धावती भेट ..ऑब्सेशन ! ( भाग १६१ वा )
दुपारी
जेवणे झाल्यावर सर्वांचा निरोप घेवून मी एक दिवसासाठी घरी जायला निघालो ..
मुक्तांगणच्या बाहेर पडताच ..एकदम सगळी बंधने निघून गेल्यासारखी वाटली ..
मुक्तांगण मध्ये असताना सतत कोणी न कोणी तरी आपल्याला पहात आहे ..आपले
परीक्षण करीत आहे .. आपल्या चुकांवर लक्ष ठेवून आहे याची जाणीव होती ..
बाहेर तसे नव्हते .. रस्त्यावरचे लोक ओळखीचे नव्हते .. कोणाला माझ्यावर
लक्ष ठेवायला वेळही नव्हता ..जो वर मी काही वेगळे वर्तन करणार नाही तोवर
कोणीही माझी दखल घेतली नसती ..ही अशी अती स्वातंत्र्याची भावना माझ्या
सारख्या व्यसनी करिता घातक असते .. अशा वेळी मनात व्यसनाचे विचार येवू
शकतात .. आणि या विचारांना जर थारा दिला गेला तर ते विचार .. थोडीशी
घ्यायला काय हरकत आहे ..कोणाला समजणार सुद्धा नाही ..अशा भावनेत रुपांतरीत
व्हायला वेळ लागत नाही ..या प्रकाराला ' ऑब्सेशन ' असे म्हणतात हे मला
मुक्तांगण मध्येच समजले ..म्हणजे व्यसनमुक्तीच्या काळात ... व्यसन
केल्यावरच्या त्या मस्त धुंदीची आठवण येणे .. थोडी घेण्यास काय हरकत आहे
असे विचार वारंवार मनात येणे .. आता आपल्याला व्यसनमुक्ती साठी आवश्यक अशा
सगळ्या गोष्टी माहीतच आहेत ..तेव्हा एकदा घेतल्याने काही फरक पडणार नाहीय
..वगैरे विचार मनात येवून व्यसनमुक्तीचा निश्चय डळमळीत होऊ शकतो .. हे
विचार जर लगेच झटकून टाकले नाहीत ..तर हमखास गडबड होणार असते ...माझ्या
मनात तो विचार आला होता पण मी लगेच झटकून टाकला ...मनाला दुसरीकडे वळवले
..अनघा ..नाशिक ..अकोला व्यसनामुळे झालेले नुकसान यावरच सारे विचार
केंद्रित केले आणि सुरक्षित झालो .. शिवाजीनगर बस स्टँड वर आलो आणि बस
मध्ये बसलो ..मला वार्ड च्या खात्यातून ७० रुपये दिले गेले होते ..बसमध्ये
प्रधान्याने अनघाचा विचार मनात होता ..तिला शेवटचे पाहून सव्वा वर्ष उलटून
गेले होते ..या कालावधीत तिच्या बद्दल काहीच माहिती समजली नव्हती ..तिनेही
मला संपर्क करण्याचा प्रयत्न केला नव्ह्ता ..हे जरा विचित्र वाटत होते
..काहीतरी अघटीत तर झाले नसावे ही शंका मनात येत होती .. बहुधा तीने
पळून जावून लग्न करू असा प्रस्ताव ठेवल्यावर मी माघार घेतली म्हणून तीला
राग तर आला नसावा माझा ? हा विचार व्यथित करीत होता .. त्यावेळी परिस्थितीच
अशी होती की तसे पळून जावून लग्न करण्यासारखी परिस्थिती नव्हती माझी ..
तेव्हढी आर्थिक कुवत नव्हती .. ताकदही नव्हती ..धैर्य नव्हते ..व्यसन सुरु
असल्याने तेव्हा शरीर मनाने देखील कमकुवत झालो होतो मी ... तिच्या म्हणण्या
नुसार वागणे वेडेपणा ठरला असता ... असे माझे विचार ..तर अनघा कदाचित
आयत्या वेळी मी माघार घेतली .. ज्याच्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी
केली होती त्यानेच कच खाल्ली म्हणून निराश झाली असावी .. निमुटपणे
कुटुंबियांच्या म्हणण्याला होकार देवून तीने माझे नाव तिच्या हृदयातून
कायमचे पुसून टाकले असेल तर ? ..या विचाराने माझा थरकाप झाला .. पुन्हा
मनावर निराशेचे मळभ दाटून आले .. एकदा फक्त एकदा तरी तीला भेटले पाहिजे असे
तीव्रतेने वाटू लागले .. आशा निराशेच्या खेळ मनात सुरु राहिला नाशिकपर्यंत
.. !
घरी पोचलो वहिनींनी दार उघडले .. त्यांना मला असे अचानक
पाहून नवल वाटले ... सुहास घरातच होता ..एकदम कसा काय आलास ? उपचार पूर्ण
झाले का ? वगैरे प्रश्न विचारू लागला ..त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची
चिंता वाढल्याचे जाणवत होते .. आई काही दिवस नांदेडला मामा कडे गेलीय असे
समजले .. भावाला परवा परत जाणार आहे असे सांगितल्यावर त्याचे समाधान झाले
.. जेवण करून भावाशी गप्पा मारत बसलो .. त्याला ' मुक्तांगण ' मधील गमती
जमती सांगितल्या .. एकदोन वेळा अनघाबद्दल याला विचारावे असे वाटले पण तो
काहीच सांगणार नाही याही खात्री होती ..उगाच तिचा विषय पुन्हा आमच्या
विसंवादाचे कारण बनला असता ..आई घरी नव्हती हे खूप वाईट झाले होते
..अनघाच्या बाबतीत माहिती साठी माझी सगळी भिस्त आईवर होती .. तीला कदाचित
सगळे सविस्तर माहित असावे .. दुसऱ्या दिवशी सकाळी नाशिकरोडला मित्रांकडे
जावे अशी इच्छा होत होती ..पण घरा बाहेर पडलोच नाही .. आईचे कपाट शोधून
अनघाचे एखादे जुने पत्र दिसतेय का ते पहिले .. पण हाती काहीच लागले नाही ..
सायंकाळी मेरी मध्येच एक चक्कर मारली .. कंटाळा आल्यासारखे झाले होते ..
कसातरी दिवस रेटला होता ..रात्र कठीण गेली ..अनेक शंका कुशंका .. जर तरची
वावटळ मनात येत होती ...रफी लता चे एक जुने गाणे मनात घोळत होते .. .. '
याद में तेरी जाग जाग कें हम ..रातभर करवटे बदलते है ..हरघडी दिलमे तेरी
उल्फत कें धीमे धीमे चिराग जलते है .. त्यातील एक कडवे आहे ' क्या कहे
तुझसे क्यू हुई दुरी ..हम समझते है अपनी मजबुरी ..जिंदगी कें उदास राहो में
..तेरी यादो कें साथ चलते है ...' अशा अवस्थेत ही दर्दभरी गाणी मनात तुंबळ
युद्ध माजवतात .. घायाळ व्हायला होते .. !
शेवटी मनावर दगड ठेवून
पुन्हा मुक्तांगणला जायला निघालो ..भावाला हायसे झाल्यासारखे वाटले असावे
.. बहुतेक आता कायमचे ' मुक्तांगण ' ला राहीन असे त्याला सांगितले
...बसमध्ये पुन्हा मनाचे वेगवेगळे रंग अनुभवत होतो .. एकदाचा सुरक्षित असा
मुक्तांगण ला पोचलो .. सर्व मित्रांना खूप आनंद झाला ..सायंकाळी
प्रार्थनेच्या वेळी मी सुरक्षित आल्याबद्दल सर्वानी माझे अभिनंदन केले . ती
रात्र पुन्हा झोपेविना तळमळत गेली ..आपण घेतलेला निर्णय चूक की बरोबर हे
ठरवता येत नव्हते .. आत्मविश्वास डळमळीत झाल्यासारखा वाटला .. दुसऱ्या
दिवशी मँडमना भेटलो .. त्यांना देखील मी जावून परत आल्याचे समाधान वाटले ..
त्यांनी आता तुला येथे अधिक जवाबदारीने राहावे लागेल याची कल्पना दिली
..माझ्या येथे राहण्याचा खर्च म्हणून भावाने दर महिना तीनशे रुपये
मुक्तांगणला भरण्याचे ठरले होते .. तो तीनशे रुपयांचा चेक सोबत आणला होता
..मँडम कडे तो दि ला .. चेक घेताना मँडम म्हणाल्या हे पैसे मुकांगणला कमाई
व्हावी म्हणून घेतले जात नाहीत तर ..तुला त्याची किंमत राहावी म्हणून घेतले
जातात ..आयते ..फुकट ..असे काही मिळाले तर त्याची किंमत रहात नाही असा
माणसाचा स्वभाव असतो .. आजपर्यंत तुला आईवडिलांचे प्रेम .. त्यांनी
दिलेल्या सुख सुविधा ..वगैरे गोष्टींची किंमत नव्हती कारण तुला हे सगळे
आयते ..आपोआप मिळालेले होते ..आता या पुढे मिळालेल्या संधीचा ..प्रेमाचा ..
सुविधांचा गैरवापर न करता राहिलास तर नक्कीच फायदा होईल .. पाहता पाहता
सगळे बदलेल ..! मँडम च्या बोलण्याने जरा धीर आला !
================================================================
कार्यकर्ता प्रशिक्षण ! ( भाग १६२ वा .)
कार्यकर्ता प्रशिक्षण ! ( भाग १६२ वा .)
नाशिकहून
मुक्तांगणला परत आल्यावर ..आता मी मुक्तांगण येथे फक्त उपचार घेणारा पेशंट
नव्हतो तर त्यासोबतच मुक्तांगणच्या निवासी कार्यकर्ता देखील झालो होतो ..
म्हणजे येथे राहत असताना थेरेपी मध्ये सहभाग घ्यायचाच होता अधिक
मुक्तांगणच्या कामात देखील सहभागी व्हायचे होते ..माझ्यावर हळू हळू काही
जवाबदा-या टाकण्यात येणार होत्या .. निवासी कार्यकर्त्यांची सर्वात पहिली
आणि मोठी जवाबदारी असे ती संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्याची ... जरी
स्वैपाकाची मोठी भांडी घासण्यासाठी वार्डच्या लोकांची दोन दोन जणांची पाळी
असे ..तरी संपूर्ण इमारतीत झाडू मारणे ..झाडू मारून झाल्यावर सगळीकडे
फिनेलच्या पाण्याने पोछा मारणे ...समुपदेशकांच्या खोल्या झाडून स्वच्छ
ठेवणे .. इमारतीत असलेले संडास..बाथरूम स्वच्छ करणे .. बागकाम करणे ..
इमारतीच्या मागील मेंटल हॉस्पिटलच्या आवारातील परिसरात खड्डे करून वेळो
वेळी झाडे लावणे .. ड्रेनेज लाईन स्वच्छ ठेवणे .. मुक्तांगण मध्ये होणाऱ्या
कार्यक्रमांची तयारी करणे ..अशी अनेक किरकोळ आणि अनेक महत्वाची देखील कामे
निवासी कार्यकर्ते करत असत .. मँडम ने जेव्हा बंधू ला बोलावून त्याला
तुषार देखील आजपासून तुमच्या सोबत कम करणार आहे असे सांगितले तेव्हा त्याला
खूप आनंद झालेला दिसला .. बाहेर आल्यावर मला मिठी मारून म्हणाला ' बरे
झाले तू अजून काही महिने येथे थांबतो आहेस ते ..एका महिन्यात खरे तर काहीच
शिकायला मिळत नाही .. ' बंधू चे म्हणणे अगदी खरे होते .. इतक्या वर्षांचे
व्यसन .. विचारांचे बिघडलेपण .. भावनिक असंतुलन केवळ ३५ दिवस किवा एका
महिन्यात निघून जाणे कठीणच असते ..त्या दिवशी संध्याकाळीच प्रार्थनेच्या
वेळी बंधूने वार्डात सर्वाना सांगितले की आता निवासी कार्यकर्त्याच्या
आमच्या टीम मध्ये तुषार देखील सामील झाला आहे ..सर्वानी टाळ्या वाजवून
पाठींबा दिला . माझी नेमणूक रोज सगळा वार्ड झाडण्यासाठी करण्यात आली
..अर्थात इतरही कामात मी सहभागी असणारच होतो .. !
एकदा रात्री जेवणे
झाल्यावर बंधू माझ्याकडे आला .. म्हणाला ' अरे यार वार्डचे बाथरूम चोक
झालेय ते स्वच्छ करायला हवेय आपल्याला रातोरात .. नाहीतर उद्या सकाळी वांधे
होतील सगळ्यांचे ..' मी देखील उत्साहाने चल आपण साफ करूयात म्हणून निघालो
.. वार्ड च्या समोर मोठा पँसेज ओलांडला की टी.व्ही .रूम व डायनिंग रूमचा
मोठा वार्ड इतकाच हॉल होता ..त्याच्या कडेला चार संडास ..दोन बाथरूम ..आणि
त्याच्या समोर लघवी करण्यासाठी वेगळी जागा होती .. त्या वेळी मुक्तांगण
मध्ये तंबाखू विडीची बंदी नव्हती... फक्त सगळे लक्ष दारू ..आणि इतर मादक
पदार्थांवर केंद्रित होते .. विडी ओढणा-याला दिवसाला सुमारे १० विड्या मिळत
असत व तंबाखू खाणाऱ्याला दिवसाला तंबाखूची फक्त एक पुडी मिळे..अनेकदा विडी
ओढून झाल्यावर .. थोटूक कचऱ्याच्या बादलीत टाकून द्यावे असा दंडक असला तरी
..येथे राहणारे सगळे मुळातच नियम तोडण्याच्या वृत्तीचे असल्याने बहुतेक जण
विडीची थोटके लघवी करण्याच्या सिरँमिक च्या भांड्यात किवा खालच्या लघवी
वाहून नेणाऱ्या नालीत टाकून देत असत ....शिवाय नीट पाणी टाकत नसत
..त्यामुळे ती नाली तुंबली होती ..लघवीचे पाणी नीट ड्रेनेज च्या पाईप
पर्यंत जात नव्हते ..नालीतून ते बाहेर बाथरूम मध्ये पसरत होते ..
खराटा..फिनेल .. तुंबलेली जागेत घालण्यासाठी एक काठी असे साहित्य घेवून
आम्ही तेथे पोचलो ..रात्री चे ११ वाजून गेले होते ..वार्ड मधील सगळे मेंबर
झोपले होते .. बाथरूम मध्ये शिरताच तुंबलेल्या पाण्याचा दर्प नाकात शिरला
.. बंधू .मी ..आणि शेखर असे तिघे होतो .. बंधूने नालीच्या तोंडाशी असलेल्या
गोलाकार छिद्रात काठी घालण्याचा प्रयत्न केला पण काठी पुढे जाईना ..
म्हणजे तोंडाशीच चोकअप असावे .. मग बंधू ने त्या लघवीच्या पाण्यात सरळ हात
घातला ..ते पाहुन मला कसेतरीच झाले ... बंधू त्या घाणेरड्या पाण्यात
बिंधास्त् हात घालून हाताने चाचपडत अंदाजे काय अडकले आहे ते पाहण्याचा
प्रयत्न करत होता ..मग त्याने हात बाहेर काढला तेव्हा त्याच्या हातात
विडीची थोटके आली ..ती त्याने बाहेर फेकली ..तितक्यात शेखर म्हणाला ' बंधू
नये पंटर को सिखावो ये ' ..बंधू हसला ..' अरे यार पहेलाही दिन है उसका
...जमणार नाही त्याला ' ..पण शेखर मागेच लागला माझ्या .. मी आढेवेढे घेत
नालीजवळ बसून त्या पाण्यात हात घातला ..तसा आणखीन जास्त उग्र दर्प माझ्या
नाकात शिरला .. एकदम उलटी होईलसे झाले ..मी पटकन उठून उभा राहिलो .. बंधू
आणि शेखर हसु..लागले ते पाहुन मला शरमल्या सारखे झाले ..मनात आले आपली ही
जणू परीक्षाच आहे ..निर्धाराने पुन्हा खाली बसलो आणि पाण्यात हात घालून आत
चाचपडू लागलो ..हात जरा खोल घातला .अगदी कोपरापर्यंत .. माझ्या हाताला
देखील बुळबुळीत झालेली बिडीची थोटके ..प्लास्टिकची पिशवी वगैरे लागले ..मी
ते बाहेर काढले .. श्वास कोंडून धरला होता इतका वेळ .. तो कचरा बाहेर काढून
पुन्हा ..हात घातला .. पुन्हा कचरा काढत गेलो आणि काय आश्चर्य हळू हळू
तुंबलेले पाणी ओसरू लागले ..नालीतील सर्व पाणी ड्रेनेज मध्ये वाहून गेले ..
बंधू ने माझ्या पाठीवर थाप मारून शाबासकी दिली .. मग आम्ही पाणी आणि फिनेल
टाकून सर्व नाली स्वच्छ केली .. तासाभराने समाधानाने सगळे झोपायला निघालो
..मला उगाच हाताला अजून ते घाण पाणी लागलेय ..त्याचा वास येतोय असे वाटत
राहिले ..बंधूने समजाविले अरे हे सगळे मानसिक असते ..लहानपणापासून मनावर ते
घाण असे संस्कार झाले आहेत आपल्यावर म्हणून आपल्याला तसे वाटते व किळस
येते .. लाखो सफाई कामगार रोज हेच काम करत असतात याचा तू कधी विचार केला
आहेस काय ? ..बंधूचे बरोबर होते .. हजारो वर्षांपासून अश्या प्रकारची कामे
करणारे लोक आहेत .. घाण सगळे करतात मात्र ती साफ करण्याची जवाबदारी विशिष्ट
लोकांनाच का द्यायची ? पुढे मी संडास बाथरूम चे चोकअप काढणे .. तुंबलेले
गटार साफ करणे .. ड्रेनेज लाईन साफ करणे .. वगैरे कामात तरबेज झालो ..!
दुसरे
अजून एक घाण वाटणारे काम म्हणजे उरलेले खरकटे अन्न टाकण्याचा जो मोठा
प्लास्टिकचा ट ब होता ... तो टब भरला की मेंटल हॉस्पिटलचा स्वीपर येवून
त्या टबातील खरकटे अन्न त्याच्या डुकरासाठी घेवून जाई ..चार पाच दिवसांचे
खरकटे साठल्याने ते अन्न अक्षरशः सडलेले असे .. त्या टबात वर फेस आलेला असे
..अश्यावेळी आम्हाला तो टब उचलून बाहेर स्वीपर आला की त्याला नेवून द्यावा
लागे ..आणि तो मोठा तब असल्याने उचलायला दोन जण लागत .. त्या टबातील ते
फेस आलेले ..दुर्गंधीयुक्त अन्न आम्ही हाताच्या ओंजळीने काढून स्वीपर च्या
बादलीत टाकत असू .. एकदा तो फेस पाहून बंधू म्हणाला मस्त फर्मेंनटेशन झालेय
.. हातभट्टी ची दारू तयार करताना असाच फेस येतो ..सडका गुळ आणि नवसागर
घातलेले मिश्रण फसफसून वर आल्यावर मग भट्टी लावतात ..त्याचेच पाणी आपण दारू
म्हणून आनंदाने पितो .. मग या कामाला काय लाजायचे !
================================================================
वार्डमधील धमाल ! ( भाग १६३ वा )
माझी
रोज सकाळी वार्ड मध्ये झाडू मारण्याची ड्युटी लागली होती .. आणि दिवसभर
इतर लहानमोठ्या कामात सहभागी होत होतो .. सकाळी ७ ला प्रार्थना व चहा झाला
की मी झाडू घेवून वार्ड मध्ये शिरत असे .. मँडमनी आमच्या निवासी
कार्यकर्त्यांच्या टीम ला कौतुकाने ' मेंटेनन्स टीम ' असे नाव दिले होते
..तसेच त्यांनी आम्हाला कंपनीत कामगार घालतात तशी कॉटनच्या जाड निळ्या
रंगाच्या कापडाच्या पँन्ट ..त्याच रंगाचे शर्ट्स देखील शिवून घेतले होते
..मी वार्डात झाडू मारायला जाई तेव्हा बंधू ने वार्ड मधील टेपरेकॉर्डरवर वर
छान हिंदी मराठी भजने लावलेली असत .. त्यात स्व.भीमसेन जोशी आणि लता
मंगेशकर यांची हिंदी भजनांची एक कँसेट मी पहिल्यांदाच ऐकली होती ..अतिशय
सुंदर ..मधुर ..गाणी होती .. त्यातील ' बाजे रे मुरलिया बाजे ' हे भजन तर
एकदम मस्तच या भजनांच्या तालावर मी पटापट एकेक पलंग सरकवून.. त्याखालील
कचरा काढून झाडू मारत असे ..साधारण २००० फुटांचा वार्ड झाडायला मला कमीत
कमी अर्धा तास तरी लागे .. व्यसनी माणसाचे सगळ्यात प्रमुख लक्षण म्हणजे तो
अतिशय चाणाक्ष किवा आमच्या भाषेत ' चतरा ' असतो ..असे वेगवेगळ्या गावचे ७०
ते ८० चतरे..चलाख ..थोडक्यात सांगायचे तर ..' बारा गावची दारू प्यायलेले '
लोक एकत्र राहत असले की गमती जमती होणारच .. मस्करी ...एकमेकांच्या खोड्या
काढणे .. किरकोळ भांडणे हे चालतच होते .. दिवसभरात जेमतेम पाच तास थेरेपीज
होत असत मग उरलेला वेळ फार थोडे लोक वाचन .. किवा इतर चांगल्या गोष्टी
मध्ये व्यतीत करत .. बाकीचे टिवल्या बावल्या करण्यातच वेळ घालवत ..सर्व जण
बहुधा २५ ते ३५ या वयोगटात मोडणारे होते .. काही दारुडे मात्र चाळीशी उलटून
गेलेले देखील होते ..त्यापैकी एक मेजर होता सैन्यातला .. स्वतःला जरा
शहाणा समजत असे हा मेजर तसेच दारू चांगली आणि ब्राऊन शुगर वाईट ...असा फरक
करून ..गर्दुल्ले म्हणजे समाजाला कलंक असे नेहमी म्हणत असे ..त्याचा
आम्हाला गर्दुल्ल्यांना खूप राग येई .. शिवाय तो स्वतःला जरा वेगळा
..सैनिकी शिस्तीतील मानत असल्याने चिडला की ' गोळ्या घालीन एकेकाला ' असे
म्हणायचा ..त्याची एक सैन्यातील सवय होती ती अशी की ..सैन्यात सकाळी घाई
घाई ने परेडला ड्रेसअप करून जावे लागत असल्याने अनेक जण म्हणे सकाळी चहा
निवांतपणे पिण्यात वेळ घालवत नाहीत तर ते चहाचा मग घेवून संडासात जातात ..
म्हणजे वेळेचे नियोजन नीट होते .. तो इथे देखील सकाळी चहा मिळाला की चहाचा
त्यावेळी मुक्तांगणला असलेला जर्मलचा मग घेवून संडासात जाई .. त्याला अनेक
वेळा आता तू सैन्यात नाहीस .. इथे असे करू नकोस असे सांगूनही तो ऐकत नसे
..एकदा रात्री तो झोपला असताना आम्ही त्याच्या मगला छोट्याच्या खिळ्याने
लहानसे पटकन दिसणार नाही असे छिद्र पाडले.. झाले प्रार्थना झाल्यावर तो
घाईने मग मध्ये चहा भरून घेवून संडासात गेला ..दोनच मिनिटात ' एकेकाला
गोळ्या घालीन ' असे ओरडत बाहेर आला ..आम्ही सगळे गंभीर चेहरे करून ' काय
झाले मेजर साहेब ? असे संभावित पणे विचारू लागलो ..तर अजून चिडला म्हणाला '
मै सब जानता हू ..ये बहोत बडी साजिश है ..वगैरे ' अर्धा तास तो बडबडत होता
..मुख्य म्हणजे त्याला तक्रार करायला मँडम कडे देखील जाता येत नव्हते कारण
.. तो संडासात चहाचा मग घेवून जातो हे मँडमना देखील समजले असते .
रघु
हा तेथील एकंदरीत निरीक्षण .. सर्वाना वेळच्या वेळी थेरेपीजना पाठवणे ..
आनंद्वार्ड मधून येणाऱ्या लोकांची झडती घेणे वगैरे कामात तरबेज होता ..एकदा
वार्ड मधील एकाच्या घरून आलेला तिळाच्या लाडूंचा डबा रात्री कोणीतरी फस्त
केला .. सकाळी सकाळी तो बिचारा बोंबाबोंब करू लागला ..त्याला आवडतात म्हणून
खास त्याच्या आईने २० तिळाचे लाडू पाठवले होते त्याच्यासाठी .. आता चोर
कोण हे ओळखणे कठीणच होते कारण रात्रीच डबा फस्त केलेला .. कोणीही कबुल
करीना ... आमच्या निवासी कार्यकर्त्यांच्या टीम साठी ही चोरी शोधून काढणे
आव्हान होते मोठे .. काही उपाय सुचेना . एकदोन जणांवर संशय होता ..पण
पुरावा नव्हता .. शेवटी रघु ने आयडिया केली ..तो संडासात जावून उभा राहिला
....संडासात जाणाऱ्या.. येणाऱ्या लोकांवर त्याची बारीक नजर होती .. त्याने
आपले काम झाल्यावर कोणीही पाणी टाकू नये असे सर्वाना बजावले होते
..प्रत्येक जण बाहेर आला की रघु ..तो आतील ' ऐवज ' एकदा नजरेखालून घालून मग
त्यावर पाणी टाकत गेला .. तासाभरात रघूने दोन चोर शोधून काढले .. आम्हाला
रघूने हे नक्की कसे ओळखले ते कळले नाही ..मग रघूने फुशारक्या मारत सांगितले
..' तील का दाना.. .कभी पेट में पुरा हजम नाही होता ... वो अख्खा बाहर
निकलता है ..मैने सबको चेक करके बराबर ढूंढ लिया ' .. आम्ही रघूच्या
चतुरपणाची दाद दिली .. एक सांगली कडचा प्राथमिक शाळेतील शिक्षक .. दारूचे
व्यसन सोडायला तेथे दाखल होता .. हा दिवसभर अवस्थ असे .. त्याच्या मनातील
दारूची ओढ काही पूर्ण गेलेली नव्हती ..बाहेर असताना व्यसन करण्याची इच्छा
होणे स्वाभाविक असते ..मात्र हा मास्तरला ' मुक्तांगण ' मध्ये सुद्धा
दारूची तीव्रतेने आठवण येई ..नाह्मी तो गप्पा मारताना दारूची कशी मस्त नशा
असते ... कश्या पार्ट्या केल्या ..कशी मजा केली हेच बोलत असे .. एकदा
गुरुवारी त्याच्या घरचे लोक भेटायला असताना सर्वांच्या नकळत त्याने घरच्या
लोकांकडून काहीतरी खोटे नाटे कारण सांगून पन्नास रुपयांची नोट घेतली .. खरे
तर उपचार घेणाऱ्या पेशंटना अजिबात पैसे देवू नका असे पालकांना सांगितले
जायचे ..काही पालक आमच्या सूचना पाळत नसत .त्यापैकीच याचे पालक होते ..
याने पठ्याने ... रोज सायंकाळी जेव्हा सर्व पेशंट्सन ऐक तास ' फेरफटका '
मारण्यासाठी बाहेर सोडले जाई तेव्हा .. इमारती बाहेरच्या रस्त्यावर फिरताना
जाणाऱ्या येणाऱ्या ऐक दोन मेंटल हॉस्पिटल च्या अटेंडंटशी ओळख करून घेतली
होती ..
' फेरफटका ' म्हणजे मुक्तांगण च्या इमारती बाहेर मेंटल
हॉस्पिटलचा जो रस्ता होता त्यावर इमारतीच्या समोरच सर्व पेशंट शतपावली
केल्यासारखे इकडून तिकडे ..परत तिकडून इकडे असे फिरत असत ..काही लोक..लोक
इमारती समोरच्या हिरवळीवर बसून गप्पा मारत .. आम्ही निवासी कर्मचारी
त्यांच्यावर लक्ष ठेवत असू ... एका टोकाला मेंटल हॉस्पिटलला स्वयंपाकाचा
पुरवठा करणारी गँस ची मोठी टाकी लावलेली होती ..या टाकीवर सुरक्षारक्षक
म्हणून मेंटल हॉस्पिटलच्या दोन अटेंडंटची ड्युटी असे .. त्यापैकी एकाला या
मास्तरने पटवले आहे आणि त्याच्या जवळ दारूची क्वार्टर आणायला पैसे दिले
आहेत अशी खबर आम्हाला मिळाली ...तसे आमच्याकडे दाखल असलेल्या पेशंट्सना
आम्ही शक्यतो मेंटल हॉस्पिटलच्या कर्मचारी वर्गाशी बोलू देत नव्हतो ..पण
याने जाता येता..केव्हा तरी आमच्या नकळत अटेंडंटशी संधान बांधले होते ..
आम्हाला आज तो कर्मचारी मास्तरला दारूची क्वार्टर आणून देणार आहे असे समजले
होते ... आम्ही त्याला बाटली खिश्यात असताना रेडहँन्ड पकडायचे ठरवले
...त्यानुसार फेरफटका मारताना आम्ही मुद्दाम त्याच्याकडे लक्ष नाही असे
दाखवले ..तो आणि त्याचा एक जोडीदार ..फिरत फिरत त्या अटेंडंट जवळ गेले हे
आम्ही पहिले ..त्या अटेंडंट ने हळूच याच्या हातात काहीतरी दिले ते देखील
पहिले ..आता हा उलटा वळून आपल्या बाजूला येईल तेव्हा त्याला पकडून त्याची
झडती घ्यायची असा आमचा प्लान होता ..तो जसा समोरून आमच्या जवळ आला तसे बंधू
ने त्याला थांबवले ....जरा तुमची झडती घ्यायची आहे असे म्हणाला .. तोच तो
मास्तर इतक्या अनेपेक्षितपणे जोरात वार्ड कडे पळाला की आम्ही भानावर
येईपर्यंत तो वार्डचा जीना चढून वर पोचला होता ..आम्ही सगळ्यांनी त्याच्या
मागे धाव ठोकली .. वेगाने पळत तो वार्डच्या संडासात पोचला आतून दार लावले
.. ' मुक्तांगण ' चे संडास मुद्दाम वरून उघडे ठेवलेले होते ..कारण आत
असताना कोणाला चक्कर आली ..फिट आली तर ..वरून आंत शिरून त्याला मदत करता
येत येई ..बंधू पटकन वर चढला आणि तो शिरलेल्या संडासात उतरला ..पण तो
पर्यंत मास्तर ने पटकन बाटलीचे बुच उघडून ..बाटली तोंडाला लावली होती
..आतील दारू तशीच कच्चीच घटाघट रिचवली त्याने ... मग आत उतरलेल्या बंधूच्या
हातात रिकामी बाटली दिली .. इतक्या लोकांच्या डोळ्या देखत हे सारे घडले
..आम्ही ठरवूनही त्याला अडवू शकलो नव्हतो ... बंधूने त्याच्या आधी ऐक
थोबाडीत दिली ..पण आता रागावून काही उपयोग नव्हता ..मास्तर ने त्याचा' डाव '
साधला होता .. या प्रसंगावरून व्यसनाधीनता हा आजार किती खतरनाक आहे हे
समजायला आम्हाला मदत मिळाली .
================================================================
खतरनाक आजार ! ( भाग १६४ वा .)
निवासी
कार्यकर्ता म्हणून सर्व जवाबदा-या पर पाडत असताना आम्ही सर्व थेरेपीज
देखील कराव्यात असा मँडमचा आग्रह असे ..कारण एकदा आपल्याला सर्व येतेय असा
भाव आमच्या मनात येवून आमचा उपचारांमधील सहभाग कमी झाला असता तर त्या मुळे
नुकसान आमचेच होणार होते . फक्त मुक्तांगण मध्ये राहून व्यसनमुक्ती साध्य
होणार नव्हती तर आपण ज्या ' व्यसनाधीनता ' या गंभीर अशा मनो-शारीरिक आजारात
अडकलो आहोत ...तो आजार कसा भयानक आहे हे समजून घेवून ..समुपदेशकाच्या
सूचनांचे योग्य पालन केले नाही तर पुन्हा पुन्हा स्लीप ..रीलँप्स ..आणि
पर्यायाने पुन्हा प्रचंड नुकसान ..उपचार असे करावे लागेल हे आम्ही
प्रामाणिक पणे समजून घ्यावे अशी मँडमची इच्छा असे .. अनेकांना व्यसनमुक्ती
केंद्र म्हणजे एखादा व्यसनमुक्तीचा कारखाना आहे असे वाटे .. म्हणजे पेशंट
अँडमीट केला की त्याने ३५ दिवस राहून एकदम व्यसनमुक्त होऊनच बाहेर पडावे ही
पालकांची अपेक्षा .. तर प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या व्यक्तीला देखील काही
दिवसात आपण सुधारल्यासारखे वाटून तो लवकर घरी जाण्याचा आग्रह धरे ..
स्वतःचे अनेक वर्षांचे वैचारिक ..भावनिक बिघडलेपण ध्यानात घेतले नाही
....मान्य केले नाही ..त्यात सुधारणा केली नाही तर सुधारणेची फसवी भावना
...पुन्हा त्याच गर्तेत घेवून जाई .. .स्वतच्या व्यसनमुक्तीच्या इच्छेला
प्रामाणिक पणाचे पाठबळ नसेल तर वारंवार व्यसन सुरु होते असे येथे सांगितले
जाई .. मुक्तांगण मध्ये दाखल झाले की शरीरातील व्यसनांचा प्रभाव तर
साधारणपणे एका आठवड्यात निघून जाई ..मनातील व्यसनाचे सुप्त आकर्षण काढायला
प्रामाणिक प्रयत्न गरजेचे असत ...आपले व्यसन आता सुटले असे म्हणून बेसावध
राहून चालत नाही .. कोणत्याही मनाविरुद्ध घडलेल्या घटनेमुळे ..एखाद्या
भावनिक अस्थिरतेमुळे .. राग .. खुन्नस .. निराशा ..वैफल्य अशा भावनांमुळे
मन विचलित होऊन किवा जुने व्यसनी मित्र भेटल्यामुळे ....मनात पुन्हा एकदा
तरी व्यसन केल्यानंतरची धुंदीची .. तणावमुक्तीची .. काही काळ मिळणाऱ्या
धैर्याची ..सर्वश्रेष्ठ असल्याचा आभास निर्माण करणारी अवस्था हवीहवीशी वाटू
लागल्यामुळे ... जर योग्य मदत घेतली नाही तर ..तर .. पुन्हा ' ये रे
माझ्या मागल्या ' आहेच .
मुक्तांगण मध्ये असे अनेक जण होते जे केवळ
उपचारात केवळ शरीराने सहभागी असत मात्र मनापासून हा सहभाग नसे .. अशा
लोकांना बाहेर गेल्यानंतर काही दिवसातच पुन्हा उपचार घेण्यासाठी यावे लागे
.व्यसनाधीनतेच्या मुळाशी असलेल्या विचारांचा ..भावनांचा जो पर्यंत
प्रामाणिक पणे शोध घेवून ..ते विचार ..भावना काढून टाकण्याची प्रक्रिया
पूर्ण होत नाही तोपर्यंत व्यसन .. नुकसान .. उपचार हे चक्र सुरु राहते
..म्हणून जास्तीत जास्त काळ व्यसनमुक्ती केंद्रात किवा उपचारात्मक
वातावरणात राहणे .. डिस्चार्ज झाल्यावर पाठपुरावा करणे .. वेळोवेळी
समुपदेशकाची मदत घेणे अपरिहार्य असते ..निवासी कार्यकर्ता म्हणून जास्त
दिवस राहिल्यानंतर मी जेव्हा वारंवार समूह उपचार ..समुपदेशन यांना समोर
जावू लागलो तेव्हाच या आजाराची गंभीरता मला समजत गेली .. निवासी
कार्यकर्त्यांमध्ये जो अनिल नावाचा कर्नाटकच्या मोठ्या उद्योगपतीचा मुलगा
होता तो ..सतत कानाला वॉकमन लावून गाणी ऐकत असे .. कामात अतिशय हुशार
..विशेषतः त्याला साफसफाई च्या कामाची खूप आवड होती .. तो म्हणे गेल्या पाच
वर्षात तीनचार वेळा मुक्तांगण मध्ये उपचारांसाठी दाखल झाला होता .. या
वेळी जास्तीत जास्त दिवस राहिला तर सुधारेल या आशेने कुटुंबियांनी याला
जास्त काळ मुक्तांगण मध्ये ठेवले होते .. तो देखील लवकर घरी जाण्याचा आग्रह
करत नसे . मात्र अशा जास्त काळ राहणाऱ्या मुलांना.. घरी काही कार्यक्रम
असेल तेव्हा .. किवा जरा चेंज म्हणून मँडम काही दिवस घरी जावून पुन्हा
येण्याची परवानगी देत . फक्त एक अट असायची.. ती अशी की घरी गेल्यावर व्यसन
करायचे नाही ..चार दिवस सर्व नातलगांसोबत आनंदाने घालवून पुन्हा
मुक्तांगणला यायचे ..उपचार सुरूच ठेवायचे . तर हा अनिल एकदा बरेच दिवस झाले
घरी गेलो नाही म्हणून चार दिवस सुटी घेवून कर्नाटकात त्याच्या घरी गेला
होता .. आमचे सर्व निवासी कार्यकर्त्यांचे सततच्या सहवासाने एकमेकांशी
जिवाभावाचे संबंध जुळत .. आमच्यापैकी जो कोणी काही दिवस सुटीवर घरी जाई तो
परत येताना आमच्या चारपाच जणांसाठी घरून काही खाण्याचे पदार्थ वगैरे आणत
असे ..अनिल तर श्रीमंत असल्याने घरून परत येताना निवासी कार्यकर्ता
बांधवांसाठी ..येताना खूप खावू आणतो असे मी ऐकून होतो .. त्यात विविध
प्रकारचे फळांचे जँम ..सरबत .. जलजीरा च्या पुड्या वगैरे असे तसेच नवीन
गाण्यांच्या ध्वनिफिती असतच ...नवीन कपडे असत .. हा अनिल एकदा घरी गेला
असताना.. तो आपल्यासाठी काय काय आणेल या कल्पनेत आम्ही होतो .. एकदाचा चार
दिवसांनी सायंकाळी पाच वाजता सर्व वरिष्ठ कार्यकर्ते घरी गेल्यावर अनिल
ऑटोतून मोठ्या दोन बँगा भरून घेवून आला .. बाहेर ऑटोची चाहूल लागताच आम्ही
पटकन बाहेर गेलो पाहतो तर अनिल ऑटोत बसलेला ... त्याच्या हाताला मोठे
प्लास्टर लावलेले होते ..बापरे हे काय झाले म्हणत.. आम्ही सर्वानी त्याच्या
बँगा उतरविल्या .. त्याला आधार देवून सावकाश खाली उतरवायला मदत केली ..
म्हणाला ' यार जरा बाईक स्लीप होकार गिरा तो ये हात फ्रँक्चर हो गया
..आम्ही सर्वानी हळहळ व्यक्त करीत त्याला आधार देवून आत आणले ...मग म्हणाला
' सबके लिये देखो क्या क्या लाया हू ...' तसे आम्ही पटापट त्याच्या बँगा
उघडल्या .. रघु देखील त्याची झडती घेण्यासाठी हजर होताच ... रघूने आधी
त्याचे खिसे तपासले .. मग बँगा बारकाईने तपासल्या .. त्यात नेहमीप्रमाणेच
फळांचे जँम .. गाण्यांच्या नव्या कँसेट्स .. नवे कपडे वगैरे होते .. लगेच
जलजीराची तीन पाकिटे फोडून आम्ही चार पाच जणांनी जलजीरा प्यायले .. त्याला
कपडे बदलण्यास मदत केली .. साधारणतः अर्ध्या तासाने तो संडासला जातो म्हणून
खालच्या मजल्यावर पालक आणि स्टाफ करिता असलेल्या संडासात गेला ..हा संडास
बहुधा कार्यकर्ते आणि पालक वापरात असल्याने वरून उघडा नव्हता ... बराच वेळ
झाला तरी अनिल बाहेर येईना ...रघु ला संशय आलाच .. रघूने एकदोन वेळा दार
ठोठावून त्याला आवाज दिला तर ' रुको यार जरा ..अभी तो बैठा हू ' असे उत्तर
मिळाले आतून .. मग रघु इमारतीच्या बाहेर जावून संडासच्या मागच्या बाजूला
जावून उभा राहिला ..
याने सोबत नक्कीच ब्राऊन शुगर लपवून आणली असावी
असा रघूचा कयास होता .. आमचे लक्ष मात्र त्याने आणलेल्या खाण्याच्या
वस्तूंमध्ये गुंतलेले असल्याने तो विचार आमच्या मनातही शिरला नव्हता .. उलट
आम्ही रघु उगाच संशय घेतो म्हणून लागलो ..शेवटी अनिल अर्ध्या तासाने
संडासच्या बाहेर पडला ..तोच बाहेर मागच्या बाजूला संडासच्या खिडकीशी चाहूल
घेणारा रघु आत आला ..रघूच्या हातात ब्राऊन शुगर ओढून वापरलेली पन्नी होती
.. म्हणाला ' अनिल आपने अभी ये पन्नी संडासकें खिडकीसे बाहर फेका था ..
साथमे कितना माल लाया सच सच बता दो ' अनिल चिडला रघुवर ' साले तू कितनी बार
झडती लेगा ? एक बर झडती दिया है ना मैने .. फालतू शक् लेता है .. ये पन्नी
मैने नही फेका .. तू झुठ बोल रहा है ' म्हणत रघुशी वाद घालू लागला ..शेवटी
बंधूने अनिलला पुन्हा झडती दे असे सांगितले .. रघु ने पुन्हा खिसे तपासले
तर काहीच मिळाले नाही .. रघु जरा विचारात पडला .. मग सरळ त्याने अनिलने
हाताला लावलेल्या प्लास्टर कडे नजर टाकली म्हणाला ये भी दिखावो खोलकर ..
आम्ही पण आग्रह केला तेव्हा अनिलच्या हाताचे प्लास्टर फाडण्यात आले ..त्यात
नायट्रावेट च्या गोळ्यांच्या चार स्ट्रिप्स ... ब्राऊन शुगर च्या दहा
पुड्या .. कोऱ्या पन्नया असा एवज निघाला .. आता अनिल निरुत्तर झाला होता
..अपघात वगैरे काही झाला नव्हता त्याचा .. त्याने सरळ सरळ आमची फसवणूक केली
होती .. बिंग फुटल्यावर अनिल एकदम रघुवर चिडला त्याला मारायला धावला रघु
पटकन पळाला... आम्ही अनिलला धरले .. शांत केले .. आता पुन्हा तुला उपचार
घ्यावे लागतील असे सांगून बंधू ने मँडमला फोन लावून सगळी हकीगत सांगितली
..मँडमने अनिलला आता मुक्तांगण मध्ये न ठेवता ..पुन्हा आनंदवार्ड मध्ये
दाखल करा अश्या सूचना दिल्या ...अनिल आनंदवार्ड ला जायला तयार होईना .. कसे
तरी त्याची समजूत घालून आम्ही त्याला सायंकाळी आठ वाजता आनंदवार्ड मध्ये
पोचवून आलो .
================================================================
अनिलचे साहस ! ( भाग १६५ वा )
अनिलला
मँडम च्या सूचनेनुसार बंधू आणि विजय यांनी केवळ अंगावरच्या कपड्यानिशी
आनंद वार्ड मध्ये सोडले होते .. त्याचे सगळे किमती सामान मुक्तांगण मध्येच
होते ज्यात नवीन कँसेट्स ..एक कँमेरा ..खाण्याच्या वस्तूंचे सीलबंद डबे
वगैरे ! आम्हाला मनापासून अनिल बद्दल वाईट देखील वाटत होते .. कारण तो
सगळ्यांशी चांगला वागत असे ..त्याच्या बाबतीत असे कसे घडले ? याची चर्चा
करत असताना एक लक्षात आले की अनिलला जरी व्यसनमुक्त होण्याची इच्छा होती
..तरीही चार दिवस सुटीवर घरी गेला असताना .... आपण आता मुक्तांगणलाच राहतोय
..व्यसनमुक्त होणारच आहोत ..मग जरा सुटीवर घरी एखादे वेळा व्यसन केले तर
काय हरकत आहे असा विचार त्याचा मनात येवून त्याने एकदा व्यसन केले ..नंतर
त्याला थांबता आले नाही ..घरी चारही दिवस त्याने व्यसन केले असावे मग मग
मुक्तांगणला परत येताना.. आता आपल्याला टर्की होईल ही भीती वाटली असावी
..या भीतीने त्याने सोबत देखील माल आणला होता .. व्यसनमुक्तीची इच्छा
त्याचबरोबर एकदा ..थोडेसे ..अशी व्यसनाची तीव्र ओढ ही दुहेरी मानसिकता
बहुधा प्रत्येक व्यसनीच्या बाबतीत निर्माण होत असावी ..अशा वेळी निग्रह
नसेल तर पुन्हा व्यसन सुरु होते ..हा चकवा ओळखून योग्य वेळी मनाला आवरणे
कठीणच असते ! रात्री बराच वेळ पर्यंत काहीबाही चर्चा करत आम्ही जागे होतो
.. साधारणपणे १ वा . आम्ही सगळे निवासी कर्मचारी वार्डच्या बाजूलाच
असलेल्या लायब्ररीत झोपलो .
अचानक बाहेर मोठ्याने आरडा ओरडा एकूण
आम्हाला जाग आली ..सगळे पटकन उघून बाहेर आलो तर ..वार्डच्या दारात तीन चार
पेशंट भेदरून उभे होते .. आम्हाला पाहून त्यांना धीर आला .. ते खुणेनेच
आम्हाला गच्चीकडे जाणाऱ्या जिन्याकडे बोट दाखवून काहीतरी सांगण्याचा
प्रयत्न करत होते..आम्ही त्या जिन्याजवळ गेलो आणि स्तब्धच झालो .. जिन्यात
टोकाला अनिल फक्त एका निकर वर उभा होता .. गोरापान ..मात्र आता पांढराफटक
दिसत होता .. त्याचे कुरळे केस विस्कटलेले होते ... एखाद्या भुतासारखा तो
उभा होता ..डोळे लाललाल झालेले .. थोडासा बधीर देखील वाटत होता ..बंधूने
धाडसाने पुढे होऊन त्याचा हात धरला आणि त्याला जिन्यातून खाली आणले .. याला
आपण संध्याकाळी आनंद वार्ड मध्ये सोडून आलो होतो ..हा पुन्हा इथे
मुक्तांगण मध्ये कसा ? आणि या अशा अवतारात ? सगळे बुचकळ्यात पाडले होते ..
तर वार्डच्या पेशंटना अनिल बाबत फारशी माहिती नसल्याने ते सगळे घाबरलेले ..
एखादे भूत पहिल्यासारखा त्यांचा चेहरा झाला होता .. मुक्तांगण मध्ये एक
वर्षापूर्वी एक ब्राऊन शुगरचा व्यसनी टर्कीत असताना अपघाताने जिन्यातून
खाली डोक्यावर पाडून मरण पावला होता .. त्याचे भूत येथे अधून मधून फिरते
अशी आख्यायिका सर्वानी ऐकली होती .. ते भूत म्हणे एका काळ्या बोक्याच्या
रुपात फिरत असते ..असे सांगितले जाई ..एकदोन वेळा रात्री मलाही तो ठार काळा
बोका दिसला होता .. त्याचे लालबुंद डोळे अंधारात चमकत असत ..मी देखील
त्यावेळी जरा टरकलो होतो ..नंतर बंधूने सांगितले होते की .अरे तो बोका
मेंटल मेंटल हॉस्पिटलमधल्या किचनच्या कर्मचाऱ्यांनी पाळलेला आहे .. दिवसभर
तो तेथे किचन मध्ये सुस्त पडून असतो आणि रात्री बाहेर फिरतो .. मुक्तांगण
मध्ये आलेले नवीन पेशंट रात्री बेरात्री झोप येत नाही म्हणून उगाच
वार्डच्या बाहेर फिरतात... त्यांनी तसे रात्री बेरात्री वार्डच्या बाहेर
पडून इमारतीत फिरू नये म्हणून निवासी कर्मचाऱ्यांपैकीच कोणीतरी ही काळ्या
बोक्याची बातमी पसरविली आहे .
अनिलला आम्ही धरून लायब्ररीत आणले
..मग सगळा उलगडा झाला याने सोबत कालच सोबत आणलेल्या नायट्रव्हेट च्या
गोळ्यांपैकी काही गोळ्या खाल्ल्या होत्या ..शिवाय संडासात ब्राऊन शुगर
ओढ्लीच होती ..त्याला आम्ही आनंदवार्ड मध्ये पोचविले तेव्हा तो नशेतच होता
..रात्री केव्हातरी नशेतच तो उठून आनंद्वार्ड च्या भिंतीवरून उडी मरून
पळाला होता .. पळून सरळ बाहेर न जाता मुक्तांगण मध्ये ठेवलेल्या त्याच्या
वस्तू घेण्यासाठी तो मुक्तांगणच्या इमारतीच्या मागील ड्रेनेज च्या पाईपला
धरून वर गच्चीवर गेला होता ..गच्ची वरून खाली येणारे जाळीचे दार तोडून तो
मुक्तांगणच्या आत प्रवेशला होता ..ड्रेनेजचा पाईप चढताना दोन वेळा तो
खालच्या घाणीत पडला .. त्याचे कपडे खराब झाले होते म्हणून कपडे काढून तो
फक्त निकर वर होता ..गच्चीवरून जीना उतरून खाली येत असताना .. वार्डचा एक
नवीन पेशंट सुधीर झोप येत नाही म्हणून कँरीडाँर मध्ये फिरत असताना ..त्याला
हा जिन्यातून खाली येणारा अनिल दिसला ..पांढराफटक पडलेला ..अंगावर फक्त
निकर ..विस्कटलेले केस ..लालभडक डोळे ..झाले सुधीरची फाटली ..भूत ..भूत
..असे बोंबलत सुधीर वार्डमध्ये पळाला.. वार्डचे सगळे लोक उठले ..त्यांच्या
आवाजाने आम्हाला जाग आली . आम्ही कशीतरी वार्डच्या लोकांची समजूत घालून
त्यांना परत झोपायला पाठविले .. सुधीर काही बोलण्याच्या बोलण्याच्या..
.ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हताच .. अनिल ला अंगावर कपडे घालून पुन्हा पहाटे
चार वाजता आनंद वार्ड मध्ये सोडण्यात आले ..तेथून त्याची रवानगी ' उंच '
वार्डे मध्ये करण्यात आली .
.. !
( मुक्तांगण ..आणि इतर
व्यसनमुक्ती केंद्रांच्या बऱ्याच अँडमिशन नंतर आज अनिल खूप चांगला राहतो
आहे ..त्याच्या पत्नी व ऐका गोड मुलीसोबत आनंदाने संसार करतो आहे ..असे मला
परवाच पुण्याच्या एका मित्राकडून समजले ..खरोखर खूप आनंद झाला हे ऐकून
..कारण अनिल आणि आम्ही दोनचार जण म्हणजे इतरांच्या दृष्टीने गाँन केस होतो )
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें