प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.com



गुरुवार, 21 मार्च 2013

या जन्मावर या जगण्यावर....!!!

भाग १११' गटारी आमावस्या '
मनाविरुद्ध घडलेले मला अजिबात सहन होत नाही ..अनेकवेळा वेळा मी बोलून दाखवत नसलो तरी आतल्याआत धुमसत राहतो ..आणि मग काही निमित्त मिळाले की माझा स्फोट होतो ..शक्य असेत तर ..मारामारी ..शिवीगाळ ..नाहीतर पुन्हा व्यसन सुरु करणे आहेच .. अनघा बिचारी इतकी तिच्या आईवडिलांना गळ घालून ...नाशिकला किती उत्साहाने आली ..आणि आपल्या घरातील मंडळीनी ..त्यांना अपेक्षित प्रतिसाद दिला नाही ही गोष्ट माझ्या मनात घर करून होती ..अर्थात अनघाने मला काहीही बोलून दाखवले नव्हते हा तिचा मोठेपणा ..पण जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आई ..भाऊ ..यांनी किमान ' आमच्या साखरपुड्याची तारीख तरी ठरवायला हवी होती असे माझे मत होते ..सकाळी प्रचंड पाऊस असल्याने कुठेच बाहेर पडता आले नव्हते ..म्हणजे किमान एक तासभर का होईना .. अनघाला बाहेर ..निदान गणपती मंदिरापर्यंत तरी नेवून आणावे ..गप्पा माराव्यात ही अपेक्षा देखील पावसामुळे पूर्ण होऊ शकली नव्हती .. सायंकाळी दादर नागपूर एस्प्रेस मध्ये त्यांना बसवून देण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशन वर गेलो .अनघाच्या आईवडिलांशी नेमके काय बोलावे ते कळत नव्हते ..मी गप्प गप्पच होतो ..अनघा काहीतरी बोलून माझा ताण हलका करण्याचा प्रयत्न करीत होती ..कदाचित तिला माझ्या चेहऱ्यावरून माझ्या मनस्थितीचा अंदाज आला असावा ..त्या लोकांना गाडीत बसवून मी सरळ हॉटेलमध्ये ड्युटीवर दाखल झालो ..सकाळी अर्ध्या दिवसाची सुटी घेतली होती हॉटेलला फोन करून ..तेव्हाच मँनेजर ने संध्याकाळी नक्की कामावर ये असं निरोप दिला होता म्हणून नाईलाजाने गेलो .खरेतर .इतका निराश झालो होतो की कामावर जाण्याची इच्छाच होत नव्हती ..तरी गेलो .

हॉटेल वर पोचलो तर बारच्या बाहेर च्या बाजूने लायटिंग करण्याचे काम सुरु होते ..आज कोणतीही पार्टी असल्याचे माझ्या ऐकिवात नव्हते ..तरी देखील ही रोषणाई का ? ..एका वेटर ला विचारले तर त्याने माहिती दिली ..आज गटारी अमावस्या आहे .. बार मध्ये खूप गर्दी असणार होती ..बैल पोळ्यानंतर येणारी अमावस्या नशिक ..पुणे ..मुंबई भागात ' गटारी अमावस्या ' म्हणून ओळखली जाते .. गटार ..आणि अमावास्येचा तसा काडीचाही संबंध नसतो ..मात्र ' श्रावण ' पाळून नंतर श्रावण संपल्याचा ..म्हणजेच मासाहार पुन्हा सुरु करण्याचा दिवस ..तसेच ज्या लोकांनी श्रावणात दारूच्या थेंबालाही स्पर्श केलेला नाही ..त्यांचा ' उपास ' सुटण्याचा दिवस ..थोडक्यात भरपूर दारू पिण्याचा दिवस म्हणून हा दिवस प्रसिद्ध आहे ..गटारात लोळेपर्यंत दारू ढोसणे ..म्हणून कदाचित ' गटारी अमावस्या ' म्हणत असावेत .. श्रावणात दारू सोडलेले लोक मोठ्या आतुरतेने श्रावण संपून येणाऱ्या ' पोळ्याची ' वाट पाहतात असतात . मोझेस अजून गावाहून परत न आल्याने ' बार ' चा ताबा माझ्याकडेच होता ..सायंकाळी सात पासूनच गर्दी होण्यास सुरवात झाली .. मी खूप ' बिझी ' झालो .. सारखी कॉकटेल्स आणि पेग बनविणे सुरु होते .. एकीकडे रेस्टॉरंट मधली बिले बनिविण्याचे ..कँश घेण्याचे काम देखील वेगाने सुरु होते .. रात्री १० नंतर खूप रंग चढला ' बार ' ला ...मोठमोठ्याने बोलणे ..सुरु झाले ..आज ' गटारी अमावस्या ' असल्याने असावे कदाचित आमच्या हॉटेलचे कधी काळी पिणारे स्टाफ देखील बारमध्ये हजेरी लावून एखादा पेग मारून गेले .. मँनेजर राजेश ..स्टोअर् किपर .. त्यांनी मला देखील एखादा पेग आज घेण्यास हरकत नाही असे आवर्जून .. आग्रह करून सांगितले .. त्यांना माझे पूर्वीचे ' पिणे ' ठावूक नव्हते ..नाहीतर त्यांनी मला असं आग्रह केला नसता ..शेवटी माझे नियंत्रण सुटले आणि मी एक ' ब्लडी मेरी ' चा लार्ज पेग स्वतच्या हाताने बनवून गटकावला ..तसेही तेव्हापर्यंत मी कधी ' कॉकटेल ' हा प्रकार चाखला नव्हता . नेहमी कस्टमरना ' कॉकटेल ' बनवून देताना ..याची चव एकदा घ्यायला हवी असे सुप्त आकर्षण मनात दडून बसलेले होतेच ..शिवाय अनघा प्रकरणात पदरात पडलेली निराशा .. आई..भाऊ यांच्या वरील राग होताच मनात ..एक पेग पोटात गेल्यावर ..माझ्या चित्तवृत्ती बहरल्या .. कामाचा वेगही वाढला ..बोलणे वाढले .. मग माझे पेग वर पेग रिचवणे सुरु झाले ..वेळेचे भान नव्हतेच .!


 दुसऱ्या दिवशी एकदम दुपारी १२ च्या सुमारास शुद्धीवर आलो ..पाहतो तर मी हॉटेलमधील रूम न २२० ' मध्ये झोपलेलो होतो .. खूप आळसावलो होतो ..सगळे अंग जड झालेले ..डोके प्रचंड दुखत होते ..काल रात्री नेमके काय झाले असावे ते आठवेना ..मला फक्त मी सुमारे सहा पेग प्यायल्याचे अंधुक आठवत होते .. तोंड धुवून खाली रिसेप्शनिस्ट कडे आलो तर तो मला पाहून हसू लागला ..सगळे वेटर आजूबाजूला जमा होऊन इशारे करून मला हसत होते ..मी बावचळल्या सारखा झालो ..समोरून मँनेजर आले मला हसून म्हणाले ..अरे तू तर खूप कच्चा निघालास ... एक दोन पेग पण सहन होत नाहीत तुला..त्यांना मी फक्त त्याच्या समोर दोन पेग घेतल्याचे माहित होते ..नंतर मी गुपचूप किती रिचवले असतील हे कसे माहित असणार .. पुढे मनेजर म्हणाले .. बाबारे ..काल तुला खूप चढली होती ..शेवटी तू कँश काउंटरवरच डोके ठेवून झोपला होतास .सगळी कँश उघडी होती ..मी मग तुला वेटर्स मार्फत अक्षरशः उचलून रूम मध्ये नेवून झोपवले .. स्वतः कँश काउंटर वर बसलो ..बार चे काम सांभाळले ..नशीब कँश सगळी टँली झालीय . असे म्हणत त्याने कँश बॉक्स ची किल्ली माझ्या हवाली केली ..हे ऐकून मला कसेसेच झाले ...खूप अशक्तपणा जाणवत होता ..पोटात आग ..पडली होती ..पुन्हा रुमवर जाऊन पडलो .....संध्याकाळी उठलो . सरळ ' बार ' च्या ड्युटी वर हजर झालो ..डोके खूप दुखत होते म्हणून कोणाचे लक्ष नाही असे पाहून ' रॉयल चँलेंज ' चा एक स्मॉल पेग मारला .
====================================================================

भाग ११२ नैतिक अधःपतन ..!

व्यसनाधीनते मुळे व्यसनी व्यक्तीचे सगळ्यात मोठे नुकसान होते ते ..म्हणजे त्याचे नैतिक अधःपतन ..अर्थात हे शिकायला ..मान्य करायला मला पुढेही खूप अनुभव घ्यावे लागले ..जरी व्यसन करणे बंद असले तरी .. झालेले नैतिक अधःपतन भरून यायला ..चांगल्या _वाईटाची जाण यायला बराच अवधी द्यावा लागतो ..नैतिक अधःपतन म्हणजे ..थोडक्यात सांगायचे झाले तर .इतरांच्या भावनांची पर्वा नसणारे ..आत्मकेंद्रित ..दुराग्रही ..सगळे काही माझ्या मर्जीने ..माझ्या मनासारखे घडले पाहिजे असा अट्टहास असणारे विचार आणि आपल्या इच्छेने सगळे घडावे यासाठी खोटे बोलणे ..विश्वासघात करणे .. भल्या -बुऱ्याची पर्वा नसणारे ..सगळे काही निस्तरायला मी समर्थ आहे ..असा अहंकार असणारे स्वभावदोष . माझ्याही बाबतीत हे नैतिक अधःपतन झालेले असल्यामुळे मी आई आणि भावाच्या भावना समजून घेऊ शकलो नव्हतो ..खरेतर त्यांचा निर्णय अगदी बरोबर होता .. पूर्वी मी दोन वेळा व्यसनमुक्ती साठी मेंटल हॉस्पिटल ला दाखल होतो .. बाहेर आल्यावर जेमतेम तीन चार महिने चांगला राहून ..काहीतरी निमित्ताने पुन्हा व्यसनास सुरवात केली होती ..माझी हॉटेल मधील नोकरी जेमतेम पगाराची होती .. भविष्यकाळासाठी काहीही रक्कम साठवलेली नव्हती ..अश्यावेळी किमान मध्ये जर एक वर्ष व्यसनमुक्तीचे गेले असते तर तो पर्यंत मी आर्थिक ..भावनिक..मानसिक दृष्टीकोनातून अधिक स्थिर झालो असतो व नंतर मग मी लग्न करून नवीन जवाबदारी घेण्यास हरकत नव्हती ...त्यासाठीच त्यांनी अनघाच्या आईवडिलांना अजून काही महिने थांबावे असा सल्ला दिला होता ..त्यानाही तो पटला होता .. अनघाची देखील काही हरकत नव्हती ...पण ..पण हे सगळे मला त्यावेळी समजले नाही ..मला वाटले हे लोक उगाच वेळकाढूपणा करत आहेत .. यांचा अजून माझ्यावर विश्वास नाहीय ..माझे चांगले चाललेले असतांना मुद्दाम काहीतरी अडचणी काढून मला त्रास होईल असे वागतात ...वगैरे विचार मला राग ..निराशा ..खुन्नस ..या भावनांच्या गर्तेत घेऊन गेले होते ..आणि त्याच भरात मी पुन्हा ' फक्त एकदाच' म्हणून त्या दिवशी दारू प्यायलो ...मात्र व्यसनाधीनता हा एक मनो-शारीरिक आजार असल्याने ..एकदा व्यसन बंद केल्यावर कोणत्याही कारणाने पुन्हा प्यायची नाही हा निर्धार कायम ठेवण्यासाठी जागरूक रहावे लागते .. ही जागरूकता मी बाळगली नव्हती ..इतके दिवस व्यसन केलेले नाही .आता एखादेवेळी घेण्यास काही हरकत नाही या अतींआत्मविश्वासाने दारू प्यायलो ..मग आजाराचा शारीरिक भाग सुरु झाला ..शरीर बंड करून उठले ..आणखी हवे ..अजून .अशी मागणी करू लागले आणि दुसऱ्या दिवशी मी पुन्हा प्यायलो !

आता माझ्या मनात कुटुंबियांबद्दल खूप राग होता .. त्यामूळे सततची अस्वस्थता सुरु झाली .. मनाच्या एका कोपऱ्यात बैचेनी ..उलट सुलट विचार यांचे दंद्व सुरु झाले गटार आमावस्येच्या दुसऱ्या दिवशी देखील मी गुपचूप तीन पेग प्यायलोच .. तिसऱ्या दिवशी मला खूप पश्चाताप देखील झाला .. पुन्हा नाही असे ठरवले ..मात्र ते पाळता आले नाझी ..कारण पुन्हा शरीर -मनाचे बंड सुरु झाले होते ..मग दर दोन तीन दिवसांनी माझे पिणे सुरु झाले ..रात्री मी घरी येईपर्यंत फक्त आई दार उघडण्यासाठी जागी रहात असे ..तिला वास आलाच ..तिने मला सावधही केले ..काहीतरी कारण देवून मी तिच्याकडे दुर्लक्ष करीत गेलो ..त्या काळात अनघालाही पत्र पाठवले ..अर्थात अनघाला काही सांगितले नाही पुन्हा प्यायल्या बद्दल ..तिचेही उत्तर आले ..तिचे आईवडील एकंदरीत नाशिक भेटीबद्दल समाधानी होते .. त्यांना भावाचे म्हणणे योग्य वाटले होते ..अजून फक्त सहा महिने थांबून मग साखरपुडा करू असा त्यांचाही विचार होता ..त्या दिवशी अकोल्याहून नाशिक ला येताना किती अडचणी निर्माण झाल्या या बद्दल तिने लिहिले होते ..नेमकी गाडी प्रचंड लेट आली ... हे सगळे इकडे रेल्वे स्टेशन वर गाडीची वाट पहात थांबले असतांना ..रात्री घरी कोणी नाही हे पाहून त्यांच्या घरी चोरांनी चक्कर मारून किरकोळ चोरी केली होती .. तरीही ते एकदाचे ठरवल्यानुसार नाशिक ला आले होते ..हे वाचून माझ्या मनात एक शंका आली ..त्यांनी नाशिकला येवू नये म्हणून तर अश्या अडचणी नियतीने निर्माण केल्या नसाव्यात ? म्हणजे काहीतरी अघटीत घडणार हे ठरलेलेच होते की काय ..ते घडू नये म्हणून अडचणी निर्माण झाल्या होत्या असे तर नाही ? अर्थात भविष्यात काय वाढून ठेवले आहे हे जर नेमके पणे माणसाला आधीच कळाले असते तर ..तर ...राजा दशरथाने ..कैकयीला ' वर ' दिलाच नसता .. कंसाने देवकीचे लग्न करून दिले नसते ...रावणाने सीतेचे अपहरण केले नसते !

 दर तीनचार दिवसांनी माझे दारू पिणे सुरु झाले ..तसे आता मी देखील पार्टीत वेटरच्या दारू चोरीत त्यांना साथ देवू लागलो .. बार मध्ये पेग भरताना मुद्दाम पेग कमी भरून उरलेली दारू स्वतच पिऊ लागलो ..पूर्वी मला स्टॉक घेताना दारू एक्सेस येत असे आता शॉर्ट येऊ लागली ..पगार झाला तसा आता एकदा दारू ऐवजी ब्राऊन शुगर घ्यावी असा विचार मनात आला ..मग सुटीच्या दिवशी ते ही झाले .. अनघाच्या नाशिक भेटीनंतर साधारण पणे महिनाभरातच मी पुन्हा रोज व्यसन करणे सुरु केले .. सकाळी सात वाजताच घराबाहेर पडून आधी भद्रकाली येथे जावून ब्राऊन शुगर घेणे ..मग कामावर जाणे ..रात्री पुन्हा सुटल्यावर बारा वाजता मी भद्रकालीत ब्राऊन शुगर शोधायला जाई ..शालीमार स्टॉप च्या मागच्या बाजूला असलेल्या सिव्हील हॉस्पिटल कडून भद्रकालीत जायला एक पायवाट होती त्या वेळी ...ती वाट कब्रस्तानातून जाई ..त्या कब्रस्तानाच्या शेजारीच माझा नवीन गर्दुल्ला मित्र अब्बास रहात होता .. मला नाशिकरोड चे सगळे अड्डे माहित होते ..आणि ओळखीतही होते अड्डेवाले ..नाशिक शहरात मी तसा नवीनच असल्याने अड्डेवाल्यांशी फारश्या ओळखी नव्हत्या ..ते लोक नवीन व्यक्तींला पुडी देण्यास घाबरत असत ..किवा फसवत असत म्हणून अब्बासला पकडले होते ..अब्बास भद्रकालीत जुना राहणारा होता ..त्याला सगळे 'आब्या 'म्हणत असत अत्यंत चतुर असा आब्या पूर्वी गँरेज मध्ये मँकेनिक चे काम करायचा पण व्यसनामुळे त्याने आता काम करणे बंद केले होते ..त्याचा मोठा भाऊ हनीफ हा देखील ब्राऊन शुगरचा व्यसनी होता .. आईवडील नव्हते त्यांना ..घरात फक्त एक मोठी लग्न न झालेली बहिण आणि हे दोघे भाऊ असे कब्रस्तानच्या मागील बाजूस असलेल्या एका झोपडीत रहात होते .. रात्री बारा वाजता मी आब्याकडे जाई ..त्याला पैसे दिले की मग मला झोपडीत थांबवून पुडी आणायला तो बाहेर पाडत असे .. हनीफ बहुधा तोवर भरपूर नशा करून झोपलेला असे किवा त्याच्याकडे पैसे नसतील तर जागाच असे .. मग रात्री २ वाजपर्यंत कारभार उरकून मी घरी जाई ..जास्त पैसे असतील तर सकाळचा कोटा घेऊन ठेवी ..अन्यथा पुन्हा सकाळी उठून भद्रकालीत जावे लागे .. आब्या आणि हनीफ जरी सख्खे भाऊ असले तरी ब्राऊन शुगर बाबत मात्र अगदी एकमेकांचे शत्रू असल्यासारखे स्वार्थी पणे वागत ..एकाजवळ पैसे नसले तर दुसरा त्याला सहजासहजी ब्राऊन शुगर पाजत नसे ..खूप भांडणे होत त्यांची ..कधी कधी हनीफ ला टाळण्यासाठी आब्या आणि मी झोपडीत न जाता कब्रस्तानातच मेणबत्ती पेटवून द्खाद्या कबरीचा आडोसा करून ब्राऊन शुगर पीत बसत असू ..भयाण वातावरणात ..मध्यरात्री ..कब्रस्तानात आम्ही दोघे एखाद्या भुतासारखे बसून कुजबुज करत .ब्राऊन शुगर ओढताना जर कब्रस्तानात भुते असतील तर ती देखील आम्हाला घाबरून काही काळ दूर जात असावीत असं गमतीदार विचार कधी कधी मनात येई .

========================================================================

भाग ११३ .शतदा प्रेम करावे !

 
पुन्हा पूर्ववत ब्राऊन शुगर पिणे सुरु झाल्यावर पैश्यांची चणचण भासू लागली .. नोकरीत पगार महिन्यातून एकदाच होऊ शकतो ..पण माझी रोजची पैश्यांची गरज किमान १०० रु होती ..म्हणजे पगार महिन्याला रु .५०० आणि व्यसनासाठी लागत महिना कमीत कमी ३००० रु . हे व्यस्त प्रमाण असल्याने पगार अपुरा पडू लागला ..कामावर आगावू पैसे घेणे ..उधार उसनवारी करणे हे प्रकार आधी सुरु झाले ..नंतर मग घरात आईकडे पैसे मागू लागलो ..वडिलांच्या आजारपणात बराच खर्च होत होता ..त्यात आईचे शिवणकाम वगैरे पूर्ण बंद होते ..तरीही मी रोज काही ना काही कारणाने आईकडे पैसे मागू लागलो ..ती बिचारी काहीतरी जुळवा जुळाव करून चिडून ..रडून ..शेवटी हतबल होऊन पैसे देई ..अनेकदा तिला त्यासाठी भावाशी खोटे बोलावे लागे ..एकदोन वेळा तिने गुपचूप तिच्याजवळचे दागिने गहाण ठेवले ..काही दागिने विकावे लागले ..घरात आता वाहिनी ..भावाचा मुलगा मोहित ..असे सदस्य असल्याने पूर्वीसारखे आईकडे उघड पैसे मागता येत नसत ..मग मी पहाटेच आई उठली की उठून तिला ..मला कामावर कँश शॉर्ट आलीय ..काल पैसे हरवले ..नोकरीवर भरले नाहीत तर नोकरी जाईल वगैरे कारणे सांगत असे ..तिला मग माझ्या नोकरीची काळजी वाटे..पैसे द्यावेच लागत तिला . माझे पिणे वाढत गेले तसे कामावर जाण्या येण्याच्या वेळात बदल होऊ लागले .. संडासात जास्त वेळ बसू लागलो ..तब्येतीवर होणारा परिणाम .. हे सगळे भावाच्या लक्षात आलेच ..त्याने सरळ सरळ मला सांगितले ..आता मी तुला उपचार देण्यासाठी अजिबात पुढाकार घेणार नाही ..तू तुझे पहा ..खरोखर सुधारायचे असेल तर..पुन्हा पिणे सुरु झालेय हे कबुल कर .. एकदा व्यसन पुन्हा सुरु झाले की पुन्हा नकारात्मकता जागृत होते व्यक्तिमत्वातील ..त्यामूळे मी कबुलच करत नव्हतो की मी पुन्हा पिणे सुरु केलेय म्हणून ..कारण भीती वाटे की ..हे जर पुन्हा अनघाला समजले तर ..कदाचित ती मला परत माफ करणार नाही ..माझ्यापासून कायमची दुरावेल ..शिवाय अश्या वेळी उगाचच मनात खोटा आत्मविश्वास वाटतो ..की आपण लवकरच सगळे सोडून देवू ..आपल्याला सहज जमेल पुन्हा स्वतःच्या मनाने सोडणे ..उद्यापासून नक्की बंद ..असा पोकळ निर्धार मनात करून रोज पीत गेलो ..

त्याच काळात मी नांदेड येथे ..भूविकास बँकेच्या स्पर्धा परीक्षेला बसलो होतो ..त्या परीक्षेला नांदेड येथे जायचे होते ..किमान दोन दिवस तेथे रहावे लागणार होते ..नांदेड ला माझे दोन मामा रहात असत तसेच ..एका मावस मावशीचा मुलगा देखील असतो ..कोणाकडे उतरावे हो प्रश्नच नव्हता पण तेथे ब्राऊन शुगर मिळत नाही हे मला ऐकून माहित होते .. म्हणजे जाताना सोबत जास्त स्टॉक न्यावा लागणार होता ..पण तेवढे पैसे जवळ नव्हते ..कसातरी जमेल तेवढा जेमतेम एक दिवस पुरेल इतका स्टॉक घेऊन नांदेडला निघालो .. तेथे दुसऱ्या दिवशी सकाळी पोचलो ..मामा कडे उतरण्या ऐवजी मावस भावाकडे उतरणे जास्त सोईचे वाटले ..मात्र पहिल्याच दिवशी सर्व पुड्या पिवून संपवल्या ..आता रात्री काय ? नांदेड मध्ये सगळीकडे शोधले पण ब्राऊन शुगर मिळेना ..शेवटी त्या दिवशी ' टर्की ' होऊ नये म्हणून रात्री खूप दारू प्यायलो .. मावसभावाच्या घरी रात्री घरी परतलो ..तेव्हा माझा अक्षरशः तोल जात होता चालताना ..बोलता येत नव्हते धड ..मावस भाऊ आणि वाहिनी काय ते समजले पण काही बोलले नाहीत ..मात्र नंतर रात्री ..मला तेथेच उलटी झाली ..ब्राऊन शुगरच्या ' टर्की ' चा त्रास होऊ नये म्हणून दारू प्यायलो होतो पण दारूनेही त्रास थांबला नव्हता ..रात्रभर बेडवर तडफडत होतो ..उद्या परीक्षेत काय ' दिवे ' लागणार ते उघडच होते .. सकाळी पोटात खूप आग पडलेली ..जुलाब सुरु झालेले .. नाकातून पाणी वाहते आहे .. हात पाय प्रचंड दुखत आहेत अश्या अवस्थेत परीक्षेला गेलो .कसे तरी ..काहीतरी लिहिले ..आणि सरळ नांदेडहून अकोल्याला जायचे ठरवले ..जवळचे पैसे संपलेच होते म्हणून मावसभावाकडून उसने पैसे घेऊन ..नांदेड - अकोला बस मध्ये ' टर्की ' तच बसलो ..सायंकाळी अकोल्याला बस पोचली की ..लगेच अकोल्याला ब्राऊन शुगर मिळेल ..टर्की अंद होईल या आशेने तसेच अनघाची देखील भेट घेता येईल या हेतूने अकोल्याला निघालो होतो .. वाटेत बस दोन वेळा नादुरुस्त झाली त्यात सुमारे चार तास गेले ..बस रात्री उशिरा म्हणजे ११ वाजता अकोल्याला पोचली होती..बसस्टँड वरून सरळ अड्ड्यावर गेलो तर तिथे ब्राऊन शुगर संपलेली होती ..बाकीचे अड्डे माहित नव्हते ..शिवाय इतक्या रात्री नवख्या माणसाला कोणीच ब्राऊन शुगर देवू शकणार नव्हते ..शेवटी नाईलाजाने बहिणीकडे गेलो ..ती रात्रही तडफडत होतो बिछान्यावर ..सकाळी उठून ब्रश करत बहिणीच्या घरच्या मागच्या दारात उभा होतो तर नेमका सलील 'मंदिरात आलेला होता ..त्याने मला पहिले ..त्याल खूप आनंद झाला .. आता खरे तर मला अड्ड्यावर जायचे होते ..पण सलील मला चिकटला असल्याने अड्ड्यावर जाता येईना .. त्याला कसे कटवावे ते समजेना .. त्रास सुरूच होता .. सलील कडून समजले की त्याचे आईवडील चार दिवसांसाठी बाहेर गावी लग्नाला गेलेत म्हणून .मला खूप आनंद झाला ..अनघाची भेट घेण्यासाठी सलीलच्या घरी गेलो ....अनघाला पहिले आणि माझे मनोबल वाढले ..वाटले आता अड्ड्यावर जावून ब्राऊन शुगर पिण्यापेक्षा ..दोनतीन दिवस अनघाच्या सहवासात राहून ' टर्की ' सहन करावी ..अनघाच्या नुसत्या भेटीने मला खूप ताकद मिळाली होती .. सलील ला माझे पिणे सुरु झालेय ते सांगितले नव्हते मात्र अनघाला भेटल्यावर एकांतात तिला सगळे सांगितले .. तिने फारश्या कटू प्रतिक्रिया न देता म्हणाली " हरकत नाही .आता तू इथे रहा काही दिवस म्हणजे आपोआप बंद होईल ..तुला काही त्रास होऊ देणार नाही मी ..आईबाबा घरी नाहीत तेव्हा तू आमच्या घरीच रहा इथे ..तुला काही त्रास झाला तर मी आहेच मदतीला "

 मग ते तीन दिवस मी बहिणीकडे क्वचित फक्त तोंड दखविण्यापुरता गेलो ..बाकी दिवसभर अनघाच्या सहवासात राहिलो ..तिच्याकडे अरुण दातेंची ' शुक्रतारा ' ही गाण्यांची कँसेट होती ..तिच्या मांडीवर डोके ठेवून पासून मी तासंतास ' शुक्रतारा ' ची गाणी ऐकत असे ..'टर्की ' होतच होती पण ती सहन करण्याचे बळ मला अनघाने दिले ..रात्रभर ती तशीच बसून राही कारण मी मांडीवर डोके ठेवलेले असे ..केसातून मायेने हात फिरवत ती मला धीर देई ..टर्कीत मला झोप येणे शक्यच नव्हते ..म्हणून माझ्यासाठी ती जागी रहात असे ..मी तिच्याजवळ खूप काही बडबड करत होतो ..मनातले सगळे विचार ओकत होतो .. सोबत सतत ' शुक्रतारा ' ची कँसेट आणि त्यातील कर्णमधुर अर्थपूर्ण गाणी ...' या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ' हे गाणे पूर्वी की ऐकले होते मात्र त्याचा गर्भितार्थ मला अनघाच्या मांडीवर डोके ठेवून पहुडलेला असताना जास्त समजला .. त्यातील अजून एक गाणे ' बंदिनी ' या मराठी दूरदर्शन मालिकेतील टायटल सॉंग होते .. या गाण्यात स्त्री जन्माची महती ..तिला होणारे त्रास ...तिच्या व्यथा अतिशय सुंदर मांडल्या आहेत ..स्त्री ची थोरवी तेव्हा आतून समजली .. ' रूप बहिणीचे माया देई ..वात्सल्यमूर्त आई होई ..माहेर सोडून येई ..सासरी सर्वस्व देई ..हृदयी पान्हा ..नयनी पाणी ..जन्मोजन्मीची कहाणी ...' वा किती अर्थगर्भ शब्द आहेत हे ...वेळ कसा जाई ते समजत नव्हते ... सतत चार दिवस भूक नव्हती म्हणून जेवत नव्हतो तर अनघा आग्रह करून मला किमान सरबत तरी पाजत होती .. प्रचंड सहनशीलतेने मला समजून घेत होती .. तिने ' या जन्मावर ..' हे गाणे त्या काळात माझ्याकडून पाठ करून घेतले ..असे वाटे आता परत नाशिकला जाऊच नये ..कितीही त्रास झाला तरी पुन्हा ब्राऊन शुगर घ्यायची नाही हा निर्धार तिच्या सहवासात वाढत होता .. काळ असाच हिच्या माडीवर डोके ठेवलेला असतांना थांबावा .. असेच इथेच अनघाच्या मांडीवर डोके ठेवून मरण आले तर किती बरे होईल ..सगळ्या कटकटी संपतील ..सगळे भोग थांबतील ..पुन्हा कधीच व्यसन करण्याची भीती राहणार नाही असे विचार मनात येत असत ,..तर एकीकडे अनघा भविष्यातील सुंदर स्वप्नांबाबत माझ्याशी बोले ..

===============================================================

भाग ११४ वा  है ये कैसा सफर ..!

अनघाच्या सहवासात ' टर्की ' सहन करत गेलो .. पुन्हा नाशिकला जाऊच नये असे वाटत असले तरी ..जाणे भाग होते .. ' या जन्मावर ' हे गाणे इतके वेळा ऐकले होते मी त्या तीन दिवसात की अगदी अकोल्याहून परत यायला निघालो तेव्हा रेल्वेत देखील सारखे ते गाणे माझ्या मनात कोणीतरी टेप लावल्यासारखे ऐकू येत होते ..एकदा केव्हा तरी ' नामजप ' करणाऱ्या लोकांबद्दल वाचले होते की काही काळानंतर ' नामजप ' करणे बंद केले तरीही आपोआप मनातल्या मनात ' नाम ' ऐकू येत राहते आणि जप होत जाते अगदी तसाच काहीसा हा अनुभव होता ..नाशिकला परत येताना पुन्हा व्यसन करायचे नाही हा निश्चय केलाच होता .. त्या नुसार नियमित पुन्हा कामावर जाणे सुरु केले ..मात्र व्यसन बंद केल्यावर एकदम जाणवले की गेल्या दोन महिन्यात किती प्रचंड आर्थिक नुकसान करून ठेवले आहे ..उधाऱ्या ..झालेल्या होत्या ..हे नुकसान भरून काढण्यासाठी वेळ द्यावा लागणार होता .. निर्धाराने कामाला लागलो ..साधारण पणे आठ दिवस झाले असतील ..एकदा सायकल पंक्चर होती म्हणून बसने जायला निघालो होतो ...थेट बस मिळाली नाही म्हणून मुंबई आग्रा रोड पर्यंत एका बसने आणि तेथून पुढे दुसऱ्या बसने जाणार होतो ..मुंबई आग्रा रोडवर ज्याला ' बॉम्बे नाका ' म्हणतात तेथे बसची वाट पहात उभा असतांना अचानक इगतपुरी कडे जाणाऱ्या एका टँक्सीतून कोणीतरी ' तुषार ..तुषार ..' असे मोठ्याने ओरड्लें आणि टँक्सी थांबली ..पाहतो तर त्यात माझे नाशिकरोडचे गर्दुल्ले मित्र बसलेले होते ..हरीष ..राजू..अरुण वगैरे .. त्यांना पाहून हृदयाचा ठोका चुकला माझ्या ..खूप दिवसांनी ही मंडळी अशी अचानक भेटली होती ..आज काल तू येत नाहीस नाशिकरोड ला .. कुठे असतोस ..वगैरे चौकशी सुरु झाली ..त्यांना विचारले तुम्ही कुठे निघालात तर ..ते इगतपुरी ला ' माल ' आणायला निघाले आहेत असे समजले ..राजू ने नवीन टँक्सी घेतली होती बँकेचे कर्ज काढून ..नाशिकरोड ते नाशिक अश्या तो फेऱ्या करत असे .. इगतपुरीला सध्या खूप स्वस्त आणि एकदम मस्त ' माल ' ( ब्राऊन शुगर ) मिळतो अशीही माहिती त्यांनी माहिती पुरवली .. त्यांनी चल आमच्याबरोबर इगतपुरीला .. असे म्हणताच ..मी थोडासा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण खरे सांगायचे तर इगतपुरीला स्वस्त आणि एकदम पिवर ' माल ' मिळतोय हे ऐकून माझ्या मनात खळबळ सुरु झाली होती ..गेले काही दिवस आपण बंद केलेलेच आहे आता योगायोगाने हे मित्र भेटले आहेत ..एकदा इगतपुरी ला जायला काय हरकत आहे असे विचार मनात जोर धरू लागले ..एकदा का या विचारांना तुम्ही थारा दिलात की मग आपोआप स्वत:च स्वत:चे समर्थन करणे सुरु होते ..आपला कंट्रोल राहील .. आपल्याला एकदा केले तरी काही फरक पडणार नाही वगैरे ..मग अंतर्मनाचा निर्धार ढासळू लागतो ...मी लगेच त्यांच्यासोबत टँक्सीत बसलो ...!

व्हायचे तेच झाले पुढे ..पुन्हा दर एकदोन दिवसांनी ..पिणे सुरु झाले ..पिवून झाले की अपराधीपणाची भावना ..पश्चाताप ..आणि नशा उतरली की प्रचंड निराशा ..रितेपण ..अडचणी ..चिंतांचा बागुलबुवा ..फक्त ' एकदाच ' अशी मानसिक ओढ ..शारीरिक त्रास ..शेवटी सगळे निर्धार शून्य ..असे हे ' दुष्टचक्र ' होते ..आता पुन्हा घरी कटकटी सुरु झाल्या .. भावाने सगळे ताडले होते ...हा नालायक त्या बिचाऱ्या चांगल्या मुलीला फसवतोय हे त्याच्या लक्षात आले ..रोज भावाची आणि माझी वादावादी सुरु झाली ..आईकडे पैसे मागणे वाढले ..अनेकदा आईकडे पैसे नसत तेव्हा ती शेजारच्या मैत्रिणींकडून पैसे उधार घेऊन मला देत असे .. कारण याने पैश्यांसाठी बाहेर काही भानगडी करू नयेत हा तिचा उद्देश असे .. कधी कधी ती माझा हात धरून ओढत मला समोरच्या खोलीत वडिलांकडे नेई ..व ' अहो ..तुम्ही याला काही तरी बोला हो ..बघा कसा त्रास देतोय मला ..तुम्ही असे आजारी ..मुके का झालात .. याला धडा शिकवा काहीतरी .. " पक्षाघात झाल्याने बिछान्याला खिळलेले वडील नुसते मान हलवत ..त्यांच्या डोळ्यातून घळाघळा ..अश्रू येत ..मलाही खूप रडू येई ..पण पैसे मात्र हवेच असत .. आजही ते सगळे आठवले तरी वाटते ..मी केलेल्या या गोष्टीना कदाचित निसर्ग कधीच माफ करणार नाही ..खूप राग येतो स्वतचा ....परिस्थितीचा .. एकदा रात्री घरी आल्यावर आईने सांगितले की तुझे असे वागणे पाहून मोठ्या भावाने तुझे लग्न वगैरे कारण देण्यात काही अर्थ नाही असा निर्णय घेतला आहे व त्याने तश्या आशयाचे पत्र अनघाच्या वडिलांना पाठवले आहे .. आजच सायंकाळी पत्र पोस्ट केलेय त्याने .. खरे तर आईने हे मला मी भानावर येण्यासाठी सांगितले होते ..तिला वाटले की हे ऐकून तरी मी व्यसन बंद करीन पण..मी तसे न करता सकाळी ९ लाच ' मेरी ' च्या मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये गेलो आणि ते पत्राचे पाकीट पुढे रवाना होण्यापूर्वीच एक अर्ज देवून माझ्या ताब्यात घेतले..त्यात भावाने ..अनघाच्या वडिलांना उद्देशून लिहिले होते की ..' माझा भाऊ सुधारेल असे काही आम्हाला वाटत नाहीय..त्यामूळे उगाच तुम्ही आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी करून देण्याची चूक न करता .. तिच्यासाठी एखादे चांगले स्थळ पहा ..' पत्र वाचून माझ्या अंगाचा तिळपापड झाला .. भावाचा खूप राग आला ..अर्थात त्याचे काहीच चुकले नव्हते ..सर्व चूक माझीच होती तरीही मी त्याच्यावर राग ठेवून होतो ..अ ..रागात पिणे आणखीन वाढले ..आतून मलाही समजत होते .. मी अनघाला सुखी करू शकणार नाहीय ..पण तसे उघड कबुल करणे कठीण जात होते .. मनाच्या कोपऱ्यात अजूनही सुप्त अहंकार मला सांगत होता की ' मी सगळे काही नीट निभावून नेवू शकतो '

अखेर ..खूप निराश होत गेलो ..आपले जिवन व्यर्थ आहे ..आपल्या जगण्याला काही अर्थ नाही असे वाटू लागले ..त्याच काळात एकदा पैसे नव्हते म्हणून सायकल विकली ..दुरुस्तीला टाकली आहे असे घरी सांगितले ..मग घरून बस भाड्याचे पैसे घेऊन कामावर न जाता दिवसभर ब्राऊन शुगर च्या साठी मित्रांच्या मागे भटकणे सुरु झाले .. आठवडाभर कामावर गेलोच नाही .. डोके फिरल्यासारखे वागत होतो .. भावाला जर विनंती केली असती की मला तू पुन्हा ' उपचारांसाठी दाखल कर ..तर त्याने तसे नक्कीच केले असते ..पण भावावरील राग तसे करू देत नव्हता ..आता कामावर दांडी का मारली असे विचारले तर बहाणा म्हणून एकदा डोक्यावरचे सगळे केसच काढून अक्षरश: ' चप्पी ' केली डोक्याची .. आणि कामावर सांगितले की माझे काका वारले म्हणून केस काढले आहेत .. त्याच वैफल्याच्या भरात ..एका रात्री घरात उंदीर मारण्यासाठी आणलेल्या ' रँट पॉयझन ' च्या पावडर चे पाकीट दिसले .. वाटले संपवून टाकावे जिवन .. त्या दिवशी रात्री सगळे झोपल्यावर ती पावडर काढली नुसती कशी खायची म्हणून कपभर दुधात ती राखाडी रंगाची पावडर मिसळली आणि ते दुध प्यायलो ..( बाकी पुढील भागात )

========================================================================

भाग ११५ वा  घर सोडले ..मुंबई !
रँट पॉयझन ची पावडर दुधात टाकून प्यायलो .. वाटले होते आपला कारभार संपेल आता .. सगळ्या कटकटी संपतील .. पाच मिनिटातच मला प्रचंड ओका-या सुरु झाल्या ..उलटी द्वारे सगळे बाहेर पडले ..सगळी नशाही उतरली .. मरण इतके सोपेणाने मला मिळणार नसावे बहुतेक ..कर्माचे संचित बाकी होते .. रात्रभर अधून मधून उलटीची उबळ येत होती ..तोंडात त्या पावडरची कडवट चव आणि नाकात उग्र वास रेंगाळून राहिला होता .. पुढे काय हा प्रश्न होताच .. आता कामावर तोंड दाखवावेसे वाटेना .. अनघाला कसे तोंड द्यायचे .. घरातील माझा नेहमीचा त्रास कसा थांबवायचा यावर एक उपाय बाकी होता तो म्हणजे घर सोडून निघून जाणे ...कुठेही जाऊ ..कसे ही राहू ..पण घरच्या लोकांना आपला त्रास या पुढे नकोच असे वाटू लागले .. सकाळी आई उठल्याबरोबर तिला मी कुठेतरी दूर निघून जातोय असे म्हंटले ..तिने त्यापेक्षा चांगला रहा ..व्यसने सोड असे समजाविण्याचा प्रयत्न केला ..पण लहानपणापासून कधी कुणाचे ऐकले नव्हते म्हणून तर ही वेळ आलेली .. शेवटी आईचा नाईलाज झाला .. तिने मला पाचशे रुपये काढून दिले ..म्हणाली ..सुखरूप रहा .. ती देखील माझ्या वागण्याने खूप त्रस्त होती तरी मायेचा पाश तिला सोडवत नव्हता ..कधीतरी हा सुधारेल ..सगळे व्यवस्थित होईल ही आशा अजूनही तिच्या मनात होती ..तिच्या डोळ्यातील अश्रुंकडे दुर्लक्ष करीत मी सोबत एक शबनम पिशवी घेतली ..त्यात एक शर्ट ..पँट ..टॉवेल इतके कपडे घेऊन सकाळी सहालाच घराबाहेर पडलो ..आता मागे जे होईल ते होईल .. आपण विचार करायचा नाही .. अड्यावर जाऊन आधी चार पुड्या घेतल्या ..जवळ आता फक्त तीनशे रुपये उरले होते रेल्वे स्टेशन वर येऊन सरळ पंचवटी एक्सप्रेस पकडली ..

गाडी जशी जशी पुढे वेगात निघाली होती त्याच वेगात भूतकाळातील क्षण झरझर मनात येवून जात होते ..आतल्या आत रडत होतो ..एकदा लहानपणी क्रिकेट खेळताना माझ्या पायात नारळाची करवंटी घुसून पायाची शीर कापली गेली होती तेव्हा ..रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या ..धावपळ करून वडिलांनी मला दवाखान्यात नेले होते ..तेथे सांगितले गेले की टाके घालावे लागतील त्यासाठी दुसऱ्या स्पेशालिस्ट कडे न्या ..वडिलांजवळ पुरेसे पैसे नव्हते ..उसने पैसे घेऊन त्यांनी मला मोठ्या दवाखान्यात नेले ..दोन दिवस तेथे राहून घरी आल्यावर एक महिना विश्रांती व्हायची होती ..पायाची जखम मोठी होती ..त्या काळात घरी बेडवर पडून पडून खूप कंटाळा येई तेव्हा टी .व्ही नव्हते ..आई माझ्याशी पत्ते खेळत बसे .. थोडा एका पायावर लंगडत चालू लागलो तेव्हा .. घरातच आई बरोबर क्रिकेट खेळत असे ..महिन्यातून एकदा वडिलांचा पगार झाला की ते आम्हाला सगळ्यांना त्यावेळी नाशिकरोड ला प्रसिद्ध असलेल्या हॉटेल ' पवन ' मध्ये मसाला डोसा खायला घेऊन जात .. दिवाळी साठी आम्हाला सोबत नेवून नवे कपडे ..फटाके घेवून देत असत ..वडील स्वतःसाठी मात्र बजेट नसल्याने काही घेत नव्हते .. आई शिवणकाम करून ते पैसे माझे हट्ट पुरविण्यासाठी खर्च करत असे ...सगळे आठवून आतून सारखे उमाळे येत होते ..रेल्वेच्या संडासात जावून ब्राऊन शुगर ओढता ओढता रडत होतो ..मुंबईला कुठे जायचे हे नक्की नव्हतेच .. कोणत्याही नातलगाकडे जावू नकोस असे आईने आधीच बजावले होते .. गाडी थेट व्ही .टी ( छत्रपती शिवाजी टर्मिनस ) ला पोचली तेथे उतरून मग प्लाटफॉर्म वर फिरू लागलो .. एक पुडी शिल्लक होती ब्राऊन शुगरची .ज्या भागातून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात त्या ठिकाणी अगदी कोपऱ्यातल्या प्लँटफॉर्म वर गेलो तेथे पार्सल विभागाची पोती ठेवलेली होती त्याच्या मागे डोकावले तर तेथे दोन तीन जण कोंडाळे करून ब्राऊन शुगर ओढत बसले होते .. अगदी फाटके मळके कपडे ..डोक्यावर तेलपाणी नसलेले केसांचे जंगल ..अशी भणंग अवस्था होती त्यांची.. ..त्यांच्या सोबत बसून ब्राऊन शुगर ओढणे सुरु केले ... कुठला ..काय अश्या चौकशा केल्या त्यांनी ..मी चप्पी केलेल्या डोक्यावर एक ' पी ' कँप घातली होती ..त्यांनी त्या बद्दल विचारताच खोटेच सांगितले वडील वारले असे .. म्हणजे असे खोटे सांगून मी त्यांची सहानुभूती मिळवत होतो .

 त्यांच्या बोलण्यातून समजले की ' चुनाभट्टी ' येथे ब्राऊन शुगर अगदी स्वस्त मिळते फक्त चार रुपयांना एक पुडी ..नाशिकला जी पुडी २५ रुपयांना मिळायची ती पुडी फक्त चार रुपयांना मिळत होती .. लगेच त्यांच्या सोबत लोकल ने चुनाभट्टीला गेलो ..चुना भट्टी रेल्वे स्टेशन पासून सुमारे शंभर मीटर रेल्वे टूँक लाच लागून एक झोपडपट्टी होती तेथे बहुतेक सगळ्या दक्षिण भारतीय लोकांची वस्ती होती ..त्या वस्तीत दोन तीन ठिकाणी ब्राऊन शुगर विकण्याचे काम चालले होते .. जवळच्या दोनशे रुपयांच्या पन्नास पुड्या घेतल्या .. तेथेच रेल्वे रुळाच्या बाजूलाच अनेक गर्दुल्ले पीत बसलेले होते ..वारा लागू नये म्हणून सगळ्यांनी डोक्यावर एक पोते पांघरले होते आणि त्या आडोश्यात बिनधास्त पिणे सुरु होते .. बाजूच्या रस्त्याने लोकांची ये जा सुरु होती ..कोणी ढुंकूनही यांच्याकडे पहात नव्हते ..इतके बिनधास्तपणे नाशिकला पिता आले असते तर किती बरे झाले असते असं विचार मनात चमकून गेला ...मी देखील तिथेच त्यांच्या बाजूलाच बसून चेसिंग करू लागलो .. रात्र होत आली होती ..आता झोपायचे कुठे हा प्रश्न होता .. त्यांच्यापैकी एकजण बोलण्यास जरा बरा वाटला ..त्याला माझी अडचण सांगितली तर तो म्हणाला ' मै तो रेल्वे स्टेशन पर ही सो जाता हुं , तुम भी मेरे साथ सो जाना ' ..रात्री आम्लेट पाव खाऊन 'चुनाभट्टी ' रेल्वे स्टेशन च्या फलाटावरच मुक्काम ठोकला.. वाटेत वाचण्यासाठी वर्तमान पत्र घेतले होते ते अंथरून त्यावर अंग टाकले . नोव्हेम्बर महिना होता ..बऱ्यापैकी थंडी वाटत होती तसाच पोटाशी पाय घेऊन पडून राहिलो .. सोबतच्या गर्दुल्ल्या जवळ एक फाटके खूप जीर्ण झालेले कांबळ होते ते त्याने अर्धे मला घ्यायला परवानगी दिली तेव्हा जरा उब आली .
( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें