सध्या मी सुरु केलेल्या . " मला समजलेला किवा न समजलेला देव .. अल्लाह.. गॉड वगैरे " या लेखमालेतील माझ्या अनुभवांबद्दल काही लोकांच्या मनात खरोखरच असे घडू शकते का ? की हे केवळ तरुणांचे प्रबोधन करण्यासाठी एक कथा सूत्र निवडले गेला आहे ? असा प्रश्न उदभवू शकतो कारण आपले स्वतःचे अनुभव इतक्या उघडपणे मांडण्याची सहसा कोणी हिम्मत करत नाही.
'मान सांगावा जनात, आणि अपमान सांगावा मनात' अशीच जनरीत असते .. त्याच्या विरुद्ध हे आहे , तसेच मी जे शब्दबद्ध करत आहे त्यातील घटना पात्रे काही ठिकाणी मी त्यांच्या खऱ्या नावासहीत वर्णिली आहेत तर ज्या लोकांना त्यांच्या भूतकाळातील अश्या उल्लेखाने त्रास होऊ शकतो अश्या लोकांची नावे मी बदलून लिहीत आहे . या लेखमालेतील माझ्या बाबतची प्रत्येक घटना खरी आहे व त्याची कोणाला पडताळणी करुन घ्यायची झाल्यास आपण त्याबाबत संबंधित ठिकाणी माझ्याकाळच्या लोकांकडे चौकशी करू शकता .
========================================================================
मी दारू , गांजा , चरस , भांग , अफू , ताडी आणि शेवटी ब्राऊन शुगर अशी व्यसने केली आहेत व या व्यसनांमुळे.. व्यसनी व्यक्तीचे कसे अधःपतन होते याचे वर्णन करण्याचा हेतू आहे , या अधःपतनाच्या अनुभवातून तसेच माझ्या सहवासात येऊन मला वेगवेगळ्या प्रकारे शिकवण देणाऱ्या सर्व हितचिंतकांच्या कडून मी... माझी आज जीवनाप्रती असलेली श्रद्धा मिळवली आहे व त्यातूनच लहानपणी पडणाऱ्या अनेक प्रश्नांची मला उत्तरे मिळत गेली तसे जिवन अधिक सोपे आणि सुकर झाले आहे . वर उल्लेख केलेल्या प्रत्येक मादक पदार्थाचे दुष्परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने शरीर, मनावर आणि मेंदूवर व व्यक्तिगत आणि कौटुंबिक , आर्थिक , सामाजिक आणि नैतिक पातळीवर वेगवेगळ्या प्रकारे होतात त्यामुळे हे व्यसन जरा बरे ..ते व्यसन खूप वाईट असा काही फरक कोणी करु नये.. शेवटी सगळ्या व्यसनांच्या गाडीची तीन शेवटची स्टेशने असतात
१) अकाली मृत्यू - लिव्हर , किडनी ,व शरीरातील इतर महत्वाचे अवयव निकामी झाल्याने मृत्यू , व्यसनामुळे निर्माण झालेल्या वैफल्याच्या भरात अथवा निर्माण झालेल्या समस्यांमुळे आत्महत्या , नशेत वाहन चालवविल्याने अपघाती मृत्यू .
२) ठार वेडेपण - सर्व प्रकारची व्यसने मेंदूवर अतिशय गंभीर परिणाम करीत असल्याने मेंदूच्या पेशींना नुकसान होऊन विचार , भावना यांच्यावरील मेंदूचे नियंत्रण सुटणे , मेंदूच्या कार्यातील सुसंगती संपुष्टात येऊन वर्तनात बद्दल होणे , कानात आवाज येणे , कोणीतरी मारायला येतेय अश्या प्रकारचे भास होणे , व शेवटी ठार वेडेपणाकडे वाटचाल . अशी अनेक उदाहरणे मी पहिली आहेत त्या बद्दल लेखमालेत लिहिणारच आहे .
३) कारावास - नशेच्या भरात राग आल्याने व्यसनी व्यक्तीच्या एखादा गंभीर गुन्हा घडणे , एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूस कारण बनणे , किवा नशे साठी पैसे मिळवण्यासाठी एखादा गंभीर गुन्हा ..अपघात होऊन ...दीर्घ किवा अल्प काळ कारावास भोगणे . म्हणजे एकंदरीत सगळीच व्यसने सारखीच नुकसान पोहोचवू शकतात फक्त काही फास्ट गाड्या आहेत तर काही स्लो गाड्या आहेत मात्र पोचवितात उधवस्ततेकडेच , तेव्हा कृपया दारू जरा बरी इतर ड्रग्ज अधिक वाईट असा फरक करू नये , व आपण जर या पैकी एखाद्या व्यसनाच्या गाडीत प्रवास करीत असाल तर ताबडतोब खाली उतरून जावे ही नम्र विनंती . आणि ज्या वाचक मित्रांना अश्या व्यसनांबाबत मनात कुतूहल असेल त्यांनी हे कुतूहल कृतीत न आणता माझ्या अनुभवातून धडा घ्यावा !
मी थोडी घेतो ... क्वचित घेतो .. माझा कंट्रोल आहे ... शिवीगाळ करत नाही .. हिंसक होत नाही किवा सगळ्या जवाबदा-या सांभाळून पितो .. घरात काही कमी नाही .. अशी समर्थने मी सुरवातीपासून देत गेलो आणि आता लक्षात आले की मी स्वतःलाच फसवत होतो आमच्या कडे एक घोषवाक्य आहे ' थोडी थोडी घेत गेला , बघता बघता बेवडा झाला ' त्यामुळे व्यसनांपासून चार हात लांब राहणेच अधिक योग्य ही खुणगाठ मनाशी बांधावी .
पुढे मला मेंटल हॉस्पिटल .. फुटपाथ .. व्यसनमुक्ती केंद्र....सेंट्रल जेल असा प्रवास करावा लागला आहे व केवळ सर्वोच्च शक्तीची कृपा , आई वडील , भावंडे , इतर नातलग आणि स्नेही .व्यसनमुक्तीची प्रेरणा टिकवण्यास मदत करणारे समुपदेशक ..विशेषतः ' मुक्तांगण ' व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका स्व. डॉ . अनिता अवचट , डॉ , अनिल अवचट , मुक्तांगण च्या प्रगतीत आणि व्यसनमुक्ती संदर्भात खास कार्य करणारे मनोविकास तज्ञ डॉ . आनंद नाडकर्णी .. मला नेमक्या वेळी आधार देणारे ' मैत्री ' व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक माझे परम मित्र रवी पाध्ये आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रतिभा पाध्ये , ' मैत्री ' आणि ' मुक्तांगण ' मधील माझे अनेक मित्र , सध्या मुक्तांगण च्या संचालिका असलेल्या सौ .मुक्ता पुणतांबेकर.. अल्कोहोलीक्स अँनॉनिमस या व्यसनमुक्ती साठी जागतिक पातळी वर कार्य करणाऱ्या संघटनेचे साहित्य ..असंख्य हितचिंतक यांच्या मुळेच आज मी व्यसनमुक्त आहे , प्रत्येकाच्या बाबतीत व्यसनमुक्तीचा प्रवास अतिशय कठीण असतो त्यामुळे कोणीही हा बाहेर पडला म्हणजे आपण पण करू आणि मग अनुभव घेऊन बाहेर पडू असा सहज विचार करू नये प्रत्येकालाच हे जमेल असे नाही त्यामुळे सुरवातीलाच सावध झालेले बरे ! शिवाय व्यसनाच्या काळत मी आयुष्याची सुमारे २० वर्षे जी वाया घालविली आहेत ती काही माझ्या जिवनात परत येणार नाहीत हे नक्की त्यामुळे मी आर्थिक , सामाजिक बाबतीत जगापेक्षा मागे पडलोय हे सत्य स्वीकारणे मला अनेकवेळा कठीण होते तेव्हा प्रयोग टाळावेत . धन्यवाद !
========================================================================
भाग पहिला
देव म्हणजे नक्की काय ? तो कसा असतो ? देव कसा दिसतो ? वगैरे प्रश्न मला लहानपणा पासून पडत .. या प्रश्नांचे सविस्तर उत्तर देण्यास कोणी तयार नव्हते ...देव्हा-यातील मूर्ती , मंदिरीतील मूर्ती , विविध देवतांचे आकर्षक आणि तेजोवलय असलेले फोटो पाहताना मात्र निश्चितच मनात एक प्रकारचा शांततेचा भाव उमटत असे , कदाचित देवाबद्दल ऐकलेल्या दिव्य कथांचा तो परिणाम असावा ,पुढे जेव्हा मोठा होत गेलो तस तश्या व्यक्तिगत खाणे पिणे, कपडेलत्ते , खेळाची साधने वैगरे मिळवण्याच्या इच्छा जागृत होत गेल्या व अनेकदा आई बाबा देत नाहीत मग देवाकडे मागितले की देव नक्की देईल या आशेने देवाकडे मागणे मागत गेलो ..,काही मागण्या पूर्ण झाल्या .. काही नाही झाल्या , जेव्हा आसपासची विषमता , गरिबी , अनाथ , अंध , अपंग , गुन्हेगार , चोर , खुनी लोक अश्या विषम परिस्थितीची जाणीव झाली ..तेव्हा प्रश्न पडला की देव सगळ्यांना सुखी का करत नाही ? जगात देव आहे तर मग तो लोकांना असे का करतो , तो जर बुद्धीदाता आहे तर काही लोकांना अन्याय करण्याची , गुन्हे करण्याची , चोरी , दरोडे घालण्याची वाईट बुद्धी का देतो ? जर देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या चांगल्या वाईट कर्माचे फळ देतो असे म्हणतात ... तर मग लबाड .. ढोंगी .. अन्यायी .. खुनी ..लोकांना लुबाडणारे राजकारणी यांना त्यांच्या कर्माची योग्य ती शिक्षा का मिळत नाही ? हे लोक कसे निर्दोष सुटतात ? कर्माचे फळ मिळण्याची नेमकी प्रक्रिया काय असावी ? की फक्त लोकांना भीती घालण्यासाठी हे सांगितले जाते ?
उन्हाळ्यात जेव्हा मी बाहेर अंगणात झोपत असे तेव्हा लवकर झोप यावी म्हणून आकाशातले तारे मोज असे आई सांगत असे , पण तारे मोजण्या ऐवजी हे आकाश कसे निर्माण झाले असावे ? एकूण किती तारे असतील ? पृथ्वी , चंद्र , सूर्य , तारे . सूर्यमाला , आकाशगंगा , कृष्णविवर , या बद्दल अनेक प्रश्न मनात घोळत . माकडचा माणूस झाल्याचा डार्विन चा सिद्धांत मग आता जी माकडे आहेत ती का माणसे झाली नाहीत ? प्राण्यांच्या वर्तनाची जशी काही निश्चित निरीक्षणे आणि अंदाज आहेत तसे माणसांबद्दल का नाही ? पृथ्वीला जर वरून खालपर्यंत छिद्र पाडले तर कोठून बाहेर पडेल माणूस ? देव जर सर्व चराचरात व्यापून आहे तर मग हिंदूंचा देव वेगळा त्याचे नियम वेगळे आणि मुस्लीम , ख्रिस्ती , .. इतर धर्मांचे देव आणि त्यांचे नियम वेगळे असे का ? अनेक उलटे सुलट प्रश्न मनात फेर धरत आणि शेवटी देव नाहीच असे उतर निघत असे , देव नाहीच म्हणजे ,मग पाप - पुण्याचा हिशेब करणारा देखील कोणी नाही , असा सोपा निष्कर्ष निघाला . तेथूनच कदाचित मी देव धर्माच्या संस्कारांचे ओझे फेकून द्यायला सुरवात केली कौटुंबिक , सामाजिक , धार्मिक बंधने तोडायला सुरवात केली , यात स्वतच्या इच्छापूर्तीचा आग्रहच नव्हे तर अट्टाहास देखील सामील होता , आणि इच्छापूर्ती झाली नाही की राग , निराश्या , वैफल्य , वैगरे भावना बळावत त्यातच पुढे जीवनात व्यसने आली . एके दिवशी मरायचेच आहे मग जीवनातील सगळ्या मौज-मस्ती च्या गोष्टी केल्या पाहिजेत हा दृष्टीकोन तयार झाला आणि अनिर्बंध जीवन जगणे सुरु झाले . साधारण पणे इयत्ता आठवी पासून स्वतच्या इच्छेने जगण्याचे आणि बंडखोरी करण्याचे वेड पुढे वाढतच गेले , आधी शाळेला दांडी मारून सिनेमाला जाणे , सिगरेट ओढून पाहणे आणि ओढत जाणे , दारू ची चव घेणे त्यानंतर येणाऱ्या धुंदीच्या अवस्थेबद्दल असणारे कुतूहल व अनुभव घेणे त्यात सराईत होणे सुरु राहिले .
एकदा त्याच काळात म्हणजे मी बारावीला असताना वडील अर्धांगवायूने आजारी पडले आणि कोणीतरी सांगितले की निफाड गावाजवळ गणपतीचे एक जागृत स्थान आहे तेथे जाऊन जर आम्ही सहस्त्रावर्तने केली तर वडिलांना लवकरात लवकर बरे वाटेल मी मात्र विश्वास नसल्याने त्या कार्यक्रमाला गेलो नाही मोठा भाऊ व व इतर नातलगांनी ती सहस्त्रावर्तने पूर्ण केली . सहावी सातवी पर्यंत घरात शुभंकरोती म्हणणारा मी आता देवावरची श्रद्धा सोडली होती . अगदी नाईलाजाने घरी देवासमोर किवा कुठे , सत्यनारायण पुजेच्या प्रसादला गेलो की इतरांना बरे वाटावे म्हणून ' देखल्या देवा दंडवत ' सुरु होते.. अनेकवेळा घरातील सत्यनारायणाच्या पूजेच्या समोरील पैसे देखील चोरले .

चमत्कार को नमस्कार ! ( भाग २ )
एकीकडे देव नाही हे जरी मनाने ठरवले असले व अनिर्बंध जगणे सुरु असले तरी लहानपणापासून दिले गेलेले संस्कार इतक्या सहजा सहजी पूर्णपणे संपवणे शक्य नसते , जगात अनेक गोष्टी अश्या घडत असतात की जेथे विज्ञान नेमकी मीमांसा करू शकत नाही अर्थात हे देखील शक्य आहे की ज्या गोष्टी घडल्याही नसतील त्या लोकांनी एकाचे दोन करूनएकमेकांना सांगितल्या असाव्यात .. देवभोळेपणाच्या आहारी जाऊन अनेक चत्मकार घडल्याचा दावा केला असेल .
शिर्डीचे श्री साईबाबा , संत गजानन महाराज , सत्यसाईबाबा , तसेच गावोगावी असलेले थोर साधू , महात्मे यांचे चत्मकार वाचल्यावर मन जरा विचलित होत असे .. आपण देव मानत नाही म्हणजे काहीतरी चूक करतो आहोत अशी अपराधी पणाची भावना अधून मधून वाटत असे .. आमचा एक जरा वयाने मोठा मात्र कसलेही व्यसन नसलेला मित्र होता बाबुभाई शेख म्हणून तो सैलानी बाबांचा भक्त होता व त्याचे वडील अगदी साधे पण सैलानी बाबांचे निस्सीम भक्त होते त्यांच्या अंगात दर गुरुवारी सैलानी बाबा येत असत व त्या दिवशी त्यांच्या घरी दरबार भरत असे ... म्हणजे अनेक वेगवेगळ्या चिंतानी ग्रासलेले लोक तेथे जमत .. बाबुभाईचे वडील त्यांना काहीतरी यंत्र अथवा मंत्र ऐका चिठ्ठीवर लिहून देत असत ... एकदा गुरुवारी आम्ही तेथे सहज बाबुभाई सोबत गेलो होतो तेव्हा तेथे सर्व वातावरण श्रद्धेने भरलेले होते , बाबुभाई चे वडील सैलानी बाबांच्या मोठ्या फोटोसमोर वज्रासनात बसले होते आणि डोळे मिटून तोंडाने काहीतरी पुटपुटत होते ते एरवी डोक्यावर पांढरी टोपी घालत असत मात्र त्यादिवशी त्यांनी डोक्याला ऐक हिरवा रुमाल गुंडाळलेला होता , समोर उदबत्त्या लावल्या होत्या तसेच एका ताटलीत धूप जळत होता , हॉल मध्ये काही स्त्रिया आणि पुरुष होते सर्व भक्ती भावाने डोळे मिटून बसले होते सर्व जातीधर्माचे लोक त्यात होते .
काही वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि सर्वांसमोर हाताची मुठ उघडली तर त्यांच्या तळहातावर एक लाल मणी होता तो त्यांनी एका माणसाला समोर बोलावून दिला व त्याला सांगितले मणी सतत शरीराला लागून राहील असा परिधान कर तुझे काम होईल . नंतर मला समजले की तो मणी त्यांनी हातातून जादूने काढला होता . मी थक्कच झालो आणि मग मी बाबुभाई कडून एक सैलानी बाबांचा फोटो घेऊन तो खिशात ठेवू लागलो . बाबूभाई बोलण्यात खूप हजरजबाबी आणि चतुर होता मराठी अगदी उत्तम बोलत असे तो .. रोज आम्हाला सैलानी बाबांचे वेगवेगळे चमत्कार सांगू लागला तसेच तो भूता खेतांच्या गोष्टी देखील सांगत असे व त्याचे वडील भूत देखील उतरवतात ही माहिती समजली मी त्याला अनेक प्रश्न विचारात असे पण तो शिताफीने त्याची उत्तरे देत असे , एकदा बाबुभाई सोबत आम्ही मित्र सैलानी बाबांचे प्रसिद्ध ठिकाण ' बुलढाणा ' जिल्ह्यात देखील बाबांच्या उरूस आणि संदल साठी तीन दिवस गेलो होतो .

भाग ३ असेल हरी तर देईल खाटल्यावरी !
इयत्ता आठवी पासूनच अभ्यासाकडे दुर्लक्ष करत गेलो होतो .. त्यामुळे दहावीत जेमतेम ५० टक्के मार्क्स मिळालेले ... कॉलेजला तर आभ्यासाच्या बाबतीत आनंदी आनंदच होता .. मित्र .. सिनेमा .. व्यसने अश्या उनाडक्या जोरात सुरु राहिल्या सर्व जण म्हणत की ११ वी ची परीक्षा बोर्डाची नाही त्यामुळे सगळ्यांनाच पास करतात .. मी देखील त्याच भ्रमात होतो , टयूटोरीयल्स वैगरे भानगडीत कधी पडलोच नाही .. वर्षातील ९० टक्के दिवस हे थियेटर मध्ये घालवलेले .. चक्क नापास झालो ते देखील ११ वी ला .. .वडिलांना हा धक्काच होता , ते मला घेऊन आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे गेले त्या वेळी श्रीमती सुनंदा लेले या प्राचार्य होत्या आमच्या नाशिक मधील ' पुरुषोत्तम इंग्लिश ' स्कूल च्या .. वडिलांनी त्यांच्या कडून आमच्या सर्व प्रतापांची माहिती घेतली खूप चिडले होते माझ्या वर... तरी मुलाच्या भविष्याच्या काळजीने त्यांनी लेले मॅडम ना मला पास करून घेण्याची विनंती केली .. उगाच वर्ष वाया जाईल असा युक्तिवाद केला मात्र लेले मॅडम ने ठाम नकार दिला व सांगितले की याला तुम्ही पाठीशी घालू नका याला याच्या कर्माचे फळ मिळू दे .. त्या वेळी त्यांचा खूप राग आला होता पण इलाज नव्हता शेवटी वर्ष वाया गेलेच ..पुढे दुसऱ्या महाविद्यालयात ११ वी ला पुन्हा प्रवेश घेतला , मात्र मागील प्रसंगातून फारसा शिकलो नाही फक्त पास होण्यापुरता आभ्यास करून ११ वी झालो , व्यसने वाढली होती . १२ वी चे वर्ष म्हणून सगळे कानीकपाळी ओरडत राहिले पण पहिले पाढे पंचावन्न , बाबुभाईशी ओळख झाल्या नंतर सैलानी बाबांचा फोटो खिशात ठेऊन काहीही केले तरी 'सैलानी बाबा ' वाचवतील हा एक समज बळावला होता . १२ वी ला देखील वर्षभर उनाडक्या केल्या आभ्यासात नाही.. मात्र सांस्कृतिक बाबतीत प्राविण्य मिळवले , कविता . अभिनय , संगीत यात मला १२ च्या स्नेह संमेलनात बक्षीसे देखील मिळाली .. त्या वर्षी वडिलांच्या आजारपणामुळे ते ' भायखळा ' येथे रेल्वे च्या दवाखान्यात दाखल होते , भाऊ शिक्षणासाठी पुण्याला आणि आई वडिलांची शुश्रूषा करण्यासाठी वडिलांजवळ होती .. घर माझ्या ताब्यात , मजाच मजा होती .. सतत मित्र जमवून व्यसने करणे .. मौज मजा करणे हेच एकमेव काम .
आम्ही १२ वी ला नापास होणार हे भविष्य शेंबडे पोर सुद्धा सांगू शकले असते .. पहिला पेपर जरा बरा गेला कारण मराठीचा होता .. पुढच्या सगळ्या पेपर्स ची बोंबच होती , दुसऱ्या दिवशी आम्ही बाबूभाई कडे जाऊन काहीतरी आयडिया करायचे ठरवले नेमके त्या दिवशी मला एका ठिकाणी महत्वाचे काम होते म्हणून , मी जाऊ शकलो नाही आणि बाबू भाई कडे मात्र माझे दोन्ही मित्र गेले .. बाबू भाईने त्यांना मंत्र लिहिलेल्या चिठ्ठ्या दिल्या व सांगितले की या चिठ्ठ्या खिश्यात ठेवून तुम्ही कॉपी जरी केलीत तरी पकडले जाणार नाही .. माझे मित्र खुशीत होते . मी त्या दिवशी बाबुभाई कडे जाऊ न शकल्यामुळे माझ्या कडे ती जादूची चिठ्ठी नव्हती ..मित्र त्या दिवशी रात्री खुशीत होते तर माझा जळफळाट होत होता ते मस्त गांजा पिवून झोपी गेले मी मात्र इर्षेने रात्रभर जागून इंग्रजी च्या पेपर चा आभ्यास केला .. कारण माझ्या जवळ सैलानी बाबांचा मंत्र असलेली चिट्ठी नव्हती .. दुसऱ्याच दिवशी कॉपी करताना माझा मित्र पकडला गेला .. मी मात्र चिठ्ठी नसल्याने कॉपी च्या भानगडीत नव्हतो , तिसरा मित्र नंतरच्या पेपर ला पकडला गेला . मी रोज रात्रभर जागून आभ्यास करत गेलो आणि त्या वर्षी माझे दोन्ही मित्र नापास झाले १२ वी ला .. मी पास झालो . आमच्या अनेक मित्रांना बरीच वर्षे मी नेमका काय चत्मकार करून पास झालो या बाबत शंका होती .

भ्रम , अनुभूती की संमोहन ? ( भाग ४ )
बारावीला असतानाच .. एकदा रस्त्यात ' इस्कॉन ' ची गाडी दिसली , मोठी व्हॅन होती , सगळीकडे भगवान श्रीकृष्णाचे फोटो वैगरे लावलेले होते .. गाडीचे मागील दार उघडून आत गाडीत सगळीकडे देव देवतांचे फोटो असलेली पुस्तके विकायला ठेवली होती , कुतूहल म्हणून तेथे थांबलो .. भगवे कपडे परिधान केलेले आणि डोक्याचा तुळतुळीत गोटा कलेले तरुण कार्यकर्ते गाडीभोवती जमलेल्या लोकांना ' भगवदगीतेची ' पुस्तके विकत होते , मला जरा नवलच वाटले त्या लोकांचे ...तरुण वयात हे लोक असे देव धर्माच्या नावाखाली आपले घर दार सोडून कसे काय गावोगावी फिरतात ? यांच्या व्यक्तिगत इच्छा -आकांक्षा नसतील का काही ? म्हणजेच घर , संसार वैगरे . तेथे एक पुस्तक दिसले ' श्रीमद्भगवद्गीतागीता जशी आहे तशी ' या नावाचे , अत्यंत आकर्षक मुखपृष्ठ होते पुस्तकाचे शंख.. चक्र ...गदा ..धारण केलेली श्रीकृष्णाचा सुंदर फोटो , मला वाचनाची आवड लहानपणापासूनच होती व वेगवेगळ्या विषयावरची पुस्तके मी वाचत असे , ते पुस्तक म्हणजे श्री .प्रभूपाद्स्वामी यांनी केलेला गीतेचा मराठी अनुवाद होता , आवाक्यातील किंम्मत होती म्हणून ते विकत घेतले .पुस्तकात सुरवातीला अत्यंत आकर्षक अशी महाभारताचे वर्णन करणारी चित्रे होती .. कृष्णाच्या अर्जुनाला दिलेल्या ' विराट विश्वरूप दर्शनाचा देखावा ' असलेले एक मोठे चित्र होते .. गीतेचे संस्कृत मधील श्लोक आणि त्याचा सुलभ मराठीत विस्तारीत अर्थ त्या पुस्तकात होता .. सगळे पुस्तक ऐका बैठकीत वाचणे शक्यच नव्हते म्हणून अधून मधून ते पुस्तक वाचत असे ..आमची एकून तीन मित्रांची तिकडी होती .. त्याच काळात आमची विलास गोवर्धने ( पाटील ) नावाच्या आमच्या पेक्षा वयाने मोठा असलेल्या म्हणजे नोकरी करणा-या .. लग्न झालेला व्यक्तीशी ओळख झाली .. आकर्षक व्यक्तिमत्व , राजकारण , काव्य , इतिहास , समाजकारण वैगरे वेगवेगळे विषय त्याच्या बोलण्यात असत त्यामुळे तो आमचा आवडता आणि आमचा जवळचा मित्र बनला होता , विलास बद्दल सविस्तर नंतर कधीतरी सांगेन , हा विलास आम्हाला नेहमी व्यसने बंद करा असा आग्रह करत असे अर्थात आम्ही त्याला तेव्हढ्या पुरते हो म्हणत असू , एकदा त्याने निर्वाणीने सांगितले ...जर तुम्हा तिघांना मी मित्र म्हणून हवा असेन तर.. तर तुम्ही गांजा पिणे बंद करा व त्यासाठी तुम्ही आधी एकमेकांना भेटणे काही दिवस बंद करा , पाहू तुम्हाला जमते का ते ! आम्हालाही मनातून व्यसन बंद करावे असे वाटत असे कधी कधी.. पण जमत नव्हते .. तिघांची तिकडी इतकी पक्की होती की एकमेकांना भेटल्याशिवाय चैन पडत नसे .. शेवटी आम्ही निर्णय घेतला की आपण किमान ५ दिवस एकमेकांना भेटायचे नाही म्हणजे गांजा पिण्याधी आठवण होणार नाही व आपले व्यसन सुटेल झाले ठरले .
पहिल्या दिवशी मी कॉलेज ला गेलो तेव्हा कुठेही न पाहता वर्गात जाऊन बसलो ते दोन मित्र वेगवेगळ्या वर्गात होते , त्यांना न भेटताच कॉलेज मधून सरळ घरी आलो , मात्र वेळ कसा घालवावा हे समजत नव्हते इतकी मित्रांची सवय झालेली .. मग गीतेचे ते विकत घेतलेले पुस्तक काढून वाचत बसलो मात्र घरात एकाग्रता वाटेना म्हणून आम्ही मित्र रोज भेटत असू त्या नाशिक रोड मधील दुर्गा बागेत जाऊन बसलो दुपारची साधारण १ ची वेळ होती हिवाळ्याचे दिवस असल्याने उबदार उन पडले होते , बागेत एकदोन रिकामटेकडे होते माझ्यासारखे , मी छान हिरवळीवर पसरलो आणि पुस्तक वाचू लागलो , गीतेतील एकेक प्रसंग वाचत होतो , त्याच वेळी कशी कोण जाणे मला खूप झोप आल्या सारखे वाटले म्हणून उताणा पडून ते उघडलेले पुस्तक तोंडावर ठेवून काही वेळ पडलो , साधारणतः ५ मिनिटे झाली असावीत अचानक मला कोठून तरी एक वेगळाच मंद सुगंध जाणवला , आधी तो दूर होता नंतर अगदी माझ्या जवळ आल्यासारखा वाटला , हा सुगंध या पूर्वी मी कधीच अनुभवलेला नव्हता कोणते फुल , उदबत्ती अथवा माझ्या स्मृतीत असलेल्या सुगंधांपेक्षा एकदम वेगळा , अगदी राहवेना म्हणून डोळे उघडले आणि सुगंध गायब !
उठून आसपास पाहिले पण कोणीच नव्हते , काय झाले असावे नेमके , कोठून येत होता तो सुगंध ? या प्रश्नांची उत्तरे मला अजून मिळाली नाहीत . भ्रम होता, कसली अनुभूती होती की आत्मसंमोहन ?
========================================================================
अनुभूतीच्या पलीकडे ? ( भाग ५ )
अनेक प्रकारच्या अध्यात्मिक पुस्तकातून अश्या प्रकारचा अनुभव अध्यात्मिकते कडे वाटचाल करणाऱ्या लोकांना येत असतो असे वाचले होते.. मी त्या काळात व्यसने करीत होतो त्या मुळे मी अध्यात्मिक वैगरे असण्याचा प्रश्नच नव्हता .. एक खरे की व्यसने बंद करण्याचा माझा निर्णय त्या काळापुरता तरी खूप प्रामाणिक होता .. व्यसन न केल्यामुळे आलेली अस्वस्थता व बैचेनी घालवण्यासाठी मी जे पुस्तक वाचावयास घेतले होते ते अध्यात्मिक होते . एकंदरीतच जीवनाचे सार उलगडून दाखवणारी ' गीता ' वाचत असताना मला थोडी गुंगी आली किवा झोप आल्यासारखे वाटले म्हणून मी काही वेळ डोळे मिटून उघडे पुस्तक तोंडावर ठेवून पडलो होतो . त्या वेळी काही क्षण का होईना मी गीतेत सांगितलेल्या विचारांशी इतका तादात्म्य पावलो होतो की , वर्तमान जीवनातील सर्व चिंता , काळज्या , वैगरे विसरून गेलो होतो , अर्थात माणूस झोपेतही सगळे काही विसरतोच म्हणा , पण ती झोप नव्हती तर अर्ध जागृतीची अवस्था होती अश्या अवस्थेत माणसाचे अंतर्मन अतिशय संवेदनशील झालेले असते .. संमोहन हे एक शास्त्र आहे हे विज्ञानाने मान्य केलेले आहे आणि हे शास्त्र देखील अंतर्मनाच्या एकाग्रतेवरच आधारित आहे .
अर्ध जागृतीच्या अवस्थेत मला मी बागेत पहुडलो आहे हे देखील समजत होते तसेच मी गीतेचे विचार वाचले आहेत हे देखील आठवत होते मला फक्त नेमका तो वास कुठून आला हे समजले नाही तसेच तसा वास पूर्वी कधी मी अनुभवला देखील नव्हता हे नेमके कसे घडले याचा मी असा निष्कर्ष काढलाय की ती एक माझी आनंदाची अनुभूती होती . कारण सर्व काळज्या चिंता विसरून , वर्तमानात फक्त साक्षी भावाने वावरणे हा अतिशय आनंदाचा अनुभव असतो आणि तो अनुभवत असतांना आलेला सुगंध माझी इंद्रियांची संवेदनशीलता खूप वाढल्याने मला जाणवला असावा . पुढे मी ' विपश्यना ' करण्यासाठी इगतपुरी येथे गेलो तेव्हा देखील मला अगदी सुगंधच नाही पण तश्याच प्रकारचा अनुभव आला होता त्या बद्दल नंतर लिहीनच . ' विपश्यना ' म्हणजे भगवान गौतम बुद्धाने स्वतच्या अनुभवातून जी ध्यान पद्धती विकसित केली आहे त्याबद्दल मार्गदर्शन करणारे शिबीर .
अनेक संतांनी भजन , कीर्तन , करताना , किवा ध्यान धारणा करताना असले अनुभव आलेले मी वाचलेले आहे , इतकेच काय पंढरी च्या वारीला जाणारे वारकरी देखील जेव्हा त्यांचा भक्ती भाव टिपेला पोचतो तेव्हा ' विठ्ठल , विठ्ठल ' असा गजर करत मनाच्या अर्धजागृतीच्या अवस्थेत असा आनंदानुभव घेतात .म्हणूनच मी या अनुभवला नेमके विशेषण न लावता , भ्रम , अनुभूती की संमोहन ? असे नाव दिले आहे .अर्थात कश्यामुळे ही का असेना तो आनंदानुभव होता हे नाकारता येणार नाही हेच खरे . मी ज्ञानी नाही हे मी येथे स्पष्ट करू इच्छितो . माझे मला जाणवलेले स्पष्टीकरण कदाचित काही लोकांना अयोग्य वाटेल किवा मला नेमके काय सांगायचे आहे याबाबत काही लोकांना संभ्रम पडला असेल तर माफ करावे .

बामण भट कढी आंबट ..होळी रे होळी ....बंदुकीची गोळी ! ( भाग ६ )
माझे वडील रेल्वेत नोकरीस होते व आम्ही सुमारे २० वर्षे नाशिकरोड येथे रेल्वे क्वार्टर मध्ये राहत होतो . तेथे फक्त एकदोन कुटुंबे ब्राह्मणांची होती इयत्ता पहिली पासून मला आसपास खेळण्यासाठी सर्वच जातीधर्मातील मित्र मिळाले, समाजात खोल वर पसरलेला जातीयवाद मी तेव्हापासून अनुभवतो आहे तेथे एखाद्या मुलाचा त्याच्या माघारी उल्लेख ..तो गवळ्याचा .. तो न्हाव्याचा , धनगराचा , बामनाचा , मराठ्याचा ...वाण्याचा असाच होत असे अर्थात प्रत्यक्ष त्या व्यक्तीसमोर असा उल्लेख क्वचितच होई . रेल्वे क्वार्टरच्या समोर ' विष्णू नगर ' नावाची वस्ती होती , त्याच्या पुढे सिन्नर फाटा आणि मागे ' राजवाडा ' म्हणजे दलित समाजाची वस्ती होती . माझा सगळीकडे स्वैर वावर असे माझे खेळगडी सर्व समाजातील् होते , खेळताना नेहमी मला बामन भट .. कढी आंबट .. सव्वा रुपया दक्षिणा .. डाळभात वाला.. घाबरट असे चिडवले जायचे , आमच्या घरी कधीच जात पात पाळली गेली नाही .. तरीदेखील हे मित्र मला नेहमी समोर माझ्या जातीचा उल्लेख करून चिडवत असत .. माझ्या बालमनाला ते दुखःद वाटत असे , घरी जेव्हा मी ते सांगत असे तेव्हा .. जाऊ दे तू त्यांच्यात खेळायला जाऊ नकोस असा सोपा सल्ला दिला जाई .. पण ते देखील मला पटत नसे एकदोन वेळा तर काही मुलांनी माझी पतंग फाडली , भंवरा हिसकून घेतला तेव्हा मी खूप रडलो .. तेव्हा असे वाटले की आपण घाबरतो म्हणून हे असे वागतात मग मी ठरवले की घाबरायचे नाही , तेव्हापासून मी निर्भय पणे त्यांच्यात वावरू लागलो , अरे ला कारे करू लागलो , मग शिव्या ..हाणामारी यातही पुढाकार घेउ लागलो मित्रांच्या घरी जाऊन अंडे .. मटन खाण्यास सुरवात केली तेव्हा मला चिडवणे बंद झाले . घरी माझ्या अश्या वागण्याचे कौतुक होणे शक्यच नव्हते .. मी बिघडत चाललो आहे असा शिक्का बसला माझ्यावर .. मला वाटते माझी बंडखोरी तेव्हापासूनच सुरु झाली असावी ...माझ्या अश्या बिनधास्त वागण्याने नंतर माझा उल्लेख माझ्या माघारी ' नकली बामण ' असा केला जाई म्हणजे बामण हे बिरूद काही जात नव्हते ही गम्मत होती . तेथूनच मी घरी शुभंकरोती म्हणणे सोडले देव वगैरे मानणे बंद केले व ज्याच्या कडे शक्ती आहे ..हिम्मत आहे .. दोन देण्याची आणि घेण्याची कुवत आहे तोच श्रेष्ठ असे माझे तत्वज्ञान बनले . कॉलेज ला असताना आमच्या भागात एक अय्युब नावाचा मुलगा बराच गुंड म्हणून प्रसिद्ध होता , त्या अयुब चे एकूण ७ भाऊ होते त्या पैकी दोन जरा बरे म्हणजे कामधंदा करणारे होते तर बाकी सर्व माझ्यासारखे उनाड , हा अय्युब मुलींची छेड काढणे .. खेळताना जबरदस्ती मुलांची बॅट , चेंडू हिसकावून पळून जाणे ..असे प्रकार करत असे व सात भाऊ म्हणून मुले त्याच्या वाट्याला जात नसत एकदा अयुब माझ्या ऐक किरण रोडे नावाच्या मित्राला नडला .. ते जेव्हा मला समजले तेव्हा माझी सटकली आणि मी अयुबला पकडले खूप मारामारी झाली शेवटी मी हातात स्ट्म्प घेऊन अयुब च्या मागे धावलो तो पुढे आणि मी मागे असा सर्व विष्णुनगर मध्ये पळापळ झाली . तेव्हापासून माझा सगळीकडे बोलबाला झाला . त्या पुढे माझ्या माघारी माझा उल्लेख 'डेंजर बामण ' असा होऊ लागला .( बामण हे बिरूद मात्र गेले नाही हे विशेष )
========================================================================
भ..भू .. भूत भूत !, मेलो मेलो !( भाग ७ )
अय्युब ला एकदा झटका दाखवल्यानंतर स्टेशन वाडी , सिन्नर फाटा , विष्णू नगर भागात माझा चांगलाच बोलबाला झाला होता व आता तोंडओळख असणारे मला आवर्जून नमस्कार करू लागले होते तसेच तोंडावर तुषार भाऊ असे संबोधू लागले होते आणि पाठीमागे डेंजर बामण हे होतेच . गणपती उत्सव , नवरात्र , होळी , रंगपंचमी असे सण म्हणजे मजाच मजा असे मस्ती ,
मस्करी , किरकोळ भांडणे , खोड्या हे असायचेच . विशेषतः ' होळी ' ची तयारी एक आठवडा आधीपासून सुरु व्हायची , लोकांकडे गोवऱ्या , लाकडे यासाठी वर्गणी मागणे , रात्रीच्या वेळी आसपास बेवारस पडलेली किवा मालकचे लक्ष नसलेली लाकडे उचलून आणणे , प्रत्यक्ष होळी पेटल्या पासून रंगपंचमी पर्यंत ५ दिवसात होळी सतत धगधगती ठेवण्याची जवाबदारी आमचीच असे .रात्री २ ते ३ वा . पर्यंत आमची टोळी जागत असे.. एव्हाना कुटुंबियांनी मला बोलणे सोडले होते कारण बोलून त्याचा काही परिणामही होत नसे , तसेच रेल्वे क्वार्टर्स मधील तुरळक ब्राह्मण मित्रांनी माझी मैत्री सोडली होती ( कदाचित घरून त्यांना तशी समज मिळाली असावी ) . आम्ही पेटत्या होळी जवळ बसून रात्री उद्योग करत असू , लाकडे चोरून आणणे , जे लोक वर्गणी देत नाहीत अश्या लोकांच्या दाराला बाहेरून कड्या घालणे , एखाद्या भांडखोर व्यक्तीच्या घरावर दगडफेक करणे वैगरे सामाजिक उपद्रव चालत असत .
त्याच वेळी नाशीक रोड ला ' रेजिमेंटल ' थेटर मध्ये ' कब ?क्यू ?कहा ? ' हा हॉरर चित्रपट लागला होता त्यात प्राण हा खलनायक आहे.. तो एका सीन मध्ये उताणा झोपलेला असताना एकदम यंत्रवत पद्धतीने उठून उभा राहण्याचा एक अतिशय परिणाम कारक प्रसंग आहे .. चित्रपट पाहताना लोक घाबरतात तो प्रसंग पाहून , आमच्यातील एक ते तसे यंत्रवत उठून उभे राहणे शिकला होता . एकदा रात्री होळी जवळ बसलो असताना त्याने ते करून दाखवले अगदी हुबेहूब .. आता कोणाला तरी घाबरवता येईल हा विचार सगळ्यांच्या डोक्यात आलाच , गल्लीतील सुधाकर नावाचा एक सरळ मुलगा नेमका त्याच दिवशी रात्री ' कब , क्यू , कहा ? पाहण्यास गेला आहे ही माहिती एकाने पुरविली सुमारे साडेबारा वाजत होते म्हणजे सिनेमा सुटला असणार व सुधाकर चा घरी जाण्याचा रस्ता जेथे होळी पेटते तेथूनच होता , प्लान ठरला आणि आम्ही सर्व आसपास लपलो फक्त होळी जळत होती आणि होळीजवळ तो प्राण ची नक्कल करणारा उताणा अंगावर कांबळे घेऊन पडला होता सुधाकर येण्याची चाहूल लागली तसे शिटी वाजवून इशारा दिला आणि तो मुलगा हळूच उठून उभा राहिला इकडे सुधाकरची बोबडी वळलेली , भ ..भू .भूत असे म्हणत तो पळत सुटला .
नंतर सुधाकर ५ दिवस आजारी होता तो झोपेत उठून पळत असे , बडबडत असे .. सतत ताप चढलेला ... आमची मस्करी त्याच्या जीवावर बेतली होती .. आम्हाला खूप अपराधी वाटत होते पण ही मस्करी आम्ही केली हे सांगणे म्हणजे सर्वांवर संकट ओढवून घेणे , तेथे स्टेशन वाडीत एक लक्ष्मण नावाचा मांत्रिक होता , मानेपर्यंत वाढलेले केस , काळा कुळकुळीत रंग , गळ्यात कवड्यांच्या माळा.. असे उग्र ध्यान होते लक्षमण चे , सुधाकरच्या घरातील लोकांनी त्याला ' लक्षमण कडे नेले , लक्षमण ने जरा फुकफाक करून सुधाकर ला भुताने धरल्या चे जाहीर केले आणि मग काही पैसे घेऊन एक कोंबडी सुधाकर वरून उतरवली . सुधाकर चक्क बरा झाला ,. तेव्हापासून लक्ष्मण चा मान खूप वाढला त्या भागात .

प्लँचेट ! आत्मा बोलावणे ( भाग ८ )
लहानपणा पासून जसा माझा मस्तीखोर , खोडकर स्वभाव होता तसेच वाचनाची देखील खूप आवड होती मला , रेल्वे क्वार्टर्स मध्ये एक रेल्वेची लायब्ररी होती , तेथे अनेक प्रकारची पुस्तेके होती सुरवातीला जादूच्या गोष्टीची म्हणजे जादूचा दिवा , जादूची बासरी , सिंदबादच्या सफरी , बादशहा -बिरबल , तेनालीराम , चांदोबा तर नेहमीचाच , नंतर रहस्य कथा , श्रीकांत सिनकर , गुरुनाथ नाईक , काकोडकर , काळापहाड कथा , रातराणी कथा , न्यायधीश कथा इ . पुढे १० वी नंतर मग कादंबऱ्या वाचू लागलो त्यात स्वामी , छावा , मृत्युंजय , श्रीमान योगी ,अमृतवेल , ययाती, राधेय , कौंतेय ,इ .. सामाजिक जाणीव वाढत गेली तशी मग आत्मचरित्रे वाचू लागलो यात दलित आत्मचरित्रे मला जास्त भावली कारण त्यात अतिशय कठीण आणि वास्तववादी प्रसंग असत बलुत , उचल्या , अक्करमाशी , बारमाशी , अशोक व्हटकर यांचे' ७२ मैल ' 'कोल्हाट्याचे पोर " , कोसला , जरीला ,अमृता प्रीतम , भाऊ पाध्ये , विजय तेंडूलकर , भालचंद्र नेमाडे , पु ल .देशपांडे .व.पु . काळे .. नारळीकर ..बाबा आमटे , म .गांधी , सावरकर , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , स्वामी विवेकानंद , हेडगेवार , गोळवलकर गुरुजी , संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम ,प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकांचे रविंद्र गुर्जर यांनी केलेले मराठी अनुवाद , खूप खूप वाचत असे मी... विशेषतः गुढ विद्या वगैरे बद्दल माझे आकर्षण वाढले होते ' मोहिनी विद्या , साधना व सिद्धी ,' मृत्यूच्या पलीकडे ' 'त्राटक विद्या ' ..सगळी नावे इथे देणे कठीणच आहे इतके वाचन झालेय
माझा वाचनाचा झपाटा देखील खूप होता सकाळी आणि पुन्हा संध्याकाळी मी पुस्तक बदलत असे एका घरात एका वेळी दोनच पुस्तके मिळत एक आई वाचत असे व एक मी आणि भाऊ पण मला हा कोटा पसंत नव्हता , तेव्हा काही वेळा मी लायब्ररी वाल्याची नजर चुकवून एक दोन पुस्तके शर्टाच्या आत लपवून आणत होतो , आईला सांगे की तो माझ्या ओळखीचा आहे म्हणून मला जास्त पुस्तके देतो मात्र एकदा वडिलांना समजले की हा चोरून पुस्तके आणतो मग त्यांनी मला सगळी पुस्तके परत नेऊन देण्यास सांगितली सुमारे १५ पुस्तके गुपचूप नेऊन ठेवणे शक्यच नव्हते मी खूप रडलो मग वडिलांनी मला लायब्ररीत सोबत नेले आणि तेथे खरा प्रकार सांगितला की याला वाचनाची खूप आवड आहे म्हणून याने हा असा प्रकार केला आहे . तो माणूस काही बोलला नाही पण नंतर माझा रेल्वेच्या लायब्ररीत जाण्याचा उत्साह कमी होत गेला . एकदा एक गुढ विद्येचे पुस्तक हाती लागले त्यात वेग वेगळ्या प्रकारच्या सिद्धी कशा प्राप्त करता येतात या बद्दल माहिती त्यातले काही प्रकार अत्यंत आकर्षक होते .. वशीकरण .. गुप्तधन ..अदृश्य होणे वगैरे पण त्यासाठी करायचे विधी आणि साहित्य खूप कठीण होते म्हणजे अमावस्येची रात्र , काळ्या मांजरीचे डोळे काढणे , घुबडाच्या पायाचे हाड , वटवाघूळाचे पंख असे प्रकार त्यावेळी मी करणे शक्यच नव्हते . एका पुस्तकात ' प्लँचेट ' म्हणजे मृत आत्म्याला बोलावण्याचा विधी सांगितला होता व त्या आत्म्याला जर आपण प्रश्न विचारले तर तो त्याची उत्तरे देतो असे लिहिले होते .
हे करणे मात्र मला शक्य होते साधने देखील फारशी लागणार नव्हती , म्हणजे फक्त एक गुळगुळीत पाट , स्टील चे पाणी पिण्याचे फुलपात्र , खडू , उदबत्ती , आणि तीन जण . सोपा विधी होता अगदी गुळगुळीत पाटावर मध्यभागी खडूने एक छोटा गोल काढायचा , त्याच्या एका बाजूला इंग्रजी मध्ये ' यस ' आणि दुसऱ्या बाजूला ' नो ' व वरती १ ते १० आकडे आणि उरलेल्या तीन बाजूला इंग्रजी तील ए ते झेड पर्यंत आद्याक्षरे लिहायची . मग उदबत्ती लावून तीन जणांनी डोळे मिटून बसायचे , एखाद्या गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याचे स्मरण करायचे ( यात ती व्यक्ती नैसर्गिक रित्या मरण पावलेली असावी म्हणजे अपघात , खून , आत्महत्या अश्या प्रकारांनी गेलेली व्यक्ती नसावी ) मग त्या फुलपात्राच्या खोलगट भागात उदबत्ती फिरवायची आणि तोंडाजवळ फुलपात्र धरून ' त्या ' बोलावणार असणाऱ्या विशिष्ट व्यक्तीचे नाव घेऊन ' लवकर या ' असे म्हणायचे आणि फुल पात्र पाटावरच्या छोड्या मध्यभागी असलेल्या गोलावर उपडे ठेवायचे व तीन जणांनी त्या उपड्या फुलपात्रावर उजव्या हाताचे पहिले बोट ठेवायचे .
========================================================================
आत्मा आला रे आला ! ( भाग ९ )
झाले ठरले मग मी तीन चार मित्रांना ही आयडिया सांगितली .. आधी घाबरले म्हणाले काही भलते झाले तर ? एखादा खतरनाक आत्मा आला तर तो त्रास देईल , मग परत गेला नाही तर कसे ? अनेक शंका होत्या तरी कुतूहल मात्र सर्वाना होतेच त्या मुळे भीतीवर कुतूहलाने मात केली आणि ते तयार झाले , जागेचा प्रश्न होता कोणत्याही मोठ्या माणसाला हे सांगणे
म्हणजे संकटच कारण कोणीच असे धंदे करायला परवानगी दिली नसती .. एकाचे आईवडील दोघेही नोकरी करत असत त्याच्या घरी दुपारी प्लँन्चेट करायचे नक्की झाले . आम्ही दुपारी एकूण ५ जण त्याच्या घरी जमलो , सर्व तयारी केली एका गुळगुळीत पाटावर आकडे आणि अक्षरे लिहून झाले , उदबत्ती लावली , बाहेर कोणाला कळू नये म्हणून एकाने सर्व खिडक्या लावल्या पण मग दुसऱ्याने शंका काढली की सर्व जर बंद ठेवले तर आत्मा येणार कुठून ? शेवटी एकच खिडकी उघडी ठेवली , कोणाचा आत्मा बोलवायचा हा प्रश्न बाकी होता सर्वानी एकदम इतिहासातल्या आपापल्या आवडीच्या थोर व्यक्तींची नावे सुचवली ,पण इतक्या थोर व्यक्ती जास्त बिझी असणार तर येणार नाहीत म्हणून मग किरकोळ , सर्वसामान्य व्यक्तीचा आत्मा बोलवावा म्हणजे लवकर येईल व शक्यतो नात्यातील असेल तर लवकर येईल या कल्पनेने माझ्या आजोबांचा आत्मा बोलावण्याचे ठरले ते नैसर्गिकरित्या मरण पावले होते . उदबत्ती लावून आम्ही सर्व डोळे मिटून बसलो .. वातावरणात गुढ शांतता पसरली .. उदबत्तीचा धूर , आमच्या श्वासांचे आवाज देखील आम्हाला एकू येत होते .. मी फुलपात्र घेऊन उदबत्तीचा धूर त्याच्या खोलगट भागात दाखवला मग फुलपात्र तोंडाजवळ नेऊन आजोबांचे नाव घेऊन ' लवकर या ' असे म्हणून ते फुलपात्र पाटावर उपडे ठेवले .. तिघांनी उजव्या हाताचे पहिले बोट त्यावर ठेवले , आणि फुलपात्र केव्हा हलते याची वाट पाहत बसलो सुमारे ५ मिनिटे झाली तरी काहीच हालचाल होईना इतक्यावेळ एका जागी शांत बसून राहणे मला कठीणच होते .. माझी थोडी चुळबुळ सुरु होती आणि त्यातच माझ्या बोटाचा दाब त्या फुलपात्रावर वाढला आणि त्या दाबाने ते थोडे सरकले सर्वाना दिसले की भांडे थोडे सरकले . एकदम आमच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला , मला मात्र शंका होती की बहुतेक माझ्या हाताचा बोटाचा दाब वाढल्याने बोटाचा दाब वाढल्याने गुळगुळीत पाटावर फुलपात्र पुढे सरकले असावे पण मी काहीच बोललो नाही कारण हा प्रयोग मीच करायला लावत होतो सर्वाना त्या मुळे तो यशस्वी व्हावा ही जवाबदारी पण अर्थात माझीच होती .
भांडे हलल्या बरोबर एकाने प्रश्न विचारला , मी परीक्षेत पास होईन का ? बाकीचे त्याच्यावर ओरडले असे फालतू प्रश्न विचारू नको कारण आत्मा एका वेळी फक्त तीन प्रश्नांची उत्तरे देतो असे त्या पुस्तकात लिहिले होते , अर्थात त्या वेळी आमच्या जीवनात फारसे गंभीर असे प्रश्न उद्भवलेले नव्हतेच म्हणा शेवटी पास , नापास , आणि एखादी मुलगी आवडते तिला पण तसेच वाटते का ...वगैरे मिळून एकूण तीन प्रश्न विचारले गेले , मला खरी आईडिया कळली होती बोटाचा दाब हळूच त्या फुलपात्रा वर वाढवला की ते सरकते मग फक्त त्याला कोणाला नकळत दिशा दिली की काम फत्ते .
या यशस्वी प्रयोगामुळे सर्व मित्रांमध्ये माझा मान वाढला होता , व आता आम्ही नेहमी प्लँचेट करू लागलो होते माझ्या दोन मित्रांना देखील माझी आयडिया कळली होती ते देखील आता भांडे नकळत कसे सरकावावे याचे तज्ञ झाले होते . आमचे हे प्रकार वाढल्यावर मोठ्या लोकांना समजलेच व ते आम्हाला रागावले म्हणाले हे आत्मे जर परत गेले नाहीत तर वांधे होतील , तुमचे जिणे कठीण करतील ते वगैरे . अनेकदा आत्म्याने दिलेले उत्तर बरोबर निघत असे त्यामुळे इतरांना विश्वास ठेवणे भागच होते ..एकदा दिल्लीला आमच्या आत्याच्या घरी लग्नासाठी गेलो असताना तेथे आत्याच्या मुलीचे दागिने गहाळ झाले होते म्हणून मग मला प्लाँचेट करायला सांगण्यात आले , मोठी जवाबदारी होती मी जरा घाबरलोच होतो कारण पास , नापास .. आणि दागिने यात मोठा फरक होता , शेवटी मी मनात आले तसे भांडे फिरवले आणि काय आश्चर्य सर्व उत्तरे तंतोतंत जुळली आणि दागिने सुरक्षित आहेत हे कळले . हा योगायोग म्हणावा की माझ्या अंतर्मनाची शक्ती ?

अतृप्त आत्म्यांचा धिंगाणा अन शनीदेवांची अवकृपा ! भाग १०
माझे हातचलाखीने चाललेले प्लांचेट चे प्रयोग कधी यशस्वी होत तर कधी अयशस्वी मात्र त्यामुळे माझा मान वाढला होता मित्रांमध्ये हे नक्की , आता तर मी फक्त गेलेल्या नातलागांचेच नाही तर इतर सुप्रसिद्ध आणि थोर व्यक्तींचे आत्मे देखील बोलावू लागलो होतो . त्याच काळात व्यक्तिगत पातळीवर मी अत्यंत अवस्थ असायचो , अनेक अनुत्तरीत प्रश्न नेहमीच मनात गोधळ घालत असत , प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेण्याचे कुतूहल , चंचल मन , काहीतरी वेगळे किवा साहसी कृत्य करण्याची उर्मी .. स्वतच्या इच्छेने जगण्याचा हट्टी स्वभाव या स्वभावातील विशेषतां मुळे मनाविरुद्ध काही घडलेले सहन होत नसे , घरातील संस्कार .. रुढी वगैरे तर केव्हाच झुगारून दिलेल्या . कुटुंबीय फक्त दिवसरात्र ...अभ्यास.. आभ्यास ' असे टुमणे लावून होते साहजिकच घरात कमीत कमी वेळ थांबत असे फक्त जेवण आणि झोपणे इतकाच घरी सापडत असे थोडक्यात घर म्हणजे फुकटचे लॉजिंग व बोर्डिंग होते माझ्या दृष्टीने .
सिगारेट , दारू , गांजा , भांग अशी व्यसने देखील हळू हळू जीवनात स्थिरावत होती , एकंदरीत माझे हे असे बेताल वागणे पाहून आईने कोठून तरी एका प्रसिद्ध जोतिष्या बद्दल माहिती काढली .. माझी पत्रिका त्याला नेऊन दाखवली .. माझे वागणे कसे हाताबाहेर होत आहे याचे यथासांग वर्णन केले असावे तिने .. कारण नंतर मला कळले की जोतिषी एकदम गंभीर झाला होता .. त्याने निष्कर्ष काढला की याने प्लांचेट करून बोलावलेले आत्मे योग्य ठिकाणी परत गेलेले नाहीत व ते सतत याच्या भोवती असतात , याला अवस्थ करतात .. तसेच याच्या राशीत ' शनी ' आला आहे तेव्हा तो शनी याच्यावर काही ना काही गंडांतर आणत राहणार नेहमीच .. याने दर शनिवारी ' शनी ' चा उपास करावा , शनी महात्म्याचे वाचन करावे , शनीला तेल व रुईची माळ घालावी असे केले तर सगळे नीट होईल तसेच आत्म्याच्या शांतीसाठी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन ' त्रिपिंडी , नारायण नागबली , व कालसर्पयोग ' अशी पूजा करावी . आई जोतीष्याकडून आल्यावर हे सगळे वडिलांना सांगताना मी गुपचूप ऐकले तसेच आई पुढे हे देखील म्हणाली जे घडते आहे त्यात तुषार चा फारसा दोष नाही तर शनी महाराज आणि हे आत्मे सगळा गोंधळ घालत आहेत ..
हे ऐकून मला हायसे वाटले .. त्यानंतर मी काही चूक केली आणि घरी रागावू लागले की मी त्राग्याने म्हणू लागलो की यात माझा काही दोष नाहीय हे तुम्हाला माहित असून मला का रागावता ? म्हणजे ' मी ' अगदी गरीब , ' बिच्चारा ' होतो .. जे काही विपरीत घडते आहे त्यात माझा काही दोष नाही ही भावना अत्यंत सुखावणारी होती . मला वाटते प्रत्येकाला आपल्या चुकांचे खापर फोडण्यासाठी काहीतरी कारण लागतेच .. मला ते कारण आयतेच मिळाले होते . ' त्रंबकेश्वर ' चा आईचा प्रस्ताव मी धुडकावून लावला कारण मलाही ही भीती वाटत होती की जर खरेच आत्मे शांत झाले तर मग मला नीट वागावे लागेल . ' शनी ' चे मात्र आईने जास्तच मनावर घेतले होते , तिने बाजारात जाऊन एक शनी महात्म्याची पोथी आणली व दर शनिवारी मला वाचण्यास सांगितले , तसेच 'शनी ' मंदिरात जाऊन तेल , माळ वगैरे साग्रसंगीत विधी करावेत असा आग्रह केला आणि त्या बदल्यात मी तिच्या कडून अनेकदा पैसे उकळले , बिचारी वडिलांपासून लपवून मला पैसे देत होती आणि मी तिच्या मायेचा , प्रेमाचा गैरफायदा घेत होतो . ' शनी ' महाराजांची पोथी वाचताना एक गोष्ट जाणवली हे महाशय खूप उग्र , कोपिष्ट , ताकदवान आहेत , अगदी इंद्र , विक्रमादित्य , सूर्य , यानाही शनीने सोडलेले नाही असे त्या पोथीत होते , शनीच्या कोपाला सर्व देवता घाबरत असत असे वर्णन त्या पोथीत होते .. ते वाचून मला जरा रागच आला त्यांचा .. उगाच कोणाच्या तरी राशीत जाऊन बसायचे ... त्याला पिडायचे हे बरे नव्हे , पोथी वाचताना ' शनी ' महाराजांबद्दल आदर कमी आणि रागाची भावना जास्त असे . उपास केले पण अनेकदा ते मोडले देखील , तेल , माळ विधी दर शनिवारी करतच होतो असे नाही पण त्या नावाखाली आईकडून पैसे उकळत होतो .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें