भाग ८६दुसऱ्या दिवशी सायंकाळी मी संमोहन शिबिराच्या ठिकाणी वेळेआधीच पोचलो ..डॉ दीपक केळकर यांची भेट घेतली ...त्यांना थोडक्यात माझ्या बद्दल माहिती देवून ..मला शिबिरात सामील होण्याची इच्छा दर्शविली ..त्यांनी लगेच होकार दिला व तेथील आयोजकांना मला विनामुल्य प्रवेश देण्याच्या सूचना दिल्या ...प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या डॉ. केळकर ..यांनी अगदी सोप्या भाषेत संमोहना बद्दल चे गैरसमज .. संमोहनाचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी होणारा उपयोग या बद्दल माहिती दिली .. पूर्वी या बद्दल मी पुस्तकात वाचले होते ..शाम मानव ..यांच्या संमोहनाच्या प्रयोगांबद्दल देखील मला माहित होते .आता मात्र सगळे सविस्तर समजून घेत होतो .. मानवी मनाच्या शक्तीचाच वापर करून घेऊन काम करणारे हे शास्त्र खरोखर अद्भूत आहे ..मानवी मनाचे दोन भाग असून अंतर्मन आणि बाह्य मन या पैकी बाह्य मन हे सतत जागृत असते ..तर अंतर्मन सुप्त असते .बाह्य मनाला काही विशिष्ट सूचना देऊन थोड्या वेळापुरते .. निद्रिस्त करून थेट अंतर्मनात प्रवेश करून जर काही सूचना दिल्या गेल्या तर अंतर्मन त्या सूचना स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्यास बाह्य मनाला आणि शरीराला देखील प्रेरित करू शकते ..असे थोडक्यात संमोहनाचे वर्णन करता येईल ..मनातील विचारातूनच माणसाचा स्वभाव व व्यक्तिमत्व बनत असते . बाह्य जगाकडून आलेल्या चांगल्या वाईट- सूचना , अनुभव ..त्यातून बनलेले विचार हे बाह्यमना कडून अंतर्मानाकडे पाठवले जातात ..अंतर्मनाच्या खोल तळाशी असलेले अनेक नकारात्मक .. विचार ..भावना ..मनोशारीरिक आजार होण्यास कारणीभूत ठरू शकतात ..असे विचार काढून टाकून माणसाला अधिक कार्यक्षम आणि कर्तबगार बनविण्यासाठी प्रेरित कारणे हा संमोहन शास्त्राचा मुख्य उद्देश आहे ..मात्र अनेक गैरसमज ..अफवा ..या मुले हे साधे सरळ शास्त्र ..गुढ शास्त्र बनून राहिले आहे . पूर्वी सगळ्यात आधी डॉ.एंटन मेस्मोर याने असे प्रयोग करून रोग निवारण करण्यास सुरवात केली म्हणून या विद्येला ' मेस्मोरीझम ' असे म्हंटले जात होते .. सुरवातीला या शास्त्राचे विरोधक असलेल्या जेम्स ब्रेड यांनी या शास्त्राचा सखोल आभ्यास करून मग त्याला ' हिप्नोटीझम ' असे नाव दिले . भारतीय योगशास्त्रात योगोपचार करण्यासाठी देखील संमोहनाचा वापर केला जातो .म्हणजे हे ऐक पुरातन शास्त्र आहे . योगनिद्रा हा ऐक आत्मसंमोहनाचाच प्रकार आहे .
डॉ .केळकर यांनी सविस्तर माहिती देवून नंतर संमोहना बद्दल चे गैरसमज स्पष्ट केले. संमोहनशास्त्राला मानसशास्त्राचा शास्त्रशुध्द पाया आहे. कोणत्याही संमोहनकाराकडे कोणत्याही प्रकारची अलौकिक किंवा दिव्यशक्ति नसते, मात्र कठीण परिश्रम व प्रदीर्घ साधना करावी लागते. सहसा जादूचे प्रयोग करणारे आपल्या प्रयोगाची गूढता वाढवण्यासाठी व हातचलाखी लपवण्यासाठी अशी अलौकिक शक्ति आपल्या मध्ये आहे असा दावा करतात. सर्व माहिती देवून झाल्यावर त्यांनी ..आपल्या सहकाऱ्यांवर संमोहनाचे प्रयोग केले . दुसऱ्या दिवशी त्यांनी उपस्थित प्रेक्षकांपैकी कोणाला संमोहनाचा अनुभव घ्यायचा आहे काय असे विचारल्यावर ..मी पुढे झालो ... त्यांनी मला मन पूर्ण एकाग्र करून त्यांच्या बोलण्याकडे लक्ष केंद्रित करायला सांगितले मग .. हळू हळू तुझे डोळे जाड होत आहेत ..पापण्या खूप खूप जड झाल्या आहेत ..डोळे मिटत आहेत ..तुला फक्त माझा आवाज ऐकू येतोय ..मी सांगेन ते सगळे तू अनुभवणार आहेस अश्या सूचना ते देत गेले .. आणि मी संमोहित झालोय याची खात्री होताच ..आता मु तुझ्या दंडात ऐक सुई खुपसणार आहे ..मात्र दुला काहीही वेद्ना होणार नाहीत .. अश्या सूचना देत माझ्या दंडात ऐक इंजेक्शन ची सुई खुपसली आणि प्रेक्षकांना दाखवण्यासाठी तीसुई काही काळ तशीच टोचलेल्या अवथेत ठेवली ..आश्चर्य म्हणजे खरेच मला काहीच वेदना जाणवल्या नव्हत्या ..तसेच सुई टोचलेल्या भागातून रक्त देखील बाहेर आले नव्हते कारण त्यांनी ..रक्त येणार नाही अशी सूचना आधीच दिली होती माझ्या अंतर्मनाला ..मग माझ्या डोक्याखाली ..कमरेखाली ..आणि पायाखाली ऐक स्टुल ठेवून मला त्यावर झोपवले आणि सूचना देण्यास सुरवात केली ..हळू हळू तुझे शरीर लाकडा सारखे कडक होणार आहे ..मी तुझ्या कमरेखालचा स्टुल काढणार आहे ..मात्र तरीही तू पडणार नाहीस .. कमरेचा भाग खूप कडक ..कडक होतोय ..म्हणत माझ्या कमरेखालचा स्टुल काढला ..आता माझ्या डोक्याखाली आणि पाया खाली फक्त स्टुल होता म्हणजे एखाद्या बेंच सारखा मी झालो होतो तरीही पाठीचा मणका अतिशय ताठ राहिला ..त्यांनी माझ्या शरीराच्या बेंच वर तीन जणांना बसायला सांगितले तरीही ..मी तसाच कडक राहिलो ..खूप सुंदर अनुभव होता तो .. खरोखर मानवी मनाची शक्ती अगाध आहे हे मला उमगले .. मात्र फक्त ती शक्ती योग्य .सकारात्मक वळण देऊन वापरता आली तर..जगातील सगळ्या समस्या नष्ट होतील ..पण अनेक जण ही शक्ती विघातक गोष्टींसाठी वापरून समस्या वाढवत असतात ..मी देखील त्या पैकीच ऐक होतो ..माझ्या मनाची शक्ती मला योग्य ठिकाणी वापरता येत नव्हती याचे पहिले कारण मनाची ..विचारांची चंचलता .. भावनाप्रधानता . आणि चांगल्या वाईटाची निवड न करता येणे .
हे शिबीर खूप काही शिकवून गेले मला ..पण त्याचा व्यवहारात वापर मात्र मी करू शकलो नाही .. अनेक दिवस व्यसने केल्यामुळे मी मानसिक दृष्ट्या कमकुवत झालो होतो ..तसेच माझा अहंकार ..स्वतच्या इच्छेने जगण्याचा अट्टाहास.. स्वकेंद्रित वृत्ती ..आणि विकारांचा पाठलाग ...नेहमी फक्त स्वताच्याच आनंदाचा विचार ..इतरांच्या भावनांची कदर नसणे या गोष्टी मला वारंवार पराभवाकडे ढकलत होत्या ..हे समजण्याची देखील माझी कुवत राहिली नव्हती .
=======================================================================
भाग ८७ वा चकवा ....!
संमोहन शिबीर केल्यावर ..मी माझा भाचा ..भाची ..सलील .आणि इतर मित्रांवर संमोहित करण्याचे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला ..मात्र संमोहित होण्यासाठी पहिली अट ही असते की संमोहित होणाऱ्या व्यक्तीचे पूर्ण सहकार्य आणि संमोहित होणाऱ्या व्यक्तीचा संमोहन कर्त्यावर असलेला पूर्ण विश्वास .. संमोहना बद्दल असलेल्या अनेक प्रकारच्या गैरसमजांमुळे ..असा पूर्ण विश्वास ठेवणे जरा कठीणच जाते . ..त्या मुळे माझे प्रयोग फारसे यशस्वी होऊ शकले नाहीत ..मेंटल हॉस्पिटलचे तीन महिने आणि येथील चार महिने असे माझे व्यसनमुक्त राहण्याचे सुमारे ७ महिने झाले होते होते .. दरम्यान नाशिकहून भावाला मुलगा झाल्याची बातमी आईने पत्रातून कळवली ..मला खूप आनंद झाला .. आता अकोल्यात रुळलो होतो ..तेथील उन्हाळ्याशी मात्र जुळवून घेता घेता कंटाळा येत असे ..अकोला जिल्हा पाण्याच्या बाबतीत देखील दुष्काळीच म्हणायचा ..उन्हाळ्यात तर नळाला आठवड्यातून दोन तीन वेळाच पाणी येई ..आसपासच्या हात पंपावर जरून पाणी आणावे लागे ..बहिण आणि मेव्हणे दोघेही नोकरी करत असल्याने ..त्यांची वेळेबाबत फार ओढाताण होत असे ..पाणी भरण्यासाठी माझी मदत होत होती ..पहाटे चारलाच बहिण उठत असे व मग ६ वाजेपर्यंत स्वैपाक वगैरे आटोपून ती नोकरीला जाण्याची तयारी करत असे ..अनेकदा तिची धावपळ पाहून मला तिची दया येई ..कारण सायंकाळी घरी आल्यावर ती पूर्ण थकलेली असे ..आल्यावर आधी ती दहा मिनिटे नुसती बसून राही ..आणि मग पुन्हा रात्रीच्या स्वैपाकाची तयारी .. माझे मेव्हणे देखील तिला बस स्टँडवर सोडायला आणि पुन्हा आणायला जाणे या बाबतीत कधी चुकत नसत .. त्यांचे दोघांचे कष्ट पाहून कधी तरी आपल्यालाही संसारासाठी असेच कष्ट करावे लागणार आहेत या कल्पनेने मी चिंतीत होत असे .. .. दुपारी अनघा ५ वी ते ८ वी च्या लहान मुलांचे क्लास घेई ..तिच्याकडे तीनचार मुले शिकायला येत असत .. ती जेव्हा क्लास घेई तेव्हा ती कशी बोलते ..शिकवते हे पाहण्याची मला फार उत्सुकता वाटे ..पण ते कधी पाहता आले नाही ... ती आठवड्यातून एकदा समिती त देखील जाई समिती म्हणजे संघाची मुलींसाठी असलेली ' शाखा '. लहानपणी मी काही दिवस संघात गेलो होतो तेव्हा मला आठवते गिरीश कुबेर हे प्रचारक नाशिकला होते ..ते नेहमी मला शाखेत जाण्यासाठी आग्रह करत असत ..मी दोन वेळा तीन दिवसीय शिबिरे देखील केली आहेत ..मला जास्त रस तेथे घेतल्या जाणाऱ्या खेळांमध्ये होता . पुढे माझी जीवनशैली बदलल्यानंतर मात्र मी कधी ' शाखेत ' गेलो नाही .
राम मंदिरात रोज आरतीला उभा राहून आता माझी रामरक्षा पूर्ण पाठ झाली होती ..मंदिराच्या ' रामजन्म ' आणि ' हनुमान जयंती ' उत्सवात देखील मी हिरीरीने सहभाग घेतला .. ' रामनवमी ' च्या दिवशी अनघाने छान लाल शालू नेसला होता .. खूप सुंदर दिसत होती ..रामजन्म होण्याच्या सुमारास मी ऐक जीन्स आणि जुना टीशर्ट घालून मंदिरात उभा होतो ..तिचा मला निरोप आला की माझ्या मैत्रिणी आज येणार आहेत आता मंदिरात तेव्हा ..तू जरा छान कपडे घालून ये ..त्यांना तुला बघायचे आहे .. म्हणजे हिने आपल्या मैत्रिणींना देखील माझ्या बाबत सांगितले होते तर .. मी मुद्दाम तिला चिडवण्यासाठी म्हणालो ..हे च कपडे ठीक आहेत ..तर तिचा चेहरा उतरला ..मग मी जाऊन ठेवणीतले कपडे घालून आलो .. तिच्या तीनचार मैत्रिणींचा गट आला होता मला पाहायला .. मला मंदिराच्या बाजूला एका कोपऱ्यात बोलावून तिने माझी त्यांच्याशी ओळख करून दिली .. मैत्रिणींच्या चेहऱ्यावरून अनघाची पसंत योग्य असल्याची त्यांची खात्री झाल्याचे मला कळलेच ... नंतर तिनेही मला तसे सांगितले .. मुली किती साध्या ..सरळ ..पटकन विश्वास ठेवणाऱ्या असतात हे मला अनघाच्या वर्तनावरून जाणवले ..मंतरल्या सारखे दिवस होते ते ... त्या काळात मला कधीच व्यसनाची आठवण सुद्धा झाली नाही ..आपले व्यसन आता पूर्णपणे सुटले अशी माझी खात्री होत चालली होती ..आणि मुख्य म्हणजे व्यसन करायला आता काही कारणही उरले नव्हते .
अनघा आणि सलील चार दिवस गावाला गेले असतांना मी खूप कंटाळा आला म्हणून सिनेमा पाहायला निघालो होतो .. अकोल्याला दूर अंतरावर जायचे म्हणजे बहुधा सायकल रिक्षा वापरत ..मी देखील आमच्या राहत्या ठिकाणापासून सायकल रिक्षा केली होती .. वाटेत ऐक मोठा चढ लागला तेव्हा त्या सायकल रिक्षा चालवणाऱ्याची दमछाक होते आहे हे पाहून मी खाली उतरून पायी चालू लागलो नंतर चढ संपल्यावर रिक्षावाला जरा दोन मिनटे विश्रांती साठी थांबला आणि त्याने बिडी काढून पेटवली ..ते पाहून मी देखील बिडी काढली तर माझ्या कडे काड्यापेटी नव्हती ..म्हणून त्याच्याकडे काड्यापेटी मागितली .. त्याने काड्यापेटी हातात देण्याएवजी स्वतः मला काडी पेटवून बिडी पेटवण्यासाठी माझ्या तोंडाजवळ जळतो काडी आणली आणि माझे लक्ष त्याच्या उजव्या हाताच्या पाहील्या दोन बोटांकडे गेले ..मी चकित झालो त्याच्या हाताच्या दोन बोटांचा पुढला भाग थोडासा जळल्या सारखा काळपट दिसला ..एकदम मी चमकलो ..ब्राऊन शुगर ओढणाऱ्या लोकांची बोटे बहुधा अशी थोडीशी जळालेली असत ..म्हणजे हा रिक्षावाला ब्राऊन शुगर चा व्यसनी होता तर ..मी पटकन त्याला त्या बद्दल विचारले तर आधी नाही म्हणाला .नंतर जास्त जोर दिल्यावर त्याने तो ब्राऊन शुगर ओढत असल्याचे कबुल केले ..झाले माझी मती फिरली ..इतके दिवस आपण व्यसनापासून दूर आहोत ..तेव्हा आज फक्त एखादा दिवस घ्यायला काय हरकत आहे ? .. मी मागचा पुढचा विचार न करता सिनेमाला जाणे रहित केले आणि त्याला अड्डा कोठे आहे ते विचारले ..आणि त्याच्यासोबत अड्ड्यावर जाऊन दोन पुड्या घेतल्या आणि त्याने दाखविलेल्या एकांत असलेल्या जागी जाऊन चेसिंग करायला सुरवात केली . पिताना मी स्वतःला बजावत होतो की हे फक्त आजच करायचे आहे ..या नंतर अजिबात नाही ..आणि इतके दिवस आपण प्यायलो नाहीय त्या मुळे एकदा प्यायल्याने आपल्याला लगेच ' टर्की ' देखील होणार नाहीय .
( मित्रानो .. आपणा सर्वाना माझा नक्कीच राग येईल आजचा भाग वाचून ..हा इतका मुर्ख कसा ..नालायक आहे .. इतके कसे समजत नाही ..पुन्हा एकदा तरी का होईना व्यसन करायची काय गरज होती ..असे विचार आपल्या मनात येतील ..पण कृपया ऐक लक्षात घ्या की व्यसनाधीनता ह ऐक मनोशारीरिक आजार आहे व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत हे घडू शकते .. पुढेही अनेक वेळा ही चूक मी केली आहे ..कृपया माझ्यावर न रागावता हा ' आजार ' भयंकर आहे ते समजून घ्यावे व जमल्यास मला माफ करावे .. हा सगळा भूतकाळ आठवताना मला देखील अनेक वेळा स्वतचा खूप राग येतो व पश्चाताप होतो . पण ..आता वेळ निघून गेली आहे )
=======================================================================
भाग ८८ वा गडे मुर्दे ..बाहर निकले !
त्या दिवशी मी फक्त दोन पुड्या घेऊन प्यायलो ..मनाशी सारखे स्वतःला बजावत होतो की आता परत कधीच नाही .. रात्री बरोबर घरी पोचलो .. जेवायची इच्छा नव्हती .. तसाच झोपण्याचा प्रयत्न केला .. मात्र काही केल्या झोप लागेना .. सारख्या जुन्या आठवणी यायला लागल्या .. इतके दिवस जवळ जवळ मी पूर्व आयुष्य विसरल्या सारखेच झाले होते मात्र त्या दिवशी ब्राऊन शुगर ओढल्यावर ..मनात सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या . विशेषतः अनेक त्रासदायक आठवणी .. ज्यात मला अपमान वाटला होता ..खूप दुखः झाले होते ..कोणाचा तरी खूप राग आला होता .. निराश्या ..अपेक्षाभंग ..या सगळ्या आठवणीं ....मधमाश्यांच्या मोहोळावर कोणी दगड मारल्यावर जश्या चवताळून मधमाश्या घोंगावतात .तशा सगळ्या आठवणी मनात फेर धरून घोंगावत होत्या ...मी सातवीत असतांना एकदा आमच्या शाळेची सहल काश्मीर ला जाणार होती ..मोठा भाऊ तेव्हा दहावीत होता ..आम्ही दोघेही सहलीला जायला उत्सुक होतो ...मात्र वडिलांच्या पगारात एकाच वर्षी दोघांच्या काश्मीर च्या सहलीचा खर्च त्यांना झेपला नसता म्हणून ..फक्त भावाला पाठवण्याचे ठरले .. मी जेव्हा दहावीत जाईन तेव्हा मग मला पाठवू असे वडिलांनी सांगितले ..त्या वेळी मला वडिलांचा खूप राग आला होता ..आपण इतके गरीब का याचेही खूप वाईट वाटले होते ..मध्यमवर्गात जन्माला येण्याएव जी आपण जर टाटा ..बिर्ला वगैरे उद्योगपतींच्या घरी जन्माला आलो असतो तर किती बरे झाले असते असे वाटले मला ..पुढे मी दहावीला असतांना नेमकी त्या वर्षी आमची सहल कोठेच गेली नाही .त्यामूळे माझे काश्मीर ला जाणे राहिलेच कायमचे .. भावाबरोबर मलाही गायनाचा क्लास लावायचा होता ..परत तीच अडचण एकदम दोघांचे पैसे भारत येणार नव्हते ..नंतर माझी वेळ येईपर्यंत तो क्लासच बंद झालेला होता ..सुमा ने मला समजून न घेता माझ्याकडे फिरवलेली पाठ ..
एकदा आम्ही सगळे नांदेडहून परत नाशिकला येताना ...त्यावेळी मनमाड ला गाडी बदलावी लागे ..मनमाड स्टेशन वर खूप गर्दी होती त्यादिवशी रविवार होता आणि कोणतीतरी स्पर्धा परीक्षा असल्याने मनमाड हून शेकडो तरुण मुले नाशिकला स्पर्धा परीक्षा देण्यासाठी निघाली होती ..गाडीत चढण्यासाठी स्टेशनवर गर्दी करून उभी होती ..मी ..आई , वडील , माझा भाऊ , लहान भाचा आनंद असे सोबत होते गाडी आल्यावर ...गाडीत चढताना वडील सर्वात पुढे होते .. गाडी आल्याबरोबर त्या मुलांनी एकदम गाडीत चढण्यासाठी घाई गोंधळ सुरु केला ..त्यातील ऐक जण माझ्या वडिलांना '' ए टकल्या सरक बाजूला असे ओरडून धक्का देऊ लागला ते पाहून माझे टाळके सटकले आणि मी त्याला मागे ओढला ..त्याला भिडलो .. ते पाहून त्याचे सगळे मित्र मला भिडले ..मी एकटा आणि ते सुमारे २० ते २५ जण होते ..ते मला वरून लाथा बुक्के मारत होते मी मात्र जो पहिला वडिलांना बोलणारा पकडला होता त्याच्याच छातीवर बसून त्याला मारत होतो ..सुमारे ५ मिनिटे हा धुमाकूळ चालला होता ..माझी आई .भाऊ मला सोडवण्यासाठी मोठ्याने ओरडत होते ..माझा भाचा रडत होता ..मी मात्र वेड्यासारखा मार खात होतो तरीही त्या मुलाला काही सोडत नव्हतो ..तितक्यात गाडीने शिटी दिली तशी ती सगळी मुले मला सोडून गाडी पकडण्यासाठी धावली ..वडिलांना ' टकल्या 'म्हणणारा मुलगा अर्धमेला झाला होता ..वडिलांनी मला बाजूला खेचले आम्ही सगळे गाडी पकडायला धावलो .. गाडी हळू हळू सुरु झाली होती ..धावपळ करून कसेतरी गार्डच्या डब्यात चढता आले ..त्या धावपळीत सामानाची ऐक बँग गहाळ झाली ..गाडीत चढल्यावर वडील मलाच खूप रागावले ..नालायक ..गुंड .कुठे नेण्याच्या लायकीचा नाहीस वगैरे मला म्हणू लागले .. म्हणजे त्यांना तो मुलगा बोलला म्हणून मी मारामारी केली ..इतका मारही खाल्ला आणि वडील मलाच रागावले होते ..तेव्हा देखील स्वतच्या मध्यमवर्गीय पणाचा खूप राग आला होता मला .
माझ्या दहावीच्या परीक्षेच्या वेळी मला सगळे माझे आभ्यासात जास्त लक्ष नसे म्हणून तू नुसता पास झालास तरी आम्ही ५ किलो पेढे वाटू ..तुझ्या कडून आम्हाला जास्त टक्के मार्क मिळण्याची अजिबात आशा नाही असे म्हणत असत ..जेव्हा दहावीचा निकाल लागला तेव्हा मला ४९ टक्के मार्क मिळाले म्हणजे सेकंडक्लास होता ..त्यांची अपेक्षा तर फक्त पास होण्याची म्हणजे ३५ टक्के इतकीच होती ..मला त्या पेक्षा किती तरी जास्त मार्क्स मिळाले होते ..मात्र संध्याकाळ झाली तरी वडील काही पेढे आणायचे नाव घेईनात .. उलट जेव्हा संध्याकाळी माझा ऐक फर्स्टक्लास मिळालेला माझा मित्र आमच्या घरी पेढे देण्यास आला तेव्हा ..वडील मला त्याच्यासमोर रागावले .. म्हणाले हा मुलगा बघ ना याने ना कुठला क्लास लावला ना कोणते अपेक्षित प्रश्नसंच वापरले तरी याला तुझ्या पेक्षा जास्त मार्क्स आहेत .. ते माझ्या मनाला फार लागले होते ..खरेतर ती महिना अखेर तारीख होती आणि वडिलांजवळ पुरेसे पैसे नव्हते म्हणून त्यांनी पेढे आणले नव्हते ..नंतर पगार झाल्यावर वडिलांनी पेढे आणले पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती ..माझ्या मनात ती अढी कायमची बसली होती ..
आमच्या रेल्वे क्वार्टर मध्ये ऐक भांडखोर बाई रहात होती ..तिला आमच्याच वयाची दोन मुले होती पण ती मुले फारशी कोणांत मिसळत नसत .सारखी घरात बसून असत ..क्रिकेट खेळताना अनेकदा आमचा बॉल त्यांच्या अंगणात जाई .. इतर मुले तो बॉल त्यांच्या अंगणातून काढायला घाबरत असत मात्र मी ..बिनधास्त जाऊन बॉल घेऊन येत असे ..एकदा ती बाई मला बॉल आणायला गेलो असतांना रागावली ....मी फक्त तिला इतकेच म्हणालो की काकू ..अहो खेळताना बॉल जाणारच इकडे तिकडे ..तुम्ही इतके रागावू नका ..तर तिने लगेच माझे बखोट धरून मला माझ्या घरी धरून आणले व माझ्या आईकडे तक्रार केली ..माझ्या आईने माझी बाजू ऐकून न घेता ..मोठ्या माणसांना उलटून बोलतोस म्हणून मलाच दोन धपाटे घातले होते .. एकदा आम्हाला गावाला जायचे असतांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या ...रात्रीची गाडी रेल्वेला खूप गर्दी होती ....आमचे रिझर्व्हेशन नव्हते .. आई , वडील, मी , माझा भाऊ असे सगळे हातात सामान घेऊन .. प्रत्येक डब्याचे दार अगतिकतेने वाजवत होतो मात्र कोणीही दार उघडत नव्हते .. एका डब्याच्या टी .सी. ने दार उघडले वडील रेल्वेतच असल्याने त्याला अजीजी करून सांगू लागले की ' हम स्टाफ के है ..थोडा अंदर खडे रहेने की लिये जगह दे दो ' त्याने काहीही न ऐकता धाडकन दार लावून घेतले ..त्यावेळची वडिलांच्या चेहऱ्यावरची असहायता माझ्या मनात कायमची कोरली गेली होती ..खूप राग आला होता त्या टी.सी चा पण काहीही करू शकत नव्हतो . शेवटी लेडीज डब्यामध्ये आम्ही कसेतरी चढलो होतो .
त्यादिवशी कश्या कोणजाणे मनाच्या तळाशी बसलेल्या सगळ्या आठवणी वर येत होत्या ..कदाचित मी अनेक महिन्यानंतर ब्राऊन शुगर सेवन केल्यामुळे असे झाले असेल ..माझ्या मनातील निराशा ..राग ..खुन्नस ..दुखः ..अपमान ..खंत या साऱ्या नकारात्मक भावना जागृत झाल्या होत्या .
=======================================================================
भाग ८९ वा मेंटलचे सर्टिफिकेट..!
रात्रभर मी नकारात्मक आठवणींच्या गदारोळात जागा होतो ..म्हणून सकाळी क्लास ला जावेसे वाटेना ..उठलो आणि बहिण ..मेव्हणे कामावर गेल्यावर परत झोपून राहिलो ..सुमारे सात महिन्यानंतर मी फक्त ऐकदा व्यसन केले होते तरी देखील दुसऱ्या दिवशी मला एकदम शक्तिपात झाल्यासारखे वाटत होते ..दिवसभर आळसात झोपून काढला .. संध्यकाळी अनघाची खूप आठवण येत होती ..म्हणून मंदिरात जाऊन बसून राहिलो ..तिला गावाहून परत यायला अजून ऐक दिवस बाकी होता .. थोड्याच कालावधीत मला अनघाच्या असण्याची इतकी सवय झाली होती ..की तिचे काही काळ का होईना दूर जाणे खूप अवघड वाटले .. रात्री जेवून झोपण्याचा प्रयत्न केला ..पुन्हा तीच जुनी बैचेनी ..अवस्थता .. जरी शारीरिक ' टर्की ' झाली नाही तरी मानसिक अवस्थता जागृत झाली होती माझी एकदा व्यसन केल्यामुळे .. बहिणीला वाटले उन लागले असेल याला ..अकोल्याच्या उन्हाची सवय नाही म्हणून असे होत असेल ..पायाला कांद्याचा रस लाव .. वगैरे प्रकार सुचविले तिने ..केव्हातरी उशिरा झोप लागली .
दोन दिवसांनी मन जरा ताळ्यावर आले .. अनघा गावाहून परत आली होती .. परत माझे नियमित रुटीन सुरु झाले .. अनघा ..खूप बोलकी होती ..तिची आई जेव्हा केव्हा भजनी मंडळात वगैरे बाहेर जाई तेव्हा सलील मला निरोप देई ..मन मी अनघाकडे जाऊन बसे .. तिला बोलायला अनेक विषय असत कॉलेजच्या मैत्रिणी ..नातलग .. तिच्या जीवनातल्या जुन्या आठवणी ..भरभरून बोलत असे ती..मी नुसताच हं ...हं .करत तिच्या तोंडाकडे पाहत पाहत राही ..बोलताना ती खूप निरागस दिसे ..मंत्रमुग्ध होऊन मी तिच्याकडे पाहत आहे हे तिला समजल्यावर मग एकदम चूप होत असे . काय झाले ? ..तू पण बोल ना काहीतरी असे मला म्हणे .. तिच्या चालण्या बोलण्यातील नैसर्गिक सहजता खूप लक्षवेधी असायची ..एकदा तिने जरा घाबरतच मला सांगितले की ती जेव्हा केव्हा गच्चीवर आभ्यासाला किवा काही कामाला ....नुसतेच उभी राहायला जाते तेव्हा ..बाजूच्या एका नवीन झालेल्या इमारती मधील मुले त्यांच्या खिडकीतून अनघा त्यांना दिसली की लगेच ते देखील तीनचार जण गच्चीवर येत आणि ..मोठ मोठ्याने अचकट विचकट बोलत ..शिट्या मारत ..हा प्रकार गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु होता ..ऐक दोन वेळा त्यापैकी एकाने तिला हात दाखवून इशारे करण्याचा प्रयत्न केला होता .. तू मला हे आधी का सांगितले नाहीस म्हणून मी तिच्यावर रागावलो ..तर म्हणाली ..तू भडक डोक्याचा आहेस हे मी ऐकून आहे तुझ्या भाचीकडून ..उगाच काहीतरी मारामारी करशील ..अजून नवीन भानगडी नकोत म्हणून तुला सांगितले नाही ... आता मी शक्यतो गच्चीवर जातच नाही .. मुलींचा मुळचा स्वभाव तसा भांडणे वगैरे करणारा नसतो ..उलट जिथे पुरुषांचा संबंध येतो तेथे त्या नमते घेतात .. कोणाला बहुधा काही सांगण्याच्या भानगडीत पडत नाहीत व सहन करतात ...आपल्यावरून भांडणे व्हावीत असे त्यांना वाटत नाही .अर्थात याचाच गैरफायदा पुरुष घेतात ..भले स्त्रिया आपापसात भांडतील खूप पण ..रक्तपात ..मारामारी ..गुन्हेगारी या बाबत त्या दूरच असतात . सलील ला सांगितलेस का असे विचारले तर ..तिने त्यालाही सांगितलेले नव्हते .. नंतर सलील भेटल्यावर मी त्याला हा प्रकार सांगितला .. तो जरी चिडला तरी ..माझ्या इतका तो मारामारीत निपुण नसल्याने ..एकदा मी बोलतो त्या मुलांशी ..इतकेच म्हणाला मला ते पटले नाही ..मी स्वतच या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावायचे ठरवले ..फक्त त्यामुलांशी भांडण करताना अनघाच्या आई वडिलांना समजायला नको होते ..तसेच कॉलनीत बभ्रा होऊ द्यायचा नव्हता ..कारण अनघा वरून मी इतका का भांडण करतो याचा त्यांना संशय आला असता ..वर कॉलनीत देखील सगळीकडे चर्चा सुरु झाली असती ..तिच्या साठी तिच्या भावाने भांडणे वेगळे ..मी भांडणे वेगळे होते ..तरी मी दुसऱ्या दिवशी मुद्दाम मंदिरात थांबलो आणि अनघाला गच्चीवर जाण्यास सांगितले ..ती गच्चीवर जाऊन उभी राहिली ..साधारण दहा मिनिटात बाजूच्या इमारतीतून ती मुले त्यांच्या इमारतीच्या गच्चीवर आलेली मला दिसली .. थोड्याच वेळात त्यांचे मोठ्याने बोलणे सुरु झाले ..अनघाकडे पाहून हसून एकमेकांना टाळ्या देणे वगैरे सुरु झाले ..मला मंदिरातून हे सगळे दिसत होते ..उठलो आणि सरळ त्यांच्या इमारतीजवळ जाऊन त्यांना गच्चीवरून खाली येण्यास सांगितले ..ते चार पाच जण होते ..बाहेरगावाहून तेथे शिक्षणासाठी आलेले ..एकत्र भाड्याची खोली घेऊन रहात होते .. जरा ताठ्यानेचती मुले खाली आली ..मी त्यांना काय करता .वगैरे विचारपूस करायला लागलो तर उलट उत्तरे देऊ लागली ..मग मी माझे खरे रूप दाखवले त्यांना ..जरा जास्त आगावू वाटणाऱ्या एकाच्या कानाखाली लावली ..व शिव्या देण्यास सुरवात केली ..त्यांना ताकीद दिली उद्यापासून जर असे प्रकार दिसले तर एकेकाचा जीवच घेईन असं दम दिला ..वर हे देखील सांगितले की माझ्या कडे मेंटल हॉस्पिटल चे सर्टिफिकेट आहे वेडा असल्याचे ..नुकतीच वयात आलेली साधारण विशीची मुले होती ती सगळी ..माझा आवेश पाहून घाबरली आणि पळाली..
अनघा हे सगळे गच्चीवरून पाहत होती ..सलील देखील जरा दूर उभा राहून हे सगळे पाहत होता ..त्याला मी तू जवळ येऊ नकोस असे आधीच सांगितले होते .. नंतर दुसऱ्या दिवशी रात्री साधारण ९ वाजता मी घरीच जेवायला बसलो असतांना ऐक अनोळखी मुलगा आमच्या कडे आला ' मामा ' कोण आहे ? तुला बाहेर तुझे मित्र बोलवत आहेत असं निरोप दिला त्याने . मी पटकन उठून बाहेर गेलो तर तीनचार अनोळखी मुले बाहेर उभी होती .. त्यांनी मला जरा बाजूला येण्यास सांगितले ..मी बाजूला असलेल्या गल्लीत गेलो तर तिथे सुमारे तीस चाळीस मुलांचा घोळका उभा होता ..मला अंदाज आला की ..कालचे प्रकरण असणार ..इतकी मुले पाहून जरा मनातून घाबरलो पण तसे न दर्शविता तेथे गेलो ..ऐक जण बहुधा पुढारी असावा त्या मुलांचा ..मला म्हणाला ..काय रे तू ' दादा ' आहेस का इथला ?...आमच्या पोरांना का दम दिलास ? ..मी सांगितले ती मुले मुलींना छेडतात असे ..तर म्हणाला ..तुझी कोण लागते ती मुलगी ? .इथे मी निरुत्तर झालो कारण अनघाचे आणि माझे संबंध मला उघड करायचे नव्हते ..माझ्या मित्राची बहिण आहे .असे म्हणालो ..त्याने पटकन माझ्या ऐक थोबाडीत मारली ..अंगात रक्त उसळ्या मारत होते ..पण स्वतःला सावरले कारण इथेच बहिणीच्या घराजवळ मारामारी झाली असती तर ..बहिण ..मेव्हणे सगळ्यांना समजले असते ..ते मलाच रागावले असते ..मी म्हणालो आपण सगळे थोडे लांब चलुयात..मला एकाला मारायला तम्ही इतके जण आला आहात ना ? चला थोडे लांब जाऊ मग एका वेळी चारचार जण या मला भिडायला ..पाहू काय होतेय ते ..माझा खुनशी स्वर आणि ठाम आवाज त्या लीडर मुलाला जाणवला असावा तसेच इतके मुले पाहून न घाबरता ..त्याच्या डोळ्याला डोळा भिडवून मी बोलत होतो त्यावरून हे पाणी वेगळे आहे हे तो समजला .मग दोस्ती खात्यात म्हणाला ..तू त्या मुलांना दम दिलास तेव्हापासून ती मुले खूप घाबरली आहेत .. तू मेंटल आहेस असे त्यांना सांगितले आहेस ..त्यावरून तर जास्तच धसका घेतलाय त्यांनी ..आम्ही येथील युवक कॉंग्रेस ची मुले आहोत ..वगैरे ... मी त्याल लीडर ला जरा बाजूला घेऊन अनघा माझी मैत्रीण असल्याचे सांगितले ..यावर तो मनापासून हसला ..म्हणाला हे पहिले सांगायचे होते यार तू ..मग माझ्या गळ्यात हात घातला आणि आम्ही सगळे दूर असलेल्या पानटपरी वर गेलो ..तेथे त्याने मला सिगरेट पाजली . एकंदरीत बाका प्रसंग होता पण जास्त गोंधळ न होता फक्त ऐक थोबाडीत खाऊन मी तो निभावून नेला होता . तेव्हापासून अनघाला त्रास देणे बंद केले त्या मुलांनी .
=======================================================================
भाग ९० वा वडिलांचे आजारपण !
सिनेमाला जाताना वाटेत गर्दुल्ला सायकल रिक्षावाला भेटल्यानंतर मी त्या दिवशी न राहवून ब्राऊन शुगर ओढली होती ..त्या गोष्टीला आता दहा दिवस होऊन गेले होते .. पुन्हा सगळे सुरळीत सुरु झाले होते ...एके दिवशी आईचे पत्र आले ..की भावाच्या मुलाचे बारसे झाले आणि त्याचे नाव ' मोहित ' असे ठेवले आहे ..सगळा कार्यक्रम छान झाला ..मात्र नंतर वडिलांना पुन्हा एकदा अर्धांगवायूचा झटका आला होता व त्यांना उपचाराकरिता दवाखान्यात दाखल केले आहे असे पत्रात लिहिले होते .मागच्या वेळी जेव्हा वडिलांना असा पहिला अँटँक आला होता त्याला आता सुमारे सहा वर्षे होऊन गेली होती ..त्या वेळी वडिलांचा उजवा हात निकामी झाला होता ..तसेच स्मरणशक्ती वर परिणाम झाला होता .. रेल्वेच्या इगतपुरी ..भायखळा येथील दवाखान्यात उपचार देवून नंतर ' टाटा मेमोरियल ' मध्ये स्कँन करून ..फ़िजिओथेरपी व औषधे घेऊन ते बरे झाले होते ... त्या वेळी मला आठवते वडील सगळे लिहिणे ..वाचणेच विसरले होते म्हणजे त्यांची अक्षरओळख हरवली होती ..मग पुन्हा त्यांनी पाटी ..अंकलिपी ..वगैरे घेऊन सगळे रिकलेक्ट केले होते .. एखाद्या पहिलीतल्या शाळकरी मुलासारखे ते पाटी पेन्सिल घेऊन त्यावर बाराखडी ..पाढे लिहीत असत ..हळू हळू मग त्यांना सगळे आठवले ..मात्र तेव्हा पासून वडिलांना कामावर फक्त ऑफिस वर्क द्यावे अशी सूचना दिली होती रेल्वेच्या डॉक्टरनी ..तसेच त्यांना रक्तदाबाच्या गोळ्या नियमित घ्याव्या लागत असत ..सेवानिवृत्त झाल्यावर आता तीन वर्षांनी पुन्हा एकदा त्यांना असा पँरँलीसीस चा झटका आला होता ..या वेळी सगळी उजवी बाजू निकामी झाली आहे ..व जिभेवर देखील परिणाम झाला असून ..तोंड थोडे वाकडे झाले आहे व बोलता येत नाही असेही आईने पत्रात लिहिले होते ..पत्र वाचून बहिण रडू लागली ..मी देखील गंभीर झालो .. वडिलांबद्दल खूप वाईट वाटू लागले .. बहिणीला उन्हाळ्याच्या सुट्या लागायला अजून ऐक महिना अवकाश होता ..माझीही मराठी आणि इंग्रजी टायपिंग ची परीक्षा बाकी होती त्यामूळे आम्हाला लगेच नाशिकला जाता येणार नव्हते .
आईचे पत्र वाचून माझे मन नाशिककडे ओढ घेऊ लागले ..लहानपणापासून च्या वडिलांच्या आठवणी येऊ लागल्या ..माझे वडील ..रोज सकाळी कामावर जाताना नियमित देवपूजा करीत ..मग मोठ्याने गीतेचा ' ऊर्ध्वमूल मधःशाखं ' हा अध्याय .दत्ताचे स्तोत्र ..गणपती अथर्वशीर्ष..वगैरे म्हणत असत पूजा झाली की कपाळावर गंध लावून मगच कामावर जात ..स्वभावाने विनोदी होते ..मात्र निष्कपटी स्वभाव होता ..कोणालाही पट्कन काही रागावून बोलत नसत ..कामावर त्यांचे सहकाऱ्यांशी काही कारणावरून खटकले की .. तेथे काही न बोलता मग घरी येऊन सगळे आईला सांगून चीडचीड करत असत .. लहानपणी फारतर एकदोन वेळा त्यांनी आम्हा भावंडाना मारले असेल ..नंतर मी मोठा झाल्यावर तर ..त्यांनी मला काही बोलणे देखील बंद केले होते ...कारण मी त्यांना उलटून उतर देत असे ..मी व्यसनाधीन झाल्यावर तर अनेकदा ..तुमच्या मुळे मी व्यसनी झालो ..काय केले तुम्ही आमच्यासाठी ? वगैरे आरोप त्यांच्यावर करत असे ..वडील तरुण असतांना आमचे आजोबा सेवानिवृत्त झालेले होते त्या मुले आजोबांनी वडिलांना ..आता स्वतच्या पायावर उभे रहा ..बास झाले शिक्षण असे स्पष्ट सांगितले ..तेव्हा पासून त्यांनी शिक्षण सोडले व निरनिरळ्या नोकऱ्या करू लागले होते .. त्यांना एकूण चार भाऊ आणि ऐक बहिण होती ..माझे सर्वात मोठे काका बडोद्याला होते ..त्यानंतरचे काका ..ठाण्याला ..ऐक काका बडोद्यालाच ' सुरसागर ' तलावात म्हणे पोहताना गेले होते .. तर लहान काका देखील ठ्ण्याला होते ..या पैकी ठाण्याचे मोठे काका हे उच्चशिक्षित होते तसेच ते लहानपणी दुसऱ्या कुटुंबात दत्तक गेले होते ..या काकांची .सांपत्तिक स्थिती चांगलीच होती. ...मात्र इतर सर्व भावंडे मध्यमवर्गीय ...आत्या सर्वात लहान ती दिल्लीला असे तिचे यजमान सैन्यात होते . .. मोठे दोन्ही काका देखील अर्धांगानेच आजारी पडून गेले होते ..राहिले होते ते ठाण्याचे लहान काका वडील आणि आत्या ..
वडिलांना सिगरेट चे व्यसन होते ..मात्र दिवसातून केवळ तीन चार सिगरेट ते ओढत असत .. त्यांचे अक्षर अगदी बारीक मात्र वळणदार होते ..सर्व नातलगांना नियमित खुशालीचे पत्र लिहिणे त्यांना आवडत असे ..तसेच रोज रात्री ...जमाखर्चाच्या वहीत दिवसभरातील केलेला खर्च लिहून काढणे हा त्यांचा आवडता उद्योग होता .. सगळा खर्च लिहून झाल्यावर मग पाकिटातले पैसे काढून ते मोजून ..सगळा हिशोब नीट लागला त्यांचे समाधान होई ... पुढे मी जेव्हा व्यसनासाठी त्यांच्या पाकिटातून पैसे काढू लागलो ..तेव्हा ते हिशोब करायला बसले की हिशोब लागत नसे ..मग ते सरळ मला विचारात ..मात्र मी कानावर हात ठेवी ..बिचारे चूप बसत 'आपलेच दात ' असे झाले होते माझ्या बाबतीत . कधी कधी राग अनावर झाला की मला ' घरातून निघून जा ' असे म्हणत मात्र ..मी मुजोरी करत असे त्यांच्याशी .. असं कसा जाईन ? ..मला पोसता येत नाही तर मग जन्म का दिला वगैरे सुनावत असे ..माझे असे बोलणे ऐकून ते खूप व्यथित होत असत . ..सगळे सगळे आठवू लागले ..माझ्या वागण्याचा मला पश्चाताप देखील होई नंतर ..मात्र तो पश्चाताप ' आळवावरचे पाणी ' सारखा होता . आईचे पत्र वाचून मला खूप दुखः झाले ..आणि माझ्यासारख्या व्यसनी व्यक्तिमत्वाच्या माणसाला सगळ्या दुखाःवर ..तणावावर .. निराशेवर एकच उपाय माहित असतो तो म्हणजे हे सगळे विसरण्यासाठी थोडीशी नशा कारणे .. त्या नुसार मी त्या दिवशी मित्रा कडून उसने पैसे घेऊन पुन्हा दोन पुड्या घेऊन आलो आणि प्यायलो .
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें