प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.comरविवार, 30 जून 2013

आत्मकरुणा .. निराशा ...एकटेपणा ! - प्रथम पर्व समाप्त

पुनर्वसनाची योजना !  ( भाग १७१ वा )

मुक्तांगण व्यसनमुक्तीसाठी तीन पातळयांवर काम करते .. ज्यात जनजागृती ..म्हणजे विविध शाळा कॉलेजेस .. कार्यालये .. या ठिकाणी जावून व्यसनाधीनता हा एक गंभीर मनोशारीरिक आजार आहे ..त्याचे दुष्परिणाम ..तसेच योग्य शास्त्रीय उपचारांनी व्यसनी व्यक्ती बरा होऊ शकतो हे दर्शविणारे पथनाट्य सादर करणे व व्याख्याने देणे ज्या मुळे नवीन व्यसनी निर्माण होण्यास आळा बसू शकतो आणि जे व्यसनात अडकले आहेत त्यांना उपचार घेण्याची प्रेरणा मिळते .. दुसरा भाग उपचारांचा असतो ज्यात व्यसनी व्यक्तीला निवासी उपचार देण्यात येवून त्याला आधी व्यसनाच्या शारीरिक गुलामीतून बाहेर काढणे ..आवश्यक ती वैद्यकीय मदत देणे .. नंतर समूह उपचार ..व्यक्तिगत समुपदेशन ..मानसोपचार तज्ञांची मदत ..आणि इतर उपचार देवून व्यसनापासून कायम दूर राहण्यासाठी त्याची मानसिक ताकद वाढविण्याचे कार्य केले जाते ..तिसरा महत्वाचा भाग हा त्या व्यसनी व्यक्तीच्या पुनर्वसनाचा असतो ..ज्यात त्या व्यक्तीने पुन्हा व्यसनाकडे वळू नये म्हणून .. त्याचे कुटुंबीय ..समाज ..यात पुनर्प्रस्थापित होण्यासाठी त्याला स्वतच्या विचार ..वर्तन आणि कृती यात बदल करण्याचे प्रशिक्षण देणे व आर्थिक बाबतीत स्वावलंबी होण्यासाठी त्याला नोकरी व्यवसाय ई. बाबतीत स्थिर करण्यासाठी त्याचे कुटुंबीय व समाजातील घटकांची मदत घेणे .. त्याचा आत्मविश्वास वाढविणे हे असते . ज्या लोकांना काहीच येत नसेल त्यांना काही तांत्रिक प्रशिक्षण देणे .. किवा एखादा छोटासा व्यवसाय करण्यासाठी या व्यवसायाचे शिक्षण देणे वगैरे देखील झाले पाहिजे असा मँडमचा कटाक्ष असे . त्या साठी ' अनिकेत प्रशिक्षण ' म्हणून विभाग होता मुक्तांगण मध्ये जेथे आम्हाला मेणबत्त्या बनविणे ..आकाश कंदील बनविणे .. प्लास्टिक मोल्डिंग च्या मशीन मध्ये प्लास्टिकच्या वस्तू बनिविणे वगैरे प्रशिक्षण दिले जाई ..अर्थात जे इच्छुक आहेत तेच लोक यात सहभागी होत असत ..बहुधा जास्त काळ मुक्तांगण मध्ये उपचार घेणाऱ्या मित्रांच्या बाबतीत हा पुनर्वसनाचा भाग असे .. मुक्तांगण मध्ये जास्त काळ राहणारे असे आम्ही सुमारे १० जण होतो त्यावेळी .. त्यापैकी काही निवासी कार्यकर्ता म्हणून संस्थेच्या कामात मदत करीत करीत असत ..असे निवासी कार्यकर्ता म्हणून काम करणे हा देखील पुनर्वसनाच्या प्रक्रियेचा भाग होता ..ज्यात आम्हाला विविध प्रकराच्या जवाबदा-या देवून ..बाहेरच्या जगात समर्थ पणे जगण्याचा आत्मविश्वास मिळणार होता ..निवासी कार्यकर्ता म्हणून जास्त काळ मुक्तांगण मध्ये व्यतीत करण्याने आमची व्यसनमुक्ती बळकट होण्यास अधिक मदत मिळत असे ..माझी इच्छा तर कायमचे या क्षेत्रातच काम करावे अशी होती .. कारण पूर्वी बाहेर इतर नोकऱ्या करण्याचा माझा प्रयत्न काही महिन्यातच शून्य होत असे ..

मी बाहेरच्या जगात जास्त काळ व्यसनमुक्त राहू शकत नाही असा माझा अनुभव होता .. मुक्तांगणला त्यावेळी मोजके सरकारी अनुदान होते .. निवासी कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या काही जणांना स्टाफ मध्ये म्हणजे पगारी कार्यकर्ता म्हणून नेमण्याचा प्रस्ताव आला होता ..माझी इच्छा होती की मला ही संधी मिळावी .. परंतु मी हे कोणाजवळ उघड पणे बोलू शकलो नाही .. मँडमनी जेव्हा एकदा मला माझ्या भविष्यकालीन योजनेबद्दल विचारले होते तेव्हा मी त्यांना सांगितले होते की ..मी नाशिकला तर जाणार नाहीय इतक्यात .. पुण्यातच कुठेतरी नोकरी करून आधी व्यसनमुक्ती बळकट करणार आहे . .त्या नंतर मग दोन महिने तो विषय बाजूला पडला होता .एकदा मँडमनी मला व आणखी दोघांना बोलावून सांगितले की आपल्या कडे पुनर्वसनाच्या योजनेचा भाग म्हणून एका कुबेर चेम्बर्स येथे असलेल्या एका इलेक्ट्रोनिक्स कंपनी कडून प्रस्ताव आलाय की इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंचे ..असेम्ब्लिंग ..साँल्ड्रींग ..वगैरे शिकायची कोणाला इच्छा असेल तर अशा दोन तीन जणांना मोफत प्रशिक्षण देण्यास ते तयार आहेत .. त्यासाठी मी तुमच्या तिघांचे नाव सुचविते आहे .. रोज दुपारी तीन ते पाच या वेळात तेथे जायचे आहे .. मँडमनी मी.. विजय..शेखर या तिघांची निवड केली होती . आम्हीही त्यास होकार दिला .. मग रोज दुपारी मँडम घरी जायला निघाल्या की त्यांच्या सोबत जिप्सी गाडीत आम्ही तिघे ..इंजिनियरिंग कॉलेजच्या अलीकडे असलेल्या कुबेर चेम्बर्स येथे जात असू ..तिसऱ्या मजल्यावर कंपनी होती . जाताना मँडम त्यांच्या गाडीने आम्हाला सोडत असत व येताना आम्ही बसने परत येत असू .. कँपँसिटर..रेजिस्टंर ..सोल्ड्रिंग गन..वगैरेचा वापर करून पीसीबी वर सगळे कसे असेम्बल करायचे व त्यापासून एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू कशी तयार होते हे शिकत होतो आम्ही ..पुन्हा एक महिन्य नंतर निवासी कार्यकर्त्यांपैकी काही लोकांना आता हळू हळू बाहेर राहण्यास सुरवात करावी ..जेणे करून बाहेरच्या जगात देखील व्यसनमुक्त राहण्याची सवय लागेल या हेतूने मुक्तांगण पासून २ किमी अंतरावर असलेल्या एका वस्तीत .. एका सामाजिक संस्थेमार्फत चालीवण्यात येणाऱ्या ' बेगर्स होम ' मध्ये काही लोकांनी रात्रीचे झोपायला जावे असा प्रस्ताव आला .. त्यासाठी मी ... शेखर ..अँग्नेलो ..प्रकाश यांची निवड झाली .आधी आम्ही चौघांनी तेथे जावून त्या पडक्या हॉलची जरा डागडुजी केली .. तेथे खाली फरश्या बसविण्याच्या कामात मदत केली .. मग तेथे राहणे सुरु करण्याचा दिवस उजाडला .. सकाळी ८ वा , मुक्तांगणला यायचे ..दिवसभर येथे कामात ..उपचारात सहभाग घ्यायचा ..रात्रीचे जेवण झाले की मग त्या बाहेरच्या जागेत झोपायला जायचे असे आम्हाला सांगितले गेले .मला हे मनापासून आवडले नव्हते ..मात्र तसे मँडमना सांगण्याची माझी हिम्मत नव्हती ..खरेतर आपल्या मनात काय आहे हे मोकळेपणाने मी बोलायला हवे होते ..मात्र तसे झाले नाही त्यामुळे मी मनातल्या मनात कुरकुर करत सगळे मान्य करत गेलो .

बाहेर झोपायला जाण्याच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी सिनेमा पाहायला म्हणून आम्ही चौघे परवानगी घेवून सायंकाळी ४ ला बाहेर पडलो ..सिनेमा पाहून ..नंतर बाहेरच जेवण करून आम्ही त्या बेगर्स होमच्या हॉल मध्ये झोपायला जाणार होतो ..दुसऱ्या दिवशी सकाळी परत ८ वाजता मुक्तांगण मध्ये यायचे होते ..खूप दिवसांनी कोणतेही निर्बंध नसताना आम्ही बाहेर पडलो होतो .. बसमध्ये माझ्या बाजूला अँग्नेलो बसला होता ..तर मागच्या सीट वर शेखर आणि प्रकाश .. अँग्नेलो ने त्याच्या खिश्यात हात घालून शंभराच्या काही नोटा बाहेर काढल्या व मोजून खिश्यात ठेवल्या .. त्याच्याकडे इतके पैसे पाहून मला नवल वाटले .. आम्हाला मँडम नी सिनेमा आणि जेवण असे मिळून प्रत्येकी ५० रु. दिले होते .. हे इतके जास्त पैसे याने कुठून आणले ? ..त्याला विचारले तेव्हा समजले की त्या दिवशी गुरुवार असल्याने त्याला भेटण्यासाठी त्याचे काका आले होते त्यांच्याकडून याने सुमारे १ हजार रुपये घेतले होते ..ते पैसे पाहून शेखरने माझ्याकडे पाहून डोळे मिचकावले व म्हणाला ' आज बहोत माल है अपने पास ..जो चाहे वो कर सकते है ..किसीको पता नाही चलेगा ' मी नुसताच हसलो .. येरवड्यात ' गुंजन ' थेटरला त्यावेळी सनी देओलचा ' नरसिंहा ' हा सिनेमा लागला होता . तिकिटे काढून जरावेळ बाहेर चहा.. सिगरेट झाल्यावर आम्ही सिनेमा थेटर मध्ये बसलो .मध्यंतराच्या आधी प्रकाश उठून लघवीला म्हणून जो बाहेर पडला तो ..नंतर सुमारे अर्धा तास उलटून गेला तरी परत आला नाही ..आम्ही तिघेही त्याला शोधायला बाहेर पडलो ..थेटरच्या आवारात सगळीकडे शोधले पण प्रकाश काही सापडला नाही ..म्हणजे तो पळून गेला होता हे नक्की झाले .. आम्हाला उगाच अपराध्यासारखे वाटू लागले ..प्रकाश जरी जास्त दिवस मुक्तांगण मध्ये रहात होता तरी तो मनापासून नाही तर त्याच्या आईवडिलांच्या आग्रहावरून रहात होता .. त्यामुळे त्याला संधी मिळताच त्याने पोबारा केला होता . आम्ही एसटीडी वरून कॉल करून मुक्तांगण मध्ये प्रकाश पळून गेला ही बातमी कळविली . मग सिनेमा संपल्यावर .. जेवण करायला म्हणून बाहेर पुणे शहरात गेलो ..शेखर आणि अँग्नेलोच्या नशेच्या गप्पा सुरु झाल्या ..पुण्यात कोठे ब्राऊन शुगर मिळते वगैरे .. त्यांच्या बोलण्यावरून त्यांना नशा करण्याचे ' ऑब्सेशन ' आलेय हे मला समजले .. पण सोबत मी असल्याने कदाचित ते उघड तसे म्हणत नव्हते .. मी त्यांच्यात सामील होईन की नाही याची त्यांना भीती वाटत असावी ...शेखर शेवटी मला न राहवून म्हणाला ' तुषार..देख यार बहोत दिन हो गये अपनेको यहाँ.. आज जरा मौका मिला है ..पैसे भी है .. जरा मूड बन रहा है गर्द पीने का .. हम दोनो पियेंगे आज .. चाहे तो तू भी पी ले !' शेखरच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मी म्हणालो ' यार मेरेको जमके भूख लगी है ..मै तो मस्त खाना खावूंगा '

( बाकी पुढील भागात )

================================================================

आँब्सेशन ! (भाग १७२ वा )

अँगी आणि शेखर यांना खूप दिवसांनी हातात भरपूर पैसे आणि स्वातंत्र्य मिळाल्यामुळे नशा करण्याची तीव्र इच्छा होतेय हे मला समजले .. सुरवातीला व्यसनाने दिलेला आनंद व्यसनी व्यक्तीच्या अंतर्मनात खूप खोलवर रुजलेला असते ...संधी मिळताच पुन्हा एकदा तो आनंद घेण्याची इच्छा उफाळून येते हाच या आजाराचा दुर्दैवी भाग आहे ..अशा वेळी काही पथ्ये पाळण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात शिकविले जाते ..त्यात मोकळेपणी आपल्या मनातील विचार ... भावना आपल्या जवळच्या व्यक्तीकडे बोलून दाखवणे .. व्यसन करण्याची इच्छा होतेय हे जरी खरे असले तरी ..या पूर्वी या इच्छेने आपला कितीतरी वेळा घात केला आहे याची स्वतःला आठवण करून देणे .. व्यसनामुळे आपले झालेले नुकसान आठवणे ...आपण फक्त एकदा ..किवा थोडेसे करून नंतर थांबू शकलो नाहीय ..तर प्रत्येक वेळी एकदा ..थोडेसे सुरु झाले की पुन्हा काही दिवसातच आपण त्याच दुष्टचक्रात अडकलो आहोत..ही इच्छा ..ही तीव्र ओढ तात्पुरती आहे ..अशा वेळी मन दुसरीकडे तरी कुठेतरी गुंतवावे लागते ...एकदा मनाला असे डायव्हर्ट केले की ती इच्छा निघून जाते वगैरे .. तसेच अशा वेळी सर्वात प्रथम गोष्ट अशी की आपण मानत असलेल्या ईश्वराची मनात प्रार्थना करणे ..त्या सर्वोच्च शक्तीकडे .. व्यसन न करण्यासाठी शक्ती मागणे ..मग पोटभार जेवण करणे किवा काहीतरी खाणे ज्यामुळे मनाची बैचेनी ..अवस्थता कमी होण्यास मदत मिळते .मी मुक्तांगण मध्ये खूप निर्धाराने आलो होतो ..तसेच .. खूप प्रयत्न केल्यानंतर अँडमीशन मिळवली होती .. बाहेर आता आपल्याला कोणताही आधार नाही अशी मनाशी खुणगाठ बांधली होती ..अशा वेळी पुन्हा तीच चूक करून उरला सुरला ..मुक्तांगणच्या लोकांचा विश्वासघात करणे मला नक्कीच परवडणारे नव्हते हे मी जाणून होतो ..त्या मुळे शेखर आणि अँगीच्या बोलण्याकडे मी दुर्लक्ष करत होतो .

' यार मेरेको बहोत भूख लगी है ..पहेले खाना खाते है ' असे म्हणून मी त्यांचे मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करीत होतो .. मात्र त्यांचा तुणतुणे सुरूच राहिले ..मग वैतागून मी म्हणालो ' आप लोगो को जो करना है करो ..मै नही करूंगा ' मी तुमच्यात सामील होणार नाही असे स्पष्ट सांगितल्यावर त्यांचा जरा विरस झाला ..मग आपण दोघेच ब्राऊन शुगर पिवू अशा त्यांच्या गप्पा सुरु झाल्या .. पण त्यांच्या मनात मुख्य भीतीही होती की मी त्यांनी काय काय केले ते उद्या मुक्तांगण मध्ये गेल्यावर मँडम ना सांगेन याची .. शेखर मग म्हणाला ' तुषार देख तू नही करेगा ..ये बहोत अच्छी बात है .. लेकिन साले तू कल सब मँडम को बता देगा ऐसा लग रहा है ' यावर मी त्यांना आश्वासन दिले की तुम्हाला जे करायचे ते करा मी कोणालाही काहीही सांगणार नाही .. ते थोडे निर्धास्त झाले .. तरी त्यांना इतके दिवस माझ्यासोबत राहून हे ठावूक झाले होते की याच्या पोटात कोणतही फार काळ रहात नाही ..मँडमला नाही पण इतर कोणाला तरी हा नक्की हे बकणार .. हो.. नाही करत करत त्यांनी ब्राऊन शुगर चा विचार सोडून दिला ..मग ते दारू कडे वळले .. ' चलो हम गर्द नही ..लेकिन दारू तो पियेंगे ' असा प्रस्ताव त्यांनी मांडला . मी त्यालाही स्पष्ट नकार दिला .. मला भूख लागली आहे हे पालुपद सुरूच होते माझे ..मग दारूचा विचारही बारगळला .. मग संवादाची गाडी जरा वेळ ' बुधवार पेठ ' या विषयावर रेंगाळली ...शेवटी आम्ही मस्त नॉनव्हेज जेवण करून ..आमच्या नव्या निवासस्थानी ' बेगर्स होम ' मध्ये सुखरूप परतलो.

दुसऱ्या दिवसापासून आमचे वेगळे रुटीन सुरु झाले होते .. सकाळी ' बेगर्स होम ' मध्येच अंघोळ वगैरे उरकून आम्ही आठ वाजता मुक्तांगण मध्ये जात असू ..मग दिवसभर तेथेच राहून पुन्हा रात्री मुक्तांगण मध्ये जेवण झाले की परत ' बेगर्स होम ' ..दुपारी नियमित पणे मँडम च्या जीप्सीतून ' इलेक्ट्रॉनिक असेम्ब्लिंग ' च्या प्रशिक्षणाला जाणे सुरूच होते... हा नवीन बदल मला मनापासून आवडला नव्हता .. कारण मला पूर्णवेळ मुक्तांगण मध्येच राहायची इच्छा होती .. काही दिवसांनी हे आपण मँडमना सांगू आणि परत मुक्तांगण मध्येच राहायला येवू असे मी ठरविले होते मनाशी .. त्याच काळात मँडम आजारी होत्या म्हणून चार दिवस मुक्तांगण मध्ये आल्या नाहीत .. मुंबईला कसल्यातरी तपासण्या करायला गेल्या आहेत हे समजले .. माझ्या सुमारे आठ महिन्याच्या मुक्तांगणच्या वास्तव्यात मँडम सलग इतके दिवस सुटीवर पहिल्यांदाच गेल्या होत्या .. त्यांचे आपल्या कामावर इतके प्रेम होते की त्या बहुधा सुटी घेत नसत ...अनेकदा तर त्या जेव्हा नाशिक ..मुंबई ..सातारा येथे तेथील जुन्या रुग्णांचा फाँलोअपचा दौरा करत असत तेव्हा पुण्याला रात्री २ वाजता परतल्या तरी मुक्तांगण मध्ये इतक्या रात्री एक चक्कर मारत असत .. मँडमचे असे अचानक मध्यरात्री मुक्तांगण मध्ये येणे आमच्यासाठी खतरनाक असायचे .. कारण सर्वानी रात्री ११ वाजता झोपले पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता ..मात्र बहुधा आम्ही निवासी कर्मचारी आणि काही वार्डातील अवस्थ गर्दुल्ले काही रात्री लवकर झोपत नसत ..आमची लायब्ररीत काहीतरी थट्टा..मस्करी सुरु असे ..तर वार्डातील लोक आपल्या जागण्याने इतरांना त्रास नको म्हणून वार्ड जवळ असलेल्या संडास बाथरूमच्या मोकळ्या जागेत गप्पा मारत बिड्या फुंकत टाईम पास करत असत .. व्यसन जरी बंद झाले असले ... जेवण वगैरे सुरळीत झाले असले तरी वेळच्यावेळी झोप येणे सुरु व्हायला गर्दुल्ल्यांना ..दारूड्यांच्या तुलनेत थोडा जास्त वेळ लागतो ...मँडम अशा रात्री राउंड वर आल्या की आधी सरळ लायब्ररीत शिरत ..आम्हाला झोपायला हाकलून मग वार्ड मध्ये ..सरळ बाथरूम मध्ये जावून तेथील लोकांना बाहेर काढून झोपायला लावत .. बंधूला एकंदरीतच विश्रांतीचे वावडे होते .. तो रात्री बेरात्री देखील कपडे धुणे .. बागेत खड्डे करून नवीन झाडे लावणे वगैरे कामे करत असे .. त्याला मँडम हमखास असेल तेथून शोधून काढून झोपायला पाठवत ..कारण बंधू असा तीनचार दिवस पुरेशी विश्रांती न घेता जागला की त्याचा एकदम कोणत्यातरी शुल्लक करणावरून स्फोट होई ..कोणावर तरी प्रचंड आरडा पओरडा करत असे तो ... मग त्याला व्यक्तिगत समुपदेशन करून मँडम शांत करत असत. व्यसन बंद केल्यावर ..लवकरात लवकर सर्व सामान्य जिवन जगायला सुरवात झाली पाहिजे असा मँडमचा आग्रह असायचा .

( बाकी पुढील भागात )

================================================================

आत्मकरुणा .. निराशा ...एकटेपणा ! (  भाग १७३ वा )

' बेगर्स होम ' मध्ये राहण्याचे आमचे रुटीन व्यवस्थित सुरु झाले होते .. त्या दिवशी आँब्सेशनचा यशस्वी सामना केल्यानंतर पुन्हा आम्ही नीट स्थिरावलो होतो .. एकदा अचानक दुपारी १२ च्या सुमारास माझा मोठा भाऊ व वाहिनी मला भेटायला आले ... ते पुण्यात कोणत्यातरी कार्याच्या निमित्ताने आले होते ..लगेच परत जायचे होते त्यांना.. म्हणून जास्त बोलता आले नाही ...माझ्याशी पाच मिनिटे बोलून ते मँडमना भेटण्यासाठी म्हणून वरच्या मजल्यावर गेले ..त्या पाच मिनिटात मी न राहवून वाहिनीला अनघाबद्दल हळूच विचारले ' अनघाचे काही पत्र वगैरे आले का ? काही माहिती मिळाली का ? ' यावर त्या पटकन म्हणाल्या ' अजून विसरला नाहीत तुम्ही तीला ? आता कायमचे विसरायला हवे तुम्ही हे ' मला हे ऐकून जरा धक्काच बसला .. म्हणजे बहुधा अनघाबद्दल त्यांना काहीतरी निश्चित माहिती असावी मात्र मला सांगण्यासारखी ती माहिती नसेल म्हणून त्यांनी मला असे कोड्यात टाकणारे उत्तर दिले असावे .. मला भेटून ते दोघे मँडमना भेटले आणि निघूनही गेले ... ते गेल्यानंतर मँडमनी मला भेटायला बोलाविले .. ' काय म्हणत होता भाऊ ? ' ' काही विशेष नाही मँडम ..तो इथे पुण्यात एका नातलगांच्या लग्नाला आला होता ..सहज म्हणून मला भेटून गेला ' माझे उत्तर गुळमुळीत होते .. वर मी मँडमला ' तुमच्याशी काय बोलला असे विचारले ? ' त्यावर मँडम नुसत्याच हसल्या ..' तुला काय वाटते ..काय बोलले असतील ? ' पुन्हा त्यांचा प्रतिप्रश्न ..' त्यांनी मी काय काय त्रास दिला ते सांगितले असेल तुम्हाला ..किती पैसे उडविले .. काय काय भानगडी केल्या वगैरे ' माझ्या मनात होते ते मी बोलून दाखवले ' ..मला मध्येच थांबवत त्या म्हणाल्या ' असे तुला वाटतेय .. प्रत्यक्षात त्यांनी अजिबात तुझ्या तक्रारी केल्या नाहीत ..फक्त आमचे आता पुढे काय ? तुझे सध्या कसे चालले आहे या वर बोलणे झाले ..प्रत्येक वेळी असा उलटा विचार करणे योग्य नाही .. याच सवई मुळे कदाचित तुझा घरच्या लोकांशी सुसंवाद होत नाही ..ते काय विचार करतील ..काय बोलतील ..काय करतील हे सगळे तू आधीच गृहीत धरतोस आणि ते देखील नकारात्मक पद्धतीने .. त्याचा तुलाच त्रासही होतो ..त्यांच्या साठी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की तू व्यसनमुक्त आहेस .. नव्याने आयुष्य पुन्हा घडविण्याचा प्रयत्न करतो आहेस हे सगळे ऐकून त्यांना आनंद झालाय ' मँडमचे बोलणे एकूण मला बरे वाटले ... मग इलेक्ट्रॉनिक क्लासची प्रगती .. नवीन बेगर्स होम या जागेत झोपायला कसे वाटते वगैरे विचारून त्यांनी मला निरोप दिला .

त्या दिवशी रात्री पुन्हा टक्क जागा होतो .. अनघाचे लग्न तर झाले नसेल ? हा विचार राहून राहून मनात येत होता ..तसे झाले असेल तर माझ्या व्यसनमुक्त राहण्याला काहीच अर्थ राहिला नसता ..जिच्या प्रेरणेने ..जिच्या मुळे मी व्यसनमुक्तीचा निर्धार जपत होतो तीच जर जीवनात नसेल तर सगळे शून्य असे वाटत होते .. दुसऱ्या दिवशी पासून माझ्या वागण्यात बदल झाला .. मी शांत शांत राहू लागलो ..कोणत्याच कामात मन लागेनासे झाले .. हा बदल कोणाच्या फारसा लक्षात आला नाही ..काही दिवसातच माझा इलेक्ट्रॉनिकचा कोर्स संपला व तेथेच मला नोकरी लागली ..म्हणजे सकाळी ९ ते दुपारी चार या वेळात मी तेथेच थांबून शिकायला येणाऱ्या इतर प्रशीक्षणार्थीना मदत करावी असे मला सांगितले गेले व त्याचा पगार म्हणून मला सुराविताला महिना पाचशे रुपये मिळणार होते .. मी ते मान्य केले .यात एक अडचण अशी होती की सकाळी मला लवकर निघावे लागे कारण ९ वाजता मला येरवड्याहून इंजिनियरींग कॉलेज जवळ ' कुबेर चेम्बर्स ' ला जावे लागे .. सकाळी ६ ला उठून मी फ्रेश होऊन मुक्तांगणला जाई ..मग तेथे चहा घेवून लगेच रात्रीच्या उरलेल्या पोळ्या आणि जर तयार असेल तर नाश्त्याची उसळ डब्यात घेवून लगेच निघावे लागे .. दोन मुले आणि दोन मुली असे आम्ही एकूण चार जण तेथे नोकरी करत होतो .. दुपारी जेव्हा सगळे डबा खायला बसत तेव्हा मला माझ्या डब्याची लाज वाटे ..कारण माझ्या डब्यात कालच्या शिळ्या पोळ्या आणि असली तर उसळ नाहीतर ...नुसत्या पोळ्या व कांदा लसून मसाला असे .. एक दोन वेळा तर रात्री पोळ्या उरल्या नाहीत म्हणून मला डबाच नेता आला नाही .. मला रोज खर्चायला म्हणून मुक्तांगण मधून फक्त बस भाड्यपुरते पैसे मिळत होते .. एखादा रुपया वर उरत असे कधी कधी ..ज्या दिवशी डबा नेत नव्हतो त्या दिवशी मी एक वडापाव खात असे .. एकेकाळी हजारो रुपये उडविणाऱ्या वर अशी अर्धपोटी राहायची वेळ येते या बद्दल मला फार वाईट वाटे .. त्याच काळात मँडम पुन्हा आजारी पडल्या ..पुन्हा त्यांना मुंबईला उपचारांसाठी जावे लागले ..बातमी अशी पसरली होती की मँडमना कँन्सर झालाय ..ही बातमी आमच्या सर्वांसाठीच धक्कादायक होती .. इतक्या चांगल्या व्यक्तीलाच नेमका असा दुर्धर आजार का व्हावा ? जगात देव असेल तर तो नक्कीच निष्ठुर आणि अन्यायी आहे असे वाटू लागले .. मुक्तांगण आता स्वतंत्र होऊन ... उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी पांढरा पायजमा आणि पांढरा कुर्ता किवा पांढरा शर्ट असा युनिफार्म ठरला होता .. निवासी कार्यकर्त्यांकडे उपचार घेणाऱ्या सगळ्या मित्रांचे हे युनिफार्म धुण्याचे आणि नीट वळवून इस्त्री करून त्यांना देण्याचे काम सोपविण्यात आले ..याचे कारण इतक्या लोकांना एकदम कपडे धुण्यासाठी बाथरूम मध्ये जागा होत नसे तसेच सुमारे ७० लोकांचे कपडे वाळत घालण्यासाठी वार्ड मध्ये सोय नव्हती ..हे कपडे धुण्यासाठी एक वॉशिंग मशीन आणले होते .. एकाने वार्डमधील लोकांचे कपडे विशिष्ट वारी म्हणजे मंगळवारी व शनिवारी गोळा करायचे ..दुसऱ्याने ते कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवायचे ..सुकवायचे आणि एकाने इस्त्री करून ते परत वार्डात ज्याचे त्याचे कपडे त्याला द्यायचे अशी कामे वाटून दिली गेली ..दिवसा चार वाजेपर्यंत मी कुबेर चेम्बर्स मध्ये नोकरी करून मग संध्याकाळी परत मुक्तांगण मध्ये येत होतो .. तेथे रात्रीचे जेवण करून पुन्हा परत बेगर्स होम मध्ये जात होतो म्हणून माझ्या कडे आठवड्यातून दोन वेळा वार्डमधील मित्रांच्या कपड्यांना इस्त्री करण्याचे काम सोपविले गेले ...त्यासाठी एक मोठी वजनदार इस्त्री देखील आणली गेली .

अनघाचे लग्न झाले की काय ही शंका ..कुबेर चेम्बर्स मध्ये डब्यावरून वाटणारी लाज .. मला दिले गेलेले इस्त्रीचे काम ..आणि मँडमचा आजार या सगळ्या गोष्टी माझ्या पचनी पडत नव्हत्या ...खूप अवस्थ वाटू लागले मला .. मी किती गरीब ..बिचारा .. आणि हे सगळे जग किती स्वार्थी निष्ठुर अशी आत्मकरुणेची भावना मनात निर्माण होऊ लागली .. तसेच आता अनघा कधीच आपली होणार नाही हा विचार निराशाजनक होता .. अश्या सगळ्या गोष्टी मला समुपदेशकाकडे बोलायच्या होत्या मनमोकळे करायचे होते ..परंतु दिवसा कामासाठी बाहेर जावे लागे ..मी परत येईपर्यंत सगळे समुपदेशक घरी निघून जात ..खास सुटी घेवून हे सगळे मी कोणाकडे तरी बोलायला हवे होते ..त्या साठी एक दिवस कुबेर चेम्बर्सला गेलो नसतो तरी चालले असते पण मला हे बोललेच पाहिजे असे महत्व वाटले नाही ..मी मनातल्या मनात कुढत दिवस काढत होतो ...इतर सगळे माझ्यापेक्षा खूप सुखी आहेत ..जगात सर्वात जास्त दुखी: असा मीच आहे हा विचार मनात पक्का बसला .. त्यामुळे माझे इतरांशी बोलणे एकदम कमी झाले ... सारखे झोपून रहावेसे वाटू लागले ..कारण रात्री उलट सुलट विचार करून पुरेशी झोप मिळत नव्हती ..एकदोन वेळा मी कुबेर चेम्बर्स मधून तब्येत बरी नाही या कारणाने लवकर सुटी घेवून बेगर्स होममध्ये जावून दुपारचा झोपून राहिलो ..एकदा असाच खालच्या मोठ्या होलमध्ये रात्रीचा कपड्यांना इस्त्री करीत होतो ..सत्तर लोकांचे पायजमे आणि शर्ट असे मिळून एकूण १४० कपडे इस्त्री करायचे होते .. ती जड इस्त्री घेऊन नशिबाला दोष देत काम सुरु होते .. या अशा जगण्याला काही अर्थ नाही हा विचार मनात पक्का होत होता ...नेमके किती दिवस हे कष्ट करावे लागणार हे अनिश्चित होते .. व्यसनमुक्तीचे सुमारे ९ महिने होत आले होते तरीही ..मनासारखे काहीच घडत नव्हते .. पुन्हा व्यसन करायचा पर्याय तर नव्हताच ..मग ..मग हे जिवनच संपविले तर ? ..सगळ्या गोष्टी संपतील .. कुठलेच दुखः राहणार नाही .. असा आत्मघाताचा विचार मनात येवू लागला .

( बाकी पुढील भागात )


================================================================

ससून सर्वोपचार रुग्णालय !   ( भाग १७४ वा )

सुमारे अर्धे कपडे इस्त्री करून झाले होते ..अजून ७० कपडे तरी बाकी होते इस्त्री करायचे .. जीवावर आल्यासारखा मी संथ पणे काम करत होतो ...रात्रीचे ९ वाजत आलेले .. खालच्या ' अनिकेत प्रशिक्षण ' च्या हॉल मध्ये मी एकटाच होतो .. मनातला अंधार वाढत गेला तसा हे जिवन संपवावे असे विचार मनात दाटून येवू लागले .. गेल्या ९ महिन्यापासून धुम्रपान सोडून कोणतेही व्यसन न करता देखील मला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत होता .. खरे तर जगात प्रत्येकालाच अशा प्रकारच्या आर्थिक ..मानसिक वगैरे अडचणींचा सामना करावा लागतो .. पण असा सामना करणे मला कठीण जात होते ..कारण अनेक वर्षे व्यसन करून मी आत्मविश्वास गमावला होता ..तसेच जीवनात सगळे काही झटपट मिळावे ही वृत्ती असल्याने ..चांगले जिवन सुरु होण्यास लागणारा वेळ माझ्यासाठी जीवघेणा वाटत होता ...खरे तर माझे जिवन संकटमय करण्यास मीच कारणीभूत होतो .. बेजवाबदार वर्तन करून .. स्वतच्या मर्जीने जगून .. इतरांच्या भावनांची पर्वा न करता मी जगलो होतो .. त्याचीच फळे म्हणून मला जीवनात स्थिरावण्यास वेळ लागत होता ..परंतु या संकटांची जवाबदारी स्वतःकडे न घेता ...मी अन्याय होतोय या भावनेने ग्रस्त झालो होतो ..जसा जसा वेळ पुढे सरकत होता तसे तसे माझी निराशा वाढत गेली .. मी आजूबाजूला नजर टाकली .. समोरच्या एका रँक मध्ये ...संडास -बाथरूम स्वच्छ करण्याची साधने ठेवलेली होती ..फिनेल ..हायड्रोक्लोरिक अँसिड..ब्रश वगैरे त्याच्याच बाजूला इमारतीत खूप मच्छर ..ढेकुण झाले की लॉकर्स ..कपाटे साफ करण्यासाठी एक कीटकनाशक ठेवलेले दिसले .. आम्ही निवासी कर्मचारीच याचा वापर करत असू .. ' न्युआँन ' नावाचे फिकट निळ्या रंगाचे ते कीटक नाशक खूप जहाल होते ..बहुधा शेतकरी शेतातील कीड नष्ट करण्यासाठी याचा वापर करतात .. मी सरळ ती बाटली उचलली आणि बुच उघडून तोंडाला लावली .. कडवट द्राव घसा जाळीत पोटात शिरला ..क्षणभर श्वास कोंडल्यासारखे झाले .. बाटलीत सुमारे ७५ टक्के कीटकनाशक शिल्लक होते ..त्यापैकी अर्धे पोटात गेले असावे ..तशी ..उलटीची उबळ आली ..मात्र सकाळी फक्त चहा घेवून बाहेर पडलो होतो ..आदल्यादिवशी रात्री पोळ्या उरल्या नव्हत्या म्हणून डबाही नेला नव्हता ' कुबेर चेम्बर्स ' ला जाताना .. दिवसभरात उदास मनस्थिती मुळे काहीच खाल्ले नव्हते ..फक्त दोन वेळा चहा घेतला होता ..पोटात उलटून पडण्यासारखे काहीच नव्हते ..

बेसिन जवळ गेलो .. उलटीची उबळ येत होती पण कोरड्या उलट्या होत होत्या .. एकदम गरगरल्यासारखे होऊ लागले ..डोक्यात कोणीतरी घणाचे घाव घालतेय असे वाटू लागले ..पोटात तर जणू जाळच पेटला होता .. तितक्यात मला जेवायला बोलवायला आमचा सुभाष नावाचा मित्र खाली आला ..मी हॉल मध्ये नाही पाहून उलट्यांचा आवाज ऐकून सुभाष बाथरूम मध्ये आला .. त्याने पहिले की बाजूला ' न्यूआँन ' ची बाटली पडलीय उघडी .. त्याने लगेच आरडा ओरडा सुरु केला .. सगळे निवासी कर्मचारी धावत आले .. माझ्या डोळ्यापुढे आता अंधारी येवू लागली ..काजवे चमकल्यासारखे वाटले .. पटकन कोणीतरी मला उचलून खांद्यावर घेतले बहुधा शेखर होता .कारण त्याच्या बोलण्याचा आवाज मी ओळखला .. नंतर मला अंधुक आठवते .. बंधू ..अँगी ..विजय सर्वांचे आवाज ऐकू येत होते .. मग कोणीतरी डोळे उघड म्हणत हाताने माझ्या पापण्या उघडल्या ..माझ्या डोळ्यात विजेरीचा प्रकाश टाकला ..मग म्हणाले .. याला ससून मध्ये न्या ..झोपू देवू नका .. बहुधा ते मेंटल हॉस्पिटलचे डॉक्टर असावेत ..पुढचे काहीच आठवत नाही ..

एकदम दोन दिवसांनी मला शुध्द आली तेव्हा मला ससून हॉस्पिटलच्या एका पलंगाला बांधून ठेवलेले होते ...बाजूला अँगी ..शेखर उभे होते .. मी डोळे उघडल्यावर शेखरने माझ्या डोक्यावरून हात फिरवला ..म्हणाला ' साले बच गया तू ' ..मग त्याने मला सगळी कथा सांगितली .. मला खांद्यावरून उचलून घेवून माझे मित्र आधी मेंटल हॉस्पिटलच्या डॉक्टरकडे घेवून गेले होते ..तेथे रक्तदाब ..नाडी वगैरे तपासून ..डोळ्यांच्या बाहुल्या पाहून मला ससून मध्ये नेण्याचा सल्ला दिला गेला ...ताबडतोब एकाने ऑटो आणला त्यात मला बसवून विजय ..शेखर ..अँगी यांनी ..ससून रुग्णालयात आणले .. तेथे आधी माझ्या घश्यात रबरी नळी घालून पोटातील विषारी द्राव बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला ..मग काही इंजेक्शन्स दिली गेली .. सलाईन लावले ..नाकातून नळी घालून... पोटेशियम परमँग्नेटचे पाणी सोडून स्टमक वाँश दिला गेला .. एव्हाना मी बहुधा त्या द्रवाच्या प्रभावाने भ्रमाच्या अवस्थेत गेलो होतो म्हणे ..मी मोठमोठ्याने रडत होतो ..गाणी म्हणत होतो .. सारखा बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करत होतो ..म्हणून मला बांधून ठेवले गेले .. शेखर सगळी माहिती सांगत होता .तसा तसा माझ्या अंगावर काटा येत होता .. मला म्हणे त्या भ्रमाच्या अवस्थेत ..अनघा भेटायला आलीय .. मी तिच्याशी बोलतोय ..नंतर माझा जिवलग मित्र विलास पाटील पण दिसला .. मध्येच अकोल्यातील रामाचे मंदिर दिसले .. मग मी कोणाला तरी खुप शिव्या दिल्या त्या अवस्थेत ..असे सुमारे दीड दिवस सुरु होते .. मग मला गाढ झोप लागली ..आणि आता सकाळी मी शुद्धीवर आलो होतो ..मी शेखरला माझे हात सोडण्यास सांगितले .. तर त्याने आधी डॉक्टरला विचारले मग माझे हात सोडले .. आता मी धोक्याच्या बाहेर होतो असे डॉक्टरनी मला तपासून सांगितले ... बांधलेले हात पाय सोडताच मी उठण्याचा प्रयत्न केला ..मात्र प्रचंड अशक्तपणा जाणवत होता ..उठू शकलो नाही .. मला लघवीला जायचे होते ..शेखरने सांगितले की काळजी करू नकोस तुला कँथेटर लावला आहे .. नंतर सुमारे दोन दिवसांनी मी हळू हळू उठून बसू लागलो ..थोडासा चालू फिरू लागलो ..
माझा आत्महत्येचा प्रयत्न फसला होता .. म्हणतात ना ' वेळ आली नव्हती ' अजून बरेच भोग बाकी असावेत .. आपण जिवंत आहोत याचा आनंद वाटला नाही ..मात्र नियतीच्या मनात मी अजूनही जिवंत राहावे असे आहे हे समजले ..कोणत्या हेतूने निसर्गाने मला जिवंत ठेवले ते शोधावे लागणार होते आता ..या मिळालेल्या जीवदानाचा लाभ घेतला पाहिजे असे वाटले !

(बाकी पुढील भागात )

================================================================

परत नाशिक ! ( भाग १७५ वा )

ससून मध्ये चार दिवस राहून चालणे फिरणे ..जेवण सुरळीत झाल्यावर मला डॉक्टरांनी सुटी दिली .मुक्तांगण मध्ये परत आलो तसे मला उमराणी सरांनी मला भेटायला बोलाविले ..मँडम अजूनही मुंबईलाच होत्या असे समजले .. त्यांच्या अनुपस्थितीत उमराणी सर् प्रमुख म्हणून काम पाहात असत ..सरांनी आधी तब्येतीची वगैरे चौकशी केली ..' तू असा कसा एकदम टोकाचा निर्णय घेतलास ? अरे तुला काय समस्या होत्या त्या बोललास का कोणाजवळ ? " सरांचा हा प्रश्न मला अपेक्षित होता ..मात्र त्याचे उत्तर मलाही सांगता येत नव्हते ..कदाचित आसपासच्या सर्व लोकांवरील अविश्वास हे देखील कारण असावे माझ्या कोणाजवळ काहीही न बोलण्याचे ..मी नुसता मान खाली घालून बसलो ..पुढे सर् म्हणाले ..' असो झाले ते झाले .प्रत्येकाच्या जीवनात कधी कधी अशा समस्या येतात की जेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात .. आपल्या सगळ्या क्षमता संपल्यासारखे वाटते ..आता सगळेच संपले .. अशी निराशा दाटून येते ..मात्र एक नेहमी लक्षात ठेव ..कोणतीही समस्या ही आपल्या जीवापेक्षा मोठी असत नाही .. फक्त ती समस्या सोडविण्यासाठी आपली बुद्धी तोकडी पडते कधी कधी ..अशा वेळी आसपासच्या व्यक्तींची मदत घ्यायची असते .. तू तुझी घुसमट तुझ्या एखाद्या जवळच्या मित्राजवळ ..माझ्याजवळ .. मोरे सरांजवळ व्यक्त करू शकला असतास ..आपण नक्की मार्ग काढला असता काहीतरी ... मी सर्व सामुपदेशकांसोबत तुझ्या बाबतीत चर्चा केली ..आणि आम्ही असे ठरवले आहे की ..तू खूप ' होमसिक ' झाला असावास ..अथवा येथे पुन्हा त्याच वातावरणात राहून कदाचित तुला पुढचा सकारात्मक विचार करणे या पुढे कठीण जाईल .म्हणून तुला आम्ही मुक्तांगण मधून सुटी द्यायचे ठरवले आहे .. तू उद्या खैरे सरांबरोबर नाशिकला आपल्या घरी जावे हे अधिक योग्य राहील ..येथे सुमारे नऊ महिने तू राहिलास ..या काळात व्यसनमुक्ती हा आजार .. त्यातून बाहेर पडण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न .. धोके ..या बाबत बहुतेक सगळी माहिती मिळाली आहे तुला .. रस्ता माहित झालाय व्यसनमुक्तीचा ..अडचणी ..खाच खळगे देखील माहित आहेत ..आता निर्धाराने चालणे तुझे काम आहे .. पुन्हा कधी असा टोकाचा विचार करू नकोस ..आणि कधी काही अडचण आली तर . ..आमच्याशी संपर्क कर .. मदत माग ..वगैरे सांगत सरांनी मला जाण्यास सांगितले ...!

दुसऱ्या दिवशी सकाळी माझे मोजके समान घेवून खैरे सरांबरोबर नाशिकला जायला निघालो निघालो ..वाटेत ..आधी संगमनेरल उतरलो ....तेथील सामाजिक कार्यकर्त्या अँड .... निशाताई शिवूरकर यांनी व्यसनमुक्तीच्या प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला होता .. त्या कार्यक्रमात सामील झालो ..तेथे खैरे सरांनी मला माझे व्यसनाचे दाहक अनुभव सांगायला सांगितले .. मी कोणताही संकोच न बाळगता .. थोडक्यात व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम माझ्या अनुभवातून मांडले .. मग तेथेच जेवण वगैरे करून ..नाशिककडे निघालो... संध्याकाळी आम्ही घरी पोचलो ..सरांनी थोडक्यात आईला ..भावाला माझ्याकडून घडलेल्या प्रकारची कल्पना दिली ..या पुढे मी नाशिकलाच राहणार आहे हे सांगितले त्यांना ..तसेच ही देखील खात्री दिली की तुषार या पुढे चांगला राहील .. त्याने मुक्तांगण मध्ये सगळ्या उपचारात चांगला सहभाग घेतलाय ..मात्र काही भावनिक त्रासांमुळे त्याने चुकीचा निर्णय घेतला होता ..या पुढे आपण त्याच्यावर नियंत्रित पद्धतीने विश्वास ठेवून .. आमच्या संपर्कात रहावे ..पुढे काही गडबड झाल्यास ..आपण त्याला पुन्हा मदत करू . मग दुसऱ्या दिवशी ..मी ' भालेकर हायस्कूल ' येथे पाठपुरावा सभेला गेलो ..पूर्वी मुक्तांगण मध्ये उपचार घेवून आता चांगले राहणारे पाच सहा जण आले होते ..सरांना भेटायला .. मुक्तांगण तर्फे नियमित पाठपुरावा ठेवण्यासाठी संजय नावाचा एक पूर्वी मुक्तांगण मध्ये उपचार घेवून चांगला राहणारा तरुण नेमला होता ..त्याच्यासोबत माझी ओळख झाली ....आता मी नाशिकलाच राहणार होतो हे मी संजयला सांगितले ..तेव्हा संजयने मला आठवडयातून एकदा तरी आपण भेटले पाहिजे वगैरे सांगितले ....नंतर सर् पुण्याला निघून गेले .
सुरवातीचे काही दिवस घरात मला अपराध्यासारखे वाटत होते .. पण भाऊ ..वाहिनी ..आई यांनी मला मी पूर्वी केलेल्या चुकांची आठवण करून दिली नाही ..दिवाळी जवळ आली होती ..आईचे दिवाळीत बहिणीकडे अकोल्याला जायचे ठरले होते ..जरा बदल म्हणून मी पण आईसोबत जावे असे ठरले .. मी मनातून खूप आनंदित झालो होतो .. नक्की अनघा भेटेल ..किवा तिच्या बद्दल पक्की माहिती मिळेल अशी आशा बळावली पुन्हा ...अकोल्याला पोचलो तर पहिला धक्का बसला तो हा की बहिण आता जुने घर सोडून ..स्वतच्या बांधलेल्या घरात तुकाराम हॉस्पिटल जवळ राहायला गेली होती ..म्हणजे अनघाच्या घरापासून सुमारे ६ कि.मी . दूर ... म आता उठसुठ राम मंदिरात जावून बसणे शक्य नव्हते ..तसेच सलील देखील सारखा भेटू शकला नसता .. अकोल्याला पोचल्यावर दुसऱ्या दिवशी मी भाचीला अनघाबद्दल विचारले तेव्हा तीने आधी गुळमुळीत उत्तर दिले ..तुझी अनघाची भेट झाली होती का ? ती तुला माझ्या बद्दल काही बोलली का ? असे खोदून खोदून विचारले तर म्हणाली ...आता आम्ही दूर राहायला आल्यापासून भेट होत नाही ..एकदाच भेटली होती .. तिचे लग्न झाले आहे .कोठे असते नक्की माहित नाही ती .. मला हे अपेक्षितच होते ..जरी लग्न झाले असले तरी तीला किमान एकदा तरी मला भेटायचे होते ..तिची माफी मागायची होती प्रत्यक्ष ..मी तीला भेटण्याचा प्रयत्न करीन हा सर्वाना अंदाज होताच ..त्या मुले सगळ्यांनी योग्य ती सावधगिरी बाळगूनच मला माहिती दिली ...संध्याकाळी सलीलला भेटायला माझ्या भाच्यासोबत गेलो .. मला अनघाच्या घरात जायला आता संकोच वाटत होता ..पूर्वीच्या संबधात खूप वादळे आल्यामुळे दुरावा निर्माण झाला होता .. मी बाहेरच थांबून भाच्याला सलीलला बोलवायला पाठविले .. सलील माझ्याशी जणू पूर्वी काही घडलेच नाही असा बोलला .. त्याला सरळ सरळ अनघाबद्दल काही विचारण्याची मलाही हिम्मत झाली नाही .. इकडच्या तिकडच्या गप्पाच झाल्या ... मी प्रयत्नपूर्वक नॉर्मल रहात होतो .. सलील ने मला जेव्हा ' एक आकाश संपले ' या मालिकेत आम्ही तुला पहिले गाणे म्हणताना असे सांगितले तेव्हा मला बरे वाटले .. चला म्हणजे मी कोठे होतो वगैरे यांना ठावूक आहे तर ..म्हणजे अनघाला देखील माहित असणार ..तरीही तीने आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही म्हणजे ..ती नक्की आपल्याला विसरण्याचा प्रयत्न करत असणार ..जगराहाटी पुढे तीने हार मानली असावी ..किवा मनावर दगड ठेवून .. नवीन संसार सुरु केला असावा .. कसे जमले असेल तीला हे .. ती कधी माझ्या आठवणीने व्याकुळ होत असावी का ? ...नव्या संसारात रमल्यावर ..बरे झाले जे झाले ते असे वाटत असेल तीला ? अनेक प्रश्न मनात होते ..त्यांची उत्तरे केवळ अनघाच देवू शकली असती . .बहिणीकडे मी एरवीपेक्षा शांत शांतच राहिलो ..नवा डाव सुरु करायचा होता एकट्याने .. मनात गाणे आठवत होतो ..' दुनिया मे हम आये है तो जीना ही पडेगा ..जिवन ही अगर जहर तो पिना ही पडेगा !

( बाकी पुढील भागात )