प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.comसोमवार, 18 मार्च 2013

मुक्काम पोस्ट ..मेंटल हॉस्पिटल !

भाग ५६
माझा सगळा माज उतरल्या सारखा झाला होता , जीवघेणी टर्की , त्यात अनोळखी जागा , अनोळखी माणसे , कोणीही माझ्या मायेचे जवळ नाही साधे सहानुभूतीचे दोन शब्द देखील बोलणारे कोणी नाही , तसाच तडफडत पलंगावर सारखा उठबस करत होतो रात्रीचे १० वाजून गेले होते .. गोपाल माझ्या कडे पाहत येरझाऱ्या घालत होता .. तो मघाचा अटेंडंट दोन तीन वेळा दारातून मला मी जागेवर आहे की नाही ते पाहून गेला होता ..मुख्य दार उघडल्याचा आवाज आला आणि तीन चार माणसांचा बोलण्याचा आवाज .. मी कुतूहलाने कोण आले ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला ..गोपाल ने माहिती पुरवली की रात्री या वार्ड मध्ये एकूण दोन अटेंडंट असतात त्या पैकी ऐक आता उशिरा आला होता आणि त्याच्यासोबत या वार्डचा आणि पलीकडील वार्डचा स्वीपर पण आला होता ..ते तिघेही त्यांच्या रूम मध्ये गेले ..पुन्हा निरव.. जीवघेणी शांतता आणि टर्की ..आसपासचे सगळे पेशंट झोपले होते ..त्यांना सर्वाना त्यांच्या मानसिक रोगाच्या गोळ्या ४ लाच वाटल्या गेल्या होत्या ..व आता त्यांची मध्यरात्र झाली होती .. गोपाल पुन्हा माझ्या जवळ आला व मला माझी माहिती विचारू लागला ..मी त्याला ब्राऊन शुगर चा व्यसनी आहे वगैरे सांगितले त्यावर त्याने एकदम कसनुसा चेहरा करून हाताने स्वतच्या गालावर ऐक हलकीशी चापट मारत तौबा केले , म्हणाला ..हमने सुना है इसके बारे में ..बहोत खराब ..मै सिर्फ ऐक बार गांजा पिया हुं अशी माहिती त्याने पुरवली ..मी मग त्याला तू येथे कसा ? विचारल्यावर त्याची कळी खुलली व स्वतः बद्दल सांगू लागला ..तो बी .एस .सी झालेला होता .. मात्र कसा कोणजाणे एकदा घरात कश्यावरून तरी भांडण झाले आणि तेव्हा याची जी सटकली तेव्हापासून .घरात थांबेनसा झाला नोकरी सोडली ..रात्रीबेरात्री कुठेही भटकू लागला ..एकदा घरच्यांनी त्याला मानसोपचार तज्ञांकडे नेले आणि ..नंतर तेथून तो इथे आला होता ..एकदा मध्ये सुटी झाली होती त्याची पण बाहेर पुन्हा तसेच वागणे सुरु झाले ..पुन्हा इथे आला होता . त्याचे बोलणे एकण्यात माझा बरा वेळ गेला ..टर्कीत असतांना असा काहीतरी टाईमपास गरजेचा असतो तितकेंच माझे मन जरा माझ्या त्रासापासून दूर गेले होते .. गोपाल ने असेच आपल्याशी बोलत जागे रहावे असे वाटू लागले ..तो जर झोपला असता तर अगदीच एकटा पडलो असतो मी ..त्याने आपल्याशी बोलत रहावे म्हणून मी आणखीन ऐक बिडी काढली ..पुन्हा तशीच अर्धी अर्धी ओढली .

आता त्या अटेंडंट च्या खोलीतून मोठमोठ्याने बोलण्याचे हसण्याचे आवाज येत होते ..ते लोक पत्ते खेळत आहेत असा गोपाल ने हाताने इशारा केला .मला जुलाब आल्यासारखे झाले म्हणून वार्ड च्या कोपर्यात असलेल्या संडास बाथरूम कडे गेलो ..पुन्हा ऐक उलटी ... तेथिल नजारा काही सांगण्यासारखा नव्हताच .. डोक्यावर परिणाम झालेले लोक स्वच्छतेच्या बाबतीत कसे जागरूक नसतात याचा उत्तम नमुना होता तो ..दिवसा दोन आणि रात्री ऐक असे स्वीपर ड्युटीवर असत पण ते काही चोवीस तास संडासमध्ये थोडीच थांबणार आहेत ? कसातरी माझे काम उरकून परत बेडवर आलो आता अंगात चालण्याचेही त्राण राहिले नव्हते .. मी तसाच उठबस करत होतो ..टर्की त असतांना एका जागी बसणे ..झोपणे .सगळेच कठीण होते .. किती वाजले असावेत याचा नेमका अंदाज बांधणे कठीण होते ..थोड्या वेळाने गोपाल देखील पेंगू लागला आणि तो त्याच्या बेडवर जाऊन झोपला . पुन्हा मी एकटा ..असह्य वेदना ..अश्या वेळी खूप जुन्या ..अगदी बालपणीच्या आठवणी मनात उमटतात ..आईचा मी अत्यंत लाडका होतो अगदी सातवी पर्यंत सतत आईच्या मागे मागे असायचो ..मला नातलग आईचे शेपूट म्हणून चिडवत असत ते आठवले ..मग माझा खोडकर पणा ..मस्ती ..शाळेतील गमती जमती ..आणि शेवटी सुमा ! माझ्या जीवनाची पाहता पाहता वाताहत झाली होती सगळी स्वप्ने ..विरली होती आणि उरला होता तो भयाण एकांत आणि टर्की ! मी हलकेच उठून दाराजवळ गेलो आता जवळच्या बिड्या संपल्या होत्या , टर्कीत बिडीचा मोठा आधार असतो ..अटेंडंट च्या खोलीतून अजून हसण्या बोलण्याचे आवाज ऐकू येतच होते त्यातील ऐक दोघे बहुतेक दारू प्यायले असावेत कारण त्यांचा आवाज जरा वेगळाच येत होता .त्यांना हाक मारून बिडी मागावी असे वाटले पण पुन्हा त्या अटेंडंट ने थोबाडीत मारलेले आठवले .तसाच मागे फिरलो इथे मुजोरी करून चालणार नाही हे मला उमगले होते .

तसाच पुन्हा बेडवर बसून स्वतच्या नशिबाला दोष देत बसलो ..एकदम मुख्य गेट वाजल्याचा आवाज आला आणि ते अटेंडंट ने उघडल्याचा ही आवाज आला .मी सावध झालो .. मग वार्ड च्या दाराजवळ एकदम अनेक लोक दिसले .. सगळ्यांच्या दाढ्या वाढलेल्या , फाटके कपडे .. रस्त्यावर जे मनोरुग्ण फिरताना दिसतात तसेच होते सगळे .अटेंडंट ने त्यांना आता सोडले आणि पुन्हा बाहेरून दार लावून घेतले ..ते सगळे भांबावल्या सारखे एका कोपर्यात भिंतीला टेकून बसले ..इतक्या रात्री यांना कोणी अँडमीट केले असावे ते समजेना . .. पण ऐक बरे वाटले की हे लोक रस्त्यावर बेवारस फिरत असतात त्याएवजी येथे राहणे केव्हाही सुरक्षित होते किमान अन्न ..वस्त्र ..निवारा याची तरी त्यांची गरज पूर्ण झाली असती . हळू हळू त्या नवागतांची भीड चेपली तसे ते उठून इकडे तकडे फिरू लागले . 

=======================================================================
भाग ५७ वा  चाय , नाश्ता ..खाना !
बहुधा पहाटेचे ३ वाजले असावेत , ती नवीन आलेली मंडळी आता भीड चेपल्यामुळे वार्ड मध्ये इकडे तिकडे फिरत होती , सगळ्यांचे चेहरे हरवल्यासारखे होते ..ही माणसे अशी का होत असावीत ? .एकदम सगळ्या जीवनाकडे पाठ फिरवून हे असे मनाची पाटी कोरी कशी होत असेल ? वगैरे प्रश्न त्यांच्या कडे पाहून मनात येत होते ..तितकाच विरंगुळा म्हणून मी काहीबाही विचार करत बसलो होतो. टर्की तर होतीच वर नोव्हेंबर महिना असल्याने बऱ्यापैकी थंडीही वाजत होती म्हणून मी ते पलंगावर असलेले लाल रंगाचे कांबळ काढून अंगावर घेऊन बसलो होतो ..मध्येच उठून ..जुलाब ..पुन्हा पलंग .मग गेट पर्यंत ऐक चक्कर आणि त्या अटेंडंटच्या खोलीचा कानोसा असे सुरु होते माझे .आता हळू हळू वार्ड मधील इतर जुनी मंडळी उठू लागली होती . व त्यांच्याही येरझऱ्या सुरु झाल्या होत्या ..रात्री लवकर झोपल्यामुळे हे सगळे पहाटे लवकर उठले होते . तोंड धुणे वगैरे काही प्रकार नव्हताच ..सगळे संडास बाथरूममध्ये जाऊन तेथील घाणीची शोभा वाढवून येत होते . वार्ड चे गेट वाजले आणि ऐक नवीन माणूस आत आला साधारण पन्नाशीचा .त्याच्या हातात ऐक रजिस्टर होते व सोबत आणखी ऐक तरुण, दोघानीही ' चलो कल रात को नये कौन कौन आये है ? यहाँ लाईन में खडे हो जावो " असा पुकारा केला , मी देखील कालच आलेला होतो त्यामूळे त्यांनी बोट दाखवलेल्या जागेवर तसाच अंगावर कांबळ घेऊन उभा राहिलो . नाम बोल ? असे म्हंटल्यावर नाव सांगितले तसे त्याने एका छोट्या खोक्यातून ऐक छोटीशी बाटली काढली व ' इसमे पेशाब करो थोडी ' असे सांगितले . म्हणजे लघवीचा नमुना तपासणी साठी घेण्याचे काम चालू झाले होते .मी माझा नमुना दिला त्याच्याकडे ..मात्र काल रात्री जी एकदम १० लोकांची टोळी आली होती त्यांना नेमके काय होतेय ते कळत नव्हते ..मग तो सोबतचा तरुण एकेकाला जवळ जाऊन पकडून नाव विचारी आणि रजिस्टर मध्ये ते नाव शोधून त्याला ऐक बाटली देई नमुना देण्यासाठी . काही जण इतके बधीर होते की त्यांना आपले नावही सांगता येत नव्हते मग एकदोन फटके खात ते ..नंतर मला समजले की हे दोन्ही स्वीपर होते आणि वार्ड च्या स्वच्छते बरोबर हे लघवीचा नमुना घेण्याचे काम देखील त्यांच्याकडे होते ..सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरु होता . त्या पैकी त्या सिनियर स्वीपर ने खिश्यातून ऐक बिडीबंडल काढला तसे वार्ड मधील दोन तीन जण एकदम त्याच्या कडे धावले त्याने ..सावकाश सगळ्यांकडे पाहून .मग दोघांच्या हातात दोन दोन बिड्या दिल्या .ते बहुधा त्याला वार्ड च्या सफाई कामात मदत करणारे होते म्हणून त्यांना असा बिड्यांचा पगार रोज मिळे असे मला समजले ...मी देखील त्याच्या कडे बिडी मागण्याच्या विचारात होतो ..संकोच वाटत होता ..असे भिकाऱ्या सारखे बिडी मागणे मनाला पटत नव्हते .शेवटी बिडीची ओढ जिंकली ..मी थोडा त्याच्या जवळ सरकून लाचारीने मला पण ऐक बिडी द्या अशी खुण केली ..त्याने आधी जरा रागाने माझ्याकडे पहिले ' मेरी शादी में आया है क्या तू ? ' असे खोचकपणे विचारले .मी नुसताच चेहऱ्यावर लाचारीचे भाव घेऊन उभा होतो ..शेवटी नाईलाज झाल्यासारखा चेहरा करून त्याने ऐक बिडी मला दिली .

आता सर्वाना सकाळचे वेध लागले होते वार्ड चे रात्रपाळीचे अटेंडंट उठून वार्ड मध्ये आले आणि त्यांनी पुन्हा गिनती चा पुकारा केला सगळे धडपडत रांगेने खाली बसले .मग मोजणी सुरु झाली .काही जण बाथरूममध्ये होते त्यामूळे मोजणी कमी भरली ..मग पुन्हा सगळ्यांना बाथरूम मधून बोलावून पुन्हा मोजणी आणि जेव्हा एकूण संख्या नीट भरली तेव्हा त्यांनी चल गोपाल चाय कें लिये जावो असा आदेश दिला . ऐक जण तेथे अगदी रुबाबात वार्ड चा अटेंडंट असल्यासारखा वावरत होता ..गोपाल ने त्याला ' शंकर .चाय का बर्तन दो ' असे म्हंटले मग समजले की प्रत्येक वार्ड मध्ये असा एखादा खूप जुना पेशंट असतो जो अनेक वर्षांपासून तेथेच राहत असतो . असा माणूस वार्ड च्या अटेंडंटचा मदतनीस म्हणून बिनपगारी काम करत असतो ..तो अत्यंत विश्वासू असतो ..त्यामूळे वार्ड चे सामान सांभाळणे ..सिस्टर ला गोळ्या वाटण्यास मदत करणे ..बाहेरू जाऊन निरोप[ देणे घेणे वगैरे कामे त्याच्यावर सोपवली जात असत ..असा शंकर हा प्राणी होता ..त्याचे पुढचे सगळे दात पडलेले होते ( त्याला मधून मधून फेफरे येत असे आणि त्यामूळे त्याचे सर्व पुढचे दात गायब झाले होते )..शंकर लगबगीने उठून अटेंडंटच्या बाजूला असलेल्या एका बंद खोलीजवळ गेला त्याने कमरेच्या करदोडयात बांधलेल्या किल्ल्या काढल्या आणि ती खोली उघडून त्यातून ऐक मोठे अल्युमिनियम चे भांडे काढले त्यावर ठेवण्याचे ऐक झाकण देखील काढून गोपाल च्या हाती दिले ..गोपाल आणि त्याच्या सोबत इतर दोन पेशंट आणि ऐक अटेंडंट चहा आणायला बाहेर पडले .. हॉस्पिटल चे किचन म्हणे तेथून थोडे दूर होते ..रोज चहा , नाश्ता , आणि जेवण आणण्यासाठी अशी टीम किचन कडे रवाना होत असे . गोपाल चहा आणायला बाहेर पडला तसे शंकर ने त्याच खोलीतून अजून ऐक गाठोडे बाहेर काढले ते मोठे गाठोडे तसे हलके वाटले कारण शंकर ने सहज पणे ते उचलून वार्ड मध्ये आणले होते ... ते गाठोडे त्याने वार्ड च्या मध्यभागी आणून सोडले तसे सगळे लोक त्या गाठोड्यावर तुटून पडले .त्यात जर्मल चे मग्ज होते ..चहा पिण्यासाठी ते मग वापरले जात व रोज त्याचा उपयोग झाला की पुन्हा शंकर त्यांना गुंडाळून गाठोड्यात बांधून ठेवत असे ..अशी गर्दी एकदम उसळण्याचे कारण असे की त्यातील बहुतेक मगांचे कान तुटलेले होते व तेथे ऐक भोक पडलेले असे ,,त्या भोकातून आतील चहा सांडून जाई ..म्हणून कान असलेला मग मिळवण्यासठी ही गडबड उडाली होती ..मला काय करावे समजेना ..टर्की त गरम गरम चहा मिळाला तर हवेच होते .पण मग घेण्यासाठी त्या गर्दीत घुसणे मात्र जीवावर आले होते माझ्या, सगळ्यांचे मग घेऊन झाल्यावर शंकर ने नवीन लोकांना स्वतः ते तोडके मोडके मग्स वाटले वर दम दिला ' चाय पिणे कें बाद , वापस मेरेको लाकर देना " शंकर मराठी होता व त्याच्या हिंदी बोलण्याला ऐक मजेशीर मराठी धार होती ..शिवाय समोरचे सगळे दात गेल्याने तो थोडेसे बोबडे बोलत असे ..त्याचे बोलणे एकून मला गम्मत वाटली . शंकर ने मलाही ऐक मग दिला बिन कानाचा आणि दोन भोके असलेला ..त्या मग ला विशिष्ट वास येत होता ..चहा पिऊन झाल्यावर अनेक जण धुवून न घेता ते मग्स तसेच शंकर जवळ जमा करत त्यामूळे मग्स च्या तळाला वाळलेल्या चहाचा काळपट थर जमा राही त्याचा तो वास होता ..मी आधी बाथरुम मध्ये जाऊन पाण्याने जमेल तितका स्वच्छ तो मग धुवून काढला ..सारखा त्याचा वास घेऊन पहिले तरी काही तो नीट स्वच्छ झाला असे वाटले नाही .

एकदम मुख्य गेट वाजले आणि पुन्हा रांगेत बसायची धावपळ उडाली सगळ्यांना रांगेने चहा वाटण्यात आला ..किचन मधून वार्ड मध्ये आणेपर्यंत चहा कोमट झाला होता ..व चवी बद्दल फारसे सांगणे योग्य नाहीच .. रेल्वे स्टेशन वर मिळणाऱ्या चहा पेक्षा जरा वाईटच होता तो . पण जरा कोमट गोडसर द्रवाने घशाला जरा शेक मिळाला..पण त्या मगाच्या दोन्ही भोकांवर बोट ठेवून चहा न सांडू देता पिणे ही कसरत होती ...आता सकाळ झाली ..साडेपाच लाच चहा घेऊन झाल्यावर मग पुन्हा सगळे लोक येरझऱ्या घालू लागले . कोपऱ्यातील एका बेडवर ऐक जण घरचे कपडे घालून बसला होता तो मघापासून झोपलेलाच होता चहा वाटपाच्या वेळी तो उठला आणि मग त्याने त्याच्या पलंगाखालुन ऐक पत्र्याची पेटी काढून त्यातून टूथपेस्ट , ब्रश वगैरे काढून साग्रसंगीत दात घासले . त्याच्या कडे ऐक स्टील चा ग्लास होता त्यात शंकर ने त्याला बेडजवळ चहा नेऊन दिला .चहा घेऊन झाल्यावर तो मग आरामात बिडी ओढत बसला ..मी बराच वेळ त्याचे निरीक्षण केले..व सगळ्या लोकांमध्ये हा गृहस्थ जरा बऱ्यापैकी भानावर दिसतो असे वाटून त्याच्या जवळ गेलो तर त्याने सरकून मला त्याच्याशेजारी बसायला जागा केली , त्यानेही मी जरा बरा दिसतोय हे ओळखले असणार ..त्याचे नाव सलीम होते ..कल्याण चा राहणारा होता व गेल्या सहा महिन्यापासून तो येथे होता ..माझे व्यसन समजल्यावर म्हणाला .' मैने ऐक दो बार पिया है गर्द ' लेकिन साली लुख्खी नशा है वो !" सलीम बोलायला चांगला होता ...मात्र त्याला बिडी मागितल्यावर जरा नाराज झाला म्हणाला मेरेको रोज ऐक बंडल मिलता है वो पुराके पिना पडता है .. मी त्याला माझ्या वडिलांनी त्या संध्याकाळी असलेल्या माणसाकडे पैसे दिलेत हे सांगितले त्यावर तो मोठ्याने हसला म्हणाला ..भूल जाओ वो पैसे अभी .. वो आदमी को मै अच्छा जानता हुं .. मी जरा निराश झालो ते पाहून त्याने ऐक बिडी दिली व म्हणाला बारबार नही दुंगा !

=======================================================================

भाग ५८ वा  मुक्काम पोस्ट ..मेंटल हॉस्पिटल !

टर्की होतच होती पण काही इलाजही नव्हता म्हणून सगळे सहन करत सारखे मन शारीरिक त्रासा कडून दुसरीकडे वळवत होतो ..सकाळी सात वाजता रात्रपाळी वाले अटेंडंट जायला निघाले व दिवसपाळीचे लोक आले , नर्स देखील आल्या तेव्हा पुन्हा एकदा गिनती झाली ..या वेळी ऐक दाढीला छान कट दिलेला आणि दाढी व केसांना मेंदी लावलेला ऐक पन्नाशी चा गृहस्थ देखील सकाळी ड्युटी वर आला होता ..तो या वार्ड चा सिनियर आहे हे समजले चेहऱ्या वरून कडक वाटला त्याचे नाव गुलाम हुसेन आहे असे समजले त्याने गिनती झाल्यावर मला जवळ बोलावून नाव...गाव वगैरे विचारले मग माझे ब्राऊन शुगर चे व्यसन आहे हे ऐकल्यावर थोडा हळहळला म्हणाला ' यहाँ प्यार से रहोगे तो प्यार मिलेगा ' त्याचे हे वाक्य अगदी पटले मला ..जगात ही असेच असते प्रेम दिले तर प्रेम मिळते आणि द्वेष ..तिरस्कार ..विश्वासघात दिला तर तसेच पदरात पडते . मग औषध वाटप करण्यासाठी सिस्टर वार्डात आल्या , त्या समोर स्टूलवर ऐक लाकडी खणांची पेटी घेऊन बसल्या होत्या आणि मांडीवर रजिस्टर ठेवून एकेकाचे नाव वाचून त्याला जवळ बोलावून समोर गोळ्या खायला लावत होत्या . सगळे पेशंट खाली जमिनीवर चवड्यावर बसले होते ..बहुतेक लोकांची ती बिन नाडीची चड्डी एकदम उठून उभे राहताना सुटत असे पण कोणीच हसत नव्हते कारण सगळ्यांना ते सवयीचे असावे ..सिस्टरना देखील असे चड्डी ओघळून खाली येण्याचे विशेष नवल वाटत नव्हते तेवढ्यापुरते त्या नजर दुसरीकडे वळवून पुन्हा कामाला लागत .. काही जण तर इतके बधीर होते की त्यांचे नाव पुकारले जातेय हेच त्यांना समजत नसे मग अटेंडंट त्याला हलवून उभा करीत असे ..एकंदरीत मनोरंजक होता हा औषध वाटपाचा कार्यक्रम . माझे नाव पुकारल्यावर मी आधी काळजीपूर्वक ती चड्डी धरली आणि मग उठून उभा राहिलो ..औषध वाटून झाल्यावर मग गोपाल आणि त्याची टीम नाश्ता आणायला गेली ..लगेच शंकर ने पुन्हा ते जर्मल च्या मग्ज चे गाठोडे आणून सर्वांसमोर ठेवले .. चांगला मग मिळवण्यासाठी तीच धावपळ ..जरा वेळाने शंकर ने त्याच खोलीतून जर्मन आणि स्टील च्या चार पाच खण असलेल्या थाळ्या बाहेर काढल्या तशी पुन्हा चांगली थाळी मिळवण्यासाठी गोंधळ उडाला .. मी नुसताच उभा होतो तेव्हा सलीम ने मला थाळी घेण्याची खूण केली यावर मी त्याला भूक नाही असे पोटावर हात ठेऊन खुणावले तर म्हणाला ' तेरे को नाही खाना है तो किसी लेकर किसी दुसरे को दे दे ' म्हणून मग शेवटी ऐक थाळी उचलली .थाळीच्या खालच्या भागात पिवळट थर जमा झालेला होता मग्ग्यांची जशी गत होती त्यापेक्षा जास्त खराब थाळ्या होत्या कारण नीट न धुतल्यामुळे खरकट्या अन्नाची पिवळट पुटे साचली होती व त्याला प्रचंड वास येत होता . सगळ्यांना मग वार्ड ला लागून असलेल्या बाहेरच्या व्हरांड्यात बसवण्यात आले तेथे बाहेरून जाळी लावलेली होती आणि त्यातून छान उन्हाचे कवडसे येत होते मी नीट उन अंगावर पडेल अश्या बेताने बसलो सगळे समोरासमोर बसले होते आणि समोर थाळ्या ठेवल्या होत्या .

गोपाल आणि त्याची टीम नाश्ता घेऊन आल्यावर अटेंडंट आणि त्याच्या मदतनीसाने नाश्ता वाटण्यास सुरवात केली एकाने प्रत्येकाच्या थाळीत चार चार ब्रेड चे स्लाईस टाकले मग मागून येणाऱ्याने त्या स्लाईस वर उसळ टाकली ( उसळ म्हणजे पाण्याची फोडणी दिलेले कडधान्य होते ..वाटणा .मुग .चवळी तर कधी कधी राजमा देखील असे उसळीत ) मी उसळ घेण्यास नकार दिला ..मग दुध वाटप सुरु झाले ते वाटणारा सरळ सरळ थाळीत डावाने दुध टाकत होते ..ब्रेड ..उसळ आणि वर दुध असे सगळे अनेकांच्या थाळीत एकत्र झाले होते ..पण कोणीच त्यावर काही प्रतिक्रिया न देता बसले होते ..मला जरा नवल वाटले .जरा शहाण्या लोकांनी मात्र दुध जवळच्या मगात घेतले . मी चहाची वाट पाहत होतो म्हणून दुध नाकारले नंतर समजले की चहा फक्त दिवसातून दोन वेळा मिळतो ..एकदा पहाटे ६ वाजता आणि मग दुपारी तीन वाजता . तसाच उन खात बसून राहिलो अनेक जणांच्या नजरा माझ्या थाळीवर होत्या का ते समजेना कदाचित मी खात नाही याचे त्यांना आश्चर्य वाटत असावे नाश्ता झाल्यावर सगळे उठू लागले तसा मी देखिल उठलो तशी एकदम तीनचार जणांनी माझ्या थाळीतील ब्रेड वर झडप घातली त्यांचे त्या चार स्लाईस वरून जुंपले शेवटी त्या चार स्लाईस चे त्या झटापटीत दहा तुकडे होऊन प्रत्येकाला त्यातील काहीतरी मिळाले ..ही खाण्यासाठीची झटपट पाहून मला कसेतरीच झाले ..मला घरी चारीठाव हवे ते देण्यास आई तयार होती पण मला अन्नाची किंमत नव्हती आणि इथे ब्रेड च्या एका तुकड्यासाठी .. ! हे खरे आहे की प्रत्येकाला एकदा तरी अन्नाची किंमत कळायला हवी !

नाश्ता झाल्यावर गोपाल माझ्या जवळ येऊन म्हणाला " कलसे अगर आपको नाश्ता नाही होना तो मेरेको देते जाओ " मी मान हलवून त्याला काल मला दाखल करण्याच्या वेळी वडिलांकडून पैसे घेतलेल्या अटेंडंट बद्दल विचारणा केली तेव्हा त्याने तो आला आहे व खोलीत बसला आहे असे सांगितले ..मी गेट जवळ उभा राहून तो कालचा माणूस खोलीबाहेर येण्याची वाट पाहत उभा राहिलो सुमारे १५ मिनिटे झाली मग पाय दुखू लागले म्हणून खाली भिंतीला टेकून बसलो ..तो बाहेर आला तशी त्याला हाक मारली ' ओ ,साहेब ..ओ साहेब " त्याने अनोळखी नजरेने माझ्याकडे पाहत त्रासिक स्वरात विचारले ' काय आहे? ' मी यावर त्याला बिडी मागितली व काल वडिलांनी त्याच्याजवळ पैसे दिले आहेत याची त्याला आठवण करून दिली तेव्हा तो मोठ्याने ओरडला ' उद्या तू मला ब्राऊन शुगर पण मागायला कमी करणार नाहीस . काही बिड्या वगैरे मिळणार नाहीत तुला " . बापरे! ..माणसे इतकी सपशेल उलटू शकतात हे प्रथमच इतक्या जवळून अनुभवत होतो . तरीही मी त्याच्या कडे गयावया करत राहिलो तेव्हा त्याने खिशातून ऐक बिडी काढून मला दिली उपकार केल्यासारखी . चोराची लंगोटी या न्यायाने ती बिडी घेऊन सलीम जवळ आलो सलीम गालात हसत होता .बहुधा तो हा सगळा प्रकार दुरून पाहत होता . सलीम ने मला सांगितले की ऐसे पैसे इन लोगो कें पास नही देते , बाहर ऐक साई का कॅन्टीन है , अगर वहां पैसे जमा किये तो साई का लडका चाय बिडी वगैरे लाकर देता है " ही माहिती मला नवीनच होती ..आधी माहित झाले असते तर वडिलांना साई जवळ जास्त पैसे जमा करायला सांगितले असते ..सलीम च्या घरच्यांनी त्याला रोज ऐक बिडी बंडल आणि १० वाजता चहा मिळेल इतके पैसे साई कडे जमा केल्याचे त्याने सांगितले मला . 

=======================================================================

भाग ५९ वा  बिडीसाठी ..मारामारी !


सलीम तेथे सहा महिन्यांपासून राहत होता त्यामूळे त्याला सर्व माहिती झालेली होती .त्याचे वडील कल्याण ला एका वार्ड चे नगरसेवक होते .सलीम .दारू पिऊन घरात व बाहेरही खूप गोंधळ घालत असे व माझ्या सारखाच खाजगी रुग्णालयातून पळून येई म्हणून त्याला वडिलांनी येथे आणले होते ..त्याला वेळच्या वेळी बिड्या ..चहा मिळण्याची त्यांनी सोय केली होती . शिवाय वडील दर आठवड्याला त्याला भेटायला येत व छान घरचा डबा आणत त्यामूळे तो इथे चांगला रमला होता . नाश्ता झाल्यावर मग डॉक्टर चा राउंड झाला मला तपासण्यात आले .. ऐक काळपट लाल रंगाचे बी कॉम्प्लेक्स चे इंजेक्शन देण्यात आले सिस्टर चा हात खूप जड वाटला ..खूप दुखू लागला माझा हात कदाचित टर्कीत त्वचा व सर्वच अवयव जास्त संवेदनशील होत असल्यामुळे मला जास्त दुखले असावे ...गोपाल तयार होऊन बाहेर फिरायला जायला निघाला ..याला बाहेर जाण्याची परवानगी मिळाली होती कारण त्याने तेथील लोकांचा विश्वास संपादन केला होता ..तसेच तो वार्ड च्या कामात मदत करीत होता .बाहेर म्हणजे अर्थात मुख्य कंपौंड च्या आतच फिरणार होता तो ..साधारण पणे १०० एकर जमिनीवर ते मनोरुग्णालय उभारले गेले होते ..एकूण १९ वार्ड होते सर्वात प्रथम दाखल झाल्यावर पेशंट ला १९ नंबरच्या म्हणजे आता मी असलेल्या वार्ड मध्ये ठेवले जाई निरीक्षणाखाली ..आणि नंतर १० दिवसांनी त्याच्या आजाराचे नक्की स्वरूप कळल्यावर त्याला त्या प्रकारच्या वार्ड मध्ये पाठवले जाई ..डिप्रेशन , स्किझोफ्रेनिया ,इपिलेप्सी , पँरँनोईया , ओब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डीसऑर्डर , अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक आजाराचे रुग्ण त्या त्या प्रकारची लक्षणे असलेल्या वार्ड मध्ये ठेवले होते . गोपाल सारखे अनेक जण होते प्रत्येक वार्ड मध्ये ज्यांना वार्डच्या बाहेर काही काळ सोडले जाई ..हे लोक तेवढ्या काळात बिड्या मिळवण्यासाठी बाहेर व्हिजीट ला येणाऱ्या माणसांना त्यांचा पेशंट शोधून देण्याचे तसेच बाहेरून येणाऱ्या नवागतांना ऑफीस वगैरे दाखवण्याचे काम करत असत व त्या बदल्यात त्यांना पैसे मागून त्या पैश्यांचा बिड्या घेत असत ..ही सर्व माहिती मला सलीम पुरवत होता .. हॉस्पिटल भोवती ऐक मोठी दगडी भिंत बांधली होती साधारण १० फुट इतकी उंच ती भिंत होती त्यामूळे ती ओलांडून सह्जासाजी कोणी पळून जाऊ शकत नव्हते ..आणि एखादा बहाद्दर जर उडी मारून भिंतीच्या पलीकडे पोचला तर पलीकडे हॉस्पिटलच्या च कर्मचारी बांधवांची वस्ती होती तेथे तो पळणारा पकडला जाई ..एखादा त्यातूनही वाचला तर मग त्याच्यावर कायदेशीर केस दाखल केली जाई व त्याला त्याच्या पत्यावर जाऊन घरून पुन्हा पकडून आणले जाई .म्हणजे एकंदरीत पळून जाण्याचा प्रयत्न करणे हितावह नव्हतेच .

टर्की होतच होती तरीही मी आतल्या आत सगळा त्रास सहन करत होतो कारण दुसरा पर्याय देखील नव्हता माझ्याकडे . काही लोकांना नाश्ता न देता व्हरांड्यात एका लाईनीत बसवले गेले होते ..त्यांना ईसीटी साठी नेणार असल्याचे सलीम ने सांगितले . म्हणजे इलेक्ट्रिक कन्वल्जन थेरेपी ...काही जास्त बेफाम असलेल्या किवा अगदी हिंसक होणाऱ्या अथवा विशिष्ट लक्षणे असलेल्या व्यक्तीना ही विजेचा शॉक देण्याची टूीटमेंट दिली जात असे ..सौम्य अश्या विजेच्या लहरी मेंदूत खेळवून त्या व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या या उपचारांचा लाभ होतो व ती व्यक्ती शांत होते असे समजले . त्यांना आधी नाश्ता न देण्याचे कारण असे की शॉक दिल्यानंतर त्यांना उलट्या होण्याचा संभाव असे ...शॉक मिळण्याच्या लाईनीत बसलेले लोक अतिशय बापुडवाणा चेहरा करून बसले होते , मला त्यांची दया आली . बाकीचे लोक आता वार्ड मध्ये येरझाऱ्या घालण्याचे काम करत होते ..येरझाऱ्या घालणे हा एकमात्र व्यायाम आणि विरंगुळा होता या लोकांचा ..मी सलीम जवळ बसून सगळे ऐकत होतो ..सलीम ला देखील बऱ्याच दिवसात त्याचे इतके सविस्तर ऐकणारा श्रोता मिळाला नसावा हे जाणवले ..तो जेव्हा जेव्हा बिडी पेटवे तेव्हा तेव्हा स्वतःहून अर्धी बिडी मला ओढायला देत होता . त्याने अशीच अर्धी बिडी माझ्या हाती दिली आणि मी ती तोंडात घालणार तोच एकाने झटका मारून माझ्या हातातील बिडी पळवली ..हे मला अनपेक्षित होते .. तो माणूस आमच्या जवळच मघापासून उभा होता व आमच्याकडे पाहत होता ..कदाचित तो संधीची वाट पाहत असावा ..व मी थोडा बेसावध असतांना त्याने आपले काम चोख केले होते ..मी त्याच्या मागे शिव्या देत पळू लागलो व त्याला पकडून मारण्यास सुरवात केली ..त्याने देखील माझ्यावर हल्ला केला ..कॉलेज मध्ये आणि स्टेशनवाडी .सिन्नर फाटा येथे मला मारामारीचा चांगलाच अनुभव होता तसेच मी मुळचा आक्रमक प्रवृत्तीचा असल्याने त्याला सहज चोप देऊ लागलो खूप आरडा ओरडा झाला सलीम आणि अटेंडंट ती मारामारी सोडवायला आले मी खुपच बेफाम झालो होतो कसेतरी त्यांनी आम्हाला दोघांना बाजूला केले ..मग त्याला आणि मलाही बांधून ठेवण्यात आले ..पलंगावर उताणे झोपवून माझे दोन्ही हात आणि दोन्ही पाय पलंगाच्या कडांना दोरीने करकचून बांधले गेले होते ..हे भलतेच झाले होते ..टर्की त होतो त्यामूळे माझा संताप अनावर झाला होता व मी त्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला होता .

तसाच बांधलेल्या अवस्थेत मी पडून होतो ..उगाच मारामारी केली असे वाटू लागले ..मग मुख्य डॉ. केळकर यांचा वार्ड मध्ये राउंड आला ते माझ्याजवळ आले त्यांना सर्व हकीगत समजली होती .मला म्हणाले ' तुला शॉक द्यायला हवेत ' यावर मी त्यांना म्हणालो ' सर् पण त्याने आधी माझी खोडी काढली ' म्हणून मी मारामारी केली . तर मग म्हणाले ' वेडा कोण आहे तू की तो ? ,,तू व्यसनी आहेस आणि तो मनोरुग्ण आहे हे लक्षात ठेव , तो तुझ्या पेक्षा जास्त दुर्दैवी आहेत ' मला हे पटले ..मग त्यांनी मला या पुढे असे करू नकोस असे बजावून अटेंडंट ना मला सोडून देण्यास सांगितले ..हुश्श्श ! एकदाची सुटका झाली माझी ..त्या दुसऱ्या व्यक्तीला त्यांनी ऐक इंजेक्शन दिले .बहुधा झोपेचे असावे . मला सोडल्यावर मी मान खाली घालून भिंतीला टेकून बसलो ..खूप अपमान झाल्यासारखे वाटत होते मला . जरा वेळाने गोपाल आला त्याला सर्व माहिती समजली तेव्हा माझ्याजवळ येऊन बसला व ऐक बिडी मला देऊन म्हणाला ' मारामारी नही करना यहां , नही तो आपको क्रिमिनल वार्ड में भेज देंगे ये लोग " १ आणि ८ नंबर चे वार्ड तेथील क्रिमिनल वार्ड म्हणून ओळखले जात तेथे वेडाच्या भरात खून वगैरे केलेले लोक , तसेच अधिक हिंसक आणि पळून जाण्याचा प्रयत्न करणारे लोक ठेवले जात असत . तेथे प्रत्येकाला स्वतंत्र अश्या छोट्या गज लावलेल्या खोलीत कोंडले जाई ..लघवी ..संडास सगळे त्याच खोलीत करावे लागे ..अगदी जेवण व नाश्ता देखील त्या गजांच्या जाळी खालूनच मिळे .म्हणजे काळ्यापाण्याची शिक्षाच जणू !

( बाकी पुढील भागात )
=======================================================================

आलिया भोगासी ..! ( भाग ६० वा )


डॉ . केळकरांनी मला शॉक देण्याची भीती घातल्यावर मी घाबरलो होतो ..शॉक घेतले तर मी कायमचा वेडा होईन की काय अशी भीती वाटली व मनाशी ही खुणगाठ बांधली की येथे शक्यतो भांडणे वगैरे करायची नाहीत .सर्वांशी गोडी गुलाबीने वागायचे. आपण उगाच मित्राचे ऐकून इथे आलो असेही वाटू लागले ..तरी मी त्याला विचारले होते की कशी व्यवस्था आहे ते ..पण त्याने काही नीट माहिती न देता ' प्रत्यक्ष अनुभव घे ' असे त्रोटक उत्तर देऊन माझी उत्सुकता वाढवली होती आणि त्या मुळेच मी मनोरुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता . दुपारच्या जेवणाच्या वेळी पुन्हा गिनती मग ..शंकर चे थाळ्या वाटणे .आणि व्हरांड्यातील रांग..टर्कीत मला भूक लागणे शक्यच नव्हते तरीही तसाच थाळी समोर बसलो ..दोन साधारणतः भाकरी इतक्या जाड काळसर भाजलेल्या चपात्या , वरणाचे पाणी , आणि तोंडल्याची भाजी वाढली गेली ..तोंडली चिरणे हा प्रकार नव्हताच ..अख्खी तोंडली टाकली होती भाजीत आणि व पातळसर रस्सा ..मी जेवत नाहीय हे लक्षात येताच समोर बसलेले दोन तीन जण माझ्या कडे आशेने पाहू लागले मी माझी थाळी त्यांच्यासमोर सरकवली ..तसे त्यांनी झडप घालून थाळीतील अन्न गायब केले ! दोन चापात्यांपेक्षा जास्त चपात्या कोणालाही दिल्या जात नव्हत्या .मग भात ही वाढला गेला ..भातात हळद टाकली होती व थोडी मुगाची डाळ देखील होती त्यामूळे तो भात कम खिचडी असा प्रकार होता . जेवणे झाल्यावर ..थाळ्या गोळा करणे ..येरझाऱ्या ..दुपारी तीनला चहा ..गोळ्या वाटप ..आणि पुन्हा दुपारीच साडेचार वाजता रात्रीचे जेवण !मला आता येथे येऊन बरोबर चोवीस तास लोटले होते .. व या चोवीस तासात बरेच काही शिकायला मिळाले होते त्यामूळे किमान तात्पुरता तरी माझा सगळा माज उतरला होता .पाहता पाहता तीन दिवस उलटून गेले ..सलीम मला अधूनमधून बिडी देत होता पण ती पूर्ण नाही तर त्याची पिऊन झाल्यावर उरलेली अर्धी .गोपाल देखील मूडमध्ये असला की स्वतःहून आख्खी बिडी देई ! माझी टर्की जरा कमी झाली होती ..मात्र तीन दिवसात मी एकही क्षण झोपू शकलो नव्हतो ..दिवस कसातरी इकडे तिकडे पाहण्यात निघून जाई ..मात्र रात्री सगळे झोपल्यावर .मी एकटा जागा राही हे खूप भयाण वाटे ..अश्या वेळी भलते सलते विचार मनात येत ..गतकाळातील चांगल्या .वाईट आठवणींची भुते मनात फेर धरून नाचू लागत . का ? कसे ? कधी ? असे प्रश्न पडत ..स्वतच त्याची जमेल तशी उत्तरे शोधत बसायची . तेथे वार्ड च्या गेटजवळ ऐक लोखंडी जाळीची बंदिस्त अशी चौकट दिसली ..सलीम ला विचारले तेव्हा त्याने सांगितले की येथे टी.व्ही ठेवतात पण तो सध्या दुरुस्तीला गेलाय व लवकरच येईल ..बरे वाटले ते ऐकून ..टी व्ही आल्यावर चांगला वेळ जाईल अशी स्वप्ने रंगवत बसलो .

पाहता पाहता पाच दिवस झाले ..आता मला पहाटे पहाटे केव्हातरी थोडीशी झोप लागू लागली ..सगळ्या अटेंडटशी जरा ओळख झाली माझी .दुपारच्या वेळी सिस्टर जेव्हा निवांत बसलेल्या असत तेव्हा त्या कुतूहलाने मला बाहेर ऑफिसात बोलावून माझी माहिती विचारात असत .. त्यांना खूप वाईट वाटे माझ्या बद्दल ..चांगल्या घरचा पोरगा ...असा कसा वाया गेला म्हणून त्या हळहळत ..मी गाणी म्हणतो हे समजल्यावर त्यांनी मला गाणे म्हणण्याचा आग्रह केला आणि मी ऐक दोन गाणी म्हंटली तेव्हातर मी त्यांना जिंकलेच ..मग कधीतरी त्या त्यांच्या डब्यातून मला एखादी पोळी ..भाजी असे देऊ लागल्या . एकंदरीत आता तेथे रुळत चाललो होतो ..माझ्यानंतर चार दिवसांनी अजून दोन ब्राऊन शुगर चे व्यसनी दाखल झाले होते दोघेही मुंबईचे होते .राजू आणि लक्ष्मीकांत अशी त्यांची नावे ऐक महाराष्ट्रीयन होता तर दुसरा गुजराथी ..मग त्यांच्या टर्कीत मी त्यांना धीर दिला ..आम्ही चांगले मित्र झालो .एकदा आम्ही अटेंडंट ला विनंती करून वार्ड मधील सगळ्या थाळ्या चांगल्या धुवून देतो असे संगितले ..सगळ्या थाळ्या काढून त्या एका मोठ्या भांड्यात पाण्यात भिजवल्या ..नंतर एकेक थाळी काढून विटकरीच्या तुकड्याने तसेच तेथे उपलब्ध असलेल्या सोडा पावडर ने घासल्या आणि मस्त स्वच्छ केल्या त्यामूळे मग त्यांनी आम्हाला आमची थाळी त्या सगळ्या थाळ्यात न ठेवता आमच्या स्वतःजवळ गादीखाली ठेवण्याची परवानगी दिली .थाळी आणि चहा घेण्याचा मग स्वतचा असल्यासारखा आम्ही जपून ठेवू लागलो . जेवण जरी बेचव असले तरी टर्की संपल्या नंतर खूप भूक लागू लागली त्यामूळे थाळीत पडेल ते नखरे न करता खाऊ लागलो . घरी ही भाजी आवडत नही..ती भाजी नको असे नखरे इथे चालले नसते .मी सगळ्या भाज्या मुख्यतः मेथी , मुळा , तोंडली , दुधी , भोपळा अश्या भाज्या देखील सराईत पणे खाऊ लागलो .सलीम ने मला मंत्र दिला होता की " यहां टेस्ट कें लिये नही खाना बल्की जान बनाने कें लिये खाते जाओ " . बिड्यांची मात्र मारामार असे ...दिवसभरातून जेमतेम एकदोन बिड्या प्यायला मिळत ..एकदा पहाटे, पहिल्या दिवशी आली तशीच ऐक दहाबारा मनोरुग्णांची टीम दाखल झाली .. तेव्हा मी त्या स्वीपर ला त्यांच्या लघवीचे नमुने घेण्यास मदत केली तेव्हा खुश होऊन त्याने चार बिड्या दिल्या मला ..ही चांगली आईडिया होती ! तेथील स्वीपर ला त्याच्या सफाई कामात ..अटेंडंट ला गिनती वगैरे करणे एखाद्या हिंसक झालेल्या व्यक्तीला बांधण्यात वगैरे मदत केली की ते सहजपणे बिड्या देत . मी , राजू आणि लक्ष्मीकांत ने सर्वांचा विश्वास संपादन केला तेव्हा मग आम्हाला बाहेर किचन मधून जेवण चहा , नाश्ता आणण्यास पाठवले गेले .. किचन साधारणतः वार्डपासून अर्धा किलोमीटर दूर होते ..तेथे मोठ्या मोठ्या पातेल्यात भाजी , वरण वगैरे शिजत ठेवलेले असे ..आतल्या भागात एका मोठ्या म्हणजे सुमार १५ लांब सहा फुट रुंद फुट तव्यावर दोन्ही बाजूनी बसून उपचार घेणारे व आता जुने झालेले मनोरुग्ण पोळ्या लाटून त्या तव्यावर टाकत आणि ऐक अटेंडंट त्या भाजलेल्या पोळ्या एका मोठ्या भांड्यात मोजून जमा करी . ती पातेली साधारण पाच फुट उंच आणि त्याचा व्यास देखील तितकाच किवा त्या पेक्षा जास्त मोठी होती म्हणजे सगळे एकंदरीत मोठेच काम होते ..सुमारे २००० पुरुष आणि १ हजार स्त्री रुग्णांचा स्वैपाक तेथे बनविला जाई मात्र सरकारी कर्मचारी जेमतेम एका वेळी पाच जण असत त्यामूळे त्यांना मनोरुग्णांची मदत घेणे भाग होते ..ती मोठी भांडी घासणे , भाज्या कापणे .. शिजवण्यासाठी भांड्यात टाकणे खाली लाकडे लावून ती भट्टी पेटवणे , वगैरे सगळी कामे ते रुग्णच करत असत . तेथे ' स्त्री ' मनोरुग्णांसाठी वेगळा विभाग आहे हे प्रथमच बाहेर पडल्यावर मला समजले . त्या पैकी काही स्त्रिया किचन मध्ये मदतीला दिसल्या ..ऐक मोठा पांढरा मळकट गुडघ्यापर्यंत चा झगा किवा लाल , निळे काठ असलेली पांढरी साडी असा त्याचा वेश होता , बहुतेकिंचे चेहरे तसेच निस्तेज ..आणि ऐक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे त्यांच्या डोक्यावर अगदी कमी केस ठेवलेले होते म्हणजे अगदी बारीक कटिंग केल्या सारखे किवा मुंडण केल्यासारखे ,,हे असे का ? कारण स्त्री चे सौंदर्य केसातच तर असते ..त्यावर मला असे समजले की अनेक दिवस केसांची नीट निगा न ठेवता आल्याने केसात उवा होतात किवा गुंता होतो ..व जर स्त्रियांची कधी मारामारी झाली तर त्या आधी एकमेकांच्या झिंज्या धरतात व तसे करता येऊ नये म्हणून बारीक केस ठेवण्याची काळजी घेतली जाई . स्त्रियांच्या विभागात पुरुष रुग्णांनाच काय पण पुरुष अटेंडंटना व स्वीपर ला देखील परवानगी शिवाय व काही खास काम असल्याशिवाय प्रवेश नव्हता ..त्या विभागात अटेंडंट आणि सफाई कर्मचारी देखील स्त्रियाच होत्या केवळ पुरुष डॉक्टर मात्र जाऊ शकत होते तेथे .

किचन ला नियमित जाऊ लागल्यावर आम्हाला थोडे जास्त जेवण मिळू लागले तसेच वार्डात देखील आमची वट वाढली ..मग तेथील मजेशीर असलेल्या मनोरुग्णाशी गप्पा मारण्यात ..त्यांची फिरकी घेण्यात ..गाणी यात छान वेळ जाऊ लागला . एकदा राजू ला भेटायला त्याची आई येऊन गेली आणि त्याने गुपचूप तिच्याकडून ५० रुपये मागून घेतले .. पन्नास रुपये हातात पडल्यावर आमची डोकी बिघडली ...येथे ब्राऊन शुगर तर नाही पण एखाद्या अटेंडंट किवा स्वीपर ला लालूच देऊन आपण गांजा किवा दारू मागवू शकतो हा विचार मनात मूळ धरू लागला ..आम्ही सावधपणे तसा शोध घेण्याचा प्रयत्न केला ..एकदोन जणांची नावे समजली की जे आमचे काम करू शकतील ..पण त्यांची लगेच भेट होऊ शकली नाही ..तेथे आमच्या वार्डाच्या भिंतीना बाहेरून रंग देण्याचे कम सुरु होते ..त्यासाठी बाहेरून कामगार आले होते ..आम्ही त्या पैकी एकाला पटवले आणि त्याला वीस रुपये देवून ऐक देशी दारू ची बाटली आणायला सांगितले ..त्याने घाबरत घाबरत आमचे काम केले ..वा ,,मजाच आली रात्री आम्ही तिघांनी गुपचूप व्हरांड्यात जाऊन ती क्वार्टर संपवली .मग मस्त गप्पा मारत बसलो .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें