प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.com



सोमवार, 18 मार्च 2013

यह महलों की दुनिया

भाग ७६
दिलीपच्या आईच्या बाबत ते प्रकरण समजल्यावर मला सारखे हे सारे खोटे असावे असे वाटत होते म्हणून सांगणाऱ्या अटेंडंट च्या मी मागेच लागलो की हा सिनियर हे सगळे कसे ...कुठे ....जमवतो ते मला सांग मी त्याची अधीक्षकांकडे तक्रार करतो असे म्हणालो .,यावर त्याने मला सांगितले की तू तशी काही तक्रार केलीस तर अधीक्षक काहीही करू शकणार नाहीत कारण हे त्या स्त्रीच्या संमतीने होतेय ..जर तक्रार केली तर आधी तिचे भेटणे नियमबाह्य आहे म्हणून ते बंद होईल आणि त्या आईचा तळपट लागेल तुला ... हे देखील अर्थात खरे होते ..तरीही ..मी खूप मागे लागलो म्हणून त्याने सांगितले की रविवारी जेव्हा बिल्डिंग च्या तळमजल्या वरचे सुतारकाम आणि हातमाग विभाग बंद असतात तेव्हा त्याच्या चाव्या त्या सिनियर कडेच असल्याने रविवारी तो तिला सकाळी लवकर बोलावतो आणि सकाळी ती १० वाजता आल्यावर आधी त्या खालच्या विभागात जाते आणि मग ऐक तासाने वरच्या मजल्या वर आपल्याकडे येते ..पुढच्या रविवारी की आधीच मेन गेट वर जाऊन बसलो ... दिलीपची आई बरोबर पावणेदहा वाजता आली ..तिला कळणार नाही अश्या पद्धतीने मी तिचा पाठलाग केला तर ती त्या खालच्या सुतारकाम कक्षात गेली बहुतेक तो सिनियर आधीच दार उघडून आत जाऊन बसला असावा ..नंतर सुमारे पाऊण तासाने बाहेर येऊन मग ती वरच्या मजल्यावर आमच्या वार्डात गेली ..

नंतर काही वेळाने तो सिनियर बाहेर पडला ..मला तेथे बाजूला उभा असलेला बघून चपापला ...मग उगाच ' काय तुषार ..कसे काय ? .. घरी कधी जाणार ' वगैरे चौकशी करू लागला नंतर मला.. चल चहा घेऊ म्हणून.. गेटच्या बाहेरच्या कॅन्टीन मध्ये घेऊन गेला चहा ..भजी ..असे मागवले . ..आतून मला त्याचा खूप राग येत होता पण ..पण काही बोलता येईना .कारण मला जरी तेथे बरेच स्वातंत्र्य होते तरी शेवटी मी कागदोपत्री तेथील पेशंट होतो .. भांडण वगैरे झाले असते तर मलाच महागात पडले असते . चहा पिऊन झाल्यावर त्याने वर मला ऐक बिडी बंडल घेऊन दिला .. निमुटपणे मी वार्डात परतलो ..स्वताच्या असहायतेची खूप चीड येत होती ..वार्डात गेलो आणि सरळ दिलीपची आई ज्या बाथरूम मध्ये त्याला दार लोटून घेऊन अंघोळ घालत होतो तेथे गेलो आणि दारावर जोरात लाथ मारली ..दर सताड उघडले मोठ्याने ओरडलो त्या बाई वर '" ये क्या नाटक हे तुम्हारा रोज रोज का ..यहां वार्ड में आनेके लिये आपको किसने परमिशन दिया है ..वगैरे .." त्यावर ती बाई एकदम काकुळतीला आली माझ्या डोक्यावर हात फिरवून ' बेटा ..ये दिलीप को कुछ समझता नही है ..इसलिये इसे नहेलाने कें लिये आना पडता है ..तू तो समझदार है ना ? " तिचा हा पवित्रा देखील मला अजून असहाय करणारा होता ..तरीही आतून खूप धुमसत होतो मी .. मग जेवण वगैरे न करता तसाच सायंकाळपर्यंत झोपून राहिलो .. जगात अश्या अनेक गोष्टी घडत असतील जिथे... आपण सारे काही समजून उमजूनही.. काही करू शकत नाही ..कधी परिस्थितीने हात बांधले जातात ..तर कधी नेमके काय करावे हेच समजत नाही .. सायंकाळी मी सगळा राग दिलीप वर काढला .. किरकोळ कारण होते ..सायंकाळी ४ ला चहा प्यायच्या वेळी मी झोपलो होतो म्हणून माझा ग्लास शिरूर ने भरून पलंगाच्या पायथ्याशी ठेवला होता ..नेमका दिलीप चा धक्का लागून तो ग्लास सांडला आणि मला कारण मिळाले ..शिव्यांचा भडीमार करत मी दिलीप वर तुटून पडलो त्याला खाली पडून लाथा बुक्क्यांनी तुडवला ..सगळ्या अटेंडंटनी मला धरून आवरले ..शांत केले ...मग स्वतःचाच राग येऊ लागला मला .. वाटले येथे राहून आपले डोके पण फिरत चालले आहे की काय ? .. सरळ खाली सिस्टर च्या कडे जाऊन ' लार्जेक्टील ' च्या दोन गोळ्या मागितल्या ..आणि तसाच न जेवता झोपून गेलो .. डोक्यात गाणे घोळत होते ' ये महलो..ये तख्तो ..ये ताजो ..की दुनिया .." . आईची खूप आठवण येत होती ..किती तरी दिवसात तिच्या कुशीत डोके ठेऊन झोपलो नव्हतो ..!

तीनचार दिवस मी असाच सुन्न होतो ..मग गोकुळाष्टमी च्या दिवशी जेव्हा तेथे दहीहंडी फोडणार असे कळल्यावर जरा मूडमध्ये आलो .. तेथे मनोरुग्णालयाच्या आवारातच तेथील काही स्टाफ करिता क्वार्टर्स बांधली होती त्या इमारतीच्या समोरच्या . मैदानात साधारण पणे पंधरा फुटावर दहीहंडी बांधली होती ..ढोल ताशे वगैरे सगळे होते ..खूप गुलाल उधळला ..पहिल्यांदा कोणतीही नशा न करता नाचलो ..पूर्वी बाहेर गणपती उत्सव ..नवरात्र ..शिवजयंती ..आंबेडकर जयंती .वगैरे दिवशी आम्ही सगळे मित्र खूप दारू पिऊन नाचत होतो ते आठवले .. सर्व वार्डामधून जरा बरे असणारे पेशंट दहीहंडी बघायला आले होते त्या पैकी तब्येतीने चांगल्या लोकांना खालच्या फळीत उभे करून .वरच्या फळीत मग तेथील तरुण स्टाफ आणि खाजगी अटेंडंट चे काम करणारी मुले असे चढणे पडणे सुरु झाले ..मी एकदा वरून खाली पडलो तर पाय मुरगळला आणि पाहता पाहता भप्प सुजला ..मला चालता येईना ..दोन तीन जणांनी उचलून मला वार्डात आणले .. मग सिस्टर ने पेन किलर चे इंजेक्शन दिले .रात्रभर झोपू शकलो नाही .. वाटत होते तीन चार दिवसापूर्वी दिलीपला विनाकारण लाथांनी तुडवले होते ..बहुतेक त्याचाच परिणाम असावा की काय हा ?

=======================================================================
भाग ७७ वा ढेकणांचे राज्य !

मेंटल हॉस्पिटल मध्ये गादीच्या आत कापसाऐवजी काथ्या भरलेला असे ..उशीचे ही तसेच वरून जरी त्यावर अस्तर असले तरी बहुतेक वेळा त्या अस्तरातून बाहेर येऊन त्या काथ्याची टोके ..नेहमी हे घर नाही याची आठवण करून देत असत ..सर्वात कळस म्हणजे गाद्या व उश्या जुन्या आलेल्या त्यामूळे त्या अस्तराला बाहेरून छोटी छोटी छिद्रे पडलेली असत आणि त्या छिद्रातून आत प्रवेश करून ढेकणांनी गाडीचा ताबा घेऊन आत त्यांच्या वसाहती वसवलेल्या होत्या ..मला सुरवातीला ' टर्की ' असतांना हे फार जाणवले नाही कारण मी जास्त वेळ गादीवर थांबतच नसे ..मात्र एकदा ' टर्की ' कमी झाल्यावर छान झोप येई ..एकदा असाच झोपेत काहीतरी कानाजवळ टोचतेय असे वाटल्याने कुशीवरून डोके थोडे वर उचलले आणि पाहतो तर काय किमान १० ते १५ ढेकुण एकदम माझ्या उशीवरून पळापळ करताना दिसले ..म्हणजे ही टोळी मी कुशीवर झोपला असतांना हळूच उशीच्या ..गादीच्या कव्हर मधून बाहेर येऊन .मेजवानी करत होती तर ..मला काही सुचेपर्यंत ते चपळ ढेकुण पटापट गायब झाले .. आता मला झोप येणे शक्यच नव्हते ..मी रात्री २ वाजता ढेकुण शोध मोहीम सुरु केली ..आणि लक्षात आले हे काम इतके सोपे नाही उशी आणि गादीचे अस्तर फाडून आतल्या काथ्याच्या जंगलात शिरावे लागले असते .. एकदोन चुकार ढेकुण हाताला लागले तसे त्यांना चिरडले ..तर नवीन त्रास त्यांना चिरडल्याचा रक्ताचा डाग तर पडलाच... वर ऐक असह्य असा वास सुटला ..

मग मी वैतागून ऐक सतरंजी घेऊन ती जमिनीवर टाकली आणि उशी न घेता त्या वर झोपण्याचा प्रयत्न करू लागलो ..मध्ये डोळे उघडून आसपास पहिले तर हळू हळू गादीतून बाहेर पडून काही ढेकुण ' शिकार ' कोठे गेली याचा शोध घेत सतरंजी पर्यंत पोचलेले ..मला वाटते या प्राण्यांना रक्ताचा वास येतो व त्या आधारे हे बरोबर सावज हेरतात .. मन उगाच ढेकुण प्रजातीचा विचार करू लागले ..परदेशात ' ढेकुण ' असतील का ? यांचे आयुष्य किती काळ असते ? ढेकुण फक्त माणसांनाच चावतात व त्यांचे रक्त पितात की इतर प्राणी देखील यांना चालतात ? दोन तीन वेळा उठून बसलो आणि सतरंजी मागे पुढे केली .माझी माझी चाहूल लागून रात्रपाळीचा अटेंडंट सुनील उठला व माझ्या जवळ येऊन काय प्रकार आहे ते पाहू लागला .मी ढेकुण खूप झालेत इथे असे सांगितल्यावर त्याला फारसे नवल झालेले दिसले नाही .म्हणाला त्यांच्या कडे लक्ष देऊ नकोस उलट ते तुझ्या अंगातील ' ब्राऊन शुगर चे रक्त बाहेर काढत आहेत ..अश्या वेळी त्याचा हा जोक मला आवडला नाही मग मी शिरूर ला उठवले आणि त्याला थोडे रॉकेल मागितले ..कुर कुर करत त्याने एका मगात थोडेसे रॉकेल दिले .त्या रात्री मी टक्क जागा राहून ढेकुण दिसला की पकडून त्याला त्या रॉकेल मध्ये टाकू लागलो ..सुमारे ७० ते ८० ढेकुण तरी एका रात्रीत मी संपवले .. ढेकणांच्या बाबतीत ऐक नवीन माहिती मला सुनील ने पुरवली की त्यांना जर चिरडले तर त्यांच्या रक्तातून देखील नंतर नवीन ढेकुण तयार होतात ..हे एकूण मी हादरलोच होतो म्हणून मग रॉकेल चा वापर केला ..दुसऱ्या दिवशी सकाळी मी वार्डच्या सिनियर ना हा प्रकार सांगून त्याला काहीतरी उपाय केला पाहिजे असे म्हणालो तर ते म्हणाले एकदा सगळ्या गाद्या काढून त्यांना गच्चीवर नेऊन उन दाखवले पाहिजे तसेच सगळे पलंग नीट तपासून रॉकेल च्या बोळा फिरवला पाहिजे किवा ते पलंग झटकून त्यातील ढेकुण पकडून मारले पाहिजेत ..मोठेच काम होते एकंदरीत पन्नास तरी पलंग आणि गाद्या काढायच्या होत्या ..वार्ड मध्ये जरा समजूतदार असे जेमतेम आठ दहा पेशंट होते त्यांना मदतीला घ्यायचे मी ठरवले तसेच दोन खाजगी अटेंडंट देखील मला मदत करण्यास तयार झाले ... आधी आम्ही सगळ्या गाद्या काढण्यास सुरवात केली . त्याच वार्डात ऐक अतिशहाणा पेशंट राहत होता याचा जन्म भारतातील होता मात्र नंतर त्याचे शिक्षण इंग्लंड मध्ये झालेले होते आणि तेव्हाच केव्हातरी त्याच्या डोक्यावर परिणाम होऊन शेवटी तो मातृभूमी तिला मनोरुग्णालयात मुक्कामाला आला होता ..त्याचे नाव ' अनिल ' होते जवळ जवळ साडेसहा फुट उंच लाल गोरा .. आणि तब्येतीने चांगला असं हा गडी अतिशय फटकळ आणि उद्धट किवा मुजोर होता ..त्याच्या घरून बाहेरील ' साई ' च्या कॅन्टीन मध्ये भरपूर पैसे भरलेले होते त्यामूळे त्याला रोज कॅन्टीन मधून सकाळ संध्याकाळ चहा ..बिडी बंडल आणि हवे तेव्हा बिस्किटाचे पुडे मिळत हा फारसा वार्डात थांबत नसे ..सकाळी नाश्ता झाला की फिरतीवर जाई ते थेट जेवणाच्या वेळीच वार्डात येई ..मग दुपारी पुन्हा बाहेर जाई ते सायंकाळी ५ ला परत येई ..मग सारखे इकडे तिकडे फेऱ्या मारणे आणि बिड्या ओढत राहणे असं त्याचा कार्यक्रम .

ऐक दोन वेळा मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याने मला काहीतरी उलट उत्तर देऊन उडवून लावले होते .. अटेंडंट शी देखील तो मोठ्या तोऱ्यात बोले ..सगळे त्याच्यावर खार खाऊन होते... .पण त्यांना त्याला काही शिक्षा करता येणे शक्य नव्हते कारण तो अधीक्षक राउंड ला आले की थेट त्यांना भेटून इंग्रजी मध्ये त्यांच्याकडे तिखट मीठ लावून तक्रार करत असे तक्रार करत .तर हे गाद्या काढण्याचे काम सुरु झाल्यावर मी अनिल ला आज तू वार्डात मदत करायला थांब अशी विनंती केली तर त्याने मला झिडकारले.. ' ब्लडी इंडियंस ..फक्ऑफ ..असे काहीतरी त्याच्या भाषेत पुटपुटला .. तो क्वचितच मराठी बोले ..आणि ते मराठी उच्चार देखील इंग्रजी सारखे असत .. त्याचे मला असे फटकारणे म्हणजे माझा खूप मोठा अपमान होता ..मी त्याला शुद्ध मराठीत शिव्या दिल्या ..त्याला हे अनपेक्षित होते कारण त्याच्या आडदांड तब्येतीमुळे कोणी त्याच्या नादी लागत नसत ..माझी त्याची बाचाबाची पाहून सगळे अटेंडंट खुश झाले त्यांना माहिती होते याने तुषार ला खाजवले म्हणजे नक्की आता काहीतरी निर्णायक होणार .. त्यांनी मला इशारा केला की तू याला भीड बिंधास बाकी आम्ही पाहून घेऊ .. त्याची उंची आणि तब्येत पाहून मी जरा विचारात होतो .. शिवाय तो डोक्यावर परिणाम झालेला माणूस जर पिसाळला तर मला भारी तर पडणारच होता वर जीव देखील घेतला असता त्याने .. मी अटेंडंट ला आधी वार्ड बाहेर जाण्याचा दरवाजा बंद करायला लावला .. म्हणजे अनिल आता बाहेर जाऊ शकणार नव्हता .. माझ्या शुद्ध मराठीतील शिव्या एकून त्याला मिरची लागलीच होती .तो पुन्हा इंग्रजी मध्ये काहीतरी पुटपुटला आणि दाराकडे जाऊ लागला त्याने माझ्याकडे पाठ करताच मी त्याच्यावर मागून हल्ला केला .. त्याच्या गळ्यात मागून हात घालून त्याला अक्षरशः लटकलो आणि खाली पाडले .. तो खाली आणि मी वर ..तो जरी आडदांड होता तरी खास मारामारी च्या बाबतीत मात्र अनभिज्ञ होता तर माझे मारामारीचे प्रशिक्षण सिन्नर फाटा ..स्टेशन वाडी येथे झालेले होते मी आक्रमक पणे त्याला भिडलो होतो आणि तो फक्त बचावात्मक प्रतिकार करत होता .

=======================================================================
  भाग ७८ वा भारतीय झटका ..!

अनिल ला चष्मा होता त्याला मी खाली पाडून त्याच्यावर स्वार होऊन त्याला बुक्के मारत होतो त्यातच त्याचा चष्मा दांडी तुटून चेहऱ्यावरून खाली पडला आणि त्याचा आत्मविश्वास अजूनच कमी झाला .. मग मात्र तो शुद्ध मराठीत ''मेलो ..मेलो ..वाचवा ..हवालदार ' असे ओरडू लागला... आणि जोरात हात पाय झटकू लागला त्याच्या हाताचा ऐक फटका माझ्या तोंडावर बसला आणिमाझा ओठ फाटला..रक्त येऊ लागले .. मग अटेंडंट पुढे झाले आणि त्यांनी मारामारी सोडवली .. अनिल उठला आणि सरळ बाहेर जायचे म्हणून हट्ट करू लागला ..अटेंडंट ना माहित होते की हा आता सरळ जाऊन अधीक्षकांकडे माझी आणि सर्वांची तक्रार करणार म्हणून ..त्यांनी त्याला दार उघडण्यास नकार दिला तसा मग गुपचूप त्या जाळीच्या गेट जवळ बसून राहिला व कोणी ओवरसीयर येतोय की काय याची वाट पाहू लागला .. माझ्या ओठारतून रक्त येतच होते .

तेथे अटेंडंट म्हणजे हवालदार , हवालदाराच्या वर सिनियर .. त्याच्या वर जमादार ..आणि त्याच्याही वर ओवरसीयर चे पद होते ..हे ओवरसीयर प्रत्येक वार्डात दिवसातून किमान तीन वेळा तरी राउंड घेत असत ..त्या दिवशी नेमके सिनियर ओवरसीयर श्री .चांगलानी साहेब हे राउंड वर आले आणि गेट उघडताच अनिल त्यांच्या पुढ्यात जाऊन इंग्लिश मधून त्याची तक्रार करू लागला ..त्यांनी माझे नाव ऐकून मला समोर बोलावले तर माझा ओठ फाटलेला आणि त्यातून रक्त येत होते .. त्यांनी मला सगळा प्रकार विचारताच मी त्यांना ढेकुण नष्ट करण्याचे काम हाती घेतले म्हणून अनिल माझ्यावर चिडला आणि माझ्यावर त्याने हल्ला केला त्यात माझा ओठ फाटला असे त्यांना सांगितले .. अनिल त्यांना मी खोटे बोलतो आहे असे सांगत होता ..पण परिस्थिती माझ्या बाजूने होती .. कारण अनिल ला मी मुका मार दिला होता तर त्याचा हात लागून माझा ओठ फाटला होता हे सगळ्यांना दिसत होते ..चांगलानी साहेबांनी ताबडतोब अनिल चा फॉर्म काढून त्यावर ' एक्सायटेड .. ट्रान्सफर टू वार्ड न. १ ' असं शेरा लिहिला . एक्सायटेड.... या शेऱ्याचा तेथे अर्थ असा होता की ...सदर पेशंट हा अती उत्तेजित झालेला असून याला इतर पेशंट मध्ये ठेवणे धोक्याचे आहे त्यामूळे याला स्वतंत्र खोलीत ठेवण्यात यावे ... ताबडतोब अनिल ला क्रिमिनल म्हणून समजल्या जाणाऱ्या वार्ड नंबर १ मध्ये चार जण धरून घेऊन गेले .तेथून त्याला काही दिवस तरी अजिबात बाहेर पडता येणार नव्हते ... अनिल गेल्यावर मग आम्ही सगळ्यांनी मिळून गाद्या गच्चीवर नेल्या पलंग झटकले आणि चक्क कागद पेटवून पलंगाच्या फटीत लपलेले ढेकुण जाळून मारले ..खाली पडलेले ढेकुण पकडून रॉकेल पकडून मध्ये टाकले ..ढेकुण रॉकेल मध्ये किवा पाण्यात टाकल्यावर थोड्याच वेळात मागचा भाग वर करून त्यात तरंगू लागतो ..म्हणजे तो मेला असे समजायचे ..हा शोध मला तेथेच लागला ..रात्री झोपताना आज आपण इतके ढेकुण मारले म्हणजे खूप जीवांची हत्या केली असं विचार मनात आला व थोडे वाईट वाटले .. गांधाजी ना कधी ढेकुण चावले असतील का ? असाही ऐक गमतीदार विचार मनात आला ..जर चावले असते तर त्यांनी अहिंसेचा विचार मांडला असता का ? असाही प्रश्न मनात चमकून गेला ..शेवटी माझा मीच निष्कर्ष काढला की जर आपल्याला कोणी विनाकारण त्रास देत असेल व प्रकरण समजावण्याच्या पलीकडे असेल तर स्वसंरक्षणासाठी तरी हिंसा करावीच लागते त्यातला त्यात डास ..ढेकुण ..झुरळे ..लाल मुंग्या असे प्राणी जर चावले तर अहिंसेचा विचार मनात येणे एकंदरीत कठीणच असावे .

नंतर आठ दिवसांनी अनिल जेव्हा परत आमच्या वार्ड मध्ये ट्रान्सफर होऊन आला तेव्हा अगदी गोगलगाय झालेला होता ..त्या नंतर तो कधी कोणाला उलटून बोलला नाही ..त्याला थंड केल्याबद्दल सगळे अटेंडंट माझ्यावर खुश झाले . त्या नंतर अनिल माझ्याशी आपणहून बोले व कधी कधी तर प्रेमाने बिडी देखील पाजू लागला ..त्याच दरम्यान हॉस्पिटल चा गणेशउत्सव साजरा झाला त्यात सजावट वगैरे करायला मदत केलीच पण जेव्हा स्थापनेच्या दिवशी तेथील निवासी वैदकीय अधिकारी श्री वैद्य साहेब यांनी मला आपल्या कडे सहस्त्रावर्तने करायची आहेत तुला गणपती अथर्वशीर्ष येते का असे विचारले तर मला जरी अगदी सगळे पूर्ण येत नव्हते तरी ..लहानपणी वडील नियमित म्हणत असत ते एकून बरेचसे पाठ झाले होते म्हणून होकार दिला ..स्थापनेच्या दिवशी एकून ११ जण सहस्त्रावर्तन करण्यासाठी बसले त्यात मी देखील बसलो आणि खणखणीत स्वरात इतरांसोबत स्वर मिसळला .चक्क माझे पाठ होतेच हे मला तेव्हा समजले .. !

=======================================================================

भाग ७९ वा घरचे वेध ...!

मला दोन महिने होऊन गेले होते मेंटल हॉस्पिटलच्या दुसऱ्यांदा प्रवेश घेऊन ..मागच्या वेळी ५० दिवसांनी मला भाऊ डिस्चार्ज घेऊन घरी घेऊन गेला होता ..या वेळी दोन महिने होऊन गेले तरी कोणी भेटायलाही आले नव्हते किवा काही निरोप देखील नव्हता ..ठाण्याचा चुलत भाऊ मागच्या वेळी भेटायला आला होता त्याने सोबत माझ्यासाठी मिठाई वगैरे आणली होती ..अर्थात त्या वेळी माझी पहिली वेळ होती कदाचित सर्वांनाच मी सुधारून चांगला होऊन येईन अशी आशा होती ..पण दुसऱ्यांदा पुन्हा दाखल झाल्यावर त्यांना ही काही सुधारणारी केस नाही असे वाटले असेल म्हणून त्यांनी लक्ष दिले नसावे .. ' रोज मरे त्याला कोण रडे ' असे झाले असावे माझ्याबाबत . मेंटल हॉस्पिटल मध्ये जेवण बरे होते .. पण चपात्या खूप जाड आणि कधी कधी कच्च्या किवा जळलेल्या असत कारण त्या चपात्या लाटणारे मनोरुग्णाच होते व भाजण्यास मदत करणारे देखील तसेच .. भाज्या जरी चांगल्या असल्या तरी भाज्या चीरण्याचा तेथील प्रकार अजब होता आणलेली सर्व भाजी म्हणजे एका वेळेस सुमारे ३०० ते ४०० किलो भाजी लागत असावी ..ती भाजी एका सिमेंट च्या चौथऱ्यावर ठेवली जात असे त्या चौथऱ्याच्या बाजूला ऐक पाण्याची टाकी होती ..तर अशी आणलेली भाजी त्या चौथऱ्यावर ठेवून त्यावर भजी कापणारे हातातील मोठा कोयता सपासप चालवत त्यात त्या भाजीचे वेगवेगळ्या आकाराचे तुकडे होत असत ..मग ते तुकडे खालच्या पाण्याच्या हौदात लोटून दिले जात ..याला भाजी धुणे म्हणत असावेत ..ते तुकडे मग पाण्यातून काढून सरळ फोडणीसाठी मोठ्या भांड्यात टाकले जात ..भाजीचा मसाला मात्र खूप सुंदर बनत असे ..मिरे .लवंगा ..दालचिनी .. काळी वेलची .धणे ..असे सर्व मसाल्याचे पदार्थ आणि लाल मिरच्या हे सर्व एकत्र बारीक करण्यासाठी ऐक मोठा विजेवर चालणारा दगडी वरवंटा होता तेथे हा मसाला सर्व एकत्र पिसून झाल्यावर मग तो भाजीत टाकला जर असे .. पण यातही किचन मधील लोक मसाल्याचे पदार्थ चोरी करून घरी नेतात व त्यामूळे भाजीत मसाला कमी पडतो आणि पाणी जास्त टाकतात असे मला समजले ...

तेथे ऐक ' क्लास ' पेशंट नावाचा प्रकार होता म्हणजे काही लोकांकडून तेथे राहण्या जेवण्याचे जास्त पैसे आकारून त्याना खास तेल चोपडलेल्या चपात्या दिल्या जात त्या चपात्या चावायला जरा मउ असत ..तेथील किचन मधील एका सिनियर कुक शी मी ' काका ..मामा ..वगैरे म्हणत ओळख करून घेतली होती ..जेव्हा मी किचन मध्ये वार्डच्या टीम सोबत जेवण आणण्यासाठी जाई तेव्हा हळूच या काका च्या मागे लागून तीनचार तेल लावलेल्या चपात्या आणि एका कागदावर तो वाटलेला नुसता मसाला मागून शर्टाच्या आत लपवून आणत असे ..नुसत्या पोळीसोबत तो मसाला मस्तच लागे . व्यसन बंद असतांना मला घरी आई करत असलेल्या एकेक पदार्थांची आठवण येई ..ते पदार्थ खावेसे वाटत ..अटेंडंट ..सिस्टर किवा ड्युटीवरचे स्वीपर कधी कधी मला त्यांच्या डब्यातील पदार्थ नमुना म्हणून देत..एकदा रात्रपाळी ला असलेले अटेंडंट आणि स्वीपर ची पार्टी होती त्यांनी घरून डुकराचे मटण आणले होते व सोबत दारूच्या बाटल्या ....तेथेच सिस्टर च्या खोलीत गँसवर ते मटण शिजवले गेले मी देखील त्या पार्टीत सामील झालो होतो ..तेव्हा मला थोडी दारू देखील प्यायला मिळाली ..तेथे बरेच अटेंडंट आणि स्वीपर हे दारूच्या आहारी गेलेले होते... ते मला समजावून सांगत की तुला नशा करायची असेल तर तू दारू पीत जा पण हे ब्राऊन शुगर नको पिउस खूप भयंकर असते ते ... मला त्यांची गम्मत वाटे त्यांची स्वताची दारू पिऊन हालत खराब झालेली स्पष्ट दिसत होती तरी ते दारू चांगली आणि ब्राऊन शुगर वाईट असं फरक करत असत .

एकदा वार्डात मी आणि सुनील दुपारी ' चेस ' खेळत बसलेलो असतांना सिनियर जमादार आत आले आणि त्यांनी सगळ्यांना रांगेत बसायला सांगितले .काय प्रकार आहे ते मला समजेना त्यांच्या बरोबर भरून आलेले दोन तीन लोक होते त्या माणसांच्या हातात दोन तीन मोठे बॉक्स होते आम्हाला लाईनीत बसवल्यावर त्यांनी त्या बॉक्स मधून सफरचंदे आणि बिस्किटाचे पुडे सगळ्यांना वाटायला सुरवात केली ..मग समजले की तेथे कोणी श्रीमंत लोक वेगवेगळ्या कारणांनी मनोरुग्णांना बिस्किटे.. फळे वगैरे वाटप करण्यासाठी येत असत... रांगेत बसताना मला जरा संकोचल्या सारखे झाले... आपण भिकाऱ्यासारखे येथे रांगेत बसून त्यांच्याकडून सफरचंद आणि बिस्कीटाचा पुडा घ्यायचा तर ...पण संकोच करत का होईना बसलो रांगेत आणि घेतले पदरात पाडून जे मिळाले ते . स्वतःचा खूप रागही आला .. ! मला घरून निघताना सोबत आईने रामदास स्वामींचे ' मनाचे श्लोक ' असलेले ऐक छोटेसे पुस्तक दिले होते ते पुस्तक काढून कधी कधी मी वाचत बसे .. आमच्या इमारतीच्या मागच्या बाजूला स्टाफ राहत असलेली ऐक इमारत होती ..त्या समोरच्या एका बाकावर मी बसून कधी कधी खोल चिंतन करे ..व आता या पुढे चांगले जिवन जगायचे असे ठरवत असे ' मनाचे श्लोक ' वाचून आपण काय काय चुका केल्या कसे मनाला सैल सोडले व विषयांच्या आहारी गेलो ..मनाला गुलाम करण्या एवजी आपणच मनाचे गुलाम कसे झालो वगैरे विचार करून वाईट वाटे ... तेथे स्टाफ च्या इमारतीत ऐक कस्तुरे नावाचे ओवरसीयर राहत होते त्यांची मुलगी एकदा मी बेंचवर ' मनाचे श्लोक ' वाचत बसलेला असतांना कुतूहलाने जवळ आली आणि तिने माझी चौकशी सुरु केली ..बहुतेक तिला माझ्या बद्दल ऐकून माहित असावे ..ती नववीत होती .. तिला व्यसनांचे दुष्परिणाम या वर शाळेत ऐक निबंध लिहायचा होता त्या साठी मग मी तिला मदत केली . त्यामूळे कस्तुरे साहेबांच्या घरी माझे जाणे येणे सुरु झाले तेथे कधी कधी पोहे ..उपमा असे घरचे पदार्थ खायला मिळत .

=======================================================================
भाग ८० वा स्थलांतर .!

जरी तब्येत चांगली होत होती ..तरी मन ? मन मात्र नेहमी जुन्या मित्रांच्या ..सुमाच्या आठवणीनी बैचैन असे ..दिवसभर मेंटल हॉस्पिटल मध्ये मी अगदी मजेत घालवत असे ..आसपासच्या वातावरणाशी ..लोकांशी ..परिस्थितीशी जमेल तसे जुळवून घेत ..जमेल तेथे भांडण करीत तर काही ठिकाणी नम्रतेने लोकांची मने जिंकत होतो मात्र रात्र झाली की जशी जंगली श्वापदे बाहेर पडतात तसे माझ्या अंतर्मनातील वैफल्य ..निराशा .. बाहेर पडे .. लहानपणापासून मनाविरुध्द घडलेल्या अनेक गोष्टी .. मनात काटा बनून सलत रहात.. आणि पुन्हा अनेक अनुत्तरीत प्रश्न ..मी बराच वेळ जागत राही नाईट ड्युटीवर असलेल्या अटेंडंट सोबत मग कधी चेस खेळत आणि रात्रपाळी ला जर माझा मित्र सुनील असेल तर तो हार्मोनियम काढे ... आम्ही ' मनोरंजन कक्षात ' जाऊन बसत असू ..तेथे मी ऐकसे ऐक विरह गीते म्हणत असे ..अगदी मुकेश ..रफी .लता ..तलत ..किशोरकुमार ..हेमंतकुमार ..अरुण दाते ..सुधीर फडके ..सुनीलला मला इतकी गाणी कशी येतात याचे आश्चर्य वाटे .. त्याला जेव्हा मी संडासात रेडीओ नेऊन तासंतास ऐकत बसे हे सांगितले तेव्हा त्याला खूप गम्मत वाटली मस्करीत मला म्हणाला " तुषार ..तू जरी वागण्या बोलण्यातून नॉर्मल वाटत असला तरी ..आतून खोल मनातून .' मेंटलच ' आहेस " ..मला त्याचा राग आला नाही ..फक्त असं अर्धवट वेडा असण्यापेक्षा जर मी पूर्ण वेडा होऊन मला सगळे काही विसरता आले असते तर किती बरे झाले असते असे वाटले ..एकदा रात्री असेच हार्मोनियम घेऊन बसलेला असतांना ..खिडकीतून बाहेर लक्ष गेले तर पूर्ण चंद्र आकाशात मिरवत होता त्याचा दुधाळ..मंद ...पण स्वच्छ प्रकाश सगळीकडे पसरलेला होता मला एकदम लता मंगेशकर चे ' चांद ..फिर निकला ..मगर तुम ना आये ..जला फिर मेरा दिल करू क्या मै हाये " हे आठवले आणि मी म्हणायला सुरवात केली ..इतका मग्न झालो होतो की .... माझ्याच डोळ्यातून अश्रू येऊ लागले ..किती आर्त आणि हृदय पिळवटून टाकणारा दर्द ओतलाय लताने या गाण्यात ते जाणवले . त्या दिवशी रात्रभर झोपू शकलो नाही ..निर्मात्याने हा विश्वाचा अफाट पसारा खरोखर का निर्माण केला... आणि वर ...इतके मोह ..आकर्षणे ..हेवेदावे ..भावनांचा कधी हळुवार ..कधी बेफाम ..बेलगाम ..तर कधी विध्वंसक ..विनाशक कल्लोळ ..!

बरोबर तीन महिने पूर्ण झाल्यावर भाऊ मला डिस्चार्ज घेण्यास आला ..मी पटापटा साऱ्यांचा निरोप घेऊन आनंदाने घरी जायला निघालो ..भावाने मला मी बी.काम. पास झाल्याची बातमी दिली .. चला एकदाचा कसा का होईना पदवीधर झालो याचे बरे वाटले ...आता परत चूक करायची नाही ऐक चांगले .सरळ जिवन व्यतीत करायचे असे मनाशी ठरवले ..घरी आलो तर कळले की दोन दिवसांनी मला आई सोबत दिवाळी साठी मोठ्या बहिणीकडे ' अकोल्याला ' जायचे आहे ..आधीच रिझर्वेशन झाले होते ..माझ्या संमतीचा प्रश्नच नव्हता ..माझ्या मोठ्या बहिणीचे मी चौथीत असतानाच लग्न झाले होते ..तिचे यजमान अकोला येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये नोकरीला होते तर बहिणीने लग्नानंतर डी.एड केले व ती देखील जिल्हापरिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत होती . आम्ही अकोल्याला पोचलो तेव्हा आमचे जोरदार स्वागत झाले .. दिवाळीचे दोन दिवस मी जरा ' अंतर्मग्न ' अवस्थेतच काढले ' देख कें दुनिया की दिवाली .दिल मेरा चुपचाप जला ' असे झाले होते .. माझे असे मनातल्या मनात कुढणे सर्वाना जाणवत होते व सगळे मी आनंदी रहावे म्हणून प्रयत्न करत होते ..त्यातूनच आईने मला विचारले की ' तुषार .. तू काही दिवस जर येथेच ताई कडे राहिलास तर बरे होईल ..तिकडे नाशिकला तुला सारखी मित्रांची आठवण येते आणि त्यांना तू भेटायला जातोस मग परत परत व्यसन करतोस ..त्या ऐवजी तू एखादे वर्ष इथे रहा .. हवे तर इथे तू मराठी ..इंग्रजी चा टायपिंग चा क्लास लाव ..शॉर्टहँड शिक् म्हणजे तुला पुढे चांगली सरकारी नोकरी मिळणे सोपे होईल वगैरे ...मी नकार देण्याच्या देखील मनस्थितीत नव्हतो ..आणि आनंदाने हो देखील म्हणणे जीवावर आले माझ्या .त्यांचा सगळ्यांचा आग्रह पाहून ठरवले की चालेल ..राहू एखादे वर्ष इथे बहिणीकडे ..नाहीतरी आता नवीन जिवन सुरु करायचेच आहे तर गाव देखील बदलून पाहू !

माझ्या होकाराने आईच्या मनावरचे मोठे ओझे उतरल्यासारखे झाले .तिची माझ्या व्यसनाधीनते मुळे खूप ओढाताण होई ..भावाचे लग्न होऊन घरात आलेल्या नवीन सुने समोर माझी बाजू घेणे किवा माझे सारखे असे वागणे तिलाही अपमानास्पद होत होते ..दोन दिवसांनी मला अकोल्याला ठेऊन आई नाशिकला परत गेली .माझा भाचा तेव्हा नववीत होता तर भाची आठवीत ..ते दोघेही माझ्याशी खूप प्रेमाने वागत .. रोज कामावरून आले की मेव्हणे मला बाहेर फिरायला घेऊन जात ..थंडीचे दिवस असल्याने त्यांनी एकदा आपण रोज पहाटे उठून जवळच असलेल्या पी .के .व्ही ( पंजाबराव कृषी विद्यापीठ ) येथे फिरायला जात जाऊ छान व्यायाम होतो असा मला प्रस्ताव दिला ...मी देखील तो स्वीकारला आणि मग त्यांच्या सोबत पहाटे चार ला उठून मी फिरायला जाऊ लागलो ..येथे माझ्या स्मोकिंग वर जरी बंदी नसली तरी मर्यादा आल्या होत्या .. आणि त्याबद्दल बहिण आणि मेव्हणे देखील मला काही बोलत नसत फक्त हे सगळेच बंद झाले तर अधिक चांगले असे त्यांनी मला सुचविले होते ! पाहता पाहता महिना होत आला... मी हळू हळू अकोल्यात रमू लागलो .. सकाळी ९ ते ११ या वेळात मला मेव्ह्ण्यानी मराठी आणि इंग्रजी टायपिंग चा क्लास लावून दिला व दुपारी ३ ते चार या वेळात शॉर्टहँड चा क्लास लावला . बहिण व मेव्हणे सकाळी साडेआठलाच घराबाहेर पडत .बहिणीची शाळा जरा दूर असलेल्या खेडेगावात होती त्यामूळे तिला लवकर निघावे लागे व तिला बस स्टँड वर सोडण्यासाठी मेव्हणे तिच्यासोबत बाहेर पडत व नंतर घरी येऊन जेऊन ते कामावर जात ..भाचा आणि भाची ची शाळा दुपारची होती ते साडेअकराला शाळेत गेले की ..घरात बहिणीचे सासरे आणि मी असे दोघेच असू .. बहिणीचे सासरे देखील माझ्याशी प्रेमाने वागत होते .

1 टिप्पणी: