प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.com



सोमवार, 18 मार्च 2013

पुन्हा मेंटल हॉस्पिटल ....!

भाग ७१
नोकरी ऐक प्रकारे गेल्यातच जमा होतो ..पण घरी मात्र त्या बाबत सांगितले नव्हते ..अर्थात सांगणार तरी काय ? म्हणून मग नोकरीचे नाटक सुरु ठेवले ..सकाळी घरून आईकडून काहीही खोटीनाटी कारणे सांगून किमान ब्राऊन शुगर च्या एका पुडी पुरते तरी पैसे घेऊन घरातून बाहेर पडत होतो ..मग अड्ड्यावर जाऊन पुडी घेऊन ती पिऊन झाली की दिवसभर इकडे तिकडे टाईम पास करून रात्री परत घरी येत असे ..पण एका पुडीने माझे समाधान होत नव्हते दिवसाला किमान चार पुड्या असा माझा कोटा होता ..अश्या वेळी नाशिक शहरातल्या इतर गर्दुल्ल्यांसोबत ओळखी होऊ लागल्या होत्या ..या पूर्वी नाशिक रोड मधील गर्दुल्ले व अड्डे माहित होते ..आता नाशिक शहरातील गर्दुल्ले आणि अड्डे माहित होऊ लागले ..सुमारे आठवडाभर हे नोकरीचे नाटक टिकले एके दिवशी ..नोकरी गेल्याचे घरी समजलेच ..मग उगाच तेथील कर्मचारी माझ्यावर जळतात म्हणून त्यांनी माझी साहेबांकडे खोटी तक्रार करून मला काढायला लावले असे कारण सांगितले ..अर्थात घरच्या लोकांचा विश्वास बसला नव्हताच त्यावर ..पण मग आता दुसरी नोकरी शोध असं लकडा लावला त्यांनी माझ्या मागे ..नाशिक शहरातील एका गर्दुल्ल्याशी चांगली ओळख झाली.. त्याचे नाव कुबेर असे होते ..त्याच्या कडे नेहमी भरपूर पैसे असत व त्याचे बोलणे वगैरे एकदम गोड आणि सभ्य होते ..तो अड्ड्यावर आला की त्याला सगळे गर्दुल्ले चिटकत असत .. कुबेर देखील ज्यांच्याकडे पैसे नसतील किवा कमी पैसे असतील त्यांना माल पाजत असे ..मला कळले की कुबेर हा ऐक पाकीटमार आहे म्हणून ..त्याची जीवन शैली मस्तच होती ..दिवसभरात सिटी बसेस मधून दोन चार चकरा मारल्या की त्याच्याकडे भरपूर पैसे येत ..मग ते पैसे संपेपर्यंत तो राजा असे ..त्याच्याशी ओळख झाल्यावर मला देखील असेच ..झटपट पैसे मिळाले पाहिजेत... असे वाटू लागले !

एकदा मी पण तुझ्या सोबत येती म्हणून कुबेर च्या मागे लागलो ..तर तो नकार देऊ लागला म्हणाला ..हमारे उपर केसेस हो गई है अभी , अब ना चाह्कर भी नशे कें लिये ये काम करना पडता है ..तुम अच्छे घरसे हो ..ये काम में मत आना ! कुबेर पण चांगल्याच घरचा होता ..पण तो आठवीत असतांना अपघातात त्याचे वडील गेले होते आणि तेव्हा पासून घरात कमावणारे कोणीच नाही म्हणून १० वी नंतर कुबेर ने शाळा सोडली होती ..आणि नशा करू लागला होता असेच गर्द ओढताना एका मुंबई च्या पाकीटमाराची ओळख झाली होती आणि त्याच्या कडून कुबेर नी ही ' दीक्षा ' घेतली होती . मी देखील तीच ' दीक्षा ' मला दे म्हणून त्याच्या मागे लागलो होतो . पण ..कुबेर मात्र ठाम होता ...मी तुला हे काही शिकवणार नाही असे त्याने स्पष्ट सांगितले मला .. खूप मागे लागलो तेव्हा म्हणाला चाहे तो तुम ' ठेक ' देने कें लिये मेरे साथ चलो .. ठेक देणे ..म्हणजे बसमध्ये किवा गर्दीत पाकीट माराने सावज हेरल्यावर त्याचा साथीदार त्या सावजाच्या अगदी जवळ जाऊन त्याला अश्या पद्धतीने चिटकून उभा राहतो की पाकीटमाराला त्याचा ' डाव ' कारणे सोपे जावे ..म्हणजे थोडक्यात सावाजाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मदत करणे . मला खूप आनंद झाला ..कुबेर ने मला दोन गोष्टीची मात्र खबरदारी घेण्यास सांगितली ..पहिली गोष्ट अशी की बसमध्ये मी त्याचाशी ओळख आहे असे अजिबात दाखवायचे नाही ..तो ' धूर ' मला दुरून इशाऱ्याने दाखवणार होता ..' धूर ' म्हणजे ज्याचे पाकीट मारायचे आहे असे सावज .. त्याने ' धूर ' दाखवला की मी त्या धुराजवळ जावून चिटकून उभे राहायचे त्याला ...जाणवणार नाही अश्या पद्धीतीने .. दुसरी गोष्ट कुबेर ने सांगितली की जर पाकीट मारताना कुबेर पकडला गेला तर मी लगेच तेथून निघून जायचे .. थांबायचे नाही नाहीतर पोलीस मलाही साथीदार म्हणून ओळखू शकतात .. आणि जर लोकांनी कुबेरला पकडून मारहाण करण्यास सुरवात केली तर मी देखील पुढाकार घेऊन त्याला सर्वांच्या पुढे जाऊन मारण्याचे नाटक करायचे व इतर लोकांना कमी मारू द्यायचे ! लगेचच मी त्याच्या मागे बस मध्ये फिरणे सुरु केले .. सुरवातीला खूप भीती वाटत असे ..कुबेर ने ' धूर ' दाखवले की मी त्याच्या जवळ जाऊन त्याला चिटकून उभा राहत असे... अश्या वेळी कुबेर आता कसा त्याच्या जवळ येईल व पाकीट मारेल हे पाहण्याची उत्सुकता वाटे ...पण कुबेर ने मी कुबेर कडे अजिबात लक्ष द्यायचे नाही असे बजावले होते ..उगाच संशयास्पद हालचाली करून ' धूर ' सावध होतो असं त्याचा अनुभव होता . नाशिकरोड ते पंचवटी किवा पंचवटी ते नाशिकरोड बस मध्ये शालीमार स्टॉप वर कुबेर बस मध्ये चढत असे तर मी त्याच्या ऐक स्टॉप आधी किवा ऐक स्टॉप नंतर म्हणजे गंजमाळ किवा सी .बी .एस . ला बसमध्ये चढत होतो . . बहुधा बसच्या नेहमीच्या रुट वरील कंडक्टर ला असे पाकीटमार माहित असतात व म्हणून कंडक्टरने मला ओळखू नये म्हणून मी कुबेर सोबत बस मध्ये चढायचे नाही असे सांगितले होते .. साधारण तीनचार चकरात कूबेर त्याचे काम चोख बजावून किमान तीन चार ' धूर ' उतरवत असे ( धूर उतरवणे म्हणजे सावजाचे पाकीट साफ करणे ) ..मग दिवसभर आम्ही भरपूर ब्राऊन शुगर ओढत असू व सिनेमा वगैरे चैन करत असू !

=======================================================================
भाग ७२ वा रक्ताची उलटी ..! 


साधारणपणे पंधरा दिवस मी कुबेर सोबत फिरलो ... तो भरपूर पैसे मिळवत होता ..जेव्हा आसपासच्या खेड्यात आठवडी बाजार असे किवा जत्रा वगैरे असली की कुबेर आणि त्याच्या सारखी मंडळी अश्या ठिकाणी न चुकता हजेरी लावत असत .मला मात्र त्याने तेथे बरोबर नेले नाही .मी त्याचा पार्टनर फक्त बस मधल्या कामापुरताच होतो .एकदा सकाळी मी लवकर कुबेरच्या घरीपोचलो होतो ..आणि मला माल प्यायचा होता म्हणून त्याला बाहेर चल अशी घाई करू लागलो ..त्याच्या घरी त्याची म्हातारी आई आणि तो असे दोघेच राहत असत एका छोट्याश्या खोलीत त्यांचा संसार सामावलेला होता ऐक शिलाई मशीन होते कोपऱ्यात ..आणि चारदोन भांडी ..स्टोव्ह .. हा इतका पैसे मिळवतो तरी याचे घर असे का ? असं विचार मनात आला म्हणून त्याला विचारले तर ..हसला म्हणाला ..मेरे पैसे मेरी माँ नही लेती ..वो सिलाई वगैरे कें काम करती है और उसिमेसे घर खर्च चलता है ..इसलिये मै रातको घर आते समय सारे पैसो का माल लेता हुं ..या फिर ..किसीको माल पिलाकर कंगाल होकार घर आ जाता हुं ...कुबेरचे गरीब गर्दुल्ल्यांना असे सहजतेने माल पाजण्याचे हे रहस्य होते तर ...त्याच्या प्रामाणिक आईला ..त्याचे असे लोकांचे पाकीट मारून कमावलेले पैसे घरात नको होते ..व .कुबेर ने नशा बंद करून चांगले जिवन जगावे ही तिची इच्छा होती ..पण ते देखील तिच्या हाती नव्हते ..म्हणून तिच्यापुरता तिने निर्णय घेतला होता व कुबेर ला तसे स्पष्ट सांगितले होते की तुला माझ्या सोबत राहायचे असेल तर तू घरात येताना तुझे पापाचे पैसे घरात आणू नकोस . ..मला त्याच्या आईच्या या प्रामाणिक पणाचे खूप आश्चर्य वाटले ..घरातील स्त्रीला आपल्या घरातील पुरुष कोठून पैसा आणतात हे नक्कीच माहित असते ..सर्वच स्त्रियांनी जर कुबेरच्या आई सारखा निर्णय घेतला तर काय बिशाद आहे कोणाची भ्रष्टाचार करण्याची ...अर्थात घरातील स्त्री ला कोण किती मान देतो यावर हे अवलंबून आहे हे देखील खरे आहे . आई कुबेर ला घरातून हाकलून ही देऊ शकत होती ..पण एकुलता ऐक मुलगा असल्याने त्या बाबत तिची माया आड येत असे .

कुबेर खूप भाविक देखील होता ..घरातून बाहेर पडल्यावर .,,तो त्याच्या घराच्या पासून जवळच असलेल्या मारुतीच्या मंदिरात जाई ..तेथे सुमारे १० मिनिटे तो हात जोडून डोळे मिटून उभा रहात असे ..मी जर सोबत असलो तर मी नुसताच बाहेरून नमस्कार करून कुबेर ची वाट पाहत बाहेर उभा राहत असे ..त्याच्या या असे दहा मिनिटे डोळे मिटून उभे राहण्याचे नवल वाटले म्हणून असाच तो मारुतीच्या मंदिरातून बाहेर आल्यावर त्याला विचारले '' कुबेर तुम जानते हो कें तुम गलत काम करनेके लिये जा रहे हो ..फिरभी भगवान कें सामने इतनी देर क्यू खडे रहेते हो ? क्या आपको लागता है भगवान ऐसे काम कें लिये आपको आशीर्वाद देगा ? " ..कुबेर मोठ्याने हसला ..यार ..भगवान हमेशा सबको ' तथास्तु ' कहेता है ..जो काम दिलोजानसे करोगे उसमे आपको सक्सेस मिलेगा ..लेकिन आगे भगवान जैसा काम वैसे फल भी देता है " मै ..भगवान से सक्सेस नाही मांगता हुं ..बल्की ..सारे फल जल्दी मिले ..और इन कर्मो से जल्दी छुटकारा मिले ऐसी प्रार्थना करता हुं ....! विचित्रच होते त्याचे तत्वज्ञान . एकदा बसमधून आम्ही जात असतांना द्वारका हॉटेलच्या थांब्यावर बसमध्ये चढलेल्या एका माणसाजवळ गांधीनगर च्या स्टॉप नंतर ..कुबेर ने इशारा केला म्हणून मी ' ठेक ' द्यायला गेलो ..हळूच कुबेर माझ्या मागे येऊन उभा राहीला बसमध्ये गर्दी असल्याने उभे असलेले लोक बसच्या वेगासोबत .तसेच ब्रेक मारल्यावर एकमेकांच्या अंगावर जात होते ..तेव्हाच केव्हातरी कुबेर ने त्या व्यक्तीला धक्का देऊन त्याचा ' डाव ' केला ..आणि कसा कोण जाणे तो माणूस अचानक सावध झाला व ..तो ..मेरा पाकीट .मेरा पाकीट म्हणून ओरडू लागला ..मी लगेच बाजूला सरकलो ..माझ्या मागे कुबेर होता ..त्याने आधी माझ्याकडे पहिले ..माझा चेहरा पाहून त्याला संशय आला नसावा मात्र कुबेर कडे पाहून तो कुबेर ला तुझे खिसे दाखव म्हणू लागला ..गर्दीत कुबेर ला सटकता ही येईना ..कुबेर ..उगाच त्याच्याशी वाद घालू लागला ..त्याने आधीच मला डोळ्याने इशारा करून मी मध्ये पडू नये अशी खूण केली होती त्या नुसार मी दूर सरकून उभा होते ..त्या माणसाच्या बाजूने आता आणखीन दोन तीन लोक बोलू लागले व त्यांनी कुबेरला पकडून जबरदस्तीने त्याचे खिसे तपासले तर त्यात पाकीट सापडले ..ताबडतोब कुबेरला त्यांनी मारहाण करण्यास सुरवात झाली ..

चालत्या बसमध्ये गर्दीतही अनेक जण कुबेरला लाथा बुक्क्यांनी तुडवत होते कुबेरने आपले हात तोंडावर झाकून घेतले होते आणि गुरासारखा ओरडत मार खात होता ..ड्रायव्हरने बस थांबवली ..लोक खाली उतरू लागले ..तितक्यात कोणीतरी ' खून .. ..खून निकल रहा है ..असे ओरडले ..ताबडतोब सगळे लोक मारणे थांबवून गुपचूप उभे राहिले ..मी कुबेर कडे पहिले तर तो खाली उकिडवा बसून रक्त थुंकत होता ...उलटी काढल्यासारखे केले त्याने ...तर लाल पाणी बाहेर पडले थोडेसे .. मला त्याची काळजी वाटू लागली .. रक्ताच्या उलट्या तर होत नाहीत याला ? असं विचार मनात आला ..एव्हाना लोक ..उगाच मारले असं चेहरा करून उभे होते .. हळू हळू कुबेर पासून दूर सरकू लागले .. मी मारले नाही असेच सर्वाना दर्शवायचे होते ..उगाच बला अंगावर यायला नको होती कोणालाच ..कंडक्टर मग कुबेर जवळ गेला आणि ए.. चलो नीचे उतर जाओ बसमेसे म्हणून कुबेरला हाताला धरून बसमधून खाली उतरवले आणि बस सुरु झाली ..मला कुबेर सोबत खाली उतरवायचे होते पण इतरांना संशय येईल म्हणून मी पुढच्या थांब्यावर उतरलो आणि लगेच मागे पळत कुबेर जवळ आलो तर तो जवळच असलेल्या एका चहाच्या टपरीवर चहा पीत उभा होता ..माझ्या चेहऱ्यावरील काळजी पाहून हसला ..म्हणाला ' कुछ नही हुवा था .. जरा मार बचानेके लिये नाटक करना पडता है .. हळूच त्याने तोंडात बोट घालून ऐक ब्लेड चा अगदी छोटासा तुकडा बाहेर काढून मला दाखवला ... . कुबेर कामावर जाताना नेहमी ऐक ब्लेड चा छोटासा सुमारे १ से.मी .चा तुकडा तोंडात ठेवत असे .. नेमक्या वेळी तो तुकडा खिसा कापण्यासाठी तो वापरात असे ..किवा अश्या आणीबाणी च्या वेळी नुसती तोंडातल्या तोंडात त्या तुकड्याच्या धारेवर हलकेच जीभ फिरवली की लगेच जीभेतून रक्त येण्यास सुरवात होई ..व मुद्दाम जोरात उलट्या काढल्या की पोटातून बाहेर पडणाऱ्या पाण्यासोबत ते रक्त मिसळून ..रक्ताची उलटी होते आहे असं आभास होई .पाहणारा घाबरून जात असे व कुबेरला पडणारा मार थांबत असे ..अशी आयडिया होती तर ....!

( पुढे सुमार १५ वर्षांनी ..मी धुळे जिल्ह्यातील बेटावद या गावी ' संकल्प ' व्यसनमुक्ती केंद्रात काम करत असतांना मी कुबेरला नाशिकहून तेथे नेऊन व्यसनमुक्तीच्या उपचारांसाठी दाखल केले होते ...मात्र तो अगदी जर्जर झाला होता ...त्याचा क्षयरोग शेवटच्या अवस्थेत होता म्हणून त्याला सेंटर मधून पुन्हा घरी सोडण्याची जवाबदारी व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालकांनी माझ्यावर सोपवली होती .. त्याला गाडी करून धुळ्याहून नाशिकला नेत असतांना पहाटे ३ वाजता त्याने गाडीतच माझ्या मांडीवर डोके ठेवून प्राण सोडला ... बहुधा त्याला सगळ्या कर्मातून लवकर मुक्ती मिळावी अशी त्याची त्याची प्रार्थना देवाने एकली होती . या बद्दल लेखमालेत येईलच पुढे )

=======================================================================भाग ७३ वा पुन्हा मेंटल हॉस्पिटल ....!

कुबेर सोबत असतांना घरी अजिबात पैसे मागायची वेळ आली नाही ..तरी माझी घसरत जाणारी तब्येत ..घरात आले की जास्तीत जास्त वेळ झोपून राहणे वगैरे गोष्टींमुळे भावाला मी पुन्हा व्यसन सुरु केले आहे हे समजले होते ..एकदा कुबेर ला पोलिसांनी रंगे हाथ पकडले आणि तो जेल मध्ये गेला तसा मी पुन्हा एकदा घरी म्हणजे आईकडेच पैश्यांसाठी भुणभुण सुरु केली आणि तिने सरळ सांगितले ' हे पहा , इतके दिवस आम्ही तुझे वागणे पाहतो आहे ..त्यातून तुझे व्यसन पुन्हा सुरु झालेय असाच निष्कर्ष निघतो ..तेव्हा उगाच जास्त नुकसान करून घेण्यापेक्षा तू आताच सगळे मान्य करून टाक व सरळ परत ठाण्याला उपचारांसाठी दाखल हो ' खरे तर मलाही हेच हवे होते ..कारण आता आपण परत जुन्या वाटेवर आहोत हे जाणवत होते ..स्वतच्या बळावर प्रयत्न करूनही व्यसन थांबत नव्हते ..वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर आई कडे फारसे पैसेही नसत कारण रेल्वे क्वार्टर सोडल्यानंतर तिचे शिलाई करण्याचे काम थंडावले होते ..घरात नवीन वाहिनी असल्याने वाहिनी समोर आईला सारखे पैसे मागणे शक्य होत नसे .रेल्वे क्वार्टर सारखे तमाशे येथे व्हायला नको होते मला .शेवटी मी पुन्हा मेंटल हॉस्पिटल मध्ये दाखल होण्यास तयार झालो आणि भावासोबत ठाण्याला गेलो .या वेळी डॉ . केळकर यांची बदली होऊन त्यांच्या जागी डॉ .रेकाडे म्हणून नवीन अधीक्षक आले होते .

नियमाप्रमाणे मला आधी ' ऑब्झर्वेशन वार्ड ' मध्ये पाठवले गेले . तेथे आता सर्वांशी माझी माझी ओळख होतीच त्यामूळे पहिल्या वेळे सारखा फारसा घाबरलो नाही . या वेळी तेथे सलीम भेटला नाही ..तो घरी गेला असे समजले ..बाकी सर्व अटेंडंट तेच होते . ..गुलाम हुसेन यांनी मला पाहिल्यावर कपाळावर हात मारून घेतला ..कदाचित एका अनुभवानंतर मी शहाणा होईन अशी त्यांना आशा असावी मला म्हणाले ' आपको मेंटल की सब्जी रोटी घरसे ज्यादा पसंद आई ऐसा लागता है " मी शरमलो तेव्हा पाठीवर थाप मारून मला धीर देत म्हणाले ' जल्दी संभल जाओ " .शत्रू ला जेव्हा समजले की मी परत आलोय तेव्हा तो एका आठवड्यातच मला भेटायला आला .. त्याने आमच्या वार्ड च्या डॉक्टरांशी बोलून माझी ट्रान्स्फर त्याच्या वार्ड मध्ये म्हणजे ' संगीत कक्ष ' वार्ड न . १८ एबी. येथे नवीन इमारतीत करून घेतली . हा वार्ड स्पेशल वार्ड समजला जात असे म्हणजे इथे इतर वार्डच्या तुलनेत जास्त स्वच्छता होती .तसेच दोन हॉल पैकी एका हॉल मध्ये पेशंट साठी पलंग होते तर दुसऱ्या हॉल मध्ये मनोरंजन कक्ष होता जेथे रंगीत टीव्ही ..समोर बसायला बाके ..एका खोलीतून एम्पलीफायर वरून रेडिओ ची गाणी वार्ड मध्ये ऐकवण्याची सोय अशी सगळी व्यवस्था होती ..तसेच या वार्ड मध्ये राहणारे बहुतेक रुग्ण जुने तर होतेच पण ७० टक्के लोक घरचे खूप श्रीमंत होते ..त्यामूळे येथे बहुतेक पेशंटचे बाहेरच्या साईच्या कॅन्टीन मध्ये पैसे भरलेले असत .. वार्ड मध्ये किमान १० पेशंट कडे तरी रोज कॅन्टीन काढून बिडी बंडल येत होते .. ..त्यामूळे बिडी मिळवण्यास फारशी अडचण येत नव्हती ..मी त्यांच्या कडून दमदाटी करून बिडी काढत असे ...यावेळी देखील मला ' टर्की ' चा त्रास झालाच पण पूर्वी इतका नाही तीन दिवस जरा जेवण गेले नाही ..झोप लागली नाही ..नंतर पुन्हा सगळे सुरळीत सुरु झाले . घरी मात्र अशी अंगावर ' टर्की ' काढणे खूप कठीण जात असे मला . माझा लवकरच नवीन वार्डात जम बसला .. तेथे शत्रू सारखाच ऐक संगीतप्रेमी अटेंडंट होता सुनील नावाचा त्याच्याशी पण माझी छान गट्टी जमली .. सुनील हार्मोनियम आणि सिंथेसायझर देखील वाजवत असे ...तो रात्रपाळीला असला की माझ्यासाठी म्हणून थोडा जास्त डबा घरून घेऊन येई ..कधी कधी त्यात तांदळाची जाड पोळी असे ..पहिल्यांदा मी हा प्रकार तेथे खाल्ला .येथील पेशंट ना बाहेर मनोरुग्णालयाच्या आवारात फिरण्याची मुभा होती त्यामूळे वार्ड मध्ये नाश्ता झाला की बहुतेक जण बाहेर पडत ते थेट जेवणाच्या वेळीच पुन्हा वार्ड मध्ये येत . येथील कपडेही तुलनेत जास्त स्वच्छ असत व मुख्य म्हणजे सगळ्या चड्ड्याना नाड्या होत्या .

इथे टाईमपास म्हणून मी ' बुद्धिबळ ' खेळत असे , मागच्या वेळी मित्र झालेला ' गोपाल ' देखील आता याच वार्डात होता त्याच्याशी ' बुद्धिबळ ' खेळणे म्हणजे मजाच असायची तो पाहता पाहता त्याच्या सोंगट्या काळ्या की पांढऱ्या हे विसरत असे आणि माझ्याच सोंगट्यांनी चाली करू लागे ..मग काही वेळ त्याला आठवण करून देण्यात जाई ..आमचे बुद्धिबळ खेळणे पाहून मग सुनील , शत्रू , राजपाल अशी तेथील कर्मचारी मंडळी देखील आम्हाला बुद्धिबळ शिकव म्हणून आग्रह करू लागली तेव्हा त्यानाही बुद्धिबळ शिकवले आणि मलाच नवीन पार्टनर मिळाले खेळायला .. तेथे मनोरुग्णालयाच्या कर्मचारी वर्गातर्फे दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जाई .. गणपती बसवण्याच्या वेळी मी देखील सजावट करण्यात मदत केली ..त्या निमित्ताने मला ' महिलांच्या ' विभागात जायला मिळाले ...पुरुष विभागासारखेच स्वतंत्र वार्ड होते तेथे आणि महिलांसाठी एका मोठ्या हॉल मध्ये ' मनोरंजन कक्ष ' तेथे वर्तमान पत्रे ठेवलेली होती तसेच ऐक टेबल टेनिस चे टेबल देखील होते काही महिला तेथे मोठा पायघोळ झगा डोक्यावरचे अगदी बारीक कुरतडल्या सारखे केस अश्या वेशात टेबल टेनिस खेळताना पाहून गम्मत वाटली .

=======================================================================भाग ७४ वा  मनोरुग्णांची दुनिया !
नवीन वार्ड मध्ये मी जणू मनोरुग्णालयाचा तेथील एखादा निवासी कर्मचारी असल्या सारखाच वावरत होतो ..तेथील सर्व स्टाफ मला मित्रासारखे वागवत असत ..सुनील आणि शत्रू सोबत रोज सकाळी ' मनोरंजन कक्षात ' बसून माईक वर गाणी म्हणणे ..नंतर फेरफटका मारणे ..चहा ..जेवण ..नाश्ता आणायला जाणाऱ्या टीम बरोबर सोबत सुपरवायझर सारखे जाणे ..स्वीपर वार्ड मध्ये ड्युटीवर असलेल्या स्वीपर मंडळीना त्यांची कामे करून घेण्यास मदत करणे आणि फावल्या वेळात ..वार्ड मधील गमतीशीर मनोरुग्णांची फिरकी घेणे ..छान वेळ जात असे माझा ..वार्ड नंबर १९ मधील ' शंकर 'प्रमाणेच येथेही ऐक खूप जुना पेशंट होता जो वार्ड ची मालमत्ता म्हणजे कपडे ..मग्स , थाळ्या . चादरी .ब्लँकेट्स यांची देखभाल आणि रक्षण करण्याचे काम करत असे ..याचे नाव शिरूर असे होते .तो पुण्याजवळच्या शिरूर गावचा होता म्हणे ..अगदी लहान म्हणजे जेमतेम ५ वर्षांचा असतांना त्याची आई वारली ..वडिलांनी दुसरे लग्न केले तेव्हा याला ताप आला होता आणि तो तापत बरळत असे म्हणून त्याला येथे आणून ठेवला होता ..व त्या गोष्टीला आता सुमारे ५० वर्षे झाली असावीत ..तेव्हापासून याला कोणीही भेटायला देखील आले नव्हते ..हॉस्पिटलच्या प्रशासनाने दोन तीन वेळा घरी पत्र पाठवले होते पण ..पत्ता चुकीचा असा शेरा मारून पत्र परत आलेले ...आणि शिरूर कायमचा मेंटल हॉस्पिटल चा रहिवासी झाला होता .. लालगोरा ..अर्धवट टक्कल पडलेले ..पांढरे केस आणि मिश्याही पांढऱ्या असा शिरूर चेहऱ्यावरून खूप प्रेमळ दिसत असे ..तो सतत कमरेला तेथील निरनिराळ्या चाव्यांचा जुडगा लावून काही ना काही कामात असल्यासारखा इकडून तिकडे फेऱ्या मारी ..

पहाटे चार ला उठून पाण्यासाठी इमारतीची मोटार चालू कारणे हे त्याचे पहिले काम ..नंतर रात्रपाळीला ड्युटीवर असलेल्या अटेंडंटचे बिछाने आवरणे ..नंतर चहा ..नाश्ता ..जेवण या वेळेला भांडी काढून देणे .. ऐरवी पाहणाऱ्याला त्याच्या वर्तनात काही वावगे असल्याचे जाणवत नसे एकदम सर्वसामान्य माणसासारखी त्याची वागणूक होती ..कधी कधी मात्र तो एकटाच स्वतःशी बडबड करत बसे आणि ते देखील मोठ्याने नही तर पुटपुटल्यासारखे ..सुरवातीला जेव्हा मी वार्डमध्ये जम बसवला तेव्हा शिरूर थोडा थोडा माझा राग करी ..कदाचित त्याला वाटे की हा आपली जागा घेणार की काय ..आणि आपले महत्व कमी होईल की काय ..या असुरक्षितते मुळे आधी तो माझ्याशी जरा फटकून राही ..एकदा बाजूच्या हॉल मध्ये टी.व्ही .पाहत बसलो असतांना हळूच माझ्या शेजारी येऊन बसला व मला विचारले ' तुझ्या घरी कोण कोण आहे ? ..मी त्याला आई ,वडील ,भाऊ , वहिनी असे सगळे नातलग असल्याचे सांगितले तेव्हा त्याने तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत मान डोलावली व मग मला मोठ्याने म्हणाला ' इतके नातलग आहेत ..मग ते काही तुला वाऱ्यावर सोडणार नाहीत ..लवकरच घेऊन जातील तुला ' मला त्याचे माझ्याबाबत असे विचार करण्याचे नवल वाटले ..म्हणालो 'शिरूर मी स्वतः इथे राहत आहे ..माझे व्यसन सोडण्यासाठी ' तर समाधानाने मान डोलवत तो निघून गेला ..नंतर तो माझ्याशी खूप प्रेमाने वागे मेंटल हॉस्पिटल मध्ये खूप जुनाट म्हणजे शंकर , शिरूर आणि प्रत्येक वार्डात असलेल्या अश्या चाव्या आणि कारभार सांभाळणां- व्यक्तीला बहुधा विडी किवा तंबाखूचे व्यसन असे पण शिरूर याला अपवाद होता ..त्याला गमतीने कधी कधी वार्ड चे अटेंडंट बिडी पिण्याचा आग्रह करत तेव्हा तो खूप चिडे व सगळ्या चाव्या वगैरे काढून जमिनीवर फेकून देई म्हणे ..' बिडी पाजायची असेल तर मी येथे राहत नाही ..हवे तर विष पाजा ' ..मग सगळे हसत ..एकदा असेच त्याने चाव्या फेकल्या तेव्हा ऐक अटेंडंट त्याल म्हणाला नुसत्या चाव्या काय फेकतोस..हे तुझ्या अंगावरचे कपडे पण तर आम्हीच दिलेले सरकारी खर्चाचे आहेत ..त्यावर त्याने पटकन अंगातील बंडी पण काढली आणि अर्धी चड्डी पण सोडून दिगंबर उभा राहिला . मग काही केल्या पुन्हा कपडे घालायलाच तयार होईना ..शेवटी त्या अटेंडट ने शिरूर च माफी मागितली तेव्हा कुठे त्याने कपडे घातले .

वार्ड मध्ये दुसरा जुना पेशंट म्हणजे ऐक साठीचा पण चांगला तरतरीत म्हातारा होता त्याचे नाव पूर्ण नाव हरकिशनदास गोवर्धनदास बांगडा असे होते हा पूर्वी ब्रह्मदेशात रंगून येथे व्यापारी होता ..तेथे असतांना ..व्यापारात काहीतरी गडबड झाली आणि डोक्यावर परिणाम होऊन तो गेल्या २५ वर्षांपासून येथे होता ..हा वार्डात सतत फेऱ्या मारी व प्रत्येक फेरीत हाताच्या बोटाने मनातल्या मनात काहीतरी आकडेमोड करत असे ..मग वार्डातील स्पीकर ..ट्युबलाईट ..पलंग ..आणि एखादा नवा पेशंट याच्या कडे बोट करून समाधान झाल्यासारखा मान डोलवत असे ..अटेंडंट त्याला मानही देत आणि त्याची मस्करी देखील करत असत ..त्याला नाव विचारल्यावर तो ..विचारणाऱ्याला आधी त्याचे नाव विचारी आणि मगच स्वतचे नाव वडिलांचे नाव आणि आडनाव असे पूर्ण सांगे आणि हातावर टाळी देई ..मग तो नाव विचारणाऱ्याला त्याचे गाव ..धर्म ..जात असे सगळे प्रश्न करी ..अगदी शेवटी लग्न झाले का असे विचारी आणि जर त्याने नाही उतर दिले तर ..हा त्याला ' जल्दी शादी करो ' असा सल्ला देई .. याला जर कोणी स्वतच्या हातातील अंगठी ..पेन ..रुपयाचे नाणे ..किवा एखादी नोट दाखवली व तुझ्याकडे हे नाही असे हिणवले तर तो शर्ट वर करून गळ्यातील जानवे त्या माणसाला काढून दाखवी व त्याल विचारे की तुझ्याकडे हे आहे का ? त्याची का कोण जाणे पण त्या गळ्यातील जानव्यावर खूप श्रद्धा होती दिवसातून अनेक वेळा तो शर्ट वर करून ते जानवे आहे की नाही ते तपासून पाही... ते जानवे आणि त्याच्या डोक्यावर असलेली ऐक मोठ्या जखमेची खुण ही जणू त्याची एकमेव मालमत्ता होती ..ती खुण कोणीतरी डोक्यावर काठी मारल्यामुळे झाली असे तो सांगत असे ..व ते सांगताना जो माहिती विचारी त्याच्या डोक्यावर हात फिरवून तुला अशी खुण आहे का ते तपासून पाही .

======================================================================= भाग ७५ वा  ' स्वामी तिन्ही जगाचा .."
त्याच वार्डात ऐक दिलीप नावाचा पेशंट होता ..वय साधारण ३० वर्षे असावे .. हा दिलीप नेहमी कोठेतरी कोपऱ्यात भिंतीला धरून तासंतास उभा राहत असे ..काही विचारले तर त्याची असंबद्ध उत्तरे देई .दात थोडेसे पुढे .चट्टयापट्ट्याचा पायजमा ..ऐक रंगीत शर्ट पायजाम्याची नाडी नेहमी हातभार बाहेर लोंबत असलेली असे हे ध्यान होते .. त्याच्या साठी त्याच्या घरच्या लोकांनी ऐक प्रायव्हेट अटेंडंट नेमला होता ( प्रायव्हेट अटेंडंट म्हणजे काही श्रीमंत लोक आपल्या पेशंट वर नीट लक्ष देणे , त्याला नियमित अंघोळ घालणे , त्याचे कपडे बदलणे , जुने कपडे धुणे , वगैरे कामासाठी ऐक खाजगी अटेंडंट नेमू शकत असत कारण सरकारी अटेंडंट ला वार्डातील सगळ्या लोकांकडे इतके नीट लक्ष पुरवणे शक्य होत नाही ..तर हे खाजगी अटेंडंट म्हणून काम करणारी तरुण मुले तेथील कर्मचारी वसाहतीतीलच सरकारी अटेंडंटचीच मुले असत व त्यावेळी महिना दीडशे ते दोनशे रुपये इतक्या पगारावर ते हे काम करत असत , व वेळ प्रसंगी ते वार्डातही मदतनीस म्हणून काम पाहत ) दिलीप वेळच्या वेळी जेवतोय की नाही वगैरे गोष्टींवर लक्ष ठेवणे .. तसेच दिलीपची सर्व काळजी घेणे हे काम त्याच्याकडे होते .. हे काम त्या अटेंडंट कडे असे ...आमच्या वार्डात असे खाजगी अटेंडंट ठेवलेले दोन पेशंट होते ..एकदा पेशंट ची अंघोळ वगैरे सोपस्कार झाले की हे अटेंडंट मग दिवसभर मोकळेच असत त्यांच्या सोबत मी चेस खेळत असे किवा कंटाळा आला की दुपारी आम्ही इमारतीच्या मागे असलेल्या मैदानावर जाऊन क्रिकेट देखील खेळत असू ..

या दिलीप ला खरोखर काही कळत नसले तरी कधी कधी तो अचानक आक्रमक होई व एखाद्यावर हल्ला करे तेव्हा मात्र त्याला इंजेक्शन देऊन काही काळ बांधून ठेवावे लागे .. सर्वात महत्वाची गोष्ट अशी होती की जरी दिलीप साठी खाजगी अटेंडंट नेमला होता तरी त्याची आई नियमित दिलीप ला भेटायला येत असे ..असे पेशंटला नियमित आणि ते देखील वार्डात जाऊन भेटण्याची तेथील नियमानुसार परवानगी नव्हती ..मात्र त्याच्या आईने कसेतरी ते मँनेज केले होते ..मेंटल हॉस्पिटल मध्ये रुग्णांना भेटण्यासाठी ऐक व्हिजीट रूम होती तेथेच पालकांनी आपल्या पेशंटला भेटण्यास परवानगी असते वार्डात पालकांना जाता येत नाही असा नियम होता ..तरीही दिलीपची आई नेहमी साधारण पणे ११ वाजता वार्डात येई ते दिलीपची सेवा करून एकदम दुपारी २ च्या दरम्यान परत जाई .. ती दिलीपच्या बाबत खूप भावूक होती ..सर्वाना सारखी दिलीप मी घरी परत गेल्यावर कसा वागतो हे विचारी ..तीचे वय अंदाजे ६० वर्षे असावे ..जाडी ..तिचेही दात थोडे पुढे आलेले ..थोडीशी अजागळ .. भडक रंगाची साडी असा तिचा वेश असे .. ती वार्डात आल्यावर आधी दिलीप च्या तोंडावर हात फिरवून प्रेम दर्शवत असे ..मग त्याला घेऊन बाथरूम मध्ये जाई ( मेंटल हॉस्पिटल च्या बाथरूम संडास ला आतून कड्या ठेवायची पद्धत नव्हती कारण एखाद्या पेशंट ला बाथरूम संडास मध्ये काही अपघात झाला तर लगेच त्याला मदत करता यावी हा हेतू असे ) बाथरूम मध्ये गेल्यावर त्याला ती साग्र संगीत शाम्पू ..चांगला महागडा साबू वगैरे लावून अंघोळ घाली ..नंतर घरून आणलेले स्वच्छ कपडे त्याला घातल्यावर मग सोबत आणलेला डबा ती त्याला खाऊ घाली .. इतकी सेवा आई करत असतांना दिलीप मात्र मख्खच चेहरा करून असे त्याच्या चेहऱ्यावर कधी आई आल्यावर आनंद किवा ती परत जाताना मी दुखः मी पहिले नाही ...

दिलीपचा इतिहास जेव्हा मी तेथील अटेंडंट ला विचारला तेव्हा त्याने सांगितले की वयाच्या १० व्य वर्षी घरात डोक्यावर पडला आणि याला फिट आली व तेव्हापासून हा असा आहे ..तरुण होईपर्यंत घरीच होता आईने त्याला तसाच सांभाळला पण तारुण्यात आपल्यावर याच्या लैंगिक प्रेरणा देखील जागृत होऊ लागल्या आणि याने एके दिवशी आपल्या घरातच आपल्या लहान बहिणीला पकडले ..आरडाओरडा झाला ..बहिणीला सोडवण्यात आले ..तेव्हापासून त्याला घरात ठेवण्याचे धोक्याचे म्हणून येथे मेंटल मध्ये ठेवले आहे ..आणि पुढे त्याने जे सांगितले ते धक्कादायक होते .. त्याच्या आईला आपला मुलगा लैंगिक सुखापासून वंचित आहे या बद्दल खूप वाईट वाटे म्हणून ती कधी कधी अंघोळ घालताना त्याचे हस्तमैथुन देखील करून देत असे .. .. तिला असे रोज भेटण्याची परवानगी कोणी आणि कशी दिली या बद्दल देखील मला कुतूहल होते त्यावर त्या अटेंडंट मित्राने अजून ऐक गंभीर बाब मला सांगितली की त्या बिल्डिंग चा ऐक सिनियर अटेंडंट होता जो त्या बाईला तिच्या मुलाला रोज भेटल्यास आडकाठी करू शकत असे त्याला खुश करण्यासाठी त्या बाईला आठवड्यातून एकदा त्या सिनियरचे त्या सिनियर ला शरीरसुख द्यावे लागे .. बापरे ..मी हादरलोच त्या सिनियर चा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला तो साधारण पन्नाशी चा होता ..अश्या परिस्थितीने गांजलेल्या ..६० वर्षे वयाच्या ..अजिबात सुंदर नसणा-या स्त्री चा असं गैरफायदा घेणारा माणूस देखील जगात आहे हे समजले आणि मुलाच्या प्रेमाखातर असा त्याग करणारी आई .... सगळे अतर्क्य होते ... एकूण तीनचार दिवस मी सुन्न झालो होतो ..तो सिनियर जेव्हा जेव्हा समोर येई तेव्हा तेव्हा माझ्या अंगाचा तिळपापड होई .. त्या दिलीपचा देखील कधी कधी खूप राग येई ..दोष कोणाचा हे मला कधीच ठरवता आले नाही ..त्या बाईचे पुत्रप्रेम अलौकिक होते की अतिरेक होता ?

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें