प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.com



शनिवार, 23 मार्च 2013

जाये तो जाये कहां ...

भाग १२१ वा सलीमभाई भंगारवाला ! 

आम्ही एका समोर मोठे अंगण असलेल्या अगदी भंगार वाटणाऱ्या दुकानाजवळ पोचलो होतो ...दुकानासमोरच मोठे अंगण ..त्या अंगणात सगळीकडे प्लास्टिकच्या बाटल्या .. तारांची भेंडोळी ..पुठ्यांचे गठ्ठे ..काचेच्या लहान मोठ्या बाटल्या ..असे ढिगारे पडलेले होते .. त्या ढिगाऱ्याच्या मध्यभागी एक मोठा वजन काटा टांगलेला होता ..आमच्यासारखेच दोन तीन जण तेथे बाहेर उभे होते ..भोलाच्या ओळखीचे असावेत .. भोलाला पाहून त्यातील एकाने त्यांच्या गप्पा सुरु झाल्या .. मी नुसताच उभा राहून एकात होतो त्या गप्पातून कोणातरी मेल्याचे ..कोणालातरी पोलिसांनी पकडल्याचे ...कोणातरी नकली ब्राऊन शुगर विकात असल्याचे .. उल्लेख होत होते ..सर्वसामान्य माणसे एकमेकाला भेटल्यावर ..हवापाणी .नोकरी .. आजारपण .. महागाई वगैरे गोष्टींवर चर्चा करतात..इथे यांचे जिव्हाळ्याचे विषय अगदी भिन्न होते .. मधल्या मोठ्या वजनकाट्याजवळ एक लुंगी आणि बनियान वर असलेला वयस्क माणूस उभा होता .. त्याचेच नाव सलीम भाई ..एका कळकट बाईने आणलेले भंगारचे सा मान तो काट्यावर बारकाईने मोजून घेत होता ... ती बाई ..दिनवाण्या मुद्रेने किती वजन भरतेय .. यात आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांचे भागेल इतके पैसे मिळतील का या चिंतेत असावी ...सलीमभाईने तिरक्या नजरेने आमची दखल घेतली होती ..त्या बाईचा हिशोब झाल्यावर तिच्या हातावर पैसे ठेवून सलीमभाईने मग आम्हाला सगळ्यांना आतल्या बाजूस बोलाविले ...तिथे अजून एक काटा ठेवलेला होता ... हा भाग दर्शनी भागापासून जरा वेगळा होता ..इथे लोखंडी सळ्या..लोखंडी पट्ट्या ..असे सगळे लोखंडी समान ठेवलेले होते ..आम्हाला त्याने आत बोलाविण्याचे कारण मला नंतर समजले ..गर्दुल्ले बहुधा रेल्वेचे लोखंड आणतात आणि ते उघडपणे बाहेरच्या काट्यावर मोजायचे नाही म्हणून आम्हाला आत बोलावले गेले होते ..आम्ही आपापल्या पाठीवरची पोती काळजी पूर्वक रिकामी केली .. माझ्याकडील लोखंडी रॉड सलीमभाई ने वजन न करताच पटकन उचलून तोंडाने सहा किलो म्हणत बाजूच्या ढिगात फेकला ..मी वजन करा असे म्हणालो तर ..माझ्या अंगावर ओरडला .. ' ४० साल से रेल्वे का लोखंड ले रहा हू ..कोनसा पार्ट कितने वजन का है ..सब जानता हू म्हणत बाकीच्या मुलांकडचे लोखंड पाहू लागला .. सगळ्यांच्या हिशोब करून झाल्यावर आम्ही बाहेर आलो सलीम भाईने माझ्या हातावर चाळीस रुपये ठेवले ..लोखंडी रॉड आणि इतर मिळून ... 

पैसे खिश्यात पडताच अंगात पुन्हा उत्साह संचारला ..आम्ही घाईघाई ने रेल्वे स्टेशनकडे निघालो ..तेथून चुनाभट्टी ..माल घेवून पुन्हा परत आलो ..रात्रीचे दहा वाजून गेले होते ...कासमच्या जवळ कोंडाळे करून बसलो होतो चारपाच जण ...पुन्हा त्याच गप्पा ..अच्छा माल कोनसा है ...कौन मरा ..किसको पकडा वगैरे ..या गर्दुल्ल्यांचे नेटवर्क खूप तगडे होते ..तासाभरात एखादी बातमी सगळीकडे प्रसारित होत होती ...रात्री उशिरापर्यंत माल पीत बसलो ..आज मी झोपायला अंगाखाली घेण्यासाठी सलीमभाई च्या दुकानातून एक पाच बाय दोन चा जाड पुठ्ठा मिळवला होता ..तो अंगाखाली पसरल्यावर बरे वाटले .. लोक नवीन संसार थाटताना जशी नवीन वस्तू खरेदी केल्यावर आनंदात असतात तसेच काहीसे वाटले त्या पुठ्यावर झोपल्यावर.. स्टेशनवरील गर्दी थंडावली होती ..सगळे आपापल्या निवाऱ्याच्या जागी ..सुख शोधत ..सुख मानत . सुख मिळविण्याच्या नवीन योजना आखत विसावले असावेत ...मी टक्क जागाच होतो ..काहीबाही आठवत होते ..असे किती दिवस चालणार ? ..या प्रश्नाचे उत्तर शोधत होतो ..अनघाची आठवण अपरिहार्यच...केव्हातरी पहाटे डोळा लागला असावा ..एकदम सकाळी सातलाच जाग आली ...पाहतो तर मी एकटाच तेथे झोपलेला होतो ..बाकी सगळे उठून गेलेले ...

तीन दिवस असे कचरा वेचण्याचे काम सुरु राहिले ..दिवसभर उन्हात फिरून भंगार गोळा करायचे ..सायंकाळी विकून आधी ब्राऊन शुगर आणि पैसे उरले तर चहा पाव ..वडापाव असे काहीतरी पोटात ढकलायचे... शेवटी चौथ्या दिवशी मला खूप ताप भरला .. अंग एकदम तापलेल्या भट्टीसारखे गरम झालेले ..डोळ्यातून देखील जांभई आली कि गरम पाणी येई ..उठण्याचे देखल त्राण नव्हते अंगात .. कालची एक पुडी उरली होती ती मारून ..पुन्हा तसाच बेवारशी पडून राहिलो ..वाटले आपण असेच मारून तर जाणार नाही ना ? बेवारशी .... बरे होईल तसे झाले तर ...आपल्या खिश्यात कोणतेही ओळखपत्र नाही ...पोस्टमार्टेमला बॉडी नेतील आणि मग तेथून काहीही होऊ शकते ..आपल्या पुरतील .की जाळतील ?अर्थात एकदा प्राण गेला की काहीही केले तरी काहीच फरक पडणार नाही ..जिवंत असेपर्यंतच सगळ्या काळज्या..चिंता .. जात ..धर्म ..प्रेताला एकाच न्याय लवकर विल्हेवाट लावायचा ..! ताप चढतच होता ..बहुधा दुपारी चारला कासम आला ...मला तसे तापात पडलेला पाहून त्याचा जीव कळवळला ...त्याने माझ्यासाठी चहा मागवला ...स्वतःजवळचा माल पाजला ...म्हणाला तू ये धूप मी भटकनेसे बुखार आया है ..दुसरा कोई काम कर ...मी त्याच्याकडे पाहून क्षीण हसलो ... तू येडा है... म्हणत... त्याने माझ्या डोक्यावरून हात फिरवला ..! 

=======================================================================
भाग १२२ वा  जाये तो जाये कहां ... 


संध्याकाळी ताप होताच अंगात .. मनात भलते सलते विचार येत होते .. कासम सकाळीच त्याच्या भीक मागण्याच्या धंद्यावर जाऊन आलेला होता ..त्याची सोबत होती ..त्याने मला टर्की थांबण्या इतपत ब्राऊन शुगर पाजली ..पण मनाचें काय ? ..मन काही केल्या विचार करणे थांबवत नव्हते ..तिन्हीसांजा होत होत्या तसे तसे अधिकच उदास वाटत होते ..जसे बाहेरून अंधारून येत होते तसेच आतूनही ...मला आठवले लहानपणी आई या वेळेस देवासमोर दिवा लावून ..आमच्या मुलांकडून ' शुभं करोति ' म्हणून घेत असे .. सर्वसामान्य माणसांना देखील तिन्हीसांजेच्या वेळी असे उदास वाटत असावे का ? नेमक्या याच वेळी काय काय गमावले ..काय मिळायचे राहिले ..याबद्दल मनात खंत भरून येत असावी ..म्हणून कदाचित आशादायक विचार मनात यावेत ..श्रद्धा कायम राहावी .. यासाठी ' शुभं करोति " .असावे का ? आसपास येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आवाज ..धावपळ ..डोक्यातले कर्कश्श विचार नकोसे झाले होते ..सगळा नुसता कलकलाट झालेला ...वाटले सरळ घरी निघून जावे परत ..भावाची माफी मागून ..पुन्हा उपचार घ्यावेत ..अहंकार मात्र तसे करू देत नव्हता ...वाटे पुन्हा त्यांची बोलणी खावी लागतील ...तारुण्यात पदार्पण करताना कितीतरी स्वप्ने पहिली होती स्वतःबद्दल ..सगळी मातीमोल झालेली ..आणि आता पुन्हा उठून राहण्याची उभारी देखील संपलेली ..प्रचंड अपराधीपणा ..निराशा ..वैफल्य याच गोष्टींचा धनी झालो होतो ...हे असे ब्राऊन शुगर पिवून खितपत पडून रहाणे पदरात आले ...कासम सारखा तू उद्यापासून कचरा वेचण्याचे काम सोड असे सांगत राहिला ..तितक्यात एक काळा गॉगल लावलेला पायजमा शर्ट घातलेला हातात काठी घेतलेला आंधळा माणूस समोर उभा राहिला ..कासामच्या ओळखीचा होता ..' क्या रे ...आज कौनसे लाईन पर गया था ? ' ..त्याला कासम ने विचारले ..तो माणूस चक्क गॉगल काढून काठी ठेवून कासमच्या बाजूला बसला..म्हणजे तो आंधळा नव्हता ..मात्र त्याचे सोंग बेमालूम होते ..समोरून तो चालत आला तेव्हा मी देखील आंधळाच समजलो होतो त्याला ..हा माणूस आंधळ्याचे सोंग घेवून लोकल्स मध्ये तसेच बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांमध्ये कल्याण पर्यंत भीक मागतो असे त्यांच्या बोलण्यातून समजले ..कधी हार्बर लाईन .कधी सेंट्रल ..वेस्टर्न असे याचे कार्यक्षेत्र होते ..

त्याने बसल्यावर पायजम्याच्या खिश्यातून एक ' संत्रा ' ची क्वार्टर काढली ..कासमने त्याच्या गाठोड्यातून एक प्लास्टिकचा ग्लास काढून त्याला दिला अर्धी त्या ग्लासात टाकून त्याने ग्लास तोंडाला लावला ..मग उरलेली दारू कासम ने गट्टम केली ...त्याच्या आजकाल लोकांची कशी दानत राहिलेली नाही ..भिकाऱ्याला कसे हाड हाड करतात .. वगैरे गप्पा सुरु झाल्या .. पुन्हा दुसऱ्या खिश्यातून दुसरी बाटली काढली ..इसको दे थोडी ..इसकी तबियत खराब है ..असे कासमने त्याला म्हंटले..त्याने शेवटी मलाही थोडी पाजली ..बराच वेळ ते काहीबाही बडबडत बसले होते ..हळू हळू आवाज चढले ..सगळ्या जगाला शिव्या देवून झाल्या ..जग कसे हरामी आहे ..लोक कसे स्वार्थी असतात ..माणुसकी कशी संपत चाललीय ..आपण तेवढे चांगले आणि बाकी सगळे जग वाईट असाच निष्कर्ष होता बोलण्याचा ..मला आम्ही दुर्गाबागेत बसून गांजा आणि दारू पिण्याच्या काळात असेच बडबडत असू ते आठवले ..बहुधा प्रत्येक व्यसनीला आपण स्वतः अगदी साधेभोळे ..सालस ..प्रामाणिक आहोत आणि जग निष्ठुर ..स्वार्थी ..आपल्या भावनांची किंमत नसणारे आहे असेच वाटत असावे ...सगळ्यांना शिव्याशाप देवून झाल्यावर तो माणूस ..जाता हुं .म्हणत निघून गेला ..स्टेशनच्या पलीकडेच झोपडपट्टीत राहत असावा ..कासमदेखील आता चांगलाच सुस्त पडला होता ..ब्राऊन शुगर चे दोनचार दम मारून तो पण आडवा झाला ..मला विचार झोपू देत नव्हते ...मुंबई सोडून कुठेतरी दुसरीकडे जावे का ? असा विचार मनात आला ..पण जायचे कुठे ? घरी तर नाहीच नाही ..मग ? 

आमच्या बाजूलाच पलीकडे एक कुष्ठरोगी झोपला होता ..तो सारखा खोकत होता त्याच्याकडे लक्ष गेले आणि मनात विचार चमकला ..आपण वरोरा येथे बाबा आमटे यांच्या आनंदवनात जावे का ? पूर्वी बाबा आमटेंची पुस्तके वाचली होती ..त्यांचा ' ज्वाला आणि फुले ' हा काव्य संग्रह खूप आवडला होता .. आनंदवन येथे जाऊन किमान आपले आयुष्य सत्कारणी तरी लागेल ...असे नशा करत जगण्यापेक्षा ... सेवेत आपले जीवन व्यतीत करणे केव्हाही चांगले ..तेथे दर उन्हाळ्यात श्रमदान शिबिरे होतात तरुणांसाठी असे माहित होते ..बाबा आमटे सारख्या ऋषीतुल्य व्यक्तीच्या सहवासात आपले व्यसनही बंद होईल याची मनाला खात्री वाटत होती ..पूर्वी आम्ही अश्या शिबिरांना जायचे देखील ठरवले होते ..मात्र गेलो नव्हतो ..पण तेथे गेल्यावर काय सांगायचे हा प्रश्न होताच ..बाबा आमटे यांना सगळे खरे खरे सांगितले असते तर त्यांनी नक्कीच मला तेथे ठेवून घेतले असते ...वरोऱ्याला जाण्याचा विचार मनात जोर धरू लागला ..आता शेवटची खूप ब्राऊन शुगर प्यायची आणि मग निघून जायचे मुंबई सोडून असे ठरवत होतो ...पण शेवटची भरपूर प्यायची तर पैसे कोठून येणार ...भरपूर म्हणजे किती ते ..पैसे किती मिळतात यावर अवलंबून होते ..आता येथे कचरा वेचणे नको ..कोण्यातरी नातलगाकडे जावून पैसे मागावेत असे वाटले ..पण ..आईने कोणत्याही नातलगाकडे जावू नकोस असे बजावले होते ...पाहू काहीतरी करू उद्या अश्या विचारात केव्हातरी डोळा लागला.भाग १२३ वा 
चोर बाजार !
सकाळी जरा उशिराच जाग आली ..पाहतो तर सगळे गर्दुल्ले आपापल्या नशा पाण्याच्या उद्योगासाठी निघून गेलेले ..माझ्या जवळ खिश्यात फुटकी कवडी नव्हती ..कासम देखील दिसला नाही ...खिश्यात एक बिडी होती ती ओढली ..आता दिवसभर काय ? ..टर्की सुरु झालेली ...उगाच कोणी ओळखीचा गर्दुल्ला दिसतोय का या साठी सगळे फलाट पालथे घातले ..एका ठिकाणी अनोळखी गर्दुल्ले बसले होते कोंडाळे करून ..तेथे जावून भिकाऱ्या सारखा उभा राहिलो ...चेह्स्यावर दीनवाणे भाव घेवून ...वाटले कोणीतरी एखादा दम पाजेल आपल्याला ...एखाद्या लग्न समारंभात जेवणावळी सुरु असताना ..भिकारी जसा बाहेर आशेने उभा राहतो तसेच वाटले मला स्वतःबद्दल ..त्यांनी माझी अजिबात दाखल घेतली नाही ...तसा मी त्यांच्याजवळ खाली बसलो .. एखादा दम द्या ..खूप त्रास होतोय असे सांगितले ..शादी मी आया क्या हमारे ? असे उत्तर मिळाले ..तरीही निराश न होता तसाच लाचारपणे बसून राहिलो ...शेवटी एकाने त्याच्या पन्नीवरचा अगदी शेवटचा दम मला मारायला दिला ..शेवटचा दम जरा जास्त कडवट असतो . दम लावला तशी खूप खोकला आला ..डोळ्यातून पाणी येईपर्यंत खोकत राहिलो .. सगळे मग उठून आपल्या कामाला गेले ..वाटले गोणी उचलून पुन्हा कचरा वेचणे सुरु करावे ..पण काल रात्री ' आनंदवन ' येथे जाण्याचा विचार केला होता तेच मनात पक्के बसले होते ..माझ्या सोबत घेतलेल्या शबनम पिशवी मध्ये ...भावाच्या लग्नाच्या वेळी घेतलेला ..एक नवा बँगी शर्ट होता ...इथे आल्यापासून गेल्या पाच दिवसात मी अंघोळ देखील केली नव्हती .. कपडेही बदलले नव्हते ..तो शर्ट तसाच होता छान इस्त्रीची घडी केलेला ..स्टेशन वरच्या बुटपॉलिश करणाऱ्या ..झाडू मारणाऱ्या वगैरे लोकांना तो शर्ट विकत घेता का असे विचारले ..चोरीचा असावा असा संशय येवून कोणीही शर्ट विकत घेईना ..एक जण म्हणाला उधर चोर बाजार में जाओ ..वहांपर लेंगे तेरा शर्ट ..तसाच चालत ..रखडत चोरबाजारात पोचलो ..सकाळचे १० वाजत आलेले होते ..येथे मात्र प्रचंड गर्दी होती ..वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल थाटलेले होते ..अगदी कोपऱ्यात कपड्यांचे ढीगच्या ढीग ठेवलेले दिसले ..सगळीकडे आरडा ओरडा ...विक्रेत्यांचे आवाज ..मधूनच वाट काढत जाणारी दुचाकी वाहने ...आजूबाजूला जुन्या इमारती ..मुस्लीम प्राबल्य असलेली वस्ती दिसत होती सगळी .. ..इमारतींच्या अवस्थेवरून दारिद्र्याची झलक दिसत होती ..


एका कपड्यांच्या ढीगापाशी थांबलो ..त्या विक्रेत्याला पिशवीतून शर्ट काढून विकायचा आहे असे म्हणालो ..त्याने शर्ट सोडून आधी मलाच निरखून पहिले .मग दस रुपये दुंगा असे म्हणाला ...हा शर्ट मी त्यावेळी २०० रु .ना घेतला होता .. अगदी जेमतेम तीनचार वेळा वापरला होता ..किमान पन्नास रुपये तरी मिळतील अशी आशा हती ..थोडी घासाघीस करू लागलो ..तसे त्याने मला काही न बोलता पुढे जा अशी खूण केली ..तीनचार ठिकाणी असाच अनुभव आला ..शेवटी एक जण पंधरा रुपये देण्यास तयार झाला ..लगेच त्याला शर्ट देवून खिश्यात १५ रुपये टाकले ...मस्जिद बंदर येथे ब्राऊन शुगरची एक पुडी १२ रुपयांना घेतली ..फक्त १५ रुपये घेवून चुनाभट्टी ला जाणे जीवावर आले होते .. ..आधी आडोसा पाहून दम मारले ..आता जरा जीवात जीव आला होता ...डोके काम करू लागले ...वरोरा येथे ..जाण्यापूर्वी एकदा भरपूर ब्राऊन शुगर प्यायची होती ..पैसे नव्हते ...आठवले ..ठाण्याला मेंटल हॉस्पिटल मध्ये असताना भोईर नावाचा एक तेथेच ठाण्यात मुलुंड नाक्याजवळ राहणारा एक जण दारूच्या व्यसनासाठी दाखल झाला होता ..त्याची माझी चांगली मैत्री झाली होती त्यावेळी ..त्याचे घर तेथेच मुलुंड नाक्याजवळ होते असे त्याने सांगितले होते ..तसेच ..त्याचे नाव तेथे कोणालाही विचारले तरी घर सापडेल असेही तो म्हणाला होता ..त्याच्या भावाच्या तीनचार ट्रक्स होत्या ..तसेच जकात वसुलीचा ठेका देखील होता बहुतेक ...ठरले ..भोईर कडे जावे ..त्याला सांगायचे की घरातून भांडून आलोय ..मला पैसे हवेत ..तो नक्की देईल अशी खात्री होती ..

ठाण्याला जावून मग मुलुंड नाक्याजवळ गेलो ..संध्याकाळ होत आली होती ..एका ठिकाणी त्याचे नाव विचारताच लगेच घर कोठे आहे ते समजले ..घरी पोचलो ..हा घरीच होता ..आधी मला ओळखलेच नाही त्याने ..मी डोक्यावरचे केस साफ करून वर टोपी घातली होती ..तसेच पायात जुनाट स्लीपर ..मळके कपडे ..वजन कमी झालेले ..माझ्या आवाजावरून तो ओळखण्याचा प्रयत्न करू लागला ..टोपी काढल्यावर मग त्याला ओळख पटली ..मला घट्ट मिठीच मारली त्याने ..खरोखर आनंद झाला होता त्याला ..याला मी मेंटल मध्ये असताना खूप मदत केली होती ..म्हणजे त्याला अनेक दिवस तेथे झोप येत नव्हती .त्यावेळी सिस्टरच्या कपाटातून मी त्याला झोपेच्या गोळ्या चोरून पुरवीत असे ...त्याची तब्येत चांगलीच सुधारली होती ...दारू पूर्ण बंद आहे हे समजतच होते ..त्याने मग घरी थांबायचा आग्रह केला ..मात्र जवळ माल नसल्याने ते शक्य नव्हते ..त्याला पाचशे रुपये मागितले ..तेव्हढे नव्हते त्याच्या जवळ तीनशे रुपये दिले त्याने ..मला सांगितले..तू इकडे तिकडे कुठे न जाता घरीच जा सरळ ..त्याला होकार देवून ..आधी चुना भट्टी गाठले ..रात्री १२ ला पुन्हा ५० पुड्या घेवून पुन्हा व्ही .टी . ला हजर झालो ...पिणे सुरु केले ..रात्रभरात १५ पुड्या संपविल्या ..कासमला नवलच वाटत होते ..याने कोणतातरी मोठा हात मारला अशी त्याला शंका वाटत होती ..खूप कळकळीने सांगितल्यावर .कासमचा मला मित्राने पैसे दिलेत यावर विश्वास बसला ..त्या रात्री कासम जवळ खूप बडबड केली ..माझा बहुतेक इतिहास सांगितला ..अनघा बद्दल ऐकून त्याच्याही डोळ्यात पाणी तरळले .." साले ..तकदीर वाला है तू .ऐसी लडकी इस जमाने में मिलना मुश्कील है ...तू पहेले उसके पास जा ' असा सल्लाही त्याने त्याने मला ..मला ही क्षणभर असे वाटले ..पण मग अनघाला काय तोंड दाखवायचे ? ..त्यापेक्षा आधी आनंदवन येथे जावून ..तेथे चांगले राहिल्यावर सहा महिन्यांनी अनघाची भेट घ्यायची असे मी ठरवले होते ..!
=======================================================================

भाग १२४ वा ! मुम्बईला रामराम ! 


आनंदवन येथे जायचे ठरल्यावर मुंबईत मन रमेना ...सोबत ३० पुड्या होत्या ..आनंदवन येथे जाई पर्यंत सगळ्या पुड्या संपवून टाकायच्या आणि मग तेथे जाऊन टर्की सहन करायचे असे ठरवले ...दुसऱ्या दिवशीच सकाळी कासमचा निरोप घेवून दादर नागपूर एक्प्रेस मध्ये बसलो ...आधी वर्धा आणि मग तेथून वरोरा येथे जाण्यासाठी गाड्या मिळतात अशी माहिती मिळवली होती ..गाडीत माझा जास्तीत जास्त मुक्काम संडासातच होता ..कारण एकतर तिकीट काढलेले नव्हते ..शिवाय रेल्वेत ब्राऊन शुगर प्यायला संडासाइतकी सुरक्षित जागा दुसरी नव्हती ...जवळचे रोख पैसे संपत आले होते मात्र सध्या माझी एकमात्र संपत्ती ब्राऊन शुगर जवळ होती त्या मुळे वाटेत जेवण ..नाश्ता वगैरे गरज नव्हतीच ...व्यसनी माणसाला त्याचे व्यसन मिळाले की मग सर्वसामान्यांसारख्या इतर गरजा महत्वाच्या वाटत नाहीत ...अधूनमधून संडास बदलत होतो कारण एकाच संडासात जास्त वेळ बसल्यावर मग घाईला आलेले लोक सारखा दरवाजा वाजवीत असत ..माझे हे असे सारखे संडासात जाणे एकाच्या लक्ष्यात आलेच ..त्याने मला काळजीने विचारले ..तब्येत खराब है क्या ? ..नुसतीच होकारार्थी मान हलविली ...भुसावळ येईपर्यंत १० पुड्या संपल्या होत्या ...अजून बराच माल शिल्लक होता ....सगळा माल संपेपर्यंत वरोऱ्याला जायचे नव्हतेच ... वाटेत शेगाव ला उतरलो ..तेथे फुकट धर्मशाळा आहेत हे ऐकून माहिती होते ..दोन दिवस माल संपेपर्यंत शेगावला थांबायचे ठरवले ...मंदिराच्या समोरच एका भक्तनिवासात मुक्काम ठोकला !



त्या वेळी शेगाव च्या मंदिराचा तसेच परिसराचा आजच्या इतका विकास झालेला नव्हता ..भक्तनिवासाच्या त्या इमारतीत तळमजल्यावर मोठा हॉल होता तेथे विनामुल्य राहता येत असे ..फक्त जर गादी..उशी वगैरे वस्तू हव्या असतील तर त्याचे पैसे द्यावे लागत ..मला गादीची गरज नव्हतीच जमिनीवर वर्तमान पत्र पसरून आडवा झालो ...पहाटे गर्दी वाढली ...तसा उठून अंगावर टॉवेल पांघरून ' चेसिंग ' सुरु केले ...आसपास माझ्या सारखेच दोन तीन बेवारशी दारुडे झोपलेले होते ..गर्दी मुळे ते देखील उठून बसले ..माझे असे टॉवेल डोक्यावर घेवून ब्राऊन शुगर पिणे यांच्यासाठी नवलाई होती ..हा काय नवीन प्रकार आहे हे ते कुतूहलाने पाहू लागले . ब्राऊन शुगर बद्दल त्यांनी ऐकलेले असावे ..पण असे प्रत्यक्ष पिणारा माणूस पहिला नसावा ..एकाचे दोन ..तीन ..चार ..से करता करता तेथे आठदहा जण गोळा होऊन माझी पन्नीची कसरत पाहू लागले ..सुरवातीला मी दुर्लक्ष केले पण जास्ती गर्दी जमल्यावर मात्र तेथून चंबूगबाळे आवरून थोडा गावात फिरलो ...दुपारी मंदिरातच मिळणारा प्रसाद खाल्ला ..पिठले भाकरीचा ..आश्चर्य असे की रोज शेकडो भक्तांना हा प्रसाद फुकट वाटला जात असे ..विशिष्ट वेळेला प्रसादाची लाईन सुरु होई ..त्यात भक्तगण आणि अनेक भिकारी ..त्यांची चिल्ली ..पिल्ली ..माझ्यासारखे बेघर ..सगळ्यांना प्रसाद दिला जाई ..एकदा शिर्डी ला गेलो असताना तेथील प्रसादाचे पैसे आकारले जातात हे पहिले होते ...येथे मात्र अजून शिर्डीला असलेल्या धार्मिक व्यावसाईकतेने प्रवेश केलेला नव्हता असे दिसले ..तसेच भक्तगणांमधील फरक देखील जाणवला ..येथील वातावरण शिर्डी पेक्षा साधेसुधे होते ...फारसा झगमगाट ...रोषणाई ..भपका जाणवला नाही .प्रसाद खाल्ल्यावर ..असाच मंदिराच्या आवरत इकडे तिकडे फिरत असताना एका बैठ्या इमारतीत खालीच व्हरांड्यात ..अनेक सेवक ..मंदिरात दान पेटीत जमा झालेली चिल्लर मोजताना दिसले ..तेथे थांबून पाहू लागलो ..नोटा ..एक रुपयांची ..पन्नास पैश्यांची ..चार आण्यांची वगैरे नाणी वेगळी काढली जात होती ..अगदी ढिगारेच होते ...तिरुपती ..पुण्याचा दगडूशेठ हलवाई गणपती ..शिर्डी ..कितीतरी देवस्थाने असतील भारतात वेगवेगळ्या धर्मांची .....भक्तीभावाने लोक तेथे पैसे टाकतात ..असा पैसा करोडोंनी गोळा होत असेल ...जर तो सगळा पैसा नियंत्रण ठेवून समाजकार्यासाठी वापरला गेला तर किती बरे होईल असा विचार मनात आला ..प्रत्येक धर्मात बहुधा आपल्या मिळकतीतील थोडा भाग धर्म कार्यासाठी खर्च करावा किवा दान करावा असे सांगितले आहे त्या नुसार अनेक जण प्रामाणिक पणे असा पैसा धार्मिक ठिकाणी देतात ..खरेतर देवानीच सगळे काही दिलेले असते ..त्याला इतक्या पैश्यांची गरजच काय ? बहुधा धर्मकार्यासाठी पैसा द्यावा याचा अर्थ पैसा धार्मिक स्थळी देणे असा नसून ..पैसा गोरगरीब ..अनाथ ..अपंग..दुबळे ..यांच्या साठी तसेच सामाजिक समस्यांसाठी खर्च करावा असा असावा ..मात्र लोक धार्मिक ठिकाणांना पैसा देतात ...सरकार ने अश्या सर्व धर्मांच्या धार्मिक ठिकाणी नियंत्रण ठेवून तेथील उत्पन्नाचा काही भाग सक्तीने सामाजिक विकासासाठी वापरला जातोय या वर लक्ष ठेवले पाहिजे असा विचार मनात आला ..मग स्वतचेच हसू आले..सरकार ...म्हणजे कोण ... संधीसाधू ..लबाड लोक जे ...लोकांच्या धार्मिक ..जातीय किवा व्यक्तिगत भावनांचा फायदा घेवून निवडून येतात ...आपल्या देशांत अतिशय उच्च मूल्ये असलेली लोकशाही पद्धत राबविली जात आहे मात्र ..लोकशाहीचे यश ? ? ? या बाबत आनंदच होता सगळा .. सरकार लोकांवर कर लादून पैसा गोळा करते ..मात्र त्यातील किती टक्के पैसा जनकल्याण योजनांवर खर्च होतो ..हे गौडबंगाल अजब होते ..विचार करता करता स्वतचे देखील हसू आले मनात ...मी इतका मोठा शहाणपणाचाविचार करत होतो आणि व्यक्तिगत जीवनात मात्र व्यसने करत होतो ..जाऊ दे इथे आपल्याला स्वतचे जीवन नीट जगता येत नाही ..कुठे देशाचा विचार करायचा !

=======================================================================

भाग १२५ वा  आनंदवन ' !

रात्री पुन्हा शेगाव लाच मुक्काम केला कारण अजून १० पुड्या शिल्लक होत्या ..रात्रभरात त्यापैकी आठ पुड्यांची वाट लावली ..पुड्या संपत होत्या तशी तशी भीती देखील वाढत होती टर्की ची ..आपल्याला जर आनंदवन येथे टर्की सहन करायची असे ठरवले होते तर मग उगाच जास्त माल घेतला ..असे वाटू लागले ..कारण जितका जास्त माल प्यायला जाईल तितकी नंतर टर्की पण जास्त होणारच ...अर्थात पश्चातबुद्धी हे व्यसानीचे सर्वात मोठे लक्षण असते ..म्हणूनच मग पश्चाताप करण्याची वेळ येते ...सुमारे दीड दिवस होतो शेगाव ला ..मात्र त्या काळात मंदिरात जाण्याची इच्छा झाली नाही ..कदाचित खूप नशा केली असल्यामुळे अपराधीपणाची भावना असावी मनात ...दुसऱ्या दिवशी सकाळी शेगाव रेल्वे स्टेशनवर पोचलो ..जवळ दोन पुड्या शिल्लक होत्या ..तेथून समजले की सेवाग्राम येथून वरोरा येथे जाण्यासाठी रेल्वे मिळू शकते ..मिळेल त्या गाडीने सेवाग्रामला आलो ..वाटेत दोन्ही पुड्या साफ केल्या ..टर्की ला समोरे जाण्याची मानसिक तयारी झालेली होती ..आता खिश्यात फक्त पाच रुपये शिल्लक होते ..तसेच मुंबईहून निघताना सहज एका आंधळ्या लॉटरीवाल्याकडून एक महिन्यांनी सोडत असलेले १० लाखाचे लॉटरी चे तिकीट .माचीस . चार पाच बिड्या ...अंगावरचे कपडे पिशवीत एक मळके बनियान ..टॉवेल..इतकीच मालमत्ता शिल्लक होती ..सेवाग्राम हून वरोऱ्या कडे जाणाऱ्या गाडीत बसलो ...आता बाबा आमटे यांना भेटण्याचे वेध लागलेले होते ...वरोऱ्याला गाडी पोचली तेव्हा सायंकाळचे चार वाजून गेले होते ..मुंबई ला इतकी थंडी जाणवली नव्हती मात्र इथे बऱ्यापैकी थंड होते ..स्टेशनवर उतरून ' आनंदवन' कुठे आहे असा पत्ता विचारल्या बरोबर एकदम चारपाच जणांनी सरळ जा असे सांगितले ...सरळ चालत असताना ..आनंदवन ग्राम पंचायतीची पाटी लागली ...मग आनंद्वनची शाळा ..महाविद्यालय ..प्रचंड मोठा परिसर होता ...चालताना आजूबाजूला बैठी घरे ..काहीतरी अपंगत्व असलेली ..माणसे... स्त्रिया ...आत्मविश्वासाने इकडे तिकडे फिरत होत्या ..अशी अपंग किवा कुष्ठरोगी माणसे बहुधा इतक्या संख्येने धार्मिक स्थानी भीक मागताना दिसतात ..मात्र येथे त्याच भीक मागणाऱ्या हातानी ..सृजनाचे मोठे कार्य केले असल्याने त्यांचा आत्मविश्वास सार्थ होता ..

संस्थेचे कार्यालय कोठे आहे असे विचारताच सरळ एका बैठ्या कौलारू घराकडे एकाने बोट दाखविले ...त्या कार्यालयाच्या समोर एक उंच खांब रोवलेला होता ..ध्वजारोहण करण्याचा असावा ...त्याच्या बाजूने सिमेंटचे बांधकाम ...आनंदवनाची कामाची वेळ बहुधा संपली असावी ..कार्यालयात कोणीच नव्हते ..बाहेरच्या एकाला विचारले तर थोडावेळ थांबावे लागेल असे त्याने सांगितले ..मग उगाच आसपास अर्धा तास वेळ घालवला ..बिडी पिण्याची तल्लफ आली होती ..पण आसपास कोणीच धुम्रपान करताना दिसत नव्हते ..इतकेच काय एक छोटे दुकान लागले त्या परिसरात तेथे बिडी बंडल घेवून ठेवू म्हणून गेलो ..तर त्या दुकानदाराने बिडी ..तंबाखू इथे विकत नाहीत असे सांगितले वर अशीही माहिती दिली की ..आनंदवनात आपल्याला कुठेच बिडी ..तंबाखूमिळणार नाही ..तंबाखू मुक्त परिसर आहे हा ..मला आश्चर्यच वाटले ..केवळ एका व्यक्तीची सूचना इतकी प्रभावीपणे पाळली जाते ...खरेतर नियम तोडण्याकडे भारतीय जनतेचा अधिक काल असतो ..' येथे लघवी करू नये 'अशी पाटी वाचत ...त्या पाटीवरच धार मारणारे महाभाग मी पहिले आहेत ..'थुंकू नये त्या ठिकाणीच जास्त थुंकतात..कचरा ..धुम्रपान निषिद्ध ..वगैरे सगळ्या नियमांची आम्ही हातीपायी धड असणाऱ्या माणसांनी वाट लावली आहे ..येथे निसर्गाची अवकृपा ..आजार ..या कारणांनी अपंगत्व आलेली मंडळी मात्र काटेकोर पणे नियम पाळत होती ..किती मोठी जादू असेल त्या व्यक्तीमत्वात ..बाबा भेटले की आधी त्यांचे पाय धरायचे मनात ठरवले होते ..येथे राहून नक्कीच आपली आत्मशक्ती जागृत होईल असा विश्वास वाढत होता ..

थोड्या वेळाने पुन्हा कार्यालयात गेलो ..तेथे एका टेबलसमोर एक कुलकर्णी किवा देशपांडे अश्या आडनावाचे एक पन्नाशीचे गृहस्थ बसलेले होते ..त्यांच्या जराश्या बसक्या नाकावरून ते देखील उपचार घेवून येथेच स्थायिक झाले असतील असे वाटले ..त्यांना मला बाबा आमटे यांना भेटायचे आहे असे सांगितले ..त्यांनी माझे नाव.. गाव ..वगैरे माहिती विचारली तेव्हा नाशिकचा आहे हे सांगितले ..बाबांशी काय काम आहे असे विचारल्यावर मात्र ..मला नेमके काय सांगावे ते समजले नाही ..सहज त्यांची भेट घ्यायची खूप इच्छा आहे असे म्हणालो ..त्यावर त्यांनी ..बाबा सध्या खूप आजारी आहेत त्यामुळे कोणालाच भेटत नाहीत असे सांगितले ..ते अंथरुणाला खिळून आहेत ..अशी माहिती समजल्यावर थोडा निराश झाले ..त्यावर त्यांनी आपण विकासदादांना भेटू शकाल अशी माहिती दिली ..बाबा आमटे यांच्या दोन मुलांबद्दल ऐकून होतो त्यापैकी प्रकाश आमटे हे भामरागड येथे आदिवासी क्षेत्रात काम करतात तर ..विकास आमटे हे आनंदवनातच बाबांना मदत करतात ..दोघेही डॉक्टर आहेत ..वडिलांच्याच कार्याला त्यानीही वाहून घेतले आहे हे देखील माहित होते ..मात्र तो पर्यंत हे दोघेही जास्त प्रकाशझोतात आलेले नव्हते ...ही गोष्ट आहे ३ डिसेंबर १९८९ सालची ..आता विकासदादा आणि प्रकाश दादा या दोघांनीही आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे जनमानसात ..विकास दादा भेटू शकतील हे समजल्यावर जरा संकोच वाटला ...माझी सगळी कथा त्यांना सांगू शकेन का या बाबत मनात शंका होती ..बाबांच्या व्यक्तिमत्वाबद्दल खूप काही ऐकून होतो ..बाबांनी नक्कीच मला त्यांच्या कार्यात सामील करून घेतले असते हा विश्वास वाटत होता ..विकासदादा आपल्याला समजून घेतील का ? ..त्यांना व्यसनी व्यक्ती बदल तिरस्कार तर नसेल ? असे प्रश्न मनात होते !

( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें