प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.com



सोमवार, 11 मार्च 2013

लोका सांगे ब्रह्मज्ञान ....!

भाग ११ 

मला आतून पक्के माहित होते की अतृप्त आत्मे , शनी महाराज वगैरे मला त्रास देत नाहीयेत तर माझे विचार आणि वर्तन माझ्या अधःपतनास जवाबदार होते , मात्र हे मला उघडपणे मान्य करणे कठीण जात होते . माझा दिवसातील जास्तीत जास्त वेळ गांजा पिणे , वाचन आणि मित्रांबरोबर टिवल्याबावल्या करण्यात जात असे, त्याच काळात ' श्रीमद्भगवद्गीता ' जशीआहे तशी वाचनात आली , गीतेतील प्रत्येक श्लोकाचा सुलभ मराठी भाषेतील अर्थ त्यात दिलेला होता .. कुरुक्षेत्रावर लढाईसाठी सज्ज असलेल्या अर्जुनाला समोर शत्रू सैन्यामध्ये आपले गुरु ... पितामह .. करोडो सैनिक दिसल्यावर ..आपल्या हातून यांचा उत्पात होणार या कल्पनेने अनेक प्रश्न पडले .. त्याची द्विधा मनस्थिती झाली इतका प्रचंड संहार करून मी नेमके काय साध्य करणार आहे ? हा युद्धाचा अट्टाहास कितपत योग्य आहे ? त्यापेक्षा सरळ युद्धविराम का देऊ नये ? अनेक प्रश्नांनी व्याकुळ आणि विषादग्रस्त झालेल्या अर्जुनाचे आणि मग त्याच्या एकेक प्रश्नाचे निराकरण करून त्याला युद्धास प्रेरित करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने त्याला केलेल्या उपदेशाचे वर्णन वाचणे हा एक अतिशय दिव्य अनुभव होता . खरेतर इतका सुंदर ग्रंथ नक्कीच जर अर्थ नीट समजून घेऊन वाचला असता तर मला खूप फायदा झाला असता पण त्या वयात प्रगल्भ बुद्धी नसल्याने मी सर्व ग्रंथाचा एकंदरीत अर्थ असा काढला की जीवन म्हणजे माया .. मिथ्या आहे .. सारे काही सोडून शेवटी अटळ मृत्यू ला सामोरे जायचे आहे .. धन , सत्ता , अधिकार , नातीगोती , सर्व काही व्यर्थ आहे ... जर हे सर्व काही मिथ्या आहे तर मग ते मिळवण्याचा प्रयत्न तरी का करावा ? असा सोपा निष्कर्ष मी काढला माझ्या त्यावेळच्या मनस्थितीला साजेशा असा हा निष्कर्ष होता .

त्यामुळे मी आभ्यास .. करियर .. सगळे व्यर्थ आहे असा समज करून घेतला व जे सर्व सोडून जायचे आहे ते मिळवायचेच कशाला ? गांजा ओढल्यावर तर हा विरक्तीचा भाव अधिकच गहिरा होत असे .. जसे जसे सिगारेट .. गांजा .. सिनेमा अश्या गोष्टींमध्ये जास्त पैसा खर्च होऊ लागला तसेतसे घरात माझे वेगवेगळ्या खोट्या कारणांनी पैसे मागण्याचे प्रमाण वाढले , मध्यमवर्गीय घरात असे रोज पैसे मिळणे शक्यच नव्हते .. मग मी पैसे मिळवण्याचा मार्ग शोधू लागलो .. नाशिकरोड रल्वे स्टेशन म्हणजे जणू आमचे आंगणच होते . द्राक्षांच्या सिझन मध्ये तेथून हजारो पेट्या द्राक्षे , कलकत्ता , दिल्ली , पटना तसेच देशाच्या इतर भागात पाठवली जात असत द्राक्षे हा नाशवंत माल असल्याने प्रवासी रेल्वे गाडीला शेवटी किवा पुढे जे दोन गुड्स चे डबे असे त्यात जास्तीत जास्त पेट्या पाठविल्या जाव्यात म्हणून व्यापारी वर्गाची चढाओढ असे रात्रीच्या वेळी अश्या एकूण चार लांब पल्ल्याच्या मुंबईहून येणाऱ्या गाड्यात या द्राक्ष्याच्या पेट्या चढवण्यासाठी हे व्यापारी हमाल नेमत असत , या हमालाचे काम म्हणजे गाडीचा गुड्स पार्सल चा डबा ज्या ठिकाणी येतो तेथे द्रक्ष्यांच्या पेट्या वाहून नेणे आणि गाडी आली की पटापट त्या पेट्या पार्सल च्या डब्यात चढवणे , एका गाडीचे त्यावेळी एका हमालाला ५ रुपये मिळत , त्यावेळी माझा खर्च ( १९८२ साली ) सुमारे १५ रुपये होता हा खर्च काढण्यासाठी मी स्टेशनवर हमाली करण्यास जाऊ लागलो .

दिवसा नशा आणि रात्री नशेसाठी पैसे मिळावेत म्हणून हमाली असे सुरु झाले . एक पेटी ४ किलो वजनाची असे अश्या सुमारे चार ते पाच पेट्या एकावेळी हातात घेऊन गर्दीत धावपळ करून त्या पार्सलच्या डब्यात टाकणे.. मग पुन्हा तेच ..असे गाडी स्टेशनात असे पर्यंत म्हणजे सुमारे ५ ते ७ मिनिटे चाले .. हे काम तसे जीकीरीचेच होते .. आमचा आठ दहा व्यसनी मित्रांचा समूह हे हमाली चे काम रात्रीच्या वेळी करू लागला त्यासाठी मी रात्री ११ ते सकाळी ४ या वेळात मी रेल्वे स्टेशन वर राहू लागलो .एकंदरीत रात्रभरात तीन ते चार गाड्या वर हमाली करत होतो .ज्या ठिकाणी माझे वडील चांगल्या हुद्यावर नोकरी करत होते तेथेच मी रात्री हमाली करत असे , सुरुवातीला मी हे घरी कळणार नाही याची काळजी घेतली , पण लवकरच ते घरी समजले वडील मला रागावले पण माझे उत्तर होते की तुम्ही मग मला जास्त पैसे का देत नाही ? आणि मी कष्टच करतोय ना ? चोऱ्या तर करत नाही ! काय बोलणार यावर ते बिचारे ?

सुहास शिरवळकर यांचे ' दुनियादारी ' एक पुस्तक देखील त्या काळात वाचले होते ज्यात कॉलेज मधील मित्रांच्याटोळक्याच्या गमतीजमती , व्यथा , प्रेमप्रकरणे , आणि शेवटी शिक्षण संपल्यावर एकमेकांपासून दूर जाणे असे सगळे वर्णनहोते हे पुस्तक वाचून देखील माझा विरक्तीचा भाव वाढत गेला होता , अर्थात त्यात पुस्तकाचा दोष नाही तर माझा दृष्टीकोनदोषी होता .

========================================================================



 भाग १२ लोका सांगे ब्रह्मज्ञान ....!

आमची गांजा ओढणारी टीम आता वाढत चालली होती , दारूचा पटकन तोंडाला वास येतो मात्र गांजाचे तसे होत नाही ,.. फक्त पिताना गांजाच्या धुराचा वास दरवळतो आणि अनुभवी किवा जाणकार लोकांनाच गांजा , चरस वगैरे च्या धुराचा वास कळतो , एकदा गांजा ओढून झाला की तोंडाला दारू सारखा भपकारा येत नाही त्यामुळे आम्ही दारू चे सेवन क्वचित आणि गांजा मात्र नियमित ओढत असू , दारू चढल्यावर बहुतेक वेळा भांडणे , शिवीगाळ , फालतू बडबड असे प्रकार घडतात पण गांजा चे मात्र तसे नाही बहुधा गांजा ओढणारे शांत राहतात भांडणे वगैरे प्रकार त्यांना मानवत नाहीत . उलट ते गांजाच्या तारेत अगदी विश्वकल्याणाचे देखील विचार करू शकतात व बारीक सारीक गोष्टींची गम्मत वाटून भरपूर हसतात देखील . आम्हाला गांजाच्या सेवनाने त्यावेळी जास्त मजा येत असे व ही मजा इतर मित्रांना देखील मिळावी या हेतूने आम्ही आमच्या मित्रांना देखील ' अरे खूप मजा येते , एकदा ओढून तर बघ ' असा आग्रह करून आमच्यात सामील करून घेत असू , त्यांना आमच्यासारखे बिघडवणे हा विचार अजिबात त्यामागे नव्हता तर त्यांना आमच्या सारखी मजा यावी हा प्रामाणिक हेतू असे , अर्थात आम्ही स्वतः देखील खड्ड्यात चाललो होतो आणि त्यानाही सोबत नेत होतो हे फार उशिरा समजले .

अश्या प्रकारे सिन्नर फाटा , विष्णू नगर , आणि नाशिकरोड च्या बिटको कॉलेज मधील काही मुले असा आमचा चांगला १५ ते २० जणांचा ग्रुप तयार झालेला होता . नाशिक रोडला ' मुक्तिधाम ' समोर एक छोटे ' दुर्गा गार्डन ' आहे . दुर्गा देवीचे मंदिर आहे तेथे आणि मग बागेत मस्त हिरवळ आहे , तसेच 'वसंत व्याख्यान माले साठी ' तेथे एक छान छोटेसे म्हणजे १५ बाय २० चे स्टेज बनवलेले आहे , या बागेत सहसा फारशी गर्दी नसे दोनचार रिकामटेकडे , आणि आमच्यासारखे व्यसनी यांची मात्र बरीच वर्दळ होती आम्ही दुपारी आणि सायंकाळी तेथे स्टेज वर बसून मस्त गांजा ओढत असू . एकदा का चिलीमीचे दोन तीन दम मारून झाले की मग वेगवेगळ्या विषयांवर मोठी मोठी चर्चा होत असे ज्यात देशभक्ती ..जातीयवाद.. धर्मवाद ..पासून ते राजकारण , इतिहास .. समाजकारण .. सिनेमा असे सगळे विषय असत व अगदी मोठ्या तत्ववेत्त्याच्या आविर्भावात आम्ही चर्चेतून काही निष्कर्ष देखील काढीत असू त्याचे आम्हाला खूप छान वाटे , एकीकडे आपण सगळे गांजा ओढून काहीतरी चूक करत आहोत ही भावना सगळ्यांच्या मनात होतीच पण अश्या मोठ्या चर्चा करून उलट आम्ही किती चांगला विचार करतो असे वाटून त्यातच आम्ही धन्यता मानत असू . त्यावेळी खलिस्तान .. इराण- इराक युद्ध ..भ्रष्टाचार . अश्या त्यावेळच्या सगळ्या गंभीर समस्यांवर आम्ही चर्चेतून उपाय शोधले आहेत . अर्थात ते उपाय त्या चर्चेनंतर सगळे जण विसरून जात होतो .

एकाने कल्पना काढली की आपण सर्वानी काहीतरी सामाजिक कार्य देखील केले पाहिजे आणि ठरले ' शीतल ' ग्रुप या नावानेआम्ही एक समूह सुरु केला रजिस्ट्रेशन वगैरे केले नाही पण समूह सुरु झाला ' शीतल ' म्हणजे थंड .. विसावा देणारे .. शांत.असा या समूहाचा अर्थ होता तसेच नाशिकरोड ला गांजा ओढून झाल्यावर एका होटेल मध्ये आम्ही चहा पाणी घेत होतो त्याहॉटेलचे नाव देखील ' शितल ' होते म्हणून हे नाव ठरले . शीतल ग्रुप तर्फे आमची पहिली मोहीम ठरली ती ' स्वच्छता मोहीम' शहरातील लोकांना स्वच्छतेचे महत्व कळावे शहरातील रस्ते स्वच्छ ठेवावेत असे लोकांना वाटले पाहिजे व त्यासाठी एकदाआपण शीतल ग्रुप च्या सदस्यांनी रस्ते झाडून काढावेत अशी योजना तयार झाली .. ८ दिवसांवरच गांधी जयंती होती वआमच्या स्वच्छता मोहिमेची सुरवात करायला हा अतिशय योग्य दिवस होता . आम्ही योजना तयार केली .. ठरले ..२ ऑक्टोला पहाटे ५ वा . सर्वानी सोबत एक खराटा किवा झाडू घेऊन देवळाली च्या सुरवातीला असलेल्या म. गांधी यांच्या पुतळ्याजवळ जमायचे आणि तेथून पुतळ्याला हार घालून झाडू मारण्यास सुरवात करायची ते रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांचा पुतळा आणि तेथून पुढे बिटको चौकाच्या अलीकडे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पर्यंतचा रस्ता झाडून स्वच्छ करायचा . आम्ही उत्साहाने कामाला लागलो योजना पक्की झाली त्यावेळी दोनच स्थानिक वर्तमानपत्रे होती ' गावकरी ' आणि ' देशदूत ' त्यात बातमी तयार करून पाठवली . आदल्या दिवशी रात्रीच आम्ही , सकाळी कामालाजास्त उर्जा मिळावी म्हणून गांजा घेऊन ठेवला होता (त्याकाळी नाशिक मध्ये ( १९ ८२ ) जरा बरी थंडी असे ऑक्टोबर मध्येदेखील ) पहाटे ४ वाजता आधी आम्ही काहीजण जमलो आधी चिलीम ओढून झाली आणि मग तेथून सगळे गांधीपुतळ्याकडे कुच केले .सगळ्यांच्या हातात झाडू अथवा खराटे होते आणि डोक्यात गांजाची नशा !
 
========================================================================

भाग १३  गांधीजयंती ची सफाई मोहीम !

पहाटे पहाटे गांजाचे दम लावून आमची गँग सफाई मोहिमेवर निघाली काही जणांच्या हातात झाडू होते , तर काहींनी खराटे आणले होते मात्र दोन जणांनी काहीच आणले नव्हते त्यांना विचारले तर म्हणाले घरचे झाडू , खराटे सकाळी घरी लागतात म्हणून नाही आणले , मात्र हे दोघेही एकदम झकपक कपडे घालून आले होते त्यापैकी एकाने नवा 'सफारी ' आकाशी रंगाचा तर दुसऱ्याने झब्बा आणि पायजामा घातला होता क्रीम कलरचा , मला त्यांचे ते कपडे पाहून जरा नवल वाटले हे असे कपडे घालून हे कसले झाडू मारणार ? आणि झालेही तसेच आम्ही गांधी पुतळ्यापासून झाडू मारण्यास सुरवात केली आणि हे दोघे ' इथे झाडा , या बाजूने जास्त कचरा आहे ' वगैरे सांगत मार्ग दर्शन करू लागले , शेवटी मी वैतागून सफारी वाल्याच्या हातात माझा झाडू दिला तर त्याने तो फक्त २ मिनिटे हातात धरला व परत दिला . हे दोघे नेतागिरी करणाऱ्यांपैकी होते हे लक्ष्यात आले माझ्या . एव्हाना सकाळचे ६ वाजून गेले होते आणि सकाळी फिरायला जाणारे , तसेच रस्त्याने जाणारे येणारे लोक आम्हाला पाहून थबकत होते , आमचे दोघे नेता मित्र अगदी अदबीने लोकांना नमस्कार करून आमच्या कार्याची माहिती देत होते .

सुमारे ८ वाजेपर्यंत आम्ही रस्ता झाडत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोचलो , पुतळ्याच्या कुंपणाच्या आतील आणि बाहेरील परिसर स्वच्छ केला आणि आमचे काम थांबले , सर्व चांगलेच घामाघून झाले होते . तेथून लगेच सगळी मंडळी पुन्हा श्रमपरिहार म्हणून मग गांजाच्या अड्ड्यावर निघाली .सफारी आणि झब्बा वाले त्या दिवशी जरा जास्तच खुश होते हे जाणवले एकंदरीत त्या वेळी मला राजकारण वगैरे फारसे समजत नव्हते पण राजकारण म्हणजे नक्की काय ते या दोघांमुळे थोडेफार समजले . तेव्हापासून सफारी आणि झब्बा पायजमा घातलेले लोक दिसले की मला उगाचच ते देखील मुरलेले राजकारणी असावेत असे वाटत राहते .

आमच्या या मोहिमेची चांगलीच चर्चा झाली व त्यावेळी आम्हाला वाटेत भेटलेल्या कदम सरांनी ( सरस्वती क्लासेस चेसंचालक ) मदत देखील करण्याचे आश्वासन दिले . त्यावेळी नाशिक रोड ला दहावी ची शिकवली ( क्लास ) घेण्यात सरस्वतीक्लासेस चे मोठे नाव होते तर नाशिक ला 'गायकवाड ' क्लासेस प्रसिद्ध होते . कदम सरांनी मदत करण्याचे आश्वासनदिल्यावर आम्ही लगेच दुसरी योजना आखली आम्ही बहुतेक जण ज्या 'बिटको ' कॉलेज मध्ये होतो तेथे निबंध स्पर्धाघेण्याचे ठरले . गांजा पिऊन खूप चर्चा करून शेवटी निबंधासाठी दोन विषय निवडले १ ) आजच्या तरुणांचे कर्तव्य २)सामाजिक बांधिलकी ३) कॉलेज च्या नोटीस बोर्डवर तशी नोटीस लावली. प्रथम . द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना बक्षिसेदेण्याची जवाबदारी कदम सरांनी स्वीकारली त्यांनी त्यासाठी त्या काळी ५०० रुपये दिले . स्पर्धेत एकूण २० निबंध आलेत्यापैकी राम कुलकर्णी या आमच्या पेक्षा २ वर्ष सिनियर असलेल्या तरुणाला पहिले बक्षीस मिळाले. ( श्री . राम कुलकर्णी हेपुढे बिटको कॉलेज चे प्राचार्य झाल्याचे समजले ) त्या वेळचे प्राचार्य श्री . पंडित सर् यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडलाआणि पुन्हा आमची टीम निघाली गांजा प्यायला

त्या दिवशी रविवार होता आणि सगळा कार्यक्रम आटोपून आम्हाला दुर्गा बागेत गांजा ओढायला जाईपर्यंत सुमारे १२ वाजलेहोते ( अर्थात सकाळी एक चिलीमिचा एक राउंड झाला होता ) आम्ही सगळे कार्यक्रम छान झाल्याच्या आनंदात मग्न होऊनचिलीम ओढत बसलो होतो , आमच्या समोर निबंधाची फाईल , बक्षिसांची नावे वगैरे कागदपत्रे पडली होती . तितक्यातअचानक तेथे रविवार म्हणून राउंड आलेल्या पोलिसांनी आम्हाला चारही बाजूनी घेरले . पाळायला काही वावच नव्हतात्यावेळी आसाराम शिंदे नावाचे एक अतिशय कडक पोलीस अधिकारी होते नाशिक रोड पोलीस स्टेशनला, ते देखील होते तेथे. आम्हाला सर्वाना रांगेत उभे करून आमची झडती घेतली गेली सोबत असलेल्या गांजाच्या पुड्या जप्त केल्या सगळ्यांचेकॉलेजचे ओळखपत्र पहिले त्यांनी मग सगळी कागदपत्रे पहिली आणि आसाराम शिंदे साहेब आम्हाला म्हणाले ' साल्यांनो ,आजच्या तरुणाचे कर्तव्य ? हा विषय देता काय स्पर्धेला आणि तुम्ही बसले गांजा ओढत . हेच कर्तव्य आहे का तुमचे ?, चलातुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईबापा समोर उभे करतो " हे एकूण आमची तंतरली ' साहेब जाऊ द्या . आम्हाला माफ कराअसे म्हणत आम्ही गयावया करू लागलो शेवटी प्रत्येकी एक एक दंडा पायावर मारून त्यांनी आम्हाला सोडले . या प्रसंगातूनआम्ही एक शिकलो या पुढे गांजा ओढताना जास्त सावधगिरी बाळगली पाहिजे ( तेव्हा जर या पुढे गांजा ओढायचा नाहीअसा धडा घेतला असता तर अधिक चांगले झाले असते )


========================================================================


 भाग १४  द्राक्षचोरी आणि महाशिवरात्र !


रेल्वे स्टेशनवर द्राक्ष पेट्यांची हमाली करण्याचे काम आता नियमित झाले होते वर्षातून साधारण ५ महिने हे काम असते , रात्रभर रेल्वे स्टेशन वर भटकणे , गाडीची वेळ आली की द्रक्ष्यांचा पेट्या पार्सल विभागातून काढून त्या पेट्या रेल्वे स्टेशन वर असलेल्या सामान वाहून नेण्याच्या चार चाकी लोखंडी गाड्यावर लादणे आणि मग गाडीचा पार्सल चा डबा ज्या ठिकाणी येतो तेथे त्या पेट्या नेऊन ठेवणे व गाडी आली की ५ मिनिटात धावपळ करून त्या पेट्या पार्सल च्या डब्यात चढवणे असे काम असे , गांजा च्या तारेत आम्ही हे काम सहज पणे करीत असू . स्टेशन वरील गर्दीत ती पेट्या लादलेली गाडी ओढण्यास सुरवातीला लाज वाटली पण मग कोणी आपल्याकडे पहाते आहे की काय ? कोणां ओळखीच्या लोकांना कळले तर वगैरे भीती नष्ट झाली .एका वेळी साधारणतः २०० पेट्या गाडीवर लादून गाडा ओढणे मजेचे काम होते . चार किलो द्राक्ष असलेली ती लाकडी पेटी छोट्या खिळ्यांनी बनवलेली असे ( सध्या पुठ्यांनी बनलेल्या पेट्या आल्यात )गाडी आली की एका वेळी सुमारे चार ते पाच पेट्या हातात घेऊन पळापळ करावी लागे , यात अनेकदा हातावर त्या ओरखडे उठत , कधी ठेच लागे , पण गाडी गेल्यानंतर मिळणाऱ्या पैश्यांकडे सारे लक्ष असे , गाडी जेमतेम ५ मिनिटे स्टेशन वर थांबल्यावर पेट्या चढवताना धावपळीत एखादी पेटी हातून निसटून प्लँटफॉर्म आणि गाडीच्या मधल्या मोकळ्या जागेतून खाली ट्रँक वर पडत असे रोज एकंदरीत सर्व हमाली करणाऱ्यांच्या हातून अश्या सुमारे दोन तीन तरी पेट्या खाली पडत असत मग गाडी गेली की त्या पेट्या वर काढून जर फुटल्या नसतील तर पुन्हा पुढच्या गाडीत चढवल्या जात असत , मात्र कधी कधी खाली पडलेली पेटी जर रेल्वे रुळावर पडली तर गाडीचे चाक त्यावरून जाई व पेटी फुटे , मग ती द्राक्षे व्यापारी आम्हाला देऊन टाकत असे .

अश्या या खाली पडलेल्या द्राक्ष पेट्याच्या बाबतीत आमच्यातील एकाने आयडिया काढली , गाडी थांबलेली असतानाच जर पलीकडच्या बाजूने कोणीतरी गाडीखाली जाऊन त्या पेट्या पळवल्या तर ? कल्पना चांगली होती आम्ही उचलून धरली. हे कलकत्ता , बिहार , उत्तरप्रदेश येथून द्राक्ष व्यापाराकरिता येणारे व्यापारी म्हणजे आमचे मालक , कधी कधी हे मालक लोक गाडीत समाधानकारक माल चढवला नाही तर रागवत असत , शिव्या देत , तर कधी पैसे कमी देत , कधी कधी आज पैसे नाहीत उद्या देतो म्हणून आम्हाला वाटेला लावत , तसेच कधी कधी जेव्हा ते आमच्या समोर हजारो रुपये मोजत तेव्हा तर त्यांची आम्हाला असूया देखील वाटे एकंदरीत त्यांच्या बद्दल सुप्त राग मनात होताच शिवाय चोरलेल्या पेट्या विकून आम्हाला वेगळे पैसे मिळू शकत होते . मग आम्ही तो प्रकार सुरु केला पलीकडच्या बाजूला आम्ही आमचा एक साथीदार उभा करत असू आणि गाडी आली की धावपळ करताना खाली पडलेली पेटी तो साथीदार गाडीखाली शिरून काढून घेई , रोज अश्या दोन तीन तरी पेट्या मिळत , अर्थात हे काम खूप रिस्की होते कारण गाडीखाली शिरताना गाडी सुरु होण्याची भीती असे तसे झाले तर मुडदा पडणार ,तसेच पलीकडील बाजूच्या प्लँटफॉर्म वरील लोकांना हा प्रकार दिसत असे , त्यांच्या पैकी कोणी बोंब केली तर डाव अंगाशी येणार हे पक्के , पण बहुधा पाहणारे लोक काही बोलत नसत कारण त्यांना हा गाडीखाली शिरणारा मुलगा नेमके काय करणार याची कल्पना नसे व जेव्हा त्यांना द्रक्ष्याची पेटी घेऊन गाडीखालुन बाहेर पडणारा मुलगा दिसे तेव्हा नेमके काय घडले हे समजेपर्यंत तो मुलगा पसार होत असे . रोज मुलगा बदलला जाई , पुढे पुढे तर आम्ही मुद्दाम चूक झाली असे दाखवून पेट्या खाली पाडत असू , तेव्हढीच जास्त कमाई होई ,माझ्यावरही तीन चार वेळागाडी खाली शिरण्याची पाळी आली होती .

एकदा दुसऱ्या दिवशी महाशिवरात्र होती , भगवान शंकर म्हणजे आम्हा गांजा ओढणाऱ्या लोकांचे दैवत होते , चिलीमिचा दम मारताना देखील ' भोले ...." किवा ' बम भोले .." असा मोठ्याने पुकारा करत दम मारला जाई . आम्ही सर्वानीमहाशिवरात्रीला भांगेचे दुध ( घोटा , थंडाई ) बनवण्याचे ठरवले त्यात द्राक्ष टाकली तर जास्त नशा येईल असा आमचा समजहोता कारण द्राक्ष्यांपासून दारू बनते म्हणजे द्रक्ष्यांच्या रसामुळे आपली थंडाई जास्त परिणाम कारक बनेल हे उघड होते , त्यादिवशी आम्ही एकूण १५ पेट्या खाली पाडल्या म्हणजे आमच्या कडे ६० किलो द्राक्षे जमली , मग पहाटे एका मित्राच्या रुमवरजाऊन त्या सगळ्या पेट्या उघडल्या आणि तो साठ किलो द्राक्षांचा ढीग समोर ठेऊन गांजा ओढत आणि द्राक्षे खात बसलो मगसकाळी सर्वानी वर्गणी काढून १२ लिटर दुध , ५० भांगेच्या गोळ्या ( नाशिक मध्ये भांगेच्या होळीला बंटा म्हणतात ) साखर आणि सुमारे १० किलो द्राक्ष्यांचा रस त्यात टाकून थंडाई बनवली .

========================================================================

भाग १५  तोहफा ..तोहफा ..तोहफा ..लाया .लाया ..लाया ...!



एका मोठ्या पातेल्यात आम्ही बनवलेली थंडाई ठेवली होती , मग कोणीतरी सांगितले त्यात जर तांब्याचे नाणे टाकले तर अधिक जास्त नशा येते , लगेच तांब्याचे नाणे कुठे मिळेल याचा शोध सुरु झाला , एकाने त्याच्या आजीच्या जवळ असे तांब्याचे नाणे ठेवले होते ते आणले ( मला वाटते या नाण्यालाच खडकू असे म्हणतात ) एकदाची थंडाई तयार झाली आणि मग एकमेकाला आग्रह करून प्यायला लावणे पण सुरु झाले .सर्वांचे एकदोन ग्लास झाल्यावर मग पुन्हा गांजाची चिलीम झाली . अजूनही पातेले अर्धे भरलेलेच होते मग आमचे जे मित्र कोणतीही नशा करत नव्हते त्यांना आग्रह करणे सुरु झाले आमचा हा उद्योग तेथील एकदोन सराईत दारुड्यांना कळला तर ते देखील फुकट नशा मिळतेय म्हंटल्यावर आमच्यात सामील झाले . पाहता पाहता सकाळचे १२ वाजले . मग टूम निघाली की आता शंकराच्या मंदिरात दर्शनाला जायचे , सिन्नर फाट्यापासून जवळच चेहडी नाका होता आणि त्याच्या थोडे पुढे शेतातून गेले की मग दारणा आणि वालदेवी या दोन नद्यांचा संगम होतो त्या संगमावर एक छोटेसे शंकराचे मंदिर होते , तसेच तेथेच मंदिराच्या मागे एका बाबांचा मठ होता , आम्ही कधी कधी त्या मठात बाबांसोबत गांजा प्यायला जात असू .

मला त्या वेळी त्या बाबांचे जीवन खूप आवडायचे , म्हणजे काय की त्या मठात ते एका सतरंजीवर नेहमी बसून असत , गांजा पिवून डोळे नेहमी तारवटलेले , दिवसातून बाबांचे १५ ते २० भक्त तरी वेगवेगळ्या वेळी येत असत आणि येताना सोबत बाबांसाठी गांजा आणि खायला काहीतरी आणत , आले की आधी ते भक्त बाबांच्या पाया पाडत , बाबा ' भोले ' असे म्हणून त्यांना आशार्वाद देत , आणि मग गांजा साफ करून चिलीम बनली की ती सन्मानाने म्हणजे आपण जसे प्रसाद घेताना एका हाताला दुसरा हात लावतो आणि पुढे करतो तशी चिलीम आधी बाबांच्या कडे दिली जायची , एकजण तितक्याच सन्मानाने गुंडी जाळून ( गुंडी म्हणजे बोटभर काथ्याच्या दोरीची छोटीशी गुंडाळी करून ती पेटवून बनलेली धगधगती गुंडाळी ) ती गुंडी त्या चिलिमित भरली जायची आणि मग बाबा एकदा आकाश्या कसे बघून काहीतरी पुटपुटत असत व मग भोले sssssss, महादेव असा जोरात पुकारा करून दम मारत असत . एकंदरीत कसली चिंता नाही वर लोक पाया पडायला येणार , सोबत गांजा , चहाचे समान , खायच्या वस्तू , बाबांच्या गरजेचे इतर सामान देखील आणणार आणि वर जाताना बाबांच्या पुढे पाच - दहा रुपयांची नीट देखील ठेवणार . मजाच होती बाबांची , त्या काळी बाबांचा मला खूप हेवा वाटे .

भर उन्हात आमची गुंगलेली टोळी संगमाकडे निघाली होती , वाटेत एकमेकांची थट्टा , मस्करी देखील सुरु होती, आमच्यासोबत आयुष्यात पहिल्यांदाच आमच्या आग्रहाने थंडाई प्यायलेले दोन जण देखील होते , गांजा , भांग असे मादक पदार्थसेवन केले की माणूस खूप हसतो , म्हणजे त्याला छोट्या छोट्या गोष्टींची गम्मत वाटते आणि एकदा तो हसू लागला कीसतत वेगवेगळ्या गोष्टींवरून हसत राहतो , तसे असे हसत खेळत आम्ही एकदाचे १ वा संगमावर पोचलो . तेथे त्या दिवशीमहाशिवरात्र असल्याने आसपासच्या भक्तांची जरा गर्दीच होती एरवी कधी स्त्रिया तेथे येत नसत पण त्या दिवशी लहान मुले, स्त्रिया आणि बाप्ये यांची जरा जास्तच गर्दी होती , ती गर्दी पाहून आमचे हसणे एकदम बंद झाले , सगळे गण एकदमगुपचूप चालू लागले आता मंदारीत जाऊन दर्शन घेईपर्यंत जरा गंभीर राहणे भाग होते , भामट्यासारखे आम्ही एक एक करूनमंदारीत जाऊन दर्शन घेतले , आणि लगेच मंदिरा मागील शेतात जेथे आम्हाला कोणी पाहणार नाही अश्या ठिकाणी एकाआंब्याच्या झाडाखाली जाऊन बसलो . तेथे एकांतात गेल्यावर पुन्हा हसणे , गप्पा आणि चिलीम सुरु झाली . एव्हानाआमच्या सोबत आलेली ती दोन नवखी मुले पूर्ण गुंगली होती , बाकीचे आम्ही सराईत मात्र मस्त मजा करत होतो तितक्यातएक म्हणाला चला आपण गाण्याच्या भेंड्या खेळू , आणि मग दोन गट करून भेंड्या सुरु झाल्या पाहता पाहता अर्धा १ तासउलटून गेला . त्या दोन नवीन मुलांपैकी एकाने मला जरा मळमळ होतेय अशी ताक्रार केली पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलेहोते . समोरच्या पार्टीवर आता ' त ' हे अक्षर आले होते आणि त्यांना काही केल्या 'त ' वरून गाणे आठवत नव्हते आम्ही भेंडीचढवण्यासाठी अंक मोजण्यास सुरवात केली होती १ ते १० मोजून होई पर्यंत जर गाणे आठवले नाही तर भेंडी होणार होती मीअंक मोजत होतो ७ पर्यंत मोजून झाले आणि तितक्यात त्यांच्या गटातील त्या मळमळ होते आहे अशी तक्रार करणाऱ्या मुलाने भडभडून जोरात उलटी केली , तो इतक्या जोरात आणि फोर्से ने ओकला की आमच्या अंगावर देखील काही शिंतोडेउडाले . व त्याच वेळी नेमके त्या पार्टीतील विवेक वाघमारे नावाच्या एका गमत्या मुलाला ' त ' चे गाणे आठवले " तोहफ...तोहफा ...तोहफा ..लाया लाया लाया ..मेरे मेरे मेरे दिलपे छाया छाया छाया " !

तो उलटीचा गंभीर प्रसंग होता , मात्र त्याचे असे ओकणे पाहून विवेकला गाणे आठवणे आणि त्या गाण्याचा अर्थ हा सगळा इतका मजेशीर योगायोग होता की सगळे त्या मुलावर चिडण्याऐवजी एकदम हसू लागले .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें