प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.com



बुधवार, 27 मार्च 2013

जिंदगी के सफर मे....!!

भाग १४१ वा 

आम्ही ते भीषण दृश्य पाहून थिजून गेलो होतो ...उताण्या पडलेल्या बाळूजवळ एक थाळी पडलेली होती ...आणि त्याच्या चार फुट दूर ..मागच्या भिंतीला टेकून एक दुसरा मनोरुग्णा उकिडवा बसला होता .. आम्ही चौकशी केल्यावर समजले की त्या उकिडव्या बसलेल्या पेशंटने बाळू ला काल रात्री डोक्यावर जाड स्टीलची थाळी जोरात मारली होती ..आणि तेव्हापासून तो असा पडलेला होता .. त्या पेशंट चे नाव फिलीप असे होते ..हा प्रकार घडला तेव्हा चारपाच जण जागे होते ..त्यांनी सारा प्रकार प्रत्यक्ष पहिला होता .. यांचे भांडण बिडीवरून झाले .. बाळू हा खूप जुना पेशंट असल्याने त्याला वार्डच्या बाहेर ..मेंटल हॉस्पिटलच्या आवारात फिरण्याची परवानगी होती .. बाळू बाहेर फिरणाऱ्या इतर पेशंट प्रमाणे .. रुग्णांना भेटायला येणाऱ्या पालकांकडे पैसे मागून त्यातून बिड्या घेवून त्या वार्डात इतर रुग्णांकडून जास्त पैसे घेवून विकायचे काम करत असे .. किवा बिडीच्या बदल्यात ..पाय दाबून घे ..मालीश करून घे ..स्वतचे कपडे धुवून घे अशी कामे ..इतर बिडी साठी तरसणाऱ्या रुग्णांकडून करून घेत असे ..काल रात्री म्हणे बाळू झोपला असताना फिलीपने जावून बाळूच्या खिश्यात बिडी साठी हात घातला .. तेथे बिडी मिळाली नाही ..मग बाळूने कमरेच्या करदोड्याला बांधलेल्या पिशवीत बिड्या असतील म्हणून फिलीप तेथे चाचपू लागला तशी बाळूला जाग आली ..थोडी झटापट झाली दोघांची ..रागाने फिलीप ने बाळूच्या डोक्यावर कोपऱ्यात पडलेली स्टीलची सुमारे दिड किलो वजनाची थाळी जोरात मारली ...बाळू तसाच खाली पडून तडफडू लागला ..मग फिलीप ने शांतपणे ..बाळूच्या कमरेची पिशवी काढून त्यातील बिड्या घेतल्या ..आणि कोपऱ्यात उकिडवा बसून रात्रभर त्या आठदहा बिड्या फुंकून संपविल्या ... अजूनही फिलीप नुसताच तडफडणाऱ्या बाळूकडे त्वेषाने पाहत होता ..त्याचे डोळे लाल भडक झालेले होते ...हा प्रकार घडला त्यावेळी रात्री आम्हाला जो धाडकन काहीतरी पडल्याचा ..न भांडे जमिनीवर पडल्याचा जो कर्कश्य आवाज ऐकू आला तो हाच होता .. हहा सगळा प्रकार पाहणाऱ्या चार पाच जणांना नेमके काय करावे हे सुचलेच नव्हते ..ते भेदरून आपापल्या जागेवर जाऊन झोपले .. तर वार्डचा नाईट ड्युटी वरील अटेंडंट .. गाढ झोपलेला .. ड्युटीवर असणारा स्वीपर देखील नेमका झोपलेला .. सकाळी जेव्हा चारला उठून त्यांनी वार्ड मध्ये राउंड मारला तेव्हा हे त्यांच्या ध्यानात आले .. म्हणजे  सुमारे गेल्या तीन तासांपासून बाळू तसाच तडफडत पडला होता .

आता पुढील कारवाई म्हणजे आधी डॉक्टरला बोलाविणे ..त्या नुसार डॉक्टर आले ..मात्र मुख्य अडचण अशी होती की बाळू जवळ जायला डॉक्टर घाबरू लागले ..कारण बाळूला ज्याने मारले तो फिलीप बाळूपासून जेमतेम चार फुट अंतरावर उकिडवा बसून लाल डोळे करून सर्वांकडे पाहत होता ..ती प्राणघातक थाळी फिलिपच्या हाताशी चटकन लागेल अशी पडलेली .. जर फिलीप ने पुन्हा कुणावर हल्ला केला तर ? ही भीती सर्वांच्या मनात होती ..कोणीही पुढे होऊन बाळूला मदत करण्यास धजावत नव्हते ...इतर वार्ड मध्ये एव्हाना बातमी जावून तेथील अटेंडंट देखील आले होते ..पण फिलीप असा बसलेला होता . त्याचे लाल झालेले डोळे .. थरकाप उडवत होते काळजाचा ..एकदोन अटेंडंट नी फिलीपला हाक मारून ..त्याला बोलते करण्याचा प्रयत्न केला .. पण फिलीप नुसताच जळजळीत नजरेने सगळ्यांकडे पाहत होता ..बाळूला मदत करायला पुढे व्हायचे तर आधी फिलीपला तेथून हलवावे लागले असते .. नेमके काय करता येईल ते कोणाला सुचेना ..फिलिपला पाठीच्या भागाकडून त्याला न दिसता पकडणे सोपे झाले असते ..पण फिलीप भिंतीला पाठ लावून बसला होता ..त्याला कशीतरी भिंत सोडायला लावली असती तर .. पटकन पाठीमागून झडप घालून पकडता आले असते ...हा सगळा प्रकार पाहताना ..बिडीची तल्लफ आली म्हणून ..मी माझ्या खिश्यातील बिडी काढून पेटविली ..तसे पटकन फिलीपने माझ्याकडे पहिले ..त्याच्या डोळ्यात क्षणभर चमक आली ...माझ्या डोक्यात कल्पना चमकली ..जर फिलिपला बिडीचे आमिष देवून भिंत सोडून पुढे बोलावले तर ...कोणीतरी त्याला मागून पकडू शकले असते ..मी पटकन दुसरी बिडी काढून फिलीपच्या दिशेला हात केला ..' फिलीप ये लो ..बिडी पियो 'असे म्हणालो ..फिलीपच्या डोळ्यात मोह दिसला ..मात्र तो काही उठुन पुढे यायला तयार होईना .. नुसताच बसल्या जागेवरून हात पुढे केला त्याने .. मग मी माझ्या खिश्यातील अख्खा बिडीबंडल काढला ..फिलीपला दाखवला .तेव्हा त्याने बसल्या जागी जराशी चुळबुळ केली .. माझ्या मनात योजना तयार झाली ..फिलीप नक्कीच बिडीच्या मोहाने उठू शकला असता हे मी ताडले होते ..


मी दोन अटेंडंटना सांगितले की मी फिलीप ला बिडी बंडल घ्यायला पुढे बोलावितो ..तुम्ही तो उठला की पटकन मागच्या बाजूने त्याच्यावर झडप घाला ...त्यावर त्यातील एक जण घाबरला .. म्हणाला मी नाही पकडणार फिलीपला ..शेवटी तो बिडी बंडल मी दुसऱ्या अटेंडंटच्या हाती दिला ..मग मी आणि सुहास वाडेकर असे दोघे जण फिलीप ला पकडायला सज्ज झालो ..हळू हळू फिलीपच्या ध्यानात येणार नाही अश्या पद्धतीने एक डाव्या बाजूने ..एक उजव्या बाजूने सरकत फिलीप च्या थोडे जवळ पोचलो .. मी सांगितल्या नुसार एका अटेंडंटने बिडी बंडल फिलीप पासून थोड्या चार पाच फुट पुढे पडेल अश्या बेताने फेकला .. फिलीप पासून बिडी बंडल फक्त पाच फुटावर होता .. फिलीप बावचळल्या सारखा वाटला .. त्याला उठून बिडी घेण्याचा मोह होत होता ..मात्र आपण भिंतीला पाठ टेकून सुरक्षित आहोत ..ती भिंत सोडून उठायला तो तयार नव्हता ..आम्ही फिलीप उठण्याची वाटच पाहत होतो ....शेवटी बिडीच्या मोहाचा विजय झाला ..फिलीप उठून समोर पडलेला बिडी बंडल घेण्यास भिंत सोडून पुढे आला ..तशी मी आणि सुहासने...मागून झडप घालून फिलीप ला ताब्यात घेतले .. पटकन त्याला आडवा पाडून त्याचे हात पाय बांधले ..ती जीवघेणी थाळी हटवली गेली ..मग डॉक्टर ने पुढे होऊन तडफडणाऱ्या ..आचके देणाऱ्या ..पण हळू हळू थंड पडत चाललेल्या बाळूला तपासले .बाळूला ताबडतोब ठ्ण्याच्या सरकारी सरकारी दवाखान्यात हलविण्याचे ठरले ..त्या नुसार एका स्ट्रेचर वरून बाळू ची रवानगी झाली आणि आम्ही फिलीपला आठ नंबर वार्ड मध्ये घेवून गेलो .. आता फिलिपला कायमचे क्रिमिनल वार्डात ठेवले जाणार होते ..कारण तो घातक बनला होता ..या पुढे देखील किरकोळ कारणावरून तो एखाद्यावर हल्ला करू शकला असता ...दुपारी बाळू गेल्याची बातमी समजली .. म्हणजे फिलीपवर आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार होता हे नक्की ..मी केलेल्या हुशारी बद्दल मला त्या वार्डच्या अटेंडंट ने पाच बिडी बंडल बक्षीस दिले .. तर बीडीपायी फिलीप खुनी बनला होता ...या विरोधाभासाची मला अजुनही गम्मत वाटते .


पुढे काही वर्षांनी ..मी चांगला असताना जेव्हा ठाण्याला नातलगांच्या कडील कार्याला गेलो होतो तेव्हा मेंटल हॉस्पिटल मध्ये सगळ्यांना भेटायला गेलो होतो .. फिलीपला मला पहायचे होते ..आठ नंबर वार्डात फिलीप एका बंद खोलीत बसला होता तसाच उकिडवा भिंतीला टेकून .. खूप बारीक झाला होता ..मी गजाच्या बाहेरून बिडी दाखविताच त्याचे डोळे तसेच चमकले ..आणि बिडी बंडल गजांच्या आत फेकताच फिलीप त्या दिवशी प्रमाणेच पटकन बंडल उचलायला भिंत सोडून पुढे आला .. मला फिलीप बदल वाईट वाटत होते ..बिडीच्या नादात त्याने स्वतःवर मोठे संकट ओढवून घेतले होते ..
==================================================================

भाग १४२ वा जिंदगी कें सफर में..गुजर जाते है जो मकाम ..फिर नही आते

मला या वेळी मेंटल हॉस्पिटल मध्ये राहून सहा महिने होऊन गेले होते .. केव्हा सुटका होईल ते काहीच सांगता येत नव्हते .. अनघाच्या पत्राची वाट पाहून ..शेवटी मीच तिच्या घरच्या पत्त्यावर ..तिच्या आईबाबांच्या नावे एक पत्र लिहिले होते ..त्यात सर्वांची माफी मागून .. या पुढे माझ्या मुळेआपणास कधीच त्रास होणार नाही याची खात्री दिली होती .. त्याचेही काहीही उत्तर मिळाले नाही ..अनघा एकदातरी संपर्क करण्याचा प्रयत्न करेल असे वाटले होते .. पण ते देखील नाही ..तिचे नेमके काय झालेय हे काहीच कळेना .. त्या दिवशी फोनवर बोलताना तीने कदाचित हे आपले शेवटचे बोलणे असेल असे म्हंटले होते ..ते खरेच ठरत होते तर ? एकदा ' चित्रहार ' मध्ये राजेश खन्नावर चित्रित झालेले ' जिंदगी कें सफर में ..गुजर जाते है जो मकाम ..फिर नही आते ..हे गाणे ऐकताना खुपच व्याकुळ झालो होतो ..अतिशय सुंदर ..भावपूर्ण शब्द ..तितकेच सुंदर संगीत ..आणि किशोरकुमारचा आवाज .. प्रेयसी ला शोधत भटकणा-या राजेश खन्नाची अर्धवट वाढलेली दाढी .. सकाळ ....दुपार ..सायंकाळ चे बदलते चित्र .. ' एक बार चले जाते है ..जो दिन रात..सुबह श्याम ..हो फिर नही आते ..हो फिर नही आते ' अतिशय वास्तववादी संदेश ... मध्ये एकदा राजेश खन्ना च्या चेहऱ्यावर पडणारे मध्यानीचे ऊन ... बापरे ..अंगावर काटा तर आलाच माझ्या ..चक्क रडू कोसळले ...काळ कोणासाठी थांबत नही हेच खरे ..माणूस मात्र व्यसनांच्या ..तर कधी पैश्यांच्या .सत्तेच्या ... शक्तीच्या .. गुर्मीत आज जे आहे ते तसेच राहील असे समजून जगत जातो ... सुखाच्या क्षणी आपणास कधी दुखः मिळू शकेल याचा विचारही त्याच्या मनाला शिवत नाही .. कालचक्र फिरतेच आहे... कणाकणांनी पुढे जातेय ..त्याला कोणी थांबवू शकत नाही .. मला सगळ्यांनी कानीकपाळी ओरडून ..रागावून ..चिडून .. प्रेमाने हात जोडून ..विनवण्या करून वारंवार व्यसने कायमची बंद कर असे सांगितले होते ...पण माझे काही वाकडे होऊ शकत नाही ...माझ्या चातुर्याच्या जोरावर सगळे निभावून नेईन ..माझा स्वतःवर कंट्रोल आहे ..या भ्रमात राहिलो होते आणि पाहता पाहता चित्र बदलले होते ... कदाचित आता मेंटल हॉस्पिटल मध्ये कायमचे तर राहावे लागणार नाही ना ? या विचाराने मनाचा थरकाप होत असे ..

एकदा लव्हात्रे साहेबांनी मला टायपिंग येतेय म्हंटल्यावर ..येथील कार्यालयात जावून तेथे टायपिंग च्या कामात मदत करत जा असे सुचविले होते ..त्या नुसार अधूनमधून तेथे जावून जरा टायपिंग चे काम करत होतो ..पण सातत्य नसे .. असाच लहानपणापासून चंचल स्वभाव व धरसोड वृत्ती मुळे काही काळानंतर जे करतो आहे त्याचा कंटाळा येई ..मन दुसरीकडे कुठेतरी ओढ घेई .. अनघाच्या सहवासात जरा आयुष्य नव्याने शिकत होतो ..समजून घेत होतो .. शेवटी व्यसनामुळे ती देखील दुरावली .. वाटे जर आपल्याला अनघा दुरावणार आहे हे आधी माहित असते तर . ..आपण पुन्हा व्यसन सुरु केलेच नसते मग अनघा आपलीच झाली असती ..आता या जर ..तर ला काही अर्थ उरला नव्हता ..वास्तव स्वीकारण्यावाचून गत्यंतर नव्हते ..सगळी चूक माझीच आहे हे मान्य करूनही त्याची इतकी मोठी शिक्षा ? हे काही पचनी पडत नव्हते ...एखादा गुन्हेगार जसा आधी गुन्हा केल्यावर नाकबूल करतो ..सगळे पुरावे सदर केले गेले की मग ..शेवटी नाईलाजाने कबुल करतो ..पण तरीही निमुटपणे शिक्षा भोगण्यास तयार होण्याएवजी ..मग तो कमीत कमी शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न सुरु करतो ..जे घडले ते अनाहूत पणे घडलेय ..त्यात माझा फारसा दोष नाहीय ..असलाच तर .त्यासाठी इतकी मोठी शिक्षा नको ..माझे वय ..माझे कुटुंबीय .. वगैरे गोष्टी लक्षात घेवून माननीय न्यायधीश महोदयांनी दया करावी अशी समर्थने देतो ..शिक्षा कमी व्हावी म्हणून प्रयत्नशील राहतो ... न्यायाधीश महोदयांनी शिक्षा कमी केली अथवा शिक्षेत सुट दिली ..त्यांनी केलेल्या कृपेचा विचार न करता स्वतच्या हुशारीवर खुश होतो .. शिक्षा कमी होऊ शकली नाही तर ..हायकोर्ट ..सुप्रीम कोर्ट .. असा प्रवास करत राहतो ..तसेच मी करत गेलो .. शेवटी सर्व दयेचे अर्ज फेटाळले गेले ..मग अन्याय.. अन्याय म्हणून रडत बसलो !
५ ऑगस्ट १९९० रोजी सकाळी सकाळी ..अगदी ६ वाजता ..अचानक एका अटेंडंट सोबत माझा चुलत भाऊ व पुतण्या आमच्या वार्ड मध्ये आले ..मी त्यांना असे सकाळी सकाळी पाहून जरा आश्चर्यच वाटले ..त्यांचे चेहरे गंभीर होते .. मला म्हणाले ' चल आपल्याला नाशिक ला जायचे आहे ...दादांची ( म्हणजे माझ्या वडिलांची ) तब्येत जरा जास्त आहे ... 'चटकन तयारी कर ..आम्ही डिस्चार्ज घेण्याची प्रक्रिया केली आहे ' ... मी पटापट आवरून सगळ्यांचा निरोप घेवून निघालो .. त्यांनी सोबत त्यांची कार आणली होती .. गाडी लगेच नाशिककडे निघाली ...वडील गेल्या ३ वर्षांपासून अंथरुणाला खिळून होते .. आता बहुतेक पुन्हा त्यांना पक्षाघाताचा झटका आला असावा ..किवा रक्तदाब वाढला असेल .. असा विचार करत होतो ..आता या पुढे त्यांना त्रास होईल असे अजिबात वागायचे नाही .. जमेल तशी त्यांची सेवा करायची ..बिचाऱ्यांनी खूप कष्ट करून आम्हाला मोठे केले होते ..केवळ माझ्यामुळे त्यांना खूप मानसिक त्रास झाला होता ..असा विचार करत होतो ...वाटेत एका ठिकाणी हॉटेल मध्ये चहा घेतला ..माझा चुलत भाऊ मला काहीतरी खावून घे म्हणून आग्रह करत होता ..पण मी नकार दिला ..आधी वडिलांना भेटल्याशिवाय मला चैन पडणार नव्हते !
==================================================================

भाग १४३ वा  वडिलांचे देहावसान !

आम्ही सकाळी साडेदहा च्या सुमारास नाशिक ला घराजवळ पोचलो तर ' आदर्श गोकुळ ' सोसायटीच्या आवारात बरीच गर्दी दिसली ..माझ्या मनात पाल चुकचुकली ... गाडीतून खाली उतरताना पावले एकदम जड झाली .. चुलत भावाने माझा हात पकडला होता .. हळू हळू जिन्याच्या पायऱ्या चढून घराच्या दाराजवळ आलो ..दार उघडेच होते .. आत पुढच्या हॉल मध्ये वडिलांचे पार्थिव ठेवलेले दिसले .. मी दारातच थबकून उभा राहिलो ..आत प्रवेश करायची हिम्मतच होईना ..सगळे माझ्याच तोंडाकडे पाहत होते .. एकदम दगडी चेहरा करून ...डोळे विस्फारून समोरचे दृश्य पाहत होतो .. एकदम रडू देखील येईना .. फटाक्याची वात पेटवली की ती जशी सुरसुर जळत मग फटाक्याला भिडून फटाका फुटतो ..तसे आतून खोल खोल मनाच्या तळातून वात पेटली ..सर्व शरीरभर फिरत मग एकदम स्फोट झाला ..धाय मोकलून रडायला लागलो मी .. धावत जावून वडिलांच्या पार्थिवावर पडलो ...त्यांच्या छातीवर डोके ठेवून ढसाढसा रडत होतो ... इतका वेळ थांबलेली इतरांची रडारड पुन्हा सुरु झाली ..त्यांच्या एका बाजूला आई आणि दुसऱ्या बाजूला भाऊ बसला होता ...आई त्यांचे शरीर हलवत ' अहो .. आला बघा तुषार .. पहा न त्याच्या कडे ..बोला काहीतरी ' ..असे म्हणत रडत होती .. ' भावाने देखील मला मिठी मारून रडणे सुरु केले .. सुमारे १० मिनिटे लागली तो उमाळा संपायला ..मग नुसतेच हुंदके सुरु झाले ..शरीर गदगद हलवत येणारे .. वडिलांच्या ऑफिस मधले लोक सकाळीच आले होते ..भावाने शक्य तेथे फोन आणि बाकी ठिकाणी तारा करून बातमी कळविली होती .. अकोल्याहून येणारी सोईस्कर गाडी लगेच नसल्याने बहिण उशिरा येणार होती .. वडील पहाटे चार च्या सुमारास गेले होते .... त्यांना खूप अस्वस्थ वाटल्याची चाहूल लागून आईला जाग आली होती ..तीने त्यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला .. छाती चोळली .. बहुधा रक्तदाब वाढला होता असे वाटले तीला .. घाईने तीने भावाला उठवले ..भाऊ उठून डॉक्टर ला आणायला जाईपर्यंत कारभार संपला होता .. दोन्ही मुले आलीत ... मुलगी ( बहिण ) यायला खूप उशीर होईल ..तो पर्यंत थांबता येणार नाही असे सगळ्यांचे मत पडले ..म्हणून मग बाकी तयारी सुरु झाली

कोपऱ्यात भिंतीला टेकून उकिडवा बसून मान गुडघ्यात खुपसून मी हुंदके देत बसलो होतो .. माझे काही नाशिक रोडचे मित्र देखील त्यांना बातमी समजली म्हणून आले होते .. मला खूप अपराध्यासारखे वाटत होते .. कारण वडिलांच्या शेवटच्या काळात मी त्यांना फार दुखः दिले होते व मला नुकसान भरपाईची संधी न देताच ते गेले होते ..जाताना मनात ..आपला एक मुलगा बिघडला आणि सुधारू शकला नाही ..त्याचे सगळे व्यवस्थित झालेले पाहता आले नाही ही खंत घेवून .. त्यांचे पार्थिव स्मशानापर्यंत नेण्यासाठी शववाहिनी आली होती .. मी भाऊ ..ऑफिस चे काही लोक माझा जिवलग मित्र किरण ..असे काही लोक त्यात बसून निघालो ..शेवटचा विधी करण्यासाठी ...अतिशय शांत चेहरा दिसत होता त्यांचा ..हे कदाचित सुटका झाल्याचे भाव असावेत असे उगाच मनाला वाटून गेले .. माझ्या मन:पटला वर भरभर त्यांच्या आठवणी येत होत्या .. अगदी लहानपणी उताणे झोपून मला पायावर घेवून ते पाय वर उचलून मला वरखाली झोका देत असत तिथपासून .. आमचा भावंडांचा आभ्यास घेणे .. महिन्यातून एकदा बाहेर हॉटेलात घेवून जाणे .. मित्राच्या ओळखीने थेटरचा पास मिळवून सिनेमा ..वर्षातून एकदा सर्कसला नेणे .....मी आजारी असताना माझ्या उशाला बसून राहणे .. महिना अखेर जवळचे पैसे संपले की त्यांची होणारी चीडचीड ... मी ११ वी ला नापास झाल्यावर आधी खूप रागावून ...मग शेवटी मला पास करून घ्यावे म्हणून लेले मँडम न गळ घालणारे वडील .. केसांच्या झिपऱ्या मानेपर्यंत वाढवल्या म्हणून जबरदस्ती कटिंगला पाठविणारे .. तेथे समोर उभे राहून केस कापणाऱ्याला सूचना देणारे ... आणि कानाची गोलाई , मानेवरचा कट मनासारखा झाला म्हणून समाधानाने मान डोलावणारे ...मी व्यसने करू लागल्यावर रात्री उशिरा आलो की फक्त एक रागाची नजर टाकणारे ..पाकिटातून मी त्यांचे पैसे चोरले की .. अस्वस्थ होणारे ..मला खोदून खोदून प्रश्न विचारून ' खरे सांग ' म्हणत ..शेवटी नाईलाजाने चूप बसणारे .. मी मोठा आडदांड झाल्यावर खूप संतापाने माझ्यावर हात उगारलेले ..मात्र मी त्यांचा हात धरताच ..चेहरा पाडून डोळे विस्फारून माझ्या कडे अविश्वासाने पाहणारे ...घरात मी तमाशे करत असताना .. ' माझ्या गरजा पूर्ण करता येत नसतील तर जन्म कशाला दिला ' असे मी म्हंटल्यावर ..अपमान वाटून कोणाशीही न बोलता झोपी जाणारे ...नंतर पक्षाघाताचा पहिला झटका आल्यावर ..स्मृती गेल्याने सगळ्यांकडे अनोळखी नजरेने पाहणारे .. स्मृती परत यावी म्हणून वयाच्या ५४ व्या वर्षी पुन्हा नव्याने पाटी पेन्सिल घेवून अंक ..डाव्या हाताने गिरवणारे .. सगळे नातलग जमल्यावर त्यांच्या लहानपणीच्या गमती सांगून ..नकला करून सगळ्यांना हसवणारे ..खेळकर मूड मध्ये असले की विनोद करणारे .. शेवटी शेवटी जेव्हा वाचा गेली होती तेव्हा ..नुसते मानेनेच इशारे करणारे .,,,किवा बोलण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दयनीय दिसणारे ...अनघाला पाहिल्यावर माझ्या कडे पाहून मुलगी खूप छान आहे ..पसंत आहे असे मान डोलावून सांगणारे .. प्रत्येक वेळी मी मेंटल हॉस्पिटलला जाताना ... आशीर्वादाच्या नजरेने पाहणारे ..नशे साठी पैसे मिळावेत म्हणून मी त्यांच्यावर वाट्टेल तसे आरोप करत असताना .. प्रयत्न पूर्वक ओठ दाबून शांत राहण्याचा प्रयत्न करणारे .. एकदा त्यांची खोटी सही करून मी बँकेतून पैसे काढल्याचे समजल्यावर धक्का बसून ..मी पोलिसात तक्रार करतो तुझी असे धमकावणारे आणि मग असहाय होऊन मला समजावणारे ..चतुर्थीला खणखणीत आवाजात अथर्वशीर्षा म्हणणारे .. रोज कामावर जाताना आधी ' ऊर्ध्वमूल मध:शाखं ' ..हा गीतेचा अध्याय डोळे मिटून म्हणणारे ....दिवाळीत सगळ्यांना पहाटे उठवून लवकर अंघोळ करा ..नाहीतर नरकात जाल असे बजावणारे ....प्रत्येक वेळी या वर्षी फटाकें आणायचे नाहीत ..उगाच पैश्यांचा धूर ..प्रदूषण अशी कटकट करत शेवटी आमच्या आग्रहापुढे मान तुकवून फटाके आणणारे ..सर्वाना नवीन कपडे घेतल्यावर ..आता बजेट संपले म्हणत स्वतः कपडे नवे कपडे न घेता आम्ही नवीन कपडे घालून फटाके फोडायला सज्ज झालो की कौतूकाने पाहणारे घेणारे .... आठवीत असताना मी N C C चा खाकी ढगळ ... कडक स्टार्च केलेला ड्रेस अन पायातील अवजड लाल चामडी बुट पाहून गालात हसून माझ्याकडे अभिमानाने पाहणारे ...' कृष्णा कशी रे लागली रक्ताची धार ..तुझिया बोटाला ' हे गाणे आलाप घेत म्हणणारे ...बापरे ..आता परत आपल्याला वडील कधीच भेटणार नाहीत ..त्यांचे पार्थिव घेवून आपण जाळायला निघालोय .. आता कितीही रडलो ..माफी मागितली तरी उपयोग नाही ..वेळ गेलीय ..निसटलीय ..संपलीय ..!
==================================================================

भाग १४४ वा   स्मशानवैराग्य !


शववाहिनी स्मशानात पोचल्यावर ..पुढची तयारी जाणकारांनी सुरु केली .. लाकडे रचणे .. बाकीच्या धार्मिक विधींची तयारी ..मला भावाचे नवल वाटले ..तो अतिशय संतुलित पणे सगळ्याला सामोरा जात होता .. अगदी जवाबदार व्यक्तीसारखा ..अर्थात तो जवाबदार आहे हे त्याने पूर्वीच सिद्ध केले होते ..माझ्या अश्या वागण्याने त्याला अनेक वेळा त्रास झाला ..घरात सतत कटकटी .. त्याची नोकरी ..संसार ..सगळे नीट सांभाळून होता तो ..इतकेच नव्हे तर सर्व नातलगांच्या लग्न व इतर कार्यात सामील होणे ..सामाजिक संबंध नीट सांभाळणे वगैरे गोष्टी तो लीलया करत असे .. येथेही तो तसाच शांतपणे वागत होता .. उलट मला धीर देत होता ..तेथे जमलेल्या बहुतेक लोकांना मी व्यसनी आहे ..माझ्यामुळे आमच्या कुटुंबाला खूप त्रास भोगावा लागला आहे हे माहित होते ..ते माझ्या बाबत काय विचार करत असतील याची कल्पना करून मला अपराध्यासारखे वाटत होते ..विशेष हे की त्या क्षणी मला बिडीची प्रचंड तल्लफ आलेली होती .. ठाण्याहून येताना वाटेत सोबत चुलत भाऊ व पुतण्या असल्याने ..नंतर घरी पोचल्यावर सगळ्या नातलगांच्या गराड्यात असल्याने गेल्या सहा तासांपासून बिडी ओढणे जमलेच नव्हते .. सगळ्या व्यसनांची मानसिक गुलामीची अवस्था आली की ..प्रत्येक सुख -दुख्खात ... तणावांच्या क्षणी .. अवस्थता ..बैचैनी .. निराशा .. वैफल्य .. अशा भावनिकतेत त्या व्यसनाची तीव्रतेने आठवण होते ..तसेच माझे झाले होते .. केव्हा एकदा सगळे सोपस्कार उरकून मला एकांतात बिडी ओढायला मिळेल हा विचार देखील मनात होताच .. मोठा मुलगा म्हणून भावाने सगळे विधी केले .. मी फक्त त्याच्या मागे मागे यंत्रवत फिरत होतो .. चितेला अग्नी दिल्याच्या क्षणी पुन्हा रडण्याचा उमाळा आला .. धडाडून पेटलेल्या चितेत वडिलांचा चेहरा धुसर होत गेला ... चहू बाजूंनी त्यांच्या देहाला ज्वालांनी वेढलेले पाहून कसेतरीच होत होते .. एक आयुष्य संपले ..असेच केव्हातरी आपल्याला ही करतील .. एकदा काळाची झडप पडली की कितीही पैसा ..सत्ता ..समर्थक .. असले तरी काही उपयोग नाही .. तुम्हाला जावेच लागणार ..उरतील त्या फक्त आठवणी ..चांगुलपणाच्या किवा ...तुम्ही केलेल्या विध्वंसाच्या .. कारवायांच्या .. सुप्रसिद्धी ..कुप्रसिद्धी .. .. बहुधा मानले जाते की शरीर सोडून गेल्यावर ..वर ..आभाळातल्या त्या उच्च शक्तीला हिशोब द्यावा लागणार आहे ..आपल्या कर्मांचा पाढा वाचला जाईल .. इतका सुंदर मानवी जन्म मिळाल्यावर तुम्ही त्याचे काय सार्थक केलेत ? ...किती लोकांना सुखी केलेत .. आपल्या बुद्धीचा ..निसर्गाने दिलेल्या वेगवेगळ्या क्षमतांचा वापर आपण मानव कल्याणासाठी केला का ? ..की पैसा .. अधिकार .. सत्ता .. यांचा गैरवापर करत लोकांना कसे फसवले ..लुटले ..लुबाडले .. विकारांची राक्षसी भूक भागविण्यासाठी किती बळी घेतले ...स्वतःला परमेश्वर समजून काय काय अन्याय केले ...सगळा सगळा हिशोब द्यावा लागेल .. मुख्य म्हणजे तेथे वकील ..चौकशी समिती ..आयोग .. क्लीनचीट देण्यास असणार नाही ..कारण आरोपपत्र आधीच पुराव्यासहित तयार झालेय ..आणि शिक्षाही ठरलीय ...मानवाने तयार केलेल्या कायद्यातून पळवता शोधता येतात ..निसर्गाच्या कायद्यातून कोण वाचवणार ? ..

चितेला अग्नी देवून झाल्यावर सगळे जरा पांगले ..मी पटकन लघवीच्या निमित्ताने आडोश्याला जावून बिडीचे दोन चार झुरके मारले ..आणि पुन्हा चितेजवळ येवून उभा राहिलो .. जाणकार अधूनमधून अग्नी धगधगता ठेवण्यासाठी त्यावर मीठ .. रॉकेलचा मारा करत होते ..बाहेरच्या लोकांना जायची घाई झाली होती .. म्हणे कवटी तडकल्याचा आवाज येईपर्यंत थांबावे लागते .. एकदा कवटीचे मेंदूला असलेले संरक्षण संपले की समजायचे आता काम पूर्ण झाले .. विषण्ण मनाने पुन्हा शववाहीनीत् बसून घराकडे परतलो ..घरात पोचल्या बरोबर .. अंघोळीची घाई सुरु झाली .. असे कोणाला पोचवून आल्यावर ..अंघोळ करणे फार आवश्यक मानले जाते .. लहानपणी जेव्हा मी अंघोळ का करायची असे विचारले होते तेव्हा .. कारण स्मशानात अतृप्त आत्मे वगैरे असतात ..ते तुमच्यासोबत घरात येतात... अंघोळ करून त्यांना पळवून लावावे लागते असे उत्तर मिळाले ..माझे काही समाधान झाले नव्हते .. आता पुन्हा जेव्हा विचार करतो तेव्हा असे वाटते की अतृप्त आत्म्यांपेक्षा स्मशानात गेल्यावर ..तेथील सगळे दृश्य पाहून मनात् जो उदासीचा ..वैफल्याचा ... क्षणभंगुर जीवनाचा ..शेवटी सगळे व्यर्थ असल्याचा भाव येतो तो भाव काढून टाकून पुन्हा जीवनाच्या रहाट गाडग्याला जुंपून घेण्यासाठी .. कर्तव्य ..जवाबदारी .. यांचे भान येवून कर्माच्या चक्रात शिरण्यासाठी स्वतःला तयार करायचे म्हणून अंघोळ असावी ..शेजारच्या घरून चहा बनवून पाठवला गेला होता सर्वांसाठी .. नको नको करत शेवटी सगळ्यांनी चहा घेतला .. आता संध्याकाळी जेवण देखील करतील .. मग हळू हळू दुखः कमी होत जाईल ..स्मृतींच्या कप्प्यात वडील बंद होतील ....मग दहावे .तेरावे ..चौदावे ..वर्षश्राद्ध या निमित्ताने पुन्हा त्या स्मृती ताज्या केल्या जातील ..

रात्री बहिण आल्यावर पुन्हा रडणे झाले .. हॉल मध्ये मध्यभागी एका ठिकाणी परातीत पिठाचा साधारण दोन इंचाचा थर लावून त्यावर एक पेटती पणती ठेवली गेली ..यावर झाकण म्हणून एक टोपली उपडी ठेवली होती .. नंतर ती टोपली काढल्यावर मृत आत्म्याला कोणता जन्म मिळालाय ते त्या पिठावर उमटलेल्या खुणांवरून समजते .. टोपली काढल्यावर सर्वानी बारकाईने पहिले ..पिठावर चित्रविचित्र अस्पष्ट रेघोट्या उमटल्या होत्या ..एखाद्या लहान मुलाच्या हातात पाटी पेन्सिल दिल्यावर तो पेन्सिल ने पाटीवर काहीतरी वेड्यावाकड्या रेघा मारतो तसे ...सगळे त्या खुणांवरून अंदाज बांधत होते .. वेगवेगळ्या प्राण्यांची ..पक्षांची नावे घेतली गेली ..कोणाचेच एकमत होईना .. त्या रेघोट्या तेथे कश्या आल्या हे एक कोडेच होते ..पुढे मला समजले की दिव्याच्या ज्योती कडे आकर्षित होऊन बारीक चिलटे त्या काड्यांनी बनलेल्या टोपलीच्या आत शिरून हे प्रताप करतात .. किवा तेलाच्या वासाने मुंग्या व सरपटणारे सूक्ष्म कीटक पिठावर ये जा करतात त्याच्या या खुणा असतात ..खरे खोटे तो देवच जाणे...! बाहेरगावाहून आलेले नातलग दुसऱ्या दिवशी निघून गेले आता ते पुन्हा चौदाव्या दिवशी येणार होते ..घरात फक्त घरातील सदस्य उरले .. साधारण चार दिवसांनी ..वडील नेहमी ज्या पलंगावर झोपत तो पलंग तेथून हलवून ...खाली ठेवलेल्या जुन्या पेट्या वगैरे हटवल्या गेल्या ..साफसफाई करण्यात आली तेव्हा भाऊ पुन्हा रडू लागला .. त्या पलंगाखाली .पेटीच्या मागे .. वडिलांना दिल्या जाणाऱ्या अनेक औषधाच्या गोळ्या पडल्या होत्या ..म्हणजे आई नेहमी वडिलांना पलंगावर भिंतीला टेकवून बसवून ..त्यांना नियमित देण्यात येणाऱ्या रक्तदाबाच्या .. पक्षाघाताच्या ..टॉनिकच्या वगैरे डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या वडिलांच्या जवळ काढून ठेवून ...बाजूला वडिलांना डाव्या हाताने सहज घेता येईल असा दुधाचा ग्लास ठेवून ..त्यांना सवडीने गोळ्या घ्या असे सांगून कामाला आत निघून जात होती तेव्हा ..वडिलांनी त्या गोळ्या न खाता हळूच उचलून पलंगाच्या मागे टाकून दिल्या होत्या ..आणि आईने गोळ्या घेतल्या का असे विचारल्यावर होकारार्थी मान डोलावली होती .. त्यांनी किमान एक महिनाभर तरी हे गोळ्या घेणे टाळले होते .. असे का केले असावे ..त्यांची जीवनेच्छा संपुष्टात आली होती का ? की आपण बरे होणार नाही असे वाटत होते ? की माझ्या त्रासाने वैतागून असे जगण्यात काय अर्थ आहे या विचाराने त्यांनी हे केले ? आम्ही भावंडे खूप रडलो ते पाहून ..मला वाटले वडिलांची जगण्याची ओढ केवळ माझ्यामुळेच संपुष्टात आली होती .. अजून पुढे पुढे मी काय काय प्रताप करीन ते उघड्या डोळ्यांनी असहायपणे पाहण्यापेक्षा त्यांनी मृत्यूला जवळ केले होते .. वडिलांच्या या आत्माघातला केवळ मीच जवाबदार आहे असे मला वाटू लागले .
==================================================================

भाग १४५ वा  ' जीवन चलनेका नाम '

वडील गेल्यानंतर....एकदोन दिवसातच .. आमचे जेवण वगैरे सुरळीत सुरु झाले... मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावरील दुखा:चा भाव मात्र मात्र अजून तसाच होता .. सगळ्यात जास्त एकटेपणा जाणवत होता तो आईला ... पूर्वीच्या प्रथेनुसार वयाच्या चौदाव्या वर्षी तिचे वडिलांशी लग्न झालेले .. तसेच आता नवरा हेच आपले सर्वस्व असे वारंवार तीला सांगण्यात आलेले ...इतक्या वर्षांच्या प्रदीर्घ काळाचा जोडीदार आता आपली साथ सोडून गेलाय..हे स्वीकारणेच काय ..साधे मान्य करणे देखील तीला खूप कठीण जात होते .. अनेकवेळा ती वडिलांचा दुधाचा ग्लास भरून घेवून बाहेर ...येवून ..मग त्यांच्या रिकाम्या पलंगाकडे विषण्णपणे पाही ...मग तिच्या लक्षात येई ....पुन्हा गहिवर ...वडील आजारी असल्यापासून गेल्या चार वर्षात तीने जणू बाहेरच्या जगाशी नाळ तोडली होती .. फक्त वडिलांची सोबत ..त्यांची सेवा ..त्यांचे आजारपण हेच तिच्या आयुष्यातले प्रमुख विषय होते ..या काळात ती कोणत्याही नातलगाच्या ..लग्नाला ..कोणत्याही सार्वजनिक समारंभाला गेली नव्हती .. त्यांच्या संसाराच्या सुरवातीच्या काही वर्षात वडिलांना आर्थिक स्थिरता नव्हती ..तेव्हा आईने तिखट ..हळद कुटून देणे ..पापड वगैरे करुण देणे अशी कामे करुन संसाराला हातभार लावला होता ..नंतर शिवणकम शिकून घेवून ...शिवणकाम काम करून ... घर समृद्ध होण्यासाठी सतत कष्ट केले ...भारतीय संस्कृतीचे हे वैशिष्ट्य आहे ..कदाचित ' पुरुष वर्चस्ववादी ' व्यवस्थेचा देखील भाग असावा.... ' पती परमेश्वर ' ही संकल्पना लहानपणापासून मनात इतकी खोल रुजविली जाते की ....बहुधा पत्नी आपल्या पतीचा मनापासून राग ..तिरस्कार ..द्वेष करूच शकत नाही ..पती कसाही वागला तरी ती त्याला माफ करता जाते ..माझे वडील व्यसनी नव्हते ..व त्यांचा स्वभाव देखील चांगलाच होता .. आईवडिलांचे भांडण असे क्वचितच होई ..आणि ते देखील आर्थिक गोष्टींवरून ......नाहीतर माझ्या वागण्यावरून ..बाकी त्यांच्यात काहीही मतभेद नव्हते ...परंतु पुढे व्यसनमुक्ती च्या क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात काम करू लागल्यावर अश्या बहुसंख्य स्त्रिया पहिल्या आहेत की ज्या ..दारुड्या ... ..मारहाण करणाऱ्या..कमाई न करणाऱ्या .. पतीवर जीवापाड प्रेम करतात..वारंवार त्याला माफ करतात ...पाठीशी घालतात .... एकदा असेच सुधारित केलेले ..घटनेत महिलांना दिलेल्या हक्कांचे पुस्तक पाहण्यात आले . महिलांना संरक्षण देणारे अनेक कायदे वाचले तेव्हा जाणवले ...महिलांवर घरगुती अत्याचार ..किवा इतर अत्याचार होऊ नयेत याची योग्य दखल घेतली गेली होती ... जर प्रत्येक महिलेने तीला घटनेने दिलेल्या अधिकार आणि हक्कासाठी संघर्ष केला किवा उल्लंघन झाल्याची रीतसर तक्रार दाखल केली तर .. तर ... बहुधा ९० टक्के पुरुष्याना एकदा तरी पोलीस कोठडी अनुभवावी लागेल .. आम्ही पुरुष खरोखरच भाग्यवान आहोत की महिला मुळातच सहनशील .. दयाळू .. असतात व संस्कृतीने सांगितलेले मायेचे पाश सहसा तोडत नाहीत . निसर्गाने त्यांना प्रदान केलेल्या मातृत्वाच्या जवाबदारीमुळे देखील कदाचित हे घडत असेल ! घरात या काळात कोणाचे फारसे एकमेकांची बोलणे होत नव्हते .. भावाचा लहानगा मुलगा मोहित तेव्हा काय घडलेय हे समजण्याइतका मोठा नव्हता ..त्यामुळे त्याच्या बाललीलांनी घरात जरा चैतन्य वाटत होते .. साधारण आठ दिवसांनी माझ्या नावाने सरकारी शिक्का असलेले पत्र आले ...सेवायोजन कार्यालयाचे ते पत्र होते ( एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज ) त्यात मला १० दिवसांनी होणाऱ्या महाराष्ट्र पोलीस ' शिपाई पदाच्या भरतीसाठी' ..मुलाखतीला..आणि परीक्षेला आमंत्रित केले गेले होता .. सर्वाना खूप आनंद झाला .. शारीरिक पात्रतेच्या योग्यते साठी माझी उंची तर चांगलीच होती ..पण छातीची रुंदी तितकी भरत नव्हती ..एक इंच कमी होते .. मग मी व्यायाम सुरु केला .. सकाळी रनिंग ला जाणे .. सूर्यनमस्कार .. भावाचे बुलवर्कर वापरू लागलो ..अर्थात केवळ आठ दिवसात काही मोठा चत्मकार होणे कठीणच .. पण मनापासून मी प्रयत्न करू लागलो ...सरकारी नोकरी मिळण्याच्या संधी कमी कमी होत गेल्या असताना ..ही संधी चांगलीच होती ..मला कधी काळी सेवायोजन केंद्राचे काही पत्र येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते ..कारण मागच्याच वर्षी जेव्हा मी बारावी पास अशी नोंदणी केलेल्या सेवायोजन कार्डावर ..पदवी धारक झाल्याची नव्याने नोंद करण्यासाठी सेवायोजन कार्यालयात गेलो असताना ..तेथे मी भांडण केले होते ..झाले असे की .. जुन्या नोंदवलेल्या कार्डावर ..घेतलेले नवीन शिक्षण नोंदविण्यासाठी एक अर्ज करून ते कार्ड ताब्यात घेवून मग कार्डसोबत तो अर्ज पुन्हा नोंदणी अधिकाऱ्याकडे द्यावा लागतो ..मी अर्ज घेवून गेलो ..तिथे प्रचंड मोठी रांग लागलेली होती .. बराच वेळ झाला तरी रांग पुढे सरकेना ..सगळे कंटाळले होते रांगेतले .. पण रोजगाराच्या आशेने ..तासंतास रांगेत उभे राहण्याची तयारी होती त्यांची .. रांग पुढे न सरकण्याचे कारण असे समजले की त्या अधिकाऱ्याच्या म्हणा की कारकुनाच्या म्हणा केबिन मध्ये सारखे कोणी कोणी वशिल्याचे तट्टू ओळख काढून पुढे घुसत होते .. मग आपले काम झाले की विजयी मुद्रेने रांगेतल्या तरुण तरुणींकडे पाहत ताठ्याने निघून जात होते .. असे दोन तीन वेळा घडल्यावर ..रांग मोडून पुढे केबिन मध्ये जाणाऱ्या एकाला मी अडवले ' रांगेत चल .. आम्ही इतक्या वेळ पासून काय मुर्ख म्हणून उभे आहोत का ? ' असे त्याला दरडावले .. माझे धाडस पाहून रांगेतल्या इतरानाही चेव आला ..सगळे आरडा ओरडा करू लागले ... ते ऐकून केबिन मधला क्लार्क बाहेर आला व त्या घुसणाऱ्या तरुणाच्या हातातील चिट्ठी त्याने घेतली ..वाचून ..आम्हाला रागावू लागला ..' असे गोंधळ कराल ..तर एकाचेही काम होणार नाही वगैरे ..' मी जास्त आरडा ओरडा करतोय हे त्याच्या लक्षात येवून तो माझ्याकडे वळून ओरडला ' काय रे तू काय बँरिष्टर झाला आहे का ? नोंदणी करण्यासाठी इतकी घाई का करतो आहेस ..आणि तुला काय लगेच नोकरी मिळणार आहे की काय ? ' असे कुत्सितपणे म्हणाला ..झाले माझे डोके फिरले .. सगळ्या व्यवस्थेला शिव्या घालत मी माझ्या हातातील अर्ज फाडला ..म्हणालो ' लाथ मारतो तुमच्या नोकरीवर .. समजतात काय स्वतःला ..तुम्ही सरकारी अधिकारी झालात म्हणून परमेश्वर नाही आहात ' वगैरे बडबड करत मी तावातावाने बाहेर पडलो .. त्यामुळे कार्डवर पदवी नोंदविण्याचे राहूनच गेले होते .. तरीही बारावीच्या नोंदणीवर मला सेवायोजन केंद्राचा कॉल आला होता .
वडिलांच्या चौदाव्याच्या विधीच्या वेळी ..सगळे सोपस्कार करून पिंडदान करण्याच्या वेळी ..काहीही केल्या एकही कावळा पिंडाला शिवायला जवळ फिरकत नव्हता .. सर्वांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव होते .. तू पुढे होऊन .म्हण की ..' या पुढे मी कधीच व्यसन करणार नाही ' म्हणजे कावळा शिवेल असे सर्वानी मला सुचविले ..मी तसेही केले ..तरी परिणाम नाही ..मुळात कावळ्याच्या रुपात असा मृत नातलगाचा आत्मा येतो हे मनाला पटत नव्हते ...शिवाय वडील गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी ..पणती लावलेल्या पिठावर ज्या रेघोट्या उमटल्या होत्या त्यावरून सर्वानी वडील कोणत्या जन्मात गेले याचे आडाखे बांधून झाले होते ..मग आता ते परत त्या नवीन जन्मातून ..पुन्हा कावळ्याच्या रुपात कसे येणार ? हे कोडेच होते ...तिथे अजून एक गम्मत झाली ..एक नातलग इथे घाटावर फोटोग्राफी चा व्यवसाय खूप जोरात चालेल असे कोणाला तरी सांगत होता ..त्याच्या मते नाशिकला गोदावरीच्या घाटावर रोज असे अनेक पिंड ठेवले जातात ..फोटोग्राफर ने जर ...ज्यांचा नातलग मृत झाला आहे ..त्यांच्या कडून ऑर्डर घेवून ... पिंडाला शिवणाऱ्या कावळ्याचा फोटो काढला तर ..स्मृती म्हणून किवा ..हा बघा या कावळ्याच्या रुपात आत्मा आला होता पिंडाला शिवायला असे फोटो दाखवून .. लोकांना सांगता येईल ..असे म्हणत होता .....त्या गंभीर अवस्थेत देखील मला खूप हसू आले या कल्पनेचे .सुमारे तासभर वाट पाहिल्यावर विधी करणाऱ्या गुरुजींनी दर्भाचा कावळा प्रतीत्कात्मक म्हणून बनवून त्याचा स्पर्श पिंडाला जरी करवला तरी काम होते हे सांगितल्यावर तर मला हा सगळा भंपकपणा वाटू लागला ..हे अश्या प्रकारचे विधी खरोखर आवश्यक आहेत का ? असे वाटू लागले .. अर्थात भावनांच्या पुढे माझ्या प्रश्नांना काही किंमत नव्हती .. शिवाय जर आई ..भाऊ .. आणि इतर जवळच्या नातलगांना मानसिक समाधान मिळत असेल तर ... त्यासाठी हे विधी करणे आवश्यक होते .. शेवटी प्रत्येकाच्या मानसिक समाधानाच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात ..मी नाही का व्यसनात मानसिक समाधान शोधात होतो ... !
( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें