प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.com



मंगलवार, 12 मार्च 2013

व्यसनाची कथा

भाग ३१

जवळची ब्राऊन शुगर संपल्यावर माझी चीडचीड वाढली होती , मला ब्राऊन शुगर न मिळाल्याने त्रास होतोय हे मित्रांना सांगणे देखील लज्जास्पद वाटत होते , कारण मग त्यांना समजले असते मी ब्राऊन शुगर च्या आहारी गेलोय ते ( एखाद्या व्यसनीला आपण व्यसनी झालोय हे इतरांजवळ कबुल करायला खूप त्रास होतो , त्याचा अहंकार त्याला हे करू देत नाही ) त्यांनी माझ्याशी खोटे बोल्रून माझ्याजवळचा साठा संपवला होता या बद्दल त्यांचा खूप रागही आला होता . आमची समूहगीत स्पर्धा दुपारी चार ला होती तोवर जमल्यास दोन वेळा रिहर्सल घेणे देखील भाग होते आणि माझी अवस्था तर बिघडत चालली होती . इतर स्पर्धा जवळजवळ संपुष्टात आल्या होत्या त्यामुळे बाकीचे स्पर्धक मस्त थट्टा मस्करी करत होते , मी उसने अवसान आणून सर्व काही ठीक असल्याचा देखावा करत होतो . ११ वा एक रिहर्सल घेण्यासाठी समूहातील सगळ्या मुलामुलींना गोळा केले तेव्हा लक्षात आले की एक चंदू नावाचा मुलगा हजर नाहीय . जेव्हा चौकशी केली तेव्हा समजले की तो पहाटेच जवळच असलेल्या मालेगावला आपल्या नातलगांना भेटण्यास गेला होता व १२ वा पर्यंत येणार असा निरोप त्याने एकाला दिला होता , मला चंदू चा प्रचंड राग आला कारण मी समूह्गीताचा प्रमुख असल्याने त्याने माझ्या परवानगी शिवाय असे जायला नको होते .एकतर मी टर्की त होतो त्यामुळे माझा आवाज नीट लागत नव्हता त्यात चंदू ची कमतरता नक्कीच जाणवणार होती , मनातल्या मनात मी धुमसत होतो , रिहर्सल च्या वेळी मी एका मुलीवर ती बाजूच्या दुसऱ्या मुलीकडे पाहून हसली म्हणून ओरडलो , ऐरवी मी मुलींशी शक्यतो मृदू स्वरात बोलत असे , काही चुकले तर न रागावता समज देत असी पण आज असे अचानक मी ओरड्ल्यामुळे तिला एकदम अपमान वाटला व ती रडू लागली , मुलींना असे चार चौघात कोणी मोठ्याने रागावले की त्या त्यांचे ब्रह्मास्त्र बाहेर काढतात, तसेच झाले ती रडू लागली , कसेतरी तिची समजूत काढून एक रिहर्सल पूर्ण केली .१२ वाजून गेले तरी चंदूचा पत्ता नव्हता चंदू आलाच नाही तर या विचाराने मी अधिक अवस्थ होत होतो , मनातल्या मनात त्याला लाखोली वाहत होतो .टर्की सुरु असल्याने मी काहीही खाऊ शकत नव्हतो इतर जण मस्त माझ्यासमोर जेवले .

सर्व दुपार अशीच शारीरिक आणि मानसिक त्रासात गेली दुसरी रिहर्सल घेतलीच नाही मी , कसाबसा तयार होऊन चेहऱ्यावर हसू ठेवत मी वावरत होतो गांजाच्या एकदोन सिगरेट ओढून झाल्या होत्या पण त्रास काही कमी झाला नव्हता ,आता आमच्या स्पर्धेची वेळ जवळ आली होती चंदूचा अजून पत्ता नव्हता शेवटी चंदू च्या ऐवजी मी दुसऱ्या एकाला उभे करायचे ठरवले होते व त्याला जमेल तसा आमच्या आवाजात आवाज मिसळ असे सांगितले एकंदरीत सगळा गोंधळच होता . अगदी आमच्या गाण्याचा नंबर येण्यच्या पाच मिनिटे आधी चंदू घाईघाईने माझ्या जवळ येताना दिसला , मला त्याचा राग आला होता , ' सॉरी जरा उशीर झाला ' असे लोचट पणे म्हणून बाजूला उभा राहिला , त्याला रागावण्यासाठी देखील वेळ राहिला नव्हता . मग त्याच्यासाहित स्टेज वर गेलो आम्ही .. आधी श्लोक ...आणि मग गाणे झाले , आमच्या दृष्टीने गाणे अचूक झाले होते बक्षिसाची अपेक्षा ठेवण्यास हरकत नव्हती नशीब असे की माझाही आवाज नीट लागला एकदाही कोरडा खोकला आला नाही हे विशेष . सायंकाळी ७ ला पारितोषिके जाहीर झाली आणि वाटप देखील सुरु झाले , आमच्या गाण्याचा नंबर नव्हता लागला . म्हणजे चक्क पराभव होता हा माझा गेले २ महिने मी या गाण्याच्या मागे लागलो होतो . माझा चेहरा पडला होता मला इतर मुले समजावीत होती . पारितोषिक वितरण संपेपर्यंत रात्रीचे ९ वाजून गेले , जवळच्या गावातील मुले आपापल्या गावी जायला निघाली होती , जे दूरच्या गावातील होते अश्या आठदहा कॉलेजची मुले थांबली होती रात्री मुक्काम करून सकाळी जावे असे आमच्या जी .एस ने जाहीर केले , खरेतर मला केव्हा एकदाचा नाशिक ला जाऊन गर्द ओढतो असे झाले होते पण सर्वांबरोबर थांबणे भाग होते . मग क्वचित दारू पिणारी मुले गावात निघाली पार्टी करायला, मी आणि आमचे मित्र देखील निघालो कशीतरी रात्र काढायची होती मला . बार मध्ये प्रत्येक जण आपल्या जवळच्या पैशांनी पिणार होता , आम्ही मित्रांनी आधीच सर्व मजा करून जवळचे बहुतेक पैसे संपवले होते त्यामुळे आमच्या जवळ जेमतेम पैसे होते जुळवाजुळव करून आम्ही एक क्वार्टर मागवली पण आमच्या सारख्या सराईत लोकांना पाच जणांत एक क्वार्टर म्हणजे ' बहोत ना इंसाफी " होती . ती क्वार्टर संपवल्यावर आम्ही पुन्हा एकमेकांचा तोंडाकडे पाहू लागलो .
आता सर्वांच्या जवळ जाण्याच्या भाड्याचे पैसे उरले होते ते खर्च केले असते तर परत जायचे वांधे होणार होते , त्यातील काही पैसे खर्च करू आपण आणि कमी पडणारे कोणाकडून तरी उसने घेऊ असे ठरले , पण कोण उसने देणार ? आमचा जी. एस . होताच उसने पैसे द्यायला हे गृहीत धरले आम्ही पण आता इंग्लिश दारू पिणे परवडणार नव्हते म्हणून देशी दारूचे दुकान शोधत गावात फिरू लागलो रात्रीचे ११ वाजून गेले होते त्यामुळे गावातील दुकाने बंद होती थंडीचे दिवस असल्याने वर्दळ ही नव्हती अजिबात एकाने नदीच्या पलीकडे एक हातभट्टीचा अड्डा उघडा असेल असे सांगितले म्हणून शोधत शोधत निघालो गावाबाहेर अंधारात चाचपडत ती कोरडी नदी आम्ही पार केली पलीकडे शेतात एक लाकडी टपरी होती आत कंदील सुरु होता आम्ही टपरी चे दार वाजवून आतल्या माणसाला उठवले तो देखील प्यायलेलाच होता अंगावर जाड कांबळे , मफलर बांधून होता . त्याच्या कडून मोठी बाटली घेतली २० रुपयात , इतक्यात एकाच्या मनात आयडिया आली याला जर बोलण्यात गुंगवून ठेवला तर अजून एक बाटली लांबवता आली असती . झाले नजरेने इशारे झाले आणि आम्ही चार जण त्या माणसाची चौकशी करू लागलो त्याला बोलण्यात गुंतवले आणि एकाने कोपर्यात भरून ठेवलेल्या बाटल्यापैकी एक बाटली लांबवली मग यथेच्छ दारू पिऊन आम्ही होस्टेलवर यायला निघालो , आता माझी बडबड सुरु झाली होती दिवसभराचा सगळा राग , संताप निघत होता . कॉलेज जवळ आलो तर आमच्या कॉलेजची मुले मुली बाहेर मैदानात बसून गाण्याच्या भेंड्या वगैरे खेळत होती आमच्या आरडाओरडा दुरुनच एकून त्यांना काय ते समजले , मी तेथे पोचताच चंदू च्या नावाने शिव्या घालायला सुरवात केली ' आज त्याच्या मुळे आपले गाणे लागले नाही असा आरोप करू लागलो तो बिचारा कुठे तरी झोपला होता , ' आज साले को खल्लास करूंगा म्हणत मी सगळ्या खोल्यांमध्ये चंदू ला शोधू लागलो , कोणीतरी त्याला ही बातमी देऊन फरार व्हायला सांगितले आणि तो निघूनही गेला तरी माझा आरडाओरडा सुरु होता , आमच्या कॉलेजच्या मुलीनी माझे हे रूप प्रथमच पाहिलेले होते त्यामुळे त्या भेदरल्या होत्या . निवृत्ती अरिंगळे मला रागावला पण मला कसलीच शुध्द नव्हती , माझ्या बरोबरचे मित्र मला जबरदस्ती झोपवत होते पण राहून राहून मी चंदुला शिव्या घालत उठून वर्गाच्या बाहेर येत होतो . सुमारे पहाटे ४ पर्यंत माझा हा तमाशा चालला होता .

========================================================================


इंदिरा गांधी यांची हत्या ..जाळपोळ , लुटमार ! ( वगैरे भाग ३२ वा )


मी गांजा , दारू आणि गर्द च्या विळख्यात चांगलाच फसलो होतो , दिवसभरात नशे साठी मला किमान त्यावेळी २० रु , तरी लागतच असत , मी जे द्राक्ष पेट्यांचे हमाली काम करायला जात होते ते काम जेमतेम सिझन मध्ये चार महिने मिळत असे बाकी दिवस मी घरातून काहीतरी खोटीनाटी कारणे सांगून पैसे नेत असे , वडील जरी मला जास्त पैसे देत नसत तरी मी आईला बरोबर वशिला लावून पैसे उकळत असे तिच्या कडून , ती घरातच शिवणकाम करे त्याचे पैसे असत तिच्याकडे , कॉलेजला जाणारा मुलगा आहे तेव्हा असतात खर्च वगैरे असे तिला वाटे , माझ्या व्यसनाची माहिती मिळाली होती पण मी त्यांना लोक उगाच काहीतरी सांगतात असे म्हणून ते उडवून लावत असे , किवा तिला माहित जरी असले व्यसनाबद्दल तरी मी पैश्यांसाठी इतका हट्ट करीत होतो की नाईलाजाने घरात कटकट नको या विचाराने तिने अनेक वेळा मला पैसे दिले होते , भाऊ जेव्हा पुण्याहून इंजिनिरिंग चे शिक्षण घेऊन परत आला तेव्हापासून माझे जरा वांधेच झाले होते कारण तो सतत माझ्या हालचालींवर लक्ष ठेवून असे जरी तो मला प्रत्यक्ष अडवू शकत नव्हता तरी माझे काम सोपे पणाने देखील होऊ देत नव्हता . माझे इतर तीन चार मित्र देखील हळू हळू माझ्या सारखेच गांजा आणि गर्द च्या विळख्यात अडकले होते , जसे जसे व्यसनाचे प्रमाण वाढू लागले तसे तसे आमचे जग लहान होते गेले म्हणजे फक्त कॉलेज ला जेमतेम तोंड दाखवण्यासाठी , मग अड्डयावर आणि तेथून घरी असा दिनक्रम ठरला होता .
जेव्हा मी आमच्या विष्णू नगर मधील अय्युब या गुंडाला धडा शिकवला होताच तेव्हाच काही दिवसातच सिन्नर फाटा येथे ' शिवसेना ' शाखा सुरु करण्यात आली होती आणि माझी त्या शाखेचा सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली होती , सिन्नर फाटा येथे एक शिवसेनेचा वार्ता फलक होता , त्यावर आठवड्यातून एकदोन वेळा काहीतरी बातमी , किवा सुविचार लिहिण्याचे काम माझ्याकडे होते . त्याच दरम्यान नाशिक मध्ये ' 'मराठा महासंघ ' या नवीन संघटनेची देखील स्थापना झाली होती , शिवसेनेचेच लोक सुरवातीला त्यात सामील झाले होते , माझा एक मित्र मराठा महासंघाचा पदाधिकारी होता , तर दुसरा एक मित्र दलित पँथर चा , मग कॉंग्रेस , स्थानिक बहुजन युवा संघटना ,हिंदू एकता , अश्या सगळ्या सामाजिक आणि राजकीय पक्ष संघटनांमध्ये माझा वावर होता ते देखील हळू हळू कमी कमी होता चालले होते . फक्त बाहेर माझी ' 'डेंजर बामण ' अशी ओळख मात्र कायम होती त्यामुळे कोणी माझ्या नादाला लागत नसत . कदाचित माझ्या व्यसनांबद्दल देखील बाहेर माहित असावे तरी कोणी त्याविषयी ' हा ज्याचा त्याचा खाजगी मामला ' , म्हणून बोलत नसत पण मला वाटे कोणाला काही माहित नाही .
एकदा असेच सायंकाळी आम्ही दुर्गा गार्डन मध्ये नशा करत बसलो असताना बाहेर च्या रस्त्यावर जरा गोंधळ वाटला अनेक तरुण घोळक्याने रस्त्यावर जमले होते , आमच्या लक्षात आले की दुपारीच त्यावेळच्या विद्यमान पंतप्रधान ' इंदिरा गांधी ' यांच्यावर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनीच गोळ्या घातल्याची बातमी रेडिओवर प्रसारित झाली होती , तसेच स्थनिक सायंदैनिक 'भ्रमर ' मध्ये देखील ही बातमी आली होती , त्या आहेत की गेल्या हे नीट स्पष्ट नव्हते पण एकदाचे त्या गेल्या हे कळले आणि त्याच्या शीख सुरक्षा रक्षकांनी गोळ्या घातल्या म्हणून लोक शीख समुदायावर नाराज होते , आवाज आणि गोंधळ वाढला तेव्हा आम्ही देखील मग त्यात सामील झालो. हळू हळू सुमारे ३०० ते ४०० तरुणांचा जमाव जमला होता , सगळे संतापात होते , त्यात फक्त युवक कॉंग्रेसचेच नव्हे तर इतरही संघटनांचे लोक सामील होते त्या घटने बद्दल चा संताप व्यक्त करण्यासाठी लोक आतुर झाले होते, प्रत्येक माणूस आपल्या व्यक्तिगत , घरगुती , आर्थिक किवा इतर कोणत्यातरी अडचणीने ग्रस्त असतोच व तो आतल्या आत धुमसत असतो व जेव्हा असे काहीतरी कारण मिळते तेव्हा अशी धुमसणारी माणसे एकत्र येतात आणि विध्वंस हा ठरलेलाच असतो .अशा वेळी त्या विशिष्ट व्यक्ती वरील निष्ठे पेक्षा आपल्या मनातील अंगार कोठेतरी बाहेर काढावा ही भावना त्यामागे जास्त असते , त्यावेळी नाशिक रोड येथे ' बग्गा ' कुटुंबियांची एक इमारत मुक्तिधाम च्या समोर होती या घरातील दोन ' बग्गा ' बंधू जुळे होते आणि ते आमच्या सोबत कॉलेजला शिकत असत तसे ते अगदी सोशल होते सर्वांशी मैत्री होती त्यांची कोणत्याही राजकारणात नव्हते फक्त त्या पैकी एक जरा बिनधास्त प्रवृत्तीचा होता म्हणजे मारामारी वगैरे मध्ये असणारा .
तर कोणी तरी गर्दीत ' सब सरदार ऐसेही है ' असे म्हणाले आणि लगेच गलका झाला आणि तावातावाने मंडळी बग्गा यांच्या घराकडे निघाली , काही लोकांच्या हातात काठ्या होत्या , काहींच्या हातात दगड , तावातावाने घोषणा देत जमाव निघाला , एव्हाना रात्री चे ८ वाजून गेले होते , पोलीस सतर्क होते , रस्त्यावर सगळीकडे सामसूम झालेली होती गलका करत आम्ही बग्गा यांच्या इमारती जवळ पोचलो त्या इमारतीत सगळे बग्गा कुटुंबीयच राहत होते , इमारतीजवळ गेलो तर एकदम अंधार पसरलेला होता खालचे एक हॉटेल , आणि इतर दुकाने देखील बंद केली गेली होती इमारतीत देखील सगळीकडे अंधार होता , जमाव इमारती समोर थांबून घोषणा देवू लागला आता काहीतरी भयंकर घडणार याची मला खात्री होती , इमारतीत अंधार असल्याने नेमकी सुरवात कशी करावी या बाबतीत जमावाच्या समोरच्या फळीचे एकमत होत नव्हते , कोणीतरी एकदोन दगड इमारतीवर भिरकावले आणि अचानक इमारतीच्या गच्चीवरून सोडावॉटच्या रिकाम्या आणि भरलेल्या देखील बाटल्यांचा वर्षाव सुरु झाला , अंधारामुळे बाटल्या कोण आणि नेमक्या कोठून फेकत आहे हे समजायला मार्ग नव्हता , हे सगळे इतके अचानक घडले की असे काही होईल याचा कोणाला अंदाज नव्हता , बग्गा कुटुंबीय असे आक्रमक होतील असे वाटले नव्हते कोणालाच त्यामुळे बाटल्या रस्त्यावर येऊन फुटू लागताच जमावाचे धैर्य खचले एकदम पळापळ सुरु झाली मिळेल त्या दिशेला लोकांना वाट फुटली . आम्ही देखील पुन्हा दुर्गा गार्डन कडे पळालो .

=======================================================================


भाग ३३ - रेल्वे स्टेशनवरील लुटमार !


सोडावॉटर च्या बाटल्यांचा वर्षाव झाल्यावर जमावाची जी पळापळ झाली ती गमतीशीर होती , वाट फुटेल तसे सगळे सैरावैरा पळत होते , तितक्यात समोरून पोलिसांचे गाडी आली तसे अजूनच गोंधळ झाला , आम्ही देखील पळत दुर्गा गार्डन गाठले , व तेथे अंधारात लपून बसलो , आम्हाला स्वतचेच खूप हसू देखील येत होते , इतक्या तावातावाने निघालेला जमाव केवळ १५ ते २० सोडावॉटर च्या बाटल्यांनी पांगवला होता . जमावाची ही अजून एक खासियत आहे एकाने दगड मारला की सगळे आक्रमक होतात आणि एक पळू लागला की सगळे पळतात . मला मनातून बरे वाटत होते असे झाले या बद्दल कारण जेव्हा आम्ही जमांवात सामील होऊन 'बग्गा ' यांच्या इमारतीकडे निघालो होतो तेव्हा एक विचार माझ्या मनात होता की जर ते कॉलेजला असलेले बग्गा बंधू खरोखर माझ्या समोर आले असते तर त्यावेळी मी त्यांच्यावर हात उचलू शकलो असतो का ? कारण आमचे व्यक्तिगत काहीही शत्रुत्व नव्हते अर्थात मैत्री देखील नव्हती पण कॉलेजला रोज तोंडावर तोंड पडत असे अश्यावळी एखाद्या नेत्याच्या हत्येवरून ज्यांचा त्या हत्येशी काही संबंध नाही तर केवळ एखादी विशिष्ट जात अथवा धर्म या वरून त्या व्यक्तीला मारणे मला तरी जमले नसते ,जमावाच्या नादाने जरी मी गेलो असलो तरी फक्त काहीतरी थ्रीलिंग घडणार आहे म्हणूनच मला जावेसे वाटले होते आणि तारुण्याची खुमखूमी होतीच अर्थात अंगात, अनेक तरुण बहुधा त्या जमावात माझ्या सारखेच असणार जे केवळ काहीतरी थ्रिलिंग अनुभवायला मिळणार म्हणून जमावात सामील झाले होते .
दुर्गाबागेत जाऊन आम्ही पुन्हा चिलीम ओढून ताजेतवाने झालो आणि मग घराकडे निघालो रेल्वे स्टेशन च्या पलीकडे रेल्वे क्वार्टर्स होते त्यामुळे रेल्वे स्टेशन वर जाणे आलेच , पाहतो तर काय ..रेल्वे स्टेशन वर देखील असेच तरुणांचे घोळके उभे होते सगळी मुले सिन्नर फाटा , विष्णुनगर , स्टेशनवाडी येथील आमच्या ओळखीचीच होती ..मग पुन्हा काय पुन्हा आम्ही त्यांच्यात सामील झालो रात्रीचे साधारण १२ वाजून गेले होते आणि हावडा कडे जाणारी कलकत्ता मेल थोडी लेट होती ती स्टेशनवर येत होती गाडी स्टेशनवर येताच घोळक्यांनी उभी असलेली मुले प्रत्येक डब्यात चढली आणि आत कोणी शीख दिसतोय का ते पाहू लागली एका डब्यात एक कुटुंब सापडले तशी एकदम शिवीगाळ करत मुलांनी त्या कुटुंबप्रमुखाला डब्याबाहेर खेचण्यास सुरवात केली , त्या कुटुंबातील स्त्री चे रडणे , किंचाळणे ,लहान मुलांचा मोठा आक्रोश झाला तो पुरुष भेदरला होता हाता पाया पडत होता तरीही त्याला कोणाला दया आली नाही मला ते पाहून कसेसेच होत होते वाटले आपण मध्ये पडून त्याला सोडवावे पण सगळी मुले आमच्याच एरियातील होती त्यांना माझी मध्यस्ती चालली नसती, लाथा बुक्क्यांनी त्या माणसास मारणे सुरु होते ,अजूनही दोन डब्यातून असेच तिघांना खाली खेचत आणले गेले होते फलाटावर गोंधळ माजला होता . तो माणूस सारखा सुटून डब्याकडे धाव घेत होता , आता त्याची पत्नी व मुले देखील नवऱ्याला वाचवायला खाली उतरली होती आणि मध्ये पडत होती त्या माणसाची पगडी सुटली होती अतिशय करुण दृश्य होते ते , त्याच्या खिशातील चिल्लरआणि नोटा बाहेर पडल्या होत्या , दोन तीन जणांनी लगेच त्या उचलून स्वतच्या खिशात टाकल्या एकाने त्याच्या हातातील घड्याळ हिसका मारून ओढले . हे पाहून मात्र मला राग आला , यांचा नेमका हेतू काय आहे ? लुटमार की बदला ? तसे पहिले तर दोन्ही हेतू निरर्थक होते मी मग आरडा ओरडा सुरु केला घड्याळ परत दे म्हणून त्या मुलाच्या मागे लागलो तेव्हा ते घड्याळ त्याने त्या स्त्री च्या हाती दिले एव्हाना रेल्वे पोलीस जे लांब उभे होते ते पण मध्ये पडले आणि ते कुटुंब पुन्हा गाडीत जाऊन बसले . गाडी या गोंधळात गाडी सुमारे १५ मिनिटे थांबली होती स्टेशनवर .
हा सगळा घटनाक्रम आठवला की अजूनही मन खिन्न होते , माणसे व्यक्तिगत शत्रुत्व नसताना देखील एखाद्या नेत्याच्या हत्येवरून इतकी क्रूर होऊ शकतात ? हत्या करणाऱ्या व्यक्तीला सोडून इतर निरपराध माणसांना असे मारणे , त्यांची मालमत्ता जाळणे , लुटमार करणे कितपत योग्य आहे ? या जमावात खरोखर इंदिरा गांधी यांच्या बद्दल तळमळ असणारे किती लोक होते ? की फक्त संधीसाधुच सामील झाले होते ? मी जरी व्यक्तिगत जिवनात नशा करत होतो तरी देखील माझे संवेदनशील मन मात्र हा सगळा प्रकार पाहून अंतर्मुख झाले होते . जाती -धर्माच्या , पंथाच्या , राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोक कधी विचार करू शकतील? तो खरोखर भाग्याचा दिवस असेल .

========================================================================

भाग ३४  पुन्हा आत्महत्या ..घरातील आतंक !


गर्द आणि इतर व्यसनांच्या मी पूर्ण आहारी गेलो होतो व आता माझी घरातील पैश्यांची मागणी वाढली होती , ती प्रत्येक वेळी पूर्ण होणे शक्यच नव्हते तेव्हा मग घरात छोट्या मोठ्या चोऱ्या सुरु झाल्या वडील पक्षाघातातून बरे होऊन आले होते आणि पुन्हा त्यांनी कामावर जाणे सुरु केले होते मात्र ते जरा विसरभोळे झाले होते त्याचा फायदा घेऊन मी त्यांच्या पाकिटातून पैसे गुपचूप काढत असे , त्यांच्या जरा लक्षात आल्यासारखे होई पण मी तुम्हीच कोठेतरी ठेवले असतील , खर्च केले असतील , हल्ली तुम्हाला आठवत नाही नीट, असे समर्थन देऊन त्यांना गप्प करीत असे अर्थात त्यांचे समाधान होत नसे तरी देखील त्यांचा नाईलाज होता , मग त्यांनी पाकीट लपवून ठेवण्यास सुरवात केली किवा पाकिटात अगदी मोजके पैसे ठेवत ते .एकदा तर मी रात्री हळूच ते झोपले असताना त्यांच्या गळ्यातील जानवे ब्लेड ने कापून त्यातील कपाटाच्या लॉकर ची चावी काढून रात्रीच सगळे झोपले असताना कपाट उघडून पैसे काढले होते व चावी परत तशीच त्यांच्या जवळ ठेवली होती , त्यांना सकाळी उठल्यावर झोपेत जानवे कसे काय तुटले याचे आश्चर्य वाटले होते व काहीतरी गडबड आहे हे देखील ध्यानात आले होते त्यांच्या आणि मी मात्र संभावित होऊन वावरत होतो .( माझी जरी देव धर्मावर श्रद्धा नव्हती तरी त्यांना जानवे असे तुटल्याने किती मानसिक त्रास झाला असावा याची आज कल्पना येते आहे )
मोठा भाऊ अभियांत्रिकी चे शिक्षण पूर्ण करून नाशिक येथेच पाटबंधारे खात्यात नोकरीस होता मग मी त्याच्या पाकिटाकडे मोर्चा वळविला पण तो माझ्या बाबतीत आधीच सावध असे त्यामूळे मी पैसे काढलेले त्याला लगेच कळत व तो आरडा ओरडा करे पण मी चोराच्या उलट्या बोंबा या नात्याने त्याच्याशी भांडत असे व घरात उगाच कटकट होते म्हणून तो बिचारा माघार घेई , मला आठवते इतर दिवशी वडील आणि भाऊ कामावर गेल्यावर मी आईच्या मागे काहीतरी भुणभुण लावून पैसे उकळत असे तिच्याकडून, तिच्या शिवणकामाचे आलेले सगळे पैसे मी उडवून टाकत होतो वर घरखर्चासाठी भावाने आणि वडिलांनी दिलेले पैसे देखील काढत होतो तिच्या कडून मग त्यांनी तिला पैश्यांचा हिशेब मागितला की ती काहीतरी खोटी कारणे सांगून वेळ मारून नेत असे एकदा ती अगतिक होऊन मला म्हणाली होती " तुषार .. मी आयुष्यात कधी खोटे बोलले नाही कोणाशी पण तुझ्या अश्या वागण्यामुळे मला प्रत्यक्ष घरातील लोकांशीच खोटे बोलावे लागत आहे " . मला मात्र कशाचेच सोयरसुतक राहिलेले नव्हते .
त्यातल्या त्यात रविवार हा दिवस माझ्यासाठी जास्त घातक असे कारण त्यादिवशी भाऊ आणि वडील दोघेही घरी असत व आईकडे पैसे मागायला काही मौका मिळत नसे मी जरा आईच्या मागे मागे केले की भाऊ लगेच आईला विचारी ' काय म्हणतोय ग हा ? ' आई त्याला मी पैसे मागतोय हे सांगत नसे कारण तिला घरात भांडणे नको असायची . एकदा असाच रविवार होता भाऊ आणि वडील दोघेही घरात असताना मी आईला हळूच पैसे मागितले ते भावाने ऐकले आणि त्याने स्पष्ट सांगितले की आई तू याला एकही पैसा द्यायचा नाहीस या पुढे , हा बाहेर काय काय धंदे करतो ते सगळे मला समजले आहे हा दारू आणि ड्रग्स च्या आहारी गेलाय याला या पुढे एकही पैसा त्यायचा नाही कोणीही , भावाला बहुतेक गल्लीतल्या मुलांनी माझ्या बद्दल माहिती दिली असावी कारण त्याचीही सिन्नर फाटा आणि स्टेशन वाडीतील मुलांशी माझ्या इतकी घसट नसली तरी तोंडओळख होतीच . त्याने मला आज काहीही झाले तरी पैसे द्यायचे नाहीत अशी सक्त ताकीद देऊन ठेवली घरात व तसे झालेले त्याला कळले तर तो घर सोडून निघून जाइल ही धमकी दिली , आई वडील बिचारे घाबरले आणि आता भावाने सगळे सांगितलेच आहे म्हंटल्यावर मी निर्लज्ज होऊन ' ब्राऊन शुगर घेतली नाही तर मला खूप त्रास होतो व मला कसेही करून पैसे हवेतच असा हट्ट सुरु केला ' , मात्र भाऊ असा बधण्यासारखा नव्हताच तो म्हणाला ' तुला काय त्रास होईल तो होऊ दे आम्ही तुला दवाखान्यात नेऊ पण पैसे देणार नाही ' तो तसा शब्दाचा अगदी पक्का आहे .नाही म्हणजे नाहीच असते त्याचे . तो त्या दिवशी रविवार असल्याने कामावर देखील जाणार नव्हता व माझ्यावर पहारा ठेवणार होता मला घरातील कोणीही पैसे देऊ नये म्हणून . त्याच वेळी उन्हाळ्याची सुट्टी असल्याने माझी मोठी बहिण तिच्या मुलांसहित माहेरी आलेली होती तिलाही त्याने मला पैसे देऊ नयेत अशी ताकीद दिली . माझा अगदीच नाईलाज झाला म्हणून मग शेवटी मी तसाच घराबाहेर पडलो बाहेर मित्रांकडून तात्पुरती नशा मिळवली पण नेहमीच असे कोणी कोणाला नशा देत नाही कारण प्रत्येक व्यसनी कंगालच असतो नेहमी , दुपार कशीतरी काढली संध्याकाळी भाऊ बाहेर जाईल फिरायला तेव्हा पैसे मिळतील आईकडून या आशेवर पण त्या दिवशी त्याने जणू प्रणच केला होता मला पैसे न मिळू देण्याचा .
भाऊ संध्याकाळी देखील घरातच बसून राहिला तेव्हा मी पुन्हा कटकट सुरु केली आता जरा आक्रमक व्हावे लागेल असे मी मनाशी ठरवले होते , मग मी एखादा व्यसनी आपल्या व्यसनांना जसा कुटुंबियांना जवाबदार धरतो तसे त्यांच्यावर आरोप करणे सुरु केले ' तुम्हाला माझ्या भावनांची पर्वा नाही , माणसापेक्षा तुम्हाला पैसा जास्त महत्वाचा आहे , लहानपणापासून माझ्यावर कसे तुम्ही अन्याय केलेत अशी बडबड करू लागलो , मोठ्या भावाला उद्देशून ' लोक भावासाठी प्राण देतात , भावासाठी काहीही करतात आणि तू साधे १०० रुपये देऊ शकत नाहीस ? ' इतका मोठा इंजिनिअर झालास पण स्वतच्या भावाच्या कामी येऊ शकत नाहीस ? , तू माझ्यावर जळतो म्हणूनच मला त्रास देतोस, मी गर्द न मिळाल्या मुळे होणाऱ्या त्रासाने मरून जावे हीच तुझी इच्छा आहे , तू खूप स्वार्थी आहेस " वगैरे म्हणू लागलो आणि मग शेवटचे अस्त्र काढले की आता मी ब्लेड ने गळा कापून आत्महत्याच करतो असे म्हणून मी एक नवी कोरी ब्लेड काढली यावर भाऊ म्हणाला ' ही सगळी तुझी नाटके आहेत आम्ही घाबरणार नाहीय याला , तुला मरायचे असेल तर बाहेर जाऊन रेल्वेखाली डोके ठेव '. अर्थात मला मारायचे नव्हतेच मुळी फक्त त्यांना घाबरवायचे होते ( व्यसनी व्यक्तीच्या अश्या वागण्याला मांनासशास्त्रीय भाषेत इमोशनल ब्लेकमेलिंग असे म्हणतात , या प्रकारात तो घर सोडून जाण्याच्या , आत्महत्येच्या , बायकोला घटस्फोट देण्याच्या वगैरे धमक्या देतो ) त्यासाठी घरातच त्यांच्या समोर नाटक करणे भाग होते मग मी एक कागद घेऊन सुईसाईड नोट लिहिण्यास सुरवात केली त्यात अगदी उद्दात पणाचा आव आणून ' मी ब्राऊन शुगर च्या व्यसनाच्या आहारी गेल्याने जीवनाला कंटाळलो आहे आणि त्यामूळे आत्महत्या करीत आहे , मरणानंतर माझे डोळे व किडनी नसेच इतर उपयुक्त अवयव गरजू लोकांना दान करण्यात यावे अशी माझी अंतिम इच्छा आहे व माझ्या मरणास कोणीही जवाबदार नाही ' अशी चिट्ठी लिहून मुद्दाम सगळ्यांना वाचून दाखवली .

=======================================================================


भाग ३५ पोलीस स्टेशन ---!


अगदी सुइसाइड नोट वगैरे लिहून मी आत्महत्येचा ड्रामा सुरु केला . ब्लेड ने हाताची शीर कापून घेतो म्हणून उजव्या हाताच्या मनगटावर ब्लेड ने हळूच कापण्यास सुरवात केली , आता आईचा धीर सुटला व ती रडू लागली , ते पाहून , बहिण आणि तिची मुले देखील घाबरून रडू लागली तेव्हा भावाने त्यांना सांगितले ' तुम्ही सरळ शेजारी निघून जा मी पाहतो काय होईल ते ' , माझा जीवघेणा हट्ट आणि भावाची ठाम भूमिका या मध्ये त्यांना काय करावे ते समजत नव्हते आई भावाला म्हणाली ' जाऊ दे , देऊन टाक त्याला पैसे , उगाच सगळ्यांना तमाशा नको ' , ( व्यसनी मंडळींच्या घरचे लोक , आजूबाजूचे लोक काय म्हणतील ? उगाच आपल्या घरातील गोष्टी लोकांना कळतील , आपली अब्रू चव्हाट्यावर येईल या चिंतेत असतात व खास करून महिला वर्ग या बाबतीत जास्त संवेदनशील असतो , हे व्यसनीला चांगल्या प्रकारे माहित असते म्हणूनच तर त्याचे म्हणणे निमुटपणे मानले जाते किवा त्याला हवे ते मिळत जाते ) पण भाऊ ऐकत नव्हता , बिचारे सगळे रडके चेहरे करून माझ्याकडे पाहत होते ,मात्र मी जणू दगड बनलो होतो त्यांच्या भावनांची मला अजिबात पर्वा राहिली नव्हती कसेही करून नशेसाठी पैसे मिळालेच पाहिजे हा माझा अट्टाहास . रक्ताची एक लाल रेघ मनगटातून बाहेर पडली तशी आईचे हुंदके वाढले कितीही ठरवले तरी तिला रडू आवरत नव्हते , प्रकरणाची गंभीरता अजून वाढावी म्हणून मग मी हाताच्या ऐवजी गळ्याची शीर कापून घेतो म्हणजे लवकर मरेन असे म्हणत मग ब्लेड गळ्याकडे नेली व हळूच कंठमणी असतो तेथे ब्लेड जरा दाबून फिरवली , पुन्हा एक लाल रेघ उमटली, मनगटाची शीर कापताना नेमके किती कापले जातेय हे मी पाहू शकत होतो मात्र गळ्याच्या बाबतीत तसे नव्हते माझ्या डोळ्यांनी मला माझा गळा किती कापला जातोय हे नेमके कळू शकले नसते व कदाचित चुकून जास्तच कापले गेले तर ... प्रकरण अंगाशी येणार या विचाराने मग मी घरातील छोटा आरसा घेतला व त्यात पाहून हळू हळू गळ्यावर ब्लेड फिरवू लागलो .
भाऊ अजिबात ऐकायला तयार नव्हता आणि मी तर पैसे मिळाल्याशिवाय माघार घेणार नव्हतोच , जरा जास्त रक्त येऊ लागले तसे आई , बहिण व तिची मुले शेजारी निघून गेले , आता ज्यांना घाबरावायचे होते त्यातील नेमके लोक निघून गेलेले त्यामूळे माझी जरा गोची झाली , घरात फक्त वडील , भाऊ आणि हट्टाला पेटलेला मी असे तिघेच उरलो , घाबरणारा प्रेक्षकवर्ग कमी झाल्याने माझे अवसान कमी झाले होते तरी मी नेटाने थोडी जास्त रिस्क घेऊन आरश्यात पाहून गळ्यावर ब्लेड फिरवू लागलो तसे जास्त रक्त येऊ लागले , आता वडील ही चप्पल घालून बाहेर पडले घरात फक्त मी व भाऊ उरलो मला पुढे काय करावे ते समजेना रक्ताची एक धार माझ्या गळयावरून ओघळत छातीवर आली बनियान रक्ताने लाल होऊ लागले , मग मी खूप शक्तिपात झाल्या सारखा डोळे मिटून मान वर करून भिंतीला टेकून बसलो आता भाऊ घाबरला असावा तो देखील उठला आणि चप्पल घालून घरातून बाहेर पडला , मला नेमके काय होतेय ते कळेना सगळे जण निघून गेलेले, बाहेर जाताना भावाने दाराला बाहेरून कडी लावल्याचा आवाज आला तसा मी भानावर आलो हे काय भलतेच हा बाहेरून कडी लावून का गेला असावा ? या विचारात पडलो आता घरात फक्त मी एकटाच उरलेला , नाटक सुरु ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता भाऊ बाहेरून कडी लावून गेलेला होता , मी मागच्या खोलीत जाऊन पहिले तर तिथेही बाहेर अंगणाकडे जाणाऱ्या दाराला कुलूप लावलेले दिसले म्हणजे मला मागच्या दराने बाहेर पडणे देखील शक्य नव्हते एकंदरीत मला घरात अडकवून ठेवण्यात आले होते प्रकरण अंगाशी आल्यासारखे झाले होते बराच वेळ तसाच विमनस्क अवस्थेत मी भिंतीला टेकून डोळे मिटून बसून राहिलो आता गळ्याची जखम ठसठसत होती व थोडे थोडे रक्तही येतच होते , ब्राऊन शुगर ची ' टर्की ' सुरु झालेली , त्यामूळे खूप अवस्थता आलेली .
तितक्यात बाहेर एका गाडीचा आवाज आला व दोन चार माणसांचे मोठ्याने बोलण्याचे आवाज आले , मग आमच्या पायरीवर बुटांचे आवाज आणि बाहेरून लावलेली दाराची कडी काढली गेली व आत चारपाच पोलीस आणि माझा भाऊ शिरला . म्हणजे डाव माझ्या अंगाशी आला होता तर , पोलिसांनी आधी मला धरले उठवून उभे केले त्यातील एक बहुधा मला ओळखत असावा तो उद्गारला ' अरे हा तर इथल्या शिवसेना शाखेचा सेक्रेटरी आहे ' मग जखम पाहून म्हणाला ' जास्त नाहीय फारसे , चला याला गाडीत घ्या ' म्हणत मला ओढून बाहेर आणले गेले , प्रतिकार करणे व्यर्थ होते कारण घरचे लोक नव्हते ते तर पोलीस होते . बाहेर पोलिसांची मोठी निळी गाडी ( डग्गा ) थांबलेली आणि त्या भोवती गर्दी जमलेली होती मला गाडीत बसवले गेले भावाला देखील त्यांनी आत बसायला सांगितले आणि गाडी निघाली , हे भलतेच झाले होते आता पैसे मिळणार नव्हतेच उलट कोठडीत जाण्याची वेळ आली होती , भाऊ माझ्या समोरच बसला होता मी त्याच्या कडे खुन्नस ने पाहू लागलो तशी त्याने मान फिरवून घेतली . नाशिक रोड पोलीस स्टेशन ला गाडी पोचली आणि मला खाली उतरवून पोलीस निरीक्षकांच्या खोलीत नेण्यात आले भाऊ देखील होताच मागेमागे , आता मला त्या साहेबांचे नाव आठवत नाहीय बहुतेक चांदगुडे असावे , भाऊ त्यांना थोडक्यात माहिती सांगत होता आणि ते खेदाने मान हलवत होते , मग मला म्हणाले ' काय रे तू इतका चांगल्या घरचा मुलगा आणि अशी नाटके करतोस होय रे ? मी लगेच रडण्याचा पवित्रा घेतला तसे त्यांचा आवाज जरा खाली आला , मग म्हणाले ' रडू नकोस तुला मारत नाहीय कोणी , त्यांनी शिपायांना माझी झडती घ्यायला सांगितली , शिपायानी झडती घेऊन मी लिहिलेली सुईसाईड नोट बाहेर काढली आणि साहेबांच्या हाती दिली ती साहेबानी वाचली आणि म्हणाले ' इतका चांगला मुलगा आहेस तू की मेल्यानंतर ,डोळे , किडनी दान करायला निघाला आहेस , पण देवाने जे तुला दिलेय ते आधी तू स्वतच नीट वापर की ' आणि हसले व मला समजावू लागले ' या व्यसनांच्या नादी लागू नकोस या पुढे , सगळे धंदे सोडून चांगला आभ्यास कर आणि नाव कमाव , उगाच स्वतचे आणि कुटंबातील लोकांचे नुकसान करू नकोस ' मी निमुटपणे मान हलवली .भावाकडे पाहून म्हणाले ' अहो याच्यावर आत्महत्येची केस दाखल केली तर याचे पुढे खूप नुकसान होईल , त्या ऐवजी आता मी याला सोडतो ताकीद देऊन मग पाहू काही केले तर , याला आधी एखाद्या दवाखान्यात न्या ' आणि त्यांनी आम्हाला जायला सांगितले , बाहेर आलो आम्ही दोघेही एकमेकांशी न बोलता निमूट पणे चालू लागलो भावाने विचारले ' दवाखान्यात चालतोस का ? " या वर मी फक्त नकारार्थी मान हलवली . पोलीस स्टेशन पासून जरा दूर सुरक्षित अंतरावर आल्यावर भावाला म्हणालो दवाखान्यात पैसे खर्च करण्यापेक्षा मला दे पन्नास रुपये , आता मी १०० वरून ५० वर आलो होतो , तर भाऊ लगेच म्हणाला ' परत जाऊ का मी पोलीस स्टेशन ला ? ' म्हणजे पुन्हा मीच अडकणार होतो म्हणून मग चूप राहिलो .
( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें