प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.com



सोमवार, 18 मार्च 2013

गर्दुल्ल्यांच्या करामती !

भाग ९६  गर्दुल्ल्यांच्या करामती !

' स्नेहदीप ' मध्ये दाखल झाल्यावर नेहमीप्रमाणे मला तीनचार दिवस ' टर्की ' चा त्रास झाला पण या वेळी तो त्रास विशेष जाणवला नाही कारण बहुधा सर्वच गर्दुल्ले रात्री सुमारे २ वाजेपर्यंत जागत असत ..टी. व्ही . .. कँरम यात छान वेळ जाई .. वार्डातील काही बंधूनी घरून स्वतची चहा पावडर आणि साखर आणली होती ..तलफ येईल तेव्हा ते चहा करत होते .. दिवसभर गप्पा ..गमतीजमती ..मस्क-या .. यात जाई ..जरी हा व्यसनमुक्ती कक्ष असला तरी व्यसनमुक्ती केंद्राप्रमाणे अजून काही विशेष थेरेपीज सुरु झाल्या नव्हत्या ..फक्त सकाळी ७ वाजता योग्याभ्यास घेण्यासाठी ऐक ' योगशिक्षक ' येत असत ..मात्र योगाभ्यास करणे अजून सक्तीचे नव्हते .. त्यामूळे मोजकेच चार पाच जण योगाभ्यास करत असत बाकीचे त्या वेळी अंघोळ ..संडास ..तब्येत बरी नाही ..वगैरे कारणांनी योगाभ्यासाला दांडी मारत होते ..' टर्की ' तून बाहेर पडल्यावर मी मात्र योगाभ्यासाला बहुतेक वेळा जाऊन बसलो होतो . एकूण ३० जणांची या वार्ड मध्ये आरामात सोय करता येत होती ..मात्र त्या वेळी फक्त मी धरून एकूण ११ च लोक उपचार घेत होते ..सगळे गर्दुल्लेच होते ..वेगवेगळ्या जातीधर्माचे आणि संस्कृतीचे ..व्यसन.. गांजा ..चरस ..अफू..दारू आणि ब्राऊन शुगरचे .. निव्वळ दारू पिणारा कोणीच नव्हता ..अश्या विविध व्यसने करणाऱ्या व्यक्तीला व्यसनमुक्ती केंद्राच्या भाषेत ' मल्टी अँडीक्ट ' म्हंटले जाते . मी सोडून सगळे मुंबईचे ..राहुल , देवेंद्र , सैय्यद , कोनाप्पा , ऑस्कर , मोहम्मद काल्या , डायगो , अनिल , कुणाल , अशी त्यांची नावे मला काही दिवसातच पाठ झाली हे सगळे मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून आले होते .. सगळे ' टपोरी ' या सदरात मोडणारे .. लबाडी ..चोरी .. वगैरे सगळ्या गोष्टीत खास माझ्यासारखे किवा त्या पेक्षा अधिक प्राविण्य मिळवलेले ..त्यांची ऐक गुप्त संकेतिक अशी ' ट ' ची भाषा ते कधी कधी बोलत असत ..ही भाषा मुंबईतील पाकीटमार लोक वापरत असत ती भाषा मी देखील लवकरच शिकलो म्हणजे सोपीच होती ती भाषा .. नीट कान देवून ऐकले की लक्षात येई लगेच .. प्रत्येक शब्दात पहिल्या अक्षरानंतर ' ट ' लावला जाई ..व पहिल्या अक्षरातील कान्हा , मात्रा ,वेलांटी जे काही असेल ते या मध्ये घातलेल्या ' ट ' देखील लावले जात असे ..तुषार चे ' तूंटूशार ' राहुल चे ' रांटाहूल ' असे होई ..पुढे मी देखील सरावाने ही भाषा बोलू लागलो .

========================================================================

भाग ९७ वा ' कंबल थेरेपी ' 


एकंदरीत आमचा वार्ड मेंटल हॉस्पिटलच्या कर्मचारी वर्गात बदनाम झालेला होता .. वार्डात देखील आमची मस्ती चालत असे ..शिव्या तर सर्रास सुरु असत . .. साले ..म्हणजे एकदम सौम्य व प्रेमाची शिवी होती त्या पुढील सगळ्या सीमा पार करत असलेल्या शिव्या येथे सर्रास अगदी दोस्ती खात्यात देखील वापरल्या जात . मी सोडून सगळे मुंबईचे असल्याने आठवड्यातून एकदा तरी त्यांना भेटायला घरून कोणी ना कोणी येत असे ..भेटायला आलेले नातलग त्यांच्यासाठी फळे ..मिठाई ..सुकामेवा असे आणत .. ते सगळ्यांना वाटले जाई ज्याच्या घरून हा माल आला असेल तो स्वतःसाठी मोठा वाटा काढून बाकीचा इतरांना वाटत असे .. बऱ्याचदा असा स्वतःसाठी काढून ठेवलेला माल रात्री कोणीतरी गायब करतोय असे सर्वांच्या लक्षात आले ..येथे प्रत्येक पलंगाच्या बाजूला हॉस्पिटल मध्ये असतात तसे पांढरे, औषध ठेवायचे छोटेसे टेबल आणि त्या खाली ऐक मोठा कप्पा असे होते ..त्या कप्यात खाण्याचे पदार्थ ठेवले जात .. या कप्प्यांना जरी दार असले तरी कुलूप लावायची काही सोय नव्हती .. याचाच कोणीतरी गैरफायदा घेत होते .. ज्याचे खाण्याचे पदार्थ चोरीला जात असत तो नक्की चोर माहित नसल्याने ..हवेत ..आई बहिणीवरून शिव्या देई ..ते सर्वांनाच त्रासदायक वाटे .. नेमका चोर कोण आहे या बाबत ' बिग बॉस ' मध्ये जसे वेगवेगळे गट पडून चर्चा होते तश्या चर्चा होत असत .. पण कोणीच कोणालाच प्रत्यक्ष चोरी करताना पहिले नसल्याने एकदम एखाद्याचे नाव घेऊन आरोप करणे योग्य नव्हते ..शेवटी मी .सैय्यद ..राहुल आणि ऑस्कर या चौघांनी झोपण्याचे सोंग घेऊन रात्रभर पाळत ठेवायचे ठरवले ..तसेही सर्व जण रात्री साडेबारा एक वाजेपर्यंत जागरण करतच असतच मात्र नंतर सगळे गाढ झोपी जात होते ..थंडीचे दिवस असल्याने एकदा अंगावर जाड कांबळे घेतले की लघवीला देखील उठण्याचा कंटाळा येई आम्हाला ..फक्त ज्या लोकांची पहाटे किचन मधून चहा ... दुध चोरून आणण्याची जवाबदारी असे त्यांना रात्रपाळीचा अटेंडंट उठवत होता . 

आम्ही पाळत ठेवण्याचे ठरवून झोपेचे सोंग घेऊन ..एक दिवस रात्रभर जागे राहिलो ...आणि मोहम्मद काल्या चोर आहे हे समजले ... दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला तसे विचारले तर त्याने स्पष्ट नकार दिला ..त्या लॉकर जवळ मी माचीस शोधत होतो असं बहाणा करू लागला .. मोहम्मद काल्या तसा अंगापिंडाने चांगलाच होता .. चोर बाजार विभागात रहात असल्याने ..मारामारी ..चोरी ..जेल वगैरे सगळे पहिले होते त्याने.. साधारण सहा फुट उंच ..ठार काळा ..असा हा मोहम्मद समोरासमोर मारामारीला दोन तीन जणांना नक्कीच भारी पडला असता ..तसा वृत्तीने देखील तो निडर होता ..एकदा त्याने बाथरूम मध्ये शिरलेला हिरवा साप कशाचीही मदत न घेता हाताने पकडलेला आम्ही पहिले होते .. तो काही चोरी केल्याचे कबुल करायला तयार नव्हता .. सगळ्या प्रकारांनी विचारून झाले तरी त्याची नकारघंटा होती .. काल्याला नक्कीच अद्दल घडविली पाहिजे असे आमचे ठाम मत होते ..मग आम्ही वेगळा प्लान केला या पुढे जेव्हा कोणाच्या घरून असे काही खायचे सामान येईल त्या दिवशी सर्वानी पाळत ठेवायची आणि काल्याला रेडहँड पकडून झोडपायचा असे ठरले ..पण काल्याला समोरासमोर भिडायला सगळे बिचकत होते त्यावर असं उपाय ठरला की एकाने मागून त्याच्या तोंडावर कांबळे टाकायचे आणि मग त्याला काही दिसेनासे झाले की लाथा बुक्क्यांनी ठोकायचे ..प्लान पक्का झाला मागील बाजूने पुढाकार मी ..राहुल ..सैय्यद ..अनिल आणि ऑस्कर घेणार होतो तर पुढच्या बाजूने बाकीचे असणार होते .. नेमके दुसऱ्याच दिवशी राहुल च्या घरचे त्याला भेटायला आले त्यांनी सोबत फळे आणि लाडू आणले होते .. राहुल ते काही वाटून बाकी त्याच्या पलंगाशेजारी असलेल्या टेबलच्या कप्प्यात ठेवले ..रात्री सगळे झोपेचे सोंग घेऊन पहारा करत होतो .. काल्या दोन तीन वेळा लघवीच्या निमित्ताने उठला ...झाडी करून पुन्हा झोपला ..पहाटे साडेतीन च्या सुमारास तो पुन्हा उठला आणि राहुल च्या टेबलजवळ गेला .त्याने कप्प्यात हात घालून फळे काढली .आम्ही आवाजाचा कानोसा घेत होतो .. कप्प्याचे दार हलकेच बंद केल्याचा आवाज झाल्याबरोबर आम्ही पटकन उठलो आणि सर्व लाईट लावले ..काल्या बावचळला होता .. त्याच्या हातात दोन सफरचंद होती .. आम्ही त्याला जाब विचारू लागलो तर मुजो-या करायला लागला .. आम्ही डोळ्यांनी इशारे केले आणि मी मागून एक कांबळे त्याच्या डोक्यावर टाकले त्याच क्षणी सगळे त्याला भिडले काही दिसत नसल्याने काल्या खाली पडला ते कांबळे मी तसेच त्याच्या तोंडाभोवती गुंडाळलेले राहील असे घट्ट पकडून ठेवले होते ..लाथा बुक्क्या बरसल्या .. काल्या शिव्या देत ओरडत होता .त्याच्या शिव्या ऐकून आम्हाला अधिकच चेव चढत होता शेवटी पाच मिनिटात तो निपचित पडला .. मग कांबळे काढले आम्ही ..त्याचे तोंड फुटले होते .. आता शिव्या देण्याची देखील ताकद राहिली नव्हती त्याच्या कडे ..गुपचूप उठून कोपऱ्यात जाऊन बसला ..मग रडू लागला ..' भाईलोग बहोत मारा है तुमने मुझे ..इतना बडा कुसूर नाही था मेरा ' ..वगैरे म्हणू लागला तो रडायला लागल्यावर आम्हालाही त्याची दया आली ..मग सगळे त्याला शांत करू लागले ..' यार तेरेको अगर जादा भूक लगती है तो मांगकर लेना था ..चोरी क्यो करता है आपसमे ' असे त्याला सांगू लागलो . मग शांत झाला ....नंतर काही दिवस आम्हाला भीती होती की हा रात्री बदला म्हणून सगळे झोपल्यावर एखाद्या वर हल्ला करेल की काय ..पण तसे काही घडले नाही तो सगळ्यांशी पूर्ववत वागत होता . 
जसा जसा ७ नंबर च्या वार्ड मधील स्वैराचार वाढत होता तश्या तश्या इतर भानगडी देखील सुरु झाल्या ..म्हणजे ज्या मित्रांच्या घरचे नातलग येत ते मित्र नातलगांकडून पैसे मागून घेऊ लागले ..पैसे हातात पडताच या पैश्यांची नशा कशी करता येईल याचा विचार सुरु झाला मेंटल हॉस्पिटल मध्ये ऐक दोन अटेंडंट गांजा ओढणारे होते ...त्यापैकी एकाशी कोनाप्पा ने संधान बांधले आणि चक्क गांजाची पुडी मिळवली ..आता ती कुठे जाऊन प्यायची हा प्रश्न होता .. कोनाप्पा ..सैय्यद ..ऑस्कर ..आणि अनिल हे चार जण या पुडीत सामील होते .सगळ्या ११ जणांना तो गांजा पुरला नसता म्हणून इतरांच्या नकळत त्यांनी हा गांजा संध्याकाळच्या वेळी आठ नंबर वार्डच्या बाजूला असलेल्या निर्जन ठिकाणी जाऊन जांभळाच्या पानाची चिलीम बनवून ओढला .. मला दुसऱ्या दिवशी त्याचा सुगावा लागला ..म्हणजे माझ्याजवळ बेसावध पणे अनिल हे बोलला ..झाले आता मला पण त्यांच्यात सामील व्हायचे होते .. परत तीन दिवसांनी त्या अटेंडंट कडून पुडी मागवली गेली ..या वेळी मी त्यांच्यावर पाळत ठेवून होतो व नेमक्या वेळी तेथे पोचलो तर मलाही दोन दम मारायला मिळाले .. पुढे असे दर दोन तीन दिवसांनी घडू लागले .. कधी जांभळाच्या ..पिंपळाच्या पानाची तर कधी किचन मधून चोरून आणलेल्या मोठ्या बटाट्याला वरून खोल कोरून मग त्याच्या खालच्या बाजूस ऐक छिद्र पडून बटाट्याची देखील चिलीम बनवून आम्ही त्यात गांजा ओढू लागलो ..वार्डातील आम्ही एकंदर पाच जण यात सहभागी होतो . 

========================================================================
भाग ९८ वा  मेरे प्यार की उमर हो इतनी सनम..तेरे नाम से शुरू !


मला ' स्नेहदीप ' मध्ये येऊन आता सुमारे दीड महिना लोटला होता ..मेंटल हॉस्पिटल मध्ये पहिल्या वेळी मला पन्नास दिवस रहावे लागले होते ..दुसऱ्या वेळी तीन महिने राहिलो होतो .. या वेळी नक्कीच त्या पेक्षा जास्त दिवस रहावे लागणार हे नक्की होते .. अनघाला मी शेवटचे पत्र नाशिकहून पाठवले होते ..त्या वेळी व्यसन सुरु झालेले होते माझे . ..नंतर वाढत जाऊन आता पुन्हा मेंटल हॉस्पिटल मध्ये दाखल व्हावे लागले .. . अनघाने बहुतेक घरी पत्र पाठवले असेल ..माझे उत्तर नाही म्हणून काळजीत असेल असे विचार मनात येत ..तिला पुन्हा माझे व्यसन सुरु झाले होते हे कळले तर नसेल ? अशीही शंका वाटे .. ते झाले तर तिच्या काय प्रत्रीक्रिया असतील ? .कधी कधी आपले नशीबच खराब आहे ..आपल्याच बाबतीत असे का होते ? ..अनघा जिवनात आल्यापासून.. सुमाचे दुरावणे ..त्याबद्दलचे दुखः ..या गोष्टी मी विसरत चाललो होतो व नवीन जिवन सुरु करण्याचे ठरवत असतानाच वडिलांचे आजारी पडणे ..मला पुन्हा नाशिकला यावे लागणे .अनघा पासून दूर रहावे लागणे ..या सगळ्या गोष्टी माझ्या फुटक्या नशिबाच्या प्रतिक होत्या असे मला वाटत असे ..असे विचार मनात आले की काही काळ मी पुन्हा उदास ..निराश ..वैफल्यग्रस्त होई . 

तेथ राहणाऱ्या गर्दुल्ल्यांपैकी राहुल ..अनिल ..डायगो हे मागील वर्षी ' मुक्तांगण ' व्यसनमुक्ती केंद्र पुणे येथे दाखल झाले होते ..ते इतरांना ' मुक्तांगण ' बद्दल माहिती सांगत तेथील ' मँडम ' कशा कडक मात्र हुशार आहेत .. तेथे होणाऱ्या ' ग्रुप थेरेपीज ' ..' म्युझिक थेरेपी ' याबद्दल ते खूप रंगवून सांगत .. या वेळी देखील आम्ही ' मुक्तांगण ' गेलो असतो तर जास्त चांगले झाले असते असे त्यांना वाटे .. वर्तमान पत्रात ' स्नेहदीप ' सुरु झाल्याचे आणि संजय दत्तच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाल्याचे वाचून ही मंडळी मुंबईच्या जवळ म्हणून इथे ' स्नेहदीप ' दाखल झाली होती ..कधी कधी आम्हाला सगळ्यांना एकदम चांगले वागण्याची लहर येई ..मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे योग्याभ्यासात सामील होत .. पुन्हा कधीही व्यसन न करण्याबद्दल गप्पा मारत ..बिडी देखील सोडून देण्याचे बेत आखले जात ..पण ..हे सगळे जेमतेम दोन तीन दिवस टिकत असे ..नंतर ' माकडाच्या घरासारखे ' पुन्हा टिवल्या बावल्या ..मस्ती ..टपोरीगिरी सुरु होई . दरम्यान तेथे मेंटल हॉस्पिटल च्या वार्षिक स्नेह संमेलनाचे वारे वाहू लागले होते .. त्यासाठी खेळांच्या स्पर्धा वगैरे आयोजित केल्या गेल्या होत्या .. मेंटल हॉस्पिटल चा स्टाफ विरुध्द ' स्नेहदीप ' चे गर्दुल्ले अशी ऐक क्रिकेट ची मँच देखील झाली त्यात आम्ही हरलो कारण सरळ होते व्यसने करून आमचे सगळ्यांचे रिफ्लेक्सेस कमी झालेले होते त्यामूळे फिल्डिंग ढिसाळ झाली ..कँच सोडले गेले ..चंचल मनस्थिती मुळे चार जण रनआउट झाले आमच्या टीमचे ...दर दोन तीन दिवसांनी चोरून गांजा ओढणे सुरूच होते . 

एके दिवशी मेंटल हॉस्पिटल सोशल वर्कर श्री.देशमुख हे मला शोधत वार्डात आले ..ते मला नावाने ओळखून होते मात्र त्यांच्याशी कधी बोलण्याचा प्रसंग मात्र आला नव्हता .. ते आमच्या वार्डात येऊन सरळ अटेंडंट च्या ऑफिस खोलीत जाऊन बसले आणि मला बोलावले ..मला त्यांचे माझ्याकडे काय काम आहे ते समजेना ..देशमुख सर् माझी विचारपूस करू लागले .. किती वर्षांपासून नशा करतोस .. येथे किती वेळा आलास .. तुला सुधारायचे आहेकी नाही ..तुझा मनावर कंट्रोल का रहात नाही .. आयुष्यभर येथेच राहायचे आहे का ? कोणत्या कारणाने वारंवार नशा करतोस वगैरे प्रश्न ते विचारात होते ..मी जमेल तशी ..तोंडात येतील ती उत्तरे त्यांना देत होतो ..हे सगळे कशासाठी चालले आहे याचा अजिबात अंदाज बांधता येईना मला ..शेवटी त्यांनी विचारले की अनघा कोण आहे ? मी एकदम चमकलो ..अनघा बाबत यांना कसे समजले ? ...मी थोडक्यात अनघा बद्दल त्यांना सांगितले .. म्हणाले घाबरू नकोस मित्र तू खूप लकी आहेस ..असे म्हणत त्यांनी एक पोस्टाचे फोडलेले पाकीट माझ्या समोर टेबलवर ठेवले ..म्हणाले हे पत्र आलेय तुझ्या नावाने ..तुझ्या मैत्रिणीचे . मी पटकन पाकीट उचलू लागलो तर म्हणाले ..थांब नंतर सावकाश वाच ..आधी मला वचन दे की तू परत व्यसनाच्या नादी लागणार नाहीस याचे ..अशी वचने देणे ..शपथा घेणे वगैरे तर माझ्या डाव्या हातचा मळ होता .. मी त्वरित त्यांच्या हातात हात ठेवून त्यांना वचन दिले..समाधानाने मन डोलवत ते माझ्या हातात ते पाकीट देवून निघून गेले .. मी पटकन वार्डातील पलंगावर येऊन बसलो आणि ते पाकीट उघडून आतील पत्र काढले.. फुलस्केप कागदावर पत्र लिहिले होते ...पत्राच्या अगदी वरच गाण्याच्या ओळी लिहिल्या होत्या ' मेरे प्यार की उमर हो इतनी सनम ..तेरे नाम से शुरू .तेरे नाम से खतम ' पटापट माझही नजर पत्रावर फिरू लागली ..अनघाने त्यात तिला मी पुन्हा व्यसन सुरु केल्याचे आणि ' मेंटल हॉस्पिटल ' ला दाखल असल्याचे माझ्या भाची कडून समजल्याचे लिहिले होते ..तू पुन्हा व्यसन सुरु केल्याचे दुखः तर वाटलेच ..पण तसे तू मला पत्रातून का कळवले नाहीस या बद्दल देखील खूप वाईट वाटल्याचे लिहिले होते ..तुझा माझ्यावर विश्वास नाही का ..वगैरे लिहून ..पुन्हा गाण्याचा ओळी होत्या ..त्यावेळी नवीन आलेल्या ' तेजाब ' सिनेमातील गाण्याच्या ..' कहे दो..के तुम हो मेरे वरना .. जीना नाही मुझे है मरना ' ..त्याच्या खाली लिहिले होते ..माझे काही चुकले का ? .तू पुन्हा का व्यसन सुरु केलेस ? . ..मला तुझी खूप आठवण येते .. शेवटी तिने मला धीर दिला होता ..आता मात्र तू मनावर घे आणि पक्का निर्धार कर .. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत ..माझे हे पदवीचे शेवटचे वर्ष आहे ..आईबाबा आतापासून माझ्या लग्नाची चर्चा करत आहेत घरात .. त्यांना सगळे सांगून टाकावे असे वाटते पण ..त्यांची भीती देखील वाटते ..तू लवकरात लवकर येथे ये ..सगळे काही सुरळीत होऊ दे .. अशी माझी रोज प्रभू श्रीरामचंद्रा कडे प्रार्थना असते .. असे लिहून पत्राचा शेवट केला होता ..त्याच्याच खाली सलील ने देखील थोडे लिहिले होते ..व त्यावेळी आलेल्या अमिताभ च्या ' जादूगार ' सिनेमातील गाण्याच्या ' डोंट वरी बी हँप्पी ' या ओळी लिहिल्या होत्या . पत्र वाचता वाचता माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले ..! 

अधीक्षक डॉ .लव्हात्रे यांनी विशेष प्रयत्न करून ' स्नेहदीप ' व्यसनमुक्ती कक्ष सुरु केलेला असल्याने येथे उपचार घेणाऱ्या व्यसनी मुलांना येथे राहणे जास्त सोईस्कर वाटावे म्हणून त्यांनी आमच्या वार्ड बाबत काही सवलती दिल्या होत्या ..एकतर आमचे कपडे इतर मनोरुग्णांपेक्षा अधिक स्वच्छ धुतलेले असत तसेच शर्टाला कॉलर ..खिसा खास वेगळ्या रंगाचे होते .. स्वयंपाक घरात जेवण आणायला जातेवेळी देखील जेव्हा ७ नंबर मधील गर्द्दुल्ले जेवण घेण्यास किचन मध्ये येतील तेव्हा .. त्यांना लाईनीत जेवण न देता आधी दिले जावे अश्या किचन मध्ये सूचना होत्या ..आमचे लोक चहा ..नाश्ता ..जेवण आणायला जात तेव्हा आधी आणि चांगली वरची तर्री असलेली भाजी आणि वरण आम्हाला मिळत असे .. ७ नंबर च्या लोकांना मेंटल हॉस्पिटल च्या आवारात फिरण्याची देखील परवानगी होती डॉ .श्रीखंडे नावाचे एक वेगळे डॉक्टर .. येथे पेशंटची देखभाल करण्यासाठी नेमले होते ..श्रीखंडे सर् दिवसातून किमान दोन वेळा तरी वार्ड मध्ये राउंड मारत असत ..नातलगांना देखील वार्डात येऊन भेटण्याची सोय होती ..वार्डात अटेंडंट च्या खोलीतील गँस ..जेवण आणि चहा गरम करण्यासाठी वापरता येत होता आम्ही रात्रीचे जेवण जरी वार्डात चार वाजता आणले तरी ते जेवण रात्री साडेआठ वाजता किवा मनाला येईल तेव्हा गरम करून जेवत असू .. एकंदरीत भरपूर सवलती होत्या आमच्या ' स्नेहदीप ' वार्डला ..पण तेथेच घात झाला कारण आम्ही सगळे व्यसनी म्हणजे मुळातच स्वातंत्र्याचा स्वैराचार करणारी मंडळी होतो ..येथेही हळू हळू स्वैराचाराला सुरवात झाली होती ..तीन तीन मुलांचा ऐक ऐक गट करून आम्ही चहा , जेवण , नाश्ता वगैरे वेळच्या वेळी किचन मधून आणण्यासाठी ड्युटीज लावून घेतल्या होत्या ..चहा आणायला नियमाप्रमाणे सकाळी साडेपाच ते सहा च्या दरम्यान जायचे असे पण आमच्या वार्डातील लोक पहाटे साडेचार लाच बाहेर पडत याचे कारण ' दुध चोरी ' होते .. पहाटे साधारण चार च्या सुमारास किचन मध्ये डेअरी तून मोठ्या चाळीस लिटर च्या कँन मधून दुध येई ..साधारण दहा ते बारा कँन भरून आलेले ते दुध ..किचन चे लोक किचन शेजारीच असलेल्या एका खोलीत मोठ्या पातेल्यात तापवायला ठेवले जाई .. दुध तापायला ठेवले की किचन चे लोक किचन मध्ये दिवसभराच्या स्वैपाकाची तयारी करण्यास निघून जात ..दुध असलेल्या खोलीला बाहेरून कुलूप लावून ..त्या खोलीला साधारण कमरे इतक्या उंचीवर ऐक छोटीशी खिडकी होती .. आम्ही त्या खिडकीतून ऐक प्लास्टिक चा पाईप दुधाच्या पातेल्यात सोडत असे आणि त्या पाईप चे दुसरे तोंड आम्ही नेलेल्या बादलीत सोडून एकदा ' सक ' करून मोठी दुधाची धार आमच्या बादलीत पाडत होतो ..रोज सुमारे बादलीभर दुध आम्ही चोरून आणत होतो ..मग वार्डात दिवसभर चहा होई ..आमच्या वार्द्च्या अटेंडंट ला हे माहित झाले होते मात्र तो देखील आम्हाला सामील होता ..त्याला दिवसभर फुकट चहा प्यायला मिळे . 

एकदा नाश्ता ..अंघोळ वगैरे झाले की सगळे ' टपोरी ' मस्त बाहेर फिरायला निघाले आहेत अश्या अविर्भावात आमचा खास ड्रेस घालून ..काहीजण तर स्नो .पावडर वैगरे लावून मेंटल च्या आवारत फिरायला निघत असू ..स्टाफ क्वार्टर्स च्या समोरील एका बेंच वर ही टोळी बसून ..येणाऱ्या जाणाऱ्या सिस्टर्स ..स्टाफ च्या घरातील मुली ..बायका निरखत बसणे हा या लोकांचा खास छंद होता ..मी मात्र या प्रकारापासून दूर होते कारण स्टाफ क्वार्टर्स मध्ये राहणारे बहुतेक जण माझ्या ओळखीचे होते ..ही टोळी कधी कधी मुलींवर शेरेबाजी करणे , त्यांना पाहून विशिष्ट आवाज काढणे असे प्रकार करत असत ..सैय्यद ने तर तेथे राहणाऱ्या एका नर्स च्या लहान बहिणीवर जाळे टाकले होते ,, सैयद दिसला तसा देखणा होता ..राजेश खन्ना सारखा भांग वगैरे पाडत असे ..लालगोरा होता दिसायला ... ती बावळट देखील त्या जाळ्यात फसली असल्याचे जाणवत होते ..ती खिडकीतून त्याला इशारे करत असे ...७ नंबर चा वार्ड हळू हळू सगळ्या कर्मचारी वर्गात बदनाम होत होता ..पण अधीक्षक ' साहेबांची खास मर्जी असलेला वार्ड म्हणून कर्मचारी काही बोलू शकत नव्हते .. व्यसन बंद झाले की मग जो अतिरिक्त उत्साह ..स्फूर्ती , उर्जा निर्माण होते तिला जर योग्य ठिकाणी लावले गेले नाही आणि नियंत्रणात ठेवले नाही तर असे होते .. मी काही अगदी ' सोवळा ' प्रकारातला नव्हतो तरीही हे प्रकार मात्र मला आवडत नसत मी या प्रकारा पासून चार हात लांबच रहात असे ..उलट मी त्यांना ..हे सगळे एखादे वेळी अंगलट येईल असेही सांगे . एकदा मात्र माझी आणि डायगो अल्मेडा ची या वरून मारामारी झाली ..झाले असे की हा डायगो नेमका एकदोन वेळा ..मला मागील वेळी भेटलेल्या पल्लवी या शाळकरी मुलीच्या मागावर असलेला मला दिसला ..मी त्याला पल्लवी बाबत सावध देखील केले ती येथील एका ओवरसीयर ची मुलगी आहे आणि अतिशय सरळ साधी मुलगी आहे अशी त्याला जाणीव करून दिली ..मागच्या वेळी मी पल्लवी ला ' व्यसनाचे दुष्परिणाम ' या निबंधासाठी मदत केली होती .. ती इतकी साधी होती की ती आमच्या वार्ड ची मुले जातायेताना तिला हाय .. हँलो करत त्यांना हसून प्रत्युत्तर देई .. तिला यांच्या मनात कोणता राक्षस असेल याची जाणीव नव्हती .. डायगो खास तिच्या शाळेत आणि क्लास ला जाण्या येण्याच्या वेळी रस्त्यावर उभा राही व तिला अभिवादन करून तिच्यासोबत बोलत थोडे दूरपर्यंत चालत जाई .. मग वार्डात येऊन ..सगळे फुशारक्या मारून तिखट मीठ लावून सगळ्यांना सांगे ..मला ते अजिबात आवडत नव्हते .. एकदा तो असाच तिखट मीठ लावून सांगताना माझी सटकली . त्याला सरळ म्हणालो ' चल अभी के अभी पल्लवी को जाकर पूछते है , के तू यहां जो बता रहा है वो सच है क्या ? ' त्यावर तो मला म्हणाला ' तू मेरे उपर जलता है ' मला हे सहन न होऊन मी त्याला भिडलो जरा गुद्दागुद्दी झाली ..इतर मित्रांनी आम्हाला सोडवले . तेव्हापासून मात्र परत तो पल्लवी च्या वाट्याला गेला नाही . 

========================================================================

भाग ९९ वा उपरती ..!

अनघाचे पत्र वाचून मी खूप आनंदी झालो .. तिचे माझ्यावर असलेले निस्सीम प्रेम अलौकिकच म्हणायचे ..तिचा विश्वासघात करून मी परत व्यसन केले होते तरीही .. माझ्यावर न रागावता उलट तिने मला धीर दिला होता ...मी जरी स्वतःल दुर्दैवी समजत असलो तरी वस्तुस्थिती अशी होती की मी खूप भाग्यवान होतो ..फक्त माझा दृष्टीकोन नकारात्मक असल्याने ,,मी नेहमी मला काय मिळाले नाही याचा विचार करून निराश होई ..त्या ऐवजी मला काय मिळाले आहे हे मी लक्षात घेतले असते तर ..मी पत्र वाचताना सगळे मित्र भोवती गोळा झाले होते ..सर्वाना कुतूहल होते ..मी पूर्वी कधी त्यांना अनघा प्रकरणाबद्दल बोललो नव्हतो ..थोडक्यात मी त्यांना सगळे सांगितले ..तर सगळ्या गर्दुल्ल्यांना पण आनंद झाला ..त्या दिवशी रात्री वार्डात खूप गाणी म्हंटली ..धम्माल केली खूप .. मला लवकर घरी जावे असे वाटू लागले ..परंतु येथून डिस्चार्ज घेणे माझ्या हाती नव्हते ...आता या पुढे एकदम साधे सरळ जिवन व्यतीत करायचे असे मी ठरवत होतो .. 

दुसऱ्याच दिवशी सैय्यद चे नातेवाईक त्याला भेटायला आले होते ..सैय्यद ने त्यांच्याकडून ५० रुपये मागून घेतले होते .. लगेच ते पैसे आम्हाला गांजा आणून देणाऱ्या अटेंडंट ला दिले गेले ..आज मात्र मी या मुलांसोबत या पुढे गांजा वगैरे ओढायचा नाही असे मनात ठरवले बिचारी अनघा तिकडे माझ्या सुधारून लवकर अकोल्याला येण्याची वाट पाहत होतो आणि अश्या वेळी आपण येथे देखील पुन्हा व्यसने करावीत हे आता मनाला बोचत होते म्हणून मी तो निर्णय घेतला होता .. संध्याकाळी नेहमी प्रमाणे कोनाप्पा ..सैय्यद ..राहुल वगैरे मंडळी जेव्हा बाहेर फिरायला निघाली तेव्हा मी येत नाही असे त्यांना सांगितले त्यांना खूप आश्चर्य वाटले ..मी वार्डातच टी.व्ही . पाहत बसलो .. सुमारे तासभराने ती मंडळी व्यवस्थित गांजा ओढून परत आली ..मग त्यांचे हसणे खिदळणे सुरु झाले ..क्षणभर आपण जायला हवे होते असे वाटले ..पण आता अश्या मोहांना बळी पडायचे नाही असं निर्धार पक्का करत गेलो . आमच्या वार्डात नंतर दोन अल्कोहीलीक्स देखील दाखल झाले ..आता एकूण संख्या १३ झाली होती ..हॉस्पिटलच्या ..वार्षिक स्नेहसंमेलना करिता तेथील स्टाफ च्या लोकांची ऐक एकांकिका बसवावी असे स्टाफ मधील नाट्यप्रेमी लोकांनी ठरवले होते ..' डॉक्टर .रोगी व यम ' नावाची ऐक विनोदी एकांकिका निवडली गेली होती व मला त्यातील डॉक्टर च्या भूमिकेसाठी निवडले गेले .. सात नंबर वार्ड मधील इतर सगळे सदस्य जरी तेथील स्टाफ मध्ये बदनाम होते तरी ..माझ्या बाबतीत मात्र सगळ्यांना आस्था होती ..कारण माझे सगळ्या स्टाफ शी चांगले संबंध होते ..पूर्वी मी दोन वेळा दाखल असतांना बहुतेक सगळ्या स्टाफशी माझी ओळख झाली होतो ..एकांकिके च्या रिहर्सल च्या निमित्ताने आता मी बहुतेक वेळ ' महिला ' विभागातील हॉल मध्ये जात असे ..वार्डात खूप कमी वेळ थांबू लागलो ..कधी कधी मला आमच्या वार्डातील गर्दुल्ले " तू यहां स्टाफ बन जा ..बिन पगारी फुल अधिकारी " असे चिडवत ,..त्यांचे बोलणे मी मनावर घेत नसे .. 

आमच्या वार्डात दोन आठवड्यापूर्वीच ऐक नवीन अटेंडंट बदलून आला होता ' रमेश नावाचा .. तरुण तसेच तडफदार देखील होता ..नेहमी तो आम्हाला आमची वागणूक सुधारण्या बदल काही ना काही सांगत असायचा ..याला तंबाखूचे देखील व्यसन नव्हते ..तुम्ही सगळी चांगल्या घरची मुले आहात ..आईवडिलांच्या तुमच्यावर आशा केंद्रित आहेत ..लवकरात लवकर सुधारून तुम्ही घरी जाऊन नवीन आयुष्य सुरु करा असे तो म्हणे .. तसेच ' अल्कोहोलीक्स अँनॉनिमसचीच शाखा असलेल्या दारू व्यतिरिक्त इतर मादक पदार्थ सेवन करणाऱ्या लोकांसाठी असलेल्या ' नार्कोटिक्स अँनॉनिमस चे लोक देखील सदस्य तेथे आठवड्यातून एकदा मिटींग घ्यायला येत असत .हे सदस्य येताना सोबत आमच्यासाठी बिडी बंडल घेऊन येत ..त्यामागे त्यांचा हेतू हा होता की आम्ही लवकर त्यांच्याशी मैत्री करावी व इथून डिस्चार्ज झाल्यावर नियमित बाहेर होणाऱ्या मिटींग्ज ना उपस्थित रहावे . ते सदस्य त्यांच्या जीवनातील मादक पदार्थांमुळे झालेले नुकसान आम्हाला कथन करत असत .. ...मी ते मन लावून ऐकत असे ..व आपणही या लोकांसारखेच व्यसनमुक्त रहावे ही प्रेरणा मनात पक्की होत असे .. 

मी जरी आता आमच्या गांजा ओढणाऱ्या मित्रांसोबत गांजा ओढायला जाणे बंद केले असले तरी त्यांचे दर दोन तीन दिवसांनी बाहेर फिरायला जाऊन गुपचूप गांजा ओढणे सुरूच होते . त्याकाळी आठवड्यातून दोन वेळा सायंकाळी ७ वाजता टी व्ही वर ' चित्रहार ' व ' छायागीत ' हा हिंदी सिनेगीतांचा कार्यक्रम लागत असे ...सगळे व्यसनी गाण्यांचे खूप शौकीन असतात .. आम्ही न चुकता हा कार्यक्रम पहात असू ..एकदा नेमक्या ' चित्रहार ' च्या वेळी गांजा ओढणारी मंडळी बाहेर होती ..नवीन अटेंडंट रमेश ची त्या दिवशी रात्रपाळी होती ..पाच जण वार्डात उपस्थित नाहीत हे त्याच्या लक्षात आले ..मात्र बाहेर फिरायला गेले असतील ' चित्रहार ' च्या वेळी परत येतील असा त्याचा अंदाज होता ..मात्र त्या दिवशी ' चित्रहार ' सुरु झाला तरी हे लोक काही आले नाहीत ..रमेश च्या मनात शंका आली ..इतक्या आवडीचा कार्यक्रम सोडून ही मंडळी बाहेर काय करत आहेत ? झाले तो त्यांना शोधायला निघाला नेहमी आम्ही टाईम पास करायला बसू ती सारी ठिकाणे त्याने पहिली पण ही मंडळी कुठे दिसली नाहीत ..मग तो वार्डात येऊन आम्हाला विचारू लागला ..तर आम्ही सगळ्यांनी ..आम्हाला काही माहित नाही असे उत्तर दिले ..रमेश काही स्वस्थ बसणार-यातला नव्हता ..ती मंडळी परत आल्यावर रमेश त्यांना रागावला ' तुम्हाला बाहेर फिरायला जाण्याचे स्वातंत्र्य असे त्याचा गैरफायदा घेऊ नका ..तसेच त्याने या पुढे माझी रात्रपाळी असेल तेव्हा सगळ्या लोकांनी वार्डातच थांबाले पाहिजे अशी त्यांना ताकीद दिली . .. रमेशला बहुतेक हे लोक काहीतरी गडबड करत असावेत हा संशय आला होता . 

रमेशचे रागावणे यांना रुचले नाही .. त्या दिवशी रात्री ते ' रमेश बहोत शाना समझता है अपने आप को ..तेरे जैसे हमने कई देखे .' .वगैरे आपसात चर्चा करत होते ..एकंदरीत रमेश आता त्यांच्या शत्रू पक्षात होता .. रमेशची रात्रपाळी आठवडाभर होती ..दोन दिवसांनी पुन्हा तसेच घडले ..' छायागीत ' च्या वेळी रात्री सात नंतर ही मंडळी बाहेर होती ..त्या दिवशी रमेश ने सोक्ष मोक्ष लावायचे ठरवले असावे .. ती मंडळी साधारण आठ च्या सुमारास परत आली तेव्हा रमेश ने वार्ड चे गेट लावून घेतले होते त्यांना बाहेरच थांबायला सांगितले व वार्डातील स्वीपर जवळ ' इमर्जन्सी कॉल ' लिहून ड्युटी डॉक्टर कडे पाठविला ..' ' इमर्जन्सी कॉल ' म्हणजे वार्डात जर कोणी खूप आजारी असेल किवा अत्यवस्थ असेल तर ड्युटी डॉक्टर ने त्वरित वार्डात येण्याची विंनती असते .. स्वीपर तो कॉल घेऊन गेला ..हे लोक वार्ड वाहेर उभे राहून रमेश शी हुज्जत घालत होते ..पण रमेश काही दार उघडायला तयार नव्हता .. डॉक्टर आल्यावर उघडतो असे म्हणाला .साधारण दहा मिनिटातच डॉक्टर आले ..त्यांना आणि आमच्या गर्दुल्ल्या मित्रांना रमेश ने एकदमच आत घेतले व त्यांना त्यांच्या खोलीत न जाऊ देता तेथेच अटेंडंट च्या रूम मध्ये थांबविले आणि डॉक्टर ना सांगितले की मला हे लोक काहीतरी नशा करून आल्याचा संशय आहे ..म्हणून तुम्हाला बोलावले ..कोनाप्पा त्यांचा पुढारी होता तो इंग्रजीतून डॉक्टर कडे .रमेश ..खोटे बोलतोय ..तो उगाच आमच्यावर दादागिरी करत असतो नेहमी .. तक्रार करू लागला ..डॉक्टर ने सगळ्यांच्या डोळ्यात टाँर्च मारून त्यांचे डोळे तपासले .. दारू चा तोंडाला वास येतो तसा गांजाचा वास तोंडाला येत नाही त्या मुळे...डोळ्यांच्या बाहुल्या तपासल्या जातात ..त्या मादक पदार्थ सेवन केल्याने आकुंचन पावतात ..किवा एकदम मोठ्या होतात ..डॉक्टर ने त्यांना तपासून ..जाहीर केले की हे सगळे संशयास्पद आहेत ..त्यावर रमेश ने त्यांना शिक्षा म्हणून वार्ड नंबर आठ मध्ये पाठवले जावे अशी डॉक्टर ना विनंती केली ..डॉक्टर ने देखील त्यांच्या सर्वांच्या फाईल वर तशी नोट लिहिली .. वातावरण एकदम गंभीर झाले होते ..हे असे घडायला नको होते ..असे आम्हाला सर्वांनाच वाटत होते ..आमच्यातील पाच जण असे शिक्षा मिळणार म्हणून आम्ही सगळे रमेश ला समजावू लागलो पण रमेश ठाम होता ..यांनी जर निमुटपणे आम्ही काहीतरी नशा केली आहे हे कबुल केले तर ..मग मी विचार करीन असे तो म्हणाला ..मग आम्ही आमच्या मित्रांना समजावू लागलो ..जर काही केले असेल तर रमेश ची माफी मागून कबुल करून टाका सगळे असे सांगितले ..पण कोनाप्पा .. सैय्यद ..अनिल सगळे हट्टाला पेटले होते ..मला माहित होते की हे गांजा ओढून आलेत ..पण मी मध्ये काहीच बोललो नाही फक्त कोनाप्पाला कबुल करून टाका सुटका ..माफी मागून सुटका करून घ्या असं इशारा केला .तो तयार होईना .. 

========================================================================

भाग १०० वा विनाशाची नांदी !


रमेश देखील माघार घ्यायला तयार नव्हता आणि आमचे मित्र कोनाप्पा ..सैय्यद ..राहुल .अनिल ऑस्कर हे देखील हट्टाला पेटले होते ..ड्युटी डॉक्टर फाईल वर ' ट्रान्सफर टू वार्ड न. ८ ' असा शेरा त्या प्रत्येकाच्या फाईल वर लिहून निघून गेले ..आम्ही सगळे वार्डच्या गेट जवळच गोंधळ करत उभे होतो ..त्या गोंधळातच रमेश ने वार्ड च्या स्वीपर ला त्यांच्या फायली घेऊन वार्ड न. आठ कडे रवाना केले होते .. एखाद्याला जर दुसऱ्या वार्डात पाठवले जाणार असेल तर ज्या वार्डात पाठवले जाणार असेल तेथील अटेंडंट त्याला आपल्या वार्ड मध्ये घेऊन जाण्यासठी येण्याची पद्धत होती ..त्या नुसार वार्ड नंबर आठ या क्रिमिनल वार्ड मधील तीन अटेंडंट आमच्या ट्रान्सफर केल्या गेलेल्या मुलांना घ्यायला आले ..तिघेही चांगले मजबूत लोक होते ..नेमका त्या पैकी ऐक जण दारू प्यायलेला होता .. मेंटल हॉस्पिटल मधील अनेक कर्मचारी दारू पिणारे होते ..त्यापैकीच तो ऐक होता .. ते तिघेही आमच्या वार्डच्या गेट जवळ आले.. बाहेरूनच ते ... कोणाकोणाला ट्रान्सफर केले गेले ...त्यांनी चला असे आमच्याशी बोलू लागले ..कोनाप्पा गेट जवळच उभा होता ते अटेंडंट आमच्याशी बोलत असतांना कोनाप्पाला एकाच्या तोंडाचा दारूचा भपकारा आला ..तसा कोनाप्पाला भांडणाला नवा मुद्दा मिळाला ..' हम लोगो को नशा किया है ऐसे शक् से क्रिमिनल वार्ड मे भेजा जा रहा है ..लेकिन आपके सरकारी अटेंडंट तो दारू पीकर ड्युटी पर आये हुये है ' असे तो म्हणू लागला ' हम इन लोगो के साथ वार्ड न आठ मे नही जायेंगे ' असा पवित्रा कोनाप्पा ने घेतला ..कोनाप्पाचा मुद्दा तांत्रिक दृष्ट्या बरोबरच होता .. पुन्हा बाचाबाची सुरु झाली ...आपल्याला न्यायला आलेल्या अटेंडंट पैकी ऐक जण दारू प्यायलेला आहे हे आतल्या सगळ्यांना कळाले ...त्यानाही चेव चढला ..खूप गोंधळ माजला .. आत मध्ये रमेश आणि स्वीपर असे दोघेच होते आम्हाला शांत करायला ..कोणीच कोणाचे ऐकायला तयार होत नव्हते . 

कोनाप्पा म्हणू लागला ' ऐसे पिये हुये आदमी के साथ हम बाहर नही जायेंगे ..दुसरे लोगो को बुलाये ..अभी के अभी हम सुपरिटेंड साहब से मिलना चाहते है ' सुपरिटेंड साहेबांचे नाव काढताच अटेंडंट जरा नरमले ..एकतर लव्हात्रे साहेबांचा हा आवडता व लाडका वार्ड होता ..त्यात त्यांचा ऐक माणूस दारू प्यायलेला होता जर लव्हात्रे साहेब आले असते तर त्यांनी त्या दारू पिऊन ड्युटीवर आलेल्या अटेंडंट वर आधी कारवाई केली असती ..' इकडे आड ..तिकडे विहीर ' अशी अवस्था झाली रमेशची आणि त्याच्या अटेंडंट मित्रांची ..शेवटी मग पुन्हा ड्युटी डॉक्टर ला बोलावले गेले ...डॉक्टर आल्यावर त्यांना सर्व प्रकार समजला तर ते देखील ..गंभीर झाले ..त्यांच्यासाठी देखील धर्मसंकट होते ..मग सुवर्ण मध्य म्हणून असे ठरले की आमच्या मित्रांच्या डॉक्टर ने केलेल्या क्रिमिनल वार्ड च्या ट्रान्सफर रद्द कराव्यात ..दोघांसाठी ही हे सोईस्कर होते ..डॉक्टर ने परत सगळ्यांच्या फाईल्स वर ट्रान्स्फर रद्द केल्याचा शेरा लिहिला ..बाहेरचे अटेंडंट निघून गेले ..डॉक्टर देखील निघून गेल्यावर आमच्या मित्रांनी मोठ्याने ' हिप हिप ..." आरोळी ठोकली . रमेशला बरोबर डोके लढवून ..कचाट्यात पकडून कोनाप्पाने संकट टाळले होते . कोनाप्पा हा सुमारे चाळीस वर्षाचा ..अंगाने बारीक मात्र खूप हुशार आणि बुद्धिमान ..पूर्वी मर्चंट नेव्हीत होता ..गांजा ..दारू ..ब्राऊन शुगर अशी व्यसने लागल्यानंतर काही वर्षातच त्याने शिप वर जाणे बंद केले होते ..शेवटी ' स्नेहदीप ' मध्ये व्यसनमुक्ती साठी यावे लागले होते त्याला . कोनाप्पाने संकट टाळले म्हणून सर्व मित्र त्याच्यावर खुश होते सर्वानी कोनाप्पाला ..वर्ड कप जिंकल्यावर जसे खेळाडूंनी सचिन तेंडूलकर ला उचलून जल्लोष केला होता तसे उचलून वार्डात नेले .. रमेश हतबल होऊन त्याच्या खोलीत निघून गेला ...सगळ्यांनी नंतर मजेत जेवणे उरकली आणि मग वार्डातील एका खोलीत जमून हास्य विनोद सुरु झाले . 

' आपण जिंकलो ' अशी भावना होती सर्वांच्या मनात ..दोन चार गाणी म्हणून आल्यावर ..कोनाप्पाने विषय काढला ' ये साला रमेश का बंदोबस्त करना पडेगा ' सैय्यद आणि ऑस्कर ने देखील कोनाप्पाची तळी उचलून धरली .. ते चार पाच जण रमेश ला कशी अद्दल घडवावी याचा विचार करू लागले ..मी त्यांना आता झाले गेले विसरून जा असे सांगत होतो ..पण ..कोनाप्पा आणि त्याचे साथीदार ऐकायला तयार नव्हते .. रमेश ला अद्दल घडविण्याच्या वेगवेगळ्या योजना बनवत होते ... रमेशला वार्डातील एखाद्या खोलीत एकटा पकडून ठोकायचे असे त्यांच्या मनात होते .. सरकारी अटेंडंट वर ड्युटीवर असतांना हात उचलणे हा गंभीर गुन्हा होता ..आणि असं गंभीर गुन्हा करण्याची योजना आखली जात होती ..मला पुढील भयंकर संकटाची चाहूल लागली होती ..मी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला ..पण आज मिळालेल्या विजयाचा उन्माद असल्याने त्यानी मला धुडकावून लावले ..रमेशच्या नाईट ड्युटी चा तो शेवटचा दिवस होता ..दुसऱ्या दिवशी रविवार होता रमेश सुटीवर असणार होता रविवारी ..नंतर सोमवारी सकाळी त्याची मॉर्निंग ड्युटी होती ..म्हणजे सोमवारी तो सकाळी सातला ड्युटी वर येणार होता ..रमेश सोमवारी सकाळी आला की तो जेव्हा आल्यावर गिनती करण्यासाठी एकेका खोलीत जाईल त्यावेळी सर्वानी सावध राहून रमेश जेव्हा अगदी कोपऱ्यातल्या खोलीत जाईल तेव्हा त्याच्यावर एकाने मागून कांबळे टाकून त्याला बेदम मारायचे अशी योजना बनली ..हा प्लान बनविताना वार्डातील १३ पैकी ११ जण उपस्थित होते .दोन अल्कोहोलिक मित्र मात्र केव्हाच झोपून गेले होते ..' यहां अगर पेशंट बडी गडबड करते है तो ..खतरे का अलार्म दिया जाता है ..और सब अटेंडंट मदत केल लिये दौडते है ' अशी माझी माहिती मी त्यांना पुरविली ..या लोकांनी असे काही करू नये असे मला मनापासून वाटत होते ..यावर कोनाप्पा माझ्यावर चिडला ' तुम डरपोक हो ..अटेंडंट के चमचे हो ..तुमको अपने गर्द्दुल्ले भाईयो का साथ देना चाहिये वगैरे सुनावू लागला ' मी सगळे गुपचूप ऐकून घेतले ..ते सगळे इतके उन्मादात होते की त्यांना समजावून काही फायदा नव्हता ..शेवटी मी वैतागून म्हणालो ' आप लोगो को जो करना है करो ..मै आप लोगो का साथ नही दुंगा ' माझ्या हातात इतकेच होते . यांचा प्लान रमेशला सांगावा असेही माझ्या मनात येत होते ..पण तसे केले असते तर रमेशने पुन्हा काहीतरी नवीन भानगड करून यांना पेचात पकडले असते ..शिवाय .हे सगळे ऐक होते आणि मी एकटा पडलो होतो ..यांनी आयत्या वेळी मलाच खोटा ठरवला असता .. माझ्यापुढे देखील मोठा प्रश्न होता .. गर्दुल्ल्या साथीदारांची साथ द्यावी तर ते अन्यायकारक होते ..व रमेशची साथ द्यावी तर माझ्या गर्दुल्ल्या मित्रांचे नुकसान करण्यासारखे होते .. द्विधा मनस्थिती झाली होती..

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें