प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.comमंगलवार, 12 मार्च 2013

कॅंपस हिरो

भाग २६ 

बारावी पंचवटी कॉलेज नाशिक येथे केल्यानंतर ...FY .B.com साठी मी बिटको कॉलेज नाशिकरोड येथे प्रवेश घेतला . नाशिक रोड ला राहत असल्याने येथे सर्व मित्रच होते . पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल मध्ये सोबत असलेले सगळे पुन्हा बिटको कॉलेज मध्ये भेटले . मी चांगला गातो हे सर्वाना माहित होते तेव्हा उपनगर येथे राहणाऱ्या विजय ओहोळ ( विजय ओहोळ हा नंतर कोंग्रेस चा नगरसेवक देखील झाला होता ) नावाच्या माझ्या मित्राने युवक महोत्सवात होणाऱ्या समूहगीत स्पर्धेत पाठविल्या जाणाऱ्या समूहासाठी माझी शिफारस किरण कुलथे या कॉलेज च्या नामांकित गायकाकडे केली . किरण कुलथे समूह्गीता करिता निवडल्या जाणाऱ्या समूहाचा प्रमुख होता तर ज्योती गुंडाळे ही समूहाच्या मुलींची प्रमुख होती . किरण कुलथे आणि ज्योती गुंडाळे या जोडीने व्यक्तिगत तसेच समूह गीत स्पर्धेत या पूर्वी कॉलेज ला प्राविण्य मिळवून दिले होते .आधी माझ्या गाण्याची चाचणी घेण्यात आली त्या वेळी मी ' सखी मंद झाल्या तारका ' हे सुधीर फडके यांनी गायिलेले गाणे म्हंटले आणि माझी निवड झाली . त्या वर्षी पुणे विद्यापीठाचा युवक महोत्सव अंमळनेर येथे होणार होता . आम्ही नाशिकचे प्रसिद्ध गीतकार आणि संगीतकार गायकवाड सर् यांचे ' रे आभाळा ' हे निसर्गगीत समूहगीत म्हणून बसवले होते गायकवाड सर् नियमित तालमींना येत असत त्यांनी देखील माझ्या निवडीवर शिक्कामोर्तब केले . 

माझे गांजा पिणे , भांग खाणे नियमित सुरु होतेच , त्यावेळी मी फुटू नये म्हणून बनविलेली स्टील ची चिलीम नेहमी माझ्या खिशातच असे आमचा गांजा पिणाऱ्या मित्रांपैकी चार पाच जण बिटको कॉलेजलाच होते त्यामुळे कॉलेज च्या समोर असलेल्या ' मिलन ' होटेल मध्ये तास बुडवून आमचे चिलीम पिणे सर्रास चाले मालक काही बोलला तर मग होटेल च्या बाहेर च्या भागात जाऊन आमचा उद्योग सुरु राही . मात्र समूह्गीताच्या तालमींना मी नियमित जात असे पाच मुली आणि पाच मुले असा आमचा समूहगीताचा मिश्र समूह होता होता . एकदाचा युवक महोत्सव १ दिवसावर येऊन ठेपला आणि जय्यत तयारी करून आम्ही कॉलेज ने केलेल्या स्पेशल बस मधून आदल्या दिवशी रात्री अंमळनेर येथे जाण्यास निघालो . समूह नृत्य , एकांकिका , काव्यवाचन , आणि एकदोन इतर सांस्कृतिक स्पर्धेचे मिळून एकूण सुमारे ४० जण होतो आम्ही . कॉलेजचे जी.एस त्या वेळी निवृत्ती अरिंगळे आणि राजू विभांडिक हे दोघे होते हे दोघेही जी.एस तसे स्वभावाने साधे होते तरी त्यांचा चांगला दरारा होता . आमची गंजडी टीम सोबत नसल्याने गांजा पिणारा मी एकटाच होतो , बसमध्ये सोबत मुली देखील असल्याने चिलीम पिणे जरा कठीणच होते म्हणून मी सिगरेट मध्ये गांजा भरून ओढायच्या वेळी मागच्या बाजूला मुलांमध्ये जाऊन बसत असे , निवृत्ती आणि मनोहर ला माहित होते याला समजावून सांगून काही फायदा होणार नाही फक्त याने काही भानगड करू नये या कडे मात्र लक्ष ठेवले पाहिजे . 

एकूण तीन दिवस युवक महोत्सव होता पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात काव्य वाचन झाले आमच्या कॉलेज तर्फे साधना सुराणा ने तिच्या कविता सुंदर वाचल्या . एकूण पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या ४० कॉलेजेस ची मुले तेथे आली होती म्हणजे सुमारे १५०० तरुण मले मुली अंमळनेर शहरात जमली होती आमची सगळ्यांची राहण्याची सोय महाराणा प्रताप कॉलेज च्या होस्टेल वर होती तर मुलींची सोय मुलींच्या वसतिगृहात करण्यात आली होती दिवसभर स्पर्धेसाठी आणि जेवण वगैरे साठी आम्ही मुले मुली एकत्र राहत असू व रात्री झोपण्याच्या वेळी आपापल्या वसतिगृहात जावे लागे , आमच्या सोबत व्यवस्थापक म्हणून श्री . फडके सर् होते . दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ ला आमचे समूहगीत झाले ' रे आभाळा ' , हे निसर्गगीत पाऊस पडण्याच्या आनंदाचे वर्णन करणारे होते , गम्मत अशी की आमचे गीत झाल्यावर साधारण १० मिनिटात पाऊस पडला अर्थात हिवाळा असून देखील पाऊस पडणे म्हणजे जरा आश्चर्यकारक होते , ही निसर्गाची लीला होती मात्र आम्हाला उगाचच वाटले की आमच्या गाण्यामुळे पासून पडला . त्याच दिवशी समूह् गीत स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आणि आमच्या कॉलेज ला प्रथम क्रमांक मिळाला . ही बातमी कळताच आम्ही सगळ्यांनी जल्लोष केला , लगेच सगळी मुले रात्री ८ वाजता अंमळनेर गावात फिरायला बाहेर पडली . बाहेरगावी असल्याने जरा अधिकच उत्साह होता सगळ्या मुलांमध्ये पार्टी झाली असा मुड होता म्हणून आमच्या पैकी काही मुलांनी दारू प्यायली मी होतोच अर्थात या पिणाऱ्या मंडळी मध्ये ,मग माझी चिलीम ओढणे देखील झाले आणि सगळी मंडळी होस्टेल कडे परत यायला निघाली आता पोटात दारू असल्याने आमचे आवाज वाढले होते , तसेच विजयाची धुंदी होती डोक्यात .आम्ही त्या वेळी प्रसिध्द असलेले " बचके रहेना रे बाबा ,बचके रहेना रे " गाणे मोठ मोठ्याने म्हणत रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची छेड काढत होस्टेल कडे निघालो होतो , आमचा धिंगाणा पाहून तेथील एका सज्जन नागरिकाने आम्हाला थांबवून सांगितले की ' मुलानो , तुम्ही रस्त्याने हा जो काही धिंगाणा करत निघाला आहात हे ठीक नाही इथे नवीन पोलीस इन्स्पेक्टर बदलून आलाय बाजीराव पाटील म्हणून तो खूप कडक आहे , उगाच अडकाल " त्याचे सांगणे आम्ही हसण्यावारी नेले आणि परत तसेच चाळे करत करत होस्टेल ला पोचलो तेथे कळले की नाशिक विभागातील समूह नृत्याला देखील बक्षिस लागले आहे झाले परत आरडा ओरडा जल्लोष सुरु झाला . नाशिक विभागातील बी .वाय कें , एच .पी .टी , आर .वाय .कें , एन .बी .टी लों या कॉलेजेस ची देखील मुले आमच्या धिंगाण्यात सामील झाली त्यावेळी बी .वाय .कें कॉलेज चा जी .एस .अतुल चांडक हा होता . आम्ही बोंगो ,कोंगो ही वाद्ये बाहेर काढली आणि तेथेच होस्टेल च्या पटांगणात नाचणे सुरु केले , वर नशिक चा जयजय कार करणे सुरु होतेच . 
राडा ..दांगोडा.. ! 

========================================================================

भाग २७

नाशिक विभागातील बहुतेक सर्व मुले गोळा होऊन मोठ्याने आरडा ओरडा करत नाचत होती ( साधी सरळ मुले मात्र केव्हाच आपल्या खोल्यात झोपली होती ) आम्ही बहुतेक जण दारू पिऊन करत असलेला धिंगाणा ..रात्रीचे ११ वाजून गेलेले . आमची राहण्याची सोय केलेल्या महाराणा प्रताप कॉलेजच्या वसतिगृहातील तळ मजल्यावर केलेली होती तर वरच्या मजल्यावर त्याच कॉलेजच्या ह 
ोस्टेल ची मुले राहत होती त्यांची परीक्षा महोत्सव संपल्यावर काही दिवसातच होणार असल्याने रात्री बहुतेक मुले आभ्यासात मग्न होती सुरवातीला आमचा धिंगाणा पाहून ती सगळी मुले वरच्या मजल्यावरच्या गँलरीत जमा होऊन आमची गम्मत पाहू लागली मात्र अर्धा तास होऊन गेला तरी आमचा गोंधळ काही थांबेना , आमच्या सोबतचे सर्व व्यवस्थापक त्यांना सोय करून दिलेल्या वेगळ्या निवासस्थानी केव्हाच झोपलेले , कॉलेजचे जी .एस अधूनमधून आम्हाला चला रे बस करा आता म्हणत होते पण दारू पिऊन धुंद झालेली आणि विजयाचा उन्माद संचारलेली मुले ऐकणार थोडीच होती कोणाचे . वरच्या मजल्यावर गोळा झालेल्या स्थानिक मुलांचे कुतूहल शमले तसे त्यांच्यापैकी एकाने ' ओ ..भाऊ चला बर आता तुम्ही झोपून जा , असे ओरडून म्हंटले ' तसे आमच्यातील एकाने ' ए ..आज रातभर नही सोयेंगे ..मस्ती करेंगे ..नाचेंगे, आम्ही पाहुणे आहोत तुमचे " ' असे प्रत्युत्तर दिले आणि पुन्हा एकदा जयजयकार सुरु केला आम्ही . आमचे असे उत्तर एकून वरची मुले चिडली असावीत ' पाहुणे आहात तर पाहुण्याच्या पायरीने रहा , दांगोडा करायचा असेल तर तसे सांगा ' असे उत्तर आले वरून , नशेत असलेल्या आम्हाला देखील या उत्तराचा राग आला आणि ' तुम्हाला काय करायचे ते करा .. म्हणत आरडा ओरडा सुरु केला , त्यावर प्रतिक्रिया म्हणून वरच्या मजल्यावरून एक खुर्ची आमच्या घोळक्यात फेकली गेली ती कोणाच्या अंगावर पडली नाही पण आम्ही वाजवत असलेल्या कोंगोवर पडली , झाले ठिणगी उडाली , आम्ही लगेच शिवीगाळ सुरु केली , ती पडलेली खुर्ची जमिनीवर आपटून तिचे पाय मोकळे केले गेले , ते खुर्चीच्या पायाचे दांडे हातात घेऊन आम्ही वर ललकारले ' आओ सालो .. मैदानमें , हिम्मत असेल तर खाली येऊन बोला ' मी त्या वेळी लावारीस टाईप बूट घातलेले होते त्याच्या आत माझे ते लोखंडी चेन ला गोळा लावलेले हत्यार लपवले होते ते बाहेर काढले . 

आता परिस्थिती गंभीर झालेली होती मग आमच्या लक्षात आले की आम्ही धिंगाणा करणारे सुमारे ३० मुले होतो आणि हळू हळू वरच्या होस्टेल मधली मुले खाली येऊन चारही बाजूने आम्हाला घेरत होती एव्हाना ही बातमी आमचे व्यवस्थापक फडके सर् यांच्या पर्यंत पोचली होती ते धावत येऊन आम्हाला समजावू लागले पण आम्ही ऐकायला तयार नव्हतो कोणीतरी राणाप्रताप कॉलेजच्या होस्टेल वार्डन ने ऑफिस मध्ये जाऊन पोलिसांना फोन केला आहे अशी खबर आणली , तशी आम्ही फडके रस आम्हाला खूप रागावले आणि त्यांनी आम्हाला आमच्या खोल्यात कोंबायला सुरवात केली एकूण तीन खोल्यात त्यांनी आम्हाला कोंबले आणि बाहेरून दाराला कड्या लावून घेतल्या ते बाहेरून ओरडून सांगत होते " तुम्ही सगळे झोपा आता गुपचूप , पोलीस येणार आहेत '" आमच्या जागा बदलल्या गेल्या होत्या आमचे सामान दुसऱ्या खोलीत तर आम्ही तिसऱ्याच खोलीत असे झाले होते . घडल्या प्रकारची दबक्या आवाजात चर्चा करत आम्ही मिळेल त्या ठिकाणी बसलो , खोलीत आधीच काही साधी सरळ मुले झोपी गेलेली होती , त्यांना एकदम काय गोंधळ आहे ते समजेना त्यांना बाजूला सरकायला सांगत आम्ही जागा करून घेतली आमच्यासाठी , साधारण १५ मिनिटे झाली असावीत तरी बाहेरून कसली चाहूल लागेना , आम्हाला वाटले फडके सरांनी आम्हाला घाबरवले असावे पोलिसांचे नाव सांगून. थोडे निवांत झालो तशी मी चिलीम काढून गांजाचे दम मारले , एकदोघांना मी चिलीम ऑफर केली पण त्यांनी नाकारली व माझ्याकडे ते कुतूहलाने पाहू लागले तशी मला अजून जोर चढला , जोरात दम मारून , मी किती बिनधास्त आहे हे प्रदर्शन करू लागलो तितक्यात दुरून पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू आला तसे आमचे धाबे दणाणले , मी पटकन चिलीम विझवून माझ्या बुटात लपवली , कोणीतरी म्हणाले लाईट बंद करा खोलीतील म्हणजे पोलिसांना वाटेल आपण झोपलो आहोत , लाईट बंद करून आम्ही उताणे पडून बाहेरील आवाजांचा कानोसा घेत होतो . 

मोठमोठ्याने बोलण्याचे आवाज येत होते बाहेरून , मध्येच फरशीवर चालताना होणारा बुटाचा आणि दंडुका आपटल्याचा आवाज ...आम्ही एकदम चिडीचूप झालो होतो आमच्या बाजूच्या दोन्ही खोल्यात देखील आमच्यातीलच मुले कोंबली होती सरांनी, त्या खोलीचे दार बाहेरून ठोठावल्याचा आणि दार उघडल्याचा आवाज आला मग एक मोठा आवाज आला ' वास घ्या एकेकाच्या तोंडाचा आणि दारूचा वास आला तर सरळ आत घ्या ' म्हणजे पोलीस नक्की आले होते आणि ते प्रत्येकाच्या तोंडाचा वास घेणार हे आम्हाला समजले . काही वेळातच मग आमच्या खोलीचे दार बाहेरून वाजवले गेले , कोणाचीच हिम्मत होईना पुढे होऊन दार उघडण्याची आम्ही निपचित पडून होतो , काही क्षणांनी पुन्हा जोरात दार वाजवले गेले , तेव्हा आमच्यात नसलेल्या पण खोलीत आधी पासून झोपलेल्या एकाला दाराचा आवाज एकन जाग आली आणि त्याने सरळ उठून डोळे चोळत लाईट लावला व दार उघडले त्या बरोबर एकदम आठ दहा पोलीस आत शिरले पहिले दार उघडणाऱ्या मुलाच्या एक कानाखाली वाजवली आणि त्याला ओढत बाहेर नेले , हे पाहून आमची फाटली , आम्ही सगळे एकदम उठून उभे राहिलो . त्या पोलिसांच्या मध्ये एक सहा फुट उंच धिप्पाड व्यक्ती अधिकारवाणीने बोलत होती आम्ही ओळखले हेच ते बाजीराव पाटील ,' चला रे वास घ्या एकेकाच्या तोंडाचा ' बाजीराव गरजले , पोलिसांनी एकेकाला धरून ' चल तोंड उघड , वास दे तोंडाचा असे सुरु केले , आम्ही प्यायलेले लोक मागे मागे सरकत होतो , अर्थात तरी आमची पाळी येणारच होती , माझे डोके वेगाने काम करत होते यातून कसे वाचायचे ? हा विचार सुरु होता ..मला एक कल्पना सुचली ( ती कल्पना मानसशास्त्रावर आधारित होती हे आता समजते आहे ) मी विचार केला की जे वास द्यायला घाबरत आहेत , किवा मागे राहत आहेत त्यांच्या बाबतीत पोलिसांची खात्री असणार की हे प्यायलेले आहेत व जी मुले आपणहून सहजतेने पुढे येत आहेत त्यांच्या बाबत बहुधा हे प्यायलेले नसावेत असे वाटत असणार ,, सगळ्यांच्या लक्षात येईल अश्या बेताने एकदम पुढे सरकू लागलो आणि डायरेक्ट बाजीराव पाटील यांच्यासमोर जाऊन माझा वास घ्या असे म्हंटले , माझे मानसशास्त्र आणि भोळा भाबडा चेहरा कामी आला , बाजीराव पाटील यांनी स्वतः माझा वास न घेता बाजूच्या शिपायाला ' ''ए याला बघ रे घाई झालीय ' असे म्हणून माझा वास घ्यायला सांगितले , त्या पोलिसाने देखील पटकन माझ्याजवळ येऊन तोंड उघडण्यास सांगितले , मी तोंड उघडले पण श्वास बाहेर न सोडता मोठ्याने आँ असा आवाज काढत श्वास आत ओढला , तो पोलीस माझ्या आधीच्या हालचालींनी माझ्या बाबत बहुधा बेसावध होता त्याने पटकन ' चल , हो बाजूला म्हणत मला न प्यायलेल्या मुलांच्या घोळक्यात ढकलले . वा , मी चक्क निर्दोष ठरलो होतो ! 

========================================================================

भाग २८ सुवर्ण पदक स्वीकारण्याचा सन्मान ! 


मी डोके लढवून , पोलिसांच्या तावडीतून सुटलो , तेव्हा हे देखील आठवते आहे की मी मनातल्या मनात देवाचा ही धावा करत होतो , जरी देव वगैरे मी त्यावेळी मानत नव्हतो व इतर वेळी चर्चा वगैरे करताना देव कसा नाही हे सांगत होतो पण जेव्हा भीषण संकट येईल तेव्हा बरोबर मला देवाची आठवण येई . त्या वेळी मनातल्या मनात मी देवाला असेही कबुल केले होते की ' आता या वेळी मला यातून सहीसलामत बाहेर काढलेस , तर या पुढे पुन्हा कधी असा चुकीचा वागणार नाही . अर्थात हे फक्त संकटाच्या वेळी कबुल करायचे असते असाच माझा समज होता नंतर पालन वगैरे करण्याच्या भानगडीत मी पडत नसे हे देखील तितकेच खरे आहे . त्या दिवशी आम्ही रात्रभर घडल्या प्रकारची चर्चा करत जागे होतो नाशिक विभागातील एकूण १५ मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यात आमच्या कॉलेजचे ५ जण तर बाकी इतर कॉलेजेस चे होते २ जण तर अगदीच निरपराध होते ते बिचारे झोपेतून उठून दार उघडायला गेले आणि त्यांना वास न घेताच पोलिसांनी ताब्यात घेतले होते पण नंतर त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यावर त्यांना सोडून दिले गेले , बाकीचे वैद्यकीय तपासणीत सापडले त्यांना कोठडीत डांबले होते पोलिसांनी . दुसऱ्या दिवशी सकाळीकडे हीच चर्चा सुरु झाली " हा नात्या कसा वाचला " याची देखील चर्चा करत होती आमच्या कॉलेजची मुले . आमच्या समूह गीताच्या समूहाचे प्रमुख गायक ( लीडर ) आणि इतर दोन गायक देखील पकडले पकडले गेले होते . समूहातील मुली त्यांच्या वसती गृहातून जेव्हा सकाळी नाश्ता करण्यासाठी आमच्याकडे आल्या तेव्हा त्यांना ही बातमी समजली उरलेली मुले त्यांना रंगवून रात्रीची घटना सांगत होती . सकाळच्या सत्रात फक्त दोनच स्पर्धा होत्या त्यात आमचे कॉलेज नव्हतेच . मग चर्चा सुरु झाली की आता आपल्या समूह गीताचे सुवर्ण पदक स्वीकारायला स्टेज वर कोण जाणार कारण समूहप्रमुखाने जाण्याची पद्धत होती , पण आमचा समूह प्रमुख तर कोठडीत बंद होता . नेमका रविवार असल्याने त्या मुलांना ताबडतोब कोर्टात नेऊन जामीन वैगरे करून आणणे एकंदरीत कठीणच काम होते . आमचे जी .एस सर्व मुलांशी स्टेजवर कोण जाईल या बद्दल सल्ला मसलत करत होते काही जणांनी स्वतः जाण्याची इच्छा व्यक्त केली , तर जी .एस ने जावे असे काहींचे म्हणणे पडले 

मी मात्र या बाबतीत अलिप्त होतो मला कोणीही स्टेजवर गेले तरी काहीही फरक पडणार नव्हता किवा त्या बाबतीत मी विचारच केला नव्हता , आणि मला जायला मिळावे हा विचार देखील मनाला शिवला नव्हता , उलट मनातून जरा अपराधीपणा देखील वाटत होता , कारण त्या मुलांमध्ये मी पुढाकार घेऊन दारू प्यायलो होतो आणि सहीसलामत बाहेर सुटलो होतो मनात एकदा त्या मुलांना भेटायला जाण्याची इच्छा होती . मी हळूच पोलीस स्टेशन कोठे आहे याची चौकशी करून तेथून सटकलो आणि सुमारे ५ की.मी पायी उन्हात त्यांना भेटायला गेली . मला फक्त दोनच मिनिटे भेट घेता आली त्यांची बिचारे खूप घाबरले होते . जर पोलसांनी भलती कलमे लावली असतील तर त्यांच्या आयुष्याचे नुकसान होईल या काळजीत होती . एकाने मला त्या प्रसंगी केस विंचरायला कंगवा मागितला ( त्यावेळी माझ्या डोक्यावर भरपूर केस होते , व मी कंगवा बाळगत होतो खिशात ) त्याची मात्र मला गम्मत वाटली कारण इतक्या गंभीर प्रसंगात सापडला असताना देखील याला आपले केस व्यवस्थित दिसावे याची काळजी होती . त्यांना भेटून परत येताना वाटेत आमचे जी . एस . आणि इतर दोन कॉलेजेस चे जी एस . भेटले ते त्या मुलाच्या सोडवणुकीची सोय करण्यासाठी गावात निघाले होते , तेथील एकदोन कॉंग्रेस च्या पुढाऱ्यांची मदत मिळते काय हे त्यांना पहायचे होते . त्यांनी मला पाहून ' तू कुठे गेला होतास ' विचारले तेव्हा मी आपल्या पोरांना भेटायला गेलो होतो असे मी सांगितले त्यांना बरे वाटले ते म्हणाले ' नशीब तुला त्यांना भेटावेसे वाटले ते " बाकी तुमच्या समूहातील सर्व जण स्टेजवर कोण जाईल याची चिंता करत आहेत . 

सायंकाळी हे नक्की झाले की पकडली गेलेली मुले आज काही सुटणार नाहीत .बक्षीस समारंभ ६ वा सुरु झाला , मी एकांतात जाऊन सिगरेट मध्ये गांजा भरून दम मारून मग अगदी शेवटी बसलो होतो , एकेका स्पर्धचे नाव सांगून सुवर्ण , रौप्य , आणि कास्य पदकाची बक्षीसे जाहीर केली जात होती आणि त्या वेळचे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू श्री . राम ताकवले यांचे हस्ते पदके प्रदान केली जात होती . तितक्यात आमच्या कॉलेजची दोन तीन मुले मला शोधात माझ्याजवळ आली आणि त्यांनी सांगितले की तुला निवृत्ती अरिंगळे ने बोलावले आहे मला समजेना नेमके काय काम असावे ते . मी स्टेज जवळ गेलो तिथे बाजूला घोळका करून आमच्या कॉलेजची मुले -मुली उभ्या होत्या . निवृत्ती ने मला सांगितले की ' आपल्या कॉलेज चे नाव आले की समूह्गीताचे सुवर्ण पदक घ्यायला तू स्टेजवर जायचे आहेस . बापरे ! क्षणभर माझा विश्वासच बसेना , कोणत्या निकषावर यांनी मला पाठवायचे ठरवले ते समजेना . शेवटी आमच्या कॉलेजचे नाव पुकारल्या गेल्यावर मी स्टेज वर गेलो पदक स्वीकारले, मग जेव्हा शिल्ड ( ढाल ) देण्यासाठी पुकारा झाला तेव्हा समूह्गीतातील मुली , राहिलेली मुले आणि जी .एस देखील स्टेजवर आले . नंतर मला समजले मी मी भर उन्हात त्या मुलांना भेटायला गेलो होतो ते जी .एस ना आवडले होते , तसेच पदक स्वीकारायला कोण जाणार अशी चर्चा चालू होती तेव्हा मी स्वतः जावे अशी इच्छा अजिबात व्यक्त केली नव्हती या वरून त्यांनी मला शेवटी हा बहुमान देण्याचे ठरवले होते . 

दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मुलांना कोर्टात नेऊन जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली मग आम्ही परत येण्यास निघालो पण जाताना सगळे खूप आनंदात , उत्साहात होते तर येताना वातावरण जरा गंभीर होते , नंतर कॉलेज ने पकडलेल्या गेलेल्या मुलांच्या घरी पत्र पाठवून त्यांच्या पालकांना मुलांवर लक्ष ठेवण्यास बजावले असे कळले . ती केस सहजपणे सोडवली गेली . न्यायमूर्तीनी समज देऊन मुलांना सोडले असे समजले . ही देखील बातमी पेपर मध्ये वाचली की " अंमळनेर येथे झालेल्या युवक महोत्सवाच्या तीन दिवसात , अंमळनेर मध्ये दारूची एकूण तीन लाख रुपयांची विक्री झाली होती " यावरून हल्लीच्या युवक महोत्सवात किती दारू विक्री होत असेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो . पुढच्या वर्षी आमचा समूह गीताचा प्रमुख पदवीधर होऊन दुसऱ्या कॉलेज मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी गेला म्हणून समूहप्रमुख मी झालो आणि मग " सटाणा " येथे झालेल्या युवक महोत्सवात वेगळी धमाल आली त्या बद्दल पुढील भागात .

======================================================================

भाग २९  सटाणा युवक महोत्सव - दारूची चोरी 

( माझ्या जिवनप्रवासात केलेल्या चुका , झालेले नुकसान , सुधारणेचा प्रवास आणि त्यातील अडचणी आणि गेल्या आठ वर्षांपासून मादक पदार्थांपासून सातत्याने दूर राहत , स्वतःत घडत गेलेले बद्दल , सकारात्मक दृष्टीकोन , मिळत गेलेला विवेक . व्यसनमुक्तीचे कार्य वगैरे सगळ्या गोष्टी आठवत आहेत तश्या लिहीत आहे काहीवेळा एखादी घटना नंतर आठवते त्यामुळे लेखमाला कदाचित वाचकांना मागे -पुढे गेल्यासारखी वाटेल त्याबद्दल क्षमस्व ! तसेच जे लेखमालेचे मूळ शीर्षक आहे त्याचा देखील अर्थ जशी जशी लेखमाला पुढे जाईल आणि पूर्णत्वाला पोचेल तसा स्पष्ट होत जाईल )
बिटको कॉलेज च्या दुसऱ्या वर्षी म्हणजे कॉलेज च्या समूहगीताचा समूह प्रमुख पदवीधर होऊन नाशिक शहरात एन.बी .टी लॉ कॉलेज ला पदव्युत्तर शिक्षणासाठी गेला आणि मग अनुभवी म्हणून आपोआप समूह प्रमुखाचे पद माझ्या कडे आले . मी अतिआत्मविश्वासाच्या जोरावर यावेळी स्वतच गाणे लिहायचे, त्याला चाल देखील स्वतःच लावायची असे ठरवले होते , त्यानुसार माझ्या आवडीचा ग्रंथ श्रीमदभगवत गीतेवर आधारित संदेश तरुणांना देईल असे गाणे लिहायचे ठरवले मग दिवसरात्र तेच डोक्यात घोळत होते परीक्षकांवर आपल्या समूह्गीताचे इम्प्रेशन कसे पडेल ? पाहिजे मग कल्पना सुचली गाण्याच्या आधी गीतेतील एखादा श्लोक सर्व समूहाने म्हणायचा आणि नंतर लगेच जोडून गाणे म्हणायला सुरवात करायची त्या प्रमाणे मग कर्मयोगावर आधारित सुप्रसिद्ध ' कर्मण्येवाधिकारस्ते .... ' हा श्लोक निवडला . त्यावेळी अर्थात श्लोकातील संस्कृत शब्दांचा उच्चार नेमका कसा करायचा हे माहित नव्हते पण कसेतरी जमवले . ते गीत आता पूर्ण आठवत नाही पण जे आठवते ते सांगतोय गीताचे शीर्षक होते ' जागृत हो रे पार्था ' आधी श्लोक आणि मग गाणे पुढील प्रमाणे होते ' कर्मफलांचा मोह त्यागुनी , कर्तव्याचा ध्यास घेउनी , आत्म्याच्या तव मुक्तीसाठी जागृत हो रे पार्था ' असे धृवपद होते , मग मध्ये आलाप आणि सरगम जमेल तसा टाकला होता पुढील एक कडवे आठवते आहे ते असे, " धर्म तुझा मानवता , क्षमा शांतीचा प्रणेता , अधर्माशी संग करुनी , अनितीला अनुसरुनी लावू नकोस तू , कलंक पुरुषार्थ रे पार्था ! 

पहिले कडवे आता आठवत नाहीय पण एकंदरीत गाण्यात तरुणांसाठी खूप छान असा शांती , नीती आणि कर्तव्य पालनाचा संदेश होता . ( एकीकडे खूप भव्य दिव्य असे विचार आणि आचरण मात्र शून्य असे विचित्र मिश्रण झाले होते माझ्या व्यक्तीमत्वात थोडक्यात ' लोका संगे ब्रह्मज्ञान ' अशी अवस्था होती ) समूह प्रमुख असल्याने आपोआपच समूहातील गायकांची निवड करणे देखील माझ्याच हाती होते एकंदरीतच मला मानाचे स्थान होते काही वशिले देखील लावले गेले मात्र मी खरोखर अलिप्त राहून , जे खरोखर चांगले गातात त्यांनाच समूहात निवडले चार मुली आणि माझ्यासहित सहा मुले असा दहा जणांचा समूह तयार केला आणि मग रोज गाण्याचा सराव सुरु झाला . एव्हाना मी ब्राऊन शुगर च्या आहारी गेलो होते ते मला समजले तो प्रसंग असा की एकदा रात्री ब्राऊन शुगर घेण्यास पैसे नव्हते म्हणून नुसताच गांजा ओढून मी झोपलो आणि काही केल्या मला झोप येईना , सर्व हातापायांची एकदम आग होऊ लागली , त्वचेच्या खालून काहीतरी गरम वाहत आहे असे वाटू लागले , अंगावर काटे येत होते ,मध्येच थंडी वाजे लगेच पुन्हा अंग गरम होई , सारख्या शिंका येत होत्या , दर ५ मिनिटाला जांभई येऊन डोळ्यातून खूप पाणी येऊ लागले , मळमळ होऊन दोन वेळा उलटी झाली , पोटात ओढल्यासारखे वाटत होते तीन वेळा पातळ जुलाब झाले असा नखशिखांन्त त्रास होत होता रात्रभर मी बिछान्यावर तळमळत होतो. ( त्यावेळी ' विड्रॉवल्स ' किवा ' विरह लक्षणे ' म्हणजे व्यसनाची मानसिक आणि शारीरिक गुलामी झाल्या नंतर व्यसन न केल्यावर होणारा त्रास कसा असतो ते कळले मला . या त्रासाला ब्राऊन शुगर चे व्यसनी ' टर्की ' असे म्हणतात हे देखील नंतर समजले ) 

दुसऱ्या दिवशी कसाबसा सकाळी उठून कॉलेजला गेलो सारखी कोरडया खोकल्याची उबळ येत होती युवक महोत्सवाची तारीख जवळ होती म्हणून गाण्याची रिहर्सल घेणे भाग होते त्या दिवशी मी स्वतः न गाता फक्त समूहाकडून गाणे म्हणून घेतले . नंतर एका मित्राकडून पैसे उसने घेऊन आधी अड्ड्यावर गेलो आणि ब्राऊन शुगर घेतली सिगरेट मध्ये भरून पहिला झुरका मारला आणि काय आश्चर्य एकदम शांत वाटू लागले , शिंका बंद झाल्या , नाकातून पाणी गळणे थांबले , मळमळणे , पोट ओढल्यासारखे वाटणे , खोकला सारे त्रास एकदम गायब झाले

========================================================================

भाग ३०  टर्की .. संताप , खुन्नस ! 

सटाणा युवक महोत्सवाची तयारी पूर्ण झाली , या वेळी कॉलेजच्या स्पर्धकांचे अंमळनेर चा वाईट अनुभव लक्षात घेऊन फारसे लाड न करण्याचे ठरवले असावे कॉलेज प्रशासनाने कारण त्यांनी स्पेशल बस न करता फक्त तिकिटाचे जाण्या येण्याचे पैसे आणि चहा , नाश्ता , जेवण यासाठी भत्ता दिला जाईल असे स्पष्ट केले . दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वा पासून स्पर्धा सुरु होणार होत्या म्हणून मुली आणि बहुतेक स्पर्धकांनी पहाटे लवकर नाशिक हून सटाणा येथे जाण्याचे ठरवले. माझ्या बरोबर गांजा ओढणाऱ्या इतर तीन जणांना देखील मी एव्हाना ब्राऊन शुगर ची चव घ्यायला लावली होती ( एखादा व्यसनी आपल्या मित्रांना देखील आपल्याला नशेने जो आनंद मिळतो तो मिळावा म्हणून आग्रह करतो , त्यात जरी त्याचा हेतू कोणाला बिघडवण्याचा नसला तरी जे दुष्परिणाम व्हायचे ते होतातच , माझे मित्र आधी मी ब्राऊन शुगर ओढतो म्हणून मला रागवत असत पण हळू हळू ते देखील कुतूहल आणि माझ्या अधूनमधून केल्या जाणाऱ्या आग्रहाला बळी पडून जमेल तेव्हा गांजा , दारू आणि आता ब्राऊन शुगर देखील ओढू लागले होते ) त्या पैकी दोन जण माझ्या बरोबरच कॉलेजला होते त्यांची वर्णी देखील मी समूह गीताचे मदतनीस म्हणून सटाण्याला जाणाऱ्या मुलांमध्ये लावली होती . तर आम्ही एकूण चार पाच जणांनी पहाटे बस ने जाण्याऐवजी आदल्या दिवशी रात्रीच सटाण्याला जायचे ठरवले होते व त्यानुसार आम्ही तयारी करून गांजा , ब्राऊन शुगर असा पैसे असतील तेव्हढा साठा सोबत घेऊन नाशिक ला सी .बी .एस च्या स्थानकावर जमलो होतो . 

प्रत्येकाने आपापल्या पैश्यांनी आपल्याला लागणारी नशेची सामुग्री खरेदी करावी असे आधीच ठरले होते त्या नुसार मी देखील ब्राऊन शुगर च्या एकूण १० पुड्या सोबत घेतल्या होत्या या वेळी एकूण दोन दिवस महोत्सव चालणार होता त्या हिशेबाने एका दिवसाला ५ पुड्या पुरेशा होत्या माझ्या साठी . आणि गांजाच्या पाच पुड्या घेतल्या होत्या ब्राऊन शुगर च्या तुलनेत गांजा खूप स्वस्त आणि भरपूर असे एका पुडीत . रात्री आधी सर्व एका बार मध्ये जाऊन दारू प्यायलो आणि मग बस मध्ये बसलो बसमध्ये धूम्रपानास मनाई असते परंतु जर कोणी तक्रार केली तरच कंडक्टर देखल घेतो हे आम्हाला माहित होते बसमध्ये फारशी गर्दी नसल्याने आम्हाला प्रत्येकाला खिडकी जवळ जागा मिळाली व बस मध्येच सिगरेट मध्ये गांजा आणि ब्राऊन शुगर भरून ओढत आम्ही प्रवास केला पहाटे साधारण ३ ला आम्ही सटाण्याला पोचलो , मग तेथून ऑटो ने कॉलेज गाठले कोणत्या कॉलेज ची राहण्याची सोय कोणत्या वर्गात केली आहे याची यादी समोर नोटीस बोर्डावर लावलेली होती . आमच्या कॉलेज चे जी .एस या वेळी देखील तेच होते निवृत्ती अरिंगळे आणि राजू विभांडिक ते इतर मुला मुलींबरोबर पहाटे निघणार होते त्यामुळे आमच्या कॉलेज तर्फे सगळ्यात आधी पोचणारे आम्हीच ५ जण होतो . चपराशाने आम्हाला वर्ग उघडून दिला आणि सतरंज्या झोपायला गाद्या वगैरे दिल्या आणि तो निघून गेला बाजूच्या इतर वर्गातून इतर गावातून आलेली काही मुले होती . चपराशी जाताच वर्गाचे दर लावून आमचा नशेचा सामुहिक कार्यक्रम पुन्हा सुरु झाला . मी ब्राऊन शुगर चा कोटा पुरवून पिणार होतो कारण मला ब्राऊन शुगर न मिळाल्यास प्रचंड त्रास होत असे , माझे मित्र तो पर्यंत माझ्या इतके आहारी गेले नव्हते, तरीही ते मित्र सारखे मला ब्राऊन शुगर ची सिगरेट मागत होते मी त्यांना माझी संपेल असे सांगताच ते म्हणत तुला उद्या आम्ही आमच्या जवळची देऊ असे करत करत माझ्याकडे केवळ ३ पुड्या उरल्या व अजून मला पूर्ण दोन दिवस काढायचे होते ( व्यसनी व्यक्तीचे असेच होते जास्ती दिवस पुरेल म्हणून तो जितका जास्त साठा घेऊन ठेवतो तितका तो साठा लवकर संपतो कारण त्याचा स्वतःवरील कंट्रोल केव्हाच संपुष्टात आलेला असतो ) 

दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी १० पर्यंत झोपून होतो ते एकदम जेव्हा आमच्या कॉलेजचे इतर स्पर्धक आले तेव्हाच उठलो . मी आधी फ्रेश होऊन बाहेर पटांगणा कोपर्यात जाऊन ब्राऊन शुगर ची १ पुडी संपवली आता फक्त एकच उरली होती व अजून किमान दीड दिवस काढायचा होता . समूह गीताची स्पर्धा दुसऱ्या दिवशी ४ ला होणार होती , तोपर्यंत समूहनृत्य , एकांकिका , व्यक्तिगत गायन , वादन , काव्यवाचन अश्या स्पर्धा झाल्या आमच्या कॉलेजची ' छत आकाशाचे माझिया घरा ' ही एकांकिका मस्तच झाली व एकांकिकेला व अभिनयाचे बक्षीस रेवती जाधव या मुलीला मिळणार हे निश्चित झाले होते . मग समूह नृत्यात देखील आमच्या कॉलेजचे ' जीवाच मैतर ढवळ्या न पवळ्या ला शेतात घेऊन चाल र ' या गीतावर बसवलेले नृत्य छान झाले , वाद्य वादन स्पर्धेत आमच्या कॉलेजच्या गोविलकर ने सेक्सोफोन वर ' ओ ,मिलन ..मौजोसे मौजो का ' हे बहुधा ' एक ही भूल ' या चित्रपटातील गीत वाजवून आपले पदक पक्के केले . इकडे आम्ही सर्व स्पर्धांचा आनंद घेत अधून मधून गांजा ओढत मजा करत होतो . रात्री अगदी मोह आवरेना आवरेना म्हणून मी उरलेल्या एकमात्र पुडीतील थोडीशी ब्राऊन शुगर ओढली मित्रांना आता तुमच्या कडील मला द्या म्हंटले तेव्हा त्यांनी सरळ सांगितले ' अरे आम्ही ब्राऊन शुगर घेतलीच नव्हती सोबत , तुला खोटे सांगितले आम्ही की उद्या तुला आम्ही पाजू असे , बापरे ! माझे धाबेच दणाणले म्हणजे आता आपल्याला पुन्हा मागील वेळे सारखा त्रास होणार .. सटाण्यात ब्राऊन शुगर मिळत नाही याची माहिती मला होतीच म्हणजे चांगलाच अडकलो होतो मी बर परत नाशिक ला जाऊन ब्राऊन शुगर घेऊन यावे म्हंटले तर जवळ जाण्या येण्याचे पुरेसे पैसे देखील नव्हते . मित्रांचा खूप राग आला पण त्यांना मला इतका त्रास होतो हे मी सांगितले नव्हते म्हणून कदाचित ते असे वागले होते त्यामुळे मनातल्या मनात त्यांना शिव्या घालत मी कसाबसा झोपण्याचा प्रयत्न करत होतो पण जमले नाही सकाळ पर्यन्त मी उरलेली पुडी देखील संपवून टाकली .

( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें