प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.com



गुरुवार, 21 मार्च 2013

अपेक्षा ..वास्तव ..परिणाम !

भाग १०६ वा नाना पाटेकर यांची भेट !

भावाने पुढच्या महिन्यात डिस्चार्ज घ्यायला येतो असे सांगितले होते ..आता एक एक दिवस येथे मेंटल मध्ये राहणे कठीण जात होते ..केव्हा एकदा अकोल्याला जाऊन अनघाला भेटतो असे झाले होते .. एकदा दुपारी मी ' स्नेहदीप ' मध्ये कँरम खेळत बसलो असतांना अटेंडंट ' तुला लव्हात्रे साहेबांनी बोलाविले आहे असा निरोप घेऊन आला ..मी बाहेर येऊन पाहतो तर काय आश्चर्य ' स्नेहदीप ' च्या गेट जवळ लव्हात्रे साहेब उभे होते आणि त्यांच्या सोबत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर व अभिनेत्री दीप्ती नवल होते ..मी गेट जवळ येईपर्यंत अटेंडंट ने गेट उघडले होते व ते आतही आले होते .. मी जवळ जाताच लव्हात्रे साहेबांनी मला विचारले ' यांना ओळखतोस का तुषार ? ' मी ओशाळून म्हणालो ' सर् .यांना कोण नाही ओळखणार .सगळा देश ओळखतो यांना ' साहेब हसले ..मग त्यांनी माझी ओळख नाना पाटेकर यांच्याशी करून देताना म्हणाला ' हा आमच्या मेंटल हॉस्पिटल चा हिरो आहे ..तुषार ..नाटकात काम करतो ..छान गाणी म्हणतो . व्याख्यान देखील देतो चांगले .' नाना पाटेकर यांच्याशी मी हात मिळविला . पुढे सर् सांगू लागले .'.हा ब्राऊन शुगरचा व्यसनी आहे ..इथे तिसऱ्या वेळेस आलाय ..पण खूप हुशार आहे .. ' नाना पाटेकर माझ्याकडे पाहत उद्गारले ' बापरे ..खूप वाईट व्यसन आहे ते ..आता या पुढे अजिबात अशी व्यसने करू नका ' मला शुभेच्छा देवून मग ते पुढे मेंटल हॉस्पिटलचे इतर विभाग पाहण्यास निघून गेले .. मला खूप आनंद झाला होता ..लव्हात्रे साहेबांनी खास माझी नाना पाटेकर यांच्याशी ओळख करून देणे हा माझा गौरवच होता .. नाना पाटेकर जीन्स आणि टीशर्ट वर होते उंच ..तुकतुकीत सावळा रंग ..चेहऱ्यावर नेहमीसारखे बेफिकिरीचे भाव ..बारीक केस तर दीप्ती नवल देखील जीन्स ..टी शर्ट घालून होती ..ते दोघे नवीन सिनेमाच्या लोकेशन च्या पाहणी साठी मेंटल हॉस्पिटलला भेट देण्यास आले होते .


मोठा भाऊ सांगितल्या नुसार बरोबर एक महिन्यानी मला घेऊन जाण्यास आला तेव्हा ..मी पटापट सगळे सामान आवरून त्याच्या सोबत घरी जायला निघालो ..या वेळेस अनेक स्मृती मनात घेऊन निघालो होतो घरी ..प्रत्येक वेळी मेंटल हॉस्पिटल च्या निवासात वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव गाठीशी आले होते ..चिना माझ्या मागे मागे मुख्य दरवाजापर्यंत सोडायला आला ..त्याला मी जाणार म्हणून वाईट वाटत होते ..मी भावाला त्याला पाच रुपये द्यायला सांगितले ..भावाने त्याला पाच रुपये देताच त्याच्या डोळ्यात पाणी आले ...सरळ ऑटो करून आम्ही स्टेशन वर आलो ... रात्री घरी पोचलो ...या वेळी चांगले राहायचे मी ठरवले होते ..जुन्या मित्रांना अजिबात भेटायचे नाही ..नाशिकरोडला तर जायचेच नाही ..जमले तर अकोल्यालाच नोकरी शोधायची आणि तेथेच सेटल व्हायचे असा विचार मनात होता ...दोन दिवस घरीच थांबलो .आणि लगेच मी अकोल्याला जातो असा तगादा लावला ...मी अकोल्याला जाण्याची इतकी घाई का करतोय याचा बहुतेक त्यांना अंदाज असावा .. अनघाला शेवटचे पाहून सुमारे १० महिने झाले होते ..आपण पुन्हा व्यसन सुरु करून तिच्याशी प्रतारणा केल्याची खंत देखील मनात होतीच .. तिला कसे तोंड द्यायचे याची मनातल्या मनात जुळवणी करत होतो ..अकोल्याला घरी जाताच अंघोळ वगैरे उरकून आधी राम मंदिरात गेलो ..तेथून अनघाच्या घराची मागची किचनची खिडकी दिसत असे ..एकदम सलील च्या घरी जाणे योग्य वाटले नाही ..त्यांच्या पैकी कोणीतरी साधारण पणे सकाळी साडेआठ वाजता मंदिरात येतेच हे माहित होते मला ..म्हणून मंदिरातच बाकावर बसून राहिलो ..काही वेळातच सलील मंदिरात आला मला पाहून त्याने मला मिठीच मारली ... पूजा केल्यावर त्याच्या सोबत त्याच्या घरी गेलो .. दुरुनच अनघाने मला पहिले होते ..तिचा चेहरा आनंदाने फुलून आला होता ...मला काय सांगू आणि काय नको असे झाले होते तिला ..


घरात ते दोघेच होते ..आई बाबा कोठे गेले असे विचारले तेव्हा समजले ते अनघासाठी वरसंशोधन करीत होते आणी त्या करिता नागपूर येथे गेले होते .. हे सांगताना अनघाच्या डोळ्यात पाणी आले ..म्हणाली तू लवकर नोकरी शोध आणि सगळे सांगून टाक माझ्या आई बाबांना ..बापरे ..मला हे जमले नसते नक्कीच ..शिवाय माझा पूर्व इतिहास देखील सांगण्यासारखा नव्हताच ..माझी पार्श्वभूमी अजून त्यांना माहित असण्याचे काही कारणच नव्हते फक्त सलील आणि अनघाला माझा इतिहास माहित होता ..त्यांनी ..कोठेही त्याची वाच्यता केली नव्हती ..पण जेव्हा लग्नाची मागणी घालायची आहे तेव्हा हे लपवणे योग्य ठरले नसते ..हे एक नवीनच संकट होते ..तसा नेहमी मी खूप बिनधास्त वावरतो सगळीकडे .. पण हे प्रकरण नाजूकच होते ..अनघाचे वडील तसे शांत स्वभावाचे होते ..मुख्य प्रश्न होता तिच्या आईचा ..ती खूप चौकस होती ..आणि कडक देखील .तिच्या प्रश्नांना उत्तरे देणे मला कठीण गेले असते ..अनघाचे म्हणणे होते की आता हीच वेळ आहे सांगून टाकण्याची कारण ते बिचारे उगाच इकडे तिकडे स्थळे पाहत आहेत ..आणि अजून जरी प्रत्यक्ष तिला दाखविण्याची वेळ आली नव्हती तरी ..कधीतरी ती वेळ येणारच .. अश्या वेळी ..स्थळ नाकारण्यास काय कारण सांगावे हा प्रश्न होताच ..शिवाय अनघाला असे खोटे कारण सांगून स्थळ नाकारणे पसंत नव्हते .. दोन दिवसांनी ते परत येणार होते ..तो पर्यंत घरात हे दोघे बहिण भाऊच होते .. दोन दिवस माझाही मुक्काम जवळ जवळ त्यांच्याच घरी होता ..भविष्याची सुंदर स्वप्ने रंगवण्यात वेळ कसा निघून जाई समजत नसे ..दुसऱ्या दिवशी सलील ने ' तेजाब ' ची तिकिटे काढून आणली होती ..अनघाच्या पैश्यांनी ...तिला माझ्या सोबत तेजाब पहायचा होता ... सिनेमा सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत अनघा माझा हात हातात घट्ट धरून होती ...!


( बाकी पुढील भागात )

===================================================================

भाग १०७ वा  तेरे मेरे सपने ..अब एक रंग है !

अनघाचे आईवडील यायला अजून दोन दिवस होते ..तो पर्यंत माझा मुक्काम त्यांच्या घरीच होता .. तासंतास आम्ही गप्पा मारत असू ..भविष्यातील स्वप्ने रंगवत असू .. अगदी आपल्या मुलांची नावे काय ठेवायची इथपर्यंत ... अनघाने त्या काळात मला माझ्या आवडीचे पदार्थ करून खाऊ घातले .. तिला स्वैपाक करताना पाहणे म्हणजे एक आनंदानुभव होता .. सहज डौलदार हालचाली .. तन्मयता ..भाजी चिरण्या पासून ..पोळ्या लाटणे .. दुध तापवणे ..दुध तापेपर्यंत ते उतू जाऊ नये म्हणून घेतलेली काळजी .. तिच्या सगळ्या सगळ्या हालचाली मी डोळ्यात साठवून घेत असे .. खरेच एकदा तरी घरातील स्त्री ला स्वैपाक करताना पहिले पाहिजे आणि ते देखील तिच्या नकळत .. खूप खूप सुंदर दिसतात त्या त्यावेळी ... मुख्य म्हणजे केलेला स्वैपाक जेव्हा घरातील लोक आवडीने जेवतात ..तेव्हा ते पाहून त्यांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या समाधानाला तोड नाही .. त्यांना त्या वेळी खाणा-याने किमान एकदा तरी छान झालेय असे म्हणावे अशी अपेक्षा असते ..पण ..बहुधा स्वतःहून ' स्वैपाक छान झालाय ..किवा एखादी भाजी सुंदर झालीय असे ' पुरुष्यांच्या तोंडून निघणे मुश्कीलच असते .. लग्नानंतर १० वर्षानी तर असे उद्गार अगदी दुरापास्तच होतात ... या दोन दिवसात अनेकदा आम्ही खूप जवळ आलो तरी मला अनघाने कधी मर्यादा ओलांडू दिल्या नाहीत हे तिचे वैशिष्ट्य होते .. पुरुष या बाबतीत अधिरच असतो ..पण अनघा मात्र पूर्ण संयमी होती ..एकदा मी मर्यादा ओलांडू पाहतोय असे लक्षात येताच तिने मला स्पष्ट संगितले ..आपण लग्न होईपर्यंत मर्यादा ओलांडायच्या नाहीत आणि ..तू तसा आग्रह देखील करू नकोस ..आग्रह केला तरी की ऐकणार नाही ..तुला राग आला तरी चालेल ..तीचे हे रूप देखील खूप लोभसवाणे होते .. आजकाल ' लग्नापूर्वी शरीर संबंध ठेवण्यास काहीच हरकत नाही ' असे म्हणणाऱ्या मुली पहिल्या की त्यांची खरोखर कीव येते ..कितीही प्रेम असले तरी याचा अर्थ शरीर संबंध झालाच पाहिजे असे अजिबात नसते ..योग्य वेळी स्वतःला अलिप्त ठेवणे मुलींना जमलेच पाहिजे ..अन्यथा मुले नंतर याचाच गैरफायदा घेतात ...त्यातून नवीन संकटे उद्भवतात ..मी जेव्हा तिला म्हंटले की ' अग् आपण लग्न करणारच आहोत ..तुझा माझ्यावर विश्वास नाही का ? तर म्हणाली ' इथे विश्वासाचा प्रश्नच येत नाही .. विश्वास आहे म्ह्णून तर ..तुझा इतिहास माहित असतांना देखील तुझ्याशी लग्नाला तयार झाले ..प्रेम आणि शरीरसंबंध या वेगळ्या गोष्टी आहेत ..माझा तुझ्यावर हा देखील विश्वास आहे की तू मला कधीच माझ्या मनाविरुद्ध काहीही करायला भाग पाडणार नाहीस ..तसेच माझ्या आईवडिलांचा देखील माझ्यावर अपार विश्वास आहे की मी त्यांनी मला दिलेल्या स्वातंत्र्याचा कधीच गैरफायदा घेणार नाही ..तू असं भलता सलता हट्ट करू नकोस ..नाहीतर माझ्या मनातील तुझी प्रतिमा नक्कीच डागाळेल ' अनघाचे हे ठाम बोलणे एकून मी थक्कच झालो ..किती तेजस्वी दिसत होती ती हे म्हणताना ...नंतर परत मी कधी मर्यांदा ओलांडण्याचा विचारही करू शकलो नाही .


दोन दिवसांनी अनघाचे आईवडील परत आल्यावर ..मी त्यांना सर्व सांगितले पाहिजे असे तिचे म्हणणे होते ..पण मी काही ही हिम्मत करू शकलो नाही ..तेव्हा एकदा तीनेच तिच्या आईला माझ्याबद्दल सगळे काही सांगितले ..अगदी पूर्वी मी व्यसनी होतो हे देखील ..फक्त मला परत तिसर्यांदा देखील मेंटल हॉस्पिटल ला जावे लागले हे मात्र तिने सांगितले नाही ..सलील ने पण अनघाची बाजू घेतली ..मी खूप चांगला मुलगा आहे मात्र ..भरकटला होतो असे मत त्याने व्यक्त केले .. कशीतरी तिच्या आईची परवानगी मिळाली एकदाची ..तिच्या आईनेच तिच्या वडिलांना हे सांगितले असावे ..नंतर मी त्यांच्याकडे गेल्यावर माझे खूप आनंदाने स्वागत होई ..त्यांच्या माझ्यावरील विश्वास पाहून मलाच कधी कधी संकोचल्यासारखे होई ..माझा भूतकाळ आठवून स्वतची शरम येत असे ..आता लवकरात लवकर छानशी नोकरी शोधायचे मी ठरवले ..अकोल्याच्या औद्योगिक विभागात जाऊन एक दोन वेळा मी नोकरी साठी प्रयत्न देखील केले ..अनघा पदवीधर झालेलीच होती ..मी कधी कधी मला चांगली नोकरी मिळेल का ? सर्व ठीक होईल का अशी चिंता करत बसे तेव्हा अनघा मला खूप धीर देई .. जे काही प्रामाणिक पणे कमावशील त्यात मी आनंदी राहीन ..हवे तर मी देखील नोकरी करून संसारास हातभार लावीन असे म्हणे .. खरोखर माझे भाग्य हेवा करण्यासारखे होते . अकोल्याला येऊन मला जेमतेम पंधरा दिवस झाले असतील तोच नाशिकहून वडील जास्त आजारी असल्याचा निरोप आला ..
नेहमी प्रमाणे बहिण उन्हाळ्यात नाशिकला जाणारच होती .तिच्याच सोबत परत नाशिकला आलो ..काही दिवस नाशिकला राहून पुन्हा अकोल्याला जाऊ असा विचार केला होता .. शिवाय आता या पुढे कधी व्यसन करायचे नाही हा ठाम निर्धार केलेलाच होता .. वडिलांना डॉ . ठकार यांच्या दवाखान्यात दाखल केले होते .. तीनचार दिवसांनी जरा बरे वाटले म्हणून पुन्हा त्यांना घरी आणले ..परंतु वडिलांच्या तब्येतीत विशेष सुधारणा होत नव्हतीच .. आई सतत वडिलांच्या सेवेत मग्न असे ... त्यांचे कपडे बदलणे ..अंघोळ घालणे .. दाढी करून देणे .. वेळच्या वेळी औषधे देणे .. सगळी कामे आई विनातक्रार करत असे ..कधी कधी आमची मदत घेई ती त्यासाठी ..नाशिकला गेल्यावर बहिणीने बहुधा माझ्या भावाला व आईला अनघा प्रकरण सांगितले होते .. आईने मला आता चांगला रहा .. त्या मुलीचा विश्वासघात करू नकोस असे बजावले ... आता अकोल्याला न जाता इथेच नोकरी शोधावी असे सगळ्यांचे म्हणणे पडले .. वडील आजारी असतांना मी असे घर सोडून दुसऱ्या गावी राहणे योग्य नव्हते...मी जरा नाखुशीनेच नाशिकला राहायला तयार झालो ..काही दिवसातच मी नोकरीच्या जाहिराती पाहू लागलो .. पूर्वी मी हॉटेल पंचवटी मध्ये नोकरी केली असल्याने हॉटेलच्या नोकरीचा मला अनुभव होताच एकदा वर्तमान पत्रात रेस्टाँरट कँशियर ..रिसेप्शनिस्ट ..हवेत अशी नव्याने सुरु झालेल्या हॉटेल ' सूर्य ' ची जाहिरात वाचून मी सोबत अर्ज घेऊन मुलाखतीला गेलो .

( बाकी पुढील भागात )

===================================================================

भाग १०८ वा  हॉटेल सूर्य !

मुंबई आग्रा हायवे वर इंदिरानगर च्या थोडेसे पुढेच नव्याने सृऊ झालेले हॉटेल ' सूर्य ' नाशिक मधील त्या काळचे मोठे हॉटेल होते .. पुण्याच्या मेहेर कुटुंबाचे हे हॉटेल ..जरी ' सूर्य ' असे याचे नाव असले तरी गम्मत अशी की त्याच्या इंग्रजी च्या SURYA अश्या स्पेलिंग मुळे सर्व जण ' सूर्या ' असाच उच्चार करत असत .. माझ्या घरापासून सुमारे १५ किलोमीटर वर हे हॉटेल होते ..मुलाखतीला एक राजेश नावाचे मँनेजर होते ..मी त्यांना माझा अर्ज दिला ..त्यांनी चारपाच किरकोळ प्रश्न विचारून मग ..१७ ..१९ .३३ अश्या दहा विषम संख्यांची मला पटकन बेरीज करायला सांगितली .. मी मनातल्या मनात पटापट आकडेमोड करून उत्तर लिहिले ..तपासायला दिले .. तपासून ते म्हणाले हे उत्तर बरोबर नाही चुकला आहेस तू .. का कोणजाणे पण मला तसे वाटले नाही ..म्हणालो ' सर् ..नाही चुकणार ..' त्या वर त्यांनी परत ती बेरीज केली ' चुकलेच आहे तुझे उत्तर ' पुन्हा ते म्हणाले ..पाहू परत करतो असे म्हणत मी बेरीज केली तर खरोखरच माझे उत्तर चुकले होते .. मी ओशाळलो ..मोठ्याने हसून राजेश सर् म्हणाले ' हे उत्तर चुकले आहे ..तरी देखील मी तुझी या नोकरीकरिता निवड करतो आहे .. ' मी गोंधळलो ..पुढे म्हणाले ' उत्तर जरी चुकले असले ..तरी तुझा ' उत्तर , चुकणे शक्य नाही ' हा तुझा आत्मविश्वास मला आवडला..म्हणून तुझी निवड करतोय ' त्यांनी माझ्याशी हात मिळवला .
 

दुसऱ्याच दिवसापासून त्यानी मला कामावर बोलावले ..दुसऱ्या दिवशी सकाळी मी घरून तयारी करून सकाळी साडेनऊ लाच बाहेर पडलो ..वडिलांच्या जुन्या हर्क्युलस सायकल वरून रोज मला जाणे येणे करायचे होते ..हॉटेल वर पोचल्यावर राजेश सरांनी मला ' मोझेस ' नावाच्या एका तरुणाच्या हवाली केले ..हा माझ्यापेक्षा फार तर पाच वर्षांनी मोठा होता .. तो रेस्टॉरंट कँशियर आणि ' बारमन अशी दोन्ही कामे सांभाळत असे .. त्याला मदतनीस म्हणून मला नेमले गेले .. रेस्टॉरंट मध्ये १५ टेबल्स होते ..सकाळी ११ ते २ आणि सायंकाळी ७ ते अकरा अशी रेस्टॉरंट आणि बार ची वेळ असे .. वेटर कस्टमर च्या ऑर्डर घेऊन त्या आधी मला सांगे ..त्या ऑर्डर मी KOT म्हणजे ' किचन ऑर्डर तिकीट ' वर लिहून देई ..मग माझी सही असलेली KOT वेटर किचन मध्ये ' हेड कुक ' ला देई .. त्या ऑर्डर प्रमाणे मग मी बिल बनवत असे ..वेटरकडून त्या बिलाचे पैसे घेऊन त्याला कस्टमर ला देण्यासाठी पावती बनवून देणे असे माझे काम होते ..मोझेस ने मला दोन दिवसातच चांगले तयार केले .. मी जो सकाळी साडेनऊ ला घरातून बाहेर पडत असे तो एकदम रात्री साडेबारा पर्यंत घरी येई माझे रात्रीचे व दुपार चे जेवण रेस्टॉरंट मध्येच असे .. पगार पाचशे रुपये ठरला होता .. अधिक ओव्हरटाईम झाला तर तो देखील मिळणार होता .


साधारणतः दहा दिवसात ' सूर्य ' मधील सगळ्या स्टाफ आणि वेटर्स शी माझी ओळख झाली .. तेथे वरच्या दोन मजल्यावर मोठे हॉल देखील होते ..जे पार्टी ..करिता भाड्याने दिले जात .. मँनेजर राजेश हे दक्षिण भारतीय होते मात्र त्यांचे शिक्षण महाराष्ट्रातच झाल्याने मराठी चांगले बोलत असत ..माझ्याच वयाचे होते ..अंगाने जरा स्थूल मात्र चपळ .. लालगोरे .. त्यांचा केटरिंग व हॉटेल मँनेजमेंटचा कोर्स झालेला होता ..हॉटेल सूर्य मध्ये एकूण २० रुम्स होत्या त्यापैकी काही सिंगल तर काही डबल ..आणि दोन स्पेशल ' सुट ' देखील होते ..त्यावेळी रूमचे टेरिफ २०० रु पासून सुरु होत होते . माझा रेस्टॉरंटची वेळ संपली की दुपारी माझा वावर हॉटेलच्या सर्व विभागात असे .. एकदा हॉटेलचे अकाऊंटंट ने मला विचारले दुपारचा तू रिकामाच असतोस त्यावेळी मला हिशेबात मदत करशील का ? ..मी ताबडतोब तयार झालो ...पाँश हॉटेलची नोकरी म्हणून मी बूट ..शर्टिंग केलेल्या वेषात रहात असे ..काही दिवसातच मी कामात तरबेज झालो .. कधी कधी शनिवारी व रविवारी अनेक स्थानिक लोक रेस्टॉरंट मध्ये जेवायला येत त्यावेळी सगळे टेबल्स भरलेले असत ..तेव्हा सगळ्यांची बिले पटापट बनविण्याची ..पैसे घेण्याची खूप तारांबळ होई ..पण मजा देखील येत असे .. रात्री सगळी कँश टँली करून मग ते पैसे मी ' रिसेप्शन ' काऊंटर वर तेथील स्टाफ कडे किवा मग हॉटेलच्या वरच्या मजल्यावरच मालक श्री .रमेश मेहेर रहात असत त्यांच्याजवळ देत असे . एकंदरीत खुपच व्यस्त झालो होतो .. मी कामात तरबेज झाल्यावर मोझेस फक्त बार व पार्टीचे कम सांभाळू लागला ...अनघाला पत्र लिहून ..नवीन नोकरी बद्दल कळविले होते ..या व्यस्त रुटीन मध्ये अनघाचे पत्र हा एकमेव विरुंगुळा होता मला ..तिचे पत्र आले की मी अक्षरशःत्याची पारायणे करीत असे ..एकदा .दोनदा ..तीनदा ..कितीही वेळा वाचले तरी समाधान होत नसे ..तिचे नवीन पत्र येईपर्यंत जुनी पत्रे वाचत बसत असे .

===================================================================

भाग १०९ वा स्वप्नमय जग !


अनघाच्या पत्राची वाट पाहणे हा माझा विरुंगुळा बनला होता ..सकाळी ९.३० ते रात्री साडेबारा असं पूर्ण व्यस्त झालो होतो .. या रुटीन मध्ये नाशिकरोड चे मित्र वगैरे सगळे विसरलो होतो ..फक्त लवकरात लवकर आर्थिक दृष्ट्या अधिक सबळ कसा बनेन याचा विचार मनात असे .. केवळ हॉटेल च्या नोकरीवर संसार होणे शक्यच नव्हते ..त्यामूळे कधी कधी भविष्यकाळाची खूप काळजी वाटे ...अनेक प्रश्न मनात येत ..अनघाला आपण खरोखर आनंदी ठेवू शकू का ? आपल्या हॉटेलच्या तुटपुंज्या पगारात आपला संसार सुखाचा होईल का ?वगैरे ..हॉटेल मधील सगळ्या प्रकारची कामे की शिकत होतो ..एकदोन वेळा दुपारच्या वेळी मोझेस सोबत हॉटेल मध्ये ' बर्थ डे ' पार्टी साठी हॉल बुकिंग साठी आलेल्या कस्टमर बरोबर ' पार्टी ' चा मेन्यू ' व ' रेट ' कसे ठरवले जातात ते पहिले ...छोट्या छोट्या २५ जणांच्या समूहाच्या पार्टीची जवाबदारी देखील सांभाळली ..म्हणजे पार्टीला आलेल्या सगळ्या लोकांचे स्वागत करणे ..त्यांच्या ड्रिंक्स व जेवणाची व्यवस्था पाहणे .. हॉटेल मध्ये व्हेज... नॉनव्हेज ...चायनीज ..पंजाबी डिशेस..अश्या सर्व प्रकारचा ' मेन्यू 'होता त्यानुसार ' रेट ' कसा ठरवायचा ..हे देखील शिकलो ..कस्टमरला आवडेल व हॉटेलला देखील फायदा होईल असा मेन्यू सुचविणे व ठरविणे ही देखील एक कलाच होती . कामातील माझी तत्परता ..आणि हुशारी पाहून मालक आणी मँनेजर माझ्यावर खूशच होते ..त्यांना कोणालाच माझ्या पूर्वजीवना बद्दल काहीच माहित नव्हते .. ते मला चेहऱ्याने दिसतो तसाच भोळा भाबडा समजत होते .. मेंटल हॉस्पिटलचे सहा महिने आणि आताचे नोकरीचे दोन महिने अशी माझी व्यसनमुक्ती वाढत चालली होती ..मेंटल हॉस्पिटल च्या या वेळच्या मुक्कामात फक्त पहिले महिनाभर वार्डातील इतर मित्रांच्या सोबत तीनचार वेळा गांजा प्यायलो होतो ..आणि शेवटच्या महिन्यात ' स्नेहसंमेलनाच्या ' वेळी रात्री मेंटल हॉस्पिटल च्या कर्मचारी मित्रांसोबत एकदाच बियर प्यायलो होतो . 


बारचे आणि पार्टी व इतर कामे सांभाळणारा मोझेस गावाला जाणार होता दोन महिन्यांसाठी ..तेव्हा त्याने मला ' बारमन ' चे काम देखील शिकवले ..म्हणजे 'ड्रिंक्स ' च्या वेटर ने घेतलेल्या ऑर्डर नुसार पेग बनविणे ... विविध कॉकटेल्स तयार करून देणे अश्या गोष्टी मी शिकलो .त्याकाळी .' ब्लडी मेरी ' ..स्क्रू ड्रायव्हर ' ' जिमलेट ' अश्या कॉकटेल्सची अधिक मागणी होती ..मोझेस गावाला गेल्यावर ..रेस्टॉरंट कँशियर आणि ' बारमन ' अश्या दोन्ही जवाबदा-या देखील सांभाळू लागलो .. हॉटेलचा बार रेस्टारंटच्या विरुध्द दिशेला होता .. मध्ये माझी कँशियर ची केबिन ..मला पुढील बाजूने खिडकीतून रेस्टॉरंटचे काम व मागे वळले की बार मध्ये जाण्यासाठी वेगळे रस्ते होते .. ' बार ' मध्ये शनिवार ..रविवार सोडून विशेष गर्दी नसे ..त्यामूळे दोन्ही सांभाळणे जमत होते ..आठवड्यातून एकदा वेगवेगळ्या ब्रांड च्या सगळ्या दारूच्या बाटल्या काढून ' स्टॉक ' घेण्याची देखील जवाबदारी माझीच होती ..एकदा तीन चार पेग झाले की मग पिणारा कस्टमर बहुधा पेग कसा भरला जातोय या कडे लक्ष देत नसे ..अश्या वेळी ' बारमन ' कशी ' गडबड करतो हे लक्षात आले ..मात्र मी त्यावेळी धुम्रपान सोडून बाकी सर्व गोष्टींपासून अलिप्त रहात होतो म्हणून कधी कस्टमरच्या पेग मध्ये गडबड करावीशी वाटत नसे .. तरीही आपल्याला स्टॉक घेताना ' शॉर्ट ' येवू नये या भीतीने मी पेग थेंबभर कमीच भरत असे ....त्यामूळे अनेकदा ' स्टॉक ' घेताना हिशेब करूनही माझ्याकडे जास्त दारू उरत असे ..अश्या वेळी जो पिणारा वेटर असेल त्याला मी ती वरची दारू देई .. रेस्टारंट मध्ये सगळे मिळून एकूण ६ वेटर होते ..तसेच रूम सर्व्हिस चे आठ ..दहा जण होते त्यापैकी तीनचार जणांना दारूचे व्यसन होते ..बाकीचे कधी कधी घेणारे होते ..त्यावेळी संपूर्ण स्टाफ मध्ये मी व इतर दोघेच दारू न पिणारे होतो ..ज्या वेळी हॉटेल मध्ये ' ड्रिंक्स ' सोबत पार्टी असे तेव्हा पिणारी वेटर मंडळी खुश असत .. अनेकदा पार्टी ठरवणारी मंडळी दारूचे किती बंपर लागतील हे आधीच ठरवत असत ..जेथे पार्टीचे खाण्याचे पदार्थ सर्व्ह केले जात त्याच्या बाजूलाच ..ड्रिंक्स च काऊंटर लावला जाई .. वेटर कोणाचे लक्ष नाही असे पाहून बाटलीतील थोडी थोडी दारू... टेबलच्या खाली लपवून ठेवलेल्या स्टील च्या पाणी वाटपाच्या जग मध्ये जमा करत आणि हळूच तो जग दुसऱ्या साथीदारा मार्फत तेथून रवाना करत .. ज्या पार्टीत ड्रिंक्स ची काही मर्यादा ठेवलेली नसे त्या पार्टीत तर चंगळच होई वेटर्सची ..एकदोन वेळा मी एकाला असे करताना हटकले तेव्हा इतर मला समजावू लागले ..जाऊ द्या नातू साहेब ..तुमचे काय जातेय ? कस्टमरचे पैसे आहेत .. ते लोक पार्टीत इतका पैसा उडवत आहेत ..आपल्या लोकांनी जरा एकदोन बाटल्या इकडे तिकडे केल्या तरी त्यांना काही फरक पडत नाही ..मी जरी त्यावरून भांडलो नाही तरी ' आपल्याला काय करायचेय ' ही वृत्ती मला आवडत नसे ..त्यामूळे मी पार्टीचा इन्चार्ज असलो की वेटर्सना दारू चोरीची बहुधा संधी देत नसे .. तरी ' आपलेच दात ' या न्यायाने काही वेळा चूप बसावे लागे .


प्रत्येक पार्टीत एखादा तरी दारुडा व्यक्ती असायचाच ..म्हणजे अश्या व्यक्तीचे सगळे लक्ष ' ड्रिंक्स ' च्या काउंटर वर केंद्रित असे तो बहुधा बाजूलाच उभा राहून सारखा पेग मागत असे .. जेवणाकडे त्याचे अजिबात लक्ष नसायचे ..जर त्याची पत्नी पार्टीला सोबत आलेली असली तर ती पत्नी सारखी जवळ येऊन त्याला सावध करायचे काम करी ..हा नुसता मान हलवून पुन्हा तेच करी ..पार्टीच्या शेवटी मग अश्या माणसाला चार लोक आधार देवून नेत असत ..त्यावेळी त्याच्या पत्नीला मेल्याहून मेल्यासारखे होई ..ती उगाचच केविलवाणे हसत सर्वाना तोंड देई . काही पार्टीत बायका देखील सहभागी होत असत ' ड्रिंक्स ' मध्ये ..बहुधा त्यांचे नवरेच त्यांना आग्रह करत ... त्याच्या आग्रहाला मान म्हणून किवा पतीची आज्ञा शिरसावंद्य मानून त्या स्त्रीला ' वाईन ' तरी घ्यावीच लागे ..पत्नीला असा आग्रह करणाऱ्या लोकांची मला कीव येई ..हे स्वतः तर पितातच पण त्या पत्नीला पण सवय लावत आहेत असे मला वाटे ..गम्मत अशी की अश्या ...पार्टीत स्वतःहून ड्रिंक्स घेणाऱ्या महिला कमी असत .स्वतःहून ड्रिंक्स घेणाऱ्या बहुतेक स्त्रियांचे केस बहुधा आखूड कापलेले असत .. तोंडावर मेकअपचा थर असे ..प्रत्येक व्यक्तीशी बोलताना त्यांचे आश्चर्य वाटल्या सारखे भुवया उंचावणे ..मानेला झटके देणे ...ओठांचा चंबू करून लाडिक बोलणे पाहून मला अश्या स्त्रियांचा रागही येई याच स्त्रिया वेटरशी .. हॉटेलच्या स्टाफशी बोलताना मात्र अतिशय तोऱ्यात बोलत असत .


सूर्या हॉटेल मधील माझ्या नोकरीचे पाहता पाहता तीन महिने होऊन गेले होते .. या काळात अनघाची तीन पत्रे आली ..तसेच येताना सोबत मी तिचा बारावीच्या हॉल तिकिटावर असलेला फोटो सोबत घेऊन आलो होतो .तो फोटो पहात ..तिची पत्रे पुन्हा पुन्हा वाचत मी विरह सहन करीत होतो ..एके दिवशी तिचे पत्र आले की बहुतेक माझे आईबाबा व मी दोन दिवसांसाठी नाशिकला तुमच्या घरी पुढील बोलणी करण्यासाठी येणार आहोत .मला खूप आनंद झाला ते वाचून ..केव्हा अनघाला भेटतो असे झाले होते मला ..

===================================================================
भाग ११० वा  अपेक्षा ..वास्तव ..परिणाम !


एके दिवशी रात्री तार मिळाली अनघाच्या वडिलांकडून ' उद्या नाशिकला पोचतो आहोत ' ती तार वाचून माझा आनंद गगनात मावेनासा झाला ..भावाला माझ्या या प्रकरणाचा अंदाज होता ..अर्थात अनघाचे आई वडील यासाठी पुढाकार घेतील असे त्याला वाटले नव्हते .. लहानपणापासून त्याने माझे सगळे धंदे पहिले असल्याने त्याच्या दृष्टीने ..हे देखील काही दिवसांचे नाटक असणार असे त्याला वाटले होते ..तार पाहून त्याला कळाले की हे प्रकरण बरेच पुढे गेलेय ..ते कोणत्या गाडीने येणार हे लिहिले नव्हते त्या वेळी अकोल्याहून नाशिककडे यायला बहुधा रेल्वेगाडी रात्री होती ..दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमी प्रमाणे कामावर निघालो ..जाताना आईला बजावून सांगितले होते की ती मंडळी आल्यावर मला हॉटेलवर फोन करून निरोप दे म्हणून .. हॉटेलच्या काऊंटर वर देखील माझा फोन येईल असे सांगून ठेवले होते ..त्या दिवशी माझे कामात अजिबात लक्ष नव्हते .. दोन तीन बिले बनविताना चुकलो .. सगळे लक्ष ते आले असतील का ? फोन केव्हा येतो ..या कडे होते .. दुपारी जेवण झाल्यानंतर अकौंटंट च्या केबिन मध्ये बसलेलो असतांना निरोप आला की भेटायला कोणीतरी आलेय ..मी लगबगीने बाहेर आलो तर हॉटेल च्या रिसेप्शन वर मोठा भाऊ आणि अनघाचे वडील उभे होते .. आनंदाने मी त्यांचे स्वागत केले ...त्यांना माझी कामाची जागा दाखविली ..बार ..रेस्टॉरंट ..किचन ..सगळीकडे फिरविले ..त्यांनी चहा घेतला ..फारसे बोलणे झाले नाही ..नेमके काय बोलावे हे देखील सुचत नव्हते मला ..अनघाचे वडील स्वभावाने शांत होते ..पूर्वीही कधी त्यांच्याशी फारसे बोलणे होत नसे .. आणि अनघाने त्यांना माझ्या बद्दल सगळे सांगितले आहे हे समजल्यानंतर तर मी त्यांच्याशी बोलायला जरा संकोचच करत असे ..मोठा भाऊ देखील पहिल्यांदाच माझे कामाचे ठिकाण पाहायला आलेला ..तो सगळे निरीक्षण करत होता ..एकंदरीत माझे ठीक चालले आहे हे त्याला वाटल्याचे त्याच्या चेहऱ्या वरून जाणवत होते ..माझा लगेच अर्ध्या दिवसाची सुटी घेऊन त्यांच्या सोबत घरी जाण्याचा विचार होता ..तसे मी भावाला म्हणालो ..काही गरज नाही सुटी घ्यायची हे राहणार आहेत अजून एक दिवस असे त्याने सांगितले .


रात्री केव्हा एकदा घरी जातो असे झाले होते मला ..नेहमी प्रमाणे रात्री साडेबारा च्या सुमारास घरी पोचलो तर घरात सगळे जागेच होते ..पलंगावर वडील समाधानाने बसले होते ..आणि समोर माझी आई ..भाऊ ..अनघाचे वडील ..आई दोघेही होते .अनघा कुठे दिसेना ..मी चौकस नजरेने त्यांच्याकडे पहिले तर आतून अनघा आणि माझ्या वाहिनी बाहेर आल्या ..माझा चेहरा प्रफुल्लित झाला ..तीने देखील नजरेनेच मला अभिवादन केले ..इतक्या सगळ्या मोठ्या माणसांसमोर नेमके काय बोलावे तेच मला सुचेना ..जेवण झाले का ? अकोल्याला पाऊस कसा आहे .. वगैरे गप्पा करत होतो मी .. चला झोपायला आता उशीर झालाय असे आईने म्हणताच .. सगळे झोपाण्याची तयारी करू लागले .. पुढच्या खोलीत मी ..भाऊ ..अनघाचे वडील आणि पलंगावर माझे वडील अशी पुरुष मंडळी बाहेर झोपलो ..आतल्या खोलीत आई वाहिनी ..अनघा असा स्त्री वर्ग झोपला होता ..त्या दिवशी रात्री मी झोपलोच नाही ..अनघाशी एकांतात कसे भेटता येईल ..बोलता येईल याचाच विचार सुरु होता ..तीन वेळा मी पाणी पिण्याच्या निमित्ताने उठून स्वैपाक घरात चक्कर मारली ..मुद्दाम खोकलो ..अनघाने माझी चाहूल लागून बाहेर यावे ही इच्छा होती ..शेवटी तिसऱ्या वेळेस ती देखील पाणी प्यायला म्हणून उठून बाहेर स्वैपाक घरात आली ..हळूच कुजबुजत आम्ही बोललो ..तिचा हात हातात घेऊन ..कशी आहेस ? तुझी खूप आठवण येते .. अशी दोनचार वाक्ये जेमतेम बोललो ..तशी अजून कोणतीतरी उठल्याची चाहूल लागली म्हणून अनघा पटकन आतल्या खोलीत निघून गेली ..

रात्रभर मी जागाच होतो ..सकाळी आई नेहमी प्रमाणे पहाटे उठल्यावर मी देखील उठून स्वैपाक घरात आईकडे गेलो ..आईला अनघा पसंत आहे काय ते मला विचारायचे होते .. आईने ' छान आहे मुलगी ..आवडली सगळ्यांना ' अश्या तुटक शब्दात प्रतिक्रिया देत ..आता या पुढे नीट रहा म्हणजे झाले असा सल्ला दिला .दुसऱ्या दिवशी सगळ्यांचा नाशिक ची प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा कार्यक्रम होता ...मी खास सुटी घेऊन घरी थांबण्याची काही गरज नाही असे सगळ्यांचे म्हणणे पडले ...काहीही वाद न घालता मी कामावर गेलो ..खरेतर अनघाला घेऊन एकटे ' सोमेश्वर ' ला फिरायला जावे असा माझा प्लान होता ..पण सगळ्या वडीलधाऱ्या मंडळीसमोर मला तो प्रस्ताव मांडता आला नाही ..शिवाय आमची आधीची ओळख असल्याने ..एकमेकांची माहिती करून घेण्यासाठी वेगळे फिरायला जाण्याची काही गरजच नव्हती ..मी अनघाला एकटी गाठून ..आपण फिरायला जायचे का ? असं प्रस्ताव मांडला तर ती पण मोठ्या शहाजोग पणे ..असे चांगले दिसणार नाही ..तुझे आईवडील ..भाऊ वाहिनी ..काय म्हणतील असे म्हणाली ..तेव्हा माझा नाईलाज झाला ...रात्री घरी आल्यावर पुन्हा तेच .. तिसऱ्या दिवशी मात्र मी सकाळी घरीच थांबलो ..प्रचंड पाऊस देखील पाडत होता ..पावसामुळे अनघाला कुठे बाहेर घेऊन जाण्याची सोयच राहिली नाही ..नजरेनेच आम्ही खूप बोलत होतो . मला काल दिवसभरात यांची नेमकी बोलणी झाली असावीत हे जाणून घ्यायचे होते ..पण सगळे नेहमीप्रमाणेच वागत होते ..आमच्या लग्नाचा किवा पुढे कसे ? हा विषय कोणीच काढत नव्हते ..

शेवटी मी आईला विचारलेच तर तिने सांगितले ..तू आताच काही महिने चांगला राहतो आहेस ..किमान एक वर्षभर चांगला राहिल्यावर पुढे ठरवायचे असे ठरले आहे ..अनघाचे आईवडील ..तो पर्यंत ' साखरपुडा ' उरकून घेऊ लवकर असे म्हणत होते ..पण आम्हीच त्यांना अजून काही दिवस थांबायचा सल्ला दिला आहे .. तू आता नीट बँकेत पैसे साठव ..भाड्याने खोली घे ..पुढची सगळी संसाराची तयारी .सामानाची जमवाजमव करत रहा ..असे स्पष्ट सांगितले ...आईला मग मी ' अनघाला इथे अजून दोन दिवस थांबू देत ..असे म्हणालो ' तर आईने त्याला नकार दिला ..असे चांगले दिसत नाही ...मी असे काही म्हणणार नाही हे उत्तर दिले ' जरी काही नकारात्मक घडले नव्हते तरी माझा अपेक्षाभंग झाला होता हे नक्की ..कारण एका व्यसनी व्यक्तीच्या स्वभावानुसार मी आधीच काय काय घडावे हे ठरवून टाकले होते ..त्यात आमच्या साखरपुड्याची तारीख ठरेल ..अनघाच्या आईवडिलांना पुढे पाठवून आपण अनघाला दोन दिवसांसाठी नाशिकला थांबवून घेऊ ..छान ' सोमेश्वर ' ला फिरायला जाऊ ..नाशिकरोडच्या मित्रांना चांगल्या मित्रांना अनघाची ओळख करून देवू ..अनघाला हॉटेल ' सूर्य ' मध्ये जेवायला घेऊन जाऊ वगैरे गोष्टी होत्या ..प्रत्यक्षात तसे काहीच करता आले नाही या बद्दल खूप निराश झालो होतो मनातून .. मोठ्याभावाने मुद्दाम तर वेळकाढूपणा केला नसेल ? अशीही शंका मनात येत होती ..त्याला माझ्यावर इतक्या सहजी विश्वास बसणे कठीणच होते ..म्हणून अजून किमान एक वर्ष जाऊ देत मग ठरवू असे त्याचे मत होते ...सगळ्यांचा मला राग आला होता ..अनघा बिचारी इतक्या सगळ्या मोठ्या मंडळींसमोर काही बोलणे शक्यच नव्हते ..' तिला ..तू आताच अकोल्याला जाऊ नकोस ..दोन दिवस थांब ' म्हणालो तर तिने ' असे चांगले दिसत नाही '... हे उत्तर दिले .


( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें