प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.com



शनिवार, 16 मार्च 2013

व्यसनाचा गुंता


 भाग ३७ वा



रविवारी सकाळपासून घरी मी सुरु केलेला गोंधळ आता तरी थांबेल अशी घरच्या मंडळीना आशा होती , रात्री मित्राने मला ब्राऊन शुगर पाजून तात्पुरता माझा त्रास थांबवला होता व मी शांत पणाने घरी आलो होतो तेव्हा आता सगळे सुरळीत होईल अशी घरच्या लोकांची खात्री होती , मी देखील आता एखादी नोकरी शोधायची असे ठरवले होते मनाशी , सकाळी नेहमी प्रमाणे भाऊ कामावर गेल्यावर आता आई कडून एकदाच शेवटचे पैसे घ्यायचे आणि या पुढे मग ब्राऊन शुगर सोडून द्यायची असा देखील मनाशी विचार करत होतो मी , जे काही दिवसभर घडले होते ते माझ्यासाठी देखील अनपेक्षितच होते , घरचे लोक इतके ताणून धरतील असे मला वाटले नव्हते . जरी सकाळी आणि रात्री दोन्ही वेळा मला ब्राऊन शुगर प्यायला मिळाली होती तरी माझे समाधान काही झाले नव्हते कारण स्वतच्या पैश्यांनी शान मध्ये ब्राऊन शुगर विकात घेऊन एकट्याने संडासात बसून , रेडीओवर गाणी ऐकत पिण्यात , आपले दुखः कुरवाळण्यात जी मजा होती ती काही मला मिळाली नव्हती .( जेव्हा एकटे पिणे सुरु होते , तेव्हा एखादी व्यक्ती व्यसनाच्या आहारी पूर्णपणे गेल्याचे समजण्यास हरकत नाही ) . सकाळी मी लवकरच उठून स्नान वगैरे करून तयार झालो होतो व उगाच टाईमपास म्हणून एक अभ्यासाचे पुस्तक काढून बसलो होतो , घरची सगळी मंडळी उठून आपापल्या कामाला लागली होती , मी कानोसा घेऊन भाऊ कामावर जाण्याची वाट पाहत होतो , सकाळी साधारण पणे तो ९ च्या सुमारास घराबाहेर पडत असे , पण साडेनऊ होत आले तरी तो काही बाहेर जाण्याची चिन्हे दिसेनात , उलट त्याचे सगळे आरामात चालले होते , बहिणीच्या मुलांशी मी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती अजूनही कालच्या दहशतीतून बाहेर आलेली नव्हती , लांबूनच माझे निरीक्षण करणे सृरू होते त्यांचे .



१० वाजून गेले तरी भाऊ काही कामावर जाईना तेव्हा माझ्या ध्यानात आले की याने मुद्दाम माझ्यासाठी सुट्टी घेतली होती , तो मला चांगला ओळखून होता , तुषार आज देखील काहीतरी गडबड करणार हे त्याने हेरले असावे आणि म्हणूनच तो सुट्टी घेऊन घरी थांबला होता , काल इतके रामायण झाल्यावर आता जास्त तमाशा करण्याची माझी इच्छा नव्हती , पण भाऊ घरात केवळ मी नाटके करू नये , पैसे मागू नयेत ,किवा मला पैसे मिळू नयेत म्हणून घरी थांबला याचा मला मनातून राग येत होता , शेवटी मी नवीन अस्त्र बाहेर काढले भावाला म्हणालो ' काल जे काही झाले ते झाले , आता आजपासून मी सगळी व्यसने बंद करणार आहे , पण या पूर्वी मी काही लोकांकडून उधार पैसे घेतले आहेत ते , मला परत करायचे आहेत , मी जर त्यांना पैसे परत केले नाहीत तर ते मला मारतील , तेव्हा कसेही करून मला आज २०० रुपये दे , मी अर्ध्या तासात त्यांचे पैसे परत करून घरी येतो ' भावाला अंदाज होताच याचा तो म्हणाला ' चल मी येतो तुझ्यासोबत , कोणाचे पैसे द्यायचे आहेत ते आपण सोबत जाऊन देऊन टाकू " त्याला माहित होते मी खोटे बोलतोय आणि म्हणून मी पण सोबत येतो हे त्याचे म्हणणे होते , मात्र लगेच मग मी ' काल पासून तू उगाच माझ्या मागे लागला आहेस , आता मी एव्हढे कबुल करतोय की सगळी व्यसने सोडून देणार आहे , चांगला वागणार आहे , तरी तू विश्वास ठेवायला तयार नाहीस , हवी तर मी शपथ घेतो तू म्हणशील त्याची ' ( खोट्या शपथा घेणे , खोटी वचने देणे यात सारे व्यसनी अगदी हुशार असतात ) भाऊ म्हणाला ' या अशा शपथा पूर्वी अनेक वेळा घेतल्या आहेस तू , माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीय , तू मुकाट्याने घरात बस , ज्या लोकांचे पैसे द्यायचे असतील त्यांची नावे संग मला हवी तर , मी जाऊन पैसे देतो त्यांना , तुला जर काही त्रास होत असेल तर माझ्या सोबत दवाखान्यात चल , ती गळ्याची जखम बघ अजून ओली आहे ' काल ब्लेडने गळा कापून घेण्याचे नाटक जरी यशस्वी झाले नव्हते तरी गळ्यावर साधारण १ इंचाची चीर पडली होती त्यावर पातळ खपली धरली होती पण जखम जरा मोठीच होती एकदोन टाके लागले असते डॉक्टर कडे गेलो असतो तर ( अजूनही ती खुण माझ्या गळ्यावर आहे ) . पण मी ' तुझा माझ्यावर विश्वास नाही , मी सुधारू पाहतो आहे तर तू मला सुधारू देत नाहीस वगैरे आरोप सुरु ठेवले ,शेवटी तो वैतागून म्हणाला जाऊ दे तुझ्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही . मी आपला कामावर जातो . तुझे आयुष्य आणि तू काय करायचे ते करा असे म्हणत कामावर जाण्याची तयारी करू लागला . वा ! मला हेच हवे होते , सुमारे १२ वा . तो कामावर जातो म्हणून बाहेर पडला .



मी आई कडे मोर्चा वळवला पैसे मागण्यासाठी तर ती म्हणाली कालच तुझ्या भावाने माझ्या कडून आणि ताई कडून देखील सगळे पैसे काढून घेतले आहेत . हे भलतेच झाले होते मला वाटले आई खोटे बोलत असावी मी तिची पर्स तपासली , तिच्या पैसे ठेवण्याच्या गुप्त जागा म्हणजे साखरेचा डबा , व इतर दोनचार डबे होते ते ही तपासले पण एकही पैसा नव्हता , मग मी तू शेजारूच्या काकूंकडून उधार पैसे मागुन आण म्हणून तिच्या मागे लागलो पण ती काही कोणाकडे उधार पैसे मागायला जायला तयार होईना म्हणाली आम्ही गरिबीत दिवस काढले पण कधी कोणाकडे हात पसरला नाही आणि तुझ्यासाठी मी कोणाकडेही हात पसरणार नाही , तुला लाज वाटायला हवी असे उधार पैसे मागून आण म्हणायला , यात लाज कसली एकमेकांची मदत करायला हवी हा तर शेजार धर्म आहे वगैरे मी तिला सांगू लागलो . मी स्वैपाक घरात आईशी वाद घालत होतो . बहिण आणि भाचे नुसतेच आमच्याकडे बघत होते घराचे पुढचे दार उघडेच होते , तितक्यात एकदम घरात भाऊ आणि चार पोलीस शिरले आणि त्यांनी मला पकडले . आधी पायावर दोन काठ्या लगावल्या आणि बाहेर फरफटत नेले , हे पोलीस रेल्वे स्टेशन च्या बाहेर असलेल्या चौकीतील होते ते मला ओळखत होते तरीही त्यांनी मला दयामाया न दाखवता बाहेर आणून पायीच चौकीकडे नेणे सुरु केले , गल्लीतील लहान पोरे , बायका हा सगळा तमाशा पाहत होत्या , मी काही विशेष झाले नाही अश्या अविर्भावात उगाच निर्विकार चेहरा ठेवून चाललो होतो . चौकीत गेल्यावर त्यांनी मुख्य पोलीस स्टेशन ला फोन लावून मला ताब्यात घेतल्याचे कळवले . ( मनातल्या मनात मी आता भावाला सोडायचा नाही असे ठरवत होतो , काल पासून मी जो घरात तमाशा मांडला होता त्या बद्दल मला लाज वाटण्याऐवजी मी भावाचा सूड कसा घ्यायचा या बद्दल वीचार करत होतो , व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात असे म्हणतात की व्यसनी व्यक्ती हा घरच्या लोकांच्या दृष्टीने एका आतंकवाद्या पेक्षा देखील जास्त भयंकर असतो , कारण खरे आतंकवादी हे दुसऱ्या जातीच्या , धर्माच्या लोकांना त्रास देऊन त्याच्या मनात दहशत बसवतात पण घरातील मंडळीना सुखात ठेवतात , मात्र व्यसनी हा स्वतच्याच घरात आधी दहशत माजवतो, आणि बाहेरच्या लोकांशी गोड वागतो .)



========================================================================

 भाग ३८



त्या पोलीस चोकीत लगेच रेल्वे स्टेशन च्या बाहेरील स्टँडवरचे माझे आँटोचालक मित्र गोळा झाले आमचा मित्र विलास पाटील तेथेच हॉटेल ' मराठा ' मध्ये बसलेला होता त्यालाही समजले , तो देखील चौकीत आला . सगळे जण नेमके काय झाले हे विचारात होते व त्या पोलिसांना जाऊ द्या सोडून द्या म्हणत होते पण पोलिसांनी सांगितले याला मुख्य पोलीस स्टेशन ला साहेबांसमोर हजर करायचे आहे आम्हाला . पोलिसांनी मग तेथून रिक्षा करून मला नाशिक रोड पोलीस स्टेशन ला आणले आणि साहेबांसमोर उभे केले , साहेब नेमके कोठेतरी बाहेर निघाले होते म्हणून त्यांनी मला बसवून ठेवायला सांगितले . मला आता परत टर्की सुरु झाली होती , सकाळी भाऊ कामावर जाईल व नंतर पैसे मिळतील या आशेवर मी होतो तो पर्यंत फारसा त्रास जाणवला नव्हता पण आता आपल्याला अजिबात ब्राऊन शुगर मिळणे शक्य नाही हे लक्ष्यात आले तव्हा त्रास जास्त जाणवू लागला . मला सारख्या जांभया आणि शिंका येत होत्या . तेथील पोलीस मला कुतूहलाने ब्राऊन शुगर कशी असते वगैरे प्रश्न विचारात होते ( मुंबई , नाशिक , पुणे या पट्ट्यात ब्राऊन शुगर चे आगमन व विक्री साधारणतः १९८० साली सुरु झाली होती , ही घटना ८४ सालची , अनेक पोलिसांना ब्राऊन शुगर म्हणजे नेमके काय हे देखील माहित नसे , काहीना गांजासदृश काहीतरी असावे असे वाटत होते , नंतर मग NDPS अँक्ट आल्यावर पोलिसांना खास ब्राऊन शुगर बाबत केसेस कश्या करायच्या याचे प्रशिक्षण दिले गेले , व त्यांना माहित झाले की हा प्रकार काय आहे ते ) मला साहेबांच्या ऑफिस मधून दुसऱ्या खोलीत जेथे पोलिसांचे लिखापढीचे काम चालते त्या ठिकाणी नेण्यात आले आणि एका कोपर्यात भिंतीला टेकून खाली बसायला सांगितले गेले , माझी हालत टर्की ने खराब होत होती . अश्या वेळी स्मोकिंग केल्याने जरा दिलासा मिळतो पण माझ्या खिशात बिड्या देखील नव्हत्या , स्वतच्या नशिबाला दोष देत मी गुढघ्याभोवती हात बांधून विमनस्क बसलो होतो . तेथे माझे वडील आणि मोठा भाऊ ही मग येऊन पोचला , मी त्यांना आता असे करणार नाही मला सोडायला सांगा म्हणून आग्रह करू लागलो तर एका हवालदाराने मला दटावले व ' चूप बस ' असे ओरडला . पुन्हा मी गरीब चेहरा करून करुण डोळ्यांनी त्यांच्या कडे पाहत बसून राहिलो .

तेथे त्याच वेळी नाशिकरोड शिवसेना अध्यक्ष श्री . प्रभाकर कर्डिले . त्याच्या काही कामानिमित्त आले होते ( आमच्या सिन्नरफाटा ' शिवसेना ' शाखेचे उद्घाटन ते आणि साबीर शेख यांच्या हस्ते झाले होते व येथील शाखेचा सेक्रेटरी म्हणून ते मला ओळखत होते ., एकदोन वेळा काही कामानिमित त्यांच्या कडे गेलोही होतो मी ) मला तेथे असा बसलेला पाहून त्यांनी शिपायांना काय भानगड आहे ते विचारले तेव्हा त्यांना पोलिसांनी मी काल पासून केलेल्या तमाशाची माहिती दिली , ते माझ्या जवळ येऊन म्हणाले ' काय रे , तू शिवसैनिक आहेस ना , आणि असली व्यसने करतोस , हे तुला शोभत नाही " मी मान खाली घातली मग म्हणाले ' जाऊ दे ! घाबरू नकोस , तुला कोणी मारणार नाही इथे , सोडून देतील जरा वेळाने , नंतर भेट मला येऊन " आणि ते निघून गेले . भाऊ आणि वडील तेथील मुख्य हवालदाराशी काहीतरी बोलले त्यावर त्याने मान हलवली आणि ते देखील निघून गेले हे सर्व घडेपर्यंत दुपारचे ४ वाजले होते . त्या ऑफिसात आता फक्त चार हवालदार आपापल्या टेबल वर काम करत बसलेले होते आणि ड्युटीवरील बाकी तीनचार पोलीस बाकावर गप्पा मरत बसले होते , गप्पा मारता मारता त्यांनी माझ्याकडे मोर्चा वळवला व माझी विचारपूस करू लागले , ब्राऊन शुगर कुठे मिळते ? , कशी दिसते , कशी पितात , किती रुपयाला ? वगैरे कुतुहलाचे प्रश्न होते ते मला त्यांच्याशी बोलणे जीवावर आले होते पण उत्तरे दिल्यावाचून इलाज नव्हता तसेच असेच बोलता बोलता जर त्यांच्या कडून मला बिड्या काढता आल्या असत्या तर हवेच होते , अधून मधून बाहेर ड्युटी करणारे किवा पेट्रोलिंग करणारे पोलीस जेव्हा ऑफिस मध्ये येत तेव्हा माझ्या कडे पाहून नवीन केस कोणती याची चौकशी करत , काही जण तर डायरेक्ट चौकशी न करता एकदम ' काय रे , भडव्या .. तूच ना तो पर्वा दरोडा घातलेला , सांग अजून तुझे साथीदार कोठे आहेत , किवा तूला १ वर्षापूर्वी मी पकडले होते ना रे चोरीच्या केस मध्ये ' असे म्हणत ( नंतर मला समजले की पोलीस गुन्हेगारावर मानसिक दबाव आणून त्याने सर्व कबुली द्यावी यासाठी असे त्याने न केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याच्याशी बोलतात व त्याला घाबरवतात , न केलेले गुन्हे देखील अंगावर टाकतील या भीतीने काही नवखे गुन्हेगार मग लगेच केलेले गुन्हे कबुल करुन टाकतात )


तेथे एका हवालदाराने जेव्हा बिडी काढून पेटवली तेव्हा लगेच मी त्याच्या कडे बिडी मागू लागलो या वर तो म्हणाला ' अरे , माझा मुलगा तुझ्या इतका आहे , तुला लाज वाटत नाही का माझ्याकडे बिडी मागायला ' साधारणतः तो हवालदार माझ्या वडिलांच्याच वयाचा होता , झुबकेदार मिशा , केसात चंदेरी छटा , मी खूप गयावया केल्यावर त्याला माझी दया आली व त्याने एक बिडी दिली मला मग माझी चौकशी करू लागला तू कोणत्या वर्गात शिकतोस ? कोणत्या कॉलेजला आहेस ? वगैरे , मी त्याला बिटको कॉलेजला आहे असे सांगितल्यावर तो जरा चपापला म्हणाला , माझा मुलगा पण याच कॉलेजला आहे आणि तो पण शेवटच्या वर्षाला आहे , मी त्याला मुलाचे नाव विचारले तर त्याने सांगितलेले नाव माझ्या चांगलेच ओळखीचे होते , म्हणजे त्याचा मुलगा आमच्या सोबत ' सटाणा ' युवक महोत्सवात समूहनृत्याच्या समूहात होता . आम्ही चांगले ओळखत होतो एकमेकांना . मग म्हणाला ' ओळखतोस का माझ्या मुलाला ? त्याला काही व्यसन नाही ना तुझ्यासारखे ? . त्या हवालदाराचा मुलगा कधीतरी स्मोकिंग करत असे फक्त, ते मला माहित होते पण मी ते सांगितले नाही व म्हणालो नाही साहेब ओळखतो मी त्याला खूप चांगला आणि हुशार मुलगा आहे तुमचा , यावर तो मिशीत हसला व खुश झाला. असाच तासभर गेला मला उलटी होईल अशी मळमळ सुरु झाली होती टर्कीमुळे , मी त्याला तसे सांगताच मला हात धरून त्याने बाहेर पटांगणात कोप -यात नेले मी तिथे उलटी केली , पोटातील सगळे पित्त बाहेर पडले , एकदम थकल्यासारखा मी खाली बसलो तेव्हा त्याने एकाला पाणी आणण्यास सांगितले ,घोटभर पाणी पिऊन पुन्हा मी आत ऑफिस मध्ये आलो , माझी अवस्था पाहून त्याला दया येत होती , मला तो ' व्यसने चांगली नसतात , असे वागू नये वगैरे समजावू लागला , ' मी त्याला जेव्हा विचारले की मला केव्हा सोडणार तेव्हा म्हणाला ' पाहू साहेब आल्यावर काय ते पण तुला दोन तीन दिवस तरी डांबून ठेवावे असे तुझ्या घरच्या लोकांचे म्हणणे आहे ' ' माझ्यावर कोणती केस केली' असे विचारले तर हसला म्हणाला ' कसली केस न काय , केस केली तर पुढे तुला नोकरी मिळेल का ? काही केस नाहीय फक्त असेच तुला अद्दल घडावी म्हणून तुझ्या भावाने साहेबाना विनंती करून दोन चार दिवस अडकवण्यास सांगितले आहे ' . मी थोडा निश्चिंत झाले तेव्हा , त्यांनी मला एकदम कोठडीत न टाकता ऑफिस मध्ये बसवले तेव्हाच मला अंदाज आला होता की केस वगैरे केली नाहीय ते .



मला आता पोटात एकदम ढवळून आले जोराची संडास आली ( ही सगळी टर्की ची लक्षणे असतात ) मी त्याला तसे म्हणालो तेव्हा म्हणाला चल माझ्या सोबत व त्याने मला त्या बैठ्या इमारतीच्या डाव्या बाजूला पटांगणात असलेल्या कोपर्यात नेले तेथे चार संडास होते आजूबाजूला वाळक्या पानांचा वगैरे खूप कचरा होता तेथे जाण्यास सांगितले व तो माझ्या पासून साधारण १० फुट अंतरावर उभा राहिला मी आजूबाजूचे निरीक्षण केले संडासच्या मागे २० फुट अंतरावर तारेचे कुंपण होते तेथून बाहेर रस्ता आणि त्या पलीकडे मेनगेट ची क्वार्टर्स होती ( मेनगेट क्वार्टर्स म्हणजे प्रेस मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या साठी बनवलेली सरकारी वसाहत आता ती सगळी घरे पाडण्यात आली आहेत ) मी संडास मध्ये जाऊन जोरात दार लावले , आधी पटकन माझे काम उरकले आणि मग हळूच आवाज न करता दाराची कडी काढून बाहेर डोकावून पहिले तर तो हवालदार संडासकडे पाठ करून पोलीस स्टेशनच्या दिशेला पाहत उभा होता ही चांगली संधी होती , मी ताबडतोब चपला तिथेच सोडल्या व दबकत संडासच्या मागील बाजूला पोचलो आणि तारेच्या कुंपणांकडे धूम ठोकली साधारण आठदहा पावले नीट पडली आणि नंतर एकदम जाणवले पाय चिखलात रुतल्या सारखे रुतत आहेत खाली लक्ष गेले तर एकदम ओकारी सारखे झाले , खाली त्या संडास मधून बाहेर पडलेला मैला साचला होता काही वाळलेला तर काही ओला , माझे पाय साधारणतः पोटऱ्या पर्यंत त्यात भरले होते एकदम दुर्गंधी आली तरी मागे न पाहता तसाच नेटाने ते तुडवत कुंपणा जवळ गेलो आणि कुंपणाची तार हाताने वर उचलून तारेखालून बाहेर रस्त्यावर आलो पळत सुटलो मेनगेट क्वार्टर्स कडे . बाहेर कोठेतरी बहुतेक सत्यनारायण पूजा सुरु असावी तेथे लाउडस्पीकर वर सुरु असलेले कालिया सिनेमाचे गाणे लागले होते ' कौन किसी को रोक सका , सैयाद तो एक दिवाना है , तोड कें पिंजरा , देखना एक दिन ..पंछी को उड जाना है ! .' पळताना ते गाणे कानात शिरत होते आणि मी अजून वेग पकडला .


========================================================================

 भाग ३९ वा

पोलीस स्टेशन मधून जो थेट पळत सुटलो ते एकदम आधी रेल्वे स्टेशनवर गेलो , तेथे आधी एका नळावर घाणीने बरबटलेले पाय धुतले , आता टर्की खूप जास्त जाणवत होती , कसेही करून मला ब्राऊन शुगर हवी होती , मी तेथून नेहमीं जेथे ब्राऊन शुगर विकत घेत असे त्या हाजो आपा च्या अड्यावर गोसावी वाडीत गेलो ( हीचे मूळ नाव हाजरा होते , पण आम्ही सर्व गर्दुल्ले तिला हाजो आपा म्हणत असू , या बाईचा नवरा पेशाने पहेलवान होता ,एका खुनाच्या आरोपात जेल मध्ये शिक्षा भोगत होता तो, आणि आपा उदरनिर्वाहासाठी आधी गांजा आणि मग ब्राऊन शुगर विकण्याचे काम करीत होती ) मी हाजो आपा चे नेहमीचे आणि रोख व्यवहार करणारे गिऱ्हाईक होतो , त्यामूळे ती मला रात्री बेरात्री केव्हाही ब्राऊन शुगर देण्यास मनाई करत नसे , आज पहिलीच वेळ होती की मी तिच्याकडे उधार मागायला जाणार होतो , सायंकाळी साधारण ७ वाजले होते , मी तिच्या घराच्या खिडकीतून हक मारली तशी पटकन तिने हात बाहेर काढून कितना ? असे विचारले या वर मी म्हणालो ' आपा , आज पैसे नाही है , ५ पुडी दे दो , काल पैसे मिल जायेंगे , तिने हात परत आत घेतला , मग खिडकीचा पडदा सरकवून माझ्या कडे पाहत म्हणाली ' ऐसा उधार नाही मिलेगा ' मला खरे तर मनातून ती आपल्याला नक्की उधार देईल अशी खात्री होती , कारण ऐरवी देखील ती इतर गर्दुल्ल्या लोकांपेक्षा माझ्याशी अधिक सौम्य बोले .

एकदा तर तिने मला काय शिकतोस ? कोणत्या कॉलेजला वगैरे चौकशी केली होती माझी एकंदरीत तिने मला त्या दिवशी मात्र सरळ रोख पैसे सांगतील असे सांगून माझा भ्रम निरास केला होता , मी लगेच पवित्र बदलला एकदम मी तिला काल ब्लेड ने गळ्यावर केलेली जखम दाखवून म्हणालो ' ये देखो आपा , कल मैने ये क्या किया है , आज मुझे माल नाही मिलेगा तो मै मर जाउंगा , अभी पोलीस स्टेशनसे भागकर सिधा यहापर आया हू ' ही मात्रामात्र लगेच लागू पडली , गळ्याची जखम तशी कोणीही घाबरावे अशी मोठी होती त्यातल्या त्यात एखादी ' स्त्री ' तर नकीच घाबरली असती हाजो आपा परिस्थितीमुळे जरी अश्या व्यवसायात असली तरी सर्व प्रथम ती आधी ऐक ' स्त्री' होती ' हाय अल्लाह , असे ओरडून ती एकदम खिडकीत मागे सरकली मग , अविश्वासाने माझ्याकडे पाहत म्हणाली ' आज दे दुंगी , लेकिन दोबारा यहा आना नही ,और य नशा छोड दो अभी तुम " मी हो ला हो केले मग तिने पाच पुड्या हातात दिल्या , तसा मी वेगाने तेथून सटकलो .

मग लपत छपत रेल्वे क्वार्टर्स कडे आलो , घरात काय चाललेय हे मला पहायचे होते , पोलीस आपला शोध घेत आहेत का ही भीती होतीच , आमच्या घराच्या मागील बाजूस अंगण होते आणि त्याभोवती साधारण पणे ८ फुट उंच भिंतीचे कुंपण , मी त्या भिंतीवर चढून तिच्यावरून चालत घराच्या गच्चीवर पोचलो , तेथे आमच्या मधल्या आणि पुढच्या खोलीचे व्हेंटिलेटर होते छोटेसे , त्यातून जरी खालचे काही दिसत नसले तरी आव्हाज स्पष्ट ऐकू येत असत , कान देऊन मी आतले संभाषण ऐकत होतो , आत भाऊ आणि वडिलांचे बोलणे सुरु होते ' असा कसा निघून गेला तो तेथून , ते पोलीस काय करत होते ? असे वडील म्हणत होते , तर भाऊ म्हणत होता ' ते म्हणतात की तुमच्या घरातीलच कोणीतरी येऊन त्याला घेऊन गेलेय म्हणून " सगळा प्रकार माझ्या लक्षात आला , मला तीनचार दिवस असाच तेथे पोलीस स्टेशन मध्ये कोठडीत न डांबता ऑफिस मध्ये बसवून ठेवायचे ठरले होते , व त्यानुसार भाऊ माझा रात्रीचा डबा , आणि अंथरूण घेऊन तेथे गेला तेव्हा त्याला तेथील पोलिसांनी तो आमच्या हातून पळाला असे न सांगता , घरातीलच कोणीतरी येऊन मला घेऊन गेले असे सांगून भावाची बोळवण केली होती , भाऊ घाबरलेला होता , कारण त्याला हे अपेक्षित नव्हते , त्याला आता मी पुढे काय पवित्रा घेईन याची भीती होती , पोलीस ही त्याची शेवटची आशा होती पण मी ती धुळीस मिळवली होती व आता मी बदला म्हणून त्याला मारीन की काय अशी भीती त्याच्या मनात होती . , मी तो संवाद एकूण जरा निर्धास्त झालो , म्हणजे आता पोलीस आपल्याला शोधणार नाहीत हे पक्के होते ( कदाचित केस न करता असे डांबून ठेवणे , पोलिसांसाठी देखील कटकटीचे काम असावे ) मी गच्चीवरच आधी ब्राऊन शुगर ओढली तीन पुड्या उद्यासाठी ठेवल्या आणि मग गच्चीवरून खाली अंगणात उतरलो , अंगणात खूप फुलझाडे होती , जाई , जुई , मोगरा , अबोली , गुलाब वगैरे , आईला बागेची खूप आवड असल्याने छान बाग होती आमची , मी तेथील कोपऱ्यातील जाई च्या वेलामागे लपून बसलो

बाहेर तेथेच ऐक पाण्याचा हौद होता व आई नेहमी पाणी घेण्यासाठी तेथे येई ती बाहेर आली की आधी आईला भेटायचे मग घरात जायचे असे मी ठरवले होते , बराच वेळ झाला तरी अंगणात आई आली नाही , मात्र बहिण जेव्हा अंगणात पाणी घेण्यासाठी आली तेव्हा मी तिला ' ताई ' अशी हाक मारली आणि ती जी एकदम ' सुहास पळ , हा आलाय इथे 'असे मोठ्याने ओरडली त्या बरोबर घरात एकदम हलकल्लोळ मजला , एकदम मोठ्याने ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज आले , ताई पण आत घरात पळून गेली , मला नेमके काय झाले ते समजेना , म्हणून तसाच जाईच्या वेलामागे उभा राहिलो अंधारात जरा वेळाने चार पाच लोकांचे बोलण्याचे आवाज आले , आमच्या आजूबाजूला राहणारे तीनचार लोक टॉर्च घेऊन अंगणात आले आणि सगळीकडे प्रकाशाचा झोत टाकू लागले , शेवटी माझ्यावर प्रकाश पडला , मला पाहून ते म्हणाले , हा तर तुषार आहे . साप वगैरे काही नाही , आणि मी त्यांच्या सोबत आत गेलो तर आई खाली बेशुध्द झाल्यासारखी पडली होती , बहिण आणि तिची मुले रडत उभी होती , भाऊ बहुतेक माझ्या भीतीने घराबाहेर पळाला होता . मग नंतर सर्व प्रकार लक्षात आला की ' तुषार आला ' असे ताई ओरडल्यावर भाऊ बाहेर पळाला आणि भीतीने आईला एकदम मूर्च्छा आली ती खाली पडली ते पाहून सगळे रडू लागले आणि घरातील आरडा ओरडा एकूण बाहेरचे लोक आत आले तेव्हा बहिणीने जेव्हा अंगणाकडे बोट दाखवले तेव्हा त्यांना वाटले अंधारात काहीतरी साप वगैरे पहिला असणार बहिणीने आणि त्यामूळे ते साप मारायला अंगणात आले होते .मला पाहून ते निर्धास्त झाले आर्थात त्यानाही नंतर घरातील लोक सापपेक्षा जास्त मलाच घाबरतात ते समजले .

========================================================================

 भाग ४० वा  आईचा चांगला मुलगा !


मी पोलीस स्टेशन वरून पळून आल्यानंतर घरात जो हलकल्लोळ माजला होता त्याचे फलित हे झाले की त्या दिवशी रात्री मी सर्वांची माफी मागितली. ( अर्थात तेव्हा ब्राऊन शुगर पिऊन झाली होती , टर्की नव्हती म्हणून ही पश्चात बुद्धी होती , अनेक व्यसनी असे नेहमी करतात , काही मोठी भानगड , भांडण , किवा मोठी चूक केली की ते तात्पुरते माफी मागतात , काही दिवस शांततेने जगतात अर्थात व्यसन बंदच असते असे नाही पण ते घरी त्रास देणे बंद करतात काही काळ ) व या पुढे चांगला वागेन असे वचन दिले . मनाशी देखील मी हे ठरवले होते की आता एखादी नोकरी शोधली पाहिजे जेणेकरून आपला खर्च आपल्याला स्वतःला करता येईल . माझा ऐक जिवलग मित्र होता भीमा डावरे म्हणून तो विष्णुनगर च्या पलीकडे असलेल्या दलित वस्तीत राहत असे , आठवी पासून तो माझा मित्र होता . भीमाचे वडील लहानपणीच गेले होते , मोठा भाऊ व त्याच्या पत्नी मुलांसोबत भीमा व त्याची आई राहत असे . मोठा भाऊ प्रेस मध्ये नोकरीला होता मात्र त्याच्या भावाला एकंदरीत ५ मुली होत्या व तुटपुंज्या पगारात सर्व कारभार चालला होता . भीमा जरी माझ्यासोबत नेहमी राहत असला तरी त्याचे ऐक वैशिष्ट्य असे की त्याने आमच्या कोणत्याही मवाली पणात अथवा व्यसनात भाग घेतला नव्हता , उलट तो आम्हाला समजावून सांगे व्यसन करू नका म्हणून , आम्ही त्याला अनेकवेळा अनेक प्रकारे व्यसनाचा आग्रह करूनही तो सोवळा राहिला होता .कित्येक वेळा तो कुतूहल म्हणून आमची चिलीम साफ करून देत असे , किवा एखादे वेळी सिगरेट मध्ये गांजा भरून देत असे पण कधी त्याने व्यसन केले नाही हे कौतुकास्पद होते म्हणजे आम्ही सगळे मित्र व्यसनी आणि सतत आमच्यात राहूनही स्वतःला कोणतेही व्यसन न लावून घेतलेला भीमा म्हणजे ऐक आश्चर्य होते . भीमा नेहमी माझ्या घरी आभ्यास वगैरे निमित्ताने असायचा , आईने मला सांगितलेली अनेक कामे मी भिमावर ढकलत असे , उदा . सिलेंडर साठी नंबर लावणे , दुकानातून किराणा समान घेऊन येणे वगैरे . आई नेहमी म्हणत असे की तुझ्याऐवजी भीमा माझा मुलगा हवा होता इतका प्रेमळ आणि नम्र व गुणी होता तो .( गेल्या अनेक वर्षात भीमा भेटलेला नाही , तो मुंबई ला कोणत्यातरी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे असे समजले आहे ).

तर या भीमा सारखे आता वागायचे असे मी ठरवले होते व तसे वचन देखील दिले होते सर्वाना . दुसऱ्या दिवशी पासून मी भिमासोबत नोकरी शोधू लागलो , अर्थात नोकरी शोधण्याच्या निमित्ताने व आता चांगला वागतो असे म्हणून आईकडून थोडेफार पैसे उकळतच होतो व त्यात नशा भागवत होतो कसातरी .त्या पोलीस स्टेशनच्या प्रकरणानंतर मोठा भाऊ मला जरा टरकूनच होता , त्याला जरी नंतर मी काही बोललो नव्हतो तरी त्याच्या मित्रांनी बहुधा त्याला शहाणपणाचा सल्ला दिला असावा की तू तुषार च्या भानगडीत पडू नकोस , तो उगाच तुला काहीतरी इजा करेल ,त्यामूळे असावे कदाचित तो आता माझ्या बाबतीत फारसे बोलत नसे अर्थात त्याची माझ्यावर नजर होतीच फक्त त्याने बोलणे कमी केले होते इतकेच . एकदा अशीच ऐक जाहिरात आली होती स्थानिक दैनिकात ' प्रचारक हवेत ' या आशयाची . नाशिक मध्ये उंट छाप बिडीचे उत्पादन होते त्याचे मालक बस्तीराम नारायणदास सारडा हे होते , त्या समूहाची ही जाहिरात होती ' उंट ' छाप बिडी चा गावोगावी प्रसार आणि प्रचार व विक्री वाढवण्यासाठी हे ' प्रचारक पद ' होते , त्यात उमेदवाराला गायन , अभिनय , ई बाबतीत प्राविण्य असावे असा उल्लेख होता म्हणून मी भीमा सोबत तेथे मुलाखतीला गेलो श्री . पाडेकर साहेब म्हणून होते मुलाखत घ्यायला ( हे पाडेकर नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात वावरणारे होते ) मुलाखतीच्या वेळी त्यांनी मला कविता म्हणून दाखव , गाणे म्हणून दाखव , कविता कर , असे प्रश्न विचारले तसेच एखादा अभिनय करून दाखवण्यास सांगितले मी त्यावेळी त्यांना नट सम्राट मधील ' घर देता का कुणी घर ' हा भाग करून दाखवला होता . त्यांनी लगेच माझी निवड केली प्रचारक पदासाठी . भीमा त्या वेळी एका ठिकाणी पार्टटाईम नोकरी करतच होता त्यामूळे त्याने काही मुलाखत दिली नाही . तर आता मी नोकरी करणार होतो , चांगला वागणार होतो भीमा सारखा म्हणून घरची मंडळी खुश होती . कामावर हजर व्हायला अजून ऐक आठवडा बाकी होता तो पर्यंत मग आईकडून निर्विघ्न पैसे मिळत गेले मला .

मी व्यसन बंद केले नव्हते तर फक्त आता जरा सांभाळून व्यसन करत होतो इतकेच , आईने देखील घडल्या प्रकारचा धसका घेतला होता म्हणून ती मला बिनदिक्कत पैसे देत असे . माझ्या नोकरीचा दिवस उजाडला आणि मी सकाळी सकाळी मी माझा ब्राऊन शुगर चा डोस घेऊन कामावर हजर झालो पहिल्या दिवशी मला फक्त कामाचे स्वरूप समजावून सांगण्यात आले , नंतर सातपूर येथे असलेल्या उंट बिडीचे उत्पादन जेथे चालते तेथील कारखान्यात नेण्यात आले , बिडीची पाने वळून त्यात तंबाखू कशी भरली जाते , तंबाखूवर कशी प्रक्रिया होते ते सारे मी पहिले . मग उद्या पासून तुला मलकापूर येथे प्रशिक्षणासाठी जावे लागेल असे सांगितले गेले . प्रशिक्षण म्हणजे उंट विडीचा प्रचार करणारी ऐक व्हँन होती त्या व्हँन सोबत मला जायचे होते त्या गाडीवर वर भोंगे लावलेले होते , ऐक मँनेजर , ऐक प्रचारक , ऐक सहायक , चालक आणि त्याचा सहायक अशी टीम सुमारे १ आठवडा ते १५ दिवस अश्या दौऱ्यावर जात असे , त्या दोऱ्यात गावोगावी जाऊन उंट बिडीचा प्रचार करणे , तेथील व्यापाऱ्यांना बिडी सप्लाय करणे , विक्री वाढण्यास मदत करणे असे काम असे , सगळी टीम एखाद्या स्थानिक लॉज वर मुक्काम करत असे , आम्हाला जेवणाचा भत्ता मिळत असे . मी ज्या गाडीबरोबर प्रशीक्षणासाठी जाणार होतो त्या गाडीचे व्यवस्थापक आणि प्रचारक यांच्याशी माझी ओळख करून देण्यात आली , त्यांनी मला त्यांचे काही अनुभव सांगितले . व दुसऱ्या दिवशी मी प्रशिक्षणासाठी जाण्यास सज्ज झालो . रात्रीच माझा ब्राऊन शुगर चा दोन दिवसांचा स्टॉक मी घेऊन ठेवला होता .

( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें