भाग १५१ वा कबुतर ..आ ..आं ..आं.sssss !
आनंद वार्ड मध्ये असणारे सगळे गर्दुल्ले आतुरतेने .. मंगळवार व शुक्रवार ची वाट पाहत असत ..या दोन दिवशी डॉ. अनिता अवचट यांचा तेथे राउंड असे तसेच ...या दिवशी त्या सगळ्या गर्दुल्ल्यांना व्यक्तिगत भेटीसाठी बोलावून त्यांच्या पैकी ज्यांची टर्की पूर्णतः संपली आहे ..मानसिक स्थिती चांगली आहे ..आनंद्वार्ड मध्ये सुमारे १० दिवसांच्या वर कालावधी झाला आहे अशांना ' मुक्तांगण ' येथे ट्रान्स्फर करून घेत असत ...सगळे गर्दुल्ले त्या दिवशी आपला नंबर आज लागेल मुक्तांगण साठी या आशेत असत .. सकाळपासून उत्साहात असत .नीट नेटकी अंघोळ वगैरे करून मँडम च्या भेटीसाठी तयार रहात ...या दोन दिवशी साधारणतः सकाळी ११ च्या सुमारास मँडम आनंद वार्ड मध्ये येत ..मग सगळे गर्दुल्ले तेथे असलेल्या डॉ. च्या तपासणीच्या खोलीबाहेर रांगेने बसून आपल्या बोलावण्याची वाट पाहत बसत .. फाईल्स आधीच मँडम च्या टेबलवर पोचलेल्या असत .. अटेंडंट एकेकाचे नाव पुकारून त्याला आत बोलावे .. मँडम सुहास्य चेहऱ्याने त्याचे स्वागत करीत असत मग ..तीनचार प्रश्न ..आणि त्यांच्या भेदक नजरेचा सामना .. समोर बसलेल्या गर्दुल्याच्या मानसिक स्थितीचा त्यांना अचूक अंदाज येई .. त्यानुसार मग ' मुक्तांगण ' साठी निवड होई .. दर मंगळवारी आणि शुक्रवारी प्रत्येकी दोन तीन जण तरी मुक्तांगण ला ट्रान्स्फर होत असत .. इतर दिवशी मात्र सगळे गर्दुल्ले मरगळलेल्या अवस्थेत ..इथले जेवण ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटल सारखेच होते .. अर्थात बहुतेक गर्दुल्ले टर्की ..असल्याने खूप कमी जेवत ...त्यातच येथे कबुतर हा प्राणी सगळ्यांचा शत्रू बनला होता .. आनंद्वार्ड मधील काही हौशी अटेंडंटनी मिळून तेथे समोरच्या पटांगणात कबुतरे पाळली होती .. रीतसर मोठे ... जाळी लावलेले लाकडी कपाट बनवलेले होते त्या कबुतरांसाठी...एका कोपऱ्यात ते कपाट ठेवलेले होते ..सकाळी नाष्टा झाला की अटेंडंट त्या कबुतरांना मैदानात सोडत ..त्यांच्यासाठी बाजरी ..ज्वारी वगैरे दाणे टाकले जात .. सुमारे २० -३० कबुतरे होती .. कबुतरांचे खाणे झाले की त्यांना आकाशात उडवले जाई .. मग तासंतास ते कबुतरांचे शौकीन असलेले अटेंडट आकाशात उडणाऱ्या कबुतरांकडे नजर लावून असत ..यातील मुख्य त्रास असा होता की ...सुमारे १२ वाजता किचन मधून आणलेले जेवण.. जो पर्यंत ती उडणारी सगळी कबुतरे खाली उतरत नाहीत तो पर्यंत वाटले जात नसे ..थंडीचे दिवस असल्याने .. बाहेर पटांगणात गिनती झाल्यावर जेवणाच्या रांगेत बसून ..सगळे पेशंट आकाशातील कबुतरे केव्हा खाली उतरतील याकडे डोळा लावून असत ..कधी कधी तास भर नुसतेच समोर जेवणाची रिकामी थाळी घेवून बसावे लागत असे .. एक अटेंडंट तर इतका मुजोर होता की तो सरळ सांगे " जबतक सारे कबुतर नीचे नाही आयेंगे ..खाना नाही बाटेंगे " मग तो आम्हालाही तुम्ही कबुतरांना खाली उतरवण्यासाठी मदत करा असे सांगे .. आम्ही सगळे गर्दुल्ले ..आकाशाकडे पाहत ..आं ..आआ आsss..असा आवाज देत असू .. काही जण अंगातील शर्ट काढून तो हवेत गोल फिरवून कबुतरांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत असत ....ती कबुतरे रुबाबदार पणे एकेक करून खाली मैदानात उतरत असत मग तोऱ्यात ..दमदार पावले टाकत एकेक बरोबर त्याच्यासाठी राखीव असलेल्या लाकडी खणात जावून बसे .. ..सगळी कबुतरे आपापल्या जागी गेली की मग जेवण वाढले जाई ...लहानपणी आमच्या सिन्नरफाटा भागात असे कबुतर पाळणारे दोन तीन जण होते ..मी नेहमी टाईमपास म्हणून तेथे जावून बसत असे .. हा कबुतरे पाळण्याचा शौक खूप वाईट असे त्यावेळी जाणकार म्हातारे म्हणत असत ..त्यांच्या मते या प्राण्यांची देखभाल इतकी चांगली करावी लागते की ..माणूस इतर कोणती कामे करू शकत नाही ..निकामी बनतो .
प्रत्येक नवीन आलेल्या गर्दुल्ल्याने सोबत माल लपवून आणला आहे की काय ही देखील आम्हाला उत्सुकता असे ..जरी सरकारी अटेंडंट झडती घेत असले तरी गर्दुल्ले इतके हुशार असत की एखादा बरोबर माल आत आणत असे ..एकदा एकाने सोबत खाण्यासाठी बिस्किटे वगैरे आणली होती तसेच ..एका कागदाच्या पुडीत बांधून चहाची पावडर आणली होती ..अटेंडंट ने झडती घेतली ..बिस्किटांचे पुडे फोडून आत काही आक्षेपार्ह नाही याची खात्री करून घेतली मग ती चहाची पुडी उघडली . चहाची पावडर लगेच सगळ्यांना ओळखू येते ..ही कशासाठी सोबत आणलीस असे म्हंटल्यावर त्याने काहीतरी थातुरमातुर कारण सांगितले ..अटेंडंटनी देखील जास्त ताणले नाही ..नवीन आलेल्या गर्दुल्ल्यावर इतर गर्दुल्ले नजर ठेवून असत कारण त्यांना संशय असे की याने जर माल लपवून आणला असेल तर तो नक्कीच रात्री सगळे झोपल्यावर माल प्यायचा प्रयत्न करेलच ..तसेच याच्यावर आम्ही लक्ष ठेवून होतो .. रात्री सगळे झोपल्यावर याने चहाची ती पुडी उघडली ..आणि त्यातील थोडी भुकटी पन्नीवर टाकली ..आम्ही झोपेचे सोंग घेवून जागेच होतो ..पटकन आम्ही दोन तीन जण उठून त्याच्या जवळ गेलो तेव्हा समजले ..त्याने बाहेर ब्राऊन शुगर पन्नी वर वितळवून त्याचे जे काळे लिक्विड होते ते थंड झाल्यावर त्याचा काळा चपटा होणारा तो गोठलेला माल चहाच्या भुकटीत टाकून आणला होता ..चहाच्या काळ्या रंगात तो माल इतका बेमालून मिसळला होता की कोणाच्याही ध्यानात आले नाही ..मात्र लोचा असा झाला की ती चहाची पुडी इतर सामानात दाबल्यामुळे त्या मालाची देखील भुकटी होऊन चहाच्या पावडर मध्ये मिसळली गेली होती आता त्यातून नेमके ब्राऊन शुगरचे कण बाहेर काढणे कठीण झाले ..मग आम्ही पन्नीवर थोडी थोडी चहाची पावडर टाकून त्यातून दम लावले ..अर्थात नशा कमी आणि खोकलाच जास्त असा प्रकार होता तो ..पँपिलाँन या कादंबरीत जसे जेल मध्ये पैसे लपवण्यासाठी चार्जर नावाच्या छोट्या चपट्या डबीचा उपयोग केला जाई ..तसेच प्लास्टिकच्या कागदात माल ठेवून ती पुडी गुदद्वाराचा ठिकाणी लपवून आणणारे देखील महाभाग होते ..काही जण चपलेच्या तळाला किवा तळपायला चिकटवून माल आणत असत ..एकाने काळ्या हात रुमालाला माल गरम करून चिकटवून आणला होता अशीही माहिती इतर गर्दुल्ल्यांकडून समजली ...
येथे टर्कीत काही जण इतर मेंटल पेशंट्स कडून बिड्याच्या बदल्यात त्यांच्या मानसिक आजाराच्या गोळ्या मिळवून त्या गोळ्या खात असत .. दिवसभर असे गर्दुल्ले बधीर रहात.. त्यांना मग झोपेच्या गोळ्या खाण्याचे व्यसन लागत असे .. एकदा तर कमालच झाली ..सगळे जण दुपारच्या वेळी जेवणाच्या रांगेत पटांगणात बसले होते .. कबुतरे उतरवून झाल्यावर ..गिनती सुरु झाली .. गिनती नीट होऊन जेवण वाटप सुरु झाले ..तेव्हा अचानक सगळ्यांना मोठा धाड धाड असा आवाज आला .. पटांगणाच्या सगळ्या बाजूने खोल्या होत्या व त्या खोल्यांना बाहेरच्या बाजूने गज लावलेल्या खिडक्या .. पुन्हा तसाच आवाज आला सगळे अटेंडट आवाजाच्या दिशेने खोल्या तपासू लागले ..मग त्यांनी आमच्यातील एका गर्दुल्ल्याला एका खोलीतून धरून बाहेर आणले ..गोळ्या खावून त्याचे डोळे पूर्ण लाल झालेले ..कशाचेही भान नव्हते त्याने पटांगणाच्या कोपऱ्यात असलेला मोठा दगड घेवून सगळे जेवणात मग्न आहेत असे समजून त्या दगडाने खोलीच्या खिडकीचे गज तोडण्याचा प्रयत्न केला होता .. नशेत हा इतका बधीर झाला होता की इतका मोठा दगड गजांवर आपटल्या वर आवाज होईल याचेही त्याला भान नव्हते तसेच ते गज इतके मजबूत होते की असे दगडांनी ठोकून ते केवळ वाकले असते ..तुटले नसते अजिबात ..पण पळून जाण्याच्या ओढीने त्याने हा प्रकार गोळ्या खावून केला होता ..त्याला अटेंडंट नी आधी खूप झोडला मग त्याची बदली ' उंच वार्ड ' मध्ये झाली ..ठाण्याला जसा क्रिमिनल वार्ड होता ८ नंबर... तसा येथे ' उंच वार्ड ' होता .
=======================================================================
भाग १५२ वा पालीची शेपटी !
आनंद्वार्ड मध्ये मला आठ दिवस झाले होते ..दरम्यान टर्की जरी संपली असली तरी रात्री झोप काही केल्या येत नसे ...ब्राऊन शुगर व तत्सम अमली पदार्थांची व्यसने असलेल्या लोकांची हीच समस्या असते ..जरी मादक न मिळाल्यामुळे होणारे शारीरिक त्रास कमी झाले तरी झोप नॉर्मल व्हायला किमान २ महिने लागतात ... अर्थात दिवसभर कष्ट केले ..शरीर थकवले तर हे झोप येणे देखील लवकर सुरु होते ..मात्र आनंद वार्ड मध्ये कसले आलेत कष्ट ? ..फक्त सकाळी सकाळी थंडीत अटेंडंट आम्हाला सक्तीने खाली पटांगणात पडलेली झाडाची पाने सक्तीने उचलायला लावत असे ..सुमारे तासभर हे झाले की दिवसभर कोठेतरी कोपऱ्यात बसून गप्पा झोडणे ..जेवण..बिड्या फुंकणे ...जेवण .. चहा..नाष्टा या वेळेला तसेच अटेंडंटची ड्युटी बदलण्याच्या वेळी गिनतीसाठी रांगेत बसणे असे रुटीन होते ...काही गर्दुल्ले टाईम पास म्हणून किवा नशा म्हणून तेथील मनोरुग्णांच्या ..मानसिक आजारांच्या ...तसेच झोपेच्या गोळ्या मिळवून खात होते ..अर्थात त्याचा उपयोग झोप येण्याऐवजी होण्याऐवजी नशा म्हणूनच होत होता .. जर झोपेची गोळी खावून तुम्ही लवकर बेडवर जावून झोपलात तर झोप लागते ..पण जर गोळी खावून तुम्ही इकडे तिकडे फिरलात किवा गप्पा मारत बसलात तर झोप येत नाही व त्या गोळीची नशा जाणवते .. मेंटल पेशंट्स कडून त्यांच्या गोळ्या घेवून अशी नशा करणारे गर्दुल्ले रात्री सुमारे ४ वाजेपर्यंत जागत असत ... गेल्या आठवडाभरात तेथे कोणी नवीन गर्दुल्ला दाखल झालेला नव्हता जुन्या गर्दुल्ल्यांवर रात्रपाळीच्या अटेंडंटचा जरा विश्वास बसू लागला होता ..त्यामुळे रात्रीचे आम्हाला कोपऱ्यातल्या टी.व्ही .रूम मध्ये कोंडणे सुरु असले ..तरी अटेंडंट जागता पहारा ठेवत नव्हते ..तेथील गावठी कुत्री देखील रोज रोज पाहून ओळखीची झालेली होती आमच्या ..आता रात्रीचे लघवीला बाहेर पडताना कुत्री फक्त एकदा आमच्या कडे पाहून शेपटी हलवत असत व नंतर ..अटेंडट ने केलेल्या शेकोटीजवळ मुटकुळे करून सावधपणे पडून रहात ...
एकदा रात्री असेच आम्ही चारपाच जण झोप येत नव्हती म्हणून गप्पा मारत बसलो होतो तेव्हा... टर्कीचे.. माल प्यायल्याचे ..चोरीचे किस्से रंगवून सांगितले जात होते ..एकाने सांगितले की पालीची शेपटी देखील पन्नीवर टाकून तीला खालून पेटती काडी लावली की विरघळून त्याचे लिक्विड होते आणि त्याने नशा येते व टर्की देखील होत नाही ..तो हे इतका छातीठोक पणे सांगत होता की आमचा त्यावर विश्वास बसला .. पूर्वी पाल मारून तिच्या शरीरातून सुई दोरा घालून नंतर पालीच्या शरीरातील द्रवाने भिजलेले दोरा सुकवून काही जण गांजा बरोबर चीलिमीत टाकून ओढतात हे मी ऐकले होते ...नाशिकला कुंभमेळ्यासाठी आलेल्या अघोरी पंथाच्या साधूला असे करताना माझ्या एका मित्राने पाहिलेले मला सांगितले होते ..मात्र पालीची शेपूट अशी पन्नीवर टाकून ओढण्याबद्दल प्रथमच ऐकत होतो .. झाले सर्वांच्या मनात ते ऐकून खळबळ माजली ..सर्वच प्रयोगशील असल्याने तो विचार आम्ही उचलून धरला .. मग पाल कुठे मिळेल त्याबद्दल चर्चा झाली .. आनंदवार्डच्या चारही कोपऱ्यात संडास आणि बाथरूम्स होत्या ..एकाने रात्रीच्या वेळी तेथे पाली पाहिल्याचे सांगितले .. लगेच योजना बनली ..एकदम चार पाच जण असे उठून रुमच्या बाहेर पडलो असतो तर कुत्री भुकली असती म्हणून एकेकाने उठून बाथरूम कडे जायचे .. तो जावून पाच मिनिटे झाली की मग दुसऱ्याने उठून बाहेर पडायचे असे ठरले ....त्यानुसार एकेक करून आम्ही सावधपणे संडास बाथरूमच्या जागेत पोचलो .. तेथे भिंतीवर चाळीसचा बल्ब लावलेला होता ..त्याच्या आसपास काही कीटक घोंगावत होते आणि एक पाल त्यांना खाण्यासाठी दबा धरून बसलेली दिसली ...साधारण पणे ती पाल १२ फुट उंचीवर होती .. मारायची कशी ते समजेना .. मग एकाने त्याच्या पायातील स्लीपर काढून बरोबर नेम धरला ..तितक्यात पाल कीटक खायला पुढे सरकली त्याचा नेम हुकला ..चपाक असा आवाज करत स्लीपर भिंतीला लागून नेमकी खाली असलेल्या युरीनच्या नालीत पडली ...तो खूप वैतागला कशीतरी चिमटीत धरून त्याने ती चप्पल उचलून आतल्या नळावर धुतली ..आता पाल पुन्हा एका जागी थांबल्यासारखी वाटली ..मात्र कोणी चप्पल मारायला तयार होईना... कारण नंतर भिंतीवर आपटून चप्पल खालच्या मुतारीच्या नालीत पडते हे लक्षात आले होते ....शेवटी हो ...ना करत अजून ऐक जण तयार झाला ..आता अजून ऐक भीती मनात होती ....जर पालीला नेम बरोबर लागून पाल खाली नेमकी त्याच नालीत पडली तर कसे ? ..पालीचे एक वैशिष्ट्य असते की ती जीवावर बेतले की पळून जाण्यासाठी... शत्रूचे लक्ष विचलित करण्यासाठी तिच्या शेपटीचा साधारणतः दीड इंचाचा भाग स्वतःहूनच तोडून टाकते ... अगदी तसेच झाले ..त्याने चप्पल मारली ती पालीच्या अंगावर लागली तसे पाल शेपटी टाकून पुढे पळली ..आमचे तीने तोडून टाकलेल्या शेपटीकडे लक्षच नव्हते .. भिंतीवर ती पुढे पळताना लक्षात आले की अरे हिची शेपटी कुठे गेली ..मग मग खाली जमिनीवर सगळीकडे शोधाशोध सुरु झाली ..ती शेपटी नेमकी एकाच्या पायाखाली आलेली ..त्याचा चपलेचा पाय पडून चेंदामेंदा झालेली दिसली .. नशीब खालच्या नालीत पडली नव्हती ..नंतर ती शेपटी आम्ही उचलून एकेक करून पुन्हा टी.व्ही . रूम मध्ये जमलो .. पन्नी कोठून आणणार हा प्रश्न होताच ... मग एकाने सोबत आणलेला स्टीलचा चमचा पन्नी म्हणून वापरता येईल असे सुचविले ..अर्थात तो चमचा गरम करण्यासाठी जास्त काड्या जाळाव्या लागल्या ..ज पहिला दम मी मारणार म्हणून ज्याने चप्पल मारून शेपटी पाडली होती तो मागे लागला ...त्याने चमच्यात चेंदामेंदा झालेली शेपटी टाकली आणि खालून माचिसच्या एकदम तीनचार काड्या जाळून लावल्या .. कसचे काय .. ती शेपटी वितळायचे नाव घेईना .. करपट असा वास पसरला सगळीकडे ..तरीही त्याने नेटाने चमच्यातून हलकेच येणारा धूर पाईप ने तोंडात ओढला आणि त्याला प्रचंड ठसका लागला .. तो जोरजोरात खोकू लागला ..उलटीची उबळ आली तसा तो चमचा खाली टाकून ..उलटी करायला बाहेर पळाला.. नंतर मग आमची काही हिम्मत झाली नाही प्रयोग पुढे सुरु ठेवण्याची .. सगळे ज्याने ही आयडिया सांगितली होती त्याला शिव्या घालू लागले .
येथे जास्त काळ राहणाऱ्या सर्व पेशंट्स न बहुधा एकदातरी खरजेचा सामना करावा लागे .. म्हणजे हाताच्या बोटाच्या बेचक्यात ..व अंगावर आधी लाल पुरळ येई आणि मग तेथे खाज सुटे .. खाज इतकी तीव्र असे की मनाला कितीही आवरले तरी खाजविल्याशिवाय राहवत नसे ..आणि मग ते पुरळ फुटून त्याची लस इतर ठिकाणी लागून सर्व अंगभर खरुज वाढे ....पूर्वी ठाणे मेंटल हॉस्पिटल मध्ये ..दुसऱ्या वेळी दाखल असताना मला देखील हा खरजेचा प्रसाद मिळाला होता ..पण सर्व नर्सेसशी चांगली ओळख असल्याने लगेच त्यावर प्रभावी उपचार पण झाले होते .. येथे खरुज होऊ नये म्हणून काळजी घेण्याचा एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला .. आठवड्यातून एकदा सर्व पेशंट्सना ..म्हणजे १० ते १५ गर्दुल्ले आणि इतर मनोरुग्ण यांना मोकळ्या पटांगणात लाईनीत उभे केले जाई मग उग्र घाणेरड्या वासाच्या ...पिवळसर रंगाच्या द्रव पदार्थाची मोठी बाटली आणून सर्वाना कपडे काढायला लावत .. आणि प्रत्येकाच्या हातावर ते दुर्गंधीयुक्त चिकटसर् तेल थोडे थोडे दिले जाई . ते तेल सर्व अंगाला लावून चोळायचे ..पंधरा मिनिटांनी बाथरूम मध्ये जावून अंघोळ करायची ...माझ्या आनंद वार्डच्या वास्तव्यात एकदा मलाही या घाणेरड्या तेलाचा अनुभव घ्यावा लागला .शिवाय हे उपचार ऐच्छिक नव्हते तर सक्तीने सर्वानाच घ्यावे लागत असत .
=======================================================================
भाग १५३ वा ! मुक्तांगण ' मध्ये प्रवेश !
पंधरा दिवस होत आलेले असताना एका शुक्रवारी डॉ. अनिता अवचट मँडमनी माझी आणि इतर चार जणांची मुक्तांगण येथे बदली केली ..आमच्या पैकी एक गणेश नावाचा साताऱ्याचा मुलगा होता तो गेला महिनाभरापासून आनंद वार्ड मध्ये होता मात्र त्याची काही केल्या निवड होत नव्हती ' मुक्तांगण ' साठी याचे कारण नेमके काय असावे या बाबत तो संभ्रमात होता .. साताऱ्याला एका खासगी रुग्णालयात दाखल असताना त्याची एच .आय .व्ही ची तपासणी केली गेली होती व तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने बहुधा ती बातमी सगळीकडे पसरली होती म्हणून माझी निवड होत नाही असे त्याचे म्हणणे होते .....त्याने माझ्याजवळ मुक्तांगण मध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत असलेल्या असलेल्या प्रसाद या मित्रासाठी निरोप दिला की एकदा मला भेटायला आनंद वार्ड मध्ये ये ..गणेश ने आनंद वार्ड मध्ये मला खूप मदत केली होती म्हणून त्याची निवड झाली नाही याचे मलाही खूप वाईट वाटले .... जेवणे झाल्यावर दोन वाजता आमची पाच जणांची वरात घेवून अटेंडंट ' मुक्तांगण ' कडे निघाला सोबत जास्त समान नव्हतेच कोणाच्या... एक जोड कपडे .. आणि इतर किरकोळ ब्रश पेस्ट वगैरे .. आमच्या सर्वांच्या अंगावर मेंटल हॉस्पिटल चे कपडे होते ... आम्हाला मुक्तांगणच्या पोर्च मध्येच थांबवले गेले .. तेथे एका गोऱ्या ..उंच अशा व्यक्तीने फाईल वरची नावे वाचून आमचा ताबा घेतला ..हा मुक्तांगणचा कार्यकर्ता होता .. बोलताना तो जरा अडखळत असे .. त्याचे नाव रघु होते हे नंतर समजले ..त्याने सर्वाना तळमजल्यावर असलेल्या बाथरुमकडे नेले .. येथे सर्वानी आधी अंघोळ करायची आणि मगच वरच्या वार्डात जायचे असा दंडक होता रघुचा ..प्रत्येकाची पुन्हा बारकाईने झडती घेतली त्याने .. अंगावरचे सगळे कपडे काढून मग उठाबशा कढायला लावल्या ..हा प्रकार कशासाठी ते मला समजेना ..नंतर कळले की काही गर्दुल्ले जे गुदद्वाराच्य ठिकाणी माल किवा झोपेच्या गोळ्या .. वगैरे लपवून आणू शकतात ..अशा उठबश्या काढल्यावर त्यांनी लपवलेला माल सहज लक्षात येतो ..रघु अतिशय चतरा होता .. तो देखील पूर्वीचा गर्दुल्लाच होता ..त्यामुळे त्याला गर्दुल्ल्यांच्या सगळ्या युक्त्या ठावूक असणे स्वाभाविक होते ..सर्वांची साग्रसंगीत अंघोळ उरकल्यावर मग आम्हाला मुक्तांगण मधले कपडे देण्यात आले .. हे कपडे जरा स्वच्छ होते .. पांढरी ..लाल ..किवा हिरव्या रंगाची बंडी आणि पांढरा पायजमा ... त्या वेळी मुक्तांगण हे मेंटल हॉस्पिटलच्याच अखत्यारीत असल्याने कपडे देखील मेंटल हॉस्पिटलचेच होते ...आम्हाला सगळ्यांना वरच्या मजल्यावर नेण्यात आले ..मोठा साधारण २ हजार फुटांचा हॉल होता त्यात दाटीवाटीने पलंग लावलेले होते .. वार्ड मध्ये जेमतेम चार पाच जण दिसले ..बाकीचे सगळे खालच्या दुसऱ्या हॉल मध्ये योगाभ्यास करायला गेलेत असे समजले ....येथे काही भानगड करायची नाही ..नाहीतर परत आनंद वार्ड किवा उंच वार्ड मध्ये पाठवले जाईल अशी सर्वाना ताकीद देवून मग रघु खाली निघून गेला .. आम्ही सर्वानी लगेच विड्या काढून निवांत झुरके मारले . त्या वेळी ' मुक्तांगण ' मध्ये विडी तंबाखू साठी बंदी केलेली नव्हती याचे कारण असे की ब्राऊन शुगर ..दारू ..व इतर तत्सम व्यसने बंद करताना जो त्रास होई तो जरा हलका होण्यासाठी विडी किवा तंबाखूने मदत मिळे .. पेशंटची अवस्थता थोडी कमी होई ..आधी मुख्य शत्रू ज्याने पैसा ..तब्येत ..कुटुंब या सगळ्यांची वाट लावली त्याच्याशी लढायचे व नंतर बिडी.. तंबाखू सारख्या किरकोळ शत्रूचा बेत पहायचा असा सरळ विचार त्यामागे होता ...अर्थात बिडी तंबाखू देखील मर्यादित प्रमाणातच मिळत असे ..सध्या गेल्या पाच सहा वर्षांपासून ' मुक्तांगण ' मध्ये बिडी ..तंबाखू ..गुटखा वगैरे सगळ्या गोष्टीना बंदी आहे ..मुक्तांगण च्या स्थापने नंतर बिडी तंबाखू बंद करण्याच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी होण्यास सुमारे १५ ते २० वर्षे लागली ..याचे प्रमुख कारण असे की जरी संचालक मंडळ ठाम असले तरी... प्रत्यक्ष योजना राबविणारे सगळे कार्यकर्ते पूर्वाश्रमीचे व्यसनी होते ..पुनर्वसनाच्या प्रक्रियेत ते कार्यकर्ता म्हणून काम करत असत अश्या लोकांना बिडी तंबाखूचे व्यसन असे ..जो पर्यंत प्रत्येक कार्यकर्ता ते बंद करत नाही तो पर्यंत नियमाची काटेकोर अंमलबजावणी होणे शक्यच नव्हते .. !
योगाभ्यास संपल्यावर खाली योग करायला गेलेली सगळी मंडळी वर आली ...एकदम गोंधळ ..मस्ती चे वातावरण झाले ..त्या वेळी सुमारे ७० ते ८० जण मुक्तांगण मध्ये दाखल होते ..त्यापैकी ८० टक्के गर्दुल्ले होते तर बाकीचे दारूचे व्यसनी होते . गर्दुल्ल्यांची संख्या जास्त असल्याने वार्डात सतत मस्तीचे .. वातावरण असे ..कारण सारे गर्दुल्ले बहुधा तरुण होते ..दारू प्यायला सुरवात केल्यापासून ते व्यक्ती दारूचा व्यसनी बनून उपचारांची वेळ येईपर्यंत पाच सहा वर्षे सहज निघून जातात ..गांजा ..ब्राऊन शुगर ..झोपेच्या गोळ्या वगैरे अमली पदार्थांबाबत हाच व्यसनी होऊन उपचार घेण्याची वेळ येण्याचा कालावधी फार फार तर दोन दिन वर्षे इतका असतो ..या नशेत झपाट्याने नुकसान होते तसेच तरुण पिढीच त्या वेळी ब्राऊन शुगरच्या व्यसनात सापडली होती ...सर्व मग चहा घेण्यासाठी वरच्याच मजल्यावर असलेल्या डायनिंग हॉल मध्ये गेले .. वार्ड आणि डायनिंग हॉल च्या मध्ये कँरीडाँर होता त्याच्या दोन्ही बाजूला डॉक्टर ..आणि समुपदेशकांच्या केबिन होत्या .. आम्हाला प्रत्येकाला चहा घेण्यासाठी एक जर्मन सिल्व्हरचा दांडी असलेला मग ...आणि जेवणासाठी कप्पे असलेली स्टीलची थाळी देण्यात आली... काही जण माझ्यासारखे अगदी पहिल्यांदा येथे आलेले होते तर काही मात्र आतापर्यंत दोन तीन वेळा येवून गेले होते... मात्र पुन्हा व्यसन सुरु झाल्याने त्यांना पुन्हा यावे लागले होते .. जे जुने सराईत होते ते अगदी बिनधास्त असत तर आम्ही नवीन जरा बिचकूनच असू त ...संध्याकाळी सात वाजता वार्डातील बेल वाजली तसे सगळे प्रार्थनेसाठी जमा झाले ..मग अक्लोहोलीक्स अँनॉनिमस य संस्थेची प्रार्थना वाचली गेली ..प्रार्थना झाल्यावर सगळ्यांनी एकमेकांना गुड इव्हिनिंग केले .. रघु सतत सगळ्यांवर लक्ष ठेवून होता .. मी प्रसाद कोण आहे अशी चौकशी केली तेव्हा मला तो मागच्या अंगणात काहीतरी काम करतोय असे समजले .. मग सगळ्यांना ए .ए च्या मिटींग साठी एकत्र करण्यात आले .. तेव्हा प्रथम प्रसाद नावाचा प्राणी दिसला मला .. अंगात बनियान .. खाली जीन्स कापून त्याची बनविलेली शॉर्टस .. डोळ्यावर जाड भिंगांचा चष्मा .. पिळदार शरीर .. त्याचे दंड मस्त टणक दिसत होते तसेच छाती देखील रुंद व्ही शेप ची दिसली .. हा देखील गर्दुल्ला आहे यावर क्षणभर विश्वास बसला नाही माझा . अतिशय� उत्साही वाटला ...सगळे त्याला त्याच्या प्रसाद या नावाने हाक मारण्याऐवजी ' बंधू ' असे हाक मारत होते . पहिल्या भेटीत कुणावरही छाप पाडेल असे व्यक्तिमत्व होते त्याचे ...! मिटींग मध्ये बंधू ने स्वताची गर्दुल्ला अशी सर्वाना ओळख करून दिली ..आणि त्याचे गत जीवनातील अनुभव सर्वाना सांगितले ..दादरच्या एका मध्यमवर्गीय घरातील मुलगा .. आई शिक्षिका तर वडील खासगी कंपनीत ... एक लहान भाऊ आणि बंधू अशी दोन मुले..बंधूला जरा डोळ्यांची समस्या असल्याने जाड भिंगांचा चष्मा लागला ..तेव्हापासून त्याच्या मनात एक न्युनगंडाची भावना निर्माण होत गेली ..नंतर कॉलेजला गेल्यावर मराठी माध्यमातून शिक्षण झाल्यामुळे पुन्हा इंग्रजी चांगले येत नाही हा न्यूनगंड .. त्यातच मित्रांच्या संगतीने ब्राऊन शुगर चे व्यसन लागले ..वगैरे ...बंधू चे हिंदी आणि मराठी भाषेवर प्रभुत्व दिसले ...तो जेव्हा .. घरी कश्या चोऱ्या केल्या ..घरच्या लोकांना कसा त्रास झाला वगैरे सांगत होता तेव्हा जणू काही माझीच कथा सांगतोय मला असे वाटत होते .. २९ ऑगस्ट १९८६ मध्ये मुक्तांगण ची स्थापना झाल्याचे वर्तमानपत्रात वाचून तो येथे दाखल झाला होता ..गेल्या चार वर्षात दोन वेळा दाखल व्हावे लागले होते त्याला .. येथून बाहेर पडल्यावर काहीना काही भावनिक अथवा कौटुंबिक समस्येमुळे काही महिन्यातच त्याचे व्यसन परत सुरु होत होते . या वेळी मात्र मी पूर्णतः मनावर घेवून प्रामाणिकपणे व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणार आहे असे सांगून त्याने बोलणे संपवले . सर्वानी टाळ्या वाजविल्या ..मग आणखीन दोन जणांनी त्यांचे अनुभव सांगितले .. तासाभरात मिटींग संपल्यावर रात्रीच्या जेवणासाठी रांग लावली गेली ..जेवण ..चहा ..नाष्टा येथे मेंटल हॉस्पिटलच्याच किचन मधून येत असे .. नंतर सहा महिन्यांनी ' मुक्तांगण ' स्वतंत्र झाल्यावर मुक्तांगणचे वेगळे किचन सुरु झाले .
वार्डात माणसे जास्त आणि पलंग कमी अशी अवस्था असल्याने आम्ही नवीन लोकांची वार्डातच पलंगांच्या मधल्या जागेत सतरंजी टाकून झोपायची सोय केली गेली ... बंधू आणि इतर तीन जण जे तीनचार महिन्यांपासून येथे राहत होते व कार्यकर्ते म्हणून कामात मदत करीत होते ते देखील आमच्याच बाजूला सतरंजीवर झोपले .. रात्री मी बंधुजवळ आनंद्वार्ड मध्ये असणाऱ्या गणेश चा निरोप दिला व त्याला अजून ऐक महिना झाला तरी मँडमनी ' मुक्तांगण ' येथे का बदली करून घेतले नसावे ? अशी विचारणा केली तर त्याने दुसरे कारण सांगितले ..म्हणाला ' तो गेल्या चार महिन्यात लागोपाठ तीन वेळा दाखल झालाय त्यामुळे त्याला या वेळी मुद्दाम तंगवले जातेय ..कारण त्याला उपचार घेण्यातील गंभीरता अजून समजली नाहीय .. हे कारण मला पटले .. नाहीतर गणेश म्हणाला होता तसे केवळ तो HIV(+) आहे म्हणून त्याला घेत नसतील तर तो त्याच्यावर अन्याय होता होता असे वाटले .बंधूचा स्वभाव आणि एकंदर व्यक्तिमत्व सगळ्यांना आवडेल असेच होते .. माझी आणि त्याची लवकरच गट्टी जमली !
=======================================================================
भाग १५४ वा स्लीप ..रिलँप्स ..क्लीन ..सोबर ई .
रात्री खूप वेळ बंधू आणि मी गप्पा मारत होतो .. पहाटे साडेतीनच्या सुमारास जेमतेम डोळा लागत होता तितक्यात आमच्या बाजूला झोपलेले तीनचार कार्यकर्ते उठले..त्यांनी वार्डातील ऐक दोन तगड्या लोकांना उठवले ... ते सगळे गेट उघडून गेट च्या बाहेर पडले .. हा काय प्रकार आहे ते मला समजेना ..बंधू देखील सुमारे तासाभरात उठला ..आणि डायनिंग रुमच्या मोकळ्या जागेत व्यायाम करू लागला .. त पाहून मलाही उत्साह आला ..मी देखील सूर्यनमस्कार मारू लागलो ...बंधूला हे लोक इतक्या पहाटे कुठे गेले हे विचारले तर म्हणाला ते मेंटल हॉस्पिटलच्या किचन मध्ये गेलेत मदत करायला .. तेथे पहाटे जावून आपले मित्र किचनच्या मोठ्या भांड्यात बादलीने स्वैपाकाचे पाणी भरण्यास ..मोठी भट्टी पेटवण्यास वगैरे ..किचनच्या कर्मचार्यांना मदत करतात आणि मुख्य म्हणजे पहाटे मेंटल हॉस्पिटल साठी जी दुध घेवून येणारी गाडी येते त्या गाडीतून दुधाचे कँन उतरवण्यास मदत करतात तसेच त्या भरलेल्या दुधाच्या कँन नंतर भट्टीवर ठेवलेल्या मोठ्या भांड्यात रिकाम्या करून दुध तापवायला ठेवणे अशी कामे करतात .एव्हाना पहाटेचे साडेपाच वाजत आले होते ..बंधूने वार्डात जावून बेल वाजवली तसे सगळे उठले ..तोंड धुणे वगैरे आटोपून ..सगळ्यांना वरच्या गच्चीत जमा केले गेले .. तेथे बंधू ने सर्वांची शारीरिक कवायत घेतली .. पुण्याच्या थंडीत इतक्या पहाटे देखील बंधू फक्त बनियान घालून होता .. एकदम फुर्तीला .. सजग ..नंतर पुन्हा कालचीच प्रार्थना झाली ..तो पर्यंत किचन मध्ये मदतीला गेलेल्या कार्यकर्त्यांनी गरम गरम चहा आणला होता तो सगळ्यांना वाटला गेला .. गप्पा ..विनोद करत सर्वानी चहाचा आस्वाद घेतला .. मेंटल हॉस्पिटल मधून आलेला चहा असूनही हा चहा खूप चांगला घट्ट ..गोड चहापत्ती योग्य प्रमाणात घातलेला होता ..याचे कारण मुक्तांगण चे कार्यकर्ते जे पहाटे पहाटे जाऊन किचन मध्ये मदत करत होते त्या बदल्यात किचनचे लोक मुक्तांगणच्या मुलांसाठी वेगळा चांगला चहा बनवून पाठवत असत ..आमच्या मुलांच्या देखरेखीखालीच तो चहा तयार होई .. थंडीत असा चहा प्यायला मजा आली .
काल दुपारीच मुक्तांगणला आलो असलो तरी ...माझी बहुतेक लोकांशी तोंडओळख झाली .. गप्पाही सुरु झाल्या .. तेथे राहणाऱ्या जुन्या मुलांच्या बोलण्यात सारखे स्लीप ..रिलँप्स..क्लीन ..सोबर असे शब्द येत असत ..जेव्हा बंधू ला मी याचा अर्थ विचारला तेव्हा त्याने सांगितले हे सगळे शब्द तुला व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात वारंवार ऐकायला मिळतील बहुधा हे शब्द अल्कोहोलीक्स अँनॉनिमस या संघटनेच्या लोकांकडून आले असावेत ..स्लीप म्हणजे ..व्यसनमुक्तीचा निर्धार केल्यानंतर काही काही दिवसात ...काही महिन्यात किवा काही वर्षात जेव्हा तो निर्धार डळमळीत होऊन एखादा व्यसनी पुन्हा पितो तेव्हा त्याला स्लीप झाला असे म्हणतात .. जर असा स्लीप झालेला व्यक्ती मग तसाच पीत राहिला तर त्याला रिलँप्स झाला म्हणतात .. जर तो व्यक्ती व्यसनमुक्त रहात गेला तर तो क्लीन आहे असे म्हणतात व जर व्यसनमुक्ती सोबतच त्याचे विचार ..आचरण .. आणि जिवनाच्या इतर बाजूंमध्ये देखील तो सकारात्मक प्रगती करीत गेला तर त्याला सोबर असे म्हणतात ..म्हणजे स्लीप झाला तर घसरला ..घसरून तसाच पडून राहिला तर रिलँप्स ..व्यसनमुक्तीचा प्रवास नेटाने सुरु ठेवला तर क्लीन ..आणि व्यसनमुक्ती सोबतच साधे सरळ .. निस्वार्थी .. जवाबदारीचे ..स्वतच्या आणि इतरांच्या उपयुक्ततेचे जिवन सातत्याने जगू लागला तर सोबर ...बंधूला व्यसनमुक्ती बद्दल बरीच माहिती होती .. त्याच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या होत्या ... माझ्या आजवरच्या अनेक गुरुं मध्ये आता बंधूची पण भर पडली होती ...जे लोक येथे येवून जुने झालेले होते ..तसेच त्यांचे पालक त्यांना भेटायला येवून गेलेले होते त्यांच्या अंगावर घरचे ...पांढरा सदरा किवा कुर्ता आणि पांढराच पायजमा असे कपडे होते ...तर माझ्यासारखे जे बाहेरगावचे होते किवा ज्यांचे नातलग अजून भेटीस आले नव्हते त्यांच्या अंगावर मेंटल हॉस्पिटलचेच कपडे होते .. वार्ड मधील सत्तर लोकांना वेळच्या वेळी उठवणे ..सर्व थेरेपीज ना पाठवणे .. वगैरे कामांसाठी वार्डातील लोकांमधूनच ऐक माँनीटर निवडला जाई ...याचे सर्वानी ऐकावे असा दंडक होता .. माँनिटर ची निवड झालेला व्यक्ती हसतमुख ..सर्वांशी जुळवून घेणारा .. मदतीस तत्पर असा असावा लागे .. त्यावेळी सुनील नावाचा ऐक दारूचा व्यसनी असलेला साघारण तिशीचा मुलगा आमचा माँनीटर म्हणून निवडला गेला ..माझी त्याच्याशी देखील चांगली ओळख झाली .
सकाळी नाष्टा वगैरे झाल्यावर साडेनऊ वाजता सर्वाना खालच्या मजल्यावर असलेल्या हॉल मध्ये जमा केले गेले .. तेथे आता ' मुझिक थेरेपी ' होणार होती असे समजले .. आम्ही सगळे खाली मांडी घालून बसलो .. समोर पेटी ..तबला ..एक बासरी असे साहित्य ठेवलेले होते .. खादीचा झब्बा ..जीन्स घातलेली व्यक्ती बसलेली होती ..त्यांचे नाव श्रीरंग उमराणी आहे असे समजले .. त्यांनी आधी सर्वाना डोळे मिटायला सांगितले आणि मग बासरीचे मधुर सूर कानी पडू लागले .. मला संगीतातील राग ..वगैरे प्रकार कळत नाहीत कारण तसे शास्त्रीय शिक्षण घेतलेले नाही तरी देखील बासरीचे सूर इतके मधुर होते ..की नकळत मन त्या सुरांवर एकाग्र झाले .. आपण एखाद्या हिरव्यागार रानात आहोत .. आजूबाजूला पक्षी ..उडत आहेत ...समोर डोंगरातून एक झरा उडी घेवून बाजूने वाहतोय ... असे निसर्गचित्र मनःपटला वर उमटत होते .. खूप शांत वाटत होते ..साधारण पाच मिनिटांनंतर बासरी थांबली ... सगळ्यांनी डोळे उघडले ... प्रार्थना झाली ...सर् संगीताचे महत्व सांगू लागले ..संगीत हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे ..सांगितला भाषेचे ...देशाचे... धर्माचे ..जातीचे ..वर्णाचे बंधन नसते ..कारण संगीत ही निसर्गाची अनमोल देणगी आहे ... वेगवेगळ्या प्रकारचे संगीत आपली मनस्थिती प्रसन्न ठेवण्यास मदत करते .. आपल्या मनस्थितीत बदल करण्यास कारण बनू शकते वगैरे माहिती त्यांनी दिली ..ते अतिशय शांत स्वरात ..शुद्ध मराठीत बोलत होते .. नंतर त्यांनी समोर ठेवलेली हार्मोनियम जवळ घेवून वाजवायला सुरवात केली बंधू लगेच तबल्यावर जावून बसला .. म्हणजे बंधूला हे देखील येत होते तर .. मग आमच्या पैकी काही जणांनी समोर जावून गाणी म्हंटली .. बहुधा सगळे हिंदी सिनेमातील गाणी म्हणत होते .. उडत्या चालीची ..आणि आम्ही सगळे टाळ्या वाजवून साथ देत होतो .. एकदम आनंदी वातावरण झाले होते .. मलाही हुरूप आला ..मी देखील माझे आवडते गाणे म्हंटले ' या जन्मावर ..या जगण्यावर ..शतदा प्रेम करावे ' ..मस्त सूर लागला होता .. हिंदी भाषिक लोकांना गाणे समजले नाही मात्र सगळ्यांनी टाळ्या वाजविल्या .. उमराणी सरांनी माझे नाव विचारून मला शाबासकी दिली .. मग ' हीची चाल तुरुतुरु हे ' उडत्या चालीचे गाणे म्हंटले ..अजून धमाल आली ..हिंदीचा आग्रह झाला म्हणून ' सलामे इश्क मेरी जां ..जरा कुबूल करलो ' ही मुकद्दर का सिकंदर मधील कव्वाली म्हंटली .. ! सगळ्या वार्डात गायक म्हणून माझी ओळख प्रस्थापित झाली .
=======================================================================
भाग १५५ वा निवासी कार्यकर्ते ..देखभाल ..समुपदेशक !
' मुझिक थेरेपी ' संपल्यावर उमराणी सरांनी मला जरा वेळाने माझ्या केबिन मध्ये ये असा निरोप दिला .. सगळे वरती वार्डात आल्यावर मी वरच्या मजल्यावर असलेल्या कँरीडॉर मध्ये चक्कर मारली ..मुक्तांगण मध्ये समुपदेशक म्हणून काम करणाऱ्या लोकांचा खोल्या होत्या .. प्रत्येक खोलीवर संबंधित समुपदेशकाच्या नावाचा बोर्ड लावलेला दिसला ... वार्डला लागून श्रीमती बेलसरे सिस्टरची औषधवाटपाची खोली ..श्रीरंग उमराणी ...मेघना मराठे ..वैशाली फणसळकर .. भास्कर मोरे ..प्रकाश पितळे .. राजाराम जोशी .. सुभाष साळुंके .. प्रकाश खैरे ..कांचन गोलरकेरी ..अशी तेथे काम करणाऱ्या समुपदेशकांची नावे होती दोन्ही मजल्यावर या समुपदेशकांच्या खोल्या विभागलेल्या ..या पैकी दोन जण पूर्वी व्यसनाधीन असलेले व आता व्यसनमुक्तीच्या कार्यात स्वेच्छेने सहभागी झालेले होते तर बाकीचे ...समाजकार्य महाविद्यालयातून रीतसर समुपदेशनाचे प्रशिक्षण घेतलेले ... मानसशास्त्राचा आभ्यास केलेले ..आणि समाजसेवेच्या निस्वार्थी प्रेरणेने अत्यंत कमी मानधनावर काम करणारे होते ...खाली पोर्च च्या आत प्रवेश केल्या बरोबर चौकशीचा काउंटर ..त्याच्या समोर हिशोबनीस श्री दिलीप पोरवाल यांची खोली .. वरच्या मजल्यावर डायनिंग रुमच्या बाजूची पहिली खोलीवर संचालिका डॉ . अनिता अवचट यांच्या नावाची पाटी होती .. एका १००० फुटाच्या हॉलच्या वर ग्रंथालय चा बोर्ड लावलेला .. वा म्हणजे इथे लायब्ररी पण होती तर ..मी ग्रंथालयात डोकावलो तेथे आठदहा कपाटे दिसली ...पुस्तके छान रचून ठेवली होती ...तीन चार टेबल लावलेले होते त्या भोवती खुर्च्या मांडलेल्या ..एकंदरीत सगळीकडे कमालीची स्वच्छता आढळली ...
खालच्याच मजल्यावर मेंटल हॉस्पिटल मधून रिटायर झालेले भोसले नावाचे अटेंडंट आता मुक्तांगण मध्ये देखरेख करण्याचे काम करत होते ..काही गर्दुल्ले माझ्यासारखे जे बाहेर खूप नुकसान सोसून मनापासून व्यसनमुक्ती करिता येथे दाखल होत असत ते पळून जाण्याचा प्रयत्न करत नसत ..मात्र नुकतेच व्यसनात सापडलेले ..ज्यांना अजून व्यसनाचे फारसे दुष्परिणाम भोगावे लागले नाहीत ..किवा नुकसान होऊनही ज्यांना अजूनही व्यसनाचे तीव्र आकर्षण थोपविता येत नाही अशा लोकांना मुक्तांगण मधून पळून जाणे आनंद वार्डच्या तुलनेत सोपे होते ..त्यांच्यावर नीट देखरेख करण्याचे काम हे अनुभवी भोसले मामा करत असत .. दुसरा ऐक गट निवासी कार्यकर्त्यांचा होता ..ज्यात रघु ..प्रसाद .. विजय ..शेखर ..अँग्नेलो ..सुभाष असे पाच सहा जण होते .. हे सगळे पूर्वीचे गर्दुल्ले मात्र आता मुक्तांगण मध्येच उपचार घेवून जास्त दिवस येथे राहून काही जवाबदा-या पार पाडत होते ...प्रत्येक जण अतिशय हुशार ..चतुर .. गमत्या .. आणि माझ्यासारखाच ' छपरी ' देखील होता . छपरी म्हणजे स्वतचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी अत्यंत गोड बोलणारा ..मखलाशी करण्यात पटाईत ..प्रत्येकात काहीतरी आकर्षक गुण आणि तितकाच घातक दोषही ..निवासी कार्यकर्त्यांमध्ये ऐक जण सतत कानाला वाँकमन लावून गाणी ऐकत काम करताना दिसे ..त्याचे नाव अनिल .. कर्नाटकचा राहणारा ..मोठ्या उद्योगपतीचा मुलगा .. याची आई परदेशी होती आईचा लालगोरा रंग असलेला ..सोनेरी कुरळे केस .. सगळे शिक्षण इंग्रजीतून झाल्याने मराठी न समजणारा ..हिंदी थोडे थोडे ..मात्र इंग्रजीवर प्रभुत्व .. हा देखील गर्दुल्ला होता .. मुक्तांगण सुरु आल्यापासून तीनचार वेळा मुक्तांगण ला दाखल झालेला .. संडास सफाई ..बाथरूम सफाई याची विशेष आवड व नैपुण्य असणारा ..येथे काही दिवस राहून बाहेर गेला की परत व्यसन सुरु करणारा .. हा बाहेर असताना डेबोनॉर ..फँन्टसी ..अश्या इंग्रजी मासिकांमध्ये लेखन देखील करत असे .. .
विजय हा दक्षिण भारतीय ..चांगला शिकलेला .. मात्र संगती मुळे बिघडलेला .. व्यसनाधीनतेच्या काळात गुन्हेगारी कडे वळलेला .. अनेकदा जेल मध्ये राहून आलेला . ..मात्र मुक्तांगण मध्ये असला की सर्वांशी नम्रतेने वागणारा .. सर्व जवाबदारी घेणारा ..मात्र स्वताचे वेगळेपण टिकवण्याचा आग्रह धरणारा ..सतत सर्व अधिकार स्वतःकडे ठेवण्याचा अट्टाहास असणारा .. नेतृत्व गुण असलेला...इतरांवर जरब ठेवणारा .. प्रसाद हा ..ढोलकी ..तबला ..पेटी ..बासरी ..गिटार अशी सर्व वाद्ये थोड्याफार प्रमाणात हाताळू शकणारा .. बोलायला अत्यंत गोड .. सेवेस मदतीस तत्पर .. खूप भावनाप्रधान .. आनंदी .. सतत काही ना काही कामात मग्न असणारा .. खूप कमी विश्रांती घेणारा ..वाचनाची प्रचंड आवड असलेला इतका की अगदी जेवताना सुद्धा याच्या हातात अनेकदा एखादे पुस्तक असे .. व्यायामाची आवड ..चांगले लयबध्द नृत्य करणारा .. एकदोन पेटंट गाणी म्हणणारा .. जे जे नवीन असेल ते शिकण्याची अत्यंत आवड बाळगणारा .. मात्र एकदा सटकली की प्रचंड आरडा ओरडा करणारा .. डोळे मोठे करून खावू की गिळू नजरेने पाहणारा .. राग शांत झाला की पुन्हा काही दिवस अधिक नम्रतेने जिव्हाळ्याने वागणारा ..ज्याच्यावर रागावला त्याची जाहीर माफी मागणारा ..शेखर हा ..अतिशय बुद्धिमान ..उत्कृष्ट स्मरणशक्ती असलेला .. चार दोन उडत्या चालीची गाणी शिकून घेतलेला .. इकडचे तिकडे करण्यात पटाईत.. याची स्मरणशक्ती इतकी कुशाग्र होती की याला स्वतःचीच काय इतर अनेकांची जन्मतारीख ..मुक्तांगण मध्ये दाखल होण्याची तारीख असे बरेच तपशील आठवत असत .. सिनेमातील गाणी त्यांचे नायक नायिका सगळे स्मरणात राहत असे याच्या ..एखादी गोष्ट कोणाला आठवत नसली तर हमखास शेखर ला विचारले जाई ..अँग्नेलो हा खूप लहान वयात म्हणजे वयाच्या १३ व्या वर्षीपासून संगतीने बिघडलेला .. आमच्या सगळ्यात तरुण .. विनोदी .. गमत्या ..तितकाच कष्टाळू .. इलेक्ट्रिक . रंगकाम .. व इतर गरजेच्या तांत्रिक कामात तरबेज ..
हे सगळे निवासी कार्यकर्ते म्हणजे खरेतर मुक्तांगणची शान होते .. मँडमप्रती मुक्तांगणप्रती निष्ठा ठेवणारे ... मात्र मुक्तांगण बाहेर पडल्यावर फार काळ व्यसनमुक्ती टिकवता न येणारे ..रीलँप्स झाले की पुन्हा पराभूत होऊन ..आशेने मुक्तांगणला येणारे .हे सगळे निवासी कार्यकर्ते मुक्तांगणची स्वच्छता .. संडास बाथरूम धुणे .. वार्डमध्ये राहणाऱ्या पेशंट्सना आवश्यक ती मदत करणे समुपदेशकांना त्यांच्या कामात मदत करणे.. आठवड्यातून दोनदा सायंकाळी ए. ए. च्या मिटींग्ज घेणे ..वार्डातील शिस्त टिकवण्यास हातभार लावणे .. वार्डातील वातावरण आनंदी ठेवणे मुक्तांगणच्या वस्तूंची देखभाल करणे .मेंटल हॉस्पिटलच्या किचन मधून वेळच्या वेळी चहा ..नाष्टा ..जेवण आणणे ..अशी अनेक प्रकारची कामे करत असत .. किचनमध्ये पहाटे हे जेव्हा वार्डातील एकदोन तगडे पेशंट मदतीला जात तेव्हा एक गडबड हमखास करत असत .. दुधाच्या कँन्स गाडीतून उतरवून घेवून त्या मोठ्या पातेल्यात ओतण्याच्या वेळी मुक्तांगण मधून चहा आणण्यासाठी नेलेल्या पातेल्याखेरीज एक वेगळे मोठे पातेले नेले जाई त्यात कोणचे लक्ष नाही असे पाहून एक कँन हळूच अंधारात सोबत नेलेल्या पातेल्यात ओतून जवळ जवळ रोज सुमारे २० ते तीस लिटर दुध हमखास चोरून आणत असत .. मग ते दुध वार्डात आजारी असलेल्या पेशंट्स ना . अधून मधून तलफ आली की हवे तेव्हा चहा बनविण्यासाठी ..तब्येत लवकर सुधारावी म्हणून पिण्यासाठी वापरले जाई ..मँडम ना मात्र हे दुध आम्ही किचन मधून कूकच्या परवानगीने आणतो असे सांगून त्यांनी मँडमचे समाधान केले होते .. म्हणतात ना चोर चोरी से जाये हेराफेरी से नाही असे होत असावे कदाचित ..एक गोष्ट मात्र नमूद करणे भाग आहे ..अत्यंत गुणी मुले दारू ..ब्राऊन शुगर ..व इतर मादक पदार्थांच्या आहारी जाऊन त्यांच्या जीवनाचे वाटोळे झालेले होते व अश्या सगळ्या वाया गेलेल्या ..कुचकामी ठरलेल्या .. निराश ..हताश .. मुलांना आणि त्यांच्या पालकांना डॉ . अनिल अवचट आणि डॉ . अनिता अवचट या दांपत्याच्या रुपाने ...नवीन जीवनाचा सूर्योदय ..आशेचा झरा ..मायेची फुंकर ... दिलासा लाभला होता .
( बाकी पुढील भागात )
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें