प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.com



सोमवार, 18 मार्च 2013

नवे घर ..जुने विचार !

भाग ६१
राजू च्या आईकडून त्याने गुपचूप घेतलेल्या पैश्यात आम्ही बाहेरून दारूची क्वार्टर मागवून रात्री सगळे झोपल्यावर गुपचूप व्हरांड्यात बसून प्यायलो ..ऐक अंधारात गुपचूप केलेली पार्टीच होती ती . उरलेल्या पैश्यातून मग आम्ही बिडी बंडले आणली होती व त्या वर आमचे पुढील ५ दिवस मस्त गेले म्हणजे बिडीसाठी कोणाकडे हात पसरावा लागला नाही .आम्ही तेथील अटेंडटस ना त्यांच्या कामात मदत करून विश्वास संपादन केला होता सर्वांचा त्यामूळे आता आम्हाला रात्रीचे जेवण सर्वांसोबत दुपारी साडेचार ऐवजी रात्री करायला त्यांनी परवानगी दिली होती ..आम्ही दुपारी जेवण आले की आमच्या मगात भाजी , वरण काढून ठेवत असू तसेच पोळ्या देखील काढून ठेवल्या जात आणि मग रात्री साडेनऊ ला आम्ही तीनचार जण मिळून एकत्र जेवण करू लागलो , आम्ही ज्या वार्ड मध्ये होतो तो ' ऑबझरवेशन वार्ड ' असल्याने मनोरुग्णालयात भरती झालेल्या रुग्णाला प्रथम आमच्याच वार्ड मध्ये दाखल केले जाई व नंतर त्याच्या वर्तनाचे , लक्षणांचे निरीक्षण करून त्याला मानसिक आजारानुसार इतर संबंधित वार्ड मध्ये पाठवले जाई , त्यामूळे आम्हाला एकदम ताजे मनोरुग्ण पाहायला मिळत त्यांचे विशिष्ट प्रकारचे इतरांच्या दृष्टीने असणारे वेडेपण आम्हाला पाहायला , अनुभवायला मिळे कधी कधी गम्मत वाटे तर कधी कधी वैषम्य ! शरीरात मानवी मेंदूचे किती महत्व आहे व तो किती महत्वाची कामे करतो आणि जर त्यात अगदी थोडा जरी बिघाड उदभवला तर किती अनर्थ होऊ शकतो याची जणू प्रात्यक्षिकेच आम्ही रोज पाहत होतो . वेडा किवा मनोरुग्ण म्हंटले म्हणजे ऐक विशिष्ट प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे स्वताशी बडबड करणारा हवेत... हातवारे करणारा ... लोकांना शिव्या देणारा किवा दगडे मारणारा .. भणंग ... दाढी वाढलेला , डोळ्यात हरवलेले भाव घेऊन फिरणारा....स्मरण नष्ट झालेला ..विनाकारण मोठमोठ्याने भेसूर हसणारा .. वगैरे आणि सिनेमात जी पात्रे मनोरुग्ण म्हणून दाखवली जातात त्यांना थोडेफार फरकाने अश्याच रुपात दाखवले जाते पडद्यावर ! तेथे असतांना आमच्या लक्षात आले की बहुतांशी सिनेमात बहुतांशी जी पात्रे दाखवतात किवा आपल्या मनात जी मनोररूग्णाबद्दल ची प्रतिमा तयार झालेली आहे ती अर्धवट माहितीवर आधारित आहे किवा मानसिक आजार अगदी टोकाला पोचलेल्या व्यक्तींवरून तयार झालेली आहे ..प्रत्यक्षात मात्र तश्या टोकाला पोचलेल्या केसेस ठाण्याच्या मनोरुग्णालयात आम्ही जेमतेम ३० टक्के पहिल्या तर ७० टक्के केसेस अश्या होत्या की त्या रुग्णांचा वर्तनाचा एखाद ..दुसरा भाग सर्वसामान्यांपेक्षा वेगळा किवा विक्षिप्त होता बाकी वेळी ते लोक सर्वसधारण माणसाप्रमाणे वागत म्हणजे त्यांना जेवण ..झोप ..थंडी ..उन पाऊस ..इतरांशी असलेले नातेसंबंध .. शरीर संबंधाची ओढ ..बोलण्यातील सुसंगती अश्या सर्व संवेदना असत ! व काहीवेळा त्यांच्या वर्तनाची गम्मत वाटून हसू येई तरी ऐरवी ते सर्वसामान्य माणसाप्रमाणेच वागत असत .

मी मागच्या लेखात उल्लेख केलेली एकदम मध्यरात्री वगैरे पोलासंकडून भरती केली जाणाऱ्या टीम मध्ये असणारे लोक पोलीस ऐकतर रस्त्यावरून उचलून .मग त्या व्यक्तीला कोर्टात न्यायधीशा समोर उभे करून .. त्याला सरकारी खर्चाने तेथे आणत असत त्यापैकी बहुतेक लोक आपण रस्त्यावर अर्धवट कपड्यात ..चेहऱ्यावर अनोळखी भाव घेऊन फिरणाऱ्या लोकांसारखे असत तर काही जण व्यवस्थित कपडे केलेले , चांगले सुसंगत बोलणारे असत ..तर काही जरा आक्रमक .शिव्या देणारे ..डोळ्यातून अंगार फेकणारे ..सदैव मारामारीला तयार असणारे असत .काही जण भेदरलेले .. कावरेबावरे झालेले मात्र सगळ्याचे भान असणारे ! मी जेव्हा सखोल चौकशी केली तेव्हा मला माहिती मिळाली की सरकारी मनोरुग्णालयात तीन प्रकारांनी अश्या मनोरुग्णांना दाखल केले जाते ते पुढील प्रमाणे ,

१) स्वेच्छेने किवा पालकांच्या व रुग्णाच्या संमती ने भरती झालेले लोक याला सरकारी भाषेत म्हणजे इंग्रजीत व्हाँलेंटरी बोर्ड ( V.B) म्हणतात . यात रुग्णाला घरचे लोक मानसोपचार तज्ञांनी सुचाविल्यामुळे किवा त्याच्या वर्तनाचा घरी किवा त्याच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असल्यामुळे त्याला समजावून त्याच्या मर्जीने दाखल होता येते ..त्याच्या कडून सरकारी दवाखान्याच्या नियमाप्रमाणे रोजच्या राहण्या जेवण्याच्या व्यवस्थे बद्दल पैसे आकारले जात मात्र औषधे मात्र सरकारतर्फे मोफत पुरवली जात , असे रुग्ण पालक त्यांना घरी नेईपर्यंत किवा डॉक्टर्स नी पालकांना घरी नेण्याची सूचना देईपर्यंत किवा रुग्णालयात ती व्यक्ती राहण्यास तयार आहे तो पर्यंत तेथे राहू शकतात . मी तश्याच व्ही .बी . प्रकारात मोडत होतो .

२) सदर व्यक्तीचे वर्तनाचा कुटुंबियांना , तसेच शेजार्यापाजार्याना किवा समाजाला त्रास होतो आहे व त्याचे वर्तन त्याला स्वतःला अथवा इतरांना अपायकारक आहे व त्याला मानसोपचार दिले जावेत अशी पोलिसांकडे तक्रार आल्यावरून पोलासानी त्या तक्रारीची दाखल घेऊन मग संबंधित रुग्णाला अटक करून किवा ताब्यात घेऊन कोर्टात हजार करून माननीय न्यायालयाच्या आदेशाने मनोरुग्णालयात उपचार देण्यासाठी सक्तीने आणले जाते या प्रकाराला सरकारी भाषेत रिसेप्शन ऑर्डर ( R.O .) म्हणतात . यात त्या रुग्णाचे निरीक्षण करून त्याला योग्य ते उपचार देऊन मग न्यायालयाच्या व डॉक्टरांच्या परवानगीने त्याची विशिष्ट परीक्षा घेऊन त्यात पास झाल्यावर घरी सोडण्यात येते किवा काही लोकांना मग तात्पुरती सुटी दिली जाते व या काळात त्याने मनोरुग्णालयात दिलेल्या तारखेला हजार राहून तपासणी करणे , औषधे घेणे करावे लागते व त्याचे वर्तन योग्य राहिले तर मग सुटी मिळते ( पँरोल वर ) मात्र त्याने जर परत काही गोंधळ केला तर लगेच संबंधित पोलीस ठाण्याचे लोक त्याला परत उचलून रुग्णालयात घेऊन येतात .

३ ) पोलसांनी माननीय न्यायालयासमोर हजर करून सदर व्यक्तीच्या डोक्यावर परिणाम झालेला असून या व्यक्तीला मनोरुग्णालयात दाखल करण्यात यावे कारण याच्या जीवाला याच्या वर्तनाने अपाय होऊ शकतो किवा इतरांना अपाय व त्रास शकतो असे निवेदन करून केलेल्या विनंतीवरून न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्याला मनोरुग्णालयात आणले जाते व तेथे अमर्यादित कालपर्यंत उपचार दिले जातात . जर त्याकाळात तो नीट भानावर आला तर त्याला त्याच्या सुरक्षेची काळजी घेऊन बाहेर सोडण्यात येऊ शकते किवा पालकांच्या ताब्यात दिले जाऊ शकते या प्रकाराला सरकारी भाषेत " डीटेन्शन ऑर्डर " ( D.O.) असे म्हणतात यात काही वेळा खुनाच्या आरोपात मनोरुग्ण असल्याचे सिद्ध झाल्याने जेल मध्ये पाठवण्याऐवजी किवा जर फाशीची शिक्षा दिली गेली असेल तर तो नीट होईपर्यंत आणि नीट झाल्यावर मग न्यायालयाच्या आदेशाने फाशी देण्यासाठी मनोरुग्णालयात अडकवून ठेवले जाते .

मी पहिल्या प्रकारात म्हणजे स्वतच्या आणि पालकांच्या संमती ने दाखल झालो होतो असे लोक तेथे कामिक प्रमाणात असत.. व्यसनाधीनता ह ऐक मानसिक मनो -शारीरिक आजार असल्याने मला तेथे प्रवेश देण्यात आला होता मात्र व्यसनाधीनते वर खास प्रकारे म्हणजे व्यसनमुक्ती केंद्रात देतात तसे उपचार देण्याची त्या वेळी तेथे सोय नव्हती त्या मुळे मला इतर मनोरुग्णांच्या सोबत ठेवले गेले होते , राजू व लक्ष्मीकांत देखील माझ्याच प्रकारात मोडत होते .

( सूचना --वर दिलेले तिन्ही प्रकार मी सर्वसधारण पणे सांगण्याचा प्रयत्न केलाय यात अनेक कायदेशीर गुंतागुंत असू शकते . जाणकारांनी योग्य मार्गदर्शन करावे )

========================================================================
भाग ६२ वा  मनोरुग्णालयातील संगीत उपचार !

पाहता पाहता मला ठाणे मेंटल हॉस्पिटल मध्ये ऐक महिना होत आला होता , दिवसभर आम्ही दोनतीन गर्दुल्ले तेथे मस्करी , मस्ती , तेथील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करणे वगैरे करत दिवस काढत होतो , मात्र अजूनही आम्हाला रात्री नीट झोप येत नव्हती ... टर्की चा जरी त्रास राहिला नव्हता तरी मुळचा रात्री जागरण करण्याची सवय जात नव्हती , कधी कधी बिड्या कमी पडत तेव्हा आम्ही कागदाची बिडी तयार करून त्यात खायची तंबाखू भरून ओढत असू अर्थात याने खुप खोकला येई पण बिडी चा धूर घेतल्याचे समाधान मिळत होते ..तेथे खूप वर्षापासून असलेल्या शंकर या जुन्या मनोरुग्णा कडे त्या वार्ड मधील जेवण वाटप ..कपडे वाटप ..मंजन आणि खोबरेल तेल वाटप ..साबू वाटप करणे ..वस्तू सांभाळणे असा अलिखित चार्ज होता ...शंकर रोज सकाळी शंकर एका डब्यात ठेवलेले काळे दंतमंजन वार्ड मध्ये पाच मिनिटे आणून ठेवी त्यातून ज्याला हवे त्याने चिमुटभर मंजन घेऊन दात घासावेत असे अपेक्षित असे ..आमच्या जवळ घरून आणलेली टूथपेस्ट संपली तेव्हा आम्हीही त्या मंजनाचा लाभ घेतला ..लाईफबॉय साबुचा ऐक चतकोर तुकडा प्रत्येक आठवड्याला एकदा मिळे ..बहुतेक जण साबण वगैरे घेत नसत..खोबरेल तेल देखील आठवड्यातून दोन वेळा रांगेत उभे करून सगळ्यांच्या हातावर थोडे थोडे दिले जाई होई ...तेथे आम्हाला खूप भूक लागे कारण बाहेर अनेक दिवस व्यसनामुळे जेवणाकडे दुर्लक्ष झालेले होते अश्या वेळी गोड गोड बोलून आम्ही कधी शंकर कडून ब्रेड चे चार स्लाईस जास्त मिळवून मग त्यावर सिस्टर कडून घेतलेली ग्लुकोज पावडर पसरवून मस्त ब्रेड .ग्लुकोज सँडविच बनवून खावू लागलो ..दर आठवड्यातून सुमारे दोन वेळा अंगावरचे कपडे बदलले जात ..त्यासाठी आधी सर्वानी एका रांगेत उभे राहून शर्ट काढायचे व ते एका ठिकाणी गोळा करायचे मग शंकर त्याच्या कडील धुतलेल्या कपड्यांचे गाठोडे उघडून त्यातील ऐक ऐक शर्ट एकेकाच्या अंगावर फेकत असे ..कधी कोणाला फाटका ..अर्धवट उसवलेला .किवा नीट न धुतला गेलेला शर्ट मिळे ..मग चड्डी वाटप देखील तश्याच प्रकारे असे ..एकदा शंकर कपडे वाटत असतांना तेथे वार्ड चे सिनियर गुलाम हुसेन देखील होते मी हळूच त्यांच्या कडे जाऊन त्यांना ..मला नाडी वाला पायजमा मिळाला तर बरे होईल असे सांगितले ..माझे तेथील वर्तन सर्वांशी चांगलेच होते .शिवाय बहुतेक गुलाम हुसेन यांची मुले माझ्याच वयाची होती .त्यामूळे त्यांना आमच्याबद्दल आस्था होती ..त्यांनी लगेच शंकर सांगून आम्हाला नाडी असलेले पायजमे आणि जरा चांगले धुतलेले व न फाटलेले कपडे देण्यास सांगितले .शंकर कडे सगळ्या प्रकारच्या कपड्याचा स्टॉक होताच .

ऐक प्रकारे अगदी छान रुळलो होतो आम्ही तेथे . एकदा रात्रीच्या वेळी ड्युटीवर ऐक म्हातारा स्वीपर आला होता तो दारू पिऊनच होता मग रात्री तो वार्ड मधील व्हरांड्यात खुर्ची टाकून बसला आणि रुबाबात जवळच्या पिशवी तून त्याने गावठी दारू भरलेली बाटली काढली व ग्लास घेऊन पीत बसला ..रात्रीचे बारा वाजले होते बहुतेक मनोरुग्ण झोपलेलेच होते ..आम्ही त्या स्वीपर ला तो आल्याआल्या साफसफाईत थोडी मदत केली होती त्यामूळे ..तो आमच्याशी बोलत बसला होता आम्ही खुर्चीशेजारी त्याच्या पायाशी बसून त्याच्या गोष्टी ऐकत बसलो होतो ..तो ग्लास मधून ऐक दारूचा घोट घेई व मग ग्लास पुन्हा खाली आमच्या बाजूला ठेवून त्याच्या तरुणपणीच्या गप्पा सांगत बसला होता ..बोलताना त्याचे ग्लास कडील लक्ष हटले की आमच्या पैकी ऐक जण पटकन त्याच्या ग्लासातील ऐक घोट पिऊन ग्लास परत आहे त्या जागी ठेवी ..त्याच्या हे काही लक्षात येत नव्हते ..ग्लास लवकर संपला तसे त्याने जरा संशयाने आमच्याकडे पहिले ..लगेच आम्ही त्याची तारीफ करणे सुरु केले तसा तो काही न बोलता पुन्हा ग्लास भरून पीत बसला ..त्या दिवशी त्याची जवळ जवळ पाव बाटली आम्हीच संपवली होती तरी त्याला कळले नाही ..पुढे आम्ही रोज संध्याकाळी तो स्वीपर ड्युटीला येतोय की का याची वाट पाहू लागलो ..पण नंतर काही तसा योग आला नाही . एकदा सकाळी आम्ही नाश्ता वगैरे करून वार्ड मध्ये काहीतरी मस्करी करत बसलेलो होतो त्या वेळी ऐक जण वार्ड मध्ये आला तो अटेंडंटच होता मात्र त्याने पांढरा गणवेश घातलेला नव्हता ..त्याने वार्डात विचारले ' किसीको गाना ..वगैरे गानेका है क्या ? ' मला नेमका काय प्रकार आहे हे समजेना ..त्याला कोणीतरी मी चांगली गाणी म्हणतो असे सांगितले तेव्हा तो माझ्याजवळ येऊन म्हणाला ' चलो गाना गानेके लिये ' काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी त्याच्यासोबत निघालो त्याने आमच्या वार्ड च्या अटेंडंट ला मला घेऊन जातो आहे असे सांगून मग मला वार्ड च्या बाहेर आणले . थोडे दूर ऐक इमारत होती त्या इमारतीत जीना चढून आम्ही अगदी वरच्या म्हणजे दुसऱ्या मजल्यावर गेलो समोर वार्ड नंबर १८ ए.बी अशी पाटी होती आत व्हरांड्यातून चालत जाऊन एका मोठ्या हॉल मध्ये पोचलो आणि मी थक्कच झालो तेथे छान ऐक छोटेसे स्टेज बनवलेले होते समोर शाळेत असतात तसे बेंच ठेवलेले होते त्यावर काही मनोरुग्ण बसलेले होते ..स्टेजवर हार्मोनियम ..कोंगो ..तबला ..माईक असं सारा सरंजाम होता . माझ्या सोबत आलेल्या अटेंडंट चे नाव शत्रू असे होते ..त्याने कोंगो चा ताबा घेतला मग ऐक दुसरा अटेंडंट हार्मोनियम वर बसला आणि त्यांनी मला गाणे म्हणण्यास सांगितले ..येथे असं सगळे काही असेल याची मला कल्पना नव्हती .पण छान वाटले मग मी दोन तीन गाणी म्हंटली माईकवर समोर बसेलेले मनोरुग्ण गाणे संपले की टाळ्या वाजवत होते . नंतर समजले की मनोरुग्णांना संगीताने सुधारणेस मदत होते म्हणून त्यांचे मनोरंजन आणि उपचार अश्या दोन्ही अर्थाने त्या वार्ड मध्ये तशी सोय करण्यात आली होती ..! माझी आणि शत्रू ची नंतर छान गट्टी जमली मग मी रोज सकाळी संगीत कक्षात जाऊन गाणी म्हणू लागलो .


========================================================================भाग ६३ वा  मेंटल मधून सुटी !

वेळच्या वेळी जेवण , नाश्ता , बीप्लेक्स ची इंजेक्शन्स आणि टॉनिक या मुळे माझी तब्येत मनोरुग्णालयात चांगलीच सुधारत होती , शिवाय मी पूर्वी नुकताच गांजा प्यायला सुरवात केली असतांना असाच एकदा रस्त्यावर योगासनांची चित्रे असणारा चार्ट विकत घेऊन आलो होतो व त्यात पाहून काही आसने देखील पूर्वी करत होतो . पद्मासन , सिद्धासन , नौकासन , हस्तपादासन , सर्वांगासन , पवनमुक्तासन वगैरे आसने मी मनोरुग्णालयात देखील सकाळी लवकर उठून करू लागलो होतो व सूर्यनमस्कार होतेच जोडीला , त्यामूळे झपाट्याने माझे वजन वाढले ..तेथे पालेभाज्या मध्ये मुख्यतः पालक आणि मेथी जवळ जवळ रोज संध्याकाळी बनत होती ती आम्ही नुसतीच मग्ज भरून भरून पीत असू ..सलीम चा मंत्र माझ्या चांगलाच लक्षात होता तो म्हणजे ' 'जेवण हे चवी साठी जेवायचे नाही तर तब्येत सुधारण्यासाठी जेवायचे त्यात आवड निवड न ठेवता ..जे काही शरीरास पोषक आहे ते बिनधास्त खावे ' या प्रमाणेच मी भरपूर खात होतो. पाहता पाहता मला तेथे पन्नास दिवस होत आले होते ..आता घरी जायची ओढ वाटू लागली होती..सुधारलेली तब्येत सगळ्या मित्रांना दाखवायची ..त्यांना भेटायची इच्छा मनात येऊ लागली ..इतके दिवस मी नाशिक ला नसल्याने माझ्या ' पानटपरी ' चे काय झाले ? मी भावाला सांगून माझ्या एका मित्राजवळ काही दिवस पानटपरी चा ताबा देण्यास सांगितले होते ..आता लवकरात लवकर सारे नुकसान भरून काढायचे असे मनात होते , आपण जरा अतीच केले म्हणून आपल्याला येथे यावे लागले ही खुणगाठ मनाशी बांधली होती व या पुढे ब्राऊन शुगर ला तर अजिबात हात लावायचा नाही हा देखील निश्चय केला होता ..गांजा ..दारू वगैरे अधून मधून अगदी कमी प्रमाणात घेतल्यास काही हरकत नाही असेही वाटत होते ..मला नाशिक ला भावाला एकदा फोन करून ..मी आता बरा आहे आणि मला सुटी करावी असा निरोप द्यायचा होता .पण निरोप पाठवण्याचे काही साधनही नव्हते माझ्याकडे . जशी जशी घरची ..नाशिकची आठवण येणे वाढले तसा तसा मी अजून किती दिवस येथे थांबावे लागेल ? या विचाराने उदास होऊ लागलो होतो ..सुमाची पण आठवण येई ..कदाचित आता ताठ मानेने तिच्यासमोर जाता येणार होते मला ..मग कदाचित पुन्हा ...कल्पनेचे मनोरे मनातल्या मनात बांधले जात होते तसा तसा मी घरी जाण्यासाठी अधीर होत होतो !

शेवटी बरोबर ३० डिसेंबर १९ ८७ या दिवशी सकाळी ११ वाजता वार्ड मध्ये माझ्यासाठी निरोप आला की माझी सुटी होणार आहे आणि मोठा भाऊ मला घ्यायला आला आहे ..मी ताबडतोब तयार होऊन बसलो . मला येथे दाखल करतेवेळी सोबत आईवडील आणि चुलतभाऊ आला होता ..आता घ्यायला मोठा भाऊ आला होता ..तो प्रथमच मनोरुग्णालयात आला होता जरा बिचकतच होता तो तेथे वावरताना ..मी मात्र सराईत झालो होतो आतापर्यंत ..त्याने आणलेले घरचे कपडे घातले तर चक्क मला कपडे घट्ट होते होते पँट चे बटन लवकर लागेना ..वजन काट्यावर उभा झालो .. वजन ५१ किलो भरले म्हणजे गेल्या सुमारे पन्नास दिवसात माझे वजन तब्बल १२ किलो वाढले होते ..ते पाहून भावालाही खूप आनंद झाला .सगळे सोपस्कार उरकून सर्वांचा निरोप आणि शुभेच्छा घेऊन मी मनोरुग्णालयाच्या बाहेर पडलो .भाऊ म्हणत होता की जरा ठाण्यातल्या नातेवाईकांना भेटून मग घरी जाऊ ..पण आता मी केव्हा एकदा नाशिक ला जाईन अशी घाई झाली होती ..शिवाय आता व्यसनमुक्त असतांना नातेवाईकांसमोर जाण्याचा आत्मविश्वास राहिला नव्हता असे वाटे ते काय विचार करत असतील आपल्याबद्दल ( अर्थात व्यसन करीत असतांना असले विचार मनात आले असते तर व्यसन केलेच नसते ..पण व्यसन करतेवेळी कोण काय म्हणेल ही भीती वाटत नाही उलट ..मला कोणाची पर्वा नाही असाच उद्धट विचार मनात येतो ) .

दादर नागपूर एक्सप्रेस मध्ये ठाण्याहून बसलो आम्ही आणि निघालो नाशिक कडे ..भाऊ मला कुतूहलाने ..मनोरुग्णालयातील माहिती विचारात होता आणि मी देखील त्याला फुशारक्या मारून सगळे सांगत होतो ..साधारण पणे इगतपुरी जवळ भावाने हळूच माझ्यावर ऐक बाँब टाकला ..म्हणाला की आता आपण रेल्वे क्वार्टर सोडले आहे व नाशिक शहरातील ' मेरी ' विभागात ( महाराष्ट्र इंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ) भावाला मिळालेल्या क्वार्टर मध्ये राहायला गेलो आहोत .मला हा मोठा धक्काच होता ..वडील जरी नुकतेच रेल्वेतून सेवानिवृत्त झाले होते तरी नाशिकरोड च्या रेल्वे क्वार्टर मध्ये आम्ही नंतरही सहा महिने राहू शकत होतो व तसे ठरलेही होते ..मग मध्येच रेल्वे क्वार्टर सोडायचे कारण काय ? आणि मी घरी नसतांना ..मला न विचारता .माझे मत न घेता हा निर्णय घेतला गेलाय याचे देखील वाईट वाटले. ( तसा मला विचारून काही गोष्ट करण्याइतका किवा माझा सल्ला घेण्याइतपत मी कर्तबगार नव्हतोच ..पण तरीही व्यसनी व्यक्तीला उगाच आपण शहाणे आहोत असे वाटते व घरातील प्रत्येक निर्णय प्रक्रियेत आपला सहभाग असावा अशी त्याला आशा असते ) मी एकदम चूप झालो ते भावाच्या लक्षात आले त्यावर तो सारवासारव करू लागला की केव्हातरी रेल्वेक्वार्टर सोडावे लागणारच होते ..शिवाय मला क्वार्टर मिळाले म्हणून आम्ही हा निर्णय घेतला ..मग तो ' मेरी ' विभाग किती छान आहे तेथे त्याच्या ऑफिस चा छान क्लब आहे ..बडमिंटन , टेबल टेनिस खेळायला कोर्ट आहे ... मोठे वाचनालय आहे ..वगैरे माहिती सांगू लागला ..मी नुसताच हं ..हं करत होतो . त्याचे बोलणे झाल्यावर मी त्याला ' पानटपरी ' बद्दल विचारले तर म्हणाला सध्या बंदच ठेवलीय टपरी ..तुला हवे तर तू काही दिवस चांगला रहा मग परत सुरु करता येईल ..जागा आहे तशीच ! एकंदरीत माझ्या उत्साहावर विरजण पडले होते !

नाशिक रोड ला पोचल्यावर रेल्वेक्वार्टर कडे न वळता आम्ही बाहेरच्या बस स्टँड कडे गेलो तेव्हा कसेतरीच झाले मला ..तेथे ' नाशिकरोड -मेरी ' अशी पाटी असलेल्या बसमध्ये बसलो ..मी यंत्रवत भावाच्या मागे निघालो होतो . पंचवटी च्या पुढे दिंडोरी रोड वर मेरी च्या स्टॉप वर उतरलो आणि थोडे चालत एका सरकारी इमारतीच्या वसाहतीजवळ पोचलो आपले घर तिसऱ्या मजल्यावर आहे भावाने माहिती पुरवली आम्ही जीना चढून वर पोचलो आणि एका ठकाणी थांबलो समोर दारावर पाटी होती " सुहास नातू " या नावाची ...म्हणजे आता मी वडिलांच्या हक्काच्या घरातून भावाच्या नावे असणाऱ्या घरात राहायला आलो होतो ..रेल्वेक्वार्टर मध्ये राहत असतांना मी घरी गोंधळ केला की भाऊ रागाने कधी कधी मला, तू या घरातून निघून जा असे म्हंटला की मी मोठ्या तोऱ्यात त्याला हे तुझे घर नाहीय तर माझ्या वडिलांचे आहे असे उत्तर देत होते ते आठवले ..पण पण ..आता ..मला भावाच्या घरी रहावे लागणार होते आणि येथे माझा तोरा देखील चालणार नाही हे माझ्या ध्यानात आले .

========================================================================
भाग ६४ वा ! नवे घर ..जुने विचार !

भावानेच डोअर् बेल वाजवली ..आईला बहुधा आम्ही जिन्यात असतानाच आमची चाहूल लागली असावी .तिने पटकन सुहास्य मुद्रेने दार उघडले ..तिच्यामागे वडीलही उभे होते ...दोघांच्याही पाया पडलो त्यांचे डोळे खूप काही बोलत होते ..मला त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याचे धाडस झाले नाही . आधी मी सगळीकडे फिरून घर पहिले ..बाहेरची ऐक मुख्य १५ बाय १५� ची खोली ..त्यालाच लागून अजून ऐक छोटीशी १० बाय १०ची खोली ..छोटेसे स्वैपाकघर ..आणि छोटेसेच संडास , बाथरूम.. माझी जरा निराशाच झाली .मला रेल्वे क्वार्टर मधील प्रशस्त खोल्या आठवल्या ..मागच्या बाजूला असलेले मोठे अंगण ..त्यातील फुलझाडे ..फळझाडे ..पेरू ..पपई . आणि मुख्य म्हणजे अंगणाच्या कोपऱ्यातील संडास ..जेथे मी निवांत तासंतास गांजा ..ब्राऊन शुगर ..दारू अशी व्यसने करत बसत असे ..सगळे काही बदलले होते आणि ते देखील अचानक ..अकल्पितपणे ! आईने केलेला चहा घेताना मी चुपच होतो ..आई मला नवीन परिसर किती छान आहे ..वाचनालय ..मुख्य रस्त्याच्या पलीकडे असलेले टुमदार गणपती मंदिर वगैरे माहिती पुरवीत होती . चहा घेऊन झाला तशी बिडी ओढण्याची तल्लफ झाली ..इतर व्यसने बंद असली तरी माझी बिडी ओढणे घरच्यांनी नाईलाजाने स्वीकारले होतेच ..मी सवई प्रमाणे संडासात शिरलो ....बिडी ओढण्यासाठी ...पटापट दोनचार झुरके मारून बाहेर आलो संडास ला वरच्या बाजूला छोटेसे व्हेंटीलेटर होते ..त्याला उतरत्या काचा लावलेल्या बिडीचा धूर त्याच्या दिशेला सोडला मात्र तो सगळा लगेच बाहेर जाईना सगळ्या संडासात बिडीचा धूर रेंगाळून राहिला होता . तसाच बाहेर आलो आणि भावाने जरा कडक शब्दात सांगितले ..हे तुझे संडासात बिडी ओढणे वगैरे इथे चालणार नाही ..आम्हाला त्रास होतो धुराचा ..मी नुसतीच मान हलवली ..यावर आई म्हणाली ..हे सगळे बंद केलेस तर जास्त बरे होईल ..आता छान तब्येतही झालीय तुझी ..इथे घर छोटे आहे त्यामूळे तो बिडीचा धूर पटकन बाहेर जात नाही व सगळीकडे वास पसरतो ..त्याचा आम्हाला त्रास होतो ..मनात म्हंटले ..तुम्हाला इथे यायची इतकी काय घाई झाली होती . माझ्या स्वातंत्र्यावर गदा आली होती हे मी जाणले आणि हादरलो .म्हणजे नुसतेच घर बदलले नव्हते तर .सगळेच बदलले होते . चपला घालून जेवायला जरा वेळ आहे म्हणून बाहेर पडलो ..सगळाच परिसर अनोळखी होता ..बावचळून नेमके कोणत्या दिशेला जायचे ते समजेना ..शेवटी आल्या रस्त्याने पुढे चालत राहिलो .

तसा अगदी स्वच्छ परिसर होता सगळा ..बाहेरच्या बाजूला ऐक बैठ्या दुकानांची बांधलेली ओळ ..तेथे माणसांची गर्दी होती ..वाचनलयाचीही पाटी दिसली तेथे ..ऐक हेअर कटिंग सलून .दोन किराणां दुकाने ..मला गांधी नगर मधील सरकारी प्रेस च्या वसाहतीची आठवण झाली . ..ऐक सिगरेट ओढली ..रात्रीसाठी बिडीचा स्टॉक घेतला आणि परत फिरलो . आईने माझ्या आवडीची तुरीच्या डाळीची खिचडी ..पापड ..वर कुटाच्या मिरच्या तळून केलेली तेलाची फोडणी ..टमाटे बटाटयाची रसभाजी असं छान स्वैपाक केला होता ..पण माझे जेवणात मन लागत नव्हते ..आई काही ना काही विषय काढून मला बोलते करण्याचा प्रयत्न करीत होती ..ते मला समजतही होते आणि म्हणूनच नाराजी दाखवण्यासाठी मी गुपचूप मान खाली घालून जेवत होतो . जेवण झाल्यावर .पुन्हा बिडी ..भावाचे बोलणे नको म्हणून मग बाहेर पडून वर जाणारा जीना चढून गच्चीवर गेलो ..त्या इमारतीत असलेल्या दोन विंग ची मिळून म्हणजे एकूण २४ घरे होती .गच्ची चांगली मोठी होती ..पण सगळीकडे अंधार ..अंधारात बिडी पेटवून भुतासारखा उभा होतो ..डोके सरकले होते ! बिडी संपवून खाली आलो , आई वडील आणि भाऊ टीव्ही बघत बसले होते ...हॉल ला लागून असलेल्या छोट्या खोलीत जाऊन पलंगावर पडलो .. चादर तोंडावर घेऊन झोपायचा प्रयत्न करू लागलो ..जागरणाची सवय आणि प्रचंड अवस्थता या मुळे लवकर झोप लागणे शक्यच नव्हते ...विचारांचा भुंगा डोके पोखरत होता .मेंटल हॉस्पिटल मध्ये मला चादर तोंडावर लपेटून डोक्या घट्ट लपेटून घ्यायची नवीन सवय लागली होती कारण तेथे रात्री चार पैकी फक्त दोन ट्यूबलाईट बंद करत व दोन चालूच ठेवत असत ..सगळ्या मनोरुग्णांवर लक्ष ठेवता यावे ..व मनोरुग्णांनाही अंधारात काही अपघात होऊ नये म्हणून असे केले जाई ..त्यामूळे तोंडावर उजेड पडे ..म्हणून तोंडावर चादर !

हे असे तातडीने रेल्वे क्वार्टर सोडणे मला अजिबात आवडले नव्हते ..माझ्या कितीतरी अनमोल स्मृती जुळल्या होत्या रेल्वे क्वार्टरशी ...सुमारे १ ली पासून ते थेट कॉलेजच्या शेवटच्या वर्षापर्यंत सारे शिक्षण ..मस्ती ..मारामारी ..व्यसने ..सुमा ..सगळेच काही आठवू लागले .बी.कॉम च्या शेवटच्या वर्षी मागचे मिळून माझे एकूण १२ विषय बाकी राहिले होते .. त्याची परीक्षा दिल्याशिवाय हातात पदवी पडणार नव्हती ..भावाने इतक्यात पानटपरी चे काही करायचे नाही असे सांगून ..माझा विरस केला होता ..भावाचा रागही येत होता पण त्याच्या दृष्टीने त्याची बाजू बरोबर होती ..त्याच्या आणि माझ्या स्वभावात लहानपणापासून हाच मोठा फरक होता ..तो सगळे व्यवस्थित आखणी करून करत असे तर मी मनात येईल तसे करत असे .... एका सरळ रेषेसारखे त्याचे जिवन होते ..लहानपणापासून म्हणजे ...सहावी पासून तो ..मी मोठेपणी इंजिनियर होणार असे म्हणे ..त्या नुसार त्याने खूप मन लावून आभ्यास करून ..चांगले मार्क्स मिळवून ..पुण्याला सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात आपल्या मार्कांच्या जोरावर प्रवेश मिळवला होता ..यथावकाश अभियंता होऊन छान नोकरी ही मिळवली होती ..स्वतच्या पैश्यातून नवी कोरी हिरो होंडा घेतली होती ...माझ्या वर्तनाचा त्यालाही खूप त्रास भोगावा लागला होता ..त्याचे माझ्यावर निरतिशय प्रेमही होते ..म्हणूनच तो प्रत्येक वाईट गोष्टीत मला आडवा येई ...मी माझ्या आड येतो म्हणून त्याचा राग राग करत होतो .. पण माझे ही त्याच्यावर प्रेम होते ..लहानपणी त्याला ताप असतांना ..काहीतरी गडबड होऊन त्याच्या बोलण्यावर फरक झाला होता ..तो कधी कधी बोलताना अडखळत असे ..त्यामूळे जेव्हा त्याला शाळेतील ..स्टेशन वाडीतील आमचे खेळगडी त्याच्या बोलण्यावरून चिडवत तेव्हा की अनेकदा त्यांचाशी त्याला चिडवले म्हणून मारामारी करत असे ..तो मात्र हे चिडवणे मनावर घेत नसे ..म्हणे जाऊ दे चिडवू दे त्यांना ..आपल्या अंगाला काही भोके पडत नाहीत .माझ्या व्यसनाच्या काळात देखील त्याला खूप मानसिक त्रास झाला होता ..बी .ई .केल्यावर त्याला एम. ई . करायचे होते पण माझे घरात असे वागणे पाहून त्याचे माझ्या काळजीने आभ्यासात लक्ष लागत नसे व तो दोन वेळा परीक्षेला बसला पण आभ्यास झाला नाही म्हणून पेपरला गेलाच नव्हता ..म्हणजे माझ्यामुळेच हे त्याचे नुकसान झाले होते ! कितीतरी विचार ..आठवणी ..मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टींचा सल ..खंत ..पश्चाताप ...राग..नाईलाज ..या भावनांच्या गदारोळात मी चादरीखाली गुदमरलो होतो !
========================================================================

भाग ६५ वा  ३१ डिसेंबर ..!

विचारांची वादळांनी झोप केव्हाच उडवून नेली होती ..पुन्हा अनेक ..का ? ..का ?..आणि का ?.... प्रश्नचीन्हांचा फास ... लहानपणा पासून प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी घडावी असं माझा अट्टाहास होता ..त्या प्रमाणेच मी जगलो होतो ..तरी अनेक ठिकाणी ..लोक ..परिस्थिती ..अश्या गोष्टींपुढे माझा हट्ट निष्प्रभ ठरला होता व त्या त्या वेळी मी बंडखोरी करून शेवटी चुकीचाच मार्ग अवलंबला होता ...हे देखील जाणवत होते . इथे नव्या घरात मला सतत परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागणार होते ..हा बद्दल .मी कितपत स्वीकारू शकेन या बद्दलही मनात शंका होती ...रात्रभर कुस बदलत मनाचा चकवा सुरु राहिला ..केव्हा एकदा सकाळ होते असे झाले मला कारण उद्या आधी उठून नाशिक रोड ला जायचे आणि सगळ्या मित्रांच्या भेटी घ्यायच्या ..पानटपरी चा हाल हवाल पहायचा ..जमले तर सुमाकडे ऐक चक्कर मारायची असा सगळा प्लान मनात आखला गेला ..त्यातच उद्या ३१ डिसेंबर आहे हे आठवले ....व्यसन करायला लागल्यापासून ३१ डिसेंबर म्हणजे हक्काने व्यसन करण्याचा दिवस असा आमचा मित्रांचा गैरसमज होता तसेच गेली पाच सहा वर्षे प्रत्येक ३१ डिसेंबर ला उद्या पासून म्हणजे नवीन वर्षापासून सगळी व्यसने बंद असं फोल निर्धारही केला जायचा ... !

पहाटे पाच वाजताच मी पलंग सोडला आणि ब्रश वगैरे करू लागलो ..माझी चाहूल लागून आई लगेच उठली ..आईला कितीही गाढ झोपेत असली तरी घरात जाग आल्याची चाहूल कशी लागते हे ऐक कोडेच होते ..आणि माझ्या बाबतीत तर जणू ती सारखे माझ्यावर लक्ष ठेवून आहे की काय असे वाटे ..म्हणजे सारखी माझ्या बद्दलच विचार करत असे ती . ..ब्रश करून आईने दिलेला वाफाळलेला चहा घेत बसलो वडील आणि भाऊ झोपले होते अजून तो पर्यंत मला आईला पटवता आले असते ..' मी जरा नाशिक रोड ला जाऊन येतो आज' आईला हे अपेक्षित असावे , ' आता कशाला जायचे तिथे .. काही गरज नाही ' तिने स्पष्ट सांगितले तरी मी जाणारच हे माहित असल्यासारखे मग प्रेमाने म्हणाली ' अरे ..कालच तर आला आहेस घरी ..ऐक दोन दिवस घरीच थांब ..मग सावकाश जा ' . ' नाही आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे ..मला सगळ्या मित्रांना भेटायचे आहे ..आणि काही मित्रांकडून उधार पैसे घेतले आहेत ते देखील परत करायचे आहेत ' मी मूळ मुद्दा मांडला . ' किती पैसे द्यायचे आहेत ? ..एकूण ऐक हजार द्यायचे आहेत असे म्हंटल्यावर आईने एकदम सावध पवित्र घेतला ' हे पहा , या पुढे माझ्या कडे पैसे वगैरे मागायचे नाहीत ..सुहास मला तुला पैसे देते म्हणून खूप रागावला आहे ..त्याने माझ्या कडील सगळे पैसे काढून घेतले आहेत ..तुझे वडील आता सेवानिवृत्त आहेत याचे भान असू दे जरा ' तिने आपली असमर्थता जाहीर केली ...आईकडे पैसे ठेवलेले असतात हे मला माहित होते ' अग आता एकदम हजार नको आहेत ..सध्या पाचशे दिले तरी चालतील ' मी थोडा खाली उतरलो . शेवटी हो ना करता करता तिने दोनशे रुपये द्यायचे कबुल केले पुन्हा या पुढे मागायचे नाहीत असे माझ्याकडून वदवून घेतले .. आणि आता लगेच जाऊ नकोस बाहेर सगळे उठू देत ..मग जा ..नाहीतर सुहास पुन्हा चिडेल तिने सावधगिरीचा इशारा देत मला हळूच दोनशे रुपये काढून दिले . पैसे खिश्यात पडताच मी लगेच स्नान वगैरे उरकून तयार झालो बाहेर निघायला ..भाऊ , वडील उठले तर मला असं तयार पाहून भावाने विचारलेच ' कुठे निघालास " ' जरा सहज बाहेर फिरून येतो ' असे उत्तर देऊन सटकलो .

कालच्या बसस्टॉप वर आलो तर तिथे नाशिक रोड ला जाणाऱ्या बसेस चे वेळापत्रक दिसले सकाळी साडेआठ ला पहिली बस होती नाशिकरोड ला जाणारी आणि आता फक्त सात वाजलेले ... समोरच ऐक पानटपरी उघडी दिसली ..तेथे सिगरेट पीत उभा राहिलो ...पाच मिनिटातच सिगरेट संपली ..आता कसा वेळ घालवावा ...समोर रस्त्यापलीकडे ऐक मंदिर दिसले ..तेथे गेलो ..गणपतीचे मंदिर होते ते ..काल आईने या मंदिराबद्दल माहिती दिलीच होती ... दुरुनच छातीला हात लावून बाप्पांना अभिवादन केल्यासारखे केले...समोर असलेल्या एका बाकावर टेकलो ... केव्हा एकदा आठ वाजतात असे झाले होते मला ..मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांना निरखत बसलो उगाचच ...पुन्हा ऐक सिगरेट पेटवली तर ..एका भाविकाने माझ्याकडे मंदिराच्या आवारात सिगरेट ? असे प्रश्नार्थक मुद्रेने पहिले तसे शरमून तेथून उठलो आणि पुन्हा स्टॉप वर आलो ... पावणेआठ वाजता ऐक बस नाशिकरोडहून मेरी ला आली पाटी उलटी करून तीच बस पुन्हा नाशिकरोड जाणार होती बस मध्ये बसून एकदाचा नाशिकरोडला पोचलो आधी रेल्वे स्टेशन वर गेलो ..तेथे ,,वडा..चिवडा वगैरे विकणारे एकदोन फेरीवाले मित्र भेटले तेथे जरा टाईमपास करून सिन्नर फाट्याला गेलो पान टपरीवर धूळ बसली होती ..वर लावलेला ' एकता ' पान भांडार चा बोर्ड खुपच मळकट दिसत होता ...जरा वाईट वाटले पानटपरीची अशी अवस्था पाहून ..मग माझ्या व्यसनी मित्रांच्या घरी गेलो सगळे मला पाहून जाम खुश झाले ..विशेषतः माझी तब्येत सुधारल्याचे सगळ्यांना नवल वाटत होते ..जरा इकडची तिकडची माहिती घेतल्यावर मग हळूच एकाने गांजा काढला व चिलीम भरली ..मी गांजा ओढायचा नाही असे ठरवलेच नव्हते ...ब्राऊन शुगर बाबत मात्र ' अजिबात नाही ' असे मनात होते . सवईप्रमाणे माझ्यापुढे चिलीम केली गेली तसा ऐक दम मारला ...मग ..पुन्हा ..पुन्हा साधारण तासाभरात आमच्या दोन पुड्या झाल्या . सगळ्या मित्रांना मेंटल हॉस्पिटल मधल्या गमतीजमती सांगत बसलो ...दुपारी एकाच्या घरी जेवण केले .संध्याकाळी सर्वांचा छान दारू वगैरेचा प्लान होता ..मला घरी जावेसेच वाटेना ..थांबलो ...मला मनाविरुद्ध घडत असलेले सगळे विसरायचे होते . रात्री दारूची पार्टी झाल्यावर जुन्या गर्दुल्ल्या मित्राने पन्नी काढली तसा ..आता दारू प्यायलो.. गांजा प्यायलो ..मग ब्राऊन शुगर चा एखादा दम मारायला काय हरकत आहे ? .. आपण आता रोज थोडेच येथे येणार आहोत ? असे स्वतःलाच समर्थन देत .पन्नी हातात घेतली .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें