प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.comरविवार, 17 मार्च 2013

मनोरूग्णालयाचे अंतरंग


भाग ५० वा  सापाची कात ..!


दुसऱ्या दिवशी मला डॉ. वझे यांनी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज दिला . कुटुंबियांना म्हणाले याला अश्या ठिकाणी ठेवले पाहिजे जेथून याला पळून जाता येणार नाही. .नाईलाजाने पुन्हा मला घरी आणले गेले , मी पुन्हा शपथा वगैरे घेतल्या , आई कडून गुपचूप पैसे घेऊन माझे पिणे सुरूच राहिले . पानटपरी वर माल आधी तुझे वागणे ८ दिवस नीट राहिले तर भरू असे भावाने आश्वासन दिले होते . एकदा सकाळी मी हाजो आपा कडे पुडी घ्यायला गेलो तर तेथे माझ्या सारखे जवळजवळ ५० गर्दुल्ले जमले होते , रात्री रेड पडली व आज पुडी मिळत नाहीय हे समजले . सर्व गर्दुल्ले घोळक्याने उभे राहून . आता कसे होणार अशी चिंता करत होते . काही जण नाशिक शहरात माल शोधायला निघून गेले , पण तेथेही माल मिळत नाहीय अशी बातमी आली होती . मी व माझा ऐक मित्र नेमके काय करावे या विवंचनेत उभे होतो . टर्की तर सुरु झालेली होती , जेव्हा माल मिळणार नाही असे ऐकले तेव्हा तर नेहमी पेक्षा जास्त त्रास सुरु झाला . मी रेल्वे स्टेशन च्या सिन्नरफाटा भागाकडील क्वार्टर्स मध्ये राहत होतो तशीच रेल्वे क्वार्टर्स ची ऐक वसाहत पलीकडच्या सुभाष रोड च्या भागाकडे देखील होती , तेथे रवी नावाचा गर्दुल्ला माल विकतो आहे असे कोणीतरी सांगितले . हा रवी आम्हाला पहिल्यांदा जेव्हा गांजाच्या अड्ड्यावर भेटला तेव्हा तब्येतीने एकदम मस्त होता , सावळा , उंच डेरिंगबाज म्हणून प्रसिद्ध होता मात्र नंतर जेव्हा आम्ही गर्दच्या व्यसनात अडकलो तेव्हा रवी ची अवस्था माझ्यापेक्षा लवकर खराब होत गेली होती तो चोऱ्या करू लागला होता , जेल मध्ये देखील जाऊन आला होता , त्याला घरातून हाकलून दिले होते असे ही कानावर आले होते , सुभाष रोड च्या रेल्वे क्वार्टर्स मधील काही ऐका खोलीची काही क्वार्टर्स अतिशय पडक्या अवस्थेत होती त्या मुळे तेथे कोणीच राहत नसे त्या पैकी एका खोलीत सध्या रवी राहतो आणि तेथेच तो माल देतो आहे असे कोणीतरी सांगितले म्हणून तेथे गेलो .

खोलीला दार वगैरे नव्हतेच , थंडीचे दिवस होते म्हणून अर्धवट दाढी वाढलेला रवी ऐक फाटकी गोधडी अंगावर घेऊन हातात पन्नी घेऊन बसलेला दिसला , त्याला पन्नी हातात घेऊन बसलेला पाहिल्यावर त्याच्या कडे माल आहे अशी खात्री वाटून आम्ही जवळ गेलो तर पन्नी वर ब्राऊन शुगर च्या द्रवरूप काळ्या मला ऐवजी भलतेच काहीतरी दिसले आणखी जवळ गेलो , त्या खोलीत ऐक उग्र दर्प पसरला होता . आम्हाला पाहून त्याने पन्नी बाजूला ठेवली . ' यार , तेरे पास माल है ऐसा सुनकर आये है ' असे रवीला म्हणालो तर हसला म्हणाला ' माल असता तर मी सापाची कात चेस करत बसलो नसतो .' हे एकून आम्हाला धक्काच बसला त्याने पन्नी वर उचलून दाखवली तर त्यावर साधारण १ सेंटीमीटर लांबरुंद असा ऐक तपकिरी असा सापाच्या कातीचा अर्धवट जळलेला तुकडा दिसला हळूच त्याने बाजूच्या पोत्या खाली हात घालून ऐक मोडकी तोडकी सापाची कात बाहेर काढली व म्हणाला हे प्यायलो आहे सकाळपासून त्यामूळे जरा माझी टर्की कमी झालीय . आम्हाला जरा नवल वाटले ब्राऊन शुगर ची टर्की सापाच्या कातीने कशी कमी होईल ? पण रवी ठाम सांगत होता म्हणून विश्वास ठेवावा लागला . ती बहुधा नागाची कात असावी , कुठून आणली असे विचारले तर त्याने सांगितले की बाजूच्या तशाच पडक्या खोलीत त्याला ती खाली पडलेल्या मोडक्या कौलांच्या ढिगा खाली सापडली होती . त्याने पुन्हा पन्नी ला खालून जळती काडी लावून तो तुकडा खालून धग देत जाळणे आणि त्याचा वर येणारा उग्र धूर तोंडात ओढणे सुरु केले , मग माझ्या पुढे पन्नी केली मी जरा बिचकलो , पण वाटले जर टर्की कमी होत असेल तर काय हरकत आहे ओढायला . मी पण ऐक दम मारला खूप कडवट असा धूर तोंडात गेला तसा मला एकदम खोकला येऊ लागला , इतका प्रचंड खोकला की अगदी डोळ्यातून पाणीच आले . मला हा प्रकार अजिबात रुचला नाही मात्र रवी अगदी आरामात दम मरत होता , बाजूला त्याने गांजाची चिलीम भरून ठेवली होती त्याचेही दम तो मारत होता , माझा दुसरा मित्र तर हादरलाच होता त्याने त्या सापाच्या कातीचा दम मारण्यास स्पष्ट नकार दिला . मी धीर करून आणखीन ऐक दम मारला मात्र या वेळी एकदम उलटीच झाली मला . तेथून लगेच सटकलो आम्ही . ( नंतर , काही महिन्यातच रवी ला वेड लागलेय असे समजले , ऐक दोन वेळा तो रस्त्यात दिसला फाटके कपडे , दाढी , केस वाढलेले , हातात ऐक मळकी पिशवी होती , त्याच्या जवळ गेलो तेव्हा त्याने मला ओळखले नाही , त्याच्या डोळ्यातील चमक निघून गेली होती , अगदी बारीक झाला होता , काहीच न बोलता माझ्या कडे फक्त पाहत राहिला , शेवटी मी निघून पुढे निघून गेलो . लवकरच रवी मरण पावला अशी बातमी समजली )

रवी कडून त्या सापाच्या कातीचे दम मारून ही माझी टर्की काही कमी झाली नव्हती . पुन्हा हाजो आपा , तिचा भाऊ चुलत भाऊ हनीफ याचा अड्डा , वास्को हॉटेल समोर ताडीच्या दुकानाच्या मागे असलेला भाबी चा अड्डा सगळ्या ठिकाणी फिरलो पण कुठेच ब्राऊन शुगर मिळत नव्हती . कल्याण ला नाशिक पेक्षा स्वस्त माल मिळत असे , काही गर्दुल्ले दर दोन दिवसांनी कल्याण हून माल आणत असत हे आम्हाला माहित होते पण आम्ही कधी तसे केले नव्हते , शेवटी मी माझ्या मित्राने कल्याण ला माल आणायला जाण्याचे ठरवले रेल्वेने जेमतेम तीन तासात कल्याण ला जाता येत होते . आम्ही रेल्वे स्टेशन वर आलो समोर ' हावरा मुंबई एक्प्रेस उभी होती , ती पकडली आणि कल्याण कडे रवाना झालो , तिकीट काढण्याची भानगड नव्हतीच माहित आम्हाला ,टी सी ला कसे चुकवावे हे चांगले ठाऊक होते .

=================================================================
भाग ५१ पोलिसी प्रसाद ! 


आम्ही ब्राऊन शुगर च्या शोधात नाशिक कल्याण ला निघालो होतो , नाशिक मधील अनेक जण आठवड्यातून कल्याणहून माल आणत कारण नाशिक ला त्या वेळी जी पुडी १० रु . ना मिळत होती त्याच्या पेक्षा जास्त माल भरलेली म्हणजे ज्याला गर्दुल्ल्यांच्या भाषेत ' सडड्म ' पुडी असे म्हणतात ती पुडी कल्याण ला केवळ ४ रु . त मिळत असे , अनेक जण तेथून एकदम दोन तीन दिवसांचा माल आणून तो पुरवून पीत आणि संपला की पुन्हा कल्याण ला जात , मी मात्र प्रथमच माल आणायला कल्याण ला निघालो होतो . दुपारी ३ च्या सुमारास आम्ही कल्याण ला पोचलो , रेल्वे स्टेशन च्या बाहेर आलो तर बाहेर बूटपॉलिश करणारी , तसेच चप्पल शिवणारी वगैरे मुले बसलेली दिसली , त्या पैकी दोन तीन जण भर रस्त्यावर डोक्यावर ऐक पोते किवा कांबळ पांघरून त्याचा आत चेसिंग करत बसलेले दिसले , त्यांना इतके उघड ब्राऊन शुगर पिताना पाहून मला नवल वाटले , मग समजले की या लोकांना पोलीस पकडत नाहीत कारण ऐक तर त्याच्या कडून काही पैसे मिळण्याची शक्यता नसे आणि दुसरे म्हणजे त्यांना पकडून कोठडीत डांबल्यावर ते टर्की त खूप तेथे खूप धिंगाणा करत असत , म्हणजे , भिंतीवर डोके आपट ,उलट्या कर , मोठमोठ्याने विव्हळणे वगैरे प्रकार पोलिसांसाठी त्रास दायक असत शिवाय ब्राऊन शुगर पिऊन त्यांची तब्येत खराब झालेली असे , टर्कीत तर ही अवस्था अधिकच खराब होई व जर त्यांना कोठडीत असतांना काही बरे वाईट झाले तर ती जवाबदारी नको म्हणून पोलीस शक्यतो त्यांना हात लावत नसत , अगदीच नाईलाजाने मोठ्या चोरी वगैरे प्रकरणात एखादा गर्दुल्ला पकडला तर त्याला कोठ्डीत असे पर्यंत पोलिसांना स्वतःकडील छाप्यात पकडलेली ब्राऊन शुगर द्यावी लागे , किवा जर चौकीत जप्ती ची ब्राऊन शुगर नसेल तर मग अड्ड्यावरून आणून द्यावी लागे .

आम्ही कल्याण ला ' बैलबाजार ' या विभागात ब्राऊन शुगर मिळते ही माहिती काढली होती त्यानुसार तेथून जवळच असलेल्या ' बैल बाजारात ' पोचलो . एका घरात हा धंदा होता . आमच्या कडे एकूण ५० रुपये होते त्या पैकी ४० रुपयांच्या १० पुड्या घेतल्या आणि परत निघालो , आता टर्की खूप वाढली होती , सकाळपासून मालासाठी खूप वणवण झाली होती , एकदाचा माल हातात पडल्यावर तर जास्तच टर्की जाणवू लागली कधी एकदा चेसिंग करतो असे झाले होते आम्हाला , पण रस्त्याच्या बाजूला आडोशाला बसून प्यायला भीती वाटत होती , कारण आम्ही तेथील स्थानिक नव्हतो व आमच्या अंगावरचे जरा बरे कपडे पाहून पोलिसांनी आम्हाला नक्कीच हटकले असते . पोलीस एकदम भणंग गर्दुल्ल्याला हात लावत नाहीत मात्र कोणी जरा बरा पांढरपेशा दिसणारा सापडला तर तो मात्र त्यांचे सावज बनत असे . शेवटी कल्याण रेल्वे स्टेशन च्या समोर असलेल्या बस स्थानका वर गेलो , तेथे कोप-यात सुटायला बराच वेळ असलेल्या बाहेरगावी गाणाऱ्या रिकाम्या बसेस उभ्या होत्या , त्या पैकी एका बस मध्ये शिरलो , थंडीचे दिवस असल्याने लवकर अंधार पडू लागला होता , बसमध्ये खाली बसून आमचा कारभार सुरु झाला पटापट दोन पुड्या संपवल्या , तितक्यात ती बस सुटणार म्हणून एकदम आठदहा लोक बस मध्ये शिरले , तसे तिथून बाहेर पडलो , खिशात अश्या पुड्या ठेवणे जोखमीचे काम होते म्हणून आम्ही वर फक्त ५ पुड्या ठेवल्या होत्या व उरलेल्या पाच आमच्या बनियान च्या खालच्या बाजूला असलेली शिवण उसवून त्यात एकाकडे तीन आणि एकाकडे दोन आशा पुड्या लपवल्या होत्या , बस मधून खाली उतरून आम्ही मग बस स्टँड च्या बाजूला असलेल्या सार्वजनिक शौचालयात शिरलो तेथे ऐक संडास रिकामा होता त्यात दोघे घुसलो आणि दार लावून घेतले , आणि मग वर ठेवलेल्या तीन पुड्या काढून त्या पन्नीवर टाकून ओढणे सुरु केले , बराच वेळ गेला , एकदोन वेळा कोणीतरी दार वाजवले पण आम्ही काहीच उत्तर दिले नाही , मग ती दार वाजवणारी व्यक्ती बाजूला रिकाम्या असलेल्या संडासात गेली असावी .
सुमारे तासभर आम्ही त्याच संडासात होतो , तिन्ही पुड्या संपल्यावर आम्ही बाहेर पाडण्याकरिता दार उघडले , तितक्यात दोन पोलीस शौचालयात बाहेरून आत शिरताना दिसले , पण आता उशीर झाला होता आधी मी संडास चे दार उघडून बाहेर पडलो आणि मग त्याच संडासातून माझ्या मागोमाग माझा मित्र बाहेर पडलेला पाहून त्यांना आश्चर्य वाटणे स्वाभाविक होते , त्यांनी आम्हाला थांबवले व चौकशी सुरु केली सर्वात पहिला प्रश्न होता की ' तुम्ही दोघे एकदम एका संडासात काय करीत होतात ? ' मी चटकन उत्तर दिले की ' साहेब मी एकटाच गेलो होतो संडासला पण आतील नळ माझ्याच्याने उघडत नव्हता म्हणून या मित्राला आत बोलावले होते आणि आम्ही बाहेर पडणार तितक्यात आपण आम्हाला पहिले ' पोलिसांचा यावर विश्वास बसने कठीणच होते , त्यांनी आमचे नाव गाव विचारले , मग येथे कल्याण ला कशाला आलात असे विचारले तेव्हा ' आम्ही नोकरी शोधायला आलो होतो ' असे सांगितले . मात्र त्यांचे समाधान झालेले नव्हते , शेवटी त्यातील एकजण म्हणाला ' तुम्ही , संडासात समलैंगिक काम करत होतात अशी माझी खात्री आहे ' त्याने एकदम भलताच आरोप लावला होता , अर्थात त्याचे एका परीने योग्यच होते कारण एका संडासात दोन पुरुष एकदम काय करू शकतील या बाबत त्याचे डोके तेव्हढेच चालले होते . मग आम्ही एकदम गयावया करू लागलो तेव्हा थांबा तुमची झडती घेतो म्हणून आमचे खिसे तपासू लागला , शर्टाच्या वरचा खिशात आमचे कॉलेज चे ओळख पत्र सापडले व मग माझ्या पँट च्या मागील खिशात त्याला घाईघाईने ठेवलेला चेसिंग करायचा चेसर ( म्हणजे , पन्नीवरून बाहेर पडणारा धूर तोंडात घेण्यासाठी जी कागदाची पुंगळी करतात तिला पाईप किवा चेसर असे म्हणतात ) सापडला तसे त्यांना समजले की आम्ही गर्दुल्ले आहोत , मग दोघेही हसले , त्यांना देखील आपण या दोघांवर भलताच संशय घेत होतो याची गम्मत वाटली असावी , मग त्यांनी आम्हाला जवळच्या पोलीस स्टेशन ला नेले , सुदैवाने त्यांनी आमची समग्र झडती घेतली नाही , नाहीतर त्यांना बनियान मध्ये लपवलेल्या पुड्या देखील सापडल्या असत्या . पोलीस स्टेशन ला तेथील साहेबांनी आम्हाला दम दिला तुम्ही इतक्या दुरून ब्राऊन शुगर घ्यायला आलात म्हणून तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे म्हणत आमच्या दोघांच्या पायावर आणि तळहातावर चार चार दंडे ओढायला हवालदारांना सांगितले . कळवळत कसेतरी दंडे खाल्ले . मग त्यांनी आम्हाला सोडून दिले , खरे तर त्यांनी कमीच शिक्षा केली म्हणून आम्ही मनातून आनंदी होतो , कदाचित आमचे दोघांचे कोवळे चेहरे आणि भाबडे चेहेरे पाहून त्यांना दया आली असण्याची देखील शक्यता आहे .=================================================================
भाग ५२ वा नरोत्तमदास माधवदास मनोरुग्णालय. ठाणे !

पोलिसांच्या तावडीतून दंडे खाऊन सुटल्यावर आम्ही कल्याण रेल्वे स्टेशनवर येऊन बसलो . पोलिसांनी पकडल्याचा मानसिक ताण आणि पायाच्या पोटऱ्या व तळहातावर बसलेल्या मारामुळे सगळी नशा उतरली होती , आम्ही दोघेही एकमेकांना दोष देत बसलो होतो , मित्र मला म्हणत होता ' तू नीट बाहेरचा अंदाज न घेता संडासचे दार का उघडले ? ' तर मी त्याला म्हणत होतो ' तुला लगेच घाईने माझ्या पाठी बाहेर येण्याची काय गरज होती ? ' खरे तर दोष कोणाचाच नसतो अश्या वेळी ती ' वेळ ' च आलेली असते एखादी घटना घडण्याची . जिवनात येणाऱ्या प्रत्येक दुखःद प्रसंगातून , मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनातून , संबंधित व्यक्तींनी काहीतरी धडा घ्यावा अशी योजना असते निसर्गाची पण माणूस अहंकारामुळे धडा घेण्या ऐवजी चूक कोणाची हे शोधात बसतो किवा दैवाला दोष देतो . कल्याण हून परत नाशिक ला येताना वाटेत रेल्वेत आम्ही उरलेल्या पुड्या संपवून टाकल्या. दुसऱ्या दिवशी पर्यंत नशिक मध्ये सगळे अड्डे सुरळीत सुरु झालेले होते झालेले होते . दिवसेंदिवस मला ब्राऊन शुगर साठी पैसे मिळणे कठीण होत चालले होते , वडील आणि भावाने आईकडे कमीत कमी पैसे राहतील याची दक्षता घेण्यास सुरवात केली होती , आईच्या शिवणकामाच्या पैश्यांचा देखील ते तिला हिशेब मागत असत त्यामूळे अगदी काकुळतीला येऊन आई मला कसेतरी पैसे देत असे , तिला असे नेहमी त्रास देणे मलाही कष्टप्रद होत असे पण टर्की सुरु झाली की माझा सारा सद्सद्विवेक निघून जाई , एकदा पैसे हाती पडून माल पिऊन झाले की मग परत पश्चाताप होई मात्र कितीही पश्चाताप झाला तरी व्यसन कायमचे बंद करणे जमत नव्हते . दारू आणि इतर मादक पदार्थ यातील प्रमुख फरक असा सांगता येईल की दारूच्या व्यसनी व्यक्तीला जेव्हा पैसे मिळत नसतील तेव्हा ती आक्रमक होण्याची शक्यता असते व नंतर दारू पिऊनही मनातील असंतोष , खुन्नस यामुळे नशेत आक्रमक होण्याची शक्यता असते तर ब्राऊन शुगर आणि तत्सम मादक पदार्थांचे व्यसनी पैसे मिळवण्यासाठी आक्रमक होऊ शकतात पण एकदा पैसे मिळून त्यांची नशा भागली की ते शक्यतो भांडणे वगैरे करत नाहीत असा माझा अनुभव आहे .

१२ वीत असतानापासून आधी दारू , गांजा चरस , भांग , ताडी , अफू असे करत करत माझे व्यसन आता ब्राऊन शुगर च्या टोकाच्या अवस्थेला पोचले होते , गेल्या ४ वर्षात जेवण , शांत झोप आणि इतर व्यक्तिगत जवाबदा-या यांचे संतुलन केव्हाच बिघडले होते व त्याचा साहजिकच तब्येतीवर परिणाम झाला होता . मी देखील व्यसनमुक्ती साठी काहीतरी ठोस केले पाहिजे या विचारात होतो तेव्हाच माझा ऐक जवळचा मित्र अचानक एकदा भेटला तो गेले बरेच दिवस दिसला नव्हता त्याची तब्येतही चांगली झालेली दिसली तेव्हा त्याने सांगितले की त्याच्या कुटुंबियांनी कुठूनतरी माहिती काढून त्याला ठाणे येथील ' मेंटल ' हॉस्पिटल मध्ये व्यसनमुक्ती साठी दाखल केले होते व तेथे तो सुमारे महिनाभर राहून आला होता , त्याची तब्येत पाहून मला त्याचा हेवा वाटला व मलाही वाटले आपणही असे उपचार घेतले पाहिजेत पण ' मेंटल ' हॉस्पिटल म्हणजे जरा मन कचरत होते , मी काही वेडा थोडीच होतो ? तरीही तेथे व्यवस्था वगैरे कशी असते याची त्याच्याकडे चौकशी केली तर त्याने तू जा आणि स्वतः अनुभव घे असे त्रोटक उत्तर दिले , तो जरी तेथून व्यसनमुक्त होऊन आला होता तरी त्याने माझ्या आग्रहाखातर माझ्या सोबत ऐक दोन दम मारलेच . मी त्याच दिवशी घरी ' मेंटल ' हॉस्पिटल बद्दल सांगितले तेव्हा घरच्यांना जरा बरे वाटले मी उपचार घेण्यास तयार आहे हे पाहून त्यांनी लगेच ठाण्याला असलेल्या आमच्या नातलगांना फोन लावला व सविस्तर चौकशी करण्यास सांगितले . दोन तीन दिवसातच ठाण्याच्या नातलगांनी कळवले की सध्या मेंटल हॉस्पिटल चे सूपरीटेंड असलेले डॉ , केळकर यांची त्यांनी भेट घेतली होती व माझ्या बद्दल माहिती दिली तेव्हा त्यांनी अगदी निश्चिंत पणे दाखल होण्यास हरकत नाही असा निर्वाळा दिला होता .

असा निरोप एकून माझाही आत्मविश्वास वाढला व मी ठाण्यास जायला तयार झालो , सकाळी पंचवटी एक्प्रेस ने नाशिकहून आई वडील आणि मी असे तिघे ठाण्याला पोचलो तेथे ऐक दिवस नातलगांकडे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी ' मेंटल ' हॉस्पिटल ला जाण्यास निघालो . आम्ही मेंटल हॉस्पिटल च्या गेट जवळ पोचलो सोबत माझा ठाण्याचा चुलतभाऊ देखील होताच त्यानेच डॉ . केळकर यांना भेटून चौकशी केली होती . गेटजवळ येताच मी गेटकडे पहिले भव्य असे उंच प्रवेश द्वार होते मोठा दिंडी दरवाजा अर्धवट उघडा होता , इंग्रजांच्या काळातील बांधकाम केलेल्या त्या दिंडी दरवाजावरील पाटी वाचली ' नरोत्तामदास माधवदास मनोरुग्णालय ' स्थापना १९०१ असे लिहिले होते त्यावर . क्षणभर मी थबकलो , माझ्या सारख्या स्वतःला शहाण्या समजणाऱ्या व्यक्तीवर आज व्यसनामुळे चक्क मनोरुग्णालयात दाखल होण्याची पाळी आली होती , लहानपणी आम्ही मुले एकमेकांना चिडवताना डोक्याभोवती हाताचे ऐक बोट फिरवून ' मेंटल ' आहे किवा याला ' मेंटल' ला टाकले पाहिजे अश्या अर्थाची खुण करून हसत असू ते आठवले . चि. वी . जोशी यांच्या चिमणराव या व्यक्तिरेखेच्या पुस्तकात ' मेंटल ' हॉस्पिटल चा उल्लेख आणि तेथील गमती जमती वाचल्या होत्या आणि आता मी त्या अनुभवास समोरा जाणार होतो म्हणून मनात थोडीशी उत्सुकता देखील होती . उपचार घ्यायचे म्हणून सकाळीच मी सोबत घेतलेला ब्राऊन शुगर चा साठा संपवला होता . आम्ही गेटजवळ डॉ . केळकर यांची चौकशी केली तेव्हा ते घरी असल्याचे समजले त्यांचे घर हॉस्पिटल च्याच बाजूला होते , प्रशस्त असे आवार असलेले ता घर देखील ब्रिटिशांच्या काळात बांधलेले होते , बाहेर मोठी बाग आणि दगडी इमारत , तेथील शिपायाने कोणीतरी भेटण्यास आल्याचा निरोप दिला तेव्हा डॉ , केळकर बाहेर आले , साधारण पन्नाशीच्या पुढे त्यांचे वय असावे,मध्यम उंची , केस थोडे पांढरे , चष्मा , प्रेमळ चेहरा असे ते व्यक्तिमत्व होते , त्यांनी माझी माहिती घेतली , मग माझी तपासणी केली , रक्तदाब व नाडी वगैरे पहिली मग ब्राऊन शुगर मिळाली नाही तर काय काय त्रास होतो याची माहिती मला विचारली ,मी सगळे सविस्तर सांगितले त्यांना , मग त्यांनी एका फॉर्मवर माझी माहिती भरली आणि त्यावर माझी व वडिलांची सही घेतली आणि माझी रीतसर अँडमीशन झाली तेथून पुन्हा मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो मला वार्ड न. १९ ( ऑबझरव्हेशन वार्ड ) मध्ये दाखल करण्याचे केळकर सरांनी सांगितले होते .

=================================================================

भाग ५३ वा मनोरुग्णालयाचे अंतरंग ! 


मुख्य प्रवेशद्वारावर आम्ही माझा अँडमिशन फॉर्म दाखवला तेव्हा ते अर्धवट उघडे असलेले मोठे दार आतील व्यक्तीने पूर्ण उघडले , आत गेटच्या जवळच ऐक कौलारू खोली होती चेकपोस्ट सारखी , बाहेर व्हरांड्यात एका लाकडी बाकावर पांढरा शर्ट आणि पांढरी पँट घातलेले दोन तीन जण बसले होते त्या पैकी एकाने तो फॉर्म पाहून त्यांच्या कडील रजिस्टर वर काहीतरी नोंद केली व वडिलांकडे १८० रुपये मागितले , म्हणजे ऐक महिन्याचे एका दिवसाला राहण्या जेवण्याचे मिळून फक्त ६ रुपये अशी फी होती . फी घेऊन त्याची पावती त्याने दिली मग त्यांच्यापैकी ऐक जण आम्हाला घेऊन वार्ड नंबर १९ कडे निघाला , आम्ही दुपारी २ वा . येथे आलो होतो आणि प्रवेश प्रक्रियेत सुमारे ५ वाजले होते . आत ऐक छान छोटासा डांबरी रस्ता सरळ जात होता , रस्त्याच्या कडेला दुतर्फा फुलझाडे लावलेली होती व त्यांची निगा व्यवस्थित राखली जर असावी असे दिसत होते , तसेच त्या झाडांच्या कडेला जमिनीत अर्धवट विटा पुरून बोर्डर तयार केली होती पांढरा आणि लाल रंग त्या विटाना दिलेला होता , माझी नजर चौकसपणे भिरभिरत होती , रस्त्याच्या डाव्या बाजूने एकदोन दगडी इमारती लागल्या , तर उजव्या बाजूला ऐक कौलारू बैठी इमारत , ऐक दुमजली चाळीवजा इमारत , परत ऐक कौलारू बैठी इमारत लागली पुढे वळणावर वळून आम्ही थेट जात राहिलो , मी उत्सुकतेने कोणी वेडी माणसे दिसतात का ते पाहत होतो तर फक्त एकदोन जण मला दिसले ते शांतपणे रस्त्यावर येरझारा घालत होते अंगावर थंडीचे ऐक काळे स्लीवलेस जाकेट आत मळकट पांढरा वाटणारा बिनकॉलर चा सदरा आणि खाली ढगाळ अर्धी मळकी चड्डी असा त्यांचा वेश होता , रस्त्याने चालताना बाजूच्या इमारतीतून भांड्यांचे , लोकांच्या बोलण्याचे , ओरडण्याचे वगैरे आवाज येत होते . आमच्या सोबत च्या माणसाने सांगितले की आता सर्वांची संध्याकाळच्या जेवणाची वेळ झालीय म्हणून सगळीकडे सामसूम आहे , मला आश्चर्य वाटले सायंकाळ चे जेमतेम साडेपाच होत आले होते आणि ही अशी कशी रात्रीच्या जेवणाची वेळ ? मी त्याला तसे विचारले तेव्हा त्याने सांगितले की सरकारी रुग्णालयात हीच वेळ असते रात्रीच्या जेवणाची . आम्ही एका बैठ्या इमारतीजवळ पोचलो त्याचे गेट इमारतीच्या मध्यभागी होते , लोखंडी जाळीचे ते मजबूत दार आतून साखळी आणि त्याला कुलूप लावून बंद केलेले होते .

आमच्या सोबतच्या माणसाने दारावर हातातील दंडुक्याने आवाज केला तेव्हा आतून ऐक तसाच पांढरा शर्ट आणि पांढरी विजार घातलेला माणूस आला व त्याने दार उघडले , " पेशंट कोण आहे ' असे विचारले तेव्हा आमच्या सोबत च्या माणसाने माझ्याकडे बोट दाखवल्यावर त्याने फक्त मला आत येऊ दिले माझा फॉर्म घेतला , माझे आईबडील आणि चुलत भाऊ बाहेरच थांबले होते त्यांना थोडे तसेच थांबायला लावले त्याने आणि आतून दार लावून त्याने मला बाजूला असलेल्या खोलीत नेले मला म्हणाला ' तुझे खिसे दाखव ' , मी दोन्ही हात वर केल्यावर त्याने खिशात हात घालून खिसे तपासले , पैसे वगैरे नव्हतेच काही , पण दोनचार बिड्या आणि काडेपेटी निघाली आणि माझे कॉलेजचे आयकार्ड होते ते त्याने काढून टेबलावर ठेवले , मग म्हणाला तुझे कपडे काढ , तुला आता सरकारी कपडे देतो मी असे म्हणून त्याने बाजूला पडलेल्या मळक्या कपड्यांच्या ढिगातून ऐक कधीकाळी पांढरा असणारा शर्ट ( बहुधा शर्टाला कॉलर नसेच तेथे ) काढला तो माझ्या अंगावर फेकला , त्या शर्टाला बटणे नव्हती तो बनियान घालतात तसाच मी अंगावर चढवला ,मग ऐक तसीच मँचिंग मळकी पांढरी ढगळ चड्डी दिली मला त्या चड्डीला बटणे किवा नाडी काहीच नव्हते मांजरपाटाचे हे कपडे होते , बटणे किंवा नाडी नसताना कंबरेवर चड्डी कशी टिकेल ? मी त्याच्या कडे प्रश्नार्थक मुद्रेने पहिले त्याला समजले मी काय म्हणतोय हसून म्हणाला इथे चड्डी ला नाडी व बटणे नसतात कारण नाडीचा वापर करून वेडे लोक फास लावून घेण्याची शक्यता असते , व बटणे सारखी तोडतात म्हणून हे असे असते . मग त्याने ती ढगळ चड्डी तिच्या दोन्ही बाजू आत मुडपून ( लुंगी बांधताना जश्या लुंगीच्या दोन्ही कडा कमरे जवळ खोचतात ) कंबरेवर टिकेल अशी कशी बांधायची ते शिकवले . नाईलाजाने मी ती चड्डी कमरेला बांधली , मग त्याने बाजूच्या कपाटातून ऐक उभे राहून वजन दाखवणारा ऐक वजन काटा काढला त्यावर मला उभे केले , मी देखील खाली वाकून वजन पहिले आणि मलाही धक्काच बसला माझे वजन फक्त ३९ किलो भरले होते .म्हणजे या चार वर्षात माझे वजन जवळ जवळ १५ किलो घटले होते . मग माझा हात धरून त्याने मला पुन्हा गेटजवळ आणले , बाहेर माझे आईवडील आणि चुलत भाऊ सचिंत मुद्रेने उभे होते , क्षणभर त्यांनी मला ओळखलेच नाही , मला अश्या मळक्या वेड्याच्या ड्रेसमध्ये पाहून आईला रडूच फुटले , वडीलही गंभीर झाले होते . आता मलाही रुडू येऊ लागले होते . सोबतचा माणूस आईवडिलांना धीर देत म्हणाला ' काही काळजी करू नका तुमच्या मुलाची आम्ही त्याची चांगली काळजी घेऊ ' मी बिड्या वगैरे सगळे त्याला सांगितले की मला रोज बिड्या लागतील ओढायला त्यावर त्याने ' मी देईन तुला बिड्या व इतर गरजेच्या वस्तू ' मग आई वडिलांकडे वळून हसत म्हणाला 'याच्या खर्चासाठी माझ्याकडे पैसे देऊन ठेवा " वडिलांनी ऐक पन्नास रु चि नोट काढून त्याला दिल्यावर इतकेच अश्या अर्थाने लाचारीने हसला तेव्हा त्याला आणखीन पन्नास रुपये वडिलांनी दिले .मग तो माझ्या पाठीवर हात थोपटत म्हणाला ' आता तू अगदी निर्धास्त रहा , कोणी काही त्रास दिला तर मला सांग , ' त्याने मग आईवडिलांना जाण्यास सांगितले आईने त्या लोखंडी गेटच्या जाळीतून आत हात घालून एकदा माझ्या तोंडावरून हात फिरवला आणि जड पावलांनी त्यांनी माझ्याकडे पाठ फिरवून ते जाऊ लागले . ते वळणावर दृष्टीआड होईपर्यंत मी पाहत होती त्यांच्याकडे . 


=================================================================

भाग ५४ वा  मेंटल गिनती ...!

आई वडील दिसेनासे होताच त्या मला कपडे देणाऱ्या माणसाचा सूर एकदम बदलला त्याने जरा करड्या स्वरात मला बजावले ' इथे नीट राहायचे , अजिबात फालतूपणा चालणार नाही , चल आता वॉर्ड मध्ये . असे म्हणत त्याने माझा दंड धरून मला आतल्या भागात नेले तेथे देखील ऐक जाळीचा दरवाजा होता साखळी आणि कुलूप लावलेला , ते कुलूप उघडून त्याने मला वार्ड च्या आतील भागात ढकलले आणि लगेच पुन्हा बाहेरून कुलूप लावून घेतले . सगळ्यात आधी काय जाणवले असेल तर ऐक अस्वच्छ पणाचा घाणेरडा दर्प सगळी कडे पसरून होता मला एकदम मळमळ ल्या सारखे झाले , तसाच कोपर्यात उभा राहून आतील भागाचे निरीक्षण करू लागलो , आंत एकून चार लाईनीत पलंग लावलेले होते प्रत्येक लाईनीत सुमारे १० पलंग असावेत म्हणजे एकून चाळीस पलंग होते आत , त्यातील ७० टक्के पलंग भरलेले होते म्हणजे त्यावर कांबळ पांघरून कोणीतरी झोपले होते , तर बाकीचे लोक पलगांच्या मधल्या रिकाम्या भागातून येरझाऱ्या घालत होते , मला आत आलेला पाहून लगेच माझ्या भोवती चारपाच जण गोळा झले , सगळ्यांचे चेहरे निस्तेज होते , दाढीचे खुंट वाढलेले आणि त्यांच्या अंगाला तो उग्र दर्प जणू चिकटून राहिलेला होता , जवळ येताच मी थोडा मागे सरकलो तेव्हा त्यातील ऐक जण म्हणाला ' डरो मत , ऐक बिडी दे दो ' मघा माझ्या खिशात निघालेल्या चारपाच बिड्या मी परत घेतल्या होत्या त्या झडती घेणाऱ्या व्यक्तीकडून पण माचीस मात्र त्याने मला दिली नव्हती ( कदाचित माचीस म्हणजे जाळपोळ करण्याचे साधन म्हणून त्याने खबरदारी घेतली असावी ) 

मी पटकन ऐक बिडी काढून त्या व्यक्तीला दिली , हलकेच स्मित करून त्याने लगेच इतर लोकांना ' ए , चलो बाजू हो जाओ सब ' असा दम दिला , व माझा हात धरून तो मला एका पलंगाजवळ घेऊन गेला , मला पलंगावर बसायला सांगितले व पलंगावर असलेल्या गादीखाली हात घालून ऐक माचीस चा काडी घासतात त्या भागाचा तुकडा काढला( आम्ही अश्या तुकड्याला टप्पर म्हणत असू ) , मी कुतूहलाने सगळे पाहत होतो , मग त्याने त्यांच्या त्या स्लीवलेस जाँकीटाच्या खिशात हात घालून ऐक माचीस ची काडी काढली व ती काडी त्या टप्पर वर घासून पेटवली , मग त्या जळत्या काडीने मी दिलेली बिडी पेटवून त्याने ऐक खोल झुरका मारला व माझ्या शेजारी चिकटून बसला , मी ताबडतोब थोडा बाजूला सरकलो कारण त्याची अशी जवळीक मला किळसवाणी वाटली , शिवाय त्याच्या अंगाला , कपड्यांना येणारा उग्र दर्प , पिवळे दात , सगळेच असहनीय होते , माझे असे दूर सरकणे त्याला जाणवले तेव्हा बिडीचा झुरका मारत शून्यात पाहत तो उद्गारला ' क्या करेगा , दो साल हो गये , मेरे घरसे कोई लेने कें लिये आया नही है ! ' मी काहीच प्रतिक्रिया न देता नुसताच त्याच्याकडे पाहत होतो , तो बहुधा त्या वार्ड मधील सिनियर व्यक्ती असावा ( म्हणजे जास्त दिवसांपासून राहणारा ) कारण त्याचे इतर सगळे ऐकत होते . मी सोबत एका पिशवीत माझी टूथपेस्ट , ब्रश , वाचायला ' मृत्युंजय ' आणि गीतेचे मराठी भाषांतर असलेले पुस्तक घेतले होते , व आईने त्यात जबरदस्ती ऐक लोणच्याची व मुराम्ब्याची बाटली टाकली होती , झडती घेताना त्या अटेंडंट ( मेंटल हॉस्पिटल मध्ये वॉर्ड बॉय सारखे किवा पहारेकऱ्या सारखे काम करणाऱ्या लोकांना सरकारी भाषेत अटेंडंट म्हणतात हे मला नंतर समजले , मात्र पेशंट त्यांना हवालदार म्हणत असत ) ने ती पिशवी तपासून मला ती नीट सांभाळण्याची सूचना दिली होती ती शबनम पिशवी माझ्या खांद्यालाच लटकलेली होती , त्या पिशवीकडे पाहून त्या सिनियर ने विचारले इसमे क्या है , यावर मी त्याला कुछ ,किताबे है , और आचार वगैरे असे सांगितल्यावर त्याचे डोळे एकदम चमकले ' कौनसी किताब 'असे विचारले तेव्हा मी मराठी असे उतर दिल्यावर मात्र त्याचा विरस झाल्यासारखे वाटले . 

त्याचे नाव गोपाल होते हे मला नंतर समजले तो दक्षिण भारतीय होता त्याच्या हिंदी उच्चारावरून ते स्पष्ट जाणवत होते . गोपाल ची बिडी अर्धी ओढून होते आहे तोच एकदम तीनचार जण जे इतका वेळ दुरून आमच्या कडे पाहत होते ते जाळ आले व त्यांनी गोपाल पुढे हात पसरले , ते त्याला ती उरलेली अर्धी बिडी मागत होते , गोपाल ने पुन्हा ऐक खोल झुरका मारला आणि त्या पैकी एकाच्या हातात ते बिडीचे अगदी थोडे उरलेले जळते थोटूक दिले त्या बरोबर तो बिडीचे थोटूक मिळालेला माणूस एकदम जोरात धावत सुटला व धावता धावतच बिडीचे दम मारू लागला आणि इतर आपल्यालाही ऐक झुरका मिळावा म्हणून त्याच्या मागे धावले , ते पाहून मला गम्मत वाटली बिडीच्या एका झुरक्या साठी ही सगळी धावपळ मी प्रथमच पाहत होतो .. ऐक शिटी वाजली आणि एकदम सगळे झोपलेले पटकन उठून बसले , मला समजेना इतक्यावेळ गाढ झोपल्यासारखे वाटणारे हे पलंगावरील लोक एका शिटी सरशी पटकन कसे उठले ते , मग तो मघाचा अटेंडंट आत आला आणि ' चलो गिनती कें लिये ' असे ओरडला त्या बरोबर सगळे पलंगाच्या मधल्या रिकाम्या भागात लाईनीने खाली बसले आता त्या अटेंडंट सोबत ऐक दुसरा अटेंडंट देखील होता तरुण मुलगाच वाटत होता त्यानेही पांढरा ड्रेस घातला होता . त्या दोघांनी मग लाईनीत बसलेले लोक मोजायला सुरवात केले ते प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून आकडे मोजत होते . गोपाल ने मला देखील हात धरून लाईनीत बसवले होते , माझ्याजवळ आल्यावर तो नवीन अटेंडंट थबकला त्याच्या सराईत नजरेने मी नवीन आहे हे ओळखले असावे , माझ्या डोक्यावर जरा जोरात चापट मारत त्याने आकडा मोजला हे मला जाणवले , हे गिनती चे नाटक सुमारे १५ मिनटे सुरु होते , मग त्यांचे समाधान झाल्यावर पुन्हा ते वार्ड ला बाहेरून कुलूप लावून निघून गेले आणि सगळे आतले लोक निर्धास्त झाल्यासारखे पलंगावर गेले .

=================================================================

भाग ५५ वा  भीषण रात्र ..!

गिनती हा प्रकार मेंटल हॉस्पिटल मध्ये खूप महत्वाचा असतो हे मला समजले , तेथील हवालदारांची ड्युटी बदलते तेव्हा व प्रत्येक जेवण आणि नाश्त्याच्या वेळेला ही गिनती केली जात असे , आता सायंकाळी ७ ला गिनती झाली म्हणजे सकाळपासून ड्युटीवर असलेला हवालदार जाणार आणि मघा जो तरुण हवालदार आला होता तो रात्रपाळी ला असणार हे गोपाल ने मला सांगितले , एव्हाना मला जांभया येणे सुरु झाले होते , सकाळी घरून निघताना मी माझ्यासोबत घेतलेला ब्राऊन शुगर चा कोटा संपवून टाकला होता व त्याला सुमारे १० तास उलटून गेले होते , अजूनही मला काही औषध वगैरे देण्यात आलेले नव्हते . मी आता रात्र कशी काढावी या विवंचनेत होतो .. पुन्हा गेट उघडण्याचा आवाज आला आणि तो मघाचा तरुण अटेंडट आत आला माझ्या कडेच पाहत ओरडला ' तुषार नातू ' .. तूच का ? मी मान हलवली तेव्हा त्याने मला त्याच्या मागे चालण्याचा इशारा केला , त्याच्या मागे एका व्हरांड्यात असलेल्या खोलीत गेलो तेथे ऐक टेबल , ऐक मोठे कपाट होते , टेबल समोरील खुर्चीवर ऐक सिस्टर बसलेली होती , तिने माझी फाईल पहिली व मला म्हणाली या गोळ्या घे , तिच्या हातात एकूण पाच सहा गोळ्या होत्या ..क्षणभर मी बिचकलो .इतक्या गोळ्या एकदम खायच्या या अर्थाने तिच्याकडे पहिले ..तर म्हणाली .घाबरू नकोस , तू काही मरणार नाहीस ..ब्राऊन शुगर पिऊन मेला नाहीस ..मग या गोळ्या तर साध्या आहेत ..मी खजील होत त्या गोळ्या तोंडात टाकल्या आणि तिने पुढे केलेला पाण्याचा ग्लास तोंडाला लावला ..सिस्टर च्या तोंडून ब्राऊन शुगर चा उल्लेख ऐकताच माझ्या मागे उभा असलेला त्या अटेंडंट ने माझ्या पाठीवर थाप मारली व म्हणाला ' रात्री गुपचूप झोपायचे ..अजिबात .तीन पाच केलेले चालणार नाही मला ' ( ' तीन पाच करणे' हा तेथील ऐक वाक्प्रचार होता ..याचा सरळ अर्थ असा की काही मस्ती ..गोंधळ किवा गडबड ).मी गुपचूप मान हलवली आणि गोळ्या खाऊन झाल्यावर त्याने मला परत त्या मोठ्या हॉल मध्ये आणून सोडले , माझा पलंग अगदी पहिल्या रांगेतील पहिलाच होता .. नवीन दाखल झालेल्या पेशंटला ..त्याने सहजपणे डोळ्यासमोर रहावे म्हणून असा एकदम समोरचा पलंग देतात हे मला नंतर समजले .

पलंगावर ऐक मळकट पांढरी चादर घातलेली होती आणि ऐक तसेच मळकट कव्हर असलेली उशी ठेवलेली होती , खालच्या बाजूला ऐक लाल रंगाचे ब्लँकेट व्यवस्थित गादीखाली फोल्ड मारून ठेवलेले दिसले ..मी माझ्या पलंगावर बसून माझ्या गळ्यातील पिशवी काढली आणि ती उशाच्या कडेला ठेऊन इकडे तिकडे निरीक्षण करत बसलो , ऐक बिडी काढून ती पेटविण्यासाठी गोपाल कडे काडी मागितली ..गोपाल माझ्या आसपासच वावरत होता मघापासून ..त्याने ऐक काडी काढून टप्पर काढले व ..बिडी मी पेटवून देतो म्हणाला मला समजेना .मग लक्षात आले त्या निमित्ताने त्याला ऐक दोन दम मारण्यास मिळणार होते ..त्याने माझ्या तोंडातून बिडी घेऊन ती स्वतच्या तोंडात ठेवली आणि पेटवली ..ऐक दोन झुरके 'शान मध्ये मारले आणि मग ती पेटती बिडी माझ्यापुढे केली ..गोपाल च्या तोंडातली बिडी पुन्हा मी तोंडात घेणे मला कसेतरीच वाटले ..त्याचे पिवळे दात आठवले ..अनेक दिवसात त्याने दात घासले नसावेत हे स्पष्टच होते ..माझी ही अवस्था गोपाळच्या ध्यानात आली असावी , त्याने शरमून आपल्या शर्टाच्या खालच्या कोपर्‍याने त्या बिडीचा खालचा भाग पुसल्या सारखे केले आणि मग म्हणाला ..अभी लो ! मनातल्या मनात मला हसूही आले .. त्याने ज्या शर्टाने ती बिडी पुसली होती ..तो शर्ट देखील फारसा स्वच्छ नव्हताच मुळी..पण आता माझ्या कडे जेमतेम दोन बिड्या उरल्या होत्या .. अशी अर्धी बिडी पिण्याची काटकसर करणे भाग होते .नाईलाजाने मी ती बिडी घेऊन झुरके मारू लागलो ..टर्की ने रंग दाखवायला सुरवात केली होती ..एकापाठोपाठ ऐक जांभया ..आणि शिंका सुरु झाल्या होत्या ..हात पाय दुखायला लागले होते ..पोटात ओढल्या सारखे व्हायला लागले होते .. पुन्हा तो मघाचा अटेंडंट गेटजवळ आला आणि त्याने मला हाक मारली .. जवळ गेलो तर म्हणाला हे दुध घे ..तुझ्या फाईल वर सकाळ संध्याकाळ दुध द्यायचे लिहिले आहे ..त्याच्या हातात ऐक ग्लास होता ..मी दुध तोंडाशी नेले तसे मला एकदम मळमळ सुरु झाली ..टर्की मुळे नॉशिया आला होता ..एकदम ओकारी आली मी ग्लास तसाच हातात धरून .ओकारी बाहेर पडू नये म्हणून तोंड घट्ट दाबून ठेवले पण शेवटी ..नाईलाज झाला आणि मला तेथेच गेट जवळ भडभडून उलटी झाली ..तो अटेंडंट सावध असावा तो लगेच बाजूला सरकला ..चार दोन शिव्या हासडल्या मला.. दुधाचा ग्लास हातातून खाली पडला होता सगळे दुध सांडले होते ..आणि वर मी केलेल्या उलटीचे थारोळे ..! पोटातील सगळे बाहेर पडले ..तरी सारखी उलटीची उबळ येत होती ..पोट दुखायला लागले .कसातरी अशक्त पणे उठून उभा राहिलो . 

तो अटेंडंट काळजी पूर्वक गेट उघडून आत आला व आधी माझ्या ऐक मुस्कटात लावली ' साले ... अब ये कौन साफ करेगा ? असे म्हणत त्याने खाली साचलेल्या थारोळ्या कडे बोट दाखवले ..मी असहाय होऊन त्याच्या कडे पाहत होतो. मग म्हणाला ' तुलाच हे साफ करावे लागेल आता ' व त्याने गोपाल ला खराटा आणायला सांगितले ..हे म्हणजे भलतेच झाले होते ..नुसताच उभा होतो .गोपाल ला माझी दया आली असावी त्याने ..मग माझ्या वतीने ते सगळे साफ केला मग तेथे पोछा मारला ( म्हणजे .घरात जसे फारशी एका फडक्याने पुसून घेतात तसे एका काठीला ऐक मोठे फडके बांधलेले असते ,ती काठी मोठ्या कौशल्याने फरशीवर हलवून त्या कपड्याने फारशी स्वच्च करण्याला पोछा मारणे असे म्हणत असत ) आता मी पूर्ण गलितगात्र झालो होतो .. घरी असा त्रास सुरु झाला की मी कसेही करून ब्राऊन शुगर मिळवत होतो ..पण इथे मी पूर्ण हतबल होतो .. जो त्रास होतोय तो गुपचूप सहन करणे इतकेच माझ्या हाती होते .इथून पळून जायला ही काही मार्ग नव्हता ..मी चांगलाच अडकलोय हे मी समजलो होतो ..गलितगात्र होऊन पलंगावर पडलो तर अंगाला काहीतरी टोचल्यासारखे झाले मग लक्षात आले की ती गादी कापसाने नव्हे तर काथ्याने बनवली होती व त्याच्या आतील काथ्याची बारीक टोके गादीच्या कव्हर च्या बाहेर आली होती .उशीही तशीच टोचणारी ..माझी सर्व त्वचा तापली होती अगदी चटके बसत होते आतून ..तडफड होत होती शरीर मनाची ..!
( बाकी पुढील भागात ) 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें