प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.comरविवार, 17 मार्च 2013

व्यसन आणि मायेचे पाश

भाग ४५ वा नोकरीला रामराम ..स्वतचा व्यवसाय !प्रशिक्षण अर्धवट सोडून आलो होतो तरी देखील इस्माईल भाई यांनी व आमच्या टीम च्या लोकांनी माझा चांगला अहवाल दिल्याने नंतर २ दिवस आराम केल्यानंतर माझी नेमणूक स्वतंत्र गाडीवर ' प्रचारक ' म्हणन झाली . म्हणजे आता एका नव्या गाडीवर मी इस्माईल भाईंची प्रचारक पदाची भूमिका निभावणार होतो . आम्हाला नगर , कोपरगाव हा भाग दिला गेला एकंदर १० दिवसांच्या दौऱ्यासाठी . तेथे ही पहिले चार दिवस जवळ ब्राऊन शुगर चा साठा होता म्हणून चांगले गेले व नंतर जवळचा माल संपल्यानंतर माझी टर्की सुरु झाली , आता प्रशिक्षण नसल्यामुळे तसा मी सभ्यपणाचा बुरखा काढून टाकला होता व बिनदिक्कत सर्वांसमोर बिडी सिगरेट ओढत होतो , त्या टीम चे मँनेजर रोज रात्री थोडी दारू पिणारे होते , मी देखील त्यांच्या सोबत दारू पिऊ लागलो , कोपरगाव बस स्टँड पासून जवळच मी ऐक गांजाचा अड्डा देखील शोधून काढला होता , मग रोज यथेच्छ दारू गांजा पिणे सुरु झाले , गांजा दारू पीत होतो तरी मूळ गर्द ची मजा काही येत नव्हती तसेच दारू प्यायल्यानंतर मी अधिक आक्रमक होत असे , म्हणजे मारामारी शिवीगाळ असे प्रसंग घडत असत माझ्याकडून दारू प्यायल्यानंतर ( दारू तसे पहिले तर शास्त्रीय भाषेत ऐक 'डिप्रेसंट ' आहे , म्हणजे शरीर मन यांना अधिक शिथिल करणारे रसायन . पण दारूचे सेवन केल्यानंतर निरनिराळ्या प्रकारे लोक वागतात ऐक वर्ग असा आहे की दारू पिऊन एकदम शांत बसतात , कोणाशीही काहीच बोलत नाहीत , दुसऱ्या प्रकारच्या लोकांना दारू प्यायली की प्रचंड बडबड सुचते ते सारखे तेच तेच बोलत राहतात आणि अगदी आसपासच्या लोकांना जीव नकोसा करतात , तिसरा वर्ग जरा हिंसक असतो तिसऱ्या वर्गातील लोक हे दारू प्यायले की त्यांना जुन्या अपमानाच्या घटना , प्रसंग आठवतात , एकंदरीत मनाविरुध्द गोष्टींबद्दल मनात खदखदत असलेला त्यांचा संताप बाहेर पडू पाहतो अश्या वेळी ते भांडणे उकरून काढतात , शिविगाळ करतात , मारामारी करतात , भले मार खातात पण तरीही मुजोरी करत राहतात . चौथा वर्ग आहे ते लोक दारू प्यायले की त्यांना एकदम भावनिक चढउतार दाखवतात मध्येच दुखा:ने रडणे, प्रेमाचे भरते आल्यासारखे जवळच्या लोकांना मिठ्या मारणे , पाया पडणे अशी नाटके करतात ) मी या पैकी २ आणि ३ या प्रकारात होतो , त्या मुळे दारू प्यायलो आणि आसपास कोणी असले की मी प्रचंड बडबड करत असे किवा जर कोणाशी काही वाद झाला तर एकदम मारामारी करत असे . एकदा याच भरात मी नाशिकरोड स्टेशन जवळ मित्रांमध्येच वाद झाला म्हणून एका मित्रावर जवळ बसलेल्या चप्पला चपला शिवून देणाऱ्या व्यक्तीची आरी उगारली होती , नशीब इतर मित्रांनी मला पकडले म्हणून माझ्या हातून काही भयंकर घडले नव्हते . कोपरगाव येथे कसे तरी १० दिवस मी पूर्ण केले आणि येतांनाच मनाशी ठरवले की ही नोकरी सोडून द्यायची आणि स्वतचा काहीतरी धंदा सुरु करायचा ( बहुधा सर्व व्यसनी लोकांना स्वतचा व्यवसाय करायला जास्त आवडते याचे प्रमुख कारण असे की त्यांना नोकरीत असलेली वेळेची , मालकाची किवा वरिष्ठांची गुलामी किवा बांधिलकी आवडत नसते , स्वतच्या मर्जीने त्यांना जगायचे असते , कोणतही बंधन नको असते , शिवाय धंदा म्हणजे रोज पैसे हातात खुळखुळत असतात , नोकरीत महिन्यातून एकदाच पगार मिळतो ) , नाशिक ला आल्यावर मी घरात कटकट सुरु केली की मी नोकरी करणार नाही , जेवणाचे हाल होतात , माझी तब्येत बिघडते वगैरे आणि सरळ राजीनामा देवून झाल्या १५ दिवसांचा पगार घेऊन घरी आलो तो पगार मला मजा करायला ४ दिवस पुरला , वडिलांची सेवानिवृत्ती आता जवळ आली होती म्हणून त्यानाही मी ते सेवानिवृत्त होण्याच्या आत कुठेतरी सेटल व्हावे असे वाटत होते , त्यांनी मला रेल्वेतच नोकरी करण्याचा प्रस्ताव दिला म्हणजे आधी टेम्पररी खलाशी म्हणून भरती व्हायचे आणि मग रेल्वेच्या परीक्षा देवून कायमचे रेल्वेत सामील व्हायचे , पण हा प्रस्ताव मी नाकारला मी आणि खलाशी म्हणजे चक्क स्वतचा अपमान समजत होतो मला एकदम मोठा अधिकारी व्हायचे होते किवा स्वतचा धंदा सुरु करायचा होता , आता वाटतेय की त्यावेळी वडिलांचा प्रस्ताव स्वीकारला असता तर बरे झाले असते माझ्या सोबतच्या एका मित्राने आधी खलाशी म्हणून नोकरी केली आणि नंतर रेल्वेच्या परीक्षा देवून आता तो मस्त रेल्वेत तिकीट तपासनीस म्हणून सेटल झालाय चांगला . घरातील लोकांपुढे मला तुम्ही ऑटोरिक्षा घेऊन द्या म्हणून मागे लागलो , वडील फारसे विरोधात नव्हते मात्र मोठ्या भावाने ऑटोरिक्षाच्या योजनेला सख्त विरोध केला , त्याला माझी मित्र मंडळी आणि माझा स्वभाव चांगला माहित होता हा ऑटो घेणार म्हणजे व्यवसाय कमी आणि मित्रांबरोबर फालतुगीरीच जास्त करणार , शिवाय काही गुन्हेगारी कृत्ये देखील करू शकतो हे त्याला ठावूक होते मग मी दुसरा प्रस्ताव ठेवला की मी 'पानपट्टी ' सुरु करतो , नाशिकरोड रेल्वे स्टेशन समोर माझ्या अब्दुल नावाच्या मित्राचे ऐक पान सिगरेट चे ' संघर्ष ' पण भांडार नावाचे दुकान होते ( अजूनही ते दुकान आहे बहुतेक तेथे आता अब्दुल चा मुलगा बसतो ) या दुकानात मी नेहमी टाईम पास म्हणून अब्दुल ला मदत करीत असे , अब्दुल चरसी होता त्यामूळे आमचे चांगले जमत होते , तर मला वेगवेगळी पाने लावणे वगैरे जमत होते म्हणून मी पानपट्टी चा प्रस्ताव ठेवला तो प्रस्ताव ऐकून वडीलाना धक्काच बसला . तरी तेखील ते कसे तरी तयार झाले , भावाला हे देखील मंजूर नव्हते पण त्यातल्या त्यात हा एका जागी बसून राहील असा व्यवसाय म्हणून त्याने मान्यता दिली .

पानटपरी टाकण्यासाठी आधी जागा आवश्यक होती , मी सिन्नर फाटा शिवसेना शाखेचा सेक्रेटरी असल्यामुळे जागेची अडचण आली नाही , सिन्नर फाट्याला भाजीबाजार सुरु होतो तेथून ते रेल्वे स्टेशन ओलांडून पलीकडे नाशिकरोड शहरात जाण्यासाठी ऐक छोटा पादचारी पूल आहे त्या पुलाच्या सिन्नर फाटा भागाच्या पायथ्याशी मी जागा निवडली , बिंधास त्याजागेवर अतिक्रमण करायचे ठरवले तशी ती जागा म्युनिसिपाल्टी ची होती त्यामूळे फारशी अडचण येणार नव्हती , वडिलांनी मग लाकडी टपरी वगैरे बनवण्यासाठी मला परवानगी दिली आणि पैसेही .. त्यातील काही पैसे नशेत आणि काही पैसे कामात असे लावून ऐक ५ बाय ५ ची साधारण १० फुट उंचीची लाकडी टपरी बनवली त्या टपरीत ऐक वरचा भाग आणि मध्ये पार्टीशन टाकून खाली रिकामा भाग असे ठेवले , म्हणजे जेव्हा दुकानात कोणी नसेल तेव्हा मला खालच्या रिकाम्या भागात माझे धंदे करता येणार होते . वडिलांनी एकंदरीत १० हजार रुपये खर्च केले पानटपरी साठी . १५ ऑगस्ट १९८७ या दिवशी माझ्या पानटपरी चे उद्घाटन त्यावेळचे नाशिकरोड चे शिवसेना अध्यक्ष श्री . प्रभाकर कर्डिले यांच्या हस्ते झाले , त्या दिवशी सिन्नर फाटा दलित पँथर शाखेने कोणत्यातरी कारणावरून १५ ऑगस्ट हा दिवस ' काळा दिवस ' म्हणून साजरा करायचे ठरवले होते त्या मुळे माझे काही मित्र शर्टाला काळ्या पट्ट्या लावून होते ते देखील पानटपरी ज्या जागी बनवली त्या जागेवरून उचलून सिन्नर फाटा येथे आणण्याकरिता मदत करण्यासाठी हजर होते .दलित पँथर , शिवसेना , बहुजन युवा संघटना , आणि मराठा महासंघ या सर्व संघटनांचे माझे मित्र उद्घाटनासाठी उपस्थित होते पानटपरी चे नाव ' एकता ' पान भांडार असे ठेवले होते मी व तशी पाटी देखील रंगवून वर लावली होती . उद्घाटन आल्यावर लगेच ऐक तासभरातच मी दुकान बंद करून मित्रांना पार्टी दिली .

=======================================================================

भाग ४६ वा 
पानटपरी चे भविष्य ???

मोठ्या थाटात ' पानटपरी ' चे उद्घाटन झाले तरी त्या पान टपरी चे भविष्य मात्र अंधारातच होते कारण व्यसनी व्यक्ती जो पर्यंत व्यसन पूर्ण बंद करत नाही तो पर्यंत तो कोणतेही काम धड , नेटाने करू शकत नाही हे देखील तितकेच खरे आहे , अनेक व्यसनी मित्रांना त्यांचे पालक त्या व्यसनीने मार्गी लागावे या हेतूने व्यवसाय सुरु करून देतात , किवा ओळखीने एखादी नोकरी लावून देतात पण् तो लवकरच सगळ्याचे ' पानिपत ' करतो . उद्घाटनाच्या आदल्या दिवशी रात्री मी व माझा ऐक मित्र रात्री त्या टपरीत ब्राऊन शुगर ओढत बसलो असतांना , उद्या सकाळी लावायचा म्हणून आणलेला मोठा आरसा जो बाजूला ठेवला होता त्याला माझ्या मित्राचा धक्का लागून तो तडकला होता , उद्घाटनाच्या आदल्या दिवशीच असा आरसा तडकलेला पाहून माझ्या मनात पाल चुकचुकलीच होती की या पानटपरी चे भविष्य काही नीट नाही अशी .( मी अंधश्रद्धा वादी नाही तरी , काही घटना पुढे होणाऱ्या बरबादीचे संकेत असू शकतात हे त्या वेळी मानत होतो ) . थाटामाटात उद्घाटन करून तासाभरातच माझ्या गांजाडी , गर्दुल्ल्या आणि दारुड्या मित्रांना मी पार्टी दिली . व सायंकाळी दुकान उघडलेच नाही कारण दुपारीच भरपूर नशा करून मी झोपी गेलो होतो .दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी पानटपरी उघडली व माझा व्यवसाय सुरु झाला , अब्दुल भाई कडे सगळे शिकलेलाच होतो त्यानुसार साधी , बनारसी , आणि बांगला अश्या तीन प्रकारची पाने ठेवली होती मी दुकानात .पानटपरी च्या व्यवसायात सिगरेट , बिडी च्या विक्री पेक्षा पान , मावा ( म्हणजे सुपारी आणि सुगंधी तंबाखू ( ज्यांचे ब्रांड नंबर आहेत १२० , ३०० वगैरे ) यांचे किवाम लावून व्यवस्थित एकत्रित केलेले मिश्रण ज्याला विदर्भात खर्रा असे म्हणतात , अश्या वस्तूंच्या विक्रीत जास्त नफा असतो , जवळ जवळ ५००० हजार रुपयांचा माल मी दुकानात भरला होता . टपरी मस्त भरलेली दिसत होती मात्र तेवढा तो तडकलेला आरसा जरा विसंगत वाटत असे मी त्या तडकलेल्या भागावर ऐक चिकट पट्टी लावली होती . 

आता सकाळ संध्याकाळ माझ्याकडे रोख रक्कम जमा होत होती शिवाय मी घरच्यांना आधीच सांगून ठेवले होते की जे विक्रीचे जे पैसे येतील ते मी सुरवातीला काही महिने घरी न देता भांडवलातच भर घालणार आहे त्यामूळे घरी काही देण्याचा प्रश्न उरला नव्हता , पण ते विक्री चे पैसे मी व्यसनात उडवत होतो सिन्नर फाट्याचे आणि स्टेशन वाडीतील सर्व व्यसनी मित्रांचा अड्डाच बनली होती ती पानटपरी , जरा गल्ला जमा झाला की मी एखाद्या पंटर ला मी ब्राऊन शुगर आणायला पाठवत असे व मग टपरीच्या खालच्या मोकळ्या भागात बसून चेसिंग करत असे . वडील आणि भावाला मनापासून मी करत असलेला हा व्यवसाय आवडत नव्हता म्हणून त्यांच्यापैकी सहसा कोणी त्या टपरीकडे फिरकत नव्हते , तेथे जवळपास त्या वेळी वीज घेण्याची सोय नव्हती म्हणून संध्याकाळी मी रॉकेलची बत्ती ( ज्याला गँसबत्ती म्हणत ) लावत होतो , ही बत्ती पेटविणे म्हणजे ऐक मोठेच काम असे , त्याचा तो पांढरा जाळीचा फुगा ज्याला मेंटल म्हणत ( याला मेंटल का म्हणतात हे देखील ऐक कोडेच होते ) नीट लावणे मग पंप मारणे आणि योग्य तेवढे रोकेल वर आले की काडी लावणे मग तो फुगा पेटून लाल झाला की त्यावर फुकर मारून तो प्रकाशित करणे हे कुशलतेचे काम देखील मी लवकरच शिकलो . आता मस्त सकाळ संध्याकाळ माझे नशा करणे सुरु होते . शेवटी महिनाभरात दुकानातील माल कमी दिसू लागला तेव्हा एकदा थोडीफार खरेदी केली . १५ ऑगस्ट ला सुरु झालेली टपरी दसऱ्या पर्यंत सुरळीत चालली म्हणजे सुमारे २ महिने विशेष अडचण आली नाही मग मात्र माझी दुकान उघडण्याची व बंद करण्याची वेळ अनियमित असल्याने तसेच कधीही मी दुकान बंद ठेवत असल्याने हळू हळू विक्रीवर परिणाम होत गेला , एकदा तर अशी अवस्था आली की रात्रीचे १० वाजले होते व माझ्याकडे जेमतेम १० रुपयेच गल्ला आला होता तेव्हा आम्ही दोन तीन मित्र नशेच्या विवंचनेत होतो त्याच वेळी सिन्नरफाटा भागातील वीज गेली होती तेव्हा एकच्या डोक्यात कल्पना आली की सिन्नर फाट्यापासून एकदम शिवाजी पुतळ्याजवळ नेणाऱ्या उड्डाण पुलावर पण आता लाईट नसल्याने अंधार आहे आपण जर तेथे जाऊन एखाद्या जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तीला लुटले तर अंधारात कोणाला काही समजणार देखील नाही आणि काही गडबड झाली तर सहज पळूनही जाता येईल , झाले लगेच दुकान बंद करून आम्ही निघालो अंधारात सोबत शस्त्र म्हणून मी टपरीतील कात्री घेतली होती .

अंधारात आम्ही पुलावर दबा धरून उभे होतो , तितक्यात समोरून अंधारात ऐक व्यक्ती येताना दिसली त्याच्या सायकल च्या पायडल चा आवाज येत होता दुरून, आम्ही सज्ज झालो आणि ती सायकल जवळ येताच अडवली तो ऐक दारू प्यालेला माणूस होता अंधारात एकदम असे चार जणांनी घेरल्यामुळे घाबरला बिचारा मग आम्ही त्याचे खिसे तपासून पैसे काढून घेतले सायकलच्या हँडल लटकलेली ऐक पिशवी होती ती देखील काढून घेतली आणि पळालो , एकूण ५० रुपये कमाई झाली होती व त्या पिशवीत फरसाण , जिलेबी असे पदार्थ होते बिचारा आपल्या घरातील लहान मुलांसाठी खाऊ म्हणून घेऊन जात असावा . ही लुटमार जरी मी नशेसाठी केली होती तरी नंतर मनात बरेच दिवस मला वाईट वाटत राहिले त्या बद्दल . दिवाळीच्या सुमारास दुकानातील जवळ जवळ सगळा माल संपला होता , मग पुन्हा वडिलांकडे अजून पैसे हवेत माल भरायला म्हणून लकडा लावला जेव्हा त्यांनी आधीच्या विक्रीचे पैसे कुठे आहेत हे विचारले तेव्हा त्यांना सांगितले की सुरवातीला धंदा वाढवण्यासाठी आणि गी-हाईक जोडण्या साठी उधार माल द्यावा लागला म्हणून जास्त पैसे जमा झाले नाहीत वगैरे यावर अर्थात त्यांचा विश्वास बसला नाही , मग पुन्हा पैश्यांसाठी कटकटी सुरु झाल्या घरात . प्रत्यक्ष दिवाळीत तर मी कहरच केला , माझ्या आईचा तिथीने नरकचतुर्दशीला वाढदिवस असतो , त्या दिवाळीत नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले होते व पहाटे उठून सगळ्यांचे अभ्यंगस्नान झाल्यावर मी दुकानात माल भरायला मला २ हजार रुपये हवे म्हणून भांडण सुरु केले , आज लक्ष्मीपूजन आहे दुकानात नीट माल भरून पूजा वगैरे करायची आहे मला असे म्हणू लागलो , सुट्टी असल्याने मोठा भाऊ घरातच होता तो सुमारे २ महिनेमाझ्या बाबतीत लक्ष घालत नव्हता पण त्यालाहे माहित होते की मी दुकानाची वाट लावत आहे , त्याने विरोध सुरु केला ,मग वाद वाढला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असे पैसे घराबाहेर नेऊ नयेत म्हणून सगळे मला समजावत होते तर मी आत्ताच्या आत्ता पैसे हवेत म्हणून हट्टाला पेटलो होतो , त्यादिवशी आईचा वाढदिवस आहे हे देखील भान मला नव्हते , भावाने आणि वडिलांनी मग आईला दोष देणे सुरु केले ' तुझ्या लाडानेच बिघडला आहे ' असे म्हणू लागले ती बिचारी रडू लागली आणि रागाने तिने मला दोनचार थपडा लगावल्या त्यावर मी देखील चिडलो व भावावर धावून गेलो , अंगणात कुत्र्याला बांधून ठेवण्याची साखळी होती ती घेऊन मी भावावर हल्ला चढवला तर वडिलांनी मला अडविण्यासाठी मध्ये हात घातले त्यात त्यांच्या तळहाताला जखम झाली , खूप आरडाओरडा सुरु होता , शेजारीपाजारी जमले ब्राह्मणाच्या घरातील हा तमाशा पाहून सर्वांनाच वाईट वाटत होते पण कोणी मध्ये पडण्यास आले नाही कारण मी किती बेफाम आहे हे त्यांना माहित होते . 


=======================================================================

भाग ४७ वा 
लक्ष्मीपूजनाची तमाशा !


सकाळी ६ पासूनच मी घरी कटकट सुरु केली आणि शेवटी त्याचे पर्यवसान भांडण , भावाशी मारामारी , आईची रडारड , शेजाऱ्या पाजा-यांना फुकटचा तमाशा यात झाले होते , घरचेही अगदी हट्टाला पेटलेले पाहून मी थोडा पवित्रा बदलला म्हणालो ' माझा तुम्हा सर्वाना त्रास होतोय ना , तर मी आज , आतापासून घर सोडून जातो " असे म्हणत मी हातात मिळतील ते कपडे ऐकजुनी बँग काढून त्यात भरले , माझा हा पवित्रा पाहून भाऊ म्हणाला ' जातो आहेस हे छानच , पण परत मात्र अजिबात येऊ नकोस ' हे एकून मी पुन्हा बिथरलो व ' मी कायमचा घर सोडून जातोय तेव्हा मला आता तरी काही पैसे त्या , त्यात मी पानटपरी चा माल भरतो व त्या टपरीतच राहतो या पुढे ' असे म्हणू लागलो . आधीची माझी किमान २००० रुपयांची मागणी आता मी कमी करण्याच्या बेतात होतो , बहुतेक सगळे व्यसनी असेच करतात आधी जास्त पैसे मागून पाहतात व जमत नाही म्हंटल्यावर मग तडजोड करून मिळेल ते पदरात पाडून घेतात . शेवटी हो नाही करता करता मी मला फक्त १ हजार रुपये द्या म्हणू लागलो . भावाने तावातावाने मला हजार रुपये काढून दिले व कायमचा निघून जा म्हणाला , मी देखील तसाच बँग उचलून तिरमिरीने बाहेर जायला निघालो , आई वडील सुन्न होऊन उभे होते मी त्यांच्या पाया पडलो आणि घर सोडले बाहेर पडल्यावर भावाने पुन्हा आठवण करून दिली परत येऊ नकोस अशी . घरातून बाहेर पडून मी आधी माझ्या टपरीवर गेलो सकाळचे ७ वाजून गेले होते बँग टपरीवर ठेवली आणि सरळ हाजो आपा च्या अड्ड्यावर गोसावीवाडीत गेलो आपाला हाक मारून तिला पाचशे रुपयांचा माल मागितला , त्या १० रु. ला ऐक पुडी मिळत होती व जर एकदम १०० रुपये देऊन १० पुड्या घेतल्या तर आपा ऐक पुडी जास्त म्हणजे ११ पुड्या देई , मी एकदम ५०० रु दिले म्हणजे मला ५० पुड्या अधिक वरच्या ५ जास्त अश्या ५५ पुड्या मिळायला हव्या होत्या , आपाने खिडकीतून माझ्या हाती ऐक पुरचुंडी ठेवली त्यातील पुड्या काढून मी मोजल्या तर त्या ६० भरल्या एकून ५ पुड्या मला हाजो आपाने जास्त दिल्या होत्या , मी तिला तसे सांगितल्यावर म्हणाली ' अरे आज लक्ष्मी पूजा का दिन होता है ना ?सबेरे सबेरे तुने लक्ष्मी लाकर दी इसलिये ५ पुडिया बक्षिश दी है ' मी एकदम खुश झालो , हाजो आपा किती चांगली आहे असे वाटू लागले . त्यावेळी हे समजले नाही की मी हिंदू असून लक्ष्मी चा अनादर करत होतो तर हाजो आपा मुस्लीम असूनही लक्ष्मी चा आदर करत होती . 

तेथून एका मित्राच्या घरी गेलो व त्याला सोबत घेऊन टपरीवर आलो , जास्त पैसे असले की बहुतेक व्यसनी आपल्या मित्रांना त्या नशेच्या आनंदात सहभागी करून घेतात ,मात्र कमी पैसे असतील तेव्हा ते एकटेच नशा करतात . तासाभरात १० पुड्या संपवून आम्ही पुन्हा दुसऱ्या मित्र कडे गेलो त्यालाही सामील केले आमच्यात , त्या दिवशी मी जास्तच टेन्शन आहे असे म्हणत खूप दारू देखील प्यायलो माझा अवतार अक्षरशः पाहण्यासारखा झाला होता , सर्व मित्र अंगावर नवीन कपडे घालून होते तर मी जुन्या कपड्यात अंघोळ न करता घरा बाहेर पडलो होतो त्यात भरपूर ब्राऊन शुगर , गांजा , दारू पिऊन तर्रर झालो होतो दुपारी काहीही न खाता तसाच टपरीवर येऊन खालच्या भागात झोपलो . जाताना मित्र सांगून गेले की संध्याकाळी छान शहरात फिरायला जाऊ दिवाळीची मजा पाहू आम्ही तुला ६ वाजता बोलवायला येतो . मला एकदम संध्याकाळी ७ ला जाग आली टपरीत अंधार पसरलेला होता कसा तरी चाचपडत टपरीच्या बाहेर आलो , सगळीकडे मस्त रोषणाई केलेली दिसत होती , टपरीत माल भरायचा पूजा करायची वगैरे मोठ्या बाता करून मी घरून पैसे घेऊन निघालो होतो मात्र टपरीत चक्क अंधार होता , गँस बत्ती लावायचे देखील मला जीवावर आले होते , ऐक मेणबत्ती पटवून पुन्हा बाहेरून टपरी बंद करून टपरीच्या खालच्या भागात चेसिंग करत बसलो . एकट्यानेच १० पुड्या संपवल्या . मी टपरीत बसून ब्राऊन शुगर ओढत असताना ऐक दुसरा दारुडा मित्र आला ( माझ्या सगळ्या व्यसनी मित्रांना माहित झाले होते की बाहेरून टपरी बंद असली तरी खालच्या लाकडी फळ्यांच्या फटीतून मेणबत्तीचा उजेड दिसतोय म्हणजे तुषार नक्की आत असणार त्याच अंदाजाने त्याने बाहेरून वाजवले ) त्याला आत घेतले व त्याच्या जवळ ५० रुपये देऊन त्याला दारू आणायला सांगितले . मग पुन्हा गांजा ही मागवला . रात्री १० पर्यंत पुन्हा मी सकाळ सारखाच ' लल्ला ' झालो होतो. ( खूप नशा करून धुंद झालेल्या व्यक्तीला आम्ही ' लल्ला ' झाला असे म्हणत असू ) रात्री माझे सकाळी सोबत असलेले मित्र आले ते छान बाहेर फिरून आले होते ' मला का सोबत नेले नाही ' असे विचारल्यावर त्यापैकी ऐक म्हणाला "तुझा अवतार पाहिलास का आरश्यात ? तुझ्यासोबत बाहेर फिरायला जाणे म्हणजे आमच्या इज्जतीचा भाजीपाला करून घेण्यासारखे आहे " त्याचे हे बोलणे मला खूप लागले , सकाळी मी याच मित्रांवर जवळ जवळ २०० रुपये खर्च केले होते आणि तेच मला आता माझ्या अवताराबद्दल सुनावत होते , अर्थात त्यांचेही बरोबरच होते सकाळपासून खूप नशा करून माझा चेहरा निस्तेज झाला होता , डोळे लालीलाल झालेले , आणि कपडे मळलेले होते . पुन्हा मग ब्राऊन शुगर चा ऐक राउंड झाला सर्वांसोबत आणि मित्र आपापल्या घरी निघून गेले . मी एकटाच अंधारात नशिबाला दोष देत टपरीत पडलो होतो , काही केल्या झोपही लागत नव्हती सारखा उठून जवळची ब्राऊन शुगर ओढत होतो . पहाटे पहाटे केव्हातरी झोप लागली असावी .


=======================================================================

भाग ४८ वा वडिलांची माया ..!रात्रभर ब्राऊन शुगर पितापिता पहाटे मला झोप लागली असावी सकाळी एकदम तोंडावर गरम गरम पाणी पडल्याने आली , पण टपरी लाकडी फळ्यांनी बनवलेली होती , ती बनवताना मी खर्चात बरीच काटकसर केलेली होती कारण त्यातूनच मी कंची मारून ( विदर्भात एखाद्या वस्तूच्या खरेदीत किवा एखाद्या व्यवहारात पैसे मारणे किवा खरा हिशेब न देता त्यात कमिशन मारणे यास कंची मारणे असे म्हणतात ) मी माझ्या नशेसाठी पैसे वापरले होते त्यामूळे काही फळ्या थोड्या वाकड्या होत्या व त्या जोडताना काही फटी निर्माण झालेल्या होत्या तसेच टपरी तयार करणारा कारागीर देखील मीच स्वस्तात शोधून आणला होता त्याने त्या फळ्या फारश्या कुशलतेने जोडल्या नव्हत्या . तोंडावर एकदम गरम पाणी पडल्याने मी गडबडीने भांबावून उठलो आणि एकदम ओरडलो ' कौन है रे साले ' घाईने आतून टपरीची कडी उघडून बाहेर आलो तर ऐक लहान मुलगा पळताना दिसला . तेव्हा सगळा प्रकार माझ्या लक्षात आला तो लहान मुलगा टपरीच्या मागे उभा राहून टपरीवर जोराने धार मांरत होता आणि ते गरम पाणी माझ्या तोंडावर त्या लाकडी फळयांच्या फटीतून आले होते , क्षणभर स्वतची शरम आली मला , मग तसाच बाहेर हवेत शिव्या देत उभा राहिलो .

मला संशय होता की त्या मुलाला मुद्दाम कोणीतरी तेथे मुतायला सांगितले असावे , माझ्या टपरीच्या शेजारी एका झोपडीवजा घरात बादशहा नावाचा माणूस त्याच्या पत्नीसोबत राहत होता हा बादशहा सुमारे ५० वर्षे वयाचा असावा मुलबाळ काही नव्हते व उदरनिर्वाहासाठी तो त्याच झोपडीत चहा , सिगरेट वगैरे विकत असे , बाजूला माझी टपरी आल्यापासून त्याचे सिगरेट बिडी चे गी-हाईक कमी झाले म्हणून तो जरा माझ्यावर खार खाऊन होता पण प्रत्यक्ष मला काही म्हणण्याची त्याची हिम्मत नव्हती याला माहित होते की मी टपरीत झोपलो आहे त्यानेच समोरच्या झोपडपट्टीतील लहान मुलाला मुद्दाम टपरीवर लघवी करण्यास सांगितले असावे असा मला संशय होत्या म्हणून कोणाचे नाव न मी घेता मोठमोठ्याने शिव्या घालत होतो . शेवटी मला आसपासच्या लोकांनी समजावले मग पुन्हा आत टपरीत शिरलो आणि चेसिंग सुरु केले कालपासून मी एकून ८०० रुपये उडवले होते नशेत , टपरीत माल भरणे दूरच साधी टपरी उघडून लक्ष्मीपूजनाची पूजा देखील केली नव्हती मी . तसाच विषण्ण विचार करीत बसलो . आता दोनशे रुपयात काय माल भरणार ? सुमारे १० वाजता कपडे बदलून टपरीच्या बाहेर आलो , जवळ जेमतेम १० पुड्या शिल्लक होत्या तसाच पुन्हा हाजो आपा कडे गेलो पुन्हा त्या दोनशे रुपयांच्या पुड्या घेतल्या आणि टपरीवर येऊन ओढत बसलो , एकदोन मित्र आले त्यानाही ब्राऊन शुगर पाजली .कोणाकडून तरी उधार पैसे मागावेत म्हणून जरा प्रयत्न केले तर एकाने २ दिवसांनी नक्की देतो असे सांगितले तोपर्यंत मग टपरी बंद ठेवून वाट पाहणे भाग होते . संध्याकाळपर्यंत पुन्हा ' लल्ला ' झालेलो होतो . तसाच विचार करत अंधारात टपरीत पडून राहिलो , काल पासून पोटात अन्नाचा कण नव्हता आणि वासनाही नव्हती प्रचंड नशा केल्याने पित्त वाढले होते ,त्यात अंघोळ देखील नाही . काल सकाळी घर सोडताना आई काहीतरी खाऊन जा म्हणाली होती ते आठवले , मी नाही म्हणालो तेव्हा म्हणाली ' थांब जरा दिवाळीचे दिवस आहे थोडा फराळ देते सोबत ' पण ते देखील मी ऐकले नव्हते हे सगळे आठवले आणि मला रडू आले , तसाच हुंदके दाबत रडण्याचा उमाळा थांबवत चेसिंग करत होतो गालावरून अश्रू ओघळत होते . रात्री प्रचंड अशक्तपणा जाणवत होता अंग गरम झालेले होते तोंडाला कोरड पडलेली बाहेर जाऊन ऐक पाण्याची बाटली भरून घेऊन आलो आणि पडून राहिलो , गुंगीतच केव्हा तरी झोप लागली . 

तिसऱ्या दिवशी सकाळी अगदी उठून बसण्याचे ही त्राण अंगात नव्हते सकाळचे ९ वाजले असावेत , बाहेरून ' तुषार , दार उघड ' असा वडिलांचा आवाज ऐकू आला आधी मी काहीच उत्तर दिले नाही जेव्हा त्यांनी जोरात टपरीवर वाजवले तेव्हा मग कसातरी उठून आतून कडी काढली आणि बाहेर तोंड काढले तेव्हा वडील म्हणाले ' चल घरी , काय अवस्था झालीय तुझी " मला त्यांचे हे मायेचे बोलणे एकून एकदम रडू फुटले पण मी मोठ्या तावातावाने घर सोडले होते , तसेच बाहेर पडताना ' पुन्हा येऊ नकोस ' असे भाऊ म्हणाला होता ते आठवून म्हणालो ' नाही , आता मी घरी येणार नाही ' वडिलांनी अंगाला हात लावला तर अंगात प्रचंड ताप होता .' अरे , तो सहज म्हणाला होता , आम्ही काही तुझे शत्रू नाही , चल तुला कोणी काही बोलणार नाही ' असे म्हणत वडिलांनी माझा हात धरून मला बाहेर ओढले कसातरी उठून बाहेर आलो आणि टपरीला कुलूप लावून सावकाश वडिलांचा हात धरून घराकडे निघालो . वाटेत वडील सांगत होते ' आम्ही दोन तीन वेळा टपरीवर चक्कर मारली प्रत्येक वेळी टपरी बंदच होती , चौकशी केल्यावर समजले तुझे काय चालले आहे ते , मग आम्ही निर्णय घेतला तुला घरी बोलावून आणण्याचा . 


=======================================================================

 भाग ४९ वा पुन्हा हॉस्पिटल !

 वडिलांनी मला समजावून घरी आणल्यावर अंगात खूप ताप होता म्हणून घरातच पडून राहिलो , जवळ शेवटच्या दोन पुड्या होत्या त्या देखील संध्याकाळ पर्यंत पुरवून संपवल्या , आता पुन्हा रात्रीचा प्रश्न होताच , इतके रामायण झाल्यावर पुन्हा घरी पैसे मागणे जरा कठीणच वाटत होते , अंगात ताप आहे म्हणून डॉक्टरांकडे चल असे वडील म्हणाले तेव्हा लगेच तयार झालो मी तसाही नशा , त्या साठी पैसे ,कटकटी , भांडणे यांना कंटाळलेलाच होतो मनाशी विचार केला की तीनचार दिवस जर हॉस्पिटल मध्ये अँडमीट झालो तर माझा नशा न मिळाल्यामुळे होणारा त्रास , टर्की तरी कमी होईल म्हणून आमचे अजून ऐक परिचित डॉ. वझे यांच्या हॉस्पिटल ला दाखल होण्याची वडिलांकडे इच्छा प्रदर्शित केली . डॉ. वझे हे अतिशय हुशार आणि प्रेमळ व्यक्तिमत्व होते , पूर्वी जनसंघाचे क्रियाशील सदस्य असणारे हे डॉक्टर आणीबाणी च्या काळात तुरुंगवास भोगलेले होते , त्यांचे हॉस्पिटल नाशिकरोड येथे बरोबर दुर्गा गार्डन च्या समोर होते , त्यांच्या हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याचा मुख्य हेतू होता तो म्हणजे सुमा चा घरी जाण्या येण्याचा रस्ता त्याच हॉस्पिटल समोरून होता , तिला दुरून का होईना पाहता आले असते असा विचार करून मी डॉ . वझे यांचे कडे संध्याकाळी दाखल झालो , मला सर्वात आधी सलाईन लावण्यात आले त्यात डॉ . नी टॉनिक चे इंजेक्शन घातले होते , सलाईन मधून पडणारा ऐक ऐक थेंब पाहत पडून होतो . सुमारे रात्री ९ वा पहिली बाटली संपली ,लगेच दुसरी बाटली लावण्यात आली , त्याकाळी ब्राऊन शुगर च्या टर्की साठी नेमके कोणते औषध द्यावे या बाबत डॉ .देखील अनभिज्ञ होते , दारू च्या विड्रॉवल्स साठी जसे कॉम्पोझ च्या गोळ्या किवा इंजेक्शन देतात मात्र ब्राऊन शुगर च्या विड्रॉवल्स साठी साध्या झोपेच्या गोळ्यांनी फरक पडत नाही तर उलट पेशंट हँलुस्नेशन मध्ये जाऊ शकतो ( म्हणजे भ्रमाच्या अवस्थेत ) अर्थात ही सगळी माहिती मला नंतर समजली . मला डॉ . नी टर्की ची काहीच औषधे दिली नव्हती , हात पाय दुखतात , पोटात ओढल्यासारखे होते वगैरे मी सांगितलेला त्रास कमी होण्यासाठी फक्त त्यांनी काही वेदनाशामक गोळ्या दिल्या होत्या .

रात्री मला टर्की सुरु झाली , माझी चुळबुळ वाढली , रात्रभर आता तडफडत रहावे लागणार या विचाराने मनाचा ताबा घेतला आणि मग ब्राऊन शुगर ची चव आठवू लागली , कसेही करून किमान ऐक तरी दम मारायला मिळाला पाहिजे असे वाटू लागले , मला सलाईन लावून सिस्टर निघून गेली होती मात्र माझ्या खोलीच्या बाहेरच तीचे टेबल होते , मग मला उगाच अँडमिट झालो असे वाटले , कसेतरी आता बाहेर पडले पाहिजे हा विचार मनात जोर धरू लागला , मी हळूच सलाईन ची सुई काढून उठून रुमच्या बाहेर असलेल्या बक्ल्नीत आलो , माझी रूम पहिल्या मजल्यावर होती , सहज उडी मारून जाऊ शकत होतो पण ती बाल्कनी बरोबर हॉस्पिटल च्या प्रवेश द्वाराच्या वरच होती म्हणजे मी वरून उडी मारली तर थेट समोर प्रवेश द्वारापाशी पडलो असतो आणि लगेच प्रवेश द्वारा समोर असलेल्या काउंटर वरील माणसाला दिसले असते व मी पकडला गेलो असतो , मग नीट निरीक्षण केले तेव्हा लक्षात आले की बाल्कनीच्या बाजूला वरून ऐक पाईप खाली आला होता , त्या पाईप ला धरून खाली उतरलो असतो तर प्रवेश द्वारापासून बाजूला अंधारात मला उतरता आले असते . ठरले आणि लगेच कृती केली , सावकाश बाल्कनीतून वाकून पाईप पकडला आणि त्यावरून खाली उतरलो . व धूम ठोकली , मी असा विचार केला होता की हॉस्पिटल पासून गोसावीवाडी जवळच होती तेथून फक्त तात्पुरती टर्की थांबविण्या साठी ऐक पुडी घ्यायची आणि पुन्हा हॉस्पिटल मध्ये येऊन झोपायचे . सिस्टर ने जर काही विचारले तर तिला टॉयलेट ला गेलो होतो असे सांगायचे . पळत जाऊन सरळ हाजो आपा कडे गेलो खिशात फक्त १५ रुपये होते , ऐक पुडी घेऊन तेथेच आडोसा पाहून पटापट दम मारले जरा बरे वाटले , लगेच तडक पुन्हा हॉस्पिटल गाठले आणि पाहतो तर काय हॉस्पिटल चे मुख्य प्रवेश द्वार बंद झाले होते व पाईप वरून चढून वर जावे म्हंटले तर त्या बाल्कनी चे दार देखील आतून बंद केलेले होते , म्हणजे मी खोलीतून गायब होऊन बाहेर पडलो आहे हे सिस्टर ला समजले असणार . काय करावे ते सुचेना ,शेवटी धीर करून हॉस्पिटल चे मुख्य दार वाजवले ,एका वार्डबॉने दार उघडले , त्याच्यासमोरच मी संध्याकाळी अँडमीट झालो होतो ,मला असे बाहेरून येताना पाहून त्याने संशयाने माझ्याकडे पहिले व म्हणाला ' तू केव्हा बाहेर गेला होता ? ' सकाळी सांगतो म्हणून त्याला मी उडवून लावले व सरळ माझ्या रुमकडे जाणारा जीना चढू लागलो , तो वार्डबॉय मला तसा थोडाफार ओळखत होता म्हणून जास्त बोलला नाही . वर गेलो तर सिस्टर कालवा करायला लागली ' असे न सांगता कसे निघून गेला , वगैरे ' तिची माफी मागितली आणि सलाईन पुन्हा लावा असे म्हणालो . तिने आमची जवाबदारी असते , हे वागणे बरोबर नाही असे बडबडत पुन्हा सलाईन लावले . हे मी डॉ .न सांगणार उद्या अशी धमकी मला देऊन निघून गेली या वेळी मात्र तिने जाताना बाल्कनीच्या दाराला आतून कुलूप ठोकले . 

ऐक पुडी पिऊन थोडाफार त्रास कमी झाला होता त्यामूळे झोप लागली कशीतरी , पण सकाळी पुन्हा त्रास सुरु झाला , सकाळी आई चहा , नाश्ता घेऊन आली होती . काही खाण्याची इच्छा नव्हती मात्र चहा घेतला . आणि पडून राहिलो , माझ्या कपाळावरून हात फिरवत आई प्रेमाने काही बाही बोलत राहिली , आता तू लहान नाहीस , असे वागणे सोडून दे , जगात सगळे सगळ्यांच्याच मनासारखे घडत नाही पण म्हणून का कोणी असे वागतो ( आईला सुमा प्रकरणाची चाहूल लागली होती , आणि फिस्कटले आहे हे देखील समजले होते , त्या मुळेच मी असा बेफाम वागतो आहे असा तिचा अंदाज होता , सरळ सरळ हा विषय न बोलता ती आडून पाडून समजावत राहिली )मी देखील आज्ञाधारक पणे ऐकत राहिलो , सुमारे १० वाजता माझा ऐक मित्र मला हॉस्पिटल मध्ये भेटायला आला , तो देखील माझ्या सारखाच व्यसनी होता , मात्र माझ्याइतके तमाशे करत नव्हता .
( बाकी पुढील भागात )


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें