प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.comशनिवार, 23 मार्च 2013

गर्दुल्यांचे विश्व - एक झलक


भाग ११६ वा  गर्दुल्यांचे विश्व ! 

मुंबईत ब्राऊन शुगर ज्या ठिकाणी इतर ठिकाणच्या तुलनेत स्वस्त मिळते तेथे आपोआपच बाकीच्या ठिकाणचे गर्दुल्ले जमा होतात .. त्यापैकी काही जण माल घेऊन परत जातात ..तर काही जण ज्यांनी नशेसाठी घरदार सोडलेय किवा ज्या ना सुरवातीपासूनच घर दार नाहीय असे गर्दुल्ले अड्ड्याच्या आसपासच कोठेतरी स्वतच्या राहण्याची जमेल ती व्यवस्था करून घेतात ..अश्या भणंग गर्दुल्ल्यांना पोलीस बहुधा काही मोठा गुन्हा केल्याशिवाय हात लावत नाहीत ..याचे पहिले कारण असे की त्यांच्या अवतार खूप भयानक असे .. महिनोंमहिने अंघोळ नाही .. कुपोषणा मुळे तब्येत खंगलेली ..क्षयरोग असल्याची लक्षणे .. आणि जीवाची पर्वा नसणे .. ताब्यात घेतल्यावर यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर त्या बिचाऱ्या पोलिसाची नोकरी जाण्याची भीती .. हे लोक किरकोळ चोऱ्या करणे ....रस्त्यावरील प्लास्टिक ..पुठ्ठे .. भंगार वगैरे जवळच्या एका पोत्यात गोळा करत दिवसभर फिरत असत ..मग सायंकाळी ते भंगार विकून अड्ड्यावर येवून तळ ठोकत ..दुसरा एक वर्ग पाकीटमारांचा होता ..घरदार असलेले मात्र व्यसनापायी चोऱ्या .पाकीटमारी करणारे .. त्यांची बहुधा दोन तीन जणांची टोळी असे .. दिवसभर लोकल्स मधून फिरून .सावज हेरून त्याचा खिसा साफ करण्यात यांचा हातखंडा असे .. पकडले गेले तर मार खाण्याची देखील तयारी असे या लोकांची ..काहीवेळा तर अश्या पकडलेल्या पाकीटमारास लोकलच्या गर्दीला ..मुंबईच्या धावपळीच्या ..महागाईच्या ..संसाराच्या त्रासाने वैतागलेले लोक चक्क धावत्या लोकल मधून बाहेर फेकून देत ..जर नशीब बलवत्तर असेल तर जीव वाचेल ..अन्यथा कायमचे अपंगत्व आहेच नशिबी ..तिसरा वर्ग मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय घरातील गर्दुल्ल्यांचा होता ..जे माझ्यासारखे घरातून चोऱ्या करत ..घरून खोटेनाटे सांगून पैसे मिळवत .. व संधी मिळेल तशी नातलग ..आणि आसपास देखील हात साफ करणारे ..यांचे कपडे झकपक असत ..घरातून खाणे चांगले असल्याने तब्येत फारशी ढासळलेली नसे मात्र मन पूर्णतः बिघडलेले काही महिन्यांनी हे लोक देखील रस्त्यावर येत ..त्या काळात मुंबईच्या गटारांची सर्व लोखंडी झाकणे गर्दुल्ल्यानी गायब करून भंगारात विकली होती त्यानंतर मग अशी झाकणे बहुधा सिमेंटची बनवली गेली . मुंबईत किरकोळ चोऱ्या वाढण्याचे कारण हे गर्दुल्लेच होते .

घरी छान गादीवर झोपायची सवय होती ..त्यामूळे नुसत्या वर्तमान पत्रावर मला झोप येणे शक्यच नव्हते .. शिवाय जवळ माल होताच अधूनमधून उठून चेसिंग करत होतो ..पहाटेच स्टेशनचे रेल्वे पोलीस दुरून राउंड ला येताना दिसले तसा शेजारी झोपलेल्या पार्टनरला उठवले ..त्याला असे बेवारस जीवनाची सवय झालेली होती त्या मुळे छान झोपला होता तो .. त्याला सांगितले की पोलीस येत आहेत तर म्हणाला " डरो मत कुच नाही करेंगे वो ..उनको मै हप्ते का ५० रुपया देता हुं यहां सोने का ..तुम दस रुपये निकालो जेबसे " म्हणजे या भणंग गर्दुल्ल्यांकडून देखील हप्ता घेणारी माणसे होती तर ...ते पोलीस जवळ आले तसे आम्ही दोघेही अदबीने उठून उभे राहिलो .." साब ..मेरा दुरका रिश्तेदार है ये ..' पप्पू ' नाम है , दो दिन के लिये मुंबई घुमने आया है " असे त्याने पोलिसांना माझ्या बाबत सांगितले याने माझे नवीन नाव ठेवले होते ' पप्पू ' .. पोलिसांनी एकदा मला नीट खालवर निरखून पहिले ..मग माझ्या हातातील दहा रुपयांची नोट घेतली आणि " कुछ गडबड नाही करनेका यहां " असा दम देवून पुढे गेले माझ्या सोबत असलेल्या पार्टनरचे नाव सुरेश होते ..तो कल्याण चा राहणारा होता ..माझ्यासारखेच त्याने एक वर्षापूर्वी घर सोडले होते ..आणि आता तो सराईत फुटपाथ वासी झालेला होता .. माझ्या जवळ अजून ३० पुड्या शिल्लक होत्या ..काल दुपारपासून मी एकूण २० पुड्या संपविल्या होत्या .. आम्ही सार्वजनिक नळावर तोंड धुवायला गेलो ..शबनम पिशवीतून ब्रश आणि पेस्ट काढली तसा सुरेश खूप मोठ्याने हसला ..म्हणाला ' ये नाटक कुछ दिन चलेगा तेरा बादमे ..दात मांजना बंद कर देगा तू ..तो मोठ्याने हसताना प्रथमच माझे लक्ष त्याच्या दाताकडे गेले ..काळसर पिवळे दात होते त्याचे ... म्हणजे माझेही दात असे होणार की काय या कल्पनेने अंगावर काटा आला .. त्याने देखील तळहात पुढे पसरला " ला थोडी पेस्ट मेरेको भी दे ..बहोत दिन हुवे इसका टेस्ट लेकर " त्याच्या हातावर थोडी पेस्ट दिली ..तोंड धुवून दोघांनी चहा घेतला .. त्याच्या जवळच्या गाठोड्यात एक प्लास्टिक ची पाण्याची बाटली होती ती त्याने नळावर भरून घेतली ..मी रेल्वे स्टेशन वरील सार्वजनिक संडासात जातो असे म्हणालो तर माझ्याकडे वेडा आहेस की काय अश्या मुद्रेने पहात म्हणाला "रोज उसको दो रुपये देने पडते है ..उससे अच्छा तो भारत सरकार का रेल्वे लाईन है " रेल्वे लाईनच्या कडेने ने थोडे दूर चालत गेलो ..आसपास अनेक लोक खाली तोंडे करून विधी उरकताना दिसले .. आम्हीही जरा अंतर राखून बसलो .

सुरेश जवळ काहीच पैसे शिल्लक नव्हते .. त्याला चहा पाव खावू घातला आणि परत अड्ड्यावर आलो .. सकाळचे ७ वाजून गेलेले होते .. अड्ड्याच्या कडेच्या रेल्वे लाईन च्या बाजूला कालसारखेच दृश्य होते .. गर्दुल्ले अंगावर पोते घेवून भक्तीभावाने ..एकाग्रतेने चेसिंग करत बसलेले ..त्यांच्या बाजूला आम्ही देखील तळ ठोकला .. मी सोबत असल्याने आज सुरेशला भंगार गोळा करायला जाण्याची गरज नव्हती त्याचा पिण्याचा बंदोबस्त माझ्याकडे होता ..साधारण अर्ध्या तासाने मला दुरून पुन्हा पोलीस येताना दिसले ..हे रेल्वे पोलीस नव्हते ..महाराष्ट्र पोलीस होते .. मी पुन्हा घाबरलो ..नीचे गर्दन करके पिते रहो ..उनके तरफ देखो मत असा सल्ला सुरेशने दिला तरीही मला राहवेना मी त्यांच्याकडे सावधपणे पहात होतो ..माझ्या लक्षात आले की माझ्या डोक्यावरील टोपी कडे त्यांचा लक्ष गेले होते .. शिवाय माझ्या अंगावरचे कपडे अजून भणंग गर्दुल्ल्या सारखे झालेले नव्हते .. नक्कीच हा या एरियात नवखा आहे हे त्यांनी ओळखले असणार ..मी त्यांच्या कडे बघत असतानाच त्यातील एकाची माझी नजरानजर झाली .. मी ओळखले हे लोक मला नक्की हटकणार ..मी पटकन उठून उभा राहिलो .. तसे तो माझ्याशी नजरानजर झालेला पोलीस दंडा उगारून माझ्या कडे धावत येवू लागला .. मी सावध होतोच पटकन धूम ठोकली ..त्याने मागून मला फेकून मारलेला दंडुका माझ्या पायावर लागला तसा खाली पडलो पण ..पुन्हा उठून पळालो थेट बाजूला असलेल्या गटारातून घाण तुडवत पलीकडे रस्त्यावर पोचलो ...चपला गटारातच गेल्या होत्या ..आता तेथे परत जाणे धोक्याचे होते ..तसाच चालत राहिलो खूप लांबचा फेरा मारून चुना भट्टी रेल्वे स्टेशनवर आलो आणि पुन्हा व्ही .टी . कडे निघालो .

====================================================================

भाग ११७ वा  मुम्बईची झलक !

जवळ आता २० पुड्या शिल्लक होत्या आणि खिश्यात फक्त २५ रुपये राहिले होते .. चुनाभट्टीहून पळून येवून पुन्हा व्ही. टी. ला आलो .. अगदी कोपऱ्यातल्या फलाटावर पुढे काही तरी तोडणे ..बांधण्याचे काम सुरु होते ..बहुतेक त्या बाजूने नवीन प्रवेशद्वार आणि वेगळा प्लातफॉर्म वाढविण्याचे काम असावे .. तेथेच पार्सल ऑफिस च्या बाजूला बसलेल्या गर्दुल्ल्यांमध्ये मिसळलो .. संपूर्ण दिवसभर तेथेच चेसिंग करण्यात घालविला .. उद्यापासून काहीतरी कम शोधू मुंबईत असे ठरवले होते .. बांधकाम चालू असल्याने अनेक रोजंदारीचे कामगार तेथेच बाजूलाच एक पाल उभे करून त्यात राहणारे होते तसेच ..अनेक गर्दुल्ले देखील कायमचे तेथे पोत्याचा आडोसा करून रहात असलेले आढळले ..एका ठिकाणी तर एक मुलगी आणि बहुधा तिचा नवरा होता सोबत ..दोघांचेही कपडे मळके ..फाटके ..एकत्र चेसिंग करत बसले होते ..म्हणजे नवरा बायको दोघेही ब्राऊन शुगरचे व्यसनी होते दोघांचे वय जेमतेम २० वर्षे असावे .... रात्री स्टेशन समोर थोडे चालत जाऊन ' झुणका भाकर ' खावून आलो .. आता खिश्यात फक्त १० रुपये होते आणि जेमतेम ५ पुड्या .. एका दोन्ही पाय अपघातात गेलेल्या गर्दुल्ल्या भिकाऱ्या जवळच वर्तमान पत्र पसरून झोपेची आराधना करू लागलो..

मला घर सोडून आता दोन दिवस होत आले होते ..जवळचे पैसे संपल्यातच जमा होते ..दिवसभर अंगाला पाणी लागले नव्हते त्यामूळे कसेतरीच वाटत होते ..अंगावरचे कपडे बऱ्यापैकी मळले होते ..कोठे तरी काम शोधायला हवे होते म्हणजे माझा जेवणाचा .. मुख्य नशेचा प्रश्न सुटला असता ..पण माझ्या सारख्या घर सोडलेल्या व्यक्तीला एखादे प्रतिष्ठीत काम मिळणे शक्यच नव्हते ..हॉटेल मध्ये वेटरचे काम मिळू शकले असते फार तर .. मग राहण्याची आणि जेवण्याची देखील व्यवस्था झाली असती ..झोप येईना म्हणून उठून स्टेशन वर फिरू लागलो ..प्रवेशद्वाराजवळ सारखी लोकांची ये जा सुरु होती ..सारख्या भरधाव धावणाऱ्या लोकल्स कुठून कुठून येत होत्या .. तसेच दूर पल्याच्या प्रवासी गाड्या ..इतकी माणसे कुठे जात येत असतात सारखी .. ती सगळी माणसे कोणत्यातरी ओढीने घाईघाईत निघाली होती ..किती सुखी आहेत ही माणसे असे विचार मनात येवू लागले ..या सगळ्यांना थकून भागून परतायला एक घर आहे ..घरात गेल्यावर स्वागत करणारी मायेची माणसे आहेत ..आणि आपण सगळे सोडून इथे रस्त्यावर आलोत .. कॉलेजला असतांना नाशिक रोड ला दुर्गाबागेत बसून रात्री उशिरापर्यंत गांजा ओढत बसल्यावर आमच्यातील कोणी ..उशीर झाला चला आता घरी जाऊयात ..असे म्हंटले की मला त्याचा खूप राग येत असे ..असे वाटे . बंधन नसावे आपल्याला ..घर ..वेळ ..माणसे ..कोणतेच बंधन नको ..त्यावेळी नाशिक रोड स्टेशनवरून घरी परत येताना प्लँटफार्म वर झोपलेली भिकारी ..अनाथ..माणसे पाहून त्यांचा हेवा वाटे ..यांना कोणतेच बंधन नाही ..कोणतेही सामाजिक ..कौटुंबिक नियम नाहीत ..उगाच सभ्य माणसाप्रमाणे वागण्याची देखील गरज नाही ..जे आहे ते सगळे उघडे वास्तव ..बहुधा माझ्या त्या वेळच्या विचारांना आता मूर्त स्वरूप आले होते ..मला देखील कोणाचे बंधन राहिले नव्हते ..घरी लवकर ये सांगणारे नव्हते ..जेवला का ... इतका वेळ कुठे होता ..तब्येत बरी नाही का .. असे प्रश्न नव्हते .. पण पण ..एक प्रचंड असुरक्षितता मनात भरून राहिलेली होती .. पूर्वी घराचे बंधन वाटणाऱ्या मला आता इतर लोक त्यांच्या घरी जाताना पाहून भरून येत होते .. गम्मतच असते मनाची !

जोरजोराने शिवीगाळ एकून मागच्या बाजूला पहिले तर ...तेथे दोन स्त्रिया एकमेकींच्या झिंज्या धरून भांडत होत्या .दोघींच्या चेहऱ्यावर भडक मेकअप होता ..ओठ रंगवलेले ..मध्यमवयीन .. अगदी स्त्री ला शोभणार नाहीत अश्या घाणेरड्या शिव्या देणे सूरु होते ..खूप बघे जमले होते पण कोणीही सोडवत नव्हते त्यांचे भांडण ..उलट त्या भांडणाचा आनंद घेत होते लोक ..त्या दोन्ही बहुधा शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया होत्या ..आणि त्यांचे कोणत्या तरी आर्थिक व्यवहारावरून भांडण जुंपले होते..एकमेकींना खाली पाडून वस्त्रांचे भान न ठेवता त्यांची मारामारी सुरु होती .. मला का कोण जाणे अण्णाभाऊ साठेंच्या ' चिरागनगरची भुते ' या पुस्तकाची आठवण झाली .. शेवटी दोन पोलिसांनी येवून त्यांचे भांडण सोडवले .. परत येवून वर्तमानपत्रावर अंग टाकले .. मध्यरात्र होऊन गेली होती तरीही तुरळक वर्दळ सुरूच होती आजूबाजूला ..उद्या सकाळी उठून आधी काम शोधायला जावे लागणार होते ..त्यासाठी चांगली झोप घेणे आवश्यक होते पण इतकी नशा करूनही झोप वैरी झालेली .. डोळे सताड उघडे होते ..अनघा कशी असेल ..कदाचित आपण आता चांगले रहात आहोत या भ्रमात ती भविष्याची स्वप्ने पहात गाढ झोपली असेल ..तिच्या मांडीवर डोके ठेवून ' टर्की ' काढल्याची आठवण झाली ...आता कधीच तिची भेट होऊ शकणार नाही .. याची जाणीव मनात खोल खड्डा पाडत होती ..परत जावे का घरी .. पण ..आपले पुन्हा पुन्हा घसरणे थांबेल का ..उठून पुन्हा पन्नी काढली आणि चेसिंग सुरु केले !

====================================================================

भाग ११८ वा  मोरीवाला ... !

रात्री २ ते ४ अशी थंडावलेली माणसांची वर्दळ पुन्हा सुरु झाली ..मी रात्रभर जागाच होतो .. तोंड धुवून आधी दोन पुड्या पन्नीवर टाकल्या जरा तरतरी आली आता जवळ फक्त दोन पुड्या शिल्लक होत्या ..आणि पाच रुपये ... चहा घेतला आणि स्टेशन बाहेर येवून तसाच वाट फुटेल तसा चालत राहिलो .. उजाडले होते .. पुन्हा तशीच घाईघाईने कामावर निघालेली माणसे ..छानकपडे घातलेली ..अंगावर स्प्रे वगैरे मारलेली .. त्यांच्या नोकरी ..घर या बांधिलकीत सुखी असणारी .. ही बांधिलकी जरी नाईलाजाने स्वीकारली असली तरी त्यात रमणारी .. आणि स्वातंत्र्याचा अट्टाहास ठेवणारा मी ..अवस्थ ...असमाधानी ..दुखः चघळत बसणारा ...मी एखादे हॉटेल शोधत होतो जेथे मला नोकरी मिळू शकेल ..एकदोन ठिकाणी चौकशी केली ..माझ्याकडे संशयास्पद नजरेने पहात गल्ल्यावरील माणसांनी काहीही न बोलता फक्त नकारार्थी मान हलविली ..एकाने खूप चौकशी केली आणि शेवटी ..' कुछ लफडा करके यहां मुंबई आया होगा ' असा निष्कर्ष काढत बोळवण केली ..शेवटी एका साध्या निम्नवर्गीय लोकांसाठी असावे असे वाटणाऱ्या हॉटेलात मालकाने २० रुपये रोज मिलेंगे ..खाना मिलेगा .. रहेनेके लिये भी जगह मिलेगी ..१२ घंटे काम करना पडेगा ..रोज का पगार रोज श्याम को मिलेगा ..अश्या शर्तीवर मला कामावर घेतले ..मोरीत काम करावे लागेल असे सांगितले ..चहा ..नाश्ता ...शाकहारी ..मांसाहारी जेवण असे सर्व प्रकार या हॉटेलात उपलब्ध होते .. गल्ल्यावर ऐक उग्र चेहऱ्याचा माणूस होता बहुधा दक्षिण भारतीय असावा .. त्याला सगळे दिपुसेठ म्हणत होते ..माझ्या जवळील शबनम पिशवी त्याने त्याच्या बाजूला गल्ल्यावर ठेवून घेतली .. मला आत मोरीत पाठवले ..किचनच्या बाजूलाच ऐक छोटीशी अंधारी जागा होती .. बाहेरून जेमतेम उजेड आत येत होता ..बाजूला एक पिंप पाण्याने भरलेले .. एका प्लास्टिकच्या टबात साबणाचे काळपट रंगाचे पाणी होते .. बाहेरच्या बाजूने हॉटेलच्या दर्शनी भागाकडे एक छोटासा चौकोन उघडा होता त्यातून वेटर खरकट्या ताटल्या ..कपबश्या ..ग्लास वगैरे आत माझ्याकडे देई ..त्या टबात त्या सगळ्या वस्तू टाकून मला त्या विसळून नंतर पाण्याने भरलेल्या पिंपात स्वच्छ करून पुन्हा बाहेर द्यावा लागत .. आत आजूबाजूला सर्वत्र खरकटे पसरले होते त्यातच उभा राहून हे काम सुरु केले ..एकदोन वेळा त्या खरकट्या वासाने ..आसपासच्या कुबट हवेने ..मळमळल्या सारखे झाले ..पण काम सुरु ठेवले सकाळी आठची वेळ असल्याने चहा आणि नाश्ता जोरात चालू होता .. उपमा ..बटाटावडा .. समोसा ..शिरा ..अश्या खरकट्या ताटल्या पटापट वेटर आत सरकवत होता .. सारखे उभे राहायचे ..पुन्हा खाली वाकून प्लेट्स विसळायच्या पुन्हा उभे राहून त्या धुतलेल्या प्लेट्स परत द्यायच्या .. असे काम अव्याहत सुरु झाले .. दहा वाजता थोडा वेळ काम थंडावले ..मी पटकन खाली बसून माचीस मधून पन्नी काढून तीनचार दम लावले .. मग निवांत बिडी पीत उभा राहिलो ..तसे किचन च्या आतल्या बाजूच्या माणसाने चहा बनविण्याचे मोठे भांडे ..आणि इतर दोन मोठी खरकटी भांडी दिली .. !

दुपारी दोन वाजता .. मालकाने जेवायला आवाज दिला .. बाहेर आलो ..बाहेरचा हॉल आता जरा रिकामा होता ..एका प्लेट मध्ये भात आणि त्यावर लाल रस्सा टाकून मला वेटर ने जेवण दिले .. आतल्या वासाने भूक मेल्यातच जमा होती ..कसेबसे तीनचार घास खाल्ले .. माझे सगळे लक्ष घडाळ्याकडे होते ..केव्हा एकदा सायंकाळचे आठ वाजतात आणि सुटी होते याची वाट पहात होतो ..दुपारी सगळ्या जेवणाच्या प्लेट्स आणि स्वयंपाकाची भांडी साफ करून झाली ..कांद्याच्या अर्धवट खाल्लेल्या फोडी ..लिंबाच्या फोडी ..मांसाहारी प्लेट्स मधील टाकावू जिन्नस .. सगळा राडा झाला होता मोरीत .. मग खराटा घेऊन मोरी स्वच्छ करायला सांगितले गेले .. मी शर्ट काढून ठेवला होता बाजूला आणि पँट गुडघ्यापर्यंत दुमडून घेतली होती ..तरीही कपड्यांवर लालसर पिवळट डाग पडलेच ..सायंकाळी बरोबर आठ वाजता एक पोरगेलासा काळा मुलगा मोरीत आला ..माझी जागा घ्यायला ...मी शर्ट घालून बाहेर आलो .. गल्ल्यावर आता बहुतेक मालकाचा तरुण मुलगा बसला होता .. त्याने त्याच्या जवळील वही उघडून पहिली माझे नाव वाचले मी तेथे खोटे नाव सांगितले होते ..त्याने माझ्या हातावर वीस रुपये ठेवले ..म्हणाला घुमफिरकर रातको १२ बजेसे पहेले आजाना सोने के लिये ..मी नुसतीच होकारार्थी मान डोलावून माझी पिशवी घेवून सटकलो .. सरळ रेल्वे स्टेशनवर कालच्याच जागी येवून बसलो .. आधी राहिलेली एक पुडी मारली .. सगळे अंग आतून कसकसत होते ..पायाच्या पोटऱ्या दुखत होत्या ..कंबर सारखे वाकून ..उभे राहून ठणकत होती .. गेल्या दोनतीन दिवसात खूप ब्राऊन शुगर प्यायल्याने एका पुडीने माझे काम भागणे शक्यच नव्हते .. पुन्हा चुना भट्टी ला जावे असं विचार मनात आला ..पण आता अंगात कुठे जाण्याची शक्ती राहिलेली नव्हती .. थोडासा ताप जाणवत होते ... शेजारी तो दोन्ही पाय गेलेला गर्दुल्ला मस्त चेसिंग करत बसला होता .. त्याच्या जवळ भरपूर माल होता ..दिवसभर लोकल्स मध्ये फिरून ..भीक मागून त्याला बऱ्यापैकी कमाई होत होती म्हणजे किमान रोज १०० रुपये तरी मिळवत होता तो ..आपण अपंग असतो तर बरे झाले असते असे क्षणभर वाटले .. भीक तरी मागता आली असती .

त्याचे नाव कासम होते असे त्याने सांगितले ..मस्जिदबंदर ला राहणारा होता ..घरी आई आणि भावंडे होती .. ब्राऊन शुगर चे व्यसन लागल्यावर हा पाकीटमारी करू लागला आणि एकदा पब्लिकने पकडल्यावर याला धावत्या लोकल मधून बाहेर फेकला होता तेव्हा दोन्ही पाय गेले त्याचे ..काही महिने सरकारी इस्पितळात राहून... येथे मुक्काम ठोकला होता त्याने ..अधूनमधून घरी जाई व आईला थोडेफार पैसे देई ..त्याला दोन्ही पाय गमावल्याचे फारसे दुखः नव्हते ..कारण त्याला आता भरपूर भीक मिळत होती ..भरपूर ब्राऊन शुगर पिता येत होती ..भरपूर व्यसन करायला मिळणे आणि ते देखील कोणतीही अडचण न येता हे प्रत्येक व्यसनीचे व्यसन करण्याच्या काळातील स्वप्न असते ..ते स्वप्न पूर्ण झाले होते कासमचे ..माझी माहिती घेतल्यावर तो एकदम भावूक झाल्यासारखा वाटला ..मला म्हणाला " तू तो अच्छे घरका लागता है ..यहां पर रहेगा तो बरबाद हो जायेगा ... अबी हमारी जिंदगी इसी दोजख मे कट जायेगी .. जितना जल्दी हो सके अपने घर चला जा " माझ्याजवळचे वीस रुपये घेवून त्याने मला तीन पुड्या पुड्या दिल्या ..म्हणाला " मै अपने पास का माल किसीको देता नही ...लेकिन तेरी हालत देखकर दे रहा हुं .. " उद्या सकाळसाठी ऐक पुडी ठेवून बाकी माल संपवत बसलो .. आता परत हॉटेल वर झोपायला जाण्याचा कंटाळा आला होता .. तेथेच स्टेशनवर झोपण्याचा प्रयत्न करू लागलो .. !

====================================================================

भाग ११९ वा  कशासाठी..नशेसाठी !

बहुधा मला ताप होता ..त्याच गुंगीत जरा डोळा लागला असेल ..पहाटे पहाटे कोणीतरी मला काठीने टोचले आणि डोळे उघडले ..पहिले तर माझ्या बाजूला तीनचार रेल्वे पोलीस उभे होते .. त्यांच्या रात्रीच्या तीन वाजताच्या राउंड मध्ये त्यांना मी संशयास्पद वाटलो होतो म्हणून मला हटकत होते ..आधी मला तिकीट विचारले ..कुठे जायचेय ..कुठून आला वगैरे प्रश्न होते .. मी सांगितले की नाशिकहून आलोय .. ..येथे मुंबईला नोकरी शोधण्यासाठी आलोय ..घरची खूप गरिबी आहे ..वगैरे ..मग माझी झडती घेतली गेली ..चेसर ..पन्नी ..ब्राऊन शुगरची ऐक पुडी असे ..मी ब्राऊन शुगर च व्यसनी असल्याचे पुष्टी देणारे साग्रसंगीत पुरावे सापडले .. माझ्या बाजूला झोपलेल्या कासमला ते ओळखत होते .. कासमला देखील उठवले गेले ..त्याला माझ्या बद्दल विचारले ..त्याने फक्त त्याची माझी फक्त दोन दिवसांची ओळख आहे हे सांगितले ..मात्र अच्छे घरका लडका है ..नशे के लिये घर छोडना पडा बेचारेको अशी माझी बाजूही घेतली .. त्या पोलिसांपैकी पैकी एक जण मुळचा नाशिकचा राहणारा होता ..त्याने नाशिक ला कुठे राहतोस वगैरे दोन तीन प्रश्न विचारले ..शेवटी ..मी गुन्हेगार नाही याची खात्री झाल्यावर मला सोडून ..ते दुसऱ्या सावजाच्या शोधात पुढे निघून गेले ... कासम ने माझी बाजू घेतल्याबद्दल मी त्याचे आभार मानले तर म्हणाला .. " साले ये रेल्वे की सुरक्षा कम करते है ..और खुद का पेट जादा भरते है ..मेरेको भी इनको हप्ता देना पडता है ..यहां सोनेका .. अबी तुम और चार पाच दिन यहां रुकोगे तो तुमसे भी पैसे मांगंगे ...वो भी क्या करेंगे ..बाल बच्चेवाले लोग है ..सरकार का पगार पुरा नही पडता .. मग विषण्ण हसत म्हणाला ..खाकी टोपी वालेसे जादा खतरनाक वो सफेद टोपी वाले लोग है " कासम चे तत्वज्ञान ऐकून त्या ही अवस्थेत मला हसू आले ..आता परत झोप लागणे शक्यच नव्हते ..जवळचे सर्व पैसे संपले होते ..कासम ने मग मला दोघांच्या चहा चे पैसे देवून ..स्टॉल वर चहा आणायला पाठवले .

सकाळचे पाच वाजत आलेले होते ..चहा ने जरा तरतरी आल्यावर मग उरलेली शेवटची पुडी संपवली .. अंगात थोडा ताप होता त्यामूळे झोपूनच रहावे असे वाटत होते ..पण . गर्दी वाढल्यावर फलाटावर झोपता येणे शक्यच नव्हते ..शिवाय झोपून राहिलो तर मग नशेचे काय ? नशेसाठी पैसे कोठून येणार ? पुन्हा त्या हॉटेलात जाण्याचे अगदी जीवावरच आले होते .. दुसरे कोणते तरी काम करावे असे विचार मनात येवू लागले .. मागे रेल्वे स्टेशन च्या विस्तारीकरणाचे काम सुरु होते ..तेथे अनेक मजूर ठेकेदाराकडे काम करत होते ..त्या ठेकेदाराशी बोलणे करून जर एखादे लिखापढी चे काम मिळाले तर बरे झाले असते .. सात वाजेपर्यंत मग उगाचच इकडे तिकडे टाईम पास करत भटकत राहिलो .. गर्दी वाढली होती ..एक जण चालता चालता मध्येच थांबून मागच्या खिश्यातील पाकीट काढून त्यातले पैसे मोजताना दिसला ..वाटले याच्यावर झडप घालून पैसे घेऊन पळून जावे ..एक क्षण थबकलो ..आजूबाजूला पहिले तर माणसे घाईत जात होती कोणाचेही लक्ष नव्हते त्या माणसाकडे .. हिम्मत झाली नाही .. वाटले जर नीट धावता आले नाही तर उगाच पकडले जाऊ ..मार खाण्याची भीती नव्हती ..पण जर पोलिसात दिले असते तर मग ' टर्की ' काढावी लागली असती चौकीत ..शिवाय केस झाली असती ती वेगळीच .. त्या व्यक्ती कडे दुर्लक्ष केले .. आता पैसे कसे मिळतील हा विचार मनात जोर धरत होता . आयते पैसे हवे होते ..खूप खूप ..अर्थात काहीतरी डेरिंग केल्याखेरीज आयते पैसे मिळणे सोपे नव्हतेच ..रस्त्याच्या कडेला विमनस्क उभा होतो .. काल जे अनेक गर्दुल्ले रेल्वे स्टेशन वर दिसले होते ..त्या पैकी एक जण समोरून येताना दिसला ..त्याच्या एका हातात एक मोठे रिकामे गोणपाट होते ते त्याने पाठीवर धरले होते .कळकट अवतार ..अंगावर मळाची पुटे चढलेली ..पायात तश्याच जुनाट स्लीपर ..काल त्यानेही मला स्टेशन वर बसून ब्राऊन शुगर पिताना पहिले होते ..तो जवळ आला तसा त्याच्याकडे पाहून हसलो ..त्याला विचारले .. "कितना पैसा मिलता है ये काम मे ? " कबी कबी पाचसो बी मिलते है तकदीर रहेगा तो ..लेकिन पचास रुपये तो मिल ही जाते है रोज के " ..क्यू ?.. तू बी करेगा क्या ये काम ? त्याच्या पुढच्या प्रश्नाला नुसती होकारार्थी मान हलविली ...काल दिवसभर भांडी विसळून घाणेरड्या मोरीत काम केल्याचे फक्त वीस रुपये मिळाले होते इथे पन्नास मिळणार होते .. जेवणाची पर्वा होतीच कोणाला ..त्याने थांबून त्याच्या हातातील गोणीत हात घालून आतून दुसरी एक गोणी काढली ..माझ्या हातात देत म्हणाला .." चल ..लेकिन सब बेचने के लिये मेरे साथ चलना पडेगा भंगार वाले के पास " ..म्हणजे मी जे काही कचरापट्टी गोळा करणार होतो ते विशिष्ट भंगारवाल्या कडे मी विकावे असे त्याचे म्हणणे होते ..बहुतेक ..त्याला त्या भंगारवाल्या कडून कमिशन मिळणार असेल ..येथेही कमिशन चालते तर ..त्याचे नाव भोला आहे असे त्याने सांगितले ..हा फक्त नावाचाच भोला वाटला 

मी त्याच्या सोबत हातात गोणी घेवून चालू लागलो ..तो पटापट खाली वाकून वर्तमानपत्राचे कागद .. पुठ्याची रिकामी खोकी .. रस्त्यावर पडलेला खिळा..गंजलेली तार .. प्लास्टिक च्या पिशव्या असे उचलून गोणीत टाकत होता ..मलाही हे उचल ते उचल असे मार्गदर्शन करत होता ..एरवी आपण कचरा म्हणून फेकून देत असलेल्या कितीतरी वस्तू आता माझ्या दृष्टीने मौल्यवान ठरत होत्या .. चालता चालता तो मला विशेष सूचना देखील देत होता ..लोखंड का माल उठाते समय .जरा आजुबाजू झाडी करना ..किसीने टोका तो डरनेका नही ... चालता चालता आम्ही एका सोसायटी जवळ आलो ..त्याने सूचना दिलीकिसीका ध्यान नही ऐसा देखकर बाल्कनी मे सुखने साडी ..शर्ट ..पँट भी अंदर कर दे .. हे ऐकून मी घाबरलो ..तो सराईतपणे वाकत फिरत होता ..त्याची नजर अतिशय बेरकी होती आजूबाजूला पहात पटकन एखादी चोरी देखील करत होता ..एका एका इमारतीजवळ आल्यावर तेथील वरच्या मजल्यावर उभ्या असणाऱ्या एका माणसाने भोला ला हटकले .." ऐ.. क्या है .. ..साला तू ही उस दिन नीचेसे बच्चे की सायकल लेकर भागा था ना ? " भोला सहजपणे म्हणाला " क्या साब कुछ भी बोलते है ... हम गरीब है ..लेकिन चोर नही .. पापी पेट के लिये ये कचरे का काम करना पडता है ...भोलाने हे बोलताना चेहरा इतका दयनीय केला होता की आता पटकन रडेल असेच वाटेल कुणाला .. तो माणूस जरा गोंधळाला .." साले सगळे सारखेच दिसतात '' असे पुटपुटला अपराधीपणे..भोला निर्भय पणे त्याच्या नजरेला नजर देत म्हणाला " गरीब को सब सताते है साब .. बडे बडे चोर उधर दिल्ली मे बैठे है ..उनको बोलनेकी हिम्मत नही करता कोई " तो माणूस हळूच आत निघून गेला ...तो गेल्यावर भोला मला म्हणाला " इसके बच्चे की सायकल उठाया था मैने आठ दिन पहेले ..साले ने उपर से देखा ..चिल्लाया तो मै भाग गया सायकल लेकर ..आज बराबर पहेचाना था उसने ..लेकिन डरनेका नही ..कैसे मै उसकेही गल्ले पड गया ..आदमीको कोन्फिडेन्स होना चाहिये " भोलाच्या तोंडून " कॉन्फीडन्स " शब्द ऐकून मस्त वाटले ..वा ..चोरी करण्याचा .. कबुल न करण्याचा ..उलट्या बोंबा मारण्याचा ..शिरजोर होण्याच्या.. कॉन्फीडन्स वरच भोलाचे जगणे अवलंबून होते ..याच कॉन्फीडन्स वर भ्रष्टाचारी गब्बर होते होते .. निवडून येत होते ...मघा कासम आणि आता भोलाच्याही बोलण्यातून एक जाणवले की राजकीय मंडळींवर यांचा खूप राग आहे ..हे फारसे शिकलेले नव्हते तरी ..सगळ्या देशाची वाट लावणारे खरे राजकारणी लोकच आहेत हे मात्र त्यांना बरोबर समजले होते .

====================================================================

भाग १२० वा  जिवंत प्रेते ..!

त्या सोसायटीत भोलाचे जवळ जवळ अर्धे पोते भरले ..सोसायटीच्या मागील बाजूस घरातून फेकल्या गेलेल्या काच-याचा ढीग चिवडत भोला बिनधास्त खाली मांडी घालून बसला होता .. मला एकदम तसे बसायची लाज वाटली म्हणून थोडा दूर उभा राहून आजूबाजूला पहात होतो .. आता डोक्यावर उन आले होते .. सकाळच्या पुडीचा परिणाम कमी होऊन मला ' टर्की ' सुरु झाली होती ...टर्की ची सर्वात पहिली खुण म्हणजे जांभया येणे ..मग शिंका ..नाकातून पाणी गळणे ..अंगदुखी ..आणि प्रचंड तडफड ..एव्हाना कच-याचा ढीग चिवडून समाधान झालेला भोला माझ्या जवळ आला ..मला जांभई आलेली पाहून काय ते समजला .. " सबेरे कब माल पिया था ? ..तेरेको तकलीफ शुरू हो गई ना ? " मी कसेनुसे तोंड करून होकारार्थी मन हलविली ..चल अड्डे पर जाते है ..असे म्हणत त्याने मला त्याच्या मागे येण्याची खुण केली .. एका फ्लायओव्हर वरून आम्ही मध्ये असलेल्या जिन्यावरून खाली उतरलो ..मस्जिद बंदरला आलो होतो ...खूप ट्रक्स उभ्या होत्या आजूबाजूला .. समोर एक झोपडपट्टी होती ..तेथे कोंडाळे करून अनेक गर्दुल्ले मजेत माल पीत बसले होते .. सगळे बहुधा कचरा वेचणारे ..कळकट ..खंगलेले ...मृत्यूची वाट पहात जगणारे ..त्यांच्या बाजूलाच एक जण भूईसपाट झालेला होता ..साला बेवडा है ..भोला त्याच्याकडे पहात म्हणाला ...भोलाने स्वतच्या कळकट कपड्यात कुठेतरी लपवलेल्या दोन पुड्या काढल्या .." अबी तेरेको पिलाता हुं ..लेकिन बादमे ..मेरेको भी पिलाना पडेगा .." असे म्हणत त्या कोंडाळ्यातच खाली बसला ..मी देखील बाजूला उकिडवा बसलो ..सर्वजण पिण्यात इतके मग्न होते की त्यांनी आमची काहीच दखल घेतली नाही .. दोन तीन दम मारल्यावर मला जरा हुशारी आली .. पलीकडे रेल्वे लाईन होती ..तेथून लोकल्स धडाडत जात होत्या .. त्या कोंडाळ्यातील एक जण बहुधा तिशीचा असावा .. खूप नशेत होता ..बसल्या बसल्या तो दोन वेळा कलंडला .. त्याच्यावर एक जण ओरडला " साले कितनी बार बोला ..माल के साथ मे गोलिया मत खाते जा ..." म्हणजे त्या माणसाने ब्राऊन शुगर सोबत नशेच्या गोळ्या देखील खाल्ल्या होत्या तर .. अनेक जण जास्त नशा येण्यासाठी असे करतात हे मी ऐकून होतो ..ब्राऊन शुगर ला जास्त पैसे लागतात म्हणून आधी नायट्रावेट ..वेलीयम टेन ..वगैरे गोळ्या खायच्या आणि मग टर्की होऊ नये म्हणून थोडी ब्राऊन शुगर प्यायची ..खूप जास्त नशा येते त्यामूळे ...मात्र गोळ्या खावून मेंदू पूर्णतः बधीर होऊन जातो .. स्थळ काळाचे भान हरपते ..' मै जाता हुं ..'असे तोंडातल्या तोंडात पुटपुटत तो खूप नशेत असलेला माणूस उठला आणि पलीकडे असलेल्या रेल्वे लाईन कडे जाऊ लागला ..बहुधा त्याला रेल्वे लाईन पार करून जायचे होते .

तो इतका नशेत होता की चालताना दोन वेळा धडपडला ..हा कसा पलीकडे जाणार असा विचार माझ्या मनात आला त्याला किमान चार टूँक पार करावे लागणार होते ....भोलाला मी तसे म्हंटले ..तर भोला सहजपणे म्हणाला .."मरने दे सालेको ..तू तेरा देख " भोलाच्या कोरडेपणाचे मला नवल वाटले तो माणूस आता रेल्वे लाईन वर पोचला होता तितक्यात पलीकडून लोकलचा भोंगा वाजला ...माझे त्याचाच कडे लक्ष होते ..न राहवून मी अरे ..अरे असे ओरडलो ..तसे सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले ..समोरून लोकल येत होती ..हा सुमारे पन्नास फुटांवर अगदी ताठ उभा राहून त्याच्या दिशेने येणाऱ्या लोकल कडे पहात होता ..पुढे काय घडणार हे लक्षात येवून सगळे त्याला बाजूला हो असे ओरडून सांगू लागले ...तो मात्र ठार बहिरा झाला होता जणू ...डोळे विस्फारून मंत्रमुग्ध झाल्यासारखा ... समोरून येणाऱ्या लोकलच्या धुडाकडेच पहात राहिला ..मध्येच डोळे बारीक करत निरखून पहिल्यासारखे करत खाली वाकला ...जणू समोरून लोकल ऐवजी कोणी लहान मुलगाच त्याच्याकडे धावत येत आहे असे भाव होते त्याच्या चेहऱ्यावर ...एका क्षणात तो दिसेनासा झाला ...धाड.धाड करत लोकल पुढे गेली ..आम्ही सगळे पाहतच राहिलो ..अगदी सहजपणे तो मृत्यूला सामोरा गेला होता ..मी हळहळत होतो ते पाहून भोला म्हणाला " इसके पहेले दो बार बचा है ये ..इस बार हो गया काम भारी " माझ्या मते त्याने आत्महत्या केली होती ..तसे मी भोलाला म्हणून दाखवले तर भोला म्हणाला " अरे ये गोलीका नशा ऐसाही पागलपन करवाता है ...उसको समझाही नही होगा की सामनेसे गाडी आ रहा है ...कोई दुसरी चीज समझ रहा था ..छूट गया " कदाचित भोला म्हंटला तसेही असावे ..नशेच्या गोळ्या खावून अनेकप्रकारचे भास होत असतात माणसाला त्यातच त्या माणसाने जीव गमावला होता ..अर्थात तो सुटला होता एकप्रकारे नशेच्या विळख्यातून कायमचा ..आम्ही मात्र अजूनही त्याच दलदलीत जिवंत प्रेते बनून जगत होतो ..

पुन्हा संध्याकाळ पर्यंत भोलाच्या मागेमागे पाठीवर गोणी टाकून फिरू लागलो ..आता आम्ही रेल्वे लाईनच्या बाजूने कचरा गोळा करत जात होतो ..चहाचे प्लास्टिकचे कप ..कोल्ड्रिंक्स च्या रिकाम्या बाटल्या वगैरे सापडत होते ...दारूच्या रिकाम्या बाटल्या देखील सापडल्या ...अचानक माझे लक्ष गेले एका लोखंडी रॉड कडे गेले ..दोन डब्यांना जोडणाऱ्या कपलिंग्जचा दांडा होता तो ..भोलाचे लक्ष जाण्याआधीच मी पटकन तो सुमारे पाच किलो वजनाचा रोड उचलून पोत्यात घातला ..भोलाने पहिलेच ते ..हसला मोठ्याने ' हा ..अबी तू अच्छा हुशार हो गया ये काम में '.असे म्हणत माझ्या पाठीवर थाप मारली त्याने ...पुन्हा काहीबाही उचलत चालत राहिलो पाठीवरचे ओझे वाढत होते ..कसे कोण जाणे मला आशा भोसलेंचे ''जिवलगा ..राहिले रे ..दूर घर माझे ..पाऊल थकले ..माथ्यावरचे जड झाले ओझे ' हे गाणे आठवले ..कदाचित पाठीवरच्या ओझ्यावरून आठवले असावे ...मग ते गाणेच मनातल्या मनात गुणगुणत पुढे जात राहिलो ...गाव मागचा ..मागे पडला ..पायतळी ...पथ ..तिमिरी बुडला ..ही घटकेची सुटे सराई ....मिटले दरवाजे .....!अनघा आता काय करत असेल असा विचार मनात आला ..ती देवळात आरतीची तयारी करत असावी .. कदाचित रामरक्षा म्हणत असेल ..माझ्यासाठी... .मनाने मी अकोल्याला पोचलो होतो ... चल आ गया सलीमभाई का दुकान या भोलाच्या उद्गारांनी भानावर आलो .. !( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें