प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.com



शनिवार, 23 मार्च 2013

ना तुम बेवफा हो ..

भाग १३१ वा  निर्णय बदलला !

अनघाने सारखे असेच बोलत रहावे असे वाटू लागले ..तिच्या डोळ्यातील भविष्याचे स्वप्न मी वाचत होतो ...अश्या वेळी हिला कसे दुखवावे ? ...हळू हळू मी देखील तिच्या स्वप्नात रमू लागलो ..वाटले आपला निर्णय हिला सांगण्यापेक्षा ..जे घडले ते सगळे सांगून टाकू ..निर्णय तिलाच घेवू द्यावा .. बोलता बोलता ती एकदम शांत होऊन माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागली ..जणू माझ्या मनातील दंद्व तीला समजले असावे ... म्हणाली ' असा शांत का बसला आहेस ? तुझी तब्येत इतकी खराब कशी झाली ? एकदम कसा आलास अकोल्याला ? मी तीला सगळे सांगायला सुरवात केली ..पुन्हा व्यसनाची सुरवात कशी झाली ..घरात भांडणे वाढली ..भावाचे आणि माझे जास्तच बिनसले .. नोकरी सोडली ..घर सोडले ..मुंबई ..शेगाव ..वरोरा ...सगळे सांगताना तिच्या चेहऱ्या वरचे भाव अजिबात बदलले नव्हते ..तर उलट तिच्या डोळ्यात एक आश्वासक धीर होता ...हे सगळे सांगताना ... मी असे चित्र उभे केले होते तिच्यापुढे की माझी व्यसन सोडण्याची इच्छा असूनही मला माझे कुटुंबीय ..परिस्थिती ..घटना कश्या साथ देत नाहीत ..आणि त्यामुळेच माझा इच्छाशक्ती कशी दुबळी होत जाते ..वगैरे ..प्रत्येक व्यसनीची ही खास स्टाईल असते .. सहानुभूती मिळविण्यासाठी तो स्वतच्या चुका सांगताना नेहमी माझा का नाईलाज कसा झाला हे समोरच्याला उत्तम प्रकारे पटवून देवू शकतो ..अनघाला पुढे हे देखील सांगितले ..यापुढे अजिबात घरी जाणार नाही असे ठरवले आहे ..


सगळे एकून घेतल्यावर तीने .... मग तू इथेच अकोल्यात रहा ..घरच्यांशी पटत नाही तर ..असा साधा सरळ निष्कर्ष काढला .. मी देखील पटकन तिला होकार दिला ..मनावरील दडपण उतरले होते .. पुन्हा एकदा नव्याने सुरवात करायची होती ..मी कुठे रहावे हा प्रश्न होता कारण या वेळी घर सोडून आल्याने बहिण मला पाठींबा देईलच याची खात्री नव्हती ..मग घरी आल्यावर ..बहिणीला पण जे घडले ते सगळे .. अश्याच पद्धतीने सांगितले की तीला माझी दया येवून ..मोठ्या भावाचा राग यावा ..माझ्या बदल ' बिच्चारा ' अशी भावना निर्माण व्हावी ..बहिणीने मला तिच्याकडे राहण्यास व अकोल्यातच नोकरी शोधण्यास परवानगी दिली ... सगळे एकंदरीत मनासारखे जमुन आले म्हंटल्यावर माझा आत्मविश्वास वाढला ..आता प्रश्न होता टर्की सहन करण्याचा ..मागच्या वेळी अनघाचे आई वडील घरी नसताना तिच्या मांडीवर डोके ठेवून ..' शतदा प्रेम करावे ' ऐकत टर्की सहन केली होती ..या वेळी तसा योग येणे शक्य नव्हते .. पाहू जमेल तशी टर्की सहन करू असा निर्धार केला ... मला आता होटेल क्षेत्रातील नोकरीचा चांगलाच अनुभव होता . ..त्यामुळे अकोल्यातील

एखाद्या चांगल्या प्रतिष्ठित हॉटेलमध्ये मध्ये सहज नोकरी मिळू शकली असती .. नव्याने डाव मांडण्याची मानसिक तयारी झाली .

त्यादिवशी रात्री फारशी टर्की झालीही नाही ..मात्र झोप लागली नाही रात्रभर ..दुसऱ्या दिवशी सकाळीच सलील माझ्याकडे आला ..म्हणाला ..चल नोकरी शोधायची आहे ना तुला ? ...घर सोडताना मी सोबत कपडे घेतलेलेच नव्हते .अंगावरचे कपडे जुने जुनाट झालेले होते .. सलीलने मग त्याचा एक ड्रेस मला घालायला दिला .. छान तयार होऊन ..आम्ही नोकरीच्या शोधात बाहेर पडलो .. अकोला शहरात टॉवर जवळ एक नवीन होटेल झालेले होते ..त्याचे नाव नक्की आठवत नाही ..तेथे गेलो .. . स्वागतकाला नोकरी मिळू शकेल काय अशी विचारणा केल्यावर त्याने व्यवस्थापकाकडे पाठविले .. याच मालकाचे एक दुसरे हॉटेल अकोला बसस्टँड च्या मागे होते ' ग्रीनलँड ' नावाचे तेथे रिसेप्शनिस्ट म्हणून जागा होती ..मी ताबडतोब होकार दिला ...दुसऱ्या दिवसापासूनच कामावर हजर राहण्यास सांगितले गेले ..सगळे छान झटपट जमून आले होते ...सलील देखील खुश झाला ..म्हणाला तुझे नशीब चांगले आहे खूप ..उद्यापासून व्यवस्थित नोकरी करायची .. छान जम बसवायचा इथेच असे ठरवले .. अनघाला ही बातमी सांगितल्यावर तिलाही खूप आनंद झाला ..रात्री काहीतरी जुगाड जमवून फक्त एकच पुडी प्यायलो .. आता कमी करत करत पूर्ण बंद करायचे योजले होते ..त्या आनंदात घरी देखील एक पत्र लिहिले .. माझी काळजी करू नये ..येथे मी सुखरूप आहे ..अकोल्यातच राहण्याचा निर्णय घेतला आहे .. वगैरे ! दुसऱ्या दिवसापासून माझी नोकरी सुरु झाली ..हे हॉटेल बसस्टँड च्या मागच्या गल्लीत होते ..बहुधा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह .. व्यापारी लोक वगैरे येथे उतरत असत ... फार महागडे नव्हते ..तरीही त्या काळी बऱ्यापैकी नावलौकिक होता हॉटेलचा .. माझा हॉटेल सूर्याचा अनुभव येथे कामाला आला ..मी दोन तीन दिवसातच चांगला सराईत पणे काम करू लागलो ..मात्र फक्त रात्री का होईना एखादी पुडी ओढणे सुरूच होते .. अर्थात जेवण वगैरे व्यवस्थित सुरु झाल्याने जरा गालावर तुकतुकी येवू लागली होती ... सकाळी ७ ते सायंकाळी सात अशी माझी नोकरीची वेळ होती १२ तासांची ... सकाळी राममंदिरात जावून ..नंतर मग हॉटेल ..सायंकाळी पुन्हा ..मंदिर..सलील ..जमेल तशी अनघाची भेट असे मस्त रुटीन सुरु झाले होते ..

.सुमारे आठ दिवस झाले असतील माझा विकली ऑफ होता त्या दिवशी ..दुपारी अनघाला भेटायला गेलो असताना ..ती जरा गंभीर दिसली .. म्हणाली बहुतेक तू नाशिक सोडून मुंबईला निघून गेल्यावर तुझ्या भावाने आणि आईने आमच्या पत्त्यावर एक पत्र पाठवले असावे ते काल आमच्याकडे पोस्टमनने आणून दिलेय ..बरे झाले पत्र माझ्या हाती पडलेय ..नाहीतर अनर्थ झाला असता .. तीने एक पाकीट माझ्या हाती दिले .. भरभर मी मजकुरावरून नजर फिरवली ... माझे व्यसन पुन्हा सुरु झाल्याचे त्यात नमूद केलेले होते ..तसेच व्यसन सुरु झाल्यावर ..माझे वागणे कसे बदलते ..पैश्यांची अफरातफर ..घरात कटकटी ..वगैरे बद्दल लिहिले होते ..पुढे सध्या तुषार घर सोडून निघून गेलाय मात्र तो कधीही अकोल्याला येण्याची शक्यता असून ..त्याच्यावर विश्वास ठेवू नये ..त्याचे लग्न करून देण्याचा निर्णय आम्ही बदलला आहे ..अनघा खूप छान मुलगी असून ..तिच्या जीवनाचे वाटोळे होऊ नये असे आम्हाला मनापासून वाटते ..तेव्हा कृपया .. तुषार तेथे आला तर अनघाला त्याच्यापासून दूर ठेवावे ..आपल्या कुटुंबाशी नातेसंबंध झाले असते तर आम्हाला आनंदच होता ..मात्र शेवटी ..नियतीपुढे आपले काही चालत नाही असे लिहून .. हे पत्र जर अनघा किवा सलील च्या हाती पडले तर त्यांनी ते आईबाबंपासून न लपवता त्यांना दाखवावे असा सल्ला दिला होता .. पत्र वाचून मला खूप राग आला भावाचा आणि आईचा .. हा आगाऊपणा करण्याची त्यांना काय गरज होती वगैरे विचार मनात आले .. अनघा मी काय बोलतो याची वाट पाहत होती ...मी म्हणालो .. अनघा तू काय तो निर्णय घे मी तुला सगळे सांगितलेच आहे .. तीने क्षणभर माझ्या डोळ्यात पहिले आणि सरळ ते पत्र फाडून त्याचे तुकडे तुकडे केले .

=======================================================================

भाग १३२ वा  नवीन संकट !

अनघाचा माझ्यावरील अढळ विश्वास बघून मला स्वतःचीच खूप लाज वाटू लागली .. तीने अगदी शांत पणे निर्धाराने ते पत्र फाडून टाकले होते ..याचा उघड अर्थ होता ..की ती कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता माझ्याशी संसार थाटायला सिध्द झाली होती ..मी सहज तीला म्हणालो ..जर समजा लग्नानंतर देखील मी वारंवार असाच वागत राहिलो तर तू काय करशील ..त्यावर ती पटकन म्हणाली .. काय करणार ? ... निभावून नेणार सगळे ...तू पैसे दिले नाहीस तर मी नोकरी करीन .. माझ्या प्रेमावर ..आणि त्याही पेक्षा जास्त ईश्वरावर माझी श्रद्धा आहे ...मी कधी कोणाचे वाईट चिंतले नाही आणि चिंतणार देखील नाही ..माझी श्रद्धा आहे की ..जे काही जीवनात घडेल मी निभावून नेण्याची ताकद तो ईश्वर नक्कीच मला देत राहील ...असे काही बोलताना तिचा चेहरा आत्मविश्वासाने उजळून निघे .. ठाम शब्द ..तितकेच आश्वासक डोळे ..मला वाटते बहुधा प्रत्येक स्त्री कडे अशी ठाम भूमिका घेण्याची कुवत असते ..फक्त परिस्थितीनुसार अशी कुवत वापरली जात नाही ..व त्यांना अबला म्हंटले जाते ..त्यांच्या हृदयातील .. ममता .. करुणा ..क्षमाशीलता यांचा गैरफायदा घेतला जातो .. अनेक नैसर्गिक ..सामाजिक बंधनांमुळे त्यांची ही कुवत खच्ची करण्याचे काम होत राहते .. स्त्री स्वातंत्र्याच्या साऱ्या मर्यादा आणि क्षमता देखील अनघा जाणून होती ..स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांच्यातील सीमारेखा ज्याला समजते ती व्यक्ती सगळ्या प्रकारची बंधने पाळूनही योग्य तेथे ठाम भूमिका घेण्याची जवाबदारी उचलू शकते .

अनघाचा दृढ निश्चय माझी ताकद वाढविणारा होता ..मी पण मनाशी पक्के ठरवले की लवकरात लवकर रात्रीची एक पुडी देखील पिणे बंद करून पूर्ण व्यसनमुक्त रहायचे ...दुसऱ्या दिवशी शनिवार होता .. माझ्या बहिणी सोबतच सकाळी मी बाहेर पडलो ..शनिवारी बहिण शाळेतून लवकर घरी येत असे .. मी कामावर असताना दुपारचे चार वाजत आलेले होते ..सात वाजता सुटी झाली की आधी अड्ड्यावर जायचे ..पुडी घ्यायची आणी मग घरी असा माझा नेहमीचा प्लान असे .. पूर्वी सकाळ ..दुपार ...संध्याकाळ ब्राऊन शुगर घेत होतो ..ती सवय आता नराहिली नव्हती याचे सगळ्यात मोठे कारण पैसा हे होते ..तर दुसरे कारण ..मी हे सगळे सोडून देण्याच्या मनस्थितीत असल्याने जास्त लबाड्या .. पैसे मिळविण्यासाठी लोचे वगैरे गोष्टी टाळत होतो ..तरी चोवीस तासातून एकदा तरी ब्राऊन शुगर घेतच होतो .. टर्की ची भीती आणि मनाची सवय ही दोन्ही कारणे होती त्यामागे ..माझ्या समोरचा फोन वाजला ..हॉटेल मध्ये रूम बद्दल चौकशी करणारे फोन मीच घेत असे व तो फोन रिसेप्शन वरच ठेवला होता ..फोन उचलला तसा दबक्या आवाजात ' हॉटेल ग्रीनलँडच ना ? ' अशी विचारणा झाली ..मी होय असे उत्तर दिल्यावर मग एका मुलीचा आवाज ' तुषार .मी अनघा बोलतेय ..' पहिल्यांदाच अनघा माझ्याशी फोनवर बोलत होती त्यामुळे पटकन तिचा आवाज मला ओळखता आला नाही ..ती पुढे म्हणाली ' तू ताबडतोब इथे माझ्या घरी निघून ये ' ..मला काही समजेच ना ..इतके कोणते मोठे संकट आलेय ते ..' अग ..अशी ड्युटी सोडून कसा येवू एकदम ? ..काय झाले ते तर सांग ? " तिच्या हुंदके देण्याचा आवाज आला ..रडत असावी बहुधा ' तुषार ..आमच्या घरी जे पत्र पाठविले होते तुझ्या भावाने आणि आईने लिहिलेले ...तसेच पत्र त्यांनी तुझ्या ताईच्या शाळेच्या पत्त्यावर देखील पाठविले होते .....सकाळी ताई शाळेत गेले तेव्हा तीला ते मिळाले .. त्यात तोच मजकूर होता ..आणि वर ताई साठी सूचना होती .. अनघाच्या घरी देखील असेच पत्र पाठविले आहे ..ते पत्र जर अनघाच्या किवा सलील च्या हाती लागले तर ते कदाचित त्यांच्या आई बाबाना दाखविणार नाहीत ..तेव्हा तू स्वतः तुझ्या कडे पाठविलेले पत्र अनघाच्या आईबाबांना नेवून दाखव ..आमचा निरोप व्यवस्थित दे त्यांच्या कडे ' .. माझ्या बहिणीने तिचे काम चोख केले होते ... तीने सरळ शाळेतून घरी आल्यावर दुपारी अनघाच्या घरी जावून तिच्या आईवडिलांना सगळा प्रकार सांगितला ..

' त्यामुळे घरातील वातावरण खूप तंग झालेय ..मी हट्टाला पेटून बसले तेव्हा ..आयुष्यात पहिल्यांदा आईने माझ्यावर हात उचलला आहे .. तू ताबडतोब येथे येवून ..सगळ्यांना शांत कर ' अनघा कळवळून बोलत होती .. मात्र मला खात्री होती ..मी अनघाच्या आईबाबांना भेटल्यावर सगळे काही व्यवस्थित होईल ..त्यांना नक्कीच मी या पुढे व्यसनमुक्त राहीन असा विश्वास देवू शकत होतो ..' हे बघ ..मी येतो लवकरच ..पण इतके काही घाबरून जावू नकोस .. आता फक्त तीन तास राहिले आहेत ..सात वाजता मी येथून निघालो की सरळ तुझ्या घरी येतो ' असे मी सांगितले व तीला धीर देण्याचा प्रयत्न केला ...' तुषार ..तुला जर इथे येणे शक्य नसेल तर ..तू अकोला रेल्वे स्टेशनवर ये ..मी पण घर सोडून तिथे येईन .. जमेल तितके पैसे सोबत आणीन ...आपण पळून जावू आणि आधी लग्न करू ' अनघा अगदी अटीतटी ला आली होती ...तिची पळून जावून लग्न करण्याची कल्पना मला घातक वाटली ...कारण माझ्या खिश्यात जेमतेम १५ रुपये होते ..नाशिकला माझ्या घरी तीला नेणे शक्यच नव्हते ... मी तर काय फुटपाथ वर देखील झोपून ..उपाशी राहून दिवस काढले असते .. मात्र अनघा सारख्या मुलीची माझ्या सोबत अशी फरफट करणे मला मान्य नव्हते .. शिवाय जर अनघाच्या आईवडिलांनी पोलिसात तक्रार केली असती ..तर ..पोलिसांचा ससेमिरा मागे लागला असता ते वेगळेच ...' अग इतके सोपे नाहीय पळून जाणे वगैरे .. तू उगाच जास्त घाबरते आहेस .. मी सगळे नक्की नीट करीन ...फक्त थोडा वेळ कळ काढ.. असे मी अनघाला सारखे सांगत राहिलो .. ' बघ ..तुषार लवकर ये तू ..मला तर काहीच सुचत नाहीय ..आईची नजर चुकवून ..मी घरासमोरच्या दुकानारून फोन करते आहे ..तू लवकर आला नाहीस तर कदाचित ..आले हे शेवटचे बोलणे ठरेल '.... ' काही काळजी करू नकोस ..मी लवकर येतोच ' असे निर्वाणीचे तीला सांगितले ..फोन बंद झाला ..माझे कामावर चित्त लागेना ... काहीतरी कारण काढून सटकायला पाहिजे असे ठरविले ..तितक्यात एक जण त्याची रूम सोडत होता ....ते बिल वगैरे बनविण्याचे काम आले ...त्यात अडकलो .. माझी नजर सारखी घड्याळाकडे होती .....तर मन ...अनघाकडे .. त्या कस्टमर चे बिल बनवून झाल्यावर सरळ मँनेजर कडे जावून ' तब्येत बरी नाही ..जरा लवकर घरी जावू का ? ' अशी विचारणा केली ..त्याचा होकार मिळताच आहेर पडलो .. सहा वाजत आलेले होते ..नेहमीप्रमाणे आधी अड्ड्यावर जावून पुडी घ्यावी आणि मग अनघाच्या घरी जावे असा विचर मनात आला ..ते आवश्यकच होते ..कारण माल प्यायल्याशिवाय ..अनघाच्या आईवडिलांशी बोलण्याचा आत्मविश्वास आला नसता ..घाईने अड्ड्यावर जावून पुडी घेतली ..फटाफट मिळेल त्या जागी दम मारले आणि अनघाच्या घराकडे निघालो .


=======================================================================

भाग १३३ वा  ना तुम बेवफा हो ..ना हम बेवफा है !

अनघाच्या आई वडिलांना काय सांगायचे ? ..ते काय म्हणतील ? ..त्यांना कसे पटवायचे असा विचार सतत मनाशी सुरु होता ..आणि आजपासून अगदी खरोखरच नशा बंद करायची ..खूप नाटक झाले आता आपले ..असे ठरवत अनघाच्या घराजवळ आलो .. घराच्या पायरीवरच सलील बसलेला दिसला ..बहुधा माझीच वाट पाहत असल्यासारखा ..मला पाहून लगेच उठून उभा राहिला .. त्याचा चेहरा जरा वेगळाच वाटला ... खूप दडपण आल्यासारखा ..बाहेर पायरीवरच उभा राहून माझ्याशी बोलू लागला ..एरवी मला आदबीने घरात बोलाविणारा सलील ..कधी असा पायरीवरूनच माझ्याशी बोलेल असे वाटले नव्हते ..मग त्याला विचारले घरात कोण कोण आहे ? तो नुसताच विषण्ण हसला ' कोणीच नाहीय ..मी एकटाच आहे ' ....म्हणजे गेले कुठे सगळे ? म्हणाला ' माहित नाही " त्याचे हे तुटक बोलणे पाहून ..माझ्या मनात शंकेची पाल चूकचूकली ...' यार सलील खरे संग मला काय झाले ते ? ' मला दुपारी अनघाचा फोन आला होता ..ती खूप रडत होती ..माझ्या ताईने तुझ्या घरी माझ्या घरून आलेले पत्र दाखविले होते ..तुझे आईवडील खुप चिडलेले होते ..वगैरे मी त्याला थोडक्यात सांगू लागलो ...' आता एकदम अशी सामसूम कशी घरात ? कुठे गेली अनघा ..तुझे आईबाबा ? ' माझा धीर सुटत चालला होता .. सलील खाली मान घालून हळूच म्हणाला ' ते गावाला गेलेत सगळे ' ..म्हणजे असे अचानक गावाला कसे काय गेले ? .. कोणत्या गावाला ? सलील मख्खासारखा उभा होता ..माझ्याकडे पहायचे टाळत होता ..कदाचित माझ्या कडे पाहिल्यावर ..त्याचा ठामपणा निघून जाईल की काय अशी त्याला भीती वाटत असावी ... म्हणून नजर चोरत होता माझी ..' बर ..कोणत्या गावाला गेलेत ते तरी संग यार ' मी काकुळतीला आलो होतो ...' ते कुठे गेलेत ते मलाही माहित नाहीय ' सलील उद्गारला ..हे भलतेचहोते ..तो सरळ सरळ खोटे बोलत होता ..त्याचे आईवडील आणि बहिण कोणत्या गावाला गेले आहेत हे त्याला माहित नसणे शक्यच नव्हते .. पण त्याने अगदी ठरवून ओठाला कुलूप लावले होते ..घट्ट दाबून ठेवली होती माहिती .. मी त्याचं नजरेचा वेध घेत होतो ..तो नजर चुकवीत होता .. !

मी मनातून संतापलो होतो खूप ..वाटले याच्या दोन थोबाडात दिल्या तर पटकन खरे बोलेल .. पण तसे करावेसे वाटले नाही ...त्याचे खांदे धरून त्याला जोरात हलविले .. ' सलील ..तू नीट संग सगळे मला खरे खरे ' माझ्या हाताचा दाब खांद्यावर त्याल जाणवला ... पुढे काय होऊ शकते याचाही अंदाज आला असावा ..म्हणाला ' हवे तर मार मला .. पण मी काहीही सांगू शकत नाही ' चला ..म्हणजे याला सगळे माहित होते ..तो सांगू इच्छित नव्हता ..पुढे म्हणाला ' आमची काही चूक नाहीय ...तुझ्या घरातलेच लग्न करून द्यायला तयार नाहीत तुमचे ..तू पण कोणाचे ऐकत नाहीस ..स्वतच्या मर्जीने जगतोस ...काय करणार आम्ही शेवटी ? '....बोलताना त्याचे ओठ वाकडे होत गेले ..जणू आता तो रडणारच की काय असे वाटू लागले ...मला त्याचा रागही आला आणि दयाही येत होती ..बिचाऱ्याने अनघाची ओळख व्हायच्या सुरवातीपासून मला खूप साथ दिली होती ..आता मात्र खरेच त्याचा नाईलाज झाला असावा .. ' सलील तुला आपल्या दोस्तीचा वास्ता आहे ..यार ..सांगून टाक न सगळे ? ' त्याचं डोळ्यातून पाणी ओघळले ..' दोस्ती एका बाजूला आहे ..आणि हे घरचे प्रकरण एका बाजूला .. तू माझा दोस्त अजूनही आहेच यार ..फक्त मला ताईला कुठे नेलेय ते सांगण्याचा आग्रह करू नकोस तू ..ताईला आई बाबांनी कुठे नेलेय ते तुला अजिबात सांगणार नाही .. माहित आहे तू मारशील मला एखादेवेळी..पण मी मार खाईन ..सांगणार नाही ' म्हणजे सगळे चित्र स्पष्ट झाले होते .. अनघाला माझ्यापासून दूर नेणे हा पर्याय ..तिच्या आईबाबांनी निवडला होता तर ..त्यांना खात्री होती ..ही इथे राहली तर ..नक्कीच कसेही करून तुषारला भेटणार ..प्रकरण गंभीरच होते ..त्यांच्या दृष्टीने त्यांनी योग्य तेच केले होते ..मी तेथून लगेच निघालो ..मनावर प्रचंड ओझे घेवून .. मला या लोकांनी एक शेवटची संधी द्यायला हवी होती असे वाटले .. अर्थात या पूर्वी संधीच तर मिळाली होती ..पण मी त्या संधीचा गैरफायदा घेतला होता ..आपण कसेही वागलो ..तरीही आपले फारसे नुकसान होऊ शकत नाही ..आपण सगळे सांभाळून घेवू हा आत्मविश्वास होता मला ..शेवटी सगळ्याला सुरुंग लागला ... हे सगळे इतके झटपट घडेल असे वाटले नव्हते ..मी सगळ्यांना गृहीत धरत होतो ..जास्तीत जास्त वाद होतील ..अनघाचे आई वडील मला रागावतील ..मग मी बुद्धिचातुर्याने त्यांची समजून घालेन ..माझे बोलीबचन खूप कठीण असते ..नक्कीच मी त्यांना पटवले असते ..असा साधा सरळ विचार मी केला होता ..पण सगळे व्यर्थ ... मला माझी बाजू मांडण्याची ..बोलण्याची संधीच मिळाली नव्हती .

सैरभैर होवून मी चालत होतो ...बहिणीकडे पण जावेसे वाटेना ..कदाचित मी तिच्याशी भांडलो असतो ..मेव्ह्ण्याना राग आला असता ...चूक माझी आहे हे मला मान्य होते ..पण.. पण ..इतकी मोठी शिक्षा मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते .. मग मनात कल्पना आली सलील सांगत नाहीय ..पण सलील च्या एखाद्या मित्रा कडून अनघाला कुठे नेलेय ही माहिती मिळू शकली असती ..त्यांच्याच थोड्या दूरच्या नात्यातील एक जण माझा देखील मित्र होता ....मी त्याच्याकडे गेलो ..त्याला सगळे थोडक्यात सगळे सांगितले ..व कुठे गेलीत ती मंडळी ते सलील काढून काढून घ्यायला विनंती केली ..तो जरा गंभीर झाला .. म्हणाला त्यांचे जवळचे सगळे नातलग बहुतेक नागपूर ..पुणे येथेच आहेत .. मग एकदम आठविल्यासारखे सारखे म्हणाला ..अमरावतीला देखील एक मावशी असते सलीलची .अनघा खूप बोलकी असल्याने सगळ्या नातलगांबद्दल माझ्याशी बोलत असे ..मात्र मला त्यात फारसा इंटरेस्ट नसल्याने मी तिचे बोलणे मनापासून एकले नव्हते याचा आता पश्चाताप होता होता .. ही कोणती मावशी .? मी सलीलच्या नातलगाला ती मावशी अमरावतीला कुठे राहते असे विचारले तर ते मात्र त्याला सांगता आले नाही ..बडनेरा स्टेशनच्या आसपास राहते बहुतेक त्याने अंदाजे सांगितले .. ठीक आहे म्हणत मी त्याच्या कडून पन्नास रुपये उसने घेतले . ..देशी दारूच्या दुकानात जावून पटकन एक क्वार्टर लावली .. मग बाहेर येवून विचार करू लागलो ... आता कसे ..एका क्षणात सगळे जग उलटे झाले होते .. अनघाला कुठे शोधायचे .. ती बिचारी म्हणतच होती ..तू लवकर ये नाहीतर अनर्थ होईल .. हे कदाचित आपले शेवटचे बोलणे असेल ..' मीच तू उगाच जास्त घाबरतेस ' म्हणून तिचे बोलणे गंभीरतेने घेतले नव्हते ..तिचा फोन आल्या बरोबर जर आपण ताबडतोब निघालो असतो तर कदाचित ..तिची भेट झाली असती ..प्रकरण इतक्या थराला गेले नसते ..पण आता जर ..तर ..ला काहीही अर्थ उरला नव्हता .अनघाला क्रूर नियतीने माझ्या पासून हिरावून नेले होते .. मी अंधारात भुतासारखा .मंदिराच्या कोपऱ्यातील बाकावर बसलो होतो ..आरतीची वेळ होती ..मात्र सगळीकडे सामसूम होती ...जरा वेळाने सलील ..आरती करण्यासाठी मंदिरात आला एकटाच ..मला बाकावर बसलेले त्याने पहिले पण काहीही न बोलता कामाला लागला ... आरती करून निघूनही गेला ..त्याला काहीच बोलावेसे वाटले नाही माझ्याशी ..किवा त्याच्याकडे बोलण्यासारखे नव्हतेच काही .. उठून मंदिराकडे गेलो ..दुरुनच राम..सीता ..लक्ष्मणाच्या मूर्तीकडे पाहू लागलो ..डोळ्यातून पाणी येत होते .. मूर्ती धुसर दिसत होती .. ! उद्या अमरावतीला जावून अनघाचा शोध घेण्याचे मनाशी ठरवत होतो .
=======================================================================

भाग १३४


मैने तुझको कितना ढूंढा ..आवरा गलियोंमें 
ये आवाज लगाई..के आजा तेरी याद आई !

रात्री ११ पर्यंत तसाच मंदिराच्या बाकावर सुन्न होऊन बसलो होतो .. माझ्या भाच्याला बहुतेक सारा सुगावा लागलाच होता ..त्याला माहित होते आपला मामा खूप डेंजर आहे काहीतरी भलते सलते करून बसेल ..तो दुरून माझ्यावर नजर ठेवून होता .. शेवटी तो मला बोलवायला आला .. घरी चल म्हणून आग्रह करू लागला ... मला बहिणीच्या घरी जाण्याची इच्छाच नव्हती .. तिचा खूप राग आलेला होता ..तीने अनघाच्या आईवडिलांना भेटण्यापूर्वी एकदा मला विश्वासात घ्यायला हवे होते असे वाटले ...सगळ्या जगाचाच राग येवू लागला होता ..स्वतःचाही राग आलेला होता .. जीवाचे काहीतरी बरेवाईट करावे हा विचा र वारंवार मनात येवू लागला .. पण ..आशा होती ..कदाचित उद्या आपण शोधायला जावू तेव्हा अनघाचा पत्ता लागू शकेल .. एकदा तरी तिची भेट घ्यायची होती मला .. बिचारीची अवस्था आता कशी असेल याची कल्पनाच करवत नव्हती .. तीला दृढ विश्वास होता की ...मी लवकर येवून सगळे व्यवस्थित करीन .. आपली वाट पाहत बसली असावी ..कदाचित तीला जबरदस्ती गाडीत कोंबून नेले असेल ...किवा शेवटचा उपाय म्हणून तिच्या आईबाबांनी ...तू जर आमचे एकले नाहीस तर आम्ही आमच्या जीवाचे काही करून घेवू अशीही धमकी दिली असेल ..किवा मग माझी वाट पाहून ..ज्याच्या भरवश्यावर घरी भांडतोय ..तोच माघार घेणारा निघाला..म्हणून नाईलाजाने जे जे होईल त्याला निमुटपणे सामोरी गेली असेल ...अगदी शेवटच्या क्षणापर्यंत माझी वाट पहिली असेल तीने ... माझ्याबद्दल तिरस्काराची भावना मनात घेवून मनावर दगड ठेवला असेल ..भलते सलते विचार मनात येत होते ..शेवटी भाच्यासोबत घरी आलो ... बहिण काहीच बोलली नाही माझ्याशी ..माझ्या तोंडाचा दारूचा वास आलाच असावा .. गुपचूप जावून पलंगावर पडलो ..भूक नाही असे सांगून जेवण केले नाही ... रात्रभर ..भिंतीवरच्या घडल्याची टिक.. टिक.टिक ऐकत होतो ..प्रत्येक तासानंतर घड्याळात पडणारे ठोके .. मनाचा ठणका वाढवत होते ..

सकाळी उठल्याबरोबर ..फ्रेश होऊन बाहेर पडलो ... कामावर जाणारच नव्हतो .. रेल्वे स्टेशनवर येवून ..बडनेरा कडे जाणाऱ्या गाडीत बसलो .. सकाळी सुमारे ९ वाजता बडने-याला उतरलो ..सरळ रेल्वे स्टेशनच्या बाहेर येवून .. समोर दिसेल त्या रस्त्याने फिरू लागलो .. वाट फुटेल तश्या वेगवेगळ्या गल्ल्यातून फिरत होतो .. अनघाच्या अंगकाठी सारखी कोणी पाठमोरी मुलगी दिसली की ती अनघाच आहे असे वाटे .. भरभर चालत जावून ...पुढून चेहरा पाहून पुन्हा पुन्हा निराश होत होतो .. चालताना सतत नजर भिरभिरत होती .. वेडाच झालो होतो जणू .. सिनेमात जसे नायकाला हरवलेली ..दूर गेलेली ..नायिका अचानक सापडते तसा काहीतरी चत्मकार घडेल अशी आशा होती .. फक्त एकदा ..एकदाच ..क्षणभर का होईना ती भेटावी ही तळमळ वाढत चालली होती ..घश्याला कोरड पडली तसा एका चहाच्या गाडीवर पाणी पिवून ..पुन्हा पायपीट सुरु केली .. सायंकाळचे पाच वाजत आले ...थंडीचे दिवस असल्याने लवकर अंधारून येत होते ...माझी सावली चालताना लांब पडू लागली ...आता टर्की देखील सुरु झाली होती ..ब्राऊन शुगर वर काल दारू प्यायल्यामुळे ...ब्राऊन शुगर चा परिणाम कमी झाला होता ..त्यामुळे लवकर टर्की सुरु झालेली ..काय करावे समजेना ...असेच मुंबईला निघून जावे का ? पण जर एकदोन दिवसांनी अनघा परत अकोल्यात आली तर आपल्याला कसे समजणार ? .. कदाचित तीनचार दिवसांनी ..सलीलला आपली दया येवून तो जर अनघाचा नेमका पत्ता सांगण्यास तयार झाला तर ? आशा निराशेचा भोवरा डोक्यात गरगरत होता .. चालून चालून पायाचे तुकडे पडायची वेळ आलेली ..करकरीत तिन्हीसांज काय असते तो प्रकार अनुभवत होतो ..बाहेरचा अंधार मनात दाटून आलेला .. शेवटी जड पावलाने पुन्हा बडनेरा रेल्वे स्टेशनवर परतलो ... मनात एक विचार आला ..इकडे आपण जिला शोधतोय ..ती जर अकोल्यातच परतली असेल आज सकाळी तर किती बरे होईल ... पुन्हा अकोल्याला आलो .. घरी बहिणीकड जाण्याचा मूड नव्हताच .. मंदिरापाशी एक चक्कर टाकली ..आशेने अनघाच्या घराकडे नजर टाकली ..पुन्हा शून्य ...

अड्ड्यावर जावून एक पुडी घेतली ...बहिणीकडे न जाता एक पाटील नावाचा मित्र भाड्याने रूम घेवून राहत होता .त्याच्यासोबत त्याचे दोन कॉलेज मधले पार्टनर देखील होते ..त्याच्या रुमवर गेलो ...तिथे संडासात बसून पुडी प्यायलो ..तसाच जेवण न करता त्याच्या रुमवर पडून होतो .. सकाळी उठून आधी मंदिराकडे धाव घेतली ..कदाचित अनघा आली की काय ते पाहायला .. पदरी निराशा ..प मंदिराच्या आवारात उभा राहिलो ..रामाच्या मूर्ती कडे पाहताना अनघाची एक गम्मत आठवली .. ती म्हणे ..लहानपणापासून तीला कोणी रागावले ..काही मनाविरुद्ध घडले की राम रायासमोर येवून उभी राही ..मग त्या मूर्तीला मनातल्या मनात आपली तक्रार सांगत असे .. मूर्ती म्हणे तिच्याकडे पाहून ...सगळे एकून घेवून तीला धीर देई ..स्मित करून तीला जणू घाबरू नकोस ..मी आहे असा दिलासा देत असे .. तसेच तिचे काही चुकले तर म्हणे त्यामुर्तीचा चेहरा .रागीट होई ..मग अनघा माफी मागे ..तीने हा प्रकार सांगितला तेव्हा मी खूप हसलो होतो .. तिच्या निरागसपणाची गम्मत वाटे ..आज अश्याच निरागसपणे आपल्याला राम रायांशी बोलता येईल का ? ते धीर देतील का ..मूर्ती स्मित करेल का ..की मूर्तीचा चेहरा रागीट होईल ..वेड्यासारखा विचार करून खरेच मूर्तीकडे टक लावून पाहू लागलो .. छे ..असे कसे घडेल .. तेव्हढा निरागसपणा असायला हवा त्यासाठी ... .संत तुकाराम देखील म्हणे विठू रायांशी बोलत असत .. पुन्हा तोच निरागस पणा .. भक्तीचा अनोन्यभाव ...आपल्यासारख्या विकारांच्या आहारी गेलेल्या माणसाला असा अनुभव येणे शक्यच नाही ... शेवटी पुन्हा मुंबईला जाण्याचे ठरविले .. माझे कपडे घेण्यासाठी बहिणीच्या घरी आलो ..तर भाच्याने निरोप दिला की ' मामा ..आज रात्रीच्या गाडीने आजी येतेय अकोल्याला .. तुला इथेच थांबायला सांगितले आहे आजीने .. ' म्हणजे माझी आई इथे येणार होती .. बहुधा ताईने कुठून तरी फोन करून माझ्या अवस्थेबद्दल आईला सांगितले असावे ..मी अनघाच्या घरी काही भांडण करतो की काय अशी त्यांना भीती असावी म्हणून ..आई इथे येणार होती ..मला समजवायला .. वाटले थांबू नये ..पण पुन्हा आशा जागृत झाली की आई काहीतरी सुवर्णमध्य काढून अनघाच्या आईबाबांना समजावू शकेल .. पुन्हा सारे सुरळीत होऊ शकेल !


=======================================================================

भाग १३५ वा  आईची मुत्सद्देगिरी ..गोडीगुलाबी !


दिवसभर विमनस्क अवस्थेतच घालविला .. जवळ पैसे अजिबात नव्हतेच कसातरी जुगाड करून एका पुडीचा बंदोबस्त केला .. नजर सारखी अनघाच्या घराकडे होती ..अचानक ती दिसेल ही आशा सोडण्यास मन तयार नव्हते .. सलील दोन वेळा भेटला पण फारसे बोलला नाही ... त्यालाही कदाचित मनातून अपराधी वाटत असावे .. अर्थात बहिणीच्या भल्यासाठीच त्याला माझ्याशी असे वागावे लागत होते ..माझ्या सारखा व्यसनी माणूस नेहमी लोकांना ..परिस्थितीला .. घटनांना ..गृहीत धरून चालत असतो ..आपण कसेही वागले तर चालते ..मात्र लोकांनी नेहमी आपल्या मनासारखे वागले पाहिजे ...आपल्या भावनांची कदर केली पाहिजे ...खरे तर सगळ्या प्रकरणात मी ..माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनघा ..सलील .. त्यांचे कुटुंब ..माझी आई ..वडील ..भाऊ .. बहिण यांना आजवर माझ्या मुळे काय काय त्रास झालाय याचे आत्मपरीक्षण करण्याएवजी ..माझ्यावर किती अन्याय होतोय ..अशी भूमिका घेवून अनघा भेटलीच पाहिजे या हट्टावर कायम होतो ..काही दिवसांच्या व्यसनमुक्तीनंतर ..पुन्हा पुन्हा सुरु होणारे माझे व्यसन ..आणि व्यसन करण्यामागील माझी ..कृत्रिम आनंद मिळविण्याची मनोभूमिका..काय होईल ते पाहून घेवू ..मी सगळे नीट कंट्रोल करू शकेन हा पोकळ आत्मविश्वास हे साऱ्या गोष्टीना जवाबदार होते ..हे आज मला खूप वर्षांनी उमगतेय..त्यावेळी मी फक्त स्वतचे दुखः .. स्वतःवर झालेल्या अन्याय .. निष्ठुर जग ..या मनस्थितीत होतो ..आई येथे आल्यावर देखील ..आईशी काय काय बोलायचे हे मी ठरवून ठेवले ..सगळ्यात आधी सगळा दोष तिच्यावर टाकणार होतो ..मग मी सगळे ..सोडतो ..नक्की सुधारतो ..पण एकदा तरी अनघाची भेट करून दे ...मला माझ्या आणि अनघाच्या लग्नाची हमी दे ...मगच सगळे काही ठीक करतो ..वगैरे बोलून तिच्या पुत्रप्रेमाला वेठीस धरणार होतो ..म्हणजे स्वतःला बदलण्या एवजी परिस्थिती ..लोक ..घटना ..सगळे माझ्या मनासारखे बदलत असतील तरच मी बदलीन ...असा अट्टाहास होता माझा ..आणि जेव्हा सगळे मनासारखे घडत होते ..तेव्हा ..तेव्हा .? एकदा ..थोडेसे ... आजच्या दिवस असे म्हणून पुन्हा व्यसनास सुरवात करीत होतो ...

रात्री २ ला आई दादर नागपूर एक्सप्रेस ने अकोल्याला पोचली .. ती आल्या आल्या ..आधी तीने मला सुखरूप पाहून तिचा जीव भांड्यात पडला .. मग मी तुम्ही पत्र का पाठवले ...वगैरे आरोप सुरु केले ..तेव्हा तीने सांगितले ..आमचा नाईलाज झाला .. तुला अनेक वेळा संधी दिली होती ..मागच्या वेळी देखील सुहास ने पत्र पाठवले आहे हे मी तुला सांगून सावध करण्याचा प्रयत्न केला ..पण तू ते पत्र पोस्टातून परत घेवून आलास ..सुधारण्या ऐवजी ..आपले काही वाकडे होऊ शकत नाहीस या भ्रमात राहिला ...सगळे तुला फार सोपे वाटते ...लग्न ..संसार ..या गोष्टींची अपेक्षा तुझ्यासारख्या चंचल मुलाने ठेवणे चूकच आहे ..जेमतेम पगार असताना देखील ..अनघाचे आईवडील ..तुमचे लग्न करून देण्यास तयार होते .. गरिबी असली तरी सुखात संसार करून दाखवीन ही त्या पोरीची जिद्द होती ..नुसती गरिबी चालते रे ...कष्ट केले की दोन वेळा पोटापुरते कोणीही मिळवतो .. आम्हीही ..संसाराच्या सुरवातीला गरिबीत दिवस काढले .. खूप कष्ट केले .. पोरांच्या भविष्यासाठी पै..पै ..जमा केली ..स्वतच्या मनाला मारून जगलो ..पण तुझ्या दादांना व्यसन नव्हते ..म्हणून सारे सुरळीत झाले .. पैश्यांपेक्षा घरातील मनशांती ...कुटुंबियांचा एकमेकांवरील अ ढळ विश्वास ...प्रेम ..या जोरावर संसार टिकतात .. व्यसने करीत राहिलास ..तर सगळे व्यर्थ !आई खूप गहन बोलत होती .....सगळा अर्थ मला समजत होता ..मात्र तरीही जे घडले आहे त्याला सर्वस्वी मीच जवाबदार आहे हे स्वीकारण्यास तयार नव्हतो ...माझा एकच हेका होता ..तू अनघाच्या आईबाबांशी बोल ..तुम्ही पत्र पाठवून सगळा गोंधळ घालून ठेवलाय तो निस्तर ..नाहीतर मग ..तुला माहित आहे मी काय करेन त्याचा भरवसा नाही ...खरेतर या चोराच्या उलट्या बोंबा होत्या ..अनघा वर माझे खरे प्रेम आहे आहे असे मी म्हणत होतो ..पण प्रेमाचा अर्थच मला समजला नव्हता .. तिच्यावर काय माझे स्वतःवर देखील प्रेम नव्हते ..नाहीतर अशी व्यसने करून स्वतच्या शरीराचे ..कुटुंबाचे ..भविष्याचे मी नुकसान करत राहिलोच नसतो ..एक मात्र होते माझे स्वतच्या इच्छांवर खूप खूप प्रेम होते ..माझ्या इच्छेनुसार वागण्याचे स्वातंत्र्य मी नेहमीच अबाधित ठेवले होते ...प्रसंगी भांडण ..मारामारी ..शिवीगाळ .. धमक्या असे सगळे प्रकार वापरून कसेही करून माझ्या इच्छे नुसार घडवून आणण्याचा माझा प्रयत्न असे ..माझ्या इच्छा माझ्या स्वतच्या भल्याच्या आहेत किवा नाहीत ..हे कधीच समजून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता ..शिवाय माझ्या इच्छेनुसार जगताना .. माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा भावनांचा मी विचार करू शकलो नव्हतो ..


दुसऱ्या दिवशी सकाळी आई ..अनघाच्या घरी गेली ..तिचे आई बाबा तीला मावशीकडे सोडून आदल्या रात्रीच परत आले होते .. बराच वेळ त्यांचा काहीतरी खल चालला होता .. तो पर्यंत माझा जीव टांगणीला ...सारखा मंदिर .. मग अनघाच्या घरासमोरून जाणारा रेल्वे ट्रँक ..अश्या येरझाऱ्या सुरु होत्या माझ्या ..सलील दोन वेळा त्यांच्यात जावून बसला ..त्याला काय म्हणत आहेत ते.. हे विचारले तर ..साल्याने सांगितले नाही ...शेवटी सुमारे दीड तासांनी ..मला त्यांच्या घरी बोलाविले गेले .. अनघाच्या आईने ..तू खूप चांगला मुलगा आहेस अशी आमची अजूनही खात्री आहे ...अशी सुरवात करून ..मला बरेच काही सुनावले ..शेवटी म्हणाली ..सगळ्यात आधी तू पुन्हा व्यसनमुक्त राहायला सुरवात कर ...मग पुढे काय होते ते नक्की करू आम्ही ..म्हणजेच कोणतेही ठोस असे आश्वासन दिले नाही ..सारखा तू आधी सुधार ...या वरच भर होता ..आई ने ही हेच सांगितले ..म्हणाली ..अजूनही तू मनावर घेतलेस तर सगळे काही सुरळीत होईल ..तेव्हा आता उगाच आतताई पणा न करता तुझा हट्ट सोडून तू माझ्यासोबत नाशिकला चल ..पुन्हा हवे तर मेंटल हॉस्पिटल मध्ये दाखल हो ..चांगला हो मग पाहू ..त्यांच्या म्हणण्याला मान डोलाविण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय उरलाच नव्हता .. मला फक्त एकदा अनघाला भेटण्याची संधी द्या ..अशी विनवणी केली मी त्यांना ..मात्र त्याबाबतीत ..आता सध्या तरी हे शक्य नाही या वर ती मंडळी ठाम होती ..त्या काळात जर आजच्या सारखे सर्रास मोबाईल असते तर अशी वेळ आलीच नसती असे मला सारखे वाटते आता ..अनघाने कसेही करून मला संपर्क केला असता हे नक्की होते ..परिस्थितीने मला अगदी दयनीय करून टाकले होते ..सपशेल पराभव झाला होता माझा शेवटी मी त्यांच्या म्हणण्याला मान्यता देवून .. नाशिक व तेथून ..मेंटल हॉस्पिटलला जाण्यास तयार झालो ..त्याच दिवशी दुपारच्या संध्याकाळच्या गाडीने निघणार होती आई ...तिच्यासोबत मी जाणार हे पक्के झाले . मग आता शेवटचे म्हणून आईकडून निर्लज्जपणे पन्नास रुपये मागून घेतले ..सलीलला सोबत घेवून ..अड्ड्यावर निघालो ..चार पुड्या घेतल्या ..रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच एकांतात जागा मिळाली तिथे बसून दोन संपविल्या ...आईला आणि मला रेल्वे स्टेशनवर निरोप द्यायला ..बहिण ..मेव्हणे ..भाचे ..सलील सगळे उपस्थित होते .. सलील सारखा सारखा मला शुभेच्छा देत होता ..एकदाची गाडी हलली ...बहुतेक त्यांनी सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला असावा ...मी पुढे काय ?..पुन्हा चौथ्या वेळी मेंटल हॉस्पिटल मध्ये जाण्याची मानसिक तयारी करत होतो .. भविष्यात काय वाढून ठेवले असावा याचा अंदाज घेत होतो .. कदाचित मेंटल हॉस्पिटल मध्ये अनघाचे परत पत्र येईल .. ही आशा होतीच मनात .

( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें