने सगळे झोपायला निघालो ..मला उगाच हाताला अजून ते घाण पाणी लागलेय ..त्याचा वास येतोय असे वाटत राहिले ..बंधूने समजाविले अरे हे सगळे मानसिक असते ..लहानपणापासून मनावर ते घाण असे संस्कार झाले आहेत आपल्यावर म्हणून आपल्याला तसे वाटते व किळस येते .. लाखो सफाई कामगार रोज हेच काम करत असतात याचा तू कधी विचार केला आहेस काय ? ..बंधूचे बरोबर होते .. हजारो वर्षांपासून अश्या प्रकारची कामे करणारे लोक आहेत .. घाण सगळे करतात मात्र ती साफ करण्याची जवाबदारी विशिष्ट लोकांनाच का द्यायची ? पुढे मी संडास बाथरूम चे चोकअप काढणे .. तुंबलेले गटार साफ करणे .. ड्रेनेज लाईन साफ करणे .. वगैरे कामात तरबेज झालो ..!

दुसरे अजून एक घाण वाटणारे काम म्हणजे उरलेले खरकटे अन्न टाकण्याचा जो मोठा प्लास्टिकचा ट ब होता ... तो टब भरला की मेंटल हॉस्पिटलचा स्वीपर येवून त्या टबातील खरकटे अन्न त्याच्या डुकरासाठी घेवून जाई ..चार पाच दिवसांचे खरकटे साठल्याने ते अन्न अक्षरशः सडलेले असे .. त्या टबात वर फेस आलेला असे ..अश्यावेळी आम्हाला तो टब उचलून बाहेर स्वीपर आला की त्याला नेवून द्यावा लागे ..आणि तो मोठा तब असल्याने उचलायला दोन जण लागत .. त्या टबातील ते फेस आलेले ..दुर्गंधीयुक्त अन्न आम्ही हाताच्या ओंजळीने काढून स्वीपर च्या बादलीत टाकत असू .. एकदा तो फेस पाहून बंधू म्हणाला मस्त फर्मेंनटेशन झालेय .. हातभट्टी ची दारू तयार करताना असाच फेस येतो ..सडका गुळ आणि नवसागर घातलेले मिश्रण फसफसून वर आल्यावर मग भट्टी लावतात ..त्याचेच पाणी आपण दारू म्हणून आनंदाने पितो .. मग या कामाला काय लाजायचे !

================================================================

वार्डमधील धमाल ! ( भाग ६३ वा )

माझी रोज सकाळी वार्ड मध्ये झाडू मारण्याची ड्युटी लागली होती .. आणि दिवसभर इतर लहानमोठ्या कामात सहभागी होत होतो .. सकाळी ७ ला प्रार्थना व चहा झाला की मी झाडू घेवून वार्ड मध्ये शिरत असे .. मँडमनी आमच्या निवासी कार्यकर्त्यांच्या टीम ला कौतुकाने ' मेंटेनन्स टीम ' असे नाव दिले होते ..तसेच त्यांनी आम्हाला कंपनीत कामगार घालतात तशी कॉटनच्या जाड निळ्या रंगाच्या कापडाच्या पँन्ट ..त्याच रंगाचे शर्ट्स देखील शिवून घेतले होते ..मी वार्डात झाडू मारायला जाई तेव्हा बंधू ने वार्ड मधील टेपरेकॉर्डरवर वर छान हिंदी मराठी भजने लावलेली असत .. त्यात स्व.भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांची हिंदी भजनांची एक कँसेट मी पहिल्यांदाच ऐकली होती ..अतिशय सुंदर ..मधुर ..गाणी होती .. त्यातील ' बाजे रे मुरलिया बाजे ' हे भजन तर एकदम मस्तच या भजनांच्या तालावर मी पटापट एकेक पलंग सरकवून.. त्याखालील कचरा काढून झाडू मारत असे ..साधारण २००० फुटांचा वार्ड झाडायला मला कमीत कमी अर्धा तास तरी लागे .. व्यसनी माणसाचे सगळ्यात प्रमुख लक्षण म्हणजे तो अतिशय चाणाक्ष किवा आमच्या भाषेत ' चतरा ' असतो ..असे वेगवेगळ्या गावचे ७० ते ८० चतरे..चलाख ..थोडक्यात सांगायचे तर ..' बारा गावची दारू प्यायलेले ' लोक एकत्र राहत असले की गमती जमती होणारच .. मस्करी ...एकमेकांच्या खोड्या काढणे .. किरकोळ भांडणे हे चालतच होते .. दिवसभरात जेमतेम पाच तास थेरेपीज होत असत मग उरलेला वेळ फार थोडे लोक वाचन .. किवा इतर चांगल्या गोष्टी मध्ये व्यतीत करत .. बाकीचे टिवल्या बावल्या करण्यातच वेळ घालवत ..सर्व जण बहुधा २५ ते ३५ या वयोगटात मोडणारे होते .. काही दारुडे मात्र चाळीशी उलटून गेलेले देखील होते ..त्यापैकी एक मेजर होता सैन्यातला .. स्वतःला जरा शहाणा समजत असे हा मेजर तसेच दारू चांगली आणि ब्राऊन शुगर वाईट ...असा फरक करून ..गर्दुल्ले म्हणजे समाजाला कलंक असे नेहमी म्हणत असे ..त्याचा आम्हाला गर्दुल्ल्यांना खूप राग येई .. शिवाय तो स्वतःला जरा वेगळा ..सैनिकी शिस्तीतील मानत असल्याने चिडला की ' गोळ्या घालीन एकेकाला ' असे म्हणायचा ..त्याची एक सैन्यातील सवय होती ती अशी की ..सैन्यात सकाळी घाई घाई ने परेडला ड्रेसअप करून जावे लागत असल्याने अनेक जण म्हणे सकाळी चहा निवांतपणे पिण्यात वेळ घालवत नाहीत तर ते चहाचा मग घेवून संडासात जातात .. म्हणजे वेळेचे नियोजन नीट होते .. तो इथे देखील सकाळी चहा मिळाला की चहाचा त्यावेळी मुक्तांगणला असलेला जर्मलचा मग घेवून संडासात जाई .. त्याला अनेक वेळा आता तू सैन्यात नाहीस .. इथे असे करू नकोस असे सांगूनही तो ऐकत नसे ..एकदा रात्री तो झोपला असताना आम्ही त्याच्या मगला छोट्याच्या खिळ्याने लहानसे पटकन दिसणार नाही असे छिद्र पाडले.. झाले प्रार्थना झाल्यावर तो घाईने मग मध्ये चहा भरून घेवून संडासात गेला ..दोनच मिनिटात ' एकेकाला गोळ्या घालीन ' असे ओरडत बाहेर आला ..आम्ही सगळे गंभीर चेहरे करून ' काय झाले मेजर साहेब ? असे संभावित पणे विचारू लागलो ..तर अजून चिडला म्हणाला ' मै सब जानता हू ..ये बहोत बडी साजिश है ..वगैरे ' अर्धा तास तो बडबडत होता ..मुख्य म्हणजे त्याला तक्रार करायला मँडम कडे देखील जाता येत नव्हते कारण .. तो संडासात चहाचा मग घेवून जातो हे मँडमना देखील समजले असते .

रघु हा तेथील एकंदरीत निरीक्षण .. सर्वाना वेळच्या वेळी थेरेपीजना पाठवणे .. आनंद्वार्ड मधून येणाऱ्या लोकांची झडती घेणे वगैरे कामात तरबेज होता ..एकदा वार्ड मधील एकाच्या घरून आलेला तिळाच्या लाडूंचा डबा रात्री कोणीतरी फस्त केला .. सकाळी सकाळी तो बिचारा बोंबाबोंब करू लागला ..त्याला आवडतात म्हणून खास त्याच्या आईने २० तिळाचे लाडू पाठवले होते त्याच्यासाठी .. आता चोर कोण हे ओळखणे कठीणच होते कारण रात्रीच डबा फस्त केलेला .. कोणीही कबुल करीना ... आमच्या निवासी कार्यकर्त्यांच्या टीम साठी ही चोरी शोधून काढणे आव्हान होते मोठे .. काही उपाय सुचेना . एकदोन जणांवर संशय होता ..पण पुरावा नव्हता .. शेवटी रघु ने आयडिया केली ..तो संडासात जावून उभा राहिला ....संडासात जाणाऱ्या.. येणाऱ्या लोकांवर त्याची बारीक नजर होती .. त्याने आपले काम झाल्यावर कोणीही पाणी टाकू नये असे सर्वाना बजावले होते ..प्रत्येक जण बाहेर आला की रघु ..तो आतील ' ऐवज ' एकदा नजरेखालून घालून मग त्यावर पाणी टाकत गेला .. तासाभरात रघूने दोन चोर शोधून काढले .. आम्हाला रघूने हे नक्की कसे ओळखले ते कळले नाही ..मग रघूने फुशारक्या मारत सांगितले ..' तील का दाना.. .कभी पेट में पुरा हजम नाही होता ... वो अख्खा बाहर निकलता है ..मैने सबको चेक करके बराबर ढूंढ लिया ' .. आम्ही रघूच्या चतुरपणाची दाद दिली .. एक सांगली कडचा प्राथमिक शाळेतील शिक्षक .. दारूचे व्यसन सोडायला तेथे दाखल होता .. हा दिवसभर अवस्थ असे .. त्याच्या मनातील दारूची ओढ काही पूर्ण गेलेली नव्हती ..बाहेर असताना व्यसन करण्याची इच्छा होणे स्वाभाविक असते ..मात्र हा मास्तरला ' मुक्तांगण ' मध्ये सुद्धा दारूची तीव्रतेने आठवण येई ..नाह्मी तो गप्पा मारताना दारूची कशी मस्त नशा असते ... कश्या पार्ट्या केल्या ..कशी मजा केली हेच बोलत असे .. एकदा गुरुवारी त्याच्या घरचे लोक भेटायला असताना सर्वांच्या नकळत त्याने घरच्या लोकांकडून काहीतरी खोटे नाटे कारण सांगून पन्नास रुपयांची नोट घेतली .. खरे तर उपचार घेणाऱ्या पेशंटना अजिबात पैसे देवू नका असे पालकांना सांगितले जायचे ..काही पालक आमच्या सूचना पाळत नसत .त्यापैकीच याचे पालक होते .. याने पठ्याने ... रोज सायंकाळी जेव्हा सर्व पेशंट्सन ऐक तास ' फेरफटका ' मारण्यासाठी बाहेर सोडले जाई तेव्हा .. इमारती बाहेरच्या रस्त्यावर फिरताना जाणाऱ्या येणाऱ्या ऐक दोन मेंटल हॉस्पिटल च्या अटेंडंटशी ओळख करून घेतली होती ..

' फेरफटका ' म्हणजे मुक्तांगण च्या इमारती बाहेर मेंटल हॉस्पिटलचा जो रस्ता होता त्यावर इमारतीच्या समोरच सर्व पेशंट शतपावली केल्यासारखे इकडून तिकडे ..परत तिकडून इकडे असे फिरत असत ..काही लोक..लोक इमारती समोरच्या हिरवळीवर बसून गप्पा मारत .. आम्ही निवासी कर्मचारी त्यांच्यावर लक्ष ठेवत असू ... एका टोकाला मेंटल हॉस्पिटलला स्वयंपाकाचा पुरवठा करणारी गँस ची मोठी टाकी लावलेली होती ..या टाकीवर सुरक्षारक्षक म्हणून मेंटल हॉस्पिटलच्या दोन अटेंडंटची ड्युटी असे .. त्यापैकी एकाला या मास्तरने पटवले आहे आणि त्याच्या जवळ दारूची क्वार्टर आणायला पैसे दिले आहेत अशी खबर आम्हाला मिळाली ...तसे आमच्याकडे दाखल असलेल्या पेशंट्सना आम्ही शक्यतो मेंटल हॉस्पिटलच्या कर्मचारी वर्गाशी बोलू देत नव्हतो ..पण याने जाता येता..केव्हा तरी आमच्या नकळत अटेंडंटशी संधान बांधले होते .. आम्हाला आज तो कर्मचारी मास्तरला दारूची क्वार्टर आणून देणार आहे असे समजले होते ... आम्ही त्याला बाटली खिश्यात असताना रेडहँन्ड पकडायचे ठरवले ...त्यानुसार फेरफटका मारताना आम्ही मुद्दाम त्याच्याकडे लक्ष नाही असे दाखवले ..तो आणि त्याचा एक जोडीदार ..फिरत फिरत त्या अटेंडंट जवळ गेले हे आम्ही पहिले ..त्या अटेंडंट ने हळूच याच्या हातात काहीतरी दिले ते देखील पहिले ..आता हा उलटा वळून आपल्या बाजूला येईल तेव्हा त्याला पकडून त्याची झडती घ्यायची असा आमचा प्लान होता ..तो जसा समोरून आमच्या जवळ आला तसे बंधू ने त्याला थांबवले ....जरा तुमची झडती घ्यायची आहे असे म्हणाला .. तोच तो मास्तर इतक्या अनेपेक्षितपणे जोरात वार्ड कडे पळाला की आम्ही भानावर येईपर्यंत तो वार्डचा जीना चढून वर पोचला होता ..आम्ही सगळ्यांनी त्याच्या मागे धाव ठोकली .. वेगाने पळत तो वार्डच्या संडासात पोचला आतून दार लावले .. ' मुक्तांगण ' चे संडास मुद्दाम वरून उघडे ठेवलेले होते ..कारण आत असताना कोणाला चक्कर आली ..फिट आली तर ..वरून आंत शिरून त्याला मदत करता येत येई ..बंधू पटकन वर चढला आणि तो शिरलेल्या संडासात उतरला ..पण तो पर्यंत मास्तर ने पटकन बाटलीचे बुच उघडून ..बाटली तोंडाला लावली होती ..आतील दारू तशीच कच्चीच घटाघट रिचवली त्याने ... मग आत उतरलेल्या बंधूच्या हातात रिकामी बाटली दिली .. इतक्या लोकांच्या डोळ्या देखत हे सारे घडले ..आम्ही ठरवूनही त्याला अडवू शकलो नव्हतो ... बंधूने त्याच्या आधी ऐक थोबाडीत दिली ..पण आता रागावून काही उपयोग नव्हता ..मास्तर ने त्याचा' डाव ' साधला होता .. या प्रसंगावरून व्यसनाधीनता हा आजार किती खतरनाक आहे हे समजायला आम्हाला मदत मिळाली .

================================================================

खतरनाक आजार ! ( भाग १६४ वा .)

निवासी कार्यकर्ता म्हणून सर्व जवाबदा-या पर पाडत असताना आम्ही सर्व थेरेपीज देखील कराव्यात असा मँडमचा आग्रह असे ..कारण एकदा आपल्याला सर्व येतेय असा भाव आमच्या मनात येवून आमचा उपचारांमधील सहभाग कमी झाला असता तर त्या मुळे नुकसान आमचेच होणार होते . फक्त मुक्तांगण मध्ये राहून व्यसनमुक्ती साध्य होणार नव्हती तर आपण ज्या ' व्यसनाधीनता ' या गंभीर अशा मनो-शारीरिक आजारात अडकलो आहोत ...तो आजार कसा भयानक आहे हे समजून घेवून ..समुपदेशकाच्या सूचनांचे योग्य पालन केले नाही तर पुन्हा पुन्हा स्लीप ..रीलँप्स ..आणि पर्यायाने पुन्हा प्रचंड नुकसान ..उपचार असे करावे लागेल हे आम्ही प्रामाणिक पणे समजून घ्यावे अशी मँडमची इच्छा असे .. अनेकांना व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे एखादा व्यसनमुक्तीचा कारखाना आहे असे वाटे .. म्हणजे पेशंट अँडमीट केला की त्याने ३५ दिवस राहून एकदम व्यसनमुक्त होऊनच बाहेर पडावे ही पालकांची अपेक्षा .. तर प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या व्यक्तीला देखील काही दिवसात आपण सुधारल्यासारखे वाटून तो लवकर घरी जाण्याचा आग्रह धरे .. स्वतःचे अनेक वर्षांचे वैचारिक ..भावनिक बिघडलेपण ध्यानात घेतले नाही ....मान्य केले नाही ..त्यात सुधारणा केली नाही तर सुधारणेची फसवी भावना ...पुन्हा त्याच गर्तेत घेवून जाई .. .स्वतच्या व्यसनमुक्तीच्या इच्छेला प्रामाणिक पणाचे पाठबळ नसेल तर वारंवार व्यसन सुरु होते असे येथे सांगितले जाई .. मुक्तांगण मध्ये दाखल झाले की शरीरातील व्यसनांचा प्रभाव तर साधारणपणे एका आठवड्यात निघून जाई ..मनातील व्यसनाचे सुप्त आकर्षण काढायला प्रामाणिक प्रयत्न गरजेचे असत ...आपले व्यसन आता सुटले असे म्हणून बेसावध राहून चालत नाही .. कोणत्याही मनाविरुद्ध घडलेल्या घटनेमुळे ..एखाद्या भावनिक अस्थिरतेमुळे .. राग .. खुन्नस .. निराशा ..वैफल्य अशा भावनांमुळे मन विचलित होऊन किवा जुने व्यसनी मित्र भेटल्यामुळे ....मनात पुन्हा एकदा तरी व्यसन केल्यानंतरची धुंदीची .. तणावमुक्तीची .. काही काळ मिळणाऱ्या धैर्याची ..सर्वश्रेष्ठ असल्याचा आभास निर्माण करणारी अवस्था हवीहवीशी वाटू लागल्यामुळे ... जर योग्य मदत घेतली नाही तर ..तर .. पुन्हा ' ये रे माझ्या मागल्या ' आहेच .

मुक्तांगण मध्ये असे अनेक जण होते जे केवळ उपचारात केवळ शरीराने सहभागी असत मात्र मनापासून हा सहभाग नसे .. अशा लोकांना बाहेर गेल्यानंतर काही दिवसातच पुन्हा उपचार घेण्यासाठी यावे लागे .व्यसनाधीनतेच्या मुळाशी असलेल्या विचारांचा ..भावनांचा जो पर्यंत प्रामाणिक पणे शोध घेवून ..ते विचार ..भावना काढून टाकण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत व्यसन .. नुकसान .. उपचार हे चक्र सुरु राहते ..म्हणून जास्तीत जास्त काळ व्यसनमुक्ती केंद्रात किवा उपचारात्मक वातावरणात राहणे .. डिस्चार्ज झाल्यावर पाठपुरावा करणे .. वेळोवेळी समुपदेशकाची मदत घेणे अपरिहार्य असते ..निवासी कार्यकर्ता म्हणून जास्त दिवस राहिल्यानंतर मी जेव्हा वारंवार समूह उपचार ..समुपदेशन यांना समोर जावू लागलो तेव्हाच या आजाराची गंभीरता मला समजत गेली .. निवासी कार्यकर्त्यांमध्ये जो अनिल नावाचा कर्नाटकच्या मोठ्या उद्योगपतीचा मुलगा होता तो ..सतत कानाला वॉकमन लावून गाणी ऐकत असे .. कामात अतिशय हुशार ..विशेषतः त्याला साफसफाई च्या कामाची खूप आवड होती .. तो म्हणे गेल्या पाच वर्षात तीनचार वेळा मुक्तांगण मध्ये उपचारांसाठी दाखल झाला होता .. या वेळी जास्तीत जास्त दिवस राहिला तर सुधारेल या आशेने कुटुंबियांनी याला जास्त काळ मुक्तांगण मध्ये ठेवले होते .. तो देखील लवकर घरी जाण्याचा आग्रह करत नसे . मात्र अशा जास्त काळ राहणाऱ्या मुलांना.. घरी काही कार्यक्रम असेल तेव्हा .. किवा जरा चेंज म्हणून मँडम काही दिवस घरी जावून पुन्हा येण्याची परवानगी देत . फक्त एक अट असायची.. ती अशी की घरी गेल्यावर व्यसन करायचे नाही ..चार दिवस सर्व नातलगांसोबत आनंदाने घालवून पुन्हा मुक्तांगणला यायचे ..उपचार सुरूच ठेवायचे . तर हा अनिल एकदा बरेच दिवस झाले घरी गेलो नाही म्हणून चार दिवस सुटी घेवून कर्नाटकात त्याच्या घरी गेला होता .. आमचे सर्व निवासी कार्यकर्त्यांचे सततच्या सहवासाने एकमेकांशी जिवाभावाचे संबंध जुळत .. आमच्यापैकी जो कोणी काही दिवस सुटीवर घरी जाई तो परत येताना आमच्या चारपाच जणांसाठी घरून काही खाण्याचे पदार्थ वगैरे आणत असे ..अनिल तर श्रीमंत असल्याने घरून परत येताना निवासी कार्यकर्ता बांधवांसाठी ..येताना खूप खावू आणतो असे मी ऐकून होतो .. त्यात विविध प्रकारचे फळांचे जँम ..सरबत .. जलजीरा च्या पुड्या वगैरे असे तसेच नवीन गाण्यांच्या ध्वनिफिती असतच ...नवीन कपडे असत .. हा अनिल एकदा घरी गेला असताना.. तो आपल्यासाठी काय काय आणेल या कल्पनेत आम्ही होतो .. एकदाचा चार दिवसांनी सायंकाळी पाच वाजता सर्व वरिष्ठ कार्यकर्ते घरी गेल्यावर अनिल ऑटोतून मोठ्या दोन बँगा भरून घेवून आला .. बाहेर ऑटोची चाहूल लागताच आम्ही पटकन बाहेर गेलो पाहतो तर अनिल ऑटोत बसलेला ... त्याच्या हाताला मोठे प्लास्टर लावलेले होते ..बापरे हे काय झाले म्हणत.. आम्ही सर्वानी त्याच्या बँगा उतरविल्या .. त्याला आधार देवून सावकाश खाली उतरवायला मदत केली .. म्हणाला ' यार जरा बाईक स्लीप होकार गिरा तो ये हात फ्रँक्चर हो गया ..आम्ही सर्वानी हळहळ व्यक्त करीत त्याला आधार देवून आत आणले ...मग म्हणाला ' सबके लिये देखो क्या क्या लाया हू ...' तसे आम्ही पटापट त्याच्या बँगा उघडल्या .. रघु देखील त्याची झडती घेण्यासाठी हजर होताच ... रघूने आधी त्याचे खिसे तपासले .. मग बँगा बारकाईने तपासल्या .. त्यात नेहमीप्रमाणेच फळांचे जँम .. गाण्यांच्या नव्या कँसेट्स .. नवे कपडे वगैरे होते .. लगेच जलजीराची तीन पाकिटे फोडून आम्ही चार पाच जणांनी जलजीरा प्यायले .. त्याला कपडे बदलण्यास मदत केली .. साधारणतः अर्ध्या तासाने तो संडासला जातो म्हणून खालच्या मजल्यावर पालक आणि स्टाफ करिता असलेल्या संडासात गेला ..हा संडास बहुधा कार्यकर्ते आणि पालक वापरात असल्याने वरून उघडा नव्हता ... बराच वेळ झाला तरी अनिल बाहेर येईना ...रघु ला संशय आलाच .. रघूने एकदोन वेळा दार ठोठावून त्याला आवाज दिला तर ' रुको यार जरा ..अभी तो बैठा हू ' असे उत्तर मिळाले आतून .. मग रघु इमारतीच्या बाहेर जावून संडासच्या मागच्या बाजूला जावून उभा राहिला ..

याने सोबत नक्कीच ब्राऊन शुगर लपवून आणली असावी असा रघूचा कयास होता .. आमचे लक्ष मात्र त्याने आणलेल्या खाण्याच्या वस्तूंमध्ये गुंतलेले असल्याने तो विचार आमच्या मनातही शिरला नव्हता .. उलट आम्ही रघु उगाच संशय घेतो म्हणून लागलो ..शेवटी अनिल अर्ध्या तासाने संडासच्या बाहेर पडला ..तोच बाहेर मागच्या बाजूला संडासच्या खिडकीशी चाहूल घेणारा रघु आत आला ..रघूच्या हातात ब्राऊन शुगर ओढून वापरलेली पन्नी होती .. म्हणाला ' अनिल आपने अभी ये पन्नी संडासकें खिडकीसे बाहर फेका था .. साथमे कितना माल लाया सच सच बता दो ' अनिल चिडला रघुवर ' साले तू कितनी बार झडती लेगा ? एक बर झडती दिया है ना मैने .. फालतू शक् लेता है .. ये पन्नी मैने नही फेका .. तू झुठ बोल रहा है ' म्हणत रघुशी वाद घालू लागला ..शेवटी बंधूने अनिलला पुन्हा झडती दे असे सांगितले .. रघु ने पुन्हा खिसे तपासले तर काहीच मिळाले नाही .. रघु जरा विचारात पडला .. मग सरळ त्याने अनिलने हाताला लावलेल्या प्लास्टर कडे नजर टाकली म्हणाला ये भी दिखावो खोलकर .. आम्ही पण आग्रह केला तेव्हा अनिलच्या हाताचे प्लास्टर फाडण्यात आले ..त्यात नायट्रावेट च्या गोळ्यांच्या चार स्ट्रिप्स ... ब्राऊन शुगर च्या दहा पुड्या .. कोऱ्या पन्नया असा एवज निघाला .. आता अनिल निरुत्तर झाला होता ..अपघात वगैरे काही झाला नव्हता त्याचा .. त्याने सरळ सरळ आमची फसवणूक केली होती .. बिंग फुटल्यावर अनिल एकदम रघुवर चिडला त्याला मारायला धावला रघु पटकन पळाला... आम्ही अनिलला धरले .. शांत केले .. आता पुन्हा तुला उपचार घ्यावे लागतील असे सांगून बंधू ने मँडमला फोन लावून सगळी हकीगत सांगितली ..मँडमने अनिलला आता मुक्तांगण मध्ये न ठेवता ..पुन्हा आनंदवार्ड मध्ये दाखल करा अश्या सूचना दिल्या ...अनिल आनंदवार्ड ला जायला तयार होईना .. कसे तरी त्याची समजूत घालून आम्ही त्याला सायंकाळी आठ वाजता आनंदवार्ड मध्ये पोचवून आलो .
 

================================================================
अनिलचे साहस ! ( भाग १६५ वा )

अनिलला मँडम च्या सूचनेनुसार बंधू आणि विजय यांनी केवळ अंगावरच्या कपड्यानिशी आनंद वार्ड मध्ये सोडले होते .. त्याचे सगळे किमती सामान मुक्तांगण मध्येच होते ज्यात नवीन कँसेट्स ..एक कँमेरा ..खाण्याच्या वस्तूंचे सीलबंद डबे वगैरे ! आम्हाला मनापासून अनिल बद्दल वाईट देखील वाटत होते .. कारण तो सगळ्यांशी चांगला वागत असे ..त्याच्या बाबतीत असे कसे घडले ? याची चर्चा करत असताना एक लक्षात आले की अनिलला जरी व्यसनमुक्त होण्याची इच्छा होती ..तरीही चार दिवस सुटीवर घरी गेला असताना .... आपण आता मुक्तांगणलाच राहतोय ..व्यसनमुक्त होणारच आहोत ..मग जरा सुटीवर घरी एखादे वेळा व्यसन केले तर काय हरकत आहे असा विचार त्याचा मनात येवून त्याने एकदा व्यसन केले ..नंतर त्याला थांबता आले नाही ..घरी चारही दिवस त्याने व्यसन केले असावे मग मग मुक्तांगणला परत येताना.. आता आपल्याला टर्की होईल ही भीती वाटली असावी ..या भीतीने त्याने सोबत देखील माल आणला होता .. व्यसनमुक्तीची इच्छा त्याचबरोबर एकदा ..थोडेसे ..अशी व्यसनाची तीव्र ओढ ही दुहेरी मानसिकता बहुधा प्रत्येक व्यसनीच्या बाबतीत निर्माण होत असावी ..अशा वेळी निग्रह नसेल तर पुन्हा व्यसन सुरु होते ..हा चकवा ओळखून योग्य वेळी मनाला आवरणे कठीणच असते ! रात्री बराच वेळ पर्यंत काहीबाही चर्चा करत आम्ही जागे होतो .. साधारणपणे १ वा . आम्ही सगळे निवासी कर्मचारी वार्डच्या बाजूलाच असलेल्या लायब्ररीत झोपलो .

अचानक बाहेर मोठ्याने आरडा ओरडा एकूण आम्हाला जाग आली ..सगळे पटकन उघून बाहेर आलो तर ..वार्डच्या दारात तीन चार पेशंट भेदरून उभे होते .. आम्हाला पाहून त्यांना धीर आला .. ते खुणेनेच आम्हाला गच्चीकडे जाणाऱ्या जिन्याकडे बोट दाखवून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते..आम्ही त्या जिन्याजवळ गेलो आणि स्तब्धच झालो .. जिन्यात टोकाला अनिल फक्त एका निकर वर उभा होता .. गोरापान ..मात्र आता पांढराफटक दिसत होता .. त्याचे कुरळे केस विस्कटलेले होते ... एखाद्या भुतासारखा तो उभा होता ..डोळे लाललाल झालेले .. थोडासा बधीर देखील वाटत होता ..बंधूने धाडसाने पुढे होऊन त्याचा हात धरला आणि त्याला जिन्यातून खाली आणले .. याला आपण संध्याकाळी आनंद वार्ड मध्ये सोडून आलो होतो ..हा पुन्हा इथे मुक्तांगण मध्ये कसा ? आणि या अशा अवतारात ? सगळे बुचकळ्यात पाडले होते .. तर वार्डच्या पेशंटना अनिल बाबत फारशी माहिती नसल्याने ते सगळे घाबरलेले .. एखादे भूत पहिल्यासारखा त्यांचा चेहरा झाला होता .. मुक्तांगण मध्ये एक वर्षापूर्वी एक ब्राऊन शुगरचा व्यसनी टर्कीत असताना अपघाताने जिन्यातून खाली डोक्यावर पाडून मरण पावला होता .. त्याचे भूत येथे अधून मधून फिरते अशी आख्यायिका सर्वानी ऐकली होती .. ते भूत म्हणे एका काळ्या बोक्याच्या रुपात फिरत असते ..असे सांगितले जाई ..एकदोन वेळा रात्री मलाही तो ठार काळा बोका दिसला होता .. त्याचे लालबुंद डोळे अंधारात चमकत असत ..मी देखील त्यावेळी जरा टरकलो होतो ..नंतर बंधूने सांगितले होते की .अरे तो बोका मेंटल मेंटल हॉस्पिटलमधल्या किचनच्या कर्मचाऱ्यांनी पाळलेला आहे .. दिवसभर तो तेथे किचन मध्ये सुस्त पडून असतो आणि रात्री बाहेर फिरतो .. मुक्तांगण मध्ये आलेले नवीन पेशंट रात्री बेरात्री झोप येत नाही म्हणून उगाच वार्डच्या बाहेर फिरतात... त्यांनी तसे रात्री बेरात्री वार्डच्या बाहेर पडून इमारतीत फिरू नये म्हणून निवासी कर्मचाऱ्यांपैकीच कोणीतरी ही काळ्या बोक्याची बातमी पसरविली आहे .

अनिलला आम्ही धरून लायब्ररीत आणले ..मग सगळा उलगडा झाला याने सोबत कालच सोबत आणलेल्या नायट्रव्हेट च्या गोळ्यांपैकी काही गोळ्या खाल्ल्या होत्या ..शिवाय संडासात ब्राऊन शुगर ओढ्लीच होती ..त्याला आम्ही आनंदवार्ड मध्ये पोचविले तेव्हा तो नशेतच होता ..रात्री केव्हातरी नशेतच तो उठून आनंद्वार्ड च्या भिंतीवरून उडी मरून पळाला होता .. पळून सरळ बाहेर न जाता मुक्तांगण मध्ये ठेवलेल्या त्याच्या वस्तू घेण्यासाठी तो मुक्तांगणच्या इमारतीच्या मागील ड्रेनेज च्या पाईपला धरून वर गच्चीवर गेला होता ..गच्ची वरून खाली येणारे जाळीचे दार तोडून तो मुक्तांगणच्या आत प्रवेशला होता ..ड्रेनेजचा पाईप चढताना दोन वेळा तो खालच्या घाणीत पडला .. त्याचे कपडे खराब झाले होते म्हणून कपडे काढून तो फक्त निकर वर होता ..गच्चीवरून जीना उतरून खाली येत असताना .. वार्डचा एक नवीन पेशंट सुधीर झोप येत नाही म्हणून कँरीडाँर मध्ये फिरत असताना ..त्याला हा जिन्यातून खाली येणारा अनिल दिसला ..पांढराफटक पडलेला ..अंगावर फक्त निकर ..विस्कटलेले केस ..लालभडक डोळे ..झाले सुधीरची फाटली ..भूत ..भूत ..असे बोंबलत सुधीर वार्डमध्ये पळाला.. वार्डचे सगळे लोक उठले ..त्यांच्या आवाजाने आम्हाला जाग आली . आम्ही कशीतरी वार्डच्या लोकांची समजूत घालून त्यांना परत झोपायला पाठविले .. सुधीर काही बोलण्याच्या बोलण्याच्या.. .ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हताच .. अनिल ला अंगावर कपडे घालून पुन्हा पहाटे चार वाजता आनंद वार्ड मध्ये सोडण्यात आले ..तेथून त्याची रवानगी ' उंच ' वार्डे मध्ये करण्यात आली .
.. !

( मुक्तांगण ..आणि इतर व्यसनमुक्ती केंद्रांच्या बऱ्याच अँडमिशन नंतर आज अनिल खूप चांगला राहतो आहे ..त्याच्या पत्नी व ऐका गोड मुलीसोबत आनंदाने संसार करतो आहे ..असे मला परवाच पुण्याच्या एका मित्राकडून समजले ..खरोखर खूप आनंद झाला हे ऐकून ..कारण अनिल आणि आम्ही दोनचार जण म्हणजे इतरांच्या दृष्टीने गाँन केस होतो )