प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.com



मंगलवार, 12 मार्च 2013

माझी प्रयोगशीलता


भाग २१

माझ्या लाडक्या जँकी कुत्र्याला देखील मी हळू हळू गांजा च्या धुराची सवय लावत होतो , अर्थात त्यामागे माझा फक्त कुतूहल हाच हेतू होता त्याला त्रास देणे हा हेतू कधीच नव्हता तरीही ते अतिशय निंद्य कृत्य होते हे मान्य करायला मला संकोच वाटत नाहीय एका नशेबाज व्यक्तीच्या डोक्यात काय येऊ शकेल हे सांगता येत नाही याचाच हा नमुना आहे . गांजाचे शारीरिक दुष्परिणाम फारसे वेगाने किवा गंभीर होत नाहीत मात्र त्याचा माणसाच्या मेंदूवर खूप भयानक परिणाम होऊ शकतो , गांजा पिऊन पुढे वेड लागलेले अनेक जण मला माहित आहेत . जँकी च्या बाबतीत माझे प्रयोग फक्त गांजा वरच थांबले नाहीत तर पुढे मी ब्राऊन शुगर ओढायला सुरवात केल्यावर जँकी ला ब्राऊन शुगर चा धूर देखील दिला होता व त्यातून भयंकर गंभीर प्रकरण उदभवले होते .

झाले असे की अधून मधून म्हणजे आठवड्यातून एक दोन वेळा मी जँकी ला माझ्या बरोबर संडासात नेऊन त्याच्या तोंडात गांजाचा धूर सोडत असे , नंतर जेव्हा मी ब्राऊन शुगर ओढायला लागलो तेव्हा देखील मला तो प्रयोग पुन्हा जँकी वर करावा असे वाटले व मी ब्राऊन शुगर चा तोंडातील धूर जँकी च्या तोंडात सोडला आता त्याला माझ्या अश्या वागण्याची सवय झाली होती त्या मुळे त्याला फारसे आश्चर्य वाटले नसावे किवा त्याने अविश्वास देखील दर्शवला नाही , ब्राऊन शुगर ही अफू वर रासायनिक प्रक्रिया करून तयार केलेली पावडर असल्याने त्यातील अफू चे गुणधर्म अफुच्या साधारण पाचपट जास्त परिणाम कारक असतात एक प्रकारे अफूचा अर्कच असते ही पावडर याचे व्यसन अतिशय वेगाने लागते व हे व्यसन मिळाले नाही तर दारू व गांजाच्या पेक्ष्या खूप जास्ती शारीरिक त्रास होतात ( विथड्रॉवल्स ) मी पूर्णपणे ब्राऊन शुगर च्या आहारी गेल्यावर माझी भूक मंदावली होती , वजन कमी होत चालले होते , तसेच आता ब्राऊन शुगर साठी लागणारे पैसे जमवणे देखील कठीण होत चालले होते त्यामुळे घरात चोऱ्या करणे , बाहेर उधारी करणे , ओळखीच्या लोकांकडे उसने पैसे मागणे असे प्रकार सुरु झाले होते .

जँकी ला देखील मी जेव्हा चार पाच वेळा ब्राऊन शुगर चा धूर दिला तेव्हा त्याला देखील त्याचे व्यसन लागल्याचे मला जाणवू लागले होते कारण मी संडासात गेलो की तो बाहेरून माझ्यावर भुंकणे सुरु करत असे म्हणजे त्याचा अर्थ असा की त्याला देखील मी आत घ्यावे . माझ्या कडे जेव्हा जास्त पैसे असत व पुरेशी ब्राऊन शुगर असे तेव्हा मी त्याला आत घेऊन ब्राऊन शुगर चा धूर त्याच्या तोंडात सोडत असे , मात्र जेव्हा माझ्या कडे कमी ब्राऊन शुगर असे व माझा मुड ठीक नसे तेव्हा मी त्याच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष करीत असे . मला हे जाणवत होते की माझ्या प्रमाणेच जँकी ला देखील ब्राऊन शुगर मिळाली नाही तर शारीरिक त्रास होत असावा व म्हणून तो जिवाच्या आकांताने बाहेरून भुंकून मला देखील दे अशी विनंती करत असावा पण जँकी त्या बाबतीत सर्वस्वी माझ्यावर अवलंबून असल्याने त्याचा नाईलाज होता म्हणजे मी जर कृपा केली तरच त्याला ब्राऊन शुगर चा धूर मिळत असे . सुरवातीला गांजामुळे वाढलेली जँकी ची भूक नंतर ब्राऊन शुगर मुळे मंदावली होती व तो जरा सुस्त होत चालला होता हे स्पष्ट बदल मी मनात नोंद केले होते .

माझा मोठा भाऊ नुकताच त्याचे पुण्याचे अभियांत्रिकी चे शिक्षण पूर्ण करून पुन्हा घरी आला होता , त्याला बाहेरून माझे सगळे प्रताप समजले होते व तो एकदोन वेळा माझ्याशी माझ्या व्यसनाबाबत बोलला देखील होता पण मी त्याला उडवून लावले होते . माझा मोठा भाऊ स्वभावाने शांत , सालस प्रवृत्तीचा आहे त्यामुळे त्याला माझे वागणे पटत नव्हते तरी तो माझ्याशी भांडण वगैरे करीत नसे शिवाय मी किती बंडखोर आहे व बाहेर कोणकोणत्या प्रकारच्या लोकांमध्ये वावरतो हे त्याला माहित होते , माझा रागीट स्वभाव , हाणामारीला तत्पर असणे या गोष्टींमुळे तो शक्यतो माझ्या बाबतीत बोलणे टाळत असे . एकदा सकाळ पासून मला जरा पैश्यांची चणचण होती त्यामुळे मी वैतागात होतो , सकाळी आईला कुठेतरी समारंभाला बाहेर जायचे होते म्हणून ती लवकर घराबाहेर पडली होती , तिच्या कडून जाताना पैसे घेतले होते पण ते माझ्या व्यसनासाठी पुरेसे नव्हते , मी साधारणतः सकाळी ९ घराबाहेर पडलो होतो अड्ड्यावर गेल्यावर समजले की आदल्या दिवशी पोलिसांची रेड पडली होती आणि त्यामुळे ब्राऊन शुगर मिळणे बंद होते .

हे एकून माझे हातपायच गळाले , तेथे अड्ड्यावर माझ्या सारखे बरेच गर्दुल्ले घोळक्याने उभे होते , एका ठिकाणी मिळत नाही म्हंटल्यावर मग दुसरीकडे कोठे मिळते का याची एकमेकांना विचारणा होत होती एकाने सांगितले की नाशिक शहरात भद्रकाली मध्ये माल ( ब्राऊन शुगर ) मिळतो आहे . ज्यांच्या कडे जास्त पैसे होते ते ताबडतोब बस आणि रिक्षा करून भद्रकाली कडे रवाना झाले , माझ्या कडे जेमतेम पैसे असल्याने माझी अडचण होती नाशिक ' भद्रकाली ' ला बसने जाणे येणे आणि ब्राऊन शुगर खरेदी करणे या साठी पुरेसे पैसे नव्हते फार तर एका वेळचे म्हणजे जाण्याचे किवा येण्याचे पैसे होते , शेवटी येताना पायी येऊ असा निर्धार करून बसने भद्रकाली ला गेलो तेथे ब्राऊन शुगर मिळण्यासाठी बराच वेळ लागला इकडे विड्रॉवल्स मुळे माझा जीव कासावीस झाला होता , शेवटी एकदाची पुडी मिळाली व मी तेथेच आडोश्याला तीनचार दम मारून आधी मला होणारा त्रास थांबविला व मग घरी यायला निघालो भद्रकाली ते नाशिक रोड रेल्वे क्वार्टर्स हे अंतर सुमारे ९ किलोमीटर असावे येताना भाड्यासाठी पैसे नव्हते म्हणून भर उन्हात मी पायी येण्यास निघालो . सुमारे अडीच तास पायी चालून मी घरी आलो घरात मोठा भाऊ होता फक्त , वडील कामावर गेले होते दुपारचे ३ वाजले होते मी घरात आल्याबरोबर सरळ संडासात शिरलो व उरलेली ब्राऊन शुगर ओढण्यास सुरवात केली , मी घरात आल्याबरोबर जँकी माझ्या मागे पुढे घोटाळू लागला होता पण त्याच्या कडे मी सरळ दुर्लक्ष केले होते , मी संडासात गेल्यावर त्याने भुंकणे सुरु केले याचा अर्थ ' मला पण हवे ' हा होता हे आता मला माहित झाले होते . त्या दिवशी मी सकाळ पासून पनवती लागल्यासारखा फिरलो होतो , वर पैश्यांची अडचण त्यामुळे डोके फिरले होतेच , मी जँकी च्या भुंकण्या कडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होतो पण ते काही जमेना जेमतेम माझ्यापुरती ब्राऊन शुगर असताना मी जँकी ला त्यात सहभागी करून घेणे शक्यच नव्हते . एकीकडे त्यांच्या भुंकण्यामुळे माझे लक्ष पिण्यात नीट लागत नव्हते व मला जँकीचा राग येऊ लागला होता . शेवटी मी वैतागून बाहेर आलो आणि त्याच्या पेकाटात दोन लाथा घातल्या त्याला हे अनपेक्षित होते तो मोठ्याने विव्हळू लागला तितक्यात माझा मोठा भाऊ तेथे आला त्याने मी जँकी ला मारलेले पहिले व मला तो रागावू लागला ' का मारतोस त्या गरीब जीवाला ? कसला राग काढतो आहेस त्यांच्यावर वगैरे बोलू लागला " मी मुजोर होतोच सुरवातीपासूनच मी देखील ''माझा कुत्रा आहे तो , मी आणला आहे त्याचे हवे ते करीन , तू कोण मध्ये बोलणारा म्हणून भावाशी वाद करु लागलो " शेवटी वैतागून भाऊ म्हणाला '"किती त्रास देशील सर्वाना ? तू सर्व लाजलज्जा सोडली आहेस , इतका निर्लज्ज मुलगा मी कधी पहिला नाही , एखादा असता तर आपल्या मुळे इतका त्रास होतोय घरच्यांना म्हणून सरळ जीव तिला असता रेल्वे खाली , तसाही तुझा जगुन काही फायदा नाही " असे त्याने म्हणताच माझे डोके फिरले थांब मला मर म्हणतोस ना बघ आता मरतोच मी , असे म्हणून मी रागाने दुसऱ्या खोलीत जाऊन दार आतून लावून घेतले 


========================================================================

भाग २१ ब  वाचा गेल्याचे सोंग ---- !


( सर्व वाचकांसाठी एक सूचना देणे राहून गेले आहे ती पुढील प्रमाणे - मी माझ्या हट्टी , जिद्दी , बंडखोर , मनमानी करण्याच्या, सर्व काही झटपट मिळाले पाहिजे अश्या प्रकारच्या वृत्तीमुळे आणि आयुष्य म्हणजे नुसती मौज मजा असा गैरसमज करून घेतल्यामुळे सहजगत्या व्यसनाच्या जाळ्यात अडकलो होतो व नंतर व्यसनामुळे जे शारीरिक , मानसिक आर्थिक , कौटुंबिक , सामाजिक आणि नैतिक अधःपतन कसे होते याचे तसेच नंतर त्यातून बाहेर पाडण्यासाठी , पुन्हा सावरण्यासाठी जे काही केले व आजचा जो काही सुज्ञ पणा आहे तो कसा मिळाला याचे वर्णन या लेखमालेत करीत आहे . मला वेळोवेळी असंख्य लोकांनी मदत केली म्हणून आज मी जिवंत आहे व त्या सर्वांचा मी ऋणी आहे , या लेखमालेत जरी काही गमतीशीर घटना असतील तरी त्यामागे एक अपराधाचीपणाचा सल देखील मनात आहे . कृपया तरुण आणि प्रयोगशील वाचकांनी मी केलेले प्रयोग आपल्या आयुष्यात करू नयेत ही विनंती कारण सर्वांनाच यातून पुन्हा बाहेर पडणे जमेलच याची खात्री देता येत नाही . माझ्या जीवनाची ऐन उमेदीची जी सुमारे २५ वर्षे मी वाया घालवली त्यातून इतरांनी काहीतरी धडा घ्यावा या उद्देशाने ही लेखमाला लिहीत आहे , माझ्या कृत्यांचे समर्थन , किवा उद्दात्तीकरण करण्याचा माझा हेतू नाही तसे कोणाला वाटत असेल तर त्यांनी आपला दृष्टीकोन बदलावा . आपल्या आयुष्याची खाजगी पाने इतरांसमोर उलगडण्याचा हा उद्योग मी केवळ त्यातून इतरांना लाभ व्हावा याच सदहेतुने करीत आहे . )

रागारागाने मी आतल्या खोलीत जाऊन दार आतून लावून घेतले , मोठ्या भावाने ,मला ' ती जिवंत राहून काही फायदा नाही , त्यापेक्षा मरत का नाहीस , गाडीखाली जाऊन जीव दे ' असे म्हंटल्या मुळे माझा अहंकार प्रचंड दुखावला गेला होता व आता मोठ्या भावाला काहीतरी धडा शिकवला पाहिजे असे मला वाटत होते . त्याने केलेल्या अपमानाचा बदला आपल्याला त्रास न होता कसा घेता येईल असा विचार मनात होता . ( व्यसनी माणसाची बुद्धीमत्ता ही व्यसनाच्या काळात तो नेमकी नकारात्मक गोष्टींसाठी वापरतो ) आणि मला समोर कप्प्यात वडिलांनी ढेकुण मारण्यासाठी आणलेली बेगॉन ची बाटली दिसली ताबडतोब माझ्या मनात योजना तयार झाली . मी ती बाटली उघडून त्यातील बेगॉन माझ्या कपड्यावर शिंपडले त्यामुळे कपड्यांना व माझ्या अंगाला बेगॉन चा वास येऊ लागला मग ती रिकामी बाटली हातात घेऊन दार उघडले . मी आत काय करतोय या भीतीने भाऊ दाराबाहेरच उभा होता आता त्यालाही आपण काहीतरी भलतेच बोलून गेलोय याची जाणीव झाली असावी , बाहेर येऊन लगेच मी म्हणालो ' बघ मी मरावे से वाटतेय ना तुला ? आता तुझी इच्छा पूर्ण होईल , मी बेगॉन प्यायलो आहे . आणि आता बाहेर जातोय ' म्हणत .मी घराचे दार उघडून बाहेर पडलो . भाऊ घाबरून ' अरे थांब थांब , आपण डॉक्टरकडे जाऊ ' म्हणत होता , पण त्याला हिसडा मारून मी निघून गेलो , तो बिचारा साधा सरळ असल्यामुळे काय करावे हे त्याला सुचत नव्हते वर घाबरला देखील होता , बाहेर पडून मी सरळ गांजाच्या अड्ड्याकडे गेलो . आणि तेथील मित्रांमध्ये जाऊन गांजा ओढत बसलो , गांजाचे एक बरे असते दारू आणि इतर मादक पदार्थांच्या तुलनेत स्वस्त असल्याने सहज प्यायला मिळते .

साधारण: सायंकाळचे ७ वाजेपर्यंत मी अड्ड्यावर टाईम पास केला . जवळचे गर्द दुपारीच संपले होते त्यामुळे थोडा त्रास होऊ लागला होता , गांजा ओढून मी गर्द ची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करत होतो पण ते शक्य नव्हते जेव्हा गर्द चे विड्रॉवल्स असतात तेव्हा तो त्रास गर्द घेतले तरच थांबतो . रात्री ८ वाजता रेल्वे स्टेशन वर माझा एक गर्दुल्ला मित्र भेटला त्याने मला माझा त्रास कमी होण्याइतपत गर्द पाजले . इकडे घरी आई वडील आल्यावर भावाने सगळा प्रकार त्यांना सांगितला होता आणि वडील व भाऊ माझा सगळीकडे शोध घेण्याचा प्रयत्न करत होते , ते मला शोधतील हे माहित असल्याने मी मुद्दाम माझ्या नेहमीच्या मित्रांकडे किवा नेहमीच्या अड्यावर गेलो नव्हतो . सगळे उद्योग करून झाल्यावर मग मी शेवटी रात्री १० ला घरी आलो , पहातो तर आईचे रडून रडून डोळे लाल झालेले , वडील हताश पणे खुर्चीवर बसले होते व भाऊ अपराधी मुद्रेने मन खाली घालून उभा होता .

मी घरात शिरल्याबरोबर आईने मला जवळ घेतले व ' कुठे गेला होतास , चल आपण डॉक्टर कडे जाऊ , अरे मोठ्या भावाचे इतके काय मनावर घेतलेस ? ' असे म्हणू लागली मी काय बोलतो या कडे सर्वांचे लक्ष होते मला वनपीस जिवंत घरी आलेला पाहून त्यांच्या जीवात जीव आल्याचे मला जाणवले होते पण अजून माझा भावावरील राग कमी झाला नव्हता . मी काही न बोलता नुसते ' ऊ , ऊ ' असे केले यावर आईला शंका आली व म्हणाली ' तू बोलत का नाहीस ? त्यावर मी जीभ बाहेर काढून मला बोलता येत नाहीय असा इशारा केला . झाले आईने पुन्हा रडायला सुरवात केली वडिलांना म्हणाली ' अहो ! याची वाचा गेली की काय ? आणि भावाला रागावू लागली , आता झाले का तुझे समाधान , तुला हेच पाहिजे होते ना , इतका छान बोलणारा माझा सोन्यासारखा मुलगा मुका झाला हो " भाऊ काहीतरी बोलायचे म्हणून ' अग , पण आई , मी जरा रागात तसे म्हंटले , मला खरेच तसे व्हावे असे वाटले नव्हते " त्यावर ' चूप बस नालायक , एक शब्द बोलू नकोस , त्याचे आईवडील आहेत अजून जिवंत त्याला पोसायला , तुझ्या कमाई चे खात नाही तो " वगैरे म्हणून त्याच्यावर डाफरली .

मी मुकेपणाचे सोंग चांगले वठवत होतो , मनातल्या मनात भावाचा आईने केलेला पाणउतारा पाहून समाधान मिळत होते ( अर्थात ही माझी विकृती होती , हे आता समजतेय ).

( बाकी पुढील भागात )

========================================================================

भाग २२  हॉस्पिटल मधून पलायन --!   

आई भावाला रागवत होती ते पाहून मला बरे वाटत होते , मनातल्या मनात मी ' मला मर म्हणतोस काय ? बघ आता मजा ' असे म्हणत होतो . त्या काळी माझ्या उडाणटप्पू पणा करण्याच्या आणि बेताल वर्तनाच्या जो आड येईल तो मला माझा शत्रू वाटत असे आणि माझ्या शत्रूंमध्ये सर्वात पहिला नंबर मोठ्या भावाचा होता कारण तो नेहमी माझ्या भानगडी शोधून काढत असे आणि माझ्या स्वैर जगण्याच्या आड येत असे . आता याची वाचा गेली की काय या शंकेने आई सारखी मला ' अरे प्रयत्न तरी कर बोलण्याचा , बोल काहीतरी ," असे म्हणत होती व मी मात्र नुसताच ऊ ..ऊ ..चे नाटक करत होतो . वडील स्तब्ध झाले होते . काय करावे कोणाला काही सुचेना मला दवाखान्यात चल म्हणाले पण मी नकार दिला आणि तसाच न जेवता झोपलो ( भूक लागली होती , पण नाटक नीट वठवण्यासाठी उपाशी राहणे आवश्यक होतेच ) त्या दिवशी मी तर नशेत असल्याने लगेच झोपलो पण रात्रभर आई , वडील आणि भाऊ झोपू शकले नसतील. मला झोपेत असताना आईचा हात आणि वडिलांचा हात डोक्यावरून फिरतांना जाणवत होता .

दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वा . च आईने मला उठवले , एव्हाना ही बातमी शेजारी कळली होती व ते देखील चौकशीला आले होते . सर्वानी मला दवाखान्यात चल म्हणून आग्रह केला शेवटी मी कसाबसा होकार दिला , ' विशाल 'पुस्तकालायाच्या शेजारी नाशिकरोड ला . डॉ . पटनी यांचे क्लिनिक होते तेथे जाण्याचे ठरले काल रात्री इतके नाटक केल्यावर आता सकाळी मला पुन्हा गर्द ची गरज होती व जर आई वडिलांकडून पैसे मिळवायचे तर मग त्यांचे थोडे ऐकणे भाग होते म्हणून मी दवाखान्यात जाण्यास तयार झालो होतो , आम्ही रिक्षा आई मी आणि वडील असे तिघे रिक्षा करून डॉ . पटनी यांचे कडे गेलो . नुकतेच डॉ . आले होते , ते तसे आमचे फँमिली डॉक्टर पण होते , आईने त्यांना सर्व कर्मकहाणी सांगितली 'बेगॉन ' प्यायला हे एकून ते थोडे गंभीर झाले होते मात्र त्यामुळे वाचा गेली हे मात्र त्यांच्या पचनी पडले असावे असे त्यांच्या चेहऱ्यावरून वाटले नाही , त्यांनी मला तपासणीसाठी आतल्या खोलीत नेले आणि आई वडिलांना बाहेर थांबायला सांगितले . आत गेल्यावर मग ' जीभ दाखव , उलट्या झाल्या का तुला , पोटात दुखतेय का ' असे प्रश्न विचारले मी उत्तरादाखल नुसतेच ऊ..ऊ . सुरु ठेवले , शेवटी मला म्हणाले ' अरे वैद्यकीय क्षेत्रात मी गेल्या १० वर्षापासून काम करतोय पण हे असे बेगॉन प्यायल्या मुळे वाचा गेल्याचे उदाहरण प्रथमच पाहतो आहे , तू नक्की खोटे बोलत आहेस " ( आमची अधूनमधून डॉ . पटनी यांच्या क्लिनिक शेजारी असलेल्या होटेल ' शीतल ' मध्ये बैठक होती , आणि त्यांना मी बिघडलेला मुलगा आहे हे माहित होते )

मी नुसतेच ऊ..ऊ केल्यावर मग दोस्ती खात्यात म्हणाले ' यार , मला सांग खरे काय ते ? मी कोणाला सांगणार नाही याचे वचन देतो तुला " मग मी त्यांना भावाचा राग आलाय हे सांगितले व अधून मधून मी ब्राऊन शुगर घेतो हे देखील कबुल केले ( अर्थात मी रोजच सगळी व्यसनी करत होतो , पण व्यसनी माणूस हे कधीच कबुल करत नाही तो अधून मधून घेतो असेच सांगतो इतरांना ) . मग डॉ . मला म्हणाले की आता मी उपचार म्हणून तुला सलाईन लावतो मग तू बोलणे सुरु कर , आणि या पुढे असे वागू नकोस . मला गर्द प्यायची घाई झाल्याने मी देखील नाटक सोडण्याचे मान्य केले , डॉ . मग बाहेर येऊन आईला म्हणाले ' बहुतेक याला बेगॉन पिऊन खूप उलट्या झाल्या असाव्यात , आणि त्यामुळे खूप अशक्त पण आलाय व बोलता येत नाहीय , दोन सलाईन च्या बाटल्या चढवल्या की होईल ठीक , नाहीतर नंतर मग पाहू काय करायचे ते . ताबडतोब मला पटनी यांच्या समोरच असलेल्या हॉस्पिटल मध्ये भरती करण्याची प्रक्रिया सुरु झाली त्यांचे हॉस्पिटल शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर च्या दुकानांमागेच होते . मला तेथून हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले , ताबडतोब सलाईन लावण्यात आले आई वडील मग मला तेथील नर्स च्या हवाली करून घरी जायला निघाले मी तासाभरात परत येते तुझ्यासाठी डबा घेऊन असे सांगून आई गेली . मी नुसताच आढ्याकडे पाहत पडलो होतो , जसे जसे ग्लुकोज शरीरात जात होते तसे तसे माझे गर्द चे विड्रॉवल्स वाढत होते , आणि माझी चुळबुळ सुरु झाली . सलाईन संपायला किती वेळ लागेल असे नर्स ला विचारले तर तिने २ तास असे उत्तर दिले , झाले संपले मी चांगलाच अडकलो होतो आता , काय करावे ते सुचेना , तितक्यात दुसऱ्या खोलीतून नर्स ला कोणीतरी बोलावले आणि ती गेली , आता माझे डोके वेगाने काम करू लागले , आई परत यायच्या आत येथून निघाले पाहिजे नाहीतर मग आई जाऊ देणार नाही हे माहित होते , मी पटकन सलाईनची सुई बाहेर काढली आणि रुमच्या बाहेरच्या बाल्कनीत आलो , पहिल्या मजल्यावर माझी खोली होती , जमिनीपासून साधारण १५ ते सतरा फुट उंचावर होतो मी , धीर करून बाल्कनीतून खाली उडी घेतली , थोडा पाय मुरगळला , व चप्पल देखील तुटली , पण मी ताबडतोब तेथून धूम ठोकली .

घरी पोचलो तर आई नुकतीच माझा डबा घेऊन परत दवाखान्यात जाण्यासाठी बाहेर पडली होती , घरी वडील एकटेच होते , त्यांना मी घरी पाहून धक्काच बसला , मी लगेच बोलायला सुरवात केली , म्हणालो ' डॉ . नी सलाईन लावल्यावर मला बोलता येऊ लागले , जरा मला १०० रु . द्या एका मित्राचे काल घेतले होते ते त्याला परत करायचे आहेत ' , मला बोलता येतेय म्हंटल्यावर त्यांना हायसे वाटले मात्र १०० रु , ची मागणी केली तेव्हा ते नकार देऊ लागले , पण मी मागेच लागलो तेव्हा कालचा प्रसंग त्यांच्या मनात ताजा असल्याने याच्या तोंडी लागले तर परत काही भलतेच होईल या भीतीने असावे बहुधा पण त्यांनी मला पैसे दिले आणि मी परत गर्द च्या शोधात बाहेर पडलो .

========================================================================


भाग २३  संगीत ..अभिनय .., काव्य व इतर अवांतर !  

तसे आमच्या घरी संगीताची आवड सुरवातीपासून आहे , माझे आजोबा सयाजीराव महाराजांच्या दरबारी नोकरी करत असत , तसेच ते कीर्तनकारही होते , माझ्या वडिलांना देखील संगीताची आवड होती त्यांचे थोडेसे संगीत शिक्षण देखील झाले होते व राजकोट च्या रेडीओ केंद्रावर त्यांनी तरुणपणी गायन देखील केले होते , मलाही लहानपणापासून संगीत आवडत असे , सकाळी शाळा असताना आई रेडीओ लावून मग आम्हाला उठवत असे त्यावर छान गीते लागत , संत तुकाराम , संत एकनाथ , संत् कबीर यांचे अभंग , भीमसेन जोशी , प्रल्हाद शिंदे , लता मंगेशकर , आशा भोसले यांनी गाईलेली भक्ती गीते , भावगीते , विरहगीते मी ऐकत् असे अनेकदा अर्थ कळला नाही तरी ऐकायला आवडे . नाशिक रोड येथे आमच्या माहितीत एकच संगीत क्लास होता , त्याचे नाव ' श्रद्धा ' संगीत विद्यालय . कुलकर्णी म्हणून कोणी मँडम हा क्लास चालवत असत बिटको टाँकीज च्या शेजारी हा क्लास त्यांच्या राहत्या घरीच चालत असे .

मला आणि माझ्या मोठ्या भावाला दोघानाही संगीत शिकवले पाहिजे अशी वडिलांची इच्छा होती पण दोघांना एकाच वेळी संगीत क्लास मघ्ये घालणे त्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणारे नव्हते , म्हणून मोठा भाऊ बहुधा आठवीत असताना त्याला त्यांनी संगीताचा क्लास लावला , मी त्या वेळी पाचवीत होतो मला नंतर क्लास लावणार होते . त्या क्लास चा भावाचा अनुभव काही ठीक नव्हता , अनेकदा सुट्या देत , किवा कुलकर्णी बाई घरकाम सांभाळून क्लास घेत असल्याने पुरेसा वेळ देत नसत म्हणून भावाने पण लवकरच क्लास सोडला मग माझे संगीत शिकणे राहूनच गेले व नंतर जेव्हा क्लास लावू शकत होतो तेव्हा भलत्याच गोष्टीत अडकलो होतो .तरी रेडिओ वर एकून माझी बरीच गाणी पाठ झालेली होती व मी ती गाणी हुबेहूब म्हणण्याचा प्रयत्न देखील करीत असे , माझा आवाज चांगला आहे असे मित्र आणि नातलग म्हणत त्यामुळे कोण्या नातलगांकडे गेलो , काही कौटुंबिक कार्यक्रम असला , शाळेचे स्नेह संमेलन वगैरे ठिकाणी मी मला येत असलेली गाणी म्हणत असे व माझे कौतुक देखील होई , मोठा होऊ लागलो तशी हिंदी गाणी देखील पाठ होत गेली .

गांजाचे व इतर व्यसने लागल्यावर आम्ही मित्र दुर्गाबागेत तासंतास बसून गाणी म्हणत असू , गांजा प्यायल्यावर आवाज अधिक मोकळा होतो असा माझा अनुभव आहे , मी किशोर कुमार , मोहम्मद रफी , मुकेश , . मन्नाडे , सुधीर फडके , वगैरेंची गाणी आरामात म्हणत असे व माझा आवाज देखील तेव्हढा उंच जाई , असफल प्रेम प्रकरणा नंतर तर हिंदी मराठी विरह गीते मला जास्तच आवडू लागली होती , मी जेव्हा केव्हा अंगणातल्या संडासात गांजा किवा गर्द अथवा दारू प्यायला जाऊन बसत असे तेव्हा कोणाचे लक्ष नाही असे पाहून मी हळू हळू संडासात रेडीओ देखील नेण्यास सुरवात केली , नशेत ती आर्त स्वरातील विरहगीते एकून माझा वेळ छान जाई , असे वाटे की आपलेच दुखः ते गाऊन दाखवत आहेत , त्या स्वरातील दर्द मनाला भिडे , नंतर नंतर तर रेडीओ देखील सोबत असलाच पाहिजे अशी सवय झाली , आमच्या कडे त्या वेळी फिलिप्स चा एक लहान ट्रान्झीस्टर होता तो घेऊन मी रात्री १० ते ११.३० म्हणजे सुमारे दीड तास आणि दुपारी ११ किवा १ ते २ असा वेळ संडासात नशा करण्यात आणि गाणी एकण्यात घालवीत असे रेडीओ सिलोन ' तामिलीर्शात ' , संगीत सरिता ' विविध भरतीवरील इतर संगीतमय कार्यक्रमांच्या वेळा मला पाठ झाल्या होत्या, जेव्हा मी संडासात रेडीओ नेतोय हे घरच्यांना समजले तेव्हा त्यांनी आडकाठी केली मला ,म्हणाले ' हे काय भलतेच सुरु केले आहेस ? तुला वेड बीड लागले की काय ? " पण मी ऐकणाऱ्या मुलांपैकी नव्हतोच . भावाने तर दोन तीन वेळा रेडीओ मधील सेल काढून ठेवले होते पण ते माझ्या लक्षात आल्यावर मी पुन्हा बाहेर येऊन भावाशी भांडून सेल घेऊन रेडीओ सुरु करीत असे , म्हणजे आता हे एकटा असताना नशा करत असेन तेव्हा सोबत संगीत असल्या खेरीज मला मजा येत नसे . अर्थात त्या मुळेच असावे मला सुमारे २००० च्या वर हिंदी व मराठी गाणी तोंडपाठ आहेत .त्या वेळी मी माझी एक गाण्याची कँसेट देखील स्वतः रेकोर्ड करून ठेवली होती , मला उगीचच वाटे की मी फार मोठा गायक होऊ शकलो असतो पण ...माझे नशीब की मला संगीत शिकता आले नाही . १२ वी ला पंचवटी कॉलेज ला असताना मला गँदरिंग मध्ये गाण्याचे , अभिनयाचे आणि समूह नृत्याचे बक्षि देखील मिळाले आहे अशी एकदम तीन बक्षिसे पटकविणारा मी त्या वर्षीचा एकमात्र होतो .

गांजा पीत असताना एकदा घरी कशावरून तरी खूप भांडण झाले आणि माझे डोके फिरले वाटले घर सोडून निघून जावे . मुंबई ला पळून जाऊन मोठा अभिनेता , गायक वगैरे झाल्याची उदाहरणे मला माहित होती , तसेच सिनेमात जसा हिरो लहानपणी घर सोडून जातो आणि मुंबईत होऊन मोठा श्रीमंत , नामवंत होतो तसेच आपणही करू म्हणजे सगळ्यांना आपली किंमत कळेल , काहीतरी धाडसी पाउल उचलल्याशिवाय कुटुंबियांची तोंडे बंद होणार नाहीत असा विचार केला , आपण मुंबई ला जाऊन लता मंगेशकर ला भेटायचे आणि तिला आपली गाणी ऐकवायची ती नक्की आपल्याला काहीतरी संधी मिळवून देईल असा अतिआत्मविश्वास वाटत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ला अंगावरच्या कपड्यानिशी घराबाहेर पडलो ( इतक्या सकाळी उठून महाराज कुठे निघाले या बद्दल घरच्यांना जरा आश्चर्य वाटले , कुठे निघालास ?वगैरे प्रश्न आईने विचारले पण काहीही उत्तर न देता निघालो ) , सोबत माझी गाणी रेकोर्ड केलेली सेट घेतली , जवळ कालचे उरलेले फक्त २० रुपये होते , आधी अड्ड्यावर जाऊन गांजा प्यायलो , एक पुडी सोबत घेतली त्या वेळी गांजाची एक पुडी केवळ १ रुपयाला मिळत असे .जवळ आता १५ रुपये उरले होते , मग रेल्वे स्टेशन वर येऊन सकाळची मनमाड हून मुंबईकडे जाणारी ' पंचवटी ' एक्प्रेस पकडली . वडील रेल्वेत होते त्या मुळे तिकीट चेकर ची वैगरे भीती वाटत नसे , तसेच बहुतेक मवाली पण स्टेशनवरच केले असल्याने तिकीट चेकर ला कसे चुकवायचे ते चांगले माहित होते .

========================================================================

भाग २४  दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह ....ते पुन्हा घर !
 

सकाळी ७.३० ला नाशिकरोड रेल्वे स्टेशन वरून ' पंचवटी ' एक्प्रेस मध्ये बसलो , माझा रेल्वे स्टेशन वर नेहमी वावर असल्याने सगळे फेरीवाले ओळखीचे होतेच माझ्या , बटाटावडा , चिवडा , द्राक्षे , कोल्ड्रिंक्स , खीरा काकडी असे पदार्थ रेल्वे डब्यात तसेच , स्टेशन वर विकणारे हे मित्र कलंदर असत त्यांच्या बरोबर राहून मी चालत्या गाडीत एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाणे , वेगात असणारी गाडी गाडीसोबत धावत जाऊन पकडणे , सोडणे असे प्रकार शिकलो होतो . त्यांच्याशी गप्पा मारत बटाटेवडे वगैरे खात गाडीत छान टाईम पास केला , मात्र मी कुठे निघालोय हे मात्र कोणाला बोललो नाही फेरीवाले मित्र नाशिक रोड ते इगतपुरी व कधी कधी कसारा इथपर्यंत अप -डाऊन करत असत , त्या मुळे कसा-या पर्यंत छान मजेत वेळ गेला , कसा-या च्या पुढे गाडी गेली तेव्हा एकदम मला रिकामे वाटू लागले , मुंबई ला या पूर्वी ठाणे , सांताक्रूझ , वांद्रे,  दादर , अश्या ठिकाणी नातलगांकडे गेलो होतो पण त्या वेळी सोबत कुटुंबीय होते असा एकटा आणि ते देखील घर सोडून जाणे म्हणजे जरा मनावरील दडपण वाढवणारे होते ( नंतर ब्राऊन शुगर च्या नादात अनेकदा मुंबई ला जाणे येणे केले , काही दिवस फुथपाथ वर देखील वास्तव्य केले ). कल्याण पासून मग मुंबईचे कारखाने , झोपडपट्या, रेल्वे लाईन च्या कडेला बसून विधी उरकणारे लोक , मोठे मोठे दुर्गंधी युक्त नाले , उघडी नागडी मुले , बाजूच्या टँक वरून समांतर धावणाऱ्या लोकल्स , त्यातील खच्चून भरलेली , दाराला लटकणारी माणसे वैगरे दृश्ये पाहून मन विषण्ण होत होते , माझा कसा निभाव लागेल इथे ? हा प्रश्न वारंवार मनात येत होता .

मध्यवर्ती ठिकाण म्हणून दादर येथे उतरण्याचे मी ठरवले होते , तेथे उतरल्यावर मग आपण लोकांकडे चौकशी करून लता मंगेशकर चे घर विचारू आणि तिला भेटायला जाऊ असा सोपा सरळ विचार केला होता मी . दादर ला उतरल्यावर आधी स्टेशन च्या बाहेर आलो . सगळीकडे सतत धावपळीत , घाईत चालणारी माणसे होती , नेमके कोणाला लता मंगेशकर चा पत्ता विचारावा हा संभ्रम पडला , एक दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला तर काय कटकट आहे अश्या अविर्भावाने माझ्या कडे पाहत ते घाईत निघून गेले,( बहुधा ते मला भिकारी समजले असावेत ) शेवटी एका पानठेल्या वर जाऊन विचारले तर त्यालाही वेळ नव्हता , त्याने नुसताच हाताने पुढे सरळ जा असा इशारा केला , शेवटी एक म्हातारा पेन्शनर होता बहुतेक त्याला थांबवले व लता मंगेशकरचा पत्ता विचारला त्यावर तो हसला म्हणाला ' यहा कहा मिलेगो वो ? ' क्या काम है उनसे ? कहासे आये हो असे प्रश्न विचारू लागला , आमचे बोलणे पाहून एकजण मराठी असावा बहुतेक तो थांबला व मला म्हणाला असा त्यांचा पत्ता नाही सांगत तुला कोणी . तू विले पार्ले येथे जा तेथे दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह आहे , त्यांच्या वडिलांचे आहे ते ,तेथे तुला पत्ता मिळेल .

मग पुन्हा रेल्वे स्टेशनवर आलो आणि विले पार्ले कडे जाणाऱ्या लोकल मध्ये बसलो दुपारचे १२ वाजून गेले होते त्यामुळे लोकल्स ची गर्दी कमी झालेली होती , विलेपार्ले येथे आल्यावर दिनानाथ मंगेशकर नाट्य गृहाचा पत्ता विचारून तेथे पोचलो बहुतेक कोणताही प्रयोग नसावा कारण सगळीकडे शांत होते तेथील एका पहारेकऱ्याला लता मंगेशकर चा पत्ता विचारला त्यावर तो म्हणाला ' तू इथे कशाला पत्ता विचारतो आहेस त्यांचा ? ' मी सांगितले की हे नाट्यगृह त्यांच्या वडिलांच्या नावाने आहे म्हणून विचारतोय ' त्यावर हसून म्हणाला ' अरे हे महापालिकेने बांधलेले नाट्यगृह आहे आणि येथे दिनानाथ मंगेशकरांचे नाव ते एक जेष्ठ नाट्यकर्मी होते म्हणून दिलेय , लता मंगेशकर यांचा येथे काहीही संबंध नाहीय . झाले माझे अवसान गळाले अर्धवट माहितीवर आपण येथे आलो हा मोठा मुर्खपणा केला असे वाटू लागले .जड पावलांनी परत फिरलो आता एक क्षण देखील मुंबईत थांबू नये असे वाटू लागले , जवळ ची गांजाची पुडी सिगरेट मध्ये भरून प्यावी म्हंटले तर आसपास सतत अशी गर्दी की कोणाला जर गांजाचा वास समजला तर वांधे होतील म्हणून दादरला परतलो आणि तेथे ओव्हर ब्रीज वर जाऊन एका म्हाताऱ्या भिकाऱ्याच्या बाजूला उकिडवा बसलो आणि हळूच सिगरेट मध्ये गांजा भरला , एक दोन झुरके मारले मग जरा डोके शांत झाले , पुन्हा सगळ्या घटनांचा विचार करू लागलो .

घरात भांडण झाले म्हणून काय लगेच घर सोडायचे आपण ? आपला हा आततायी पणाच झालाय , आणि भांडणाचे मूळ तर आपलीच चूक होती , आईबाबा किवा भाऊ काही आपले शत्रू नाहीत , ते जरा जास्त रागवत असतील पण ते आपल्या भल्यासाठीच ना ? असे स्वतःलाच समजावू लागलो अर्थात हा सगळा विचार घरी परत जाण्यासाठीच चालला होता मग निर्णय घेतला आता मिळेल ती गाडी पकडून सरळ घरी जायचे . घरी जाण्याचा निर्णय झाल्यावर पुन्हा जरा हुशारी वाटली . मनमाड कडे परत जाणारी पंचवटी एक्प्रेस दादर ला ४.३० ला येते बोरीबंदरहून . एव्हाना साडेतीन वाजलेच होते , मग एक तास स्टेशनवर बसून राहिलो , मनाशी आता या पुढे , आई वडिलांचे ऐकायचे , फालतू धंदे सोडून द्यायचे वगैरे निश्चय करत होतो . एकदाचा गाडीत बसलो आणि रात्री १०.३० ला पुन्हा नाशिक रोडस्टेशन वर उतरून सरळ दोन टांगात घर गाठले . मला परत आलेला पाहून सर्वाना आनंद झाला सकाळपासून कुठे गेला असावा या काळजीतच होते घरचे . एकंदरीत जेमतेम १५ तासात माझा स्वाभिमान वगैरे गळून पडला होता . नंतर काही दिवस जरा बरा वागलो . मनातील पश्चातापाची बोच कमी झाली तसा पुन्हा स्वैर वर्तन सुरु केले .

( व्यसनी व्यक्तीला अनेकदा त्याच्या कृत्याचा पश्चाताप होत असतो , व काही दिवस जरा आपल्या वर्तनात सुधारणा दाखवतो मात्र काही दिवसातच तो सगळे विसरून पुन्हा आपल्या मूळ पदावर येतो..... बाकी पुढील भागात.....


========================================================================

 भाग २५ अभिनयाचे धडे --नाट्यप्रवास !
 


१२ वी ला असताना पंचवटी कॉलेज मध्ये स्नेहसंमेलनाच्या वेळी आपण एखादी एकांकिका बसवावी असे आमच्या मनात आले अर्थात या पूर्वी अभिनयाचा काही अनुभव नव्हता परंतु आमच्या पेक्षा वयाने मोठे असेलेल जे आमचे विलास पाटील , रतन पगारे , यशवंत रिपोर्ट वगैरे मित्र होते ( अर्थात हे मित्र आमच्या सारखे व्यसनी नव्हते ) त्यांनी आम्हाला या प्रकरणी मदत करायचे ठरवले , मग रतन पगारे ने ' ईश्वर मृतात्म्यास शांती देवो ' नावाची एक एकांकिका खूप विनोदी आहे आणि ती तुम्ही बसवा असे सुचविले आम्हाला त्यातील काहीच काळात नसल्याने रतननेच आम्हाला एकांकिका बसवून देण्याची जवाबदारी स्वीकारली मग आधी लेखकाला भेटणे त्याची रॉयल्टी वैगरे द्यावी लागते या गोष्टी समजल्या फक्त ५१ रुपये इतकी रॉयल्टी देऊन लेखकाची परवानगी काढली त्या एकांकिकेत एकून सहा पात्रे होती इंद्र , चित्रगुप्त , नारद , एक अभिनेता , यमराज , आणि सेवक त्यापैकी नारदाची प्रमुख भूमिका होती आमच्या सर्व मित्रांची अभिनयाची परीक्षा घेऊन रतन ने नारदाच्या भूमिके साठी माझी निवड केली , इंद्र म्हणून भारत खैरनार , चित्रगुप्त -भीमा डावरे , अभिनेता -अनिल पगारे , यमराज - थॉमस चांदेकर , सेवक -प्रकाश जाधव अशी आमची टीम होती. या पैकी गांजा ओढणारे आम्ही चार जण होतो तर दोघे मात्र कोणतेही व्यसन करत नव्हते , मग नाटकाच्या तालमी सुरु झाल्या .

रतन ने आम्हा सर्वाना आधी आमच्या भूमिकेचे महत्व , आमची बोलण्याची पद्धत , हावभाव , हातवारे या बाबत मार्गदर्शन केले , सुरवातीला तर खूप अवघडल्या सारखे होई , बोलताना हातवारे कसे करावेत ते समजत नसे ,तसेच जेव्हा दुसरा अभिनेता बोलतो तेव्हा आपल्या ऐकताना आपल्या चेहऱ्या वरचे भाव कसे बदलावेत , हात कसे ठेवावेत वगैरे गोंधळ होत होता , त्यात आम्ही तिघे कधी कधी जर रिहर्सल च्या वेळी गांजा पिऊन असलो तर मग धम्मालच असायची आम्हाला इतरांच्या अभिनयाचे हसू यायचे किवा गम्मत वाटायची मग सगळेच हसायला लागत , अश्या वेळी रतन खूप चिडे नंतर त्याला कळले हे लोक गांजा पिऊन तालमीला येतात , तेव्हा त्याने एक दोन वेळा रागावून हे बंद करा नाहीतर मी मदत करणार नाही अशीही धमकी दिली परंतु आम्ही पुन्हा त्याची माफी मागून त्याला पटवत होतो . त्या वेळी माझे वडील पक्षघाताने आजारी होते म्हणून ते भायखळा येथील रेल्वे च्या हॉस्पिटल मध्ये दाखल होते तर आई त्यांच्या जवळ , आणि मोठा भाऊ पुण्याला शिकायला होता , त्यामुळे माझे घर मोकळेच होते आम्हाला तालमी करायला आणि बाकी मौज मस्ती करायला . शेवटी एकदाचे नाटक बसले सगळ्यांचे पाठांतर चांगलेच होते मात्र काही वेळा संवाद मागे पुढे होत अश्या वेळी पडद्यामागून संवाद म्हंटले जातात व त्याला प्राँम्पटिंग म्हणतात हे देखील तेव्हाच समजले . मी आधुनिक नारदाची भूमिका साकारणार होतो , जीन्स ची पँन्ट , वर उघडा , गळ्यात जानवे , आणि तंबो-या ऐवजी गिटार असा माझा वेश होता , तर बाकीचे मात्र पारंपारिक वेशभूषा करणार होते . आम्ही सर्वानी वर्गणी काढून वेशभूषा वगैरे चा , तसेच मेकअप चा खर्च करणार होतो नाटका साठी लागणाऱ्या साधनांना प्राँपर्टी , व कपड्यांना ड्रेपरी असे म्हणतात हे देखील समजले तसेच नाटकात अभिनय न करणारे परंतु इतर मदत करणाऱ्या लोकांना बँकस्टेज कलाकार असे म्हणतात ही माहिती मिळाली , आमच्या नाटकातील बँकस्टेज कलाकार आमच्या सारखेच आमचे गांजा ओढणारे मित्र होते , एकंदरीत सगळीच धमाल होती .

शेवटी एकदाचा प्रयोगाचा दिवस उजाडला , आदल्या दिवशी रंगीत तालीम झाली होती ( म्हणजे वेशभूषा करून ) . आधी आम्ही सगळे गांजाच्या अड्ड्यावर गेलो तेथे दम मारून ताजेतवाने झालो आणि मग प्रत्यक्ष नाटकाला सुरवात झाली . नाटकात हशा घेणारे खूप संवाद माझ्या तोंडी होते व माझे पाठांतर देखील चांगले होते तसेच अधूनमधून मला ' नारायण , नारायण ' असे म्हणायचे होते मी ते जरा इंग्रजी पद्धतीने म्हणत असे त्याला देखील लोक हसत होते . कोणीही कुठेही न चुकता प्रयोग पार पडला एकदाचा , मग पुन्हा आमची टोळी अड्ड्यावर श्रम परिहार करायला गेली . आमच्या एकांकिकेला बक्षिस मिळाले होते तर मला अभिनयाचे बक्षिस मिळाले . नंतर आम्ही ही एकांकिका आमच्या विष्णू नगर च्या गणेश उत्सवात देखील सादर केली तसेच सिन्नर फाट्याच्या मुलांचा ' त्रिमूर्ती ' संगीत मेळा होता त्यात देखील आमची एकांकिका एक दोन वेळा सादर केली . मी चांगला अभिनय करतो हे समजल्यावरून मग मला कामगार क्रीडा मंडळाच्या एका ' उकिरडा ' नावाच्या दलित नाट्यात देखील छोटासा रोल मिळाला . हे ' उकिरडा ' नाटक राज्यनाट्य स्पर्धेत तिसरे आले होते .. त्या बद्दल पुढील भागात .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें