प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.comसोमवार, 18 मार्च 2013

वडीलांची सेवा आणि सोबत

भाग ९१

अकोल्याला अगदी दृष्ट लागण्या सारखे सुरळीत चाललेले असतांना ..माझ्या मनातील खोलवर दडून बसलेल्या व्यसनाच्या सुप्त आकर्षणाला मी बळी पडलो होतो .. आणि वर स्वतचे समर्थन देखील करत होतो की ..आपण रोज कुठे व्यसन करतोय .. आठवड्यातून एखादे वेळी केल्यास आपले फारसे नुकसान होणार नाही .. एकीकडे टायपिंग क्लास ..राममंदिर ..अनघाचा सहवास ..बहिणीचे ..मेव्ह्ण्यांचे.माझ्या गोड भाचा आणि भाचीचे निर्व्याज प्रेम ..सलील ची मैत्री ..माझे उज्वल भविष्य तर दुसरीकडे ..व्यसनाचे वेड्यासारखे आकर्षण .. दुहेरी व्यक्तिमत्व झाले होते माझे ..अकोल्याला रहाताना बहिणीला माझा सारा इतिहास माहित असल्यामुळे .. ती मोजकेच पैसे माझ्या हाती देई ..बहुतेक तिला मोठ्या भावाने तश्या सूचना दिल्या असाव्यात .. मलाही त्याचे काही वाटले नाही सुरवातीला ..मात्र नंतर ऐक दोन वेळा व्यसन केल्यावर ..तिचे मला मोजके पैसे हातात देणे मला खटकू लागले .. आठवड्यातून एकदा तरी की काही ना काही खोटे कारण सांगून मी बहिणीकडे पैसे मागू लागलो .. व्यसनाचा राक्षस पूर्ण जागा झाला होता मनात ..फक्त आजच्या दिवस ..एकदाच ..पुन्हा कधी नाही असे स्वतःला बजावत मी परत परत तेच करत गेलो ..जरी रोज नसले तरी संधी मिळेल तेव्हा मी अकोल्याला ब्राऊन शुगर ओढू लागलो ..ऐक दोन वेळा मेव्ह्ण्यांच्या पाकिटातून देखील पैसे काढले ..त्यांच्या लक्षात आले असावे ..मात्र ते बोलले नाहीत ..तरी त्यांच्या वागण्यात बदल झाल्याचे मला जाणवले ..त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले मी !.


असाच क्रिकेट खेळताना एकदा पाठीत उसण भरली .. दोन दिवस झाले तरी का बरे वाटेना ..पेन किलर च्या गोळ्या झाल्या ..आयोडेक्स मलिये ..काम पर चलिये देखील झाले तात्पुरते कमी होई ..फरक पडेना .. सलील ने सुचवले ' पायाळू ' व्यक्तीकडून जर पाठीवर पाय फिरवला तर उसण ताबडतोब बरी होते .. हे पायाळू प्रकरण एक प्रकारची अंधश्रद्धा च आहे असे माझे मत होते .. जन्माला येताना बहुधा सारे जण डोक्याच्या बाजूने जन्माला येतात ..काही व्यक्ती पायाकडून जन्म घेतात ..याचा अर्थ त्यांच्यात काहीतरी दैवी सामर्थ्य असावे ..असा कोणीतरी शोध लावला असावा आणि ते दैवी सामर्थ्य म्हणजे काय तर म्हणे अश्या माणसाचा पाय उसण भरलेल्या जागेवर फिरवला तर उसण बरी होते .. अश्या व्यक्तीवर वीज पडण्याचा अधिक धोका असतो .. अश्या व्यक्तीला जमिनीत पाणी कुठे लागेल हे कळते वगैरे .. या सगळ्या गोष्टींची बुद्धीला पटेल अशी कारणीमीमांसा मात्र कोणला सांगता येत नाही . सलील ला आधी मी उडवून लावले .. त्याने माहिती पुरवली की ' अनघा ' पायाळू आहे आणि तिने मागे म्हणे सलील च्या पाठीत उसण भरली तेव्हा ..त्याला पाठीवर पाय फिरवून बरे केले होते .. हे ऐकून वाटले ..असेल अंधश्रद्धा ..पण आपल्याला फायदा जर होत असेल तर एकदा प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे ? .. सलील ने अनघाला तसे सांगितले तर ..ती काही केल्या माझ्या पाठीवर पाय फिरवायला तयार होईना ..अजून ऐक अंधश्रद्धा अशी आड येत होती की ..अनघा मला पाय कशी लावणार ? तिच्या मनात माझे स्थान भावी पतीचे होते आणि अश्या व्यक्तीला पाय लावणे म्हणजे लाथ मारण्यासारखे होते तिच्या दृष्टीने ..हे पाप करायला अनघा तयार होईना .. शेवटी माझे दुखणे पाहून तिचे मन द्रवले आणि ती तयार झाली मग मी खाली वाकून बसलो ..आधी ती तीन वेळा पाझ्या पाया पडली ..म्हणजे गुन्हा करण्याच्या आधीच तिने जाणू क्षमा मागितली होती ..नंतर तिने हलक्या पायाने माझ्या पाठीवर तीन वेळा पाय फिरवला ..झाले जेम तें ५ सेकंदांचे काम होते ते .. माझ्या दुखण्यात काही फरक पडला नाही ..पण तसे सांगितले असते तर अनघाला वाईट वाटले असते कारण एकतर ती तयार होत नव्हती ..तरी तिला आग्रह करून तयार केले होते ..मग तिला बरे वाटावे म्हणून म्हणालो ' वा ! छान वाटते आहे आता ...पूर्ण बरे नाही झाले अजून पण एकदम कमी झालेय दुखणे ...' हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला त्याला तोड नव्हती ...मला वाटते अनेक निरुपद्रवी अंधश्रद्धा अश्याच फोफावत असाव्यात . साधारणतः चार दिवसांनी पाठ बरी झाली आपोआप . पाठीत उसण भरणे ..मान लचकणे .. कंबर लचकणे वगैरे बाबी काही गंभीर दुखापत नसेल तर आपोआप चार दिवसात बऱ्या होतात .

माझ्या टायपिंग ची परीक्षा जवळ आली होती त्यामूळे मला क्लास मध्ये अर्धा तास सराव करायला जास्तीचा मिळू लागला ..मी देखील मन लावून सराव केला .. केव्हा एकदा परीक्षा होते आणि आपण नाशिकला जातोय असे झाले होते मला ..नाशिकच्या मित्रांपासून सुमारे पहिल्यांदाच इतका काळ म्हणजे सहा महिने दूर होतो .. एकदा सलील ..मी ..अनघा आणि तिची मैत्रीण असे मिळून अकोल्यात ' राजेश्वर ' मंदिरात जाऊन शंकराच्या पिंडीचे दर्शन घेऊन आलो होतो ..हे म्हणे तेथील पुरातन आणि जागृत देवस्थान होते .. माझे व्यसन अधून मधून सुरु झाले आहे ..हे अनघा व सलील ला कळू नये याची मी दक्षता घेत होतो ..बहिणीला बहुधा संशय आला असावा कारण माझे कधी कधी संडासात जास्त वेळ बसणे तिला जाणवले होते ..तिने आडून पाडून तसे बोलून ही दाखवले होते मला ..मेव्ह्ण्यांसमोर जास्त बोलणे नको म्हणून कदाचित तिने विषय वाढवला नव्हता . या वेळी सलील ला देखील माझे नाशिकचे घर पाहण्याची उत्सुकता होती म्हणून तो देखील आमच्या सोबत नाशिकला येणार होता चार दिवस राहून तो परत जाईल असे ठरले आणि आमचे नाशिकला जाण्याचे आरक्षण झाले .. एकीकडे अनघा पासून काही काळ दूर जाणार याचे दुखः वाटत होते ..तर आपल्या गावी जाण्याचा आनंद अश्या समिश्र भावना माझ्या मनात होत्या . एकदाची माझी टायपिंग ची परीक्षा आटोपली .. बहिणीला.. भाच्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्याच .. सलील सोबत आम्ही सारे नाशिकला जाण्यासाठी स्टेशनवर आलो सोबत अनघा स्टेशनवर सोडायला आली होती .. मी गाडी सुरु झाल्यावर दारातच उभा होतो .. बराच वेळ अनघाचा हात हलत होता ..हळू हळू माझ्या डोळ्यासमोरून ती धुसर होत गेली ..तिचा हलणारा हात मात्र अजूनही आठवण झाली की हृदयात कळ उठवतो .

( बाकी पुढील भागात . वाचक मित्रानो ... आपण माझ्या या जीवन प्रवासाशी समरस झाला आहात हे मी जाणतो त्यामूळे अनेकदा ...काही गोष्टी आपल्याला दुखः होऊ नये म्हणून खऱ्या स्वरुपात लिहू नये असेही मनात येते ..पण तो मोह मी टाळतो आणि जे वास्तव आहे ..जे घडलेय ते जसेच्या तसे लिहितो आहे .. व्यसन केल्यानंतर मिळणाऱ्या क्षणिक आनंदाचा पगडा व्यसनी व्यक्तीच्या मनावर इतका खोलवर रुजलेला असतो की एकदा ते आकर्षण जागृत झाले की जगातले सर्व आनंद त्याला व्यर्थ वाटू लागतात ..या वर उपाय एकाच असतो ..की एकदाही व्यसन न करणे ..पण नेमका हा उपाय अमलात आणणे कठीण असते व्यसनी व्यक्तीसाठी म्हणून तो वारंवार अश्या आकर्षणाला बळी पडू शकतो ..व्यसनमुक्ती केंद्रात या आकर्षणावर मात करण्यासाठी उपचार आणि उपाय सांगितले जातात ..त्या बद्दल माझ्या पेज वर नव्याने सुरु केलेल्या ' बेवड्याची डायरी ' या लेखमालेत आपण सविस्तर वाचालच .)

=======================================================================

 भाग ९२ वा  वडिलांची सेवा ..??????


बहिण ..भाचे ..सलील आणि मी असे सर्व नाशिकला घरी पोचलो ..या वेळी घर बदललेले होते ..भावाने त्याच्या सी.डी .ओ . ऑफिस समोरच तारवाला नगर मध्ये ' आदर्श गोकुळ ' को .ऑप. सोसायटीत वडिलांच्या फंडातून मिळालेले साठ हजार आणि त्याचे स्वतचे साठ हजार मिळून ऐक छान पाचशे चौ. फुटाचा फ्लँट घेतला होता .. मेरीचे क्वार्टर सोडून दिले होते .. ' या सोसायटीत दोन विंग होत्या प्रत्येक विंग मध्ये एकूण १२ फ्लँट होते ..दोन्ही विंगची मिळून प्रशस्त गच्ची होती ..मला हे घर खूप आवडले ..त्या वेळी तारवाला नगर नवीनच सुरु झाले होते आसपास बरीच मोकळी जागा होती ..समोर महापालिकेची बाग होती .. . वडील हॉस्पिटल मध्ये दाखल असल्याने घरी जरा गंभीरच वातावरण होते ..भावाचा मुलगा ' मोहित ' छान गोंडस होता .. आई सकाळीच सगळे आवरून वडिलांजवळ हॉस्पिटल मध्ये गेली होती ...रात्री तेथे भाऊ थांबे तर ..दिवसा आई थांबत होती असे समजले .. .. सायंकाळी आम्ही वडिलांना भेटायला हॉस्पिटल मध्ये गेलो ..पंचवटीत असलेल्या आयुर्वेदिक हॉस्पिटल मध्ये वडिलांना दाखल केले गेले होते . आम्हाला सर्वाना पाहून वडिलांना खूप आनंद झाला होता .. पण तो व्यक्त करण्यासाठी आता ते बोलू शकत नव्हते ..आईने त्यांना उठवून उशीला टेकवून बसवले ..उजवा निकामी झालेला हात त्यांच्या मांडीवर आईने उचलून ठेवताना पाहून मला कसेसेच झाले .. त्यांचे तोंडही थोडे वाकडे दिसत होते ..चालणे तर शक्यच नव्हते पण उठता बसताना देखील त्यांना मदत घ्यावी लागत होती ..बहिणीने वडिलांजवळ बसून त्यांचा डावा हात हातात घेतला तसे वडिलांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले ..ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागले पण तोंडातून नुसताच ' तू ..ती ..तू .' असा आवाज आला ..जीभ देखील निकामी झालेली होती त्यांची ..मला.. बहिणीला ...भाच्यांना पाहून झालेला आनंद केवळ ते होकारार्थी मान हलवून ..रडून व्यक्त करू शकता होते ..आईने सगळी माहिती दिली ..' मोहित ' च्या बारश्याच्या दिवशी ते खूप आनंदात होते .. रात्री घरी आल्यानंतर खूप वेळ गप्पा मारत होते ..दुसऱ्या दिवशी सकाळी उठताना लक्षात आले की केव्हा तरी झोपेत असे झाले आहे म्हणून ..आनंदाने उत्तेजित झाल्याने कदाचित रक्तदाब वाढून हे झाले असावे ..!

आता मला नाशिकला राहून वडील जोवर हॉस्पिटल मध्ये आहेत तोवर रात्रीचे त्यांच्या पाशी थांबायचे होते ..दिवसा आई थांबत असे .. त्यांना आयुर्वेदिक हॉस्पिटल मध्ये पंचकर्म आणि शरीराला वाफ देणे ..औषधी तेलाने मालीश करणे वगैरे उपचार सुरु होते .. लघवी ..संडास करिता त्यांना पॉट द्यावा लागे ..आयुष्यभर कष्ट करून जगणाऱ्या माणसाला असे परावलंबी व्हावे लागणे प्रचंड यातनामय होते .. लघवी साठी पॉट मागताना त्यांचा चेहरा खूप दयनीय होई .. शिवाय तोंडाने बोलता येत नसल्याने ते फक्त सोबत थांबलेल्या व्यक्तीकडे पहात तोंडाने काहीतरी आवाज करून किवा डावा हात हलवून त्याचे लक्ष वेधून घेऊन ..मान हलवत असत ..सुरवातीला त्यांना काय म्हणायचे आहे ते अजिबात समजत नसे ..मात्र आईला त्यांची भाषा बरोबर समजे .. ती लगेच त्यांना काय हवे आहे ते ओळखत असे ..वडील त्या अवस्थेतही आईने बरोबर ओळखले याची मान हलवून दाद देत असत .. पहिल्या दिवशी रात्री मी जेव्हा त्याच्या जवळ थांबलो तेव्हा रात्री कितीतरी वेळ झोप येईना ..वडिलांबद्दल खूप वाईट वाटत होते ..जरा ..व्याधी ..मृत्यू या निसर्गाच्या नियमाबद्दल खूप राग येत होता .. आपणही कधीतरी म्हातारे होणार ..काहीतरी आजारपण येणार आणि मग मृत्यू .. मला मृत्यू ची भीती वाटत नव्हती पण म्हातारपण आणि व्याधी न होता मृत्यू आला तर किती बरे असे वाटे .. आज तरुण असणारा प्रत्येक जण कधीतरी म्हातारा होणार आहे ..त्याला काहीतरी आजार होणार आहेत ...कदाचित परावलंबी व्हावे लागणार आहे . अश्या वेळी माणसाचा सगळा ताठा निघून जातो .. कितीही पैसा ..यश ..अधिकार ..सन्मान असला तरी हे अपरिहार्य आहे .. मोजकेच भाग्यवान लोक हृदयविकाराचा झटका येऊन पटकन कारभार संपवितात .. बहुतेक जण शेवटच्या घटका मोजत बिछान्यावर असहाय पणे मरणाची वाट पाहत घालवितात ..वडिलांच्या मनात असे बिछान्यावर खीळलेले असतांना काय नेमके विचार येत असतील याचा मी विचार करत होतो ..रात्री वडिलांना हाताने जेवण भरावून ..गोळ्या देवून मी झोपवले होते ..बहुतेक त्यांना झोपेच्या गोळ्या सुरु होत्या म्हणून पटकन झोप लागली ..मी मात्र अनेक प्रकरचे चांगले ..वाईट विचार करत सारखी कुस बदलत होतो ..पहाटे पहाटे केव्हातरी मला झोप लागली असावी ..मी वडिलांचे बोट धरून एका बागेत फिरायला गेलोय .. आईस्क्रीम घेऊन दया म्हणून त्यांच्याकडे हट्ट करतोय ...तोच कोणीतरी मला हलकेच स्पर्श केला मी पटकन सावध झालो ..म्हणजे मी स्वप्नात होतो तर ..शेजारी वडील कुशीवर वळले होते आणि माझ्या बाजूला तोंड करून मला उठवण्याचा प्रयत्न करत होते ..त्यांचा चेहरा अतिशय केविलवाणा झाला होता ..ते मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते ..पाणी ? मी विचारले ..त्यांनी नकारार्थी मान हलविली .. तोंडातून नुसताच '' ती ..ती . ' असा अस्पष्ट आवाज .लघवी ? असे मी विचारल्या बरोबर ..त्यांनी चेहरा कसातरीच करत होकारार्थी मान हलविली .मी पटकन उठून त्यांना लघवीचा पॉट दिला ..मला असे झोपेतून उठवून लघवीसाठी पॉट मागणे त्यांना कष्टप्रद वाटत होते हे त्याच्या हालचालीतून मला जाणवले ..कदाचित मी झोपमोड झाली म्हणून चिडेन की काय याची भीती ..आणि स्वतच्या परावलंबी पणाची शरम असे समिश्र भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते .. !

दुसऱ्या दिवशी सकाळीच आई हॉस्पिटलला चहा ..वडिलांना नाश्ता वगैरे घेऊन आली तेव्हा मी घरी परतलो ..सलील ला मला नाशिकरोड ला नेऊन ..माझे कॉलेज ..मित्र .. आम्ही त्याला सांगितलेल्या गोष्टींची नेमकी ठिकाणे दाखवायची होती ..आम्ही नाशिकरोड ला गेलो ..वाटेत त्याला मी माझे कॉलेज दाखवले ..मग सिन्नर फाट्याला माझी ' पान टपरी ' दाखविली ..ती भावाने विकून टाकली होती आता तेथे चपला दुरुस्त करण्याचे आणि तयार चपला विकायचे दुकान ऐक जण चालवत होता ..मग आमच्या गांजा पिण्याचा अड्डा .. सिन्नर फाट्याचे सर्व मित्र .. एका ठकाणी मित्रांची चिलीम ओढणे सुरु होते ..त्यांच्यात बसून दोन तीन दम मारावे असा मोह झाला पण सलील सोबत असल्याने तो विचार अमलात आणता आला नाही
=======================================================================
. भाग ९३ वा  कुणाच्या खांद्यावर ..कुणाचे ओझे !

चार दिवसात सलील ला पंचवटी ...मुक्तिधाम ..तपोवन वगैरे ठिकाणी मी फिरवले ..रोज रात्री वडिलांजवळ थांबत होतो .. वडिलांच्या तब्येतीत अजून तरी फारसा फरक पडत नव्हता .. त्यांचे तैलमर्दन ..वाफ घेणे ..आणि इतर औषधे असे प्रकार मात्र नियमित सुरु होते ..त्यांच्या निकामी झालेल्या हाताला आणि पायाला लावायला ऐक ' महानारायण ' तेल नावाचे आयुर्वेदिक तेल सांगितले होते ..त्या तेलाचा खूप भयंकर असं वास येत असे .. त्या तेलाच्या बाटलीचे झाकण उघडले की वडील देखील कसेतरीच तोंड करत ..मात्र सगळे उपचार ते मन लावून करून घेत होते ..शरीराला वाफ देण्याचा कार्यक्रम देखील कधी कधी त्यांना त्रासदायक वाटे कारण त्यावेळी एका बंद लाकडी पेटीत बसवले जाई त्यांचे फक्त तोंड बाहेर ठेवून ती पेटी बंद करून मग त्यात वाफ गरम वाफ सोडत असत ..कधी कधी त्यांना वाफ जास्त गरम असेल तर सौम्य चटके बसत असत ..अश्याव वेळी त्यांना तोंडाने काही सांगता येत नसल्याने ते ..वाफ जास्त गरम असली तर नकारार्थी मान हलवून इशारा करत असत ...त्यांचे इशारे जर आई जवळ नसेल तर आम्हाला समजणे कठीण जाई ..मग आम्ही त्यांना अनेक पर्याय विचारत असू ते नकारार्थी मन हलवत ..अगदी आम्ही नाहीच ओळखले तर त्यांच्या डोळ्यातून पाणी येई ते पाहून खूप वाईट वाटे ..मग त्यांच्या जवळ आम्ही ऐक पाटी पेन्सिल ठेवली ..त्या पाटीवर ते त्यांना काय म्हणायचे ते लिहीत असत ...त्यांच्या मेंदूला व्यायाम म्हणून ऐक ' ब्रेनविटा ' नावाचा छोटासा खेळ भावाने आणून दिला होता एका प्लास्टिक च्या गोल तबकडीत छोटे छोटे कप्पे होते ..त्या कप्प्यात बसणारे खेळण्यातले कंचे ( काचेच्या गोट्या ) सोबत होते ..हे सगळे कंचे त्या कप्प्यात बसविल्यावर ऐक कप्पा रिकामा राही मग एका आड ऐक अशी एकेक गोटी काढत जायची ज्याच्या शेवटी कमीत कमी गोट्या राहतील तो ' जिनियस ' असे मानले जायचे ..वडील कंटाळले की डाव्या हाताने हा गोट्या काढायचा उद्योग करत बसत असत .

सलील अकोल्याला परत गेल्यावर ..दिवसा लायब्ररीची पुस्तके वगैरे वाचन करणे आणि रात्री वडिलांजवळ थांबणे असे माझे रुटीन सुरु झाले मध्ये ऐक दोन वेळा नाशिकरोड ला जाऊन गांजा दारू वगैरे प्यायलो ..आता मला व्यसनासाठी घरातून पैसे मिळणे जरा अवघडच होत असे ..कारण वडिलांच्या आजारपणाच्या खर्चामुळे आईजवळ मोजकेच पैसे शिल्लक रहात होते ..तसेच येथे मेरी ला राहायला आल्यापासून तिचे शिवणकाम वगैरे बंदच होते ...ब्राऊन शुगर ..म्हणजे माझ्यासाठी मोठी चैन होती ..दारू आणि गांजा त्या मनाने स्वस्त होता ..पंचवटीत ' वाघाडी ' नावाचा ऐक भाग आहे ..तेथे बहुसंख्य वस्ती कुष्ठरोगाने पिडीत असलेल्या लोकांची आहे .. जवळून वाहणाऱ्या वाघाडी नावाच्या नाला सदृश नदी जवळ ही वस्ती वसलेली होती .म्हणून वाघाडी असे नाव असावे ..तेथे सर्रास गावठी दारू गाळण्याचा आणि विकण्याचा धंदा चाले ...सडका गुळ ..नवसागर असे एकत्र आंबवून मग पिंपात ठेवलेल्या त्या मिश्रणाला फेस आला की भट्टी लावून दारू गाळण्यात येई .. तेथे मुबलक आणि स्वस्त दारू मिळे ..रात्री वडिलांजवळ झोपायला जाताना मी आधी वाघाडीत ऐक चक्कर टाकून मग हॉस्पिटल ला जाऊ लागलो ..वडिलांना कळूनही ते मला काही बोलू शकत नव्हते ..साधारण पाच दहा रुपयात माझे काम भागत असे ..या वस्तीत जरी बहुसंख्य कुष्ठरोगी रहात होते आणि त्यांच्या नावाने हे हातभट्टीचे धंदे सुरु होते तरी हे धंदे चालविणारी सर्व माणसे कुष्ठ रोगी नव्हती ..फक्त कुष्ठरोगी लोकांच्या नावाखाली ते हे अवैध दारू गळण्याचे काम करत असत ..जरी पोलिसांनी छापा मारला तरी हे लोक विनासायास कायद्याच्या कचाट्यातून सुटत असत ..कारण ..म्हणे कुष्ठरोग्यांना पकडणे ..पोलीस कोठडीत ठेवणे .. केस चालवणे वगैरे पोलिसांना त्रासदायक काम होते ..एकदा एका नवीन आलेल्या कलेक्टर ने जेव्हा पोलिसांना सक्त ताकीद देवून वाघाडीतले सगळे धंदे बंद पाडले तेव्हा तेथील गुंड आणि पुढारी लोकांनी वस्तीतील कुष्ठरोगी ...त्यांची बायकापोरे ..वगैरे सहित कलेक्टर ऑफिस मोर्चा नेला होता .. ' कलेक्टर ने आमच्या पोटावर दिलाय पाय .. आता आम्ही खायचे काय ? ' अश्या अविर्भावात हा मोर्चा कलेक्टर ऑफिस च्या खानावळीत जाऊन चहा पाणी ..नाश्ता ..जेवण करून तेथेच खानावळीचे पैसे न देता ठाण मांडून बसला होता . शेवटी कलेक्टर ला माघार घ्यायला लागली व परत सगळे धंदे सुरळीत सुरु झाले असे मी ऐकून होतो .. म्हणजे बिचाऱ्या कुष्ठरोग्यांच्या नावावर दारू गाळण्याचा अवैध धंदा करणारे महाभाग देखील होते तर ..


एकदा गम्मत झाली सायंकाळी वडिलांजवळ जाण्याआधी वाघाडीत एका अड्यावर पीत बसलो असतांना ..ऐक जण आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या रुग्णाच्या ड्रेस मध्येच अड्ड्यावर आला त्याने वरच्या खिश्यातून दहाची नोट काढून दारू मागितली .. त्याने त्याचा ऐक हात पाठीमागे लपवला होता ..अड्ड्यावरील कंदिलाच्या उजेडात नीट दिसत नव्हते ..त अड्डेवाल्याने त्या माणसाला पाठीमागे हातात काय आहे हे विचारले तर त्याने थोडेसे संकोचत मागे लपवलेला हात पुढे केला ..आणि सगळे हसू लागले ..त्याच्या हातात कँथेटर ला जोडलेली ' युरीन ' ची प्लास्टिक ची बँग होती ...दारू मुळे किडनी खराब झाल्याने तो हॉस्पिटल ला उपचार घेत होता ..लघवी बंद झालेली होती मूत्रपिंडाच्या त्रासामुळे त्याला कँथेटर लावले गेले होते ... पायजम्याच्या आतून ती नळी बाहेर प्लास्टिक च्या बँग ला जोडलेली होती आणि अश्याही अवस्थेत हे महाशय ..घरच्यांची नजर चुकवून तेथे अड्ड्यावर दारू प्यायला आले होते .. !


वडिलांनी खूप तरुण वयापासून कष्ट करून पैसे मिळवण्यास सुरवात केली असल्याने आता देखील आजारी असतांना त्यांच्या खिश्यात ऐक तरी पन्नास रुपयांची नोट ठेवलेली असावी असं त्यांच्या हट्ट असे ..म्हणजे ती नोट ते कोठेही खर्च करू शकत नव्हते तरी खिश्यात हवी म्हणून ठेवली जाई ..रोज त्यांचे कपडे बदलताना आठवणीने ते डाव्या हाताने ती नोट काढून मुठीत धरून ठेवत असत मग दुसरा शर्ट घातला की परत शर्टच्या वरच्या खिश्यात ठेवून देत असत ....एकदा सायंकाळी त्यांच्या पाशी दवाखान्यात जाताना माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते ..आता दारूचे काय ? हा प्रश्नच होता ..मला वडिलांच्या खिशातील पन्नास रुपयांची नोट आठवली ..पण वडील ती नोट मागून मला देणे शक्यच नव्हते ..म्हणजे .वडिलांच्या नकळत ती नोट काढावी लागणार होती .. झोपताना ते ती नोट त्यांच्या डोक्याखालच्या उशीखाली ठेवत असत त्यामूळे झोपल्यावर काढताना ते जागे होण्याची शक्यता होती ..मग आयडिया केली . वडलांचे जेवण झाल्यावर त्यांच्या शेजारी त्यांना टेकून बसलो .. प्रेमाने त्यांच्याशी काहीतरी बोलत मी माझा हात त्यांच्या खांद्यावरून त्यांच्या शर्टच्या खिश्याजवळ नेवून हळूच दोन बोटांनी ती नोट काढली .. बाहेर जाऊन .. त्या दिवशी मस्त दारू ..ब्राऊन शुगर अशी चैन केली ..मग रात्री उशिरा हॉस्पिटल ला आलो ..पाहतो तर वडील जागेच होते .. मी त्यांच्या रूम मध्ये गेल्याबरोबर ते स्वतच्या खिश्याला डावा हात लावून मला नोटे बद्दल विचारू लागले ..मी ..ते काय म्हणत आहेत ते मला काहीच समजत नाहीय असा अविर्भाव केला ..मग त्यांनी पाटीवर पेन्सिल ने पन्नास रुपये असे लिहिले ..तेव्हा ..असतील इथेच कुठेतरी ..मी कशाला घेऊ वगैरे म्हणत नकार दिला .. ते नाराज झालेले दिसले .दुसऱ्या दिवशी सकाळी आई आल्याबरोबर त्यांनी आई जवळ ही तक्रार केली ..सगळा प्रकार आईच्या लगेच लक्षात आला. मला खूप रागावली आई ..त्या नंतर मग वडिलांच्या खिश्यात दुसरी नोट ठेवली गेली ..पण सायंकाळी आई घरी जाताना ती नोट आठवणीने काढून परत घरी नेत असे आणि सकाळी आली की परत वडिलांच्या खिश्यात ठेवत असे !
=======================================================================

 भाग ९४ वा नोकरी ..व्यवसाय ..व्यसन !


आयुर्वेदिक हॉस्पिटल मध्ये वडील सुमारे २ महिने होते ..मात्र फारसा फरक पडला नाही त्यांच्या तब्येतीत ..दरम्यान आईची फार दगदग होई ..माझ्या पुतण्या लहान असल्याने वहिनीना घरकामात जास्त वेळ देणे कठीण होते . शिवाय त्यांनी गाण्याचे क्लास घेण्यास सुरवात केलेली होती .रोज सायंकाळी चार ते आठ त्या गाण्याचे क्लास घेत असत ..काही दिवस मी देखील कौतुकाने वाहिनीकडे पेटी शिकलो ..फक्त ' सावन आया आज सुहावन ..सखिया मंगल गावत गाना ' इतकीच प्रगती केली ...आईला घरातली कामे आटोपून दिवसा दवाखान्यात काही वेळ बसावे लागे ..भाऊ वेळ मिळेल तसा दिवसा किवा रात्री दवाखान्यात येतच होता .. मी रिकामा होतो मात्र ..व्यसने पुन्हा सुरु आल्याने सगळ्यात जास्त ' बिझी ' झालो होतो ...म्हणजे दिवसभर पैसे कोठून मिळतील ? ..काय लोचा करायचा ? ..कसे जमवायचे ?या विचारात व्यस्त राहू लागलो होतो ...रात्री काही नाही तर निदान गांजा पिण्याची सोय करतच होतो .हॉस्पिटल मध्ये माझा ट्रान्झीस्टर नेला होता .. मग रात्री झोप येईपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी लागलेली विरहगीते ऐकत बसे ..शेवटी वडिलांना घरी आणण्याचे ठरले ..घरीच औषधे घेऊन ..फिजीयोथेरपी करत रहावी असे ठरले .


वडील घरी आल्यावर ..एका परिचितांच्या ओळखीने मला ' नवदुर्गा इंडस्ट्रीज ' , अंबड येथे पर्चेस विभागात नोकरी मिळाली ..कंपनी ला लागणारे साहित्य नाशिक मधूनच खरेदी करायचे काम माझ्याकडे होते ..कंपनीने ऐक स्कुटर देखील दिली होती मला फिरायला ..सुरतीला काही दिवस मी नोकरी नीट केली .. व्यसने अगदी रोज नाही तरी संधी मिळेल तेव्हा सुरूच होती ..एकदा मी कंपनीचे महत्वाचे काम असतांना स्कुटर घेऊन दिवसभर गायब राहिलो ..आणि मालकाचे डोके फिरले ..त्याने मला नोकरी वरून काढून टाकले ..घरी मात्र मी खरी परिस्थिती न सांगता ..काहीतरी समर्थने देऊन वेळ निभावून नेली ..मग आमच्या वाहिनीच्या वडिलांचे स्नेही श्री . वसंतराव नातू यांच्या ' मायबोली ' या वाचनालयात मला वाहिनीच्या वडिलांनी शब्द टाकला म्हणून नोकरी मिळाली ..अशोक स्तंभ येथून रविवार कारंजा कडे येणाऱ्या रस्त्यावर वाहिनीच्या वडिलांच्या मालकीचे ऐक छोटेसे दुकान होते ..ते वसंतराव नातू यांनी भाड्याने घेतले होते ..व तेथे त्यांनी त्यांच्या ' लायब्ररी ' ची ऐक शाखा सुरु केली होती ..मला ही छोटीशी लायब्ररी सांभाळण्याचे काम मिळाले .. .. सकाळी ९ ते रात्री साधारण साडेआठ पर्यंत मी तेथे थांबत असे ..नवीन सभासद करून घेणे ..त्यांना पुस्तके बदलून देणे ..अश्या स्वरूपाचे काम होते .. वसंतराव नातू हे परिवहन मंडळातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी हा वाचनालयाचा व्यवसाय सुरु केला होता ..त्यानाही वाचनाची खूप आवड होती व पाहता पाहता त्यांनी हा खाजगी वाचनालयाचा व्यवसाय खूप वाढवला होता ..त्या वेळी त्यांच्याकडे अंदाजे सुमारे दोन हजार सभासद असावेत..वसंतरावाना तीन मुली होत्या तिघींचे लग्न झालेले होते .. नाशिक शहरातील परशुराम सायखेडकर नाट्यगृहाच्या शेजारी असलेले ' सार्वजनिक वाचनालय 'आणि हे दुसरे खाजगी ' मायबोली ' वाचनालय प्रसिद्ध होते . खरेतर मला देखील वाचनाची आवड असल्याने ही नोकरी अगदी चांगलीच होती पण .. माझ्या मनातील व्यसनाचे आकर्षण काही कमी होत नव्हते ..!

अकोल्याला अनघाला पत्र पाठविताना मी सलील च्या नावावर पाकिटात पत्र पाठवीत होतो ..मलाही ती सलीलच्याच नावाने पत्र पाठवीत असे ..त्या काळी मोबाईल ही भानगड अस्तित्वातच नव्हती तसेच सर्वत्र टेलिफोन पण नव्हते त्यामूळे आमचा संपर्क महिन्यातून फार तर दोन वेळा आणि तो देखील पत्राद्वारे होऊ लागला .. ' लायब्ररी ' चे काम अजून वाढावे म्हणून नातू काकांनी मला नवीन कल्पना सुचविली ..त्यांनी पेपर मध्ये घरपोच लायब्ररी च जाहिरात दिली आणि जे लोक संपर्क करतील त्यांच्या कडून महिना थोडे जास्त पैसे वर्गणी म्हणून आकारून त्यांना घरपोच पुस्तक बदलून देण्याचे काम मला सोपवले ..तसेच मी देखील वेगवेगळ्या वसाहतीत सायकलने फिरून घरोघरी जाऊन घरपोच वाचनालयाची माहिती देवून सभासद बनविणे सुरु केले .सोबत मी दोन मोठ्या पिशव्यात दिवाळी अंक , कादंबऱ्या ..धार्मिक ..आत्मचरित्रे अशी वेगवेगळ्या प्रकारची मिळून चाळीस ऐक पुस्तके नेत होतो ..अनेकदा मी पावती न बनवता सभासद बनवून त्यांचे वर्गणीचे पैसे हडप करू लागलो ..तुलनेत हे पैसे हडपण्याचे प्रमाण कमी असल्याने नातुकाकांच्या लक्षात येत नव्हते . काही दिवसांनी रविवार कारंजावरचे भाड्याचे दुकान बंद करून ' मायबोली ' वाचनालय एम .जी रोडवर नव्याने झालेल्या ' अभ्यंकर प्लाझा ' या ठिकाणी मालकीच्या जागेत गेले तेथे सकाळी व संध्याकाळी पुस्तक वगैरे बदलून देण्यासाठी दोन मुली होत्या ..त्या वेळात मी घरपोच लायब्ररी चे काम करत असे व दुपारच्या वेळात वाचनालयात थांबत असे ..नातू काका खूप उत्साही होते ..त्यांना माझ्या पूर्वीच्या जीवनाबद्दल माहिती असूनही माझ्यावर विश्वास ठेवत होते ..ते मला व्यवसायाच्या नवीन नवीन कल्पना सांगत असत ..दुपारच्या वेळी वाचनालयात जास्त गर्दी नसते म्हणून त्यांनी मला दुपारी पार्ट टाईम तेथे वाचनालयाच्या बाजूलाच असलेल्या ' साहिल ' वॉच क. या घडयाळे व त्यांचे स्पेअर पार्टस असलेल्या दुकानात श्री . खरे यांच्या कडे काम करण्यास सुचविले ..त्यानुसार मी ' साहिल ' वॉच मध्ये देखील काम करू लागलो .. माझी लवकरात लवकर भरभराट करावी ही नातुकाकांची इच्छा होतील ..परंतु स्वतच्या भल्याची मला समज यायची असल्याने ..मिळणारे सर्व पैसे मी व्यसनात उडवत होतो ..कष्टदेखील भरपूर करत होतो पण शेवटी ' देणाऱ्याचे हात हजारो ..दुबळी माझी झोळी ' असे झाले होते .. साहिल वॉच कंपनी चे मालक खरे देखील खूप कल्पक होते ..रक्षाबंधनाच्या वेळी त्यांनी मुंबईहून घाऊक भावाने राख्या मागवल्या होत्या त्या विकण्यासाठी देखील मी रक्षा बंधनाच्या चार दिवस आधीपासून समोरच्या फुटपाथ वर स्टुल घेऊन बसलो ..रक्षा बंधनाच्या आदल्या दिवशी बऱ्याच राख्या उरल्या .. सगळ्या खपाव्यात म्हणून मेनरोड ला देखील हातगाडी वर राख्या मांडून विकल्या .. या विक्रीत माझे वेगळे कमिशन असे ..सगळे पैसे शेवटी गांजाच्या ..दारूच्या ..ब्राऊन शुगरच्या वर खर्च होत .

राखीचा सिझन संपल्यावर नातुकाकानी नवीन कल्पना मांडली ' तुषार उद्योग ' नावाने व्यवसाय सुरु करण्याची ..माझ्या नावाने हा व्यवसाय असणार होता ..काही खाण्याचे पदार्थ आणि इतर वस्तू ' मायबोली ' वाचनालयाच्या जागेतच विक्रीला ठेवायचे आणि ते काम मी सांभाळायचे अशी त्यांची कल्पना होती ..जर मी नीट लक्ष घालून व्यवसाय वाढविला असता तर मग वेगळी जागा व जास्तीचे भांडवल देण्यासाठी देखील ते मदत करणार होते . मी देखील उत्साहाने एके दिवशी स्वतच्या हाताने ऐक पत्र्याचा बोर्ड बनवून त्यावर पेंट ने ' तुषार उद्योग ' हे नाव रंगविले ..अर्थात त्या दिवशी मस्त डोस झाला होता ब्राऊन शुगरचा म्हणून हा अतिरिक्त उत्साह होता .. तो बोर्ड वाचनालयाच्या बाहेर लावला ..काकांनी सांगली , कोल्हापूर वगैरे ठिकाणी प्रसिध्द असलेले ' भडंग ' मागवले होते ते विक्रीस ठेवले ..तसेच बिस्किटाचे पुडे .. वेफर्स असे पदार्थ विक्रीस ठेवले ..नंतर दोन दिवसात त्यांनी पाठ वगैरे शेकण्यासाठी मिळणारी इलेक्ट्रिकची पिशवी देखील मला विक्रीसाठी आणून दिली .. या निमित्ताने माझ्या खिश्यात जसे जास्त पैसे येऊ लागले तसे व्यसन वाढू लागले ..इतके सगळे पैसे व्यसनात उडवून देखील कधी कधी घरी देखील पैसे मागत होतो ..वडील पूर्वी माझ्या बाबतीत ऐक वाक्य नेहमी म्हणायचे की हा ' कुबेराला देखील भीक मागायला लावेल ' ते खरेच होते ... शेवटी तब्येतीवर सगळ्याचा परिणाम दिसू लागला मी पुन्हा खंगत चाललो होतो ..भावाच्या लक्षात सगळे आलेले होते फक्त जो पर्यंत घरी जास्त त्रास देत नाही तो पर्यंत तो कटकटी नकोत म्हणून बोलला नव्हता ..अधून मधून आमचे खटके उडत असत पण आई पटकन मध्यस्ती करत होती .. तब्येतीवर परिणाम होत असल्याने मग मी कामावर दांड्या मारू लागलो ..हळू हळू नातुकाका माझ्याबाबत निराश होऊ लागले !

=======================================================================

भाग ९५ वा  ' स्नेहदीप ' व्यसनमुक्ती कक्ष
!

मी नेहमी रात्री घरी उशीरच येत होतो ....कारण तो पर्यंत भाऊ झोपलेला असायचा व त्याला तोंड देण्याची समस्या येत नसे .. एकदा मी थोडा लवकर घरी आलो आणि भावाने संशय येऊन माझी झडती घेतली ..आधी मी नकार दिला पण नंतर तो जास्त मागे लागला ...माझ्या खिश्यात ब्राऊन शुगर ओढण्याची पन्नी .. ऐक पुडी सापडली ...तो मला पुन्हा ' मेंटल हॉस्पिटल ' ला चल म्हणून मागे लागला .. आताशी तर माझी नोकरी ..' तुषार उद्योग ' हा व्यवसाय सुरु झालाय ..नातूकाका मला सुटी देणार नाहीत .. मी घरीच राहून व्यसन सोडतो असे बहाणे करू लागलो ..पण ..भाऊ ठाम होता ..त्याने उद्याच आपण ' ठाण्याला जाऊ असे सांगितले .. शिवाय तू या वेळी बाहेर काय काय भानगडी केल्यात ते देखील सगळे सांगून टाक म्हणाला ..मला खरी भीती तीच होती ..मी मेंटल हॉस्पिटल ला दाखल झाल्यावर ..माझ्या आर्थिक भानगडी बाहेर पाडल्या असत्या ..मी हजर असतांना सगळे निभावून नेले असते ..शेवटी भावाला सर्व खरे सांगितले ..फिरत्या वाचनालयाच्या सभासदांचे खाल्लेले पैसे ..नातू काकांकडून उधार घेतलेले पैसे ..आणि इतर किरकोळ उधाऱ्या या बद्दलची माहिती दिली ..तू काही काळजी करू नकोस .मी सगळे पैसे फेडतो तुझे असे भावाने आश्वासन दिले ..दुसऱ्या दिवशी सकाळीच पंचवटी एक्सप्रेस ने आम्ही ठाण्याला निघालो . गाडीत मी भावाला सारखे बजावत होतो ...नातुकाका ..खरे वगैरे मंडळीना मी पुन्हा व्यसन सुरु केले हे सांगू नकोस ..सलील चे पत्र आले तर ते पाकीट न उघडता तसेच ठेव ..मी आल्यावर उत्तरे देईन वगैरे ..सगळ्या गोष्टीना भाऊ होकारार्थी मान हलवत होता .


ठाण्याला पोचल्यावर रिक्षाने आम्ही सरळ मेंटल हॉस्पिटल च्या दारात हजर झालो .. अधीक्षकांनच्या ऑफिस च्या दारावर या वेळी वेगळी पाटी होती ' डॉ .पा. ठ. लव्हात्रे ' नावाची ..म्हणजे मागच्या वेळी असलेले डॉ. रेकाडे साहेब बदलून गेले होते तर ..आमचा नंबर लागल्यावर आम्ही केबिन मध्ये शिरलो ..आत ऐक साधारण पंचेचाळीस वर्षे वयाचा अर्धवट टक्कल पडलेला ..गोरापान ....चष्मा ..भव्य कपाळ असलेला माणूस बसला होता ..त्यांनी माझी सगळी माहिती विचारली ..ब्राऊन शुगर मिळाली नाही तर काय काय त्रास होतात ?..केवढ्याला ऐक पुडी मिळते ? .. इतर व्यसने कोणकोणती आहेत ? वगैरे प्रश्न विचारले ..मग मला म्हणाले ...तू मागच्या वेळी दोन वेळा हॉस्पिटल च्या इतर मनोरुग्णासोबत राहिला होतास या वेळी आम्ही तीन महिन्यापूर्वीच खास व्यसनी लोकांसाठी सुरु केलेल्या ' स्नेहदीप ' व्यसनमुक्ती कक्षात तुला राहायला मिळेल ..ही माहिती माझ्या करिता नवीन होती..खास व्यसनमुक्ती साठी मेंटल हॉस्पिटल मध्ये नवीन विभाग सुरु करण्यात आला होता याचे कारण व्यसनी लोकांच्या वाढत्या केसेस हेच असावे ..मी एका अटेंडंट सोबत नवीन कक्षात आलो .. ७ न. च्या वार्ड चे नुतनीकरण करून त्याचे नाव ' स्नेहदीप ' असे ठेवण्यात आलेले होते ..नवीन अधीक्षक डॉ .लव्हात्रे यांच्या पुढाकाराने ही सुरवात झाली होती हे मला समजले .. डॉ . लव्हात्रे हे अतिशय अभ्यासू आणि उत्साही व्यक्तिमत्व होते ..व्यसनाधीनता हा ऐक मनोशारीरिक आजार असून व्यसनी व्यक्तीला वेगळ्या प्रकारे उपचार दिले पाहिजेत हे त्यांच्या लक्षात आले होते तसेच या व्यक्ती वेड्या नसतात तर ' अतिशहाण्या ' या प्रकारात मोडतात हे देखील त्यांनी जाणले असावे . पूर्वी सात नंबर 'अ 'आणि 'ब' हे वार्ड वेडे कुष्ठरोगी आणि संसर्गजन्य आजार असलेल्या लोकांचे वार्ड म्हणून ओळखले जात असत ..सहसा त्या वार्डकडे पूर्वी मी फिरकलो नव्हतो ..एकदाच सिस्टर सोबत तिच्या गोळ्यांची पेटी हातात घेऊन तेथे गोळ्या वाटपा साठी गेलो होतो तेव्हा सिस्टर ने मला तोंडाला रुमाल बांधायला सांगितले होते ..अतिशय अस्वच्छ असे हे वार्ड होते ...अगदी खंगलेली माणसे ..काहींचे नाक चपटे झालेले ..हातापायांच्या बोटांवर जखमा .. जुनाट मोडकळीला आलेले पलंग ..पंखा स्थितीत नाही अशी या वार्ड ची केविलवाणी अवस्था होती .. अगदी मृत्यू पंथाला लागलेल्या लोकांना या वार्ड मध्ये ठेवण्यात येत असे ..या वार्ड च्या मागील बाजूसच मृत्यू पावलेल्या लोकांना नातेवाईक येपर्यंत ठेवायची जागा म्हणजे ' मुडदाघर ' होते पूर्वी ऐक दोन वेळा मी या 'मुडदा घराच्या ' खिडकीतून डोकावून बर्फात ठेवलेली प्रेते देखील पहिली होती ..आता मात्र सात ' अ ' नंबरचे स्वरूप पूर्ण बदलले होते आतून छान रंग दिला होता ..या वार्ड ला पुढे मोठा व्हरांडा नंतर आतल्या बाजूस एकूण पाच मोठ्या खोल्या होत्या समोर आणि मागे देखील जाळी लावून बंद केलेला मोठा व्हरांडा होता .. गेटच्या डाव्या बाजूला अटेंडंट आणि सिस्टर चे ऑफिस होते ..मी वार्ड मध्ये प्रवेश केला तेव्हा आत वेगवेगळ्या खोल्यात असलेले सर्व पेशंट बाहेर आले मला पाहायला ..त्यांच्या सर्वांच्या अंगावर सरकारीच मात्र थोडे वेगळ्या प्रकारचे कपडे होते पांढरे स्वच्छ नाडी असलेले पायजमे , पांढराच शर्ट ..मुख्य म्हणजे शर्टाला कॉलर होती ..आणि डाव्या छातीवर ऐक खिसा देखील होता ..वैशिष्ट्य म्हणजे कॉलर आणि खिश्याच्या कापडाचा रंग हिरवा होता ..छान ड्रेस होता तो ..' स्नेहदीप ' कक्षातील व्यसनी रुग्णांसाठी खास बनवलेला ड्रेस होता ..हे व्यसनी लोक इतर वेड्या लोकांमध्ये लगेच ओळखू यावेत हा हेतू असावा.


या वार्ड चे उद्घाटन अभिनेता संजय दत्त याच्या हस्ते झाले होते हे मला समजले ..हा ऐक मोठा बदल होता ..मला पाहायला आलेल्या पेशंट च्या चेहऱ्यावर कुतूहल होते माझ्याबद्दल .वार्ड चे अटेंडंट देखील नवीन भरती झालेले वाटले .. मला अटेंडंट ने तीन नंबरच्या खोलीत पाठवले तेथे एकूण आठ पलंग ठेवलेले होते .त्यापैकी ऐक कोपऱ्यातील पलंग मला मिळाला ..पाच खोल्यांपैकी पहिली खोली मनोरंजन आणि जेवण घर म्हणून वापरली जाई येथेच टी,व्ही देखील होता ..२ , ३ , आणि ४ नंबरच्या खोल्यातून व्यसनी पेशंटची रहायची व्यवस्था होती तर शेवटच्या पाच नंबर च्या खोलीत एका स्टँड वर कँरम मांडून ठेवला होता व ऐक टेबलटेनिस चा टेबल देखील होता .. वार्ड च्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात छान प्रशस्त दारांना कड्या असलेले तीन तीन संडास बाथरूम होते ..वा .. एकंदरीत मेंटल हॉस्पिटल च्या तुलनेत फाईव्ह स्टार व्यवस्था केली गेली होती व्यसनी मंडळींसाठी . त्या वेळी तेथे एकूण १० जण उपचार घेत होते ..पहिल्याच दिवशी माझी सगळ्यांशी ओळख झाली सगळे मुंबईचे गर्द्दुल्ले होते वयोगट ३५ ते २० हा होता त्याचा ..बहुधा सगळे हिंदीतच बोलत होते आणि त्यांची खास मुंबैय्या हिंदी होती ! बिडीचे फारसे वांधे दिसले नाहीत कोणाचे बहुतेकांनी साई चे कँटीन लावलेले होते .. ते सर्व मी मेंटल हॉस्पिटल ला पहिल्यांदाच दाखल झालोय असे समजत होते ...मी देखील त्यांना स्वतःहून येथे पूर्वी दोन वेळा येऊन गेलोय हे सांगितले नाही .. मात्र संध्याकाळी जेव्हा सिस्टर गोळ्या वाटायला आल्या त्यांनी मला ओळखले या सिस्टर आधी पहिल्यांदा मी ज्या ' आँबझर्व्हेशन ' वार्ड मध्ये होतो तेथे होत्या त्यांनी लगेच मला ओळखले व म्हणाल्या ' अरे वा ! तुषार ..कधी आलास ? ' मी त्यांना सांगितले दुपारीच आलोय म्हणून ..मग म्हणाल्या ' चला आता आम्हाला छान गाणी ऐकायला मिळतील' ..माझा आणि सिस्टर चा तो संवाद ऐकून बाकीचे पेशंट समजले की हा ' पुराना पापी ' आहे म्हणून .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें