भाग १४६ वा हम तुमसे जुदा होके ..मर जायेंगे ..रो रो कें !
अनघाला शेवटचे भेटून ८ महिने होऊन गेले होते ..इतक्या कालावधीत ..तिच्याबद्दल काहीच माहिती मिळू शकत नव्हती .. वडील गेल्यावर जेव्हा बहिण आली होती तेव्हा तीला विचारण्याचा प्रयत्न केला तर तीने सरळ उडवून लावले ... अनघाचा विषय सगळे जणू विसरूनच गेले होते ..फक्त मीच वेड्यासारखा तिची भेट नक्की होईल असा विचार करत होतो ... अनघाच्या बाबतीत देखील अपराधी पणाची भावना मनात होती ..किमान तीला एकदा भेटून तिची माफी तरी मागावी अशी इच्छा होती मनात .. पोलीस भरतीचे पत्र मिळाल्यावर स्वभावाप्रमाणे उगाच पुढील स्वप्ने पाहू लागलो ..आपण जर यात निवडलो गेलो तर ...तर ट्रेनिंग संपले की लगेच ..अनघाच्या आईबाबांना भेटायचे अश्या योजना मनात आखत होतो .. पुन्हा व्यसन सुरु होऊ नये म्हणून शक्यतो घराच्या बाहेर पडत नसे .. वाचन ..टी.व्ही यातच वेळ घालवत होतो .. पण मनावरची वैफल्याची छाया कमी होत नसे ...अनघाची जुनी पत्रे .तिचा फोटो पाहावा म्हणून एकदा माझी सगळी कागदपत्रे शोधली तेव्हा काहीच सापडले नाही ..मग समजले की आईने ते सगळे तिच्या ताब्यात घेवून त्याची विल्हेवाट लावली होती ..कदाचित आईला भीती असावी की हा या पत्रांचा पुढे गैरवापर करून अनघाला आणि तिच्या कुटुंबाला भावनेच्या भरात त्रास देवू शकेन ..आणि तसेही झाले नाही तरी ती पत्रे सारखी सारखी वाचून ..फोटो पहात राहून अनघाला विसरणे कठीण होईल याला ..आणि नव्याने उभे राहण्यास अडचण येईल ..आईने काय विचार केला होता ते तिलाच माहित पण ती पत्रे असती तर तेव्हढाच माझ्या मनाला आधार झाला असता असे वाटत होते .. ती पत्र आणि फोटो गायब केल्याबद्दल आईचा राग देखील मनात होता .
भरतीच्या दिवशी माझ्या सोबत भाऊ देखील आला होता ..सी .बी.एस जवळील पोलीस परेड ग्राउंड वर प्रचंड गर्दी जमलेली होती ..सुमारे ५०० जागांसाठी एकूण १० हजार तरुण आलेले दिसत होते ... ज्यांना सेवायोजन कार्यालयातून पत्र गेले होते अशी माझ्यासारखी मुले तर होतीच ..पण पत्र मिळाले नाही मात्र कोठून तरी माहिती मिळाली ..वर्तमानपत्रात बातमी वाचली म्हणून देखील अनेक तरुण आले होते .. बाहेरगावाहून आलेल्या तरुणांनी तर रात्रीपासूनच ग्राउंड वर मुक्काम ठोकलेला दिसत होता ..इतकी गर्दी पाहून माझ्या मनात आधीच निराशा दाटून आली ....उगाच बावचळून गेल्यासारखे झाले ..आत्मविश्वास संपुष्टात आला होता .. ऐरवी सगळीकडे आत्मविश्वासाने वावरणारा मी येथे का कच खाल्ली याचे कारण अजूनही समजत नाहीय मला ..भाऊ सारखा मला धीर देत होता ...ती प्रचंड गर्दी पाहून वाटले ...ही इतकी बेरोजगारी निर्माण कशी झाली ? ... लोकसंख्या वाढ म्हणून ..की राज्यकर्त्यांचे अपयश म्हणून ..आधीच महाराष्ट्रात त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी झिरो बजेट म्हणून सरकारी नोकर भारती थांबवलेली होती ..त्यात अशी संधी मिळणे कठीण म्हणून इतके लोक जमले असावेत ...स्वातंत्र्य प्राप्ती नंतर देशाच्या जनतेशी ..जनतेच्या समस्यांशी .. विकासाशी काहीही संबंध नसलेले राज्यकर्ते मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या राज्यात सत्तेवर आले ..अयोग्य नियोजन .. इच्छाशक्तीचा अभाव ..सत्ता सांभाळण्यासाठी करावी लागणारी कसरत ..आणि स्वतच्या साम्राज्याचा विस्तार या नादात नेत्यांनी जनतेकडे दुर्लक्षच केलेले होते ..निवडणुका जवळ आल्या की जोरदार प्रचार करून ..वस्तू ..दारू ..पैसे यांचे वाटप करून एका महिन्याभरात पुन्हा गरीब ..अशिक्षित .. मतदाराचे हक्क ..लोकप्रतिनिधींची जवाबदारी वगैरे काहीही समजत नसलेल्या लोकांना गाड्यातून भरभरून आणून पुन्हा सत्ता ताब्यात घ्यायचे राजकारणी लोकांचे तंत्र छानच होते . याला कारण देशातील सुशिक्षित ..पांढरपेश्या वर्ग ..उच्चमध्यम वर्ग यांची मतदानाबाबतची उदासीनता देखील कारणीभूत असावी !शिवाय अठरापगड जाती ..अनेक धर्म यांच्या वेगवेगळ्या अस्मिता ..जनतेतील विसंवाद ... तत्वांना महत्व देण्यापेक्षा ...व्यक्तिना महत्व देणारा समाज !
प्रत्यक्ष भरतीच्या वेळी जेव्हा मला शारीरिक मापे घेण्यासाठी बोलाविले तेव्हा आधी माझे वजन नोंदवले गेले ..मग उंची मोजली गेली ...शेवटी छातीचे माप घेताना गडबड झालीच .. इतकी वर्षे व्यसने करून मी तब्येतीचे वाटोळे केलेले होते .. गेले काही महिने जरी व्यसन बंद होते तरी .. तब्येतीत म्हणावी तशी सुधारणा झालेली नव्हती .. माझ्या छातीचे माप एक इंच कमी भरले ... मी हिरमुसला होऊन बाजूला उभा राहिलो ...एका परीक्षकाला बहुधा माझी दया आली असावी ..त्याने मला परत छातीचे माप देण्यास सांगितले ..पुन्हा तेच झाले... शेवटी निराश मनाने सायंकाळी घरी परतलो .. भाऊ माझी अवस्था समजू शकत होता .. ' अरे इतके मनाला लावून घेवू नको ..आता तुझे वय २७ वर्षे आहे ..सरकारी नोकरी साठी अजून तीन वर्षे तू प्रयत्न करू शकतो .' असे मला सांगत होता ..त्या दिवशी घरी आल्यावर कोणाशीही बोलावेसे वाटेना ..माझा खूप मोठा पराभव झाल्यासारखे वाटत होते ..जिवनाच्या सर्वच क्षेत्रात मी हरलो होतो ही भावना मनात येत होती ...आता तर अनघा ची भेट अजून दुरापास्त झाली होती ..कधी कधी वाटे कुणाला न सांगता अकोल्याला निघून जावे ..कसेही करून अनघाचा शोध घ्यावा ..पण असे जबरदस्ती अनघाला भेटण्याचा प्रयत्न करणे .. मनाला पटत नव्हते ..जर तिच्या आईवडिलांना पसंत नसेल तर आमच्या भेटीला काही अर्थ नव्हता ...शिवाय आता अनघा माझ्याशी कशी वागेल या बाबत मनात शंकाच होती ....जर तीच्या मनात असते तर तीने नक्कीच मला कसाही करून संपर्क केला असता ... असेच निराशेत दिवस ढकलत होतो ..तेव्हा एका परिचितांकडून नव्याने सुरु झालेल्या ' नागजी मेमोरियल हॉस्पिटल ' कडून सुरु करण्यात आलेल्या ' मेडीकार्ड ' ची योजना राबवून जास्तीत जास्त लोक या योजनेत सामील करून घेण्यासाठी प्रतिनिधी नेमणार आहेत अशी माहिती समजली ..व त्याच परिचितांच्या ओळखीने ' हॉस्पिटल रिप्रेझेंटिटिव्ह ' या पदावर माझी तात्पुरती नेमणूक देखील झाली ..दीड हजार रुपये पगार आणि प्रवासभत्ता मिळणार होता .. सुरवातीला नाशिक शहर .. नाशिक महापालिकेच्या हद्दीत हे काम करायचे होते ..व्यक्तिगत मेडीकार्ड आणि कुटुंबाचे मेडीकार्ड असे दोन प्रकार होते ..तीन वर्षांसाठी म्हणून एकदा सदस्यत्व घेतले की दरवर्षी अश्या व्यक्तीला सवलतीच्या दरात संपूर्ण मेडिकल चेकअप करून घेता येणार होता ..तसेच नागजी हॉस्पिटल च्या उपचार खर्चात देखील काही टक्के सवलत मिळणार होती ..एकूण पाच जण तेथे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कामाला लागलो होतो .. आधी तीन दिवस आमचे ट्रेनिंग झाले ..म्हणजे संभाव्य ग्राहकांना नियमित मेडिकल चेकअपचे महत्व समजावून देणे ..त्यांच्यात आरोग्यजागृती करणे .. आणि मग ठराविक पैसे भरून सदस्यत्व घेण्यासाठी त्यांना आग्रह करणे ह एकम होते ..थोडक्यात संभाव्य ग्राहकांना वेगवेगळे गंभीर आजार सांगून घाबरविणे ..आणि त्यांना ग्राहक करून घेणे .
वेगवेगळी सरकारी कार्यालये .. व्यावसायिक .. श्रीमंत वर्ग अश्या ठिकाणी फिरून आम्हाल हे काम करायचे होते .. प्रत्येक प्रतिनिधीने महिन्याला किमान दहा तरी सदस्य करावेत तरच नोकरी टिकेल असे बंधन होते ....सुरवातीला उत्साहाने फिरलो .काम वाटले तितके सोपे नव्हते .. लोक अनेक प्रकारचे प्रश्न विचारीत त्यांचे समाधान करावे लागे ..सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तर चक्क अंधश्रद्धा होता ..नागजी मेमोरीला हॉस्पिटल ज्या जागी सुरु करण्यात आले होते त्या जागी खूप पूर्वी स्मशान होते .. कालांतराने स्मशान म्हणून वापर कमी होत गेल्यावर मग नागजी मेमोरिअल हॉस्पिटल त्या जागेवर उभे राहिले होते ...तसेच त्या वेळचे सगळ्यात अद्ययावत हॉस्पिटल असल्याने बहुधा एकदम शेवटच्या टोकाला असलेल्या केसेस ..अपघाताच्या केसेस वगैरे नागजी मध्ये भरती केल्या जात असत ..त्यातील काही लोकांचा मृत्यू झाल्याचा लक्षणीय आकडा होता ..त्यामुळे जनमानसात नागजी हॉस्पिटल बद्दल एक धास्ती होती .. आम्हाला ट्रेनिंग मध्ये हे आधीच सांगण्यात आले होते ..व असे स्मशाना संबंधी प्रश्न विचारले कोणी तर ..त्या लोकांना आम्ही तेथे शुद्धीकरण करून घेतले आहे ..भूमिपूजा वगैरे साग्रसंगीत करून घेतलेली आहे ..त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही असे समजावून सांगण्याच्या सूचना दिल्या होत्या ..अर्थात लोकांना कितीही समजावून सांगितेले तरी बहुधा त्यांची भीती कमी होत नसे .. पहिल्या महिन्यात मी कसेतरी दहा सदस्य बनवून नोकरी टिकवली ... पण मनात सारखे अनघाचे विचार ...निराशा .. अश्या भावनिक स्थितीमुळे पुढे पुढे कामावर जावेसेच वाटेना ... जर आयुष्यात अनघा नसेल तर मग ..नोकरी ..घर .. पैसा मिळवूनही काय फायदा असा विचार मनात येई ..या निराशेच्या ..अपराधीपणाच्या भावनेत पुन्हा रात्रीची झोप येईनाशी झाली ... रात्री उशिरापर्यंत कुस बदलत जागा रहात होतो ...अनघा भेटू शकणार नाही म्हणजे जणू माझी ऊर्जाच संपुष्टात आल्यासारखे झाले होते ..हळू हळू कामावर जाण्याऐवजी ब्राऊन शुगर नाही पण वाघाडीत जावून गावठी दारूच्या अड्ड्यावर बसू लागलो .. दारू पिवून मग एखाद्या बागेत जावून बसायचे तेथेच बसून लोकांना भेटी दिल्याच्या म्हणजे होम व्हीजीटस केल्याही खोटी नावे लिहून रिपोर्ट तयार करायचा असे सुरु झाले .
====================================================================================
भाग १४७ वा मुझको देखे बिना ..करार ना था ,एक ऐसा भी दौर गुजरा है !
नागजी हॉस्पिटलच्या नोकरीत दारू पिणे सुरु झाल्यावर .. दांड्या वाढणे स्वाभाविक होते .. खोटे रिपोर्ट लिहून सादर करणे सुरु झाले .. पूर्णतः व्यसन बंद ठेवण्याच्या वेळी प्रत्येक व्यसनीला ही अडचण येवू शकते .. तो त्याचे मूळ व्यसन न करता पर्यायी व्यसन ( सबस्टीट्यूट ) करण्याचा प्रयत्न करतो ..म्हणजे ब्राऊनशुगरचा व्यसनी असेल तर ब्राऊन शुगरने जास्त नुकसान होते अशी स्वतची समजूत करून घेवून त्या ऐवजी जरा स्वस्त असणारी ..दारू , गांजा , झोपेच्या गोळ्या , ताडी अशी इतर व्यसने करून..आपली ब्राऊन शुगर तर बंद आहे ..मग ही व्यसने करण्यास काही हरकत नाही असे स्वतःचे खोटे समाधान करून घेतो ..तसेच जर तो व्यसनी आधी दारुडा असेल तर ..दारू बंद केल्यावर ..वास न येणाऱ्या इतर नशा म्हणजे गांजा ..भांग.. ताडी ..झोपेच्या गोळ्या वगैरे घ्यायला सुरवात करू शकतो ...याचे कारण असे की संपूर्ण व्यसनमुक्ती किवा कोणतेही मादक द्रव्य न घेता जिवन व्यतीत करणे ही कल्पना अमलात आणणे त्याला कठीण वाटत असते .. नशेत राहण्याची शरीर .मनाला इतकी सवय होते की कोणतीतरी नशा केल्याखेरीज त्याला चैन पडत नाही .. पैसा ..घरची परिस्थिती .. त्याच्यावरील व्यसनमुक्तीचा दबाव ..या साऱ्या गोष्टींचा विचार करून ..कोणाला लवकर समजू शकणार नाही ..तुलनेत जास्त नुकसान होणार नाही अशी नशा करण्याचा प्रयत्न करतो ..अर्थात त्याचे असे पर्यायी व्यसन करणे तितकेच घातक असते ..कारण पुन्हा लवकरच तो पुन्हा त्याच्या मूळ व्यसनाकडे वळतो .. कधी कधी तर आधीचे व्यसन आणि नंतर चे पर्यायी व्यसन अशी दोन्ही व्यसने सुरु राहून अधिक अधिक नुकसान होता जाते ..माझेही तसेच झाले होते ...माझ्या अंतर्मनातील निराशा ..वैफल्य ..दुखः ..अन्यायाची भावना ..अनघा प्रकरणी आलेला घरच्या लोकांचा राग ..वडील गेल्यानंतर निर्माण झालेली अपराधीपणाची भावना ....या भावनिक गोंधळामुळे मी आतून अतिशय बैचेन होतो ..त्यातच भविष्यकाळाची चिंता ..भूतकाळातील पश्चाताप ..वगैरे होतेच ..मी वाघाडीत दारू पिवून तेथे अड्ड्यावर जास्तीत जास्त वेळ घालवू लागलो होतो ...सोबत विरहाची ..प्रेमभंगाची .. गाणी होतीच जगातील सगळ्यात दुखी: जीव मीच आहे .. सर्वात जास्त अन्याय माझ्यावर झालाय ..सारे जग निष्ठुर आहे ..कोणाला माझी पर्वा नाही वगैरे विचार तर सतत मनात येत राहतात ..अनघाची भेट ही एकमात्र आशा देखील हळू हळू लोप पावत चालली होती ..अनघा मला अशी कशी विसरू शकते ? हा प्रश्न खूप अवस्थ करणारा होता ..वेगवेगळ्या कल्पना करून मानसिकदृष्ट्या पूर्णतः उध्वस्त होत होतो .
नोकरीचे जेमतेम दोन तीन महिने पूर्ण होईपर्यंत ' मेडिकार्ड ' चे पुरेसे सदस्य न जमवू शकल्याने नोकरी गेली .. सकाळी बस भाड्याचे ...थोडे दारूपुरते पैसे घेवून जो बाहेर पडत होतो तो एकदम रात्रीच घरी येवू लागलो .. दिवसभर जुन्या व्यसनी मित्रांमध्ये टाईमपास करणे ..मिळेल ते व्यसन करत राहणे ..संधी मिळाली तशी ब्राऊन शुगर पिणे देखील सुरु झाले ..आईला सारे कळत होते ..तिचाही नाईलाज झालेला होता .. मला परोपरीने समजावून देखील ' पालथ्या घड्यावर पाणी 'असे झाले होते . पुन्हा खोटीनाटी करणे सांगून आईकडून पैसे उकळणे ... सुरु झाले .. वडील गेल्यावर आईच्या नावे फँमिली पेन्शन सुरु झाली होती ..तसेच वडिलांच्या फंडाचे थोडेफार पैसे मिळाले होते ते सगळे आईच्या नावावर होते .. त्यातून भाऊ एकही पैसा घेत नसे ..आईचा फारसा खर्च नव्हताच .. जास्तीत जास्त पैसे मीच उडवले ...याच काळात एकदा नाशिक शहरात ब्राऊन शुगर चा तुटवडा भासू लागला ..कारण नवीन पोलीस अधिकाऱ्यांनी जरा कडक धोरण अवलंबले होते ..तेव्हा अनेक गर्दुल्ले ...अंबरनाथ येथून स्वस्तात मिळणाऱ्या ब्राऊनशुगर च्या पुड्या आणून एकाच्या दोन पुड्या करून त्या जास्त किमतीत नाशिक मध्ये विकू लागले .. माझ्या आणि माझ्या जिवलग मित्राच्या मनात देखील या कल्पनेने घर केले ..आपणही अंबरनाथहून पुड्या आणून येथे विकल्या तर आपल्या पिण्याचा खर्च भागेलच वर नफा देखील कमावता येईल या विचाराने मनात जोर धरला .. सुरवातीला भांडवल म्हणून किमान पाच हजार रुपयांची तरी गरज होती ..मित्राने एक हजार जमवले ..मी घरी आईला एक व्यवसाय करणार आहे ..मुंबई हून तयार कपडे आणून ते नाशिकमध्ये विकण्याचा असे खोटे सांगून चार हजार रुपये मागितले ..हो ..नाही करत तीने कसे बसे दोन हजार रुपये दिले ..साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही दोघे पैसे घेवून अंबरनाथ कडे निघालो ... अंबरनाथला १२ रुपयांना मिळणाऱ्या एका पुडीच्या दोन पुड्या बनवून २५ रुपयाला एक अशी पुडी विकून एका पुडीवर आम्हाला पस्तीस रुपये नफा मिळणार होता ..अंबरनाथ कडे जाताना शेखचिल्ली सारखे स्वप्नरंजन करत होतो एका पुडीमागे ३५ मग १०० पुड्याचे ३५०० ...हजार पुड्यांचे ..३५,००० असा हिशोब करत तासाभरात आम्ही कल्पनेने लखपती झालो होतो .
आधी कल्याण ..तेथून लोकलने अंबरनाथ असा प्रवास केला .. अंबरनाथ रेल्वे फाटक ओलांडून सरळ सरळ जाऊन मग एका चढावर चढले की बकाल वस्ती सुरु होते ..जवळच एक चर्च देखील होते .. त्याकाळी चुनाभट्टी चे अड्डे बंद होऊन मुंबईत स्वस्त माल मिळण्याचे ठिकाण अंबरनाथ झाले होते ..मुंबईच्या एका भागात पोलिसांनी छापे टाकून तेथील अड्डे बंद पाडले की दुसऱ्या भागात ते अड्डे पुन्हा सुरु होत होते ...मग सगळे गर्दुल्ले देखील जेथे अड्डा जवळ आहे अश्या जागी स्थलांतर करत असत ...जंगलातील पाण्याचा एक स्त्रोत आटला की प्राणी जसे पाणी मिळवण्यासाठी दुसरा स्त्रोत शोधून काढतात तसेच होत होते .. फक्त पाणी ही नैसर्गिक गरज होती तर ..ब्राऊन शुगर ही आम्हीच निर्माण केलेली गरज होती ...अंबरनाथला देखील आधी चुनाभट्टी ला पहिले होते तसेच दृश्य पाहायला मिळाले ..त्या वस्तीच्या आसपास सगळीकडे गर्दुल्लेच दिसत होते .. दोनतीन ठिकाणी माल मिळत होता ..एका ठिकाणी जावून आम्ही २४०० रुपयांच्या २०० पुड्या घेतल्या ..आता इतका माल सोबत घेवून जाणे खूप रिस्की होते ..वाटेत पोलीस किवा गर्दुल्ल्यांची टोळी देखील अडवू शकत होती .. आम्ही मुंबईचे किवा स्थानिक नाही हे आमच्या भाषेवरून लगेच समजत होते ..जमेल तशी टप्पोरी मुंबैया भाषा वापरत होतो आम्ही दोघे .. अड्ड्यावरून जास्त माल घेवून जाताना अजून एक धोका असतो तो खबरीचा ..म्हणजे अड्ड्यावरील एखादा गर्दुल्ला ..किवा कधी कधी अड्ड्याचा मालकच पोलिसांना आमचे वर्णन सांगून आम्हाला पकडून देवू शकत होता ..त्यातून त्याचा फायदा असा की पोलीस त्याला माल विकायची सलवत देतात ...कारण त्यांना अश्या टीप दिल्या गेलेल्या केसेस मिळतात ...कारवाई करत असल्याचे रेकोर्ड दाखविता येते ...किवा पकडलेल्या व्यक्तीकडून पोलिसांना पैसे मिळतात ...गर्दुल्ल्याने खबर दिली असेल तर त्याला खूप माल मिळतो पोलिसांकडून ...आम्ही अड्ड्यावरून बाहेर पडताच एका कोपऱ्यात जावून त्या सर्व पुड्या दोन रुमालात बांधून ते हात रुमाल पायाच्या पोटऱ्यांना बांधले ..म्हणजे कोणी झडती घेतली तर खिश्यात काही सापडले नसते ...काही जण अश्या पुड्या हाताला किवा पायाला जखम झाली आहे असा देखावा करून वर बांधलेल्या बँडेज मध्ये लपवतात ..एकाने तर एकदा चक्क पायाला थोडेसे सैल असे ...हाड मोडल्यावर लावतात तसे प्लास्टर लावून त्यात पुड्या लपविल्या होत्या ..व तो इतका बेमालूम पणे कुबडी घेवून लंगडत होता की कोणालाही संशय आला नसता ....पायाला पुड्या बांधून ..झटपट पुन्हा अंबरनाथ रेल्वे स्टेशन ..तेथून कल्याण ..नाशिक असा धास्तीचा प्रवास करून रात्री मित्राच्या घरी पोचलो ..मित्राचे लग्न झालेले होते ..पण त्याच्या व्यसनाला कंटाळून बायको माहेरी निघून गेलेली ..तसेच म्हातारी आई देखील काही दिवसांसाठी नातलगांकडे राहायला गेली होती ..त्यामुळे त्याचे घर रिकामेच होते .. तेथे रात्रभर बसून सगळ्या पुड्या काढून... एकाच्या दोन पुड्या बनविण्याचे काम उरकले .. स्वतचे पिणे सुरूच होते रात्रभर ..खूप नशा करून मग सकाळी आम्ही पुड्या विकायला बाहेर पडलो .
=======================================================================================
भाग १४८ वा गर्द्विक्री ते ' मुक्तांगण '
आम्ही आणलेल्या २०० पुड्यांपैकी रात्रभरात २० पुड्या दोघांनी पिवून संपवल्या ..उरलेल्या १८० पैकी ५० पुड्यांच्या ...एकीच्या दोन करून १०० बनविल्या आणि त्या पुन्हा पायाला रुमालात बांधून आम्ही बाहेर पडलो ... तो पर्यंत सकाळचे १० वाजून गेले होते .. आधी नाशिकरोड परिसरात फिरलो ..तीन चार पिणारे मित्र भेटले .. त्यांना सांगितले की आमच्याजवळ पण एकदम मस्त माल आहे २५ रु ला एक पुडी... .एकाने २५ रुपये देवून एक पुडी घेतली ..आमची बोहनी झाली .. बाकीचे दोन आता जरा कमी पैसे आहेत .... ४० मध्ये दोन द्या असा आग्रह करू लागले ..त्यांची दया येवून त्यानाही भाव कमी करून पुड्या दिल्या ..एकजण तर पूर्ण कफल्लक निघाला .. आता पैसे नाहीत यार खूप टर्की होतेय एकदोन दम तरी पाजच म्हणून लागला ..त्याचीही दया आली ..आडोश्याला जावून पुन्हा आमचे पिणे सुरु झाले ..त्यालाही तीन चार दम दिले . ...मनातून खूप भीती वाटत होती ..कारण जर पोलिसांनी पकडले असते तर ? ... नवीन झालेला अमली पदार्थ विरोधी कायदा खूप कडक होता .. पकडले जावून पोलीस केस दाखल झाली तर .. सरळ सरळ १२ ते १४ वर्षे जन्मठेप आणि वर एक लाख रुपये दंड झाला असता .. दंड भरायला पैसे तर नव्हतेच पण जर पकडले असते तर आमच्या दोघांच्याही घरचे जामिनच काय ..आम्हाला भेटायला देखील आले नसते पोलीस कस्टडीत ...हे आम्हाला चांगले माहित होते ...मनातील भीती कमी करण्यासाठी मग त्यावर दारू प्यायलो ... म्हणजे अजून जेमतेम तीन पुड्या विकल्या होत्या ..खर्च मात्र १०० रुपये झाला होता ... खूप दारू पिवून मग नाशिक शहरात आलो ..दुपारचे २ वाजले होते ..पंचवटी कारंजा .मालेगाव स्टँड ..भद्रकाली ..शालीमार भागात चक्कर टाकली आठदहा पुड्या विकल्या ...पण त्यापैकी काही सवलतीच्या भावात ..तर काही गर्दुल्ला खूप मागे लागला म्हणून त्याला फुकट पाजण्यात संपल्या .. रात्री ११ वाजे पर्यंत सोबत आणलेल्या पैकी ८० पुड्या संपल्या .. पुन्हा दारू प्यायलो ... थोडेसे जेवण केले हॉटेलमध्ये .. मित्राच्या घरी आल्यावर सगळा हिशोब केला तेव्हा लक्षात आले नफा होण्याऐवजी खर्च जास्त झाला होता ..शिवाय जवळच माल असल्याने आमचे दोघांचे पिणेही खूप झाले होते ....दोघांची त्यावरून जरा वादावादी झाली .. या पुढे कोणालाही फुकट पाजायचे नाही .. उधार द्यायचे नाही .. भाव कमी करायचा नाही असा निर्णय घेवून रात्रभर आम्ही चेसिंग करत बसलो ..पहाटे पहाटे ४ ला झोपलो ते एकदम दुसऱ्या दिवशी दुपारी १२ लाच उठलो ... उठल्यावर आधी उतारा म्हणून पुन्हा १० पुड्या ..बाहेर पडलो ..दारू .. मग नाशिक शहर .. कालचाच प्रकार ..उधारी ..फुकट .. स्वस्त ..आणि आमचे दोघांचे अमर्याद पिणे .. तिसऱ्या दिवशी तेच .. आता जवळचा माल संपत आला होता .. सगळा हिशोब केल्यावर जाणवले की आमचे भांडवल कमी झालेय ..म्हणजे २४०० रुपयांच्या पुड्या आणल्या होत्या ..त्यापैकी विक्री करून ..आमचे पिणे .. वगैरे सगळे करून आता हातात १५०० रुपये उरले होते .. याचा अर्थ मुद्दल पण निघाले नव्हते . ..फक्त भरपूर ब्राऊन शुगर पिणे झाले ..दारू मनसोक्त झाली .. मी दोन दोन दिवसांपासून घराकडे फिरकलो नव्हतो ते वेगळेच .पुन्हा अंबरनाथ ला गेलो ..या वेळी भांडवल कमी असल्याने १०० पुड्या आणल्या होत्या ..त्या अर्ध्या करून मागच्या सारखेच विक्री केली .. चार दिवसात पुन्हा माल संपला आता जवळ जेमतेम ८०० रुपये राहिलेले ..पुन्हा अंबरनाथ .. एकूण १० दिवसातच सगळे भांडवल संपले ..मध्ये दोन तीन वेळा घरी जावून आलो ..तयार कपड्यांचा धंदा सुरु केलाय त्यात खूप बिझी आहे ..नाशिकरोड ला मित्राकडेच राहतोय असे सांगून आईचे समाधान केले .. जवळ फक्त १० पुड्या उरलेल्या .. एकाने बातमी दिली की काल सकाळी पोलीस एका गर्दुल्ल्या जवळ आमची चौकशी करत होते ..म्हणजे कोणीतरी आम्ही बाऊन शुगर ची विक्री करतोय अशी टीप पोलिसांना दिली होती तर ..कोणत्याही भागात दारूचा अवैध धंदा ..ब्राऊन शुगर किवा गांजा वगैरे अमली पदार्थ विकी सुरु झाल्याची बातमी पोलिसांना जास्तीत जास्त आठ दिवसात कळते .....अर्थात कारवाई करायची किवा नाही ..वगैरे बाबतीत ..चाल ढकल होत रहाते ..कारवाई होणे हे तेथील पोलीस अधिकाऱ्याच्या प्रामाणिकते वर अवलंबून असते ..तसेच काही कायदेशीर अडचणी येवू शकतात .. आमच्या बाबतीत तर कारवाई लगेच होऊ शकत होती ..कारण पकडले गेले तर त्यांना द्यायला आमच्याकडे पैसे तर नव्हतेच आणि घरच्या लोकांचा पाठींबाही नव्हता ..पोलीस आमची चौकशी करत होते हे ऐकून आमची फाटलीच ... दिवसभर मित्राच्या घरातून बाहेर पडलोच नाही .. बरोबर २३ जानेवारी १९९१ जानेवारी ही तारीख होती ..संध्याकाळी नाशिकरोड च्या बस स्टँड वर खिश्यात जेमतेम चार पुड्या ..वीस पंचवीस रुपये उरले होते .. आता पुढे कसे असा आम्ही दोघे मित्र विचार करत असताना सिन्नर फाट्याला राहणारा आमचा गायकवाड नावाचा मित्र भेटला तो देखील आमच्या सारखाच ब्राऊन शुगर चा व्यसनी होता ...त्याची तब्येत चांगली झालेली दिसली .. आमच्या जवळ येवून बसला .. काय कसे काय चाललेय ? असे विचारल्यावर सांगू लागला की त्याला त्याच्या भावाने ' मुक्तांगण ' व्यसनमुक्ती केंद्र पुणे येथे दाखल केले होते ..तेथे तो ३५ दिवस राहून आला होता ..खूप छान वातावरण आहे .. तेथे खूप प्रेमळ आहेत सगळे .. खूप मजा आली वगैरे सांगू लागला .. ते ऐकून माझ्याही मनात ' मुक्तांगण ' ला जावे असे वाटू लागले .. आता बाहेर फिरण्यात धोका होता कारण पोलिसांना कोणीतरी गर्दुल्ल्याने आमचे दोघांचे वर्णन दिले होते ..पोलीस आपल्याला पकडतील ही भीती होतीच ... ' मुक्तांगण ' मध्ये मेंटल हॉस्पिटल प्रमाणेच त्यावेळी १८० रुपये लागत होते असे त्याने सांगितले .. माझ्या मनात ' मुक्तांगण ' ला जाण्याचा विचार जोर धरू लागला .....मित्राला तसे म्हंटले तर तो नकार देवू लागला .. शेवटी उरलेल्या चार पुड्यांपैकी दोन पुड्या मित्राला दिल्या ..दोन स्वतः ठेवल्या ..आणि घरी जायला निघालो ... जरा सावधगिरी बाळगत घरी पोचलो ... आईला सरळ सांगितले की माझे पिणे पुन्हा सुरु झालेय ..या वेळी मी मेंटल हॉस्पिटल येथे न जाता ' मुक्तांगण ' व्यसनमुक्ती केंद्र पुणे येथे जाणार आहे .. आई म्हणाली ते सगळे तू तुझ्या भावाला सांग ..मग भाऊ घरी आल्यावर ..त्याला तसे सांगितले .. आधी खूप चिडला ..तू आयुष्यात कधीच सुधारू शकणार नाहीस असे सुनावले .. शेवटी म्हणाला तिथे मला तुझ्यासोबत यावे लागेल पण आता मला इतक्यात सुटी नाहीय ..तेव्हा शनिवारी जावू आपण पुण्याला .. मला इतका धीर नव्हता ..शिवाय डोक्यावर पोलिसांची टांगती तलवार होतीच .. तिथे सोबत पालक नसले तरी घेतात असे खोटेच सांगितले भावाला ..मला तेव्हढा आत्मविश्वास होता की .मी ' मुक्तांगण ' च्या लोकांना पालक इतर कामात व्यस्त असल्यामुळे येवू शकले नाही असे सांगून .....पालकांच्या सोबतीशिवाय तेथे दाखल होऊ शकेन ...शिवाय भावाला सोबत न नेण्याचा अजून एक स्वार्थ होताच की भाऊ नेहमी मला जेव्हा मेंटल हॉस्पिटलला सोबत घेवून जात असे तेव्हा मला वाटेत अजिबात ब्राऊन शुगर पिऊ देत नव्हता ..त्याच्या सोबत जाताना टर्की सहन करत जावे लागे .. मी एकटा जाईन यावर भावाचा विश्वासच नव्हता .. काहीतरी खोटे सांगून आपल्याकडून पैसे काढण्याचा याचा डाव आहे अशीच त्याची समजूत होती ...तरी त्याला कसेतरी पटवले ..त्यावेळी नशिक-पुणे बसभाडे ४२ रुपये होते ... शेवटी तो उद्या जा ...देतो तुला पैसे असे म्हणाला तेव्हा हायसे वाटले . जवळच्या दोन पुड्या दुसऱ्या दिवशी सकाळीच संपवल्या .. सायंकाळी पूर्ण कफल्लक झालेलो होतो .. पुण्याला जाण्यापूर्वी एकदा माल घेण्याची इच्छा बाकी होतीच .. पण आता घरून पैसे मिळणे कठीण होते .. रात्री आठ वाजता भावाने मुक्तांगणला जाण्यासाठी भाड्याचे म्हणून १०० अधिक 'मुक्तांगण ' येथे भरायला १८० अधिक वीस रुपये वाटखर्च असे एकूण तीनशे रुपये हाती दिले .अर्थात मी पुण्याला जाईन की नाही याची त्याला खात्री नव्हती म्हणून ..तुला बस मध्ये बसवून द्यायला मी सोबत बसस्टँड वर येतो म्हणाला ..आता वांधे झाले माझे ..कारण मी थेट पुण्याला जाणारच नव्हतो .. येतानाच्या भाड्याचे जे पैसे मिळाले होते त्यातून आधी मी नाशिक मध्येच ब्राऊन शुगर घ्यायचे ठरवले होते .. आता भाऊ सोबत बसमध्ये बसवून द्यायला येतोय म्हंटल्यावर ..मला जाताना शेवटचे पिणे जमणे कठीणच होते ...मग मनात कल्पना आली की एकदा बस सुरु होऊन भाऊ मागे राहिला की बसमधून परत खाली उतरून जायचे .. माल वगैरे पिवून झाला की दुसऱ्या बसणे पुढे जायचे ..छान आयडिया होती .. सी .बी .एस च्या स्थानकावर भावाच्या सोबत स्कुटर वरून पोचलो सोबत एका पिशवीत एक जोडी कपडे ..टॉवेल ..टूथ ब्रश पेस्ट..वगैरे घेतले होते ...नाशीक - पुणे बस लागतातच त्यात चढलो जरा गर्दीच होती बसला .. भाऊ खाली उभा राहून खिडकीतून माझ्याकडे पाहत म्हणाला ---आधी तू तिकीट काढ बसचे ..कंडक्टर जवळ जावून भावाला ऐकू जाईल असे मोठ्याने शिवाजीनगर असे ओरडलो ..आणि पन्नासची नोट कंडक्टर ला दिली ..त्याने तिकीट देवून ...वरचे आठ रुपये मला परत केलेले भावाने खाली उभे राहून नीट पहिले ..मग त्याचे समाधान झाले ..आता हा खरेच पुण्याला जाणार याची खात्री झाली त्याची ...मग तो स्कुटर स्टार्ट करून जायला निघाला ... बसही सुरु झाली .. बस स्टँड च्या बाहेर पडून ..शालीमार कडे जायला निघाली तसे मी एकदम कंडक्टर जवळ जावून बारीक चेहरा करून म्हणालो ' साहेब मी पुण्याला नोकरीच्या मुलाखती साठी निघालोय ..मात्र आता माझ्या लक्ष्यात आले की एक महत्वाचे प्रमाणपत्र घरीच राहिले आहे ..तेव्हा कृपया माझे तिकीट कँन्सल करून मला माझे पैसे परत त्या ..माझा मुद्दा कंडक्टरला पटला ..मात्र असे तिकीट कँन्सल करता येत नाही ..त्या ऐवजी तू दुसऱ्या कोणला तरी बसमध्ये हे तिकीट दे असे तो म्हणाला .. आमचे बोलणे ऐकत असेलला एक जण शिवाजीनगर लाच निघाला होता .. त्याने अजून तिकीट काढलेले नव्हते ..त्याने पटकन मला ४२ रुपये देवून माझ्याकडील तिकीट घेतले ..कंडक्टर ने बेल मारून गाडी थांबवली ..मी खाली उतरलो . भाऊ केव्हाच दृष्टीआड झाला होता .मी मागे वळून मालेगाव स्टँड कडे निघालो ..शेवटचा माल प्यायला !
===========================================================================================
भाग १४९ वा ' आनंद वार्ड '
मालेगाव स्टँड भागात ब्राऊन शुगरच्या अड्ड्यावर पाहतो तर खूप गर्दुल्ले जमलेले होते ..म्हणजे बहुतेक मालाचे वांधे असणार .. तसेच झाले होते .. तेथे माल विकणारा अजून मुंबईहून माल घेवून परत यायचा होता ..तो रात्रीच्या पंचवटी एक्सप्रेस ने येईल या अंदाजाने गर्दुल्ले त्याची वाट पाहत थांबले होते .. मी तेथे न थांबता भद्रकाली भागात आलो ..एका ठिकाणी माल मिळत होता ..पण जास्त भाव सुरु होता ..तुटवडा असला की भाव वाढतातच ... शेवटी मी १०० रु . ला एक पुडी घेतली . ती पुडी आडोश्याला बसून ओढली .. पण समाधान होईना दोन दिवसांपूर्वी माझ्या खिश्यात भरपूर माल होता आणि आज मीच माल शोधात फिरत होतो ....वक्त बदलते देर नाही लगती ...मग परत एक पुडी घेतली ..म्हणजे आता माझ्याकडे फक्त १०० रु . शिल्लक होते ..' मुक्तांगण ' मध्ये भरायचे पैसे देखील मी उडवून टाकले होते ..का कोण जाणे मला तेथे आपण पैसे न भरता कसेही हातापाया पाडून दाखल होऊ शकू असे वाटत होते .. सगळे धंदे उरकून रात्री १० वाजता एकदाचा शिवाजीनगर च्या बस मध्ये बसलो ..तिकीट काढून झाल्यावर आता फक्त ५८ रुपये खिश्यात शिल्लक होते ... पहाटे साडेतीनच्या सुमारास शिवाजीनगर बसस्थानकात बस शिरली .. इतक्या पहाटे कुठे जाणार ? ... तेथे स्थानकातच वर्तमानपत्र टाकून त्यावर पडून राहिलो ... २५ जाने.१९९१ ही तारीख होती ... नाशिकच्या तुलनेत चांगलीच थंडी होती पुण्यात ... कुडकुडत होतो खूप .. नशा उतरली तशी टर्की देखील सुरु झाली ....चहा घेवू म्हणून स्थानकाच्या बाहेर आलो ..यापूर्वी एकदा भावाच्या इंजिनियरिंग कॉलेजच्या अँडमिशनच्या वेळी वडील आणि भावासोबत पुण्यात आलो होतो व नंतर एकदा भाऊ इंजिनियरिंग कॉलेजला शिकत असताना त्याला भेटायला म्हणून ...पुण्याची फारशी माहिती नव्हतीच फक्त शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ असलेले रेल्वेचे हॉस्टेल ..आणि इंजिनियरिंग कॉलेज हीच दोन ठिकाणे माहित होती .....शिवाजीनगर बस स्थानकासमोरच चहाची दुकाने ..पान टपऱ्या वगैरे होत्या .. चहाच्या टपऱ्या .. हॉटेल्स .. पानपट्ट्या येथे मोठ्या आवाजात टेपवर गाणी वाजवली जात होती ...भजने ..मराठी भक्तिगीते ..हिंदी फिल्मिगीते असा एकत्र गोंधळ सुरु होता ...एका ठिकाणी चहा घेतला .. मग सगळ्या घटनांचा विचार करू लागलो .. पुण्यात आलो होतो खरा .. पण काल रात्री नशेत पैसे उडवले .. आता खिश्यात जेमतेम ४० रुपये उरलेले .. टर्की देखील सुरु झालेली होती ... ' मुक्तांगण ' ला जावे की नाही असा संभ्रम निर्माण झाला मनात ... काल घेतलेले सगळे निर्णय चूक वाटू लागले .. व्यसनी व्यक्ती चंचल असल्याने सारखे निर्णय ..तसेच मानसिक अवस्था बदलत असते ...एका बाकावर विमनस्क बसून राहिलो ... नेमके काय करावे ते समजेना .. जरा सावधपणे चौकशी केली तर समजले की शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या मागील भागात ' वाकडेवाडी ' नावाची वस्ती आहे ..तेथे ब्राऊन शुगर मिळू शकत होती ... उठून सरळ वाकडेवाडी भागात गेलो ..मात्र तेथे काही ब्राऊन शुगर मिळेना .. पुन्हा परत बसस्थानकावर आलो .. मुंबई की ' मुक्तांगण ' घोळ मनात सुरूच होता .. होणाऱ्या टर्की मुळे मुंबई ला जावेसे वाटत होते .. तर चांगल्या जिवनाच्या ओढीने ' मुक्तांगण ' ला ... !तितक्यात योगायोग म्हणा की चत्मकार म्हणा ... एका पानटपरीवर चक्क मराठी गाणे वाजू लागले ..मोठ्याने ...' या जन्मावर ..या जगण्यावर ..शतदा प्रेम करावे ' त्या अवस्थेत ते गाणे जणू माझ्यासाठी संजीवनी होते ... लगेच उठून त्या पानटपरी वर जावून सिगरेट घेतली .. तन्मय होऊन गाणे ऐकू लागलो ...या गाण्यामुळे अनघाच्या स्मृती जागृत झाल्या .. तिच्या मांडीवर डोके ठेवून सहन केलेली टर्की ... तिचे निरागस निस्सीम प्रेम .. मला वारंवार जगण्याचे बळ देणारे तिचे शब्द .. सारे सारे आठवले .. अनघा आज जगात भले कुठेही असेल तरी आपण व्यसनमुक्त राहावे म्हणून नक्कीच ती प्रार्थना करत असणार असे वाटू लागले .. हळू हळू ' मुक्तांगण ' चा निर्णय पक्का होत गेला .. इतर सगळे विचार झटकून फक्त ' या जन्मावर ' हाच विचार पक्का झाला ..एव्हाना उजाडले होते .. मुक्तांगण चा सविस्तर पत्ता माहित नव्हता ..फक्त येरवडा मेंटल हॉस्पिटल इतकेच माहिती होते .. येरवडा ला जाणाऱ्या बसची चौकशी केली..एकाने कार्पोरेशनच्या स्टँड वरून बस मिळेल येरवड्यासाठी असे सांगितले ..तर एकाने इतक्या दूर जाण्यापेक्षा इंजिनियरिंग कॉलेजच्या बसस्टॉप वर जायला सांगितले ...शेवटी कार्पोरेशन च्या स्थानकावर जावून विश्रांतवाडीची बस पकडली ..वाटेत येरवडा मेंटल हॉस्पिटलच्या स्टॉपवर उतरलो ..समोरच मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची पाटी होती ..एक छोटा रस्ता सरळ आत मेंटल हॉस्पिटलच्या गेट पर्यंत जात होता .. सावकाश चालत पोचलो एकदाचा मेंटल हॉस्पिटल मध्ये ... सकाळचे आठ वाजत आले होते .. मेंटल हॉस्पिटल च्या गेट वरील अटेंडंट नी मला हटकले .. त्यांना मुक्तांगण ला जायचे आहे असे सांगितले ...त्यांनी समोर एका इमारतीकडे बोट दाखवले ... मी त्या एकमजली इमारतीजवळ पोचलो बाहेर उन्हात बरेच जण बसलेले दिसले .. त्यांच्यावर एकजण देखरेख करत होता .. सगळे माझ्याकडे कुतूहलाने पाहत होते ...माझ्या अवतारावरून मी उपचार घेण्यासाठी आलोय हे उघड होते ..एकदोघांनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तसे त्यांच्या सोबतच्या लक्ष ठेवणाऱ्या माणसाने त्यांना हटकले .. व त्याने माझी चौकशी सुरु केली ..मी डॉ. अनिता अवचट यांना भेटायचे आहे असे सांगतच ..म्हणला 'मँडम १० बजेतक आयेगी ' आपको इंतजार करना पडेगा ... बाजूला उन्हात बिड्या फुकत बसून राहिलो ..टर्की होतच होती .. पण आता निर्धार पक्का होता ..कोणत्याही परिस्थितीत ' मुक्तांगण 'ला दाखल होण्याचा .. जरा वेळाने बाहेर उन्हात बसलेली सर्व मंडळी आत निघून गेली ..मी एकटाच उरलो होतो .
पावणेदहाच्या सुमारास एक मारुती जिप्सी इमारतीजवळ येवून थांबली त्यातून गुलाबी रंगाचा खादीचा कुर्ता घातलेली एक महिला उतरली .. वय साघारण पन्नास असावे ..केस मानेपर्यंत कापलेले .. माध्यम उंची .. चालण्यात प्रचंड आत्मविश्वास आजूबाजूला कुठेच न पाहता ती महिला सरळ पोर्च मधून इमारतीच्या आत शिरली ..मी पण पटकन मागोमाग आत शिरलो .. त्यांनी माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिल्यावर ..मला 'डॉ. अनिता अवचट यांना भेटायचे आहे असे म्हणालो ..तर हसून मीच आहे म्हणाल्या ..मी लगेच त्यांच्या पाया पडलो तश्या मागे सरकल्या ..अरे अरे राहुदे असे पुटपुटल्या .. मग मोठ्याने काय काम आहे माझ्याकडे असे म्हणाल्या ...मी एक ब्राऊन शुगरचा व्यसनी आहे ..नाशिकला राहतो ..व्यसनाला खूप कंटाळलोय वगैरे माहिती सांगू लागलो .. शांतपणे सगळे ऐकून मग म्हणाल्या ..तू अर्धवट माहिती घेवून आला आहेस .. इथे ' मुक्तांगण ' मध्ये डायरेक्ट दाखल होता येत नाही ..आधी तुला समोरच्या मेंटल हॉस्पिटलच्या कार्यालयात जावून तेथे रीतसर फॉर्म भरून .. मेंटल हॉस्पिटल च्या ' आनंद ' वार्ड मध्ये दाखल व्हावे लागेल ..नंतर मग साधारण पंधरा दिवसांनी तुला मी तेथे भेटीन आणि तुझी बदली त्या वार्डातून ' मुक्तांगण ' ला करून घेईन ..अतिशय ठाम शब्दात त्यांनी माहिती दिली .. ही माहिती मला नवीन होती ..माझ्या मित्राने मला ही माहिती सांगितलीच नव्हती .. माझा विरस झाला ..तितक्यात आठवले की मी पुण्यात मुक्तांगणला जातो म्हंटल्यावर आईने तेथील डॉ. अनिता अवचट तुझ्या चुलत बहिणीच्या मिस्टरांच्या नात्यात लागतात असे सांगितले होते .. मी त्यांना चुलत बहिणीचे आडनाव सांगून तिच्या मिस्टरांची ओळख सांगितली ..क्षणभर त्यांनी आठवल्यासारखे केले मग हसत म्हणाल्या ..हो बरोबर आहे ..पण इथे नियम पाळावे लागतात .. तुला आधी रीतसर मेंटल हॉस्पिटलला दाखल व्हावेच लागेल ...शिवाय तुझ्या सोबत कोणी तरी नातलग असणे पण गरजेचे आहे ..मग माझ्या खांद्यावर हात ठेवून प्रेमळपणे म्हणाल्या ..जा समोरच्या मेंटल हॉस्पिटलच्या कार्यालयात ..सगळी प्रोसिजर पूर्ण कर ..नंतर आपण भेटूच .. आणि आत वरच्या मजल्याकडे जाणारा जीना चढू लागल्या ..मी जरा हताश झालो होतो ..इतकी गयावया करून ..ओळख सांगूनही ..आधी नियमाकडे बोट दाखवले गेले होते ...त्यावरून डॉ . अनिता अवचट या नक्कीच तत्वांना महत्व देणाऱ्या वाटल्या .. सगळे अधिकारी ..नेते .. असे नियम पाळतील तर नक्कीच देशाच्या अर्ध्या समस्या तरी नष्ट होतील ....एकंदरीत त्यांची माझ्या मनावर कडक ..नियमपालन करणाऱ्या ..प्रसंगी कठोर निर्णय घेणाऱ्या ..मात्र डोळ्यात करुणा आणि माणुसकी अशी छाप पडली .
बाहेर येवून समोरच्या मेंटल हॉस्पिटलच्या कार्यालयात शिरलो तेथे दाखल होण्यासंबंधी चौकशी केली ..टर्की वाढत चालली होती .. तरी कसेतरी स्वतःला ढकलत होतो ..दाखल होण्यासाठी १८० रुपये आधी भरावे लागतील ..मग फॉर्मवर नातलगाची सही लागेल असे समजले .. माझ्या खिश्यात फक्त ५ रुपये उरले होते .. नातलग तर बरोबर नव्हतेच ..मी अजिबात नियमात बसत नव्हतो .. हताश झालो खूप .. पण जिद्द सोडली नाही ..समोर मेंटल हॉस्पिटलच्या सोशलवर्कर ची केबिन दिसली .. ..त्यावर इंगळे अशी पाटी होती ..आधीचे नाव आता आठवत नाही फक्त आडनाव लक्षात आहे .. मी विचारणा करून आत शिरलो .. आत एक साधारण तिशीच्या महिला बसल्या होत्या .. त्यांना माझी सर्व माहिती सांगितली ..आताही मी खूप टर्कीत आहे हे सांगितले ..पण आज कसेही करून मला दाखल व्हायचे आहे ..नाहीतर आत्महत्या करण्यावाचून माझ्याकडे पर्याय नाही हे सांगितले .. सगळे नीट ऐकत होत्या इंगळे मँडम ..मध्ये मध्ये अरेरे ..अशा अर्थाने मान डोलावून मला सहानुभूती दर्शवित होत्या ..माझे बोलणे संपल्यावर म्हणाल्या ..तर तुझ्याकडे पैसे आणि नातलग देखील नाहीत .. अरे तुला उपचार खर्चात सवलत मिळवून देण्यासाठी मी अधीक्षक साहेबाना विनंती करते ..पण नातलग मात्र हवेच .. कारण हे सरकारी हॉस्पिटल आहे .. तुझी जवाबदारी कोणीतरी घेतलीच पाहिजे .. अधीक्षक डॉ . केळकर आहेत असे समजले तसा माझा आत्मविश्वास वाढला .. हे डॉ. केळकर माझ्या ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटल च्या पहिल्या अँडमिशन च्या वेळी तेथे होते हे माझ्या लक्षात होतेच .. इंगळे मँडम सोबत मी डॉ. केळकर यांच्या केबिन मध्ये गेलो .. सरांना मँडम नी माझी माहिती सांगितली ... आणि शेवटी माझे नाव सांगताच ते जरा चमकले .. म्हणाले ' अरे तू या पूर्वी मला भेटला आहेस ना .. ठाण्याला असताना ? मी होकारार्थी मान हलविली .. तर म्हणाले ..म्हणजे अजून सुधारलाच नाहीस की काय तू ? खेदाने मान हलविली त्यांनी .. पुढे म्हणाले ..चल तुला उपचार खर्चात सवलत देतो मी .. पण नातलग तर हवेतच ..मी पुन्हा हिरमुसलो .. लगेच हसून म्हणाले ..अरे तू इतका हुशार आहेस ..ब्राऊन शुगर बरोबर मिळवितोस कसेही करून ..एखादा नातलग पण मिळव इथे .. त्याच्या बोलण्यातील गर्भिर्तार्थ माझ्या ध्यानात आला ..म्हणजे तू कुणीही माणूस नातलग म्हणून सही करण्यासाठी घेवून ये असे ते सुचवीत होते ... मी समजले अश्या अर्थाने मान हलविली तर मिस्कील हसले .. त्यांनी माझ्या हातात एक फॉर्म सही करून दिला .. म्हणालो जा एका नातलगाला घेवून खाली भोसले बसले आहेत त्यांच्याकडे नातलगाची सही घेवून फॉर्म दे तुझे काम होईल .. मी पटकन खाली रस्त्यावर आलो .. मेंटल हॉस्पिटलचे कर्मचारी ..तसेच उपचारांकरिता येणारे पेशंट नातलग ..अशी वर्दळ रस्त्यावर सुरु होती ..जरा सभ्य दिसणाऱ्या एकदोघांना मी हटकले व थोडक्यात माझी अडचण सांगून तात्पुरते माझे नातलग म्हणून माझ्यासोबत चला अशी विनंती केली .. ते घाबरले व नकार दिला .. शेवटी एक लुकडा ..सावळा.. पण तरतरीत असा विशीचा मुलगा सायकलवरून येताना दिसला त्याला अडवले व माझी अडचण सांगितली .. तो म्हणाला मी येथेच प्रायव्हेट अटेंडंट म्हणून काम करतो .. त्याचे नाव सिद्धार्थ होते .. जरा वेळ विचार करून मग म्हणाला चल मी करतो तुझा नातलग म्हणून सही .. मला खूप आनंद झाला .. सिद्धार्थ सोबत आत भोसले या कर्मचार्याच्या खिडकी जवळ गेलो फॉर्म आत सरकाविला... भोसले यांनी फॉर्म पाहून मग नातलागाची सही म्हणाले ...तसा सिद्धार्थ पुढे झाला भोसले सिद्धार्थ ला ओळखत होते ..ते म्हणाले ' सिद्धू ..कायरे कोण आहे हे तुझे .. यावर सिद्धू ने मामेभाऊ असे उतर दिले ..सही केली .. एकदाची माझी तेथे अँडमिशन झाली पैसे आणि नातलग नसतानाही सगळे जुळून आले होते ... एका अटेंडंट सोबत मी ' आनंद वार्ड ' अशी पाटी असलेल्या एका वार्डात शिरलो .. दुपारचे चार वाजत आले होते ..सकाळपासून टर्की असताना मी नेटाने पुढे जात राहिलो होतो .
( बाकी पुढील भागात ... ' मुक्तांगण ' आता स्वतच्या स्वतंत्र जागेत आहे मात्र पूर्वी ते मेंटल हॉस्पिटलच्या आवारात होते )
=================================================================================
भाग १५० वा येरवडा मेंटल हॉस्पिटल !
महाराष्ट्रातील चार सरकारी मनोरुग्णालयांपैकी सगळ्यात मोठे मनोरुग्णालय म्हणून येरवडा मेंटल हॉस्पिटलचा नंबर लागतो ..त्या नंतर ठाणे ..नागपूर ..रत्नागिरी असा क्रम आहे .. ' मुक्तांगण ' ची इमारत या रुग्णालयाच्या आवारात तर होतीच पण मुक्तांगण मध्ये दाखल होण्यासाठी देखील मनोरुग्णालयाचाच फॉर्म भरावा लागे .. ' मुक्तांगण ' हा जरी स्वतंत्र ट्रस्ट म्हणून काम करत असला तरी ' मुक्तांगण ' ची सुरवात ..मनोरुग्णालयाच्या मदतीनेच झाली होती ... गोष्ट मुक्तांगणांची ' या डॉ. अनिल अवचट यांनी लिहिलेल्या नवीन पुस्तकात ..मुक्तांगण च्या स्थापनेची सविस्तर माहिती दिलीच आहे ....फॉर्म भरल्यावर एकदम ' मुक्तांगण ' मध्ये नेण्याऐवजी आधी 'आनंद वार्ड 'मध्ये ठेवण्याचे कारण असे होते की .. उपचारांसाठी भरती होणाऱ्या ब्राऊन शुगरच्या पेशंट्सना खूप टर्की होत असे ..सुमारे आठ दहा दिवस होणारा प्रचंड त्रास .. त्यावेळी असणारी त्यांची घातक मनस्थिती .. ... टर्की सुरु झाल्यावरची शारीरिक तडफड ...असे पेशंट पळून जाण्याचा प्रयत्न करतात ..किवा होणाऱ्या प्रचंड त्रासामुळे बैचेन होऊन काहीही ..आत्मघात करू शकतात ..अश्या वेळी मुक्तांगणचे नवीन तयार होत असलेले कार्यकर्ते त्यांची नीट काळजी घेण्यापुरते सक्षम नव्हते त्या वेळी ..तसेच मुक्तांगण मध्ये मुख्यतः मानसिक उपचार म्हणजे व्यक्तिगत समुपदेशन ...समूह उपचार ..योग्याभ्यास अशी उपचार पद्धती विकसित होत असल्याने ..अश्या टर्कीत असलेल्या रुग्णांकडून त्याने स्वतःला आणि इतरानाही त्रास होऊ नये या साठी ही काळजी घेतली जात असे ...मुक्तांगणची सुरवातच खास ब्राऊन शुगरच्या व्यसनींना योग्य पद्धतीने मानसोपचार देणारे व्यसनमुक्ती केंद्र या संकल्पनेतून झाली असल्याने ..त्या काळी मुंबई ..पुणे ..नाशिक या भागातील ब्राऊन शुगर चे व्यसनी मोठ्या प्रमाणात तेथे उपचारांसाठी दाखल होत होते ..' आनंद वार्ड ' मध्ये राहून काही दिवस टर्की काढली की मग आठवड्यातून दोन दिवस डॉ. अनिता अवचट या आनंद वार्ड मध्ये राउंड घेवून ..ज्यांना साधारणतः आनंद्वार्ड मध्ये राहून १० दिवस उपटून गेले आहेत व टर्की संपली आहे अश्या व्यसनींना तपासून त्यांच्याशी बोलून मग त्यांची बदली ' मुक्तांगण ' मध्ये करत असत . मी ' आनंद वार्ड ' मध्ये पाउल टाकताच तेथे आधीपासूनच असलेल्या गर्दुल्ल्यांना बातमी समजली की कोणीतरी नवीन गर्दुल्ला आला आहे .. माझ्या सोबतच्या अटेंडंटने मला एका खोलीपाशी नेवून आधी माझी संपूर्ण झडती घेतली ..माझ्या कडे ब्राऊन शुगर ..अथवा इतर काही व्यसनाचे पदार्थ लपवून आणलेले नाहीत अशी खात्री झाल्यावर त्याने .. एका १० बाय १५ च्या खोलीजवळ मला सोडले ..' आनंद वार्ड ची रचना छान मोकळी आणि हवेशीर होती .. चारीही बाजूंनी छोट्या छोट्या खोल्या ..प्रत्येक कोपऱ्यात चार चार संडास बाथरूम .. मध्ये मोठे पटांगण ..खोल्यांच्या समोर मोठा व्हरांडा .. तेथे वेगवेगळ्या मानसिक आजारांचे... जरा बरे असलेले किवां..फारसे त्रासदायक नसलेले मनोरुग्ण ठेवले जात असत .. मला त्या अटेंडंटने ज्या खोलीपाशी सोडले ती खोली खास गर्दुल्ल्यांसाठी राखीव होती ..त्या खोलीत टी.व्ही .होता म्हणून तीला टी.व्ही रूम म्हणत असत .. तेथे दाखल झालेले गर्दुल्ले दिवसभर समोरच्या पटांगणात ..किवा इतर खोल्यांमध्ये टाईम पास करत असत मात्र रात्री सर्वाना आठवणीने या टी .व्ही .रूम मध्ये गोळा केले जाई ..तेथेच त्यांनी एकत्र झोपावे असा दंडक होता कारण सर्व गर्दुल्ल्यांवर नीट लक्ष ठेवण्यासाठी ते सगळे एकत्र असणे आवश्यक होते . मी त्या खोलीजवळ जाताच दोन तीन गर्दुल्ल्यानी मला घेरा घेतला ...आधी मी कुठे माल तर लपवून आणलेला नाही याची त्यांनी चाचपणी केली .. मी नाशिकचा आहे समजल्यावर तेथे दोन तीन वेळा आलेल्या जुन्या गर्दुल्ल्यानी ..याला ओळखतोस का ? त्याला ओळखतोस का वगैरे नाशिकच्या येथे पूर्वी येवून गेलेल्या गर्दुल्ल्याची चौकशी केली .. मला कोणाशीही काहीही बोलण्याची इच्छा नव्हती ..सकाळपासून टर्कीत धावपळ केल्याने खूप थकवा आला होता ..शिवाय टर्की होतीच ...त्या वेळी आनंद्वार्ड मध्ये मुक्तांगणला बदली होऊन जाण्याच्या प्रतीक्षेत असलेले सुमारे १५ गर्दुल्ले होते .. काही एकदोन दिवसात आपली मुक्तांगण मध्ये बदली होणार म्हणून आनंदात होते ..तर माझ्यासारखे नवीन येथे अजून १० -१२ दिवस राहावे लागेल या विवंचनेत ... डॉ . अनिता अवचट यांचा उल्लेख सगळे जण ' मँडम ' असा करीत असत ...एकदोन तासातच माझी बहुधा सर्वांशी ओळख झाली ..गिरीश ..इरफान .. राजू .. असलम ..वगैरे .. सगळ्यांची जेवणे सरकारी हॉस्पिटलच्या नियमाप्रमाणे सायंकाळी पाच लाच उरकली होती .. सात वाजता सर्वांची गिनती झाल्यावर दोन तीन अटेंडंटनी मिळून सगळे गर्दुल्ले झाडून झटकून शोधून टी .व्ही .रुम मध्ये एकत्र केले .. आता या रूम मधून फक्त लघवी..संडास या नैसर्गिक कामासाठीच बाहेर पडता येणार होते ...बाहेरून रूमचे दर बंद करून ..रुमच्या समोरच ते अटेंडंट बाहेरच्या पटांगणात खुर्च्या टाकून बसून राहिले .. त्यांनी पाळलेली दोन मोठी गावठी कुत्री देखील होती त्यांच्या सोबत ..ही कुत्री देखील खास पळून जाणाऱ्या गर्दुल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठीच होती .
टी.व्ही रूम मध्ये एकत्र आल्यावर सगळ्या गर्दुल्ल्यांच्या मनमोकळ्या गप्पा सुरु झाल्या .. त्यापैकी तीन चार जण पूर्वी ' मुक्तांगण ' मध्ये होते मात्र बाहेर गेल्यावर काही दिवसातच त्यांचे परत पिणे सुरु झाले म्हणून ते पुन्हा उपचार घेण्यासाठी आले होते ..बहुधा सगळ्या गप्पा ...कुठे ब्राऊन शुगर चांगली मिळते ..कोठे महाग आहे .. बाहेर कोणी कोणी काय काय लोचे केले ...अश्याच स्वरूपाच्या होत्या ... मी टर्कीत असल्याने मला कोणाशीही बोलण्याची इच्छा उरली नव्हती ..ते सगळे हे जाणून होते व माझ्या टर्की बाबत मला सहानुभूती देखील देत होते ...एकाने मला स्पष्ट सांगितले ' कितनाभी टर्की हुवा तो भी ..हवालदार हो बताना नही..वो लोग तुम्हे ' सिक वार्ड ' भेज देंगे ..वहाँ का माहोल बहोत खतरनाक होता है " ' सिक वार्ड ' म्हणजे ठाण्याला होता तसा आजारी ..अपंग .. असहाय अश्या लोकांचा वार्ड होता तसलाच .. मी पूर्वीच ठाण्याला असताना जेवणातून विषबाधा झाली असतानाअशा प्रकारच्या वार्डचा अनुभव घेतला होता .. तसा अनुभव घेण्याची पुन्हा घेण्याची माझीही इच्छा नव्हती ..११ वाजता एका अटेंडंट ने आम्हाला टी.व्ही .बंद करण्याची सूचना दिली .. मग टीव्ही बंद झाल्यावर सगळे एका मोठ्या सतरंजीवर पडून झोपेची आराधना करू लागले .. अर्थात सगळे नुकतेच टर्की तून बाहेर पडणारे होते त्यामुळे झोप अशी कोणालाच येत नव्हती . इकडच्या तिकडच्या ..गप्पा ..हास्य विनोद सुरु होते ..गर्दुल्ला म्हणजे एक नंबर बेरकी असतो .. ब्राऊन शुगर मिळवण्यासाठी ..पैसे जमवण्यासाठी त्याला बुद्धीचा वापर करताना हे बेरकीपण आपोआप मिळते .. सगळ्यांचे बोलीबचन एकदम हार्ड असते .. आणि गप्पांचे विषय देखील मनोरंजक .. ज्यांना आनंदवार्ड मध्ये १० दिवस होऊन गेले ते साधारणतः २ वाजेपर्यंत झोपी गेले ..मी आणि अजून तीनचार जण जागेच होतो . .. थंडी म्हणून आम्ही मेंटलची जाडे कांबळी अंगावर पांघरून बसलो रात्रभर गप्पा मारत .. बिड्यांचा तुटवडा येथेही होता म्हणून मग एक बिडी तीनचार जण मिळून पीत होतो ...मला रात्री तीन चार वेळा जुलाबांसाठी जावे लागले तेव्हा ..आधी आतून दार वाजवावे लागले ..किंवा मग खिडकीतून कोणी आहे का ? असा आवाज दिल्यावर कोणीतरी अटेंडंट येई ..त्रासून दार उघडे .. घाबरत घाबरत त्याला संडास असे सांगितले ..की तो चल मोत्या असा आवाज त्या काळ्या कुत्र्याला देई ..मग मी पुढे ..माझ्या मागे तो अटेंडंट आणि त्याच्या मागे शेपटी हलवत मोत्या ..अशी वरात कोपऱ्यातील संडासपर्यंत निघे . सगळा गमतीदार प्रकार होता .
( बाकी पुढील भागात )