प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.comशनिवार, 16 मार्च 2013

एक अनुभव

 भाग ४१ वा नोकरी ..   एक अनुभव !मला नोकरी लागलीय हे समजल्यावर आई वडिलांना आणि भावाला देखील खूप आनंद झाला होता , आता सगळे सुरळीत होईल अशी आशा पल्लवीत झाली सर्वांची , मी देखील दोन दिवस सर्व मित्रांमध्ये आणि घरात , रुबाबात वावरत होतो , मी त्या वेळी बी .कॉम शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली होती , अर्थात परीक्षेत मी पास होणार नाही हे मला चांगलेच माहित होते आणि म्हणूनही कदाचित म्हणूनच मी नोकरीबाबत विचार केला असावा , असे आता वाटते आहे .दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या ८ दिवसांच्या प्रशिक्षणाची सर्व तयारी करून मी तयार होतो , कपडे , इतर आवश्यक चीजवस्तू आणि मुख्य म्हणजे माझा सुमारे दोन दिवसांचा ब्राऊन शुगर चा साठा सोबत होताच , आतापर्यंत दोन तीन वेळा टर्की सहन करण्याचा योग आल्याने त्या बाबत थोडीशी भीती कमी झाली होती व जवळ असलेली ब्राऊन शुगर संपल्यावर आपण बाहेरगावी असू त्या वेळी टर्की झाली तरी सहन करू व हे व्यसन कायमचे सुटून जाईल असेही माझ्या मनात होते ( व्यसनी व्यक्तीला त्याच्या व्यसनाबद्दल आतून अपराधीपणाची भावना असतेच व व्यसन सुटावे असे त्यालाही वाटत असते पण , सगळे काही आपोआप घडेल असे त्याला वाटत राहते किवा त्या बाबतीत त्याला अति आत्मविश्वास असतो की मी ठरवले की मला व्यसन सोडता येईल आणि म्हणूनच तो उपचारांना नकार देत राहतो ) .अकोल्याजवळ मलकापूर येथे आमची उंट बिडीची प्रचार करणारी गाडी जाणार होती आणि मग तिथेच मुक्काम करून ऐक आठवडाभर आसपासच्या गावात दिवसभर प्रचार करणे , तेथील विक्रेत्यांना तयार माल पुरवणे असे काम होते , मी प्रशिक्षणार्थी म्हणून गाडीसोबत जाणार होतो व त्या गाडीचे व्यवस्थापक , गाडीचे नेहमीचे प्रचारक , चालक आणि ऐक मदतनीस असे आम्ही एकूण पाच जण गाडीत होतो , गाडीच्या मागील बाजूस तयार उंट विड्यांची खोकी भरून ठेवलेली होती , गाडीवर वर दोन भोंगे लावलेले होते व गाडीत ऐक इम्प्लीफायर आणि माईक त्या त्या भोंग्यांना जोडलेले होते . आतील प्रचारक जेव्हा गावात शिरे तेव्हा काही बडबडगीते , उंट बिडीची जाहिरात करणारी घोष वाक्ये म्हणत असे व गाडीभोवती लोक गोळा झाले की मग लकी डूॉ घोषित करण्यात येई , म्हणजे गाडीभोवती जमलेल्या लोकांना माहिती सांगितली जाई की प्रत्येकी १ रुपयाला १ बिडी बंडल विकत घ्यावे व ते बंडल फोडून आत ज्या नंबरची चिठ्ठी निघेल ती वस्तू त्याला बक्षिश म्हणून मिळेल , लकी डूॉ साठी खास प्रकारची बिडी बंडल तयार करण्यात आली होती ज्यात १ ते ८ अश्या नंबरच्या चिठ्या टाकलेल्या असत व प्रत्येक नंबर साठी ऐक छोटीशी वस्तू बक्षिस म्हणून मिळत असे यात आठ नंबर ला सगळ्यात मोठे बक्षिश म्हणजे प्लास्टिक ची बादली असे ठेवलेले होते तर १ ते सात या नंबर साठी पुठ्याच्या आकर्षक टोप्या , कंगवा , प्लास्टिकची शिट्टी , बॉलपेन ,अश्या किरकोळ वस्तू होत्या गम्मत अशी की या विशेष बनवलेल्या बिडीबंडालामध्ये एकूण आठ नंबर च्या चिठ्या फक्त ५ होत्या , टोप्या , कंगवा , पेन अश्या किरकोळ वस्तूंच्या नंबरच्या चिठ्ठ्या मात्र भरपूर होत्या म्हणजे सर्व आठ दिवसांच्या दौऱ्यात आम्हाला जवळपास २००० विडी बंडल विकायचे होते गाडीभोवती जमलेल्या लोकांना व त्या बदल्यात ५ प्लास्टिक च्या बदल्या आणि इतर किरकोळ बक्षिशे वाटायची होती .या योजनेमागे कल्पना अशी होती की बक्षिसाच्या आशेने लोक बिडी बंडल विकत घेतील त्यांना जर तो ब्रांड आवडला तर बिडीचा खप वाढेल , सुंदर कल्पना होती ही विक्री वाढवण्यासाठी. लोकांच्या मानसिकतेचा चांगला अभ्यास असावा ही कल्पना ज्याच्या सुपीक डोक्यातून निघाली होती त्या व्यक्तीचा , लोक एकाद्या वस्तूवर दुसरी वस्तू फुकट किवा भेट म्हणून दिली की खूप खुश होतात मग त्या मूळ वस्तूची त्यांना गरज असो अथवा नसो किवा ती मूळ वस्तू महाग मिळाली तरी त्यांच्या ते लक्षात येत नाही कल्पना होती या योजनेमागे .मला प्रशिक्षण देणारे जुने प्रचारक इस्माईलभाई म्हणून ऐक मध्यम वयीन ग्रूहस्थ होते सरळ नाक , गोरेपान, उंच , मोठे स्वच्छ डोळे , आणि हसतमुख असे इस्माईल भाई मला प्रथमदर्शनीच आवडले , ते मितभाषी होते व या गाडीवर सुमारे १० वर्षांपासून ते नोकरी करत होते असे समजले , त्यांनी सर्वात आधी मला गाणी कोणकोणती येतात ते विचारले , मग आवडता गायक कोणता , शिक्षण किती , घरी कोण कोण अशी चौकशी केली व मग म्हणाले ' तुला घर सोडून असे बाहेर राहणे करमेल का ?' या वर मी त्यांना ' नोकरी म्हंटली की हे असे करावेच लागते' असे उत्तर दिल्यावर ते खुश झाले , या गाडीतील लोकांना मला कोणते व्यसन आहे हे मला कळू द्यायचे नव्हते म्हणून मी अगदी सभ्य मुलासारखा वागत होतो त्यांच्याशी . निघताना नाशिक शहरातून गाडी निघून आधी माझ्या घरी आली मला सोबत घेण्यासाठी आणि मग आम्ही मलकापूरच्या दिशेने कुच केले , जेव्हा ती बाहेरून आकर्षक रंग देऊन काढलेले उंटाचे चित्र , वर लावलेले भोंगे , असणारी गाडी आमच्या रेल्वे क्वार्टरच्या दारात आली तेव्हा आसपासच्या मुलांची गर्दी जमली होती , आई वडील त्यावेळी घरीच होते त्यांना तर माझे खूप कौतुक वाटत होते , आईने मला निघताना देवाला नमस्कार करायला सांगितला , मग देवाच्या आणि आई वडिलांच्या पाया पडून मी निघालो .( मी नोकरी करतोय म्हंटल्यावर मला घरून फारशी कटकट न होता पैसे मिळाले होते , माझा सकाळचा डोस मारून झाला होता अर्थात म्हणून मी चांगलाच फ्रेश होतो ) गाडीत बसताना मागे पहिले तर आईचे डोळे भरून आले होते आणि वडील नजरेनेच मला आशीर्वाद देत होते .========================================================================
भाग ४२ वा  सभ्यपणाचा अवघड बुरखा !एकदाची आमची गाडी मलकापूर कडे निघाली , वाटेत एकदोन वेळा चहा पाणी घेण्यासाठी थांबलो तेव्हा मी लघवीच्या निमित्ताने थोडे दूर जाऊन बिडी ओढत होतो . ( अगदी सुरवातीला मी जेव्हा ११ वी ता असतांना धुम्रपान सुरु केले होते तेव्हा आधी एकदम भारी भारी सिगरेट्स ओढत होतो , डनहिल , रोथमन्स , ५५५ , मोर छाप , अवंती चिरूट वगैरे सगळे प्रकार ओढत होतो , धुम्रपान हे व्यसन बनल्यावर मग विल्स , ब्रिस्टॉल . फोरस्क्वेअर , विल्सफ्लेक , वगैरे पुढे मग पिवळा हत्ती ,कुल , चारमिनार असा उतरता प्रवास करत शेवटी मी आर्थिक परिस्थितीमुळे गणेश बिडी , संभाजी बिडी यावर येऊन स्थिरावलो ) .अर्थात मी जरी दूर जाऊन लपून बिडी पीत असलो तरी बिडीचा उग्र वास काही लपत नाही म्हणून त्यामूळे मी बिडी ओढली की हळूच गुपचूप येऊन गाडीत बसत होतो , मनात सारखी धास्ती असे की गाडीतील कोणाला आपण बिडी ओढतो हे समजायला नको , सकाळी सकाळी ब्राऊन शुगर चा डोस भरपूर घेतल्यामुळे आता एकदम मलकापूर ला पोचल्यावरच रात्री पुन्हा ब्राऊन शुगर घ्यायची हे ठरवले होते . रात्री साधारणतः १२ वाजता आम्ही मलकापूर ला पोचलो , गाडीच्या व्यवस्थापकाने नेहमीच्या लॉजवर मुक्काम करण्यासाठी २ खोल्या बुक केल्या होत्या . सगळे सामान खोलीत नेल्यावर आधी मी लॉज च्या संडासात शिरलो आणि माझा चेसिंग चा कार्यक्रम सुरु केला . ( आधी ब्राऊन शुगर मी चीलीमित थोडी टाकून ओढत असे , मग सिगरेट मध्ये तंबाखू बरोबर मिसळून पीत होतो आणि नंतर जास्त नशा येते म्हणून चेसिंग सुरु केले होते , चेसिंग म्हणजे सिगरेट च्या पाकिटात जो बेगड किवा चांदीचा कागद येतो त्यावर ब्राऊन शुगर ची तपकिरी पावडर टाकून मग त्या ठिकाणी चांदीच्या खालून काड्यापेटी ची काडी पेटवून त्याला आंच द्यायची की मग त्या पावडरचे काळ्या रंगाच्या घट्ट पण प्रवाही अश्या द्रवात रुपांतर होते मग तो चांदीचा कागद ज्याला पन्नी म्हणतात तो हळू हळू वरखाली करत जायचे व त्या काळ्या द्रवातून जो धूर बाहेर पडतो तो तोंडात ठेवलेल्या कागदाच्या पुंगळीतून तोंडात ओढायचा , मग तो धूर तसाच छातीत भरून ठेवून वर ऐक बिडीचा झुरका मारून छातीतच दोन्ही धूर मिसळायचे आणि मग ते एकत्र बाहेर सोडायचे , खूप किचकट प्रकार होता पण त्याने लगेच नशा येत असे व नंतर सवयीने ही प्रक्रिया एकदम सोपी झाली होती ) झटपट चेसिंग करून मी परत रुमवर आलो आणि मग इस्माईल भाईशी गप्पा मारत झोपी गेलो .दुसऱ्या दिवशी पण सर्वांच्या आधी उठून मी चेसिंग केले आणि मग स्नान वगैरे उरकून आम्ही बाहेर पडलो , आम्हाला जेवण , नाश्ता वगैरे साठी रोज २५ रुपये इतका भत्ता मिळत असे हे पैसे रोज सकाळी व्यवस्थापक आमच्या हातात ठेवत असे मग त्यात आम्हाला जे हवे ते आम्ही खाऊ पिऊ शकत होतो . मी पहिले की ते सगळे लोक सकाळीच भरपूर नाश्ता करून घेत होते व मग रात्री एकदम जेवण करत होते , मी देखील तेच केले . मग आम्ही जवळच्या एका गावी पोचलो , जसे गाडीने गावाची वेस ओलांडली तसे इस्माईल भाईनी स्पीकर वरून बोलण्यास सुरवात केली ' आला आला आला , उंट आला , बक्षीस घेऊन आला , चला चला लवकर चला , बक्षीस घ्यायला चला , ' बोलताना ते एफ एम रेडीओ वर जसे रेडीओजॉकी बोलतात तसे आवाजात सुंदर चढ उतार करत होते , मध्येच ' जो वादा किया वो निभाना पडेगा, हेव इतर गाणी गुणगुणत होते स्पीकरवरून येणारे हे आवाज आणि आवाहन एकूण गाडी भोवती लहान मुले त्यांचे पालक अशी गर्दी जमत असे मग लगेच इस्माईल भाई ती बक्षिसाची योजना जाहीर करून १ रु . ला १ बिडी बंडल विक्रीला सुरवात करत जमलेले लोक बिडीबंडल घेतला की तो फोडून त्यातील चिठ्ठी काढून त्यातील नंबर सांगत आणि इस्माईल भाई त्यांच्या जवळ ठेवलेल्या वस्तूंमधून जो नंबर असेत ते बक्षिश त्या व्यक्तीला देत . खूप झुंबड उडत असे गाडीभोवती व या गर्दीत सर्वाना बरोबर गाडीच्या खिडकीतून बिडी बंडल विकणे , सुटे पैसे परत देणे , आणि बक्षिश देणे हे सगळे झटपट करावे लागत असे , इस्माईल भाई १० वर्षापासून हे काम करत असल्यामुळे ते अगदी सराईत पणे हे करत , त्यांनी मला आधीच सांगून ठेवले होते की मी त्यांच्या कडे पाहून हे सगळे शिकायचे आहे .त्या मुळे मी बारकाईने त्यांचे निरीक्षण करत होतो व त्यांना जमेल तशी मदतही करत होतो . पुढच्या गावात गेल्यावर त्यांनी माईक माझ्या हाती दिला व म्हणाले आता तू बोल स्पीकरवरून मी देखील लगेच सुरु केले ' आला आला आला , उंट आला .." वगैरे ते खुश झाले माझ्यावर .माझी ग्रहणशक्ती चांगली असल्याने मला ते काम शिकण्यास वेळ लागला नाही .दिवसभर आम्ही एकूण ५ गावे फिरलो , मध्ये एका मोठ्या गावात आम्ही चहा पाणी केले होते . दिवसभर मिळून एकूण २०० बंडल्स ची विक्री झाली होती अर्थात दिवसभरात कोणालाही बादली बक्षीस मिळाली नाही . रात्री परत लॉजवर आल्यावर मी आधी संडासात शिरलो चेसिंग करायला , परत आल्यावर इस्माईल भाईनी मला विचारले ' आपका पेट खराब हुंवा है क्या ? आप जैसे ही मौका मिलता है टॉयलेट जा रहे हो " मी त्यांना हो असे उत्तर दिले . मला या सगळ्या लोकांसमोर सभ्य मुलासारखे वागणे कठीण जात होते ,प्रत्येक वेळी बिडी ओढताना दूर जावे लागे तसेच चेसिंग च्या वेळी जास्त वेळ संडासात बसावे लागे ही कसरत अवघडच होती पण ते करणे भाग होते कारण माझ्या सोबत असलेल्या कोणालाही कसलेही व्यसन नव्हते आणि तो माझा प्रशिक्षणाचा कालावधी होता त्यामूळे माझ्याबद्दल सगळ्यांचे मत चांगले व्हावे असा माझा प्रयत्न होता .=======================================================================
 भाग ४३ वा  जखमा उरातल्या ...!मलकापूरला प्रशिक्षण दोन दिवस नीट झाले कारण माझ्याजवळ माझा ब्राऊन शुगर चा साठा होता , पण तिसऱ्या दिवशी मला टर्की सुरु झाली पण मी अंगावर सगळे त्रास सहन करत होतो दिवसभर , मात्र रात्री जास्त त्रास होऊ लागला मला उलट्या झाल्या ते पाहून सोबतचे काळजीत पडले , कदाचित बाहेरचे खाणे , पाणी सहन झाले नसावे असे त्यांना वाटले , इस्माईल भाईंजवळ डोकेदुखी , सर्दी , ताप वगैरेंच्या गोळ्या होत्या त्यांनी मला डोकेदुखीची गोळी दिली ,व आराम करण्यास सांगितले , अतिशय भयानक होती ती रात्र , माझ्या खोलीतील सगळे झोपले होते आणि मी बिछान्यावर तळमळत होतो , सारखे हात पाय गरम होत होते म्हणून मी बाथरूम मध्ये जाऊन हातपाय थंड पाण्याने धुवत होतो , मध्येच एकदम थंडी वाजे , मग कुडकुडत ब्लँकेट घेत होतो अंगावर , जुलाब आला की संडासला पळत होतो , केव्हा एकदा सकाळ होते असे झाले मला कारण आसपास काहीच जाग नसल्याने वेळ जाता जात नव्हता . इतर सर्व सुखाने झोपलेले पाहून अश्या वेळी त्या लोकांचा खूप हेवा वाटतो . स्वतची चीड येते , स्वतच्या असहाय पणा टोचत राहतो .सकाळ झाल्यावर त्रास सुरूच होता पण आसपासच्या लोकांशी बोलण्यात तो त्रास फारसा जाणवत नव्हता . त्या दिवशी इस्माईल भाईनी मला लॉजवरच आराम करण्यास सांगितले . सर्व निघून गेल्यावर मी कसातरी बाहेर पडलो आणि मलकापूर मध्ये ब्राऊन शुगर मिळते का याचा शोध घेऊ लागलो , पण तेथे फक्त गांजा आणि दारू मिळू शकत होती , शेवटी मी ऐक गांजाची पुडी घेतली आणि ऐक देशी ची निप घेऊन लॉजवर आलो , दारू पिऊन , गांजाची सिगरेट भरली आणि ओढत बसलो या नशेत सुमारे ३ तास बरे गेले , पुन्हा दारू उतरल्यावर जास्तच त्रास सुरु झाला , तसाच पडून राहिलो . पोटात काही नसल्याने खूप अशक्तपणा आला होता . असे दोन दिवस काढले , तिसऱ्या दिवशी मला थोडी हुशारी वाटली . पण आतल्याआत त्रास होतच होता .मलकापूरच्या आसपासची बहुतेक गावे करून होती म्हणून मग , खामगाव ला जाण्याचे ठरले तेथे उरलेले दोन दिवस राहून मग पुन्हा नाशिक ला जाणार होतो . खामगाव ला आमचे लॉज एका थेटर ला लागूनच होते म्हणजे अगदी इतके जवळ की थेटर मध्ये सुरु असलेल्या सिनेमातील संवाद आणि गाणी देखील आम्हाला ऐकू येतील , खामगाव ला संध्याकाळी लॉज वर आल्यावर आम्ही रूम वर बसलो होतो सुमारे रात्रीचे ९.३० झाले असावेत . माझा त्रास जरा कमी होता तरी मन अतिशय अवस्थ होते , बाजूच्या थेटर मध्ये सिनेमा सुरु झालेला होता , काही संवाद अर्धवट कानावर पडत होते व मग गाणे सुरु झाले ' मेरे नैना सावन भादों फिरभी मेरा मन प्यासा ' ' मेहेबुबा ' सिनेमा लागला होता बाजूला . ते गाणे सुरु झाले तसा मी अधिकच अवस्थ झालो , मन एकदम व्याकुळ झाले .. पाहता पाहता मन भूतकाळात जाऊन पोचले ..मी आठवीत होतो तेव्हा ..उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु होत्या .दिवसभर नुसती धमाल करायचो आम्ही मित्र ..क्रिकेट, सूरपारंब्या . चोर पोलीस , विष -अमृत , जोडीची शिवाशिवी , हत्तीची सोंड , कबड्डी कितीतरी मैदानी आणि बैठे खेळ खेळण्यात दिवस भुर्रकन संपत असे ..त्याकाळी शिवजयंती , डॉ . आंबेडकर जयंती वगैरे च्या वेळी सुमारे तीन चार दिवस कार्यक्रम असत आणि मुख्य कार्यक्रम म्हणजे रस्त्यावर दाखवला जाणारा सिनेमा हा असे . सिनेमा जरी उशिरा सुरु होत असे तरी रात्री ९ लाच आम्ही मित्र बसायला पोती वगैरे घेऊन सिनेमाच्या ठिकाणी जागा धरून बसत असू . रस्त्यावर मध्ये पांढरा पडदा टांगूला जाई , सुमारे २० फुट अंतरावरून प्रोजेक्टर वरून सिनेमा दाखवला जाई पडद्याच्या दोन्ही बाजूला लोक बसत , एका बाजूस स्त्रिया आणि दुसऱ्या बाजूला पुरुष अशी व्यवस्था असे , बहुधा तेच तेच सिनेमे दाखवले जात नेहमी . जय संतोषी मां , जंजीर , धर्मकन्या , गंगा जमुना , वगैरे , त्या वयात घरून थेटर मध्ये जाऊन सिनेमा पाहायला परवानगी मिळत नसे,म्हणून हे रस्त्यावारचे सिनेमे आम्ही सोडत नव्हतो , मध्ये रील तुटले की हल्ला गुल्ला होई , प्रोजेक्टर समोर हात नाचवले जात ..कोणीतरी गर्दीत बेडूक सोडे , मग पळापळ , पुन्हा आयोजकांचे शांततेचे आवाहन .. तर त्या दिवशी असाच शिवजयंती निमित्य ' गंगा जमुना ' सिनेमा दाखवला जात होता ..मध्येच रील तुटले आणि ते काही केल्या पुन्हा नीट जोडले जाईना , वारंवार रीळ तुटल्याने शेवटी आजचा सिनेमा रद्द असे जाहीर झाले , आमचा सर्वांचा विरस झाला . सिनेमाला माझे शाळेतील अनुराधा थेटर जवळ राहणारे काही मित्र देखील आले होते ..सिनेमा दाखवला जाणार नाही म्हंटल्यावर इतक्या लवकर आम्ही घरी जाणे शक्यच नव्हते , तेव्हा एका दिलीप नावाच्या माझ्या वर्गातील मुलाने म्हंटले चला आपण आमच्या घराजवळ जाऊ तेथे गप्पा ..गाणी म्हणत बसू . झाले आम्ही आठदहा जण सुभाष रोड वरून त्याच्या घराकडे निघालो . समोर ऐक मोठी दोन मजली इमारत मध्ये छोटी गल्ली आणि पलीकडील बैठ्या चाळीत दिलीप राहत असे , उन्हाळ्याचे दिवस असल्याने कोणीच लवकर झोपत नसत तर आम्ही त्या इमारतीच्या खाली पायऱ्यांवर बसून गाण्याच्या भेंड्या खेळू लागलो , आमचे आवाज वाढले होते त्यामूळे आसपासचे आणि इमारतीतील जागे असलेले लोक आमची गम्मत पाहत होते .मला लहान पणापासून गाण्याची आवड होती , व गळाही गोड होता त्यामूळे माझा आवाज लक्षवेधी होता . जरा वेळ भेंड्या खेळून झाल्यावर आता एकेकाला आम्ही गाणे म्हणण्याचा आग्रह करू लागलो , इमारतीच्या वर लावलेल्या ट्यूबलाईटच्या हलक्या प्रकाशात आम्ही सर्व बसलो होतो ..जेव्हा मला गाणे म्हणण्याचा आग्रह झाला तेव्हा आधी मी . केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा ' हे भक्तीगीत म्हंटले , गाणे संपल्याबरोबर सर्वानी टाळ्या वाजवल्या व मला हिंदी गाणे म्हणायचा आग्रह झाला आता इमारतीतील लोक देखील मुलांची ही गाण्याची मैफिल ऐकायला जमले होते , मी दुसरे गाणे त्यावेळी सगळीकडे गाजत असलेल्या ' महेबुबा ' सिनेमातील म्हणू लागलो ' मेरे नैना ..सावन भादो .." किशोर कुमार ने गायिलेल्या अनेक गीतांपैकी हे अतिशय सुंदर गाणे आहे . मी मग्न होऊन गाणे म्हणत होतो ..आवाज टिपेला पोचला होता. त्याच वेळी जाणवले की गर्दीतून कोणीतरी आपल्या कडे रोखून पाहत आहे जरी नीट चेहरा दिसला नाही तरी ती मुलगी सारखी आपल्याकडे पाहते आहे हे जाणवले ..ट्युबलाईट च्या अंधुक प्रकाशात देखील तिचे ते रोखून पाहणे मला स्पष्ट जाणवत होते ..=======================================================================

भाग ४४ वा  मनाचे रंग .. ओढ ..प्रेमभंग !मी अगदी टिपेच्या स्वरात ' मेरे नैना सावन भादों ' हे गाणे म्हणत होतो , आवाजही मस्त लागला होता माझा , गाण्याच्या बाबतीत माझा ऐक नेहमीचा अनुभव सांगतो , कदाचित प्रत्येक गायकाला हा अनुभव येत असावा , जेव्हा अगदी तल्लीन होऊन गाणे म्हंटले जाते , गाण्यातील शब्द , सूर व गळा हे जेव्हा एकरूप होतात तेव्हा गाणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर हलकेच रोमांच उभे राहते व ही खुण असते गाणे सुंदर होतेय याची , गायकाला स्वतःलाच जाणवते की गाणे मस्त म्हणतोय आपण ते, कदाचित श्रोत्यांना देखील अश्या वेळी एकाग्रतेने गाणे ऐकताना त्या गाण्यातील शब्दांशी एकरूपता साधली गेली की असेच होत असावे . . अगदी तसेच झाले होते माझे त्यावेळी . गाणे संपले सर्वानी टाळ्यांचा कडकडाट केला . अजून एकदोन गाणी म्हणण्याचा आग्रह झाला मला , नंतर मग तेथे जमलेल्या पैकी एका स्त्री ने मला माझे नाव वगैरे विचारले व सांगितले की मी तुझ्या आई वडिलांना ओळखते त्या स्त्री चे पती देखील रेल्वेत होते त्यांनी मला घरात बोलावले . ती रोखून पाहणारी मुलगी याच स्त्री ची होती , त्यांना एकूण तीन मुली त्यापैकी ही मधली इयत्ता सहावीत होती , मोठी माझ्याच वयाची आठवीत होती तर धाकटी पाचवीत . तिन्ही मुली दिसायला एकदम छान होत्या , माझ्या रोखून पाहणाऱ्या मुलीचे नाव सुमा होते . माझी त्या कुटुंबाशी ओळख झाली आणि त्यांनी मला परत दुसऱ्या दिवशी ये इकडे असे म्हंटले , मला ते आवडले, सुमा नाकेली ,उंच , गोरी , एका वेणीचा शेपटा घातलेली होती ती काही बालली नाही मात्र तिचे डोळे खूप काही सांगत होते . उन्हाळ्याच्या सुट्या सुरु असल्याने मग सतत त्यांच्याकडे जाऊ लागलो त्या तिन्ही मुलींशी चांगली मैत्री झाली माझी त्या भागातील माझा मित्र दिलीप होता त्याच्या तेथील मित्रांशी देखील ओळख झाली माझी , मग मी सर्व सुट्टीत खेळण्यासाठी त्या इमारतीत जाऊ लागलो , लपाछपी, जोडीची शिवाशिवी ,कँरम , पत्ते असे खेळ आम्ही खेळत असू आणि ऐक खेळ नेहमीचा झाला होता तो फक्त सुमाला न मलाच माहित होता नजरेचा खेळ , तसे आम्ही लहानच होतो पण सिनेमा वगैरे पाहून थोडाफार शहाणपणा आला होता या बाबतीत व जाणवत होते की सुमाला मी आवडतो व मलाही ती आवडत होती , ज्या ज्या खेळत दोन गट पाडावे लागत असत त्या खेळात ती नेहमी माझ्या बाजूने येत असे , मलाही सारखे तिच्याशी बोलावे , तिला हसवावे , असे वाटत होते . ऐरवी मी अंगावरच्या कपड्यानबाबत फारसा जागृत नसे पण आता मला नीटनेटके रहावेसे वाटू लागले .माझ्या आईकडे जेव्हा मी सुमाच्या कुटुंबां बद्दल उल्लेख केला तेव्हा आई म्हणाली की ' मी ओळखते त्या काकुना , क्वचित हळदीकुंकू वगैरे निमित्ताने आईची व त्यांची भेट होई , ती उन्हाळ्याची सुट्टी जरा लवकरच संपली माझी आणि शाळा सुरु झाली तेव्हा माझे सुमाच्या घरी जाणे जरा कमी झाले , मात्र शाळेत जाता येताना सुमा दिसत असे , तिची शाळा र . ज बिटको गर्ल्स हायस्कूल आमच्या पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल च्या समोरच होती . जेव्हा जेव्हा आमची नजरानजर होई तेव्हा आम्हाला एकमेकांकडे पाहतच रहावेसे वाटे वळणावर आल्यावर ती मागे वळून पाहतेय का हे बघण्याचा छंद लागला मला आणि तिलाही . मनात सारखी तिला बघण्याची ओढ वाटू लागली .. कदाचित हेच प्रेम असावे असे मी समजलो .. ती रस्त्यात कधी माझ्याशी बोलत नसे फक्त समोर आलो की ऐक जीवघेणे स्मित करीत असे , मात्र तिच्या घरी मी गेल्यावर खूप बोलत असे माझ्याशी .. पाहता पाहता दिवस संपत होते . रेल्वे क्वार्टर्स मधील माझ्या इतर अवांतर गोष्टी सुरूच होत्या ज्यात माझा आडदांड पणा , मस्ती , खोड्या , मारामाऱ्या वगैरे सुरूच होत्या , अव्यक्त अशी सुमाबद्दल असलेली ओढ काही केल्या मला प्रत्यक्ष तिच्याकडे व्यक्त करण्याची हिम्मत होत नव्हती व ती देखील फक्त नजरेनेच मला प्रतिसाद देत होती , बाहेर मित्रांमध्ये कोणालाही न घाबरणारा , आक्रमक , अश्या प्रवृत्तीचा मी असलो तरी सुमा समोर आली की मी एकदम मऊ होत असे , पाहता पाहता मी दहावी पास होऊन अकरावीला गेलो , व माझे सिनेमा बघण्याचे वेड वाढले त्या बद्दल मी मागील एका भागात लिहिलेच आहे . अकरावीला मी सिगरेट देखील ओढू लागलो होतो . चक्क नापास झालो .एकदा तर गम्मतच झाली , मी अनुराधा थेटर ला मित्राबरोबर सिनेमा पाहायला गेलो होतो व मध्यंतरात बाहेर थेटर च्या कंपाऊंड पाशी उभा राहून सिगरेट ओढत होतो , सुमाचा क्लास हून घरी जाण्याचा रस्ता थेटर समोरूनच जात होता .मी दूर रस्त्यावर ती घरी येताना दिसते का ते पाहत होतो , मी सिगरेट तोंडात घेऊन झुरका मारणे आणि त्याच वेळी समोरून येणाऱ्या सुमाला मी दिसणे ही एकच वेळ आली तोंडातील सिगरेट घाई घाई ने बाजूला करेपर्यंत व्हायचे ते झालेच होते .तेव्हापासून बिनसायला सुरवात झाली ... सुमाला मी नेमकी काय चीज आहे ते समजले होते आणि त्याकाळी असे सिगरेट ओढणे वगैरे आजच्या सारखे लोकमान्य झालेले नव्हते . सुमाचे वडील चेनस्मोकर होते व कदाचित तिला सिगरेट चा तिटकारा असावा..त्या दिवसापासून तिचे वागणे जरा बदलले तिच्या घरी गेल्यावर ती माझ्याशी फारशी बोलेनाशी झाली ..मी देखील मुर्खासारखा सिगरेट पिणे सोडून देण्याएवजी इतरही व्यसनात अडकत गेलो आणि वर सुमाचे असे तुटक वागणे ऐक व्यथा बनवून त्यात बुडत गेलो . पुढे सुमा बिटको कॉलेज ला आली तेव्हा देखील ती अनेक सूचक शब्दांनी मला सगळे धंदे सोडून शहाण्या मुलासारखे वागावे हे सांगत गेली पण तो पर्यंत माझी केस हाताबाहेर गेली होती . तिच्या वर्गातील ऐक मित्र आम्ही गांजा , ब्राऊन शुगर वगैरे ओढतो या बातम्या तिच्या पर्यंत पोचवत असावा बहुतेक त्यामूळे सगळेच फिस्कटत गेले . एकदाच ती मी जेव्हा ब्राऊन शुगर मध्ये अडकलो तेव्हा मला म्हणाली कशाला हे सगळे करतोस ? चांगले नाही . त्यावर मी उद्यापासून बंद करतो असे म्हणालो ..मात्र स्वतःशी प्रामाणिक नसल्याने मला ते पाळता आले नाही . सुमा माझ्या साठी ऐक वेदना बनून राहिली दोष माझाच होता तरीही मी काही व्यसनातून योग्य वेळी बाहेर पडू शकलो नाही आणि वर प्रेमभंग झाला म्हणून अधिकच हळवा होत गेलो .'मेहबुबा ' सिनेमातील ' मेरे नैना ' या बाजूच्या थेटर मधून ऐकू येणाऱ्या गाण्याने माझ्या सुमा बद्दल च्या सर्व स्मृती उफाळून आल्या खूप अवस्थ झालो , कसेही करून एकदा तरी सुमाला डोळे भरून पहावेसे वाटू लागले ताबडतोब मागचा पुढचा विचार न करता माझी तब्येत खूप बिघडल्याचे सांगितले आमच्या टीम च्या मँनेजर ला आणि मी घरी परत जातो असे सांगून रात्री ११ वा ,खामगाव स्टेशनवर आलो तेथून नासिक कडे जाणारी रेल्वे सुमारे ३ तास लेट होती म्हणून मग मनमाड पर्यंत जाणाऱ्या गाडीने मनमाड ला पोचलो , तेथून बसने नाशिक गाठले , आधी अड्ड्यावर जाऊन ब्राऊन शुगर घेतली , आणि संडासात असून ब्राऊन शुगर पीत चेसिंग करत माझे दुखः कुरवाळत बसलो नंतर कॉलेज ला गेलो सुमाला एकदा डोळेभरून पाहायला .( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें