भाग १२६ वा संकोच ..निराशा ..हार !
बाबा आमटे भेटू शकणार नाहीत म्हंटल्यावर माझा थोडा विरसच झाला होता ..एखादा व्यसनी जेव्हा मनात योजना आखतो ..तेव्हा ती अगदी योजना किवा कल्पना अगदी मनात योजल्यागत जशीच्या तशी प्रत्यक्षात यावी हे तो गृहीत धरतो व्यसनमुक्ती केंद्रांच्या भाषेत किवा अल्कोहोलिक्स अँनॉनिमस च्या भाषेत अश्या प्रकाराला ' रिझर्व्हेशन' असे म्हणतात ..आणि जर ती कल्पना त्याच्या मनात योजल्यानुसार वास्तवात आली नाही तर व्यसनीची घोर निराशा होते असा अनुभव आहे ..अर्थात असे अनेकदा सर्व सामान्य लोकांच्या बाबतीत देखील घडत असते ..या वरूनच ' मँन प्रपोझेस ..गॉड डिस्पोजेस ' अशी म्हण असावी ...अर्थात सर्व सामान्य लोकांच्या बाबत असे घडले तर ते एकदम निराश न होता उपलबध असणारा दुसरा पर्याय काय असू शकतो याचा विचार करतात ..अथवा होते असे कधी कधी असे स्वतःला समजावू शकतात ...आता विकास आमटेंशी काय बोलायचे हा प्रश्नच होता माझ्यापुढे ...मी बाबाना भेटण्याची माझी योजना बारगळतेय म्हंटल्यावर जरा गांगरलोच होतो मनात ..तेथेच बाहेर डॉ .विकास आमटे यांची वाट पाहत घुटमळत होतो ..ते कार्यालयाच्या बाजूला असलेल्या खोलीतच पेशंट तपासत होते असे समजले ..म्हणजे बहुधा ' बाह्यरुग्ण ' विभागाचे काम होते ...जरावेळाने मला विकास आमटे आता भेटू शकतील असा निरोप मिळाला ..आत गेलो ..सावळ्या रंगाचे उंच ..धिप्पाड व्यक्तिमत्व ..चेहऱ्यावर मात्र सौम्य भाव ..मी नमस्कार करून माझी ओळख करून दिली ..त्यांना सांगितले की मला लहानपणा पासून समाजकार्याची आवड आहे ..बाबांच्या कामात सामील व्हावे म्हणून इथे आलोय ..या वर त्यांनी .मला समाजकार्य विषयाचा ( M.S.W ) कोर्स झाला आहे का ते विचारले ...तसेच नाशिक मध्ये कोणत्या सामाजिक संस्थांशी संबधित आहात का हे विचारले .. मी कोर्स झाला नसल्याचे सांगितले .. ..कोणत्या विशिष्ट अश्या सामाजिक संस्थेशी संबधित नव्हतो ..मात्र ' शीतल ' ग्रुप अशी रजिस्टर न केलेली संस्था होती आमची मित्रांची त्याद्वारे निबंध स्पर्धा वगैरे आयोजित केल्याचे सांगितले ..
पुढे विकास आमटेनी विचारले ' तुझ्या घरच्या लोकांची तुझे असे समाजकार्याला वाहून घेण्यास परवानगी आहे का ' या प्रश्नावर माझी बोलती बंद झाली ..घर सोडून निघून आलेल्याला कसली परवानगी ? .हा मुद्दा विकासजीना पटवून देण्यासाठी माझी सगळी कर्मकथा सांगणे गरजेचे होते ..मात्र बाबा आमटे यांना सगळे सांगण्याची माझी मानसिक तयारी झालेली होती ..विकास आमटे यांना सगळे सांगण्यास कचरलो ...नुसतेच ' होय त्यांची परवानगी आहे ' असे सांगितले ..ते पुढे
म्हणाले ..इथे भावनेच्या भरात अनेक तरुण ..घर सोडून येतात ..मात्र एकदोन दिवसात त्यांचा उत्साह मावळतो ..कारण येथील कामाचे स्वरूप त्यांना मानवत नाही ..किवा ते तरुण न सांगता घर सोडून आलेले असतात ..अश्यावेळी पालक त्यांना शोधत इथे येतात ..तेव्हा तुझी कोणतेही काम करण्याची मानसिक तयारी हवी ..आणि सोबत तुझ्या पालकांनी तुला येथे काम करण्यास परवानगी दिली आहे असे पत्र हवे तरच तुला इथे राहून आमच्यासोबत काम करता येईल ..मानसिक तयारी आहे मात्र माझ्याकडे पालकांचे पत्र नाही हे मी त्यांना सांगितले ..यावर ते म्हणाले ..' ठीक आता आला आहेस तर येथे एकदोन दिवस राहून सगळा परिसर पहा ..माहिती घे ..मग नाशिकला परत जावून पालकांचे पत्र घेवून ये " त्यांनी एकाला आनंदवनात माझी तात्पुरते राहण्याची तसेच जेवणाची वगैरे व्यवस्था करायला सांगितली व मला निरोप दिला ...त्या माणसाने मला कार्यालया पासून थोड्याच दूर असलेल्या एका बैठ्या घरात नेले तेथे दोन खोल्या होत्या त्यात विद्यार्थी राहत होते ..तेथेच महाविद्यालयात शिकणारे ..खोलीतील तीन पलंगा पैकी एका पलंगावर माझी झोपण्याची व्यवस्था करून दिली गेली ..जेवणाबद्दल विचारले ..मात्र मला फारशी भूक नसल्याचे मी सांगितले ..ते गृहस्थ मग निघून गेले ..रात्रीचे आठ वाजले होते ..विकास आमटे यांनी जरी मला दोन दिवस इथे राहण्याची परवानगी दिली असली तरी नंतर ..आईवडिलांचे पत्र घेवून ये असेही सांगितले होते ...माझ्या संकोचा मुळे मी त्यांना माझी खरी माहिती सांगू शकलो नव्हतो ..याबद्दल खेद वाटत होता ..जावू दे दोन दिवस येथे राहून ' टर्की ' सहन करावी आणि नंतर परत कुठेतरी निघून जावे असे ठरवत होतो ..माझी पिशवी तेथेच पलंगावर ठेवून मग आनंदवनात फेरफटका मारण्यास निघालो ..सगळी मंडळी जेवण वगैरे करून घरांच्या पडवीत गप्पा मारत ..शेकोटी पेटवून त्या भोवती कोंडाळे करून शेकत बसलेली दिसली ..वाटेत एक मोठा हॉल लागला ' मुक्तांगण ' असे नाव त्याला दिलेले होते ..बहुधा तेथे सामुहिक कार्यक्रम वगैरे होत असावेत ...जरा दूर जावून खिश्यातील बिडी ओढली ...जवळ फक्त दोन बिड्या शिल्लक होत्या ..टर्की सुरु झालेली होती त्यामुळे थंडीही खूप वाजू लागली म्हणून खोलीत परतलो .
रात्रभर झोप आली नसतीच ..टर्कीचे रंग सुरु झालेले होते ..त्या खोलीतील विद्यार्थ्यांशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसलो ..त्यांच्या पैकी एक पायाने थोडा अधू होता ..तर दुसरा काहीच व्यंग नसलेला होता ..जरा वेळाने ते झोपले आणि त्यांनी खोलीतील दिवा बंद केला ...खिडकीतून बाहेरच्या रस्त्यावरच्या दिव्याचा थोडासा अंधुक उजेड आता येत होता ...मनात विचारांचे युद्ध सुरु झाले होते ..इथे येताना खूप आशेने आलो होतो ..मात्र झाले भलतेच ..परत नाशिकला जावे का ? की मुंबई गाठावी पुन्हा ? की अकोला ? ..नाहीतर उद्या सरळ विकास आमटे यांना परत भेटून सगळे खरे सांगावे ? शरीर आणि मनदेखील तडफडत होते ..शरीर ब्राऊन शुगर मागत होते ..तर मन विसावा .....भलत्या भलत्या आठवणी येत राहिल्या रात्रभर ..अधून मधून उठून खोलीचे दार उघडून बाहेर येवून गुपचूप बिडी पढत होतो ..शेवटी बिड्या संपल्या ..उरला सुरला आधार देखील गेला ...पहाटे चार पासूनच बाहेर लोक उठल्याची चाहूल लागली तसा बाहेर आलो थंडी मुळे अंगावर जवळ असलेला टॉवेल पांघरला होता ..एकाठिकाणी शेकोटी पेटवलेली दिसली ..तेथे शेकत बसलो ..आजूबाजूच्या लोकांशी अवांतर गप्पा करत ..सगळ्यांच्या मनात बाबा ....विकासजी यांच्या बद्दल प्रचंड आदर असलेला आढळला ...त्यांच्यामुळेच आपल्याला पुनर्जन्म मिळाला अशी कृतज्ञतेची भावना होती ...सगळे ऐकताना भारावून गेलो होतो ..उजाडले तसे पुन्हा खोलीवर आलो ..त्या विद्यार्थ्यांनी मला चहा नाष्टा घेण्यासाठी चलण्यास सांगितले ...कार्यालयाच्या बाजूलाच एका कौलारू घरात बाहेरच्या खोलीत लाकडी टेबल ठेवलेले होते अनेक विद्यार्थी तेथे चहा नाष्टा घेण्यास जमले होते त्यांच्या जवळ चहा ..नाष्टा मिळण्यासाठी कुपन्स होती ..माझ्या जवळ कुपन नव्हते ..मात्र मी आनंदवनाचा पाहुणा असल्याची सूचना तेथे असावी ..मला कुपन विचारले गेले नाही ..चहा घेतला .नाश्त्याला छान गरम गरम पोहे होते ..'टर्की' मुळे भूक अशी नव्हतीच ...उलट फोडणीच्या किवा अन्नाच्या वासाने मळमळत होते ..चहा घेवून पुन्हा परिसर फिरण्यासाठी निघालो ..तेथे नवीनच रेशीम उत्पादन केंद्र सुरु झाले आहे अशी माहिती मिळाली.. तेथे गेलो ..रेशमाच्या किड्यांची कशी वाढ होते ..त्या अळ्या कशा कोश विणतात ..मग ते कोश गरम पाण्यात टाकून त्यापासून रेशमाचा धागा कसा तयार होते ते तेथील व्यक्तीने आपुलकीने दाखवले ...बाहेर पडून जरावेळ उन्हात बसलो ..टर्की त असताना कोवळ्या उन्हाचा शेक छान वाटतो ...
जवळ बिड्या नसल्याने बैचेनी वाढली होती ..खिश्यात माचीस होती ..उगाच रस्त्यावर कोठे बिडीचे थोटूक मिळते का ते पाहत होतो ..शेवटी मनात विचार आला असे दोन दिवस इथे टर्की सहन करण्यात काही अर्थ नाही ..नाहीतरी दोन दिवसांनी येथून जावेच लागणार आहे ..त्यापेक्षा आताच गेलेले काय वाईट ? ...सकाळचे दहा वाजत आले होते ...सरळ बाहेर जाणारा रस्ता पकडला ...वरोरा स्टेशनवर आलो ..अकोल्याला जावून अनघाला भेटण्याची तीव्र इच्छा होती ...वाटले तिची एकदा भेट घेवून मग पुन्हा निघून जावू मुंबईला ..अनघाला सगळे स्पष्ट सांगून टाकू ..मी तुझ्या लायकीचा नाहीय ..मला माफ कर ..!
========================================================================
भाग १२७ वा अविस्मरणीय रेल्वेप्रवास !
वरोरा रेल्वे स्टेशनवर अकोला किवा मुंबई कडे जाणाऱ्या गाडीची चौकशी केली असता असे समजले की एकदम रात्री गाडी आहे ..आता फक्त दुपारचे १२ वाजले होते ..बापरे .. हवालदीलच झालो ते ऐकून ..परत बाहेर येवून आनंदवन चौकात रस्त्यावर येवून थांबलो ...महामार्गावरचा एखादा ट्रकवाला आपल्याला अकोल्यापर्यंत घेवून जाईल अशी आशा होतो ..खिश्यात आता दमडी देखील शिल्लक नव्हती ..ट्रक्सना हात देत होतो ..एक दोन जण थांबले पण त्यांनी २० रुपये मागितले ..मला फुकट न्यायला कोणी तयार होईना .निराश होऊन परत रेल्वे स्टेशनवर आलो ..दुपारचा एक वाजून गेला होता ..टर्की ने टोक गाठलेले ..शेवटची ब्राऊन शुगर प्यायची म्हणून भरपूर माल प्यायला होता त्यामुळे स्वाभाविकच टर्की देखील जास्तच होत होती ...रेल्वे स्टेशन कडे जाताना वाटेत .रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलात पाणी प्यायला गेलो तर तिथे त्या वेळी आलेल्या नवीन पिक्चर चे गाणे लागले होते ..' कैसे कटे दिन ..कैसी कटी राते ..पुछो ना साथिया ..जुदाई की बाते ' ते गाणे ऐकून मन अनघाला भेटण्यासाठी अधिकच व्याकुळ झाले ...स्टेशनवर एका बाकावर उन्हात पडून राहिलो ..जेमतेम दोन तीन माणसे होती स्टेशनवर ..त्यापैकी एक हमाल असावा ..एक माझ्या सारखा बेवारशी ..दुपारचे कडक उन होते तरी तसाच बाकावर पडून होतो ..टर्की त कधी कधी खूप थंडी वाजते ..तर थोड्याच वेळात लगेच अंग आतून खूप गरम होते ..त्वचेखालुन जणू रक्ताच्या ऐवजी लाव्हा वाहतो आहे इतके गरम ...उठून चालण्याचे द्खील त्राण राहिले नव्हते .. एकीकडे जुलाब सुरु झालेले म्हणून ..दर एक तासाने बाजूच्या छोट्याश्या वेटिंगरूम मध्ये जावे लागे ..चालताना सारखी नजर खाली रस्त्यावर बिडीचे थोटूक दिसतेय का याच्यावर ...तीन चार थोटके गोळा करून ठेवली होती खिश्यात तीच ओढत होतो ..मेंटल हॉस्पिटल मध्ये तेथील रुग्ण असेच रस्त्यावर बिडीचे थोटूक शोधत फिरत असत ते आठवले ..
दुपारी तीन नंतर रेल्वे स्टेशन वर एकदम गर्दी वाढू लागली ..गाडी रात्री आहे आणि आता पासून गर्दी कशी याचे नवल वाटले ..गर्दीत स्त्रियांचा भरणा अधिक होता ..सोबत चिल्ली पिल्ली ..मग एक तरुण मुलांचा मोठा घोळका आला ..त्यांच्या डोक्यावर निळ्या पट्ट्या बांधलेल्या होत्या ..काहींच्या शर्टवर निळे बिल्ले ...मग लक्षात आले त्या दिवशी ४ डिसेंबर ही तारीख होती ..म्हणजे ही सगळी मंडळी ६ डिसेंबर या डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनी ...दादर ला ' चैत्यभूमी ' येथे दर्शनासाठी जाणारी होती तर ...सगळे अतिशय उत्साहात होते ..हैद्राबाद हून एक स्पेशल गाडी त्यासाठी सोडली गेली आहे आणि ती थोड्याच वेळात ..संध्याकाळी येथे येणार .. म्हणून ही गर्दी वाढू लागली होती ..सगळे लोक बहुधा निम्नमध्यम वर्गातील ...गर्दी आता खुपच वाढली होती ..तरुण मुले ...मुली ..बहुसंख्य स्त्रिया ..आणि तुरळक बाप्ये ...मला आठवले ..गांजा ओढण्याच्या सुरवातीच्या काळात ...आमचा व्यसनी मित्रांचा समूह देखील एकदा असाच नाशिकरोड हून ६ डिसेंबर ला ' चैत्यभूमी ' ला जाण्यासाठी निघाला होता ..मित्रांसोबत मी पण निघालो होतो ..रात्रीच्या पँसेंजर ने गेलो होतो गर्दी खुपच होती ..अक्षरशः एका पायावर उभे राहून प्रवास करावा लागला ..त्यातही ..सगळ्या धार्मिक ठिकाणी जमलेल्या गर्दीत हौशे ..नवशे ..गवशे असतात तसा प्रकार होता .. दादर ला पहाटे पोचल्यावर ' चैत्यभूमी ' वर गेलो तर तिथे ही मोठी लाईन ...ती रांग पाहून ..आम्ही ठरवले ..दुपारी गर्दी कमी झाली की येथे येवू ...मग वाट फुटेल तिथे मुंबईत फिरलो ...सायंकाळी चार वाजता परत आलो तरीही तशीच गर्दी ..मग परत फिरायला निघालो ..काही जण तर जीवाची मुंबई करण्याच्या हेतूनेच आलेले होते .ज्यांच्या जवळ भरपूर पैसे होते त्यांनी हवी तशी मौज मजा केली ..शेवटी रात्री १ नंतर चैत्यभूमी ' वर आलो आणि मग गर्दी कमी असताना दर्शन घेतले ...येताना वाटेत आमच्या पैकी एकदोन जण दारू प्यायलेले होते ..गाडीला खूप गर्दी होतीच ..शेवटी आमची टोळी मिलिटरी साठी राखीव असलेल्या डब्यात शिरली ...सगळ्यांच्या डोक्यावर निळ्या पट्ट्या ..छातीवर बँजेस लावलेले ..डब्यात आमची मस्ती सुरु होती ..चिलीम भरून गांजा ओढणे चालू होते ..त्याच डब्यात एक वयोवृद्ध गृहस्थ बसलेला होता डोक्याला निळे मुंडासे बांधलेला ..त्याला आमचा धिंगाणा पाहवेना शेवटी तो म्हणालाच ' पोरानो ..बाबासाहेबांनी तुमच्यासाठी जीवाचे रान केले ...आणि तुम्ही ...अशी व्यसने करून बाबासाहेबांचे स्वप्न साकार करणार व्हय ..रे ' म्हातारा तळमळून बोलला होता ..आपल्या देशांत हे असेच होतेय ..डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती ..शिवजयंती .. गणपती विसर्जनाची मिरवणूक असो ..दारू पिवून व्यसने करीत ..थोर लोकांच्या नावे घोषणा देत आमच्यासारखे भरकटलेले तरुण एकप्रकारे त्या थोर लोकांची बदनामी करण्याचेच काम करत असतात ..
सगळे स्टेशन गर्दीने फुलून गेलेले ..डॉ .बाबासाहेब आंबेडकर या नावाची जादू सर्वांच्या मनावर ..ही जादू त्यांचा जीवन संघर्ष ...दलितांसाठी दिलेला लढा ..प्रचंड व्यासंग ..याची होती ...पुढाऱ्यांसारखे पैसे वाटून जमवलेली गर्दी नव्हती .सगळ्या राज्यातून ही जादू पसरलेली आहे असा थोर नेता ..गाडी एकदाची रात्री आठ वाजता स्टेशनात आली ...मी देखील गर्दीत जागा मिळेल तसा घुसलो ..एका डब्यात बर्थ वर जावून बसलो ..काही मिनिटातच डबा गच्च भरला ..सुमारे अर्धा तासाने गाडी हलली ..टर्की सुरु होतीच ..शिंका ..नाकातून पाणी येणे ..अर्थात आता जुलाब कमी होते ..बहुधा पोटात काही बाहेर टाकण्यासारखे शिल्लकच नसावे ...आतून पोट ओढल्यासारखे होत होते ...उलटीची उबळ येत होती ..नुसतीच कोरडी उबळ ..माझ्याकडील टॉवेल तोंडावर धरून ठेवला होता ..जर उलटी झालीच तर गर्दीला त्रास नको म्हणून ..गाडीने वेग पकडला ..तसे मनही दुप्पट वेगाने अकोल्याकडे ...नाशिककडे ..तर कधी भूतकाळात प्रवास करू लागले .. जरा वेळाने गर्दीतील काही स्त्रियांनी त्यांच्या कडचे पोटले उघडले आणि चटणी भाकरी ..भाजी ..असा ऐवज काढला ..एका माऊलीने मायेने हात पुढे करून अर्धी भाकरी आणि त्यावर लोणच्याची फोड मला देवू केली ..माझ्या डोळ्यात पाणीच आले ..एकदम आईची आठवण झाली ..पण तब्येत बरी नाही असे सांगून मी ती भाकरी घेतली नाही ..कारण उलटी होण्याची भीती होती व अन्नाचा नॉशिया आल्यासारखे झाले होते ..नागपूर जवळ येत असताना ..खुपच जास्त मळमळल्या सारखे झाले .. वाटले नागपूरला गाडी थांबल्यावर जरा वेळ स्टेशन वर उभे राहून मोकळा श्वास घेवू ..गर्दी मुळे सगळ्या डब्यातील वातावरण कोंदट झालेले होते ...वरच्यावरच कसरत करत गर्दीच्या डोक्यावरून डब्याच्या दाराकडे जावू लागलो ..फक्त १५ फुट अंतर पार करायला मला सुमारे अर्धा तास लागला इतकी गर्दी ...नागपूरला स्टेशनवर उतरलो ..तेथेही अशीच गर्दी ...गाडी सुमारे अर्धा तास थांबली होती ..माझे वर लक्ष गेले तर ..काही मंडळी डब्यावर चढून बसलेली दिसली ..ही चांगली आयडिया आहे असे वाटले ....जरा सावधपणे बसावे लागेल इतकेच ..लगेच मी देखील डब्याच्या टपावर चढलो ..बरोबर मध्यभागी सपाट जागा पाहून बसलो उतारावर पडण्याची भीती होती ...!
========================================================================
गाडीच्या टपावर चढल्यावर आधी खिश्यातील बिडीचे थोटूक काढून पेटवले ..नंतर गाडी सुरु झाल्यावर वाऱ्याच्या झोतात बिडी पेटवता आली नसती ...थंडी म्हणून पिशवीतील टॉवेल काढून अंगाभोवती घेतला ..टपावर बसलेल्या बाकीच्या लोकांनी चादर ..शाल ..कांबळे वगैरे अंगावर घेतलेले होते त्या तुलनेत माझा टॉवेल हास्यास्पदच .. गाडी सुरु झाली तशी मग थंडीचा खरा कडाका जाणवू लागला ..गाडीने जसा जसा वेग पकडला तसे तसे गार वाऱ्याचा झोत शरीराशी धडका मारू लागला . वारा आपल्याला डब्याखाली फेकून देईल कि काय याची भीती वाटू लागली ...सगळे अंग कुडकुडत होते ..दात वाजू लागले ..पडू नये म्हणून डब्याच्या टपावर आतील वायरिंग चे जे गोल असतात त्याला दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवले होते ..थंड वाऱ्याने ते गोल बर्फासारखे झाले होते ..ते पकडल्यावर बोटेही बधीर झाली हाताची ..फाटणे ..हा प्रकार काय असतो ते चांगलेच अनुभवत होतो ..देव .धर्मावर विश्वास नसला तरी अश्या वेळी सर्व देवांचा धावा मनात आपोआप सुरु झाला होता ..आठवून आठवून एकेका देवाचे नाव घेत होतो ..सगळ्या धर्मांच्या देवांना साकडे घालत होतो आता गाडी थांबल्यावर आधी खाली उतरून डब्यात जावून बसायचे ठरवले ..शेवटी एकदाचीसुमारे तासाभराने गाडी थांबली एका स्टेशनवर थांबली बहुधा गावाचे नाव ' पुलगाव ' असे होते .. खाली उतरण्यासाठी म्हणून दोन डब्यांना जोडणारे कपलिंग असते त्या ठिकाणी आलो तर एकदम नाकात ब्राऊन शुगर च्या धुराचा चिरपरिचित वास शिरला ..त्या वासाने बावचळल्या सारखे झाले क्षण भर ..खाली कपलिंग वर एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्यासाठी जे दोन जाड लोखंडी पत्री एकमेकांना जोडलेले असतात त्या जोडावर तीन जण बसलेले दिसले .. डोक्यावरून कांबळे पांघरून त्यांनी छान आडोसा केला होता आणि त्या आड ब्राऊन शुगर ओढण्याचे काम सुरु होते ..पटकन खालच्या पत्र्यावर उतरलो आणि त्यांच्या बाजूला बसलो .
त्यांना मी पण ब्राऊन शुगर चा व्यसनी आहे ..मला एक दोन दम द्या म्हणून विनंती करू लागलो ...आधी त्यांनी टिंगल केली माझी ..मग जास्तच मागे लागल्यावर नाव ..गाव ..इथे कुठे असे प्रश्न विचारण्यास सुरवात केली ..त्यापैकी एक जण म्हणाला ' तू पाकीटमार है क्या ? ..यावर नकारार्थी मन हलवत हात जोडून डोळ्यात पाणी आणून त्यांना पुन्हा एक तरी दम द्या म्हणून विनंती करू लागल्यावर ..त्यांना दया आली असावी ..ते म्हणाले ' ठीक है ..तेरेको पिलायेंगे ..मगर हमारी पन्नी खराब हो गई है ..तू जल्दीसे नीचे स्टेशन पर से अच्छी पन्नी ढूंढकर लेकर आजा ..फिर पिलायेंगे ..पडत्या फळाची आज्ञा मानून मी पटकन स्टेशन वर उतरलो आणि पन्नी शोधू लागलो ..पन्नी म्हणजे सिगरेटच्या पाकिटाच्या आत जो चंदेरी बेगडाचा कागद असतो तो शोधायचा म्हणजे सिगरेटची रिकामी पाकिटे शोधणे आले ..स्टेशनवर लोकांनी फेकलेली पाकिटे शोधू लागलो ...एकदोन पाकिटे सापडली पण त्यातील तो बेगडाचा कागद फाटलेला होता ..पुन्हा पुढे धावत गेलो ..अगदी फलाटाच्या शेवटच्या टोकापर्यंत माझी अशी पळापळ सुरु होती ...शेवटी एक फ्लेअर् सिगरेटचे रिकामे पाकीट सापडले आतील पन्नी मस्त होती ..ते पाकीट घेवून मागे वळलो तेव्हा ध्यानात आले ..गाडी सुरु झालेली ...बापरे ..गाडीने वेग घेतला होता ..मी गाडीबरोबर धावत सुटलो ..ते गर्दुल्ले बसलेला कपलिंग खूप मागे होता ...गाडीने खूप वेग घेतला तसे मला पळणे अशक्य झाले ..माझा वेग कमी पडला... पहातापाहता माझ्या डोळ्यासमोरून ते बसलेला डबा वेगात पास झाला ...अंगातील त्राण एकदम निघून गेल्यासारखा खाली बसलो .हताश होऊन .हातातील पन्नीकडे पाहात.....उठलो ..गाडीही गेली होती आणि ब्राऊन शुगरही...आता दुसरी गडी येईपर्यंत याच स्टेशनवर थंडीत.. टर्कीत.. मुक्काम करावा लागणार होता ...
स्टेशनावरच्या छोटेखानी वेटिंग रूम मध्ये आलो .. तेथेही प्रचंड गर्दी सगळे ' चैत्यभूमी ' कडे निघालेले ..या गाडीला गर्दी म्हणून पुढच्या गाडीने जावू ठरवलेले ... बूड टेकायला देखील जागा नाही ..पुन्हा बाहेर फलाटावर आलो ..स्टेशनवरच्या मोठ्या घड्याळात रात्रीचा एक वाजलेला ... बिडीचे थोटूक शोधणे सुरु केले या थंडीत तोच एकमेव आधार होता ... फलाटाच्या अगदी टोकापर्यंत गेलो चारपाच थोटके सापडली ..तेथे कोपऱ्यात शेकोटी पेटवून त्या भोवती तीनचार जण बसलेले होते त्यांच्या बाजूला जावून उकिडवा बसलो शेकत ...त्यांच्या पैकी एकजण बोलायला जरा बरा वाटला ..त्याने माझी चौकशी केली .त्याला खोटेच सांगितले ...हैद्राबाद से दोस्तो के साथ ' चैत्यभूमी ' जानेके लिये निकला था ..अभी पानी पीनेके लिये नीचे उतरा इस स्टेशनपर तो गाडी निकल गई ..बाकी दोस्तोके पास मेरे पैसे रखे है ..वो चले गये ..माझी खोटी कहाणी त्याला पटली ..तसा मी चेहऱ्याने बऱ्यापैकी सभ्य दिसतो ..त्याला माझी दया आली ..म्हणाला चलो स्टेशन के बाहर ..चाय पिलाता हू ..या थंडीत ...टर्कीत ..गरम चहा म्हणजे अमृतच ... पटकन होकार देवून त्याच्यासोबत स्टेशनच्या बाहेर आलो ..चहाच्या गाडीवर चहा घेतला ..त्याने सोबत काही बिस्किटे वगैरे खाणार का म्हणून विचारले ..मात्र खाण्याची इच्छाच नव्हती ..चहा घेतल्यावर त्याला एक बिडीबंडल घेवून द्या म्हणून विनंती केली ..समोरच्याच एकमेव पानटपरीवर आम्ही गेलो तर ..नाकात यावेळी गांजाचा वास शिरला ...चमकून आजूबाजूला पाहू लागलो ..पानटपरीवर बसलेला माणूसच सिगरेट मध्ये गांजा भरून ती सिगरेट ओढत होता ..मी पटकन माझा हात त्याच्यापुढे करून त्या गांजाच्या सिगरेटचा एक दम मागितला ...त्याने हसून हात पुढे केला त्याला मी गांजा मागत असल्याचे बरोबर समजले ...मी सिगरेट घेण्यासाठी हात पुढे केला तसे त्याला माझी पुढच्या तीन बोटांची टोके काळपट झालेली दिसली ..गर्दुल्ल्याचे हे लक्षण त्याने ताबडतोब ओळखले ..म्हणाला ..ब्राऊन शुगर भी लेते हो ना ? ..मी त्याला होकार दिला ..तसा मला चहा पाजणारा माणूस मी किती सभ्य आहे ते समजला ..हळूच जाता हू म्हणत त्याने माझा निरोप घेतला .. पानठेल्या वर बसलेला माणूस आणि मी असे दोघेच उरलो ..
त्या पानठेल्याच्या मालकाने माझी चौकशी केल्यावर त्याला खरे ते सांगितले ..गर्दुल्ला हू ..घर छोडकर आया हू ..अभी टर्की में हू वगैरे ..तो देखील ब्राऊन शुगरचा व्यसनी निघाला ..त्याला मला ब्राऊन शुगर असेल तर पाज म्हणालो .. म्हणाला पैसे लागतील ...मी सांगितले खिश्यात एकही पैसा नाही ...त्याला काय वाटले कोण जाणे ...थोडावेळ थांब मग मी पानठेला बंद केल्यावर तुला पाजतो असे आश्वासन दिले त्याने ..वा स्वतच्या नशिबाची गम्मत वाटली ..एक संधी गेली ब्राऊन शुगर मिळण्याची ..तर दुसरी संधी हजर ...अर्ध्या तासाने त्याने टपरी बंद केली व माझ्या अंगे चल म्हणाला ..त्याचे नाव मन्नाभाई आहे असे त्याने सांगितले ...गल्ली बोळातून पुढे जात शेवटी अंधारात आम्ही एक निर्जन ठिकाणी पोचलो समोर एक पडके कौलारू घर होते ..तो सराईत असावा पटकन त्या पडक्या घरात शिरला ..त्याच्या मागोमाग मी ..दोन खोल्या पार करून तिसऱ्या खोलीत मेणबत्ती लावून त्या भोवती दोन जण बसलेले होते ..हातात पन्नी ..म्हणजे हा या गावच्या गर्दुल्ल्यांचा गुपचूप गर्द ओढण्याचा अड्डा होता ... मन्नाभाई ला पाहताच त्यांच्या गप्पा सुरु झाल्या ..त्यांच्या बोलण्यातून समजले की येथे ब्राऊन शुगर विक्री करणारा कोणी नव्हता .. मन्नाभाईच नागपूरहून जास्त माल आणून आपल्या गर्दुल्ल्या मित्रांना जास्त भावात पुडी विकत असे ..मन्नाभाई ने पण पन्नी काढली ..खिश्यातून एक पुडी काढून त्यावर टाकून दम मारू लागला ..तो मला कधी दम देतोय याची वाट पाहात होतो मी ...त्याच्या पन्नीवरचा माल संपत होता तसा माझा जीव वरखाली ..अगदी शेवटचा जळका दम पन्नीवर उरल्यावर मला म्हणाला... बता जरा तेरे खिसे में क्या क्या है ? ..म्हणजे हा मला फुकट ब्राऊन शुगर पाजू इच्छित नव्हता तर ..मी उभा राहून खिसे उलटे करून दाखवले ..तसे मुंबईला घेतलेले एक लॉटरीचे तिकीट बाहेर पडले ...मन्ना भाई ने त पटकन उचलले पहिले आणि स्वतच्या खिशात ठेवले ... मग तो अगदी शेवटचा दम मला प्यायला दिला ..कसातरी दम मारला पण ..अगदी शेवटचा दम असल्याने धूरही कमी आला आणि ठसकाही लागला ...खूप निराश झालो ...अजून एक दोन दम दे म्हणून मन्नाभाईला विनवणी करू लागलो ..बाकी माल मेरे घर में रखा है असे त्याने उत्तर दिले ..त्याने माझ्या समोर एक प्रस्ताव ठेवला ..तू घर छोड दिया है ...तेरे पास नशेके लिये पैसे भी नही है ..अगर तू मेरेपास काम करेगा तो मै तेरेको खाना भी खिलाउंगा रोज और नशा भी दुंगा ..काय काम करायचे असे विचारले तर म्हणाला ..मै नागपूर से माल लेकर आता हू ..यहा पर पच्चीस तीस गर्दुल्ले है अपने जैसे ..मै पुडी बनाकर तेरे पास दुंगा ..तू दिनभर स्टेशन के पास बैठकर ब्राऊन शुगर की पुडीया बेचना ..उसके बदलेमे तुझे सबेरे एक और रातको एक पुडी दुंगा ..!
========================================================================
भाग १२९ वा अकोल्याकडे प्रयाण !
मन्ना भाई ते दिलेला प्रस्ताव फारसा आकर्षक नव्हता माझ्या दृष्टीने ..कारण एकतर त्याने मला व्यवस्थित ब्राऊन शुगर न पाजता जेमतेम शेवटचा जळका दम दिला होता ..म्हणजे अगदी शिळे ..माणसाने खाण्याच्या लायकीचे नसलेले अन्न ..खास भिकाऱ्याला बोलावून देवून काही लोक पुण्य कमावल्याचा अविर्भाव आणतात तसे त्याने केले होते ..शिवाय त्याने मी माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगूनही माझ्यावर विश्वास न ठेवता माझी झडती घेतली ..वर ते लॉटरीचे तिकीट देखील स्वतःजवळ ठेवून घेतले होते ..हे मला आवडले नव्हते ..त्यावरून मन्ना अतिशय स्वार्थी आहे हे मला उमगले...जर उद्या त्याचे ब्राऊन शुगर विक्रीचे काम करताना मला पोलिसांनी पकडले तर हा सरळ हात वर करणार हे उघड होते ..मनाशी मी त्याचा प्रस्ताव स्वीकारायचा नाही हे ठरवले ..मात्र त्याला तसे बोलून दाखवले नाही ..मला स्टेशन पर्यंत आणून सोडून मन्ना परत गेला ..सकाळी आठ वाजता येतो असे सांगून ...पहाटेचे पाच वाजले होते ..थंडी होतीच आता गार वारे देखील सुटले होते ... मी मिळेल त्या गाडीने आधी पुलगाव सोडायचे असे ठरवले ..तेव्हढ्यात उलट्या दिशेला म्हणजे भुसावळहून - वर्धे कडे जाणारी एक पँसेंजर गाडी आली जवळ जवळ रिकामी होती ..मुंबईकडे गाणाऱ्या गाड्या सगळ्या गच्च भरून ..तर येणाऱ्या गाड्या रिकाम्या असे चित्र होते ..मी त्या गाडीत बसून वर्धा येथे जायचे ठरवले .नंतर वर्ध्याहून पुन्हा दुसऱ्या गाडीने अकोल्याकडे जाणार होतो ... वर्धा स्टेशनवर तशीच गर्दी ..एक मालगाडी आली ..त्याच्या कपलिंग वर अनेक जण बसले होते .दिवसा कपलिंग वर बसून प्रवास करण्यात फारसा धोका नव्हता ..शिवाय उन पडले होते ...फक्त जरा जपून बसले पाहिजे ..आणि मुख्य म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून अजिबात झोप लागली नव्हती ..पित्त वाढले होते ..डोळे लाललाल झालेले ..अश्या वेळी टर्कीत कधी कधी एखादी थकव्यामुळे ग्लानी येवून झपकी येण्याची शक्यता असते ..जर तसे झाले असते तर गाडीच्या खाली आलो असतो ..नीट सावरून कपलिंग वर चढलो ...तेथे आधीच बसलेली मुले आधी जागा द्यायला तयार होईनात ..मात्र ' जयभीम ' केल्यावर जागा मिळाली ...
सकाळचे ९ वाजत आलेले होते ..वर्धा ते अकोला हे नंतर साधारण पणे सव्वाशे कि. मी. असावे ..म्हणजे मी दुपारी १ वाजेपर्यंत अकोल्याला बहिणीच्या घरी पोचण्यास हरकत नव्हती .. अकोल्याला गेले कि आधी पैसे घेवून अड्ड्यावर जायचे ठरवले होते ..मग लक्षात आले ..बहिण ..मेव्हणे ..कामावर तर भाचे शाळेत गेलेले असणार ..म्हणजे घरात फक्त बहिणीचे सासरे असतील ..त्यांच्या कडे पैसे मागितले असते ..पण जर त्यांनी नकार दिला तर ? ..त्यांच्या जवळ नसतील तर ? असे प्रश्न मनात होतेच ...जर तसे झाले तर सरळ सलील कडे जावून पैसे मागू ..किवा अनघाला पैसे मागू असे ठरवत होतो ..त्यांनी मी आल्या आल्या पैसे का मागतोय असे विचारले असते तर काय सांगायचे हा प्रश्न होताच ..काही सुचेना ..शेवटी आयत्या वेळी पाहू काय होईल ते असे म्हणून विचार सोडला पैश्यांचा ..गाडी अकोल्याकडे निघाली तसा अनघाचा विचार करू लागलो ... तिला आपण घर सोडून निघून आलो आहोत ते सांगावे का ? ..तिला सरळ आपले संबंध संपले ..मी तुझ्या प्रेमाचा अपमान केलाय ..जमले तर मला माफ कर ..असे सांगणे आपल्याला जमेल का ? ..सलील काय म्हणेल ..मोठाच लोचा वाढून ठेवला होता पुढे ..सगळे चांगले सुरु असताना आपण उगाच घरच्या लोकांचा मनात राग धरून व्यसन सुरु केले याचा पश्चाताप होतच होता ... उलट समस्या कमी होण्या एवजी वाढली होती ..वाढली काय प्रचंड झाली होती ..अगदी आयुष्य उध्वस्त व्हायला आले होते ..अनघाला आपले संबंध संपले असे सांगून ..आपल्या जगण्याला काही अर्थ राहील का ? ..ती काय प्रतिक्रिया देईल ?
मालगाडी सारखी सिग्नल नसल्याने ..थांबत थांबत चालली होती ..सव्वाशे किलोमीटर अंतर पार करायला दुपारचे चार वाजले म्हणजे सुमारे सहा तास लागले होते ..अकोला स्टेशनवर चालू गाडीतूनच खाली उडीमारली ..आणि स्टेशनच्या बाहेर येवून सरळ बहिणीच्या घराकडे चालायला सुरवात केली ...घरी बहिण आणि तिचे सासरे होते ...आज ती जरा लवकर घरी आली होती ..चला बरे झाले ..बहिणीला पन्नास रुपये मागितले ..मात्र माझा अवतार पाहून ती काही पैसे द्यायला तयार होईना ..मळलेले कपडे ..डोक्यावरचे केस काढून टाकलेले .. तिला संशय आलाच कि मी काहीतरी भानगड करून आलेला असावा ...तिने सरळ सरळ विचारले ..मात्र मी नंतर सगळे सांगतो म्हणून तिला उडवून लावले .. ..त्या काळी फोन नव्हता सर्वत्र त्यामुळे मी घर सोडून निघून गेलोय ही बातमी काही इथपर्यंत पोचली नव्हती अजून ...बहिणीने पैसे देण्यास नकार दिल्यावर आता सलीलचा पर्याय होता ..खराब झालेली तब्येत ..मळके कपडे ..अश्या अवतारात डायरेक्ट सलीलच्या घरी जाणे बरे दिसले नसते ..म्हणून ..बाहेरूनच सलीलला हाक मारली ..दुसऱ्या हाकेत तो खिडकीतून डोकावला मला पाहताच पटकन बाहेर आला ..असा अचानक कसा काय ? विचारू लागला ..त्याला मला पाहून आनंद झालेला दिसला ..माझा अवतार पाहून जरा गोंधळालाही होता थोडासा ...मी त्याला म्हंटले ..तुला सगळे नंतर सविस्तर सांगतो ..आधी मला पन्नास रुपये हवे आहेत ते दे ...पन्नास रुपये त्याच्याकडे एकरकमी असणे शक्यच नव्हते ... त्याच्याकडे फक्त दहा रुपये होते ..ताई कडून घेतो म्हणाला व घरात गेला ..अनघा मुलांची शिकवणी घेत असे त्यामुळे तिच्याकडे पैसे असतच ..शिवाय मुली बहुधा बाहेर पैसे खर्च करत नाहीत ..त्या वेळोवेळी मिळाले पैसे जपून ठेवतात ..मुले जरा उधळपट्टी करणारे असतात ..अनेकदा मी माझ्या भाची कडून देखील थोडेफार पैसे मागून घेतले आहेत... पाच मिनिटांनी सलील बाहेर आला ..आणि खिडकीचा पडदा सारून अनघाही बाहेर डोकावली ..मला पाहून सुंदर हसली ... आणि हाताने काय ? अशी खुण केली ..तिला मी देखील हातानेच ... नंतर सांगतो अशी खुण केली ..बहुधा सलीलने माझे नाव सांगून तिला पैसे मागितले असावेत ..तिचा मी खरच आलोय यावर विश्वास नसावा ..म्हणून खिडकीतून एकदा डोकावून पैसे मीच मागतोय याची खात्री करून घेतली होती ..सलील कडून पैसे घेवून खिश्यात ठेवून जाऊ लागलो तर ..तो देखील माझ्या पाठीमागे येवू लागला ..मी पण येतो तुझ्याबरोबर म्हणाला ..आता पुन्हा लोचा ..मी अड्ड्यावर ब्राऊन शुगर घ्यायला निघालो होतो ..सलील ला सोबत नेणे शक्यच नव्हते ..त्याला टाळणेही कठीण झाले होते !
========================================================================
भाग १३० वा दिसते मजला ..सुखचित्र नवे ..!
सलील माझ्या मागेच लागला ..तुझ्याबरोबर येतो म्हणून हटून बसल्यावर ..माझा नाईलाज झाला ...त्याला म्हणालो ..ठीक आहे तू ये माझ्याबरोबर परंतु ..जे काही घडेल ते नुसते पहायचे ..त्यातील अवाक्षर देखील तू तुझ्या ताईला सांगणार नाहीस असे आधी वचन दे मला ..त्याने त्यालाही संमती दर्शविली ..म्हणाला ..ताई ला नाही सांगणार काहीही ..माझी खराब झालेली तब्येत पाहून त्याला खरे तर संशय आलाच होता ..मी विचार केला ..याला कधीतरी कळणारच आहे ..मी पुन्हा ब्राऊन शुगर प्यायला सुरवात केल्याचे ..फक्त त्याने ते अनघाला सांगण्या एवजी मी माझ्या पद्धतीने सांगणे अधिक योग्य ठरले असते म्हणून त्याच्या पासून लपविण्याचा इरादा होता ..शेवटी त्याने अनघाला काहीही सांगणार नाही असे वचन दिल्यावर ..चल म्हणालो माझ्या सोबत . ..केव्हा एकदा अद्द्द्यावर जाऊन पुडी घेतो ..दम मारतो असे झाले होते मला ..आता सलील येतोय म्हंटल्यावर त्याला त्याची सायकल काढायला सांगितली ..तेवढेच लवकर पोचलो असतो ..सायकलवर मागे बसून एकदाचा अड्याजवळ पोचलो ..सलीलला बाहेरच्या रस्त्यावर थांबायला लावून गल्लीत शिरलो ..पटकन ४ पुड्या घेतल्या ..पानठेल्या वरून पन्नीसाठी सिगरेटचे रिकामे पाकीट घेतले ...कुठे बसून प्यायचे हा प्रश्न होताच ..बहिणीच्या घरी जावून संडासात बसता आले असते ..पण आता मला अजिबात धीर नव्हता ..तेथून जवळच बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीत शिरलो ..सलील माझ्या मागोमाग ..
पटकन पन्नी काढून दोन पुड्या पन्नीवर टाकल्या ..धूर ओढण्यासाठी चेसर बनविला ..सलील सगळे कुतूहलमिश्रित दडपणाने पाहत होता ... दम मारला ...आणि मला एकदम उलट्या होऊ लागल्या ..टर्की सहन करून पित्त खूप वाढलेले होते ..अश्या वेळी ब्राऊन शुगरचा पहिला दम मारला कि उलटीची उबळ येत असे मला ...अर्थात पोटात फक्त चहा आणि पाणी हेच होते ..हिरवट पिवळसर रंगाचा द्राव पोटातून बाहेर पडला ..सलीलच्या समोरच ...मग नुसत्याच कोरड्या उलट्या ...माझ्या डोळ्यातून पाणीच येत होते ...दम कोंडल्यासारखे झाले ..प्रचंड धाप लागली ..मला सामान्य व्हायला पाच मिनिटे लागली ..डोळे विस्फारून सगळा प्रकार सलील पाहतच राहीला ..जरा श्वास सामान्य झाल्यावर मी पुन्हा दुसरा दम मारला ..या वेळी मात्र काही त्रास झाला नाही ..मग पटापट चेसिंग करू लागलो ..अर्ध्या तासात दोन्ही पुड्या संपल्या सगळे घडेपर्यंत सलील काहीच बोलला नाही .फक्त मी त्याच्याकडे पाहिल्यावर खेदाने नकारार्थी मान हलवीत होता ...कारभार उरकल्यावर सलील ची माफी मागितली ..त्याला थोडक्यात ..गेल्या १० दिवसांपासून घर सोडून कसा भटकतोय ते सांगितले ...फक्त अनघाला जेव्हा भेटेल तेव्हा मी तुझ्या लायकीचा नाहीय ..मला माफ कर असे सांगून ..पुन्हा मुंबईला निघून जाणार आहे हे मात्र सांगितले नाही ..कारण त्याने अगदी सुरवातीलाच ' माझ्या बहिणीला कधीच दुखः देवू नकोस..फसवू नकोस असे वचन घेतले होते माझ्याकडून .व मी आता अनघाशी नाते तोडून टाकणार आहे हे त्याला सांगून त्याचा रोष ओढवून घ्यायचा नव्हता मला ..त्याला म्हणालो आता हे शेवटचे पितोय तुझ्या समोर ..उद्यापासून नाही ओढणार ..इथेच कुठेतरी नोकरी पाहून ..या पुढे अकोल्यातच राहणार ..माझ्या अश्या आशादायक बोलण्याने त्याला बरे वाटले ..म्हणाला मी तुला नोकरी शोधण्यासाठी मदत करीन ...
दुसऱ्या दिवशी दुपारी अनघाची आई भजनी मंडळात गेल्यावर मी अनघाला भेटायला गेलो ..उरलेल्या दोन पुड्या सकाळीच मारल्या होत्या त्यामुळे जरा फ्रेश होतो .. सलील ने हिला कालचा प्रकार सांगितला असावा ..अशी शक्यता होती ..अनघाने माझे उबदार स्वागत केले ... तिच्या बोलण्यावरून सलील ने तिला कालचा प्रकार सांगितले असावा असे वाटले नाही ..मानले सलीलला ..शब्दाचा पक्का होता ...कदाचित त्याला माहित होते कि माझ्याबाबत त्याने जर बहिणीला असे काही सांगितले असते तर ती व्यथित झाली असती .. आपल्या बहिणीला त्रास होऊ नये या हेतूनेही कदाचित त्याने तिला काही सांगणे टाळले असावे ..अनघा खूप बडबडत राहिली ..नाशिकला आली असताना माझ्या आग्रहानुसार तिला तिथे थांबता आले नाही याबद्दल माफी मागितली तिने ..मग कसे अचानक नाशिकला जाणे ठरले ..तेथून आल्यावर आई बाबा काय म्हणाले वगैरे ..बोलता बोलता तिने कपाटातून ... ज्वेलर्स दागिन्यांसोबत देतात तसा एक छोटासा मखमली बॉक्स बाहेर काढला ..म्हणाली ओळख यात काय असेल ते ? ..मला वाटले सोन्याची अंगठी ....चेन असे काहीतरी असेल ..पुढे उत्साहाने सांगू लागली ..माझ्या आईबाबांनी आतापासूनच आपल्या लग्नासाठी जमवाजमव सुरु केलीय ..मी तो बॉक्स उघडला तर त्यात सोन्याच्या चार बांगड्या ...छान नाजूक कलाकुसर असलेल्या ... मी पाहतच राहिलो ...अजून एक चेन .देखील करायची आहे ..तुझ्यासाठी अंगठी करणार आहे असे अनघा उत्साहाने सांगत राहिली ..मी थक्कच झालो होतो ...अनघा लग्नाची ..संसाराची स्वप्ने रंगवीत होती .. मी मनातल्या मनात ..आपले लग्न होणे शक्य नाही .. फक्त हेच सांगायला आलोय तुला .हे अनघाला कसे सांगायचे यासाठी शब्द शोधत होतो ..मुली भावी संसाराची स्वप्ने किती मनस्वी पणे रंगवितात ...अगदी सगळा जीव ओतून ..त्यात त्यांचे विशुद्ध प्रेम ..समर्पण ...संसारातील अडचणींवर मात करण्याचा आत्मविश्वास ..आपल्या जोडीदाराला कुठेलेही दुखः मिळू नये यासाठी केलेली त्यागाची तयारी ..सगळे सगळे असते ..मी वेड्यासारखा अनघाच्या उत्फुल्ल चेहऱ्याकडे पाहत राहिलो !
( बाकी पुढील भागात)
प्रेरणादायी जीवन असलेले तुषार नातू! एक हिम्मतवान मनुष्य! आपला जीवनपट उघडून दाखवून इतरांना शहाणे करण्याची तळमळ असलेले जबरदस्त व्यक्तिमत्व ! सलाम अशा महान व्यक्तिमत्वाला.!!
जवाब देंहटाएंधन्यवाद संदीपजी
जवाब देंहटाएं