प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.com



सोमवार, 18 मार्च 2013

सोनेरी कालखंड

भाग ८१
अकोल्याला हळू हळू माझ्या ओळखी होऊ लागल्या आधी भाच्याचे लहान मोठे मित्र ..मग जवळच्या मैदानावर सकाळ संध्याकाळ क्रिकेट खेळणारी मंडळी यांच्याशीही ओळखी होऊ लागल्या .. माझा भाचा आनंद मला क्रिकेट खेळताना देखील ' मामा ' म्हणून हाक मारे त्यामूळे त्याचे मित्र देखील मला ' मामा ' अशीच हाक मारू लागले .. काही जण गमतीने ' मामू ' अशीही हाक मारत ..मलाही ते फारसे वावगे वाटत नसे .. रोज संध्याकाळी बहिणीच्या घरासमोर असलेल्या मैदानावर आम्ही क्रिकेट खेळत असू ..मी आता हळू हळू नाशिकच्या मित्रांना विसरत चाललो होतो कारण मला नवीन मित्र मिळाले होते ..काही मुळे अभियांत्रिकी शिकणारी होती तर काही नोकरी करणारी आणि काही विवाहित मोठी माणसे देखील आमच्यात क्रिकेट खेळायला येत ते देखील मला ' मामा ' अशीच हाक मारत असत ... छान वेळ जात होता माझा व टायपिंग चा क्लास देखील नियमित सुरु होता ..भाचा आनंद आणि भाची स्मिता यांच्याशी माझे चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते ते त्यांच्या शाळेतील गमती जमती मला नेहमी सांगत ...


एकदा माझ्या भाचीने माझ्याकडे तक्रार केली की ती शाळेतून घरी येताना घराजवळच्या कोपऱ्यावर काही टारगट मूले काहीतरी कॉमेंट पास करून हसतात .. हे ऐकून माझे डोके फिरले .. भाच्याला मी फक्त तू ती मूले दुरून दाखव असे सांगितले त्यांना माझे नाशिकरोड चे प्रताप ऐकून माहिती होते .. एकदा त्यांनी उन्हाळ्यात नाशिकला आले असतांना माझा तमाशा पाहिलाही होता त्यामूळे मी काही भानगड तर करणार नाही ना याची त्यांना भीती वाटत होती .. त्यांनी मला ती मूले कोण ते सांगण्यास नकार दिला व ' असे चालतेच सगळीकडे ' असे मला समजावण्याचा प्रयत्न केला ..पण माझ्या डोक्यात एकदा एखादा किडा शिरला की काहीतरी निकाल लागेपर्यंत मला चैन पडत नसे ..ऐक दोन दिवस मी भाची शाळेतून घरी येण्याच्या वाटेवर ... चौकात जाऊन ...पाळत ठेवली ..ऐक चार मुलांचा गट मला दिसला जो नाल्यावरील ऐक पुलाच्या कठड्यावर बसून शाळेतून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर शेरेबाजी करण्याचे काम करतो असे आढळले .मग दुसऱ्या दिवशी मी सायंकाळी त्यांच्यात जाऊन थोडा बाजूला बसलो आणि भाची तेथून पास होताच त्यांनी काही शेरेबाजी केली ..मी भाचीला पुढे जाऊ दिले आणि मग माझ्या खास ठेवणीतल्या भाषेत त्यांना शिव्या द्यायला सुरवात केली माझी ती भाषा इथे सांगण्यासारखी नाही ..पण माझा आवेश .आक्रमकपणा ..आणि त्वेष असं होता की ते घाबरले आणि ' 'आम्ही काही बोललो नाही .. आम्ही मुलींना बहिणीप्रमाणे मानतो ' वगैरे मखलाशी करू लागले ..बरेच लोक आसपास गोळा झाले होते .. ! त्या दिवसापासून ' मामा ' चे नाव तेथील कॉलनीत अधिकच गाजू लागले .. मला अनुभवावरून माहित होते की अशी मंडळी एकदम आक्रमक पवित्र घेतला तर घाबरतात ..यांना जागीच ठेचले तर बरे असते .

भाच्याचा ऐक १२ वी मधील मित्र होता सलील नावाचा त्याच्याशी देखील माझी ओळख झाली होती तो जरा माझ्यासारखाच धाडसी होता ..त्याचे माझे छान जमे ..सलील ' खर्रर्रा ' खात असे त्याला सिगरेटचे देखील वावडे नव्हते हा आमच्या दोघांच्या मैत्रीतील विशेष दुवा होता . मी माझ्या नाशिकच्या व्यसनाच्या आणि इतर गमती जमती त्याला सांगत असे सांगत असे ..एकदा मी भाची सोबत सायकल च्या मागच्या कँरिअर वर दळण ठेऊन ते चक्कीत टाकायला पायी चाललो होतो तेव्हा समोरून ऐक मध्यम वयीन स्त्री आणि तिच्यासोबत ऐक साधारण विशीची मुलगी येताना दिसले भाचीला पाहून त्या दोघी थांबल्या आणि तिची विचारपूस करू लागल्या .. माझी त्यांच्याशी ओळख नसल्याने नुसताच बाजूला उभा राहून त्यांचे बोलणे ऐकत होतो ..बरेच दिवसात आली नाहीस घरी ? ..आभ्यास काय म्हणतोय ? वगैरे प्रश्न त्या काकू भाचीला विचारात होत्या .. त्यांच्या बरोबरची मुलगी पण तसलेच प्रश्न विचारात होती भाचीला ..दोघीही खूप बडबड्या वाटल्या ..त्या मुलीने चौकानी फ्रेम चा चष्मा घातला होता ..त्या चष्म्याआडून तिचे चमकदार डोळे जाणवले .. उतरतीचे उन त्या मायलेकींच्या तोंडावर पडले होते व त्या उन्हात त्यांचा गोरा रंग अधिकच उठावदार वाटत होता ..विशेषतः त्या मुलीचा गोरा रंग जरा वेगळाच ..आणि नितळ होता .. ती बोलत असतांना सारखे तिच्याकडे पाहत रहावेसे वाटले ..नैसर्गिक सहजता ..लक्षवेधी होती दोघींच्या हालचालीतील ..मी त्या मुलीकडे एकटक पाहत आहे... हे माझ्याकडे न पहाताही त्या मुलीला उपजत प्रेरणेने समजले असावे असे वाटले कारण ती बोलता बोलता एकदम चूप झाली ..तिच्या आईला हे बहुधा आधीच कळालेले होते कारण मुलगी चूप होताच तिच्या आईने एकदम माझ्याकडे निर्देश करून भाचीला ' हे कोण ? ' विचारले ..त्यावर भाचीने ' माझा मामा आहे हा ..नाशिकचा ..सध्या आलाय काही दिवस आमच्याकडे राहायला ' असे सांगितल्यावर त्या काकू ओळखीचे हसल्या व म्हणाल्या ' या एकदा आमच्या घरी जाण्यापूर्वी ' मी नुसताच हसून मान डोलावली ..मग त्या भाचीचा निरोप घेऊन निघून गेल्या . मी भाचीला म्हणालो ' कोण होत्या ग ? किती बडबडत होत्या दोघीही ..' यावर भाचीने मला ती सलील ची आई आणि मोठी बहिण आहे ही माहिती पुरवली ..मी त्या मुलीचे नाव विचारले तर तिने ' अनघा ' असे सांगितले माझ्या तोंडून निघाले " अनघा ??? मला वाटले तिचे नाव ' केतकी ' असेल " ...माझे हे बोलणे एकूण भाची जरा चमकली ' मामा , तू एकदम तिचे नावच बदलले ?... ' मी विषय अधिक वाढवला नाही .

ती मुलगी मला जरा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण वाटली हे नक्की ... कॉलेजला असतांना ' सुमा ' खेरीज मी कधीच कोणाचा विचार केला नव्हता समूह गायनाच्या आमच्या समूहात अनेक सुंदर मुली होत्या त्या पैकी ऐक दोघी माझ्याकडे आकर्षित झाल्या आहेत हे देखील मला जाणवले होते तरी ..कधी माझ्या मनात काही खळबळ झाली नव्हती ..जरी सुमा माझ्याशी तुटक वागत होती तरीही मी तिच्याशिवाय कोणाचा विचारही करू शकत नव्हतो ...आज खूप वर्षांनी ' सुमा ' ला विसरण्यासारखी कोणीतरी मुलगी दिसली होती . तिच्या चेहऱ्यावर पडलेल्या मावळत्या सूर्याच्या किरणांमुळे असावे कदाचित तिचा चेहरा ..बोलके चमकदार डोळे ..सगळे मनात ठसले होते . तिचे नाव ' केतकी ' असले पाहिजे असे मला वाटणे उत्स्फूर्त होते . रात्री झोपण्याच्या आधी गप्पा मारत असतांना मी भाचीला ती मुलगी काय शिकते हे विचारले तर ती बी .एस सी ..च्या दुसऱ्या वर्षाला आहे हे समजले .

=======================================================================

भाग ८२ वा घाबरगुंडी.. !

पुढे दोन तीन दिवसांनी मी दुपारी शॉर्टहँड च्या क्लास ला निघालो असतांना रस्त्यात तीच मुलगी परत दिसली ती लुनावरून कॉलेजहून परत येत होती .. मी पायी चाललो होतो ..तसे माझे लक्ष चालताना चौफेर असते म्हणजे ज्याला आमच्या टपोरी भाषेत ' झाडी ' करणे म्हणतात .. माझे निरीक्षण देखील चालू असते नेहमी चलताना सगळीकडे ...त्यामूळे ती मुलगी मला दिसली व जरीती वेगात लुनावरून पास झाली तरी मी तिला ओळखले ... संध्याकाळी मी घरी परत आल्यावर भाची शाळेतून घरी आल्यावर .. तिला तुझी मैत्रीण ' अनघा ' दिसली होती हे सांगितले ..तर भाची म्हणाला ' मामा ..तुझ्या चांगलीच लक्षात राहिलेली दिसतेय सलील ची बहिण ' भाचीने जरी हे मस्करीत विचारले असले आणि ती नववीत असली तरी ..बऱ्याच गोष्टी तिला कळू लागल्या होत्या ..तिने बहुधा नाशिकला असतांना कोणाच्या तरी कडून ' सुमा प्रकरण ऐकले होते ..त्यानंतर ची माझी अधोगती ..व्यसने सगळे ती जाणून होती ..त्यामूळे असावे कदाचित तिलाही माझ्या जिवनात असे काहीतरी नवीन घडावे की ...ज्यामुळे मी पूर्वजिवन विसरू शकेन असे वाटत असावे ..नंतर तिने मला विचारले ' तू तिचे नाव ' केतकी ' कशावरून म्हणालास ? ' त्यावर ..अग तिचा रंग एकदम केवड्यासारखा गोरा ..आणि चेहऱ्यावर मावळत्या सूर्याचे सोनेरी उन पडले होते म्हणून मला ते नाव सुचले ' असे समर्थन दिले ...थांब आता मी त्या ताईलला सांगते की माझ्या मामाने तुझे नाव ' केतकी ' ठेवले आहे असे ....भाचीने मला गमतीने धमकी दिली..... मी देखील गमतीनेच ' सांग ' मी काय घाबरतो की काय तिला असे म्हणालो . ..ही चर्चा नंतर मी विसरूनही गेलो होतो .

मला अकोल्याला येऊन आता सुमारे चार महिने लोटले होते ..तिथेच बहिणीच्या घरामागे ऐक छोटेसे राम मंदिर होते .. कधी कधी दुपारी मी व सलील त्या मंदिराच्या आवारात बसत असू ..मंदिरचे बांधकाम जेमतेम ५ बाय ५ इतकेच झले होते खालून जमिनीच्या थोडेसे वर मंदिर होते आणि वर चढायला पायऱ्या होत्या बांधकाम जरी लहान असले तरी मंदिराचे अंगण मात्र बरेच मोठे ..सुमारे २००० चौरस फुट असावे ...रात्री देखील जेवण झाल्यावर मी सिगरेट ओढण्यासाठी मंदिराच्या अंगणातील बाकावर जाऊन बसे ..ती कॉलनी नवीनच असल्यामुळे मंदिरात फारशी गर्दी नसे आणि रात्री तर एकदम सुमसाम असायची ..सलील हा माझा नवीन पण वयाने लहान असा मित्र अर्थात सलील वयानेच लहान होता ..बाकी त्याची बियर वगैरे ची चव घेऊन झालेली होती ..मी त्याला जेव्हा माझ्या व्यसनाच्या गोष्टी संगे तेव्हा तो खूप गंभीर होऊन ते ऐकून मला म्हणे ' बरे झाले मामा तू त्या ब्राऊन शुगर मधून बाहेर पडलास ते' एकदा त्याने मला त्याच्या घरी नेले होते ..अकोल्याला उन्हाळा फेब्रुवारी पासूनच सुरु होतो त्याचे घर मंदिराच्या समोरच्या बाजूला होते साधारणपणे १२०० चौरस फुटाच्या जागेत दोन मोठ्या खोल्या ..संडास बाथरूम असे बांधलेले होते समोर अंगण सोडलेले त्याला ऐक लाकडी गेट देखील होते . सलील आणि मी त्याच्या घराच्या गच्चीवर गप्पा मारल्या तेथे उजेडासाठी लाईट देखील लावला होता घरातून वायर घेऊन .. तर ..आम्ही गप्पा मारताना मी पहिल्यांदाच घरी आलो म्हणून त्याची ताई गच्चीवर जेव्हा आमच्या साठी मँगो फ्लेवर चे रसनाचे सरबत घेऊन आली ..तेव्हा पुन्हा तिला नीट निरखून पहिले ..जाताना ती जिन्यात अडखळली ..स्वतःला लगेच सावरले .. नाहीतर पडली असती ..बहुतेक मी मागून पाहतो आहे या विचाराने ती चालताना विचलित झाली असावी .

तीनचार दिवसांनी एकदा संध्याकाळी भाची जरा घाबरल्या चेहऱ्याने घरात आली ..माझ्याशी काहीतरी बोलायचे आहे असे म्हणत मला हात धरून तिने घराबाहेर च्या अंगणात आणले ..भाची प्रचंड घाबरली होती " मामा , अरे आता मी त्या अनघा ताई च्या गच्चीवर तिच्याशी गप्पा मारत होते ..तेव्हा मी गमतीने तिला सांगितले की माझ्या मामाने तुझे नाव ' केतकी ' ठेवले आहे ..तर ती खूप चिडली माझ्यावर .. म्हणाली तुझा मामा इतका नालायक असेल असे वाटले नव्हते .. नाशिकहून इथे असे धंदे करायला आलाय का तो ..वगैरे खूप बडबड केली तिने वर म्हणाली ..थांब आता मला भेटला की चांगली काढतेच तुझ्या मामाची " एका दमात भाचीने हे सगळे सांगितले आणि रडू लागली ..' अग् , त्यात मी कोणता नालायक पणा केलाय ? नुसते ' केतकी ' नाव असायला हवे असे म्हणणे काही गुन्हा होत नाही .. तू घाबरू नकोस उगाच ..काही नाही होत ' असा भाचीला धीर दिला ." तुला माहित नाही ती ताई आणि तिची आई खूप खतरनाक आहेत ..एकदम स्पष्ट बोलतात त्या..कोणालाही न घाबरता .. कॉलनीतील कोणी मूले देखील त्या ताईच्या नादी लागत नाहीत .. ती एकदम सरळमार्गी आहे ..मामा " भाची ने दिलेली ही माहिती मला नवी होती ..दोघी मायलेकी एकदम तोंडावर स्पष्ट बोलून भांडतात हे ऐकून मनातून मी जरा घाबरलो '' तू उगाच काहीतरी बडबड केलीस तिच्याकडे जाऊन " ...म्हणून भाचीला रागावलो . " जा आता त्या ताईला जाऊन सांग की मी पण कोणी फालतू मुलगा नाही ते ... आणि मी काही तिला पाहून शिट्या मारल्या नाहीत की काही पाठलाग केला नाही कधी तिचा ..नालायक म्हणायला मी इतका स्वस्त नाही .. ती रस्त्यात मला काही वावगे बोलली तर ..मी देखील ऐकून घेणार नाही .. ' भाचीला जरा उसने अवसान आणून मी धीर दिला... मनातून मी देखील घाबरलो होतो .. हे जरा जास्तच होते की ती म्हणे मला भेटल्यावर माझी चांगली ' काढणार 'आहे . मला डोळ्यासमोर .. मी टायपिंग च्या क्लास वरून घरी येतोय आणि रस्त्यात या मायलेकी मला अडवून जाब विचारात आहेत..असे चित्र दिसले . कठीणच होते हे .. बहिण किवा मेव्ह्ण्याना हे कळले असते तर त्यांना खूपच अपमानास्पद वाटले असते या विचाराने मी अवस्थ झालो होतो ..मग मी दोन तीन दिवस घरातून बाहेरच पडलो नाही अगदी रात्री किवा एकदम सकाळी सुरक्षित आणि त्या ताई ची कॉलेज ची वेळ नसेल अश्या वेळीच बाहेर पडलो ..तसा मी गुंडाना .मवाल्यांना अजिबात घाबरत नाही दोन हात करायला कधीही तयार असतो पण ... एका मुलीने मात्र मला घाबरवले होते . ती साघारण पणे ११ च्या दरम्यान कॉलेज ला जायला बाहेर पडते हे भाचीने मला सांगितले होते ..एकदा घराच्या दारात उभा असतांना घरासमोरून एकदम ती लुनावरून गेली व जाताना आमचा घरासमोर होर्न वाजवला ..मी पटकन घरात गेलो .खरे तर तिचा कॉलेज ला जाण्याचा रस्ता आमच्या घरासमोरून नव्हता तरी बहुधा ती मुद्दाम मी भेटावा म्हणूनच तर घरासमोरून गेली नसेल ना ? अशी भीती वाटली . तीन दिवस असेच अस्वस्थतेत गेले .चौध्या दिवशी सायंकाळी ती भाचीला बहुतेक बाहेर भेटली असावी ..भाचीने घरी येऊन मला निरोप दिला की " मामा , उदया संध्याकाळी ७ वाजता तुला घरातच थांबायला सांगितले आहे ताईने , ती आपल्याकडे येणार आहे ..तिला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे " आता तोंड देणे भागच होते ऐक बरे होते की माझी बहिण व मेव्हणे सायंकाळी साडेसात वाजता घरी येत ..त्यामूळे ते नसतांना ती येणार हे बरे होते . उदया नेमके काय घडेल याच्या एकसे ऐक भयंकर कल्पना मनात येत होत्या आणि काळीज धडधडत होते माझे . त्या दिवशी रात्रभर झोप आली नाही .

=======================================================================

भाग ८३ वा आनंदी आनंद !  


दुसऱ्या दिवशी मी खूप चिंतेत होतो तीच्याशी काय बोलायचे याचा मनाशी सराव करत होतो ..पण ती नक्की काय बोलेल याचा अंदाज बांधणे कठीणच होते ..ती जर म्हणाली की तू असे का बोललास ? तर ..तिला सांगायचे की तुझ्या सौंदर्याची मी तारीफच केलीय ऐक प्रकारे ... तुला ते आवडले नसेल तर मला माफ कर ..असे म्हणून सरळ माफी मागायची असे वाटले शेवटी . ..मात्र जर ती जास्त काही बडबड करू लागली तर स्वतःवर नियंत्रण ठेवायचे हे देखील ठरवत होतो ..कारण माझा राग भयंकर आहे आणि रागाच्या भरात मी तिला काहीही बोलू शकत होतो ... तेव्हा अगदी शांतपणे सगळे प्रकरण हाताळायचे हे मात्र नक्की असे स्वतःला वारंवार बजावले होते ..जर प्रकरण बहिण आणि मेव्हणे यांना समजले तर त्यांचीही माफी मागायची असा विचार केला . सायंकाळ पर्यंत भीती कायम होती ..एकदा वाटले भाची बरोबर तिला निरोप पाठवावा की ..संध्याकाळी मला जरा काम आहे ..आपण नंतर भेटू ..पण पण उगाच डोक्यावर नंतर टांगती तलवार ठेवण्यात काही अर्थ नव्हता .एकदाचा सोक्ष मोक्ष लागलेला बरा ...मनातल्या मनात सारखी सगळ्या देवांची प्रार्थना सुरु होती .. ऐरवी देव वगैरे न मानणारा मी कामापुरता बरोबर त्याची आठवण करत होतो .

शेवटी एकदाची संध्याकाळ झाली ..सात वाजण्याच्या सुमारास मी पुढच्या खोलीत टी .व्ही . लावून मुद्दाम टी .व्ही . चा आवाज मोठा करून ठेवला ..जर तिने जास्त आरडा ओरडा केला तर बाहेर कोणाला ऐकायला जायला नको ..घरात एकटा थांबायला नको म्हणून भाचीला देखील सोबत थांबायला सांगितले ..बहिणीचे सासरे घरातच होते पण वयोमानाने त्यांना कमी ऐकू येत असे हे बरे होते ..शिवाय ते आपण भले की आपले काम भले या विचारांचे असल्याने ते तसे निरुपद्रवी होते . हातात वर्तमानपत्र घेऊन ते वाचत बसल्याचे सोंग करत होतो ..तितक्यात दारात चपला वाजल्या ' बबडे , आहेस का ? ' अशी माझ्या भाचीला तिच्या टोपणनावाने मारलेली हाक ...सावध झालो .माझी भाची स्वैपाक घरात म्हणजे आतल्या खोलीत वरणाला फोडणी देत होती ..भाचीने आतूनच ' ताई ..ये ना .आत ' म्हणून तिला स्वैपाकघरातच बोलावले ..हे मी भाचीला आधीच सांगून ठेवले होते की तिने बाहेर हॉल मध्ये काही तमाशा करण्याएवजी तिला स्वैपाक घरातच बोलाव तू ..चपला दारात चपला काढून ती सरळ आत गेली ..काही क्षण स्मशान शांततेत गेले ..मग भाचीने मला हाक मारली ' मामा ..तुला आत बोलावतेय ताई " आधी काहीच उत्तर दिले नाही ..तो क्षण जवळ आला होता ..साधारण पणे दोन मिनिटांनी पेपर हातात धरूनच आत गेलो .. खाली मान घालून उभा राहिलो ..वर बघायची हिम्मत नव्हती मला ..तर ती सरळ सरळ माझ्याकडेच पाहत असल्याचे जाणवत होते .' हे खरे आहे का ? ' बाणासारखा पहिला प्रश्न आला ' काय ? ' मी मान खाली घालूनच बोललो ...' बबडी म्हणतेय की तू माझे नाव ' केतकी ' ठेवले आहेस ते ' परत मान खाली घालूनच उत्त्तर दिले ' होय ..i am soory ' अश्या वेळी इंग्रजीचा आधार वाटतो ...मला माफ कर असे म्हणण्यापेक्षा हे i am soory जास्त सोईस्कर असते हे जाणवले . ' वर बघून बोल ..माझ्याकडे पाहून ' पुन्हा शब्दाचा चाबूक ... मी घाबरत मान वर केली ..सरळ तिच्या चेहे-या कडे ..थेट तिच्या डोळ्यात पहिले ..तीच चमक ..धारधार .. ' तुला मी आवडते का ? ' हा प्रश्न जरा वेगळाच होता ..विषय सोडून ..मी पुन्हा मान खाली घातली ..'सांग ना , तुला मी आवडते का ? ' तिने परत विचारल्यावर मी नुसतीच होकारार्थी मान हलवली ..काही बोलण्यापेक्षा मान हलवणे जास्त सोपे गेले ...' लग्न करशील माझ्याशी ? ' बापरे ही पोरगी थेट लग्नापर्यंत पोचली .. काय उत्तर द्यावे ते कळेना .. तरी होकारार्थी मान हलवली परत .. ' वर पहा ' ..मी वर पहिले तर तिच्या चेहऱ्यावर हलकेच स्मित दिसले .. जर तू खरे बोलत असशील तर ..मी कानात प्राण आणून ऐकत होतो .. तर..तुला नोकरी लागली की माझ्या आईवडिलांकडे मला मागणी घाल ..मी होकार देईन " हुश्य ..मी मोठा सुस्कारा सोडला . म्हणजे जमले तर ...मग वर पाहायला भीती वाटेनाशी झाली ..भाची देखील इतक्या वेळ श्वास रोखून ऐकत होती .. ती देखील जरा सैल झाली ..पुढे ती म्हणाली ' आणि ऐक ..मला चिठ्या वगैरे प्रकरण आवडत नाही ..तुला भेटणार पण नाही कधी लग्नापर्यंत ' मी हळूच ' चालेल .. thank u ' असे म्हणालो तोच ती वेगाने ' बाय बाय ' असे म्हणत निघूनसुद्धा गेली .

मामा ..भाचीने जोरात ओरडून मला टाळी दिली . मोकळा हसलो . आणि मी पण बाहेर जायला निघालो ..आता ऐक कडक सिगरेट हवीच होती .. सरळ चौकातल्या पानटपरीवर जाऊन ऐक ' चारमिनार ' घेतली आणि मस्त खोल झुरके मारत उभा राहिलो .. तोच मला भाची ..तिची ऐक मैत्रीण सोनू आणि ही अनघा चौकापर्यंत येताना दुरून दिसल्या ..हळूच सिगरेट टाकून त्यांच्या दिशेने घराकडे निघालो ..तश्या त्या माझ्या जवळून पास होताना ती म्हणाली ' हे सिगरेट पिणे सोडून दे आता ' काहीच न बोलता मी घरी परतलो ..जीवनाचा नवा अध्याय सुरु झाला होता तर .. आता वेगळेच प्रश्न मला सतावत होते ..हिला आपल्या पूर्वायुष्याबद्दल सांगावे की नाही .. सांगितले तर तिच्या काय प्रतिक्रिया असतील ? हिला ' सुमा ' बद्दल सांगावे का ? वगैरे .. शेवटी मनाशी ठरले की ही बिचारी खूप साधी सरळ मुलगी आहे ..हिच्यापासून काही लपविता कामा नये ..रात्री जेवण झाल्यावर वही काढून पत्र लिहायला घेतले .. प्रिय अनघा , पुढे कंसात ' केतकी ' असे लिहिले .पेन पटपट चालत होता ... आधी ' सुमा ' बद्दल ..मग व्यसने ..आणि शेवटी ' मेंटल हॉस्पिटल '.... समारोप करताना लिहिले ...मला खरोखर तुझ्यासारख्या आधाराची गरज होती ... आता नवीन जिवन सुरु करायला मला खूप ताकद मिळाली आहे . खाली तुझाच असे लिहून मराठीत वळणदार सही केली . उदया सकाळी हे पत्र भाची जवळ देऊन तिला पोचावायला सांगायचे ठरवले ..त्या रात्री पण झोप आली नाही अर्थात हे जागरण हवेहवेसे होते .

=======================================================================

भाग ८४ वा  नवीन ' लोचा ' !

दुसऱ्याच दिवशी ते पत्र व्यवस्थित पाकिटात बंद करून भाची जावल अनघा ला देण्यासाठी दिले .. मला वाटले कदाचित तिने सांगितल्या प्रमाणे ती याचे उतर देणार नाही ..कारण हे चिठ्या वगैरे मला आवडत नाही असे ती म्हणाली होती पण काय आश्चर्य सायंकाळीच भाचीने मला तिचे पत्र आणून दिले .. आयुष्यातील पहिले प्रेमपत्र मिळाले होते मला .मी उत्सुकतेने ते पत्र घेऊन राम मंदिरात बाकावर जाऊन बसलो तेथील अंधुक उजेडात वाचू लागलो .. पत्रात तिने मी जगलेल्या जीवनाबद्दल वाचून खूप दुखः झाले असे लिहिले होते ..खरोखर तू खूप त्रास भोगला आहेस आजपर्यंत ..मात्र या पुढे तुला काहीही त्रास होणार नाही याची जवाबदारी मी घेईन .. तू फक्त आनंदी रहा ..मागचे सगळे विसरून जा ..लवकरात लवकर तुझा टायपिंग चा कोर्स पूर्ण करून चांगली नोकरी शोध वगैरे लिहिले होते मग , .. मलाही कळले नाही की मी तुला होकार कसा दिला ..आणि इतक्या झटपट हे सर्व घडले यावर माझा विश्वासपण बसत नाहीय ..सध्या तू कोणाला हे कळू देऊ नकोस ..मला सलील ची खूप भीती वाटते ..त्याला जर हे कळले तर त्याच्या नेमक्या काय प्रतिक्रिया असतील याची मला कल्पनाही करवत नाहीय.. सलील जरी माझा लहान भाऊ असला तरी आम्ही एकमेकांपासून काहीही लपवत नाही ..पण ही गोष्ट त्याला सांगायची मला हिम्मत नाहीय ..त्याला जर बाहेरून कोठून हे कळले तर त्याला आधी मी सांगितले नाही म्हणून खूप राग येईल .. तेव्हा तूच त्याला विश्वासात घेऊन सगळे सांग ..म्हणजे तो जास्त रागावणार नाही ..त्याला बाहेरून काही कळण्यापेक्षा तूच सांगितलेस तर त्याला बरे वाटेल आणि कदाचित तो आपल्याला मदतही करेल ..पण .पण जर दुसऱ्या कोणी त्याला सांगितले तर तो चिडेल .. शेवटी खाली तुझीच केतकी अशी तिने सही केली होती .

सलील म्हणजे तिचा धाकटा भाऊ नेमका त्यावेळी ऐक आठवडाभर गावाला गेला होता ..त्याला हे सगळे सांगायची जवाबदारी तिने माझ्यावर टाकली होती हे जरा कठीणच वाटले मला प्रत्यक्ष भावाला माझे आणि तुझ्या बहिणीचे प्रेम प्रकरण जमलेय असे सांगणे म्हणजे .. लोचा होता ..तो जरी माझ्या अकोल्यातील जिवलग मित्र असला तरी माझे सर्व गुण ..अवगुण मी त्याल सांगून झले होते ...मी तसा मनमोकळा असल्याने त्याला माझ्या जीवनातील अनेक गोष्टी सांगून चुकलो होतो व मी एकंदरीत काय ' चीज ' आहे हयाचा त्याला अंदाज होता अश्या वेळी त्याच्या बहिणीबद्दल असे काही त्याच्याजवळ सांगणे मला कठीणच जाणार होते ..नेमके कसे सांगावे याचा विचार करत बसलो . . सलील गावाहून परत यायला अजून तीन बाकी दिवस होते असे मला भाच्या कडून समजले .. मला इतका आनंद झाला होता की कोणत्या तरी मित्राजवळ हे सांगावे असे वाटत होते ..पण सलील ला सांगणे म्हणजे अवघडच काम वाटले . सायंकाळी मी सहज क्रिकेट खेळून झाल्यावर एका मित्राला सलील च्या बहिणीबद्दल विचारले की ती कशी मुलगी आहे वगैरे ..तर तो म्हणाला ' मामू ..तुम्हारा दिमाख खराब हो गया है क्या ? ..त्या मुलीचा विचारही करू नकोस तू .खतरनाक चीज है .. ' मला मनातल्या मनात हसू आले त्याच्या बोलण्याचे आणि स्वतःचा अभिमान देखील वाटला की माझी निवड एकदम अचूक होती याबद्दल.. . ते तीन चार दिवस मी हवेतच होतो त्यानंतर जरी ती मला प्रत्यक्ष भेटून काही बोलणे झाले नव्हते तरी ..रोज सायंकाळी ती राम मंदिरात येई ..मग कधी कधी सोबत तिचे आईवडील पण असत मग ते सर्व कुटुंब मिळून सायंकाळच्या आरतीची तयारी करून आरती करत असत .मला भाची कडून समजले की त्या राम मंदिराची जवाबदारी य कुटुंबाने घेतली होती म्हणजे आरती ..सकाळी साग्रसंगीत पूजा वगैरे हेच कुटुंब करत होते व मंदिराच्या गाभाऱ्याची किल्ली देखील त्यांचाच कडे होती .खूप धार्मिक लोकांशी माझी गाठ होती तर ..!

सलील गावाहून आल्यावर .. मी सायंकाळी राम मंदिरात त्याच्या सोबत गप्पा मारत बसलो होतो ..त्याच्याजवळ कसा विषय कसा काढावा याचा विचार चालला होता मनात ..समोरच त्याचे कुटुंब आरतीची तयारी करत होते ... शेवटी धीर करून त्याला म्हणालो ' यार सलील आता खूप एकटेपणा जाणवतोय आजकाल ..असे वाटते कोणीतरी मुलगी आपल्या आयुष्यात आली पाहिजे .. गेल्या दोन महिन्यातल्या मैत्रीत पहिल्यांदाच मी त्याच्याकडे मुलींचा विषय काढला होता ..तो एकदम चमकला ..तसा तो चाणाक्ष होताच ..' मामा .तुला कोणीतरी मुलगी आवडलेली दिसतेय इथली ? ..मी नुसताच हसलो व त्याची उत्सुकता अजून ताणली गेली ..तो सांग ना कोण आहे ते ... मी हवे तर तुला मदत करीन ...म्हणून मागे लागला ..त्याला म्हणालो माझी पसंत एकदम खास आहे सलील .. त्यावर तो त्याच्या डोक्याला ताण देऊन ..त्या विभागातल्या सुंदर आणि संभाव्य मुलींची नावे घेऊ लागला ..मी नकारार्थी मा न हलवत होतो ..वैतागून म्हणाला एखादा क्लू तरी दे मला ..त्यावर मी त्याला त्या मुलीला ऐक भाऊ आहे असं क्लू दिला ..पुन्हा तो विचार करू लागला मग ऐक भाऊ असलेल्या दोन तीन मुलींची नावे मला सांगितली पण मी नकारार्थी मान हलवत होतो .. मग दुसरा क्लू दिला .म्हणालो ती मुलगी तुझ्या ओळखीतील आहे .तसा तो सुरवातीपासून कॉलनीत रहात असल्याने बहुतेक सगळ्याच मुली त्याच्या आईच्या निमित्ताने किवा ताई च्या निमित्ताने त्याच्या ओळखीच्या होत्या.. पुन्हा त्याने तीनचार नावे घेतली ..शेवटी माझ्यावर चिडला ' या विभागातली मुलगी नसेलच ती , तू माझी फिरकी घेतोस वगैरे म्हणू लागला ..काही केल्या त्याच्या डोक्यात स्वतःच्या बहिणीचे नाव येत नव्हते ..अर्थात ते स्वाभाविकच होते म्हणा ..कोणताही भाऊ असा विचार कारणे अशक्यच होते ! तो लवकर सांग म्हणून माझ्या खूप मागे लागला तेव्हा ...तू आज रात्रभर विचार कर .मी सकाळी तुला त्या मुलीची चिठ्ठीच दाखवतो असे म्हणालो. एकंदरीत त्याची उत्सुकता खूप ताणली गेली होती व ..मी तुला मदत करीन असेही तो म्हणाला होता हे जरा सकारात्मक वाटले मला तरीही उद्या त्याच्या नेमक्या प्रतिक्रिया काय असतील याबाबत जरा भीतीच वाटत होती मला ..त्याला कोणत्यातरी दुसऱ्या मुलीचे नाव सांगून वेळ मारून न्यावी असे वाटले ..पण अनघाने मला स्पष्ट सांगितले होते की तू सलील ला सगळे सांगण्याची जवाबदारी तुझी आणि तू त्याला सांगितलेच पाहिजेस असे ..हे प्रकरण वेगळेच होते ..खरे तर मुली आपल्या भावाला काही कळू नये म्हणून किती काळजी घेतात ..ही तर भावाला आधी सांग म्हणून मागे लागली होती . पण या वरून सगळा सरळ सरळ कारभार आहे हे देखील समजत होते .
=======================================================================

भाग ८५ वा दिवस तुझे हे फुलायचे .. !
त्या दिवशी रात्रभर सलील झोपला नसावा बहुतेक तो सकाळीच माझ्याकडे आला .. ' काही सुचत नाहीय यार .. हरलो मी ..तूच सांग कोण मुलगी आहे ती ते ' त्याने सपशेल हार मानली होती . आम्ही मंदिरात जाऊन बसलो मी सोबत ते अनघाने दिलेले पत्र घेतले होते तेथे बाकावर बसल्यावर ते पत्र त्याच्या हातात दिले ... वाच म्हणालो ..घाईने त्याने पत्र उघडले व भराभरा वाचू लागला .. पत्र वाचताना मी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होतो ..कदाचित त्याच्या ताई चे अक्षर तो ओळखेल असे मला वाटले होते ..पण नाही ..त्याला अक्षर ओळखता आले नाही ..सगळे पत्र वाचून तो खाली तिने केलेल्या सही जवळ आला .अनघाने माझे आवडते नाव म्हणून पत्राच्या खाली तिचे नाव लिहिण्या ऐवजी ' केतकी ' असे मी दिलेले नाव लिहिले होते .. ते वाचून तो बुचकळ्यात पाडला ..' चल ..केतकी नावाची कोणीच मुलगी आपल्या एरियात रहात नाही ' सलील पटकन उद्गारला . मी नुसताच हसलो ..आता त्याची उत्सुकता अजून ताणली गेली होती ..' ऐक सांग तुला पत्रावरून मुलगी कशी वाटली ?' मी त्याचा अंदाज घेत होतो ...' एकदम छानच आहे मुलगी ..तिने तू तुझ्या पूर्वायुष्याबद्दल तू सगळे सांगूनही किती समजून घेतले आहे ..लकी आहेस तू मामू ..अभी मस्त नयेसे जिंदगी शुरू करो ' त्याने मला प्रोत्साहन दिले . पण यार ही केतकी राहते कुठे ? कारण मी पहिल्यांदाच हे नाव ऐकतो आहे या भागात .. शेवटी मी धीर करून उद्गारलो ' सलील ..हे तुझ्या ताई अनघा ने मला दिलेले पत्र आहे .. ' त्याने अविश्वासाने माझ्याकडे पहिले ..मग पुन्हा पत्र वाचले .. व शेवटी म्हणाला ' म्हणजे ?.. कधी झाले हे सगळे ? ' तो फारसा चिडलेला दिसला नाही याचे मला बरे वाटले ..मग मी त्याला सगळे सविस्तर सांगितले .. तो शांतपणे ऐकत होता ..सगळे सांगून झाल्यावर म्हणाला ' यार ..ऐक सांगू ..माझी बहिण खूप साधी भोळी आहे रे .. तू एकदम बिलंदर आहेस ..तिला कधी फसवू नकोस यार ...पुन्हा कधीच व्यसने करू नकोस तू ' झाले एकदाचे माझ्या मनावरचे हे ओझे देखील हलके झाले होते . मी त्याला वचन दिले ' मी कधीच अनघाला त्रास होईल असे वागणार नाही ' यावर त्याने समाधानाने माझ्याशी हात मिळवला ..सलील पण तू कृपया अनघाला काही बोलू नकोस बर का .. कसे ?..काय ?..ते मी तुला सविस्तर सगळे सांगितलेच आहे उगाच आता तिला काही विचारात बसू नकोस ..त्याने होकार दिला . खरोखरच मी खूप भाग्यवान होतो की असा मित्र आणि मैत्रीण मला मिळाली होती .

नंतर एकदोन वेळा आमचा पत्रव्यवहार झाला ..या वेळी पत्र सरळ सलील मार्फतच दिले होते .. माझे सुंदर रुटीन सुरु झाले .. सकाळी क्लास ..दुपारी सलील सोबत गप्पा किवा त्याच्या घरी जाऊन त्याच्यासोबत कँरम किवा चेस खेळणे ..सायंकाळी क्रिकेट ..मग राममंदिरात जाऊन बाकावर अनघा मंदिरात यायची वाट पाहत बसणे ..ती आली की मग ती मंदिरातील आरतीची तयारी करत असे .. ती सलील ला ' रामरक्षा ' म्हणायला बोलवत असे .. सलील ..अनघा ..त्याची आई किवा वडील सोबत असले तर ते सगळे मिळून ' 'रामरक्षा ' म्हणत . मला ते पाहून माझ्या लहानपणीची आठवण होई ..लहानपणी सायंकाळी दिवे लागणी नंतर माझी आई देखील आम्ही दोघे भाऊ ..आणि आमच्या सोबत खेळणाऱ्या रेल्वे क्वार्टर्स मधील समवयस्क मित्रांना घेऊन आम्हाला ' शुभं करोति .. मारुती स्तोत्र .. आणि रामरक्षा स्वतः सोबत म्हणायला लावत असे ..त्यावेळी थोडीफार ' रामरक्षा ' पाठ झाली होती माझी ..नंतर मग १ ते ३० पर्यंत पाढे घोकून घेत असे आई .. नंतर मी मोठा होत गेलो तस तसा हे सगळे विसरून गेलो होतो ..पुन्हा अनघाच्या निमित्ताने माझ्यावरील संस्कार उजळत होते ..मी देखील त्यांच्याबरोबर आरतीला उभा राहू लागलो ..खरेच अगदी सोनेरी कालखंड होता तो माझ्या जीवनातला ... !

दिवस भर भर संपत होते .. मला अकोल्याला येऊन सुमारे चार महिने होऊन गेले होते व या चार महिन्यात मी कोणतीही नशा केली नव्हती ..फक्त अजूनही सिगरेट आणि बिडी ओढणे सुरु होते ..त्या बद्दल मला आता सलील आणि अनघा देखील बोलत असत ..पण ..आज ..उद्या करत मी त्यांना उडवून लावत होतो .आमच्या कडे सकाळी देशोन्नती नावाचे दैनिक येत होते ..ते वाचताना एकदा त्यात ' संमोहन शिबीर ' असं मथळा असलेली बातमी वाचली ..अकोल्यातील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ . दीपक केळकर हे तीन दिवसांचे संमोहन शास्त्राची माहिती आणि संमोहन शिकवण्यासाठी हे शिबीर आयोजित करणार होते ..मला लहानपणापासून अश्या गुढ गोष्टींबाबत उत्सुकता होतीच ..मी लगेच शिबिराला जाण्याचे मनात ठरवले .. प्रवेश फी ५० रुपये होती ..इतके पैसे कोठून आणायचे हा प्रश्नच होता .. बहिणीला मागण्यात संकोच वाटत होता मला ..शेवटी मी ठरवले आपण सरळ जाऊन डॉ . दीपक केळकर यांना भेटायचे आणि त्यांना आपला पूर्व इतिहास सांगून ..पैसे नाहीत ..मात्र आला शिबीरात प्रवेश द्यावा अशी विनंती करायची ..पाहू काय होतेय ते . दुसऱ्या दिवसापासून रोज सायंकाळी ६ ते ९ अशी तीन दिवस शिबिराची वेळ होती ..!

1 टिप्पणी: