स्वतंत्र मुक्तांगण ! ( भाग १६६ वा )
मेंटल
हॉस्पिटलच्या अखत्यारीत असलेले मुक्तांगण याच काळात स्वतंत्र होण्याची
प्रक्रिया सुरु होती.. अँडमिशनची प्रक्रिया ..जेवण ..इतर व्यवस्थापन हळू
हळू स्वतंत्र होणार होते .नंतर मेंटल हॉस्पिटलची संबंध फक्त इमारती पुरताच
राहिला असता असे म्हंटले जाई ..आम्हाला निवासी कार्यकर्त्यांना यातील फारसे
कळत नसे ..मात्र आता मुक्तांगणचे वेगळे किचन होणार याचा खूप आनंद होता ..
मेंटल हॉस्पिटल मधून येणारे जेवण बंद होऊन ' मुक्तांगण ' मध्येच जेवण तयार
केले गेले असते ही आमच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट ...त्याच कळत
राजू नावाचा एक केटरिंगचा कोर्स केलेला दारुडा मुक्तांगणला दाखल होता
..त्याच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने त्याने किचनचे काम सांभाळावे असे मँडमने
त्याला सूचित केले होते ..त्या नुसार आधी आठवडयातून दोन वेळा त्याने
मुक्तांगण मध्येच भाजी बनविण्यास सुरवात केली होती .. हा राजू पुण्यातच
राहणारा होता ..छान भाजी बनवीत असे .. त्याच्यावर किचनचे काम करण्याची
जवाबदारी दिल्यावर ..त्याने पहिल्यांदा जी भाजी केली ती फरसबीची (
श्रावणघेवडा )..तिची चव अजूनही आठवतेय मला .. ...अगदी हॉटेल मध्ये मिळेल
तशी भाजी केली होती ..त्यात खोबऱ्याचा किस वगैरे घातला होता मग हळू हळू
सगळेच जेवण मुक्तांगण मध्ये तयार व्हायला लागले ....पहिल्या भाजीनंतर
राजूला खास सूचना दिल्या गेल्या की पंचतारांकित हॉटेल सारखे जेवण बनवू नकोस
..संस्थेचे दिवाळे काढायचे नाहीय आपल्याला .. योग्य प्रमाणात मसाले वापरून
..काटकसर करून उत्तम जेवण बनवायचे होते ...पोळ्या मुक्तांगण मध्ये
करण्याची सोय नव्हतीच ..कारण रोज सुमारे ५०० चपात्या करणे कार्यकर्त्यांना
शक्य झाले नसतेच .. त्यावर उपाय म्हणून डॉ . बाबा आढव यांनी सुरु केलेल्या
हमाल पंचायतीच्या ' झुणका भाकर ' केंद्रावरून चपात्या आणाव्यात असे ठरले
..पुणे रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या या केंद्रातून चपात्या आपणयासाठी मी आणि
अजून एकाची नेमणूक करण्यात आली होती .. मोठे अल्युमिनियमचे दोन डबे घेवून
आम्ही सुमारे ११ च्या सुमारास बसने तेथे चपात्या आणायला जात असू .बसच्या
गर्दीत ते मोठे वजनदार डबे घेवून येणे कठीणच काम होते .. मात्र त्या
निमित्ताने आम्हाला मुक्तांगणच्या बाहेर जाता येत असे ही आमच्यासाठी
आनंदाची बाब होती ..एकदा माझ्या सोबत चपात्या आणायला कार्यकर्ता म्हणून
नवीनच सामील झालेला प्रकाश होता ..मी झुणका भाकर केंद्रात चपात्या मोजून
घेत असताना .. कसा कोण जाणे प्रकाश सटकला .. मी खूप वेळ त्याची वाट पाहत
उभा राहिलो ... साडेबारा वाजत आलेले ..तिकडे मुक्तांगण मध्ये जेवणाची वेळ
होत आलेली .. काय करावे समजेना ..शेवटी मुक्तांगणला फोन करून झाला प्रकार
सांगितला तेव्हा .. प्रकाशची वाट न पाहता तू चपात्या घेवून निघून ये अश्या
सूचना मिळाल्या ..मग ते दोन मोठे डबे उचलून बसमध्ये मला एकट्याला आणावे
लागले ..मनातल्या मनात प्रकाशला खूप शिव्या घालत घातल्या .. मुळचे व्यसनी
असल्याने सगळेच कार्यकर्ते तसे बिनभरवश्याचे होते .. केव्हा मनात काय विचार
येईल याची खात्री नाही .. आणि मनात विचार आला की तो अमलात आणायला ही वेळ
लागत नसे .. अश्या लोकांना सोबत घेवून कम करणे म्हणजे मँडम व इतर वरिष्ठ
समुपदेशकांची तारेवरची कसरतच असे होती .
मुक्तांगण मध्ये स्वैपाक
सुरु आल्यापासून नवा कुक राजूचा भाव खूप वाढला होता .. तो सतत किचन मध्ये
थांबू लागला .. मुक्तांगणच्या इमारतीच्या मागे मेंटल हॉस्पिटलची खूप मोठी
जागा होती ..तेथे खूप गवत आणि इतर झाडे वाढलेली .. इमारतीच्या जवळच मागच्या
बाजूला तसेच मेंटल हॉस्पिटलच्या इतर जमिनीवर शिंदीची झाडे वाढलेली होती ..
दरवर्षी त्या शिंदीच्या झाडांचा ठेका दिला जाई मेंटल हॉस्पिटलतर्फे ..निरा
काढण्यासाठी .. म्हणजे त्या ठेकेदाराची माणसे येवून त्या झाडावर चढून तेथे
झाडाच्या वरच्या भागात चिरे मारून .. मडकी लावून ठेवत असत ..दोन दिवसानी
ती मडकी काढून घेतली जात.. पुन्हा नवी मडकी लावली जात .. त्या मडक्यात जमा
होणारा त्या झाडाचा रस निरा म्हणून विक्रीस पाठविला जाई .. एकदा राजू
सर्वाना दारूच्या नशेत असल्यासारखा वाटला .. पण तोंडाला दारूचा वास मात्र
येत नव्हता .. काय भानगड आहे कळेना कोणाला ..त्याला काय गडबड आहे विचारले
तर त्याने तब्येत बरी नाही ..रात्री झोप झाली नाही म्हणून डोळे लाल दिसतात
अशी करणे सांगून आम्हाला उडवून लावले .. `मग आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवायचे
ठरवले ..तेव्हा एकाला तो ..त्या शिंदीच्या झाडावर चढ उतर करणाऱ्या एका
माणसाशी बोलताना दिसला .. दुसऱ्या दिवशी राजूने किचन मध्ये केलेला चहा त्या
माणसाला दिलेला आम्ही पहिले ..मग संशय आला म्हणून संपूर्ण किचनची झडती
घेण्यात आली तेव्हा राजूने किचन मध्ये लपवून ठेवलेले मडके सापडले .. त्या
मडक्यात ताडी होती ..सगळा उलगडा झाला .. राजूने त्या माणसाशी ओळख वाढवून
त्याला चहा पाणी वगैरे देवून त्याच्याकडून झाडावरून काढलेले निरेचे मडके
मागून घेतले होते .. तापमान वाढल्यावर त्या निरा आंबून त्याची ताडी झाली
होती .. निरा जरी आरोग्यवर्धक ..शीतल .. पित्तशामक पेय म्हणून वापरली जात
असली तरी ..निरा आम्बल्यावर त्यापासून तयार होणारी ताडी मात्र नशा देणारे
पेय असते .. त्याचे देखील अनेक व्यसनी आहेत ..त्याचेही भयानक दुष्परिणाम
होतात .. राजूने ते मडके मिळवून अशी बसल्या जागी नशेची सोय करून ठेवलेली
आढळली ... हा सगळा प्रकार समजल्यावर ताबडतोब राजूला पुन्हा वार्डात
पाठविण्यात आले .. त्याच्या हाताखाली काम करून तयार झालेल्या दुसऱ्या
कार्यकर्त्याला किचनची जवाबदारी दिली गेली ..आणि सर्वात मोठे काम आम्हा
निवासी कार्यकर्त्यांवर आले ते म्हणजे मँडमनी आम्हाला इमारतीच्या मागे
असलेली शिंदीची झाडे तोडण्यास सांगितले ..सुमारे २० झाडे असावीत .. या
झाडाच्या पानांची टोके खूप अणकुचीदार असतात .. तसेच जितके वर हे झाड असते
तितकेच आत खोल जमिनीत त्याचे मूळ असते ...ही सगळी झाडे मुळासकट काढून टाकणे
खूप जिकीरीचे कम होते ...कोयत्याने आधी पाने छाटायची .. मग जमीन खोदून
सुमारे १० ते बारा फुट आत खोल झाडांच्या मुळापर्यंत जावून ते झाड उपटून
टाकायचे असा आमचा उद्योग सुमारे महिनाभर सुरु होता .. पानांची धारधार पाती
लागून अंगावर ओरखडे उमटत .. पानांची टोके हाताला टोचून तेथे सूज येई .. आणि
खड्डे खोदून दमछाक .. आम्ही सगळे उत्साहाने कामाला भिडलो ..तीनचार दिवसातच
आमचा उत्साह मावळू लागला .. सगळे रोज राजूला शिव्या घालत होतो .. तर तो
निर्लज्जासारखा आम्हाला झाडे तोडताना पाहून हसत असे ..एका व्यक्तीने इतक्या
लोकांना सुमारे महिनाभर कामाला लावले होते !
================================================================
पालक सभा ! ( भाग १६७ वा )
पालक सभा ! ( भाग १६७ वा )
मुक्तांगण
मध्ये उपचार घेत असलेल्या व्यसनी मित्रांना पालकांनी भेटण्यासाठी गुरुवार
ठरला होता .. त्या नुसार प्रत्येक गुरुवारी सकाळी ९ ते ४ या वेळेत पालक
भेटायला येत असत .. तसेच महिन्यातून येणाऱ्या चार पैकी दोन गुरुवारी पालक
सभा देखील होई .. प्रत्येक गुरुवारी ज्या मित्रांचे पालक येतील असा अंदाज
असे ते सगळे मस्त दाढी ..अंघोळ वगैरे करून तयार असत इतकेच नव्हे तर ज्यांचे
पालक येवू शकणार नाहीत ते देखील गुरुवारी खुश असत कारण त्यांच्या
मित्रांच्या पालकांनी घरून आणलेले खाण्याचे पदार्थ त्यांना देखील मिळत असत
.. माझ्या घरून कोणीही येणार नाही याची मला खात्री होती .. मी घरी इतका
त्रास दिलेला होता की मला असे आवर्जून कोणी भेटायला यावे असे प्रेम
..नात्यांमधील आपुलकी.. मी माझ्या वागण्याने गमावली होती .. पहिल्यांदा जे
मुक्तांगण मध्ये उपचार घेत होते त्यांचे पालक मात्र नक्की येत असत ..
ज्यांचे दोन दिन वेळा उपचार घेवून झालेले आहेत अश्या मंडळींचे पालक येण्यास
टाळाटाळ करत ...गुरुवारी सकाळपासून माझ्या मनात विषण्णता दाटून येई ...मी
घरी दिलेला त्रास आठवे .. केलेले नुकसान .. घडलेल्या सगळ्या घटना सारख्या
सारख्या आठवून खूप अपराधीपणा वाटे ..गुरुवारच्या पालक सभेची तयारी करण्याचे
काम निवासी कर्मचाऱ्यांकडे होते ..म्हणजे आदल्या दिवशी रात्री पालक सभेचा
मोठा हॉल धुवून काढणे .. मोठ्या सतरंज्या झटकून त्या घालून ठेवणे ..
पालकांना बसण्यासाठी खुर्च्या लावणे वगैरे ..ही सगळी कामे मी उत्साहाने करत
होतो .. प्रत्यक्ष गुरुवारी सकाळ पासून मात्र शक्तिपात झाल्यासारख्या
माझ्या हालचाली मंदावत जात . बंधूच्या ते लक्षात आले होते .. तो मला
त्याबद्दल नेहमी समजावे .. मला धीर देई .. ' हे ही दिवास जातील मित्रा ' हे
बहुधा साँक्रेटीस या तत्ववेत्त्याचे वाक्य सांगे ..काळ हा नेहमी बदलत असतो
.. जेव्हा यश ..प्रतिष्ठा .. सन्मान ..धन या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे
असतात तेव्हा तुम्हाला त्याचा माज येवून अहंकार..उन्माद वाढू नये व जेव्हा
सगळे काही हिरावून घेतले जाईल ..नैसर्गिक आपत्ती .. आजारपण .. प्रिय
व्यक्तीचा विरह .. दारिद्र्य या गोष्टी पदरात पडतील तेव्हा निराशेने
..वैफल्याने खचून न जाता ..कायम आशा जागृत ठेवण्यासाठी हे वाक्य अतिशय
उपयुक्त ठरते .
महियातून दोन वेळा होणाऱ्या पालक सभेत पालकांना '
व्यसनाधीनता ' या गंभीर आजाराबद्दल विविध मार्गाने माहिती देण्याचा प्रयत्न
समुपदेशक करीत असत ..तसेच व्यसनी माणसाला उपचार पूर्ण करून घरी गेल्यावर
कसे सांभाळावे .. त्याच्या भावनिक बदलांवर कसे लक्ष ठेवावे .. समुपदेशकानी
दिलेल्या सूचना पालन करण्यासाठी त्याला कसे प्रेरित करावे वगैरे ..
त्यासाठी महिन्यातून एका गुरुवारी ' मनोनाटय ' ..हा प्रकार सदर केला जाई .
वार्डातील उपचार घेणाऱ्या मंडळींपैकी उत्साही लोकांचे चार ग्रुप पाडले जात
..आमच्या पैकी एक निवासी कर्मचारी एका ग्रुपचा प्रमुख म्हणून नेमला जाई
..मग आम्हाला पालक सभेच्या १ तास आधी एखादा विषय दिला जाई .. त्या विषयावर
आधारित असे मनोनाटय त्या समूहाला सादर करावे लागे .. बहुधा सर्व विषय
..सर्वसामान्य जीवनाशी ..व्यसनाशी..स्वभावदोषांशी .. व्यसनमुक्तीशी
..कौटुंबिक जीवनाशी निगडीत असत .. आम्ही समूहातील मित्रांना भूमिका वाटून
देत असू . वडिलांची ... आईची .. पत्नीची .मुलांची ..व्यसनी व्यक्तीची अश्या
साधारण चार पाच भूमिका एका मनोनाटयात असत .. हे मनोनाटय सादर करताना कधी
कधी खूप धम्माल येई ..एखादा विनोदी वाक्य बोले ..किवा काहीतरी प्रसंगनिष्ठ
विनोद घडत .. तर कधी एकदम गंभीर प्रसंगात सर्व स्तब्ध होत .. अंतर्मुख
व्हावे लागे ..पूर्वी अनुभवलेल्या घटना आठवून पालकांच्या डोळ्यात पाणी येई .
मनोनाटय ही एक मानसिक उपचार पद्धती होती ..ज्यात व्यसनी व्यक्तीला
त्याच्या व्यसनामुळे पत्नीला ..आईवडिलांना .मुलांना ..भावंडाना कसा त्रास
होते ते अनुभवायला मिळत असे ..चारही समूहांचे मानोनाटय सादर करून झाल्यावर
..त्यात काम करणारे लोक आपापले मनोगत व्यक्त करीत .. शेवटी मँडम प्रत्येक
समूहाला दिल्या गेलेल्या विषयाचे सखोल ..अर्थपूर्ण असे विश्लेषण करून
..व्यसनाधीनता हा किती गंभीर असा मनोशारीरिक आजार आहे हे सर्वाना समजावून
देत असत ...अनेक पालकांना असे वाटत असते ..की याला उपचार देण्यासाठी
मुक्तांगण किवा एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले की आपले काम झाले
..आता त्याने पूर्ण बरा होऊनच बाहेर पडावे .. उपचारात पालकांचा देखील सहभाग
असावा लागतो .. कितीही काळजी घेतली तरी हा आजार पुन्हा डोके काढू शकतो
..अश्या वेळी त्या बाबत एकदा उपचार दिले काही फायदा झाला नाही असा विचार न
करता ..परत उपचार देणे गरजेचे आहे ..कोणतीही केस ही गाँन केस नसते ..तर
काही वेळा उपचारांचा फायदा व्हायला वेळ लागू शकतो ..काही जास्त हट्टी
..जिद्दी ..जास्त संवेदनशील ..अहंकारी असलेले मित्र पुन्हा पुन्हा चुका करू
शकतात वगैरे गोष्टी मँडम सांगत असत ..स्वतः मानसोपचार तज्ञ ..शिवाय अनेक
वर्षांचा रुग्णसेवेचा अनुभव .. उपचार देताना असलेले तादात्म्य .. मुळचा
समाजसेवेचा पिंड ..या सगळ्या गोष्टींमुळे मँडम खूप प्रभावी बोलत असत .आम्ही
बर व्हावे ही त्यांची कळकळ आम्हाला जाणवत असे .
एखाद्या गुरुवारी
..मनोनाटया प्रमाणेच चित्र उपचार ( पिक्चर थेरेपी ) देखील घेतली जाई म्हणजे
फळ्यावर चार पाच सूचक चित्र काढली जात ..प्रत्येकाने ती चित्रे पाहून
आपल्या मनात काय विचार आले मांडावेत असे आवाहन केले जाई ..घड्याळ .. घोडा
..शिडी .. सूर्य .. नोटा .. मुलगी ..पुरुष .लहान मुलगा ..दोरीवर तोल साधत
चालणारा डोंबारी ..पाण्यात पोहोणारा मुलगा वगैरे चित्र काढली जात .. एकदा
गम्मत झाली .. फळ्यावर दोरीवर तो साधत चालणारा डोंबारी काढला होता ..
आजूबाजूला गोलाकार जमलेली माणसे .. गळ्यात ढोलकी अडकवून ढोलकी वाजविणारी
त्याची बायको .. वगरे सगळे तपशील चित्रात होते .. मुंबईत व्यसनापायी
पाकीटमारी करणाऱ्या एका गर्दुल्ल्याला जेव्हा त्या चित्राबद्दल बोलायला
सांगितले तेव्हा तो म्हणाला ..माझे लक्ष डोंबार्याच्या चित्राकडे गेलेच
नाही तर त्या गोलाकार जमलेल्या गर्दीकडे होते .. खूप गर्दी होती ..त्यामुळे
मला पाकीट मारायला चांगली संधी आहे असे वाटले ..हे ऐकून सर्व हसू लागले
तसा तो खजील झाला .. एकाने जिवन म्हणजे अशी दोरीवरची कसरत असते ..नेहमी तोल
सांभाळावा लागतो .. आजूबाजूला असलेले लोक फक्त बघे आहेत ..ते तुम्हाला
टाळ्या वाजवून नेहमीच प्रोत्साहन देतील याची खात्री नसते ..मात्र तुम्ही
तोल जावून पडलात तर सर्व दोष नक्की देतात ..वगैरे भाष्य केले .. तो खूप
शहाणपणाचे बोलला होता .. नंतर एकाने त्याला तुझ्या किती अँडमीशन येथे
झाल्यात असे विचारले तेव्हा त्याने मान खाली घालत आठ असे उत्तर दिले .. '
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ' हे वाक्य इथे चांगले लागू पाडत होते .. तो
मित्र फक्त इतरांना सांगण्यासाठी हे सगळे बोलत होते मात्र त्याने स्वतःच्या
मनावर हे विचार बिंबवले नव्हते हे स्पष्ट होते .माझेही ही तसेच होत असे
..ऐरवी इतरांना सांगताना मी खूप उदात्त .. सकारात्मक .. असे बोलत असे
..परंतु स्वतः मात्र वेगळाच वागत होतो
================================================================
================================================================
पालक सभा ! वाढदिवस ! ( भाग १६८ वा )
पालक
सभेच्या शेवटी मँडम सर्व पालकांना आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांना
मार्गदर्शन करीत असत .. व्यसनाधीनता हा आजार कसा गंभीर आहे ... तसेच योग्य
उपचार दिल्यास व्यसनी व्यक्ती नक्की बरा होऊ शकतो ..त्यासाठी पालकांनी
देखील याला बरे करायचे हा निर्धार मनात जपायला हवा ..या आजाराबद्दल
कोणालाही दोष न देता सर्व पालकांनी एकत्र येवून व्यसनी व्यक्तीला उपचार
देण्यासाठी मदत केली पाहिजे .. त्याच्या व्यसनाला कोण जवाबदार आहे या वादात
न पडता ..यशस्वी पणे उपचार कसे देता येईल याकडे लक्ष द्यायला हवे ..बहुतेक
वेळा ..पालक गोंधळून जातात.. तेव्हा याच्यावर कोणी तरी करणी केली ..
काहीतरी खावू घातले .. मित्रांमुळे बिघडला .. परिस्थिती ..घटना ..इतर माणसे
यांना दोष न देता सर्व शक्ती हा बरा कसा होईल या वर केंद्रित करायला हवी
..तसेच याच्या व्यसनीपणा बद्दल स्वतःला दोष न देता ...आपण वेळेवर लक्ष देवू
शकलो नाही .. अशी अपराधीपणाची किवा आता हा कधीच सुधारू शकणार नाही अशी
निराशेची .. आमचे नशीब फुटके .. आमचे मागील जन्माचे भोग आहेत ते भोगलेच
पाहिजेत ही वैफल्याची भावना ठेवता ..कँन्सर , मधुमेह .. रक्तदाब ..हृदयरोग
..किवा इतर दीर्घकालीन उपचार घ्याव्या लागणाऱ्या आजारासारखाच हा देखील एक
आजार आहे हे समजून घ्यायला हवे व आपला माणूस नक्की बरा होईल असा सकारात्मक
विचार करायला हवा .. बहुधा तसे न होता व्यसनीच्या पत्नीच्या माहेरचे लोक
व्यसनी व्यक्तीच्या आईवडिलांना किवा भावंडाना ..तुम्ही आम्हाला फसविले ..
आमच्या मुलीच्या आयुष्याचे वाटोळे केलेत .. असा दोष देतात नाहीतर व्यसनीचे
पालक त्याची पत्नी नीट वागत नाही म्हणून जास्त पितो .. तीला चांगले संस्कार
नाहीत ..सारखी कटकट करते ..माहेरी जाते ..तिच्या माहेरचे लोक याचा अपमान
करतात ..यांच्या संसारात लुडबुड करतात म्हणून हा पितो.. असे एकमेकांवर
दोषारोप करत बसतात .. याचा फायदा घेवून व्यसनी व्यक्तीला मिळतो व तो अधिक
अधिक बेताल होतो .. व्यसन कसे ..कोणामुळे लागले ..का वाढले याची चर्चा करत
बसण्यापेक्षा पालकांनी आपापसातील सर्व गैरसमज दूर करून एकदिलाने व्यसनी
व्यक्तीला उपचार देण्यासाठी मानसिक व आर्थिक तयारी ठेवायला हवी .. काहीवेळा
एकदा उपचार देवून झाले ..मात्र काही फायदा झाला नाही ....आता तो आणि
त्याचे नशीब .. याला कायमचे हाकलून देणार .. हा मेला तर बरे .. हा कधीच
सुधारू शकणार नाही असे टोकाचे विचार मनात येवू शकतात ..हे विचार झटकले
पाहिजेत ..कारण त्याला उपचार दिले नाहीत तर तो उपचारांना जितका खर्च येवू
शकतो याच्या कितीतरी पट अधिक आर्थिक ..शारीरिक हानी करू शकतो ..शिवाय
घरातील सदस्यांची आपापसात भांडणे .. कटकटी .. त्याचे घरातील लहान मुलांवर
होणारेदुष्परिणाम .. या सगळ्या गोष्टी ध्यानात घेवून वारंवार उपचार देणे व
तो बरा होईपर्यंत देणे ..हेच ध्येय ठेवले पाहिजे ..थोडी थोडी घ्यायला हरकत
नाही अशी तडजोड देखील नको कारण तो थोडी घेवू शकत नाही हे शास्त्रीय सत्य
आहे .. तो नक्की बरा होईल हा विश्वास मनात जागवला पाहिजे ...मँडमच्या
मार्गदर्शनानंतर बहुधा पालकांना काहीच शंका उरत नसे त्या अतिशय संतुलित
पद्धतीने योग्य ..समर्पक शब्द वापरून सर्वाना दिलासा देत असत .. मुद्देसूद
..मानसशास्त्रीय संकल्पने वर आधारित असे त्यांचे बोलणे ऐकून नव्या उमेदीने
..नव्या आशेने पालक निश्चिंत होत असत तर आम्ही उपचार घेणारे लोक.. आपण
यातून नक्की बाहेर पडू शकतो ..फक्त त्यासाठी प्रामाणिक पणे मेहनत केली
पाहिजे .. आपल्यामुळे इतरांना झालेल्या त्रासाची नुकसानभरपाई केली पाहिजे
असा निर्धार करत असू . पालक सभे नंतर व्यक्तिगत समुपदेशन व पालकांचे
समुपदेशन समुपदेशकांच्या खोल्यात केले जाई ..त्यात कौटुंबिक समस्या ..
वैवाहिक समस्या .. व इतर समस्यांवर चर्चा करून योग्य मदत काय करता येईल ते
ठरवले जाई .
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी सकाळी '
पुनर्जन्माचा वाढदिवस ' हा कार्यक्रम होई ..म्हणजे ' मुक्तांगण ' सुरु
झाल्यापासून तेथे उपचार घेवून १ वर्ष किवा त्याहून अधिक व्यसनमुक्तीची
वर्षे पूर्ण केलेल्या व्यसनमुक्त राहणाऱ्या मित्रांचा मँडम , बाबा किवा
बाहेरून बोलाविलेल्या एखाद्या प्रतिष्ठीत व्यक्तीकडून व्यसनमुक्तीचे पदक
देवून त सन्मान केला जाई ..हा कार्यक्रम अतिशय भावविभोर करणारा असे .. एरवी
आपण एखाद्या व्यक्तीचा जन्म तारखेने होणारा वाढदिवस आणि हा व्यसनमुक्तीचा
वाढ दिवस यात खूप फरक होता .. आपण काहीही केले नाही ..किवा काहीही केले तरी
जन्माचा वाढदिवस साजरा होऊ शकतो ..वय वाढण्यासाठी काहीच प्रयत्न करावे
लागत नाहीत .काळाबरोबर वय वाढते .. मात्र हा व्यसनमुक्तीचा वाढदिवस साजरा
करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले असतात व्यसनी व्यक्तीने .. त्याच्या
सगळ्यात जास्त आवडत्या गोष्टीपासून दूर राहणे .. कितीही मनाविरुध्द घडले
तरी व्यसनाचा आधार न घेणे .. अनेक मोह ..चांगल्या वाईट घटना घडून
गेल्यावरही .. स्वतःला फक्त एकदा ..थोडेसे या आकर्षणापासून दूर ठेवणे सोपे
काम नव्हते .. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला समुपदेशक प्रस्तावना करून या
वाढदिवसाचे महत्व सांगे .. हा कार्यक्रम जे व्यसनमुक्तीचा वाढदिवस साजरा
करत आहेत त्यांचा सातत्याने पुढेही व्यसनमुक्त राहण्याचा निर्धार वाढविणारा
असतो ...व उपचार घेणाऱ्या मित्रांच्या मनात आपणही असाच वाढदिवस साजरा केला
पाहिजे अशी प्रेरणा जागवणारा ठरतो ..असे सांगितले जाई ..त्यानंतर आम्ही
निवासी कार्यकर्ते एक समूह गीत म्हणत असू .. हे गीत सुप्रसिद्ध मनोविकास
तज्ञ डॉ . आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेले होते ते खालील प्रमाणे !
हर नया दिन ..इक नई सुबह ..हर सांस में जागी आशा
दूर हटे ..गम कें बदल ..अब नही चाहिये कोई नशा ||
घेर लिया था अंधेरोने ..खयाल बनके घायल
इक पल भी ऐसा ना बचा था ..जो ना बनाता कायर
जिने कें इस संगर में ..सामने आई नई दिशा ....
हर नया दिन ..............................................|| १||
छोड दिये अहेसास पुराने ..गाड दिया अभिमान को..
अपने भीतर झांक कें देखा ..डबे हुवे ..इन्सान को
विकार मनके विकल हुवे ..अब हुई सत्य की अभिलाषा
हर नया दिन ..............................................||२||
अब जिवन की राहों पर ..विश्वास हमारा साथी है ..
समय समय कें गहेरे रंग ..इंद्रधनुष की भांती है ..
ये देन ना फिर बिखरा देंगे ..रहे हमारी ये मनीषा ..
हर नया दिन ...............................................|| ३||
या
गीतातील अर्थपूर्ण शब्द ..त्याला लावलेली चाल . स्वरातील चढ उतर इतके
सुंदर आहे की ते गीत म्हणताना आम्हाला मनात व्यसनमुक्तीची शक्ती संचारते
आहे असे वाटे तर गाणे ऐकणाऱ्या लोकांना एखादे समर गीत ऐकल्यानंतर जसे
लढाईचे स्फुरण चढते ..तसे व्यसनमुक्तीच्या लढाई चे स्फुरण चढत असे .
================================================================
दूरदर्शन मालिका ! ( भाग १६९वा )
आमच्या
समूहगीत गायनानंतर मग पुनर्जन्माचा वाढदिवस साजरा करणाऱ्या मित्रांना पदक
देवून सन्मानित केले जाई .. त्यांचे समुपदेशक थोडक्यात त्यांच्या
व्यसनमुक्तीच्या प्रवासाबद्दल माहिती देत असत ..असा वाढदिवस साजरा करणाऱ्या
मित्रांचे मनोगत खूप प्रेरणादायी असे .. व्यसनामुळे कसे नुकसान झाले ..
त्यातून सावरताना किती संघर्ष केला .. कुटुंबियांची मदत वगैरे .. कधी कधी
त्याच्या सोबत आलेली त्याची पत्नी ..आई अथवा इतर नातलग मंडळींपैकी कोणीतरी
बोले .. नातलगांचे बोलणे तर हृदयात घर करून जाई ..एका व्यक्तीच्या
व्यसनामुळे घरात कसा कलह निर्माण होतो ..आर्थिक ओढाताण ...भांडणे .. अशी
सारी कुटुंबियांची होणारी कुचंबणा ऐकताना आम्हाला पण आमच्या घरातील लोकांवर
आम्ही कळत ..नकळत केलेले अन्याय आठवत असत .. डोळ्यात पाणी येई ते ऐकताना
..शेवटी प्रमुख अतिथींचे मनोगत असे ...पहिल्यांदा हा कार्यक्रम पहिला
तेव्हाच मी मनाशी निर्धार केला होता ..आपण पुढच्या वर्षी नक्की
व्यसनमुक्तीचे पदक घ्यायचे .. खरोखर हा वाढदिवसाचा कार्यक्रम म्हणजे एक
रोमांचकारी अनुभव असे .
आता मुक्तांगण मध्ये स्थिरावलो होतो .. मला
येवून सुमारे चार महिने होत आले होते ..या काळात मी साफसफाई .. इतर कामात
मदत करताना ..समूह उपचार कसे घेतात .. योगाभ्यास घेणे .. मुक्तांगणच्या
बाहेरची किरकोळ कामे करणे यात पटाईत झालो होतो .. अर्थात स्वभावानुसार
आम्ही कार्यकर्ते एकमेकांची मस्करी देखील करत असू ..अजून वृत्तीत पाहिजे
तेवढा गंभीरपणा आलेला नव्हता .. व्यसनमुक्त रहात असताना जी उर्जा निर्माण
होते किवा व्यसनात खर्च होणाऱ्या ज्या उर्जेची बचत होते ती उर्जा पूर्णपणे
सकारात्मक कामात लावली पाहिजे असे मँडम सांगत ..ते मात्र पूर्णपणे जमत
नव्हते तसेच अजूनही माझी रात्रीची झोप सुरळीत झाली नव्हती ..दिवसभर जरी मी
कामे ..मस्ती ..मस्करी ..थोडेसे वाचन यात वेळ व्यतीत करीत होतो तरीही
रात्री मात्र सुमारे २ ते ३ वाजेपर्यंत झोप येत नसे .. एकदा बिछान्यावर
गेले की अनिश्चित भविष्यकाळ.. भयावह भूतकाळ .. या बद्दल विचार मनात येत असत
.. उलट सुलट विचारांनी मन व्यथित होई .. अनघा पासून दूर होऊन सुमारे दीड
वर्ष होत आले होते ..तिचा काहीच ठाव ठिकाणा नव्हता .. माझ्या
भविष्यकाळाच्या स्वप्नांचा जणू आत्माच हरवल्यासारखे झाले होते .. अनघाची
आठवण झाली की मन खूप व्याकुळ होई ..स्वताच्या असहायतेची खूप चीड येई .. तर
कधी कधी सगळ्या जगाचा राग येई ..' एक तू ना मिला ..सारी दुनिया मिले भी तो
क्या है ' अशी अवस्था होई ..मग काही दिवस मी उदास राहत असे ..
निराशेत..वैफल्यात आला दिवस कसातरी ढकलत असे .. मँडमना देखील मी अनघाबद्दल
सगळे सांगितले होते .. त्यांनी मला धीर देवून ..सगळे काही नीट होईल यावर
विश्वास ठेवायला हवा सतत असा दिलासा दिला होता .. मी असा उदास मूडमध्ये
असलो की रात्रीचा एकटाच योगाभ्यासाच्या हॉल मध्ये जावून जुनी दर्दभरी गाणी
म्हणत बसे ..बाकीचे निवासी कार्यकर्ते कधी कधी माझी थट्टा करत.. तर कधी
सहानुभूती दर्शवत असत . अनघाने व्यापलेला मनाचा कप्पा मला अस्वस्थ
ठेवण्याचे काम चोख बजावत होता .
त्याच काळात मुक्तांगणच्या कार्यात
मोलाचा सहभाग असलेले डॉ . आनंद नाडकर्णी यांनी ब्राऊन शुगरच्या व्यसनाधीनते
वर आधारित .. दूरदर्शन मालिका निर्मितीचे काम सुरु केले होते .' एक आकाश
संपले ' असे त्या मालिकेचे नाव होते ..ही मराठी मालिका नंतर दूरदर्शनवर
प्रसारित झाली होती .. मालिकेच्या दोन भागांचे चित्रीकरण मुक्तांगण मध्ये
होणार होते ..सुमारे चार दिवस त्या मालिकेत काम करणारे कलाकार .. तंत्रज्ञ
यापैकी काही लोक आमच्या सोबत मुक्तांगण मध्ये रहायला होते .. या मालिकेतील
व्यसनी व्यक्तीची प्रमुख भूमिका चावला या आडनावाच्या कलाकाराने केली होती (
त्याचे पहिले नाव आता आठवत नाहीय नीट) .. हा मराठी उत्तम बोलत असे..त्याने
त्याची भूमिका उत्तम व्हावी म्हणून आमच्या सगळ्यांकडून ब्राऊनशुगर मुळे
येणाऱ्या नशेबद्दल..टर्की बद्दल माहिती घेतली होती . मालिकेतील नायक ब्राऊन
शुगरच्या व्यसनात अडकून खूप नुकसान करून घेतो आणि मग उपचारांसाठी
मुक्तांगण मध्ये दाखल होतो असे कथासूत्र होते ..त्यानुसार नायकाच्या
मुक्तांगण मधील उपचारांच्या भागाचे चित्रीकरण मुक्तांगण मध्ये होणार होते
....त्यात समूह उपचार .. योगाभ्यास .. व्यक्तिगत समुपदेशन .. संगीत उपचार
यांचे देखील थोडे थोडे चित्रीकरण झाले ..संगीत उपचारांच्या चित्रीकरणाच्या
वेळी ...मी चांगला गातो म्हणून माझे ' या जन्मावर ..या जगण्यावर शतदा प्रेम
करावे ' हे गाणे चित्रित झाले .. समूह उपचार सुरु आहेत ..नायक
वार्डसोबतच्या इतर मित्रांसोबत संगीत उपचारात बसला आहे आणि समोर मी हे गाणे
म्हणतोय असा प्रसंग चित्रित केला गेला . हा माझा मोठा सन्मान होता .. त्या
निमित्ताने मला कँमे-या समोर येण्याची संधी मिळाली होती ..सुमारे दोन मिनिटे का होईना ..मी त्या मालिकेत झळकलो होतो .. चित्रीकरण झाल्यावर मनात
विचार आला अनघा जिथे कुठे असेल ती नक्की ही मालिका पाहिल .. तीला मी पण
दिसेन ..मी आता चांगला आहे हे कळेल ..मुक्तांगण मध्ये आहे हे देखील
समजेल..कदाचित ती माझ्याशी संपर्क करेल .
================================================================
डॉ .आनंद नाडकर्णी यांची जादू ! ( भाग १७० वा )
डॉ
.आनंद नाडकर्णी या सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञांबद्दल मुक्तांगण मध्ये ऐकूण
होतो की ते खूप छान बोलतात .. सुंदर समूह उपचार असतो त्यांचा वगैरे .. ते
मुक्तांगणच्या कार्यकारी मंडळात होते असेही ऐकले होते .. ते त्याकाळी दोन
तीन महिन्यातून एकदा मुक्तांगणला येत असत .. ठाण्याला त्यांचे क्लिनिक होते
.. त्याकामातून वेळ काढून ते खास मुक्तांगण मध्ये आले की एखादा समूह उपचार
घेत असत सर्वांचा .. अगदी प्रथम मी त्यांना महिले तेव्हा मी बुचकळ्यात
पडलो की इतक्या अवाढव्य देहाचा माणूस इतका चपळ कसा ? त्यांचा चेहरा नेहमी
हसतमुख आणि प्रसन्न असे ..डोळे अतिशय बोलके .. ते जेव्हा समूह उपचार
घ्यायला आले तेव्हा आम्ही सगळे ते काय सांगतात याकडे लक्ष देवून होतो
..जुनी मंडळी देखील या वेळी नवीन काय सांगणार उत्साहाने बसली होती .. ते
दारू ..चरस ..गांजा अगैरे व्यसनांचा अजिबात उल्लेख न करता त्या दिवशी
बाबांसारखेच सृजनशीलता या विषयावर बोलले .. त्यांचे वजन सर्वसामान्य
माणसाच्या तुलनेत जरा जास्तच होते .. तरीही ते अतिशय चपळपणे हालचाली करत
होते .. आधी त्यांनी सर्वाना स्वतची ओळख करून दिली .. मग विचारले तुमच्या
पैकी किती जाण कविता करतात ? हा अगदी अनपेक्षित प्रश्न होता .. आमच्या पैकी
काही जणांनी हात वर केले.. तेव्हा पुढे म्हणाले आज आपण सर्व जण मिळून
कविता करायची आहे ..अशी समूहाने मिळून कविता कशी करायची ते मला समजेना
..त्यांनी मग पुढे कवितेचा सर्वात महत्वाचा भाग भावना आहे असे सांगत ..
आपल्या मनातील भावना मोजक्या अर्थपूर्ण शब्दात मांडणे म्हणजे कविता ..
कविता करायला देखील विशेष प्रतिभा असलीच पाहिजे असे नाही तर .. आपल्या
मनातील नेमक्या भावना ओळखण्याचे कसब ..त्या भावना सुसंगतपणे इतरांपर्यंत
पोचण्यासाठी ..कागदावर उतरवण्याची कळकळ ..आणि आपल्या मनातील भावनेसाठी
योग्य शब्द निवडण्याचे भान हवे हे स्पष्ट केले . पूर्वी कॉलेजला असताना मी
काही प्रेम कविता केल्या होत्या .. त्यात तुझ्याशिवाय जिवन ...जिवंत मरण
..मनाला चटका .. कडक उन्हाळा .. हृदयातील खळबळ .. हुरहूर .. विरह .. समर्पण
.. निष्ठुर जग .. असे शब्द असत बहुधा . अश्या चार पाच कविता करून काही
दिवस मी कवी म्हणून मिरवलो होतो कॉलेजला.. त्यामुळे मी देखील कविता कोण कोण
करतो हे नाडकर्णी सरांनी विचारल्यावर हात वर केला .. मग नाडकर्णी सर् पुढे
सांगू लागले .. कविता करताना दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की कवितेतील
शब्द एकमेकांची घट्ट बांधणे..म्हणजेच चपखल पणे मांडणे .. त्यासाठी अगदी खूप
वाचन .. शब्द संग्रह असलाच पाहिजे असे अजिबात नाही असे सांगताना त्यांनी
बहीणाबाई चौधरी सुप्रसिध्द कावियात्रींचे उदाहरण दिले ..अशिक्षित असलेल्या
या स्त्री ने व्यवहारात नेहमी वापरले जाणारे शब्द वापरून अतिशय सुंदर कविता
केल्यात ..ज्या अजरामर आहेत ..
कवितेत यमक नावाचा प्रकार देखील
महत्वाचा आहे ज्यात कवितेच्या ओळीतील शब्दांच्या उच्चारांचा ..ताल जपावा
लागतो .. असे सांगून यमक म्हणजे नेमके काय हे स्पष्ट करताना फळ्यावर नळ हा
शब्द लिहिला व आम्हाला या शब्दासारखे शेवटी ' ळ ' आलेले दोन अक्षरी व तीन
अक्षरी शब्द सांगा असे विचारले .मुलांनी त्यावर .. चळ ..मळ ..कमळ..वळ
...कांबळ..वगैरे उत्तरे दिली ..यावर सगळ्यांना शाबासकी त्यांनी असेच करायचे
आहे आपल्याला असे म्हणत फळ्यावर ' हसत हसत जगायचे ' अशी ओळ लिहिली व या
ओळीतील शब्दांचा ताल ..अर्थ ..यमक सांभाळून पुढच्या ओळी आम्हाला सुचवायला
सांगितल्या .. एकंदरीत गम्मत होती सगळी ..एकाने पुढे ' व्यसन नाही करायचे
ही ओळ सुचविली .. दुसऱ्याने ...इतरांनाही हसवायचे असे लिहिले ..मी देखील मग
त्याखाली .. नाही रडायचे , नाही कण्हायचे असे लिहिले .. पाहता पाहता ऐक
अर्थपूर्ण कविता तयार झाली ती अशी
हसत हसत जगायचे
व्यसन नाही करायचे
नाही रडायचे, नाही कण्हायचे
नाही हरायचे ,नाही पळायचे
हसत हसत जगायचे .
समर्थ पणे उभे राहायचे
इतरांनाही हसवायचे
नाही उतायचे ,नाही मातायचे
नाही कोणालाही रडवायचे
हसत हसत जगायचे !
ही
कविता फक्त पाच मिनिटात तयार झाली ..मग पुन्हा त्यांनी दुसरी ओळ लिहिली
..पुन्हा कविता झाली .. तासाभरात आम्ही चार पाच कविता तयार केल्या सर्वानी
मिळून . मग नाडकर्णी सरांनी या कवितेला आता आपण चाल लावू असे मनात
टाळ्यांच्या तालावर कवितेला चाल लावली . खूप मजा येत होती सर्वाना ..अश्या
हसत खेळत झालेल्या समूह उपचारांचा लाभ असा की काहीतरी नवीन शिकायला मिळाले
सर्वाना .. सुमारे दीड तास सर्वांच्या मनातील निराशा ..वैफल्य ..अश्या
नकारात्मक भावना पळून जावून त्या जागी.. उत्साह .. उत्स्फूर्तता ..आनंद या
भावना निर्माण झाल्या ..शिवाय नंतर वार्डात अनेक कवी निर्माण झाले
..ज्यांनी तीनचार दिवस कविता करून धुमाकूळ घातला होता . एखादी कठीण वाटणारी
गोष्ट अतिशय सोपी सर्वाना समजेल अश्या प्रकारे सांगायची सरांची हातोटी
अवर्णनीय होती .. व्यसनांपासून दूर रहात जर अश्या गोष्टी करून आपण आपल्या
भावनाव्यक्त करत गेलो तर ..व्यसनमुक्ती सहज साध्य होऊ शकते हे पुढे त्यांनी
सांगितले .मुक्तांगण च्या या धावत्या भेटीत डॉ. आनंद नाडकर्णी म्हणजे निखळ
आनंद अशी त्यांची छाप त्यांनी सर्वांवर सोडली होती ... त्या नंतर
लायब्ररीत असलेली त्यांनी लिहिलेली बहुतेक पुस्तके मी आवर्जून वाचली !'
गद्धे पंचविशी ' .. ' एका सायकियाट्रिस्टची डायरी' ..ही नावे ठळकपणे आठवतात
..नंतर त्यांचे व्यसनमुक्ती वर आधारित ' मुक्तीपत्रे ' विवेकनिष्ठ
भावोपचार या उपचार पद्धतीवर आधारित ' विषादयोग ' वगैरे !
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें