प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.com



बुधवार, 27 मार्च 2013

काहे को ..दुनिया बनाई

भाग १३६ वा  ३१ डिसेंबर १९८९ !

नाशिकला पोचल्यावर.मला पाहून वडिलांनी समाधानाने मान हलविली ..बोलता येतच नव्हते त्यांना ..पण त्यांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू ..मी सुखरूप परत आल्याचे पाहून त्यांना आनंद झाल्याचे दर्शवित होते ..त्यांच्या जवळ पलंगावर बसलो तसा त्यांनी चांगला असलेला डावा हात माझ्या डोक्यावरून फिरवला ..मग माझा एक हात हातात घेवून बसून माझ्या तोंडाकडे पाहत राहिले .. ही काय स्वतची परवड करून घेत आहेस ? ..कधी अक्कल येणार तुला ?.. हे असे जगून काय मिळावीत आहेस ? वगैरे प्रश्न ते मला विचारात असावेत .. त्यांची अवस्था पाहून माझेही डोळे भरून आले .. वाटले .. असे का घडते आहे माझ्याच बाबतीत ..व्यसनमुक्त राहण्याची इच्छा असूनही मला यश का येत नाहीय .तारुण्यात प्रवेश करताना माझी जीवनाबद्दलची स्वप्ने अशी अजिबात नव्हती ..उलट मला चांगले शिकायचे होते ..चांगली नोकरी करायची होती ..यशस्वी व्हायचे होते ..अर्थात माझी स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारे कृतीचे पाठबळ मी देण्यास असमर्थ ठरलो होतो हे मला समजत नव्हते .. उद्या ठाण्याला जायचे आहे असे भावाने ठरवले होते .. म्हणजे अजून २४ तास काढायचे होते मला .. टर्की मी ठाण्याला सहन करू शकत होतो ..कारण मिळण्याची शक्यताच नसे .. त्यामुळे एकदा मनाने आपल्या येथे ब्राऊन शुगर प्यायला मिळू शकत नाही हे मान्य केले की आपोआप टर्की सहन करण्याची हिम्मत वाढते ..तसेच कसे मिळू शकेल ..काय करावे हे विचार देखील मग सतावत नाहीत .. निमुटपणे त्रासाला सामोरे जाता येते .. शेवटचे म्हणून अकोल्याला घेतलेल्या चार पुड्यांपैकी एक पुडी शिल्लक होती ती सकाळी प्यायलो होतोच .. अजून संध्याकाळ ..रात्र .. आणि उद्याची दुपार काढायची होती ..उद्या दुपारी मी ठाण्याला पोचलो असतो .. तेथे सगळ्यांच्या चांगल्या ओळखी असल्याने फारशी अडचण येणार नव्हती ..कशीही टर्की सहन केली असती .. आई जवळ पैसे मागितले ..तर तीने पर्स उघडून दाखविले ..जेमतेम दहा रुपये होते तिच्याकडे .. भावाजवळ मागणे शक्यच नव्हते ..त्याच्या मते आम्ही तुला वारंवार उपचार देतोय तेच खूप होते .. खायला . ..कपड्यांसाठी .. सिनेमा ..नाटक पाहण्यासाठी तो कितीही पैसे देण्यास तयार झाला असता ..मात्र नशेसाठी अजिबात एक पैसा देखील देणार नाही हे त्याचे ब्रीद होते ..

दुपारी घरातच थांबून .. पैसे कुठून मिळू शकतात का ?..काही मौल्यवान वस्तू विकण्यासाठी सापडते का ? याचा शोध घेत होतो ..घरचे लोक माझ्या बाबतीत तेव्हढी सावधगिरी बाळगून होते .. सगळे पैसे ..दागिने ..मी सहजपणे नेवू शकेन अश्या इतर मौल्यवान वस्तू ..अगदी कडी कपाटात बंदिस्त होत्या .. शेवटी नाईलाजाने बाहेरच काहीतरी जमवावे लागेल हे समजून संध्याकाळी घराबाहेर पडलो ... नाशिकला ब्राऊन शुगर मुंबई आणि अकोल्याच्याही तुलनेत महाग असल्याने किमान शंभर रुपये तरी मिळायला हवे होते ..त्या दिवशी ३१ डिसेंबर ही तारीख असल्याने ..सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते .. दुकानांवर ..हॉटेलमधून रोषणाई केलेली ... आणि मी टर्की त शोधक नजरेने फिरत होतो ..कोणीतरी नशेबाज मित्र भेटेल ही आशा होती . ..एक दोन जण भेटले पण ते अगदीच दयनीय झालेले गर्दुल्ले .. ओवाळून टाकलेले ..ते स्वतच काहीतरी झोल करण्याच्या शोधात होते .. मी एखादी कुलूप न लावलेली सायकल .. दिसली तर हात मारण्याचे ठरवले होते ..सरळ भद्रकाली च्या बाजारात विकत आली असती ..बराच वेळ हिंडूनही काही गणित जमेना .. मग फिरत फिरत मेनरोड वरून शालीमार कडे जाणाऱ्या रस्त्यावर शाली ..मफलर .. स्वेटर्स वगैरे गरम कपडे विकणाऱ्या तिबेटी लोकांच्या पालाजवळ पोचलो ..त्यांची दुकाने रांगेने लांबलचक पसल्रेली होती ..म्हणजे सिव्हील हॉस्पिटल च्या कंपांऊड वॉल ला लागून प्लास्टिक किवा ताडपत्रीचा आडोसा करून ही दुकाने लावलेली असत .. 

थंडीचे दिवस असल्याने दुकानारून स्वेटर्स वगैरे घेण्यासाठी चांगलीच गर्दी .. गर्दीतून काही संधी मिळते का ते पाहत होतो ..पूर्वी आम्ही दोनतीन वेळा असे दुकानातून गर्दीचा फायदा घेवून गिऱ्हाईक असल्याचा बहाणा करून स्वेटर्स लांबवले होते .. आज मी एकटाच असल्याने ती हिम्मत करता आली नसती .. मग मनात एक कल्पना आली की जर सिव्हील हॉस्पिटलच्या भिंतीच्या आतल्या बाजूने कोणाच्या नकळत हात घालून जर एखादा स्वेटर लांबविता आला तर बरे होईल ..हा विचार मनात येताच सिव्हील हॉस्पिटल च्या आवारात जावून भिंतीच्या आतील बाजूने निरीक्षण केले तेव्हा एक दुकान असे सापडले की मागून हात घालून सहज स्वेटर लांबवता आला असता ..पण त्यासाठी दुकानात असलेल्या तिन्ही तिबेटी स्त्रियांचे लक्ष विचलित व्हायला हवे होते .. दुकानात गर्दी होती त्यामुळे त्या पैकी दोन जणी ग्राहकांशी बोलत होत्या तर एक मात्र स्वेटर्स लटकवलेल्या बाजूकडे पाहत होती ..मी हात घातला असता तर तीला नक्कीच दिसले असते .. बराच वेळ तिथे अंधारात दबा धरून बसलो ..अचानक लक्षात आले की पायाला काहीतरी चावते आहे .. एकदम सुया टोचल्या सारख्या वेदना पायावर पोटऱ्यावर होऊ लागल्या ..मग लक्षात आले की मी अंधारात एका लाल मुंग्यांच्या वारुळावर उभा होतो ..मुंग्यांनी आधी अंदाज घेतला असावा .. मग दोन्ही पायावर चढून आपले प्रताप दाखायला सुरवात केली होती ..मनात आले ..तू चोरी करायला निघाला होता म्हणूनच की काय इतक्या मुंग्या एकदम चावल्या .. तेथून पाय झटकत पळालो . जरा दुरवर जावून पायावरच्या सर्व मुंग्या झटकल्या .. पायाला खूप खाज सुटली होती ..पण एखादा स्वेटर तेथून घेतल्याखेरीज मागे फिरायचे नाही ही जिद्द होतीच .. अर्ध्या तासाने पायाची आग होणे थांबल्यावर सावध पणे पुन्हा तेथे गेलो ..या वेळी मुंग्यांचे वारूळ टाळून उभा राहिलो .. स्वेटर्स काढून देणा-या तिबेटी स्त्री ची पाठ वळली तसा पटकन आत हात घातला ..न हाताला येईल तो कपडा अंदाजाने लांबवला .. मागे न पाहता धूम पळत सुटलो ...

माझ्या हाताला एक शाल लागली होती ... सरळ भद्रकालीत पोचलो ..अड्ड्यावर जावून मुश्ताकभाई ला ती शाल दाखवली ..त्याने फक्त एक पुडी देईन असे सांगितले ..खरे तर किमान दोन पुड्यांचा तरी डाव होईल असा माझा अंदाज होता .. मुश्ताक हा स्वतः देखील गर्दुल्लाच होता .. तो मुंबईहून गर्द विकत आणून ते नाशिकला महाग विकून स्वतची नशा भागवत होता .. त्याच्याकडे केव्हाही जा एकतर तो झोपलेला असे किवां ..जागा असेल तर त्याच्या हातात पन्नी असे ..मला त्याचा नेहमी हेवा वाटे .. असे आपल्याला देखील दिवसरात्र नशा करायला मिळाले तर बरे होईल असे वाटे ..शेवटी एकच पुडी मिळाली ती घेवून घरी आलो गच्चीवर जावून आडोश्याला ती पुडी मारली ..आणि मग घरात गेलो .. उद्या सकाळच्या पंचवटीने ठाण्याला जायला निघायचे होते .. झोप अशी लागलीच नाही .. मी पुन्हा अनघाची भेट होणे शक्य होईल या आशेने मेंटल हॉस्पिटल ला दाखल व्हायला तयार झालो होतो ..मात्र एकदा अँडमीट झाल्यावर तेथे किती दिवस राहायचे ते माझ्या मनावर नव्हते .. पहिल्या वेळेस ५० दिवस ..दुसऱ्या वेळेस तीन महिने ..तर तिसऱ्या वेळी मला सहा महिने तेथे रहावे लागले होते.. आताच्या वेळी किती महिने राहावे लागेल याची काही शाश्वती नव्हती ....व्यसनमुक्त राहिलो तर ....नक्कीच परत अनघाची भेट होऊ शकेल असे वाटत होते .

=======================================================================

भाग १३७ वा उबदार स्वागत ! 

सकाळच्या पंचवटी एक्सप्रेस ने निघून दुपारी बाराच्या सुमारास ..मेंटल हॉस्पिटल ठाणे येथे पोचलो ..गेट च्या बाहेरच माझ्या ओळखीचे दोन तीन अटेंडंट उभे होते ..मला पाहून त्यांना आनंद झालेला दिसला ..' अरे वा ..तुषार .. बरे झाले तू आलास ..२६ जाने .ला मस्त कार्यक्रम आहे इथे 'असे म्हणू लागले ..भावाला जरा आश्चर्यच वाटले .. गेट च्या आंत शिरताच जे जुने .. मला ओळखणारे व वार्डच्या बाहेर फिरणारे .. मनोरुग्ण होते ते मला नमस्कार करत होते ... चिना ने मला कुठूनतरी पहिले असावे ..तो जरा अंतर राखून आमच्या मागे मागे चालू लागला ..त्याला तर खुपच आनंद झालेला दिसला ..कारण ऐरवी त्याला कोणी व्ही .सी .आर वर सिनेमा लावला की पहायला बोलवत नसे .... त्याच्या हातापायावर असलेल्या कुष्ठरोगाच्या जखमांची इतरांना भीती वाटे ..कुष्ठ रोगाबद्दल असलेल्या गैरसमजांपोटी अश्या लोकांच्या वाट्याला नेहमी उपेक्षा ..तिरस्कार येत असतो ... मी आल्यावर मी चिनाला वार्ड न. १८ मध्ये सिनेमा पाहू देईन याची त्याला खात्री होती ..तसेच माझ्या शेजारी तो अगदी बिंधास बसू शकत होता .. भावाला हे सगळे बघून माझी गम्मत वाटत असावी ...मला म्हणाला ' तू इथे कायमचा का राहत नाहीस... इथे तुझे बरेच मित्र आहेत ..अर्थात तो हे गमतीने म्हणाला होता .. अधीक्षकांच्या कार्यालयात पोचलो तर अजूनही डॉ . लव्हात्रे हेच तेथील अधीक्षक होते ..मला पाहून म्हणाले ' अरे ..काय रे तुषार ..परत आलास ? ..कधी सुधारणार तू ..त्यांच्या बोलण्यात राग नव्हता तर माझ्याबद्दलची माया होती ..मग भावाकडे वळून ते म्हणाले ..हा इथेच जास्त सुरक्षित आहे ..आणि तुम्हाला देखील काळजी नसते ..नाहीतर बाहेत असला की ..नेमके काय काय भानगडी करेल ..किती पैसे उडवेल ..तब्येतीचे काय हाल होतील खात्री नाही .. ..त्यांनी माझ्या फाईल वर वार्ड न . १८ AB असे लिहिले .. मी त्यांना ' स्नेहदीप ' बद्दल विचारले तर खेदाने म्हणाले तो वार्ड सध्या बंद झालाय ..तिथे आम्ही इतर मनोरुग्ण ठेवले आहेत .. तुम्ही व्यसनी लोक किती डेंजर असता ते मला चांगले अनुभवायला मिळाले आहे ..धरले तर चावते ..सोडले तर पळते ..ही म्हण तुमच्यासाठीच असावी .. म्हणत ..जोरात हसून माझ्या पाठीवर थाप मारली ..

मला वार्ड न .१८ पाशी सोडून भाऊ निघून गेला ..लव्हात्रे साहेबांनी मला घरचे कपडे घालायला परवानगी दिलेली होती .. वार्डात गेल्या वर माझे अटेंडंट मित्रच ड्युटीवर होते ..मला पाहून त्यानाही आनंद झालेला दिसला .. त्यांनी लगेच माझी कपड्यांची पेटी ठेवण्याची सुरक्षित व्यवस्था केली ..मला चांगला पंख्याखाली असलेला पलंग पाहून दिला ..' एकजण म्हणाला वार्डात पुन्हा ढेकुण झालेत ..बरे झाले तू आलास ..आता एकदा मस्त साफसफाई करू..चारपाच नवीन चेहरे सोडले तर वार्डात तेच जुने चेहरे दिसले ..दिलीप .अनिरुद्ध ..कीथ ..नंदू ..वगैरे ...म्हातारा त्रिभुवनदास देखील होता ..मला पाहून जवळ आला आणि त्याचे प्रश्न सुरु झाले ' क्या पिया ? ..गांजा ? शराब ? ब्राऊन शुगर ? हेरॉईन ? कोकेन ? " मी नुसताच हसलो ..तर मला टाळी दिली त्याने .. मला टर्की सुरु झालेली होती .म्हणून पलंगावर पडून राहिलो .. सिस्टर ने दुधात ग्लुकोज घालून आणून दिले ..घेण्याची इच्छा नव्हती मात्र सिस्टर ने इतक्या अगत्याने आणले म्हणून डोळे मिटून पटकन दुध प्यायलो ..पडल्या पडल्या...घडल्या घटनांचा विचार करत होतो .. या वेळी पुन्हा ब्राऊन शुगर प्यायला सुरवात केल्यावर माझे जास्तच नुकसान झाले होते .. प्रत्येक वेळी असेच होत आलेय .. जरा तब्येत बरी झाली ..घरचे विश्वास ठेवू लागले .. हाती पैसा आला ..की माझ्या मनातील ..एकदा घ्यावे ..थोडेसेच ..फक्त आजच.. हे व्यसनाचे आकर्षण जागृत होत होते .. मी एकदा म्हणून घ्यायला गेलो की नकळत अडकत होतो ..प्रत्येक वेळी कारणे जरी वेगवेगळी सांगितले असली मी व्यसन सुरु करण्याची तरी देखील ..खरे कारण हेच होते ..की मला व्यसन केल्यानंतरची ती गुंगीची .. हलकेपणाची .. सगळे ताण संपल्याची जी अवस्था प्राप्त होते ..ती मनापासून आवडत होती .. एकदा नियमित सुरु झाले की घर दार ..कुटुंबियांचे प्रेम .. नोकरी ..इतकेच काय .. स्वतची तब्येत .. या सगळ्या बाबत मी बेपर्वा होत होतो .. मला वाटे जे काही होईल ते पाहून घेवू ..ठीक करू .. वगैरे ..मात्र पाहता पाहता सगळे माझ्या कंट्रोल च्या बाहेर होई ..आणि पश्चातापाची पाळी येत असे माझ्यावर !
आता तीनचार दिवस टर्की सहन करावी लागणार होती ..संध्याकाळी जास्त त्रास होऊ लागला म्हणून .बाथरूम मध्ये नळाखाली जावून बसलो ..थंड पाण्याची धार बरी वाटत होती अंगावर .. अर्धा तासाने थंडी वाजू लागली तसा उठलो .. पुन्हा पलंगावर .. तिन्हीसांजा झाल्या होत्या ..आठवणींची पाखरे .. मनात भिरभिरू लागली होती ..मला लता मंगेशकरांचे '' या चिमण्यांनो परत फिरा रे ..घराकडे आपुल्या ..जाहल्या तिन्ही सांजा "..हे गाणे आठवले ... अंगावर का टाच आला .. लतादीदींनी ' दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर ...ही ओळ इतक्या उंच आणि कातर स्वरात म्हंटली आहे की खरच सगळीकडून अंधाराच्या लाटा अंगावर येतात की काय असा भास होतो ..एका आईच्या भावनांचे यथार्थ वर्णन केलेय गाण्यात .. घराबाहेर असलेली मुले सुरक्षित तर आहेत ना ? या काळजीने तिचे मन व्यापून गेलेय ...बाहेरच्या क्रूर ..निष्ठुर ...फसव्या जगात आपले भाबडे पोर गेलेय ..केव्हा एकदा ते घरी येईल असे तीला होते .. पण मुलांना असते का आईच्या अश्या काळजीची पर्वा ..मी तर रात्री ..बेरात्री घरी येत असे ..तो पर्यंत आई जागीच असे ..जिन्याच्या पायऱ्यांवर माझी चाहूल लागताच पटकन बेल वाजविण्याच्या आधीच दार उघडलेले असे ..आणि पहिले वाक्य ...जेवण करून घे ...त्यावेळी आईचा खरे तर राग येई ..इतकी काय काळजी करायची ..मी काय आता कुकुल बाल आहे का ? .. वगैरे विचार मनात येत असत ..त्यावेळी आई म्हणे ..तुला बाप झाल्याशिवाय नाही कळणार ते ..खरेच मला कोणाच्या भावनांची पर्वा नव्हती .. फक्त माझा आनंद ..माझी मजा .. माझ्या इच्छा.. यात गुरफटलो होतो म्हणूनच तर असा भरकटलो देखील होतो .

=======================================================================

भाग १३८ वा   प्रजासत्ताक दिन !

या वेळेस टर्की चा फारसा त्रास जाणवला नाही .. थंडीच्या दिवसात तसाही टर्की चा त्रास कमी होतो असा माझा अनुभव होता ..पण हा त्रास घरी राहून सहन कारणे अगदी जीवघेणे असते .. कारण सगळ्यात मोठा त्रास म्हणजे रात्री झोप न येणे .. दिवसभर घरातील लोक जागे असताना .. वेळ निघून जातो कसातरी ..अन रात्र एकदम अंगावर आल्यासारखी होते ..जेव्हा सगळे गाढ झोपलेले असतात . छान घोरत असतात ..तेव्हा आपण टक्के जागे .. मन अश्यावेळी खूप तडफडते .. अनेक जुन्या ...जुन्या आठवणी मन:पटलावर येतात .. त्यातील बहुतेक आठवणी या विसरून जाव्यात म्हणून आपण ठरवले असते .. त्या अंतर्मात खूप तळाला गेलेल्या असतात ...स्वताच्या केलेल्या चुकांची बोच ..त्यांचे झालेले परिणाम .. कितीही प्रयत्न केला तरी भरून न येणारा काळ .. स्वत:चाच खूप राग येतो ..आपण असे वागलोच कसे ? हा प्रश्न वारंवार सतावतो ..जीवन किती अशाश्वत आहे याची प्रखरतेने जाणीव होऊन मनात निराश्या दाटून येते .. पुढे कसे ? हा प्रश्न डोंगराएवढा होऊन मनावर दडपण येते ...सारखे कुस बदलत झोपेचा प्रयत्न केला ...तरी मन काही कुस बदलण्यास तयार नसते .. अपराधीपणाची काटेरी बोच ..मनाला रक्तबंबाळ करत राहते ..येथे तशी समस्या नव्हती झोप आली नाही तरी नाईट ड्युटीवर असलेल्या अटेंडंट सोबत गप्पा मारण्यात ..चेस खेळण्यात रात्री दीड दोन वाजत ..मग तो पर्यंत औषधे खावून लवकर म्हणजे सायंकाळी ७ ला झोपी गेलेले एकेक जण जागे होण्यास सुरवात होई .. त्यांच्या येरझाऱ्या सुरु होत . त्यांच्याकडे पाहत वेळ जाई ..पाहता पाहता पहट होत असे ..या वेळी दाखल होण्याआधी वरोरा ..अकोला येथे मी टर्की सहन केलीच होती व त्यानंतर जास्त प्रमाणात व्यसन केले नव्हते म्हणून टर्की लवकर संपली .. मी बरोबर १ जाने .१९९०९ मध्ये ही चौथी अँडमिशन घेतली होती मेंटल हॉस्पिटल येथे .. नवीन वर्षाची सुरवात तर चांगली झालेली होती ..

दरवर्षी प्रमाणे यंदाही २६ जाने. या प्रजासातक दिनानिमित्य येथे झेंडावंदन आणि खेळ ..सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे होणार होते ....त्यात गाणी वगैरे म्हणायला ..राष्ट्गीत म्हणण्यासाठी पुढाकार घ्यायला मी आलो होतो म्हणून मेंटल च्या मला ओळखणाऱ्या सर्व कर्मचा-यांना आनंद होणे स्वाभाविक होते ...वार्ड न . १८ चा माझा हार्मोनियम वाजविणारा आणि अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची जवाबदारी घेणारा अटेंडंट मित्र मला पाहून खूशच झाला होता .. तो नाईट ड्यूटी वर असला की रात्री आम्ही संगीत कक्षात जावून मस्त नवी जुनी गाणी आठवत असू .. तो मला एकेक कठीण .. गाणे म्हणायला सांगे ..गाण्यातील दर्दी होता चांगला ..२ दिवसानंतर आपण प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरु करू असे मला सांगितले होते .. आपल्या देशात स्वातंत्र्य दिवस ..प्रजासत्ताक दिवस हे दिन राष्ट्रीय दिन म्हणून पाळण्यात येवून त्याची सुट्टी असते ..सगळीकडे आनंदाचे ..देशभक्तीचे वातावरण असते .. या दिवशी देशभक्तीची लाट येते .. सगळीकडे समर गीते ..स्वातंत्र्याचे मोल ..पुढारी वर्गाची आश्वासक भाषणे ..लाल किल्ल्यावर मा .पंतप्रधान यांचा संदेश ... सेनेचे संचालन .. राष्ट्रध्वजाचे महत्व .. वगैरे गोष्टीना उधाण येते ..स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जीवाची ..घरादाराची बाजी लावणारे केव्हाच काळाच्या पडद्या आड गेलेत . ..राज्य घटना लिहिताना डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेले समृद्ध ..सशक्त ..भारताचे स्वप्न ..लबाड लोकप्रतिनिधीनी लुटून खाल्लेय ...प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता ..लोकशाही कार्यपद्धती लागू केलेला दिवस ...आपल्या देशातील लोकशाही ही फक्त नावालाच राहिली आहे ..घराणेशाही ..भांडवल शाही .. ठोकशाही ..झुंडशाही .. या सगळ्यांचे जे काही विचित्र मिश्रण तयार होऊन त्याची मिळून सध्या कार्यरत असलेली जी खुर्चीशाही झालीय त्यालाच आपण सर्वसामान्य लोक लोकशाही समजतो . माझा मित्र विलास पाटील याने सध्याच्या संधीसाधू स्वार्थी पुढारी वर्गावर एक छान स्फोटक कविता केलेली होती ..बारावीला असताना त्या कवितेने आम्ही खूप प्रेरित झालो होतो ..ती कविता अशी होती .

सावधान !

तमाम मंत्री -संत्री ,आमदार -खासदार , आणि पुढारी जनहो ..सावधान दूर रणशिंग निनादते आहे ..फाटलेल्या आभाळातून कोसळणारे तुमच्या आश्वासनांचे शिलालेख ..आणि त्या खाली चेंगरणारे..माझे कोट्यावधी देशबांधव ..रक्त मांसाच्या त्या चिखलातून क्रांतीची चाहून एकू येते आहे ..सावधान !

तुमचे दौरे ..दुष्काळ ग्रस्तांचे..पूरग्रस्तांचे ..वादळग्रस्तांचे विमानातून सौ . सह ..आणि त्या हृदयद्रावक आठवणी सांगतायेत तुमच्या सौ . क्लबमध्ये बसून चिकन खाताना वा ...क्या कहेने है ! सावधान 

तुमची बंटी ..पिंकी .कॉन्व्हेंटला ....कारमधून ..कँडबरी चघळत जाईनात ..जाईनात ..पण रस्त्याच्या कडेलाबसून बुटपाँलिश करणाऱ्या चार ..दोन ध्रुवांच्या अंगावर धूळ पाखडत ? ...सुभानल्लाह ..सावधान ! 

तुमची सुकन्या ..लिपस्टिकचे ठसे उमटवतेय तिच्या प्रियकराच्या गालावर सिमल्याच्या निसर्गरम्य वातावरणात ..पाँश ..महागड्या हॉटेलात आणि ..त्या क्षितीजा पलीकडे.. टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आभाळमोलाची अब्रू विकणाऱ्या माझ्या शेकडो भगिनी माशाल्ला..सावधान !

ठीक आहे ..ठीक आहे ..खुर्च्या तुमच्या ताब्यात आहेत माईक तुमच्या हातात आहेत ..कारण ..कारण अजून तलवार माझी म्यानात आहे ..पण सावधान .निखाऱ्यावर अजून राख आहे उद्या कदाचित उडून जाईल ..रोकतो कोण मग मला ..मी नक्षलवादी होईन ..

ही कविता माझी पूर्वीची ..बापाच्या जीवावर कॉलेजात जायचो हिटलर ..लेनिन .मार्क्स वगैरे वाचला होता ..पण.. पण आताश्या मी उभा असतो लाईनीत रेशनच्या ..हातात घामेजलेले रेशनकार्ड अन ...रिकामा रॉकेलचा डबा घेवून ..युनिटला अर्धा ..या हिशोबाने मिळणारे दीड लिटर रॉकेल ..न ..राशनकार्डचा एवढासा कागदी तुकडा ..या भांडवलावर या साल्यांच्या टोप्या तरी जळतील काय ? 

गावाबाहेर उजाड माळरानावर एक पडकी विहीर आहे ..इतिहासाची सारी सोनेरी पाने काढून .. मी तिची डागडुजी केलीय ..अन घरची चूल विझवून दीड लिटर रॉकेल त्यात ओतून ..वाट पाहत बसलोय .वेड्यापिरांची ..एक दिवस असा येईल ..विहीर तुडुंब भरेल ..मग मग भडका उडवून देवू एकदम .. है कोई दिलवाला ..है कोई माई का लाल ? साद दिलीय ..पण प्रतीसाद ...प्रतिसाद मात्र शून्य .. 

अहो प्रतिसाद उमटेलच कसा ? ..आंधळ्या धृतराष्ट्राचे माजलेले पुत्र नाक्या नाक्या वर मोर्चे बांधून सज्ज आहेत ..शिखण्डीचे समस्त भाऊबंद आपल्या घरादाराची बिळे बुजविण्यात मग्न आहेत ..दधीची चा वंश उरलाच कुठेय .. उरत वणवा पेटलाय ..रॉकेलची मला गरज नाहीय समुद्र पाण्याचा मी पेटवणार आहे ..

असे म्हणतात की संतृप्त अश्रू कधीच वांझ नसतात ..ते देखील जोपासत असतात ..अणु-विभाजनाचा स्फोटक सिद्धांत .. संतृप्त अश्रुना आईनस्टाईन ..मी भेटवणार आहे ..रॉकेलची मला गरज नाही समुद्र आसवांचा मी पेटवणार आहे ..समुद्र आसवांचा मी पेटवणार आहे !

विलास गोवर्धने ( पाटील )

ही कविता विलास इतका आक्रमक आणि ठामपणे म्हणे की ऐकताना अंगातून रक्त सळसळत असे आमच्या .. आजही इतक्या वर्षानंतर ही कविता माझी तोंडपाठ आहे .. खरोखर या राजकीय लोकांनी सर्वसामान्य माणसांना इतक्या वेगवेगळ्या प्रकराच्या समस्यात ..भेदात ..दुहित ..इतके छान अडकवून ठेवले आहे की सर्वसामान्य जनता त्यांच्या विरोधात एकत्र येवून कधीच आंदोलन करू शकत नाही ... 

( बाकी पुढील भागात ) 

=======================================================================

पुन्हा एकदा अलार्म ! ( भाग १३९ वा ) 


मेंटल हॉस्पिटल मध्ये तसा जेल पेक्षा सुरक्षित कारभार असतो .. कारण कैदी अन मनोरुग्ण यातील प्रमुख फरक हा की समजून उमजून .. एखाद्या विकाराच्या अधीन होऊन गुन्हा केलेले ..आणि त्या बद्दल शिक्षा प्राप्त झालेले लोक जेल मध्ये असतात ..या पैकी बहुतेकांना ..आपण केलेल्या चुकांचा पश्चाताप होण्याऐवजी ..पकडले गेल्याचे दुखः जास्त असते .. आणि पुढच्या वेळी पकडले न जाता गुन्हा करण्याची योजना सतत मनात घोळत असते बहुतेकांच्या .. सुधारण्याऐवजी ....ते गुन्हेगारीच्या नवनवीन कल्पना आत्मसात करू शकतात .. तर मेंटल हॉस्पिटल मध्ये ...न केलेल्या ..गुन्ह्यांची शिक्षा निसर्ग देत असतो ...आता हे असे का ? काही जन्मतः... अपंग वेडे वाकडे जन्माला येतात ..त्यांच्या मेंदूतील काही रासायनिक बिघाड त्यांना सर्व सामान्य माणूस म्हणून जगण्यापासून देऊ ठेवतो .. तर काहीना आयुष्याच्या वाटेवर काहीतरी मानसिक आघातामुळे .. अचानक अश्या बिघडले पणाला सामोरे जावे लागते .. आणि सर्व सामान्य लोकांमध्ये राहण्याच्या कामाचे नाहीत म्हणून मेंटल मध्ये आणले जाते ..ज्या प्रमाणे काही शारीरिक आजार पूर्ण बरे होत नाहीत .. अधूमधून डोके वर काढतात ..तसेच मानसिक आजारांचे देखील आहे .. काही मानसिक आजार .. पूर्ण बरे न होता ..दिवसेंदिवस परिस्थिती डॉक्टरांच्या दृष्टीने अधिक अधिक बिघडत जाते ..आणि मग कायमचे मेंटल हॉस्पिटल मध्ये राहावे लागते .. प्रगत शास्त्राकडे अजूनही अशा दुर्धर मानसिक व शारीरिक आजारांसाठी उपाय सापडले नाहीत .. शेवटी डॉ . आम्ही शर्थीचे प्रयत्न करतो आहोतच ..मात्र शेवटी त्याची इच्छा म्हणून आभाळाकडे बोट दाखवितात .. येथे आठ नंबर आणि एक नंबर हे वार्ड ' क्रिमिनल ' म्हणून ओळखले जातात हे मी मागे सांगितले होते .. तर आमच्या १८ AB या वार्ड च्या मागील बाजूस हा आठ नंबर वार्ड होता .. तेथे वेडाच्या भरात खून केलेले ... कोणावर तरी जीवघेणा हल्ला केलेले .. त्यांच्या आजारामुळे कधीही आक्रमक होऊ शकणारे असे रुग्ण ठेवले जात असत .. मला या वार्ड बद्दल खूप कुतूहल होते ..मात्र तेथे ड्युटीवर असलेल्या अटेंडंटशी फारशी ओळख नसल्याने मला तो वार्ड आतून या पूर्वी पाहता आला नव्हता ..एकदा माझा अटेंडंट मित्र शत्रू याची तेथे ड्युटी लागली ...त्याने मग मला तो वार्ड आतून दाखविला .. वेगवेगळ्या स्वतंत्र खोल्या ..सर्व खोल्यांची तोंडे बाहेरच्या व्हरांड्याकडे .. समोर भक्कम गज लावलेली जाळी ..आत मध्ये पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासारखा ..येरझाऱ्या घालणारा ..किवा खोलीत भिंतीला टेकून बसलेला ..भावरहित डोळे .. कठोर चेहरा .. असा आतील मनोरुग्ण पाहून भीतीच वाटे ...काही जण जरा माणसाळत असलेले अधून मधून खोलीच्या बाहेर काढले जात .. तुलनेत चांगले असलेले वार्डचे जेवण चहा वगैरे आणण्यात मदत करत .. 

काही चतुर गुन्हेगार ..गुन्हा केल्यानंतर शिक्षा होऊन जेल मध्ये राहावे लागू नये म्हणून कोर्टात वेडाचे सोंग घेतात ...त्या साठी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रमाणपत्रे जोडून .. जेल मध्ये राहण्या एवजी कमी त्रासदायक म्हणून मेंटल हॉस्पिटल मध्ये राहणे पसंत करतात .. येथेही तसे दोन जण होते ..त्यापैकी एक खरोखर मनोरुग्णा असावा असा संशय येण्याइतपत विचित्र वागत असे ..तर दुसरा मात्र कोणतेही वेडाचे लक्षण नसलेला असा मला वाटला .. त्याचे नाव वाजीदअली आहे असे समजले ..अंगाने मजबूत ..जरा बुटका .. हसतमुख असा वाजीदअली ...अनेक वर्षांपासून आठ नंबर वार्ड मध्ये आहे अशी माहिती मिळाली ..त्याने खून केला होता .. आणि जेल मध्ये जाण्याऐवजी तो कोर्टात मनोरुग्ण आहे असे सिद्ध होऊन येथे राहत होता .. घरचा चांगला श्रीमंत होता ..त्याला रोज घरून तीनखणी डबा येत असे ..तसेच त्याच्या जवळ नेहमी भरपूर पैसे देखील असत ..त्या पैश्यांच्या जोरावर त्याने सगळ्या अटेंडंट ना विकत घेतले असावे असे वाटे ...अधून मधून त्याला दारू ...देखील मिळत असावी ..तो रात्रीचा जुगारी अटेंडंट बरोबर पत्ते कुटण्यातला साथीदार देखील होता ..एकंदरीत त्याने सर्वांचा चांगला विश्वास संपादन केलेला होता ..आठ नंबर वार्ड पाहिल्यानंतर माझ्या लक्षात दोन जण राहिले ..एक जण दिलीप म्हणून पत्रकार होता ..अतिशय हाडकुळा .. हाडे वर आलेली .. चेहऱ्यावर भीतीचे भीतीचे भाव ...याचा नेमका गुन्हा काय ..ते कोणी सांगितले नाही मला मात्र ..त्याला दर चार तासांनी म्हणे एक इंजेक्शन द्यावे लागे .. हा दिलीप कोणाशीही कधीही बोलत नसे ..मी जेव्हा वार्ड पाहायला गेलो ..तेव्हा त्याला बाहेरून हँलो केले ..तर नुसताच तोंडाकडे पाहत राहिला .. मग मी एक बिडी पुढे केली तर पटकन उठून माझ्या हातातील बिडी घेतली ..आणि हलकेच स्मित केले फक्त मात्र बोलला नाही काही .. 

एकदा रात्री सुनील आणि मी ..चेस खेळत असताना ११ च्या सुमारास एकदम वार्ड नंबर १८ च्या बाजूने गोंधळ ..आरडा ओरडा एकू आला .. आम्ही खिडकीतून पहिले तर बरेच लोक वार्डच्या बाहेर जमलेले दिसले ..मग जोरात शिट्या फुंकल्याचा आवाज आला ..अजून गर्दी जमली .. अटेंडट ने अशी शिटी फुंकणे म्हणजे धोक्याचा इशारा असे ..शिटी फुंकून तो इतरांची मदत मागत असल्याची निशाणी होती ..मला खूप उत्सुकता होती बाहेर जावून काय घडते आहे हे पाहायची ..पण सुनील ने मला रात्रीचे बाहेर जाण्यास मनाई केली ..म्हणाला सकाळी समजेलच सारे आपल्याला काय घडले ते ...दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी आली की वाजीदअली गेला .. रात्री हार्टफेल ने वारला .. मग पुन्हा सकाळी ड्युटीवर आलेल्या खाजगी अटेन्डट बाळू याने सविस्तर बातमी सांगितली की ..रात्री म्हणे ८ नंबर मधील अटेंडंट वार्डच्या किल्ल्या वाजीदअली कडे देवून जेवायला गेले असताना .. अचानक वाजीदचे डोके फिरले ..बहुधा दारू देखील प्यायलेला होता तो ..त्याने वार्डचे गेट आतून लावून घेवून ..मग बंद खोल्यांमध्ये असलेल्या एकेका मनोरुग्णाला आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने बाहेर ओढून उगाचच मारहाण सुरु केली होती .. अगदी बेफाम झाला होता वाजीदअली .. ड्युटीवरचे अटेंडंट जेवून परत आले होते त्यांनी बाहेरून वाजीदकडे किल्ल्या मागितल्या मात्र तो कोणाचेही ऐकायला तयार नव्हता ..अगदी रणकंदन माजवले होते त्याने .. मग पप्पू नावाच्या एका पायाने अधू .. असलेल्या मनोरुग्णाने जर धाडस करून वाजीद च्या हाताला कडकडून चावा घेतला तेव्हा त्याच्या हातातील किल्ल्या बाहेर गेटजवळ फेकल्या गेल्या ..अटेंडंट ने त्या किल्ल्या पटकन आत हात घालून हस्तगत केल्या ... मग सगळे अटेंडट आत शिरले ..बेफाम झालेल्या वाजीदला पकडले गेले ..त्याला बांधून ठेवले गेले ..आणि रात्री म्हणे झोपेतच हार्ट अँटँक येवून वाजीद मरण पावला ...आधीच्या सगळ्या कथेवर माझा विश्वास बसला ..मात्र नंतर वाजीदला रात्री बांधून ठेवल्यावर त्याला हार्ट अँटँक येवून तो मरण पावला ..या गोष्टीवर अजूनही माझा विश्वास बसलेला नाहीय ..पप्पू नंतर बाहेर भेटला तेव्हा त्याला काय झाले ते विचारले ..हा पप्पू पूर्वी पाकीटमार होता .. एकदा त्याला पाकीट मारताना पब्लिकने पकडून बेदम मार देवून धावत्या लोकलच्या खाली फेकून दिले होते म्हणे ..त्यावेळी त्याचा एक पाय मोडला होता ..व डोक्याला मार लागून त्याला फिट आली होती ..तेव्हापासून तो मनोरुग्णा झाला ....पप्पू ने देखील तेच सांगितले ..आधी पप्पू ने फुशारकी मारत बाजीदअली च्या हाताला कसा चावलो ..किल्ल्या कश्या हाती लागल्या ..वगैरे वर्णन केले शेवटी ' बादमे साले वाजीद को पकडकर बांधा था ..कैसे मर गया मालूम नही ....मै तब सो गया था " असे सांगितले ..! 

=======================================================================

भाग १४० वा   काहे को ..दुनिया बनाई ... !

या वेळी मेंटल हॉस्पिटल मध्ये पूर्वीसारखी मजा येत नव्हती .. उगाच कसे तरी ढकलायचे म्हणून दिवस मी ढकलत होतो .. राहून राहून अनघाचा विचार मनात येत असे .. ती कोठे असेल ? ..आपली आठवण करत असेल का ? परत तिचे पत्र येईल नक्की आपल्याला मागच्यावेळे सारखे ...या आशेने रोज सकाळी १ वा. पर्यंत मी हॉस्पिटल च्या मेनगेट पाशी बसून पोस्टमन आला की माझ्या नावाचे पाकीट आहे का हे पाहत असे ... हे असे वाट पाहणे जीवघेणे असायचे .. पोस्टमन ने पत्र नाही सांगितले की ..मग पाय ओढत वार्डात यायचे .. माझे जेवण काढून ठेवलेले असायचे ते पोटात ढकलायचे ...मग दिवसभर उगाच इकडे तिकडे टंगळ मंगळ .... रात्री उलटेसुलटे विचार करून झोपेचे खोबरे .. घडल्या प्रकारचा दोष कोणावर तरी ढकलून उगाच माझ्यावर किती अन्याय होतोय अशी मानसिकता ...कधी कधी तर असे वाटे एकदाचे लवकर तिसरे महायुद्ध होऊन सगळे सगळे संपून जावे.. एकदा दुपारचा असाच फिरत फिरत वार्ड न. १३-१४ मध्ये गेलो होतो ..येथे 'इपिलेप्सी ' या आजाराचे मनोरुग्ण ठेवलेले होते ... बहुतेकांचे चेहरे भयानक झालेले .. वारंवार फिट आल्याने त्यांचे पुढचे दात तर हमखास गायब झालेले .. अचानक फिट आल्यावर तोंडावर पडल्याने ..किवा ओठ दाताखाली आल्याने ८० टक्के लोकांच्या ओठावर....कपाळावर..अथवा हनुवटीवर जखमांचे भयानक व्रण ... भेसूर दिसायचे बिचारे ..शिवाय जेवणाची आबाळ झाल्याने दिवसेंदिवस खराब होत चाललेली तब्येत ..एखाद्याला रस्त्यात फिट आल्यावर .कांदा फोडून त्याच्या नाकाशी धरणे ..चप्पल सुंघवणे वगैरे गोष्टींबाबत मी ..तेथील डॉक्टर कडे माहिती विचारली ..तर त्याने या गोष्टींचा फिट शी काहीही शास्त्रीय संबंध नाही असे सांगितले .. मेंदूत अपघाताने निर्माण झालेल्या रासायनिक बिघाडामुळे ..किवा जन्मतः मेंदूच्या विकासातील काही कमतरतेमुळे हे असे होते असे त्यांनी सांगितले ...चप्पल वगैरे सुंघवण्याऐवजी ...त्याला कुशीवर वळवणे .. त्याचे कपडे सैल कारणे ..फिट आलेल्या अवस्थेत त्याला स्वतचे रक्षण करता येत नसल्याने त्या काळात त्याला काही इजा येणार नाही याची काळजी घेणे ..डोक्याखाली उशी किवा मऊ वस्तू ठेवणे ज्यामुळे त्याचे डोके जमिनीवर वगैरे आपटून डोक्याला इजा होणार नाही ..किवा दाताने ओठाला ..अथवा जिभेला इजा न होण्यासाठी काळजी घेणे वगैरे गोष्टी सांगितल्या .. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अश्या माणसाला तो पूर्ण शुद्धीवर येवून पाणी मागे पर्यंत जबरदस्ती पाणी पाजण्याचा प्रयत्न न करणे ..कारण अश्यावेळी पाणी श्वासनलिकेत जावून जीवघेणा ठसका लागण्याची शक्यता असते .

येथेही एक विचित्र प्रकार समजला .. अर्थात यात कितपत सत्यता आहे हे पडताळणे जरा कठीणच होते .. तेथे असलेल्या एका खाजगी अटेंडंट ने एका जन्मतः मुक्या... दात पडून चेहरा अतिशय विद्रूप झालेल्या साधारण तिशीच्या व्याक्तीकडे बोट दाखवून ..सांगितले की येथे पूर्वी एक समलिंगी संबंधाची आवड असलेल्या अटेंडंट ने याच्या वर त्याचे समलिंगी संबंधांचे प्रयोग केले होते ..हा ओरडला तेव्हा सगळे बिंग बाहेर पडले ... मग त्या अटेंडंट वर कारवाई झाली .. हे ऐकून मला कसेतरीच झाले ...ही अशी ओढ एखाद्याच्या मनात कशी निर्माण होत असेल ? असा प्रश्नही मनात डोकावला ....असे काही लोक बाहेरच्या जगात देखील मी ऐकून होतो .... असे लोक ..उगाचच जवळीक करतात ..अंगाला हेतुपूर्वक नको त्या जागी स्पर्श करून ...एखाद्याची चाचपणी करतात हे माहिती होते....लहान मुलांना अश्या लोकांपासून धोका असतोच ..इतकेच नव्हे तर एखाद्या मुलाला हे अश्या प्रकारे बिघडवू देखील शकतात ...म्हणजे अश्या प्रकारच्या संबंधाची चटक लावून देवू शकतात ...त्याच्या मानसिकतेत बिघाड निर्माण होऊन ..लैंगिक संबंध म्हणजे हे असेच असते अशी अशी भावना वाढीस लागून ..तो देखील पुढे अश्या संबंधात इतरांना ओढू शकतो ...काही जणांच्या बाबतीत निसर्गतः हार्मोनल असंतुलनामुळे अशी लक्षणे उद्भवतात हे नंतर समजले ..एकदा तर अश्या प्रवृत्तीच्या एका व्यक्तीला एकांतात गाठून लुबाडण्याचा आमचा प्रयत्न फसला देखील होता ...

मेंटल हॉस्पिटल मध्ये अजून एक गोष्ट लक्षात आली ..की तेथे असलेल्या अनेक मनोरुग्णांना ..धड कपडे घालणे .. अंघोळ करणे ..जेवणे ... सुसंगत बोलणे ..अथवा विचार करणे ..त्यांच्या आजारामुळे येत नसले तरी लैंगिक सुखाच्या पूर्तीची ओढ मात्र कायम असे ...निसर्ग या बाबतीत त्याचे काम चोख करत असे ...अश्या लोकांना हस्तमैथुन मात्र बरोबर समजत असे .. काही जण तर दिवसातून चार पाच वेळा असे करीत असत .. हे सगळे पाहून कधी कधी मानवी जीवनाचे खूप वैषम्य वाटे ... नैसर्गिक किवा उपलब्ध बौद्धिक ..शारीरिक ..भौतिक ..क्षमतांचा जास्तीत जास्त गैरवापर करण्यात मानवाचा कोणी हात धरू शकणार नाही हे नक्की ... याचे कारण बुद्धीला विवेकाचा लगाम नसणे हेच असावे ... आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही हा माज ..नाहीतर क्षणिक सुखासाठी काहीही करायची मानसिकता ... त्यामुळे माणूस सर्व कौटुंबिक ..सामाजिक आणि नैसर्गिक बंधने माणूस झुगारून देवू शकतो ...मी देखील असाच माझ्या बौद्धिक क्षमतांचा गैरवापर व्यसने करण्यासाठी करत होतो .. केवळ मनाला बरे वाटते ..काही काळचा ..तणावमुक्तीचा अनुभव ... मनोराज्ये रचण्यासाठी नशा केल्यावर मिळणारी स्फूर्ती .. यासाठी मी वारंवार सगळे जीवन असेच पणाला लावत होतो .... नुकसान झाले की तात्पुरता .. माफी मागत होतो .. काही काळ व्यसने बंद करत होतो ..मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या ...आणि वर नुकसान झाले की दोष स्वतःकडे न घेता .. माणसे ..परिस्थिती .. व शेवटी नशिबाला दोष देत होतो .. अनघाच्या प्रकरणात सगळा दोष माझाच होता ..तरीही मला वाटत होते की माझे नशीब खराब आहे .. मला कोणी सहकार्य करत नाही .. सगळे जग स्वार्थी आहे ..ढोंगी आहे वगैरे .. खरेतर सगळ्यात जास्त स्वार्थी आणि ढोंगी ..दुटप्पी वागणारा मी होतो .. हे लक्षात आले की ..पण मनातील स्वतचे समर्थन करणारा वकील .. जगात आपल्यापेक्षा कितीतरी लोक जास्त वाईट वागतात .. खून ..बलात्कार करतात .. जमिनी हडपतात .. आपल्या मानसिक आनंदासाठी अनेकांचा प्राण वेठीस धरतात ... मी तर फक्त व्यसने करतो .. असे स्वतःला समजावून पुन्हा माझा व्यसनमुक्तीचा निश्चय डळमळीत करण्याचे काम करत होता .

एकदा रात्री एक दीड च्या सुमारास नाईट ड्युटीवर असलेल्या सुनीलशी .. चेस खेळत बसलो असताना ..आमच्याच तिसऱ्या मजल्यावर असेलल्या समोरच्या १८ CD या वार्डातून एकदम काहीतरी धाडकन पडल्याचा ..आणि एखादे भांडे जमिनीवर पडल्यावर जसा कर्कश्य आवाज होतो तसा आवाज आला ..मग पुन्हा शांतता .. रात्रपाळीचा ओवरसीयर नुकताच व्हिजीट देवून गेला होता ..व आम्हीही लवकरच झोपण्याच्या तयारीत होतो ..हा एकदम कसला आवाज आला हे जाणून घेण्याची दोघानाही उत्सुकता होती ..मात्र थंडी इतकी वाजत होती त्या दिवशी की आम्हाला उठून काय घडले आहे ते पाहण्यासाठी उत्साह नव्हता ..मी सुनील ला म्हंटले देखील ' चल पाहून येवू समोरच्या वार्डात काय झालेय ते .. ' यावर सुनील म्हणाला ' तिथे अटेंडंट आहे ना ड्युटीवर ..काही विशेष असेल तर तो येईलच आपली मदत मागायला ..तू काळजी नको करूस ' मग आम्ही झोपलो ..पहाटेचार च्या सुमारास समोरच्या वार्डातील अटेंडंट येवून आमच्या वार्डचा दरवाजा ठोकू लागला ..तो खूप घाबरलेला दिसला ... अगदी बोबडीच वळली होती त्याची ..काय झाले म्हणून ते पाहायला मग आम्ही त्याच्या मागोमाग गेलो .. वार्डातील हॉल मध्ये शिरलो आणि समोरचे दृश्य पाहून जागेवरच थिजलो .. वार्डच्या मध्यभागी ...बाळू नावाचा एक जुना पेशंट उताणा पडला होता ..त्याच्या डोक्याखाली रक्ताचे थारोळे साचलेले ... प्राण सोडताना शेवटचे आचके दिल्यासारखे हात पाय झाडत होता ... सताड उघडे डोळे आकाशाकडे .. त्याच्या पासून दूर सगळे वार्डातील इतर पेशंट भेदरून गोलकार उभे होते ..त्याच्या बाजूला एक स्टीलची कप्पे असलेली थाळी पडलेली ..

( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें