प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.comरविवार, 21 अप्रैल 2013

मुक्तांगण

स्वतंत्र मुक्तांगण !  ( भाग १६६ वा )

मेंटल हॉस्पिटलच्या अखत्यारीत असलेले मुक्तांगण याच काळात स्वतंत्र होण्याची प्रक्रिया सुरु होती.. अँडमिशनची प्रक्रिया ..जेवण ..इतर व्यवस्थापन हळू हळू स्वतंत्र होणार होते .नंतर मेंटल हॉस्पिटलची संबंध फक्त इमारती पुरताच राहिला असता असे म्हंटले जाई ..आम्हाला निवासी कार्यकर्त्यांना यातील फारसे कळत नसे ..मात्र आता मुक्तांगणचे वेगळे किचन होणार याचा खूप आनंद होता .. मेंटल हॉस्पिटल मधून येणारे जेवण बंद होऊन ' मुक्तांगण ' मध्येच जेवण तयार केले गेले असते ही आमच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट ...त्याच कळत राजू नावाचा एक केटरिंगचा कोर्स केलेला दारुडा मुक्तांगणला दाखल होता ..त्याच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने त्याने किचनचे काम सांभाळावे असे मँडमने त्याला सूचित केले होते ..त्या नुसार आधी आठवडयातून दोन वेळा त्याने मुक्तांगण मध्येच भाजी बनविण्यास सुरवात केली होती .. हा राजू पुण्यातच राहणारा होता ..छान भाजी बनवीत असे .. त्याच्यावर किचनचे काम करण्याची जवाबदारी दिल्यावर ..त्याने पहिल्यांदा जी भाजी केली ती फरसबीची ( श्रावणघेवडा )..तिची चव अजूनही आठवतेय मला .. ...अगदी हॉटेल मध्ये मिळेल तशी भाजी केली होती ..त्यात खोबऱ्याचा किस वगैरे घातला होता मग हळू हळू सगळेच जेवण मुक्तांगण मध्ये तयार व्हायला लागले ....पहिल्या भाजीनंतर राजूला खास सूचना दिल्या गेल्या की पंचतारांकित हॉटेल सारखे जेवण बनवू नकोस ..संस्थेचे दिवाळे काढायचे नाहीय आपल्याला .. योग्य प्रमाणात मसाले वापरून ..काटकसर करून उत्तम जेवण बनवायचे होते ...पोळ्या मुक्तांगण मध्ये करण्याची सोय नव्हतीच ..कारण रोज सुमारे ५०० चपात्या करणे कार्यकर्त्यांना शक्य झाले नसतेच .. त्यावर उपाय म्हणून डॉ . बाबा आढव यांनी सुरु केलेल्या हमाल पंचायतीच्या ' झुणका भाकर ' केंद्रावरून चपात्या आणाव्यात असे ठरले ..पुणे रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या या केंद्रातून चपात्या आपणयासाठी मी आणि अजून एकाची नेमणूक करण्यात आली होती .. मोठे अल्युमिनियमचे दोन डबे घेवून आम्ही सुमारे ११ च्या सुमारास बसने तेथे चपात्या आणायला जात असू .बसच्या गर्दीत ते मोठे वजनदार डबे घेवून येणे कठीणच काम होते .. मात्र त्या निमित्ताने आम्हाला मुक्तांगणच्या बाहेर जाता येत असे ही आमच्यासाठी आनंदाची बाब होती ..एकदा माझ्या सोबत चपात्या आणायला कार्यकर्ता म्हणून नवीनच सामील झालेला प्रकाश होता ..मी झुणका भाकर केंद्रात चपात्या मोजून घेत असताना .. कसा कोण जाणे प्रकाश सटकला .. मी खूप वेळ त्याची वाट पाहत उभा राहिलो ... साडेबारा वाजत आलेले ..तिकडे मुक्तांगण मध्ये जेवणाची वेळ होत आलेली .. काय करावे समजेना ..शेवटी मुक्तांगणला फोन करून झाला प्रकार सांगितला तेव्हा .. प्रकाशची वाट न पाहता तू चपात्या घेवून निघून ये अश्या सूचना मिळाल्या ..मग ते दोन मोठे डबे उचलून बसमध्ये मला एकट्याला आणावे लागले ..मनातल्या मनात प्रकाशला खूप शिव्या घालत घातल्या .. मुळचे व्यसनी असल्याने सगळेच कार्यकर्ते तसे बिनभरवश्याचे होते .. केव्हा मनात काय विचार येईल याची खात्री नाही .. आणि मनात विचार आला की तो अमलात आणायला ही वेळ लागत नसे .. अश्या लोकांना सोबत घेवून कम करणे म्हणजे मँडम व इतर वरिष्ठ समुपदेशकांची तारेवरची कसरतच असे होती .

मुक्तांगण मध्ये स्वैपाक सुरु आल्यापासून नवा कुक राजूचा भाव खूप वाढला होता .. तो सतत किचन मध्ये थांबू लागला .. मुक्तांगणच्या इमारतीच्या मागे मेंटल हॉस्पिटलची खूप मोठी जागा होती ..तेथे खूप गवत आणि इतर झाडे वाढलेली .. इमारतीच्या जवळच मागच्या बाजूला तसेच मेंटल हॉस्पिटलच्या इतर जमिनीवर शिंदीची झाडे वाढलेली होती .. दरवर्षी त्या शिंदीच्या झाडांचा ठेका दिला जाई मेंटल हॉस्पिटलतर्फे ..निरा काढण्यासाठी .. म्हणजे त्या ठेकेदाराची माणसे येवून त्या झाडावर चढून तेथे झाडाच्या वरच्या भागात चिरे मारून .. मडकी लावून ठेवत असत ..दोन दिवसानी ती मडकी काढून घेतली जात.. पुन्हा नवी मडकी लावली जात .. त्या मडक्यात जमा होणारा त्या झाडाचा रस निरा म्हणून विक्रीस पाठविला जाई .. एकदा राजू सर्वाना दारूच्या नशेत असल्यासारखा वाटला .. पण तोंडाला दारूचा वास मात्र येत नव्हता .. काय भानगड आहे कळेना कोणाला ..त्याला काय गडबड आहे विचारले तर त्याने तब्येत बरी नाही ..रात्री झोप झाली नाही म्हणून डोळे लाल दिसतात अशी करणे सांगून आम्हाला उडवून लावले .. `मग आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवायचे ठरवले ..तेव्हा एकाला तो ..त्या शिंदीच्या झाडावर चढ उतर करणाऱ्या एका माणसाशी बोलताना दिसला .. दुसऱ्या दिवशी राजूने किचन मध्ये केलेला चहा त्या माणसाला दिलेला आम्ही पहिले ..मग संशय आला म्हणून संपूर्ण किचनची झडती घेण्यात आली तेव्हा राजूने किचन मध्ये लपवून ठेवलेले मडके सापडले .. त्या मडक्यात ताडी होती ..सगळा उलगडा झाला .. राजूने त्या माणसाशी ओळख वाढवून त्याला चहा पाणी वगैरे देवून त्याच्याकडून झाडावरून काढलेले निरेचे मडके मागून घेतले होते .. तापमान वाढल्यावर त्या निरा आंबून त्याची ताडी झाली होती .. निरा जरी आरोग्यवर्धक ..शीतल .. पित्तशामक पेय म्हणून वापरली जात असली तरी ..निरा आम्बल्यावर त्यापासून तयार होणारी ताडी मात्र नशा देणारे पेय असते .. त्याचे देखील अनेक व्यसनी आहेत ..त्याचेही भयानक दुष्परिणाम होतात .. राजूने ते मडके मिळवून अशी बसल्या जागी नशेची सोय करून ठेवलेली आढळली ... हा सगळा प्रकार समजल्यावर ताबडतोब राजूला पुन्हा वार्डात पाठविण्यात आले .. त्याच्या हाताखाली काम करून तयार झालेल्या दुसऱ्या कार्यकर्त्याला किचनची जवाबदारी दिली गेली ..आणि सर्वात मोठे काम आम्हा निवासी कार्यकर्त्यांवर आले ते म्हणजे मँडमनी आम्हाला इमारतीच्या मागे असलेली शिंदीची झाडे तोडण्यास सांगितले ..सुमारे २० झाडे असावीत .. या झाडाच्या पानांची टोके खूप अणकुचीदार असतात .. तसेच जितके वर हे झाड असते तितकेच आत खोल जमिनीत त्याचे मूळ असते ...ही सगळी झाडे मुळासकट काढून टाकणे खूप जिकीरीचे कम होते ...कोयत्याने आधी पाने छाटायची .. मग जमीन खोदून सुमारे १० ते बारा फुट आत खोल झाडांच्या मुळापर्यंत जावून ते झाड उपटून टाकायचे असा आमचा उद्योग सुमारे महिनाभर सुरु होता .. पानांची धारधार पाती लागून अंगावर ओरखडे उमटत .. पानांची टोके हाताला टोचून तेथे सूज येई .. आणि खड्डे खोदून दमछाक .. आम्ही सगळे उत्साहाने कामाला भिडलो ..तीनचार दिवसातच आमचा उत्साह मावळू लागला .. सगळे रोज राजूला शिव्या घालत होतो .. तर तो निर्लज्जासारखा आम्हाला झाडे तोडताना पाहून हसत असे ..एका व्यक्तीने इतक्या लोकांना सुमारे महिनाभर कामाला लावले होते !

================================================================
पालक सभा ! ( भाग १६७ वा )

मुक्तांगण मध्ये उपचार घेत असलेल्या व्यसनी मित्रांना पालकांनी भेटण्यासाठी गुरुवार ठरला होता .. त्या नुसार प्रत्येक गुरुवारी सकाळी ९ ते ४ या वेळेत पालक भेटायला येत असत .. तसेच महिन्यातून येणाऱ्या चार पैकी दोन गुरुवारी पालक सभा देखील होई .. प्रत्येक गुरुवारी ज्या मित्रांचे पालक येतील असा अंदाज असे ते सगळे मस्त दाढी ..अंघोळ वगैरे करून तयार असत इतकेच नव्हे तर ज्यांचे पालक येवू शकणार नाहीत ते देखील गुरुवारी खुश असत कारण त्यांच्या मित्रांच्या पालकांनी घरून आणलेले खाण्याचे पदार्थ त्यांना देखील मिळत असत .. माझ्या घरून कोणीही येणार नाही याची मला खात्री होती .. मी घरी इतका त्रास दिलेला होता की मला असे आवर्जून कोणी भेटायला यावे असे प्रेम ..नात्यांमधील आपुलकी.. मी माझ्या वागण्याने गमावली होती .. पहिल्यांदा जे मुक्तांगण मध्ये उपचार घेत होते त्यांचे पालक मात्र नक्की येत असत .. ज्यांचे दोन दिन वेळा उपचार घेवून झालेले आहेत अश्या मंडळींचे पालक येण्यास टाळाटाळ करत ...गुरुवारी सकाळपासून माझ्या मनात विषण्णता दाटून येई ...मी घरी दिलेला त्रास आठवे .. केलेले नुकसान .. घडलेल्या सगळ्या घटना सारख्या सारख्या आठवून खूप अपराधीपणा वाटे ..गुरुवारच्या पालक सभेची तयारी करण्याचे काम निवासी कर्मचाऱ्यांकडे होते ..म्हणजे आदल्या दिवशी रात्री पालक सभेचा मोठा हॉल धुवून काढणे .. मोठ्या सतरंज्या झटकून त्या घालून ठेवणे .. पालकांना बसण्यासाठी खुर्च्या लावणे वगैरे ..ही सगळी कामे मी उत्साहाने करत होतो .. प्रत्यक्ष गुरुवारी सकाळ पासून मात्र शक्तिपात झाल्यासारख्या माझ्या हालचाली मंदावत जात . बंधूच्या ते लक्षात आले होते .. तो मला त्याबद्दल नेहमी समजावे .. मला धीर देई .. ' हे ही दिवास जातील मित्रा ' हे बहुधा साँक्रेटीस या तत्ववेत्त्याचे वाक्य सांगे ..काळ हा नेहमी बदलत असतो .. जेव्हा यश ..प्रतिष्ठा .. सन्मान ..धन या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतात तेव्हा तुम्हाला त्याचा माज येवून अहंकार..उन्माद वाढू नये व जेव्हा सगळे काही हिरावून घेतले जाईल ..नैसर्गिक आपत्ती .. आजारपण .. प्रिय व्यक्तीचा विरह .. दारिद्र्य या गोष्टी पदरात पडतील तेव्हा निराशेने ..वैफल्याने खचून न जाता ..कायम आशा जागृत ठेवण्यासाठी हे वाक्य अतिशय उपयुक्त ठरते .

महियातून दोन वेळा होणाऱ्या पालक सभेत पालकांना ' व्यसनाधीनता ' या गंभीर आजाराबद्दल विविध मार्गाने माहिती देण्याचा प्रयत्न समुपदेशक करीत असत ..तसेच व्यसनी माणसाला उपचार पूर्ण करून घरी गेल्यावर कसे सांभाळावे .. त्याच्या भावनिक बदलांवर कसे लक्ष ठेवावे .. समुपदेशकानी दिलेल्या सूचना पालन करण्यासाठी त्याला कसे प्रेरित करावे वगैरे .. त्यासाठी महिन्यातून एका गुरुवारी ' मनोनाटय ' ..हा प्रकार सदर केला जाई . वार्डातील उपचार घेणाऱ्या मंडळींपैकी उत्साही लोकांचे चार ग्रुप पाडले जात ..आमच्या पैकी एक निवासी कर्मचारी एका ग्रुपचा प्रमुख म्हणून नेमला जाई ..मग आम्हाला पालक सभेच्या १ तास आधी एखादा विषय दिला जाई .. त्या विषयावर आधारित असे मनोनाटय त्या समूहाला सादर करावे लागे .. बहुधा सर्व विषय ..सर्वसामान्य जीवनाशी ..व्यसनाशी..स्वभावदोषांशी .. व्यसनमुक्तीशी ..कौटुंबिक जीवनाशी निगडीत असत .. आम्ही समूहातील मित्रांना भूमिका वाटून देत असू . वडिलांची ... आईची .. पत्नीची .मुलांची ..व्यसनी व्यक्तीची अश्या साधारण चार पाच भूमिका एका मनोनाटयात असत .. हे मनोनाटय सादर करताना कधी कधी खूप धम्माल येई ..एखादा विनोदी वाक्य बोले ..किवा काहीतरी प्रसंगनिष्ठ विनोद घडत .. तर कधी एकदम गंभीर प्रसंगात सर्व स्तब्ध होत .. अंतर्मुख व्हावे लागे ..पूर्वी अनुभवलेल्या घटना आठवून पालकांच्या डोळ्यात पाणी येई . मनोनाटय ही एक मानसिक उपचार पद्धती होती ..ज्यात व्यसनी व्यक्तीला त्याच्या व्यसनामुळे पत्नीला ..आईवडिलांना .मुलांना ..भावंडाना कसा त्रास होते ते अनुभवायला मिळत असे ..चारही समूहांचे मानोनाटय सादर करून झाल्यावर ..त्यात काम करणारे लोक आपापले मनोगत व्यक्त करीत .. शेवटी मँडम प्रत्येक समूहाला दिल्या गेलेल्या विषयाचे सखोल ..अर्थपूर्ण असे विश्लेषण करून ..व्यसनाधीनता हा किती गंभीर असा मनोशारीरिक आजार आहे हे सर्वाना समजावून देत असत ...अनेक पालकांना असे वाटत असते ..की याला उपचार देण्यासाठी मुक्तांगण किवा एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले की आपले काम झाले ..आता त्याने पूर्ण बरा होऊनच बाहेर पडावे .. उपचारात पालकांचा देखील सहभाग असावा लागतो .. कितीही काळजी घेतली तरी हा आजार पुन्हा डोके काढू शकतो ..अश्या वेळी त्या बाबत एकदा उपचार दिले काही फायदा झाला नाही असा विचार न करता ..परत उपचार देणे गरजेचे आहे ..कोणतीही केस ही गाँन केस नसते ..तर काही वेळा उपचारांचा फायदा व्हायला वेळ लागू शकतो ..काही जास्त हट्टी ..जिद्दी ..जास्त संवेदनशील ..अहंकारी असलेले मित्र पुन्हा पुन्हा चुका करू शकतात वगैरे गोष्टी मँडम सांगत असत ..स्वतः मानसोपचार तज्ञ ..शिवाय अनेक वर्षांचा रुग्णसेवेचा अनुभव .. उपचार देताना असलेले तादात्म्य .. मुळचा समाजसेवेचा पिंड ..या सगळ्या गोष्टींमुळे मँडम खूप प्रभावी बोलत असत .आम्ही बर व्हावे ही त्यांची कळकळ आम्हाला जाणवत असे .

एखाद्या गुरुवारी ..मनोनाटया प्रमाणेच चित्र उपचार ( पिक्चर थेरेपी ) देखील घेतली जाई म्हणजे फळ्यावर चार पाच सूचक चित्र काढली जात ..प्रत्येकाने ती चित्रे पाहून आपल्या मनात काय विचार आले मांडावेत असे आवाहन केले जाई ..घड्याळ .. घोडा ..शिडी .. सूर्य .. नोटा .. मुलगी ..पुरुष .लहान मुलगा ..दोरीवर तोल साधत चालणारा डोंबारी ..पाण्यात पोहोणारा मुलगा वगैरे चित्र काढली जात .. एकदा गम्मत झाली .. फळ्यावर दोरीवर तो साधत चालणारा डोंबारी काढला होता .. आजूबाजूला गोलाकार जमलेली माणसे .. गळ्यात ढोलकी अडकवून ढोलकी वाजविणारी त्याची बायको .. वगरे सगळे तपशील चित्रात होते .. मुंबईत व्यसनापायी पाकीटमारी करणाऱ्या एका गर्दुल्ल्याला जेव्हा त्या चित्राबद्दल बोलायला सांगितले तेव्हा तो म्हणाला ..माझे लक्ष डोंबार्‍याच्या चित्राकडे गेलेच नाही तर त्या गोलाकार जमलेल्या गर्दीकडे होते .. खूप गर्दी होती ..त्यामुळे मला पाकीट मारायला चांगली संधी आहे असे वाटले ..हे ऐकून सर्व हसू लागले तसा तो खजील झाला .. एकाने जिवन म्हणजे अशी दोरीवरची कसरत असते ..नेहमी तोल सांभाळावा लागतो .. आजूबाजूला असलेले लोक फक्त बघे आहेत ..ते तुम्हाला टाळ्या वाजवून नेहमीच प्रोत्साहन देतील याची खात्री नसते ..मात्र तुम्ही तोल जावून पडलात तर सर्व दोष नक्की देतात ..वगैरे भाष्य केले .. तो खूप शहाणपणाचे बोलला होता .. नंतर एकाने त्याला तुझ्या किती अँडमीशन येथे झाल्यात असे विचारले तेव्हा त्याने मान खाली घालत आठ असे उत्तर दिले .. ' अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ' हे वाक्य इथे चांगले लागू पाडत होते .. तो मित्र फक्त इतरांना सांगण्यासाठी हे सगळे बोलत होते मात्र त्याने स्वतःच्या मनावर हे विचार बिंबवले नव्हते हे स्पष्ट होते .माझेही ही तसेच होत असे ..ऐरवी इतरांना सांगताना मी खूप उदात्त .. सकारात्मक .. असे बोलत असे ..परंतु स्वतः मात्र वेगळाच वागत होतो
================================================================

पालक सभा !  वाढदिवस !  ( भाग १६८ वा )

पालक सभेच्या शेवटी मँडम सर्व पालकांना आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांना मार्गदर्शन करीत असत .. व्यसनाधीनता हा आजार कसा गंभीर आहे ... तसेच योग्य उपचार दिल्यास व्यसनी व्यक्ती नक्की बरा होऊ शकतो ..त्यासाठी पालकांनी देखील याला बरे करायचे हा निर्धार मनात जपायला हवा ..या आजाराबद्दल कोणालाही दोष न देता सर्व पालकांनी एकत्र येवून व्यसनी व्यक्तीला उपचार देण्यासाठी मदत केली पाहिजे .. त्याच्या व्यसनाला कोण जवाबदार आहे या वादात न पडता ..यशस्वी पणे उपचार कसे देता येईल याकडे लक्ष द्यायला हवे ..बहुतेक वेळा ..पालक गोंधळून जातात.. तेव्हा याच्यावर कोणी तरी करणी केली .. काहीतरी खावू घातले .. मित्रांमुळे बिघडला .. परिस्थिती ..घटना ..इतर माणसे यांना दोष न देता सर्व शक्ती हा बरा कसा होईल या वर केंद्रित करायला हवी ..तसेच याच्या व्यसनीपणा बद्दल स्वतःला दोष न देता ...आपण वेळेवर लक्ष देवू शकलो नाही .. अशी अपराधीपणाची किवा आता हा कधीच सुधारू शकणार नाही अशी निराशेची .. आमचे नशीब फुटके .. आमचे मागील जन्माचे भोग आहेत ते भोगलेच पाहिजेत ही वैफल्याची भावना ठेवता ..कँन्सर , मधुमेह .. रक्तदाब ..हृदयरोग ..किवा इतर दीर्घकालीन उपचार घ्याव्या लागणाऱ्या आजारासारखाच हा देखील एक आजार आहे हे समजून घ्यायला हवे व आपला माणूस नक्की बरा होईल असा सकारात्मक विचार करायला हवा .. बहुधा तसे न होता व्यसनीच्या पत्नीच्या माहेरचे लोक व्यसनी व्यक्तीच्या आईवडिलांना किवा भावंडाना ..तुम्ही आम्हाला फसविले .. आमच्या मुलीच्या आयुष्याचे वाटोळे केलेत .. असा दोष देतात नाहीतर व्यसनीचे पालक त्याची पत्नी नीट वागत नाही म्हणून जास्त पितो .. तीला चांगले संस्कार नाहीत ..सारखी कटकट करते ..माहेरी जाते ..तिच्या माहेरचे लोक याचा अपमान करतात ..यांच्या संसारात लुडबुड करतात म्हणून हा पितो.. असे एकमेकांवर दोषारोप करत बसतात .. याचा फायदा घेवून व्यसनी व्यक्तीला मिळतो व तो अधिक अधिक बेताल होतो .. व्यसन कसे ..कोणामुळे लागले ..का वाढले याची चर्चा करत बसण्यापेक्षा पालकांनी आपापसातील सर्व गैरसमज दूर करून एकदिलाने व्यसनी व्यक्तीला उपचार देण्यासाठी मानसिक व आर्थिक तयारी ठेवायला हवी .. काहीवेळा एकदा उपचार देवून झाले ..मात्र काही फायदा झाला नाही ....आता तो आणि त्याचे नशीब .. याला कायमचे हाकलून देणार .. हा मेला तर बरे .. हा कधीच सुधारू शकणार नाही असे टोकाचे विचार मनात येवू शकतात ..हे विचार झटकले पाहिजेत ..कारण त्याला उपचार दिले नाहीत तर तो उपचारांना जितका खर्च येवू शकतो याच्या कितीतरी पट अधिक आर्थिक ..शारीरिक हानी करू शकतो ..शिवाय घरातील सदस्यांची आपापसात भांडणे .. कटकटी .. त्याचे घरातील लहान मुलांवर होणारेदुष्परिणाम .. या सगळ्या गोष्टी ध्यानात घेवून वारंवार उपचार देणे व तो बरा होईपर्यंत देणे ..हेच ध्येय ठेवले पाहिजे ..थोडी थोडी घ्यायला हरकत नाही अशी तडजोड देखील नको कारण तो थोडी घेवू शकत नाही हे शास्त्रीय सत्य आहे .. तो नक्की बरा होईल हा विश्वास मनात जागवला पाहिजे ...मँडमच्या मार्गदर्शनानंतर बहुधा पालकांना काहीच शंका उरत नसे त्या अतिशय संतुलित पद्धतीने योग्य ..समर्पक शब्द वापरून सर्वाना दिलासा देत असत .. मुद्देसूद ..मानसशास्त्रीय संकल्पने वर आधारित असे त्यांचे बोलणे ऐकून नव्या उमेदीने ..नव्या आशेने पालक निश्चिंत होत असत तर आम्ही उपचार घेणारे लोक.. आपण यातून नक्की बाहेर पडू शकतो ..फक्त त्यासाठी प्रामाणिक पणे मेहनत केली पाहिजे .. आपल्यामुळे इतरांना झालेल्या त्रासाची नुकसानभरपाई केली पाहिजे असा निर्धार करत असू . पालक सभे नंतर व्यक्तिगत समुपदेशन व पालकांचे समुपदेशन समुपदेशकांच्या खोल्यात केले जाई ..त्यात कौटुंबिक समस्या .. वैवाहिक समस्या .. व इतर समस्यांवर चर्चा करून योग्य मदत काय करता येईल ते ठरवले जाई .

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी सकाळी ' पुनर्जन्माचा वाढदिवस ' हा कार्यक्रम होई ..म्हणजे ' मुक्तांगण ' सुरु झाल्यापासून तेथे उपचार घेवून १ वर्ष किवा त्याहून अधिक व्यसनमुक्तीची वर्षे पूर्ण केलेल्या व्यसनमुक्त राहणाऱ्या मित्रांचा मँडम , बाबा किवा बाहेरून बोलाविलेल्या एखाद्या प्रतिष्ठीत व्यक्तीकडून व्यसनमुक्तीचे पदक देवून त सन्मान केला जाई ..हा कार्यक्रम अतिशय भावविभोर करणारा असे .. एरवी आपण एखाद्या व्यक्तीचा जन्म तारखेने होणारा वाढदिवस आणि हा व्यसनमुक्तीचा वाढ दिवस यात खूप फरक होता .. आपण काहीही केले नाही ..किवा काहीही केले तरी जन्माचा वाढदिवस साजरा होऊ शकतो ..वय वाढण्यासाठी काहीच प्रयत्न करावे लागत नाहीत .काळाबरोबर वय वाढते .. मात्र हा व्यसनमुक्तीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले असतात व्यसनी व्यक्तीने .. त्याच्या सगळ्यात जास्त आवडत्या गोष्टीपासून दूर राहणे .. कितीही मनाविरुध्द घडले तरी व्यसनाचा आधार न घेणे .. अनेक मोह ..चांगल्या वाईट घटना घडून गेल्यावरही .. स्वतःला फक्त एकदा ..थोडेसे या आकर्षणापासून दूर ठेवणे सोपे काम नव्हते .. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला समुपदेशक प्रस्तावना करून या वाढदिवसाचे महत्व सांगे .. हा कार्यक्रम जे व्यसनमुक्तीचा वाढदिवस साजरा करत आहेत त्यांचा सातत्याने पुढेही व्यसनमुक्त राहण्याचा निर्धार वाढविणारा असतो ...व उपचार घेणाऱ्या मित्रांच्या मनात आपणही असाच वाढदिवस साजरा केला पाहिजे अशी प्रेरणा जागवणारा ठरतो ..असे सांगितले जाई ..त्यानंतर आम्ही निवासी कार्यकर्ते एक समूह गीत म्हणत असू .. हे गीत सुप्रसिद्ध मनोविकास तज्ञ डॉ . आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेले होते ते खालील प्रमाणे !

हर नया दिन ..इक नई सुबह ..हर सांस में जागी आशा
दूर हटे ..गम कें बदल ..अब नही चाहिये कोई नशा ||

घेर लिया था अंधेरोने ..खयाल बनके घायल
इक पल भी ऐसा ना बचा था ..जो ना बनाता कायर
जिने कें इस संगर में ..सामने आई नई दिशा ....
हर नया दिन ..............................................|| १||

छोड दिये अहेसास पुराने ..गाड दिया अभिमान को..
अपने भीतर झांक कें देखा ..डबे हुवे ..इन्सान को
विकार मनके विकल हुवे ..अब हुई सत्य की अभिलाषा
हर नया दिन ..............................................||२||

अब जिवन की राहों पर ..विश्वास हमारा साथी है ..
समय समय कें गहेरे रंग ..इंद्रधनुष की भांती है ..
ये देन ना फिर बिखरा देंगे ..रहे हमारी ये मनीषा ..
हर नया दिन ...............................................|| ३||

या गीतातील अर्थपूर्ण शब्द ..त्याला लावलेली चाल . स्वरातील चढ उतर इतके सुंदर आहे की ते गीत म्हणताना आम्हाला मनात व्यसनमुक्तीची शक्ती संचारते आहे असे वाटे तर गाणे ऐकणाऱ्या लोकांना एखादे समर गीत ऐकल्यानंतर जसे लढाईचे स्फुरण चढते ..तसे व्यसनमुक्तीच्या लढाई चे स्फुरण चढत असे .


================================================================

दूरदर्शन मालिका ! (  भाग १६९वा )

आमच्या समूहगीत गायनानंतर मग पुनर्जन्माचा वाढदिवस साजरा करणाऱ्या मित्रांना पदक देवून सन्मानित केले जाई .. त्यांचे समुपदेशक थोडक्यात त्यांच्या व्यसनमुक्तीच्या प्रवासाबद्दल माहिती देत असत ..असा वाढदिवस साजरा करणाऱ्या मित्रांचे मनोगत खूप प्रेरणादायी असे .. व्यसनामुळे कसे नुकसान झाले .. त्यातून सावरताना किती संघर्ष केला .. कुटुंबियांची मदत वगैरे .. कधी कधी त्याच्या सोबत आलेली त्याची पत्नी ..आई अथवा इतर नातलग मंडळींपैकी कोणीतरी बोले .. नातलगांचे बोलणे तर हृदयात घर करून जाई ..एका व्यक्तीच्या व्यसनामुळे घरात कसा कलह निर्माण होतो ..आर्थिक ओढाताण ...भांडणे .. अशी सारी कुटुंबियांची होणारी कुचंबणा ऐकताना आम्हाला पण आमच्या घरातील लोकांवर आम्ही कळत ..नकळत केलेले अन्याय आठवत असत .. डोळ्यात पाणी येई ते ऐकताना ..शेवटी प्रमुख अतिथींचे मनोगत असे ...पहिल्यांदा हा कार्यक्रम पहिला तेव्हाच मी मनाशी निर्धार केला होता ..आपण पुढच्या वर्षी नक्की व्यसनमुक्तीचे पदक घ्यायचे .. खरोखर हा वाढदिवसाचा कार्यक्रम म्हणजे एक रोमांचकारी अनुभव असे .

आता मुक्तांगण मध्ये स्थिरावलो होतो .. मला येवून सुमारे चार महिने होत आले होते ..या काळात मी साफसफाई .. इतर कामात मदत करताना ..समूह उपचार कसे घेतात .. योगाभ्यास घेणे .. मुक्तांगणच्या बाहेरची किरकोळ कामे करणे यात पटाईत झालो होतो .. अर्थात स्वभावानुसार आम्ही कार्यकर्ते एकमेकांची मस्करी देखील करत असू ..अजून वृत्तीत पाहिजे तेवढा गंभीरपणा आलेला नव्हता .. व्यसनमुक्त रहात असताना जी उर्जा निर्माण होते किवा व्यसनात खर्च होणाऱ्या ज्या उर्जेची बचत होते ती उर्जा पूर्णपणे सकारात्मक कामात लावली पाहिजे असे मँडम सांगत ..ते मात्र पूर्णपणे जमत नव्हते तसेच अजूनही माझी रात्रीची झोप सुरळीत झाली नव्हती ..दिवसभर जरी मी कामे ..मस्ती ..मस्करी ..थोडेसे वाचन यात वेळ व्यतीत करीत होतो तरीही रात्री मात्र सुमारे २ ते ३ वाजेपर्यंत झोप येत नसे .. एकदा बिछान्यावर गेले की अनिश्चित भविष्यकाळ.. भयावह भूतकाळ .. या बद्दल विचार मनात येत असत .. उलट सुलट विचारांनी मन व्यथित होई .. अनघा पासून दूर होऊन सुमारे दीड वर्ष होत आले होते ..तिचा काहीच ठाव ठिकाणा नव्हता .. माझ्या भविष्यकाळाच्या स्वप्नांचा जणू आत्माच हरवल्यासारखे झाले होते .. अनघाची आठवण झाली की मन खूप व्याकुळ होई ..स्वताच्या असहायतेची खूप चीड येई .. तर कधी कधी सगळ्या जगाचा राग येई ..' एक तू ना मिला ..सारी दुनिया मिले भी तो क्या है ' अशी अवस्था होई ..मग काही दिवस मी उदास राहत असे .. निराशेत..वैफल्यात आला दिवस कसातरी ढकलत असे .. मँडमना देखील मी अनघाबद्दल सगळे सांगितले होते .. त्यांनी मला धीर देवून ..सगळे काही नीट होईल यावर विश्वास ठेवायला हवा सतत असा दिलासा दिला होता .. मी असा उदास मूडमध्ये असलो की रात्रीचा एकटाच योगाभ्यासाच्या हॉल मध्ये जावून जुनी दर्दभरी गाणी म्हणत बसे ..बाकीचे निवासी कार्यकर्ते कधी कधी माझी थट्टा करत.. तर कधी सहानुभूती दर्शवत असत . अनघाने व्यापलेला मनाचा कप्पा मला अस्वस्थ ठेवण्याचे काम चोख बजावत होता .

त्याच काळात मुक्तांगणच्या कार्यात मोलाचा सहभाग असलेले डॉ . आनंद नाडकर्णी यांनी ब्राऊन शुगरच्या व्यसनाधीनते वर आधारित .. दूरदर्शन मालिका निर्मितीचे काम सुरु केले होते .' एक आकाश संपले ' असे त्या मालिकेचे नाव होते ..ही मराठी मालिका नंतर दूरदर्शनवर प्रसारित झाली होती .. मालिकेच्या दोन भागांचे चित्रीकरण मुक्तांगण मध्ये होणार होते ..सुमारे चार दिवस त्या मालिकेत काम करणारे कलाकार .. तंत्रज्ञ यापैकी काही लोक आमच्या सोबत मुक्तांगण मध्ये रहायला होते .. या मालिकेतील व्यसनी व्यक्तीची प्रमुख भूमिका चावला या आडनावाच्या कलाकाराने केली होती ( त्याचे पहिले नाव आता आठवत नाहीय नीट) .. हा मराठी उत्तम बोलत असे..त्याने त्याची भूमिका उत्तम व्हावी म्हणून आमच्या सगळ्यांकडून ब्राऊनशुगर मुळे येणाऱ्या नशेबद्दल..टर्की बद्दल माहिती घेतली होती . मालिकेतील नायक ब्राऊन शुगरच्या व्यसनात अडकून खूप नुकसान करून घेतो आणि मग उपचारांसाठी मुक्तांगण मध्ये दाखल होतो असे कथासूत्र होते ..त्यानुसार नायकाच्या मुक्तांगण मधील उपचारांच्या भागाचे चित्रीकरण मुक्तांगण मध्ये होणार होते ....त्यात समूह उपचार .. योगाभ्यास .. व्यक्तिगत समुपदेशन .. संगीत उपचार यांचे देखील थोडे थोडे चित्रीकरण झाले ..संगीत उपचारांच्या चित्रीकरणाच्या वेळी ...मी चांगला गातो म्हणून माझे ' या जन्मावर ..या जगण्यावर शतदा प्रेम करावे ' हे गाणे चित्रित झाले .. समूह उपचार सुरु आहेत ..नायक वार्डसोबतच्या इतर मित्रांसोबत संगीत उपचारात बसला आहे आणि समोर मी हे गाणे म्हणतोय असा प्रसंग चित्रित केला गेला . हा माझा मोठा सन्मान होता .. त्या निमित्ताने मला कँमे-या समोर येण्याची संधी मिळाली होती ..सुमारे दोन मिनिटे  का होईना ..मी त्या मालिकेत झळकलो होतो .. चित्रीकरण झाल्यावर मनात विचार आला अनघा जिथे कुठे असेल ती नक्की ही मालिका पाहिल .. तीला मी पण दिसेन ..मी आता चांगला आहे हे कळेल ..मुक्तांगण मध्ये आहे हे देखील समजेल..कदाचित ती माझ्याशी संपर्क करेल .

================================================================

डॉ .आनंद नाडकर्णी यांची जादू ! ( भाग १७० वा )

डॉ .आनंद नाडकर्णी या सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञांबद्दल मुक्तांगण मध्ये ऐकूण होतो की ते खूप छान बोलतात .. सुंदर समूह उपचार असतो त्यांचा वगैरे .. ते मुक्तांगणच्या कार्यकारी मंडळात होते असेही ऐकले होते .. ते त्याकाळी दोन तीन महिन्यातून एकदा मुक्तांगणला येत असत .. ठाण्याला त्यांचे क्लिनिक होते .. त्याकामातून वेळ काढून ते खास मुक्तांगण मध्ये आले की एखादा समूह उपचार घेत असत सर्वांचा .. अगदी प्रथम मी त्यांना महिले तेव्हा मी बुचकळ्यात पडलो की इतक्या अवाढव्य देहाचा माणूस इतका चपळ कसा ? त्यांचा चेहरा नेहमी हसतमुख आणि प्रसन्न असे ..डोळे अतिशय बोलके .. ते जेव्हा समूह उपचार घ्यायला आले तेव्हा आम्ही सगळे ते काय सांगतात याकडे लक्ष देवून होतो ..जुनी मंडळी देखील या वेळी नवीन काय सांगणार उत्साहाने बसली होती .. ते दारू ..चरस ..गांजा अगैरे व्यसनांचा अजिबात उल्लेख न करता त्या दिवशी बाबांसारखेच सृजनशीलता या विषयावर बोलले .. त्यांचे वजन सर्वसामान्य माणसाच्या तुलनेत जरा जास्तच होते .. तरीही ते अतिशय चपळपणे हालचाली करत होते .. आधी त्यांनी सर्वाना स्वतची ओळख करून दिली .. मग विचारले तुमच्या पैकी किती जाण कविता करतात ? हा अगदी अनपेक्षित प्रश्न होता .. आमच्या पैकी काही जणांनी हात वर केले.. तेव्हा पुढे म्हणाले आज आपण सर्व जण मिळून कविता करायची आहे ..अशी समूहाने मिळून कविता कशी करायची ते मला समजेना ..त्यांनी मग पुढे कवितेचा सर्वात महत्वाचा भाग भावना आहे असे सांगत .. आपल्या मनातील भावना मोजक्या अर्थपूर्ण शब्दात मांडणे म्हणजे कविता .. कविता करायला देखील विशेष प्रतिभा असलीच पाहिजे असे नाही तर .. आपल्या मनातील नेमक्या भावना ओळखण्याचे कसब ..त्या भावना सुसंगतपणे इतरांपर्यंत पोचण्यासाठी ..कागदावर उतरवण्याची कळकळ ..आणि आपल्या मनातील भावनेसाठी योग्य शब्द निवडण्याचे भान हवे हे स्पष्ट केले . पूर्वी कॉलेजला असताना मी काही प्रेम कविता केल्या होत्या .. त्यात तुझ्याशिवाय जिवन ...जिवंत मरण ..मनाला चटका .. कडक उन्हाळा .. हृदयातील खळबळ .. हुरहूर .. विरह .. समर्पण .. निष्ठुर जग .. असे शब्द असत बहुधा . अश्या चार पाच कविता करून काही दिवस मी कवी म्हणून मिरवलो होतो कॉलेजला.. त्यामुळे मी देखील कविता कोण कोण करतो हे नाडकर्णी सरांनी विचारल्यावर हात वर केला .. मग नाडकर्णी सर् पुढे सांगू लागले .. कविता करताना दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की कवितेतील शब्द एकमेकांची घट्ट बांधणे..म्हणजेच चपखल पणे मांडणे .. त्यासाठी अगदी खूप वाचन .. शब्द संग्रह असलाच पाहिजे असे अजिबात नाही असे सांगताना त्यांनी बहीणाबाई चौधरी सुप्रसिध्द कावियात्रींचे उदाहरण दिले ..अशिक्षित असलेल्या या स्त्री ने व्यवहारात नेहमी वापरले जाणारे शब्द वापरून अतिशय सुंदर कविता केल्यात ..ज्या अजरामर आहेत ..

कवितेत यमक नावाचा प्रकार देखील महत्वाचा आहे ज्यात कवितेच्या ओळीतील शब्दांच्या उच्चारांचा ..ताल जपावा लागतो .. असे सांगून यमक म्हणजे नेमके काय हे स्पष्ट करताना फळ्यावर नळ हा शब्द लिहिला व आम्हाला या शब्दासारखे शेवटी ' ळ ' आलेले दोन अक्षरी व तीन अक्षरी शब्द सांगा असे विचारले .मुलांनी त्यावर .. चळ ..मळ ..कमळ..वळ ...कांबळ..वगैरे उत्तरे दिली ..यावर सगळ्यांना शाबासकी त्यांनी असेच करायचे आहे आपल्याला असे म्हणत फळ्यावर ' हसत हसत जगायचे ' अशी ओळ लिहिली व या ओळीतील शब्दांचा ताल ..अर्थ ..यमक सांभाळून पुढच्या ओळी आम्हाला सुचवायला सांगितल्या .. एकंदरीत गम्मत होती सगळी ..एकाने पुढे ' व्यसन नाही करायचे ही ओळ सुचविली .. दुसऱ्याने ...इतरांनाही हसवायचे असे लिहिले ..मी देखील मग त्याखाली .. नाही रडायचे , नाही कण्हायचे असे लिहिले .. पाहता पाहता ऐक अर्थपूर्ण कविता तयार झाली ती अशी

हसत हसत जगायचे
व्यसन नाही करायचे
नाही रडायचे, नाही कण्हायचे
नाही हरायचे ,नाही पळायचे
हसत हसत जगायचे .

समर्थ पणे उभे राहायचे
इतरांनाही हसवायचे
नाही उतायचे ,नाही मातायचे
नाही कोणालाही रडवायचे
हसत हसत जगायचे !

ही कविता फक्त पाच मिनिटात तयार झाली ..मग पुन्हा त्यांनी दुसरी ओळ लिहिली ..पुन्हा कविता झाली .. तासाभरात आम्ही चार पाच कविता तयार केल्या सर्वानी मिळून . मग नाडकर्णी सरांनी या कवितेला आता आपण चाल लावू असे मनात टाळ्यांच्या तालावर कवितेला चाल लावली . खूप मजा येत होती सर्वाना ..अश्या हसत खेळत झालेल्या समूह उपचारांचा लाभ असा की काहीतरी नवीन शिकायला मिळाले सर्वाना .. सुमारे दीड तास सर्वांच्या मनातील निराशा ..वैफल्य ..अश्या नकारात्मक भावना पळून जावून त्या जागी.. उत्साह .. उत्स्फूर्तता ..आनंद या भावना निर्माण झाल्या ..शिवाय नंतर वार्डात अनेक कवी निर्माण झाले ..ज्यांनी तीनचार दिवस कविता करून धुमाकूळ घातला होता . एखादी कठीण वाटणारी गोष्ट अतिशय सोपी सर्वाना समजेल अश्या प्रकारे सांगायची सरांची हातोटी अवर्णनीय होती .. व्यसनांपासून दूर रहात जर अश्या गोष्टी करून आपण आपल्या भावनाव्यक्त करत गेलो तर ..व्यसनमुक्ती सहज साध्य होऊ शकते हे पुढे त्यांनी सांगितले .मुक्तांगण च्या या धावत्या भेटीत डॉ. आनंद नाडकर्णी म्हणजे निखळ आनंद अशी त्यांची छाप त्यांनी सर्वांवर सोडली होती ... त्या नंतर लायब्ररीत असलेली त्यांनी लिहिलेली बहुतेक पुस्तके मी आवर्जून वाचली !' गद्धे पंचविशी ' .. ' एका सायकियाट्रिस्टची डायरी' ..ही नावे ठळकपणे आठवतात ..नंतर त्यांचे व्यसनमुक्ती वर आधारित ' मुक्तीपत्रे ' विवेकनिष्ठ भावोपचार या उपचार पद्धतीवर आधारित ' विषादयोग ' वगैरे !

कार्यकर्ता प्रशिक्षण

धावती भेट ..ऑब्सेशन ! ( भाग १६१ वा )

दुपारी जेवणे झाल्यावर सर्वांचा निरोप घेवून मी एक दिवसासाठी घरी जायला निघालो .. मुक्तांगणच्या बाहेर पडताच ..एकदम सगळी बंधने निघून गेल्यासारखी वाटली .. मुक्तांगण मध्ये असताना सतत कोणी न कोणी तरी आपल्याला पहात आहे ..आपले परीक्षण करीत आहे .. आपल्या चुकांवर लक्ष ठेवून आहे याची जाणीव होती .. बाहेर तसे नव्हते .. रस्त्यावरचे लोक ओळखीचे नव्हते .. कोणाला माझ्यावर लक्ष ठेवायला वेळही नव्हता ..जो वर मी काही वेगळे वर्तन करणार नाही तोवर कोणीही माझी दखल घेतली नसती ..ही अशी अती स्वातंत्र्याची भावना माझ्या सारख्या व्यसनी करिता घातक असते .. अशा वेळी मनात व्यसनाचे विचार येवू शकतात .. आणि या विचारांना जर थारा दिला गेला तर ते विचार .. थोडीशी घ्यायला काय हरकत आहे ..कोणाला समजणार सुद्धा नाही ..अशा भावनेत रुपांतरीत व्हायला वेळ लागत नाही ..या प्रकाराला ' ऑब्सेशन ' असे म्हणतात हे मला मुक्तांगण मध्येच समजले ..म्हणजे व्यसनमुक्तीच्या काळात ... व्यसन केल्यावरच्या त्या मस्त धुंदीची आठवण येणे .. थोडी घेण्यास काय हरकत आहे असे विचार वारंवार मनात येणे .. आता आपल्याला व्यसनमुक्ती साठी आवश्यक अशा सगळ्या गोष्टी माहीतच आहेत ..तेव्हा एकदा घेतल्याने काही फरक पडणार नाहीय ..वगैरे विचार मनात येवून व्यसनमुक्तीचा निश्चय डळमळीत होऊ शकतो .. हे विचार जर लगेच झटकून टाकले नाहीत ..तर हमखास गडबड होणार असते ...माझ्या मनात तो विचार आला होता पण मी लगेच झटकून टाकला ...मनाला दुसरीकडे वळवले ..अनघा ..नाशिक ..अकोला व्यसनामुळे झालेले नुकसान यावरच सारे विचार केंद्रित केले आणि सुरक्षित झालो .. शिवाजीनगर बस स्टँड वर आलो आणि बस मध्ये बसलो ..मला वार्ड च्या खात्यातून ७० रुपये दिले गेले होते ..बसमध्ये प्रधान्याने अनघाचा विचार मनात होता ..तिला शेवटचे पाहून सव्वा वर्ष उलटून गेले होते ..या कालावधीत तिच्या बद्दल काहीच माहिती समजली नव्हती ..तिनेही मला संपर्क करण्याचा प्रयत्न केला नव्ह्ता ..हे जरा विचित्र वाटत होते ..काहीतरी अघटीत तर        झाले नसावे ही शंका मनात येत होती .. बहुधा तीने पळून जावून लग्न करू असा प्रस्ताव ठेवल्यावर मी माघार घेतली म्हणून तीला राग तर आला नसावा माझा ? हा विचार व्यथित करीत होता .. त्यावेळी परिस्थितीच अशी होती की तसे पळून जावून लग्न करण्यासारखी परिस्थिती नव्हती माझी .. तेव्हढी आर्थिक कुवत नव्हती .. ताकदही नव्हती ..धैर्य नव्हते ..व्यसन सुरु असल्याने तेव्हा शरीर मनाने देखील कमकुवत झालो होतो मी ... तिच्या म्हणण्या नुसार वागणे वेडेपणा ठरला असता ... असे माझे विचार ..तर अनघा कदाचित आयत्या वेळी मी माघार घेतली .. ज्याच्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी केली होती त्यानेच कच खाल्ली म्हणून निराश झाली असावी .. निमुटपणे कुटुंबियांच्या म्हणण्याला होकार देवून तीने माझे नाव तिच्या हृदयातून कायमचे पुसून टाकले असेल तर ? ..या विचाराने माझा थरकाप झाला .. पुन्हा मनावर निराशेचे मळभ दाटून आले .. एकदा फक्त एकदा तरी तीला भेटले पाहिजे असे तीव्रतेने वाटू लागले .. आशा निराशेच्या खेळ मनात सुरु राहिला नाशिकपर्यंत .. !

घरी पोचलो  वहिनींनी दार उघडले .. त्यांना मला असे अचानक पाहून नवल वाटले ... सुहास घरातच होता ..एकदम कसा काय आलास ? उपचार पूर्ण झाले का ? वगैरे प्रश्न विचारू लागला ..त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची चिंता वाढल्याचे जाणवत होते .. आई काही दिवस नांदेडला मामा कडे गेलीय असे समजले .. भावाला परवा परत जाणार आहे असे सांगितल्यावर त्याचे समाधान झाले .. जेवण करून भावाशी गप्पा मारत बसलो .. त्याला ' मुक्तांगण ' मधील गमती जमती सांगितल्या .. एकदोन वेळा अनघाबद्दल याला विचारावे असे वाटले पण तो काहीच सांगणार नाही याही खात्री होती ..उगाच तिचा विषय पुन्हा आमच्या विसंवादाचे कारण बनला असता ..आई घरी नव्हती हे खूप वाईट झाले होते ..अनघाच्या बाबतीत माहिती साठी माझी सगळी भिस्त आईवर होती .. तीला कदाचित सगळे सविस्तर माहित असावे .. दुसऱ्या दिवशी सकाळी नाशिकरोडला मित्रांकडे जावे अशी इच्छा होत होती ..पण घरा बाहेर पडलोच नाही .. आईचे कपाट शोधून अनघाचे एखादे जुने पत्र दिसतेय का ते पहिले .. पण हाती काहीच लागले नाही .. सायंकाळी मेरी मध्येच एक चक्कर मारली .. कंटाळा आल्यासारखे झाले होते .. कसातरी दिवस रेटला होता ..रात्र कठीण गेली ..अनेक शंका कुशंका .. जर तरची वावटळ मनात येत होती ...रफी लता चे एक जुने गाणे मनात घोळत होते .. .. ' याद में तेरी जाग जाग कें हम ..रातभर करवटे बदलते है ..हरघडी दिलमे तेरी उल्फत कें धीमे धीमे चिराग जलते है .. त्यातील एक कडवे आहे ' क्या कहे तुझसे क्यू हुई दुरी ..हम समझते है अपनी मजबुरी ..जिंदगी कें उदास राहो में ..तेरी यादो कें साथ चलते है ...' अशा अवस्थेत ही दर्दभरी गाणी मनात तुंबळ युद्ध माजवतात .. घायाळ व्हायला होते .. !

शेवटी मनावर दगड ठेवून पुन्हा मुक्तांगणला जायला निघालो ..भावाला हायसे झाल्यासारखे वाटले असावे .. बहुतेक आता कायमचे ' मुक्तांगण ' ला राहीन असे त्याला सांगितले ...बसमध्ये पुन्हा मनाचे वेगवेगळे रंग अनुभवत होतो .. एकदाचा सुरक्षित असा मुक्तांगण ला पोचलो .. सर्व मित्रांना खूप आनंद झाला ..सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी मी सुरक्षित आल्याबद्दल सर्वानी माझे अभिनंदन केले . ती रात्र पुन्हा झोपेविना तळमळत गेली ..आपण घेतलेला निर्णय चूक की बरोबर हे ठरवता येत नव्हते .. आत्मविश्वास डळमळीत झाल्यासारखा वाटला .. दुसऱ्या दिवशी मँडमना भेटलो .. त्यांना देखील मी जावून परत आल्याचे समाधान वाटले .. त्यांनी आता तुला येथे अधिक जवाबदारीने राहावे लागेल याची कल्पना दिली ..माझ्या येथे राहण्याचा खर्च म्हणून भावाने दर महिना तीनशे रुपये मुक्तांगणला भरण्याचे ठरले होते .. तो तीनशे रुपयांचा चेक सोबत आणला होता ..मँडम कडे तो दि ला .. चेक घेताना मँडम म्हणाल्या हे पैसे मुकांगणला कमाई व्हावी म्हणून घेतले जात नाहीत तर ..तुला त्याची किंमत राहावी म्हणून घेतले जातात ..आयते ..फुकट ..असे काही मिळाले तर त्याची किंमत रहात नाही असा माणसाचा स्वभाव असतो .. आजपर्यंत तुला आईवडिलांचे प्रेम .. त्यांनी दिलेल्या सुख सुविधा ..वगैरे गोष्टींची किंमत नव्हती कारण तुला हे सगळे आयते ..आपोआप मिळालेले होते ..आता या पुढे मिळालेल्या संधीचा ..प्रेमाचा .. सुविधांचा गैरवापर न करता राहिलास तर नक्कीच फायदा होईल .. पाहता पाहता सगळे बदलेल ..! मँडम च्या बोलण्याने जरा धीर आला !

================================================================

कार्यकर्ता प्रशिक्षण ! (  भाग १६२ वा .)

नाशिकहून मुक्तांगणला परत आल्यावर ..आता मी मुक्तांगण येथे फक्त उपचार घेणारा पेशंट नव्हतो तर त्यासोबतच मुक्तांगणच्या निवासी कार्यकर्ता देखील झालो होतो .. म्हणजे येथे राहत असताना थेरेपी मध्ये सहभाग घ्यायचाच होता अधिक मुक्तांगणच्या कामात देखील सहभागी व्हायचे होते ..माझ्यावर हळू हळू काही जवाबदा-या टाकण्यात येणार होत्या .. निवासी कार्यकर्त्यांची सर्वात पहिली आणि मोठी जवाबदारी असे ती संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्याची ... जरी स्वैपाकाची मोठी भांडी घासण्यासाठी वार्डच्या लोकांची दोन दोन जणांची पाळी असे ..तरी संपूर्ण इमारतीत झाडू मारणे ..झाडू मारून झाल्यावर सगळीकडे फिनेलच्या पाण्याने पोछा मारणे ...समुपदेशकांच्या खोल्या झाडून स्वच्छ ठेवणे .. इमारतीत असलेले संडास..बाथरूम स्वच्छ करणे .. बागकाम करणे .. इमारतीच्या मागील मेंटल हॉस्पिटलच्या आवारातील परिसरात खड्डे करून वेळो वेळी झाडे लावणे .. ड्रेनेज लाईन स्वच्छ ठेवणे .. मुक्तांगण मध्ये होणाऱ्या कार्यक्रमांची तयारी करणे ..अशी अनेक किरकोळ आणि अनेक महत्वाची देखील कामे निवासी कार्यकर्ते करत असत .. मँडम ने जेव्हा बंधू ला बोलावून त्याला तुषार देखील आजपासून तुमच्या सोबत कम करणार आहे असे सांगितले तेव्हा त्याला खूप आनंद झालेला दिसला .. बाहेर आल्यावर मला मिठी मारून म्हणाला ' बरे झाले तू अजून काही महिने येथे थांबतो आहेस ते ..एका महिन्यात खरे तर काहीच शिकायला मिळत नाही .. ' बंधू चे म्हणणे अगदी खरे होते .. इतक्या वर्षांचे व्यसन .. विचारांचे बिघडलेपण .. भावनिक असंतुलन केवळ ३५ दिवस किवा एका महिन्यात निघून जाणे कठीणच असते ..त्या दिवशी संध्याकाळीच प्रार्थनेच्या वेळी बंधूने वार्डात सर्वाना सांगितले की आता निवासी कार्यकर्त्याच्या आमच्या टीम मध्ये तुषार देखील सामील झाला आहे ..सर्वानी टाळ्या वाजवून पाठींबा दिला . माझी नेमणूक रोज सगळा वार्ड झाडण्यासाठी करण्यात आली ..अर्थात इतरही कामात मी सहभागी असणारच होतो .. !

एकदा रात्री जेवणे झाल्यावर बंधू माझ्याकडे आला .. म्हणाला ' अरे यार वार्डचे बाथरूम चोक झालेय ते स्वच्छ करायला हवेय आपल्याला रातोरात .. नाहीतर उद्या सकाळी वांधे होतील सगळ्यांचे ..' मी देखील उत्साहाने चल आपण साफ करूयात म्हणून निघालो .. वार्ड च्या समोर मोठा पँसेज ओलांडला की टी.व्ही .रूम व डायनिंग रूमचा मोठा वार्ड इतकाच हॉल होता ..त्याच्या कडेला चार संडास ..दोन बाथरूम ..आणि त्याच्या समोर लघवी करण्यासाठी वेगळी जागा होती .. त्या वेळी मुक्तांगण मध्ये तंबाखू विडीची बंदी नव्हती... फक्त सगळे लक्ष दारू ..आणि इतर मादक पदार्थांवर केंद्रित होते .. विडी ओढणा-याला दिवसाला सुमारे १० विड्या मिळत असत व तंबाखू खाणाऱ्याला दिवसाला तंबाखूची फक्त एक पुडी मिळे..अनेकदा विडी ओढून झाल्यावर .. थोटूक कचऱ्याच्या बादलीत टाकून द्यावे असा दंडक असला तरी ..येथे राहणारे सगळे मुळातच नियम तोडण्याच्या वृत्तीचे असल्याने बहुतेक जण विडीची थोटके लघवी करण्याच्या सिरँमिक च्या भांड्यात किवा खालच्या लघवी वाहून नेणाऱ्या नालीत टाकून देत असत ....शिवाय नीट पाणी टाकत नसत ..त्यामुळे ती नाली तुंबली होती ..लघवीचे पाणी नीट ड्रेनेज च्या पाईप पर्यंत जात नव्हते ..नालीतून ते बाहेर बाथरूम मध्ये पसरत होते .. खराटा..फिनेल .. तुंबलेली जागेत घालण्यासाठी एक काठी असे साहित्य घेवून आम्ही तेथे पोचलो ..रात्री चे ११ वाजून गेले होते ..वार्ड मधील सगळे मेंबर झोपले होते .. बाथरूम मध्ये शिरताच तुंबलेल्या पाण्याचा दर्प नाकात शिरला .. बंधू .मी ..आणि शेखर असे तिघे होतो .. बंधूने नालीच्या तोंडाशी असलेल्या गोलाकार छिद्रात काठी घालण्याचा प्रयत्न केला पण काठी पुढे जाईना .. म्हणजे तोंडाशीच चोकअप असावे .. मग बंधू ने त्या लघवीच्या पाण्यात सरळ हात घातला ..ते पाहुन मला कसेतरीच झाले ... बंधू त्या घाणेरड्या पाण्यात बिंधास्त् हात घालून हाताने चाचपडत अंदाजे काय अडकले आहे ते पाहण्याचा प्रयत्न करत होता ..मग त्याने हात बाहेर काढला तेव्हा त्याच्या हातात विडीची थोटके आली ..ती त्याने बाहेर फेकली ..तितक्यात शेखर म्हणाला ' बंधू नये पंटर को सिखावो ये ' ..बंधू हसला ..' अरे यार पहेलाही दिन है उसका ...जमणार नाही त्याला ' ..पण शेखर मागेच लागला माझ्या .. मी आढेवेढे घेत नालीजवळ बसून त्या पाण्यात हात घातला ..तसा आणखीन जास्त उग्र दर्प माझ्या नाकात शिरला .. एकदम उलटी होईलसे झाले ..मी पटकन उठून उभा राहिलो .. बंधू आणि शेखर हसु..लागले ते पाहुन मला शरमल्या सारखे झाले ..मनात आले आपली ही जणू परीक्षाच आहे ..निर्धाराने पुन्हा खाली बसलो आणि पाण्यात हात घालून आत चाचपडू लागलो ..हात जरा खोल घातला .अगदी कोपरापर्यंत .. माझ्या हाताला देखील बुळबुळीत झालेली बिडीची थोटके ..प्लास्टिकची पिशवी वगैरे लागले ..मी ते बाहेर काढले .. श्वास कोंडून धरला होता इतका वेळ .. तो कचरा बाहेर काढून पुन्हा ..हात घातला .. पुन्हा कचरा काढत गेलो आणि काय आश्चर्य हळू हळू तुंबलेले पाणी ओसरू लागले ..नालीतील सर्व पाणी ड्रेनेज मध्ये वाहून गेले .. बंधू ने माझ्या पाठीवर थाप मारून शाबासकी दिली .. मग आम्ही पाणी आणि फिनेल टाकून सर्व नाली स्वच्छ केली .. तासाभराने समाधानाने सगळे झोपायला निघालो ..मला उगाच हाताला अजून ते घाण पाणी लागलेय ..त्याचा वास येतोय असे वाटत राहिले ..बंधूने समजाविले अरे हे सगळे मानसिक असते ..लहानपणापासून मनावर ते घाण असे संस्कार झाले आहेत आपल्यावर म्हणून आपल्याला तसे वाटते व किळस येते .. लाखो सफाई कामगार रोज हेच काम करत असतात याचा तू कधी विचार केला आहेस काय ? ..बंधूचे बरोबर होते .. हजारो वर्षांपासून अश्या प्रकारची कामे करणारे लोक आहेत .. घाण सगळे करतात मात्र ती साफ करण्याची जवाबदारी विशिष्ट लोकांनाच का द्यायची ? पुढे मी संडास बाथरूम चे चोकअप काढणे .. तुंबलेले गटार साफ करणे .. ड्रेनेज लाईन साफ करणे .. वगैरे कामात तरबेज झालो ..!

दुसरे अजून एक घाण वाटणारे काम म्हणजे उरलेले खरकटे अन्न टाकण्याचा जो मोठा प्लास्टिकचा ट ब होता ... तो टब भरला की मेंटल हॉस्पिटलचा स्वीपर येवून त्या टबातील खरकटे अन्न त्याच्या डुकरासाठी घेवून जाई ..चार पाच दिवसांचे खरकटे साठल्याने ते अन्न अक्षरशः सडलेले असे .. त्या टबात वर फेस आलेला असे ..अश्यावेळी आम्हाला तो टब उचलून बाहेर स्वीपर आला की त्याला नेवून द्यावा लागे ..आणि तो मोठा तब असल्याने उचलायला दोन जण लागत .. त्या टबातील ते फेस आलेले ..दुर्गंधीयुक्त अन्न आम्ही हाताच्या ओंजळीने काढून स्वीपर च्या बादलीत टाकत असू .. एकदा तो फेस पाहून बंधू म्हणाला मस्त फर्मेंनटेशन झालेय .. हातभट्टी ची दारू तयार करताना असाच फेस येतो ..सडका गुळ आणि नवसागर घातलेले मिश्रण फसफसून वर आल्यावर मग भट्टी लावतात ..त्याचेच पाणी आपण दारू म्हणून आनंदाने पितो .. मग या कामाला काय लाजायचे !

================================================================

वार्डमधील धमाल ! ( भाग ६३ वा )

माझी रोज सकाळी वार्ड मध्ये झाडू मारण्याची ड्युटी लागली होती .. आणि दिवसभर इतर लहानमोठ्या कामात सहभागी होत होतो .. सकाळी ७ ला प्रार्थना व चहा झाला की मी झाडू घेवून वार्ड मध्ये शिरत असे .. मँडमनी आमच्या निवासी कार्यकर्त्यांच्या टीम ला कौतुकाने ' मेंटेनन्स टीम ' असे नाव दिले होते ..तसेच त्यांनी आम्हाला कंपनीत कामगार घालतात तशी कॉटनच्या जाड निळ्या रंगाच्या कापडाच्या पँन्ट ..त्याच रंगाचे शर्ट्स देखील शिवून घेतले होते ..मी वार्डात झाडू मारायला जाई तेव्हा बंधू ने वार्ड मधील टेपरेकॉर्डरवर वर छान हिंदी मराठी भजने लावलेली असत .. त्यात स्व.भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांची हिंदी भजनांची एक कँसेट मी पहिल्यांदाच ऐकली होती ..अतिशय सुंदर ..मधुर ..गाणी होती .. त्यातील ' बाजे रे मुरलिया बाजे ' हे भजन तर एकदम मस्तच या भजनांच्या तालावर मी पटापट एकेक पलंग सरकवून.. त्याखालील कचरा काढून झाडू मारत असे ..साधारण २००० फुटांचा वार्ड झाडायला मला कमीत कमी अर्धा तास तरी लागे .. व्यसनी माणसाचे सगळ्यात प्रमुख लक्षण म्हणजे तो अतिशय चाणाक्ष किवा आमच्या भाषेत ' चतरा ' असतो ..असे वेगवेगळ्या गावचे ७० ते ८० चतरे..चलाख ..थोडक्यात सांगायचे तर ..' बारा गावची दारू प्यायलेले ' लोक एकत्र राहत असले की गमती जमती होणारच .. मस्करी ...एकमेकांच्या खोड्या काढणे .. किरकोळ भांडणे हे चालतच होते .. दिवसभरात जेमतेम पाच तास थेरेपीज होत असत मग उरलेला वेळ फार थोडे लोक वाचन .. किवा इतर चांगल्या गोष्टी मध्ये व्यतीत करत .. बाकीचे टिवल्या बावल्या करण्यातच वेळ घालवत ..सर्व जण बहुधा २५ ते ३५ या वयोगटात मोडणारे होते .. काही दारुडे मात्र चाळीशी उलटून गेलेले देखील होते ..त्यापैकी एक मेजर होता सैन्यातला .. स्वतःला जरा शहाणा समजत असे हा मेजर तसेच दारू चांगली आणि ब्राऊन शुगर वाईट ...असा फरक करून ..गर्दुल्ले म्हणजे समाजाला कलंक असे नेहमी म्हणत असे ..त्याचा आम्हाला गर्दुल्ल्यांना खूप राग येई .. शिवाय तो स्वतःला जरा वेगळा ..सैनिकी शिस्तीतील मानत असल्याने चिडला की ' गोळ्या घालीन एकेकाला ' असे म्हणायचा ..त्याची एक सैन्यातील सवय होती ती अशी की ..सैन्यात सकाळी घाई घाई ने परेडला ड्रेसअप करून जावे लागत असल्याने अनेक जण म्हणे सकाळी चहा निवांतपणे पिण्यात वेळ घालवत नाहीत तर ते चहाचा मग घेवून संडासात जातात .. म्हणजे वेळेचे नियोजन नीट होते .. तो इथे देखील सकाळी चहा मिळाला की चहाचा त्यावेळी मुक्तांगणला असलेला जर्मलचा मग घेवून संडासात जाई .. त्याला अनेक वेळा आता तू सैन्यात नाहीस .. इथे असे करू नकोस असे सांगूनही तो ऐकत नसे ..एकदा रात्री तो झोपला असताना आम्ही त्याच्या मगला छोट्याच्या खिळ्याने लहानसे पटकन दिसणार नाही असे छिद्र पाडले.. झाले प्रार्थना झाल्यावर तो घाईने मग मध्ये चहा भरून घेवून संडासात गेला ..दोनच मिनिटात ' एकेकाला गोळ्या घालीन ' असे ओरडत बाहेर आला ..आम्ही सगळे गंभीर चेहरे करून ' काय झाले मेजर साहेब ? असे संभावित पणे विचारू लागलो ..तर अजून चिडला म्हणाला ' मै सब जानता हू ..ये बहोत बडी साजिश है ..वगैरे ' अर्धा तास तो बडबडत होता ..मुख्य म्हणजे त्याला तक्रार करायला मँडम कडे देखील जाता येत नव्हते कारण .. तो संडासात चहाचा मग घेवून जातो हे मँडमना देखील समजले असते .

रघु हा तेथील एकंदरीत निरीक्षण .. सर्वाना वेळच्या वेळी थेरेपीजना पाठवणे .. आनंद्वार्ड मधून येणाऱ्या लोकांची झडती घेणे वगैरे कामात तरबेज होता ..एकदा वार्ड मधील एकाच्या घरून आलेला तिळाच्या लाडूंचा डबा रात्री कोणीतरी फस्त केला .. सकाळी सकाळी तो बिचारा बोंबाबोंब करू लागला ..त्याला आवडतात म्हणून खास त्याच्या आईने २० तिळाचे लाडू पाठवले होते त्याच्यासाठी .. आता चोर कोण हे ओळखणे कठीणच होते कारण रात्रीच डबा फस्त केलेला .. कोणीही कबुल करीना ... आमच्या निवासी कार्यकर्त्यांच्या टीम साठी ही चोरी शोधून काढणे आव्हान होते मोठे .. काही उपाय सुचेना . एकदोन जणांवर संशय होता ..पण पुरावा नव्हता .. शेवटी रघु ने आयडिया केली ..तो संडासात जावून उभा राहिला ....संडासात जाणाऱ्या.. येणाऱ्या लोकांवर त्याची बारीक नजर होती .. त्याने आपले काम झाल्यावर कोणीही पाणी टाकू नये असे सर्वाना बजावले होते ..प्रत्येक जण बाहेर आला की रघु ..तो आतील ' ऐवज ' एकदा नजरेखालून घालून मग त्यावर पाणी टाकत गेला .. तासाभरात रघूने दोन चोर शोधून काढले .. आम्हाला रघूने हे नक्की कसे ओळखले ते कळले नाही ..मग रघूने फुशारक्या मारत सांगितले ..' तील का दाना.. .कभी पेट में पुरा हजम नाही होता ... वो अख्खा बाहर निकलता है ..मैने सबको चेक करके बराबर ढूंढ लिया ' .. आम्ही रघूच्या चतुरपणाची दाद दिली .. एक सांगली कडचा प्राथमिक शाळेतील शिक्षक .. दारूचे व्यसन सोडायला तेथे दाखल होता .. हा दिवसभर अवस्थ असे .. त्याच्या मनातील दारूची ओढ काही पूर्ण गेलेली नव्हती ..बाहेर असताना व्यसन करण्याची इच्छा होणे स्वाभाविक असते ..मात्र हा मास्तरला ' मुक्तांगण ' मध्ये सुद्धा दारूची तीव्रतेने आठवण येई ..नाह्मी तो गप्पा मारताना दारूची कशी मस्त नशा असते ... कश्या पार्ट्या केल्या ..कशी मजा केली हेच बोलत असे .. एकदा गुरुवारी त्याच्या घरचे लोक भेटायला असताना सर्वांच्या नकळत त्याने घरच्या लोकांकडून काहीतरी खोटे नाटे कारण सांगून पन्नास रुपयांची नोट घेतली .. खरे तर उपचार घेणाऱ्या पेशंटना अजिबात पैसे देवू नका असे पालकांना सांगितले जायचे ..काही पालक आमच्या सूचना पाळत नसत .त्यापैकीच याचे पालक होते .. याने पठ्याने ... रोज सायंकाळी जेव्हा सर्व पेशंट्सन ऐक तास ' फेरफटका ' मारण्यासाठी बाहेर सोडले जाई तेव्हा .. इमारती बाहेरच्या रस्त्यावर फिरताना जाणाऱ्या येणाऱ्या ऐक दोन मेंटल हॉस्पिटल च्या अटेंडंटशी ओळख करून घेतली होती ..

' फेरफटका ' म्हणजे मुक्तांगण च्या इमारती बाहेर मेंटल हॉस्पिटलचा जो रस्ता होता त्यावर इमारतीच्या समोरच सर्व पेशंट शतपावली केल्यासारखे इकडून तिकडे ..परत तिकडून इकडे असे फिरत असत ..काही लोक..लोक इमारती समोरच्या हिरवळीवर बसून गप्पा मारत .. आम्ही निवासी कर्मचारी त्यांच्यावर लक्ष ठेवत असू ... एका टोकाला मेंटल हॉस्पिटलला स्वयंपाकाचा पुरवठा करणारी गँस ची मोठी टाकी लावलेली होती ..या टाकीवर सुरक्षारक्षक म्हणून मेंटल हॉस्पिटलच्या दोन अटेंडंटची ड्युटी असे .. त्यापैकी एकाला या मास्तरने पटवले आहे आणि त्याच्या जवळ दारूची क्वार्टर आणायला पैसे दिले आहेत अशी खबर आम्हाला मिळाली ...तसे आमच्याकडे दाखल असलेल्या पेशंट्सना आम्ही शक्यतो मेंटल हॉस्पिटलच्या कर्मचारी वर्गाशी बोलू देत नव्हतो ..पण याने जाता येता..केव्हा तरी आमच्या नकळत अटेंडंटशी संधान बांधले होते .. आम्हाला आज तो कर्मचारी मास्तरला दारूची क्वार्टर आणून देणार आहे असे समजले होते ... आम्ही त्याला बाटली खिश्यात असताना रेडहँन्ड पकडायचे ठरवले ...त्यानुसार फेरफटका मारताना आम्ही मुद्दाम त्याच्याकडे लक्ष नाही असे दाखवले ..तो आणि त्याचा एक जोडीदार ..फिरत फिरत त्या अटेंडंट जवळ गेले हे आम्ही पहिले ..त्या अटेंडंट ने हळूच याच्या हातात काहीतरी दिले ते देखील पहिले ..आता हा उलटा वळून आपल्या बाजूला येईल तेव्हा त्याला पकडून त्याची झडती घ्यायची असा आमचा प्लान होता ..तो जसा समोरून आमच्या जवळ आला तसे बंधू ने त्याला थांबवले ....जरा तुमची झडती घ्यायची आहे असे म्हणाला .. तोच तो मास्तर इतक्या अनेपेक्षितपणे जोरात वार्ड कडे पळाला की आम्ही भानावर येईपर्यंत तो वार्डचा जीना चढून वर पोचला होता ..आम्ही सगळ्यांनी त्याच्या मागे धाव ठोकली .. वेगाने पळत तो वार्डच्या संडासात पोचला आतून दार लावले .. ' मुक्तांगण ' चे संडास मुद्दाम वरून उघडे ठेवलेले होते ..कारण आत असताना कोणाला चक्कर आली ..फिट आली तर ..वरून आंत शिरून त्याला मदत करता येत येई ..बंधू पटकन वर चढला आणि तो शिरलेल्या संडासात उतरला ..पण तो पर्यंत मास्तर ने पटकन बाटलीचे बुच उघडून ..बाटली तोंडाला लावली होती ..आतील दारू तशीच कच्चीच घटाघट रिचवली त्याने ... मग आत उतरलेल्या बंधूच्या हातात रिकामी बाटली दिली .. इतक्या लोकांच्या डोळ्या देखत हे सारे घडले ..आम्ही ठरवूनही त्याला अडवू शकलो नव्हतो ... बंधूने त्याच्या आधी ऐक थोबाडीत दिली ..पण आता रागावून काही उपयोग नव्हता ..मास्तर ने त्याचा' डाव ' साधला होता .. या प्रसंगावरून व्यसनाधीनता हा आजार किती खतरनाक आहे हे समजायला आम्हाला मदत मिळाली .

================================================================

खतरनाक आजार ! ( भाग १६४ वा .)

निवासी कार्यकर्ता म्हणून सर्व जवाबदा-या पर पाडत असताना आम्ही सर्व थेरेपीज देखील कराव्यात असा मँडमचा आग्रह असे ..कारण एकदा आपल्याला सर्व येतेय असा भाव आमच्या मनात येवून आमचा उपचारांमधील सहभाग कमी झाला असता तर त्या मुळे नुकसान आमचेच होणार होते . फक्त मुक्तांगण मध्ये राहून व्यसनमुक्ती साध्य होणार नव्हती तर आपण ज्या ' व्यसनाधीनता ' या गंभीर अशा मनो-शारीरिक आजारात अडकलो आहोत ...तो आजार कसा भयानक आहे हे समजून घेवून ..समुपदेशकाच्या सूचनांचे योग्य पालन केले नाही तर पुन्हा पुन्हा स्लीप ..रीलँप्स ..आणि पर्यायाने पुन्हा प्रचंड नुकसान ..उपचार असे करावे लागेल हे आम्ही प्रामाणिक पणे समजून घ्यावे अशी मँडमची इच्छा असे .. अनेकांना व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे एखादा व्यसनमुक्तीचा कारखाना आहे असे वाटे .. म्हणजे पेशंट अँडमीट केला की त्याने ३५ दिवस राहून एकदम व्यसनमुक्त होऊनच बाहेर पडावे ही पालकांची अपेक्षा .. तर प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या व्यक्तीला देखील काही दिवसात आपण सुधारल्यासारखे वाटून तो लवकर घरी जाण्याचा आग्रह धरे .. स्वतःचे अनेक वर्षांचे वैचारिक ..भावनिक बिघडलेपण ध्यानात घेतले नाही ....मान्य केले नाही ..त्यात सुधारणा केली नाही तर सुधारणेची फसवी भावना ...पुन्हा त्याच गर्तेत घेवून जाई .. .स्वतच्या व्यसनमुक्तीच्या इच्छेला प्रामाणिक पणाचे पाठबळ नसेल तर वारंवार व्यसन सुरु होते असे येथे सांगितले जाई .. मुक्तांगण मध्ये दाखल झाले की शरीरातील व्यसनांचा प्रभाव तर साधारणपणे एका आठवड्यात निघून जाई ..मनातील व्यसनाचे सुप्त आकर्षण काढायला प्रामाणिक प्रयत्न गरजेचे असत ...आपले व्यसन आता सुटले असे म्हणून बेसावध राहून चालत नाही .. कोणत्याही मनाविरुद्ध घडलेल्या घटनेमुळे ..एखाद्या भावनिक अस्थिरतेमुळे .. राग .. खुन्नस .. निराशा ..वैफल्य अशा भावनांमुळे मन विचलित होऊन किवा जुने व्यसनी मित्र भेटल्यामुळे ....मनात पुन्हा एकदा तरी व्यसन केल्यानंतरची धुंदीची .. तणावमुक्तीची .. काही काळ मिळणाऱ्या धैर्याची ..सर्वश्रेष्ठ असल्याचा आभास निर्माण करणारी अवस्था हवीहवीशी वाटू लागल्यामुळे ... जर योग्य मदत घेतली नाही तर ..तर .. पुन्हा ' ये रे माझ्या मागल्या ' आहेच .

मुक्तांगण मध्ये असे अनेक जण होते जे केवळ उपचारात केवळ शरीराने सहभागी असत मात्र मनापासून हा सहभाग नसे .. अशा लोकांना बाहेर गेल्यानंतर काही दिवसातच पुन्हा उपचार घेण्यासाठी यावे लागे .व्यसनाधीनतेच्या मुळाशी असलेल्या विचारांचा ..भावनांचा जो पर्यंत प्रामाणिक पणे शोध घेवून ..ते विचार ..भावना काढून टाकण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत व्यसन .. नुकसान .. उपचार हे चक्र सुरु राहते ..म्हणून जास्तीत जास्त काळ व्यसनमुक्ती केंद्रात किवा उपचारात्मक वातावरणात राहणे .. डिस्चार्ज झाल्यावर पाठपुरावा करणे .. वेळोवेळी समुपदेशकाची मदत घेणे अपरिहार्य असते ..निवासी कार्यकर्ता म्हणून जास्त दिवस राहिल्यानंतर मी जेव्हा वारंवार समूह उपचार ..समुपदेशन यांना समोर जावू लागलो तेव्हाच या आजाराची गंभीरता मला समजत गेली .. निवासी कार्यकर्त्यांमध्ये जो अनिल नावाचा कर्नाटकच्या मोठ्या उद्योगपतीचा मुलगा होता तो ..सतत कानाला वॉकमन लावून गाणी ऐकत असे .. कामात अतिशय हुशार ..विशेषतः त्याला साफसफाई च्या कामाची खूप आवड होती .. तो म्हणे गेल्या पाच वर्षात तीनचार वेळा मुक्तांगण मध्ये उपचारांसाठी दाखल झाला होता .. या वेळी जास्तीत जास्त दिवस राहिला तर सुधारेल या आशेने कुटुंबियांनी याला जास्त काळ मुक्तांगण मध्ये ठेवले होते .. तो देखील लवकर घरी जाण्याचा आग्रह करत नसे . मात्र अशा जास्त काळ राहणाऱ्या मुलांना.. घरी काही कार्यक्रम असेल तेव्हा .. किवा जरा चेंज म्हणून मँडम काही दिवस घरी जावून पुन्हा येण्याची परवानगी देत . फक्त एक अट असायची.. ती अशी की घरी गेल्यावर व्यसन करायचे नाही ..चार दिवस सर्व नातलगांसोबत आनंदाने घालवून पुन्हा मुक्तांगणला यायचे ..उपचार सुरूच ठेवायचे . तर हा अनिल एकदा बरेच दिवस झाले घरी गेलो नाही म्हणून चार दिवस सुटी घेवून कर्नाटकात त्याच्या घरी गेला होता .. आमचे सर्व निवासी कार्यकर्त्यांचे सततच्या सहवासाने एकमेकांशी जिवाभावाचे संबंध जुळत .. आमच्यापैकी जो कोणी काही दिवस सुटीवर घरी जाई तो परत येताना आमच्या चारपाच जणांसाठी घरून काही खाण्याचे पदार्थ वगैरे आणत असे ..अनिल तर श्रीमंत असल्याने घरून परत येताना निवासी कार्यकर्ता बांधवांसाठी ..येताना खूप खावू आणतो असे मी ऐकून होतो .. त्यात विविध प्रकारचे फळांचे जँम ..सरबत .. जलजीरा च्या पुड्या वगैरे असे तसेच नवीन गाण्यांच्या ध्वनिफिती असतच ...नवीन कपडे असत .. हा अनिल एकदा घरी गेला असताना.. तो आपल्यासाठी काय काय आणेल या कल्पनेत आम्ही होतो .. एकदाचा चार दिवसांनी सायंकाळी पाच वाजता सर्व वरिष्ठ कार्यकर्ते घरी गेल्यावर अनिल ऑटोतून मोठ्या दोन बँगा भरून घेवून आला .. बाहेर ऑटोची चाहूल लागताच आम्ही पटकन बाहेर गेलो पाहतो तर अनिल ऑटोत बसलेला ... त्याच्या हाताला मोठे प्लास्टर लावलेले होते ..बापरे हे काय झाले म्हणत.. आम्ही सर्वानी त्याच्या बँगा उतरविल्या .. त्याला आधार देवून सावकाश खाली उतरवायला मदत केली .. म्हणाला ' यार जरा बाईक स्लीप होकार गिरा तो ये हात फ्रँक्चर हो गया ..आम्ही सर्वानी हळहळ व्यक्त करीत त्याला आधार देवून आत आणले ...मग म्हणाला ' सबके लिये देखो क्या क्या लाया हू ...' तसे आम्ही पटापट त्याच्या बँगा उघडल्या .. रघु देखील त्याची झडती घेण्यासाठी हजर होताच ... रघूने आधी त्याचे खिसे तपासले .. मग बँगा बारकाईने तपासल्या .. त्यात नेहमीप्रमाणेच फळांचे जँम .. गाण्यांच्या नव्या कँसेट्स .. नवे कपडे वगैरे होते .. लगेच जलजीराची तीन पाकिटे फोडून आम्ही चार पाच जणांनी जलजीरा प्यायले .. त्याला कपडे बदलण्यास मदत केली .. साधारणतः अर्ध्या तासाने तो संडासला जातो म्हणून खालच्या मजल्यावर पालक आणि स्टाफ करिता असलेल्या संडासात गेला ..हा संडास बहुधा कार्यकर्ते आणि पालक वापरात असल्याने वरून उघडा नव्हता ... बराच वेळ झाला तरी अनिल बाहेर येईना ...रघु ला संशय आलाच .. रघूने एकदोन वेळा दार ठोठावून त्याला आवाज दिला तर ' रुको यार जरा ..अभी तो बैठा हू ' असे उत्तर मिळाले आतून .. मग रघु इमारतीच्या बाहेर जावून संडासच्या मागच्या बाजूला जावून उभा राहिला ..

याने सोबत नक्कीच ब्राऊन शुगर लपवून आणली असावी असा रघूचा कयास होता .. आमचे लक्ष मात्र त्याने आणलेल्या खाण्याच्या वस्तूंमध्ये गुंतलेले असल्याने तो विचार आमच्या मनातही शिरला नव्हता .. उलट आम्ही रघु उगाच संशय घेतो म्हणून लागलो ..शेवटी अनिल अर्ध्या तासाने संडासच्या बाहेर पडला ..तोच बाहेर मागच्या बाजूला संडासच्या खिडकीशी चाहूल घेणारा रघु आत आला ..रघूच्या हातात ब्राऊन शुगर ओढून वापरलेली पन्नी होती .. म्हणाला ' अनिल आपने अभी ये पन्नी संडासकें खिडकीसे बाहर फेका था .. साथमे कितना माल लाया सच सच बता दो ' अनिल चिडला रघुवर ' साले तू कितनी बार झडती लेगा ? एक बर झडती दिया है ना मैने .. फालतू शक् लेता है .. ये पन्नी मैने नही फेका .. तू झुठ बोल रहा है ' म्हणत रघुशी वाद घालू लागला ..शेवटी बंधूने अनिलला पुन्हा झडती दे असे सांगितले .. रघु ने पुन्हा खिसे तपासले तर काहीच मिळाले नाही .. रघु जरा विचारात पडला .. मग सरळ त्याने अनिलने हाताला लावलेल्या प्लास्टर कडे नजर टाकली म्हणाला ये भी दिखावो खोलकर .. आम्ही पण आग्रह केला तेव्हा अनिलच्या हाताचे प्लास्टर फाडण्यात आले ..त्यात नायट्रावेट च्या गोळ्यांच्या चार स्ट्रिप्स ... ब्राऊन शुगर च्या दहा पुड्या .. कोऱ्या पन्नया असा एवज निघाला .. आता अनिल निरुत्तर झाला होता ..अपघात वगैरे काही झाला नव्हता त्याचा .. त्याने सरळ सरळ आमची फसवणूक केली होती .. बिंग फुटल्यावर अनिल एकदम रघुवर चिडला त्याला मारायला धावला रघु पटकन पळाला... आम्ही अनिलला धरले .. शांत केले .. आता पुन्हा तुला उपचार घ्यावे लागतील असे सांगून बंधू ने मँडमला फोन लावून सगळी हकीगत सांगितली ..मँडमने अनिलला आता मुक्तांगण मध्ये न ठेवता ..पुन्हा आनंदवार्ड मध्ये दाखल करा अश्या सूचना दिल्या ...अनिल आनंदवार्ड ला जायला तयार होईना .. कसे तरी त्याची समजूत घालून आम्ही त्याला सायंकाळी आठ वाजता आनंदवार्ड मध्ये पोचवून आलो .
 

================================================================
अनिलचे साहस ! ( भाग १६५ वा )

अनिलला मँडम च्या सूचनेनुसार बंधू आणि विजय यांनी केवळ अंगावरच्या कपड्यानिशी आनंद वार्ड मध्ये सोडले होते .. त्याचे सगळे किमती सामान मुक्तांगण मध्येच होते ज्यात नवीन कँसेट्स ..एक कँमेरा ..खाण्याच्या वस्तूंचे सीलबंद डबे वगैरे ! आम्हाला मनापासून अनिल बद्दल वाईट देखील वाटत होते .. कारण तो सगळ्यांशी चांगला वागत असे ..त्याच्या बाबतीत असे कसे घडले ? याची चर्चा करत असताना एक लक्षात आले की अनिलला जरी व्यसनमुक्त होण्याची इच्छा होती ..तरीही चार दिवस सुटीवर घरी गेला असताना .... आपण आता मुक्तांगणलाच राहतोय ..व्यसनमुक्त होणारच आहोत ..मग जरा सुटीवर घरी एखादे वेळा व्यसन केले तर काय हरकत आहे असा विचार त्याचा मनात येवून त्याने एकदा व्यसन केले ..नंतर त्याला थांबता आले नाही ..घरी चारही दिवस त्याने व्यसन केले असावे मग मग मुक्तांगणला परत येताना.. आता आपल्याला टर्की होईल ही भीती वाटली असावी ..या भीतीने त्याने सोबत देखील माल आणला होता .. व्यसनमुक्तीची इच्छा त्याचबरोबर एकदा ..थोडेसे ..अशी व्यसनाची तीव्र ओढ ही दुहेरी मानसिकता बहुधा प्रत्येक व्यसनीच्या बाबतीत निर्माण होत असावी ..अशा वेळी निग्रह नसेल तर पुन्हा व्यसन सुरु होते ..हा चकवा ओळखून योग्य वेळी मनाला आवरणे कठीणच असते ! रात्री बराच वेळ पर्यंत काहीबाही चर्चा करत आम्ही जागे होतो .. साधारणपणे १ वा . आम्ही सगळे निवासी कर्मचारी वार्डच्या बाजूलाच असलेल्या लायब्ररीत झोपलो .

अचानक बाहेर मोठ्याने आरडा ओरडा एकूण आम्हाला जाग आली ..सगळे पटकन उघून बाहेर आलो तर ..वार्डच्या दारात तीन चार पेशंट भेदरून उभे होते .. आम्हाला पाहून त्यांना धीर आला .. ते खुणेनेच आम्हाला गच्चीकडे जाणाऱ्या जिन्याकडे बोट दाखवून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते..आम्ही त्या जिन्याजवळ गेलो आणि स्तब्धच झालो .. जिन्यात टोकाला अनिल फक्त एका निकर वर उभा होता .. गोरापान ..मात्र आता पांढराफटक दिसत होता .. त्याचे कुरळे केस विस्कटलेले होते ... एखाद्या भुतासारखा तो उभा होता ..डोळे लाललाल झालेले .. थोडासा बधीर देखील वाटत होता ..बंधूने धाडसाने पुढे होऊन त्याचा हात धरला आणि त्याला जिन्यातून खाली आणले .. याला आपण संध्याकाळी आनंद वार्ड मध्ये सोडून आलो होतो ..हा पुन्हा इथे मुक्तांगण मध्ये कसा ? आणि या अशा अवतारात ? सगळे बुचकळ्यात पाडले होते .. तर वार्डच्या पेशंटना अनिल बाबत फारशी माहिती नसल्याने ते सगळे घाबरलेले .. एखादे भूत पहिल्यासारखा त्यांचा चेहरा झाला होता .. मुक्तांगण मध्ये एक वर्षापूर्वी एक ब्राऊन शुगरचा व्यसनी टर्कीत असताना अपघाताने जिन्यातून खाली डोक्यावर पाडून मरण पावला होता .. त्याचे भूत येथे अधून मधून फिरते अशी आख्यायिका सर्वानी ऐकली होती .. ते भूत म्हणे एका काळ्या बोक्याच्या रुपात फिरत असते ..असे सांगितले जाई ..एकदोन वेळा रात्री मलाही तो ठार काळा बोका दिसला होता .. त्याचे लालबुंद डोळे अंधारात चमकत असत ..मी देखील त्यावेळी जरा टरकलो होतो ..नंतर बंधूने सांगितले होते की .अरे तो बोका मेंटल मेंटल हॉस्पिटलमधल्या किचनच्या कर्मचाऱ्यांनी पाळलेला आहे .. दिवसभर तो तेथे किचन मध्ये सुस्त पडून असतो आणि रात्री बाहेर फिरतो .. मुक्तांगण मध्ये आलेले नवीन पेशंट रात्री बेरात्री झोप येत नाही म्हणून उगाच वार्डच्या बाहेर फिरतात... त्यांनी तसे रात्री बेरात्री वार्डच्या बाहेर पडून इमारतीत फिरू नये म्हणून निवासी कर्मचाऱ्यांपैकीच कोणीतरी ही काळ्या बोक्याची बातमी पसरविली आहे .

अनिलला आम्ही धरून लायब्ररीत आणले ..मग सगळा उलगडा झाला याने सोबत कालच सोबत आणलेल्या नायट्रव्हेट च्या गोळ्यांपैकी काही गोळ्या खाल्ल्या होत्या ..शिवाय संडासात ब्राऊन शुगर ओढ्लीच होती ..त्याला आम्ही आनंदवार्ड मध्ये पोचविले तेव्हा तो नशेतच होता ..रात्री केव्हातरी नशेतच तो उठून आनंद्वार्ड च्या भिंतीवरून उडी मरून पळाला होता .. पळून सरळ बाहेर न जाता मुक्तांगण मध्ये ठेवलेल्या त्याच्या वस्तू घेण्यासाठी तो मुक्तांगणच्या इमारतीच्या मागील ड्रेनेज च्या पाईपला धरून वर गच्चीवर गेला होता ..गच्ची वरून खाली येणारे जाळीचे दार तोडून तो मुक्तांगणच्या आत प्रवेशला होता ..ड्रेनेजचा पाईप चढताना दोन वेळा तो खालच्या घाणीत पडला .. त्याचे कपडे खराब झाले होते म्हणून कपडे काढून तो फक्त निकर वर होता ..गच्चीवरून जीना उतरून खाली येत असताना .. वार्डचा एक नवीन पेशंट सुधीर झोप येत नाही म्हणून कँरीडाँर मध्ये फिरत असताना ..त्याला हा जिन्यातून खाली येणारा अनिल दिसला ..पांढराफटक पडलेला ..अंगावर फक्त निकर ..विस्कटलेले केस ..लालभडक डोळे ..झाले सुधीरची फाटली ..भूत ..भूत ..असे बोंबलत सुधीर वार्डमध्ये पळाला.. वार्डचे सगळे लोक उठले ..त्यांच्या आवाजाने आम्हाला जाग आली . आम्ही कशीतरी वार्डच्या लोकांची समजूत घालून त्यांना परत झोपायला पाठविले .. सुधीर काही बोलण्याच्या बोलण्याच्या.. .ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हताच .. अनिल ला अंगावर कपडे घालून पुन्हा पहाटे चार वाजता आनंद वार्ड मध्ये सोडण्यात आले ..तेथून त्याची रवानगी ' उंच ' वार्डे मध्ये करण्यात आली .
.. !

( मुक्तांगण ..आणि इतर व्यसनमुक्ती केंद्रांच्या बऱ्याच अँडमिशन नंतर आज अनिल खूप चांगला राहतो आहे ..त्याच्या पत्नी व ऐका गोड मुलीसोबत आनंदाने संसार करतो आहे ..असे मला परवाच पुण्याच्या एका मित्राकडून समजले ..खरोखर खूप आनंद झाला हे ऐकून ..कारण अनिल आणि आम्ही दोनचार जण म्हणजे इतरांच्या दृष्टीने गाँन केस होतो ) 

रविवार, 7 अप्रैल 2013

सकारात्मक आनंद

भाग १५६ वा     माँनीटर म्हणून निवड !

मुक्तांगण मध्ये गेल्यापासून दहा दिवसातच मी तेथे चांगला रुळलो . सर्व उपचारपद्धतींमध्ये हिरीरीने सहभाग घेत होतो .. तसेच वार्डच्या कामात माँनीटरला मदत करत होतो .. निवासी कार्यकर्त्यांशी देखील माझी चांगली मैत्री होऊ लागली .. मी उमराणी सरांना त्यांनी भेटायला बोलाविले म्हणून गेलो असताना त्यांनी आधी छान गाणी म्हणतोस तू ..असे म्हणत माझे कौतुक केले ..नंतर शास्त्रीय संगीत शिकला आहेस का ? कुठला ? घरी कोण कोण असते ? व्यसन कसे सुरु झाले वगैरे माहिती विचारली .. मी त्यांना जमेल तशी सविस्तर उत्तरे देत गेलो .. शेवटी ते मला म्हणाले इथे मुक्तांगण मध्ये किमान ३५ दिवस तरी राहावे लागते ..मात्र तू अधिक दिवस राहिलास तर तुला अधिक फायदा होईल ..त्या दृष्टीने विचार कर ..मला देखील इथले वातावरण आवडले होते .मी त्यांना होकार दिला .. चार दिवसांनी मला डॉ. अनिता अवचट यांचे बोलावणे आले .. प्रत्येक पेशंट ला आठवड्यातून एकदा तरी भेटायचे असा त्यांचा नियम होता ..त्यानुसार त्यांनी मला बोलाविले होते .. या पूर्वी तीनचार वेळा त्यांची भेट झाली होती पण तेव्हा जुजबी बोलणे झाले होते ..प्रत्यक्ष समुपदेशन आता सुरु होणार होते ....त्यांची परवानगी घेवून मी आत गेलो .. सुहास्य मुद्रेने त्यांनी माझे स्वागत करून ..मला समोरच्या खुर्चीत बसायला सांगितले .. मनातून जरा अस्वस्थ वाटत होते ... यांना आपला सगळा इतिहास सांगावा की नाही हा संभ्रम होताच ..कसे वाटतेय मुक्तांगण मध्ये ? ... हा अतिशय साधा प्रश्न होता ..त्यामुळे मी त्यांना छान वाटतेय .. खूप चांगले वाटतेय असे उत्तर दिले .. चांगले वाटतेय म्हणजे नेमके काय ? हा प्रश्न जरा अवघड वाटला ..म्हणजे ...भूक चांगली लागतेय ... वेळ चांगला जातोय ..व्यसनाची आठवण अजिबात येत नाही ..झोपही चांगली येते ... असे मी उत्तर दिले .. मग म्हणाल्या तू या पूर्वी कुठे कुठे उपचार घेतले आहेस ? ..मी त्यांना दोन खाजगी दवाखाने ..चार वेळा मेंटल हॉस्पिटल ठाणे .. ही माहिती दिली ..मी बोलत असताना ..त्या लक्षपूर्वक ऐकत होत्या व माझे बोलणे झाले की लगेच त्यांच्या जवळच्या एका वहीत काही टिपणे करीत होत्या .. सुमारे १० मिनिटांची भेट होती .. त्यांनी अश्या प्रकारे प्रश्न विचारले होते की कसलेही दडपण न वाटता मी पटापट उत्तरे देत गेलो .. व बहुधा सगळी माहिती त्यांना सांगितली ...शेवटी मला निरोप देत म्हणाल्या .. या वेळी तूला अधिक प्रामाणिक पणे प्रयत्न करावे लागतील .. मी आज्ञाधारक पणे मान हलवीत बाहेर पडलो .. वार्डात आलो त्यांचे शेवटचे वाक्य अगदी बरोबर होते .. मला अधिक प्रामाणिक पणे प्रयत्न करावे लागणार होते ...या पूर्वी मी जेव्हा जेव्हा व्यसनमुक्त राहिलो तेव्हा .. आता काहीही झाले तरी व्यसन करणार नाही असा निर्धार करत होतो ..पण काही महिन्यातच...जुना व्यसनी मित्र मित्र भेटणे ... घरात काहीतरी भांडण होणे .. मनाविरुद्ध घटना घडणे .. अश्या कारणांनी पुन्हा पिणे सुरु झाले होते ..याचा अर्थ ..काहीही झाले तरी व्यसन करणार नाही या स्वतच्या निर्धाराशी मी प्रामाणिक राहू शकलो नव्हतो

पुढच्याच आठवड्यात जुना माँनीटर सुटी होऊन घरी जाणार म्हणून नवीन माँनीटर ची निवड करायची वेळ आली ..जुन्या माँनीटर ने निवासी कार्यकर्त्यांना त्यासाठी माझे नाव सुचवले .. आणि सर्वानुमते माझी वार्ड माँनीटर म्हणून नेमणूक झाली ..माँनीटरचे मुख्य काम असे ते म्हणजे रोज किचन मधील मोठी खरकटी झालेली भांडी धुण्यासाठी वार्डातील तीन पेशंट्स ची ड्युटी लावणे .. हे काम बरेच किचकट अश्यासाठी होते की ..बहुधा सगळे जण ही भांडी ड्युटी करायला नाखुश असत ..तब्येत बरी नाही .. पोट दुखतेय .. माझी शस्त्रक्रिया झालीय ..अशी करणे देवून शक्यतो भांडी ड्युटी टाळण्याचा प्रयत्न असे ..गोडी गुलाबीने समजुत घालून कामे करून घ्यावी लागत .. तसेच योगाभ्यासाचा देखील कंटाळा आढळला . .. अनेकजण योगाभ्यासाचा तासाला गैरहजर राहण्यासाठी प्रयत्नशील असत .... याचे कारण कदाचित ' योग ' या संकल्पाने बद्दल लहानपणापासून असलेले समजूत असावी .. योग म्हणजे मोठ्या साधू पुरुषांचे ..दिव्य लोकांचे .. काम आहे ..सर्वसामान्य माणसाला झेपण्यासारखे नाही ....असा एक सर्व साधारण समज ' योग' विद्येच्या बाबतीत आढळतो .. दुसरे कारण असे की .. योगाभ्यासाचा तासाला जास्तीत जास्त वेळ डोळे मिटून एकाग्रतेने आसने करावी लागत ..व्यसनी व्यक्तीचे मन अतिशय चंचल असल्याने .. डोळे मिटून मन एकाग्र करणे त्याला शिक्षाच वाटते ..कधी एकदा डोळे उघडतो असे होते त्याला ..अनेक जण व्यायाम अगदी आवडीने करत असत ..पण योगाभ्यास म्हंटले की त्यांचे तोंड वाकडे होई .. येथे योग्याभ्यास शिकवण्यासाठी श्री .उदय पेंडसे ..नावाचे योग शिक्षक येत असत .. अतिशय चणाक्ष .. हुशार .. लालगोऱ्या रंगाचे पेंडसे सर् अंगाने जरा स्थूल होते .. परंतु खूप चपळ देखील होते ...मराठी ...हिंदी.. इंग्रजी या तिन्ही भाषांवर त्यांचे असामान्य प्रभुत्व ... तिन्ही भाषातून सूचना देत .. अधून मधून हलके विनोद करीत त्यांचा योगाचा तास चाले ...त्यांचे विनोद अनेकदा खूप मार्मिक असत ..त्यांच्या तासाला मला खूप मजा वाटत असे .. पेंडसे सरांनी खास व्यसनी व्यक्तीच्या शरीराला झेपू शकतील अश्या प्रकारची आसने विकसित केली होती .. तसेच आठवड्याच्या शेवटी दर शनिवारी ..रविवारी सकाळी उठल्याबरोबर शारीरिक कवायत घेण्याएवजी.. शुद्धीक्रिया किवा ' वमन धौती 'नावाचा पेंडसे सरांनी सुचविलेला प्रकार घेतला जाई .. एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करून त्यात जेमतेम चवीपुरते मीठ टाकले जाई ..नंतर .. प्रत्येकाने एका वेळी जितके ग्लास पिता येतील तितके ग्लास पाणी पटापट प्यायचे ...ते मीठ घातलेले कोमाट पाणी पोटभर पिवून झाले की ..मग कमरेत खाली वाकून .. नाकाने श्वास घेत ..श्वास बाहेर सोडताना तोंडाने बाहेर सोडत .. गळ्याच्या ..पोटाच्या स्नायूंची विशिष्ट प्रकारे हालचाल करून ..तोंडाने ह.. ह... ह ..असा आवाज काढत ते पोटातील पाणी पुन्हा बाहेर काढायचे .. खूप अवघड कम होते हे .. घश्यात बोट न घालता म्हणजे उलटी न काढता .. असे पाणी बाहेर येत नसे .. बहुतेक वेळा पेंडसे सर् स्वतः सकाळी सकाळी निरीक्षक म्हणून उपस्थित राहून ' शुद्धीक्रिया ' करून घेत असत ..एकदा पोटात मिठाचे पाणी गेले की ते जर असे तोंडावाटे बाहेर पडले नाही तर मग जुलाब होऊन बाहेर पडे ..पहिल्यावेळी मी पाच मोठे ग्लास भरून मिठाचे पाणी प्यायलो ..नीट टेक्निक माहित नसल्याने शुद्धीक्रिया नीट जमली नाही ..मग दुपारपर्यंत जुलाब होत होते ... एकदा नीट मन लावून केले तेव्हा मला जमले .. या प्रकारात माँनीटर कडे अजून एक जवाबदारी होती ती म्हणजे ...प्रत्येक जण किती ग्लास पाणी पितो ते आणि तोंडावाटे बाहेर काढताना किती ग्लास पाणी पोटातून बाहेर काढतो याची एका वहीत नोंद ठेवणे .. पेंडसे सरांच्या मते या ' शुद्धीक्रिये ' मुले आपले पोट साफ राहते ..शरीरातील विषद्रव्ये निघून जाण्यास मदत मिळते ..आणि सर्वात मुख्य मानसिक कारण असे की .. खूप अंतर्मुख ( इंट्रोव्हर्ट ) असेलला व्यक्ती या प्रकाराने मनमोकळे पणे स्वताच्या अंतर्मनातील समस्या उघड पणे बोलण्याची क्षमता मिळवू शकतो .

माँनिटर झाल्यापासून मला अजून एक सवलत मिळाली ...ती म्हणजे निवासी कर्मचारी त्यांना तल्लफ येईल तेव्हा जो चहा बनवत असत तो मला देखील ते देवू लागले .. हे निवासी कार्यकर्ते नेहमी खूप आनंदी दिसत .. सारखी काहीतरी थट्टा मस्करी चाललेली असे त्यांची एकमेकांशी .. शिवाय प्रत्येक कामात उत्साहाने सहभाग घेत ..हे पाहून मला त्यांच्या क्षमतेचे नवल वाटे .. आणि एक संशय देखील येई मनात ..की हे लोक रात्री सगळे जण झोपल्यावर काहीतरी नशा तर करत नसतील ? ..कसली तरी नशा केल्याशिवाय हे इतके आनंदी कसे राहू शकतात .. मला तर नशा बंद असताना खूप आळस येई ..कंटाळा वाटे ..आणि हे सदोदित उत्साहात ? दारू वगैरे नाही पण हे सगळे किमान एखादी सिगरेट भरून गांजा तरी ओढत असावेत असा माझा संशय बळावला तेव्हा ...मी रात्री झोपण्याचे नाटक करून या निवासी कार्यकर्त्यांवर नजर ठेवू लागलो ...बऱ्याचदा ते रात्री बेरात्री इमारतीच्या मागच्या बाजूला बसून ...लाकडे गोळा करून त्यावर चहा बनवत असत ..मी वरच्या हॉल मधील खिडकीतून त्यांच्यावर नजर ठेवू लागलो .. बंधू च्या बहुधा हे लक्षात आले की त्यांच्यावर मी नजर ठेवतोय ..त्याने एकदा मला असा खिडकीतून त्यांच्या वर पळत ठेवताना सरळ हाक मारून खाली बोलाविले .. म्हणाला ' अहो मॉनीटर ..वरून काय पाहता ..या खाली या की ...बसा आमच्यात " मी संकोचाने खाली गेलो . तेव्हा त्याने सरळ विचारले '' काय रे ..आमच्यावर नजर ठेवतोस ना ? " मला नाही म्हणणे अवघड झाले सरळ हो असे उत्तर दिले ..मनातील शंका पण बंधूला बोलून दाखविली .. तो खूप हसला नंतर म्हणाला ..मला सुधा येथे आल्यावर सुरवातीला असेच वाटले होते ..पण मित्रा तसे काही नसते ..आम्ही सगळे बाहेरच्या जगाचा विचार न करता येथे आंनदात राहण्याचा प्रयत्न करतो ..आनंदी राहण्यासाठी काहीतरी विनोद ..मस्करी करत राहतो एकमेकांची .. कामात मनाला गुंतवत असतो .. तूला असा संशय येणे स्वाभाविक आहे .. कारण या पूर्वी नशेखेरीज आपण जीवनात आनंदी राहू शकू असा विचारही आपल्या मनाला शिवलेला नसतो ..आणि इतरांना तसे आनंदी राहताना पाहून शंका वाटणारच ..बंधू च्या उत्तराने माझे समाधान झाले व खात्री देखील पटली की हे निवासी कार्यकर्ते गुपचूप कोणतीही नशा करत नाहीत .

===============================================================
भाग १५७ वा     समूह उपचार !

मला मुक्तांगणला येवून आता सुमारे २० दिवस उलटून गेले होते .. वार्डात ब्राऊनशुगरचे व्यसनी जास्त होते ..तुलनेत दारूचे व्यसनी कमी होते ..सगळे इथे आनंदात रहात असत याचे मुख्य कारण असे जाणवले की .. कोणालाही येथील समुपदेशक ..कार्यकर्ते .. अपराधीपणाची जाणीव करून देत नसत ..व्यसनी व्यक्तीकडे पाहण्याचा या सर्वांचा दृष्टीकोन अतिशय सकारात्मक होता .. तू नालायक आहेस .. तुझ्यामुळे सर्वाना खूप त्रास होतोय .. तू चोऱ्या केल्यास .. विश्वासघात केलेस .. वगैरे गोष्टींचा उल्लेख न करता ...व्यसनाधीनता हा एक मनो-शारीरिक आजार आहे .. त्यामुळे व्यसनी व्यक्ती हा वेडा नाही किवा वाईट देखील नाही तर तो एक आजारी आणि दुखी: व्यक्ती आहे या भावनेने उपचार दिले जात .. तसेच हा आजार बरा होऊ शकतो ..काही वेळा वारंवार उलटू देखील शकतो ही देखील येथील लोकांना पक्की जाणीव होती ... यातून बाहेर पडण्यासाठी स्वतच्या विचारात ..व्यक्तीमत्वात बदल करणे गरजेचे आहे हे आम्हाला सर्व समुपदेशक सांगत असत ..रोज दुपारी १२ वाजता समूह उपचारांची वेळ असे .. एकूण ३५ दिवसांच्या समूह उपचारांचे वेळा पत्रक बनवलेले होते यात मुक्तांगणला येवून १ आठवडा झालेले . ..दुसऱ्या ..तिसऱ्या ..चौथ्या व पाचव्या आठवड्यात असलेले असे वेगवेगळे गट पाडले जावून त्या त्या गटाला समूह मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येकी एक समुपदेशक हजर रहात असे .. यात व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम .. आपल्या जीवनाचे होत असेलेल नुकसान .. भरकटल्याची कारणे...सुधारणेसाठी आवश्यक बाबी ..व्यसनमुक्तीची वाटचाल सातत्याने होण्यासाठी पाळावी लागणारी पथ्ये ...अशा सर्व गोष्टींवर चर्चा होई ..या चर्चेतून सर्वाना आत्मपरीक्षण करण्यास प्रेरणा मिळत असे ..अतिशय जिव्हाळ्याचे वातावरण राखले जाई ... त्यामुळे आपण एखाद्या मोठ्या कुटुंबातच वावरतो आहोत अशी भावना सर्वांच्या मनात असे .. वार्डची झाडलोट .. किचनमधील जेवणाची मोठी भांडी धुणे वगैरे सर्व कामे इथे उपचार घेणारे मित्रच करत असत .. कधी कधी एखादा कुरकुर करे तेव्हा त्याला सामुहिक जीवनाचे महत्व समजावून दिले जाई .. समूहात राहताना केवळ स्वतच्या स्वार्थाचा विचार करून भागत नाही तर संपूर्ण समूहाचे हित ध्यानात घेवून विचार करावा लागतो ही अतिशय महत्वाची शिकवण येथे सर्वाना मिळत होती .. जात ..पात ..धर्म ..गरीब -श्रीमंत , सुशिक्षित - अशिक्षित वगैरे भेदांना येथे थारा नव्हता ..आपल्या आसपास असलेल्या प्रत्येक जीवाला आपल्यासारखीच सुख दुखे: आहेत .. तेव्हा सर्वांच्या भावना समजून घेवून प्रगती केली पाहिजे हे सूत्र येथे कटाक्षाने राबवण्याचा प्रयत्न असे .
एकदा शनिवारी सकाळी संगीत उपचारांच्या वेळी .. मुक्तांगण चे कार्यवाह असलेले डॉ . अनिल अवचट उपस्थित होते ..त्या वेळी ते महिन्यातून एक दोन वेळा तरी मुक्तांगण मध्ये येवून उपचार घेणाऱ्या रुग्णांशी संवाद साधत असत .. ( आता नियमित आठवड्यातून एकदा येतात असे समजले आहे ) त्या दिवशी जुने मित्र विशेष उत्साहात दिसले .. ते सर्व डॉ . अनिल अवचट यांचा उल्लेख ' बाबा ' असा करत होते .. डॉ. अनिल अवचट यांचे नाव एक पत्रकार .. सामाजिक समस्यांवर लिहिणारे लेखक ...म्हणून मला माहित होते .. आज त्यांना प्रत्यक्ष पहायला मिळणार म्हणून खूप कुतूहल होते .. संगीत उपचार सुरु झाल्यावर एकदोन गाणी झाली असतील तोच ... खादीचा पांढरा जुनासा वाटणारा शर्ट .. साधी पँन्ट... खांद्याला एक मोठी शबनम पिशवी लटकवलेली या वेशात एका पांढऱ्या दाढीधारी व्यक्तीने हॉल मध्ये प्रवेश केला तसे सर्वानी टाळ्या वाजविल्या ... हेच ' बाबा ' होते तर ..सर्वात आधी मनात भरला तो त्यांचा साधे पणा .. ते उमराणी सरांच्या बाजूला जावून बसले .. खांद्यावरील शबनम बाजूला काढून ठेवली ..पिशवी बरीच जड आहे हे तिच्या आकारावरून जाणवत होते .. अतिशय संथ सुरात ते बोलू लागले .. संगीत हे उपचारांचे कसे प्रभावी माध्यम आहे हे सांगत ..केवळ मानवच नव्हे तर वनस्पती आणि प्राणी यांच्याबाबतीत देखील काही प्रयोग केले गेले तेव्हा संगीतामुळे त्यांच्यात सकारात्मक बदल झाल्याचे निष्कर्ष आहेत असे त्यांनी सांगितले .. मग पिशवीतून तीनचार बासऱ्या बाहेर काढल्या ..पितळी ..स्टीलची आणि लाकडी अश्या सर्व प्रकारच्या बासऱ्या होत्या ... त्यातील एक पितळी बासरी त्यांनी ओठाशी धरून वाजविण्यास सुरवात केली .. ते कोणतेही गाणे नव्हते मात्र .. बासरी ऐकताना ..काही गाणी आठवली .. दोन मिनिटे बासरी वाजवून झाल्यावर त्यानी.. सांगितले की मी एक शास्त्रीय संगीतातील राग वाजवला होता आत्ता .. कुणाला या रागाची माहिती आहे का ? वार्डात त्यावेळी कोणीच शास्त्रीय संगीत जाणणारे नव्हते ..आम्ही सगळे नुसतेच मक्ख ... मग बाबाच पुढे सांगू लागले ..सिनेमातील सर्व लोकप्रिय गाणी ..मराठी भावगीते .. लोकगीते .. या सगळ्यांचा प्रमुख आधार संगीतातील ' राग ' असतो ..त्यांनी मग बासरीवर वाजवलेल्या रागाची एकदोन गाणी आम्हाला सांगितली तसे त्यासारखीच एकदोन गाणी आम्हाला पण आठवली ... अतिशय सोप्या भाषेत बाबा संगीताचे महत्व सांगत होते ...मुलांनी त्यांना एखादे गाणे म्हणण्याचा आग्रह केला तेव्हा .. त्यांनी ' ज्योत से ज्योत जलाते चलो ...प्रेम की गंगा बहाते चलो ' हे गाणे म्हंटले .. ' खर्ज ' च्या आसपास लागणारा त्यांचा सूर होता .. आवाजात खूप गोडवा नाही पण गाण्याच्या शब्दांच्या नेमक्या अर्थाची कळकळ मनाला भिडली होती ....त्यांनी निवडलेले गाणे पूर्वी मी अनेक वेळा ऐकले होते ..कधी गाण्याच्या अर्थाकडे लक्ष गेले नव्हते माझे ..आज मात्र ते गाणे बाबांच्या तोंडून ऐकताना .. प्रथमच गाण्याचा अर्थ मनात शिरला .... ऐक तास कसा निघून गेला ते कळलेच नाही .. संगीत उपचारांची वेळ संपली होती तरी कोणालाच उठावेसे वाटत नव्हते इतके मंत्रमुग्ध झाले होते सगळे ..नंतर जेव्हा सगळे उठून बाबांच्या पाया पडू लागले तेव्हा इतका वेळ सहज हालचाली करणारे बाबा एकदम संकोचले ..त्यांनी माझ्या पाया पडू नका असे सांगितले .. मी इतका मोठा व्यक्ती नाही ऐक सर्वसामान्य माणूस आहे हे सांगितले .. हे तर खुपच अनोखे होते .. कारण अनेक ' बाबा ' जास्तीत जास्त लोकांनी पाया पडावे म्हणून धडपड करत असतात व त्यातच धन्यता मानतात ..हे ' बाबा ' जरा वेगळेच होते .

त्या दिवशी दुपारी १२ वाजता समूह उपचार देखील ' बाबा ' च घेणार आहेत हे समजले ..आम्ही सगळे १२ वाजता पुन्हा उत्सुकतेने हॉल मध्ये जमलो .. बाबांनी आधी थोडक्यात स्वतःबद्दल स्वतच्या छंदांबद्दल माहिती सांगितली .. ते म्हणाले मित्रानो मी देखील तुमच्यासारखाच व्यसनी आहे .. मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी मी देखील सारखा करत असतो ..मात्र माझे व्यसन हे मलाही आणि माझ्या आसपास असणाऱ्या इतरांनाही कसा आनंद देवू शकेल याचा मी विचार करतो .. कंटाळा येणे ..निराश वाटणे .. बोअर होणे .. जीवनात कसलेही नाविन्य न वाटणे .. वगैरे मानवी भावना या अपरिहार्य आहेत .. त्यावर उपाय म्हणूनच लोक व्यसनाचा आधार घेतात .. आणि त्यात अडकून अधिक अधिक दुखी: होतात ... मी त्यावर उपाय म्हणून मनाला काही काळ दुसऱ्या एखाद्या गोष्टीत गुंतवण्याचा प्रयत्न करतो ...त्यातूनच अनेक नव्या गोष्टी मला शिकायला मिळतात ..जगाकडे ..या सृष्टीकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन अधिक विकसित होतो .. प्रत्येकाने जर एखादा छंद जोपासला तर नक्कीच त्याला वेळ सत्कारणी लावल्याचे समाधान मिळू शकते ...बोलता बोलता त्यांनी उभे राहून हातातील खडूने फळ्यावर एक हत्तीचे चित्र काढले .. इतक्या सहजपणे त्यांचा हात फिरत होता फळ्यावर की सगळे आश्चर्य चकित झाले .. त्यांनी पुढून ..मागून ..बाजूने हत्ती कसा दिसतो ते दर्शवणारी दोन तीन चित्रे लीलया काढली .. 
========================================================================

भाग १५८ वा  सृजनशीलता आणि सकारात्मक आनंद !

फळ्यावर बाबांनी हत्ती काढल्यावर एखादी रेषा किती वळणे .. आढेवेढे .. असा प्रवास करून एक सुंदर चित्र तयार करू शकतात हे दर्शिवले होते .. आम्ही सर्व थक्क होऊन पाहत होतो .. मग त्यांनी त्यांच्या पिशवीतून .. काष्ठ्शिल्पे काढली .. लाकडी ठोकळ्याला कानस आणि इतर हत्यारांनी कोरून ..घासून त्यातून लाकडी शिल्प कसे तयार केले जाते ते समजावून सांगितले .. त्यात त्यांनी एकाच लाकडी ठोकळ्या तून कोरलेले आई आणि तिच्या पायावर तिचे बाळ..स्कुटरवर बसलेले कुटुंब ...वगैरे शिल्पे कोरली होती ..बाबा ती शिल्पे सांगताना त्याचा इतिहास .. ती शिल्पे कोरण्याची कल्पना मनात कशी आली .. या बद्दल देखील माहिती देत होते .. चित्रकला ..शिल्पकला .. संगीत .. बासरीवादन ..त्या नंतर साध्या हातरुमालाला घड्या पाडून त्यातून निर्माण होणारे प्राण्यांचे आकार .. काही हातचलाखीच्या करामती असे अनेक प्रकार करणारे बाबा ....पांढरी दाढी .. साधा वेष ..मृदू भाषा .. सर्वांबद्दल मनात आस्था बाळगणारे एखादे ऋषीच दिसत होते .. बोलताना त्यांच्या डोळ्यात आश्वासक भाव होते .. निसर्गाने हे जग इतक्या विविध प्रकारे नटवून सजवून ..त्यात विविध वनस्पती ....प्राणी ... पक्षी ..असे जीव निर्माण करून या सर्व गोष्टींचा उपभोग घेत ... स्वतचे आणि इतरांचेही जिवन सुखकर करून ..निसर्गाचे संगोपन करू शकेल असा बुद्धिमान प्राणी मानव निर्माण केलाय .. मात्र त्याच बुद्धीचा वापर करून मानव निसर्गाच्या मर्यादा भंग करतोय ... सुखाच्या .. आनंद ..मिळवण्याच्या कैफात ...उन्माद पावून ...स्वतच्या विकृत सुखासाठी इतर जीवांचे जिवन कष्टमय करतोय .. विधायक कार्यशक्ती विनाशक बनत चाललीय ...आपण जर आपल्या सर्व क्षमतांचा सकारात्मक वापर करू शकलो तर कितीतरी मोठे मोठे चमत्कार करू शकतो असे सांगत बाबांनी सृजनशीलतेचे महत्व समजावून दिले ....प्रत्येकाच्या आनंदाच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात .. अर्थात आधी पोट भरल्यानंतरच मग इतर आनंदांकडे लक्ष जाते .. अतिशय समृद्ध अश्या या पृथ्वीवर आज मानवाने इतकी विषमता निर्माण केलीय की जगात अनेक मानव असे आहेत ... ज्यांना साधे दोन वेळचे पोटभर जेवण देखील मिळू शकत नाहीय ... चंद्रपूर ..गडचिरोली ..आणि इतर दुर्गम आदिवासी भागातील बांधव अतिशय कष्टप्रद जिवन व्यतीत करत आहेत ..मोठ्या मोठ्या शहरातून मजुरांचे तांडे राबत आहेत ..कच-याचा ढीग उपसणाऱ्या मुलांचे बाल्य केवळ पोटासाठीच संपत आहे ...सिमेंटची जंगले वाढून ..शेतीची जमीन कमी केली जातेय ...निरनिराळ्या जीवनावश्यक गोष्टींचे दुर्भिक्ष निर्माण होण्यात सर्वात मोठा हात मानवाचाच आहे ...अधिक अधिक भौतिक सुखे मिळविण्याच्या नादात इतरांचे सुख सहजपणे हिरावून घेतले जातेय . बाबांनी त्यांचे पत्रकारितेतील देखील अनुभव सांगितले .. देवदासी प्रथा ..विडीकामगारांचे प्रश्न .. शोषक अंधश्रद्धा अश्या विविध विषयांना स्पर्श करत चाललेला बाबांचा संवाद म्हणजे खरेच आनंदायी अनुभव होता ..आम्हाला सर्वाना त्यांनी अंतर्मुख केले होते ... एखाद्या धार्मिक प्रवचनापेक्षाही जास्त अशी मोलाची शिकवण होती बाबांची .....!

मी देखील नशेतून मिळणारा तात्पुरता आनंद मिळवण्यासाठी माझे स्वतचे आणि माझ्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाचे जिवन कष्टप्रद ...यातनामय करून ठेवले होते ...प्रेमळ आईवडील .. जीव लावणारा भाऊ ..बहिण .. मला सर्वस्व समजणारी अनघा .. तिचे कुटुंबीय ... जेथे जेथे नोकरी केली तेथील वरिष्ठ .. मला जिवन समर्थपणे जगण्यास प्रशिक्षण देणारे गुरुजन सगळ्यांच्या भावनांचा अनादर करत गेलो ... बाबांनी अतिशय सहजपणे आम्हाला सर्वाना आत्मपरीक्षण करण्यास प्रेरित केले होते .. त्या वेळपर्यंत केवळ नशे साठी म्हणून मी किमान पाच लाख रुपये तरी उडवले होते ...याच पैशात कितीतरी विधायक गोष्टी करता आल्या असत्या ..किमान आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी तरी या पैश्यांचा वापर नक्कीच करता आला असता ... बाबा बोलत असताना एकाने प्रश्न विचारला की ' आपण ज्या कला दाखवल्या आहेत त्या आत्मसात कारणे सर्वाना कसे शक्य होईल ? कारण मी असे ऐकले आहे की एखादा कलागुण हा नैसर्गिक असतो ..अश्या कलाकाराला निसर्गाने विशेष प्रतिभा दिलेली असते ? ..याबर बाबा हसून म्हणाले ..माझ्या मते प्रतिभेचा उत्तुंग अविष्कार हा कदाचित विशेष एकाग्रतेचा .. सरावाचा आणि निसर्गाच्या कृपेचा भाग असू शकतो .. प्रत्येक मानवाच्या मेंदूत अश्या प्रकारच्या कलांची केंद्रे आहेत .. मात्र हा खजिना आपोआप सापडत नाही तर त्यासाठी प्रेरणा हवी ... प्रयत्न केले पाहिजेत .. जरी प्रत्येक व्यक्ती मोठा गायक ..वादक ..चित्रकार .. शिल्पकार वगैरे बनू शकला नाही तरी आपल्या इतर जवाबद-या सांभाळून जर फावल्यावेळात जेव्हा मन अवस्थ असेल ..कंटाळा येईल .. मनात निराशा ..वैफल्य दाटून येईल ..व्यसन करावे अशी तीव्र इच्छा होईल ..तेव्हा जर मनाला काही काळ आपण या कलांकडे वळवले तरी आपण किमान आपल्यापुरता आनंद नक्कीच मिळवू शकतो .. बाबांचे हे उत्तर मला ही पटले .. मी देखील ठरविले की या पुढे आपणही फावल्या वेळात असा प्रयत्न करायचा . पाहता पाहता दीडतास उलटून गेला होता . बाबांनी मग सर्वांचा निरोप घेतला .

दोन दिवसांवर माझा डिस्चार्ज होता ...दरम्यान दोन वेळा माझी मँडमशी भेट झाली होती ..त्यांना मी माझ्याबद्दल बहुतेक सगळे सांगितले होते .. मी बाहेर इतक्या समस्या निर्माण करून ठेवल्या होत्या की त्यांचा सामना सहजपणे कारणे मला अजिबात सोपे नव्हते ...अजून काही दिवस येथेच रहावे असे मनात होते ...पुन्हा मला जेव्हा मँडम नी भेटायला बोलाविले तेव्हा ..आता पुढे काय विचार आहे ? असे विचारले तेव्हा मी त्यांना सरळ सांगितले की मला अजून काही दिवस इथे राहायचे आहे .. त्यांनी मला तशी संमती दिली ..म्हणाल्या तू अनेक प्रकारच्या चांगल्या गोष्टी इथे ऐकल्या ..समजून घेतल्या हे तर दिसतेच आहे ..याचा अर्थ असाही नव्हे की हे सगळे कृतीत उतरविणे लगेच शक्य होईल ...त्यासाठी तुला अजून वेळ द्यावा लागेल .. व्यसनापासून दूर राहत सर्वसामान्य जिवन जगण्याची सवय लावून घ्यावी लागेल .. त्याकरिता तू जर अजून काही दिवस इथेच राहायचे असे ठरविले असेल तर नक्कीच चांगले आहे ..मात्र आता मग इथे राहताना तुला काही जवाबदा-या देखील घ्याव्या लागतील ..माँनीटर म्हणून वार्डचे व्यवस्थापन तू चांगले केलेस तरी अजून स्वतच्या विचारांचे ...भावनांचे ...व्यवस्थापन शिकून ते अमलात आणण्यासाठी आता तुला विशेष प्रयत्न करावे लागतील .. असे सांगून त्यांनी माझ्या अजून काही महिने ' मुक्तांगण ' येथेच राहण्याच्या बेतास संमती दिली ... तत्पूर्वी एकदा नाशिकला जावून माझे कपडे घेवून येतो ..आईला ..भावाला वगैरे भेटून येतो असे मी त्यांना म्हणालो ..(माझ्या मनात अनघाची माहिती काढायचे असे देखील होते .. आई आणि भावाच्या भेटीपेक्षा नाशिकला एकदा जाण्याचे तेच खरे कारण होते मात्र तसे उघड सांगितले नाही )...यावर त्यांनी त्यालाही होकार दिला ..मात्र तेथे गेल्यावर कदाचित तुझा निर्णय डळमळीत होऊ शकेल याबाबत सावध केले ..तू जास्त काळ घरी न राहता केवळ एक दिवस राहून परत ये असे सांगितले .. माझ्याजवळ आता परत जाण्याच्या भाड्याला पैसे नव्हते ..तेव्हा त्यांनी ते पैसे तुला वार्ड अकाऊंट मधून मिळतील असे सांगितले .. वार्ड अकाऊंट म्हणजे येथे जे मित्र उपचार घेत होते .. त्यांच्या गरजेच्या वस्तूंसाठी पालक काही विशिष्ट रक्कम ' मुक्तांगण ' कडे जमा करीत असत .. डिस्चार्ज च्या वेळी त्यातून उरलेले पैसे परत दिले जात .. तसेच त्या उरलेल्या रकमेतून ..काही रक्कम स्वेच्छेने वार्डच्या खात्यात जमा केली जाई ..ज्याचा विनियोग वार्डच्या गरजा .. आणि इतर खर्च भागविण्यासाठी केला जाई .

===========================================================================

भाग १५९ वा   वळणे ..धोके ..अपघात !


नाशिकला जाण्याचे पक्के झाल्यावर मी मला नेमून दिलेले समुपदेशक श्री .भास्कर मोरे यांना भेटायला गेलो ..मोरे सरांनी समाजकार्य महाविद्यालयातून पदवी घेतली होती .. ते जवळ जवळ सुरवाती पासूनच ' मुक्तांगण ' च्या कामात सहभागी होते.... गेल्या २० दिवसात ते मला दोन वेळा भेटले होते .. सुरवातीला मला समुपदेशनाचे महत्व माहीतच नव्हते .. जेव्हा प्रथम .. भास्कर मोरे यांनी तूला बोलावले आहे असा निरोप आला ..तेव्हा मला हे देखील सांगितले गेले की ते तुझे समुपदेशक आहेत .. मी नुसताच हो ..म्हंटले आणि नंतर विसरूनही गेलो ..थोड्यावेळाने मोरे सर् वार्डात आले आणि मला म्हणाले चल जरा गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी .. गेलो त्यांच्या मागे त्यांच्या केबिन मध्ये ..' तू गाणी फार छान म्हणतोस असे ऐकलेय मी ' ..असे म्हणत त्यांनी सुरवात केली .. पुढे तुझे अजून काय काय छंद आहेत हे विचारले तेव्हा मी कविता ..अभिनय .. असे सांगितले .. तर म्हणाले ' अरे वा !मस्तच आहे ..मी पण कविता करतो असे म्हणत त्यांनी त्यांची कवितांची वही मला वाचायला दिली .. ' आत्ताच नको वाचुस सगळे .. हवे तर वार्डात गेल्यावर निवांतपणे वाच ' असे म्हंटल्यावर मी वही नुसती चालून टेबलवर ठेवून दिली होती ..मग त्यांनी घरी कोण कोण आहे ? ..शिक्षण किती झालेय .. व्यसन किती वर्षांपासून करतोय असे प्रश्न विचारले .. मी खरी उत्तरे देत गेलो ..व्यसनमुक्तीचा किती वेळा प्रयत्न केला आहेस ? मी जरा विचार करून उत्तर दिले .. म्हणालो ' सर् येथे पहिल्यांदाच योग्य दिशेने प्रयत्न करतोय ..या पूर्वी खाजगी दवाखान्यात ..नंतर मेंटल हॉस्पिटल ला देखील होतो चार वेळा .. पण तेथे काही शिकवत नव्हते ...' माझे उत्तर ऐकून मोरे सर् गालात हसले .. म्हणाले ' एक सांग तुला येथे नवीन काय काय शिकायला मिळाले ? ' पुन्हा विचारात पडलो .. ' सर् ..इथे आल्यावर मला कळले की व्यसनाधीनता हा ऐक मनो -शारीरिक आजार आहे .. हा आपण स्वतहून ओढवून घेतलेला आजार आहे .. यातून बाहेर पडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत वगैरे ' .. ' अरे वा ! तू खुपच हुशार आहेस .. पण या पूर्वी जेव्हा जेव्हा खाजगी दवाखान्यात ..मेंटल हॉस्पिटल मध्ये होतास तेव्हा तुझे व्यसन बंद झाले होते ..व्यसन मिळाले नाही तर होणारा शारीरिक त्रास देखील बंद झाला होता .. मग तरी परत का सुरु केलेस तू व्यसन ? ' हा जरा अवघड प्रश्न होता .. आताच घाई नाही उत्तर देण्याची तू पुढील वेळी मला भेटशील तेव्हा उत्तर तुझ्या वहीत लिहून आण ... महत्वाचे म्हणजे सगळी उत्तरे प्रामाणिकपणे लिही तरच मी तुला काही मदत करू शकेन असे बजावत त्यांनी मला निरोप दिला होता ..!

नंतर तीन चार दिवस मी मोरे सरांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे हे विसरूनच गेलो होतो ..जाता येता वाटेत ते एकदोन वेळा भेटले ..मला अभिवादन करून उतर लिहायची आठवण करून दिली ..तेव्हा जरा ओशाळल्या सारखे झाले मला ..असे उत्तर लिहिणे जरा कंटाळवाणेच होते .. सगळी कथा लिहीत बसावी लागली असती .. शेवटी मी लिहिले ' खूप निराशा ..दुखः ..अपेक्षाभंगाचे प्रसंग ओढवल्यामुळे माझे व्यसन पुन्हा सुरु झाले ..तसेच काही वेळा व्यसन करायचे नाही असे ठरवून देखील जुने व्यसनी मित्र भेटले ..म्हणून त्यांच्या आग्रहामुळे व्यसन सुरु केले ..कधी कधी कंटाळा आला म्हणून .. बोअर झालो म्हणून ..आणि आनंदाच्या प्रसंगात देखील आनंद द्विगुणीत करण्यासाठी म्हणून व्यसन केले ' हे उत्तर लिहून मोरे सरांना भेटायला गेलो .. त्यांनी उत्तर वाचले अन विचारले ' जेव्हा जेव्हा तू निराशा ..दुखः अपेक्षाभंग झाल्यामुळे व्यसन पुन्हा सुरु केले तेव्हा व्यसन केल्यामुळे तुझ्या समोरील समस्या नष्ट झाली का ? ' याचे उत्तर नाही असेच होते ..कारण व्यसन करून मी फक्त माझ्या मानसिक अवस्थेत तात्पुरता बदल करू शकलो होतो ..नंतर नशा उतरल्यावर पुन्हा समस्या तशीच होती .. पुन्हा त्यांनी प्रश्न विचारला .. ' जुने मित्र तुला वाटेत भेटले होते ?..तुझ्या घरी आले होते की तू त्यांच्या कडे गेला होतास ? ' ...खरे तर मीच खूप दिवस भेट झाली नाही म्हणून व्यसनी मित्रांना भेटायला गेलो होतो .. आणि त्यांना व्यसन करताना पाहून मला देखील व्यसन करण्याची तीव्र इच्छा झाली होती .. त्यांनी फारसा आग्रह केला नव्हता पण मीच एकदा घ्यायला काय हरकत आहे असे म्हणून व्यसन केले होते त्यांच्या सोबत .. मी सरांना खरे ते सांगितले ..' एकदा व्यसन करून तुला थांबता आले का ? ' सरांचा पुढील प्रश्न तयारच होता ..मी अंतर्मुख होऊन उत्तर शोधू लागलो .. फक्त एकदाच घ्यायचे असे म्हणून मी काही काळच्या व्यसनमुक्ती नंतर पुन्हा व्यसन करत होतो ..मात्र एकदा घेतल्यावर पुन्हा एका आठवड्याभरातच मला पुन्हा तीव्र इच्छा होऊन मी पुन्हा ' फक्त आजच ' ' एकदाच ' असे म्हणून व्यसन करीत होतो ..आणि मग रोजच सुरु होई ...सरांना तसे सांगितल्यावर ' म्हणजे तुझ्या हे लक्षात आले असेल की तू या पुढे कोणत्याही कारणाने जर ' फक्त एकदा '..' आजच ..थोडेसेच ' असे करून व्यसन केले तरी नंतर तुला राहवत नव्हते .. नियमित व्यसन सुरु होत होते ' सरांच्या या बोलण्याला मी दुजोरा दिला होता .

शेवटचे म्हणून भेटायला गेलो तेव्हा सरांनी सुटी मिळणार म्हणून माझे अभिनंदन केले ..म्हणाले ' एकंदरीत तू येथे खूप छान सहभाग दिलास .. माँनीटर पदाची जवाबदारी देखील चांगली पार पाडलीस ...तुला कालच बुद्धिबळ स्पर्धेत देखील पहिले बक्षीस मिळाल्याचे कळले मला .. त्यांच्या स्तुतीने मी सुखावलो होतो ..पण आता ' मुक्तांगण ' मधून बाहेर पडल्यावर तुझी खरी परीक्षा आहे .. बाहेर अनेक गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध घडतील .. जीवनात अनेक चांगली वाईट वळणे येतील .. काही घटना घडतील ज्यामुळे तुझ्या मनात पुन्हा दुखः ..निराशा ..भीती ..राग .. वैफल्य या भावना निर्माण होतील .. अशा वेळी तुला विशेष काळजी घ्यावी लागेल ..अर्थात सध्या तू फक्त एकच दिवस जातोय म्हणा .. पण लक्षात ठेव या ऐक दिवसात देखील काहीही होऊ शकते ..मुख्य म्हणजे तुला पूर्वी व्यसनामुळे मिळेल आनंद तुझ्या मनातून सहजा सहजी पुसला जाणार नाहीय ..तुला कदाचित संधी मिळताच तीव्रतेने व्यसन करण्याची ओढ निर्माण होईल .. तेव्हा जरा सांभाळूनच राहावे लागेल तुला . असे म्हणत सरांनी मला शुभेच्छा दिल्या . मुक्तांगण मध्ये त्यावेळी प्रत्येक गुरुवारी डिस्चार्ज होत असे ..म्हणजे आठवड्यातून एकदा एकदमच चार पाच जणांना डिस्चार्ज मिळत होता ..डिस्चार्ज च्या वेळी प्रत्येकाला आपले मनोगत व्यक्त करावे लागे .. म्हणजे हा सगळा कार्यक्रम पार पडेपर्यंत दुपार झाली असती ..म्हणजे जेवण करूनच मला निघता आले असते !

========================================================================

 भाग १६० वा  भावपूर्ण निरोप समारंभ !
पस्तीस दिवस उपचार पूर्ण करून पुन्हा आपल्या घरी जाणाऱ्या मित्रांचा निरोप समारंभ म्हणजे ' मुक्तांगण ' मधील अतिशय हृद्य आणि भावपूर्ण असा कार्यक्रम असतो ..त्या दिवशी आम्ही एकूण पाच जण डिस्चार्ज होणार होतो ...दोन मुंबईचे ..दोन पुण्यातले आणि मी नाशिकचा ... माझ्या डिस्चार्ज करिता कोणी घरून येणे शक्यच नव्हते ..इतरांचे पालक आलेले होते .. पूर्वी या कार्यक्रमाला 'निरोप समारंभ ' म्हणत असत नंतर ' आंतरदीप ' असे नाव दिले गेले आहे .. ' आं तरदीप ' म्हणजे हृदयात व्यसनमुक्तीचा दिवा प्रज्वलित करणे ...केवळ व्यसनमुक्तीच नव्हे तर एकंदरीतच आदर्श जीवनाची शिकवण घेवून मुक्तांगण मधून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीची प्रेरणा टिकविण्यास मदत करणाऱ्या या कार्यक्रमाला बहुधा सगळे समुपदेशक देखील उपस्थित असतात .. स्वतः मँडम देखील या दिवशी पालकांना मार्गदर्शन करीत असत .आम्ही पाच जण विशेष उत्साहात होतोच परंतु वार्डमधील इतर मित्र देखील आनंदात होते .. वेगवेगळ्या जातीधर्मांच्या ..संस्कृतींच्या ..सर्वांची वार्डमध्ये निखळ मैत्री निर्माण होते .. सामुहिक जीवनाचे धडे घेवून मनातील सारे भेद भाव नष्ट झालेले असतात .. फक्त ' मानवता ' हीच शिकवण इथे दिली जाते ..हे सगळे आता बाहेरच्या जीवनात नव्याने उभे राहण्यासाठी सज्ज झालेले असतात .. सुरवातीला ' बंधू ' ने डिस्चार्ज होणाऱ्या सर्व लोकांची नावे वाचून दाखवली व सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवण्याचे आवाहन केले .. खूप जोरदार टाळ्या वाजल्या .. नंतर बंधू ने खास त्याच्या गमतीदार.. विनोदी शैलीत डिस्चार्ज होणाऱ्या मित्रांच्या स्वभावाबद्दल वार्डमध्ये आलेले अनुभव ...सांगितले योगाभ्यासाचा कंटाळा करणारा इरफान कसे योगाच्या वेळी निरनिराळी कारणे सांगून योग्याभ्यास टाळत असे .. नेमक्या थेरेपिच्या वेळी .. संडास बाथरूम मध्ये वेळ घालविण्याचा प्रयत्न करणा-या महेशला ' रघु' कसा बरोबर शोधून काढी...माँनीटर झाल्यावर मी कसा जगाचे ओझे खांद्यावर वागवत असल्यासारखा धावपळ करी ...चौथ्यांदा उपचार घेण्यासठी आलेला अनिल येथे जणू हिल स्टेशन वर आल्या सारखा कसा मजेत राहतो .. ' बंधू ..चाहे तो दिन में चार बार भांडी ड्युटी करूंगा ..झाडू मारुंगा ..मगर थेरेपी को मत भेजो अशी विनंती करणारा राजेश .. सगळे नमुने एक एक !

बंधूची प्रस्तावना आणि निरोप घेणाऱ्या मित्रांची माहिती सांगून झाल्यावर मग .. आम्हाला एकेकाला आमचे मनोगत व्यक्त करण्यास सांगितले गेले .. बहुधा सर्व जण येथून बाहेर पडण्याचा आनंद असला तरी इतक्या चांगल्या वातावरणातून ..असे मित्र सोडून जावे लागतेय या बद्दल खेद देखील व्यक्त करत बोलत होते .. प्रत्येकाने या पुढे मी अजिबात व्यसन करणार नाही असा निश्चय व्यक्त केला .. ' मुक्तांगण ' म्हणजे आमचे माहेर आहे असे मत अनिल ने व्यक्त केल्यावर ..गम्मत म्हणून बंधूने .. अहो पण माहेरी सारखे सारखे गेले तर सासर दुरावते ... . असा टोमणाही मारला .. सगळे वातावरण हलके ..गमतीदार आणि तितकेच संवेदनशील झाले होते .. मी एक दिवस घरी जावून पुन्हा येणार असल्याने फारसा बोललो नाही ..येथे खूप काही शिकण्यासारखे आहे त्यासाठी एक दिवस घरी जावून पुन्हा शिकणे सुरु ठेवण्यासाठी परत येथे राहायला येणार आहे असे सांगितले . पालकांपैकी कोणाला काही बोलायचे आहे का असे विचारल्यावर .. महेशची म्हातारी आई उभी राहिली .. तिच्या डोळ्यात पाणी आले होते .. माझा महेश मला परत मिळाला ...येथे आणण्यापूर्वी तो माणूस राहिला नव्हता .. घरात रोज भांडणे .. कटकटी .. आर्थिक ओढाताण .. होत असे .. त्याला येथे आणल्यापासून घर खूप शांत होते .. येथे मी १५ दिवसांनी महेशला भेटले तेव्हा त्याने या पुढे व्यसनमुक्त राहीन असे सांगून माझ्या मनावरचे ओझे हलके केलेय ..आता मी सुखाने पुढच्या प्रवासाला जाण्यास मोकळी झालेय असे म्हणून सर्वांच्या मनात घर केले .. ! राजेशची पत्नी बोलायला उभी राहिली परंतु ..अचानक तीला रडू कोसळले ..ती ओक्साबोक्शी रडू लागली .. कदाचित तीला राजेश ने व्यसनाच्या काळात दिलेला सर्व त्रास आठवला असावा .. किवा आता या पुढे तो त्रास होणार नाही या मुक्ततेच्या भावनेने असावे .. तीला अश्रू आवरेनासे झाले असावेत ...तीने नुसतेच सर्वाना हात जोडले ..एकही शब्द न उच्चारता फक्त कळकळीने हात जोडून ती जणू सर्वांना व्यसनमुक्त राहण्याची विंनती करत होती .. तिचे अश्रू पाहून अनेकांचे हृदय हेलावले .. आम्ही जरी खूप संवेदनशील असलो तरी ..स्वतच्या पत्नीच्या ..आईवडिलांच्या ..मुलांच्या भावना ओळखू शकत नव्हतो हे जणू तीने दर्शवले होते .

सर्वात शेवटी बंधू ने मँडम ना मार्गदर्शनपर बोलण्याची विनंती केली ..इतका वेळ मँडम समोर बसून सर्वांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत..नेहमीप्रमाणे त्यांच्याजवळ असलेल्या डायरीत काही टिपणे करीत होत्या .. त्यांनी आधी सर्वाना ..नव्या व्यसनमुक्तीच्या जिवनाच्या शुभेच्छा दिल्या .. मग सर्वांचे कौतुक करत आता हा प्रवास सुरु झालाय ..सतत आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे अशी सूचना दिली .. व्यसनाधीनता हा अतिशय घातक आजार असून नेहमी सावध रहावे.. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा येथे भेटायला येवून पाठपुरावा करावा .. केवळ व्यसनमुक्तीच नाही तर आपले स्वभाव दोष कसे निघून जातील आणि आपल्यातील उत्कृष्ट मानव बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्नशील असाले पाहिजे .. पुढे त्या म्हणाल्या ' जर आज आपला देश पारतंत्र्यात असता तर कदाचित तुम्ही सगळे ..येथे नाही ...तर तुरुंगात असता ..कारण स्वातंत्र्यसैनिकांची मनोवृत्ती आहे सगळ्यांची ..मनात घेतलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठी तन ..मन.. धनाचे समर्पण करण्याची हिम्मत आहे ..मात्र नेमकें हे समर्पण व्यसन करण्यासाठी वापरले गेले .. या पुढे असेच समर्पण व्यसनमुक्ती आणि कुटुंब ..समाज .. निसर्ग यांच्या उपयोगात येण्यासाठी वापरले तर .. तुम्ही सगळे खूप मोठे कार्य करू शकाल ' असे सांगत पुन्हा सर्वाना शुभेच्छा दिल्या . ..पालकांनी आज पर्यंत खूप सोसले आहे .. त्यांनी आता आपला माणूस चांगला वागेल यावर विश्वास ठेवून निश्चिंत झाले पाहिजे तरी देखील एकदम त्याच्या हाती जास्त पैसे देणे टाळावे ..नेहमी त्याचे पोट भरलेले राहील असा कटाक्ष ठेवावा कारण पोट भरलेले असले की व्यसनाची ओढ कमी होते ..कदाचित पुन्हा एखाद्यचे व्यसन सुरु झाले तर गोंधळून न जाता त्याला पुन्हा उपचार देणे गरजेचे आहे .. दहावीच्या परीक्षेत जसे सगळेच विध्यार्थी एकदम पास होता नाहीत तसेच या आजाराचे आहे .. काही जास्त जिद्दी ..हट्टी ..प्रामाणिकपणे आभ्यास न करणाऱ्या मुलांना पुन्हा प्रयत्न करावे लागतात .. तसे आपल्या माणसाच्या बाबत देखील घडू शकते याची जाणीव ठेवावी ..असे पालकांना आवाहन केले .. व आपल्या व्यसनाधीनतेच्या काळात पालकांनी खूप काही सहन केलेय . आणि तरी देखील आपल्याला माफ करून ते पुन्हा आपल्या पाठीशी उभे आहेत त्या बद्दल कृतज्ञता बाळगली पाहिजे असे आम्हाला सांगितले !