भाग १०१ वा धोक्याचा अलार्म !
आमच्या मित्रांचा रमेशला सकाळी ड्युटीवर आला की कांबळे अंगावर टाकून ठोकण्याचा धाडशी प्लान पक्का झाला .. धाडशी म्हणण्यापेक्षा आत्मघाती प्लान म्हणणे अधिक योग्य राहील ..पूर्वी मी वार्ड न. १८ मध्ये असतांना माझा अटेंडंट मित्र सुनील कडून... ऐक किवा त्यापेक्षा जास्त पेशंट आक्रमक होऊन अटेंडंट वर हल्ला करत असतील तर ..अटेंडंट आपल्या खिशात असलेली शिटी काढून वाजवतो ..शिटीचा हा विशिष्ट आवाज धोक्याची सूचना असतो व अशी सूचना मिळाल्यावर शिटी ज्यांना ज्यांना ऐकू येईल ते सगळे अटेंडंट ..शिटी ज्या दिशेने वाजते आहे तेथे कसे मदतीला धावतात ..या बद्दल चे किस्से ऐकले होते ..ते किस्से खचितच चांगले नव्हते ...मी दुसऱ्या दिवशी देखील कोनाप्पाला तसे सांगण्याचा प्रयत्न केला ..कोनाप्पा काहीच ऐकायला तयार नव्हता ..आणि तसेही आम्ही व्यसनी लोक प्रचंड हट्टी ..जिद्दी असतोच ..फक्त हा हट्ट नेमका आपल्या फायद्याचा आहे किवा नाही याची जाणीव नसते आंम्हाला .. सरळ सांगून ऐकणारे असतो तर आम्हाला व्यसनमुक्ती केंद्रात यावेच लागले नसते . आपण सरळ बाहेर जाऊन किचन मध्ये किवा इतर अटेंडंटना हे सगळे सांगावे असाही विचार माझ्या मनात येत होता ..परंतु त्या नंतर पुन्हा वार्डातील लोकांवर काहीतरी गंभीर कारवाई झाली असती ..या लोकांनी काही प्लान केल्याचे कबुल तर केले नसतेच वर मी खोटे बोलतोय असे सिद्ध केले असते .. रविवारचा दिवस अत्यंत बैचीनीत गेला माझा ..रमेशला मारण्याचा प्लान केलेले लोक देखील अधीर झाले होते .. शेवटी रात्री मी झोपताना निर्णय घेतला की आपण सकाळी लवकर पलंगावरून उठायचेच नाही अंगावर पांघरूण घेऊन पडून राहायचे जे जे होईल त्याचा कानोसा घेत राहायचा ...सोमवारी नेहमी प्रमाणे मला तेथे पहाटे पाच ला उठायची सवय लागली होती .त्या प्रमाणे उठलो .ब्रश ..वगैरे करून पहाटे आलेला चहा घेऊन ..पुन्हा तोंडावर पांघरूण घेऊन झोपलो ..पांघरूणाच्या आत कान टवकारून होतो .. पावणे सात च्या सुमारास रात्रपाळीचा अटेंडंट गेट उघडून बाहेर गेल्याचा आवाज आला ..मग दिवसपाळीचा स्वीपर ड्युटीवर आल्याचा आवाज ..पन्हा रात्रपाळीचा अटेंडंट बाहेरून आत आल्याचा आवाज ..सगळे मित्र आपापसात हलकेच बोलत होते ..रमेश येण्याची वाट पाहत होते ..
बरोबर सात वाजता रमेशचा गेट वाजविण्याचा ... गेट उघडले गेल्याचा आवाज .. रात्रपाळीचा अटेंडंट बंडू आणि रमेशच्या बोलण्याचा आवाज ..पांघरूणाच्या आत माझे ..कान लांब ..डोळे टक्क उघडे ... रमेश गिनती करण्यासाठी आधी २ नंबरच्या खोलीत गेला ..तेथे चार जण मोजून मग आमच्या ३ न. च्या खोलीत आला ..पाच .सहा ..सात .आठ ..नऊ..दहा आकडा मोजताना रमेश माझ्या पलंगाजवळ होता त्याने माझ्या तोंडावरचे पांघरून काढले ' तुषार ..काय रे ..आज झोपून आहेस ? " " काही विशेष नाही.. जरा तब्येत बरी नाही माझी " मी उत्तरलो ..यावर माझ्या अंगात ताप तर नाही याची खात्री करून घेण्यासाठी रमेश ने कपाळाला हात लावला .." ताप तर दिसत नाहीय ..सिस्टर आली की गोळ्या घे " असं सल्ला देऊन रमेश चार नंबर च्या खोलीकडे गेला ....पाचच मिनिटात " मेलो .मेलो .." अशी रमेशची आरोळी ऐकू आली मग धावण्याचे धडपडीचे आवाज ..रमेश आमच्या खोलीसामोरील व्हरांड्यातून धावत ओरडत गेट जवळ गेला त्याच्या जवळच्या चावी ने त्याने गेट उघडले आणि बाहेरून पुन्हा गेट लावून घेतले ..त्याचा मागे आमचे मित्र पण धावत गेल्याचा आवाज आला ..ते सगळे गेट जवळ आतल्या बाजूला जमले होते तर रमेश बाहेरून त्यांना शिव्या देत होता ..आता मी देखील उठून बाहेर आलो ..बाहेर रमेश चा आरडाओरडा एकूण इतर ठिकाणी ड्युटी वर जाणारे अटेंडंट ..स्वीपर असे तीनचार जण जमले होते .. रमेशच्या शिव्या ऐकूण आमचे मित्र देखील आतून शिव्या देऊ लागले .. आमच्या वार्ड चा सिनियर आलेला होता तेथे ..रमेश ने त्यांना सगळी हकीगत सांगितली ..मी पाचव्या खोलीत गिनती करायला गेलो ..मागून माझ्यावर कोणीतरी कांबळे टाकले आणि मला पाच सहा जणांनी खूप मारले कांबळे झटकून मी बाहेर पळत आलोय ..मला सैय्यद ..राहुल ..कोनाप्पा ..ऑस्कर ..अनिल वगैरे मला मारताना ओझरते दिसले आहेत ..म्हणजे रमेश ने बरोबर कोणी कोणी मारले ते पहिले होते ..रमेश चे बोलणे ऐकूण आतून कोनाप्पा आणि मंडळी ' ये झुठ बोल रहा है ....हमने कुछ नही किया सिनियर ' असे समर्थन देऊ लागला .. " परसो भी इसने हमपर झुठ इल्जाम लगाया ' ..असे ओरडू लागली ..दोन मिनिटे सिनियर स्तब्ध राहिला मग त्याने मला विचारले " तुषार ..खरे सांग काय भानगड आहे ? " " सिनियर ..माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी झोपलो होतो ..रमेश ला माहित आहे ' माझे उत्तरास रमेशने देखील " तुषार झोपला होता " असे सांगून दुजोरा दिला . " कोनाप्पा ..आखरी बार पुछ रहा हुं ..सच बताओ क्या हुंवा ? " सिनियर ने निर्वाणीचा इशारा दिला ..कोनाप्पा मात्र कानाला हात लावत होता
..शेवटी सिनियर ने त्याच्या खिश्यातून ऐक पितळीशिटी काढली रमेश ला इशारा केला ..रमेश ने देखील त्याच्या खिश्यातून पितळी शिटी काढली ..त्यांच्या खिश्यात अशी शिटी असते हे मी जुना असल्याने मला माहित होते ..दोघांनी जोरात शिटी फुंकण्यास सुरवात केली ..त्यांच्या बरोबर असलेल्या इतर तीन अटेंडंटनी देखील त्यांच्या जवळील शिट्या काढून फुंकण्यास सरुवात केली ..आसमंतात सगळीकडे शिट्यांचा कर्कश आवाज घुमू लागला ..आतील सगळी मंडळी बावचळल्या सारखी उभी होती ..पाहतापाहता सगळ्या बाजूनी इतर वार्डातील अटेंडंट हातात काठ्या घेऊन आमच्या वार्डाकडे धावत येऊन लागले ..सिनियर ने वार्डचे बाहेरून लावलेले दार उघडले आत आला आणि आधी कोनाप्पाच्या कानाखाली लावली .." तुषार ..तू तुझ्या पलंगावर जाऊन झोप अशी त्याने मला ओरडून सूचना दिली " ..मी त्वरित पलंगावर जाऊन पडलो ..जोरजोरात आरडाओरडा ..काठ्या आपटण्याचे आवाज ..सुमारे शंभर ऐक अटेंडंट आमच्या वार्डात घुसले होते ... आमच्या मित्रांचे विव्हळण्याचे आवाज ..किंचाळण्याचे आवाज .. एकदोन वेळा कोणीतरी माझ्या तोंडावरचे पांघरून कढले तर रमेश ओरडला " तुषार ..नव्हता ..तो झोपला होता " पन्हा ते पांघरून काढणारे इतरांकडे वळत होते .. सुमारे अर्धा तास अशी धुमश्चक्री चालली ..मग एकदम स्मशान शांतता पसरली ..मी तोंडावरचे पांघरूण काढले ..हळूच खोलीच्या बाहेर आलो व्हरांड्यात आमचे अधीक्षक लव्हात्रे साहेब उभे होते .. त्यांच्या आसपास सगळे अटेंडंट कोंडाळे करून होते ..लव्हात्रे साहेब सर्वाना काहीतरी सूचना देत होते ..मला पाहताच त्यांनी मला जवळ बोलाविले .. रमेश ने त्यांना ' साहेब हा तब्येत बरी नाही म्हणून झोपून होता ' असे सांगितले त्यावर त्यांनी माझी फाईल मागविली व मला सांगितले " मी तुला ..पूर्वीच्या वार्ड नंबर १८ मध्ये ट्रान्स्फर करतोय ...आता या पुढे या वार्डकडे अजिबात फिरकायचे नाहीस ..या मित्रांना भेटण्याचा प्रयत्न करायचा नाहीस " मी होकारार्थी मान डोलविली . माझे सामान घ्यायला माझ्या खोलीत आलो ..सामान आवरून हळूच कोणाचे लक्ष नही पाहून बाजूच्या खोलीच्या खिडकीतून आत डोकावले तर आमचे सगळे वाघ पलंगाना बांधून ठेवले होते ..कोनाप्पा ..ऑस्कर ..सैय्यद ..राहुल .. अनिल ..अशोक एकूण आठ जणांना बांधण्यात आले होते ..सर्वांची तोंडे फुटली होती ..ते विव्हळत होते ..माझ्याकडे पाहून कोनाप्पाने मान दुसरीकडे वळविली .
========================================================================
भाग १०२ वा जिवनातील पहिले व्याख्यान !
मला लव्हात्रे साहेबांनी एक अटेंडंट सोबत देऊन माझी पूर्वीच्याच जुन्या वार्ड नंबर १८ या स्पेशल वार्ड मध्ये पाठवणी केली ..तेथील सर्व अटेंडंट ना खूप आनंद झाला ..मला पाहून म्हणाले ..बरे झाले तू येथे आलास ..आम्हाला वाटलेच होते की सात नंबर वाले कधीतरी मार खाणार आहेत ते ..त्या दिवशी सायंकाळी घडल्या प्रकाराचा विचार करताना ऐक गोष्ट जाणवली .. नक्कीच मला अनघाच्या पत्राने वाचविले होते ..तिचे पत्र आल्यानंतरच मला उपरती होऊन मी त्या मुलांबरोबर गांजा पिण्यासाठी जाणे बंद केले होते ..तसे झाले नसते तर ..कदाचित मी देखील त्या दिवशी त्यांच्या बरोबर संशयास्पद म्हणून सापडलो असतो रमेशच्या तावडीत ..खुन्नस म्हणून रमेशला मारण्याच्या प्लान मध्ये देखील सहभागी झालो असतो ..वाटले अनेक घटनांचे मूळ जुन्या कधीतरी घडलेल्या घटनेत असते .हा योगायोग देखील असेल .. असा सहजयोग जुळून येणे हे काही सर्वसाधारण नव्हते ...अनघाच्या माझ्यावरील निस्सीम प्रेमामुळेच मी वाचलो होतो . .मी अनघाच्या पत्रानंतर दुसऱ्याच दिवशी एक पत्र लिहून सोशल वर्कर देशमुख साहेबांकडे दिले होते ..त्याला आता दहा दिवस होऊन गेले होते ..तिच्या उत्तराची मी अधीरपणे वाट पाहत होतो ..दुसऱ्या दिवशी मला रमेश किचन मध्ये गेलो असतांना भेटला ..त्याने सांगितले ..कालच सायंकाळी ' स्नेहदीप ' मधील सर्व पेशंटच्या पालकांना साहेबांनी तार करून बोलावून घेतले होते ..त्यापैकी कोनाप्पा ..ऑस्कर आणि सैय्यद सोडून सर्वाना आपापल्या पालकांच्या सोबत घरी पाठवून दिले होते .. त्यांच्या फाईल वर पुन्हा कोणत्याही सरकारी रुग्णालयात दाखल केले जाऊ नये अशी सूचना देखील लिहिली होतो लव्हात्रे साहेबांनी ..कोनाप्पाला खूप मार लागला होता त्याचा जबडा भंगला होता कोणीतरी तोंडावर दंडुका मारल्याने त्याला तोंडच उघडता येत नव्हते ..त्यांच्यावर पुढील उपचार करण्यासाठी त्याला मेंटल हॉस्पिटलच्याच वार्ड नंबर ११ ( सिक वार्ड ) मध्ये ठेवण्यात आले होते .. सैय्यद आणि ऑस्करला त्यांच्या पालकांनी दोन दिवसांनी घरी नेतो असे सांगितले होते .. नंतर कोनाप्पा ..सैय्यद आणि ऑस्कर च्या पालकांनी मेंटल हॉस्पिटल च्या कर्मचारी वर्गावर मारहाण केल्याची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली ..रमेश ने देखील ' कर्तव्य बजावताना जीवघेणा हल्ला झाल्याची ' त्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविली होती ..म्हणजे भानगड आता पोलिसात गेली होती ..
दुसऱ्या दिवशी मला लव्हात्रे साहेबांनी त्यांच्या ऑफिस मध्ये बोलाविले व म्हणाले ' तुषार ..तू मला सगळा प्रकार काय घडला ते नीट सांगून टाक ' मी मला नक्की काहीच माहित नाही असे म्हणालो तर हसून म्हणाले ' तू नक्कीच इतका सरळ नाहीस ..मला तुमच्या वार्ड मधील एका अल्कोहोलिक पेशंट ने एक दिवस आधी ..रात्री सर्व गर्दुल्ल्यांची खूप वेळ पर्यंत मिटींग चालली होती हे सांगितले आहे ..व त्या वेळी तू नक्कीच जागा असशील ..तू जरी त्यांच्यात नव्हतास तरी तुला सर्व माहित असून तू आम्हाला त्या बदल पूर्वकल्पना दिली नाहीस हा तुझा गुन्हा आहे ..तुला जर यात अडकायचे नसेल तर मला आताच सगळे खरे खरे सांगून टाक ' त्यांनी असे म्हंटल्या वर मी त्यांना तशी मिटींग झाल्याची कबुली दिली ..रात्रीच्या मिटींग चा सविस्तर वृत्तांत ऐकल्यावर म्हणाले ' मी या लोकांना इतक्या सवलती दिल्या होत्या ..त्याचा सर्वानी गैरफायदा घेतला ..वर्तमान पत्रात देखील बातमी आलीय ..सगळीकडे ' स्नेहदीप ' कक्ष बदनाम झालाय ..हे सगळे निस्तरताना मला खूप त्रास होतोय ..उद्या पोलीस येतील तुझे बयान घ्यायला तेव्हा त्यानाही मला जे सांगितले तेच सांग " मी होकारार्थी मान डोलाविली ..नंतर माझे बयान घ्यायला आलेल्या पोलिसांना देखील मी तीच माहिती लेखी दिली . आता ' स्नेहदीप ' मध्ये फक्त दोन अल्कोहोलिक पेशंट उरले होते .. बाकी सगळे आपापल्या घरी गेले होते .
मी जुन्या वार्ड मध्ये सेटल झालो ..साधारण ऐक आठवड्याने आमच्या वार्डच्या सिनियर कडे निरोप आला की तुषार ला सकाळी ११ वाजता नवीन कपडे घालून तयार राहायला सांगा ..त्याला लव्हात्रे साहेब बाहेर कार्यक्रमाला घेऊन जाणार आहेत ..मला नक्की कार्यक्रम काय आहे ते कळाले नाही ..सिनियर ने मला मेंटल हॉस्पिटलचाच पण नवा लाल रंगाचा बिन कॉलरचा हाफ शर्ट व नवीन पायजमा दिला .. साधारण साडेदहा वाजता ऐक शिपाई मला न्यायला आला त्याच्यासोबत मी लव्हात्रे साहेबांच्या केबिन मध्ये गेलो ..साहेब मला म्हणाले ' तुषार ..आपल्याला शेजारीच असलेल्या ' ज्ञानसाधना ' महाविद्यालयात ' व्यसनांचे दुष्परिणाम ' या विषयावर तेथील विद्यार्थी वर्गाचे प्रबोधन करण्यास जायचे आहे ..तेथे तुला आपले अनुभव कथन करायचे आहेत ..व्यसनाचे किती भयंकर परिणाम होतात हे तू मुलांना सांगायचे आहेत " मी जरा बिचकलो ..मी जरी बिंधास होतो आणि मंचावर उभे राहून गाणे म्हणण्याचा मला अनुभव होता तरी एकदम इतक्या मुलामुलींसमोर व्याख्यान देणे म्हणजे जरा अवघडच वाटले मला ..' सर् ..पण मला हे जमेल का ? अशी मी शंका व्यक्त केली " तर ते म्हणाले ' जर तुला इतकी भयंकर नशा करायला जमले तर हे देखील नक्कीच जमेल ' मला त्यांनी धीर दिला ..बरोबर अकरा वाजता आम्ही बाहेरच्या बाजूने मेंटल हॉस्पिटलला लागूनच असलेल्या ' ज्ञानसाधना ' महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोचलो .. प्रवेशद्वारावरच एका बोर्डावर आजच्या व्याख्यानाचा विषय ' व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम ' असं लिहून .. खाली प्रमुख वक्ते म्हणून ..डॉ. लव्हात्रे .व .तुषार नातू असे लिहिले होते ते वाचून कसेतरीच झाले मला प्रमुख वक्ते मेंटल हॉस्पिटल च्या कपड्यात पायात जुनी स्लीपर घालून भाषण देताना कसे दिसतील ..याचे मनातल्या मनात हसू आले मला ...तेथे चष्मा घातलेल्या एका व्यक्तीने आमचे स्वागत केले त्यांचे नाव प्रा . प्रवीण दवणे होते असे त्यांनी सांगितले ..त्यावेळी ते आजच्याइतके सुप्रासिध्द गीतकार व कवी नव्हते ... त्यांनी आम्हाला एका मोठ्या हॉल मध्ये नेले .. तेथे बाके ठेवली होती आणि त्यावर बसलेल्या मुलामुलींनी तो हॉल तुडुंब भरला होता .. आमचे आगमन होताच सगळ्यांनी टाळ्या वाजवून आमचे स्वागत केले ! गर्दीत एकाने मला हात उंचावून अभिवादन केले ..पाहतो तर तो माझा लहान चुलत भाऊ मिलिंद होता ..तो या महाविद्यालयात शिकतो हे मला माहित होते ..पण तो आज असेल असे वाटले नव्हते .. माझ्यावरील दडपण अधिकच वाढले .
व्यासपीठावर आम्ही स्थानापन्न होताच महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आमचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले .. नंतर लव्हात्रे साहेबाना त्यांनी बोलण्याची विनंती केली .. लव्हात्रे साहेब थोडेच बोलले ..त्यांनी निरनिराळी व्यसने करणाऱ्या तरुणांचे वाढते प्रमाण खूप चिंताजनक आहे हे सांगितले व नंतर आता प्रत्यक्ष अश्या व्यसनांचा अनुभव घेऊन चुकलेल्या व आता सुधारणे साठी आमच्या कडे दाखल असलेल्या मुलाचे अनुभव आपण ऐकावेत असे सांगितले ..त्या बरोबर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला ..बाके वाजली ..शिट्या झाल्या ..माझे इतके उत्स्फूर्त स्वागत होईल असे मला वाटले नव्हते .. सर्वाना व्यसनी व्यक्ती कसा दिसतो ..कसा बोलतो वगैरे बद्दल कुतूहल असावे असे जाणवले ..घाबरत उभा राहिलो ..सुरवात केली ' नमस्कार मित्रानो ..माझ्या अंगावरील कपडे पाहून आपण समजलाच असाल की मी वेडा आहे ते ..म्हणजे खऱ्या अर्थाने वेडा ..सगळे समजत असूनही वेडेपणा करणारा ... आणि मग माझ्या कॉलेज जिवनात व्यसनाची सुरवात कशी झाली.. ते येथपर्यंत कसा आलो तो आठवेल तसा प्रवास मी सांगत गेलो ..शेवटी सर्वाना आपण कोणीही अश्या प्रकारच्या व्यसनांच्या नादी लागू नये अशी विनंती केली ..थांबलो तसा पुन्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला .. माझ्या अंगावर शहारे उठले होते .जेव्हा जेव्हा मी खूप संवेदनशील असतो तेव्हा असं अंगावर शहारे येतात माझ्या ... कार्यक्रम संपल्यावर जेव्हा दोन तीन जण माझी सही घेण्यास आले तेव्हा तर मी चक्क लाजलो ..बापरे आपली सही ? गोंधळून सही केली ..मला शुभेच्छा देऊन माझ्याशी हात मिळवण्यासाठी खूप मुले जमली होती अवतीभवती .
=======================================================================
भाग १०३ वा स्नेहसंमेलन !
लव्हात्रे साहेब देखील माझ्या भाषणावर खूप खुश झाले .. त्यांनी त्या दिवसापासून मला हॉस्पिटलच्या कपड्याऐवजी घरचे कपडे घालण्यास स्वतःहून सांगितले ..माझ्या कडे येताना सोबत आणलेला एक शर्ट आणि पँट चा जोड होता ...ते कपडे मी घालायला सुरवात केली ..सुनील आणि शत्रू या अटेंडंट मित्रांनी देखील त्यांचे टी शर्ट्स आणि जीन्स मला घालायला आणून दिले .. मेंटल हॉस्पिटल चे वार्षिक स्नेहसंमेलन आता जवळ आले होते ..मी सहभाग घेतलेल्या एकांकिकेची रिहर्सल ..स्नेहसंमेलनाकरिता खास मेंटल हॉस्पिटल च्या कर्मचाऱ्यांनी बसविलेला आँर्केस्टूा ची गाणी बसविणे यात माझा मस्त वेळ जात होता ..मी एकूण तीन गाणी म्हणणार होतो ..ऑफिस मधील एक क्लार्क मुलगी गीता आणी मी असे दोघे मिळून ' शुक्रतारा मंद वारा ' हे मराठी गीत म्हणणार होतो ..माझे वैयक्तिक ' पल पल दिलके पास ' हे किशोरकुमार चे गाणे व हेमंत कुमारचे ' ना तुम हमे जानो ' हे गीत देखील बसविले होते .
आता ' स्नेहदीप ' मध्ये केवळ तीनच पेशंट उरले होते त्यातील दोन अल्कोहोलिक होते आणि एक ब्राऊनशुगर चा नवीन मित्र दाखल झाला होता ..लव्हात्रे साहेबांनी मला नियमित ' स्नेहदीप ' ला भेट देवून तेथील मुलांना सुधारणेची प्रेरणा देण्यास सांगितले ..त्यांनी मनात ' स्नेहदीप ' ची पुन्हा नव्याने बांधणी करायचे ठरवले होते ..त्यासाठी ते माझी मदत घेत होते ..त्याच वेळी अनघाचे दुसरे पत्र देखील आले ..त्यात ती मला भेटण्यासाठी खूप आतुर झाली असल्याचे तिने लिहिले होते ..मी देखील खूप आतुर झालोच होतो ..पण मला किती दिवसांनी सुट्टी मिळेल हे नक्की नव्हते ..मला आता दाखल होऊन सुमारे चार महिने उलटून गेले होते ... त्याच काळात नाताळच्या वेळी आम्ही येशू ख्रिस्ताच्या जन्माचा गोठ्याचा देखावा तयार करून नाताळ साजरा केला त्यासाठी एक गीत बसविले होते ' येता का बेथलहेमाला ..येता का ' असे हे गीत येशू ख्रिस्ताच्या जन्माची बातमी सगळ्यांना देणाऱ्या आशयाचे होते ते मी सादर केले ..प्रत्यक्ष स्नेहसंमेलनाच्या दिवशी मला सुनील ने त्याचा कोट घालायला दिला होता ..आधी एकांकिका झाली त्यातील माझी डॉक्टरची भूमिका छानच झाली ..त्यानंतर गाणी झाली ..लव्हात्रे साहेब सपत्नीक समोरच बसले होते ..माझे ' पल पल ..दिलके पास तुम रहेती हो ' गीत त्यांना इतके आवडले की त्यांनी गाणे संपल्यावर ताबडतोब मला पन्नास रुपये रोख बक्षिस दिले . त्या दिवशी रात्री कार्यक्रम संपल्यानंतर सर्व स्टाफ ची तेथे स्टेजवरच रात्री १२ नंतर पार्टी बियर पार्टी झाली ..मला खूप आग्रह झाला म्हणून थोडी बियर घेतली त्यांच्या बरोबर ..स्नेह संमेलन संपल्यानंतर दोन दिवसातच मला अन्नातून विषबाधा झाल्याचे निमित्त होऊन ' सिक वार्ड ' मध्ये एक आठवडा रहावे लागले ..झाले असे माझ्या सकाळी एका अटेंडंट मित्राने त्याच्या घरून माझ्या साठी ' खिमा ' बनवून आणला होता ..त्याने मला सांगून तो डबा अटेंडंट ऑफिसच्या डूावर मध्ये ठेवला होता... दिवसभर मी ते विसरूनच गेलो होतो आणि रात्री मला त्याची आठवण झाली तेव्हा तो डबा मी खाल्ला ..दिवसभर बंद डब्यात ठेवलेला गरम पदार्थ खराब होतोच .. मला दुसऱ्या दिवशी सकाळी जुलाब सुरु झाले .
दोन तासातच मला पाच वेळा जावे लागले होते ..खूप अशक्त पण आला होता ..डॉक्टर ने तपासून मला औषध दिले .पण संध्याकाळ पर्यंत सुमारे १० वेळा जाऊन मला चालणे देखील अशक्य झाले ..माझी अवस्था पाहून मग डॉक्टर नी मला ' सिक वार्ड येथे हलविण्याचा निर्णय घेतला चक्क स्टेूचर वर झोपवून मला ' सिक वार्ड ' ला नेले गेले . हॉस्पिटल चा हा विभाग अतिशय आजारी असलेल्या व मृत्युपंथाला असलेल्या रुग्णांना ठेवायचा होता .. रात्री जेव्हा मला स्टेूचर वरून तेथे नेण्यात आले तेव्हा तिथे पलंग खाली नव्हता .. दोन अटेंडंट आपापसात बोलत होते की आताच ९ नंबर च्या बेडवरील पेशंट खपला आहे ..त्याचा बेड पाच मिनिटात खाली होईल तेथे मग तुषारला ठेवू ..हे ऐकून माझ्या मनात धडकीच भरली ..इतका अशक्तपणा जाणवत होता की मला अगदी बोलण्याचे देखील त्राण उरले नव्हते ...
=======================================================================
भाग १०४ वा सिक वार्ड !
९ नंबरचा बेड खाली करताना मला वार्डच्या व्हरांड्यातच ठेवले होते स्टेूचर वर ते कलेवर उचलून चार जणांनी एका दुसऱ्या स्टेूचर् वर ठेवले .... आणि मग चादर वगैरे उचलून नवीन चादर टाकून मला त्या पलंगावर आधार देवून झोपवले गेले .. खूप घाणेरडा वास येत होता त्या पलंगावर ... उशी वगैरे बदललेली नव्हतीच .. तो वास असह्य होऊन मला उलटीच आली एकदम ... उलटी करायला म्हणून जर उठलो आणि माझी नजर बाजूला असलेल्या पलंग न ठेवलेल्या हॉल कडे गेली ..त्या हॉलल जाळीचे दार लावले होते आत जरा अंधारच होता नीट निरखून पाहिल्यावर त्या अंधुक उजेडात अनेक दुर्दैवी जीव दिसले ... अंगावर एकदम काटाच आला ... तेथे ज्यांना अजिबात चालता येत नाही ... बोलता येत नाही ..हातापायाच्या काड्या झालेल्या आहेत आणि बहुतेकांच्या अंगावर एकही चिंधी नाही असे लोक होते ... ते अक्षरशः बूड घासत इकडे तिकडे सरकत होते ... आणि सगळीकडे घाणीचे साम्राज्य होते .. हे असे दुर्दैवी होते ..जे असेच जन्माला आले होते .. अगदी हाडामासाचा गोळाच एकप्रकारे .. हा गोळा खायला दिले तर खाईल... काहीना तर स्वतच्या हाताने खाणे देखील शक्य नव्हते कारण हात देखील पायासारखेच लुळे पडलेले .. त्यांचे सारे नैसर्गिक विधी बसल्या जागीच चालत .. स्वीपर किती आणि किती वेळा साफ करणार ? प्रत्येक विधी नंतर वार्ड स्वच्छ फिनेल वगैरे टाकून धुणे शक्यच नव्हते ..कारण तसे झाले तर दिवसातून किमान पन्नास वेळा तरी वार्ड धुवावा लागला असता .. मी असलेल्या विभागात जरा तरी स्वच्छता होती कारण सर्व पेशंट बेडवर होते .. विधी केला तर फक्त चादर बदलली की झाले ..तेथे मात्र जमीनिवरील फरशी कशी बदलणार ? मला उलटी होतेय पाहून सिस्टर ने लगेच एक प्लास्टिक ची बादली आणून माझ्या बेडखाली ठेवली ..पोटात काही नव्हतेच तरी उलटीची उबळ येत होती नुसताच आँकक्क ..उउउऊ असा आवाज होत होता... खपाटीला गेलेले पोट छातीत येतेय की काय असे झाले .. जीव एकदम गुदमरल्यासारखा झाला .. उलटीची उबळ थांबली तसा प्रचंड दमल्यासारखा मी कोसळलो बेडवर ...छातीचा भाता जोरजोरात वरखाली होत होता .. सिस्टर ने मला सलाईन लावले ... मग त्या असह्य दुर्गंधीत सलाईन मधून पडणाऱ्या एकेका थेंबाकडे पाहत राहिलो .
स्नेहसंमेलन झाल्यावर मेंटल हॉस्पिटल च सर्व स्टाफ बहुधा मला ओळखू लागला होता .. त्यामूळे सिस्टर .. वार्ड अटेंडंट ..तत्परतेने मला मदत करत होते ..अधूनमधून न राहवून मी त्या बाजूच्या जरा अंधाऱ्या जागेकडे बघत होतो .रौरव म्हणतात तो हाच असावा असे वाटले ...हे बिचारे जीव अक्षरशः एखादी जीवघेणी शिक्षा भोगत होते जणू मानवजन्म घेऊन ...यांचा काय दोष असेल ? ज्यांनी जन्म झाल्यापासूनच काहीही कर्म केले नाही त्यांना हे फळ कोणत्या कर्माचे मिळाले असावे ? सर्वांचे चेहरे अगदी केविलवाणे होते ... सारखे कशाला तरी घाबरत असल्या सारखे भेदरल्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत असत ते जीव ..त्यापैकी काही बेवारस म्हणून फुटपाथ वरून उचलून आणले गेले होते तर काही चांगल्या घरातील होते मात्र त्यांचे घरातील अस्तित्व जणू घरच्या मंडळींसाठी एखाद्या काळ्यापाण्याच्या शिक्षेसारखे त्रासदायक ठरले होते ..किवा ..घरी त्यांचे मायेने करणारे कोणी नसावेत म्हणून इथे आणले गेले होते ..या आधी एकदा मी येथेच ' चिल्ड्रेन वार्ड ' पहिला होता तेथेही बहतेक मुले अशी वेडीवाकडी होती... बुडावर सरपटणारी ..केविलवाणी .. असहाय..काहीच न समजणारी त्या दिवशी रात्रभर जागाच होतो ..या खतरनाक ठिकाणचा पहिलाच दिवस म्हणून जास्तच संवेदनशील झालो होतो... सारखे मोठ्याने हंबरडा फोडून रडावे असे वाटत होते .. समज असलेल्या माणसांच्या जगात असे रडणे सर्वमान्य नाही याचे भान होते म्हणून रडू शकलो नाही ..त्यांची अवस्था पाहून आपण खरोखर खूप सुदैवी आहोत हे जाणवले .. तरीही आपल्याला निसर्गाने बहाल केलेल्या या निरोगी शरीराची किंमत नाही .. हात ..पाय.नाक ..कान ..डोळे सर्व अवयव जागच्या जागी सुस्थितीत ..सर्व परिस्थितीचे आकलन करणारा मेंदू ही किती मोठी देणगी आहे हे त्या दिवशी जाणवले ..तरीही या सुदृढ शरीराचा आपण किती दुरुपयोग करतोय ..स्वतःला ..इतरांनाही नुकसान पोचोवतोय .. जगातील प्रत्येक माणसाने हे एकदा तरी जाणीवपूर्वक पहिले पाहिजे म्हणजे त्याला नक्कीच आत्मभान येऊन त्याच्या मनात इतरांबद्दल असलेला राग ..खुन्नस .. द्वेष ..सूडभावना .. ....अन्याय ..हे सगळे धुवून निघून फक्त करुणा हा एकच भाव जागा राहील ..राजकुमार सिद्धार्थ देखील असाच दुखः पाहून व्यथित होऊन राजमहाल सोडून गेला होता.संत ज्ञानेश्वर देखील आपल्या ओवीत ' विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले ' असे याचसाठी म्हणाले असावेत . त्या अंधाऱ्या जागेतील जीव ..रात्री अधन मधून आपण जिवंत आहोत हे दाखविण्यासाठीच की काय पण भेसूर आवाजात मध्येच ओरडत होते ...विव्हळत होते ...मग त्यांच्या वर एखादा अटेंडंट किवा स्वीपर नुसता हातातील दांडा आपटून ' ए ए ए ' असे ओरडला की घाबरून बूड हलवून मागे सरकत होते ..येथील अटेंडंट .स्वीपर ..सिस्टर वगैरे मंडळी मात्र निर्विकारपणे त्यांचे काम करताना पाहून आश्चर्य वाटले ' रोज मरे त्याला ..' ही म्हण सार्थच आहे .
दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता एकदम माझा मोठा भाऊ ' सिक वार्ड ' मध्ये आला त्याच्यासोबत एक अटेंडंट होता ..भावाला तेथील वातावरण पाहून गांगरल्यासारखे सारखे झाले ते मला जाणवले ..त्याला मी आधी दिसण्याऐवजी मीच त्याला पहिले दारातून आत येताना .. मला पाहताच त्याच्या जीवात जीव आला ..माझ्याजवळ येऊन बाजूला उभा राहिला ..मला समजेचना हा असा अचानक कसा आला ? ..भाऊच मग सांगू लागला .. त्याला काल रात्री तार मिळाली होती मेंटल हॉस्पिटल कडून पाठवलेली ..त्यात फक्त ' तुषार नातू सिरीयस आहे .. ताबडतोब निघावे ' असा संदेश होता ..नेमके काय झाले ते पाहण्यासाठी तो तातडीने आला होता ... मी अन्नातून विषबाधा झाल्याचे त्याला सांगितल्यावर जरा शांत झाला ..त्याला बहुधा मी येथेपण काही भानगड केली की असे वाटले असावे म्हणून घाबरला होता .. डॉक्टरना भेटून त्याने मला डिस्चार्ज मिळू शकेल का अशी विचारणा केली तेव्हा डॉक्टर ने त्याला तुषार ला किमान एक आठवडा तरी कोठे हलवू नये असं सल्ला दिला .. माझाही हे ऐकून जरा विरस झाला ..पण डॉक्टरांच्या मते मला झालेली विषबाधा साधी नव्हती त्यामूळे दुर्लक्ष करून चालणार नव्हते ..भावाने मग बाहेरून माझ्यासाठी मोसंबी ..चिकू ..सफरचंदे वगैरे आणली ..वडिलांची तब्येत अजून तशीच आहे हे समजले ...सायंकाळच्या गाडीने जायचे म्हणून तो दुपारी निघून गेला .पुढच्या महिन्यात डिस्चार्ज घेऊ असे त्याने मला सांगितले .
=======================================================================
भाग १०५ वा पुन्हा ' स्नेहदीप !
' सिक वार्ड ' मध्ये दुसऱ्या दिवशी अशक्तपणा मुळे तसाच झोपून होतो .. मला सारखे सलाईन लावले जात होते ..आजूबाजूचा असह्य दुर्गंध नाकात ठाण मांडून बसला होता ..आणि ते दुर्दैवी जीव पाहून जीव कळवळत होता ..यांच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही ..आपणच काय इतके पुढे गेलेले सायन्स देखील इथे कुचकामी ठरते ..जगातील सर्व गोष्टींची उत्तरे शास्त्राला देता येत नाहीत ..कारणीमीमांसा जरी करता आली तरी ..उपाय ? .एका विशिष्ट टप्प्यावर सगळे शोध निष्प्रभ होतात ..या जगात नक्कीच कोणतीतरी अदृश्य शक्ती सूत्रबद्ध पद्धतीने कार्यरत आहे असे वाटू लागले ..याच अदृश्य शक्तीला वेग वेगळ्या धर्मानी वेगवेगळ्या नावात ..वेगवेगळ्या आकारात ...शोधण्याचा प्रयत्न केला असावा .. पुढे या मानवी शोधाला देखील मर्यादा पडल्या..शोध थांबला मग आपापल्या शोधाचे समर्थन सुरु झाले ..शक्तीप्रदर्शन होऊ लागले ..धर्मप्रसार म्हणजे धर्माने सांगितलेल्या तत्वांचा प्रसार असा अर्थ मागे पडून ....धर्माची डोकी वाढविण्याचा प्रकार सुरु झाला ..वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या नादात ती अदृश्य शक्ती ..अधिक धुसर होऊ लागली असावी ..माझ्या मनात काहीही विचार येत असत ..विचार करून करून मेंदूला उगाच शिणवत बसत असे मी तेथे . साधारण तीन दिवसांनी मी जरा उठून चालू फिरू लागलो ..या पाच दिवसात माझे सुमारे पाच किलो वजन कमी झाले होते ...आता जरा जेवण जाऊ लागले .. इथे रोज सकाळी दुध आणि त्या सोबत एक उकडलेले अंडे मिळत असे ..
त्या दुर्दैवी जीवांपैकी काही जणांना अन्न ..भूक या गोष्टींचे भान शिल्लक होते ..ते लोक जेवणाची ..नाश्त्याची वेळ झाली की ..सरकत येऊन जाळीजवळ येऊन थांबत आणि आशाळभूत पणे बाहेर बघत असत ..ज्यांना अन्नाची .. भुकेची देखील ओळख आली नव्हती त्यांच्या समोर जेव्हा ताट ठेवले जाई तेव्हा ते नुसतेच त्या ताटा कडे बघत बसत असत... ज्यांना भूक समजे पण ती क्षुधा कधी शांत होत नसे अश्या लोकातील एखादा चपळ जीव बुडावर सरकत येऊन त्यांच्या पुढील अंडे मटकावत असे मग ..अटेंडंट च आरडाओरडा सुरु होई ..म्हणजे यांच्यातही इतरांचा अधिकार झडप घालून हिरावून घेणारे महाभाग होते तर ... अन्नाची .. सत्तेची ..संपत्तीची .. शरीर भोगाची क्षुधा कधीच न शमणारे जीव आता पृथ्वीवर सगळीकडे वाढलेत ..ते देखील अशीच चपळपणे झडप घालून इतरांचा हक्क ..सराईतपणे हिरावून घेतात ..मी देखील त्यापैकीच होतो .. आनंदा मिळविण्याची माझी भूक इतरांना दुखः देऊ शकते ..इतरांचा आनंद हिरावून घेते .. याचे माझे भान संपले म्हणूनच तर असा व्यसनांच्या काल्पनिक आनंदाच्या वाटेवर मी पुढे पुढे जात राहिलो ...एक आठवडाभरात खूप काही विचार मनात येत असत .... एखाद्या गंभीर दार्शनिका सारखी अवस्था होत असे माझी ..एक आठवड्याने डॉक्टरनी मला ' सिक वार्ड ' मधून सुटी दिली ..सोबत खूप गंभीर अनुभव गाठीशी घेऊन मी तेथून बाहेर पडलो ..अनुभवातून शिकलो ..तरी ते आचरणात आणणे अनेकदा मला कठीण होते ..कारण ' मी तसा नाही ' किवा ' मी वेगळा आहे ' ही भावना उगाच अहंकाराला खत पाणी घालून सृष्टीचे नियम तोडण्याची अनावर इच्छा .
तेथून सुटी मिळाल्यावर लव्हात्रे साहेबांनी मला पुन्हा ' स्नेहदीप ' मध्ये पाठवण्याचे ठरवले .. तेथे आता चारपाच जण नवीन दाखल झाले होते .सगळी जुनी मंडळी निघून गेलेली होती ..नव्याने तेथे शिस्त प्रस्थापित करून ..नव्या पद्धतीने आता हा वार्ड चालवावा असे त्यांच्या मनात होते ..जरी पुन्हा मी ' स्नेहदीप ' मध्ये गेलो तरी आता तेथे मन लागेना ..जास्तीत जास्त वेळ मी ' मनोरंजन कक्षात ' गाणी म्हणण्यात .. इतर वार्डातील अटेंडंट सोबत गप्पा करण्यत घालवीत असे .. अठरा नंबर वार्ड मध्ये व्हीसीआर देखील होता ..त्यावर व्हिडीओ कँसेट लावून सिनेमा पाहणे हा आमचा सर्वांचा आवडता कार्यक्रम असे आठवड्यातून किमान दोनदा तरी .. चित्रपट आम्ही पाहत असू .. व्हिडीओ कँसेट आणण्यासाठी किमान दहा रुपये लागत .. माझी सगळ्या अटेंडंटशी ..स्टाफ नर्सशी चांगली ओळख झालेली होती त्यामूळे मी सगळीकडे फिरून किमान एक रुपया तरी दया अशी वर्गणी गोळा करून पैसे जमा करून मग अटेंडंट ना कँसेट आणायला पाठवत असे .. बहुधा दुपारच्या वेळी किवा रात्री आठ नंतर हा सिनेमाचा कार्यक्रम होई ..एकदा आम्ही मनोरंजन कक्षात दुपारी सिनेमा बघत असतांना बाहेर गेट जवळ काहीतरी आरडा ओरडा झाला म्हणून बाहेर आलो .. गेटजवळ ' चीना ' उभा होता ..चिना हे याला पडलेले नाव ..हा पेशंट ' स्नेहदीप ' च्या मागील संसर्गजन्य ..कुष्ठरोग झालेल्या लोकांच्या वार्ड मध्ये राहत असे ...त्याच्या दोन्ही हातांची आणि पायांची बोटे झडत चालली होती आणि तेथे कोरड्या लालसर जखमा तयार झाल्या होत्या ..नाक देखील चपटे झालेले म्हणून त्याला सर्व ' चिना ' म्हणत असत ..त्यालाही चिना म्हणण्याचा राग येत नसे .. हा चिना तरुणच होता साधारण माझ्याच वयाचा .. संसर्गजन्य वार्ड मधील हा एकमेव पेशंट बहुधा बाहेर फिरत असे बाकीचे आतच लपून बसत असत ..कदाचित झालेल्या आजारामुळे ते जणू अस्पृश्य होते ..बाहेरच्या जगाशी त्यांनी शरीर मनाने नाळ तोडली होती ..फक्त जेवण .औषध घेणे यापुरतेच ते लोक बाहेर दिसत .
.' चीना ' मात्र बिंधास बाहेर फिरत असे ..तो तेथे पेशंटला भेटायला आलेल्या नातलगांना पेशंटची भेट करून देण्याच्या कामात ' व्हिजीट ' रूम मधील अटेंडट ना मदत करीत असे आणि त्याबद्दल भेटायला आलेले नातलग चिना ला पैसे देत .. त्याच्या जवळ बरेच पैसे जमलेले असत नेहमी .. कुष्ठरोग .मानसिक आजार या दोन्ही गोष्टीनी तो पिडीत होता ..तर हा ' चिना ' बाहेरच्या दाराजवळ मला आत सिनेमा पाहायला येऊ द्या म्हणून अटेंडंटना विनवणी करत होता ..अटेंडंट त्याची मस्करी करत होते ..त्याला पन्नास रुपये तिकीट लागेल असे म्हणत होते आणि चीनाने त्याच्या हातात काही चिल्लर पैसे आणि पाच रुपयांची एक नोट काढली होती ..माझ्याजवळ इतकेच पैसे आहेत असे त्याचे सांगणे होते ..चिना ची मला दया आली आणि अटेंडट ना त्याला आत येऊ देण्याची विनंती केली ..आंत आल्यावर तो माझ्याकडे पाहून कृतज्ञतेने हसला .. माझ्या बाजूलाच तो जरा अंतर राखून अदबीने सिनेमा पहात बसला ... थोड्या वेळाने बिडी पिण्यासाठी म्हणून मी खिश्यात हात घातला तर बिडी नव्हती खिश्यात .. माझ्या बिड्या ' स्नेहदीप ' मध्ये माझ्या बेडखाली मी विसरून आलो होतो सिनेमा पाहायला ...मी बाजूच्या एका बिडी ओढणाऱ्या अटेंडट ला बिडी मागितली तर त्यानेही खिसे चाचपून संपली असे उत्तर दिले ..चिना हे सर्व पाहत होता .त्याने हळूच त्याच्या खिश्यातून एक बिडी बाहेर काढली ..चिना बिड्या ओढत नव्हता ..पण तो त्याला मिळालेल्या पैश्यातून थोड्या बिड्या विकात घेऊन त्या आत ज्या पेशंट कडे पैसे आहेत त्यांना जास्त भावाने विकत असे ..तसेच त्याच्या वार्डातील पेशंटना बिडी देत असे .. त्याच्या बोटे झडत चाललेल्या ..लालसर कोरड्या जखमा असलेल्या हातात त्याने बिडी कशीतरी पकडून तो हात माझ्या पुढे केला ..क्षणभर मला कसेतरीच झाले त्याच्याकडून बिडी घेण्यास मी चाचरतो आहे हे त्यालाही जाणवले असावे ..तो ओशाळवाणे हसला आणि हात पुन्हा मागे केला मी पटकन त्याच्या हातातील बिडी घेतली .. माझ्या शर्टाला पुसली आणि काडेपेटी काढून बिडी पेटवली ...तो समाधानाने हसला ..त मी जर त्याने दिलेली बिडी घेतली नसती तर त्याला वाईट वाटले असते ..त्याच्या आजाराची ही त्याला करून दिलेली जाणीव त्याच्यासाठी दुखः दायक असती ..त्याला वाईट वाटू नये म्हणून मी बिडी घेतली त्याच्याकडून ..चिना त्या दिवसापासून माझा चांगला मित्र झाला ..आता तोच व्हीडीओ कँसेट साठी पैसे जमविण्याचे काम करत असे ..एखाद्या दिवशी जात कमाई केली तर तो चक्क माझ्यासाठी बिडी बंडल पण आणत असे .
( बाकी पुढील भागात )
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें